Archive by Author

सिंगापूर व मलेशियाचा प्रवास

25 May

 

परत आम्हाला विदेश पर्यटनाची संधी मिळाली. ह्यापुर्वी मी आणि माझी पत्नी कुसुम असे दोघेही थायलंडला मार्च २०१२ व मॉरिशसला मे २०१४ मध्ये विदेशी पर्यटनासाठी गेलो होतो. ह्यावेळेस आम्ही सिंगापूर आणि मलेशियाच्या प्रवासाला जायचे ठरविले. पूर्वी केसरी टूरनेच आम्ही प्रवासाला गेलो होतो. ह्यावेळी  सुद्धा केसरी टूरकडूनच जानेवारी २०१८ मध्ये जायचे निश्चित केले. त्यासाठी  अकोला येथील त्यांच्या शाखेमध्ये प्रवासाचे बुकिंग करण्यासाठी गेलो असतांना कळले की आमचे पासपोर्टची मुदत मे २०१८ पर्यंतच आहे. ती प्रवासाच्या तारखेपासून सहा महिनेपर्यंत असायला पाहिजे. म्हणून नागपूरच्या पासपोर्ट कार्यालयाची तारीख घेण्यासाठी त्यांच्या माध्यामातूनच ऑनलाईन अर्ज केला. त्यानुसार  त्या कार्यालयाला जावून पासपोर्टची मुदत दहा वर्षाने वाढवून घेतली.

जानेवारीच्या कालावधीत मलेशिया आणि सिंगापूरचं हवामान चांगलं असल्याचं कळलं. म्हणून आम्ही २०.०१.२०१८ ते २७.०१.२०१८ या सात रात्र आणि आठ दिवस हा कालावधी निवडला. या प्रवासाचे विमान मुंबईहून निघणार होते. म्हणून आम्ही पुणेमार्गे मारुती कार चालवीत मुंबईला आलो. येतांना ३१.१२.२०१७ला औरंगाबादला थांबलो. सकाळी १ जानेवारीला शौर्य दिनी  भीमा-कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन करून पुण्याला यायचं ठरविले होते.

परंतु आम्ही कोरेगावच्या जवळ आल्यावर आम्हाला स्तंभापर्यंतच्या रोडने  पोलिसांनी जाऊ दिले नाही. तर आम्हाला सिकरापूर-चाकन मार्गाने गाडी वळविण्यास सांगितले. त्यांना मी सांगीतले   की आम्हाला स्तंभाकडे जायचे आहे, पण त्यांनी क्षणभर सुद्धा  थांबण्यास मनाई केली. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला सिकरापूर-चाकन मार्गाने पुण्याला यावे लागले.  नंतर रस्त्यावरील लोकांना विचारले असताना जमावावर हल्ला सुरु असल्याचे कळले. आम्हाला ज्या मार्गाने जायला सांगितले त्या मार्गाने सुद्धा गाड्या अडवून दगडफेक करण्यात आले व गाड्यांचे काचं फोडून आतील सामान बाहेर फेकण्यात येऊन लुटालूट करण्यात आल्याचे

येणा-या गाड्यातील  लोकांनी सांगितले.  त्यामुळे आम्हाला सस्त्यातच मध्ये  काही वेळ थांबावे लागले होते. नंतर पोलिस आल्यावर हे समाजकंटक पळाल्याचे कळले. रस्त्यावर ठिकठिकाणी फुटलेले काचं दिसत होते.  या रोडने पण रहदारी तुंबली होती. या रोडने पुण्याला संघशीलकडे यायला सहा तासाच्या वर वेळ लागला. त्यामुळे आम्ही रात्री ११.३० वाजता त्याच्याकडे  पोहोचलो.  आमच्यासारखेच अनेक लोकांना कार, ट्रॅक्स, ट्रॅव्हल बसेस घेऊन दुरदूरून आलेल्यांना न पाहता परत जावे लागले. असे हिंसक प्रकार करणारे निश्चितच जातीयवादी समाजकंटक होते. संघशीलकडे तीन चार दिवस राहून आम्ही मुंबईला प्रज्ञाशीलकडे आलो.

१९ जानेवारीला रात्री ११.२५ ची क्वालालंपूरला जाणारी फ्लाईट होती. आम्ही ८.०० वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय ऐअरपोर्टला आलो. तेथे केसरीचा झेंडा घेऊन  त्यांचे  प्रतिनिधी व टूरमधील प्रवासी जमले होते. त्यांनी आम्हाला स्नॅक्स, टोप्या, पासपोर्ट (जे बुकिंग करतांना व्हिसा काढण्यासाठी घेतले होते)  व विमानाचे तिकिटे दिलीत. आतमध्ये चेकइन कॉऊंटरला जाऊन लगेज बॅगा दिल्यात. त्यानंतर इमिग्रेशन करून गेटजवळ जावून विमानाची वाट पाहत थांबलो.

आमच्या सोबत येणारे  टूर मॅनेजर मंदार पाटील आणि त्यांचे सहाय्यक योगेश चौधरी होते.

१२.३०ला विमानात बसलो. विमानात एसी असल्याने थोडी थंडी लागत होती. आम्ही अंगात स्वेटर घालून घेतले होते. शिवाय विमानात शाल पण प्रत्येकाला दिली होती. विमानात तेवढ्या रात्री आम्हाला जेवण दिले. आम्ही खिडकीजवळ बसलो होतो. या खिडकीतून बाहेरचं दृश्य दिसत होतं. पण रात्रीला ही खिडकी एअरहोस्टेसने  बंद करायला सांगितल्याने पाहू शकलो नाही. सकाळी खीडकी उघडली तेव्हा बाहेरील दृश्य अत्यंत विलोभनीय असं दिसत होतं. दिवस निघाला होता, सूर्याचे किरणे दिसत होते. ह्या सोनेरी किरणाने सारा आसमंत पूर्णपणे न्हाऊन निघालेले दिसत होते. पण सूर्याचं दर्शन मात्र होत नव्हतं. ढगांमुळे सूर्य लपला असावा. ढग म्हणजे नुसते पांढ-याशुभ्र कापसाचे पुंजके दिसत होते. पण काही वेळाने हे ढग लुप्त होऊन समुद्र व त्या काठावरील वसलेले शहरे, नागमोडी नदी, घरे, रस्ते, पाणवठे आणि एका ओळीत लावलेले पामचे झाडे दिसायला लागले. असं हे खाली जमीनीवर दिसणारं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवीत होतो.

हे विमान क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट येथे मलेशियन वेळेनुसार सकाळी  ८.३०  ला म्हणजे भारतीय वेळ सकाळचे  ६.०० वाजता आलं. म्हणजेच मलेशियन घड्याळ २.३० तासाने पुढे होतं. आम्ही त्यानुसार घड्याळीच्या वेळा लाऊन घेतल्या. इमिग्रेषण झाल्यावर आम्ही विमानतळाच्या बाहेर पडलो. आमच्या ग्रुपमध्ये ऐकून ६६ लोक होते. दोन ट्रॅव्हल एसी बसेसची व्यवस्था होती. आमची व्यवस्था बस क्रमांक एक मध्ये केली होती. आमच्या बसमध्ये रवि नावाचा तामिळ वंशाचा गाईड होता. त्याला हिंदी येत नव्हती. इंग्लिश उच्चार पण स्पष्टपणे उमटत नसे. जसं वाटर पार्क म्हणतांना ‘वाटप्पा’ म्हणायचा. मलेशियात तामिळ वंशाचे भारतीय आणि श्रीलंकन  लोक जवळपास ९० टक्के  असल्याचे कळले. हा देश मुस्लीम धर्मीय आहे.

मलेशियात पाम झाडांची लागवड  प्रमुख पिक म्हणून करतात. ओळी-ओळीने हे झाडं लावतात. याचा उपयोग सौंदर्यप्रसाधान, औषधी इत्यादी निर्मितीत करतात. परंतु येथील प्रमुख उत्पन्न  म्हणजे पेट्रोलियमचा आहे असे समजले.

आम्ही त्यादिवशी क्वालालंपूरला जयपूर महाल या हॉटेलमध्ये सकाळी १०.३० वाजता नास्ता करून पुत्रजया येथे आलो. रस्त्यात Merdeka Square  जेथे राष्ट्रीय परेड दिनाचा उत्सव होत असतो ते  पाहिलं. मलेशिया जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा ३१ ऑगस्ट १९५७ला येथेच ब्रिटिशांचं युनियन जॅक उतरवून मलेशियन झेंडा फडकविण्यात आला होता. येथे सरकारी कार्यालये आहेत. याच्या पुढे National Mosque हे मलेशियातील प्रमुख मस्जिद आहे. या मस्जिदमध्ये १५००० भाविक जमू शकतात इतकं ते मोठं आहे. या मस्जिदला एकूण ९  घुमट व एक मिनार आहे.   येथे प्रधानमंत्र्यांचं कार्यालय असून मानव निर्मित लेक आहे. अर्थात हा परिसर आम्ही दुरूनच पाहिला.  

येथील रस्ते  अगदी स्वच्छ आणि सुंदर होते . रस्त्याच्या दोन्ही बाजूला चढावावर व उतारावर झाडं लक्ष वेधून घेत होते. टेकड्यांना पण कल्पकतेने सजवलेले होते. त्यानंतर  जेथे  क्वाला आणि लम्पुर अशा दोन नद्यांच्या संगम आहे ते पण बघितलं.   

त्यादिवशी आणि दुसऱ्या दिवशी आम्ही क्वालालंपूरला इस्टीन हॉटेल येथे दोन दिवस थांबलो. या हॉटेलमध्ये मोफत वायफाय नेटवर्क देण्यात आला होता. त्यावरूनच आम्ही मुलांकडे फोन करीत होतो. कारण आम्ही तेथे सीम कार्ड वेळेअभावी विकत घ्यायचे राहून गेले होते. आमच्या ग्रुपमधील काही लोकांनी घेतले होते.

संध्याकाळी पेट्रोनाज  ट्वीन टावर्स पाहायला गेलो. दोन टावरच्या मध्ये सुरिया मॅाल आहे. जगातील सर्वात उंच व आकाशाला भिडणारं असे हे टावर ४५२ मीटर उंच व ८८ मजली आहे. आम्ही सर्वात वरच्या मजल्यावर गेलो होतो. तेथून रात्रीला झगमगाटातलं शहर दिसत होतं.  असं हे विहंगम असे दृश्य डोळ्याला सुखावणारं होतं.

२१ तारखेला सकाळी मलेशियन टुरिझम सेंटरमध्ये नावाजलेले चॉकलेट मिळतात म्हणून ते पाहायला जावून विकत घेतले.  त्याचवेळेस  भारतातून आणलेले यु.एस.डॉलर २१.०१.२०१८ रोजी बदलून मलेशियातील रिंगीट (आर.एम.) चलन घेतले. त्यावेळी एका डॉलरला ३.८२ असा विनिमय दर होता.

याच दिवशी आम्ही Sunway Lagoon पाहायला गेलो. येथे Water Park,  Amusement Park, Scream Park, Extreme Park and Wild Life Park  इत्यादी  सहा प्रकारचे पार्क आहेत. एकूण ९० प्रकारचे आकर्षण आहेत. हे पाहायला येथे पूर्ण दिवस जातो. फोटो काढायला खुप सुंदर ठिकाण आहे. हा ८८ एकरचा पार्क आहे. जमिनीपासून  १५० फुट खोल आहे. येथे आम्ही मनसोक्तपणे फिरलो. मिनीट्रेनने फिरून पूर्ण परिसर पाहिला. प्राण्याचे खेळ पाहिले. पाण्यात जाऊन ओलं व्हायचं नाही म्हणून आम्ही पाण्यात जायला टाळत होतो, पण शेवटी काही सहप्रवाशांसोबत हे ठिकाण सोडण्यापूर्वी आम्ही ३ डीचा काळा चष्मा घालून अंधारलेल्या हॉलमध्ये बसलेल्या खुर्चीमध्ये  बसलो; तेव्हा ती खुर्ची मागेपुढे होत डायनासोर आमच्या अगदी जवळ येऊन घाबरवीत होतं.  त्याचवेळेस  अंगावर पाणी सांडवून आम्हाला ओलं करून टाकलंच.

२२.०१.२०१८ रोजी सकाळी आम्ही हॉटेल सोडलं व बटू केव्ह पाहायला आलो. याला कार्तिक टेम्पल म्हणतात. वर सरळ १४० फुट उभा चुन्याचा डोंगर आहे. ते चढायला २७२ पायऱ्या आहेत. येथे तामिळ वंशाचे हिंदू लोक अनवाणी पायाने दुध, फळे नारळ व इतर काहीबाही वस्तू घेऊन जातात. काही लोक कावड घेऊन जातात. जीभेला त्रिशूल टोचतात. वर  मुरुगा देवाची व खाली पायथ्याशी हनुमानाची  मोठी मूर्ती आहे. आम्ही मात्र वर गेलो नाही. खालीच सहप्रवासी येतपर्यंत थांबलो. येथे मात्र भारत देश वास करीत असल्याचे स्पष्टपणे जाणवले.  रस्त्याच्या आजूबाजूला प्लास्टिकच्या पिशव्या, साचलेली घाण व पाणी  पाहायला मिळाले. मलेशियात कुठेही कबुतरं दिसले नाहीत, पण ते मात्र येथे घोळक्याने लोकांनी टाकलेले दाणे टीपतांना  पाहायला मिळाले.

त्यानंतर याच दिवशी मलेशियातील जेन्टींग हायलँडला जाण्यासाठी निघालो. सुरुवातीला सहा लेन असलेल्या रोडने गेलो. पूर्ण रोडवर स्ट्रीट लाईट लावलेले दिसले. येथे जातांना जगातील सर्वात मोठं असलेलं घनदाट जंगल लागते. येथे हॉटेल आणि रिझॉर्ट आहेत. १७४०  मीटर खुप उंचावर आहे.  तेथे आम्ही आशियातील सर्वात लांब व वेगवान  केबल कारने गेलो. फर्स्ट वर्ल्ड हॉटेल येथे थांबलो होतो.  येथे जगातील सर्वात मोठं कसिनो आहे. येथे चीनमधील लोक खेळायाला येतात. त्यामुळे येथे हॉटेलच्या सुविधा दिल्या आहेत. या ठिकाणी जवळपास ७३५१  रूम्स असल्याचे कळले. आम्ही कसिनो पाहायला  गेलो होतो. हा एक प्रकारचा जुगार आहे. कसिनोबद्दल सिनेमात पाहीलं होतं आणि त्याबद्दल  बरंच काही वाचलं ऐकलं होतं; पण प्रत्यक्ष पाहण्याचा योग येथेच आला. याचठिकाणी रात्रीला खूप छान लेझर सारखा अत्भुत असा शो पाहिला. डोळे दिपवून टाकणारं खुप झगमगाट होता. येथे शॉपिंगला भरपूर वेळ होता.   

सकाळी २३.०१.२०१८ ला आम्ही सिंगापूरला वोल्वो बसने जायला निघालो. येथून सिंगापूर ३५० किलोमीटर लांब आहे. आम्ही सिंगापूरला हॉलिडे इन या हॉटेलमध्ये २३.०१.२०१८ ते २६.०१.२०१८ पर्यंत अशा चार रात्री थांबलो होतो.

सिंगापूर आणि मलेशियाच्या सीमेवर इमिग्रेशन केल्यावर आम्ही सिंगापूर या छोट्याशा देशात प्रवेश केला.

सिंगापूर हे अतिशय शिस्तबद्ध आणि सुयोग्य शहर आहे.सिंगापूरला Fine देश म्हटल्या जाते. फाईन याचा एक अर्थ असा की सुंदर आणि दुसरा अर्थ    दंड ! हा देश खरोखरच अतिशय सुंदर,  स्वच्छ, शानदार रस्ते, गगनचुंबी इमारती, मोठमोठे शॉपिंग  मॅाल्स, शांत व हिरवळीने व्यापलेलं वातावरण पाहून आपलं मन भरून येतं. पण येथे गुन्हा झाला की दंड होतो. येथे बसमध्ये सुद्धा काही खाता येत नाही की पाणी सुद्धा  पिता येत नाही. नाहीतर  ३०० सिंगापूर डॉलर दंड होईल, अशी पाटी बसमध्ये लावलेली असते. येथे चुईंग गम पण खाता येत नाही. बसमध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरा लावलेला असतो.

येथे सहसा फसवणूक होत नाही. टॅक्सीवाले, दुकानदार किंवा कोणीही फसवणूक करीत नाहीत. एखाद्या ठिकाणी आपली वस्तू विसरून राहिली असेल तर परतल्यावर ती वस्तू त्या ठिकाणी तशीच असते. आम्ही खरेदीसाठी माॅलमध्ये गेलो पण आतमध्ये जातांना आपल्या इकडच्या सारखे आपली अथवा सोबत नेलेल्या बॅगची तपासणी झाली  नाही.  कारण चोरी करताना कुणी पकडलं गेल्यास त्वरित त्याच्यावर कडक कारवाई होते.

येथील  कायदा आणि सुरक्षा कडक असते. आपल्याकडे स्त्रीयांबाबत घडणाऱ्या दुर्दैवी घटना येथे नसल्यासारखेच असतात.

येथील लोक खूप चांगले आहेत. त्यांचं वागणं सौहार्दपूर्ण आहे. थोडासा भाषेचा प्रश्न कधी कधी उभा राहतो. पण आपल्याला इंग्लिश नीट येत नसेल तर थोडंसं कठीण जातं.  सिंगापूरमध्ये तामिळ लोकांची संख्या खूप आहे. मराठी लोक आणि भारतीयांचं प्रमाण लक्षणीय असलं तरी हिंदी किंवा मराठी तितकं बोललं जात नाही.

सिंगापूरमधली वयोवृद्ध माणसं सुद्धा  खूपच फिट आणि अ‍ॅक्टिव्ह आहेत.

सिंगापूरच्या अवती-भवती इंडोनेशिया, थायलंड, फिलिपाइन्स, हाँगकाँग, श्रीलंका वगैरे देश असल्याने सिंगापूरचा मध्यवर्ती ठिकाण आणि उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विचार केला जातो. सिंगापूर हे नियोजनबद्ध पद्धतीने वसलेलं शहर असून त्याचा विस्तार फार झपाटय़ाने होत आहे.

 

सिंगापूर म्हणजे सिंहाचं शहर ! पण आता सिंह राहिलेले नाहीत ! मुंबईपेक्षाही हे लहान शहर  !  हे शहर जगातील प्रमुख पर्यटन,  व्यापारिक आणि बंदराचे ठिकाण आहे. हा देश ब्रिटिशांपासून ३१ ऑगष्ट १९६३ला स्वतंत्र होवून १६ सप्टेंबर १९६३ ला मलेशियात विलीन झालं होतं. मात्र त्यानंतर ९ ऑगष्ट १९६५ साली मलेशियापासून अलग होऊन स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदय झाला.  

 आम्ही अमेरिकन डॉलर (यु.एस.डॉलर)  मुस्तफा फॉरेन  एक्स्चेंजमध्ये बदलून सिंगापूर डॉलर घेतले. त्यादिवशी एका यु.एस.डॉलरला १.३०२ सिंगापूर डॉलर असा विनिमय दर होता. म्हणजे १५० यु.एस.डॉलरला १९५.३० सिंगापूर डॉलर दिले होते.

सिंगापूरला आल्यावर त्यादिवशी  रिव्हर क्रुज येथे बोटीने फिरलो. त्यातून आजूबाजूचे सुंदर दृश्य पाहिले. सिंगापूर फ्लायर आशियातील सर्वात मोठं जायंट व्हील (Asia’s largest Giant Observation Wheel)  ह्यातील एका डब्ब्यात जवळपास आठ लोक बसतात. अगदी हळूवारपणे हा डब्बा १६५ मीटर उंचावर सरकत जाऊन खाली उतरतो. त्यामुळे यात बसायला भीती वाटत नाही. अगदी उंचावरून  सिंगापूरचे बाहेरील दृश्य  पाहता येते.

२४  तारखेला आम्ही युनिवर्सल स्टुडीओ पहायला गेलो. हे एक थीम पार्क असून सेन्टोसा इजलांडच्या परिसरात आहे. येथे फिल्म आणि टीवी सिरीअल कसे बनविल्या जातात ते बघितलं. धाडसी सिनेमा कसे बनवितात; त्याचे प्रातीक्षिके जसे हैदराबाद येथे रामोजी फिल्म सिटीमध्ये दाखवितात, तसे येथे पहायला मिळाले. आम्ही Dry  Zone मध्ये बसलो होतो. कारण याठिकाणी जोकर लोक अंगावर पाणी फेकून ओले करतात. पण  Dry  Zone मध्ये पाणी फेकत नाहीत.  या युनिवर्सल स्टुडीओमध्ये  अत्यंत धाडसी अनुभव देणारे रोलर कोस्टर, वाटर राईड पाहायला मिळतात.

जगातील पहिलं ट्रान्सफॉर्मर राईड ! ३ डीचं खास परिणाम असलेलं ! काळा चष्मा घालून बोटीत बसून आम्ही सिंगल राईडर पाहिलं. आमची बोट समोर आणि मागे जायची तेव्हा ट्रान्सफॉर्मर रोबोट्स  आम्हाला येऊन भिडत. काय जबरदस्त आणि भयानक अनुभव होता तो !

येथे जगातील सर्वात उंच रोलर कोस्टर आहे. डायनोसॉर असलेल्या या जुरासिक पार्कमध्ये बोटीने नदीतून प्रवास करावे लागते. येथे पण सगळे राईड्स पाहायला पूर्ण दिवस जातो. यावेळी येथे बाहेर निघतांना जबरदस्त पाऊस पडला होता.

२५ तारखेला सकाळी चाईनीज टेम्पल पाहायला गेलो. तेथे ओम अध्यात्मिक मंत्र असणारे प्रार्थना घेण्यात आली. येथे हसणाऱ्या बुद्धांशिवाय इतर चार मुर्त्या होत्या ज्यांची नावे बुध्दाला धरून होते. जसे सरस्वती बुध्दा, गणपती बुध्दा, मैत्री बुध्दा. पण ह्या हिंदू धर्मातील संकल्पनांनी बौध्द धर्मात कशी भेसळ केली, काय माहित? मी त्यांना सांगितले की भारतात देव, आत्मा आणि अशा मूर्त्यांच्या संकल्पना नाहीत.

त्यानंतर सामुद्रिक मत्सालय पाहायला गेलो. हे  SEA Aquarium या नावाने प्रसिद्ध आहे.  पाण्याखालील बोगद्यात असणारं मत्सालय काचेतील खिडकीतून दोन्ही बाजूने आणि तसेच वरच्या बाजूने सुद्धा पाहण्यात मन हरवून जातं. येथे फोटोग्राफी करायला खूप हुरूप येतं. येथे २५००च्या वर शार्क, कासव, डॉल्फिन, जेलीफिश, बटरफ्लायफिश, खेकडे, रीफफिश, निबलफिश, सीस्टार्स अशाप्रकारचे अनेक सामुद्रिक प्राणी असून जगातील  निरनिराळ्या देशातील २५० पेक्षा जास्त पेशीज असलेले असे हे प्राणी आहेत. ६९ एकराच्या ८३ मीटर लांब परिसरात पसरलेलं आहे.

त्यानंतर आम्ही Singapore Skyline Luge Sentosa Island  पाहायला गेलो. येथील लुगा राईड गुरुत्वाकर्षणवर चालणारी छोटीशी गाडी असते.

हि राईड वरून खाली लहान मुलांच्या खेळण्यातील बायसिकलसारखी घसरत जाते. सहा वर्षावरील व्यक्तीला एकट्यानेच ही राईड करावी लागते. आपल्याला फक्त स्टेअरिंग आणि ब्रेक सांभाळावे लागते. खालून वर परत येतांना स्कायवेने यावे लागते. स्कायराईडवरून  पूर्ण सेंटोसा इज्लांड, सिंगापूर शहर आणि साऊथचायना समुद्राचे विहंगम असे दृश्य दिसते. ही राईड करतांना मस्त मजा वाटते. अत्यंत साहसी अशी ही राईड होती. पण ज्यांना हृदयाचा आजार असेल,  उलटी होत असेल अथवा गरोदरपणात ही राईड करू नका अशा सुचना दिलेल्या आहेत.

येथे निरनिराळ्या देशातील प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे बघितले.

रात्रीला लेझर शो बघितला. याला विंग्स ऑफ टाईम म्हणतात. हा एक विलक्षण अनुभव होता. यात लेझरद्वारे आग आणि म्युझिकल कारंजे मजेशीर होते.

२६ तारखेला  सकाळी बराच फावला  वेळ असल्याने आम्ही या दिवशी  little इंडिया शॉप्समध्ये खरेदीला गेलो.  

नंतर आम्ही आशियातील सर्वात मोठं जूरोंग बर्ड पार्क ( Asia’s Largest Bird Paradise Jurong Bird Park) पाहायला गेलो. येथे पक्ष्यांचा अप्रतिम असा खेळ दाखविण्यात आला.

येथे  अनेक प्रकारचे जवळपास ६०० जातीचे व ८०००  पेक्षा अधिक विविध  पक्षी या बगीच्यात होते. रंगीबेरंगी पोपट लक्ष वेधून घेत होते.

नंतर आम्ही Singapore गार्डन बाय द बे Garden by the bay  पाहायला गेलो. हे  २५० एकरात वसलेलं हे एक  भव्य असं नैसर्गिक बगीचा आहे.  

Flower Dome and Cloud Forest  शिवाय पांढरेशुभ्र संगमवरी दगडाचे पहाड खुपच सुंदर दिसतात. निरनिराळ्या देशातून आणलेले त्या त्या वातावरणातील फुलांचे झाडं येथे आहेत. येथे थंडावा होता. तसेच येथे मानव निर्मित धबधब्याच्या उडणाऱ्या पाण्यात सारेजण मस्त मजा घेत होते. रात्रीला सुपर ट्रीवर लेझर शो पाहिला. अत्यंत नयनरम्य असा तो देखावा होता.  

२७ जानेवारीला सिंगापूरच्या छांगी विमानतळावर संध्याकाळी ५.२५ ला सुटणाऱ्या व क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी विमान होतं. आम्ही या दिवशी कुठेही फिरलो नाही. दुपारी जेवण करून आम्ही सरळ अडीच तासापूर्वी विमानतळावर आलो.  क्वालालंपूरवरून रात्री ८.०० वाजता मुंबईला जाणारे फ्लाईट होतं. हे विमान मुंबईला शिवाजी टर्मिनलला रात्री ११.३० ला पोहचलं. क्वालालंपूर ते मुंबई हे अंतर ३६२१ किलोमीटर होतं.

मुंबईला विमानतळाच्या बाहेर आल्यावर प्रीपेड टॅक्सी करायला क्वाउंटरवर गेलो. एका ठिकाणी गर्दी असल्याने दुसऱ्या क्वाउंटरवर गेल्यावर मला पवईपर्यंतचे भाडे ८०० रुपये सांगितले. एवढे भाडे नसल्याचे मला माहित होते. म्हणून अधिकृत क्वाउंटरवर गेलो. तेथे केवळ ३०० रुपये भाडे होते. सिंगापूरमध्ये अशी फसवणूक कधीच होत नाही.  भारतात तर सर्रास फसवणूक होत असते, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे नवीन माणूस नेमका फसतो. टॅक्सीत बसल्यावर बाहेर पडल्यावर रस्त्याच्या बाजूला घाणीचे साम्राज्य दिसून आलं. तेव्हा आपण सिंगापूरमध्ये नसून मुंबईत आलो आहोत याची प्रकर्षाने जाणीव झाली. किती फरक आहे सिंगापूर आणि मुंबईत ! सिंगापूरमध्ये मला कुठेही पोलीस दिसले नाहीत. रोडवर सुध्दा ट्राफिक पोलीस दिसले नाहीत. कारण हे काम सीसीटीव्ही करीत असल्याचे समजले. तसेच आणखी एक नवल वाटलं ते म्हणजे कुठेही मेडिकलचे दुकाने दिसले नाहीत. आजारी माणसाला डॉक्टरशिवाय औषधी मिळत नाहीत. त्यामुळे अशा दुकांनाचा सुळसुळाट तेथे आढळत नाहीत.  

जाता जाता काही टिप्स-

१. टीम मॅनेजर किंवा गाईड ज्या काही सूचना देतात त्या कसोशीने पाळाव्यात.

२. गृपशिवाय बाहेरील कोणत्याही व्यक्तीशी संबंध ठेवू नये. कारण फसवणूक होऊ शकते.

३. हाॅटेलमध्ये सेल्फ सर्व्हिस असते. तथापि जेवताना ताटात ऊष्टे अन्न सोडू नये. आपल्याला जेवढे खाता येईल तेवढेच घ्यावे.

४. पासपोर्ट सांभाळून ठेवावे. हरवले किंवा चोरीला गेले तर भयानक त्रासाला सामोरे जावे लागते. याबाबतीत ग्रुप लीडर काय सुचना देतात त्याकडे लक्ष द्यावे. मी याबाबतीत लोकसत्ता पेपरमध्ये आलेला लेख वाचला होता. जर पासपोर्ट चोरीला अथवा हरवला असेल तर तुम्हाला टूर सोडून भारतात परत यावे लागते. पैसेही वाया गेले, टूरही नाही आणि होणारा मानसीक त्रास म्हणजे पोलीस स्टेशन, इंडिअन एम्बसी, नवीन डॉकूमेंट मिळेपर्यंत रोज चकरा मारणे, तिथला हॉटेल, जेवण टॅक्शीचा खर्च, ग्रुप सोडून जातांना होणारे दुःख आणि मानसिक त्रास, विमानाचे भाडे इत्यादी अतोनात त्रासाला सामोरे जावे लागते. या लेखात सुचना केली होती की पूर्वीचे खेड्यातील लोक बांडी शिवत होते. शर्टाच्या आतमध्ये बनियनला खिसा असतो. त्यात पासपोर्ट नेहमीसाठी आपल्यासोबत ठेवता येते. म्हणून  मी पण अशी बांडी शिवून घेतली होती. त्यामुळे पासपोर्ट हरवण्याचा अथवा चोरीला जाण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही.

लेखक – आर.के.जुमळे, अकोला

 


 

 

आताचे अन् तेव्हाचे…

25 Mayखरं म्हणजे अकोल्याच्या घरी मी आणि कुसुम असे दोघेच राहत होतो. पण ह्यावेळी प्रजाशीलचा मुलगा व आमचा नातू  प्रतिक याचा दुसरा वाढदिवस दि. ११ मे २०१५ ला अकोल्यालाच साजरा करायचा असं ठरल्याने त्यानिमित्त सारेच कुटुंबीय म्हणजे मोठा मुलगा प्रज्ञाशील, सून किरण, नातू प्रतिक व दुसरा मुलगा संघशील, सून नूतन, नातू सिद्धांत व इशाण, मुलगी करुणा, जावई प्रशांत व नातू आरव आपापल्या दूरदूरच्या गावावरून आमच्या घरी उतरले. त्यामुळे आणखी एकदा घर कसं भरून गेल्यासारखे वाटत होते. मी लहानपणी खेड्यात राहत होतो; तेव्हा संध्याकाळच्या वेळी चिमण्या आमच्या अंगणात उतरून चिवचिवाट सुरु करीत, मग अंगण कसं भरभरल्यासारखे वाटत होते.  तसंच काहीसं माहोल आताही वाटत होतं.
 
मी नोकरी निमित्त अनेक ठिकाणी फिरलो. त्या काळात बदललेल्या नवीन नवीन घरात राहत होतो. त्यावेळी मुलं जेव्हा लहान होते – शिकत होते, त्यावेळी आमचं घर कसं भरल्यासारखे वाटत होते.  मग त्यांचे शिक्षण झाले,  लग्न झालेत, नोकरी-व्यवसायानिमित्त दूरदूरच्या ठिकाणी पाखरांना पंख फुटल्यासारखे निघून गेलेत. मीही नोकरीतून निवृत्त झाल्यावर मूळ खेडेगाव चौधरा शेजारील  शहर यवतमाळ सोडून  आमचे कुणीही नातेवाईक अकोला येथे राहत नसतांना अकोला येथेच सदनिका घेऊन स्थायिक झालो. कारण मुलांच्या जाण्यायेण्याच्या सोयीसाठी अकोला शहर हे रेल्वे मार्गावर येते, यवतमाळ शहर येत नाही म्हणून !

सारा गोतावळा एकत्र झाला; तेव्हा ते आनंदाचे क्षण टिपतांना हरकून जात होतो. एक-एका नातुंचे कोडकौतुक करतांना आमचे मन भरून येत होते. प्रतिक सर्वात लहान व त्याचाच वाढदिवस होता. प्रतिक मला ‘आपी’ म्हणायचा. सिद्धांत ‘आलोला’ म्हणायचा. ही त्याची केरळची भाषा ! तो पुण्याच्या आधी त्रिवेंद्रमला होता

ना ! आरव मला ‘बाबा’ म्हणायचा. अशी तिघांचीही मला संबोधनाची वेगवेगळी भाषा होती.  
प्रतिक ‘आपी कि (Key) देणा’ टॅक्सीत बसे, बाहेर जाते.’ असा म्हणायचा. तो कारला टॅक्सी म्हणायचा. तो बाहेर कारमध्ये जावून घरी आला, तरी कारची चाबी तो आपल्या जवळच झोपेपर्यंत ठेवत होता. तो लुधियानाला ट्रेनने जात असतांना व घरी पोचल्यावर सुध्दा ‘आपी कि देणा’ असच म्हणत असल्याचे प्रज्ञाशील सांगत होता. प्रतिकपेक्षा इशान मोठा ! तो पण खूप
गोड ! आधी आमच्याकडे येत नव्हता. मग रुळल्यावर आमच्याजवळ यायला लागला. त्याच्या पेक्षा मोठा सिध्दांत व त्याच्यापेक्षा मोठा आरव. हे दोघेही मोठे खेळकर व सक्रीय…!  त्यातल्यात्यात आरव तर फारच उड्या मारण्यात पटाईत…!  घरातल्या सोफ्यावर दणा-दण उड्या मारायचा.  खेळण्यासाठी सर्व नातुंमध्ये चढाओढ लागत असे. एखाद्यावेळी खेळणीसाठी एकमेकांशी बालसुलभ भांडणे होत. मग भांडण सोडविण्यासाठी आमची मोठी धावाधाव व्हायची.
घरात आम्ही सारे जण बसलो असतांना कुणी विचारलं तर ‘आपी त्रास देते’  असा प्रतिक अगदी सहजपणे म्हणायचा. कुणी नाही विचारलं तरीही असाच  म्हणायचा. आम्हाला त्याची मोठी गंमत वाटायची.

आताचे मुले फारच हुशार…!  ते कॉम्प्युटर, टॅबलेट व स्मार्ट मोबाईल फोन हाताळताना दिसतात.  त्यातील व्हिडीओ, गेम पाहतात. खरंच त्यांच्या हुशारकीचं जितके कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

प्रतिकला सोडायला आम्ही रेल्वेस्थानकावर गेलो. त्याला कडेवर घेऊन विचारले, ‘प्रतिक, कुठे चालला.’ ‘लुधियाना जाते’ असे स्पष्टपणे म्हणत होता. आता कुठे आहेस ? ‘अकोला’ असेही म्हणत होता. इतक्या कमी वयात म्हणजे दोन वर्षाचा असतांना तो एवढे सहजतेने बोलतो, याचे आम्हाला नवल वाटत होते.

प्रतीकच्या वाढदिवसानिमित्त जमलेले मुलं, सुना व नातू आपापल्या गावाला निघून गेल्यावर आम्ही पूर्वीसारखे दोघेच राहिलो. बरेच दिवस आम्हाला करमत नव्हते, हे काही सांगायला नकोच…!

आर.के.जुमळे

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग अठ्ठेचाळीसावा

16 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग अठ्ठेचाळीसावा

समारोप-

मी या लिखाणात उल्लेख केलेल्या  मुद्यांची अंमलबजावणी होत नाही असे नाही. कदाचित होतही असेल.

काही महत्वाच्या विषयावर पुस्तिका काढण्यात आले होते. ही समाधानाची बाब आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना बढतीमध्ये राखीव जागा असाव्यात, या संदर्भात बी.एस.पी.ने संसदेत केलेल्या प्रयत्नाबाबत एक पुस्तिका माझ्या वाचण्यात आली होती. पण ह्या पुस्तिका महाराष्ट्रात तरी घरोघरी पोहचल्याचे मला आढळले नव्हते. कारण मला ही पुस्तिका कर्नाटकच्या एका बी.एस.पी. कार्यकर्त्याकडून मिळाली होती.

कोणी म्हणतील की, कोणतीही गोष्ट कागदावर उतरविणे फार सोपे आहे; पण प्रत्यक्षात व्यवहारात उतरविणे वाटते तेवढे सोपे नाही. हे जरी खरे असले तरी निदान त्या दिशेने वाटचाल करायला काय हरकत आहे? हे जर शक्य झाले तर  बाबासाहेबांच्या संकल्पनेचा पक्ष म्हणजे, ‘पक्षाचा सरसेनापतीसारखा नेता असावा, पक्षाचे चिन्ह हत्ती असेल, निशाण निळा असेल, अनुसूचित जाती/जमाती, इतर मागासवर्गीय यांचा सक्रीय सहभाग असावा, पक्षाचे स्वरूप व्यापक व राष्ट्रीय असावा, पक्षाचे ध्येयधोरण व तत्वाचा सातत्याने प्रचार व प्रसार व्हावा, पक्ष दलित, शोषितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सतत झटणारा, संघर्ष करणारा असावा.’ असा पक्ष म्हणजे बहुजन समाज पार्टीच असेल, यात तिळमात्र शंका उरणार नाही.

मी मांडलेल्या मुद्द्यांशिवाय वाचकांच्या लक्षात आलेले आणखी काही मुद्दे असू शकतात जे पक्षाच्या वाढीला सहाय्यभूत ठरू शकतील. तरी असे मुद्दे वाचकांनी जरूर समोर आणावेत.

वरील सारे मुद्दे सर्वांनाच पटावेत अशी माझी अपेक्षा नाही. व्यक्ती तितक्या प्रवृती या म्हणीप्रमाणे अनुकूल, प्रतिकूल  विचार असू शकतात. तरी या विषयाच्या अनुषंगाने सखोलपणे विचारमंथन व्हावे असे मला वाटते. जेणेकरून पक्षाला चांगले दिवसं येवून  बहुजन समाज हा देशातील सार्‍या राज्यात व केंद्रात सत्ताधारी वर्ग बनेल व त्या माध्यमातून भारत बौद्धमय बनण्यासाठी वाटचाल करेल. म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन्हीही संकल्पना उशिरा का होईना पण यापुढे साकार व्हायला वेळ लागणार नाही असे वाटते.

एका शायराने म्हटले आहे की,

‘माना कि इस जहॉं को गुलजार (उद्यान) न कर सके हम,

कुछ खार (काटे) तो कम कर गये गुजरे जहॉंसे हम !’

इतका जरी परिणाम या लिखाणाचा झाला तरी मला समाधान लाभेल, एवढं मात्र नक्की !

शेवटी मला अगदी अंतकरणापासून सांगावेसे वाटते की,

‘मेरे तडप का एहसास तुझको हो जाये !

मेरे ही तरह से तेरे दिल की चैन खो जाये !!

संघटीत होकर दूर करके रहेंगे अपनी गुलामी !

यही होंगी फुले-शाहू-आंबेडकर को असली सलामी !!

हि लेखमाला मी येथेच संपवितो.

जयभीम-जयभारत

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग सत्तेचाळीसावा

16 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग सत्तेचाळीसावा

याच पद्धतीचे लिखाण ‘दैनिक महानायक’चे संपादक सुनील खोब्रागडे यांनी ‘फेसबुक’वर केल्याचे माझ्या वाचण्यात आले आहे. ते लिहितात की,

“आपल्या चळवळी क्षीण होण्याची कारणे कोणती आहेत? कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे, चार भिंतीच्या आड घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांवर लादणे, खूष मस्करी करणारे जे लोक असतील, हुजरेगिरी करणारे असतील, गुलामी पत्करणारे असतील त्यांना नेत्याने अवास्तव महत्व देऊन महत्वाच्या पदावर त्याची वर्णी लावणे. व्यापक परिणाम करणारे निर्णय परस्पर घेऊन ते कार्यकर्त्यांवर लादणे ही ती कारणे. आहेत. याचाच अर्थ चळवळीच्या अपयशाची प्रमुख कारणे नेत्यांमध्ये असलेले विकार, माणसांमध्ये असलेले विकार आहेत. आपल्याला अपयशी न होता यशस्वी चळवळ उभारायची असेल तर या चळवळीचे वाहक असणारे कार्यकर्ते, या चळवळीला यशस्वी करण्याची धडपड करणारे, जबाबदारी घेणारे लोक विकाररहीत असले पाहिजेत. त्यांच्या स्वभावामध्ये सदगुण जास्त आणि दोष कमीतकमी असले पाहिजेत. आपल्या नेत्यांमध्ये, चळवळीतील कार्यकर्त्यामध्ये  नेमक्या याच गोष्टीचा अभाव आहे. खूष मस्करी करणाऱ्या, हुजरेगिरी करणाऱ्या, गुलामी पत्करणाऱ्याना योग्यतेपेक्षा अवास्तव महत्व दिल्यामुळे नेता आणि त्याचे हुजरे, गुलाम, स्तुतिपाठक यांच्यामध्ये स्वामी-दास संबंधाची निर्मिती झाली आहे. आपली योग्यता नसतानाही स्वामीने आपल्याला दास्यात घेतले ही स्वामीची आपल्यावर कृपा आहे असे पदाधिकाऱ्याना वाटते. यामुळे मंत्री असला तरी तो नेत्याच्या बाजूला खुर्चीवर न बसता खाली जमिनीवर बसतो. मंत्री असला तरी तो नेत्याच्या चपला उचलतो. योग्यता नसतानाही स्वामीने सोपविलेली पदाची जबाबदारी स्वीकारायची पण काम मात्र करायचे नाही. केवळ स्वामीचा उदो-उदो करायचा आणि दुसरीकडे सेवकांनी मात्र केवळ सांगितलेले तेवढेच काम करायचे. जबाबदारी घ्यायची नाही, आपली बुद्धी वापरायची नाही. अशी विचित्र व्यवस्था तयार होते. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या मार्गात या प्रकारची संगठन व्यवस्था अत्यंत घातक आहे.”

आर.के.जुमळे,

अकोला

 

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग छेचाळीसावा

15 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग छेचाळीसावा

४६.  मजबूत संघटन

एकंदरीत बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे (धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र) पक्षाच्या बळकटीला तीन गोष्टी लागतात.

नेता – नेता असा असावा की जो प्रतिस्पर्ध्याच्या मनगटाला मनगट घासून खुल्या मैदानातील लढाईत विजयश्री खेचून आणेल.

शिस्तबद्ध संघटना – नेत्याचा संदेश जनतेपर्यंत पोहचविणारी, नेत्याचा शब्द खरा करण्यासाठी जीवाचं रान करणारी शिस्तबद्ध संघटना असावी.

कार्यक्रम – सुस्पष्ट असा कार्यक्रम की ज्यापुढे प्रतिस्पर्धी नामोहरण होईल. जनतेच्या मनाला जाऊन भिडेल. मेंदूपर्यंत पोहचेल. ह्या तिन्हीही गोष्टी बहुजन समाज पार्टीकडे नाहीत असे कोणी म्हणेल काय?

बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत सांगितले आहे की,

  • पक्ष स्थापणेसाठी व त्याच्या संघटीत वाढीसाठी झटणे, आणि पक्षाचे तत्त्वज्ञान व ध्येयधोरण यांचा प्रचार करणे,
  • पक्षाची तत्वे, विचारसरणी यांचा प्रचार, वृतपत्रे, सभा-संमेलने, व्याख्याने, वांङमयलेखन इत्यादी मार्गाने करणे,
  • पक्ष सभासदांच्या वतीने संयुक्त राजकीय चळवळी व राजकीय कृती करण्यासाठी निवडणुका लढविणे.

आणखी  संघटनेबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘आपणाजवळ मजबूत संघटना नसेल तर देशाच्या राजकारणात आपणाला कोणतेही स्थान असू शकत नाही. ‘अछूत’ लोक जर एकसंघ अशा एका जातीत संघटीत झाले तर आपण राजकारणात काही स्थान प्राप्त करू शकतो. आपले मजबूत व एकसंघ संघटन करण्यासाठी आपण दहा वर्षे थांबू नये. ही संघटना आतापासून बांधली पाहिजे; ही संघटना आजच आपण बांधली पाहिजे. होय, उद्याही नव्हे, परवाही नव्हे तर आजच !’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : खंड ७ मा.फ.गांजरे)

खरे म्हणजे ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हे बाबासाहेबांनी सांगितलेले तीन सूत्र म्हणजे संघटना बांधणीसाठी आवश्यक असणारे सूत्र आहेत. शिकल्याशिवाय संघटीत होता येत नाही व संघटीत झाल्याशिवाय संघर्ष करता येत नाही. ज्यांना संघटीत होता येते त्यांचा संघर्ष यशस्वी होतो हे मात्र निश्चित !

‘रिपब्लिकन पक्ष बांधणीची एक दिशा’ या पुस्तकात डॉ.यशवंत मनोहर लिहितात की, ‘रिपब्लिकन पक्षाच्या विनाशाला तीन गोष्टी कारणीभूत आहेत. स्वार्थ, अहंकार आणि बेईमानी. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा, त्यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या महान ध्येयापेक्षा, ज्या मंडळींना स्वत:चे प्रासंगिक नेतृत्व स्वत:चा अहंकार आणि स्वत:चे गट महत्वाचे वाटतात ती माणसे एकत्र कशी येतील? वरपांगी ऐक्याच्या सूत्राचा देखावा करणारी पण आतून विघटनाची सूत्रे जपणारी माणसे एकत्र कशी येतील? खरे तर असे आहे की जी माणसे खरोखरच मोठी असतात ती अहंकारी नसतातच.’ ही गोष्ट बहुजन समाज पक्षाच्या नेतृत्वाने सतत लक्षात ठेवणे अगत्याचे आहे असे वाटते.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग पंचेचाळीसावा

15 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग पंचेचाळीसावा

४२. पक्षाच्या लहानसहान घडामोडीला व्यापक प्रसिद्धी देणे

इतर पक्ष त्यांच्या  कोणत्याही लहानसहान व कोणत्याही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला वर्तमानपत्रात व इलेक्ट्रॉनिक मिडीयाला बातम्या देऊन पक्षाला सतत प्रकाशझोतात ठेवीत असतात. तसेच ते वार्ताहर परिषद घेऊन पक्षाचे धोरणे विषद करीत राहतात किंवा  एखाद्या विषयावर मतप्रदर्शन करीत राहतात. त्यांचे प्रवक्ता  सतत मिडीया व वर्तमानपत्राला मुलाखती देत असतात. मिडीयाच्या चर्चासत्रात भाग घेत असतात. त्यामुळे त्यांनी केलेले कार्य खरे असो की नसो पण लोकांच्या मन:पटलावर पक्षाचं नाव सतत आदळत ठेवतात. कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेत राहतात. त्यामुळे त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत निश्चितच मिळतो. बी.एस.पी.ने सुध्दा हेच तंत्र अवलंबणे आवश्यक आहे. कोणत्याही वर्तमानपत्राचे वार्ताहर वार्ता मिळविण्यासाठी कार्यक्रमस्थळी येत नाहीत; तर बातम्या तयार करून त्यांच्याकडे नेवून द्याव्या लागतात. त्यानंतरच त्या दिलेल्या बातम्या त्यांच्या वर्तमानपत्रात छापून येतात असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे प्रसिद्धीचे कार्य जाणकार कार्यकर्त्याला देवून पक्षाला सतत प्रकाशात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत राहायला पाहिजे असे वाटते.

४३. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘स्टेट्स अँड मॉयनारिटीज’ या ग्रंथात मांडलेल्या राज्य समाजवादाचे धोरण जाहीर करण्याबाबत

या ग्रंथात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील गोष्टींना महत्व दिलेले आहे.

  • मुख्य उद्योगधंदे राज्याच्या मालकीचे असतील व राज्याद्वारे ते चालविले जातील.
  • असे उद्योग की जे मुख्य नसतील पण आधारभूत उद्योग असतील असे उद्योग राज्याच्या मालकीचे असतील आणि ते राज्याद्वारे किंवा राज्याने स्थापन केलेल्या मंडळाद्वारे चालतील.
  • विमा योजनेच्या बाबतीत राज्याला मक्तेदारी असेल आणि राज्य प्रत्येकाला कायद्यानुसार विमा योजना लागू करतील.
  • शेती व्यवसाय राज्याच्या मालकीचा असेल.
  • उद्योगधंदे विमा आणि शेतजमीन ज्या खाजगी व्यक्तीकडे असतील ते त्याचा मोबदला देवून सरकार ताब्यात घेऊ शकेल.
  • राज्याने ताब्यात घेतलेल्या (संपादीत) केलेल्या शेतजमिनीचे योग्य आकारात विभाजन केले जाईल. सर्व शेतकरी सामूहिकरीत्या शेती करतील आणि राज्याने ठरवून दिल्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्यांना सर्व काही मिळेल.

म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या राज्य समाजवादाचे धोरण मान्य करून त्या दिशेने पक्ष वाटचाल करेल असे जाहीर करावे; म्हणजे आंबेडकरी जनतेचा पक्षावरील विश्वास दृढ होईल.

४४. वेळोवेळी सदस्यनोंदणीचे अभियान राबविणे

प्रत्येक पक्षाला सदस्य बनविणे कायदेशीररीत्या बंधनकारक असल्याने काही पक्ष सदस्य नोंदणीचे अभियान राबवीत असतात. बी.एस.पी.ने सुध्दा वेळोवेळी सदस्य नोंदणीचे अभियान राबवावे. प्रत्येक कार्यकर्त्याला सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट द्यावे. त्यामुळे पक्षाचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होईल. अशा मोहिमेमुळे कार्यकर्त्यांचा जनतेशी थेट संपर्क सुरु होवून जनतेशी जवळीक निर्माण होते. परिणामत: त्याचा फायदा पक्षाला मिळण्यास मदत होते.

४६. मागासवर्गीय कामगार संघटनांसोबत समन्वय राखणे

प्रत्येक सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी कार्यालयात किंवा प्रतिष्ठानात मागासवर्गीयांचे  संघटना किंवा असोसिएशन कार्यरत आहेत. जसे- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात मागासवर्गीय कर्मचारी संघटन, महाराष्ट्र शासनात कास्टट्राईब संघटन. तसेच प्रत्येक बँकेत, रेल्वेत व इतरही सरकारी/खाजगी क्षेत्रात असोसिएशन काम करीत आहेत. या संघटनांचा संपर्क त्यांच्या खात्यात काम करणाऱ्या कामगार/अधिकाऱ्यांसोबत येत असतो. ते मागासवर्गीयांच्या अन्यायाविरोधात  आणि हक्कासाठी संघर्ष करीत असतात. या संघटनांत फार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, द्रव्यबळ व बौद्धिक बळ सामावलेले असते. तेव्हा अशा संघटनांशी सलोख्याचे संबंध ठेवणे अत्यंत गरजेचे आहे असे वाटते. त्याचे जे काही उचित प्रश्न असतील ते पक्षाच्या पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न जर केला तर ते पक्षाशी जुळून राहतील. त्याचा फायदा पक्ष वाढीसाठी निश्चितच मिळू शकतो.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग चवरेचाळीसावा

15 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग चवरेचाळीसावा

४०.  राज्यातील एखाद्या प्रभावी नेत्याला राज्यसभेचा खासदार बनविणे

जेव्हा उत्तरप्रदेशात आमदारांची सदस्य संख्या जास्त होती तेव्हा महाराष्ट्रातील कोणी प्रभावी नेत्याला उत्तरप्रदेशच्या कोट्यातून राज्यसभेचा खासदार बनविणे आवश्यक होते. कारण महाराष्ट्रात तरी एखादा लोकसभेचा  खासदार निवडून येईल असे वाटत नव्हते. म्हणून एखाद्या प्रभावी नेत्याला राज्यसभेत पाठविल्याने त्या नेत्याचे वजन वाढून महाराष्ट्रात त्या पदाचा फायदा मिळू शकला असता. त्याकाळात सिध्दार्थ पाटील, सुरेश माने असे प्रभावी नेते कार्यरत होते. त्यांनी महाराष्ट्रातील लोकांचे प्रश्न राज्यसभेत मांडल्याने त्याचे अनुकूल पडसाद संपूर्ण राज्यात उमटले असते. जसे समाजवादी पक्षाने २००२ ते २००८ च्या दरम्यान अबू आझमी यांना उत्तरप्रदेशच्या कोट्यातून राज्यसभेचा खासदार बनविला होता. त्यानंतर ते महाराष्ट्र विधानसभेत समाजवादी पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलेत. कॉंग्रेसने सुध्दा तारिक अन्वर, राजीव शुक्ला सारखे बिगर महाराष्ट्रीयन लोकांना राज्यसभेवर पाठविले आहे. तरी हा प्रयोग बी.एस.पी.ने सुध्दा करायला होता असे वाटते.

४१.  स्वयंसेवक दल निर्माण करणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली दलितांच्या सर्वांगीन उत्कर्षाची चळवळ खेड्यापाड्यात पोहोचली होती. त्यावेळी अस्पृश्यांनी लाचारी सोडून स्वाभिमानाने व ताठ मानेने जगणे सुरु केले होते. त्यावेळी जातीयवादी लोक चिडून हल्ला करीत. म्हणून संरक्षण देण्याचे काम खेड्यापाड्यात, गावोगावी स्थापन करण्यात आलेले समता सैनिक दल करीत असत.

त्या समता सैनिक दलात तरुण पोरांचा भरणा असायचा. त्यांचा विशिष्ट पेहराव असायचा. एखाद्या कार्यक्रमस्थळी पोलीस दलासारखे कवायत करीत शिस्तीत चालत जायचे. त्यामुळे संपुर्ण वातावरण भारावून जात होते. समाजामध्ये विलक्षण असे बळ निर्माण झाले होते. गावोगावी व्यायामशाळा काढून त्यात मल्लखांब, दंडबैठका, दांडपट्टा, कवायत, लाठीकाठी, तलवारबाजी, जंबियाबाजी, कुस्त्या इत्यादी व्यायामाचे व कसरतीचे प्रकार शिकवीत. त्यामुळे तरुण वर्गाचे आरोग्य धडधाकट राहून व्यसनापासून अलिप्त राहत.

पूर्वी मा. कांशीरामजींच्या सभा होत त्यावेळी वेळेवर असे बहुजन व्हॉलींटिअर फोर्स (बीव्हीएफ) नावाचे स्वयंसेवक दल तयार करून मा. कांशीरामजींना  व सभेला सुरक्षा पोहचवित असत. म्हणून आता याच पद्धतीचा पण समता सैनिक दलासाराखा स्वयंसेवक दल कायमस्वरुपी बी.एस.पी.ने गावोगावी निर्माण करावा; म्हणजे बहुजन समाजातील अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व धार्मिक अल्पसंख्यांक यांना वाटत असलेल्या असुरक्षिततेच्या भावनेला दूर करता येईल असे वाटते.

बामसेफची निर्मिती करतांना मा. कांशीरामजी यांनी जी ‘बामसेफ-एक परिचय’ नावाची पुस्तिका काढली, त्यात दिलेल्या १० अंगापैकी ‘बामसेफ स्वयंसेवक दल’ या अंगाबाबत उल्लेख केला आहे. म्हणून आता बहुजन स्वयंसेवक दल बनविण्यास काही हरकत नसावी असे वाटते.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग त्रेचाळीसावा

15 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग त्रेचाळीसावा

३८.  द्वेषाचे राजकारण बंद करणे

भगवान बुध्द यांची एक शिकवण आहे. ‘द्वेषाने द्वेष वाढते. प्रेमाने द्वेषाचे शमन होते.’

बामसेफमध्ये काम करतांना आम्हाला सांगितले जायचे की, घरात व शेजारी चांगले वातावरण आणि संबंध ठेवा. विनाकारण शत्रू किंवा विरोधक निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्या. त्यामुळे मिशनचे काम करतांना घरचे, शेजारचे व इतर लोक अडथळे निर्माण करणार नाहीत. हा त्यामागे उद्देश होता. हेच तत्व पक्षात सुध्दा पाळायला काही हरकत नाही. ‘तो आपला, तो त्यांचा’ असा दुजाभाव कधिही करू नये असे वाटते. तो कुणाचा जरी असला, तरी तो आपला सुध्दा कसा होईल, याचाच प्रयत्न सातत्याने करीत राहायला पाहिजे. त्यातच पक्षाच्या यशाचं गमक आहे.

ज्यावेळी पक्ष उत्तरप्रदेशात सत्तेवर होता, त्यावेळी सरकारी स्तरावर काही प्रस्थापित वर्तमानपत्रात पानेच्या पाने भरभरून जाहिराती छापून येत होत्या. परंतु महाराष्ट्रातील बहुजन समाजातील वर्तमानपत्रात मात्र जाहिराती दिसत नव्हत्या. ऐवढेच नव्हे तर बहीण मायावती यांच्या वाढदिवसाच्या किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाच्या जाहिराती सुध्दा या वर्तमानपत्रात दिल्या जात नव्हत्या. काय तर म्हणत होते की, तो पेपर आपला नाही. तो रामदास आठवले किंवा कॉंग्रेसचा किंवा प्रकाश आंबेडकरांचा आहे. अशा वृत्तीमुळे त्या पेपरचा संबंध दुरावल्या जात होता. आपल्या पक्षाचा एकतर एकही पेपर नाही व जे बहुजन समाजातील पेपर आहेत, त्यांच्याशीही आपले  चांगले सलोख्याचे संबंध नाहीत, मग अशा परिस्थितील पक्षाचा प्रचार होईल तरी कसा?  समाजात पक्षाच्या बाजूने अनुकूल मतप्रवाह निर्माण कसा होईल?  तरी द्वेषाचे राजकारण टाळून प्रेमाचे व मित्रत्वाचे राजकारण करावे असे वाटते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दि.१४.०१.१९५० ‘जनता’ मध्ये लिहिले होते की, ‘पूर्वीचे शत्रूत्व. वैर आता विसरले पाहिजे. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखले पाहिजे आणि आपली शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्वीसारखा एकलकोंडेपणा आता उपयोगी पडण्यासारखा नाही.’

समविचारी लोक एकमेकाचे मित्र होऊ शकतात. पण आपण परस्परांमध्ये द्वेष निर्माण केल्याने शत्रूचे फावते. ते आपल्यात फुट निर्माण करतात. त्याला आपण बळी पडतो. म्हणून आपल्याला व्यक्तीगत स्वार्थ, अहंकार, मनाचा क्षुद्रपणा, बेईमानी, लबाडीवृती, अप्रामाणिकपणा, लालच, द्वेष, मत्सर ह्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. ह्या रोगाने चळवळ खंगून जाते. तरी ही लागण बी.एस.पी.मध्ये होऊ देऊ नये, याची नेतृत्वाने सतत काळजी घ्यावी असे वाटते.

३९. गरजू कार्यकर्त्यांना मानधन देण्याबाबत

कार्यकर्त्यांनाही स्वत:चे पोट व प्रपंच असतात. सारेच कार्यकर्ते श्रीमंत असतील असे नाही. तेव्हा त्यांना गुजराण करण्यासाठी ज्यांना आवश्यक आहे, अशांना मानधन देण्याची व्यवस्था पक्षाने करावी. त्यामुळे ते सारे लक्ष पक्षाच्या कामाकडे केंद्रित करू शकतील. अशी व्यवस्था इतर पक्षांनी केली आहे. त्यांच्याकडे पगारी कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पक्षांचे कार्य पार पाडतांना अडचणी निर्माण होत नाहीत. एवढा खर्च करण्याची तजवीज बी.एस.पी.ने सुध्दा केली पाहिजे असे वाटते.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

 

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग बेचाळीसावा

15 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग बेचाळीसावा

३४. स्वार्थी नेत्यांच्या हस्तक्षेपावर प्रतिबंध घालणे.

काही स्वार्थी नेते पैशाची देवघेव करीत असतात. त्यांच्या अशा कृत्यामुळे जनमानसात पक्षाची प्रतिमा बिघडल्या जाते. तरी अशा लोकांच्या कारवाया लक्षात आल्यावर पक्षाने त्यावर वेळीच आवर घालावे असे वाटते.

३५. तिकीट वाटपात पारदर्शकता असण्याबाबत

निवडणुकीच्या काळात तिकीट वाटप करतांना खालच्या स्तरापासून ते वरपर्यंतच्या कार्यकर्त्याचे मनोगत जाणून घेऊनच तिकीट देण्यात यावे; म्हणजे प्रामणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी. पक्षाच्या बाहेरील उमेदवार निवडणुकीपर्यंत पक्षात राहतात. निवडणूक संपली की निघून जातात, असे निदर्शनास आले आहे. त्यांना पक्षाशी अजिबात निष्टा नसते. तर त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करायचा असतो. किंवा त्यांना त्यांच्या पक्षाने तिकीट नाकारले असते. म्हणून अपक्ष राहण्यापेक्षा कोणत्यातरी पक्षाच्या आधाराने निवडणुकीत उभे राहावे. म्हणून ते बी.एस.पी. कडे वळतात असे लक्षात आले आहे. अशा उपऱ्या लोकांना अजिबात तिकीटा देऊ नये असे वाटते. तसेच गुन्हेगारी प्रवृतीच्या व्यक्तीना तिकीटा देणे उचित होणार नाही.

तसेच तिकीट वाटपात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. पक्षाचा फंड सोडून कोणत्याही नियमबाह्य प्रकारची वैयक्तिकरित्या पैशाची देवाणघेवाण होऊ नये. त्यामुळे कार्यकर्त्यात विश्वासाचे  वातावरण राहण्यास मदत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाचे खरे प्रतिनिधी निवडून येण्यासाठी स्वतंत्र मतदार संघाचा आग्रह धरला होता. कारण या पद्धतीने निवडून आलेले खरे समाजाचे प्रतिनिधी दिसले असते, असा त्यांचा उद्देश होता. म्हणून पक्षाने समाजाच्या खऱ्या व्यक्तींनाच व पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांनाच निवडणुकीत उभे करावे म्हणजे पक्षाच्या कामकाजात नैतिकता टिकून राहील.

३६. महाराष्ट्रातील राज्याबाहेरील व्यक्तींचे प्रभारी पद काढण्याबाबत

उत्तरप्रदेशातील दोन लोकांकडे महाराष्ट्राची कमान सोपवून काही उपयोग झाला असे वाटत नाही. त्याउलट महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना मनमोकळेपणाने व स्वतंत्रपणे काम करणे कठीण झाले आहे. पहिलेच महाराष्ट्रातील जागृत व कर्मठ लोक हे स्वाभिमानी वृतीचे आहेत. त्यांना कुणाचे दडपण सहन होत नाही. म्हणून प्रभारीपद काढून स्वतंत्रपणे काम करू देण्याचा प्रयोग करून पहावा. त्यानंतर आढावा घेऊन प्रभारीपदाबाबत फेर निर्णय घ्यावा. मा. कांशीरामजी यांनी मात्र कधीही असे निरीक्षक नेमले नव्हते; तर ते स्वतःच कामाचा आढावा घेऊन नियोजन करीत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील कार्यकर्ते दडपणाशिवाय मुक्तपणे कामे करीत होते.

३७. काही विशिष्ट मतदार क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे

ज्या मतदार संघात पक्षाचा जोर वाढला असेल अथवा दबदबा निर्माण झाला असेल, त्या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे म्हणजे तेथील जागा निवडून आणण्यास सोपे जाईल.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग एकेचाळीसावा

15 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग एकेचाळीसावा

३१.  पक्षाचे विशिष्ट कालावधीत अधिवेशन घेणे

मा.कांशीरामजी व मा.श्रीकृष्ण उबाळे असतांना महाराष्ट्रात राज्य स्तरावर एवढेच नव्हे तर जिल्हा व तालुका स्तरावर पक्षाचे अधिवेशने होत होते. तसेच युवक, विद्यार्थी व महिलांचे सुध्दा स्वतंत्रपणे अधिवेशने होत होते. त्यात पक्षाच्या विस्तारावर आढावा घेण्यात येत होता. प्रत्येक युनिट आपल्या क्षेत्रातील कार्याचा अहवाल या अधिवेशनात सादर करीत होते. त्यामुळे त्यांच्या कार्याची प्रेरणा इतर युनिटच्या कार्यकर्त्यांना मिळत होती. अशा उपक्रमामुळे  लहान-सहान कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामकाजात सामावून घेतल्या जात होते. तीच प्रथा आताही सुरु करावी असे वाटते.

३२.  निवडणुका व इतर काळात मिडीयासोबत संपर्कात राहणे

मिडीयासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी काही कार्यकर्त्यांवर सोपवावी. म्हणजे निवडणुका व इतर काळात त्याचा फायदा पक्षाला मिळू शकतो. २०१२ च्या उत्तरप्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत बी.एस.पी.च्या उमेदवाराचा सहभाग मिडीयाच्या चर्चा सत्राच्या कार्यक्रमात दिसून येत नव्हता. त्यामुळे इतर पक्षाचे उमेदवार मुख्यत: बहीण मायावतीच्या पुतळ्याचा व मिळकतीपेक्षा कमाई जास्त हे दोन मुद्दे घेऊन  विरोधक प्रचार करतांना दिसत होते. त्यामुळे काम चांगले पण प्रतिमा खराब असा काहीसा गोंधळ निर्माण करण्यात ते यशस्वी झाल्यासारखे वाटत होते. २०१२ साली उत्तरप्रदेशची सत्ता जाण्यामागे हेही एक कारण असू शकते. म्हणून पक्षाने निवडणुका व इतर काळात प्रसार माध्यमाच्या संपर्कात राहावे व टी.व्ही. वर सादर होणाऱ्या कार्यक्रमाच्या चर्चासत्रात भाग घेऊन पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडावे असे वाटते.

३३.  प्रधानमंत्रीसाठी बहीण मायावतीच्या नावाचा प्रचार करणे

अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री बनण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक अटलबिहारी वाजपेयीची प्रतिमा जनमानसात रुजवित होते. त्यांच्या नावाचे मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करीत होते. आमच्या ऑफीसमध्ये हे लोक सांगायचे की, राजीव गांधी हे बोफोर्सच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेले आहेत. तेव्हा भारताला भ्रष्टाचारापासून फक्त अटलबिहारी वाजपेयीच वाचवू शकतात. तेव्हा यानंतर त्यांनाच प्रधानमंत्री बनवायला पाहिजे. ते भाजपचे नाव घेऊन  प्रचार करीत नव्हते  तर अटलबिहारी वाजपेयीच्या नावाचा  प्रचार करायचे. म्हणजेच शेवटी भाजपचाच प्रचार करीत होते.

याचप्रकारे बहुजन समाजाला सत्तेवर आणून त्यांची प्रगती करायची असेल तर बहीण मायावतीलाच प्रधानमंत्री बनवायला पाहिजे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा जबरदस्त प्रचार सुरु केला पाहिजे. त्यामुळे पक्षाचा आपोआप प्रचार होतो.

दि.२८.०५.१९३८ च्या जनता पत्रिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘मला तुमच्यापैकी प्राइम मिनिस्टर झालेला पाहायचे आहे. मला या मुठभर शेटजी-भटजीचे राज्य नको असून ८० टक्के लोकांचे राज्य हवे आहे.’ हे त्यांचे स्वप्न १९३८ सालातले आहे. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. तेव्हापासून अजूनही असा प्रधानमंत्री झाला नाही. आता बहीण मायावतीच्या स्वरूपात तसे व्यक्तिमत्व मिळाले आहे. तेव्हा बहुजनांनी सारी शक्ती एकवटून बाबासाहेबांचे स्वप्न खरे करून दाखवावे.

बहीण मायावती यांनी ब्राम्हण वर्गाची साथ जरी सोडली व मुस्लीमांना जवळ केले तरी अनुसूचित जाती/जमाती व काही प्रमाणात ओबीसींना सोबत घेवून बहीण मायावती प्रधानमंत्रीच्या खुर्चीपर्यंत पोहचू शकतात. कारण मुस्लीम वर्ग उत्तरप्रदेशात १८.२ टक्के जरी असला तरी त्यापेक्षा आसाम मध्ये ३०.०९ टक्के, पश्चिम बंगाल मध्ये २५.२ टक्के, केरळमध्ये २४.७ टक्के आहेत. आणि पूर्ण देशात त्यांची टक्केवारी ११.६७ टक्के आहे. तेव्हा बहीण मायावती यांना या लोकांपर्यंत पोहचून, त्यांना विश्वास देवून  आपली ताकद वाढवावी लागेल.

फक्त बहीण मायावती यांनी स्टेजवर भाषण करतांना कागदावर पाहून वाचून दाखविण्यापेक्षा उत्स्फूर्तपणे भाषण द्यावे, अशी बऱ्याच लोकांची अपेक्षा आहे. अशा भाषणाचा जनमानसावर खरा प्रभाव पडत असतो. नाहीतर वाचून दाखविलेले भाषण कंटाळवाणे आणि दुर्लक्षित होण्याचा संभव असतो.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

%d bloggers like this: