दि.११ ते १३ जानेवारी २०१९ च्या दरम्यान मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे पार पडले. या संमेलनात दि. १३ जानेवारीला माझ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळचे माझे मनोगत…
…………………………………………………………………………………
आजच्या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे, उपस्थित बंधू आणि भगिनींनो,
आज या ठिकाणी माझं पाहिलं पुस्तक ‘अशा तुडविल्या काटेरी वाटा’ याचं प्रकाशन आदरणीय प्रा.डॉ.रमाकांत कोलते यांच्या हस्ते व प्रसिद्ध चित्रकार बळी खैरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे, याबद्दल मला खुप खूप आनंद होत आहे. कोलते सर मला मराठीचे विषयाचे प्राध्यापक होते. आज त्यांच्याच हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे, हा एक अपूर्व योगायोग म्हणावा लागेल.
खरं म्हणजे माझ्या ह्या लिखाणामागे प्रा. डॉ. शरद कळणावत यांची प्रेरणा पाठीशी आहे. मी १९६७ ते १९७१च्या दरम्यान अमोलकचंद कॉलेज यवतमाळ येथे शिकत असतांना ते मला मराठी विषय शिकवीत होते.
त्यांनी एकदा म्हटले होते की, ‘साहित्यात सारेचजण जगत असतात; पण जे कागदावर उमटवितात ते साहित्यिक ठरतात.’ त्यांचे हे वाक्य लक्षात ठेऊन मी लिखाणकाम सुरु केले.
मी नोकरी लागण्यापूर्वी खेड्यात राहून गरिबीत जीवन जगत होतो. मी जर तसंच जीवन जगत राहिलो असतो, तर कदाचित मी लिहू शकलो नसतो. कारण ते रोजचेच जीवन झाले असते. ‘रोज मरे त्याला कोण रडे !’ याप्रमाणे जीवनप्रवास सुरु असता. त्याकाळात ज्या परिस्थितीत मी जगत होतो, हे त्या समुहाचं सार्वत्रिक जीवन होतं. सर्वचजण असे जगतात, मग माझ्या जगण्यात असं काय आगळंवेगळं होतं, ते मी लोकांना सांगू…? परंतु त्यावेळचं जगणं आणि नोकरीनंतरचं जगणं यात आमुलाग्र बदल झाला होता. म्हणून ते कागदावर उतरविणे मला महत्वाचं वाटलं.
आजच्या पिढीला ज्या सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यात, त्या काही त्यांना एकाएकी व आपोआप मिळाल्या नाहीत. त्यामागे मागील पिढीचा त्याग, कष्ट, निर्धार व डॉ. बाबासाहेब आंबेडकराची शिकवण आणि प्रेरणा याचे फार मोठे पाठबळ आहे. ही बाब आजच्या व येणार्या पिढीला कळणे आवश्यक आहे. हा उद्देश मी लिखाणामागे ठेवला आहे.
आजच्या काही उच्चशिक्षित पिढीचा काही अपवाद सोडला तर असा समज होत आहे की, आम्ही आमच्या अंगभूत गुणवत्ता, बुध्दीमत्ता व परिश्रमाच्या जोरावर यश मिळविले आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध येतो कुठे? आम्हाला कुठे स्कॉलरशिप व राखीव जागांचा फायदा मिळाला?
खरं म्हणजे आज आम्ही पाहतो की आमची मुले मोठमोठ्या पगारावर व पदावर विराजमान झालेले आहेत, तशा संधी त्यांच्या वाडवडीलांना, जातीव्यवस्थेमुळे – आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत गांजल्याने उपलब्ध झाल्या नव्हत्या. परंतु त्यांना स्कॉलरशिप मिळाल्याने शिकू शकले. राखीव जागा मिळाल्याने नोकरी व बढती मिळाली. परिणामत: आर्थिक परिस्थिती सुधारली. म्हणून त्यांच्या मुला-बाळांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाल्या. ही देण केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे. हे मर्म त्यांना कळणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हाही उद्देश या लिखाणामागे ठेवला आहे.
खेड्यातील जीवनमान अनेक बाबींनी दुषित झालेले असते. म्हणून ही वास्तवता लोकांसमोर यावी हा उद्देश सुध्दा या लिखाणामागे ठेवला आहे.
माझं हे स्वकथन नोकरी लागेपर्यंतच्या जीवन प्रवासापुरतं मर्यादित आहे. त्यानंतरच्या वाटचालीचं चित्रण लिखाणात मुद्दाम येऊ दिलं नाही. कारण त्यानंतर माझा प्रवास हळूहळू काटेरी वाटेच्या आवर्तनातून बाहेर पडून मखमली गालीच्याच्या वाटेने सुरु झाला होता. म्हणून मी या लिखाणाला ‘अशा तुडविल्या काटॆरी वाटा’ या शिर्षका पुरतेच मर्यादीत ठेवले आहे.
मी हे लिखाण कादंबरीच्या स्वरूपात न मांडता कथेच्या स्वरूपात मांडले. कारण कादंबरी हि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सलगपणे वाचावे लागते. कथा मात्र जी पाहिजे ती वाचता येते. म्हणून मी जीवनातील एकेक प्रसंग कथेमध्ये गुंफण्याचा प्रयत्न करीत गेलो.
शेवटी मी सांगू इच्छितो की माझं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी ह्या ठिकाणी जे पाहुणे लाभलेत त्यांचे मी मनापासून खूप आभारी आहे. हा सोहळा घडवून आणण्यात आणि आता जे सूत्रसंचालनकरीत आहेत ते डॉ. प्राध्यापक शांतरक्षित यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी मला लिखाण करीत असतांना काही मौलिक सूचना पण केल्या होत्या. म्हणून त्यांच्या प्रती विशेष आभार व्यक्त करणे त्यांना जरी आवडत नसले तरी त्यांचे आभार मानल्याशिवाय मला राहवत नाही.
आपण सारेजण या प्रकाशन सोहळ्यात सामील झालात याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनोमन आभारी आहे.
माझे हे लिखाण आपणास आवडेलच अशी अपेक्षा ठेऊन मी माझे मनोगत संपवितो.
धन्यवाद…
आर.के.जुमळे
Leave a Reply