२१ जूनचा योगदीन म्हणजे निव्वळ हिंदुत्ववादी कार्यक्रम

20 Jun

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या मागे निश्चित असा दृष्टीकोन लपलेला असतो. ६ डिसेंबर १९९२ला बाबरी मस्जिद पाडली. त्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले होते. म्हणून आंबेडकरी समाजासाठी हा दु:खद दिन असतो. परंतु त्यादिवशी बाबरी मस्जिद पाडण्यात आली, म्हणून हिंदूसाठी तो आनंदाचा दिवस झाला. तर मुस्लिमांसाठी हा काळा दिवस झाला. दुसरे म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पंतप्रधान अटलजींच्या नेतृत्वाखाली राजस्थानातील पोखरण येथे १९९८ साली ५ अणुचाचण्या यशस्वी केल्यानंतर त्याला सांकेतिक नाव ‘बुद्ध हसला ‘ असे दिले. जगात शांतता नांदावी असे तत्त्वज्ञान ज्या भगवान गौतम बुध्दाने सांगितले, त्यांच्याच नावाने अणुस्फोटाच्या हिंसाचाराची दहशत निर्माण करणाऱ्या चाचण्या घ्याव्यात, हे कृत्य सुध्दा ठरवूनच केलेले दिसते.
भाजपने निवडणुकीपूर्वीच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान घोषित करून टाकले होते. याचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संसदीय लोकशाही बदलवून त्या ठिकाणी अमेरिकेत असलेली अध्यक्षीय लोकशाही पध्दत प्रस्थापित करायची आहे. या देशात हिंदूची संख्या जास्त असल्याने थेट निवड पद्धतीने पंतप्रधान हा हिंदूच असेल. म्हणजे हिंदूचीच सत्ता कायम या देशात राहील, हा त्यामागे उद्देश आहे. अध्यक्षीय लोकशाही पध्दतीत देशव्यापी एकच मतदारसंघ असल्याने प्रवीण तोगडिया किंवा बाबारामदेव सारखे कडवे हिंदुत्ववादी महाभाग बहुसंख्यांकाच्या आधारावर या देशाचा अध्यक्ष झाला तर नवल वाटणार नाही. पण संसदीय लोकशाही प्रणालीत वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या जाती-धर्माचे प्राबल्य राहत असल्याने हे लोक निवडून येऊन पंतप्रधान बनणे अशक्य आहे. म्हणूनच निवडणुकी आधीच पंतप्रधान घोषित करण्याची प्रथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरु केली, हे उघड आहे.
आता २१ जून रोजी अंतरराष्ट्रीय योग दिवस माणविण्याच्या दृष्टीने मोदी सरकार मोठ्या प्रमाणात तयारी करीत आहे. हा दिवस कसा काय आला? ह्यामागे सुध्दा दूर दृष्टीकोन आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट महासभेत भाषण करतांना “अंतरराष्ट्रीय योग दिवस” घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्राच्या सदस्य असलेल्या १९३ देशांनी २१ जून रोजी “अंतरराष्ट्रीय योग दिवस” मानावा म्हणून मंजुरी दिली.
तसे पाहिले तर भौगोलिकदृष्ट्या २१ जून हा दिवस भारतीयांसाठी सोयीचा नाही. कारण एकतर ह्यावेळी पावसाळा असतो. मुलांच्या शाळा सुरु व्हायच्या असतात. तरीही २१ जूनच का? कारण २१ जून १९४० रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन झाले होते. म्हणून या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावर हेडगेवार यांची पुण्यतिथी साजरी व्हावी हा त्यामागे उद्देश आहे. ही बाब प्रकर्षाने कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी उजेडात आणली आहे.
हा दिवस साजरा होण्यासाठी मोदी सरकार खास तयारी करीत आहे. हा कार्यक्रम ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदणीकृत व्हावा, या पद्धतीने तयारी होत आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा त्यासाठी राबविण्यात येत आहे.
यात मुख्यत: योगगुरू रामदेवबाबा अग्रेसर आहेत. ते आपल्या पतंजली योगपीठाचे ५२०० शिक्षक, काही लोक व मुलांकडून सराव करून घेत आहेत. त्यांनी हा कार्यक्रम लोकांपर्यत पोहचविण्यासाठी ३५ मिनिटाचा विशेष pakejपॅकेज तयार केला आहे. हा पॅकेज देश-विदेशातील प्रशिक्षिकांपर्यंत पोहचविण्यात आले आहे. ह्या वर्षी पहिल्यांदा हा दिवस साजरा होत असल्याने चांगला कायम स्वरूपात आठवणीत राहावा, असाही त्यामागे दृष्टीकोन असल्याचे सांगण्यात येत आहे.
योगदिवसाचा मुख्य समारोह दिल्लीच्या राजपथवर होणार आहे. ज्यात खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ४५,००० लोकांसोबत योग करणार आहेत. यात दिल्लीतील शाळेचे मुले सामील होतील. त्याशिवाय देशातील ४८ लाख केंद्रीय कर्मचारी भाग घेतील. त्यांना गेल्या दोन महिन्यापासून योगाचे वर्ग आयोजित करून प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिवसाच्या समारोहासारखाच दूरदर्शन आणि इतर चॅनलवर सरळ प्रसारण करून योगदिनाचे इत्थंभूत वर्णन केले जाणार आहे. ह्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमात मोठमोठे नेते, अभिनेते, योगगुरू रामदेवबाबा भाग घेत असल्याचे जाहीर झाले आहे.
हा ३५ मिनिटाचा कार्यक्रम असेल. असे सांगितल्या जाते की केवळ दिल्लीच नव्हे तर देशाच्या सर्वच शहरात २१ जूनला सकाळी ७.०० वाजता सामुहिकपणे हा योग केला जाईल. या ३५ मिनिटात १३ प्रकारचे आसने असतील. विशेष म्हणजे यात भारतीय लष्करातील जवान सुध्दा भाग घेणार आहेत. सियाचीन ग्लेशियर पासून ते समुद्रापर्यंत आणि राजस्थानच्या रेगीस्तान पासून ते उत्तर-पूर्वच्या जंगलापर्यंत सेनाचे जवान या दिवशी योगा करून भारतीय जनतेला चकित करणार आहेत. खुद्द संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर मेरठ छावणीच्या सैनिकांसोबत भाग घेतील. तिन्हीही सेनाचे प्रमुख प्रधानमंत्री नरेन्द्र मोदीसोबत राजपथवर आपल्या जवानांसोबत हजर राहतील. असे मानण्यात येते की राजपथवर किमान ३ हजार जवान योग करतील. सैन्याचे सर्व कमांड व कोर ह्या दिवशी योगा करतील नौसेना व वायुसेना सर्व स्टेशनावर कार्यक्रम आयोजित करतील. नौसेना जगात कुठेही असतील, तेथे तेथे हा कार्यकम आयोजित करतील. पायदळ सेनेचे प्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग २००० सैनिकांसोबत राजपथवर हजर होणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे काही मागे राहणार नाहीत. त्यांनीही रेल्वेच्या १४ लाख कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळेदरम्यान योगाचा अभ्यास करावा, असे फर्मान काढले. एनसीसीचे जवळपास १० लाख कॅडेट देशातील वेगवेगळ्या भागात १९०० केंद्रात योग करणार आहेत. देशातील शाळा-कॉलेजचे लाखो विद्यार्थी यात भाग घेणार आहेत. ह्या दिवशी प्रधानमंत्री सोबत सर्व मंत्री, खासदार, अधिकारी-कर्मचारी, इतर महत्वाचे व्यक्ती पण योगा करतांना दिसतील. हा योगाचा कार्यक्रम विजय चौक ते इंडिया गेट पर्यंत जवळपास १.४ किलोमीटरच्या परिसरात होणार आहे. या ठिकाणी संरक्षणासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार आहे. ह्यावेळी दिल्ली पोलिसांशिवाय कमांडोज आणि एनएसजीचे जवान सुध्दा देखरेख करणार आहेत.
सांगायचे म्हणजे एकंदरीत हा कार्यक्रम अत्यंत जोरात साजरा करण्याची मोदी सरकारची जय्यत तयारी सुरु आहे. अशा ह्या अवाढव्य कार्यक्रमासाठी करोडो रुपयाचा चुराडा होणार आहे, हे काही वेगळे सांगायला नको !
दुसरीकडून ह्या योगा कार्यक्रमाला देशात विरोध सुध्दा होत आहे. परंतु त्याला प्रसारमाध्यमे विशेष प्रसिद्धी देत नाहीत, असे दिसून येत आहे. योगामध्ये सूर्यनमस्कार असल्याने एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेशी यांच्याव्यतिरिक्त काही मुस्लीम संघटनांनी विरोध केला. कारण मुस्लीम जमात अल्लाशिवाय कोणाहीपुढे झुकत नाहीत. योग करतांना काही हिंदू धर्माचे श्लोक म्हणावे लागतात. तसेच ‘ओम’ या प्रतीकाचा उच्चार करावा लागतो. ह्यालाही त्यांचा विरोध आहे.
विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया म्हणतात, ‘योग करतांना ओमच्या जागी अन्य कुणाचेही नाव घेणे म्हणजे भगवान शंकराचा अपमान आहे. ओम उच्चारात शंकराची आराधना होते, त्यामुळे ते बदलले जाऊ शकत नाही. यावरून योगाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा प्रचार करणे हा सुध्दा या दिवस साजरा करण्यामागचा नेमका उद्देश दिसत आहे.
आरएसएसचा अजेंडा म्हणजे ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा आहे. सूर्यनमस्कार, सर्वस्वती पूजन, गीता अध्ययन, शालेय शिक्षणात वैदिक धर्माचा अंतर्भाव, गंगानदी शुद्धीकरण, गोवंश हत्याबंधी, धर्मांतरविरोधी कायदे बनविणे, भगवतगीतेला राष्ट्रीय गंथाचा दर्जा देणे व परदेशात नेऊन भेट देणे, राम मंदिर बांधणे, ३७० कलम रद्द करणे, समान नागरी कायदा करणे, तीर्थस्थळाचा विकास करणे, संसदीय लोकशाहीच्या ऐवजी अध्यक्षीय लोकशाही आणणे इत्यादी अनेक हिंदुत्ववादी कार्यक्रम त्यांच्या अजेंडावर आहे. जोपर्यंत भाजपाच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत भारतीय जनतेला ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवून त्यांना हा अजेंडा राबवायचा आहे.
सुगावा प्रकाशनाचे प्रा. विलास वाघ म्हणतात, ‘देशात गरिबी, बेरोजगारी वाढत आहे. शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहेत. कुपोषणाने बालके मरत आहेत. गरिबांवर अन्याय-अत्याचार वाढत आहेत. या मुलभूत विषयांकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही. सरकार याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे आणि नको ते फॅड निर्माण करीत आहेत. आता त्यांनी योगाचे फॅड आणले आहे. सूर्यनमस्कारही एक अंधश्रद्धेचा भाग आहे. योगातील नमस्कार सूर्याकडे बघूनच केला पाहिजे का? सूर्याकडे पाठ करून केला तर तो नमस्कार होत नाही का? आणि योग कोणाला हवा आहे. ज्यांच्या पोटातील पाणी हलत नाही. जे हालचाल करीत नाहीत. त्यांनी काय करायचे ते करावे ! गरिबांचे, कष्टकऱ्यांचे, मजुरी करतांना रक्ताचे पाणी होत आहे. त्यांना योगाची काय गरज आहे? डोक्यावरून विटा आणि रेती वाहणाऱ्यांना योगाची काय गरज आहे? त्यांच्या पोटाला अन्नाची गरज आहे आणि ते पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे.’
विज्ञानवादी डॉ. दिवाकर भोयर म्हणतात, ‘प्राणायाम न केल्याने कर्करोग, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार इत्यादी रोग होतात, हे म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या साफ चुकीचे आहे. प्राणायाम आरोग्याला हानिकारक असून आपले आयुष्य दीर्घ राहत नसून मरणाला लवकर आवतन देण्याचा प्रकार आहे. श्वास रोखून धरल्याने शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तवाहिन्या प्रभावित होतात. परिणामत: अॅटॅक येण्याची दाट शक्यता असते. मेंदू बधीर होऊन बुद्धी भ्रष्ट झाल्याचे प्रकार प्राणायाम करणाऱ्या मनुष्यात हल्ली जास्त प्रमाणात आढळून येतात. कोणतीही नैसर्गिक प्रक्रिया ही शरीराला आरोग्यवर्धकच असते. प्राणायामची शरीराला गरज नसून ती शरीराला तारक असण्यापेक्षा मारकच आहे. शरीरावर लादलेले ते एक दुष्कर्म असून स्वत:हून स्व:तावर ओढवून घेतलेले एक अल्पजीवी मरणच आहे. (दि. ३ जुलै २०११ रोजी आयोजित विदर्भ साहित्य संमेलन सभागृह, नागपूर येथे आयोजित चर्चासत्रातील भाषण)
नागपूर वैद्यकीय कॉलेजचे तत्कालीन कॅन्सर विभाग प्रमुख व रेडिओलॉजिस्ट डॉ. कृष्णा कांबळे म्हणतात, “८० टक्के लोकांना योगा करण्याची गरज नाही. जे २० टक्के लोक शरीराने लठ्ठ व अनेक व्याधीने ग्रासलेले असतात, तेच लोक योगा-प्राणायाम करतात. कामकरी, कष्टकरी व शेतमजूर आणि लहान मुलांना कोठे प्राणायाम करण्याची गरज पडते? सर्वात चांगला व्यायाम म्हणजे रस्त्याने फिरण्याचा हा होय. प्राणायाम वगैरे हे कुचकामी असून उलट हानिकारक आहे. ते तारक नसून मारकच आहे. आपल्या शरीरात सेंसर असतात. सेंसर म्हणजे मेंदूला आज्ञा-सूचना देणारे तंत्र होय. शरीराला प्राणवायू सोबतच ग्लुकोजची सुध्दा आवश्यकता असते. त्याशिवाय शरीर हे सुदृढ राहू शकत नाही. रामदेवबाबाचे शिष्य दीक्षित होते. ते हार्टऍटॅकने मृत्यू पावलेत. रूढी, पारंपरिक श्रद्धा आणि आस्थेमुळे सर्वसाधारण जनता प्राणायामवर विश्वास ठेवतात. परंतु असे अनेक आजार हे आनुवंशिक असतात. प्राणायामामुळे रक्तात आम्लाचे प्रमाण वाढते. हे रक्त शरीरात घातक असते. त्यामुळे हृदयविकाराचा जोरदार झटका येण्याची दाट शक्यता असते. बहुतेक प्राणायाम करणारे लोक बघा- भ्रमित, बुद्धिभ्रष्ट, विसरभोळे व प्राणायामची नशा चढल्यासारखे आपणास आढळून येतात. (दि. ३ जुलै २०११ रोजी आयोजित विदर्भ साहित्य संमेलन सभागृह, नागपूर येथे आयोजित चर्चासत्रातील भाषण)
बौध्द धम्मात योगाला (पतंजलीच्या) कोणतेही स्थान व महत्व नाही. बौध्द धम्मात विपश्यनेला फार महत्व आहे. विपश्यना आणि योगसाधना यात अर्थाअर्थी कोणताही संबंध नाही. पतंजलीयोग हा ईश्वरवादावर आधारलेला आहे. आणि ईश्वरवाद हा ब्राम्हणवर्ण, जाती श्रेष्ठत्वावर आधारलेला आहे. म्हणून प्राचीन भारतातील अवैदिक तत्त्वज्ञानात योगाला कोणतेही स्थान नाही. योगाची सुरुवात ही ‘ओम’ या शब्दाच्या उच्चारणाने होत असते. ‘ओम’ हे ब्राम्हणी, वैदिक प्रतिक आहे. त्यामुळे योगाला कोणत्याही अर्थाने धर्मनिरपेक्ष म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे योगामध्ये ज्ञान-विज्ञान आहे, त्याने मनाला संयमित करता येते, असे सुध्दा अजूनतरी सिध्द झालेले नाही. आधुनिक औषधी व चिकित्साशास्त्रामध्ये योगाला कोणतेही स्थान नाही. फिजिओथेरेपी आणि योग यात फार मोठे अंतर आहे. कोणत्याही फिजिओथेरेपी केंद्रात योग शिकविल्या जात नाही. आधुनिक मानसशास्त्रात सुध्दा योगाला कोणतेही स्थान नाही. अपंगाच्या शाळेत सुध्दा योग शिकविल्या जात नाही. मनोरुग्णालयात सुध्दा योग शिकविल्या जात नाही. म्हणजेच आधुनिक ज्ञान-विज्ञानात योगाला कोणतेही स्थान नाही. ज्या महामानवांनी जागतिक मानवतेला फार मोठे योगदान दिले असे- भगवान बुध्द, येशू ख्रिस्त, संत कबीर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, कार्ल मार्क्स, लेनिन, अब्राहम लिंकन, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा कोणत्याही महामानवाने योगाभ्यास केलेला ऐकिवात नाही. तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा योग कार्यक्रम हा संपूर्णपणे ब्राम्हणवादी आणि हिंदुत्ववादी कार्यक्रम आहे, हेच सिद्ध होते.
एकमात्र खरे की जर फायदा झालाच तर योगगुरु रामदेवबाबा यांचा धन-संपती कमविण्याचा  आणि प्रसिद्धी पावण्याचा धंदा मात्र आणखी तेजीत येईल, यात वाद नाही.

Leave a comment