Tag Archives: बुद्धविहार

बुध्दविहार आणि प्रबोधन

6 Mar

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रम्हदेशच्या बुध्दिस्ट शासन कौन्सिलसमोर १९५४ साली भाषण करतांना सांगितले की, विहारात दर रविवारी सामुदायिक बुध्द वंदना व त्यानंतर धर्मोपदेश देण्याची प्रथा पाडावी.

त्याचप्रमाणे २४ नोव्हेंबर १९५६ रोजी सारनाथच्या भाषणात सांगितले की, प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्दविहारात जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा. तसेच प्रत्येक गावामध्ये बुध्दविहार निर्माण करुन त्यात सभा घेण्यासाठी सभागृह बांधावे.

बाबासाहेबांच्या भाषणावरून जे मुद्दे लक्षात येतात ते असे- १. प्रत्येक गावामध्ये बुध्दविहार निर्माण करुन त्यात सभा घेण्यासाठी सभागृह बांधावे. २. प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्दविहारात जावे ३. सामुदायिक बुध्द वंदना घ्यावी. ४. धर्मोपदेश देण्याची प्रथा पाडावी.

या चारही मुद्यावर विचार करणे आवश्यक आहे.

पहिला मुद्दा- प्रत्येक गावामध्ये बुध्द विहार निर्माण करुन त्यात सभा घेण्यासाठी सभागृह बांधावे.

डॉ. बाबासाहेबांच्या या आदेशाप्रमाणे बौध्द समाजाने खेड्या-पाड्यात व शहराच्या मोहल्या-मोहल्यात लहानमोठे बुध्दविहार बांधण्याचा प्रयत्‍न केला. काही ठिकाणी विहार बांधून पूर्ण झाले तर काही ठिकाणी ते अपूर्णावस्थेत पडून आहेत. काही ठिकाणी सामाजिक सभागृहाचा वापर बुध्दविहार म्हणून केला जात आहे.

तथापी ज्याठिकाणी आर्थिक परिस्थितीअभावी तेथील लोक विहार बांधू शकले नसतील, किंवा अपूर्णावस्थेत पडून असतील त्या ठिकाणी बुध्द विवाहाराची निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण धर्माला ग्लानी येण्याचे तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले ते म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी मंदिर, विहार ऊपलब्ध नसणे. कारण असे ठिकाण सर्वसामान्य लोकांसाठी श्रध्देचे स्थान असते. याकरिता समाजाने एक केंद्रीय निधी स्थापन करावा. सरकारी योजनेत जसे स्थानीक लोकांनी अंदाजित खर्चाच्या १० प्रतिशत निधी जमा केल्यास ऊरलेली रक्क्म सरकार देते, त्याप्रमाणे केंद्रीय निधीने ऊरलेल्या रकमेची तरतूद करुन विहाराचे बांधकाम पूर्ण करावे. यासाठी समाजातील श्रीमंत व दानशूर लोकांनी योगदान करावे. समाजातील श्रद्धावान, प्रतिष्ठीत व प्रामाणिक लोकांकडे हे काम सुपूर्द करावे.

दुसरा मुद्दा- प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्दविहारात जावे.

ह्याबद्दल दैनिक वृत्तरत्न सम्राटमध्ये ‘दर रविवारी प्रत्येक बौध्दाने कुटुंबासह बुध्दविहारात गेलेच पाहिजे’ असे वारंवार छापण्यात येत आहे. त्यात लिहिलेले असते की, ‘बौध्द समाजातील प्रत्येकाने आपल्या कुटुंबियासह प्रत्येक रविवारी सकाळी १० ते ११ या दरम्यान शुभ्र वस्त्रे परिधान करून नजीकच्या बुध्दविहारात जावून बुध्द वंदना घ्यावी. जो समाज एकत्र येतो तो समाज विचार करतो. जो समाज विचार करतो तो समाज क्रांती करतो आणि जो समाज क्रांती करतो, तो समाज विजयी होतो.’

डॉ. बाबासाहेबांनी ‘प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्दविहारात जावे.’ असे जे सांगितले, त्या मागे समाजामध्ये सामाजिक व धार्मिक क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठरविले होते असे दिसते. सामाजिक आणि धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती घडून येण्यास मदत होते असे विचार ‘जातीचे निर्दालन’ (Annihilation of Cast) या पूस्तकात उदाहरणासह त्यांनी मांडले आहेत. असे राजकीय परिवर्तन टिकाऊ असते. म्हणून भारत बौध्दमय करणे व शासनकर्ती जमात बनणे हया दोन्हीही संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिने त्यांनी आखणी केलेली होती असे दिसते.

बुध्दविहार म्हणजे समाजाला जोडणारा एक महत्वाचा दूवा आहे. त्यामूळे समाजामध्ये एक मजबुत संघटन निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु होते. बंधुत्वाच्या, मैत्रिच्या नात्याने तो एकमेकांशी बांधल्या जातो. प्रत्येकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत होते. समाजामध्ये, कुटूंबामध्ये धम्ममय वातावरण निर्माण होते. प्रत्येकजण धम्माच्या मार्गाने वाटचाल करण्यास प्रवृत्त होतात. अन्याय, अत्याचाराच्या विरुध्द सामुहिकपणे उभे राहता येते. विहारातील प्रबोधनामूळे बौध्द धम्माचे ज्ञान मिळते. त्यामूळे बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारास चालना मिळते. लहान मुले-मूली, विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक-युवती यांचेवर धम्माचे संस्कार होतात. त्यामूळे धम्माच्या मार्गाने वाटचाल करणारा एक आदर्श आणि जागृत पिढी निर्माण होण्यास मदत होते.

परंतु आपण पाहतो की, ज्या ठिकाणी बुध्दविहार आहेत त्या गावाचे किंवा मोह्ल्ल्याचे सारेच लोक विहारात येतांना दिसत नाहीत. मी काही गावाच्या, मोहल्ल्याच्या बुध्दविहारात प्रबोधन करायला जात होतो; तेव्हा काही मोजकेच लोक येत असल्याचे मला आढळून आले होते.

लोक बुध्दविहारात का जात नाहीत? ह्याबाबतीत दैनिक वृत्तरत्न सम्राट मध्ये भन्ते अश्वजीत यांचा लेख वाचण्यात आला. त्यात त्यांनी दोन कारणे दिलीत. एक – लोकांना घमेंड असणे व दुसरे – अक्कल कमी असणे. घमेंडी लोकांना वाटते की, मी शिकलो, नोकरीला लागलो, माझ्याकडे पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे. मला काय कमी आहे? मला काय गरज आहे बुध्दविहारात जाण्याची? त्यांना वाटते की, मजुरांनी, गरिबांनी बुध्द विहारात जावेत. त्यांचेच काम आहे. आपला बुध्दविहाराशी काहीही संबंध नाही. दुसऱ्या वर्गात अक्कल कमी असल्याने त्यांना कितीही सांगितले तर त्यांच्या डोक्यात उतरत नाही. त्यांना वाटते की, विहारात जाणे, वंदन करणे, भिक्खूंचे प्रवचन ऐकणे हे रिकाम्या लोकांचे काम आहे. त्यांना असेही वाटते की जे बुध्दविहारात जात नाहीत त्यांचे काहीही बिधडत नाही. तो तर मस्त खातो, पितो आणि मजा करतो. मग आपले काय बिघडणार? असे लोक बुध्दविहारात जाणाऱ्यांकडे भामट्यासारखे पाहत त्यांची टिंगलटवाळी करतात. अशा प्रकारचे मार्मिक विवेचन आदरणीय भंतेजी यांनी केले. ऐवढेच नव्हे तर बुध्दविहारात जाण्यामुळे काय फायदे होतात, ते सुध्दा त्यांनी सविस्तरपणे त्या लेखात मांडले आहेत.

लोक बुध्दविहारात का जात नाहीत? त्याबाबतचे त्यांचे निरीक्षण बरोबर आहे. त्याबद्दल वाद नाही. परंतु माझ्या निरीक्षणानुसार मला आढळलेलं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे लोकांचे अज्ञान. खरं म्हणजे लोक धम्माबद्दल किंवा चळवळीबद्दल जागृत नाहीत. त्यांना विहाराचे महत्व कळत नाही. ज्यांना कळते त्यांच्यात इच्छाशक्ती नसते. किंवा ते कोणत्यातरी कामात गुंतलेले असतात. विहारात जाण्यापेक्षा ते आपल्या कामाला जास्त प्राधान्य देतात. ‘काय साहेब? हप्त्यातून एक दिवस तर मिळतो, घरचे काम करायला.’ असेही म्हणणारे काही महाभाग मला भेटले आहेत.

परंतु एक खरं की लोकांचं अज्ञान दूर केले तर सारेच लोक नाहीत पण काही लोक मात्र प्रतिसाद देऊ शकतात.

मी विद्युत मंडळात नोकरीला असतांना पॉवर स्टेशनच्या कॉलनीत सामाजिक कार्यक्रम आयोजित करीत होतो; तेव्हा क्लास एक व क्लास दोनचे अधिकारी (काही अपवाद सोडून) सहसा सामील होत नसल्याचे दिसत होते. मी लेखाविभागाच्या महत्वाच्या हुद्द्यावर असल्याने माझ्याशी त्यांचा संपर्क येत होता. मी त्यांना सांगायचो की, आपला समाज खेड्यापाड्यात राहतो. आपणही खेड्यातून आलेलो आहोत. तेव्हा आर्य अष्टांगिक मार्ग, चार आर्य सत्य, प्रतीत्य समुत्पाद, दहा पारमिता इत्यादी भगवान बुध्दाची शिकवण म्हणजे काय? आम्हाला जरा समजावून सांगाल काय? असे जर कोणी विचारले तर तेव्हा आपल्याला माहिती नसल्याने मान खाली घालावी लागते. अशी नामुष्कीची पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून आपण हप्त्यातून एखाद्या दिवशी बसून त्यावर अभ्यास, चिंतन, मनन करून शिकून घेऊ. अशा तऱ्हेने त्यांचं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करीत होतो व त्याला प्रतिसाद पण मिळत होता.

तिसरा मुद्दा – सामुदायिक बौध्द वंदना घ्यावी.

बुध्दविहारात जमलेल्या साऱ्यांनी वंदना घेणे हे तर आलेच. त्याशिवाय तेथे डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा पण घ्यायला पाहिजे असे वाटते. त्यामुळे बौध्द असूनही हिंदू धर्माचे आचरण करण्याला आळा बसू शकतो.

चवथा मुद्दा- धर्मोपदेश देण्याची प्रथा पाडावी.

हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समाजामध्ये अपेक्षित असलेला बदल बुध्दविहारामध्ये जाऊन व तिथे प्रबोधन ऎकून हो‍ऊ शकतो हे निश्चित आहे. आपल्या उत्तम कृतीमूळे व आदर्शवत धम्म पालन केल्यामूळे इतरही समाजातील लोक आपला आदर्श घेऊन ते सुध्दा बौध्द धम्माकडे आकर्षित होतील. त्यामूळे डॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेनूसार ’भारत बौध्दमय’ होण्यास निश्चितच वाटचाल सूरु हो‍ईल.

यातूनच बुध्दीवादी, त्यागी, निष्ठावान, प्रामाणिक, समाजाभिमूख, समाजाप्रती दायित्व व सामाजिक बांधिलकीची भावना जोपासणारा नीतिमान असा आदर्श वर्ग निर्माण हो‍ऊन डॉ. बाबासाहेबांच्या ‘शासनकर्ती जमात बनण्याच्या’ दूसर्‍या संकल्पनेनूसार समाजाची वाटचाल सूरु हो‍ईल.

ज्याअर्थी डॉ. बाबासाहेब म्हणतात की, विहारात धम्मोपदेश देण्याची प्रथा पाडावी, त्याअर्थी धम्माचे ज्ञान देणारे प्रबोधनकार समाजात तयार झाले पाहिजेत. सर्वच विहारात भंतेजी उपलब्ध असतील असे नाही. विहारात लोक जमतात व फक्त वंदना घेऊन निघून जातात, असेही बऱ्याच ठिकाणी आढळले आहे. कारण त्याठीकाणी प्रबोधन करणारा कोणताही व्यक्ती किंवा तेथे भंतेजी हजर नसल्याने असे घडते. म्हणून ज्या विहारात भंतेजी नसतील, त्या ठिकाणी प्रबोधन करण्याचं कार्य शिकलेल्या वर्गाने करायला काही हरकत नाही. समाजामध्ये आता मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीमूळे बूध्दिजिवी वर्ग तयार झालेला आहे. बुद्धीजीवी वर्ग समाजाला दिशा देऊ शकतात, असे विवेचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जातीचे निर्दालन’ (Annihilation of Caste) या पुस्तकात केले आहे.

डॉ. बाबासाहेबांनी नागपूर येथे धम्मदिक्षेनंतर सांगितले होते की, धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्माला ग्लानी येते. ज्ञानी माणसांनी धम्म ज्ञान सांगीतले पाहिजे. म्हणून प्रत्येक शिकलेल्या लोकांनी धम्म समजून घेऊन ते समाजाला सांगणे हे त्याचे कर्त्यव्य बनते. बाबासाहेबांनी हा धम्म १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दिला व ६ डिसेंबर १९५६ ला म्हणजे अवध्या दीड महिन्यात ते समाजाला सोडून गेलेत. बाळाला जन्म देवून आई निघून जावी. तसेच काहीसे घडले. म्हणून बाबासाहेबांचे कार्य पुढे घेऊन जाणे हे त्यांच्या लेकरांची जबाबदारी ठरते.

शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रबोधन करायला येऊ शकतं. फक्त त्यांच्यात इच्छाशक्ती असली पाहिजे. इच्छाशक्ती असली की मनाची तयारी होऊ शकते.

समाजाचे चित्र जर पाहिले तर आपणास आढळून येईल की, प्रत्येक व्यक्ती (काही अपवाद सोडून) एका वर्तुळात जगत असतो. आपण, आपले कुटुंब, नातेवाईक व मित्रमंडळी या पलीकडे आपले जगणे जात नाही. बस एवढेच लोक – आपल्या निधनानंतर हळहळ करतील, दुसरं काय…! नुकतेच कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांचा वारसा जपला. त्यांच्या जाण्यामुळे सारा महाराष्ट्र हळहळला. त्यांच्या कार्यामुळे ते लोकांच्या आठवणीत राहिले.

म्हणून या शिकलेल्या लोकांनी समाजात जाऊन समाजाला प्रबोधन करण्याचे कार्य हातात घ्यायला पाहिजे असे वाटते. म्हणजे त्यांची ओळख समाजाला होईल. त्यामुळे आपले जीवन तर सार्थकी लागेल लागेलच, त्याशिवाय समाजात परिवर्तनाची लहर निर्माण होईल.

त्यासाठी शिकलेल्या लोकांना एक उपक्रम हातात घ्यावा लागेल. तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी ‘बुध्दविहार प्रबोधन समिती’ स्थापन करावी. त्यांनी प्रबोधन करणाऱ्यांची यादी निश्चित करावी. प्रत्येकांनी धम्माच्या बाबतीत एकेक विषय घेऊन त्या त्या विषयाची तयारी करावी. डॉ, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म’ या पुस्तकात व इतरही अनेक पुस्तकात धम्माच्या बाबतीत बरेच विषय मिळू शकतात.

प्रबोधनकारांची फळी तयार झाल्यानंतर शहरात किंवा शहराच्या आजूबाजूला असलेल्या विहाराचे सर्वेक्षण करून त्याची यादी तयार करावी. त्या त्या विहारातील संचालकांशी संपर्क साधून त्यांच्याकडे विहारात प्रबोधन करण्यासाठी प्रबोधनकार पाठविण्याबाबत चर्चा करावी. मग पूर्ण महिन्याचा तसा कार्यक्रम आखून कार्यक्रम पत्रिका तयार करावी. त्यात दिवस, वेळ, प्रबोधनकाराचे नाव, त्यांचा विषय इत्यादी माहिती देऊन ती पत्रिका आधीच त्यांचेकडे व प्रबोधन करणाऱ्याकडे पाठवून द्यावी. त्यानुसार ठरलेल्या प्रबोधनकाराने ठरलेल्या दिवशी त्या विषयावर विचार मांडावेत. ह्या कामासाठी म्हणजे कार्यक्रम पत्रिका छापण्यासाठी व जाण्या-येण्याचा खर्च समितीने करावा. त्याचा भार बुध्दविहारावर टाकू नये. त्यामुळे ते तुटणार नाहीत. या पद्धतीने धम्मप्रचार व प्रसारासाठी एक सूत्रबद्धरित्या यंत्रणा तयार होऊ शकते असे मला वाटते.

अशी यंत्रणा अकोला येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मसभा समिती’ यांनी तयार करून काही दिवस राबविली होती. त्यांनी अकोला शहरातील व आजूबाजूचे ९ बुध्दविहारांना एकत्र करून त्याठिकाणी प्रबोधनकार पाठवित होते. त्यात माझाही समावेश होता. परंतु काही कारणास्तव त्यांनी हा उपक्रम बंद केला.

ही ‘बुध्दविहार प्रबोधन समिती’ फक्त प्रबोधनाच्या संदर्भात कार्य करेल. कारण समितीने एकच कार्य हातात घेतले तर कार्य करणे सहज आणि सोपे जाते. नाहीतर एक ना धड भाराभार चिंध्यासारखी गत होते. पुढे राज्यामध्ये ठिकठीकाणी अशा अनेक समित्या स्थापन होवून प्रत्यक्ष कार्य सुरु झाल्यानंतर राज्यस्तरावर किंवा जिल्ह्याच्या स्तरावर ‘बुध्दविहार प्रबोधन समन्वय समिती’ स्थापन करता येईल. त्यामुळे प्रबोधनाचे कार्य राबविताना येणाऱ्या अडचणी, एकमेकांचे अनुभव व त्यावरील सुधारणांबाबतच्या चर्चा करून पुढील वाटचाल ही समिती ठरवू शकते. त्याचप्रमाणे पुढे गरज भासल्यास एकसूत्रता राहण्यासाठी निश्चित असा अभ्यासक्रम आणि प्रबोधनकारांना प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून देता येईल.

हे खरे आहे की, बुध्दविहारात जमणाऱ्यांची संख्या फार कमी असते. त्यामुळे प्रबोधनकारांनी नाउमेद होऊ नये. तसेच हा उपक्रम कितीही अडचणी आल्यात तरी बंद न करता त्यावर मार्ग काढावा. ऐवढेच नव्हे तर आणखी जास्तीत जास्त विहारे जोडण्याचा व प्रबोधनकारांची मोठी फळी उभारण्याचा प्रयत्न करावा. विहारात जास्तीत जास्त लोकांनी यावेत म्हणून समाजातील कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणजे हा उपक्रम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलेले कार्य काहीना काहीतरी प्रमाणात आपल्या हातून निश्चितच घडेल असा मला विश्वास वाटतो.

आर.के.जुमळे, अकोला

%d bloggers like this: