लुधियानाचा प्रवास

27 Nov

      माझा मुलगा – प्रज्ञाशील याची लुधियाना येथे बदली झाल्याने मी व माझी पत्नी कुसुम – त्याच्याकडे गेलो. मुंबईहून माझी मुलगी करुणा, जावई प्रशांत व छोटा नातू आरव पण आले होते.

      लुधियानाच्या काही गोष्टी मला अधोरेखीत करावसे वाटल्यामुळे मी हा लेख लिहिण्यास प्रवृत झालो.

      आपल्या महाराष्ट्रापेक्षा तेथे बरेच बदल मला आढळले. पहिला बदल नमूद करण्यासारखा असा की, तेथील घरांच्या ले-आउट मधील मोकळ्या जागेत ठिकठिकाणी बगीचे बांधलेले आहेत. बगीच्यात फिरण्यासाठी त्याच्या भोवताल सिमेंटचे वाल्किंग-टॅक आहेत. बगीच्यात बसायला व झोपून व्यायाम अथवा योगासन करण्यासाठी विशेष प्रकारचे बाकडे आहेत. मध्ये फुलझाडे व सावलीसाठी इतर झाडे पण आहेत. हिरव्या गवताचे लॉन्स आहेत. मध्ये पाण्याचे कारंजे आहेत. विशेष म्हणजे या बगीच्याची नियमित देखरेख होत असतांना दिसते. पाण्याअभावी झाडे वाळत आहेत व जागोजागी कचरा साचलेला आहे, असे दृश्य दिसत नाही. त्यामुळे या बगीच्यात फिरायला व घटकाभर थांबायला हुरूप येतो. मी रोज सकाळी व संध्याकाळी निरनिराळ्या बगीच्यात फिरायला जात होतो. म्हातारे-कोतारे लोकांसाठी ही तर खासच सोय असल्याचे मला प्रकर्षाने जाणवले.

      आमच्या अकोल्यात आणि महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी कुठे फिरायला जावे, असाच प्रश्न पडतो. प्रदुर्षित रोडने फिरण्याशिवाय गत्यंतर नसते.  कारण येथील प्रत्येक ले-आउट मधील ओपनस्पेस मध्ये देवळाशिवाय दुसरे काहीच  दिसत नाही. लोकांना भाविक व दैववादी बनण्यासाठी येथे खास व्यवस्था केलेली असते. मात्र त्यांना घटकाभर मोकळ्या हवेत फिरता येईल, व्यायाम-योगासन करता येईल व त्याद्वारे त्यांची शरीरसंपदा तंदुरुस्त राहिल, असा विचार मात्र कोणाच्याही मनात येत नाही.

      मी लुधियानात अशा बगीच्यात जेव्हा जेव्हा फिरायला जायचो, तेव्हा तेव्हा लुधियानाच्या लोकांना सतत मनातल्या मनात धन्यवाद देत होतो. महाराष्टातील लोकांनी देवळाऐवजी बगीच्याचा जरूर विचार करावा अशी सुबुद्धी देव त्यांना देवोत असे विचार मला फिरता फिरता माझ्या मनात सारखे यायचे. पण महाराष्ट्रातील देव त्यांना अशी सुबुद्धी देतील याची खात्री मला वाटत नव्हती. कारण तसे जर केले तर हे देव कुठे जातील, असा प्रश्न त्यांना पडेल. मग महाराष्टात त्यांना राहण्याची व त्यांच्या पुजार्‍यांच्या पोटा-पाण्याची पंचाईत होईल ना…हेही ओघानेच आले. तरीही मी जेव्हा परत गावाला जाईन तेव्हा मला फिरायला ठिकठिकाणी हिरवीगार व फळा-फुलांनी बहरलेले बाग-बगीचे दिसतील, असे स्वप्न मात्र पडत होते.

      आणखी एक बदल मला जाणवला तो असा की, येथील बंगल्याच्या म्हणजे तेथील लोकांच्या भाषेत कोठी – त्याच्या आजूबाजूला व पाठीमागे मोकळी जागा सोडलेली दिसत नाही. त्यामुळे त्यांचे घरे चांगले प्रशस्त दिसत होते. घरात पुरेसा प्रकाश व हवा येण्यासाठी त्यांनी खाली मोकळी जागा म्हणजे अंगण व वर बाल्कनी सोडल्याचे दिसले.

      आपल्याकडे दोन घराच्या मध्ये व घराच्या मागे मोकळी जागा सोडावी  लागते. या मोकळ्या जागेत नाल्या असतात. या नाल्या कचरा-काडीने व घाणीने जबरदस्त  भरलेल्या दिसतात. कोणीही त्याची साफसफाई करतांना आढळत नाहीत. उलट त्यात आणखी घाण कशी साचविल्या  जाईल याचाच प्रयत्न आजूबाजूचे  घरवाले करीत असतांना दिसतात. कारण कुणालाही साफसफाई करण्याचे सोयरसुतक तर नसतेच, शिवाय कुणाला वेळ पण नसतो. फक्त घाण करायला मात्र भरपूर वेळ मिळत असतो, असे म्हटल्याव वावगे होणार नाही. एक मात्र खरे की,  या घाणीत डुकरे-कुत्रे यांना फिरायला मात्र चांगली व्यवस्था झालेली असते. मच्छराचा सुळसुळाट त्यामुळेच झालेला असतो, हे काही वाईट नाही. त्यांचा त्रास सहन करायला महाराष्ट्रीयन लोक चांगले सरसावले आहेत.

      तसेच आणखी एक गोष्ट मला विशेष जाणवली. ती म्हणजे तेथील गुरुद्वारा ! आपल्या महाराष्ट्रात गल्लोगल्ली, घरोघरी, रस्त्याच्या बाजूने  लहानमोठे देवळे आहेत. तेथे मोठमोठे गुरुद्वारा आहेत. पण पाहण्यासारखे आणि स्वच्छ आहेत. आम्ही एका गुरुद्वारात गेलो तेथे धर्मार्थ दवाखान्याची सोय केली होती. तेथे मल्टीस्पेशालिस्ट दवाखाना होता. निरनिराळ्या रोगावर उपचार करणारे डॉक्टर्स होते. त्यांच्या उपचाराचे दर अगदी अल्प होते. अशा प्रकारची  व्यवस्था इकडे एकाही देवळात केलेली महाराष्ट्रात तरी कुठेही दिसणार नाही.

      काही गोष्टी येथे निश्चितच चांगल्या दिसल्यात. पण एक गोष्ट येथे मात्र खटकली.  ती म्हणजे महागाईच्या बाबतीत ! आमच्या घराच्या जवळच दर रविवारी भाजी बाजार भरत असतो. तेथे भाजी बरीच महाग दिसली. एका गिर्‍हाईकाने  माझ्या समोर भेंडीचा भाव विचारला असतांना भाजीवाल्याने १५ रुपये पाव असा भाव सांगितला. तेव्हा त्या  गिर्‍हाईकाने  ‘तुम पंजाबवाले सब मिलके लुटो.’ असे म्हणून महाग भाजीबद्दल आपला राग व्यक्त केला होता. मला वाटते तो पण पंजाबच्या बाहेरचा असावा.

      आम्ही अमृतसरला सुवर्ण मंदिर असलेलं गुरुद्वारा पहायला गेलो. खरेच शिखांचे हे मंदिर पाहण्यासारखे आहे. मध्ये मंदिर आहे आणि भोवताल पाणी आहे. गुरुद्वाराच्या परिसरात जातांना पाण्यात पाय बुडवून जावे लागते. तसेच डोक्यावर टोपी अथवा फडके बांधून जाण्याची प्रथा आहे. चुकून कोणी डोक्यावरची टोपी अथवा फडके काढू नये म्हणून स्वयंसेवक सरदारजी लक्ष ठेवून असतात. ते अशा लोकांना टोकत असतात.

      आम्ही तीन वाजता भारत-पाकिस्तानच्या अट्टारी येथील वाघा बॉर्डरवर गेलो. तेथे कस्टमच्या लोकांनी व्हि.आय.पी. पाहूणे म्हणून आमची बसण्याची विशेष सोय केली होती. तेथे ’रिट्रीट्रिंग सिरोमनी’ होत असते. म्हणजे देशाचा तिरंगा झेंडा उतरविण्याचा कार्यक्रम ! दोन्ही देशाचे बॉर्डर सिक्युरीटी फोर्सचे जवान संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान वाजत गाजत हा कार्यक्रम करीत असतात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी खूप लोक येत असतात.

      दोन्हीही बाजूचे  दरवाजे उघडले जातात. ’नो मॅन लॅंड’ म्हणजे कोणत्याही देशाची मालकी नसलेली जागा – ह्या ठिकाणी जावून दोन्ही देशाचे जवान एकाच वेळेस सकाळी चढविलेला झेंडा उतरवितात.

      दोन्ही देशाचे लोक लॉउडस्पिकरवर जोरजोरात घोषणा देतात. पाकिस्तान कडील ’पाकिस्तान की जय’ म्हणतात तर आपल्याकडील ’हिंदुस्तान की जय’ असे म्हणतात. ’हिंदुस्तान की जय’ असे म्हणण्यापेक्षा ’भारत की जय’ असे म्हणायला त्यांना का लाज वाटते, ते समजत नाही. हिंदुस्तान या शब्दाचा उल्लेख भारताच्या घटनेत कुठेही नसतांना ’हिंदुस्तान या शब्दाचा वापर कां करतात ते कळले नाही. शासकिय स्तरावर तरी अशी चूक होवू नये असे मला वाटते.

      परत येतांना आम्ही सुवर्ण मंदिरजवळ असलेल्या जालियानवाला बाग पाहिला. स्वातंत्र्य चळवळीतील हे एक ऎतीहासिक स्थळ आहे. या बागेला भोवताल घरांच्या भिंतीनी वेढलेले असून आत-बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता होता. येथे १९१९ साली रौलट ऍक्टच्या विरोधात जमलेल्या लोकांवर जनरल डायर यांनी बेछूटपणे गोळीबार केला होता. यात अनेक लोक मारल्या गेले. सैरावैरा पळत असतांना या बागेत असलेल्या विहिरीत १२० लोक एकावर एक पडून मेल्याचा ऊल्लेख आहे. तेथील भिंतीवर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आहेत.

      आम्ही परत जातांना पुन्हा एकदा रात्रीला हे सुवर्ण मंदिर पाहिलं. रात्रीला खरोखरच हे मंदिर आणखी खुलून दिसत होते.

     

      त्यानंतर आम्ही शिमला पाहायला गेलो. शिमल्याचं सृष्टी सौंदर्य खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. या स्थळाची माहिती इंटरनेटवर उपलब्ध असल्याने त्याबाबत लिहिण्याचं मी मुद्दामहून टाळत आहे. तथापी तेथे आठवणीत राहाणार्‍या दोन घटना म्हणजे एक कुफरी आणि दुसरं जखू मंदिर –  या बाबत लिहिल्याशिवाय राहवत नाही.

      कुफरी हे हिलस्टेशन आहे. रोडपर्यंत आल्यावर आतमध्ये जाण्यासाठी घोड्याशिवाय दुसरं कोणतंही वाहन नाही. हा रस्ता कुठेकुठे अरुंद, दगड-धोंड्यांचा, चढ-उताराचा व चिखलाचा आहे.

      घोड्याच्या माध्यमातून तेथील लोकांची कमाई व्हावी म्हणूनच की काय तेथे मुद्दामच रोड बांधल्या जात नाहीत, असे वाटते. या रस्त्याने घोड्यावर बसून जातांना फार भीती वाटते. लहान मुलांना घेऊन जातांना मोठ्या जिकीरीचे काम वाटते. प्रत्येक घोड्यासोबत घोडेवाला असेलच असे नाही. तीन-चार घोड्यांना एकत्र बांधून त्याच्या सोबत एखादा घोडेवाला असतो. प्रत्येक घोड्याला आमच्याकडून ३२० रुपये घेऊन आणखी सांगितले की हा सरकारी रेट आहे.

      त्या स्पॉटवर खाण्याचे व खेळण्याचे दुकाने दिसले. तेथे २०० रुपये घेऊन जाग्यावरुनच दुर्बिणीतून दूरचे काही स्थळ दाखविले. ऍपल गार्डन आहे म्हणतात. पण त्यावेळी झाडाला काही ऍपल लागलेले दिसले नाहीत. अरुंद रस्त्याने भीती वाटल्याने आम्ही लव्हर्स गार्डनला न जाता मधातूनच परत आलो. विनाकारण पैसे आणि वेळ खर्च झाला अशी हळहळ वाटत होती. तेथुनच  ’थ्रीरी ईडियट’ ची सुटींग झाली होती असे सांगितल्याने आम्ही पटीयाला राजाचा ४३ किलोमिटर दूर असलेला महाल पाहायला गेलो.

      दुसरी आठवण म्हणजे जखू मंदिरची ! जखू मंदिर हे शिमल्यातच असून तेथे वर दोन किलोमीटर ऊंचावर जावे लागते. तेथे हनुमानाचे मंदिर आहे. मंदिराचं आकर्षण नव्हतं. पण हे मंदिर सर्वात ऊंच असल्याने आम्ही ते पाहण्यासाठी मुद्दामच गेलो होतो. खरोखरच वरुन शिमल्याचं अप्रतिम असं विहंगम दृष्य दिसते.

      हनुमान म्हटले की वानर आलेच ! या ठिकाणी वानराचा फार वावर आहे. आपल्याजवळील सामान ते कधी हिसकाऊन घेतील, ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून जपून राहण्यासाठी सोबत काठी व त्यांना खाण्यासाठी चुरमूरे-फुटाने १० रुपयात घेऊन जाण्याचा सल्ला तेथील चणे विक्रेते देत होते. 

            आम्ही पायर्‍याने वर चढत नाही तर एका वानराने खरोखरच कुसुमच्या खांद्यावरील ओढणी हिसकावून घेतली होती. मग चणे विकणार्‍याने चण्याचा पुडा त्या वानराकडे फेकल्यावर ओढणी टाकून दिली. त्या चण्याचे १० रुपये मात्र त्याने आमच्याकडून वसुल करायला विसरला नाही.. पैसे कमाविण्यासाठी वानराचा वापर तर करीत नाहीत ना अशी पुसटशी शंका आमच्या मनात येउन गेल्याशिवाय राहिली नाही. तसेच एका माणसाचा चष्मा सुध्दा वानरांनी हिसकाऊन घेतला होता.

      या प्रवासातील अशा काही आठवणी मनात साठवून आम्ही आपापल्या गावला परत आलो.  

One Response to “लुधियानाचा प्रवास”

  1. ninad kulkarni November 28, 2012 at 12:18 AM #

    पुढच्या वेळी जर्मनीतून भारतात माझ्या जर्मन पत्नीसह येथे जाण्याचा बेत होता:
    सुवर्ण मंदीर पाहण्याचा तिने ध्यास घेतला आहे:
    आणि आपण हिंदुस्तान असे का म्हणतो ह्याबद्दल माझे निरीक्षण असे सांगते की पाकिस्तानी मिडिया व लोक भारताचा उल्लेख हिंदूंचे राष्ट्र म्हणून हिंदुस्थान असा करतात; व पंजाब भागात अजूनही पाक सोबत जुनी खुन्नस कायम आहे :
    म्हणूनच पाकिस्तान व हिंदुस्थान असे घोषणा युद्ध रंगते;

Leave a comment