Archive by Author

चैत्यभूमीचा रेल्वे प्रवास

19 Aug

मी त्यावेळी नाशिक येथे एकलहरे विद्युत केंद्रामध्ये नोकरीला होतो. काही कामानिमीत्त मी माझा लहान भाऊ डॉ. अजय याच्याकडे मी व माझी मिसेस कुसुम असे दोघेही चंद्रपुरला गेलो होतो. त्यावेळी परतीच्या प्रवासात जे मी अनुभवलं ती गोष्ट मी येथे सांगत आहे. दि. २ डिसेंबर २००२ रोजीची ही गोष्ट आहे. ती मी दि. १४.१२.२००२ रोजी लिहून काढली होती. ती जशीच्या तशी येथे मांडत आहे.

चंद्रपूरवरून नाशिकला येण्यासाठी संध्याकाळी ५ वाजताची बल्लारशा-वर्धा अशी पॅसेंजर ट्रेन होती. मी रिझर्वेशन केले होते. हा रिझर्वेशन डब्बा पुढे वर्धा येथे नागपूर ते मुंबई जाणाऱ्या सेवाग्राम एक्सप्रेसला जोडण्यात येत असतो. एक डिसेंबरपासूनच लोक चैत्यभूमीला जाण्याच्या तयारीत असतात. त्यामुळे या काळात रोजच गर्दी सारखी वाढत जाते. अशाच गर्दीमध्ये आम्ही त्यादिवशी सापडलो होतो.

त्याआधी आम्ही दोघेही बरेचदा ६ डिसेंबरला चैत्यभूमीला जावून आलो. म्हणून मला या गर्दीची कल्पना आहे. त्या दिवशी चैत्यभूमी व शिवाजी पार्क या परिसरात रात्रभर फिरून तेथील माहोल पाहतांना भारावून गेल्यासारखे वाटते. तेथील पुस्तकांचे स्टॅाल, सीडी-कॅसेटवर वाजणारे भीम-बुद्ध गीते, जयभीमचे स्टीकर, लॉकेट, मुर्त्या, फोटो, कॅलेंडर असे सटरफटर वस्तू विकणारे छोटेछोटे दुकाने, भजनी मंडळे, लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोंढे, बाबासाहेबांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी लागलेली लांबच लांब रांग हे सारं काही पाहून मन उचंबळून येते. एवढेच नव्हेतर तेथे जाऊन एक प्रकारची वेगळीच उर्जा आपल्या जीवनात खेळत असल्याची जाणीव होते. दैनंदिन जीवन बाजूला सारून हा माहोल वेगळ्याच दुनियात घेऊन जात असल्याचे क्षणोक्षणी जाणवते. असाच माहोल दसऱ्याला नागपूरच्या दीक्षाभूमीला दिसून येते. ऐरवी जीवनात खूप प्रवास केला.  पण हा प्रवास मला काही वेगळाच अनुभव देऊन गेला. म्हणून मी तो शब्दबद्ध केला.

मुंबईला फुकट जायची सोय असल्याने समाजातील गोरगरीब वर्ग दूरदूरच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात यावेळी जात असल्याचे दिसून येते. त्यात हवसे, गवसे, नवसे असणारच ! ‘जयभीम बोलो अन् फुकटमे चलो’ अशी एक म्हण त्यामुळेच पडत चालली आहे, असे म्हणतात. आता यात इतरही समाजाच्या लोकांची केवळ मुंबई पाहायला जाणाऱ्यात भर पडली आहे. आंबेडकर अनुयायी जसे चैत्यभूमीला जातात, तसेच इतरही जातीधर्माचे लोक त्यांच्या समाजाच्या अधिवेशनाला किंवा आंदोलनाच्या मोर्च्याला हातात झेंडे घेऊन व बिल्ले लाऊन फुकटपणे जात असल्याचे सर्रासपणे दिसत आहे. चंद्रपूरच्या रेल्वेस्थानकावर बाबासाहेबांच्या चित्राचे बिल्ले विकणारे लोकांना सांगत की, ‘तीन रुपयात मुंबईला जा व ऐश्वर्याराय, शाहरुखखान व अमिताभ बच्चन यांना पाहून या.’ हे बिल्ले लावणाऱ्यांची अलोट गर्दी  पाहून रेल्वेचे टी.सी.पण कधीच विचारणा करीत नाहीत, हे जाणाऱ्यांना माहित असते. म्हणून लोक हे बिल्ले त्यांच्याकडून विकत घेत असल्याचे दिसले.

गाडी फ्लॅटफॅार्मवर आल्यावर रिझर्वेशन असूनही त्या गर्दीत सहजपणे चढता आले नाही. गर्दी थोडी कमी झाल्यावर आम्ही कसेतरी चढलो. त्या धामधुमीमध्ये माझा चष्मा पडला होता. गाडीत बसल्यावर माझ्या हाताची घड्याळ पण गायब झाल्याचे कळले. आम्हाला सोडायला आलेला माझा भाऊ सांगत होता की, एकदा त्याची स्लीपर व जोडा सुद्धा ट्रेनमधून गायब झाला होता.  

गाडी सुरु झाली. अंधार पडत चालला. गाडीत इतकी गर्दी वाढली की, उभे असलेल्या लोकांना पाय ठेवायला जागा राहिली नव्हती. माझे रिझर्वेशन असल्याचे लोकांना सांगितल्यावर आम्हाला आमच्या सीटवर बसायला जागा मिळाली. बाजूचे लोक सांगत होते की गाडी थांबली की, खिडक्या बंद करीत जा, दरवाजा उघडू नका. कारण बाहेरचे लोक दगडं मारतात. मला खरं वाटत नव्हतं. पण खरोखरच गाडी फ्लॅटफॅार्मवर येवून थांबली की, बाहेरच्या लोकांची आरडाओरडा ऐकू यायची. कुठे कुठे रेती, गिट्टी, मातीसारखे सारखे वस्तू फेकून मारीत. गाडी फक्त दोन मिनिटे थांबत असल्याने गाडीत चढायची लोकांची खूप घाई होत होती. त्यातच गाडीत बसलेले लोक, गर्दी आणखी वाढेल म्हणून दरवाजे उघडायला पाहत नव्हते. त्यामुळे बाहेरचे लोक चिडायचे. आरडाओरडा करून हातात जे मिळेल ते खिडकीतून फेकून मारीत होते. असे म्हणतात की, रेल्वेमध्ये माणसांची स्वार्थी मानसिकता नेमकी उघडी पडते. बाहेरील व्यक्ती आतमध्ये घुसण्यासाठी मोठा आटापिटा करीत असतो. धक्केबुक्के खाऊन कसातरी आतमध्ये घुसतो. एकदा का आतमध्ये गेला की, आता आतमध्ये कुणी येऊ नये असे त्याला वाटायला लागते.

माझ्या बाजूला एक मुलगी बसली होती. दहावी शिकून तिने शाळा सोडली असल्याचे तिने सांगितले. मी तिला विचारले, ‘कुठे चालली?’ ती- मुंबईला. मी- मुंबईला कुठे? ती चूप होती. म्हणून मीच म्हटले, मुंबई म्हणजे चैत्यभूमीला ना? तिने मान हलवली. मी- तिथे कशाला चालली? तिला काही आले नाही. मीच तिला म्हणालो, ‘बाबासाहेबांना अभिवादन करायला ना… तिने मान हलवली. ‘ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला हिंदुच्या अन्याय-अत्याचारातून मुक्त केले, त्यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले, त्या ठिकाणी तू चालली ना…’ तिने परत मान हलवून सहमती दर्शवली. मी- तू तिथे गेल्यावर काय घेऊन येणार आहेस? ती काहीच बोलली नाही. मी- तू तेथून पुस्तके घेऊन ये. ते तू वाच व इतरांना वाचून सांग. तू शिकलेली आहेस. इतके काम तर तू करू शकशील ना? तिने मान हलवून हो म्हटले. माझे हे संभाषण बाजूचे लोक ऐकत होते.

असेच आम्ही एकदा नाशिकहून दीक्षाभूमी नागपूरला दसऱ्याला गेलो असतांना काही उन्मत मुले फालतूच आरडाओरडा करून इतरांना त्रास देत होते. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, आपण बौद्ध धम्म स्वीकारला आहे. बौद्धधम्म हा शांतताप्रिय धम्म आहे. करुणा आणि बंधुत्वाची त्यात शिकवण आहे. म्हणून आपण कुणाला त्रास होईल असे वागू नये. हे ऐकून सारेजण शांत झाल्याचे दिसले. मग मी त्यांना चळवळीतील काही महत्वाचे मुद्दे सांगत गेलो. प्रामुख्याने शासनकर्ती जमात बनणे व भारत बौद्धमय करणे या दोन मुद्यांबाबत त्यांना अवगत केले. बाबासाहेबांचे हे दोन अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर सोडून ते गेलेत. याची जाणीव त्यांना करून दिली. माझ्या बाजूला एक वयस्कर बाई बसली होती. तिला मी विचारले, ‘तुम्ही दरवर्षी दीक्षाभूमीला जाता का?’ ती व इतर साऱ्याच बाया-माणसांनी होय म्हणून मोठ्या अभिमानाने सांगितले. मी- मग तुम्ही तेथून पुस्तके विकत आणता की नाही ? ‘हो. तर. दरवर्षी पुस्तके विकत आणते आणि घरी आल्यावर माझ्या नातुंना वाचायला सांगते.’ अशी एक बाई म्हणाली. आता गाडीतले वातावरण अगदी खेळीमेळीचे झाले होते. त्याचवेळेस असाच एक रिझर्वेशनवाला आला आणि त्याने वरच्या बर्थवर बसलेल्यांना उठवले. शांतताप्रिय उपदेशाचा डोज पाजल्याने ते बिचारे मुकाट्याने उठलेत. मी त्याला  रिझर्वेशनची तिकीट मागितली. कारण त्या बर्थचे रिझर्वेशन मी केलेले होते. म्हणून मला संशय आला. तेव्हा त्याची तिकीट पाहून त्याला सांगितले की तुमचे रिझर्वेशन या कोचमध्ये नसून दुसऱ्या कोचमध्ये आहे. तेव्हा तो वरमला. मोठ्या मुश्किलीने तो गर्दीतून वाट काढून तो इथपर्यंत आला होता. पण त्याला त्याच गर्दीतून दुसऱ्या कोचमध्ये जाणे फार अवघड असल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते. तो गेल्यावर उठलेल्या लोकांना पुन्हा बसायला सांगितले. त्यामुळे लोक हरखून गेले होते.

त्यावेळी नागपूरला जातांना-येतांना काही वाटले नाही. परंतु आता मात्र या गाडीत एक प्रकारची अनामिक भीती वाटायला लागली होती. गाडी बडनेरा या स्टेशनवर आली. त्यावेळी रात्रीचे बारा वाजले होते. खिडक्या दरवाजे बंद होते. आतमध्ये माणसांची तुफान गर्दी… त्यामुळे दम कोंडल्यासारखे वाटत होते. गाडी बऱ्याच वेळपर्यंत थांबली होती. काय कारण होतं, ते काही कळत नव्हतं. आतमधील लोक दरवाजे उघडीत नव्हते. बाहेरचे लोक खिडक्यांना ठोकत असल्याचा आवाज येत होता. बहुतेकांनी काचेच्या तावदानाशिवाय पत्र्याचे शटर सुद्धा बंद केले होते. एका खिडकीची नुसती काचेची शटर लावली होती. पत्र्याचे शटर बंद करण्याचा प्रयत्न सुरु होता. पण लागत नव्हती. बाहेरून त्या खिडकीची काच फोडण्याचा प्रयत्न सुरु होता. हा प्रकार पाहून मी खूपच घाबरलो. गाडीतील सर्वांचे लक्ष या खिडकीकडे लागले होते. प्रत्येकजण या खिडकीपासून दूर जाण्याच्या प्रयत्नात होते. काही लोक माकडासारखे वर लटकत होते. माझ्या मनातली भीती आणखी वाढत होती. शेवटी काच फुटली. त्याचबरोबर दगड,माती, गिट्टी-खड्यांचा वर्षाव सुरु झाला. त्या माऱ्यापासून सारेजण स्वत:ला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. तरीही काही लोकांना मार लागतच होता. गाडी कधी सुरु होते याचीच सारेजण आतुरतेने वाट पाहत होते. गाडी सुरु झाल्यावर या प्रसंगातून सुटका होईल असे वाटत होते. परंतु गाडी मक्खपणे तिथेच खिळून बसली होती. आतातर कहरच झाला. बाहेरचा एक व्यक्ती आगपेटीची काडी पेटवून खिडकीच्या आतमध्ये फेकत होता. अशा चार-पाच जळत्या काड्या त्याने फेकल्या होत्या. त्यामुळे आग लागून आतील लोक जळून खाक होतील की काय या कल्पनेने माझे आंग शहारून गेले. याचवर्षीच्या सुरुवातीला घडलेला गुजरातचा गोधरा कांड आठवला. येथे ५९ लोक रेल्वेच्या डब्ब्यात जळून खाक झाले होते. या आठवणीने माझं संपूर्ण शरीर थरथर कापायला लागले. छाती धडधड करीत होती. श्वाशोश्वास कमालीचा वाढला होता. घसा सारखा कोरडा पडत होता. राहून राहून पाणी पीत होतो. तरी घसा कोरडाच राहत होता. अत्यंत भीतीदायक असा तो प्रसंग होता ! रेल्वेत अशा प्रकारचा प्रसंग मी पहिल्यांदाच पाहत होतो. लोकांना ओरडून ओरडून सांगत होतो की, दरवाजा उघडून द्या. नाहीतर आगीने आपण सारेजण मरून जाऊ. पण कोणीच ऐकत नव्हते. दरवाज्याजवळ जाऊन दरवाजा उघडून द्यायची कुणाची हिंमत होत नव्हती. काहीजण म्हणत की, दरवाजा उघडला की, बाहेरचे लोक आपल्याला मारतील. त्यापेक्षा दरवाजा उघडूच नका. काही लोक म्हणत की, असाच प्रसंग पुढील स्टेशनवर होण्याची शक्यता आहे. यातून कशी सुटका करून घ्यावी ते काही कळत नव्हतं. दरवाजा उघडणे हाच त्यावर एकमेव मार्ग होता. म्हणून मी शेवटी हिंमत करून दरवाज्याजवळ जायचा विचार केला. माकडासारखा वर लटकत लटकत दरवाज्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागलो. फुटलेल्या खिडकीतून जातांना बाहेरील कुणी माझा पाय ओढतील की काय अशी भीती वाटत होती. कसातरी दरवाज्याच्या जवळपास पोहचलो. तेथील उभे असलेल्या लोकांना सांगत होतो की, कृपाकरून दरवाजा उघडून द्या. बाहेरचे लोक दगडं फेकत आहेत. माचीसच्या जळत्या काड्या फेकत आहेत. तेव्हा ते लोक म्हणाले की, दरवाजा उघडला की, संपूर्ण भीड आतमध्ये येईल. ते लोक चिडलेले आहेत. दरवाजा उघडला का नाही म्हणून आल्याबरोबर ते आपल्याला मारायला लागतील. मी त्यांना म्हणालो की, मारू द्या. किती लोकांना मारतील? जळून खाक होण्यापेक्षा मार खाल्लेला बरा. ते म्हणत, थोडं थांबा. गाडी सुरु होऊ द्या. म्हणजे आपल्यावरील बला तरुन जाईल. मी म्हणालो, गाडी सुरु होईल तेव्हा होईल. त्याआधीच आग लागली तर काय करणार? असा माझा युक्तिवाद सुरु असतांना एका धडधाकड मुलगा समोर आला. त्याला माझे म्हणणे पटलेलं दिसले. त्याने सर्वांचा राग ओढवून दरवाजा उघडला. त्याचक्षणी बाहेरचा लोंढा आतमध्ये घुसला. आतातर डब्बा खचाखच भरून गेला. मी कसाबसा कसरत करीत माझ्या जागेवर येऊन बसलो. मी मिसेसला म्हणालो, आपण येथेच उतरून जाऊ. पुढे जाऊ नाही. मला खूपच भीती वाटत आहे. मला धडकीच भरली आहे. सामान नेता आले तर पाहू नाहीतर येथेच ठेऊन देऊ, जीव वाचला तर भरपूर झाले. सामानाचं काय? सामान कमविता येईल. पण जीव कमाविता येणार नाही. तरीही सामान नेता आले तर पाहू. मी मग सामान आवरायला लागलो. आमची हालचाल पाहून आमच्या शेजारच्या जोडप्यांनी सुद्धा आमच्या सोबत बडनेरा येथे उतरायची तयारी केली. मी पुढच्या लोकांना सांगत होतो की, आम्हाला येथेच उतरायचे होते. परंतु दरवाजा न उघडल्यामुळे आम्हाला बाहेर पडता आले नाही. तरी कृपा करून आम्हाला येथे उतरू देण्यास मदत करा. माझी विनवणी ऐकून माझं सामान  त्यांनी पकडून समोरच्या लोकांकडे देत आम्हाला खाली उतरविण्यास मदत केली. आम्ही खाली उतरलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. आम्ही खाली उतरत नाही तर दरवाज्याजवळ धक्काबुक्की सुरु झाली होती.

आम्ही गाडी सुरु होईपर्यंत आपसात बराच वेळ तेथे बोलत राहिलो. कारण एवढ्या रात्री कुठेच जाता येत नव्हते. ती रात्र तेथेच रेल्वे स्टेशनवर काढावी लागणार होती. माझी मिसेस सांगत होती की, बाहेरचा एक मुलगा हातात वीट घेऊन माझ्या समोरच्या मुलीला सारखा म्हणत होता की, ‘तेरी मा की xxx. खोलती की नहीं? मारू क्या? असं हात उगारून तो तिला म्हणत होता. आमच्या सोबत उतरलेले जोडपे हिंदी भाषिक होते. ते सुद्धा खूप घाबरले होते. त्यांना मुंबईला जायचे होते. ते म्हणाले की, ये बुद्ध लोग गंधे होते है क्या? मी म्हणालो, ये गंधी हरकते करनेवाले लोग बुध्द नही है ! ये दुसरे जातीके लोग है ! वो सिर्फ बॉम्बे देखने जा रहे है ! कोणीतरी म्हणाले की, ज्यांनी तिकीट काढली त्यांना पैसे वापस मिळत आहे. म्हणून तिकीटचे पैसे  परत घेण्यासाठी स्टेशनमास्तरकडे गेलो. तेथे कळले की, आमच्यासारखे आणखी बरेच लोक तिथे उतरले होते किंवा ही धामधूम पाहून बडनेरा येथून कोणी गाडीत बसले नव्हते. ते सारेजण या लोकांच्या नावाने बोटं मोडून संताप व्यक्त करीत होते. मला मात्र त्यांचे असे बोलणे जिव्हारी झोंबत होते. मी त्यांना म्हणत होतो की, ‘असा गोंधळ करणारे लोक हे आंबेडकरी अथवा बौध्द असूच शकत नाहीत. त्यांच्या नावाने मुंबई पाहता यावी म्हणून इतर लोक जात आहेत आणि तेच लोक बौद्धांना बदनाम करण्याकरिता असा धिंगाणा घालत आहेत. हे मी चंद्रपूरला गाडीत बसलो तेव्हाच कळले होते. मला सांगा, आपल्याच आई-बहिणींना घाणेरडे शिव्या कोणी देऊ शकतील काय?’

मी तेथे हजर असलेल्या टी.सींना म्हणालो की, तुम्ही पोलीस बंदोबस्त का ठेवीत नाहीत. तुमचे रेल्वेचे पोलीस पण येथे दिसत नाहीत. तो म्हणाला, पोलीस काय करणार? हेच लोक पोलिसांना मारतील…  मी म्हणालो, गुंड प्रवृतीचे दोन-चार लोक असतात. तेच संपूर्ण लोकांना वेठीस धरतात. अशा लोकांना पोलिसांनी आवरले पाहिजे ना… गाडीतील लोकांना दरवाजा उघडायला भाग पाडायला पाहिजे, म्हणजे असा प्रकार होणार नाही. परंतु कुणीही माझ्या म्हणण्याकडे फारसे गंभीरतेने पाहत असल्याचे दिसले नाही.

म्हणून आता आंबेडकरी संघटनांनीच लोकांची जीवित हानी व सामाजिक बदनामी टाळण्यासाठी पुढे आले पाहिजे असे मला वाटले. निदान संवेदनशील ठिकाण जे आहेत तेथे तरी स्वयंसेवकांची व्यवस्था करायला पाहिजे. रेल्वे पोलिसांना सोबत घेऊन लोकांना सुखरूपपणे प्रवास करण्यासाठी आपल्या स्वयंसेवकांनी मदत करावी म्हणजे गोधरा सारखी आणखी एक दु:खद आणि हादरा देणारी घटना भविष्यात घडणार नाही.

चैत्यभूमी अथवा दीक्षाभूमी येथे जेव्हा केव्हा मी रेल्वेने गेलो; तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, गोरगरीब जनताच मोठ्याप्रमाणात या पवित्र ठिकाणी जात असतात. सुखवस्तू घरातील लोक क्वचितच रेल्वेने जातांना दिसतात. गेलेच तर चार चाकी गाड्यांनी जातात. म्हणून समाजातील जीव मुठीत घेऊन रेल्वेने प्रवास करणाऱ्या गोरगरीब जनतेला असे वाऱ्यावर व त्यांच्या परिस्थितीवर न सोडता त्यांना सुरक्षित व निर्भयपणे प्रवास करता यावा म्हणून प्रयत्न व्हायला पाहिजेत. रेल्वे प्रशासनाने आणखी जादा गाड्या सोडून गर्दी कमी होईल असे प्रयत्न करायला पाहिजेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाय करण्यासाठी रेल्वे प्रशासनावर दबाव निर्माण करायला पाहिजे असे मला मनोमन वाटले होते.

आर.के.जुमळे,

दि.१४.१२.२००२ एकलहरे (नाशीक)    

“अशा तुडविल्या काटेरी वाटा” प्रकाशित झाल्याबाबत

19 Aug

“अशा तुडविल्या काटेरी वाटा” हे माझे आत्मकथन माझ्या ब्लॉगवर होते.  ते मी पुस्तक छापल्याने काढून टाकले आहे. ज्यांना हे पुस्तक पाहिजे असेल त्यांनी माझा व्हाटस्अॅप मोबाईल क्रमांक ९३२६४५०५०६ वर संपर्क साधावा. पुस्तकाची किंमत ३०० रुपये आहे.

 या पुस्तकाच्या विक्रीची व्यवस्था www.bookganga.com या विक्रेत्यांकडे केलेली आहे.  त्याची लिंक-

https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5534863088417335610?BookName=Asha-Tudvilya-Kateri-Vata

“अशा तुडविल्या काटेरी वाटा ” चे पुस्तक

23 Sep

माझं   आत्मकथन   “अशा  तुडविल्या  काटेरी  वाटा ”    ब्लॉगवर  होते.  आता  पुस्तक  छापल्याने  सदर  ब्लॉग  काढून  टाकण्यात  आले  आहे.

या पुस्तकाची  किंमत  ३००  रुपये  आहे.  ज्यांना  हे  पुस्तक  पाहिजे  आहे,  त्यांना  सवलतीचे  दर  २०० रुपयात  देण्यात  येईल.  माझा  व्हाटस्अॅप  क्रमांक

Continue reading

आमची ती एक कथा

21 Sep

आमची ती एक कथा

रात्रीचे अकरा वाजले होते. मी रेल्वेतून उतरल्यावर फ्लॅटफॉर्मच्या बाहेर आलो. मला आता जेवण करण्याची इच्छा राहिली नव्हती. त्यामुळे बाहेर कुठे झोपता येईल का याचा अंदाज घेऊ लागलो.
बाहेरच्या परिसरात दिवस असल्यासारखा प्रकाशाचा झगमझाट दिसत होता. माझ्या जीवनात मात्र अंधार वाढत चालला होता.
तेथे खूप लोक दाटिवाटीने झोपले होते. त्यात काही खरोखरचे प्रवासी होते तर काही भटके व भिकारी होते. मी सुध्दा आता त्यांचेपैकीच एक होणार होतो, याची मला तिव्र जाणीव झाली.
लोकांच्या घोळक्यामध्ये माझा चेहरामोहरा लपून गेला होता. यानंतर मी एकटाच राहणार होतो. कोणीही नातेवाईक मला उरले नव्हते. सर्वांना सोडून आलो होतो. मी अनाथ झालो होतो.
मी पण त्या लोकांच्या घोळक्यात खाली जमिनीवर टॉवेल टाकून व डोक्याखाली थैली घेऊन झोपलो. झोप कसली…? नुसते अंग टाकले होते ! डोक्यात विचाराने थैमान घातले होते. त्यामुळे डोळा काही केल्या लागत नव्हता. परत थंडीचे दिवसं. माझं सर्वांग थाटरत चाललं होतं. थंडीपासून बचाव करण्यासाठी, नाही माझ्याकडे मफलर होता… ना स्वेटर… कुडकुडत्या थंडीत कशीबशी रात्र काढली.
सकाळ झाल्याची जाणीव होताच, मी उठून बसलो. जाणार्‍या-येणार्‍या प्रवाश्यांची ये-जा सुरु झाली. प्रत्येकजण आपल्याच धुंदीत जात-येत होते. दुसर्‍याच्या व्यथांची कुणालाच काही देणे-घेणे नव्हते. असंच मानवी जीवन आहे. नाही कां ? प्रत्येकजण आपल्याच व्यापात, गोतावळ्यात व वर्तूळात जगत असतो. कोणी कोणाकडे पाहत नाही. कोणी कोणाला व्यथा, दु:ख विचारीत बसत नाहीत. प्रत्येकाला आपापले दु:ख भोगत राहावे लागते. स्वत:च्या कर्मामुळे किंवा दुसर्‍याच्या कर्माच्या परिणामामुळे त्याच्यावर दु:ख भोगण्याची पाळी येत असते. त्याच व्यथा, वेदना घेऊन तो जगत असतो.
प्रातविधी करण्यासाठी मी लोकांच्या रांगेत उभा राहिलो. परत आंघोळ करण्यासाठी बाथरुमच्या रांगेत घुसलो. ह्यावेळी लहान मुलाला जसे काळजीपूर्वक सांभाळावे लागते, तसे थैलीवर लक्ष ठेवून जवळच बाळगत होतो. कारण हीच तर माझी संपत्ती होती. म्हणून त्याला जिवापलीकडे जपत होतो.
तेथे कुठे घरच्यासारखे गरम पाणी…? थंडगार पाण्याने आंघोळ आटोपून घेतली. त्यासाठी दिड रुपया मोजावा लागला. खर्च फार जपून करायला पाहिजे ! कारण जवळ असलेले पैसे लवकर संपायला नको ! आता मला पैशाची खरी किंमत कळायला लागली. यानंतरचे असेच रोजचे जीवन मला जगावे लागेल का ? या विचाराने मी घाबरुन गेलो. ही तर सुरुवात होती. आणखी बराच पुढला प्रवास करायचा होता ! घर सोडल्यानंतर पुढे माझे जीवन कसे घालवावे, ह्याचा विचार करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ स्टेशनवर थांबायचं ठरविलं.
मी सकाळी उठल्यावर रेल्वेच्या वेळा पाहिल्या. दिल्लीकडे जाण्याचा एक विचार माझ्या मनात येऊन गेला. तेथून बाहेर गावला जाणार्‍या गाडयांचा टाईमटेबल पाहिला. संध्याकाळी ४.३० च्या दरम्यान सुटणारी एक वेळ होती. तिकीटाच्या कांऊटरची खिडकी अद्यापपर्यंत ऊघडली नव्हती. काही लोक आजूबाजूला अजूनही झोपलेलेच होते. मी बसण्यासाठी एकांत स्थळ शोधत होतो.
मला त्यारात्रीची घटना आठवली अन् अंगावर काटे उभे झाले. त्या प्रसंगाने पुष्पांजलीची मानसिक अवस्था अत्यंत विचलित झाली होती. माझ्यावरील विश्वासाला प्रचंड तडा गेल्या होत्या. त्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या होत्या. तिच्या सासरच्या एस.टी. स्‍टँडवर पोहचेपर्यंत ती स्तब्धच राहिली. यावरुन तिच्या विमनस्क मनस्थितीचा मला अंदाज आला होता.
मी तर दवाखान्यामध्ये माझ्या पत्‍नीने लोकांच्या व मामीजींसमोर केलेल्या पाणउतार्‍यामूळे पार हादरून गेलो होतो. त्यानंतरच्या पुष्पांजलीच्या संबंधात घडलेल्या घटनेने तर माझी मन:स्थिती दुहेरी दडपणामूळे पार कोलमडून गेली होती. मला पुष्पांजलीसोबत धड बोलणे सुध्दा जमत नव्हते. मी तिची क्षमायाचना करण्याचा प्रयत्‍न करीत होतो. परंतु ती काहीच बोलत नव्हती. मी माझ्या मनातल्या व्यथा तिला कसे सांगू तेच कळत नव्हते.
मी रात्री – ती आंतमधल्या खोलीमध्ये झोपली असतांना – तिच्याजवळ गेलो होतो. एवढीच घटना तिच्या मनाने घर करुन घेतली होती. मी कोणत्या अवस्थेमध्ये तिच्याजवळ आलो होतो, याची तिला काहीच कल्पना नव्हती. मला सुध्दा ते सांगण्याची कोणतीही संधी मिळत नव्हती. सकाळी मी तिला ऊठविण्यास गेलो, तेव्हा ती तोंडावर पांघरुन घेऊन रडत होती. मला अपराधीपणाची जाणीव बोचत होती. मला काहीच सुचत नव्हते. मी केलेल्या अपराधीपणाचं प्रायश्चित घेण्याचं पक्क केलं.
मी सकाळी चहा बनविला.
‘दवाखान्यात चहा नेवून मामीजींना घेऊन येतो. त्यानंतर तुला गावला पोहचवून देईन.’ असे सांगून मी बाहेर पडलो.
दवाखान्यातून मामीजींना घेऊन आलो. तेव्हा मी सुध्दा त्यांचे सोबतच घरात शिरलो. माझ्या माघारी पुष्पांजली मामीजींना घडलेली परिस्थिती सांगेल अशी मला भीती वाटत होती.
पुष्पांजली ही कुसुमांजलीची लहान बहीण. कुसुमांजली आमच्या दोघाकडे नेहमीच संशयी नजरेने पाहत असे.
मागे पुष्पांजली वैद्यकिय उपचारासाठी आमचेकडे आली होती. त्यावेळेस ती स्पष्टच बोलली,
‘तूच, यांच्याजवळ राहा. मी निघून जाते.’
त्यावेळी पुष्पांजली खूप रडली होती.
‘यानंतर मी तुमच्या घरी येणार नाही.’ असे तिने म्हटले सुध्दा होते. त्यावेळेस तिला मी समजाविले होते की, ‘तू तुझ्या आजाराकडे पहा. कुसुमांजलीचे बोलणे मनावर घेऊ नको.’
परंतु यावेळेस कुसुमांजली स्वत:च आजारी पडली होती. कमरेचे दुखणे ऊमळले होते. काही दिवसापूर्वी मी तिला सायकल शिकवितांना खाली पडली होती. तेव्हापासून तिला कमरेचा आजार जडला होता. ट्रॅक्‍शन घेण्यासाठी व इतर औषधोपचारासाठी तिला शासकिय दवाखान्यामध्ये भरती करावे लागले होते.
नेमके त्याचवेळेस पुष्पांजली व तिचे पती तिच्या वैद्यकिय उपचारासाठी आमचेकडे आले होते. उपचार घेतल्यानंतर आमच्या स्वयंपाकाची अडचण पाहून तिच्या पतीने तिला थांबण्यास सांगितले होते.
मी दवाखान्यात जेवण, चहा व इतर उपयोगी वस्तू नेवून देत होतो. तेव्हा कुसुमांजली माझ्याशी धड बोलत नव्हती. उलट दोनदा तिने जेवण सुध्दा घेतले नव्हते. जेवणाचा डब्बा तसाच परत न्यावा लागला होता. म्हणून तिच्या सोबत कोणीतरी जवळचे असावे; यासाठी मी गावला जाऊन मामीजींना घेऊन आलो.
त्यादिवशी दुपारी मामीजींना घेऊन दवाखान्यात गेलो.
‘पुष्पांजली गेली काय ?’ असे कुसुमांजलीने विचारले.
‘पुष्पांजली सकाळीच गेली.’ अशी खोटी माहिती मामीजींनी तिला सांगितली. ‘गाडीवर पोहचवून दिले असेल.’ असे कुत्सितपणे तिने मला टोमणा मारलाच ! ती पुष्पांजली व माझ्यावर संशय घेते म्हणून मामीजींनी खोटेच सांगितले असावे, असे मला वाटले. पण खोटे कधी लपून राहत नाही, म्हणतात ! तेच येथे घडले होते. संध्याकाळी मी जेवणाचा डब्बा घेऊन गेलो.
कुसुमांजलीने मला विचारले, ‘ डब्बा कोणी बनविला.?’
मी काहीच बोललो नाही.
त्यामुळे तिचा संशय बळावला. मी चूप राहील्यामुळे पुष्पांजली गेली नाही, हे तिने ओळखले असावे. मला वाटले कदाचित मामीजींनी तिला समजावीले असेल व पुष्पांजली गेली नसल्याचे एव्हाना तिला सांगितले असावे.
ती रागातिरेकाने इतकी लालबूंद झाली की जणू काही क्रुद्ध झालेला नाग फुसफुसत माझ्यावर विष फेकत आहे, असेच मला वाटत होते. वार्डमध्येच ती माझ्यावर अतोनात भडकली होती. सर्व पेशंट आमच्याकडे पाहत होते. त्यावेळेस मामीजी तिच्या बेडजवळ नव्हत्या. ती आणखी बोलू नये म्हणून घाईघाईने मी बाहेर आलो. मी दुचाकी गाडीचे कुलूप काढत असतांना ती माझ्या मागोमाग आली व मला अद्वातद्वा बोलायला लागली.
मी मामीजींना आणण्यासाठी वार्डमध्ये गेलो व त्यांना घेऊन आलो. तेव्हा त्यांना सुध्दा ती आवरत नव्हती. शेवटी त्या हतबल झाल्यात. काय भानगड आहे म्हणून जाणारे-येणारे लोक थबकायचे. कोणी दूरुनच तर कॊणी खिडकीतून कान देऊन ऎकत होते. बराच वेळ झाल्यावर ती बेडवर नव्हती व तिचे जिव्हारी लागणारे बोलणे ऎकून कदाचित माझा सुध्दा तोल जाऊ शकतो, अशी मला धास्ती वाटत होती. म्हणून मी स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीत होतो. अत्यंत नरमाईने तिचे ते कडवट बोलणे सहन करीत – तिची क्षमा मागत – कसे तरी तिला बेडपर्यंत पोहचवीले.
परंतु मला धमकी दिली की, ‘याबाबत पुष्पांजलीला काहीच सांगू नका.’
ह्या प्रकरणानंतर मी पार कोलमडून गेलो होतो.
दवाखान्यातील हा दुसरा प्रसंग होता. तिला भरती केल्यानंतर मी लहान भावाला तो स्वत: डॉक्‍टर असल्यामूळे पत्र लिहले होते. दवाखान्यातील त्याच्या डॉक्‍टर मित्रांकडून तिच्याकडे विशेष लक्ष देण्यास मदत होईल असा माझा पत्र लिहण्यामागे उद्देश होता. मात्र तिला हे आवडले नव्हते ! ह्या बाबतीत ती मला वाटेल ते बोलली.
मी दवाखान्यात येण्या-जाण्यासाठी भाऊजींची दुचाकी-मोपेड आणली होती. गाडीवर पुष्पांजलीला घेऊन मी फिरवीत असावे, असा तिला संशय आला. म्हणून दवाखान्यामध्ये लोकांसमोर मी पत्र का लिहीले व भाऊजींकडून गाडी का आणली यावरुन रागावत होती.
हा प्रसंग मी सहन केला. परंतु दुसरे हे प्रकरण मला सहन होण्याच्या पलिकडचे होते. तिचे ते शब्द नव्हते तर तापलेल्या सळईच्या डागण्या होत्या. त्या डागण्याचे चटके सहन होत नव्हते. मी आतल्याआत रडत होतो. माझी मन:स्थिती अत्यंत खराब झाली होती.
ह्या प्रसंगामूळे माझ्या मनावरचा तोल जाऊन मला हयापूढे जीवन जगण्यात काही अर्थ नाही, असे राहून राहून वाटत होते. म्हणून त्या रात्री जीवनयात्रा संपवावी, असे पक्के ठरविले होते. परंतु त्यापुर्वी आपले मन पुष्पांजलीकडे मोकळे करावे असे वाटत होते.
घरी येतांना रस्त्याच्या बाजूने असलेल्या सार्वजनिक विहिरीमध्ये ऊडी टाकून जीव द्यावा असा विचार मी केला होता. त्यापुर्वी त्याच विहिरीमध्ये काही लोकांनी जीव दिल्याचे मी पाहिले होते. हा विचार माझ्या मनात थैमान घालीत असतांना कसातरी घरी पोहोचलो.
त्यावेळी खूप रात्र झाली होती. घरी सर्वजण झोपले होते. पुष्पांजली आतमधल्या खोलीत तर मुले, वडील व कामानिमित्त आलेला माझा मोठाभाऊ बाहेरच्या खोलीत झोपले होते. मी जेवण न करताच बाहेरच्या खोलीत अंग टाकले. झोप लागत नव्हती. पुष्पांजलीला कसे सांगावे हाच विचार मनात घोळत होता. इतके लोक असतांना मी तिच्याशी कसे बोलणार ? कुणाला ऐकू गेले तर ? काही सुचत नव्हते.
काही वेळाने दचकत दचकत मी आतमधल्या खोलीत गेलो. खरं म्हणजे त्यावेळी पुष्पांजलीला पाहताच मला जाणवलं की, माझ्या मनावर सैतानाने ताबा घेतला आहे. विस्तवाच्या धगीने वितळणाऱ्या तुपासारखी माझी गत होत आहे. पण परिस्थितीने मला सावध केलं. कारण मनातलं सारं सांगून लगेच मला खुणावत असलेल्या विहिरीवर जायचं होतं. म्हणून तिच्या अगदी जवळ जाऊन हळू आवाजात, कुणाला ऐकू जाणार नाही अशा रीतीने सांगण्यासाठी मी तिला स्पर्श केला. त्याक्षणी ती आगीचा चटका बसल्यासारखी दचकून उठली.
‘भाऊजी तुंम्ही…?’ असा प्रश्‍न करुन ती बाहेर अंगणात गेली.
तिचा प्रश्‍न म्हणजे माझ्या कानशिलावर सणसणीत थापड मारल्यासारखे वाटले.
मी भानावर आलो. झालेल्या प्रकाराने मी अतोनात लज्जित झालो. अपराधिपणाची भावना बोचायला लागली. मी भयानक घाबरुन गेलो. त्यामुळे सर्वांग कापायला लागलं. दरदरुन घाम सूटला. घसा कोरडा पडत चालला होता. माझ्या हृदयाचे ठोके वाढत चालले होते. हे काय घडले माझ्या हातून… ? असं माझं मन विचारीत होतं.
ह्या अचानक उद्‍भवलेल्या प्रकरणाने आधिच्या प्रकरणाच्या आगीत आणखी तेल ओतले होते. एका प्रकरणाने दुसर्‍या नव्या प्रकरणाला जन्म दिला होता. त्यामुळे कधी नव्हे इतका मी त्यावेळी पार खचून गेलो होतो. आता माझा सपशेल पराभव झाला होता.
मी माझ्या जागेवर येऊन झोपलो. आता यापुढे आपले जीवन संपविण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही, अशी माझी मनोभावना सांगत होती.
मामीजींना पाहून पुष्पांजली रडायला लागली. ‘पुष्पांजलीला सांगायला नको होते…’ असे त्या मला म्हणाल्या.
त्यांना वाटलं असेल की, ‘मी दवाखान्यातील प्रकरण पुष्पांजलीला सांगितले असावे. म्हणूनच ती रडत आहे.’ परंतु त्यांना काय माहीत की, हे प्रकरण वेगळेच आहे म्हणून ! पुष्पांजलीने हे प्रकरण मामीजींना सांगायची हिंमत केली नाही. कदाचित मी तेथेच असल्यामूळे ती सांगू शकली नसेल. तरीही तिने, ‘या घरात सर्वच xxxx आहेत. आता यापुढे मी कधीच येणार नाही.’ असे अत्यंत जळजळीत शब्द तिच्या तोडाबाहेर पडले.
कदाचित तिचे हे बोलणे मामीजींच्या लक्षात आले किंवा नाही, कोण जाणे? मात्र तिचे हे बोलणे मला जिव्हारी लागत होते. काळजाला जाऊन भिडत होते. त्यामुळे मी अर्धमेला झालो होतो.
त्यानंतर तिने माझ्याशी बोलणे सोडून दिले.
तिला घेऊन मी एस.टी. स्टँडवर जाण्यास निघालो. वाटेत मी तिला अपराधी भावनेने क्षमायाचना करीत होतो.
‘यापूर्वी माझ्या हातून असा प्रमाद कधिही घडला नाही. परिस्थितीने माझ्यावर कसा प्रसंग आणून ठेवला काय माहित…? तुला माझ्या मनातलं सांगायचं होतं. पण तुला स्पर्श केला, ही माझी फार मोठी चूक झाली. मी याचे प्रायश्चित नक्कीच घेणार. तुला पोहचवून दिल्यानंतर मी माझ्या जिवाचे बरे-वाईट करीन. मी तुला कसे क्षमा मागू ते कळत नाही…!
तरीही ती माझ्याशी काहीच बोलली नाही. तिचे मौनधारण मला काटे टोचल्यासारखे वाटत होते. ती काहीतरी बोलली असती तर मला हलके वाटले असते. तिच्या मनातला धगधगता वणवा काही केल्या शांत होत नव्हता.
तिच्या सासरचे गाव विस किलोमीटर अंतरावर होते.
एस.टी.स्टँड आल्यावर तिच्या सासरच्या गावला जाणारी बस ऊभी होती. आम्ही त्या बसमध्ये चढलो. बस मध्येही ती काहीच बोलत नव्हती. माझीही काही बोलायची इच्छा राहिली नव्हती. दोघेही अबोल झालो होतो.
गाव आल्यावर आम्ही बस मधून खाली उतरलो. तिच्या घराकडे जात असतांना मध्येच मी तिची सुटकेस खाली ठेवली.
तिला म्हणालो, ‘तू आता जा. मी तुझ्या घरी येणार नाही. माझ्या घरी सुध्दा परत जाणार नाही. येथूनच मी कुठेतरी जाऊन माझ्या जिवाचे बरे-वाईट करणार.’
त्याचक्षणी तिचे शब्द एकदम माझ्या कानावर आले, ‘नाही… नाही… भाऊजी, असे करु नका. तुम्ही तुमचा संसार उध्वस्त करु नका. माझी शपथ आहे तूम्हाला ! मी हे प्रकरण कुणाला सांगणार नाही. जे काही झाले ते विसरून जा. मला माझ्या घरी पोहचवून द्या. नाहीतर माझे सासू-सासरे, तू एकटीच कशी आली म्हणून बोलतील.’ ती एवढं बोलल्यामूळे माझ्या मनावरील ताण थोडंफार उतरल्याचे जाणवले.
माझ्या तोंडातून शब्द फुटले, ‘ठीक आहे. पण तुझ्या घरी थांबणार नाही. तुला पोहचविल्यावर मी तसाच परत निघेन.’ असे बोलून मी तिची सुटकेस उचलली व तिच्यासोबत जायला निघालो.
आता ती बोलकी झाली होती.
रस्त्याने जातांना म्हणाली, ‘भाऊजी, आत्महत्या करु नका. तुम्ही जर तसे केले तर मी सुध्दा करीन.’ अशी तिने भीती घातली.
मी तिला म्हटले, ‘तुझा यात काहीच दोष नाही. खरं तर मीच दोषी आहे. मला प्रायश्चित घेतलेच पाहिजे. आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही.’
तरीही ती मानायला तयार नव्हती. शेवटी तिने मला आत्महत्येपासून परावृत केलेच…! तरीही घर सोडून मी कुठेतरी निघून जावे. हा मनातला विचार मात्र मी सोडला नाही. तिला याबाबतीत काहीच सांगितले नाही.
तिचे घर आले. मी सुटकेस खाली ठेऊन माघारी जायला लागलो, तेव्हा तिने मला जेवून जाण्याचा आग्रह केला. कदाचित तिच्या हातचे हे शेवटचे जेवण राहील. म्हणून आग्रह मोडून तिला नाराज करु नये, असे मला वाटले.
स्वयंपाक झाल्यावर मला जेवायला बोलावीले. मी जेवायला बसलो. ती जेवण वाढत होती. यापुढे ती मला कधीच वाढतांना दिसणार नाही, याचे मला वैषम्य वाटत होते. तिच्या घरचे जेवण हे माझ्यासाठी शेवटचेच होते!
जेवण करुन मी जायला निघालो.
जवळ कोणी नाही असे पाहून ती मला म्हणाली, ‘भाऊजी, विसरुन जा…’ मी जाण्याच्या घाईतच तिला म्हणालो, ‘ मी तुला पत्र पाठवीन.’
असे म्हणून तिचा शेवटचा निरोप घेतला.
मी मनातच म्हणालो की, ‘मी तुला खरं काय ते सांगू शकलो नाही, ते मी पत्राने निश्चितच कळवीन. म्हणजे माझे मन एकदाचे मोकळे तरी होईल. यानंतर आपली भेट होईल की नाही काही सांगता येत नाही.’
मी मागे वळून पाहिले. ती तेथेच उभी होती. माझ्या डोळयात आतापर्यंत साचलेले अश्रूचे थेंब तुंबलेल्या पाण्याचा बांध फुटल्यासारखा अचानक बाहेर आलेत. त्या तिला दिसल्या की नाही माहिती नाही.
मी पुन्हा जायला लागलो. अश्रूच्या धारा तशाच वाहत होत्या. त्यामुळे मला पुढचा रस्ता दिसेनासा झाला होता.
आता माझ्या पुढच्या जीवनात काय वाढून ठेवले असेल, या विचाराने मी गांगरुन गेलो होतो. येथूनच मी कुठेतरी निघून जावे, असे वाटत होते. पण कुठे जावे ते सुचत नव्हते. गोंधळलेल्या अवस्थेत मी एस.टी.स्टँडवर आलो.
‘अरे, तू कुठे ?’ माझे त्या आवाजाकडे लक्ष गेले. पाहतो तर ते माझे भाऊजी होते.
‘पुष्पांजलीला तिच्या घरी आणून दिले’ असे मी त्यांना सांगितले. ते बाजूच्या गावला शिक्षक होते. ते शाळेला घरुनच जाणे-येणे करीत होते. आज शनिवार असल्यामुळे सकाळची शाळा करुन ते गावला जायला निघाले होते.
एस.टी. बस आली. त्यांच्या सोबतच मी पण बस मध्ये चढलो. त्यांनीच माझी तिकिट काढली. ते भेटले नसते तर येथूनच कुठेतरी निघून जायचा मी विचार करीत होतो.
प्रवासामध्ये मी विचारमग्न होतो. भाऊजींसोबत सुध्दा बोलायची इच्छा होत नव्हती. मी विचार केला की, ‘आता परत आलोच आहे; तेव्हा घरी जाऊन जे काही असतील-नसतील तेवढे पैसे, कपडे व सामान घेऊन निघून जावे.’
स्टँडवर जायच्या आधीच्या स्टॉपवर मी बसमधून उतरलो. भाऊजींना जातो, असे सांगितले. ते स्टँडवर जाणार होते. कारण त्यांचे घर तेथून जवळ होते.
तेथून मी पायीपायीच घरी आलो. कारण जास्त पैसे खर्च करणे मला आता परवडणारे नव्हते. मी रस्त्यानेच मनात पुढच्या योजना आखीत होतो.
पुष्पांजलीला दिलेल्या शब्दाप्रमाणे मी आत्महत्येचा विचार सोडून दिला. कुठेतरी निघून जावे, एवढेच आता माझ्या हातात राहिले होते. या गावावरुन रेल्वे जात नव्हती. म्हणून येथून पहिल्यांदा रेल्वेच्या ठिकाणी जावे व तेथे जाऊनच पुढे कुठे जावे ते ठरवावे, असा मी विचार केला.
घरी आलो; त्यावेळी मामीजी झोपल्या होत्या. त्यांना दगदगीमुळे बरे वाटत नव्हते, असे त्यांनी सांगितले.
‘मामीजी, तुम्हाला दवाखान्यात नेवून देतो.’ असे त्यांना म्हणालो.
‘आताच नाही. नंतर जाऊ.’ असे त्या म्हणाल्या.
त्यामुळे मला सामानाची जुळवाजूळव व पैसे शोधण्यासाठी अवधी मिळाला. कुसुमांजली कूठेतरी पैसे लपवून ठेवत असे. मला आलमारीत तिच्या पर्समध्ये सहाशे रुपये मिळाले. ते मी खिशात टाकले.
एक ड्रेस, एक चादर, टॉवेल, अंडरवेअर, बनियन, साबन, तेल, कोरे कागदं व घरी ठेवलेले पोष्टाचे काही पाकिटं, असे सुचेल ते सामान मुलीच्या शाळेच्या रिकाम्या बॅगमध्ये भराभरा भरले.
एवढयात मुलगी आली. ती इंग्रजी माध्यमातून पाचवीला शिकत होती.
तिला मैत्रिणीसोबत डब्बा घेऊन पिकनिकला जायचे होते. घरी तिला डब्ब्यात देण्यासारखे काहिच नव्हते. म्हणून तिला रस्त्याने जाणार्‍या फेरीवाल्याकडून संत्रा विकत घेण्यास पैसे दिले. ती पैसे घेऊन निघून गेली.
मधला मुलगा शाळेतून आल्यावर बाहेर खेळायला गेला होता. मोठा मुलगा तर एन.सी.सी.च्या कँपसाठी बाहेरगावी गेला होता. बाहेरच्या खोलीत बाबा कॉटवर झोपले होते. माझा साळा बाहेरच्या खोलीत पुस्तक वाचत होता. तो दहावीत शिकत होता. माझ्याकडेच तो गेल्या चार वर्षापासून शिक्षणासाठी होता.
मी थरथरत्या हाताने चिठ्ठी लिहिली. ‘मी घर सोडून जात आहे. नंतर पत्र पाठवीन.’ एवढेच मी त्यात लिहिले होते.
मुलीच्या कंपासपेटी मध्ये ती चिठ्ठी ठेवली. जेव्हा ती ऊघडेल तेव्हा तिला दिसेल. तोपर्यंत मी दूरवर जाऊन पोहचलो असेल. या उद्देशाने मी तिच्या कंपासपेटीचा उपयोग केला.
सामान भरलेली थैली स्वयंपाक खोलीमध्ये नेऊन ठेवली. बाहेरच्या खोलीत येऊन चप्पल घातली. तेथूनच चुपचाप स्वयंपाक खोलीत येऊन थैली उचलली व पाठीमागच्या दारातून जाण्यास निघालो.
एकदा पाठीमागे वळून घराकडे पाहिले; तेव्हा अश्रूच्या धारा वाहायला सुरुवात झाली. अनेक भावना व विचार मनामध्ये दाटून आल्या होत्या. वणव्यात सापडलेल्या पाखरासारखा तडफडत होतो. त्यात होरपळलेल्या पंखानी मुका आक्रोश करीत होतो.
एस.टी.स्टँडपर्यंत पायीच चालत गेलो. घरापासून स्टँड तसे दूरच होते. स्टँडवर येईपर्यंत डोळ्यातील अश्रू आणि नाक सारखे वाहत होते.
एस.टी.स्टँडवर आलो. नागपूरला सरळ बसने जाण्यापेक्षा धामणगाववरुन रेल्वेने जावे असा मी विचार केला. कारण बस पेक्षा रेल्वेचा प्रवास स्वस्त आहे. त्यामुळे पैसे वाचतील असे मला वाटले.
थोडया वेळाने बस आली. तिकीट काढून खिडकीजवळ बसलो. बस सुरु झाली.
आता गाव सुटल्याची तिव्र जाणीव झाली. त्याचबरोबर अश्रूचा बांध फूटला. डोळे पूर्णपणे डबडबले. क्षणभर मिटले. डोळ्यातलं पाणी पापण्यावर उतरले. समोरचं अंधुकसं दिसायला लागलं. खिडकीच्या बाहेरच्या बाजूने तोंड करुन गालावर उतरलेले आसवे रुमालाने पुसत होतो. कोणाच्या लक्षात येणार नाही, याची काळजी घेत होतो. अश्रू आवरण्याचा खूप प्रयत्‍न करीत होतो. परंतु काही केल्या अश्रूच्या धारा थांबत नव्हत्या. नाकाची फुरफूर सारखी चालूच होती. माझ्यावर आदळलेल्या वेदनांचा बंध माझे अश्रू मोकळे करण्याचा प्रयत्‍न करीत होते.
बस थांबल्यावर भानावर येऊन मी खाली उतरलो.
रेल्वेस्टेशनला जात असतांना मला एक ऒळखीचा मित्र भेटला.
त्याने मला चहा घेण्यासाठी हॉटेलात नेले. मी चहा घेत नव्हतो. त्यामुळे दु्ध घेतले. दु्ध व पानाचा खर्च त्यांनीच केला. अगावूचा खर्च करायचा नाही, असे मी ठरविल्यामूळे हॉटेलचा व पानपट्टीचा खर्च त्यालाच करु दिला.
तो निघून गेल्यानंतर मी दोन रुपयाचा पेन विकत घेतला. कारण घरून पेन घ्यायला विसरलो होतो.
रेल्वेस्टेशनला आल्या-आल्या पहिल्यांदा पॅसेंजरची तिकीट काढली. रेल्वे येण्यास बराच वेळ असल्याचे कळले. त्यामुळे फ्लॅटफॉर्मवर एका बाजूला जाऊन बसलो. तेथे थैलीमधून एक कोरा कागद काढून कुसुमांजलीला पत्र लिहायला घेतले.
त्यात लिहले की, ‘मी जरी घर सोडून जात असलो तरी मरणार नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत मी ओळख विसरुन जगणार आहे. त्यामुळे माझा तपास करण्याचा व्यर्थ प्रयत्‍न करु नये.’
त्यात असेही लिहले की, ‘तुला वाटलेच तर दुसरे लग्न करण्यास तुला मोकळीक आहे. माझे तूझ्यावर आता कोणतेही बंधन राहणार नाही. तू मुलांचा सांभाळ कर. त्यांना खूप शिक्षण दे.’ शेवटी माझ्या नोकरीचा सर्व पैसा तुलाच मिळेल. मी कसातरी जगेन, कुठेतरी असेन !’
त्यातच माझ्या साळ्याला उद्देशून लिहले की, ‘तुझ्याकडून मला खूप अपेक्षा आहेत. खूप शिक्षण घेऊन तू समाजाची सेवा कर.’
कारण एवढया लहान वयात त्याला सामाजीक जाणीवा निर्माण झाल्या होत्या. तो उत्कृष्ट पेंटर होता. त्याने पेंटींगच्या कॅडर कॅंपमध्ये शिक्षण घेतले होते. अवघ्या दोन मिनिटात. तो हत्तीचे चित्र भिंतीवर सहज व सुंदर काढायचा. चळवळीचे कार्यकते पूर्ण जिल्हाभर त्याला हत्तीचे चिन्ह व पेंटींग करायला नेत असत. त्याचे अक्षर पण खूप चांगले व वळणदार होते.
चळवळीचे ज्ञान मिळावे म्हणून माझ्या घरी अनेक पुस्तके व ग्रंथाचा संग्रह केला होता. त्याची घरघुती लायब्ररी तयार केली होती. ते कार्यकर्त्याना वाचण्यासाठी देत होतो. त्याचा रेकॉर्ड ठेवला होता. ते सांभाळण्याचे काम तो करीत होता. म्हणून त्याचेकडून अपेक्षा व्यक्‍त करणे साहजिकच होते. शेवटी पत्र लिहणे संपवीलं.
तसेच माझ्या कार्यालयाला सुट्टीचा अर्ज लिहून दोन्हिही पत्रे तेथील पोष्टाच्या डब्ब्यात टाकले.
काही वेळाने पॅसेंजरगाडी आली. गाडीत चढणार्‍या लोकांच्या गर्दीत मी पण चढलो. बसायला जागा नसल्याने बरेच लोक उभे होते. त्यात मी पण होतो. शेवटी ही गाडी खूप उशिरा ठिकठिकाणी लहान-मोठ्या स्टेशनवर थांबत थांबत नागपूरच्या स्टेशनवर आली.
मी आठवणीच्या तंद्रीतून बाहेर पडलो; तेव्हा लक्षात आले की पुष्पांजलीला पत्र लिहायला पाहिजे. मग एका कोपर्‍यात जावून बसलो. थैलीमधून कागद काढून लिहायला घेतले.
पत्र लिहीतांना मनात भावनांचा काहूर व डोळयात अश्रुंचा पूर दाटून आला होता. सारखे माझ्या डोळ्यातून आसवे गळत होते. त्या आसवाचे थेंब त्यावर पडून ओले होत होते. अत्यंत भावणाविवश होऊन मी ते पत्र पुष्पांजलीला लिहित होतो.
पत्र लिहितांना माझे डोळे कसे भरुन आले, त्याचा उल्लेख पत्रात केल्याशिवाय राहवले नाही. एक-एक शब्द मी लिहित गेलो. जवळपास पाच पानाचे पत्र झाले. मी माझे संपुर्ण मन त्यात मोकळे केले होते.
दवाखान्यातील दु:खदायक व कधिही न विसरणारी ती घटना – जे मी तिला यापुर्वी सांगू शकलो नव्हतो, ते सविस्तरपणे पत्रात लिहिले होते. नियतीने मला क्षणार्धात आरोपीच्या पिंजर्‍यात कसे अडकविले, याची इत्थंभूत माहिती मी त्यात दिली होती.
मी तिला लिहले की, ‘पुष्पांजली, येथे मला फार थंडी लागत आहे. माझ्याकडे ना मफलर आहे ना स्वेटर ! मी आता जास्त पैसे खर्च करु शकत नाही. मी जर आजारी पडलो तर माझे कसे होईल ? माझी जीवननौका आता कुठे व कशी भरकटेल याची मला जबरदस्त भीती वाटत आहे. तू मला आत्महत्या करू नका म्हणून बंधनात अडकविले. त्यामुळे आता मी नाही आत्महत्या करु शकत की माघारी फिरु शकत ! आणखी मी एखाद्या कोणत्या गुन्ह्य़ामध्ये अडकणार तर नाही ना, याचे मला भय वाटत आहे. माझ्या नोकरीचं, माझ्या मुलांबाळांचे कसं होईल, याची मला चिंता वाटत आहे. मला आता माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत स्वत:ची ओळख विसरून जगावे लागणार आहे. माझे आवडते खायचे पान सुध्दा आता विकत घेण्याची ऎपत राहिली नाही. त्यामुळेच स्वस्तातली तलफ म्हणून पुन्हा तंबाखू खाणे सुरु केले आहे. मी आता पेपर विकत घेऊ शकत नाही. विकायला ठेवलेल्या, मुडपलेल्या अर्ध्या पानावरच्या तेवढया बातम्या वाचून मला समाधान मानावे लागणार आहे. आता मला टी.व्ही. नको, पंखा नको की झोपायला पलंग-गादी नको ! भिकार्‍यांना दान देणारा माझा हात आता आखडला आहे. माझं मन मला म्हणत आहे की, ‘तू आता यापुढे भिकार्‍यांच्या रांगेत दिसणार आहेस ! ज्या भुताटकीने माझा बळी घेतला, अशा कोणत्याही स्त्री सोबत यापुढे संबंध ठेवणार नाही.’
पुष्पांजली, तू सुखाचा संसार कर. तू महान आहेस. मी तुझ्या मनाचा विनयभंग केला, ही बाब मला सतत बोचत राहील. प्रायश्चित घेतल्यानं मला बरे वाटेल. मी माझ्या पुढिल प्रवासाची जीवनागाथा जीवंत असेपर्यंत कळवित जाईन.’
माझ्या मनात जे काही होतं-नव्हतं, ते सारं पत्रात रेखाटलं. जे नाही आठवलं ते सुटलं असेल – ते माझ्या मनाच्या कंपनाने पुष्पांजलीपर्यंत पोहचवावं – अशी सदिच्छा बाळगून पत्र संपवलं.
पत्र लिहिल्यावर पुन्हा पुन्हा वाचून पाहत होतो. वाचतांना जिथे जिथे माझ्या भावना हेलावत होत्या, त्या त्या वेळी पुन्हा डोळे पाणावत होते. पत्राची घडी करुन पाकिटात टाकले. पाकिटावर पत्ता लिहितांना पुष्पांजलीचे नाव लिहून त्यावर ‘वैयक्‍तिक ’ असे लिहीले.
पत्र लिहून बराच वेळ झाला होता. मात्र पोष्टात टाकावे की नाही अशी द्विधा अवस्था माझ्या मनात निर्माण झाली. जर हे पत्र पुष्पांजलीच्या पतीच्या अथवा कुणाच्या हातात पडून त्यांनी वाचले तर त्यांना सारेच गुपित कळेल आणि त्यांनी जर हे पत्र तिला दाखविले नाही तर तिला खरी गोष्ट कळणार नाही.
पुष्पांजलीने मला सांगितले होते की, ‘याबाबतीत मी कुणाला सांगणार नाही.’ परंतु मीच तर तिला पत्र लिहून हे प्रकरण उघड केले आहे ! त्यामुळे तिची पंचाईत होऊन तिला त्रास होण्याची शक्यता आहे, याची मला भीती वाटायला लागली. पण त्याशिवाय तिला दवाखान्यातील घटना कळणार तरी कशी ? कारण मी तिला त्याबाबतीत काहीच सांगू शकलो नाही. मनाचा हिय्या करुन ते पत्र मी पोष्टाच्या डब्ब्यात टाकलेच.
मी माननीय कांशीरामजींच्या सामाजीक चळवळीत सक्रिय होतो. तेव्हा त्यांच्या दिल्ली येथील ऑफीसमध्ये कारकूनाचे काम करावे व माझ्या नोकरीच्या ऑफीस मधिल कामाच्या अनुभवाचा तेथे उपयोग करावा, असा माझ्या मनात विचार येऊन गेला.
मी नोकरीमध्ये ‘सहाय्यक लेखापाल’ या पदावर काम करीत असल्यामुळे मला अकाऊंटींगचा, कॅशबुक ठेवण्याचा व ऑडीटचा खूप अनुभव होता. मला टाईपिंग, ड्राफ्‍टिंग, अकाऊंटींग, ऑडीटींग, फायलींग इत्यादी सर्व कामे करता येत होते. माझे शिक्षण बि.कॉम पर्यंत झाले असल्यामुळे मला अकाऊंटींगचे चांगले ज्ञान होते. त्यामुळे ते मला निश्चितच ऑफीसच्या कामासाठी ठेवून घेतील, अशी आशा निर्माण झाली होती.
म्हणून मी दिल्लीलाच जायचे ठरविले. तेथे ऑफीसमध्ये काम करावे. त्यांनी राहण्याची-जेवणाची व्यवस्था केली तर ठिक, नाहीतर कुठेतरी अर्धवेळ काम करुन पोटापुरते मिळवावे व जसे इतर अनेक लोक फुटपाथवर झोपतात तसेच आपणही झोपावे. उरलेला वेळ ऑफीसमध्ये काम करण्यामध्ये घालवावा असा मी विचार केला.
जर त्यांनी ठेवलेच नाहीतर शहरांमधे फिरुन संघटनेचा पेपर विकत जावा व अशा प्रकारे चळवळीमध्ये आपले योगदान द्यावे. पुढे आपण चळवळीमध्येच पुर्णपणे सक्रिय होऊन काम करावे व अशारितीने आपला जीवनमार्ग आखावा, असे मी विचाराअंती ठरवीले.
दिल्लीला जाणारी ४.३० वाजताची रेल्वे होती. काऊंटरवर जाऊन मी तिकीट काढले. आतमध्ये फ्‍लॅटफॉर्मवर जाऊन रेल्वे येण्याची वाट पाहत होतो.
त्यादिवशी मी सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते. पोटाची भूक कुठे पळाली ते कळतच नव्हते. कदाचित पैसे संपू नये म्हणून माझे पोट सुध्दा मला सहकार्य करीत असावे.
आता येथून माझ्या जीवनाचा खर्‍या अर्थाने पुढील प्रवास सुरु होणार होता. जसजसा पुढे जाईन तसतसा मी घरापासून-गांवापासून आणखी आणखी दूर जाणार होतो. आता डोळयातील अश्रू कदाचित आटले असावेत. कारण जेव्हा मागील जीवनपट माझ्या डोळयासमोर ऊभा राहायचा, तेव्हा डोळे मात्र आधीसारखे पाणावत नव्हते.
रेल्वे येताच तिकिट सामान्य श्रेणीचे असूनसुध्दा विचाराच्या तंद्रिमध्ये द्वितीय श्रेणीच्या राखीव डब्ब्यात शिरलो.
तेथे खिडकीजवळ जावून बसलो. रात्र झाल्यावर लोक बर्थवर झोपायची तयारी करीत होते. म्हणून मला तेथून उठणे भाग पडले.
मी दरवाज्याजवळील रिकाम्या जागेत येऊन उभा राहिलो. रात्र वाढू लागली. यापुर्वी कुठे जायचे असले की द्वितीय श्रेणी अथवा भारत भ्रमणची सवलत घ्यायची असली की प्रथम श्रेणीमध्ये प्रवास करीत होतो. आता माझ्यावर कशी पाळी आली हे पाहून मी अंतर्मुख झालो होतो.
रेल्वे धाडधाड करीत पुढेपूढे जाऊ लागली. इतक्या लोकांना ती ओढत ओढत घेऊन जात होती. त्या लोकांसोबत मला पण ती ओढत नेत होती.
दोन बंदूकधारी रेल्वे पोलीस येतांना दिसले. त्यापैकी एक पोलीस माझ्याजवळ येऊन विचारपूस करु लागला.
‘ कहाँ जा रहे हो?’
‘ दिल्ली..’
‘तिकीट निकाली है?’
‘हॉ.’
‘ किससे मिलने जा रहे हो?’
‘ मान्यवर कांशीरामजीसे.’
मा.कांशीरामजींचं नाव ऐकल्याबरोबर तो थोडा थबकला आणि मला म्हणाला, ‘ठिक है. बैठे रहो.’
तो पोलीस कसा काय वरमला याचे मला आश्चर्य वाटले. कदाचित तो पण कांशीराम साहेबांचा चाहता असावा असं मी समजून गेलो.
त्यानंतर लगेच दुसरा पोलीस माझ्याजवळ आला. त्यांनी मला विस रुपये मागितले. मी पहिल्या पोलीसाकडे केविलवाण्या नजरेने पाहिले. त्यांनी माझ्याकडे पाहून त्या पोलीसाला हाताने इशारा करुन सोडून द्यायला सांगितले. त्यामुळे माझी पोलीस चौकशीतून सुटका झाली.
आता मी निश्चिंत झालो. थैलीमधून टॉवेल काढून खाली अंथरला व अंगावर चादर ओढून घेतली. तेवढया लहानशा जागेत पाय आखडून झोपण्याचा मी प्रयत्‍न करीत होतो. रात्र संपेपर्यंत झोप कशी लागली़च नाही. जस-जसी रात्र वाढत होती, तस-तसी थंडी पण वाढत होती.
रेल्वेच्या हेलकाव्या प्रमाणे माझे जीवन सुध्दा हेलकावे घेत घेत पुढे जाऊ लागले होते. दिल्लीला जाऊन काय करायचे हा विचार पुन्हा पुन्हा माझ्या डोक्यात येत होता. त्याची उजळणी मनामध्ये राहून राहून होत होती. आता मला पुढचे वेध लागले होते.
रेल्वे दिल्लीला सकाळीच येऊन पोहचली. मी खाली उतरलो. पाण्याच्या नळाजवळ गेलो. थैलीतून टूथपेस्ट काढून दात घासले. तोंडावरून पाणी फिरवले. डोक्यावरचे केस व्यवस्थित विंचरुन घेतले. तसाच स्टेशनच्या बाहेर पडलो.
दिल्लीला मी पहिल्यांदाच आलो होतो. त्यामुळे एक अनामीक भीती वाटत होती. रस्त्याच्या कडेला केळे विकणारा माणूस दिसला. आता मला पोटात भूक लागल्याचे जाणवू लागले. एक रुपयाचे दोन केळे विकत घेऊन खाल्लेत. थोडीफार पोटाची आग शमली.
पेपर विकणारा पोरगा दिसला. वाटलं पेपर विकत घेऊन काय बातम्या आहेत ते पाहू या ! मी घरातून निघून गेल्याची बातमी तर त्या पेपरमध्ये नाही ना… मला कसंच तरी वाटले. पेपरमध्ये बातमी यायला मी काय इतका मोठा माणूस थोडाच आहे ! आणि इतक्या लांबच्या पेपरमध्ये येईल तरी कसे ? शक्यच नाही… मी ओठातल्या ओठात खुदकन हसलो. माझ्यात होत असलेला असा काहीसा बदल मला पहिल्यांदा जाणवला. शेवटी मनाचे समाधान करुन पेपर विकत घेतला नाही. कारण पैशाचा प्रश्‍न होता !
तसाच समोर जाऊन करोलबागला जाणार्‍या बसची चौकशी केली. करोलबागला एक ऑफीस असल्याचे मला माहीत होते. बस आल्यावर मी करोलबागला पोहचलो. तेथील ऑफीसमध्ये चौकशी केल्यानंतर असे कळले की, महाराष्ट्राचे संयोजक नॉर्थ एव्हेन्यूच्या ऑफीसला आलेले आहेत. त्यामुळे मला हायसे वाटले ! कारण ते माझ्या अगदी जवळच्या परिचयाचे होते. ते माझी निश्चितच शिफारस करतील अशी मला खात्री वाटत होती.
त्या ऑफीसचा पत्ता घेउन मी नॉर्थ एव्हेन्यूला गेलो. तेथे ते बसले होतेच. मला पाहून हसले व कसे काय आलांत म्हणून विचारु लागले. त्यांना मी येथे राहून ऑफीसमध्ये नेहमीसाठी काम करण्याची इच्छा व्यक्‍त केली. त्याचे कारण विचारले असतांना, मी माझ्या घरघुती भांडणाचा उल्लेख करुन वस्तुस्थिती समजाऊन सांगितली. तेव्हा त्यांना सुध्दा धक्का बसल्याचे जाणवले होते.
त्यांनी व ऑफीसमधील इतर कार्यकर्त्यांनी सल्ला दिला की, ‘तुम्ही परत जाऊन तूमच्या नोकरीतील ऑफीसच्या भानगडी मिटवून या. नोकरीतील पैसे घेऊन कुटुंबाचे पालनपोषण करण्याची तजवीज केल्यानंतरच दिल्लीला या. तुम्हाला येथे ऑफीसमध्ये निश्चितच काम करता येईल. तुमच्या राह्ण्याची व जेवणाची व्यवस्था होईल. त्याची काळजी करु नका. तुम्ही जर तसे न करता येथे ऑफीसमध्ये काम करतांना मान्यवर कांशीरामजींना दिसलेत तर त्यांना सुध्दा ते आवडणार नाही. ते आता दौर्‍यावर गेले आहेत. ते आल्यावर तुमची विचारपूस करतील. तेव्हा तुम्ही वाटल्यास दोन-तीन दिवस येथे थांबा. तुमच्या मनावरील ताण कमी झाल्यावर तुम्ही जायला काही हरकत नाही.’
ऑफीसमध्ये काम करणारे चार व्यक्‍ती महाराष्ट्राचेच होते. त्यांना पण माझ्याबाबतीत झालेल्या प्रकाराबद्दल सहानुभूती वाटत होती.
त्यांचे सर्वांचे बोलणे मला पटले. कारण मी विशीष्ट नमुन्यामध्ये रजेचा कालावधी टाकून अर्ज दिला नाही. साहेबांची पूर्व परवानगी घेतली नाही. त्यामुळे माझ्या विरुध्द कारवाई करून माझा पगार काढणे बंद करतील. मग घरचे लोक काय खातील ? पैशाअभावी कसा खर्च करतील ? असे अनेक प्रश्न माझ्यासमोर उभे ठाकले.
तसेच नोकरी सोडण्याच्या संदर्भात रितसर कार्यवाही व्हायला पाहिजे. नाहीतर मला नोकरीतून काढण्याची कारवाई करतील. त्यामुळे काही आर्थिक फायदे मिळणार नाहीत. अशी मला जबरदस्त भीती वाटायला लागली. म्हणून मला ह्यासाठी तरी गावला परत जाणे आवश्यक झाले होते. त्यानंतरच मोकळया मनाने मी येथे पुन्हा येऊ शकत होतो.
ऑफीसमध्ये काम करणारे सारेजण एका खासदाराच्या क्वॉटरमध्ये राहत होते. तेथेच जेवणाची व्यवस्था होती. मी पण त्यांच्या सोबत संध्याकाळी जेवण घेतले. मी नवीन असल्यामुळे जेवायला आलेले लोक माझी आस्थेने विचारपूस करीत होते. महाराष्टातील लोकांचा ते आदर-सन्मान करीत असल्याचे मला जाणवत होते.
पुष्पांजलीच्या घरी मी जेवण केले, त्यानंतर दोन दिवसांनी आता जेवण करीत होतो. तिच्या घरच्या जेवणांनी माझी भुक दोन दिवस तरी टिकऊन ठेवली होती.
रात्रीला त्यांच्याच क्वॉटरमध्ये झोपलो होतो. हे प्रकरण घडल्यापासून मला पुरेशी झोप मिळाली नव्हती. ह्यावेळेस मात्र बर्‍यापैकी झोप लागली होती.
सकाळी ८.३० वाजेपर्यंत तयारी करुन मला ऑफीस जवळील कँटीनमध्ये यायला सांगितले. तेथे आमलेट, ब्रेड व दुध याचा नास्ता घेऊन ऑफीसमध्ये गेलो. तेथे मी कॅशबुक मेंटनन्स, टाईपिंग, फायलींग इत्यादीचे कामे करु लागलो. दुपारी सर्वांसोबत क्वॉटरमध्ये जेवण करायला गेलो. त्यानंतर पुन्हा ऑफीसमध्ये येउन रात्री ९.०० वाजता ऑफीस बंद होईपर्यंत काम करुन आम्ही रात्रीचे जेवण करायला गेलो. असा तो दिनक्रम होता.
तेथे राष्ट्रीय स्तरावर ‘बहुजन संघटक’ नावाचा हिंदी भाषेत साप्ताहीक वृतपत्र निघायचा. त्यात चळवळीच्या संदर्भात बातम्या, लेख प्रकाशीत करुन संपुर्ण भारतात त्याचे वितरण करायचे. हे काम महाराष्ट्रातील एक कार्यकर्ता करीत होता. त्याबाबतीत मी त्याला मदत करायचं काम करीत होतो.
तेथे मी दोन दिवस राहून गावला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आलो. तिकीट काढून फ्‍लॅटफॉर्मवर जाऊन थांबलो. मी तंबाखू व चुन्याची पुडी काढली.
बाजूला एक गरीब बाई बसली होती. तिने मला तंबाखू व चुन्याची मागणी केली. मी तिला त्या दोन्हिही पुडया देऊन टाकल्या व तुझ्याकडेच ठेव, असे सांगितले.
तिने तंबाखूला चुना लाऊन घोटला आणि तोंडात टाकला. नंतर तिने एका बोटाने चुना काढून तिच्या पायाच्या पोटरीला असलेल्या खांडकावर लावला.
तिच्या बाजूला एक लहान मुलगी अंगावर फाटकी चादर ओढून झोपली होती. तिच्या डोक्यावरील पांघरुन काढून तिच्या डोक्याला असलेल्या खांडकाला तिने चुना लावला. ती असे करतांना मी तिच्याकडे पाहत होतो. मी तिला त्या मुलीबद्द्ल विचारले असतांना तिला ताप आला, असे ती सांगत होती. डोक्याच्या खांडकामुळे तिला ताप चढला असावा. मी तिला दहा रुपयाची नोट देऊन दवाखान्यात घेऊन जायला सांगितले. तीने पैसे घेतले, पण काहीच बोलली नाही. गरिबाचं दु:ख काय असते, हे तिने शब्दाने न सांगता आपल्या पोटातच ठेवले होते. तिची अशी दिनवाणी अवस्था पाहून मला गहिवरुन आले.
लवकरच गाडी आली. सामान्य श्रेणीचा डब्बा पाहून मी त्यात चढलो.
त्या डब्ब्यात सी.आर.पी. पोलीस व सैनिक बसले होते. रात्र झाल्यावर ते झोपायची तयारी करीत असतांना दंडुकाचा धाक दाखऊन डब्ब्यात बसलेल्या इतर प्रवाशांना त्या डब्ब्यातून दुसर्‍या डब्ब्यात जायला सांगत होते. कोणी जाग्यावरुन उठायला नकार दिला तर त्यांना धक्काबूक्की करीत होते.
मला सुध्दा ते उठायला सांगत होते. त्यापूर्वी माझा तंबाखू खाण्याच्या निमित्ताने एका सैनिकाशी परिचय झाला होता. त्याने तंबाखू घोटण्यासाठी जेव्हा तंबाखू व चुना काढला तेव्हा मी त्याला मागितले होते. त्या बाईकडे मी पुडया दिल्यामुळे आता माझ्याकडे तंबाखू व चुना राहिला नव्हता. मला अनुभव होता की, कॊणी कां असेना तो सहसा तंबाखू व चुना द्यायला कधिच नकार देत नाही. त्याच्यावर सुध्दा कधितरी तशी पाळी येतच असते. म्हणून तंबाखू खाणारे त्या बाबतीत मात्र फार उदारता दाखवितात.
जेव्हा एक पोलीस माझ्यावर दंडुका उगारायला लागला, तेव्हा तो सैनिक मध्येच पडून त्याला रोखले व मला दोन बेंचच्या मध्ये असलेल्या जागेवर बसण्यास सांगितले. अशा रितीने माझ्या जीवनाची ससेहोलपट त्यांनेच थांबविली होती. तंबाखाने मला दुसर्‍या डब्ब्यात जाण्यापासून रोखले होते. एवढे मात्र निश्चित !
तंबाखू घोटून ओठात ठेवल्यामुळे तोंडाचा वास येत असेल, कँसरचा रोग होण्याचा धोका असेल परंतु तंबाखाचा असाही एक फायदा होतो, असे मला त्यावेळी नव्याने दिसून आले.
दुसर्‍या दिवशी दुपारी मी घरी आलो. तेव्हा बरेच लोक घरी आलेले दिसलेत. माझा लहान भाऊ व भावसून आले होते. कुसुमांजलीला जेव्हा दवाखान्यात भरती करण्यात आले होते, त्यावेळेस मी त्याला पत्र लिहीले होते. म्हणून ते दोघेही तिला पाहायला आले होते. घरी आल्यानंतर मी निघून गेल्याचे त्यांना कळले होते.
माझी बहीण, भाऊजी, कुसुमांजलीचे बाबा व मावशी पण आले होते. मामीजी तर आधीच घरी होत्या.
मी घरी पोहोचलो, त्याआधीच माझे पत्र येऊन पोहचल्याचे कळले. त्यात मी घरी परत येणार नाही,. माझी ओळख विसरुन मी जगणार आहे, असे लिहिले होते. त्यामुळे सारेच दु:खात बुडाले होते.
मी घरात पाय टाकल्याबरोबर मला पाहून घरातले वातावरण स्मशान शांतता पसरल्यासारखे झाले होते. कोणाच्याही चेहर्‍यावर दु:ख अथवा आनंदाच्या छटा न दिसता एकमेकांकडे पाहत होते.
मी घर सोडले, त्यादिवशी रात्रीला पुष्पांजली नसल्यामुळे मामीजींनाच स्वयंपाक करावा लागला होता. दवाखान्यात डब्बा पोहचविण्यासाठी त्या माझी वाट पाहत होत्या. बराच वेळ होऊनही मी घरी न आल्यामुळे माझ्या साळयाला डब्बा घेऊन जाण्यास सांगितले. तो सायकलने डब्बा घेऊन गेला.
दवाखान्यात पोहचल्यावर त्याने त्याच्या ताईकडे डब्बा दिला.
‘भाऊजी व आई का नाही आले?’ असे तिने विचारले.
‘भाऊजीने ताईला तिच्या घरी पोहचवून दिले. घरी आल्यावर परत कुठे गेलेत का ? अजूनही आले नाहीत. म्हणून मीच डब्बा घेऊन आलो. तू आता जेवण करुन घे.’ असा तो म्हणाला.
‘अस्सं… ! पुष्पांजली गेली गावाले…! गेली एकदाची कटकट…! तुझे भाऊजी गेले असतील चळवळीच्या कामाले…! माझी कुठे त्यांना फिकीर आहे…?’ असे ती रागावून म्हणाली.
मामीजी न आल्यामुळे तिला आता एकटीलाच दवाखान्यात राहण्याची पाळी आली होती.
इकडे घरी मी चळवळीच्या कामानिमित्त नेहमी बाहेर राहत असल्यामुळे कधी कधी उशिरा घरी पोहचत होतो, हे घरच्या लोकांना माहिती होते. त्यामुळे ते माझ्याबाबतीत विशेष काळजी करीत नव्हते.
या दरम्यान शाळेला तिन दिवस सुट्ट्या आल्या होत्या.
मी घरी का आलो नाही ? कुठे गेलो असेल ? याची काळजी सर्वानाच लागली होती. आज येईल, उद्या येईल म्हणून माझी सर्वजण भिरभीर वाट पाहत होते.
मी घरी आलो नसल्याबद्दल कुसुमांजलीला कुणीच सांगितले नाही. साळा रोज दवाखान्यात डब्बा पोहचवीत होता. तिची तब्बेत खराब असल्यामुळे तिला आणखी काळजी नको म्हणून तो तिला सांगत नव्हता.
तिसर्‍या दिवशी मुलीला शाळेचा होमवर्क करायचा होता. म्हणून तीने दप्‍तर काढले. दप्‍तरातील कंपासपेटी काढली. पेन काढण्यासाठी तिने कंपासपेटी उघडली. त्यात तिला चिठ्ठी दिसली. ती वाचून जोरात रडायला लागली.
‘बाबा निघून गेले आहेत. ते आता घरी परत येणार नाहीत, असे त्यांनी या चिठ्ठीत लिहिले आहे.’ असे ती रडता रडता सांगत होती.
ती चिठ्ठी सर्वांनीच पाहीली व खरोखरच तसे लिहीले असल्याचे त्यांना खात्री झाल्यावर घरात शोककळा पसरली. बाबा, मुलं, मामीजी असे सर्वचजण रडायला लागले. कुणीच कुणाला समजावण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
दुसर्‍या दिवशी ही बातमी कुसुमांजलीला सांगितली. तेथेच ती रडायला लागली. स्वत:ला दोष देत ती सारखी रडत होती. वार्डमधील पेशंट तिच्याकडे पाहत होते.’
‘बाई, तुझ्या नवऱ्यासोबत अशी भांडायला नको होते. पहा आता काय परिणाम झाला.’ असे कुणीतरी तिला म्हणाले.
ती आता दवाखान्यात राहायला तयार नव्हती.
‘मला घरी घेऊन चल.’ असे तिने भावाजवळ आग्रह धरला. डिस्चार्जचे कागदपत्रे तयार करुन तिला घरी घेऊन आला.
घरी सर्वच शोकाकूल झाले होते.
कुसुमांजली सारखी रडत होती. तिची छाती दम्याने भरुन येत होती. तिची तब्बेत आणखी बिघडणार तर नाही ना ! अशी सर्वांना भीती वाटायला लागली होती.
मला आता कुठे कुठे शोधायचे याचा ते विचार करु लागले.
पहिल्यांदा माझ्या बहिणीकडे विचारपूस करण्यासाठी कुसुमांजलीने भावाला पाठविले. तेथून तो परत आला. त्यानंतर तिने त्याला पुष्पांजलीच्या गावला पाठवले. कदाचित मी तेथे गेलो असेन किंवा कुठे गेलो असेन हे तिला माहिती असेल, असे त्यांना वाटले.
मी घरुन निघून गेल्याची बातमी वार्‍यासारखी जिकडे-तिकडे परसरली होती. काही लोक घरी येऊन सांत्वन करीत होते. ते परत येतील म्हणून आशा दाखवित होते.
मी घरी पाऊल टाकताच ती म्हणाली, ‘ किती शिक्षा दिली मला ?’
मी तिला म्हटले, ‘ मी पुन्हा जाणार आहे. पूर्वी सांगून गेलो नव्हतो. आता सांगून जाणार आहे.’
बाबा मला म्हणाले, ‘ बाबू, तू कुठे गेला होतास रे…? आम्हाला सोडून… तुझ्या आठवणीनं आम्ही किती हळहळलो ! त्या दिवसापासून जेवणाचा घास आमच्या तोंडात जात नव्हता ! तुझ्यासाठी कुसुमांजली किती रडत होती. तिचा वेदनेचा ठणका काही केला कमी होत नव्हता ! आता बरे झाले तू आलास ! तू कुठे जाऊ नकोस आम्हाला सोडून…’
एवढे बोलून तो ढसाढसा रडायला लागला. त्याच्या रडण्यामूळे मुलेही फुसफुसून रडायला लागले. मलाही रडू कोसळले. सगळे वातावरण शोकाने भारावून गेले होते.
मी लगेच तयारी करुन ऑफीसला गेलो. मी निघून गेल्याची चर्चा तेथे पण सुरु होती.
मला पाहून सर्वांना धक्काच बसला. मला खूप अवघडल्यासारखे झाले होते. कुठे गेले होते ? कां गेले होते ? इत्यादी अनेक प्रश्‍न विचारुन ते मला हैरान करीत होते. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता देता मला नकोसे झाले होते.
माझ्याबाबतीत असे घडेल, असे त्यांना कधीच वाटले नसल्याचे सांगत होते.
‘ बरे झाले तुम्ही आलांत.’ असे ते प्रतिक्रीया व्यक्‍त करीत होते. कुणालाही न सांगता अचानक निघून गेल्याने काय परिणाम होतात, याचे रहस्य मला त्यावेळी कळले होते.
मी एक महिन्याच्या सुट्टीचा अर्ज विहीत नमूण्यात लिहून, माझ्या विभागीय लेखापालाची त्यावर शिफारस घेतली. तो अर्ज कॅबिनमध्ये साहेबांकडे घेऊन गेलो.
त्यांनी सुध्दा माझी आस्थेने विचारपूस केली. एरवी सुट्टी देतांना साहेब आढेवेढे घ्यायचे. परंतु आता माझी बिघडलेली मानसिक अवस्था पाहून त्यांनी सहज सुट्टी मंजूर केली. मी त्यांचे आभार मानून कॅबिनच्या बाहेर आलो.
आता मला ऑफीसची काही काळजी राहिली नव्हती.
मी घरी येतांना माझी वैयक्‍तिक फाईल व पगाराची पुस्तिका सोबत आणली. त्यावरुन मी नोकरी सोडली तर किती पैसे मिळतील याचा हिशोब करू शकत होतो.
संध्याकाळी मी माझा विचार सर्वांना सागितला.
यापुढे कुसुमांजली सोबत जीवन कंठने अत्यंत धोक्याचे वाटत असल्याचे त्यांना सांगितले. कारण तिच्या संशयखोर व वाईट वागण्याच्या वृतीमुळे एकतर मी वाईट मार्गाने जाण्याची किंवा रागाच्या भरात माझ्या हातून काहीतरी अनर्थ घडण्याची जोरदार शक्यता आहे. त्यामुळे मी व माझे कुटुंब उध्वस्त होण्याची मला खूप भीती वाटत असल्याचे सांगितले.
‘मी नोकरी सोडून दिल्लीला जाईन; पुन्हा येथे परत येणार नाही. नोकरी सोडल्यानंतर जे काही पैसे मिळतील ते मी कुसुमांजलीला देईन. त्यात तिने कुटूंबाचा व मुलांच्या शिक्षणाचा खर्च करावा.’ असेही मी म्हणालो.
यावर कुसुमांजली एकदम उसळून म्हणाली, ‘ नाही. नाही. तुम्ही कोठेच जाऊ नका. नोकरी सोडू नका. मला घटस्फोट द्या. मी माझे पोट कसेही भरेन. मला तुमच्या नोकरीतला पैसा नको…’ इतके बोलून ती बाहेर जायला लागली.
तिने अत्यंत टोकाची भुमिका घेतली होती. तिला सर्वांनी समजाऊन परत आणले. घटस्फोट घेणे हा मार्ग मलाही पसंद पडला नाही. ती, मुलं-बाळं उघडयावर पडू नये, असेच मलाही वाटत होते. तिच्याबद्दल मला आंतरीक ओढ होतीच. परंतु तिचे बोलण्याचे व वागण्याचे प्रकार आठवले की, तिच्याजवळ कधिच राहू नये, असेच मला राहून राहून वाटत होते.
‘ सध्या तुम्ही नोकरी सोडून कुठेही जाऊ नका. काही दिवसांनी त्यावर विचार करा. सगळं काही बरोबर होईल. तुमच्या मुला-बाळांच्या पालणपोषणाचा व शिक्षणाचा प्रश्‍न आहे. दिवसोंदिवस शिक्षणाचा खर्च वाढत आहे. कुसुमांजलीला ती जबाबदारी पार पाडणे अवघड होईल.’ असेच सर्वांनी समजुतीच्या सुरात बोलून आपापली भुमिका मांडली.’
मी अंतर्मूख होऊन त्यावर गंभीरपणे विचार करु लागलो.
खरेच मुला-बाळांच्या पालणपोषणाची व शिक्षणाची जबाबदारी कुसुमांजली व्यवस्थीत पार पाडू शकेल की नाही, शंकाच होती. त्यांचे भविष्य पार मातीमोल होईल. त्यांना वनात ढकलण्यात मीच जबाबदार राहीन. नोकरी सोडणे खरेच चुकीचे पाऊल ठरेल, असेच मला वाटले. लोकांना नोकर्‍या मिळत नाहीत व माझ्याकडे असलेली नोकरी मी सोडतो. घरघुती भांडणात नोकरी गमाविली, त्याबद्दल लोक मला मुर्खात काढतील. मी स्तब्ध झालो. मला काय बोलावे ते सुचत नव्हते.
एवढयातच पुष्पांजलीचे पती व माझा साळा असे दोघेही बाहेर आलेले मला दिसले. मी त्यांचेशी बोलण्यासाठी बाहेर आलो.
मी त्यांना विचारले, ‘माझे पत्र मिळाले काय?’
त्यावर ते म्हणाले, ‘होय.’
ते पुढे म्हणाले की, ‘पत्र पहिल्यांदा माझ्याच हातात पडले. मी ते पुर्णपणे वाचल्यावर झालेला प्रकार माझ्या लक्षात आला. काय घडले म्हणून मी पुष्पांजलीला विचारले. त्यापुर्वी तिने मला काहीच सांगितले नव्हते. मी तिला सांगितले की, तुझे भाऊजी घर सोडून गेले आहेत. तुला तेथे नसते ठेवले तर बरे झाले असते. आता पहा काय प्रकार झाला हा…! वाच हे पत्र म्हणजे तुला सर्व काही कळेल.’
पत्र वाचून ती सुन्न झाली. ती काहीच बोलत नव्हती. तेवढयातच हा साळा आला. ‘ घर सोडून जाण्याबाबत पुष्पांजलीला माहित असेल किंवा एखाद्यावेळेस भाऊजी येथे आले असतील म्हणून ते पाहण्यासाठी मला पाठवीण्यात आले.’ असे त्याने सांगितले.
मी त्याना सांगितले, ’पुष्पांजली स्वच्छ आहे. तिची काहीच चूक नाही, मीच अपघाताने तिच्या जवळ गेलो होतो. माझा केवळ स्पर्ष सुध्दा तिला सहन झाला नाही. त्यामुळे मीच दोषी आहे. बाकीचे सर्व तुम्ही माझ्या पत्रात वाचले असेलच. त्यात मी सविस्तरपणे लिहिले आहे.’
माझे बोलणे ऐकून त्यांनी मला धिर दिला.
मला म्हणाले, ‘हे प्रकरण आम्ही कुणालाही सांगणार नाही. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत रहा. झाले गेले सर्व विसरुन जा.’
माझ्या मनावरील ताण कमी करण्यासाठी माझ्या भावाने त्याच्याकडे येण्याचा आग्रह केला. माझी आई त्याच्याकडेच होती. म्हणून तिला सुध्दा भेटायची मला ओढ लागली होती.
दुसर्‍या दिवशी सकाळी जेवण करुन आम्ही एस.टी. स्टँडवर जाण्यास निघालो. आमच्या सोबत पुष्पांजलीचे पती सुध्दा त्यांचे गावला जाण्यासाठे एस.टी. स्टँडवर आले. त्यांचे गाव माझ्या भावाच्या गावाच्या अलिकडे त्याच रोडवर होते. त्यानी आमच्या सर्वांच्या एस.टी. बसच्या तिकिटा त्यांच्या गावापर्यंत काढल्या होत्या.
त्यांचे गाव आल्यावर आम्हाला त्यांचेच गावला उतरण्याचे सांगितले.
मी त्यांना म्हटले की, ‘तुम्ही सर्वजण त्यांचेकडे जा. मी मात्र येणार नाही.’ पुष्पांजलीने म्हटले होते की, ‘आता आपण यापुढे एकमेकांच्या घरी जावू नाही.’ म्हणूनच त्याच्या घरी न येण्याचे कारण त्यांना न सांगताच मी नकार दिला होता. मी बस मधून खाली ऊतरलो नाही. म्हणून माझा भाऊ सुध्दा खाली उतरला नाही. ते बसमधून एकटेच उतरले. आमची बस पुढे निघून गेली.
मध्ये एका गावला बस थांबली होती. तेथे उतरुन माझ्या भावांनी शिंगाडे विकत आणले. आम्ही त्यापैकी काही शिंगाडे बसमध्येच खाल्लेत. एखाद्या तासाने आम्ही भावाच्या घरी पोहचलो असेन.
आई मला पाहून घरातून लगबगीने बाहेर आली. ‘आला माहा बाबा… बरं झालं आलास…’ असं म्हणून नेहमीप्रमाणे तिने माझ्या दोन्ही गालाचे व कपाळाचे पटापट मुके घेतले. तिच्या मायेच्या उबेने माझ्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखे वाटले…! मी बर्‍याच दिवसानंतर तिला भेटलो की, ती असेच उल्हासित व आनंदीत होऊन माझ्या गालाचे व कपाळाचे मुके घ्यायची. तसेच जाण्याच्या वेळेस निरोप घेतांना सुध्दा ती अशीच करायला विसरत नव्हती. तिला भेटल्यावर मलाही अतोनात आनंद झाला.
तिला याबाबतीत काहीच माहिती नव्हते, ते बरे झाले…! नाही तर तिने आक्रोश मांडला असता व कुसुमांजलीवर रागाचे अंगार फेकले असते. नंतरही आम्ही कोणीच तिला याबाबतीत काहीही सांगितले नाही.
मी एक महिना सुट्ट्या काढल्यामुळे घरी जायची घाई नव्हती. भावाने आम्हाला बाहेर फिरायला नेवून माझे मन रिझाविण्याचा प्रयत्‍न करीत होता. आठ दिवस थांबून मी घरी परत आलो.
सुट्ट्या आणखी शिल्लक असल्यामुळे मी घरीच आराम करीत होतो. आराम कसला? माझ्या कर्मचारी संघठनेचे व चळवळीचे लोक घरी येत होते. कधी कधी त्या कामानिमित्त मला बाहेर सुध्दा पडावे लागत होते.
मी माझ्या खात्यातील कर्मचारी संघटनेचा सर्कल सचिव असल्याने  कर्मचार्‍यांच्या समस्याकडे मला लक्ष देणे भाग होते.
तसेच माननीय कांशीरामजींच्या सामाजीक चळवळीमध्ये मी सक्रियपणे काम करीत असल्याने चळवळीसाठी लागणारा निधी जमा करण्याचे काम मुख्यत: माझ्याकडेच होते.
तसेच या  चळवळी अंतर्गत  सर्व खात्यातील कर्मचारी-अधिकारी वर्गाच्या केंद्रिय कार्यकारणीत सहसचिव असल्याने या संघटनेचे  कामकाज सुध्दा मला  पाहावे लागत होते. यामुळे कार्यकर्ते, वरिष्ठ नेते, कर्मचारी व अधिकार्‍यांशी माझा दांडगा संपर्क  वाढला असल्याने घरी  सारखी वर्दळ सुरु असायची.
तसेच कुसुमांजलीला सुध्दा महिला आघाडीमध्ये काम करायला मी प्रोत्साहित करीत होतो. तिला महिला आघाडीच्या कार्यक्रमाला घेऊन जात होतो. तिला भाषण लिहून देऊन कार्यक्रमात सादर करायला सांगत होतो. तिच्या नांवाने मी निरनिराळ्या विषयावर लेख लिहून प्रकाशीत करीत होतो. मी माझ्या  नावाने राजकीय स्वरुपाचे लेख प्रकाशीत करु शकत नव्हतो. हेही त्यामागे एक कारण होते. परंतु याशीवाय दुसरा उद्देश यामागे असा होता की, सामाजिक कार्यात भाग घेतल्याने सामाजिक दडपण येते. शिवाय वैचारिक कक्षा रुंदावतात. म्हणून वागण्यावर बंधने येवून वागणुकीत सुधारणा होईल. त्या दृष्टीने मी तिला सामाजिक व राजकीय कार्यामध्ये भाग घेण्यास प्रेरीत करीत होतो.

मी चळवळीत इतका गुंतून गेलो होतो की भोवताली जखडलेला हा पाश तोडणे मला सहजासहजी आटोक्याच्या बाहेरचे वाटत होते. म्हणून नोकरी सोडण्याचा विचार मनातून झटकून टाकावा लागला.

खरं म्हणजे नोकरी सोडून दिल्लीला परत जाण्याच्या उद्देशाने घरी आलो होतो. पण येथे आल्यावर उलटेच झाले. माझी नियोजीत योजना नियतीने निष्फळ ठरवली होती.

 

बहुजन समाज पार्टी कमजोर का होत आहे?

7 Jul

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकाळात शेडूल्ड कास्ट फेडरेशन हा मजबूत पक्ष होता. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर स्थापन झालेल्या भारतीय रिपब्लिकन पार्टीचे अनेक तुकडे होऊन त्यांचे अनुयायी एक एक तुकडा घेऊन चघळत बसलेले होते आणि आताही तेच सुरु आहे. आरपीआयची अशी दुरावस्था झालेली पाहून मा. कांशीरामजी यांनी १९८४ साली बहुजन समाज पार्टीची स्थापना करून अथक प्रयास व लोकसहभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय मान्यता मिळवून दिली. परंतु सद्यस्थितीत याही पक्षाची वाटचाल पाहतांना आरपीआय सारखीच अवस्था होते की काय असे वाटायला लागले आहे.
सुरुवातीच्या काळात बहुजन समाज पार्टीने उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाना, मध्यप्रदेश, काश्मीर, बिहार या राज्यात आपला दबदबा निर्माण केला होता. त्याशिवाय राजस्थान, आंध्र, छत्तीसगढ. कर्नाटक व दिल्ली याही राज्यात आमदार निवडून आणण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे उत्तरप्रदेशशिवाय पंजाब व मध्यप्रदेश या राज्यातही सत्तेचा प्रबळ दावेदार म्हणून पक्षाची गणना होत होती.
२००७ साली मायावतीच्या नेतृत्वात पक्षाला निर्विवाद सत्ता मिळाली. लोकसभेचे २१ खासदार व राज्यसभेचे १६ खासदार बनले. त्यामुळे केंद्रीय सरकारवर वचक निर्माण झाला. याचा प्रभाव इतर राज्यात पडून तेथे सुध्दा पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येतील, असे जो-तो स्वप्ने रंगवीत होता. महाराष्ट्रात सुध्दा तसेच घडेल असे वाटत होते. कारण महाराष्ट्रातील जनता रिपब्लिकन पार्टीच्या फाटाफूटीच्या व स्वाभिमानशून्य राजकारणाला कंटाळली होती. त्यामुळेच पक्षाला होणाऱ्या मतदानाची टक्केवारी उत्तरोत्तर वाढत जात होती. पण नंतरच्या काळात टक्केवारी घसरत गेली.
असाच प्रकार इतर राज्याच्या निवडणुकीत सुध्दा झाला. एकेकाळी ९ आमदार व ३ खासदार दिलेल्या पंजाबमध्ये आता एकही आमदार व खासदार नाही. मध्यप्रदेशात सुध्दा ११ आमदार व २ खासदार निवडून आले होते. तेथेही बीएसपीचा दबदबा कमी झाला. हरियाणात १ खासदार होता. आता तेथेही काही राहिले नाही. बिहारमध्ये ५ आमदार तर काश्मीरमध्ये चार आमदार होते. आता एकही नाही. २०१२च्या उत्तरप्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत तर कडेलोट झाला. या राज्यात पक्षाचा पराभव होवून विरोधी बाकावर बसण्याची पाळी आली. १९१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत बीएसपीचे पानिपत झाले. एकही खासदार निवडून आला नाही. त्यामुळे पक्षाची राष्ट्रीय मान्यता धोक्यात आली. असं का होत आहे. याचे विश्लेषण करायला कोणीही धजत नाही.
बाबासाहेबांच्या हयातीत आणि त्यानंतर मा.कांशीरामजींच्या काळात सुध्दा महाराष्ट्रात विदर्भ अग्रेसर होता. विदर्भातून जरी आमदार, खासदार निवडून आलेले नसले, तरी बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये प्रतिनिधी निवडून येण्यास सुरुवात झालेली होती. कधी नव्हे पण २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही, पण एकट्या विदर्भात १० टक्के मतदान घेऊन कॉग्रेस-राष्ट्रवादीचे ११ ही उमेदवार पाडलेत. म्हणजे पाडण्याच्या दुसऱ्या पायरीवर मजल मारून जिंकण्याच्या तिसऱ्या पायरीवर पाय ठेवण्याची सिद्धता पक्षाने केली होती. पक्षाच्या या घौडदौडीने महाराष्ट्रातील कॉग्रेस-राष्ट्रवादीला चागलीच धडकी भरली होती.
परंतु त्याच विदर्भातील अग्रगण्य कार्यकर्त्यांना पूर्वी आणि नंतर पक्षातून काढून टाकल्याने किंवा काहीजण निष्क्रीय झाल्याने पक्षाला त्याची किंमत अद्यापही मोजावी लागत आहे. विशेष म्हणजे असं करतांना काहीतरी खोटे-नाटे कहाण्या तयार केल्या जात होत्या. पूर्वी मा. श्रीकृष्ण उबाळे हे महाराष्ट्राचे संयोजक व नंतर अध्यक्ष असतांना बहुजन समाजातील निरनिराळ्या जातीचे नेते/कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्षात आले होते. हा त्यावेळेसचा माहोल जर टिकला असता तर उत्तरप्रदेशानंतर महाराष्ट्रात बीएसपीची सत्ता यायला वेळ लागली नसती.
महाराष्ट्रात डॉ.सुरेश माने व सनदी अधिकारी राहिलेले किशोर गजभिये हे बहुजन समाज पार्टीला उभारी देतात की काय असे वाटायला लागले असतांना मायावतीने त्यांना सुध्दा बाहेरचा रस्ता दाखविल्याची बातमी येऊन थडकली आहे.
बीएसपीची सर्वेसर्वा मायावती असे का करीत आहे ? उत्तर प्रदेश सोडून कोणतेही राज्य पुढे जायला नको व तिच्या पेक्षा कोणताही नेता वरचढ व्ह्यायला नको. हे कारण त्या मागे दडलेले तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे त्यावेळचे अध्यक्ष मा. श्रीकृष्ण उबाळेसाहेब यांना मा. कांशीरामजी हयात असतांनाच काढले होते. त्यावेळी मा. कांशीरामजी यांच्यावर तसे दडपण तर आणल्या गेले नव्हते ना ! मा. कांशीरामजींच्या निधनानंतर प्रत्येक राज्यातील अग्रगण्य नेते व कार्यकर्ते यांना या ना त्या कारणाकरिता काढण्याचा सपाटा सुरु झाला. त्यामुळे प्रत्येक राज्य कमजोर होत गेले. इतके की कुठेकुठे पक्षाचे अस्तित्वच संपून गेले आहे. जसे – काश्मीर, पंजाब. हरियाणा आणि काही इतरही ठिकाणी.
पक्षाला संपविण्याचे असे पातक हा होत आहे. त्यामागे स्व:ताच्या व नातेवाईकाच्या नावाने जमविलेली अमाप सम्पत्ती व पैसा हे तर प्रमुख कारण नाही ना ! उत्पन्नापेक्षा जास्त पैसा जमा केल्याने सी.बी.आय.चा ससेमिरा चुकविण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेसने पक्ष प्रमुखावर दबाव तर आणला नाही ना ! भाजप आणि कॉंग्रेसनंतर देशात निर्माण होणारा बीएसपीचा तिसरा पर्याय कमजोर करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा मनुवादी शक्तीकडून वापर होत तर नाही ना ! अशी शंका निर्माण झाल्यास वावगे होणार नाही.
मनुवादी शक्तीच्या दबावाशिवाय बीएसपी कमजोर करण्याचे जे आणखी काही कारणे दिसतात ते म्हणजे – जुन्या कार्यकर्त्यांना तडकाफडकी काढून टाकणे- जसे मध्यप्रदेशातील फुलसिंग बरैया, दाउराम रत्नाकर, हरियाणाचे अमनकुमार नागरा, पंजाबचे हरभजन लाखा, कर्नाटकचे बी. गोपाल, महाराष्ट्रातील श्रीकृष्ण उबाळे, सिद्धार्थ पाटील, व त्यांचे अनेक साथीदार, ब्रिगेडियर सुधीर सावंत. (असे कितीतरी उदाहरणे दाखविता येतील.) बहुजन समाजातील सर्वसामान्य जनतेकडून निधी उभारण्यासाठी सहभाग तोडून टाकणे (व्होट दो, नोट दो), स्व:ताच्या व नातेवाईकाच्या नावाने बेहिशोबी सम्पत्ती जमा करणे, बामसेफला निष्क्रिय करून कर्मचारी व अधिकारी वर्गाचा संबंध तोडून टाकणे, उत्तरप्रदेशातून प्रभारी पाठवून राज्यातील नेतृत्व निष्प्रभ करणे, पक्षाचे नियतकालिके जसे- बहुजन नायक व बहुजन संघठक बंद करून पक्षाचा व चळवळीचा प्रचार आणि प्रसार रोखणे, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’च्या जागी ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ची नवीन संकल्पना रुजविणे, उत्तरप्रदेशमध्ये स्व:ताचे पुतळे उभारणे, पंधरा विरुद्ध पंच्यानशीचा संघर्ष सोडून ब्राम्हणांचा पक्षात मोठ्या प्रमाणात शिरकाव करून घेणे, ‘हाथी नही, गणेश है, ब्रम्हा विष्णू महेश है’ अशा घोषणा देणे, कार्यक्रमात मंत्रोच्चार करणे, शंख वाजविणे अशा मनुवादी अनुचित प्रकाराला आळा न घालणे, ब्राह्मणांना आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचे तत्व मान्य करणे, गुजरातमध्ये नरेंद्र मोदीच्या प्रचारासाठी गेल्यावरही खेद व्यक्त न करणे, सभेत उत्स्फूर्त भाषण करण्याऐवजी वाचून दाखविणे. पूर्ण देशात फिरून सभा, रॅली, मिटिंगा न घेणे. हेही इतर कारणे नमूद केल्याशिवाय राहवत नाही. म्हणजेच बीएसपीची खरी पडझड मायावतींच्या एकछत्री अंमलामुळे होत आहे असे काही लोकांचे प्रामाणिक मत बनले आहे. त्यात तथ्यांश नाही असे कसे म्हणता येईल?
रिपब्लिकन पार्टीनंतर बहुजन समाज पार्टीकडे आंबेडकरी समाज फार मोठ्या आशेने पाहत होता. त्याद्वारे डॉ.बाबासाहेबांच्या संकल्पनेनुसार ‘शासनकर्ती जमात’ बनण्याचे स्वप्न हा समाज रंगवीत होता. पण आता ते स्वप्न धुळीस मिळत जात असल्याचे नजरेस येत आहे. तरी यापुढे आंबेडकरी समाजाने काय करायला पाहिजे असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. कारण प्रत्येक पक्ष दुकानदारी उघडून बसले आहेत. त्यांनी आंबेडकरी जनतेला केवळ वेठीस धरले आहे. ते लोकांना दिशाहीन करीत आहेत. फसगत करीत आहेत. निव्वळ कालापव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ‘शासनकर्ती जमात’ बनण्याची ताकद आता कोणत्याही पक्षात राहिलेली नाही. असे असतांना आंबेडकरी समाजाने गंभीरपणे विचार करायला नको का?
मला वाटते समाजाने एकतर या सर्व पक्षांना अंतर्गत भेद व अहंकार सोडून निर्मळ मनाने एकत्र येण्यासाठी दबाव निर्माण करावा. तसे जर घडले नाही तर या पक्षांवर सर्व जनतेनी बहिष्कार टाकून समाजातील बुद्धिवादी, विचारवंत, साहित्यिक, कर्मचारी-अधिकारी, व्यावसायिक यांनी पुढाकार घेऊन महाअधिवेशन बोलवावे. त्यात संविधानसभेच्या धर्तीवर निरनिराळ्या समित्या नेमून त्यांच्या अहवालानुसार राजकीय धोरण आखून पक्षाची वाटचाल करावी. या संदर्भात समाजातील वृतपत्रे, टी,व्ही.चॅनेल प्रचार आणि प्रसार करून अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी महत्वाची भूमिका वठवू शकतात.

२१ जूनचा योगदीन म्हणजे निव्वळ हिंदुत्ववादी कार्यक्रम

20 Jun

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या मागे निश्चित असा दृष्टीकोन लपलेला असतो. ६ डिसेंबर १९९२ला बाबरी मस्जिद पाडली. त्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले होते. म्हणून आंबेडकरी समाजासाठी हा दु:खद दिन असतो. परंतु त्यादिवशी बाबरी मस्जिद पाडण्यात आली, म्हणून हिंदूसाठी तो आनंदाचा दिवस झाला. तर मुस्लिमांसाठी हा काळा दिवस झाला. दुसरे म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पंतप्रधान अटलजींच्या नेतृत्वाखाली राजस्थानातील पोखरण येथे १९९८ साली ५ अणुचाचण्या यशस्वी केल्यानंतर त्याला सांकेतिक नाव ‘बुद्ध हसला ‘ असे दिले. जगात शांतता नांदावी असे तत्त्वज्ञान ज्या भगवान गौतम बुध्दाने सांगितले, त्यांच्याच नावाने अणुस्फोटाच्या हिंसाचाराची दहशत निर्माण करणाऱ्या चाचण्या घ्याव्यात, हे कृत्य सुध्दा ठरवूनच केलेले दिसते.
भाजपने निवडणुकीपूर्वीच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान घोषित करून टाकले होते. याचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संसदीय लोकशाही बदलवून त्या ठिकाणी अमेरिकेत असलेली अध्यक्षीय लोकशाही पध्दत प्रस्थापित करायची आहे. या देशात हिंदूची संख्या जास्त असल्याने थेट निवड पद्धतीने पंतप्रधान हा हिंदूच असेल. म्हणजे हिंदूचीच सत्ता कायम या देशात राहील, हा त्यामागे उद्देश आहे. अध्यक्षीय लोकशाही पध्दतीत देशव्यापी एकच मतदारसंघ असल्याने प्रवीण तोगडिया किंवा बाबारामदेव सारखे कडवे हिंदुत्ववादी महाभाग बहुसंख्यांकाच्या आधारावर या देशाचा अध्यक्ष झाला तर नवल वाटणार नाही. पण संसदीय लोकशाही प्रणालीत वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या जाती-धर्माचे प्राबल्य राहत असल्याने हे लोक निवडून येऊन पंतप्रधान बनणे अशक्य आहे. म्हणूनच निवडणुकी आधीच पंतप्रधान घोषित करण्याची प्रथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरु केली, हे उघड आहे.
आता २१ जून रोजी अंतरराष्ट्रीय योग दिवस माणविण्याच्या दृष्टीने मोदी सरकार मोठ्या प्रमाणात तयारी करीत आहे. हा दिवस कसा काय आला? ह्यामागे सुध्दा दूर दृष्टीकोन आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट महासभेत भाषण करतांना “अंतरराष्ट्रीय योग दिवस” घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्राच्या सदस्य असलेल्या १९३ देशांनी २१ जून रोजी “अंतरराष्ट्रीय योग दिवस” मानावा म्हणून मंजुरी दिली.
तसे पाहिले तर भौगोलिकदृष्ट्या २१ जून हा दिवस भारतीयांसाठी सोयीचा नाही. कारण एकतर ह्यावेळी पावसाळा असतो. मुलांच्या शाळा सुरु व्हायच्या असतात. तरीही २१ जूनच का? कारण २१ जून १९४० रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन झाले होते. म्हणून या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावर हेडगेवार यांची पुण्यतिथी साजरी व्हावी हा त्यामागे उद्देश आहे. ही बाब प्रकर्षाने कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी उजेडात आणली आहे.
हा दिवस साजरा होण्यासाठी मोदी सरकार खास तयारी करीत आहे. हा कार्यक्रम ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदणीकृत व्हावा, या पद्धतीने तयारी होत आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा त्यासाठी राबविण्यात येत आहे.
यात मुख्यत: योगगुरू रामदेवबाबा अग्रेसर आहेत. ते आपल्या पतंजली योगपीठाचे ५२०० शिक्षक, काही लोक व मुलांकडून सराव करून घेत आहेत. त्यांनी हा कार्यक्रम लोकांपर्यत पोहचविण्यासाठी ३५ मिनिटाचा विशेष pakejपॅकेज तयार केला आहे. हा पॅकेज देश-विदेशातील प्रशिक्षिकांपर्यंत पोहचविण्यात आले आहे. ह्या वर्षी पहिल्यांदा हा दिवस साजरा होत असल्याने चांगला कायम स्वरूपात आठवणीत राहावा, असाही त्यामागे दृष्टीकोन असल्याचे सांगण्यात येत आहे.
योगदिवसाचा मुख्य समारोह दिल्लीच्या राजपथवर होणार आहे. ज्यात खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ४५,००० लोकांसोबत योग करणार आहेत. यात दिल्लीतील शाळेचे मुले सामील होतील. त्याशिवाय देशातील ४८ लाख केंद्रीय कर्मचारी भाग घेतील. त्यांना गेल्या दोन महिन्यापासून योगाचे वर्ग आयोजित करून प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिवसाच्या समारोहासारखाच दूरदर्शन आणि इतर चॅनलवर सरळ प्रसारण करून योगदिनाचे इत्थंभूत वर्णन केले जाणार आहे. ह्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमात मोठमोठे नेते, अभिनेते, योगगुरू रामदेवबाबा भाग घेत असल्याचे जाहीर झाले आहे.
हा ३५ मिनिटाचा कार्यक्रम असेल. असे सांगितल्या जाते की केवळ दिल्लीच नव्हे तर देशाच्या सर्वच शहरात २१ जूनला सकाळी ७.०० वाजता सामुहिकपणे हा योग केला जाईल. या ३५ मिनिटात १३ प्रकारचे आसने असतील. विशेष म्हणजे यात भारतीय लष्करातील जवान सुध्दा भाग घेणार आहेत. सियाचीन ग्लेशियर पासून ते समुद्रापर्यंत आणि राजस्थानच्या रेगीस्तान पासून ते उत्तर-पूर्वच्या जंगलापर्यंत सेनाचे जवान या दिवशी योगा करून भारतीय जनतेला चकित करणार आहेत. खुद्द संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर मेरठ छावणीच्या सैनिकांसोबत भाग घेतील. तिन्हीही सेनाचे प्रमुख प्रधानमंत्री नरेन्द्र मोदीसोबत राजपथवर आपल्या जवानांसोबत हजर राहतील. असे मानण्यात येते की राजपथवर किमान ३ हजार जवान योग करतील. सैन्याचे सर्व कमांड व कोर ह्या दिवशी योगा करतील नौसेना व वायुसेना सर्व स्टेशनावर कार्यक्रम आयोजित करतील. नौसेना जगात कुठेही असतील, तेथे तेथे हा कार्यकम आयोजित करतील. पायदळ सेनेचे प्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग २००० सैनिकांसोबत राजपथवर हजर होणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे काही मागे राहणार नाहीत. त्यांनीही रेल्वेच्या १४ लाख कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळेदरम्यान योगाचा अभ्यास करावा, असे फर्मान काढले. एनसीसीचे जवळपास १० लाख कॅडेट देशातील वेगवेगळ्या भागात १९०० केंद्रात योग करणार आहेत. देशातील शाळा-कॉलेजचे लाखो विद्यार्थी यात भाग घेणार आहेत. ह्या दिवशी प्रधानमंत्री सोबत सर्व मंत्री, खासदार, अधिकारी-कर्मचारी, इतर महत्वाचे व्यक्ती पण योगा करतांना दिसतील. हा योगाचा कार्यक्रम विजय चौक ते इंडिया गेट पर्यंत जवळपास १.४ किलोमीटरच्या परिसरात होणार आहे. या ठिकाणी संरक्षणासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार आहे. ह्यावेळी दिल्ली पोलिसांशिवाय कमांडोज आणि एनएसजीचे जवान सुध्दा देखरेख करणार आहेत.
सांगायचे म्हणजे एकंदरीत हा कार्यक्रम अत्यंत जोरात साजरा करण्याची मोदी सरकारची जय्यत तयारी सुरु आहे. अशा ह्या अवाढव्य कार्यक्रमासाठी करोडो रुपयाचा चुराडा होणार आहे, हे काही वेगळे सांगायला नको !
दुसरीकडून ह्या योगा कार्यक्रमाला देशात विरोध सुध्दा होत आहे. परंतु त्याला प्रसारमाध्यमे विशेष प्रसिद्धी देत नाहीत, असे दिसून येत आहे. योगामध्ये सूर्यनमस्कार असल्याने एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेशी यांच्याव्यतिरिक्त काही मुस्लीम संघटनांनी विरोध केला. कारण मुस्लीम जमात अल्लाशिवाय कोणाहीपुढे झुकत नाहीत. योग करतांना काही हिंदू धर्माचे श्लोक म्हणावे लागतात. तसेच ‘ओम’ या प्रतीकाचा उच्चार करावा लागतो. ह्यालाही त्यांचा विरोध आहे.
विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया म्हणतात, ‘योग करतांना ओमच्या जागी अन्य कुणाचेही नाव घेणे म्हणजे भगवान शंकराचा अपमान आहे. ओम उच्चारात शंकराची आराधना होते, त्यामुळे ते बदलले जाऊ शकत नाही. यावरून योगाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा प्रचार करणे हा सुध्दा या दिवस साजरा करण्यामागचा नेमका उद्देश दिसत आहे.
आरएसएसचा अजेंडा म्हणजे ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा आहे. सूर्यनमस्कार, सर्वस्वती पूजन, गीता अध्ययन, शालेय शिक्षणात वैदिक धर्माचा अंतर्भाव, गंगानदी शुद्धीकरण, गोवंश हत्याबंधी, धर्मांतरविरोधी कायदे बनविणे, भगवतगीतेला राष्ट्रीय गंथाचा दर्जा देणे व परदेशात नेऊन भेट देणे, राम मंदिर बांधणे, ३७० कलम रद्द करणे, समान नागरी कायदा करणे, तीर्थस्थळाचा विकास करणे, संसदीय लोकशाहीच्या ऐवजी अध्यक्षीय लोकशाही आणणे इत्यादी अनेक हिंदुत्ववादी कार्यक्रम त्यांच्या अजेंडावर आहे. जोपर्यंत भाजपाच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत भारतीय जनतेला ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवून त्यांना हा अजेंडा राबवायचा आहे.
सुगावा प्रकाशनाचे प्रा. विलास वाघ म्हणतात, ‘देशात गरिबी, बेरोजगारी वाढत आहे. शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहेत. कुपोषणाने बालके मरत आहेत. गरिबांवर अन्याय-अत्याचार वाढत आहेत. या मुलभूत विषयांकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही. सरकार याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे आणि नको ते फॅड निर्माण करीत आहेत. आता त्यांनी योगाचे फॅड आणले आहे. सूर्यनमस्कारही एक अंधश्रद्धेचा भाग आहे. योगातील नमस्कार सूर्याकडे बघूनच केला पाहिजे का? सूर्याकडे पाठ करून केला तर तो नमस्कार होत नाही का? आणि योग कोणाला हवा आहे. ज्यांच्या पोटातील पाणी हलत नाही. जे हालचाल करीत नाहीत. त्यांनी काय करायचे ते करावे ! गरिबांचे, कष्टकऱ्यांचे, मजुरी करतांना रक्ताचे पाणी होत आहे. त्यांना योगाची काय गरज आहे? डोक्यावरून विटा आणि रेती वाहणाऱ्यांना योगाची काय गरज आहे? त्यांच्या पोटाला अन्नाची गरज आहे आणि ते पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे.’
विज्ञानवादी डॉ. दिवाकर भोयर म्हणतात, ‘प्राणायाम न केल्याने कर्करोग, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार इत्यादी रोग होतात, हे म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या साफ चुकीचे आहे. प्राणायाम आरोग्याला हानिकारक असून आपले आयुष्य दीर्घ राहत नसून मरणाला लवकर आवतन देण्याचा प्रकार आहे. श्वास रोखून धरल्याने शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तवाहिन्या प्रभावित होतात. परिणामत: अॅटॅक येण्याची दाट शक्यता असते. मेंदू बधीर होऊन बुद्धी भ्रष्ट झाल्याचे प्रकार प्राणायाम करणाऱ्या मनुष्यात हल्ली जास्त प्रमाणात आढळून येतात. कोणतीही नैसर्गिक प्रक्रिया ही शरीराला आरोग्यवर्धकच असते. प्राणायामची शरीराला गरज नसून ती शरीराला तारक असण्यापेक्षा मारकच आहे. शरीरावर लादलेले ते एक दुष्कर्म असून स्वत:हून स्व:तावर ओढवून घेतलेले एक अल्पजीवी मरणच आहे. (दि. ३ जुलै २०११ रोजी आयोजित विदर्भ साहित्य संमेलन सभागृह, नागपूर येथे आयोजित चर्चासत्रातील भाषण)
नागपूर वैद्यकीय कॉलेजचे तत्कालीन कॅन्सर विभाग प्रमुख व रेडिओलॉजिस्ट डॉ. कृष्णा कांबळे म्हणतात, “८० टक्के लोकांना योगा करण्याची गरज नाही. जे २० टक्के लोक शरीराने लठ्ठ व अनेक व्याधीने ग्रासलेले असतात, तेच लोक योगा-प्राणायाम करतात. कामकरी, कष्टकरी व शेतमजूर आणि लहान मुलांना कोठे प्राणायाम करण्याची गरज पडते? सर्वात चांगला व्यायाम म्हणजे रस्त्याने फिरण्याचा हा होय. प्राणायाम वगैरे हे कुचकामी असून उलट हानिकारक आहे. ते तारक नसून मारकच आहे. आपल्या शरीरात सेंसर असतात. सेंसर म्हणजे मेंदूला आज्ञा-सूचना देणारे तंत्र होय. शरीराला प्राणवायू सोबतच ग्लुकोजची सुध्दा आवश्यकता असते. त्याशिवाय शरीर हे सुदृढ राहू शकत नाही. रामदेवबाबाचे शिष्य दीक्षित होते. ते हार्टऍटॅकने मृत्यू पावलेत. रूढी, पारंपरिक श्रद्धा आणि आस्थेमुळे सर्वसाधारण जनता प्राणायामवर विश्वास ठेवतात. परंतु असे अनेक आजार हे आनुवंशिक असतात. प्राणायामामुळे रक्तात आम्लाचे प्रमाण वाढते. हे रक्त शरीरात घातक असते. त्यामुळे हृदयविकाराचा जोरदार झटका येण्याची दाट शक्यता असते. बहुतेक प्राणायाम करणारे लोक बघा- भ्रमित, बुद्धिभ्रष्ट, विसरभोळे व प्राणायामची नशा चढल्यासारखे आपणास आढळून येतात. (दि. ३ जुलै २०११ रोजी आयोजित विदर्भ साहित्य संमेलन सभागृह, नागपूर येथे आयोजित चर्चासत्रातील भाषण)
बौध्द धम्मात योगाला (पतंजलीच्या) कोणतेही स्थान व महत्व नाही. बौध्द धम्मात विपश्यनेला फार महत्व आहे. विपश्यना आणि योगसाधना यात अर्थाअर्थी कोणताही संबंध नाही. पतंजलीयोग हा ईश्वरवादावर आधारलेला आहे. आणि ईश्वरवाद हा ब्राम्हणवर्ण, जाती श्रेष्ठत्वावर आधारलेला आहे. म्हणून प्राचीन भारतातील अवैदिक तत्त्वज्ञानात योगाला कोणतेही स्थान नाही. योगाची सुरुवात ही ‘ओम’ या शब्दाच्या उच्चारणाने होत असते. ‘ओम’ हे ब्राम्हणी, वैदिक प्रतिक आहे. त्यामुळे योगाला कोणत्याही अर्थाने धर्मनिरपेक्ष म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे योगामध्ये ज्ञान-विज्ञान आहे, त्याने मनाला संयमित करता येते, असे सुध्दा अजूनतरी सिध्द झालेले नाही. आधुनिक औषधी व चिकित्साशास्त्रामध्ये योगाला कोणतेही स्थान नाही. फिजिओथेरेपी आणि योग यात फार मोठे अंतर आहे. कोणत्याही फिजिओथेरेपी केंद्रात योग शिकविल्या जात नाही. आधुनिक मानसशास्त्रात सुध्दा योगाला कोणतेही स्थान नाही. अपंगाच्या शाळेत सुध्दा योग शिकविल्या जात नाही. मनोरुग्णालयात सुध्दा योग शिकविल्या जात नाही. म्हणजेच आधुनिक ज्ञान-विज्ञानात योगाला कोणतेही स्थान नाही. ज्या महामानवांनी जागतिक मानवतेला फार मोठे योगदान दिले असे- भगवान बुध्द, येशू ख्रिस्त, संत कबीर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, कार्ल मार्क्स, लेनिन, अब्राहम लिंकन, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा कोणत्याही महामानवाने योगाभ्यास केलेला ऐकिवात नाही. तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा योग कार्यक्रम हा संपूर्णपणे ब्राम्हणवादी आणि हिंदुत्ववादी कार्यक्रम आहे, हेच सिद्ध होते.
एकमात्र खरे की जर फायदा झालाच तर योगगुरु रामदेवबाबा यांचा धन-संपती कमविण्याचा  आणि प्रसिद्धी पावण्याचा धंदा मात्र आणखी तेजीत येईल, यात वाद नाही.

बुध्दविहार आणि प्रबोधन

6 Mar

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रम्हदेशच्या बुध्दिस्ट शासन कौन्सिलसमोर १९५४ साली भाषण करतांना सांगितले की, विहारात दर रविवारी सामुदायिक बुध्द वंदना व त्यानंतर धर्मोपदेश देण्याची प्रथा पाडावी.

त्याचप्रमाणे २४ नोव्हेंबर १९५६ रोजी सारनाथच्या भाषणात सांगितले की, प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्दविहारात जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा. तसेच प्रत्येक गावामध्ये बुध्दविहार निर्माण करुन त्यात सभा घेण्यासाठी सभागृह बांधावे.

बाबासाहेबांच्या भाषणावरून जे मुद्दे लक्षात येतात ते असे- १. प्रत्येक गावामध्ये बुध्दविहार निर्माण करुन त्यात सभा घेण्यासाठी सभागृह बांधावे. २. प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्दविहारात जावे ३. सामुदायिक बुध्द वंदना घ्यावी. ४. धर्मोपदेश देण्याची प्रथा पाडावी.

या चारही मुद्यावर विचार करणे आवश्यक आहे.

पहिला मुद्दा- प्रत्येक गावामध्ये बुध्द विहार निर्माण करुन त्यात सभा घेण्यासाठी सभागृह बांधावे.

डॉ. बाबासाहेबांच्या या आदेशाप्रमाणे बौध्द समाजाने खेड्या-पाड्यात व शहराच्या मोहल्या-मोहल्यात लहानमोठे बुध्दविहार बांधण्याचा प्रयत्‍न केला. काही ठिकाणी विहार बांधून पूर्ण झाले तर काही ठिकाणी ते अपूर्णावस्थेत पडून आहेत. काही ठिकाणी सामाजिक सभागृहाचा वापर बुध्दविहार म्हणून केला जात आहे.

तथापी ज्याठिकाणी आर्थिक परिस्थितीअभावी तेथील लोक विहार बांधू शकले नसतील, किंवा अपूर्णावस्थेत पडून असतील त्या ठिकाणी बुध्द विवाहाराची निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण धर्माला ग्लानी येण्याचे तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले ते म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी मंदिर, विहार ऊपलब्ध नसणे. कारण असे ठिकाण सर्वसामान्य लोकांसाठी श्रध्देचे स्थान असते. याकरिता समाजाने एक केंद्रीय निधी स्थापन करावा. सरकारी योजनेत जसे स्थानीक लोकांनी अंदाजित खर्चाच्या १० प्रतिशत निधी जमा केल्यास ऊरलेली रक्क्म सरकार देते, त्याप्रमाणे केंद्रीय निधीने ऊरलेल्या रकमेची तरतूद करुन विहाराचे बांधकाम पूर्ण करावे. यासाठी समाजातील श्रीमंत व दानशूर लोकांनी योगदान करावे. समाजातील श्रद्धावान, प्रतिष्ठीत व प्रामाणिक लोकांकडे हे काम सुपूर्द करावे.

दुसरा मुद्दा- प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्दविहारात जावे.

ह्याबद्दल दैनिक वृत्तरत्न सम्राटमध्ये ‘दर रविवारी प्रत्येक बौध्दाने कुटुंबासह बुध्दविहारात गेलेच पाहिजे’ असे वारंवार छापण्यात येत आहे. त्यात लिहिलेले असते की, ‘बौध्द समाजातील प्रत्येकाने आपल्या कुटुंबियासह प्रत्येक रविवारी सकाळी १० ते ११ या दरम्यान शुभ्र वस्त्रे परिधान करून नजीकच्या बुध्दविहारात जावून बुध्द वंदना घ्यावी. जो समाज एकत्र येतो तो समाज विचार करतो. जो समाज विचार करतो तो समाज क्रांती करतो आणि जो समाज क्रांती करतो, तो समाज विजयी होतो.’

डॉ. बाबासाहेबांनी ‘प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्दविहारात जावे.’ असे जे सांगितले, त्या मागे समाजामध्ये सामाजिक व धार्मिक क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठरविले होते असे दिसते. सामाजिक आणि धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती घडून येण्यास मदत होते असे विचार ‘जातीचे निर्दालन’ (Annihilation of Cast) या पूस्तकात उदाहरणासह त्यांनी मांडले आहेत. असे राजकीय परिवर्तन टिकाऊ असते. म्हणून भारत बौध्दमय करणे व शासनकर्ती जमात बनणे हया दोन्हीही संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिने त्यांनी आखणी केलेली होती असे दिसते.

बुध्दविहार म्हणजे समाजाला जोडणारा एक महत्वाचा दूवा आहे. त्यामूळे समाजामध्ये एक मजबुत संघटन निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु होते. बंधुत्वाच्या, मैत्रिच्या नात्याने तो एकमेकांशी बांधल्या जातो. प्रत्येकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत होते. समाजामध्ये, कुटूंबामध्ये धम्ममय वातावरण निर्माण होते. प्रत्येकजण धम्माच्या मार्गाने वाटचाल करण्यास प्रवृत्त होतात. अन्याय, अत्याचाराच्या विरुध्द सामुहिकपणे उभे राहता येते. विहारातील प्रबोधनामूळे बौध्द धम्माचे ज्ञान मिळते. त्यामूळे बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारास चालना मिळते. लहान मुले-मूली, विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक-युवती यांचेवर धम्माचे संस्कार होतात. त्यामूळे धम्माच्या मार्गाने वाटचाल करणारा एक आदर्श आणि जागृत पिढी निर्माण होण्यास मदत होते.

परंतु आपण पाहतो की, ज्या ठिकाणी बुध्दविहार आहेत त्या गावाचे किंवा मोह्ल्ल्याचे सारेच लोक विहारात येतांना दिसत नाहीत. मी काही गावाच्या, मोहल्ल्याच्या बुध्दविहारात प्रबोधन करायला जात होतो; तेव्हा काही मोजकेच लोक येत असल्याचे मला आढळून आले होते.

लोक बुध्दविहारात का जात नाहीत? ह्याबाबतीत दैनिक वृत्तरत्न सम्राट मध्ये भन्ते अश्वजीत यांचा लेख वाचण्यात आला. त्यात त्यांनी दोन कारणे दिलीत. एक – लोकांना घमेंड असणे व दुसरे – अक्कल कमी असणे. घमेंडी लोकांना वाटते की, मी शिकलो, नोकरीला लागलो, माझ्याकडे पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे. मला काय कमी आहे? मला काय गरज आहे बुध्दविहारात जाण्याची? त्यांना वाटते की, मजुरांनी, गरिबांनी बुध्द विहारात जावेत. त्यांचेच काम आहे. आपला बुध्दविहाराशी काहीही संबंध नाही. दुसऱ्या वर्गात अक्कल कमी असल्याने त्यांना कितीही सांगितले तर त्यांच्या डोक्यात उतरत नाही. त्यांना वाटते की, विहारात जाणे, वंदन करणे, भिक्खूंचे प्रवचन ऐकणे हे रिकाम्या लोकांचे काम आहे. त्यांना असेही वाटते की जे बुध्दविहारात जात नाहीत त्यांचे काहीही बिधडत नाही. तो तर मस्त खातो, पितो आणि मजा करतो. मग आपले काय बिघडणार? असे लोक बुध्दविहारात जाणाऱ्यांकडे भामट्यासारखे पाहत त्यांची टिंगलटवाळी करतात. अशा प्रकारचे मार्मिक विवेचन आदरणीय भंतेजी यांनी केले. ऐवढेच नव्हे तर बुध्दविहारात जाण्यामुळे काय फायदे होतात, ते सुध्दा त्यांनी सविस्तरपणे त्या लेखात मांडले आहेत.

लोक बुध्दविहारात का जात नाहीत? त्याबाबतचे त्यांचे निरीक्षण बरोबर आहे. त्याबद्दल वाद नाही. परंतु माझ्या निरीक्षणानुसार मला आढळलेलं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे लोकांचे अज्ञान. खरं म्हणजे लोक धम्माबद्दल किंवा चळवळीबद्दल जागृत नाहीत. त्यांना विहाराचे महत्व कळत नाही. ज्यांना कळते त्यांच्यात इच्छाशक्ती नसते. किंवा ते कोणत्यातरी कामात गुंतलेले असतात. विहारात जाण्यापेक्षा ते आपल्या कामाला जास्त प्राधान्य देतात. ‘काय साहेब? हप्त्यातून एक दिवस तर मिळतो, घरचे काम करायला.’ असेही म्हणणारे काही महाभाग मला भेटले आहेत.

परंतु एक खरं की लोकांचं अज्ञान दूर केले तर सारेच लोक नाहीत पण काही लोक मात्र प्रतिसाद देऊ शकतात.

मी विद्युत मंडळात नोकरीला असतांना पॉवर स्टेशनच्या कॉलनीत सामाजिक कार्यक्रम आयोजित करीत होतो; तेव्हा क्लास एक व क्लास दोनचे अधिकारी (काही अपवाद सोडून) सहसा सामील होत नसल्याचे दिसत होते. मी लेखाविभागाच्या महत्वाच्या हुद्द्यावर असल्याने माझ्याशी त्यांचा संपर्क येत होता. मी त्यांना सांगायचो की, आपला समाज खेड्यापाड्यात राहतो. आपणही खेड्यातून आलेलो आहोत. तेव्हा आर्य अष्टांगिक मार्ग, चार आर्य सत्य, प्रतीत्य समुत्पाद, दहा पारमिता इत्यादी भगवान बुध्दाची शिकवण म्हणजे काय? आम्हाला जरा समजावून सांगाल काय? असे जर कोणी विचारले तर तेव्हा आपल्याला माहिती नसल्याने मान खाली घालावी लागते. अशी नामुष्कीची पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून आपण हप्त्यातून एखाद्या दिवशी बसून त्यावर अभ्यास, चिंतन, मनन करून शिकून घेऊ. अशा तऱ्हेने त्यांचं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करीत होतो व त्याला प्रतिसाद पण मिळत होता.

तिसरा मुद्दा – सामुदायिक बौध्द वंदना घ्यावी.

बुध्दविहारात जमलेल्या साऱ्यांनी वंदना घेणे हे तर आलेच. त्याशिवाय तेथे डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा पण घ्यायला पाहिजे असे वाटते. त्यामुळे बौध्द असूनही हिंदू धर्माचे आचरण करण्याला आळा बसू शकतो.

चवथा मुद्दा- धर्मोपदेश देण्याची प्रथा पाडावी.

हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समाजामध्ये अपेक्षित असलेला बदल बुध्दविहारामध्ये जाऊन व तिथे प्रबोधन ऎकून हो‍ऊ शकतो हे निश्चित आहे. आपल्या उत्तम कृतीमूळे व आदर्शवत धम्म पालन केल्यामूळे इतरही समाजातील लोक आपला आदर्श घेऊन ते सुध्दा बौध्द धम्माकडे आकर्षित होतील. त्यामूळे डॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेनूसार ’भारत बौध्दमय’ होण्यास निश्चितच वाटचाल सूरु हो‍ईल.

यातूनच बुध्दीवादी, त्यागी, निष्ठावान, प्रामाणिक, समाजाभिमूख, समाजाप्रती दायित्व व सामाजिक बांधिलकीची भावना जोपासणारा नीतिमान असा आदर्श वर्ग निर्माण हो‍ऊन डॉ. बाबासाहेबांच्या ‘शासनकर्ती जमात बनण्याच्या’ दूसर्‍या संकल्पनेनूसार समाजाची वाटचाल सूरु हो‍ईल.

ज्याअर्थी डॉ. बाबासाहेब म्हणतात की, विहारात धम्मोपदेश देण्याची प्रथा पाडावी, त्याअर्थी धम्माचे ज्ञान देणारे प्रबोधनकार समाजात तयार झाले पाहिजेत. सर्वच विहारात भंतेजी उपलब्ध असतील असे नाही. विहारात लोक जमतात व फक्त वंदना घेऊन निघून जातात, असेही बऱ्याच ठिकाणी आढळले आहे. कारण त्याठीकाणी प्रबोधन करणारा कोणताही व्यक्ती किंवा तेथे भंतेजी हजर नसल्याने असे घडते. म्हणून ज्या विहारात भंतेजी नसतील, त्या ठिकाणी प्रबोधन करण्याचं कार्य शिकलेल्या वर्गाने करायला काही हरकत नाही. समाजामध्ये आता मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीमूळे बूध्दिजिवी वर्ग तयार झालेला आहे. बुद्धीजीवी वर्ग समाजाला दिशा देऊ शकतात, असे विवेचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जातीचे निर्दालन’ (Annihilation of Caste) या पुस्तकात केले आहे.

डॉ. बाबासाहेबांनी नागपूर येथे धम्मदिक्षेनंतर सांगितले होते की, धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्माला ग्लानी येते. ज्ञानी माणसांनी धम्म ज्ञान सांगीतले पाहिजे. म्हणून प्रत्येक शिकलेल्या लोकांनी धम्म समजून घेऊन ते समाजाला सांगणे हे त्याचे कर्त्यव्य बनते. बाबासाहेबांनी हा धम्म १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दिला व ६ डिसेंबर १९५६ ला म्हणजे अवध्या दीड महिन्यात ते समाजाला सोडून गेलेत. बाळाला जन्म देवून आई निघून जावी. तसेच काहीसे घडले. म्हणून बाबासाहेबांचे कार्य पुढे घेऊन जाणे हे त्यांच्या लेकरांची जबाबदारी ठरते.

शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रबोधन करायला येऊ शकतं. फक्त त्यांच्यात इच्छाशक्ती असली पाहिजे. इच्छाशक्ती असली की मनाची तयारी होऊ शकते.

समाजाचे चित्र जर पाहिले तर आपणास आढळून येईल की, प्रत्येक व्यक्ती (काही अपवाद सोडून) एका वर्तुळात जगत असतो. आपण, आपले कुटुंब, नातेवाईक व मित्रमंडळी या पलीकडे आपले जगणे जात नाही. बस एवढेच लोक – आपल्या निधनानंतर हळहळ करतील, दुसरं काय…! नुकतेच कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांचा वारसा जपला. त्यांच्या जाण्यामुळे सारा महाराष्ट्र हळहळला. त्यांच्या कार्यामुळे ते लोकांच्या आठवणीत राहिले.

म्हणून या शिकलेल्या लोकांनी समाजात जाऊन समाजाला प्रबोधन करण्याचे कार्य हातात घ्यायला पाहिजे असे वाटते. म्हणजे त्यांची ओळख समाजाला होईल. त्यामुळे आपले जीवन तर सार्थकी लागेल लागेलच, त्याशिवाय समाजात परिवर्तनाची लहर निर्माण होईल.

त्यासाठी शिकलेल्या लोकांना एक उपक्रम हातात घ्यावा लागेल. तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी ‘बुध्दविहार प्रबोधन समिती’ स्थापन करावी. त्यांनी प्रबोधन करणाऱ्यांची यादी निश्चित करावी. प्रत्येकांनी धम्माच्या बाबतीत एकेक विषय घेऊन त्या त्या विषयाची तयारी करावी. डॉ, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म’ या पुस्तकात व इतरही अनेक पुस्तकात धम्माच्या बाबतीत बरेच विषय मिळू शकतात.

प्रबोधनकारांची फळी तयार झाल्यानंतर शहरात किंवा शहराच्या आजूबाजूला असलेल्या विहाराचे सर्वेक्षण करून त्याची यादी तयार करावी. त्या त्या विहारातील संचालकांशी संपर्क साधून त्यांच्याकडे विहारात प्रबोधन करण्यासाठी प्रबोधनकार पाठविण्याबाबत चर्चा करावी. मग पूर्ण महिन्याचा तसा कार्यक्रम आखून कार्यक्रम पत्रिका तयार करावी. त्यात दिवस, वेळ, प्रबोधनकाराचे नाव, त्यांचा विषय इत्यादी माहिती देऊन ती पत्रिका आधीच त्यांचेकडे व प्रबोधन करणाऱ्याकडे पाठवून द्यावी. त्यानुसार ठरलेल्या प्रबोधनकाराने ठरलेल्या दिवशी त्या विषयावर विचार मांडावेत. ह्या कामासाठी म्हणजे कार्यक्रम पत्रिका छापण्यासाठी व जाण्या-येण्याचा खर्च समितीने करावा. त्याचा भार बुध्दविहारावर टाकू नये. त्यामुळे ते तुटणार नाहीत. या पद्धतीने धम्मप्रचार व प्रसारासाठी एक सूत्रबद्धरित्या यंत्रणा तयार होऊ शकते असे मला वाटते.

अशी यंत्रणा अकोला येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मसभा समिती’ यांनी तयार करून काही दिवस राबविली होती. त्यांनी अकोला शहरातील व आजूबाजूचे ९ बुध्दविहारांना एकत्र करून त्याठिकाणी प्रबोधनकार पाठवित होते. त्यात माझाही समावेश होता. परंतु काही कारणास्तव त्यांनी हा उपक्रम बंद केला.

ही ‘बुध्दविहार प्रबोधन समिती’ फक्त प्रबोधनाच्या संदर्भात कार्य करेल. कारण समितीने एकच कार्य हातात घेतले तर कार्य करणे सहज आणि सोपे जाते. नाहीतर एक ना धड भाराभार चिंध्यासारखी गत होते. पुढे राज्यामध्ये ठिकठीकाणी अशा अनेक समित्या स्थापन होवून प्रत्यक्ष कार्य सुरु झाल्यानंतर राज्यस्तरावर किंवा जिल्ह्याच्या स्तरावर ‘बुध्दविहार प्रबोधन समन्वय समिती’ स्थापन करता येईल. त्यामुळे प्रबोधनाचे कार्य राबविताना येणाऱ्या अडचणी, एकमेकांचे अनुभव व त्यावरील सुधारणांबाबतच्या चर्चा करून पुढील वाटचाल ही समिती ठरवू शकते. त्याचप्रमाणे पुढे गरज भासल्यास एकसूत्रता राहण्यासाठी निश्चित असा अभ्यासक्रम आणि प्रबोधनकारांना प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून देता येईल.

हे खरे आहे की, बुध्दविहारात जमणाऱ्यांची संख्या फार कमी असते. त्यामुळे प्रबोधनकारांनी नाउमेद होऊ नये. तसेच हा उपक्रम कितीही अडचणी आल्यात तरी बंद न करता त्यावर मार्ग काढावा. ऐवढेच नव्हे तर आणखी जास्तीत जास्त विहारे जोडण्याचा व प्रबोधनकारांची मोठी फळी उभारण्याचा प्रयत्न करावा. विहारात जास्तीत जास्त लोकांनी यावेत म्हणून समाजातील कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणजे हा उपक्रम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलेले कार्य काहीना काहीतरी प्रमाणात आपल्या हातून निश्चितच घडेल असा मला विश्वास वाटतो.

आर.के.जुमळे, अकोला

आरक्षित खासदार आणि सामाजिक हित

8 Dec

आताच्या १६व्या लोकसभेच्या निवडणुकीत ६० वर्षे भारतावर राज्य केलेल्या कॉंग्रेसचे केवळ ४४ खासदार निवडून आले आहेत. हा एक कॉंग्रेसच्या बाबतीत नामुष्कीचा उच्चांकच म्हणावा लागेल. त्यापेक्षा आरक्षित क्षेत्रात अनुसूचित जातीच्या खासदारांची संख्या ८३ इतकी आहे.
ह्यावेळी भाजप संख्येने मोठ्या प्रमाणात निवडून आल्याने साहजिकच राखीव क्षेत्रात त्यांचेच खासदार जास्त असणे हे ओघानेच आले. त्यांचे ३९ खासदार (१७ उत्तरप्रदेश, ३ बिहार, १ छत्तिसगढ, २ गुजरात, १ हरियाणा, १ हिमाचल प्रदेश, १ झारखंड, ३ मध्यप्रदेश, २ महाराष्ट्र, १ पंजाब, ४ राजस्थान, १ कर्नाटक, १ उत्तराखंड, १ दिल्ली) तृणमूल कॉंग्रेसचे १० खासदार (पश्चिम बंगाल), कॉंग्रेस पक्षाचे ७ खासदार (१ तेलंगणा, १ केरळ, ४ कर्नाटक, १ पंजाब), एआयडीएमके पक्षाचे ७ खासदार (तामिळनाडू), बिजू जनता दलाचे ७ खासदार (ओडीसा), लोकजन पक्षाचे ३ खासदार (बिहार), शिवसेना पक्षाचे ३ खासदार (महाराष्ट्र), टीआरएस पक्षाचे २ खासदार (तेलंगणा) आम आदमी पक्षाचे २ खासदार (पंजाब), तेलगु देसम पक्षाचे ३ खासदार (आंध्रप्रदेश), एआययुडीएफ पक्षाचा १ खासदार (आसाम), वायएसआर पक्षाचा १ खासदार (आंध्रप्रदेश), सीपीआय पक्षाचा १ खासदार (एम) (केरळ) व इनेलो पक्षाचा १ खासदार (हरियाणा) असे अनुसूचित जातींच्या खासदारांचे संख्याबळ आहे. वैशिष्ट्य म्हणजे यात आंबेडकरी पक्षाचा एकही खासदार नाही. मागील लोकसभेत बहुजन समाज पक्षाचे राखीव व बिनाराखीव जागा धरून २१ खासदार होते. यावेळी एकही खासदार निवडून न आल्याने संसदेतील या पक्षाचे अस्तित्व संपल्यातच जमा झाले आहे. बाकी रिपब्लिकन गटाचे नेहमीप्रमाणे याहीवेळेस एकही खासदार निवडून आला नाही. ही गोष्ट्र आंबेडकरी चळवळी दृष्टीने चिंतेची बाब बनली आहे.
ह्यावेळी कॉंग्रेसला पर्याय म्हणून भाजपला उभा करण्यात व त्यांच्याकडे एकहाती सत्ता सोपविण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कमालीचे यश मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्वज्ञान, ध्येय धोरणे, आखलेले डावपेच व कित्येक वर्षाचे स्वप्न यशस्वी होण्याचे चिन्ह त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आले आहे. म्हणूनच विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल म्हणाले की, “आठशे वर्षापूर्वी हिंदू राजा पृथ्वीराज चौहानचा पराभव झाल्याने हिंदू पराभूत झाले होते. आज पुन्हा हिंदुत्वाचा अभिमान असलेल्यांच्या हाती दिल्लीची सत्ता आली आहे.”
पेशवाई स्थापन करण्यासाठी भाजप महत्वपूर्ण भूमिका वठवीतांना कॉंग्रेस त्यांना मदतगार बनू शकते ही गोष्ट अयोध्येत बाबरी मस्जिद पाडण्यात कॉंग्रेसने घेतलेल्या बध्याच्या भूमिकेवरून सिद्ध झाले आहे. या देशात केवळ भाजप व कॉंग्रेस असे दोनच राष्ट्रीय पक्ष एकमेकांना कायम पर्याय म्हणून राहावेत, असेच धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आखलेले आहे. ही गोष्ट मागे लालकृष्ण अडवानी बोलून गेले. म्हणून बहुजन समाज पक्षासारख्या देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रीय पक्षाला संपविण्याचे कारस्थान त्यांनी केले. याच पद्धतीने इतर राष्ट्रीय पक्ष संपले तर आश्चर्य वाटणार नाही. त्याशिवाय देशामध्ये संसदीय पद्धत मोडीत काढून अध्यक्षीय पद्धत रुजविणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शक्य होणार नाही. निवडणूक निकाल येण्याच्या आधीच नरेंद्र मोदीचे प्रधानमंत्रीसाठी नाव घोषित करणे ही त्याचीच सुरुवात आहे. योग्य वेळी पुढचं पाउल उचलण्यासाठी मतदारांची मानसिकता तयार करण्याचा हा एक सुरुवातीचा प्रयोग आहे.
अस्पृश्यांची कैफियत मांडण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९३१ साली लंडन येथे भरलेल्या द्वितीय गोलमेज परिषदेत भाग घेतला. त्यात त्यांनी अस्पृश्यांवर उगारण्यात येणाऱ्या बहिष्काराविरुध्द शिक्षा करणे, भेदाभेद विरुध्द संरक्षण मिळणे, विधान मंडळात पुरेसे प्रतिनिधित्व मिळणे, नोकऱ्यात पुरेसे प्रतिनिधित्व मिळणे, पूर्वग्रहदूषित कृती केल्याबद्दल नुकसान भरपाई मिळणे इत्यादी अनेक मागण्या सादर केल्या होत्या.
यात स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीची विशेष चर्चा झाली. मात्र गांधीजींना स्वतंत्र मतदार संघ दलितांना अगदी कोणत्याही परिस्थितीत मिळू द्यायचे नव्हते. मुसलमान आणि शिखांच्या राजकीय मागण्यांना ते मान्यता देत होते. पण बाबासाहेबांनी मांडलेल्या अस्पृश्यांच्या मागणीत मात्र आडकाठी आणत होते. उच्चवर्णीयांच्या हिताविरुध्द कोणतीही गोष्ट त्यांना करायची नव्हती. स्वतंत्र मतदार संघ हे केवळ दलितांसाठीच नव्हते तर ख्रिचन, अंग्लोइंडियन, मुसलमान, शीख, जमीनदार, अशा अनेक वर्गासाठी पण स्वीकारल्या गेल्या होत्या. परंतु म.गांधीने केवळ दलितांच्या स्वतंत्र मतदार संघाच्याच विरोधात उपोषण सुरु केले होते. मुसलमानाच्या व शिखांच्या स्वतंत्र मतदार संघ स्वीकारण्यामुळे राष्ट्र खंडित होण्याची भीती त्यांना दिसली नाही, तर दलितांच्या स्वतंत्र मतदार संघामुळे हिंदू समाज दुभंगण्याची शंका घेणे व्यर्थ आहे, असे डॉ. बाबासाहेबांचे म्हणणे होते.
बाबासाहेब म्हणतात की, “आर्थिकदृष्ट्या दलित वर्ग आपल्या उदरनिर्वाहासाठी पूर्णपणे सवर्ण हिंदुवर अवलंबून असतात. त्यांच्याजवळ कुठलेही स्वतंत्र साधन नाही. केवळ हिंदुच्या भेदभावामुळे त्यांचे सर्व मार्ग बंद आहेत. देशातील प्रत्येक गावात हिंदू अनेक जातीत विभागलेले असून देखील दलित वर्गाने थोडीदेखील उन्नती साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना निर्दयतेने दडपण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातात. आपली सुरक्षा करण्यासाठी राजनैतिक अधिकार मिळविण्याची गरज आहे. नवीन घटनेत आम्हाला जास्तीत जास्त राजनैतिक अधिकार प्राप्त करण्यासाठी जोरदार लढाई करावी लागेल.’
१७ ऑगष्ट १९३२ रोजी ब्रिटीश प्रधानमंत्र्यांनी जातीय निवाड्याची घोषणा करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ बहाल केले. त्यानुसार अस्पृश्यांना दोन मताचा अधिकार मिळाला होता. एक स्वतंत्र मतदार संघातला अस्पृश्य प्रतिनिधी निवडून आणणे व दुसरा सामान्य मतदार संघातून सामान्य प्रतिनिधी निवडून आणणे. पण त्याविरुद्ध गांधीजींनी २० सप्टेंबर १९३२ पासून आमरण उपोषण सुरु केले. विरोधकांना नमविण्यासाठी ते हे शस्त्र नेहमीच उगारीत असत. याच शस्त्राने बाबासाहेबांना सुध्दा त्यांनी नमविले. स्वतंत्र मतदार संघाऐवजी त्यांना संयुक्त मतदार संघाला मान्यता देण्यास भाग पाडले, गांधीजी जर मेले असते तर देशात हाहाकार माजला असता. त्यामुळे स्वतंत्र मतदार संघ तर मिळाला नसताच. त्याउलट खेडोपाडी विखुरलेल्या दलितांची उच्चवर्णीयांकडून सर्रास कत्तल करण्यात आली असती. गरीब दुबळी दलित जनता भरडल्या गेली असती. ते देशोधडीला लागले असते. त्यांना जीवन जगणे कठीण करून टाकले असते. म्हणून अगदी मनाविरुद्ध नाईलाजाने बाबासाहेबांना पुणे करारावर सही करावी लागली. निदान संयुक्त मतदार संघाद्वारे गेल्या तीन हजार वर्षापासून कधीच न मिळालेले राजकीय हक्क मिळत आहेत, तेवढे तरी घेऊ या आणि आपला लढा पुढे सुरूच ठेवू या, अशा उद्देशाने बाबासाहेब २४ सप्टेंबर १९३२ रोजी पुणे करारावर सही करण्यास राजी झाले.
महात्मा गांधीजींच्या आमरण उपोषणाचा परिणाम म्हणून डॉ. आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात पुणे समझोता झाला. ह्या समझोत्यामुळे अनुसूचित जातीच्या वर्गाला राखीव जागेवर संसदेत जाण्याचा मार्ग खुला झाला. पण त्यासाठी बाबासाहेबांना कमालीचा संघर्ष करावा लागला. बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार इंग्रजाकडून मिळविला खरा; पण गांधीजींच्या उपोषणामुळे सोडून द्यावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. त्याऐवजी संयुक्त मतदारसंघात राखीव जागा त्यापेक्षा थोड्या वाढवून मिळाल्या एवढेच ! पण याचा दूरगामी परिणाम असा झाला की येथूनच चमचा युगाला सुरवात झाली. अनुसूचित जातीच्या पुढाऱ्यांना प्रस्थापित मनुवादी पक्षांनी निव्वळ चमचे आणि दलाल बनविले. अनुसूचित जातीच्या समाजात हे तुमचे पुढारी म्हणून त्यांनी ह्या दलालांना व चमच्यांना उभे केले.
गांधीजींच्या षडयंत्राला यश आल्याने संयुक्त मतदार संघात उच्चवर्णीयांकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींना निव्वळ हात वर करावयाचे काम करावे लागत आहे. ते आपल्या समाजाच्या हितासाठी काहीही करून शकत नाहीत. कारण ते ज्या पक्षाकडून निवडून आलेले असतात, ते त्या पक्षाचे गुलाम बनतात. स्वतंत्र बाण्याचे प्रतिनिधी निवडून येऊ शकत नाही. कारण प्रत्येक मतदारसंघात उच्चवर्णीयांचे मते जास्त असतात. दलित वर्ग सोडला तर उच्चवर्णीय मतदारांची मते अशा उमेदवाराला मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच स्वत: बाबासाहेबांना मुंबई व भंडारा येथील लोकसभेच्या निवडणुकीत हार पत्करावी लागली. हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. जर स्वतंत्र मतदार संघ कायम राहिले असते तर भारतीय राजकारणाला एक नवीन दिशा मिळाली असती. उच्चवर्णीय जसे नाचवितात तसे नाचावे लागले नसते.
पुणे करारात राखीव जागांची संख्या जरी वाढली तरी दुहेरी मतदानाचा अधिकार मात्र हिरावल्या गेला. जातीय निवाड्यानुसार दिला गेलेल्या दुहेरी मतदानाचा अधिकार हा अमूल्य आणि विशेष अधिकार होता. राजनैतिक हत्याराच्या रूपाने त्याचे मूल्य फार होते.
डॉ. बाबासाहेबांनी ‘कॉंग्रेस आणि गांधीनी अस्पृश्यांप्रती काय केले?’ या पुस्तकात लिहून ठेवले की “पुणे करार कृतीशून्य व्हावा यासाठी कॉंग्रेसने जे जे केले, त्यापैकी दोन गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. पहिली बाब कॉंग्रेस संसदीय मंडळाने उमेदवार निवडीचे जे धोरण स्वीकारले ती होय. दुर्दैवाने या प्रश्नाचे जेवढे महत्व आहे तेवढ्या गंभीरतेने या प्रश्नाचे अध्ययन मात्र करण्यात आले नाही. मी या प्रश्नाचे अध्ययन, विश्लेषण केले आहे. …कॉंग्रेसने निवडलेला उमेदवारापैकी जे ब्राम्हण आणि तत्सम वर्गातील होते, त्यांची शैक्षणिक पात्रता उच्चतम होती. जे ब्राम्हणेतर वर्गातील उमेदवार होते, त्यांची शैक्षणिक पात्रता साधारण बरी होती. आणि जे अस्पृश्यवर्गातील होते ते जेमतेम साक्षर होते. उमेदवार निवडीची ही पद्धती फार चमत्कारिक होती. असे वाटते की ही पद्धती स्वीकारण्यामागे काहीतरी खोलवर रुजलेले कारस्थान असावे. जर कोणीही ह्या प्रणालीचे काळजीपूर्वक अध्यन केले तर त्याला असे दिसून येईल की, ब्राम्हण आणि तत्सम जाती सोडून इतर कोणालाही मंत्रिमंडळात कोणतेही महत्वाचे स्थान प्राप्त होऊ नये. असा ही पद्धती स्वीकारण्यामागे हेतू आहे. आणि अशा बनविलेल्या मंत्रिमंडळात बुद्धिमान नसलेल्या आणि सहज हाताळता येऊ शकणाऱ्या ब्राम्हणेतर व अस्पृश्यांचे त्यांना सहज सहकार्य उपलब्ध होईल अशी ही पद्धती होती. ब्राम्हणेतर व अस्पृश्य प्रतिनिधी बौद्धिक कुवत नसल्याने कधीही ब्राम्हण आणि तत्सम वर्गातील मंत्र्याशी स्पर्धा करण्याचा विचार स्वप्नातही आणू शकत नव्हते. आणि त्यांचे नेतृत्व मानण्यातच ब्राम्हणेतर व अस्पृश्यांना सामाधान वाटत होते. …श्री. गांधी यांनी जेव्हा अस्पृश्यातून मंत्री व्हावयाचे असेल तर ती व्यक्ती गुणवत्ता प्राप्त असली पाहिजे असे विधान केले, तेव्हा त्यांना या उमेदवार निवड प्रक्रियेची ही बाजू दिसलीच नाही.
…कॉंग्रेसचे अस्पृश्य कॉंग्रेसजनाप्रती दुसरे दुष्कृत्य म्हणजे त्यांच्यावर लादण्यात आलेले कठोर पक्षीय बंधन हे होय. हे सदस्य संपूर्णपणे कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीच्या नियंत्रणात होते. कार्यकारिणीला आवडणार नाही असा कोणताही प्रश्न ते विचारू शकत नव्हते. कार्यकारिणीच्या अनुमतीशिवाय त्यांना कोणताही प्रस्ताव मांडता येत नव्हता. कार्यकारिणीचा आक्षेप असेल तर त्यांना कोणताही कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करता येत नव्हते. आपल्या मर्जीप्रमाणे त्यांना मतही देता येत नव्हते. आणि जे त्यांना वाटत होते ते त्यांना बोलताही येत नव्हते. त्यांची स्थिती मुकी बिचारी कोणीही हाकावीत अशा जनावरांसारखी होती. विधानमंडळात अस्पृश्यांना प्रतिनिधित्व देण्याच्या पाठीमागे एक उद्देश असा होता की, या व्यासपीठावरून त्यांना आपल्या व्यथा वेदना व्यक्त करता याव्यात, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची त्यांना दाद मागता यावी. अन्यायाचे परिमार्जन करता यावे. कॉंग्रेसने यशस्वीपणे आणि परिणामकारकरीत्या अस्पृश्यांना प्रतिबंधीत केले.
या लांबलचक दु:खद कथेचा शेवट म्हणजे कॉंग्रेसने पुणे करारातील सर्व रस शोषून घेतला आणि चिपाळे मात्र अस्पृश्यांच्या तोंडावर फेकलीत. एवढेच.”
अशीच परिस्थिती आजही कायम आहे. ज्यांचा एकही खासदार व महाराष्ट्रात आमदार निवडून आला नाही त्यांना भाजप आणि शिवसेना यांच्या मंत्रीमंडळात मंत्री बनून काय ब्राम्हणशाहीच्या चळवळीचे पालखी वाहण्याचे काम करायचे आहे काय?
म्हणूनच पुणे समझोत्यानंतर बाबासाहेबांनी परत स्वतंत्र मतदार संघाची मागणी रेटून धरली होती. दिनांक २३.०९.१९४४ ला मद्रास येथे आयोजित अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकारिणीत प्रस्ताव क्रमांक ७ अन्वये नमूद केले आहे की, ‘…सयुक्त मतदार संघ पद्धतीने अनुसूचित जातींना विधान मंडळात त्यांचे खरे पर्तिनिधी पाठविण्यापासून वंचित केले आहे. आणि हिंदू बहुसंख्याकांना अनुसूचित जातीचे प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अक्षरशः एकाधिकारच बहाल केला आहे. हे प्रतिनिधी हिंदू बहुसंख्याकांच्या हातातील कळसूत्री बाहुल्या असतात. म्हणून ही कार्यकारिणी अशी मागणी करते की राखीव जागासाहित संयुक्त मतदार संघ पद्धती रद्द करण्यात यावी आणि त्याएवजी स्वतंत्र मतदार संघाची पद्धती स्वीकारली जावी. त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताची घटना जेव्हा लिहिली तेव्हा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना राखीव जागा १० वर्षे पर्यंत असण्याची तरतूद घटनेत केली. १० वर्षाची कालमर्यादा असतांना सुध्दा कॉंग्रेस सरकारने प्रत्येक वेळी मुदतवाढ दिली, याचे मर्म हिंदू बहुसंख्याकांच्या हातातील कळसूत्री बाहुल्या म्हणून राहाव्यात यात दडले आहेत.
बाबासाहेबांचा या तरतुदीला विरोध असल्याचे दिसते. म्हणूनच दिनांक २१.०८.१९५५ ला मुंबईत बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या सभेत लोकसभा, विधानसभा, लोकलबोर्ड मधील राखीव जागा समाप्त करण्यात याव्यात, असा अत्यंत महत्वाचा ठराव पारीत करण्यात आला. त्याच बैठकीत पुणे कराराचा धिकार पण करण्यात आला होता.
आताच्या लोकसभेमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की, संसदेतील एकूण खासदाराच्या १० टक्के पेक्षा कमी खासदार कॉंग्रेसचे निवडून आल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही. इतकी केविलवाणी परिस्थिती कॉंग्रेसची झाली आहे. परंतु निरनिराळ्या पक्षाद्वारे राखीव मतदार संघात निवडून आलेले अनुसूचित जातीचे खासदार संसदेतील एकूण खासदाराच्या १० टक्के पेक्षाही जास्त आहेत. हे सारे जर अनुसूचित जातीच्या बाजूने एकत्र झालेत तर विरोधी पक्षाची भूमिका वठवू शकतात. त्यामुळे संसदेत त्यांचा दरारा निर्माण होऊ शकतो. पण हे घडणार नाही. कारण त्यांना समाजाच्या हितापेक्षा पुढील निवडणुकीत तिकीट मिळेल की नाही याची जास्त चिंता असते.
आपल्या समाजाच्या सर्वांगीन विकासाच्या मुद्द्यावर हे खासदार खाजगीत समाजाची काळजी असल्याचे भासवीतात. परंतु त्यांच्या पक्षाच्या बैठकीत अथवा संसदेत आवाज उठविण्यास हिंमत करीत नाहीत. बिहारचा लक्ष्मणपूर हत्याकांड असो, की हरियाणामधील मिर्चपूर हत्याकांड असो, किंवा महाराष्ट्रातील खैरलांजी हत्याकांड असो, ह्या खासदारांनी संसदेत कधीही या प्रकरणाचा मोठा मुदा बनविल्याचे ऐकिवात नाही. मागील काही दिवसात हरियाणात हिंसा झाली. दलित महिलांवर सामुहिक बलात्कार झालेत. अशा घटनांच्या विरोधात पिडीतेच्या कुटुंबीयांनी जंतर-मंतर येथे धरणे धरले होते. परंतु या खासदारांना मात्र पाझर फुटला नव्हता. त्यावेळी संसदेचे सत्र सुरु होते. तरीही अत्याचाराच्या या घटनेचा मुद्दा बनवून कोणीही संसदेला हादरवून सोडले नाही. प्रश्न असा निर्माण होतो की काय या दलित खासदारांना आपली ताकद कळत नाही का?
त्यांना जेव्हा फुले-शाहू-आंबेडकर यांच्या संघर्षाची जाणीव होईल तेव्हाच ते खऱ्या अर्थाने पक्षांतर्गत लादलेल्या गुलामीचे शृंखला तोडण्यास सक्षम होतील. अशी वृती जर सर्व पक्षातील अनुसूचित जातीतील सर्व पुढाऱ्यांनी स्वीकारली तर कोणत्याही पक्षाची त्यांना गुलाम बनविण्याची हिंमत होणार नाही. असा दिवस ज्या दिवशी उगवेल तो सुदिन म्हणावा लागेल !
रामराज (उदित राज) हे दिल्लीहून भाजपच्या तिकिटावर निवडून गेलेत त्यांनी सुरुवातीच्या काळात बौध्द धम्म स्वीकारून बौध्द अभियान चालविले होते. तसेच केंद्रीय स्तरावर मागासवर्गीय कर्मचारी वर्गाची संघटना चालवून शासनदरबारी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन चालविले होते. आतातर त्यांच्या भाजप पक्षाची सत्ता आली आहे. मग ते आताही ही कामे करतील का? दलित राजनितीतील खासदार असलेले हे तीन राम म्हणजे रामदास, रामविलास व रामराज यांनी मोदीला निवडून आणण्यात सारे कसब पणाला लावलेत. असेच कसब समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लावतील काय? बाबासाहेबांच्या पुण्याईने हे सारे खासदार आरक्षित जागेवर निवडून गेलेत. त्यांना समाजाच्या प्रश्नावर चूप बसतांना कधीही बाबासाहेबांची आठवण होत नाही का? ते आपल्या मालकांकडे पाहण्याआधी आपल्या समाजाकडे का पाहत नाहीत? इत्यादी अनेक प्रश्न आज समाजाच्या मनात उपस्थित होत आहेत.
अनुसूचित जातीवर अन्याय-अत्याचार होणे, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळविण्यास दिरंगाई करणे, सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देणारी पद्धत बंद करणे, केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेत मेरीटचे गुण मिळून सुध्दा अशा उमेदवारांना मेरिटमध्ये निवड न करता अनुसूचित जातीच्या राखीव जागेवर निवड करणे, आरक्षणातील अनुशेष न भरणे, अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात तरतूद न करणे, केलेली तरतूद खर्च न करता दुसऱ्या योजेनेवर खर्च करणे, शिक्षणाचे बाजारीकरण करणे, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करून मागासवर्गीयांच्या आरक्षणाला आळा घालणे असे अनेक प्रश्न समाजाला भेडसावीत आहेत. धर्मांतर करणाऱ्या दलितांना कोणत्याही परिस्थितीत अनुसूचित जातींचा दर्जा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप सरकारने घेतली आहे. असे भाजपच्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सांगितले. पुढे ते धर्मांतरीत दलितांसाठी काय करता येईल यावर आम्ही विचार करीत आहोत असेही म्हणाले. (महाराष्ट्र टाईम्स दि. ११.१०.२०१४). ही बातमी म्हणजे अनुसूचित जातीसाठी धोक्याची घंटा नव्हे काय?
सत्तेची ताकद व त्यापासून होणारे फायदे बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी राजकीय क्षेत्रे निर्माण केली. स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन व रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया ही बाबासाहेबांनी निर्माण केलेली राजकीय क्षेत्रे होती. त्यांचा हेतू हाच होता की सत्तेच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या सामाजिक व आर्थिक परिस्थिती मध्ये बदल घडवून आणावा. म्हणून सत्तेचे विस्तारीकरण व त्याचे विविध फायदे समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक संस्थांचे त्यांनी जाळे विणले. परंतु बाबासाहेबांच्या या महान कार्यात सहभागी होण्यापेक्षा आंबेडकरी चळवळीच्या विरोधात काम करणाऱ्या पक्षात सामील होऊन विरोधी चळवळ मजबूत करण्याचे काम हे प्रतिनिधी करीत असल्याचे आपण जेव्हा पाहतो, तेव्हा दु:ख होणे साहजिकच आहे.
आरक्षित जागेवर निवडून गेलेले खासदार, आमदारांना कळले पाहिजे की ते समाजाचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले आहेत. आरक्षण त्यांच्या पात्रतेच्या भरोशावर नाही तर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या १०८ वर्षाच्या संघर्षामुळे मिळाले आहे. जर या प्रतिनिधींनी एकत्र येऊन एक ताकद निर्माण केली व त्याद्वारे समाजाचे प्रश्न उपस्थित करून सोडविले तर बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही.
अनुसूचित जातीचे प्रतिनिधी म्हणून जरी ते निवडून गेलेले असतील तरी खऱ्या अर्थाने ते दलितांचे प्रतिनिधी राहत नाहीत. तर ते त्या त्या राजकीय पक्षाचे गुलाम बनतात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. म्हणूनच दलितांच्या कोणत्याही प्रश्नावर, हक्कावर व त्यांच्यावर होणा-या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात संसद वा विधानसभेत “ब्र” ही काढीत नाहीत. मग अशा राजकीय आरक्षणाची गरजच काय? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

आर.के.जुमळे, अकोला

मॉरिशियसचा प्रवास

5 Dec

मागीलवेळी आम्ही थायलंडचा परदेशातला प्रवास केला. ह्यावेळी मॉरिशियसच्या प्रवासाला जायचं ठरविलं.

आता फिरायला जायचे म्हणजे मी आणि कुसुम असे दोघेचजण जात असतो. मुलं आता मोठी झालीत. कामोकामी लागलेत. सर्वांचे लग्न झालीत. पाखरासारखे दूर उडून गेलेत. आता त्यांची सोबत नसते. मग आम्ही दोघेच फिरत असतो.

पूर्वी मी नोकरीत असतांना मुलं लहान होते, त्यावेळी १९८६ साली आम्ही सर्वजण नेपाळ येथे काठमांडू पर्यंत गेलो होतो. त्यावेळी मोठा प्रज्ञाशील १० वर्षाचा, संघशील ८ वर्षाचा व करूणा ६ वर्षाची होती.

मी अकोला येथेच केसरी टूरच्या ब्रांच ऑफिसला मॉरिशियसचं बुकिंग केलं. मुंबईहून विमानाने मॉरिशियसला जायचे असल्याने आम्ही करुणाकडे ठाण्याला जाऊन थांबलो. ठाणेच्या केसरी टूरच्या ऑफिसने व्हिसा काढून दिला. बाकी पैसे भरले. जाण्यापूर्वी भारताचे काही चलन बदलवून डॉलरचे चलन घेतले. आमचा हा टूर पाच दिवस आणि चार रात्रीचा म्हणजे दिनांक १४.०५.२०१४ ते १८.०५.२०१४ पर्यंतचा होता.

खरं म्हणजे मॉरिशियसला जाणारं फ्लाईट १४.०५.२०१४ला सकाळी ६.४५ वाजताचं होतं. त्यापूर्वी तीन तास आधी आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी टर्मिनल-दोन या विमानतळावर पोहचण्याच्या आम्हाला सुचना देण्यात आल्याने आम्ही घरून रात्री १.०० वाजताच्या दरम्यान निघालो.

विमानतळावरील मायग्रेशन व सिक्युरिटी प्रोसिजर आटोपून आम्ही आतमध्ये गेलो. आमचं एमके ७४९ मॉरिशियस कंपनीचे विमान उशिरा म्हणजे सकाळी ७.३० वाजता सुटले. मॉरिशियसला पोहचल्यावर डॉलर मोडून मॉरिशियसचे रुपये घेतले. त्यावेळी भारताच्या एका रुपयाला मॉरिशियसचे ४० पैसे असा दर होता. त्याशिवाय आम्ही सोबत भारताचे १५००० रुपये घेतले होते. मॉरिशियसच्या चलनाला पण रुपयेच म्हणतात. एकूण प्रवास ६६५८ किलोमीटरचा होता. विमान इंडियन ओसियनच्या समुद्रावरून जात होतं. आम्हाला नास्ता व जेवण विमानातच दिल्या गेले. आम्ही मॉरिशियसच्या पोर्ट लुईसच्या ‘सर शिवसागर रामगुलाम एयरपोर्ट’  विमानतळावर पोहचलो. त्यावेळी भारतीय वेळेनुसार माझ्या घड्याळात ११.३५ वाजले होते. तेथील मॉरिशियसच्या वेळेनुसार दुपारी १.१५ वाजले होते. म्हणजे भारतापेक्षा तेथील घड्याळ हे जवळपास २ तास मागे होतं. आम्ही त्याप्रमाणे घड्याळ लाऊन घेतले. आम्ही पोहचल्याचा निरोप विमानतळावरून मोबाईलने फोन करून मुलीला कळविला. तेव्हा १०० रुपये कटले. म्हणजे एका मिनिटाला १०० रुपये लागतात. हे धक्कादायकच नाही का ?

विमानतळावरून आम्हाला बसने व्होल्मार या ठिकाणी पर्ल बीच या हॉटेलवर नेण्यात आले. जातांना गुळगुळीत (खड्डे नसलेले), स्वच्छ रोड, नारळाचे झाडं, स्वच्छ सूर्यप्रकाश, शुद्ध हवा, मोहित करणारं निसर्गसौंदर्य असा तो नजारा दिसला.

आमच्या बसमध्ये जी गाईड होती ती मूलतः भारतीय वंशाची होती. तिला इग्रजीशिवाय हिंदी पण बोलता येत होते. त्यामुळे ती जेव्हा इंग्रजीत सांगायची, त्याचवेळेस आम्ही तिला त्याचे स्पष्टीकरण हिंदीत करायला सांगत होतो. उद्देश हा की ज्यांना इंग्रजी समजत नाही, त्यांना हिंदीत कळू शकेल. हॉटेलवर पोहोचेपर्यंत तिने आजूबाजूचा परिसर व मॉरिशियस बद्दलचा इतिहास सांगितला. तिच्या बोलण्यावरून व काही हॉटेलचे चौकीदार व बसचे ड्रायव्हर ज्यांचे पूर्वज भारतीय वंशाचे होते, त्यांचे कडून जी माहिती घेतली ती अशी-

हॉलंडचा राजपुत्र मॉरीटूज याच्या नावाने या बेटाचं मॉरिशियस हे नाव पडले असे सांगण्यात आले. मोरपिंगी रंगाच्या समुद्राने वेढलेले हे सुंदर बेट आहे. समुद्र किनाऱ्यावरील वाळू पांढऱ्या रंगाची असल्याने मोठी मोहक दिसते. या ठिकाणी जायचे म्हणजे एकतर जहाजाने अथवा विमानाने. भारतातून मात्र फक्त विमानानेच जाण्याचा मार्ग आहे.

मॉरिशियसचा शोध सुरुवातीला १६ व्या शतकात युरोपियन लोकांनी लावला. पोर्तुगीज इसवी सन १५०७ ते १५१३च्या दरम्यान आलेत. त्यांनी कायमस्वरूपी वसाहती केल्या नाहीत, त्यानंतर डच आलेत. त्यांनी इसवी सन १६३८ ते १७१०च्या दरम्यान वसाहती केल्यात. परंतु तुफान, चक्रीवादळ, दुष्काळ, रोगराई, अन्नाचा तुटवडा यामुळे ते १७१० मध्ये मॉरिशियस सोडून गेलेत. त्यानंतर १७१० ते १८१० च्या दरम्यान फ्रेंच आले. १८१० नंतर ब्रिटीश आलेत. १९६१ पासून स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरु झाले. शिवसागर रामगुलाम हे वैद्यकीय व्यवसाय करणारे गृहस्थ, ज्यांनी गरिबांना खूप मदत केली, ते स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते. १२ मार्च १९६८ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर ते पहिले प्रधानमंत्री झाले. ते मॉरिशियसच्या प्रगतीसाठी खूप झटले. म्हणून त्यांना राष्ट्रपिता म्हटले जाते. त्यांच्या निधनानंतर सध्या त्यांचा मुलगा डो.नवीन रामगुलाम हे प्रधानमंत्री आहेत.

हा देश आफ्रिका खंडात येते. या देशाचे क्षेत्रफळ २०४० कि.मी. एवढे आहे. उत्तर-दक्षिण लांबी ६५ कि.मी. व पूर्व-पश्चिम रुंदी ४५ कि.मी. असलेलं हे अगदी छोटसं बेट आहे असे म्हणता येईल. पांढऱ्या रंगाच्या रेतीच्या १५० कि.मी समुद्र किनाऱ्याने हा बेट वेढला आहे. एक मात्र खरं की ह्या समुद्राचे पाणी अगदी स्वच्छ व नितळ असलेले दिसले. तसेच किनार्‍याजवळचा समुद्र खोल असल्याचे वाटले नाही. ह्या बेटावर फक्त दोन ऋतू म्हणजे उन्हाळा नोव्हेंबर ते एप्रिल व हिवाळा जून ते सप्टेंबर असा असतो. वर्षभर कमी जास्त पाउस पडत असतो. त्यामुळे पावसाळयाचा निश्चित असा कालावधी नसल्याने पावसाळा हा ऋतू येथे नाही. येथील हवामान मात्र सुखावह वाटला.

येथे कारखाने नसल्याने प्रदुर्षणाचा प्रश्नच उद्भवत नाही. कुठेकुठे किरकोळ असे लहान-लहान नाले दिसले पण मोठी अशी एकही नदी दिसली नाही.

प्रशासनाच्या दृष्टीने या देशात ९ जिल्हे आहेत. येथे दोन मोठे शहरे व ४ लहान शहरे आहेत. बाकी जवळपास १३२ खेडे आहेत. या देशाची लोकसंख्या केवळ बारा लाख एकसष्ट हजार एवढी आहे. या देशात मुख्यत: इंग्रजी आणि फ्रेंच ह्या सरकारी भाषा आहेत. तेथील लोक फ्रेंचचीच बोलीभाषा असल्यासारखी क्रियोल भाषा बोलत असतात.

येथे सर्व स्तरावरचे शिक्षण फुकट दिल्या जाते. रेल्वे व ऑटो दिसल्या नाहीत. पण सामान्य लोक सरकारी बसने प्रवास करतात. सर्व विद्यार्थ्यांना, अपंग व ज्येष्ठ नागरीकांना मोफत जाण्या-येण्याची सुविधा आहे.  ५८ वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना पेन्शन आणि मोफत वैद्यकीय सुविधा मिळते.  ७० वर्षानंतर वाढते पेन्शन मिळते. शिवाय त्यांना सांभाळायला एक केअरटेकर ज्याचा पगार सरकार देत असल्याचे कळले. येथील अर्थव्यवस्था शेतीशिवाय मुख्यत: पर्यटनावर अवलंबून आहे.

पोर्ट लुईस हे देशातले सर्वात मोठे शहर असून देशाची राजधानी आहे. ती ब्रिटीशांनी वसवलेली आहे. ही राजधानी म्हणजे या देशाचा आर्थिक केंद्रबिंदू आहे. सर्व जहाजे येथेच येतात. बँकां, विमा कंपन्याही येथेच आहेत.

या देशाचे आणखी एक वैशिष्ट्य दिसले ते म्हणजे येथे आपल्या देशासारखी मिल्ट्री नाही. मी या बाबतीत एका पोलिसाला विचारले; तेव्हा त्यांनी संगितले की सामुद्रिक बेट असल्याने भौगीलिक सीमा नाहीत. त्यामुळे मिल्ट्रीची गरज नाही. त्याऐवजी पॅरामिल्ट्री पद्धतीने म्हणजे पोलीस कमिशनरच्या अधिपत्याखाली दहा हजार पोलीस मार्फत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षाव्यवस्था पहिली जाते. मी म्हटले, ‘चांगले आहे.’ त्यामुळे तुम्हाला सैन्यावर फारसा खर्च करावा लागत नाही. आमच्या देशात तर इतर योजेनेपेक्षा सैन्यावरच जास्त खर्च करावा लागतो.

मॉरिशियसमध्ये भारतीय वंशाचे लोक जास्त आहेत. त्यामुळे इंडो-मॉरिशियस असेही म्हटल्या जाते. सध्याच्या काळात भारतीय वंशाची लोकसंख्या ६८ टक्के आहेत. त्यात मुस्लीम १७.३, ख्रिचन ३२.७, व हिंदू ४८.७ टक्के आहेत. बौध्द अगदी नगण्य असल्यासारखे म्हणजे ०.४ टक्के आहेत.

भारतीय लोक जास्त असण्यामागे एक कहाणी सांगितल्या जाते. जेव्हा मॉरिशियस मध्ये ब्रिटीश राज्यकर्ते होते. तेव्हा येथे उसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतल्या जात होते. आताही जिकडे तिकडे शेतात रोडच्या दोन्हीही बाजूला हिरवेगार व तुरुंबे आलेले उसच उस उभे असलेले दिसतात. हे उस खायला गोड नाहीत; पण त्यात साखरेचे प्रमाण जास्त आहेत. उसापासून येथे रम नावाची दारू बनविल्या जाते असेही कळले. बनविलेली व्हाईट व ब्राऊन साखर येथून मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. या उसाच्या शेतीला स्प्रिंकल पद्धतीने पाणी दिल्या जात होते. त्यामुळे बसमधून शेताकडे पाहिले की पाण्याचे कारंजे उडलेले दिसत होते. तेव्हा या शेतीला मोठ्या प्रमाणात मनुष्य बळ आवश्यक होते. त्याचवेळी भारतात पण ब्रिटीशांचे राज्य होते. त्यांनी भारतीय लोकांना मॉरिशियसमध्ये दगड उचलला की सोनं सापडते असे सांगून जहाजाने घेऊन गेलेत. तेथे गेल्यावर त्यांना वेठबिगार व गुलाम म्हणून वागवू लागले. त्यांना परत जाणे शक्य नव्हते. शिवाय येणाऱ्या लोकांना रोखू शकत नव्हते. कारण तशा बातम्या ते भारतीयांना देऊ शकत नव्हते. येथे आल्यावर त्यांना पुरती फसवणूक झाल्याचे कळले. ज्यांनी गुलामगिरी विरोधात बंड केले, त्यांचे आंदोलन अत्यंत निर्दयतेने चिरडून टाकण्यात आले. ऐवढे की अशा लोकांच्या शरीराचे अवयव कापून त्यांना उघड्यावर ठेवत. त्यामुळे इतर लोकांना दहशत बसावी हा त्यामागे उद्देश होता. नंतरच्या काळात गुलामगिरीची प्रथा हळूहळू कमी झाली. म्हणून तेथे भारतीयांचे प्रमाण जास्त आहे.

या देशातील जास्वंदाचं फुल हे राष्टीय फुल असून डोडो हा राष्ट्रीय पक्षी आहे. म्हणूनच की काय जास्वंदाचे झाडे मोठ्या प्रमाणात दिसत होते. डोडो बद्दल तर एक गमतीदार माहिती मिळाली ती अशी की पूर्वी त्या परिसरात डोडो नावाचा पक्षी मोठ्या प्रमाणात होता. तो काळ्या करड्या रंगाचा, जाड चोचीचा आणि मजबूत पायाचा बदकासारखा दिसणारा होता. पण हा पक्षी अठराव्या शतकाच्या सुरुवातीला तेथून नामशेष झाला. त्यामुळेच एखादी वस्तू नष्ट होते तेव्हा ‘As dead as Dodo’ असे म्हणतात. या बेटावर भरपूर पाउस पडत असल्याने ‘कलवारीया’ या झाडांचे भरपूर जंगले वाढत. या झाडाला लागणारे फळे हे या पक्षाचे आवडते खाद्य होते. अधिक श्रम करण्याची त्याला सवय नसल्याने त्याची उडण्याची व प्रतिकार करण्याची क्षमता कमी झाली होती. जेव्हा सतराव्या शतकाच्या सुरुवातीला डच लोकांची जहाजे येत; तेव्हा जहाजावरील खलाशी या पक्षांना व त्यांची अंडी खाऊन जगत. त्यांनी खाण्याचा इतका सपाटा वाढविला की नंतरच्या चाळीस-पन्नास वर्षात साऱ्याच डोडोंना फस्त करून टाकले. एकेकाळी मोठ्या प्रमाणात आढळणारा हा पक्षी पूर्णतः नामशेष झाला. नंतरच्या काळात या पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. त्यामुळेच तेथील दुकानात त्याची प्रतिकृती विकायला ठेवतात.

रोडच्या बाजूला उसाच्या शेतीची हिरवळ तर होतीच, पण रोड अगदी स्वच्छ दिसत होते. आपल्या भारतासारखे कुठेही काडीकचरा, प्लास्टिकचे किंवा कागदाचे तुकडे पडलेले दिसत नव्हते. मध्येमध्ये काही किलोमीटर अंतरावर टॉयलेट्स पण दिसत होते.

कुठेकुठे दूरवर दिसणाऱ्या टेकड्या ह्या एकतर हिरवळीने आच्छादिलेले, सुळके असलेले किंवा बोडके असलेले दिसत होते. पण ते खूप सुंदर वाटत होते. काहीकाही टेकड्यांना विशिष्ट आकार दिसत होते. त्याला काहीतरी नावे दिलेले होते. एका टेकडीवर तरंगत असलेला एक मोठा दगड दिसत होता. जमिनीतून मोठमोठे दगडे काढून त्यांनी शेतीयोग्य जमीन बनविलेली दिसली. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेबाबत गाईडला विचारले असतांना, नैसर्गिक सरोवरात जमा होणारे पाणी मॉरिशियसच्या लोकांना पिण्यासाठी पुरेसे असल्याचे तिने सांगितले. रोडच्या बाजूला आपल्यासारखे विक्रेते बसलेले दिसले नाहीत. त्यांच्यासाठी वेगळे झोन ठेवलेले दिसत. तसेच रस्तोरस्ती आपल्या देशासारखे भिक मागणारे भिकारी पण कुठेही दिसले नाहीत.

या देशातील आणखी एक वैशिष्ट्य सांगण्यात आले ते म्हणजे येथे साप नाहीत व कोणतेही वाघ, सिह, हत्ती सारखे जंगली प्राणी नाहीत. गुरं-ढोरं रस्त्यावर किंवा आजूबाजूच्या शेतावर कुठेही दिसले नाहीत. पण ते आतमध्ये तबेल्यात असतात असे गाईड सांगत होती. उसाची शेती यांत्रिक पद्धतीने होत असल्याने बैलाचे काम पडत नसावे.

असं सारं जरी असलं तरी एक गोष्ट मात्र खटकली. ती येथे नमूद केल्याशिवाय राहवत नाही. ती म्हणजे हॉटेल किंवा बाहेरच्या ठिकाणच्या शौचालयात पाण्याची व्यवस्था कुठेही दिसली नाही. त्याऐवजी टिस्यु पेपरचे रोल तेथे ठेवलेले दिसायचे. त्यामुळे फार अवघडल्यासारखे व्हायचे. पण उपाय नव्हता. काय करणार? ‘देश तसा वेश’ करावाच लागतो. विमानात पण अशीच व्यवस्था होती. याचं कारण काय त्याचा काही उलगडा झाला नाही. अशीच एक गोष्ट माझ्या वाचण्यात आली. आपल्या इकडे हागणदारीत पालात राहणारे भटक्या जमातीचे मुलं बाहेर शौचालयाला जातांना पाणी नेत नव्हते. त्यांचे कारण विचारले; तेव्हा त्यांनी सांगितले की पाणी ही पवित्र गोष्ट असून देव त्याला आभाळातून पाठवतो. आम्ही त्या पाण्याने देवाची आंघोळ करतो. मग आम्ही हे पाणी कसं वापरू ? देवाचा कोप होईल ना ! काय ही अंधश्रद्धा…! एवढे खरं की मॉरिशियससारख्या प्रगत देशात हे कारण असण्याची मुळीच शक्यताच नाही. भारतात मात्र अंधश्रद्धा खोलवर रुजली आहे.

आम्ही हॉटेलला पोहोचलो तेव्हा मन अगदी प्रसन्न करणारे वातावरण दिसले. कारण तेथील मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी आम्हा सर्वांना गुलाबाचे फुलं व सोबत नॅपकीन देऊन हसतमुखाने स्वागत केले.

हे हॉटेल फोरस्टार स्तरावरचे असल्याचे कळले. त्यामुळे तेथील रूम खूप छान व प्रशस्त होते. हे हॉटेल अगदी समुद्राच्या काठावर होतं. आमच्या रूममधून बाहेर समुद्राचे विलोभनीय दृश्य दिसत होते. विदेशी पर्यटक समुद्राच्या पाण्यात मौजमजा करून काठावरच्या छत्रीखाली येऊन आराम करीत. तेथे पाण्यात वाटरपोलोचा खेळ खेळत. आणखी एक वैशिट्य आढळले ते म्हणजे समुद्राच्या लाटा काठापर्यंत येत नव्हते, तर ते ५०० मीटरच्या आत थोपवण्यात आले होते.

तेथे पोहचल्यावर जवळच्या दुकानातून मॉरिशियसचे सिमकार्ड विकत आणले. त्यामुळे मुलांसोबत भरपूर वेळपर्यंत बोलता आले. हॉटेलच्या कर्मचाऱ्याकडून वायफाय जोडून घेतला. त्यामुळे कितीही वेळपर्यंत फुकटात बोलण्याची सुविधा झाली. त्या दिवशी आम्ही बाहेर न जाता हॉटेलवरच थांबलो. हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणाची व्यवस्था होती. जेवणात व्हेज, नॉनव्हेज आणि स्वीट असा प्रकार होता. त्या हॉटेलमध्ये विदेशी पर्यटक असल्याने भारतीय आणि वेस्टर्न अशा दोन्हीही पद्धतीचे जेवण होते. रात्रीला नाच-गाण्याचा कार्यक्रम राहत होता. जेवता-जेवता बाहेर दिसणारे समुद्राचे दृश मनाला मोहित करणारे वाटत होते. खरेच खूप चांगल वातावरण होतं. त्याचवेळी दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम टीम मॅनेजर गार्गी मॅडम यांनी सांगितला. टूरमध्ये साधारणत: बीच टूर, शॉपिंग टूर आणि साईट सिइंग टूर असा अंतर्भाव होता.

दुसऱ्या दिवशी १५ तारखेला सकाळी सात वाजता हॉटेलमध्येच आम्हाला नास्ता देण्यात आला. मग बसने आमच्या सहली सुरु झाल्या. त्यादिवशी आम्हाला धबधबा पाहायला जायचे होते. त्याआधी हॉटेलपासून जाणाऱ्या अलीकडील समुद्राच्या बीचवर गेलो. तेथे दूरवर आतमध्ये पॅरासेलिंग होत असल्याचे दिसले. ज्यांना पॅरासेलिंग करायचे त्यांनी बोटीने तेथे जावे, बाकीच्यांनी बीचवर थांबावे असे सांगण्यात आले. आम्ही दोघांनीही आधीच थायलंडला पट्टाया येथे पॅरासेलिंग केले असल्याने परत करण्याची इच्छा झाली नाही. आमच्या ग्रुपमधील काही लोक तेथे गेले होते. परंतु येथील पेक्षा पट्टायाची व्यवस्था चांगली होती असे आम्हाला वाटले. येथे स्पीड बोटने फिरण्याची सोय पण होती. आम्ही समुद्राच्या तीरावर थांबलो होतो. मध्येमध्ये पाण्यात फिरण्याची मजा घेत होतो. येथील समुद्राचे पाणी निळेशार दिसत होते. आम्हाला केसरी तर्फे नारळाचे पाणी दिले. मी त्या नारळाचा भाव सहज विचारला; तेव्हा समजले की त्याची लहान आकाराला १०० रुपये व मोठ्या आकाराला १५० रुपये अशी किंमत होती. म्हणजे आपल्याकडे याच्या दुप्पट २००/३०० रुपये… बापरे…! काय ही किंमत जे आपल्याकडे २५/३० रुपयाला मिळते.

आमची बस Trou d`Eau Douce येथपर्यंत जाऊन तेथे आम्हाला सोडून देण्यात आले. मग आम्ही स्पीड बोटने समुद्रातून waterfall “Grand River South कडे जायला निघालो. हा प्रवास अप्रतिम असा होता. धबधब्याच्या जवळ जात असतांना दोन्ही बाजूला तीर असलेला व झाडाझुडपांनी गच्च भरलेला अगदी नदीसारखा प्रवाह दिसत होता. तिथे जेमतेम एक बोट मावेल एवढी जागा असल्याने आधीची बोट जाईपर्यंत थांबावे लागत असे. मग धबधब्यापर्यंत बोट गेली. धबधबा खूप सुंदर होता. अगदी जवळ जाऊन बोटीवरच आम्ही थोडावेळ थांबलो. मग आमची बोट फिरून Aux Cerfs Island येथील बंदरावर आली. हा एक समुद्र किनाऱ्यापासून दूर असलेलं बेट आहे. मस्त पोहता पण येत होते. वर एका मोठ्या झाडावर वरती रोप वे दिसले. तेथून काही प्रवासी रोप वे ने जात होते. बहुदा ते धबधब्याच्या वरच्या बाजूला जात असावे. तेथे आकाशी निळसर रंगाचे स्फटिकासारखे स्वच्छ पाणी आणि पांढऱ्या रंगाची वाळू आणि हिरव्या रंगाचे सुंदर असे पामचे झाडे होते. थोडावेळ थांबून आम्ही दुसऱ्या बोटीने Trou d`Eau Douce येथे परत आलो.

तिसऱ्या दिवशी १६ तारखेला आम्ही साऊथचा टूर केला. याच दिवशी भारतातील लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले. तेथील काही दुकानात टी.व्ही. होते. त्यात हे निकाल झळकत होते. भारतीय जनता पार्टी विजयाकडे कूच करीत असल्याचे चित्र त्यात दिसत होते. या टूरमध्ये सुरुवातीला डायमंड शॉप पाहिले. नंतर मॉडेल शिप फॅक्टरी पाहायला गेलो. जहाज कसे बनवितात, त्याचे लहान लहान आकारात निरनिराळ्या प्रकारचे नमुने व प्रतिकृती येथे ठेवलेले होते. त्याची विक्री पण करीत होते. आम्ही शिप फॅक्टरी म्हणजे जहाजे कसे बनवितात ते पाहिले. त्याच्या लहान आकाराच्या प्रतिकृती विकायला ठेवल्या होत्या.

नंतर आम्ही Trou aux Cerf ज्वालामुखी पाहायला गेलो. हे ठिकाण डोंगरावर असल्याने चढावाने जावे लागते. तेथेपर्यंत गाड्या जातात. हा परिसर अतिशय सुंदर आहे. फोटो काढण्यासाठी खूप चांगला स्पॉट आहे. हा ज्वालामुखी ६०० वर्षापूर्वी जिवंत होता असे म्हणतात. आता तो निद्रिस्त अवस्थेत आहे. कधीही तो पुन्हा जिवंत होऊ शकते. ह्या ज्वालाग्राहीचे मुख अगदी मॉरिशियस देशाच्या Curepipe या शहराच्या मधोमध आहे. वरून वाकून पाहिले तर त्या विवरात खोल खड्डा दिसतो. त्यात माती-चिखल व पाणी असल्याचे सांगतात. आजूबाजूला झाडाझुडपांनी झाकलेलं दिसते. लोणारचा नैसर्गिक सरोवर वरून पाहिल्यावर जसा गोलगोल दिसतो तसाच हा दिसत होता. हा ज्वालामुखी ३०० मीटर रुंद व ६५० मीटर खोल आहे असल्याचे सांगत होते.

नंतर आम्ही Grand Bassin पहायला गेलो. हे पण एक ज्वालामुखीपासून तयार झालेलं सरोवर आहे. अतिशय सुंदर असा परिसर आहे. याला आता हिंदूलोकांचे एक पवित्र ठिकाण मानल्या जात आहे. म्हणूनच या सरोवराला ‘गंगा तलाव’ असेही म्हणतात. या सरोवरात भरपूर आणि खोल पाणी आहे. या पाण्यात लहान-मोठ्या खूप प्रमाणात मासोळ्या दिसल्या. त्या अगदी काठावर येत होत्या. लोक त्यांना काही खायला टाकत होते. म्हणून ते काठापर्यंत जमा होत होत्या. येथे भगवान शिवाचं मंदिर असून त्यात हनुमान, लक्ष्मी यांच्या मुर्त्या आहेत. शिवरात्रीला हिंदू लोक घरून अनवाणी पायाने या ठिकाणी येत असल्याचे सांगण्यात आले. येथे या सरोवराच्या सुरुवातीला मंगल महादेव या देवाचा ३३ मीटर उंचीचा पुतळा आहे.

नंतर आम्ही Black River National Park पाहायला गेलो. हे ठिकाण मॉरिशियसच्या पर्वतीय दक्षिण-पश्चिम भागात आहे. हा पार्क ६७.५४ किलोमीटर क्षेत्रफळ इतका पसरलेला असून घनदाट जंगल आहे. येथे एक सुंदर असा अलेक्झांडर नावाचा धबधबा आहे. ह्या धबधब्याचं पाणी १२७ मीटर उंचीवरून पडते. मॉरिशियस मध्ये हा सर्वात उंचीचा धबधबा आहे.

नंतर Camarel येथे गेलो. हे एक खेडे गावाचे नाव आहे. येथे सात रंगाची माती आहे. हे वेगवेगळे सात रंगाचे होते. ते १५ मीटर जाडीचे एका जवळ एक असे वाळूचे थर नैसर्गिकरित्या पसरलेले होते. यात लाल, तपकिरी, निळसर जांभळा, हिरवा, निळा, पर्पल असे रंग दिसत होते. हे आणि धबधबा ज्वालामुखीच्या हजारो वर्षाच्या प्रक्रियेमुळे नैसर्गिकरीत्या तयार झाले होते असे तेथे लिहिले होते.

येथे आणखी एक नवलाईची गोष्ट पाहायला मिळाली. ती म्हणजे महाकाय आकाराचे कासव ! हे कासव एक मीटर लांबीचे, १५० वर्षे वय असलेले होते. हे कासव २५० वर्षेपर्यंत जगू शकतात व ते ९ ते २५ अंडे देतात असे तेथे माहिती लिहिली होती.

रोडने जातांना बाजूला उसाची शेती, अननस व कॉफीचे मळे दिसत होते. प्रामुख्याने शेतात उतार-चढावावर पामचे झाडे मोठ्या प्रमाणात लावलेले दिसत होते. हे झाडे नारळाच्या झाडासारखे पण कमी उंचीचे दिसत होते. सात वर्षानंतर या झाडाची कापणी करतात. त्याचा गाभा खाण्यामध्ये सलाद व लोणच्यासाठी वापरतात. याचा उपयोग फ्रांस या देशात होत असतो. त्याला किंमत पण चांगली येत असते. म्हणून या शेतीला ‘मिलेनियर गार्डन’ असे म्हणत असल्याचे गाईड सांगत होती.

येतांना रोडला लागून असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही लंचला थांबलो. आश्चर्य असे की त्याच्या बाजूला एका मोठ्या उंच झाडावर लटकलेल्या अवस्थेत चिमण्या पक्षांचे खूप खोपे पाहायला मिळाले. हवेच्या झोताने ते मस्त झोके घेत होते. असं हेही सुंदर दृश्य आम्हाला त्यावेळी पाहायला मिळाले.

चौथ्या दिवशी १७ तारखेला आम्ही बोटॅनिकल गार्डन पाहायला गेलो. आम्ही याआधी उटी येथील बोटॅनिकल गार्डन पाहिले. तेथील फुले आणि झाडे खरोखरच सुंदर होते. तसेच याही गार्डन मधील झाडे व फुले पाहून देहभान विसरल्यासारखे होते. इतके ते सुंदर दिसले. या गार्डन चे मूळ नाव ‘Pamplemousses Botanical Garden’ असे असून त्याला सरकारने ‘Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden.’ असे नाव दिले. हे पोर्ट लुईस जवळ आहे. हे जगपसिद्ध उद्यान ३०० वर्षापूर्वीचं खूप जुने असल्याचं कळलं. ते ३७ हेक्टरवर पसरलेले आहे. पर्यटकांचे खासच आकर्षण आहे. तेथे सुंदर सुंदर झाडे, फुले, वनस्पती जे कधीही न पाहिलेले असे पाहण्यात आले. मोठ्या आकाराचे जवळपास अर्ध्या मीटर व्यासाचे चहाच्या ट्रे सारखे व हुबेहूब हृदयाच्या आकाराचे दिसणारे कमळाच्या पानाने आमचे लक्ष वेधून घेतले. याचं पान इतके मोठे की त्यात छोटासा बाळ सहज झोपू शकतो. ही एक कमळाची वेगळी जात आहे. ती फक्त मॉरिशियसलाच आहे असे म्हणतात. पहिल्या दिवशी पांढऱ्या व दुसऱ्या दिवशी लाल रंगाचे असे रोज सरड्यासारखे रंग बदलणारे फुले आहेत. या फुलांशिवाय, मसाल्याचे व औषधीगुण असलेले वेली, झाडे, व ८५ प्रकारचे निरनिराळे पाम झाडं जे बाहेरच्या देशातून आणलेले आहेत; ते सुध्दा आपले लक्ष वेधून घेतात. मोठ्या बुंध्याचे झाडं येथे पण दिसतात. आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापली जवळील जंगलात (नक्षलवादी भागात) असेच मोठ्या सागाचे झाड पाहिलेत. कुंकवाचे झाड ( बिक्सा अनोटा) या बियांपासून खाद्यरंग तयार करतात असे सांगण्यात आले. प्रत्येक झाडाचे नाव व माहिती झाडासमोरच्या चौथऱ्यावर लिहिण्यात आले होते. एका झाडाला इतके मोठे फळ होते की त्या फळाचे म्युझिकल इन्स्ट्रुमेन्ट्स बनवितात असे गाईड सांगत होती. एका काळ्या रंगाच्या खोडातून रक्तासारखा चिक निघत होता. तेथे असं एक पामचं झाड होतं की ज्याला ८० वर्षानंतर फुल लागते. काही पामच्या झाडाच्या भोवती दुसऱ्या जातीच्या बांडगुळ वनस्पतीने अक्षरशः वेढून घेतले होते. येथे रबराचे, बदामाचे झाडं होते. एका लोटस पॉंडमध्ये चीलापोया नावाचे मासे होते. ज्या रम पितांना खात असल्याची माहिती गाईड देत होती. एका झाडाच्या ज्याला ब्राऊनिया ग्रँडीसेप्स नाव होते त्याला सुंदर शेंग आली होती. या देशाचे राष्ट्रपिता मानल्या गेलेले सर शिवसागर रामगुलाम यांची तेथे समाधी आहे. या उद्यानातील प्रसिध्द असे देशोदेशाचे नेत्यांनी वृक्षारोपण केले आहे. त्यात नेल्सन मंडेला व इंदिरा गांधी यांचा समावेश आहे.

नंतर आम्ही Citadel Fort (सिटाडेल किल्ला) पाहायला गेलो. या किल्ल्यावरून पोर्ट लुईस या शहराचा व समुद्राचा संपूर्ण नजारा पाहायला मिळते. तेथे दूरवरचे पाहण्यासाठी दुर्बीण ठेवले आहेत. हा किल्ला ब्रिटीशांनी एकोणीसाव्या शतकात बांधले असून १०० मीटर उंचीवर आहे. त्यानंतर रोडने जातांना बसमधूनच आम्हाला कॅथालीक चर्च, मस्जिद, हायकोर्ट इमारत, पोर्ट लुईस थियटर, फ्रेंच वसाहती इमारती इत्यादी दाखविण्यात आले. त्यानंतर आम्ही काउदान वाटर फ्रंट (Caudan Water Front) येथे गेलो. हे एक मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल आहे. येथे प्रवेश केल्या केल्या येथे वरती एका जवळ एक असे अनेक रंगीबेरंगी छत्र्या लटकवून त्याचे छत उभारल्याचे पाहून आम्ही थक्क झालो. छान कल्पना वाटली ! एकतर उन्हापासून संरक्षण व दुसरे सजावट. आहे कि नाही गंमत…!

येथेच एका हॉटेलमध्ये जेवण घेतल्यानंतर आम्ही खरेदीचा आनंद लुटण्यासाठी लागून असलेल्या मॉलमध्ये घुसलो. त्याखाली खाण्याचे पदार्थ असणारे दुकाने होते. त्यात हातभर लांबीचे, मोठ्या आकाराचे ब्रेड विकायला ठेवले होते. त्याचा अगडबंब आकार पाहून आम्ही चकित झालो. तो बहुदा फॅमिली पॅक असावा. कसे बनवितात त्याचे प्रात्यक्षिक दाखवता दाखवता त्याचा नमुना पण खायला देत होते. हे ठिकाण बंदर असल्याने बाजूला अनेक जहाजे उभे होते, त्यामुळे फोटो काढण्यासाठी हा स्पॉट खूप चांगला होता. मग आम्ही सायंकाळी हॉटेलवर पोहचलो

पाचव्या आणि शेवटच्या दिवशी १८ तारखेला सकाळी आम्ही सबमरीन डाईव्हसाठी गेलो. हा आमचा शेवटचा दिवस होता. तेथूनच आम्ही परस्पर रात्री ९.२० वाजताची फ्लाईट पकडण्यासाठी जाणार असल्याने सोबतच बॅगा घेतल्या. समुद्राच्या काठावरील ब्लू सफारीच्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांनी आमची माहिती लिहून घेतली. नंतर त्यांनी बोटीने आम्हाला सबमरीन जेथून सुटतात, त्या जहाजापर्यंत घेऊन गेले. हे जहाज समुद्र किनाऱ्यापासून दूर आतमध्ये होतं. आम्ही ज्या बोटीने जात होतो, त्या बोटीत बसलेल्या जागेवरून समुद्राची खोली पाहता येत होती. कारण आमच्या पायाजवळ त्यांनी तसा पारदर्शक काच लावला होता. त्यामुळे समुद्रात पोहणारे मासे व समुद्र तळातील शेवाळ, दगडं, वाळू इत्यादी दिसत होते. तेथे पोहचल्यावर सबमरीन आलं. त्यात आम्ही छिद्रातून आतमध्ये शिरून काचेच्या खिडकीजवळ जाऊन बसलो. हे पूर्णपणे झाकलेलं, बंद व एअरकंडीशन असलेली बस होती. यात पाच किवा दहा लोक बसू शकतील इतकी त्याची क्षमता असते. काचेतून आम्हाला समुद्रातील आतील दृश्य दिसत होतं. त्यातून व्हिडीओ आणि फोटो काढता येत होतं. हे सबमरीन ३५ मीटर खोल समुद्रात जात असल्याचे सांगण्यात आले. सबमरीनचा ड्रायव्हर आम्हाला माहिती देत होता. रंगीबेरंगी मासे व बुडलेल्या जहाजाचे अवशेष पाहायला मिळाले. अगदी समुद्राच्या तळाला जावून थोडावेळ हे सबमरीन थांबविण्यात आले. मग आम्ही पोहणारे लहान-मोठे रंगीबेरंगी मासे, रेती, खडक, वनस्पती व जपान व मॉरिशियसचे बुडालेल्या जहाजाचे अवशेष अगदी जवळून पाहिले. सबमरीन ४५ मिनिटे आतमध्ये होतं. येथे सबस्कूटर डाईव्हची पण व्यवस्था होती. यात दोघेजण बसतात. समुद्राच्या आतमध्ये स्वतःच चालवायची असते. तरुण जोडप्यांनी ही सबस्कूटर डाईव्हची मजा घ्यायला काही हरकत नाही. परत जहाजावर आल्यावर आम्हाला ‘डाईव्हिंग सर्टिफिकेट’ देण्यात आले. मॉरिशियसच्या प्रवासातला हा सबमरीन डाईव्हचा मस्त, रोमांचकारी आणि अदभूत असा आगळावेगळा अनुभव होता.

पाच वाजताच्या दरम्यान एका हॉटेलमध्ये आम्हाला पिझ्झा खायला दिला. डिनर आम्हाला फ्लाईट मध्ये मिळणार होते; त्यामुळे पिझ्झा…! परंतु फ्लाईट अचानक रद्द होवून त्याऐवजी ती दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०० वाजता असल्याचे आमच्या टीम लीडरने सांगितले. त्यामुळे आमचा रात्रीचा का होईना एक दिवस आणखी मुक्काम वाढला. काही लोकांची मुंबईहून त्या फ्लाईटला लागून दुसरीकडे जाणारी फ्लाईट असल्याने त्यांची मात्र पंचाईत झाली. असेही काही प्रसंग फ्लाईट अचानक रद्द झाल्याने उद्भवत असतील, नाही का? आम्ही मग परत त्याच हॉटेलमध्ये आलो. येतांना एका भारतीय वंशाच्या हॉटेलमधून गार्गी मॅडमने आम्हाला सकाळी खाण्यासाठी पुरी-भाजीचे पुडे दिले. ते रुमच्या फ्रीज मध्ये ठेवायला सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी ३.०० वाजता उठून तयारी करायची होती.

१९ तारखेला आमचा सकाळी ४.०० वाजता परतीचा प्रवास सुरु झाला. त्यावेळी रोडवर काहीच रहदारी नव्हती. तरीही चौकावरील लाल-हिरवे सिग्नल मात्र लागत होते. लाल सिग्नल पाहून आमचा बस ड्रायव्हर थांबत होता. आमच्या देशातील ड्रायव्हरने असे कधीही केले नसते. रहदारी नाही ना… मग काढ गाडी… लाल सिग्नल असला तरीही…? शेवटी विमानतळावर आलो. सकाळी आठ वाजता विमान सुटलं अन आम्ही मॉरिशियसचा निरोप घेऊन थेट मुंबईला आलो.

खरंच मॉरिशियसची सुदरता, नैसर्गिक सौंदर्याचा खजिना पाहून आम्ही खूप प्रसन्न झालो.

आतातरी शहाणपण शिकले पाहिजे

24 Oct

दिनांक १९.१०.२०१४ रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला. त्यात आंबेडकरी पक्षाची दाणादाण उडाली. बहुजन समाज पक्षाने नेहमीसारखेच याही वेळेस खाते उघडले नाही. रिपब्लिकन पार्टी-आठवले गटाने भाजपशी युती केल्याने त्यांना फार मोठी आशा वाटत होती. पण लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुध्दा पडेल जागा मिळाल्याने त्यांची यावेळीही फसगत झाली. युतीत एक सत्य मात्र उमगलं की भलेही आंबेडकरी जनता कॉंग्रेस-भाजपला मतदान करीत असतील; पण कॉंग्रेस-भाजपचे लोक मात्र आंबेडकरी पक्षाला मतदान करीत नाहीत. याचा अनुभव आठवले यांनी चांगलाच घेतलेला दिसतो.

पूर्वी आठवले गटाने राष्ट्रवादी-कॉंग्रेस सोबत सोयरिक केली होती. पण शिर्डीच्या लोकसभा मतदारसंघात आपटी खाल्ल्याने राष्ट्रवादी-कॉंग्रेसला सोडून शिवसेनेचा पदर धरला. आठवलेने शिवसेनेकडे राज्यसभेची खासदारकी मागितली; पण त्यांनी ती दिली नाही. मग भाजपला दया येऊन आठवलेला खासदार बनविले. आता ते केंद्रात मंत्री बनण्यासाठी आतुर झाले आहे. यावेळेस नाही; पण पुढील विस्तारात पाहू असे नरेंद्र मोदीने सांगितल्याने मंत्रीपदाचं गाजर आठवलेंना सतत खुणवीत आहे. जेव्हा भाजप व शिवसेनेचा काडीमोड झाला; तेव्हा शिवसेनेला जोडलेली भीमसेना तोडून भाजपला जोडली.

जोगेंद्र कवाडे यांनी कॉंग्रेसशी युती केली पण स्वतःचे उमेदवार उभे न करता विधान परिषदेच्या आमदारकीच्या बदल्यात संपूर्ण पक्ष कॉंग्रेसला बांधून टाकला. रिपब्लिकन पार्टी गवई गटाचीही तीच गत झाली. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाचे बळीराम शिरस्कार  बाळापुर मतदार संघातून निवडून आल्याने प्रकाश आंबेडकरांची थोडीफार लाज राखली.

एकंदरीत कोणत्याही आंबेडकरी पक्षांचा राजकीय रथ पुढे गेला नाही. उलट प्रत्येक निवडणुकीत जसा मागे जातो तसाच याहीवेळेस मागेच गेला. भाजप-शिवसेना यांची युती व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी तुटली तरी या सुवर्णसंधीचा फायदा आंबेडकरी नेते व जनतेला घेता आला नाही. अशी दुरावस्था आंबेडकरी पक्षांची का होते? याचा विचार कधीतरी आंबेडकरी जनतेने करायला नको का? हटवादी नेते जर एकत्र येत नसतील तर जनतेने एकत्र का येऊ नये?

भाजप आणि शिवसेना अलग अलग निवडणुकीत उतरून सुध्दा त्यांचे आमदार मागच्या पेक्षा जास्त निवडून आणलेत. त्यामागील कारणे काहीही असोत; पण ते जागृत आहेत ऐवढे मात्र खरे! हिंदुत्ववादी चळवळ पुढे पुढे जात आहे आणि आंबेडकरी चळवळ मात्र मागे मागे पडत आहेत, असं हे चित्र आता निर्माण झालं आहे. प्रत्येक  विचारधारेचे मोजमाप हे त्यांच्या राजकीय शक्तीवरून होत असते. त्यामुळे हिंदुत्ववादी चळवळ वाढत आहे व त्यामानाने आंबेडकरवादी चळवळ मागे पडत आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

त्यांची राजकीय शक्ती निश्चितच उतरोत्तर वाढत आहे. म्हणून त्यांचा दुस्वास वाटणे, हेवा वाटणे किंवा मत्सर वाटणे साहजिक जरी असले; तरी त्यांच्या परिश्रमाचे त्यांना मिळालेले ते फळ आहे. कारण त्यांचा nनरेंद्र मोदी देशाचा प्रधानमंत्री असूनही वेळ काढून महाराष्ट्रात २७ पेक्षा जास्त सभा घेतात आणि दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांचे तर अगणित सभा होतात…! आमची बहिण मायावती सद्याच्या स्थितीत मुख्यमंत्री नसतांना सुध्दा त्यांना महाराष्ट्रात केवळ पाच-सहा सभा घेता येऊ शकल्या! भाजपची पितृ संघटना असलेली आर.एस.एसचे कार्यकर्ते समाजाच्या प्रत्येक स्तरात रात्रंदिवस प्रचार करीत असतात. ते सारे माध्यमे, साधने कामाला लावतात. म्हणून त्यांना यश मिळणे साहजिकच आहे. म्हणून त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. कारण प्रत्येकजण आपापल्या चळवळीचे काम करीत असतो. ते त्यांच्या चळवळीचे काम करतात. आपण मात्र आपली चळवळ वाढविण्यासाठी काय करतो; हाच खरा प्रश्न आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनांक २० जुलै १९४२च्या नागपूर येथील अखिल भारतीय दलित परिषदेत इशारा देतांना म्हणाले होते की, ‘हिंदू समाज व्यवस्थेने ज्या मानवीय अधिकारांची गळचेपी आणि लांडगेतोड केली, त्यांच्या पुनर्स्थापनेसाठी हा संघर्ष आहे. जर ही राजकीय लढाई हिंदू जिंकले आणि आम्ही हरलो तर ही दडपशाही आणि लांडगेतोड तशीच सुरु राहील.’ वर्णवर्चस्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आर.एस.एस.) ही संघटना संपूर्ण भारतावर विळखा घालायला निघाली आहे. त्यांनी नरेंद्र मोदीचा ओ.बी.सी. मोहरा पुढे करून देश ताब्यात घेतला व आता एकेक राज्य पादाक्रांत करीत आहे. २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र आणि हरियानाला ताब्यात घेतले. आतापर्यंत २९ राज्यांपैकी ९ राज्यावर त्यांनी आपली हुकुमत प्रस्थापित केली  आहे.  

ब्राम्हणवाद्यांचे खरे शत्रू आंबेडकरवादी व गैर हिंदू म्हणजे मुस्लीम व ख्रिचन आहेत. त्यांना काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष अगदी जवळचे आहेत. काँग्रेसला पर्याय म्हणून त्यांनीच जनसंघाचे नाव बदलवून भाजप ठेवले. बाटली बदलविली; पण लोकांना धार्मिक व आध्यात्मिक नशेत झिंगत ठेवणारी दारू तीच आहे. त्यामुळेच हिंदुत्वाचा आर.एस.एसचा अजेंडा राजकीय सत्तेच्या माध्यमातून राबविण्यासाठी त्यांनी भाजपला वाढविणे सुरु केले आहे.

ब्राम्हणांनी सत्तेत वाटा घेण्यासाठी बहिण मायावतीला २००७ साली उत्तरप्रदेशची सत्ता सोपविली होती. पण मुस्लीम वर्गांनी ब्राम्हणांच्या घुसखोरीमुळे बहिण मायावतीची साथ सोडून मुलायमसिंहच्या समाजवादी पक्षाकडे गेले. त्यामुळे २०१२ मध्ये बहिण मायावतीची राज्यातील  सत्ता गेली. नंतर २०१४च्या लोकसभेच्या निवडणूकीत नरेंद्र मोदीच्या रूपाने ब्राम्हणवाद्यांना मोहरा मिळाल्याने, त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे ८० पैकी ७१ खासदार निवडून आणण्याची किमया केली. मायावतीला मात्र एकही खासदार निवडून आणणे शक्य झाले नाही.

मागच्या काही निवडणुकांवरून एक बाब स्पष्ट होते की, या देशात मनुवाद्यांना द्विपक्षीय राज्यपद्धतीचा पायंडा पाडायचा आहे. कॉंग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष आलटून पालटून नेहमीसाठी सत्तेवर व विरोधीपक्ष राहतील, अशी व्यवस्था त्यांना करायची आहे. त्यामुळेच कॉंग्रेसने  मुद्दामच जनतेचा रोष ओढवून केंद्राची व आता महाराष्ट्राची सत्ता भाजपाला सहज हस्तांतरित केली आहे. या देशात द्विपक्षीय राज्यपद्धती निर्माण व्हायला पाहिजे; असे वक्तव्य लालकृष्ण अडवानी यांनी मागे एकदा केले होते. त्यानुसारच भाजप व कॉंग्रेसची वाटचाल सुरु आहे असे म्हणावे लागेल.

मनमाड येथील दिनांक १६.०१.१९४९च्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘खरी लोकशाही निर्माण करावयाची असल्यास आज हजारो वर्षे डोक्यावर नाचत असलेला वरचा वर्ग खाली व समाजातील खालचा वर्ग वर गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही. क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले. आसासह चाक पूर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांती होऊ शकत नाही, ते चक्र आम्हीच फिरवू.’ याचा अर्थ क्रांतीचे हे चक्र फिरविण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांवर सोपविली.

त्यासाठी त्यांनी सांगून ठेवले की, ‘आमच्यावर होणारा जुलूम दुसरा कोणी नाहीसा करणार नाही. तो आपला आपणच नाहीसा केला पाहिजे. यासाठी कायदेमंडळात आपले योग्य प्रतिनिधी पाठविले पाहिजे. ते तेथे जाऊन आपल्या हक्कांसाठी झगडतील.’ (अहमदाबाद येथील दिनांक २०.११.१९४५ चे भाषण )

मग ही जबाबदारी कोणी उचलली पाहिजे? याचे उत्तर बाबासाहेब मनमाड येथील दिनांक १६.०१.१९४९च्या भाषणात देतात. ते म्हणाले होते की, ‘एखाद्या समाजाची उन्नती त्या समाजातील बुद्धिमान, होतकरू व उत्साही तरुणांच्या हाती असते.’

म्हणजेच समाजातील बुद्धिजिवी, होतकरू व तरुण वर्गाने पुढाकार घेणे बाबासाहेबांना अभिप्रेत होते. बुद्धिजिवी वर्गाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर “जातिभेद का उच्छेद” (Annihilation of Caste) या पुस्तकात लिहितात की, “प्रत्येक देशामध्ये बुद्धिजिवी वर्ग प्रभावशाली असतो. जो सल्ला व नेतृत्व देऊ शकतो. देशातील अधिकांश जनता विचारशील व क्रियाशील नसतात. ते बुद्धीजीवी वर्गाचे अनुकरण करून त्या मार्गाने जात असतात. म्हणून त्या देशाचे समाजाचे भविष्य बुद्धिजिवी वर्गावर अवलंबून असते. बुद्धिजिवी वर्ग चांगला किंवा वाईट असू शकतात. बुद्धिजिवी वर्ग इमानदार, स्वतंत्र व निष्पक्ष असेल तर समाजाला संकटकाळी मार्ग काढून योग्य मार्गदर्शन करू शकेल. समाजाला सहाय्य करू शकेल. पथभ्रष्ट लोकांना ते चांगल्या मार्गावर आणू शकतात. समाजाला आणीबाणीच्या काळात दिशा देण्याचे काम करतो, तो बुध्दिजिवी” अशी व्याख्या बाबासाहेब करतात. सध्या आणीबाणीची वेळ निश्चित आली आहे. कारण ज्या राजकीय पक्षाचा प्रभाव असतो, त्या पक्षाच्या विचारधारेवर आधारित चळवळ वाढत असते. हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब राजकारणाचे महत्व आणि निकड समजावून सांगतांना म्हणतात, “आपल्या प्रगतीसाठी जिच्यावर आपण अवलंबून राहू शकू अशी एकच गोष्ट आहे व ती म्हणजे राजकीय शक्ती हस्तगत करणे. आपल्या मुक्तीचा तो एकच मार्ग आहे. याबद्दल तर मला मुळीच संदेह नाही व या शक्तीशिवाय आमचा सर्वनाश होईल.” (अ.भा.दलित वर्ग परिषद नागपूर १८,१९ जुलै १९४२)

      “अस्पृष्य समाजाला स्वातंत्र्य, इज्जत व माणुसकी पाहिजे असेल, तर तुम्हाला राजकारण काबीज करावयास पाहिजे. सध्या आपल्याकडे कोणतेच साधन नाही. म्हणूनच आपला नाश व अवनती झाली आहे. आपणास उठण्याचीही ताकद राहिलेली नाही. आपली समाज संख्याही पण अल्प आहे व तिही विस्कटलेली आहे. ही सर्व परिस्थिती सुधारुन घेण्यासाठीच आपल्या हाती राजकीय सत्ता पाहिजे.” (पुणे ०४.१०.१९४५चे भाषण, भाषण खंड १ संपादक- गांजरे पृष्ठ १३१)   “तुकड्यासाठी दुसर्‍याच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ समाजावर येऊ नये, पोटापाण्याचा प्रश्‍न सुटावा, सन्मानाने राहावयास मिळावे यासाठीच राजकीय सत्तेची जरुरी असते आणि ती मिळविण्यासाठीच आम्ही झगडत आहोत.” (भाषण खंड १ संपादक- गांजरे पृष्ठ १५३)

      हे खरं आहे की, शासनकर्ती जमातीवर अन्याय, अत्याचार होत नाहीत. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर गोळीबार हत्याकांड किंवा खैरलांजीसारखे प्रकरणे मराठा अथवा ब्राम्हणांच्या घरी होत नाहीत. कारण ते शासनकर्ती जमाती आहेत. म्हणूनच आतातरी आपले डोळे ऊघडणे क्रमप्राप्त  झाले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेप्रमाणे समाजामध्ये हजारो वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स निर्माण झाल्याने समाज आता निश्चितच प्रगल्भ झालेला आहे यात वाद नाही. हे सारे उच्चपदस्थ लोक आंबेडकरी चळवळीचे लाभार्थी आहेत, हे कुणीही नाकारू शकत नाहीत.

महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघांचे विश्लेषण केल्यास केवळ बौद्धांचे २५-३० टक्के मतदान असलेले ३१ मतदार संघ व १०-२०  टक्के मतदान असलेले १५८  मतदार संघ महाराष्ट्रात आहेत. म्हणून या मतदार संघात तरी आंबेडकरी मतदार निश्चितच प्रभाव पाडू शकतात एवढे मात्र नक्की! मुस्लीम मतदारांचे ध्रुवीकरण होवून एम.आय.एमचे दोन आमदार महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेत. मग बौध्द मतदारांचे ध्रुवीकरण होवून बौद्धांचे आमदार का निवडून येऊ शकत नाहीत?

बौध्द समाजाने खरेच एकजुटीने मतांची टक्केवारी वाढवून काही प्रतिनिधी निवडून आणणे सुरु केले तर परिवर्तनवादी व समविचारी पक्ष, मागासवर्गीय संघटना जे आरक्षणाच्या एका सूत्रात बांधले गेले आहेत व जे हजारो वर्षापासून ब्राम्हणवाद्यांचे बळी आहेत; असे नक्कीच या बौध्द समाजासोबत येतील यात वाद नाही. त्याशिवाय मुस्लीम, शीखांसारखे अल्पसंख्याक वर्ग सुध्दा जुळायला वेळ लागणार नाही. असे जर घडले तर या देशात एकतर द्विपक्षीय शासन पद्धतीत भाजप आणि आंबेडकरी असे दोनच पक्ष राहतील किंवा भाजप-कॉंग्रेस नंतर आंबेडकरी पक्षाचा तिसरा पर्याय उपलब्ध होईल, यात शंका नाही. बाबासाहेबांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन विसर्जित करून व्यापक असा रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याच्या मागे तोच उद्देश समोर ठेवला होता.

शेवटी बाबासाहेबांना कळकळीने नागपूर येथील दिनांक २०.०७.१९४२ भाषणात सांगावे लागले की, “तुम्हाला माझ्या संदेशाचे अंतिम शब्द हेच आहेत की “शिकवा, संघर्ष करा आणि संघटीत रहा. (Educate, Agitate and Organize) स्वत:च्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा (have a faith in yourselves) आणि कधीही निराश होऊ नका, (and never lose hope)” यातही बाबासाहेब या तीन सूत्रांमध्ये पहिल्या सूत्रात ‘शिकवा’ असे म्हणतात. म्हणजे स्वतः शिकल्याशिवाय इतरांना शिकविता येणार नाही. शिकल्यानंतर इतरांना शिकवा असा त्याचा अर्थ! दुसऱ्या सूत्रात संघर्ष करा. म्हणजे स्वत:ला व समाजाला संघर्षासाठी तयार करा. तिसऱ्या सूत्रात स्वत: संघटीत होवून समाजाला संघटीत करा.

बुद्धम शरणंम गच्छामी, धम्मम शरणंम गच्छामी व संघम शरणंम गच्छामी यातील मतितार्थ तोच आहे. बुध्द म्हणजे ज्ञान म्हणजेच शिकणे व शिकविणे आलेच! धम्म म्हणजे योग्य जीवन जगण्याचा मार्ग म्हणजेच संघर्ष आला! या मार्गावर चालणारा संघ म्हणजे भिक्खू संघ म्हणजेच संघटना! असाच अर्थ बाबासाहेबांनी त्रिशरणाचा घेऊन ‘शिकवा, संघर्ष करा व संघटीत व्हा” असा मुलमंत्र दिला.  

याचाच उपयोग प्रत्येकांनी आपल्या जीवनात करून आपली जबाबदारी उचलली पाहिजे. वकिलांनी समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला कायदेशीररित्या अटकाव निर्माण केला पाहिजे. डॉक्टरांनी समाजाचे स्वास्थ सांभाळलं पाहिजे. इंजिनिअर्सने समाजाच्या विकासाचे प्रोजेक्ट तयार केले पाहिजे. समाजाची बांधणी केली पाहिजे. शिक्षक-प्राध्यापकांनी समाजाला शिकवलं पाहिजे. व्यावसायिक व उद्योगांनी संघटना चालविण्यासाठी निधी मजबूत केला पाहिजे. कारकून व कार्यालयीन नोकरदारांनी पारदर्शकरीत्या हिशोब ठेवला पाहिजे. पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी समाजाला सुरक्षा प्रदान केली पाहिजे. उच्च पदस्थ शासकीय अधिकारी यांनी सरकारच्या योजनेचा फायदा समाजापर्यंत पोहचविला पाहिजे. पटवारी, ग्रामसेवक यांनी खेड्यापाड्यात राहाणाऱ्या शेवटच्या माणसाला जागवलं पाहिजे. साहित्यिक, वृतपत्र (वृत्तरत्न सम्राट, विश्वरत्न सम्राट, जनतेचा महानायक, लोकनायक इत्यादी) व टी.व्ही.चॅनेल (लॉर्ड बुध्दा टी.व्ही व आवाज इंडिया) यांनी समाजाला जागवून, त्यांचे प्रबोधन करून सुसंस्कारित केले पाहिजे. ही यादी आणखी लांबू शकते. सांगायचे एवढेच की जर कामाची वाटणी करून प्रत्येक वर्गाने इमानेइतबारे आपापली जबाबदारी पार पाडली तर समाजाचा विकास होऊन राजकीय दृष्ट्या प्रगल्भ होण्यास वेळ लागणार नाही.

पुढील पाच वर्षे यापद्धतीने मशागत केली तर येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत चांगले पिक यायला काही हरकत राहणार नाही असे वाटते.

मग उठा मित्रांनो…! बाबासाहेबांना पुन्हा एकदा वचन द्या…! जसं बाबासाहेब हयात असतांना त्यावेळेसच्या लोकांनी दिलं होतं तसं…! त्यासाठी त्यांच्या नागपूर येथील दिनांक २०.०७.१९४२च्या भाषणाची आठवण करा. ज्यात बाबासाहेबांनी म्हटले होते की, ‘आपल्या अधिकारांसाठी शक्ती, ऐक्य आणि खंबीरपणे उभे राहण्याची हमी, आपल्या अधिकारांसाठी संघर्षाची आणि जेव्हापर्यंत आपण आपले हक्क मिळवीत नाही तोपर्यंत परत न फिरण्याची हमी, मला हवी आहे. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडाल असे मला वचन द्या!’

म्हणूनच प्रसिद्ध दलित साहित्यिक दया पवार मोठ्या कळकळीने म्हणतात की, “प्रखर तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला. ज्या काजव्यांचा आम्ही जयजयकार केला, ते केव्हाच निस्तेज झालेत. आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा आणि क्रांतीचा जयजयकार करा !”

दिनांक- २३.१०.२०१४

मोबाईल- ९३२६४५०५०६ 

पत्ता- रामी हेरीटेज, आर.टी.ओ. जवळ अकोला

 

 

 

 

%d bloggers like this: