थायलंडची सहल

16 Apr

मी आणि माझी पत्‍नी कुसुम, पहिल्यांदा जीवनात परदेश प्रवास केला  दिनांक २३.०३.२०१२ ते २७.०३.२०१२ असा ५ दिवसाचा थायलंडचा प्रवास केसरी टूरच्या माध्यमातून केला.

मार्च महिन्याच्या कालावधीत वातावरण दिवसा थोडं गरम तर रात्रीला आल्हाददायक असते. मध्येमध्ये पावसाचे तुषार येऊन जात असल्याने वातावरणातील गरमपणा काही प्रमाणात कमी होत असतो. त्यामुळे केसरीने आम्हाला रेनकोट पण दिले होते. आम्ही ट्रॅव्हल बसमध्ये असतांना एकदा पट्टायाला पाऊस पडला होता. परंतु  प्रत्यक्षात रेनकोटची तशी पूर्ण प्रवासात गरज पडली नाही.

येथील वेळ भारतीय वेळेपेक्षा दीड तासाने पुढे आहे. आम्ही तेथे गेल्यावर तेथील वेळेप्रमाणे घडाळ्याच्या वेळा लाऊन घेतल्या होत्या.

१९९९ च्या जनगनणे्नुसार या देशाची एकूण लोकसंख्या ६ कोटी १० लाख असून ६८ टक्के जनता खेड्यात व उरलेली शहरात राहते. हा देश मुळात बौध्द धर्मिय असून येथील राजा पण बौध्द आहे. ९५ टक्के लोक बौध्द, ३.९ टक्के मुस्लिम, ०.५ टक्के ख्रिचन व ०.६ इतर धर्मिय आहेत.(संदर्भ-केसरी टूर)

केसरीने आमचा व्हिसा काढून दिला. हा प्रवासाचा व्हिसा ९० दिवसासाठी लागू असतो. पासपोर्ट फार जपून ठेवायला पाहिजे असते., जर हरविला, चोरीला गेला तर भयानक त्रास होतो. पोलीस तक्रार करणे, तेथील राजदुताला भेटणे किंवा माहिती देणे इत्यादी कामासाठी जवळपास ५०,००० रुपये खर्च येतात. अशी माहिती केसरी टूर ने दिली होती. त्यासाठी त्यांचा टूर मॅनेजर न थांबता, आपल्यालाच पुढील सोपस्कार करावे लागतात. म्हणून पासपोर्टची खूप काळजी घ्यायला पाहिजे असे सांगितले होते.

हॉटेलमध्ये सेफ्टी लॉकर एकतर रुममध्ये किंवा रिसेप्शन कॉउंटरला असते. त्यात पासपोर्ट व इतर किंमती वस्तू ठेवता येतात. प्रवासात पासपोर्ट घेऊन फिरण्याची गरज नाही. सेफ्टी लॉकरला कोड नंबर असते. त्यामुळे काही धोका नसतो. फक्त कोड नंबर लक्षात ठेवणे आवश्यक असते, नाहीतर दंड पडते. रुमची चाबी रिसेप्शन कॉउंटरला द्यावी. जर जवळ ठेवली व हरवली तर दंड पडते,

शक्यतोवर विमा काढून घ्यावा. म्हणजे त्यात हरवलेले किंवा उशिरा मिळालेले सामान, पासपोर्ट व औषध-पाण्याच्या खर्चाच्या जोखमीचा अंतर्भाव होतो.

जातांना सोबत कॅमेरा, जास्तीची बॅटरी व मेमरी कार्ड घेऊन जावे. मोबाईलची बॅटरी रिचार्जसाठी युनिव्हर्सल चार्जर २२० व्होल्टचा सोबत घेऊन जावे.

या देशात प्रवास करतांना एका व्यक्तीसाठी दहा हजार बाथ किंवा कुटुंबासाठी विस हजार बाथ सोबत असणे आवश्यक असल्याचे केसरीने आम्हाला सुचित केले होते. त्यामुळे सहलीवर जाण्यापूर्वी त्यांच्या ठाणे येथील कार्यालयातून रुपये बदलवून थायलंडचे बाथ हे चलन विकत घेतले. त्यावेळी एका बाथला एक रुपया पंच्याहात्तर पैसे असा विनिमयाचा दर होता.

विमान सुटण्यापूर्वी ३ तास आधी जावे लागते. कारण टीम मॅनेजरला भेटणे, त्याच्याकडून केसरीच्या टोप्या, तिकीट, पासपोर्ट व खाण्याचे पदार्थ घेणे, कॉउंटरवर बोर्डींग पास घेणे, सामान व स्वताची तपासणी करुन घेणे, इमिग्रेशन फॉर्म भरुन प्रोसिजर पूर्ण करणे, डिपार्चर गेटवर जाणे, विमानात बसणे इत्यादी कामासाठी इतका वेळ लागतो. विमानात बसण्याची जागा आधिच तिकिटवर लिहिलेली असते. त्यानुसार आपापल्या जागेवर बसावे लागते. विमानात पाणी, नास्ता व जेवण दिल्या जाते. विमानात एसी मुळे थंडी लागते. तेव्हा ज्यांना थंडी सहन होत नाही, त्यांनी शाल किंवा स्वेटर घेऊन जावे लागते.

विमानात कॉर्गो बॅग २० किलो व कॅबिन बॅग ६ किलो वजनापर्यंत नेण्याची सवलत आहे. कॅबिन बॅगमध्ये टुथपेस्ट, केसाचे तेल, जेल, क्रीम, शांम्पू, हेअरड्रायर, शेव्हिंग कीट, द्रवपदार्थ, कॉस्मेटिक्स, परफ्युम्स, बॅटरीज, टिस्युज, बेबी मॅपकिंग ह्या वस्तू नेता येत नाहीत. तथापी ह्या वस्तू कॉर्गो बॅगमध्ये ठेवता येतात.

आम्ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्टीय विमानतळाहून कथाय पॅसिफीक (Kathay Pacific) या विमानाने दि. २३.०३.२०१२ ला सकाळी ५.१० वाजता निघून सकाळी ९.३० च्या दरम्यान बॅंकॉकला पोहचलो. आमच्या सोबत ८० प्रवासी असल्याने आम्हाला फिरण्यासाठी केसरीने दोन टॅव्हल बसची व्यवस्था केली होती.

आमच्या बसमध्ये टिफीन नावाची गुटगुटीत दिसणारी स्थानिक महिला गाईड होती. तिने आम्हाला नमस्कार करतांना थायी भाषेत एका वेगळ्याच ढबमध्ये ’सव्वादिखा’ असे म्हणून स्वागत केले. तेथे आदरातिथ्याला फार मान देतात. ती इंग्रजीमध्ये बोलायची. थायलंडमध्ये थायी व इंग्रजी भाषेचा वापर करतात. ती व टीम मॅनेजर बिपीन सावंत हे दोघेही स्थळाची व पुढिल प्रवासाची आवश्यक ती माहिती वेळोवेळी देत होते. केसरीचा झेंडा घेऊन ठिकठिकाणी ते थांबत. तसेच केसरीच्या टोप्या डोक्यावर घातल्याने हरवण्याची शक्यता जवळपास नसायची.

तिच्याकडूनच आम्ही तेथील मोबाईलसाठी स्थानिक सिमकार्ड १०० बाथमध्ये घेतले.     त्या दिवशी म्हणजे दि. २३.०३.२०१२ ला आम्ही पट्टायाला गेलो. रस्त्यात टायगर हॉटॆलमध्ये दुपारचं जेवण घेतलं. त्या हॉटॆलच्या तिन्ही बाजूला वाघाच्या गुहा कृतिमरित्या तयार केल्या होत्या. त्यात सात-आठ जीवंत वाघ मस्त इकडे-तिकडे फिरत असतांना आम्ही काचेतून पाहत होतो. आम्ही त्यांचे फोटोपण काढले.

पट्टायाला संध्याकाळी अल्काझार शो (Alcazar show) पाहिला. ही थायलंड देशाचा सांस्कृतीक शो पाहिला. यात गौरवर्णिय, कमणिय बांध्याच्या सुदर मुली व तसेच मुले सुध्दा रत्‍नजडीत मुकूटे घालून सामुहिकरित्या विविध नृत्याचे प्रकार सादर करुन तेथील संस्कृतीचं प्रदर्शन करीत होते. त्यांचा विविध रंगातील आकर्षक पेहराव, लयबध्द संगितावर नृत्य, भव्य स्टेज, आकर्षक सजावट, रोषनाई पाहून वेगळाच आनंद होत होता. शो संपल्यावर ह्या नृत्यांगना प्रेक्षकांसोबत पैसे घेऊन फोटो काढून देत होत्या.

रात्रीला समुद्राच्या किनार्‍याजवळ ( Pattaya Beach) २०० मिटर दूर असलेल्या सनशाईन हॉटेलमध्ये आम्ही मुक्काम केला होता.

दि. २४.०३.२०१२ ला सकाळी आम्ही चालतच जवळच्या बिच वर समुद्रात पॅरा सेलींग (Parasailing करण्यासाठी एका जहाजावर गेलो. तेथे मी व कुसुम असे दोघांनी इतर सहकार्‍यांसोबर स्पीडबोटने हवेत उंचावर उडणार्‍या पॅराशुटने फिरुन आलो.. पाण्यात बुडवायचे की नाही ते आधी विचारत होते. आपण जर ’हो’ म्हटले तरच ते पाण्यात बुडवित. मी तसे म्हटल्यामुळे मला एकदा पाण्यात बुडविले होते. वर आकाश, खाली समुद्र व त्याचे अथांग पाणी असा हा एक चित्तथरारक अनुभव होता. तेथे आम्ही फोटो काढले. तेथील फोटोग्राफरने फोटो काढून आम्हाला १०० बाथला एक फोटो असे दोघांचेही फोटो जेवणाच्या वेळी आणून दिले.

तेथून आम्ही बोटीने समुद्राच्या आत जाऊन फिरतात अशा ठिकाणी गेलो. आमच्या सोबतचे काही लोक खाली समुद्राच्या तळाशी फिरुन आले. तेथून  कोरल इजलॅंड (Coral Island) नावाच्या दुसर्‍या बिचवर गेलो. या बोटीवर दुर्बिनसारख्या काचेतून समुद्र तळाचा भाग अगदी जवळ असल्यासारखा दिसत होता. हा बीच पट्टाया किनार्‍यापासून १६ किलोमीटर दूर आहे. तेथे आराम खुर्च्या व वर उन्ह लागू नये म्हणून छत्र्या ठेवल्या होत्या. येथे समुद्रात पोहणे, स्पिडबोट व बणाना बोटने फिरणे अशी व्यवस्था आहे. या समुद्राच्या पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते पाणी अगदी नितळ  स्वच्छ व निळेशार असल्याचे दिसले.

दुपारी आम्ही नॉंग नुक विल्हेज ( Nong Nooch Village ) येथे गेलो. येथे निरनिराळ्या आकाराचे, रंगाचे फुलांचे खूप सूदर वनस्पती व झाडं आहेत. देखणे (Decorative) वनस्पती आहेत. आमच्या गाईडने या बगिच्याचा  जवळपास ६०० एकराचा परिसर असल्याचा सांगितला. तेथे, ऑर्चिडगार्डन, ट्रोपिकलगार्डन व पॉटरी गार्डन (पामगार्डन, बेडगार्डन इत्यादी) मध्ये निरनिराळ्या बाया-माणसाच्या, प्राण्यांच्या, वाहनाच्या मुर्त्या-खेळणे आहेत. लहानमुलासाठी खेळायच मैदान, लहानसा झू, वाटरफॉल, इत्यादी अनेक रमणिय स्थळं आहेत.

येथे सुध्दा थायी नृत्याचा सांस्कृतीक शो दाखविला. त्यानंतर हतीचा शो दाखविला. हत्ती हा या देशाचा राष्टीय प्राणी आहे. येथेच आम्ही दुपारचं जेवण घेतले.

संध्याकाळी परत येतांना आम्ही एका मसाज केंद्रात गेलो. एकाला ३०० बाथ म्हणजे आपल्याकडे जवळपास ५४० रुपये होतात. आपल्याकडे जर कोणी मसाजचे ऎवढे पैसे मागितले असते तर कदाचित कोणी तयार झाले नसते. पण तेथे ऎवढे पैसे खर्चाला काही वाटले नाही. मी शाळेत असतांना आमच्या शाळेच्या समोरील मैदानात विदेशी लोक असलेली एक बस थांबलेली होती. त्यावेळी ज्या केळी एक रुपया डझनाने मिळत होत्या, त्या केळेवाल्यांनी दहा रुपये डझानांनी विकल्याचे मी पाहिले होते. जसे त्या विदेशी लोकांना महागाईबद्द्ल त्यावेळी काही वाटले नाही, तशीच मानसिकता आमची सुध्दा परदेशात गेल्यावर झाली होती.

थायलंड जसे निसर्गसौंदर्यासाठी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. तसेच पारंपारिक पध्द्तीच्या थाई मसाजसाठी सुध्दा प्रसिध्द आहे. मन आणि शरिराचा समतोल साधून सुमारे २५०० वर्षापासूनची येथील मसाज शास्त्रशुध्द व कलात्मक पध्दतीने केल्या जात असते. ऍक्युप्रेशर पॉईंटचा वापर करुन मसाज केल्या जातो त्यामुळे हा मसाज सुखावह वाटतो. मसाज करतांना ’बाऊ बाऊ’ म्हणजे हळूवार करा व ’नाक नाक म्हणजे जोर देऊन करा, अशा दोन शब्दाचा वापर करतात. असाही एक अनोखा मसाजचा अनुभव आम्ही येथे घेतला.

साधारण पाऊन तासापर्यंत हा मसाज केल्या गेला. सर्वठिकाणी स्त्रियाच मसाज करतात असे समजले. आमचा मसाज पण स्त्रियांनीच केला. त्यासाठी येथे पर्यटकाची खूप गर्दी होत असते, असे आमचे गाईड सांगत होत्या.

रात्री आम्ही सनशाईन हॉटेलमध्येच मुक्काम केला. रात्रभर येथील रस्ते गजबजलेले होते. असे म्हणतात की, येथील रस्ते रात्रीला जागेच असतात.

दि. २५.०३.२०१२ ला सकाळी नास्ता करुन आम्ही बॅंकॉकला जाण्यासाठी निघालो. बॅंकॉक थायलंड देशाची राजधानी आहे.

रस्त्यात हिर्‍यांचं दुकान असलेलं ज्याला जेम्स गॅलरी म्हणतात, ते पाहिलं. येथे हिर्‍याची खाण कशी असते. तेथे कामगार कसे काम करतात, हिर्‍यांना कसे पैलू पाडतात इत्यादी प्रात्यक्षीक  दाखविलं. नंतर दुकानात आम्ही हिर्‍याच्या अंगठ्या तर इतरांनी. हिर्‍याचे दागिने विकत घेतल्या दुपारी बॅंकॉकला अशोका हॉटॆलमध्ये जेवण घेतलं. येथील काही कर्मचारी हिंदीत बोलत होते. त्यानंतर हॉवर्ड स्केअर या हॉटॆलमध्ये गेलो. येथे दोन रात्री मुक्काम होता. त्यानंतर आम्ही एम.बी.के. व टोकीओ मॉल मध्ये खरेदीसाठी गेलो.

सकाळी आम्ही सफारी वर्ल्डला (Safari World) गेलो. हा एक मोठा जवळपास २०० एकराचा पार्क असून त्याचे दोन भाग आहे. एक सफारी पार्क जेथे प्राणी आहेत, दुसरा मरीन पार्क जेथे प्राण्यांचे खेळ दाखविले जातात.

सफारी पार्क मध्ये आफ्रिका व आशिया खंडातील प्राणी आहेत. आम्ही बसमधूनच निरनिराळ्या प्रकारचे पक्षी – मोर, शहामृग, बगळे तसेच प्राणी –जंगली म्हैशी, गायी, उंट, गेंडे हरीण, काळविट, झेब्रा, जिराफ वाघ, सिंह, चित्ता, अस्वली. हे प्राणी, पक्षी अगदी जवळून पाहता येत असल्यामुळे त्यांचे फोटो अगदी जवळून घेत होतो. येथे एक मोर पंखाचा पिसारा पसरवून नाचत असल्याचं दुर्मिळ असं दृष्य मला पहिल्यांदा पायायला मिळाल.

सफारीच्या बाजूला मरीन पार्क आहे. तेथे आम्ही माकडाचा (Orang Utan Show) बॉक्शिंग शो, सील माश्यांचा (Sea Lions show ) व डॉल्फीनचा खेळ पाहिला. तसेच सिनेमात मारामारी, बॉंबस्फोट, लुटमार अशा सारखे जे स्टंट शो असतात, ते पाहिलं.  त्याच परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही दुपारचं जेवण घेतलं.

रात्रीला आम्ही नदीवर फिरत्या जहाजावर जेवण घेतले. त्याला क्रुज डिनर म्हणतात. तेथे भारतीय व थायी पध्दतीचं निरनिराळ्या प्रकारचं शाकाहारी व मासाहारी जेवण होतं. मांसाहारीमध्ये मासे, मोठे झिंगे व चिकनचे डिशेस होते. तेथे जेवणासोबतच नाच, गाण्याचा कार्यक्रम होता. आम्ही तेथील एका स्त्री गायिकेसोबत जी हिंदी भाषातील सिनेमाचे गाणे म्हणत होती, तिच्यासोबत नाच-गाण्यात भाग घेतला. क्रुजच्या वरच्या मजल्यावर जाऊन नदीकाठावर अनेक सुंदर इमारती व  बुध्दविहार रात्रीच्या वातावरणात चमचम करीत असल्याचे दिसत होते. ते विहंगम दृष्य मी माझ्या कॅमेरात कैद केले. या देशात पन्नास हजारापेक्षा जास्त बुध्दविहार असल्याचे समजले.

सकाळी सोनेरी बुध्दविहार (world’s largest golden seated Buddha ) पाहायला गेलो. या विहारातील बुध्दाची मुर्ती ७०० वर्षापूर्वीची जगात सर्वात मोठी बसलेली सोनेरी मुर्ती आहे. तिची उंची ५ मीटर, चवडी ४ मीटर आणि वजन ५.५ टन आहे.

ही मुर्ती सुकोथाय (Sukhothai ) या काळातील असून सुरुवातीला ब्रम्हदेशाच्या आक्रमनापासून संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टरने झाकून ठेव्ली होती. ४० वर्षानंतर या मुर्तीचा शोध लागला

बाजूलाच दुसरं बुध्दविहार असून तेथे बुध्दाची निर्वांणपदाची मूर्ती (Reclining Buddha) आहे. येथे ९५ पगोडे असून बँकॉकमध्ये सर्वात ऊंच आहे. ह्या विहाराचं आकर्षण म्हणजे यातील मूर्ती १५ मीटर ऊंच, ४६ मीटर लांब आहे. या विहारात अग्रभागी राजाचे तैलचित्र होते. या देशात राजाला फार मानतात.

थायलंड देशातील बॅंकॉक मधील सर्वात उंच इमारत बाययोक स्काय हॉटेल (Baiyoke Sky Hotel ) आहे. या हॉटेलला ८८ मजले आहेत. ८४ व्या मजल्यावर फ़िरता मजला (revolving) आहे. तेथून बॅंकॉक शहर पूर्णपणे दिसते. तेथून एकावर एक असलेले अनेक उड्डानपुल (ओव्हरब्रिज) दिसत होते. बॅंकॉक शहरात जिकडे-तिकडे उड्डानपुल असल्याने या शहराला उड्डानपुलचे शहर म्हणून ओळखल्या जाते. एक पूल ५८ किलोमिटरचा असल्याचे कळले.

नंतर या हॉटॆलच्या बाजूलाच इन्द्रा मार्केट आहे. तेथे आम्ही शॉपींग केले. येथे थायी सिल्क व कॉटन कपडे तसेच लॅपटॉप व टिव्हीसारख्या इलेक्टॉनिक वस्तू स्वस्त मिळतात. पण एखादी वस्तू २५००० रुपयापेक्षा जास्त किंमतीची असेल तर भारतातील विमानतळावर कस्टम ड्युटी भरावी लागते.

रात्रीला त्याच परिसरात असलेल्या भारतीय पध्दतीचे जेवण बनविणार्‍या स्वागत हॉटॆलमध्ये जेवण करुन सुवर्णभुमी (Suvarnabhumi Airport, New Bangkok ) विमानतळावर गेलो. तेथून रात्री १२.५५ वाजताच्या  विमानाने भारतात मुंबईला परत आलो.

थायलंडमधील लोक कष्टाळू व प्रामाणिक असल्याचे दिसले. प्रत्येक कामामध्ये महिला आघाडीवर असल्याचे दिसत होत्या..

येथील स्वच्छ चकाकणारे रस्ते, शिस्तीत जाणारी वाहणे, एकावर एक असे अनेक उड्डानपुल, त्यावरुन धावणारे वाहणे व रेल्वे, दोन्ही बाजूला दिसणारी हिरवळ, बुध्दविहारे पाहून मन कसं थक्क होवून गेले होते.

या सहलीतील नानाविध स्थलदर्शन, आलिशान हॉटेल्स, चविष्ट शाकाहारी-मासाहारी जेवण-नास्ता, लोकदर्शन, त्यांची वेगळीच वेशभुषा-भाषा-राहणीमान, अफलातून प्राण्यांचा खेळ, करमणूकप्रधान नाच-गाण्याचा कार्यक्रम, आरामदायक गाडीतून फिरणं असं हे सगळंच्या सगळं रोजच्या तणावग्रस्त जीवनात काही सुखाचे क्षण वेचण्यासाठी खरोखर मस्त उपयोगात पडतो, यात वाद नाही.

आर.के.जुमळे/कुसुम जुमळे

बोनगाव-कोलकाताची सफर

6 Mar

मी माझ्या पत्‍नीसह या वर्षीच्या जानेवारी महिन्यात बोनगाव या गावला गेलो होतो. तेथे आम्ही मुलाकडे राहिलो  होतो.

तेथे माझा मोठा मुलगा कस्टममध्ये असिस्टंट कमिशनर आहे. त्याची आय.आर.एस. साठी निवड झाल्यावर पहिल्यांदा त्याला या भागात नेमणूक मिळाली.

हे गाव तालुक्याचं ठिकाण असून पश्चिम बंगालच्या २४ नोर्थ परगणा या जिल्ह्यात आहे. २४ नोर्थ परगणा नावाचं कोणतही शहर नाही, तर बारासात हे शहर या जिल्ह्याचे ठिकाण आहे.

बोनगाव हे तालुक्याचं ठिकाण असून  कोलकातापासून बांगलादेशच्या जेस्सोर रोडवर, १२५ किलोमिटर दूर आहे. येथे जवळच पेट्रापोल हे ठिकाण बांगलादेश व भारत या सिमेवर आहे. तेथून जवळपास रोज ४०० ट्र्कच्या मालाची आयात-निर्यात होत असते.

यापूर्वी मी १९८६ सालात कुटुंबासह माझ्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यलयाकडून मिळणार्‍या रजा प्रवास सवलत अंतर्गत काठमांडू पर्यंत प्रवास केला होता. त्यावेळी मुलं लहान होते. तेथून आम्ही दार्जिलींगला जातांना कोलकाताला एक दिवस थांबलो होतो. या शहरात त्यावेळी अनुभवणारी गर्दी आताही तेवढीच होती. त्यावेळी आमची ट्रॅव्हलबस ट्रॅफिकमध्ये अडकली होती. त्यामुळे गर्दीची आठवण आहे.

त्यावेळच्या कलकत्त्याचं आता कोलकाता असे नाव झाले. तथापी त्यावेळी रिक्ष्यात बसलेल्या प्रवाशांना माणसं ओढत. आता मात्र ते चित्र दिसले नाही. त्यावेळी रोडवर ट्राम धावत असत. आताही एकट-दुकट ट्राम जातांना दिसत होत्या.

गेल्या २५ वर्षापासून या राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सतत सत्ता होती. आता मात्र सत्तेत परिवर्तन होऊन ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असलेल्या तृणमूल कॉंग्रेसची सत्ता आली आहे.

मार्क्सवादी म्हणतात की, धर्म ही अफूची गोळी आहे. तरीही या राज्यात कमालीचे  देव-धर्माचे प्रस्थ नांदत आहे. त्यात तसूभरही बदल झाल्याचं मला आढळले नाही. कारण कुठेही पुरोगामी विचार पेरल्याचे दिसले नाही. साम्यवादी विचारसरणी येथे कुठेही रुजलेली दिसली नाही. कारण काही किलोमिटर अंतरावर ‘हरे रामा हरे कृष्णा, मिशनचे देशातील मुख्य ठिकाण मायापुरीला आहे. तसेच पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रध्दा काही कमी झाल्याचं दिसलं नाही. त्यांच्या राजवटीत लोकांची गरीबी सुध्दा हटलेली दिसून आलेली नाही. आताही तेथे कमालीची दैनावस्था थैमान घालत असल्याचे दिसते.

सत्तांतरामुळे पक्ष म्हणजे बाटली बदलली, पण  दारु मात्र बदलेली दिसली नाही. त्यामुळे लोकांच्या राहणीमानात फारसा फरक पडेल; असं वाटत नाही. शेतकर्‍यांच्या मालाला उचित भाव मिळत नसल्याने कर्जात बुडालेल्या शेतकर्‍यांनी विदर्भासारखे तेथेही आत्महत्त्या करीत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचल्या आहेत.

बोनगावात सायकलरिक्षा व ऑटो क्वचित दिसतात. तेथे महाराष्टात सामान वाहून नेणारे ढकलगाडी जसे असतात, तसे माणसांना घेऊन जाणारे सायकल-ढकलगाडी सर्रास जिकडे-तिकडे मोठ्या प्रमाणात रोडवर दिसत होत्या.

आम्ही घरी गेल्यावर सुनेने विचारले, ’तुम्हाला व्हॅन दिसल्या.? मला वाटलं व्हॅन म्हणजे मारुतीव्हॅन असावेत. पण हे वेगळेच वाहन होते. इकडे सायकलने जोडलेल्या ढकलगाडीला व्हॅन असे म्हणतात; असे तिने सांगितल्यावर आम्हाला हसू आले.

ह्या. व्हॅनवर  पुढे दोन व मागे दोन असे चार लोक खाली पाय सोडून निवांतपणे बसून जातात. पाऊस आला तर व्हॅनवरील प्रवाशांना जर छत्री नसेल तर ओले झाल्याशिवाय गत्यंतर राहात नाही.  कारण त्यांच्या व्हॅनवर काही आवरण नाही आणि बसायची जागा पण ओली होऊ शकते. उन्हा-पावसाच्या सुरक्षेसाठी प्रवाशांनाच छत्र्या घेऊन बसावे लागते.

Image
West Bengal Public transport

ह्या व्हॅनचे भाडे मात्र कमी आहे. इतर प्रवाशाच्या ’शेअर सिस्टीम’मुळे भाडे केवळ पाच रुपये व त्यापेक्षा दूर असेल तर त्यापेक्षा थोडं जास्त होतं. पण किमान भाडे फक्त पाच रुपये. तिथे रुपयाला टका म्हणतात. यांच्या संघटनेने दुसर्‍या वाहनांना येऊ दिले नाही, असे समजले. रेल्वे आली की, आमच्या घरासमोरुन रोडने हे व्हॅन भरभरून जायचे. हे व्हॅनवाले आणि इतर सर्वसामान्य लोक सर्रास उघडपणे कुठेही बिड्या ओढतांना दिसतात. त्यामुळे वायूचं प्रदुषन झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या धुम्रपानाचा मला फार त्रास होत होता.

तेथील सार्‍या लोकांना हिंदी समजत नाही, असं नाही. काही हिंदी बोलत पण होते. पण बर्‍याच लोकांना समजतही नव्हतं व बोलताही येत नव्हतं; अशीही परिस्थिती होती.

एखाद्यं सामान विकत घ्यायला गेलो की, त्याला  काय म्हणायचं ते कळत नव्हतं. मग ती वस्तू जर दिसण्यासारखी असली, की त्याला हाताचा स्पर्ष करुन सांगावे लागत होते. माझ्या सुनेला किराणा घ्यायचा असला की, दुकानातील वस्तूला हात लाऊन सांगत होती. अशी भाषेची अडचण येत होती.

तेथे मच्छीचा मोठा बाजार भरतो. गावाजवळ समुद्र नाही, पण गोडे पाण्याचे छोटे छोटे तलाव म्हणजे पॉंड्स आहेत. त्यात मासोळ्या पाळतात व मोठ्या झाल्यावर विकतात. रहू, कथला ह्या आपल्याकडील मासे तिकडे पण मिळतात. तेथील बेटकी मासा खायला चवदार वाटला, पण महाग आहे. ३०० रुपये किलो. बांगला देशचा हिंल्सा मासा क्वचित येतो. हा मासा बिनाकाट्याचा आहे. अत्यंत रुचकर लागतो. आम्ही खाऊन पाहिला आहे. तेथे मोठे झिंगे म्हणजे प्रॉन्स मिळतात. त्याच्या किंमती ४०० रुपयापासून ६०० रुपयापर्यंत आहेत.

तेथील सभेची एक आगळी-वेगळी पध्दत मला दिसली. कुठेतरी लोकांच्या भरगर्दीच्या चौकात एखादा स्टेज असतो. तेथे दोन-चार लोक खुर्च्या टाकून बसलेले असतात. एखादा वक्ता माईकवर बोलत असतात. त्यांच भाषण ऎकणारे तेथे कुणीच श्रोते बसलेले अथवा उभे असलेले दिसत नाहीत, तर तेथून भोवताल रोडने दूर-दूर पर्यंत लॉउडस्पिकरचे भोंगे लावतात. त्या भोंग्याच्या माध्यमातून जाणारे-येणारे चालता चालता किंवा दुकानात बसलेले व्यापारी आपला धंदा करता करता किंवा गिर्‍हाईक सामान विकत घेता घेता, त्याचे भाषण ऎकत असतात. आहे की नाही गंमत ! त्यामुळे कुणाचेही व्यवहार थांबत नाहीत किंवा कुणाला काही अडथळा निर्माण होत नाही.. ही पध्दत मला खरोखरच चांगली वाटली.

आणखी एक गोष्ट मला पाहायला मिळाली; ती म्हणजे कोणत्याही मिरवणूक किंवा मोर्चासोबत एकही पोलीस दिसला नाही. आपल्या महाराष्टात तर अशा वेळेस लोकांपेक्षा पोलीसच जास्त दिसतात.

कम्युनिस्ट पार्टीची एक मिरवणूक – मिरवणूक होती की मोर्चा होता, काय माहिती ? आमच्या घरासमोरून विळा-हातोडीचे चिन्ह असलेले लाल झेंडे घेऊन, घोषणा देत देत चालले होते. पण मला त्यांच्या मागे-पुढे एकही पोलीस दिसला नाही. निदान राजकीय पक्षाच्या मिरवणूकां-मोर्चासोबत तरी पोलीस आमच्याकडे जसे असतात, तसे पाहिजे होते ना ? पण नाही ! त्यामुळे मला गंमतही वाटत होती आणि पोलिसांना विणाकारण त्रास नाही, म्हणून चांगली गोष्ट असल्याचेही जाणवले होते !

बोनगावला ट्रॅफिक पोलीस दिसले नाहीत. तर त्याऎवजी बिनाड्रेसवाले, कोणत्याही पोशाखावर पिवळा रंगाचा जाकीट घातलेले व हातात जाड अर्धा-दांडूका घेतलेले कंत्राटदाराचे कर्मचारी असल्याचे दिसले. येथेही मला सरकारची काटकसर दिसली.

असं सांगतात की, कम्युनिस्ट राजवटीत प्रशासनामध्ये एक प्रकारची वेगळी संस्कृती निर्माण झाली होती. ! कर्मचारी फारसे काम करीत नसत. वेळेवर कधी येत नसत. कामगार युनियनच्या जबरदस्त दहशतीमुळे कोणताही अधिकारी कारवाई करण्याची हिंमत करीत नव्हते. नाहीतर संप आणि आंदोलन याला सामोरे जावे लागे. आता सत्ता बदलली तरीही तृणमूल कॉंग्रेसच्या राजवटीत फारशी सुधारणा झालेली  नाही, अशी माहिती मिळाली.

एक दिवस अशीच हातात बंगला भाषेत लिहिलेले व ज्ञानेश्वर महाराज पालखट मांडून बसतात; तसे चित्र असलेले बॅनर घेऊन ढोल-ताशाच्या तालावर नाचत नाचत भल्या मोठ्या मिरवणूका राहून राहून आमच्या घरासमोरच्या रोडवरुन जात होत्या.

 मी माहिती घेतल्यावर कळले की, त्या दिवशी हरीचंद ठाकूरची जयंती होती. मला हरीचंद व गुरुचंद या दोन ठाकूर बंधूनी केलेल्या चळवळीबद्द्ल माहिती होती. त्यांनी बंगालमधील अस्पृष्य जातीतील चांडाल लोकांची, नमो-शुद्रायची चळवळ चालविली होती.

जेस्सोर-खुलना या भागात या लोकांचा जास्त भरणा आहे. म्हणूनच जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटना परिषदेत अस्पृष्यांच्या घटनात्मक सुरक्षेसाठी जाणे आवश्यक वाटले, तेव्हा कॉंग्रेसने सारे दरवाजे बंद केले होते. त्यांना कुठूनही निवडून येणे अशक्य केले होते. सरदार पटेल यांनी जाहीर केले होते की, ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना घटना परिषदेचे दरवाजेच काय, खिडक्यासुध्दा आम्ही बंद केले आहे.’ म्हणून त्यावेळी बंगालमधील नमो-शुद्राय चळवळीचे नेते व बाबासाहेबांचे अनुयायी जोगेंद्रनाथ मंडळ यांनी मुसलमानाच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तेथून निवडून पाठविले होते. हा इतिहास त्यावेळी मला आठवला होता. पण या इतिहासाच्या खाणाखुणा मला येथे दिसल्या नाहीत.

अशा विसरलेल्या इतिहासाचा संदर्भ घेत बोनगाव-कोलकाताची सफर संपवून आम्ही अकोल्याला परत आलो.

हॅलोSS हॅलोSSS

14 Oct

माझं गांव चौधरा… अगदी लहानसं खेडं… माझं पहिली ते चवथी पर्यंतचे शिक्षण गांवापासून एक-दिड  कोस दूर असलेल्या निळोणा या गांवाला झाले.

त्यांतरचे पाचवी ते बी.कॉम. पर्यंतचे शिक्षण गांवापासून तीन…क कोस दूर असलेल्या यवतमाळ या शहरात झाले.

त्यावेळी दुकान, ऑफीस, सिनेमा इत्यादी ठिकानी टेलिफोन वर लोकं बोलत असल्याचे मी पाहत होतो.

खेड्यामध्ये टेलिफोन नसल्यामुळे लोकांना त्याचे कुतूहल वाटायचं. म्हणून मी त्याची नक्कल लोकांना करुन दाखवायचं ठरविलं.

त्यावेळी मी कॉलेजमध्ये प्रि. कॉमर्स म्हणजे आताच्या अकरावीला शिकत होतो.

माडी पोर्णिमेच्या दिवशी चन्द्राचा पांढराशुभ्र प्रकाश असतो. त्यादिवशी रात्रीचे जेवन करुन लोकं बाहेर येऊन बसत होते. एकत्र येऊन गप्पागोष्टी करणे, खेळ खेळणे, मनोरंजन करणे इत्यादी मौज-मजेचे कार्यक्रम करीत होते. लोकांना आपआपली कला प्रदर्शीत करण्याची संधी मिळत होती.  लोकांचेही त्यानिमित्ताने मनोरंजन होत होते.  मी सुध्दा माझा मित्र अर्जुन याला घेऊन टेलीफोनची नक्कल करायचं ठरवल.

मी एकीकडे माझ्या एका कानाला हात लाऊन हॅलोSS हॅलोSSS म्हणत होतो. दुसरीकडे अर्जुन त्याच्या कानाला एक हात लाऊन दुसर्‍या हाताने जोरात हालवल्याची ऍक्टींग करीत होता. मी त्याला म्हणत होतो की, ’ अरे मी तुला हॅलो हॅलो म्हणतोय, तू बोलत कां नाहीस ? तु काय करीत आहेस ? ’

‘तु सांगितल्या प्रमाणे मी हालवत आहे ना…’

‘अरे तसे नाही. फोनवर बोलतांना सुरुवातीला हॅलो हॅलो म्हणत असतात. नंतर बोलायचं  असते.’

लोकं या नकलेला पोट धरुन हासत होते.

टेलीफोन आपल्याकडे असणे म्हणजे त्यावेळी स्वप्नवत होते. परंतु आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.

त्यावेळी टेलीफोन म्हणजे श्रीमंताची मिरासदारी होती. एकदा मुंबईला १९९४ मध्ये माननिय कांशीराम यांची सभा होती. त्या सभेला माजी पंतप्रधान माननिय व्हि.पी.सिंग आले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले होते की, ‘टेलीफोन डिरेक्टरी मधील नांवे पाहिले की, कोण श्रीमंत व उच्चवर्णिय आहेत ते कळतात.’ आता टेलीफोन डिरेक्टरी मधिल नांवे पाहिले की, कोण श्रीमंत व उच्चवर्णिय आहेत ते कळत नाही !

माझ्याकडे एवढेच नव्हे तर माझे बहुतेक नातेवाईक, मित्र मंडळीकडे सुध्दा आता टेलीफोन आलेला आहे. माझे मुले त्यावेळी मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ सारख्या उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे व औरंगाबाद या ठिकानी असल्यामुळे त्यांचेशी संपर्क ठेवण्यासाठी टेलीफोन घेणे अत्यंत आवश्यक झाले होते.

पुर्वी नक्कल करीत होतो ! आता प्रत्यक्षात उतरले आहे. हे कश्यामुळे शक्य झाले आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच ! ते जर नसते तर मी कुठेतरी मोलमजुरी करीत बसलो असतो.

बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, ‘शिका… !’ ते माझ्या आई-बाबांनी ऎकले. मला शाळेत टाकून शिक्षण दिले.

चवथीपर्यंत शाळा गावांजवळच्या खेड्यात होते. पाचवीनंतर मला यवतमाळ शहरातील म्युनिसिपल हायस्कुल या शाळेत टाकले.

आम्हां दोघे बहिन-भावांना  यवतमाळ शहरापासून थोडं दूर, एका टोकाला असलेल्या उमरसरा या खेड्यागांवात बाबांनी शिक्षणासाठी ठेवले होते. सुरुवातीला बाबांच्या नातेवाईकांकडे व नंतर एक झोपडे बांधून दिले तेथे राहत होतो.

त्यावेळी मला पाचवीपासून दहावीपर्यंत पंधरा रुपये स्कॉलरशिप मिळत होती. कॉलेजमध्ये शिकत असतांना चाळीस रुपये मिळत होते. म्हणून मला शिक्षण घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या आधार झाला. त्यामुळे मला बी.कॉमपर्यंत शिक्षण घेता आले.

राखीव जागेच्या सवलतीमूळे पुढे मला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये लिपिकाची नोकरी मिळाली. त्यानंतर महावितरण कंपनीमध्ये अकॉउंटस ऑफीसर्पर्यंत पदोन्नती घेत घेत सेवानिवृत झालो.

मी शिकलो, नोकरीला लागलो. माझी आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यामुळे माझ्या लहान भावाला डॉक्टरचे शिक्षण घेण्यासाठी मदत करु शकलो. माझ्या मुलांना शिकऊ शकलो. एक मुलगा वकील झाला. दुसरा डॉक्टर झाला. मुलगी कॉंम्पूटर ईंजिनिअर झाली. एवढे आमुलाग्र परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक कार्यामूळेच घडुन आले !

मी सप्टेंबर २००७ साली सेवानिवृत झालो. त्यावेळी माझ्या कार्यालयात  झालेल्या निरोप समारंभाच्या वेळी मी सांगितले की, ‘मी नोकरीला लागलो ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच! कारण त्यांनीच शिक्षणासाठी स्कॉलरशिप व शासन-प्रशासामध्ये मागासवर्गीय जातींचा सुध्दा सहभाग असावा म्हणून राखीव जागा मिळवून दिल्या. म्हणून या देशातील मागासवर्गियांची प्रगती झाली. केवळ मागासवर्गियांची प्रगती झाली, असे नव्हे तर या देशाची सुध्दा प्रगती झाली. कारण देशात राहणाऱ्या लोकांची प्रगती झाल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. एखाद्या शरीराचा तीन चतुर्थांश भाग जर खराब असेल तर ते शरीर विकलांग असते. तसेच देशातील बहुतांश लोक जर गरिबी व अज्ञानात खितपत पडले असतील तर, तो देश सुध्दा विकलांग झालेला असतो. त्यामुळे केवळ मीच नव्हे तर सर्वांनी त्यांचे ऋणी असायला पाहिजे.’

 

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण आणि बौध्दांची जबाबदारी

18 Sep

           दिनांक १४.१०.१९५६ रोजी नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली व नंतर उपस्थित लाखो अनुयानांना त्यांनी दिक्षा दिली.

      दुसर्‍या दिवशी दिनांक १५.१०.१९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत त्यांनी धम्माचे विवेचन व समाजबांधवांना मार्गदर्शन करणारे ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण दिले. या घटनेला आज ५५ वर्षे लोटून गेलीत. तेव्हा त्यांनी ज्या पोटतिडकीने दिशानिर्देश दिलेत त्यानुसार  समाजबांधव वागला कां याचा विचार करणे आवश्यक आहे.

      बाबासाहेब भाषणात म्हणाले होते की, ’आम्हाला इज्जत प्यारी आहे आहे, लाभ प्य्रारा नाही.’

      केसरीच्या बातमीदाराने संगमनेरच्या सभेत चिठ्टी पाठवून बाबासाहेबांना विचारले होते की, ’तुमचे लोकं हलाखीमध्ये जगत आहेत. त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाहीत. त्यांना अन्न नाही. शेतीवाडी नाही अशी त्याची बिकट परिस्थिती असतांना मेलेली ढोरे ओढू नका असे तुम्ही सांगत असल्यामुळे त्यांचे दरवर्षी कातड्याचे, शिंगाचे, मांसाचे ५०० रुपये उत्पन्नाचे नुकसान होते.’ तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की, ’तुम्ही, तुमचे पांच मुले, तुमच्या भावाच्या ५/७ मुलांमिळून तुमच्या कुटूंबानी हे काम करावे म्हणजे तुम्हाला ५०० रुपयाचे  उत्पन्न मिळेल. त्याशिवाय मी दरवर्षी तुम्हाला ५०० रुपये वर देण्याची व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न-वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहून घेईन. मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही कां सोडून देता? तुम्ही कां हे करीत नाही? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही? ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे…’

      दुसर्‍या एका ब्राम्हण मुलाने, पार्लमेंट, असेंब्ल्याच्या जागा कां सोडता असे विचारले होते. त्यावर बाबासाहेब म्हणाले की, ’तुम्ही महार बनून भरा.’

      म्हणून बाबासाहेब म्हणतात की, आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरीता! मनुष्य मात्राला पूर्णावस्थेस नेण्याकरितां आम्ही तयारी करीत आहोत. त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे.

      काय बाबासाहेंबाच्या या म्हणण्यानुसार समाजबांधव वागत आला आहे कां? की स्वार्थासाठी वाटेल ते, प्रसंगी स्वाभिमान, मानसन्मान व इज्जत गहान ठेवायला मागेपूढे पाहिले नाही. याचा जाब अशा लोकांनी स्वत:ला विचारायला नको कां?

      बाबासाहेब त्या भाषणात म्हणाले होते की, ’आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५ पासून येवले येथे एक ठराव करुन हाती घेतली. मी.हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञा मी मागेच  केली होती आणि काल मी ती खरी करुन दाखविली. मला इतका आनंद झाला की- हर्षवायुच झाला आहे. नरकांतून सुटलो असे मला वाटते.’

      काय आपण सुध्दा पुर्णपणे हिंदू धर्माच्या संकृतीचा, रितीरिवाजाचा त्याग केला आहे कां? असा प्रश्‍न आम्ही स्वत:ला विचारायला नको कां?

      पुढे बाबासाहेब म्हणतात की, ’मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द धर्मात यावयाचे आहे, त्यांनी जाणीवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.’

      काय बाबासाहेंबाच्या म्हणण्यानुसार, समाजबांधवांनी बौध्द धम्म आतातरी पटवून घेतला आहे कां? धम्माची शिकवन समजून घेऊन इतरांना समजून सांगितली काय? याचा जाब प्रत्येकांनी स्वत:ला विचारायला नको कां?

      भगवान बुध्दाचा उपदेश सांगतांना बाबासाहेब म्हणतात की, बौध्द संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान आहेत. सागरात गेल्यावर हे गंगेचं पाणी किंवा हे महानदीचे पाणी ओळखणे अश्यक्य असते. त्याप्रमाणे बौध्द संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात.

      काय लग्न जुळवतांना आपण पोटजातीचा विचार करतो काय? याचा जाब अशा लोकांनी विचारायला नको काय?

      बाबासाहेबांनी भाषणामध्ये धर्मास ग्लानी कां येते? या राजा मिलिंदानी विचारलेल्या प्रश्‍नाला भन्ते नागसेनाने दिलेल्या उत्तराचे विवेचन करतांना तीन कारणे सांगितली आहेत.

१. पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्वांत गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व कालानुसार अशा धर्म टिकतो.

२. दुसरे कारण हे की, धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्मास ग्लानी येते. ज्ञानी माणसांनी धर्म-ज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिध्द नसतील तरी धर्माला ग्लानी येते.

३. आणि तिसरे कारण हे की, धर्म व धर्माची तत्वे विद्वानासाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ट विभूतिचे पूजन करतात.

      बाबासाहेब म्हणतात की, आपण बौध्द धर्म स्विकारतांना ही कारणे लक्षांत ठेवली पाहिजे. बौध्द धर्माची तत्वे कालिक (काही काला पुरती) आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही.

      काय धम्म प्रचारासाठी व  गांवा-गांवात, मोहल्या- मोहल्यात बुध्द विहारे बांधण्यासाठी समाज बांधवांनी विशेषत: शिकलेल्या बुध्दिजीवी वर्गांनी पुढाकार घ्यायला नको काय? कारण हा वर्ग समजून घेउन इतरांना समजावून सांगू शकतो. हा वर्ग बाबासाहेबांच्या चळवळीचा लाभधारक आहे. तेव्हा या लोकांवर बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी येऊन पडत नाही काय?

      बाबासाहेब पुढे म्हणतात की, “मात्र तूमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्द‍ल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौध्द धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शुन्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे हो‍ऊ नये, म्हणून आपण दृढ निश्‍चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.”

      काय आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा प्रयत्‍न केला काय किंवा करतो काय? आपल्या कृतीने बुध्द धम्म निंदाजनक स्थितीस आणला असे झाले तर नाही ना? याचा अंतर्मुख होवून सर्वांनी विचार करायला नको काय?

      बाबासाहेब पुढे म्हणतात की, “ हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे, काही इच्छिले आहे, हे तरूणांनी लक्षांत घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान २० वा हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा.

      काय आपल्या उत्पनाचा विसावा हिस्सा म्हणजे पांच टक्के आपण बाबासाहेबांच्या कार्याकरीता योगदान देतो काय? कां हेही पैसे आपण आपल्याच घरात, शौकपाण्यासाठी खर्च करतो? याचा विचार आपण करायला नको काय? हा पैसा बाबासाहेबांचा आहे आणि तो मी बाबासाहेबांच्याच कामाकरीता खर्च करेन याची जाणीव किती लोकांना आहे?

      भाषणाच्या शेवटी बाबासाहेब म्हणतात की, “दरेकांनी दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौध्द माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो.”

      काय इतर जाती-धर्माच्या लोकांनी बौध्द धम्म स्विकारावा म्हणून आपण अशी काही यंत्रना निर्माण करु शकलो काय? याचा आम्ही विचार करायला नको काय?

      बाबासाहेबांचे भाषण व त्यावर आपली जबाबदारी याचा विचार करुन जर सर्वांनी एकत्र येऊन एका सुत्रबद्द पध्दतीने व निष्ठापूर्वक  रितिने  वाटचाल करण्याचा निर्धार केला तर खर्‍या अर्थाने बाबासाहेबांचे ’भारत बौध्दमय’ करण्याचे स्वप्‍न काही अंशी साकार झाल्याशिवाय राहणार नाही, हे निर्वीवाद सत्य आहे.

टिप-  सदर लेख

दिनांक २४.०९.२०११  दैनिक धम्मशासन, मुंबई,

दिनांक २५.०९.२०११ दैनिक वृतरत्‍न सम्राट, मुंबई,

दिनांक २९.०९.२०११ व ३०.०९.२०११  जनतेचा महानायक, मुंबई,

दिनांक ०६-१०-२०११ दैनिक बहुजन महाराश्ट्र पूणे  धम्मचक्र प्रवर्तन विशेषांक

व दिनांक ०६-१०-२०११  धम्मसंदेश यवतमाळ  धम्मचक्र प्रवर्तन विशेषांक मध्ये प्रकाशित झाला आहे. 

गुरु शिष्यानी वादळ निर्माण केले

6 Jul

      ११ अप्रील ला क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या गुरु शिष्यानी या महाराष्टातच नव्हे तर संपुर्ण भारतात एक प्रकारचा झंझावात, वादळ  निर्माण केले होते. संपुर्ण समाजमन त्यांनी ढवळून काढले होते.
      फुले-शाहु-आंबेडकर चळवळीचा १८४८ ते १९५६ पर्यंतचा १०८ वर्षाचा हा संघर्ष होता. ज्योतीबा फुले यांनी या समाज क्रांतीच्या इमारतीचा भक्कम असा पाया रोवला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावर कळस चढविला.
      या देशात त्यांनी न भुतो न भविष्यती असा क्रांतीकारी इतिहास घडविला. त्यांच्याच संघर्षामुळे  आम्हाला आज गोड फळे चाखायला मीळत आहे.
      एक शायर म्हणतो-
      हजारो सालोसे नरगीस अपने बेनुरीपे रोती है।
      बडे मुश्किल से होती है चमन मे दिदारे पैदा॥
      याचा अर्थ, हजारो वर्षापासून  नरगीस आपल्या विद्रुप चेहर्‍याकडे पाहून रडत होती. परंतु जेव्हा बागेत फुलं उगवयला लागले तेव्हा ती हसली. 
      त्याच प्रमाणे हजारो वर्षापासून शुद्र अतिशुद्र, स्त्रिया, बहुजन समाज आपल्या विद्रुपतेकडे म्हणजे दयनीय परिस्थितीकडे पाहून रडत होते. परंतु जेव्हा याच खाणीत क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजश्री शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारखे हिरे पैदा होऊन ते समाजाचे दु:ख दुर करण्याचा प्रयत्‍न करायला लागले. तेव्हा कुठे या समाजाला हायसे वाटले. आशेचा किरण दिसला.
      कालची मुके आज बोलू लागले. कालपर्यंत आम्ही मूके होतो आज मात्र बोलू लागलो. ही किमया या दोन्ही गुरु शिष्यानी घडवून आणली आहे. एक काळ असा होता की प्रस्थापीत व्यवस्थेने येथील शुद्राती-शुद्र बहुजन समाजाला शिक्षणापासून दूर ठेवले होते. क्रांतीबा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हातात लेखणी दिली. त्यामुळे आज हा वर्ग मोठमोठ्या हुद्यावर जाऊन पोहचला आहे.
      वामन दादा कर्डक आपल्या गाण्यात म्हणतात की, ‘शेणाचे हात लावले पेणाले‘ ज्यांचे हात नेहमी गाई-ढोराच्या शेणाने माखलेले असायचे, आता त्यांच्या हातात लेखणी आली आहे. ही लेखणी क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजश्री शाहु महाराज  व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्या हातात दिली ही गोष्ट आपण कधिही विसरता कामा नये..
      निसर्गातील साध्या पाण्याला तहान भागवण्यासाठी हात लावता येत नव्हता. ज्योतिराव फुलेंनी आपल्या आवारातील हौद त्यावेळी अस्पृष्यांसाठी खुला केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ साली महाड येथील चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी सत्याग्रह करावा लागला होता. जेथे कुत्रे, मांजरे, गाई-ढोरे पाणी पित होते परंतु माणसांना मात्र  पाण्याला शिवण्यास मनाई होती.  त्यांची सावली सुध्दा उ़च्चवर्णीय आपल्या अंगावर पडू देत नव्हते. निरनिराळ्या प्रकारे त्यांनी गुलामीत जखडून ठेवले होते.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्यांना इतिहास माहीत नाही ते इतिहास घडवू शकत नाही. एक इतिहास व्यक्तीला बदलवू शकतो तर व्यक्ती सुध्दा इतिहासाला बदलू शकतो असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. या दोन्ही गुरु-शिष्याने अस्पृष्यतेचा, विषमतेचा  हजारो वर्षापासून चालत आलेला अमानवी इतिहासाचा प्रवाह रोखून धरला. परिवर्तन करण्याची एवढी प्रचंड ताकद त्यांच्या चळवळीमध्ये होती ही बाब नाकारता येणार नाही. 
      जोसेफ मॅझनी नावांच्या एका विचारवंताने म्हटले होते की, माणूस जरी मर्त्य असला तरी त्याचे विचार मात्र जिवंत राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा खोडून काढतांना सांगितले की, असे समजणे घोडचुक होईल. कारण एखाद्या रोपट्याला जिवंत ठेवण्यासाठी खत व पाणी देण्याची आवश्यकता असते. नाहीतर ते मरुन जाईल.  त्याचप्रंमाणे विचाराला जिवंत ठेवण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार होणे तितकेच महत्वाचे आहे. नाहीतर ते विचार सुध्दा मरुन जाईल. क्रांतीबा ज्योतिराव फुलेंचे विचार सुध्दा असेच काळाच्या आड लपलेले होते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले व त्यांचे मानव कल्याणाची चळवळ शुध्द स्वरुपात पुढे नेली.
      कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी अनेक शाळा, कॉलेज, वसतीगृह काढले, ते म्हणतात-
      ‘एक वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा..
      शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसे  पेरा..
      व पांच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा…’
      म्हणून महापुरुषांचे विचार एका पिढीतून दुसर्‍या पिढीपर्यंत समर्थपणे पोहचविण्यासाठी विचार पेरणे आवश्यक आहे. नाहीतर  ते विचार खंडीत होवून जातील.
      ज्योतिबा फुले हे भारतीय इतिहासातील पहिले भारतीय आहेत की ज्यांनी ब्राम्हणवादी समाज व्यवस्थेच्या विरोधात कठोर विद्रोह केला.  त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत जो अविरत संघर्ष केला तो ब्राम्हणी समाज व्यवस्थेच्या विरोधात होता. ते ब्राम्हणांचा विरोध करीत नव्हते. तर ब्राम्हणी समाज व्यवस्थेचा विरोध करीत होते.
      तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्राम्हणांचा विरोध करीत नव्हते. तर ब्राम्हणवादाचा  विरोध करीत होते. त्यांनी १२ व १३ फ़ेब्रुवारी १९३८ ला जळगांव येथे झालेल्या कामगार परिषदेत सांगितले होते की, ‘ब्राम्हणवाद म्हणजे समता, स्वातंत्य, बंधुत्व व न्याय नाकारणारी प्रवृती होय. ही प्रवृती जशी ब्राम्हणांमध्ये असेल तशीच ती ब्राम्हणेतरांमध्ये पण असू शकते.’ म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीत ब्राम्हणांनी सुध्दा सक्रिय योगदान दिले होते, ही गोष्ट नाकारता येऊ शकत नाही.
      ज्योतिबा फुले यांच्या आगमनाच्या पुर्वीचा जो काळ होता तो पेशवाईचा काळ होता. हा पेशवाईचा काळ म्हणजे शुद्र-अतिशुद्र, बहुजन समाजासाठी अत्यंत अंधारमय काळरात्र  होती व ब्राम्हणांसाठी मात्र अत्यंत भरभराटीचा काळ होता.
      ब्राम्हण भोजणे व दक्षीणा हा त्यांच्यासाठी पर्वणीचा उद्योग असायचा. सरकारी तिजोरीतला अमाप पैसा या ब्राम्हण भोजणांवर खर्च करायचे. खादाड वृती इतकी विकोपाला गेली होती की, जो  ब्राम्हण एकाच वेळेस चार शेराचा भात, दुध, तुप, साखर खात असेल त्याला पालकीचा मान मिळत असे. तसेच सरकारी तिजोरी खाली होईपर्यंत ब्राम्हणांना लाखो रुपयाची दक्षिणा वाटत असत. श्रावण मासात रुपये, सोणे-नाणे वाटण्यासाठी एक सण असायचा. लाखो ब्राम्हण दक्षिणेसाठी पुण्यात जमायचे. नानासाहेब पेशवे यांनी १७५३ साली ८०००० ब्राम्हणांना १६ लाख रुपये वाटली अशी नोंद आहे.
      शिवाजी महाराजांची सत्ता गेल्यानंतर मनुस्मृतीच्या कायद्याचा अंमल याच काळात अत्यंत कठोरपणे करण्यात येत होता. हिंदु धर्मात ज्या सतीप्रथा, विधवा विवाहबंदी, बालविवाह, जरड विवाह, विधवांचे केशवपण, जातीभेद, अस्पृष्यत: यासारखे जे अनिष्ट चालिरिती आधिच चालु होत्या त्याला पेशवाईत आणखीनच बळ मिळाले होते.
      शुद्र-अतिशुद्र असा हा भलामोठा समाज विषारी जातीयतेच्या दु:खाने, शोषणाने, भुकेने, निरक्षरतेने त्राही त्राही झाला होता. लुळापांगळा झाला होता. त्याकाळी शैक्षणीक, सामाजिक, नैतिक अवस्था इतकी किळसवानी थराला जाऊन पोहचली होती की पेशवाई म्हणजे मानवतेवर फार मोठा कलंक ठरावा.
      शुद्र-अतिशुद्रांना शिक्षण घेण्यापासून बंदी होती. चांगली मोडी अक्षर लिहिणार्‍या सोनार, प्रभु वगैरे जातींच्या लोकांचे हात तोडून टाकण्यात आले होते. शिक्षण घेऊ पाहणार्‍या कित्येक लोकांना फासावर लटकवीले गेले होते.
      अनेक प्रकारच्या जुलमी कर वसुलीसाठी शेतकर्‍यांना ओणवे करुन उघड्या पाठीवर फटके मारीत, नाजुक भागावर चटके देत असत. त्यांच्या स्त्रियांवर गूंडाकडून बलात्‍कार घडवून आणीत. 
      स्त्रियांच्या दु:खाला तर पारावर राहिला नव्हता.
      ‘शुद्र पशु नारी ये है सब ताडण के अधिकारी’
      या स्वामी तुलशीदासाच्या म्हणण्यानुसार नारी ती मग ब्राम्हणाची कां असेना त्या शुद्रच होत्या. त्यामुळे ब्राम्हणाची आई, बहिण, मुलगी यांचा सुध्दा ब्राम्हण पुरुष मनुस्मृतीच्या कायद्यानुसार छळ करायचे.
      आपल्या मुलींचे लग्न वयाच्या नवव्या वर्षीच उरकून घ्यावे असे त्यांनी फर्मान काढले होते. त्यामुळे बालविवाह, अकाली वैधव्य, सतिची चाल, केशवपण अशा सारख्या अनिष्ट चालिरितीने स्त्रिया नाडल्या जाऊन त्यांना जनावरासारखी वागविले जात होते.
      एकापेक्षा अनेक बायका करण्याची पध्दत त्यावेळी श्रिमंत, जमीनदार, राजघराणे यांच्यात रुढ झाली होती. नाना फडणीसाला नऊ बायका, दुसर्‍या बाजीरावाला अकरा बायका, महादजी शिंदेला सात बायका. याशिवाय अनेक रखेल राहायचा. त्याची मोजदाद नाही. त्यांचे कडे एक जनानखाणा असायचा.
      एखाद्या ६०-७० वर्षाच्या वयस्कर पुरुषाच्या गळ्यात ८-९ वर्षाची कोवळी मुलगी बांधून द्यायचे… अशा नवर्‍याचे निधन झाले की त्यांना आयुष्यभर विधवेचे जीवन जगावे लागे. पुरुषांच्या वाईट नजरांना त्यांना बळी पडावे लागे. अशातच त्यांना मातृत्व आले की आत्महत्या करायच्या किवा जन्माला आलेल्या बालकांच्या हत्या करायच्या.
      सतीमध्ये केवळ लग्नाच्या बायकांना जाळत असत असे नव्हे; तर त्यांच्या रखेल, नौकरानी, दासी यांना सुध्दा जाळत. जाळण्यापुर्वी त्यांच्या अंगावर दागदागिने घालायला लावायचे, तिच्या मृत नवर्‍याच्या चित्तेवर बसवून तिला जिवंतपणी जाळत. तिने जर चित्तेवरुन उडी घेण्याचा प्रयत्‍न केला तर तीला बांबूच्या काठीने ढकलून द्यायचे. तिचा आर्त आवाज आसमंतात घुमू नये म्हणून मोठमॊठे नगारे वाजवित. जळाल्यावर त्यांच्या राखेला हात लावण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणांना! कारण त्यात सोने-नाणे असायचे. ‘मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे’ म्हणतात ते हेच असावेत! किती ही क्रुर प्रथा! अंगावर काटे येतात…
      तीला दुसरे लग्न करायला बंदी होती.      त्यांच्या डोक्याचे केस काढुन त्यांना विद्रुप करायचे.
      ‘अहो अण्णा मी तुमची लाडकी।
      मला कां करतां बोडकी॥’
      अशा त्या टाहो फोडत असल्याचे सावित्रीमाईने आपल्या काव्यात म्हटले आहे.
      पायात वहान घालण्याची त्यांना बंदी होती. एखाद्या कोपर्‍यात तीला बसून राहावे लागे. अशा प्रकारचे अनेक निर्बंध तिच्यावर असायचे.
      पेशवाईत स्त्रियांचा बाजार भरायचा. दास-दासी विकत घेण्याची व विकण्याची उघड प्रथा होती. स्त्रियांचे शील व चरीत्र नेहमीच धोक्यात असायचे. 
      न्यायाला व सत्याला कुठेही स्थान नव्हते. घाशीरामने आपली कोवळी मुलगी बाजीरावला भोगायला देउन कोतवालकी मिळवली होती हे सत्य आपण घाशीराम कोतवाल या नाटकात पाहिले असेल. प्रजेचा अतोनात छळ होत होता. भ्रष्टाचार बोकाळला होता. न्याय सुध्दा विकत मिळत होता.
      कनिष्ट जातींना कठोर शिक्षा व वरिष्ट जातींना सौम्य शिक्षा व्हायच्या. धर्माविरुध्द बोलणे म्हणजे धर्मद्रोह व राजाविरुध्द बोलणे म्हणजे राजद्रोह. उकळत्या तेलातून नाणे किंवा अंगठी काढणे, तप्त लाल झालेली कुर्‍हाड हातात धरणे, आरोपीची जिभ कापणे, शरिराचे एक एक अवयव तोडणे, फटके मारणे, जखम झाली की त्यावर मिठ लावणे, तोफेच्या तोंडेत देणे, हत्तीच्या पायाने तुडविणे, डोके उडऊन गांवात फिरवीणे अशा प्रकारच्या कठोर शिक्षा शुद्र-अतिशुद्रांना भोगावे लागत असे.
      ब्राम्हणांना सचैल स्नान करणे, तूप पिणे, दुधातील खिर खाणे असे हास्यास्पद शिक्षा करीत असे. ब्राम्हणांना दक्षिणा दिले की पापमुक्त होत असे.
      सामाजिक अत्याचारात ब्राम्हण वर्गाने कहरच केला होता. काही सोनाराने कपाळावर आडवे गंध लावला म्हणून लोखंडी शिक्के तापऊन त्यांच्या कापाळावर उमटविल्या. सुताराने एकटांगी धोतर नेसले म्हणून त्याच्या ढुंगणाचा कुल्ला कापुन टाकला. शुद्रांमध्ये मोडणार्‍या व आता ओ.बी.सी मध्ये गणल्या जाणार्‍या सोनार, सुतारासारख्या जातींचा सुध्दा त्याकाळी छळ होत होता.
      या काळात अस्पृश्यांच्या अत्याचाराला पारावर नव्हता. याच काळात रस्त्यावर उमटलेले पायाचे चिन्ह पुसून जावे म्हणून ढुंगणाला फडा बांधणे व थुंकण्यासाठी गळ्यात गाडगे अडकवीणे अस्पृश्यांना बंधनकारक केले होते. कित्येकांच्या तोंडात तेल व शेंदूर ओतून त्यांना इमारतीच्या पायात, गढी, किल्ले व बुरुजात ठार मारण्याची प्रथा होती.
      अशा या अंधार युगाचा अंत १८१८ ला झाला. त्यानंतर ब्रिटीशांची राजवट आली.
      फुले दांपत्याचे आगमन झाल्याचा काळ पेशवाई नंतरचा जरी असला तरी सामाजिक परिस्थीती पेशवाईकालीन परिस्थितीपेक्षा फारशी सुधारली होती असे म्हणता येत नाही.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुध्द आणि संत कबीर यांचे सोबत ज्योतिबा फुले यांना सुध्दा गुरु मानले होते. ते एकदा म्हणाले होते की, ‘जर ज्योतिबा फुले या धरतीवर जन्माला आले नसते तर आंबेडकर सुध्दा निर्माण झाला नसता. म्हणून ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक चळवळीला  भारताच्या सामाजिक क्रांतीच्या इतिहासात विशेष स्थान आहे.
      एका ब्राम्हण व्यक्तीच्या सांगण्यावरुन ज्योतीबांच्या वडिलांनी ज्योतीबांचे शिक्षण बंद केले होते. परंतु गफ्फार मुन्सी व लेजिट अशा मुस्लिम व ख्रिचन व्यक्तिने ज्योतीबांच्या वडिलांना समजावीले म्हणून ज्योतीबांना पुढील शिक्षण घेता आले.
      याच काळात त्यांचेवर ख्रिचन मिशणमधील शिक्षणाचा, थॉमस पेन यांच्या ‘मानवाचे हक्क’ या ग्रंथाचा, जॉर्ज वाशिग्टन व शिवाजीराजे यांच्या चरीत्राचा प्रभाव पडला. 
      ब्राम्हण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून ज्योतीबांना हाकलून दिले होते. वडिल म्हणाले की, ‘बरे झाले तुला फक्त हाकलले. पेशवाई असती तर तुला हत्तीच्या पायाने तुडविले असते.’ ज्योतीबां वडिलांना म्हणाले की, ‘बाबा तुम्ही हे सर्व सहन केले असेल परंतु मी मात्र सहन करणार नाही.’ हा प्रसंग त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. त्यानंतर त्यांनी धर्मशास्त्र, वेद, पुराण याचा अभ्यास केला व जातीभेदाच्या नांवाने देण्यात येणार्‍या कारणांचा शोध घेतला.
      सामाजीक क्रांतीच्या चळवळीचे नेतृत्व करु पाहणार्‍या सेनापतीला  दुरदृष्टी व धाडस या दोन  मौलीक गुणाची गरज असते. हे दोन्हिही गुण ज्योतिबा फुले यांच्याकडे निश्चितच होते.
      ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी याविरोधात चळवळ चालविली. मातृत्व आलेल्या स्त्रियांना आत्महत्या न करण्याबाबत प्रवृत करीत. त्यांचे बाळंतपण व मुलांचे संगोपण त्यानी स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृह व बाल संगोपण गृहात करीत असत.
      काशीबाई नांवाची एका ब्राम्हण स्त्रिला आत्महत्या न करु देता, तीचे बाळंतपण केले व तिच्या बाळाला-यशवंताला दत्तक घेतले. हेच फुले दांपत्याचे एकमेव मुल होते. कारण त्यांना स्वत:चे मुल नव्हते. या यशवंताला त्यानी वैद्यकीय शिक्षण दिले व त्याचे आंतरजातीय मुलीशी लग्न लाऊन दिले.
      ज्योतिबा फुले यांनी विधवा मुलींचे नाव्ह्यांनी डोक्याचे केस कापू नयेत म्हणून त्याचे शिष्य नारायन मेघाजी लोखंडे यांच्या मार्फत त्यांचा संप घडवून आणला होता.    आजकाल पगारवाढीसाठी संप केला जातो. पण अशा सामाजिक प्रश्‍नासाठी संपाचे शस्त्र ज्योतिबा फुलेंनी उगारले हे जगातील त्यावेळचे पहिले उदाहरण असेल.
      ज्योतीबा फुले शुद्र-अतिशुद्राच्या गुलामगिरीचे, दुखाचे  कारण अविद्या आहे असे म्हणत. म्हणून त्यांनी ‘शेतकर्‍याचा आसुड’ या ग्रंथात म्ह्टले आहे की-
      विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥
      निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।
      वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
      हा महात्मा फुले यांचा संदेश म्हणजे क्रांतीकारक तर आहेच पण एक नविन तत्वज्ञान मांडणारा आहे. पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीपासून जवळपास २००० वर्षापासून एखाद्या मुक्या जनावराप्रमाणे राहणार्‍या शुद्र अतिशुद्र समुहाचा अडकलेला हुंकार मुक्त झाला या संदेशामुळेच! 
      म्हणून त्यांनी शिक्षणावर जास्त भर दिला.  १ जानेवारी १८४८ ला मुलींसाठी भिडे वाड्यात पहिली ऎतिहासिक शाळा काढली. त्यानंतर त्यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या. पुढे १८५२ पर्यंत अशा शाळांची संख्या १८ पर्यंत नेली.
      इंग्रज लोकांची अशी धारणा होती की जर वरिष्ट जातींना उच्च शिक्षण दिले तर झिरपत खालच्या जातीपर्यंत येईल. फुलेंनी या त्यांच्या योजनेला विरोध केला. त्याऎवजी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे करावे असे त्यांनी हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात मागणी केली.
      याची अंमलबजावणी मात्र राजश्री शाहु महाराजांनी त्याच्या राज्यात केली होती. जे पालक मुलांना शाळेत टाकणार नाहीत त्यांना ते दंड करीत.
      याचीच तरतुद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानात केली. परंतु खेदाची गोष्ट अशी की, ६० वर्षानंतर त्याचा कायदा होऊन १ अप्रिल २०१० पासून त्याची अंमलबजावणी झाली आहे. त्याची जर आधिच कायदा होऊन अंमलबजावणी झाली असती तर शिक्षणाच्या बाबतीत भारतामध्ये एक वेगळेच चित्र निर्माण झाले असते.
      मुलींना शिकविण्यास शिक्षक मिळत नव्हते. म्हणून त्यांनी सावित्रीलाच शिक्षिका बनविले. सावित्री ही भारतातील पहिली शिक्षिका ठरली. त्यानंतर त्या मुख्याध्यापिका झाल्यात. तेव्हा  भारतामध्ये मुख्याध्यापिका झालेल्या त्या पहिल्या स्त्री होत्या
      त्या घरुन शाळेत जायच्या तेव्हा रस्त्यातील ब्राम्हण लोकं तिला शेण, माती,दगडं मारुन अर्वाच्च शिव्या देत असत. मुलींनी शिकणे पाप आहे. धर्माच्या विरोधात आहे. जेवणाच्या ताटात अळ्या पडतात. आज कोणाच्या स्त्रिया शिक्षणामध्ये व इतर अन्य क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. असे असून सुध्दा या स्त्रिया सावित्रीमाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात काय? की त्या फक्त  काल्पनीक सरस्वतीला जीला कोणताही इतिहास नाही. अशा सरस्वतीलाच  देवता माणतात? याचे आश्चर्य वाटते.      ज्योतीबांना व सावित्रीमाईंना वडिलाने ब्राम्हणाच्या तक्रारीवरुन घराबाहेर काढले. तरीही ते डगमगले नव्हते.
       स्त्रि-पुरुष समानतेवर ताराबाई शिंदे यांनी लिहलेल्या पुस्तकाचा त्यांनी गौरव केला. त्यांनी स्वत:च्या जीवनात त्यांच्या विचाराचे अनुकरण केले. ज्योतीबांना अपत्य नव्हते. तेव्हा सगेसोयरे व प्रत्यक्ष पत्‍नी सावित्री हिने सुध्दा दुसरे लग्न करण्याची विनंती केली. तेव्हा ते सावित्रीना म्हणाले की, वैद्यकिय दृष्ट्या तुझ्यात जर ऊणीव असेल तर दुसरे लग्न करुन सवत आणण्यास  काही हरकत नाही. पण माझ्यात जर ऊणीव असेल तर तुला दुसरे लग्न करुन या घरात सवता आणावे लागेल, याला तुझी तयारी आहे कां? असा तिला प्रश्‍न केला. अशा प्रकारे समता कृतीत आणणारे ते युगपुरुष होते.
      शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी ज्योतीबा फुले रायगडावर गेले. तेथे झाडाझुडपात व काट्यात लपलेला शिवाजीची समाधी शोधून काढली. व तो परिसर साफ केला. त्यावर फुले वाहिली. ग्रामभटाने हे पाहिले व त्यांनी ते फुले पायांनी उधळले. त्यांनी शेतकर्‍यांचा रक्षणकर्ता असे शिवाजीराजे यांचे चित्र रंगवून पोवाडा रचला.
      जमीनदार व सावकारच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी शेतकर्‍यांची चळवळ चालविली. याच वेळेस त्यांनी शेतकर्‍यांचा आसुड हा ग्रंथ लिहीला
      नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये गिरणी कामगाराची  चळवळ सुरु केली होती.   
      १८७७ साली पडलेल्या दुष्काळात त्यांनी लहान मुलांसाठी अन्नछत्र उघडले होते.
      १८७७ साली चळवळीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘दीनबंधु’ नावाचे मुखपत्र सुरु केले. त्या मुखपत्राचे संपादक सुरुवातीला कृष्णराव भालेकर व नंतरच्या काळात नारायण मेघाजी लोखंडे होते.
      ज्योतीबा फुले यांनी प्रंचड लेखन केले. त्यांनी शेतकर्‍यांचे आसुड, गुलामगिरी, ब्राम्हणाचे कसब, तृतीय रत्‍न, शिवाजींचा पोवाडा, सार्वजनिक सत्य धर्म, अखंड इत्यादी अनेक प्रकारचे ग्रंथ, नाटक व काव्यलेखन केले. आयुष्याच्या अखेरीस ते आजाराने ग्रस्त असल्यामुळे त्यांचा उजवा हात काम करीत नव्हते. म्हणून त्यांनी डाव्या हाताने सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ लिहिला.
      पत्रकारिता, ग्रंथलेखन, साहित्यलेखन, काव्यलेखन, तत्वज्ञान, कामगार चळवळ, शेतकरी आंदोलन, स्त्री मुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन, जाती निर्मुलन, अनिष्ट प्रथा निर्मुलन आरोग्य, शिक्षण ईत्यादी अनेक स्तरावर महात्मा फुलेंची चळवळ प्रहार करत पुढे जात होती.
      सतीप्रथेच्या बाबतीत ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी जागृती निर्माण केली. बायको मेल्यावर तीचा  नवरा सता कां जात नाही असा ते प्रश्‍न विचारीत.
      ब्राम्हणांनी दोन मारेकर्‍यांना ज्योतिबा फुलेंना मारण्यासाठी सुपारी देऊन पाठविले होते. परंतू ज्योतिबा फुलेंच्या विनयशील वागणूकीमुळे ते दोघेही त्यांना शरण गेले. त्यातला एक धोंडीराम कुंभार याला काशीला पाठविले. तेथे त्यांनी ग्रंथाचा व  शास्त्राचा अभ्यास करुन पंडीत झाला. दुसरा रोडे रामोशी ज्योतिबाचा अंगरक्षक झाला.  
      राजेशाहीमध्ये सत्तेच्या सर्व किल्ल्या ब्राम्हणाकडेच होत्या. नांवाला क्षत्रिय राजे असले तरी त्यांची सत्ता ब्राम्हणाच्या सल्ल्याने चालत असायचे. राम आणि कृष्णा सारख्या देवांची सत्ता सुध्दा  ब्राम्हणाच्या सल्लामसलतीने चालत होता.
      ज्योतीबा फुलेंच्या काळात जरी सत्ता ब्रिटिशांची असली तरी त्यांच्या प्रशासनात  ब्राम्हणच होते. समाजातील उच्च स्थानामुळे सत्तेला आपल्या कलाप्रमाणे राबविण्यात ते यशस्वी झालेत. ऎनकेन प्रकारे सत्तेवर ब्राम्हणाचे वर्चस्व राहिल्यामुळे  सर्वसामान्य लोकं आणि शेतकरी नाडल्या जात होते. त्यांच्या अशिक्षितपणाचा, अडाणीपणाचा फायदा घेऊन कोर्ट कचेरीच्या कामात त्यांना कसे नागविल्या जात होते ते ज्योतीबांनी ‘ब्राम्हणाचे कसब’ आणि ‘शेतकर्‍यांचा आसूड’ या ग्रंथात लिहिले आहे.
      ब्राम्हणांनी मनुस्मृती व वेद निर्मान करुन ते देवनिर्मित आहेत असे लोकांना सांगितले. त्यामाध्यमातून चातुर्वण्य व्यवस्था व जातीची उच्च-निच अशी उतरंड तयार केली. त्यामुळे बहुजन समाज एकत्र येऊ शकला नाही. पाप, पुण्य, नशीब, दैव अशा भोळसर कल्पना त्याच्यात बिंबवील्यात.  त्यामुळे  ब्राम्हणांकडून होणारे अन्याय अत्याचाराला ते निमुटपणे सहन करीत असत.
      हिंदुधर्माच्या ग्रंथावर ते टिका करीत असे. रामायणाला लोकांची मने रिझविण्यासाठी त्यावेळच्या गप्पाड्या नाटक्यांनी कल्पून रचिलेला नितीहीन इतिहास होय. गोपीकांचे वस्त्र पळविणारा, गोपपत्‍नी राधेसोबत रममान होणार्‍या कृष्णाला महाभारतातील नितिभ्रष्ट पात्र समजत असत.
      विटलो खोट्या धर्मा।
      त्यागिले निच कर्मा॥ असे त्यांनी एका काव्यात म्हटले आहे.
      त्यांनी फक्त ब्राम्हणी समाज व्यवस्था किंवा हिंदु समाज व्यवस्था किंवा जाती व्यवस्था या विरोधात विद्रोह केला असे नसुन त्यांनी ज्या धर्म शास्त्रांचा आधार घेऊन  ही व्यवस्था निर्माण केली त्या धर्म शास्त्रांच्या सत्यतेच्या विरुध्द सुध्दा आव्हान दिले.
      ज्योतीबा फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथात रामायण व ‘भागवत’ यातील गोष्टी खर्‍या व विश्वसनिय नाहीत असे लिहिले आहेत. ‘रामायणात परशुरामाचे धनुष्य सिता जर सहज उचलून खेळत असेल व तोच धनुष्य उचलतांना जर रावण पडत असेल तर रावणापेक्षा सिता ही शक्तीशाली असली पाहिजे. मग रावण सितेला कसा काय पळवून नेऊ शकतो? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.
      तसेच ब्राम्हण असलेल्या भृगु ॠषीने विष्णु-आदिनारायणाला लाथ मारतो तेव्हा  भृगु ॠषीच्या पायाला लागले असेल म्हणून विष्णु त्याचे पाय चोळतो. याचा अर्थ ब्राम्हणाने प्रत्य्क्ष देवाला जरी लाथ मारली तरी तो सहन करतो. मग आपण तर शुद्रच आहोत, मग आपल्याला ब्राम्हणाने लाथ मारल्यानंतर हु की चु करु नये, असा त्याचा भावार्थ आहे असे फुलेंनी ग्रंथात लिहिले आहे.
      ‘ब्राम्हण हे ईराणी आर्यभट असून परकीय आहेत. त्यानी आपली सत्ता टिकविण्यासाठी वेदापासून पुराणापर्यंत निर्मिती केली. आक्रमण करुन आलेल्या आर्यानी शक्ती, विश्वासघात व धार्मिक प्रचार या माध्यमातून स्थानिक जनतेवर त्यांनी विजय मिळविला. विष्णुचे नउ अवतार म्हणजे आर्यांनी प्राप्त केलेल्या विजयाच्या निरनिराळ्या अवस्था होत्या’ असे ज्योतीबा फुलेंनी ग्रंथात लिहिले आहे.
      इंग्रज आहेत तोपर्यंत शुद्राने जल्दी करुन भटाच्या दास्यत्यातून मुक्‍त व्हावे असे गुलामगिरी या ग्रंथामध्ये लिहिले आहे.
      मनुस्मृतीचे कोणीतरी एखादा शुद्र दहन करील असे भाकीत ज्योतीबा फुले यांनी व्यक्त केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुची आज्ञा मानून २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे महाड येथे दहन केले
      शुद्र-अतिशुद्रास रसातळाला नेणारा त्यांचे जीवन, भावविश्व बेचिराख करणारा असा हिंदुधर्म असल्यामुळे त्यांनी ’सार्वजनिक सत्य धर्माची’ स्थापना केली.
      २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या स्थापनेमागे त्यांचे ३ उद्देश होते-
१. शुद्र व अतीशुद्र यांची ब्राम्हण पुरोहिताकडून होणारी पिळवणूक बंद करणे.
२. त्यांना त्यांच्या मानवी हक्काची व अधिकारांची शिकवणूक देणे. आणि
३. ब्राम्हणी शास्त्रांच्या आणि धार्मिक गुलामगिरीतून त्यांना मुक्त करणे.
हाच उद्देश समोर ठेउन ज्योतीबा फुलें यांनी आपल्या कार्याची दिशा आखली होती.
      सत्यशोधक समाजाची स्थापना करुन सनातन्याचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली. तसेच सत्यशोधक समाजाचे संघटन करण्याचे कार्य हाती घेतले. या संघटनेचा पुणे, मुंबई व खेडोपाडी प्रचार व प्रसार करण्य़ात आला.. ब्राम्हणाच्या हातून लग्न व इतर कोणतेही विधी करण्याचे काम या संघटनेने थांबवून आपल्याच कार्यकर्त्याद्वारे ते सत्यशोधक पध्दतीने विधी करीत असत. संघटनेने अनेक सत्यशोधक विवाह अत्यंत कमी खर्चात व साधेपाणाने घडवून आणले.
      ८ मार्च १८६४ रोजी त्यांनी शेणवी जातीच्या विधुर-विधवांचा पुनर्विवाह घडवून आणला.
      ख्रिचन,  मुस्लिम, मांग व  ब्राम्हण यांनी भावासारखे राहावेत असे फुले म्हणत असत. ख्रिस्त महमंद मांग ब्राम्हणासी।
      धरावे पोटाशी। बंधुपरी॥ यावरुन ते मानवतेवर किती प्रेम करायचेत ते दिसते. एकाच घरात एक भाऊ मुस्लिम एक ख्रिस्ती एक बौध्द असावा अशी त्यांची सर्व धर्म समभावाची व व्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना होती.
      ज्योतीबा म्हणतात-
      ‘थोडे दिन तरी मद्य वर्ज करा।
      तोच पैसा भरा। ग्रंथासाठी॥’
१८८० मध्ये त्यांनी दारु विक्रीला विरोध केला होता. 
      प्रत्येक सरकारी खात्यात ब्राम्हणेत्तर लोकं असल्याशिवाय जनतेला खरे सुख मिळणार नाही. म्हणून ते प्रत्येक खात्यात सर्व जातीच्या लोकांचा भरणा असला पाहिजे असे ते प्रतिपादन करीत. विशेषत: शिक्षण खात्यात सर्व जातीच्या शिक्षकांची नेमणुक करावी असे ते सरकारकडे मागणी करीत असे. म्हणजेच प्रत्येक जातीला त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात त्यांची भागिदारी असावी असा त्यांनी विचार मांडला होता. हाच विचार घेवून राजश्री शाहू महाराज यांनी त्याच्या संस्थानात ब्राम्हणेतरांना ५० टक्के आरक्षण दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गियांना आरक्षण मिळण्यासाठी कठोर संघर्ष केला व भारतीय घटनेमध्ये तशी तरतुद केली.
      २ मार्च १८८८ रोजी पुणे येथे ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सत्कार प्रसंगी ज्योतीबाने शेतकर्‍याच्या पोषाखात  जाऊन म्हणाले की, ‘येथे जमलेले हिरेमोती व मौल्यवान कपडे घातलेले लोक हे हिंदुस्थानचे खरे प्रतिनिधी नाहीत. खरा हिंदुस्थान खेड्यात आहे. तो उपाशी, गरीब, बेघर व उघडा-नागडा आहे. त्याला शिक्षण देणे आवश्यक आहे. ही जाणीव आपण आपली माता महाराणी व्हिक्टोरिया यांना करुन द्यावी.’
      ज्योतीबांनी  इंग्रज नोकरशाहीलाही धारेवर धरले होते. इंग्रज अधिकारी ऎषारामी बनला आहे. हाताखालील ब्राम्हण अधिकार्‍यावर विश्वास ठेऊन इंग्रज अधिकारी शेतकर्‍यांची पिळवणूक करीत असतो. इंग्रजी राजवटीत ब्राम्हण अधिकारी अधिकच जुलमी व भ्रष्टाचारी बनली आहे.
      ग्रामीण शेतकरी–कष्टकरी जनतेचे आता दुहेरी शोषण होत आहे. एकीकडे इंग्रज व दुसरीकडे ब्राम्हण यांच्याकडून त्यांची भयंकर नागवणूक होत आहे
      म्हणून ज्योतीबा फुले म्हणतात-
      ‘सत्ता तुझी राणीबाई। हिंदुस्तानी जागृत नाही॥
      जिकडे तिकडे ब्राम्हणशाही। डोळे उघ्डुनी पाही॥ .
      मुंबईच्या सभेत त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली.
      संत कबीर म्हणतात-
      सुखीया सब संसार है। खाये और सोये॥
      दु:खीया दास कबीरहै। जागे और रोये॥
      याचा अर्थ-
      सर्व लोकं खाण्यात व झोपण्यात सुख मानतात. कबीर मात्र यामुळे दु:खी होऊन जगत आहे व रडत आहे.  
      संत कबीर पुढे म्हणतात-
      बडा हुआ तो क्या हुआ। जैसे पेड खजुर॥
      पंछी को तो छाया नही। फल लागे अती दुर॥
      याचा अर्थ- ‘खजुराच्या झाडाप्रमाणे मोठा झालास म्हणून काय झाले. पाखरांना तर तुझी सावली मिळत नाही आणि तुझी फळे दुर असल्यामुळे ते पण कोणाला खाता येत नाही.’
      म्हणून महात्मा ज्योतीबा फुले यांच्या त्यागमय जीवनाचा बोध घेऊन सामाजीक कार्यामध्ये तन, मन धनाने सहयोग दिला पाहिजे. फुले-शाहु-आंबेडकरांच्या चळवळीचा सैनिक बणण्याऎवजी प्रतिक्रांतीवाद्याचा सैनिक बनून मानवतेचा बळी तर घेत नाही ना यावर आपण लक्ष ठेवायला शिकले पाहिजे हा बोध ज्योतीबा फुलेंच्या जीवन आणि कार्यामधून घेता येईल. 
      एक शेर असा आहे-
      मिला दे खाक मे हस्ती, गर कुछ मर्तबा चाहे।
      कि दाना खाक मे मिल गुले, गुलझार होता है॥
      याचा अर्थ आहे-
      जेव्हा धान्याचा एक दाना जमिनीत पुरतो. तेव्हा त्याचे झाड बनते. त्याला कणिस लागते. त्या कणसाला हजारो दाने लागतात. परंतु हे हजारो दाने निर्माण करण्यासाठी त्या एका दान्याला जमिनीमध्ये नष्ट व्हावे लागते. असं हे ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे जीवन होते.

—————————————————————————————————-

 सदर लेख लेखकांनी (आर. के. जुमळे) दिनांक ११.०४.२०१० रोजी भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन, विद्युत वसाहत दिपनगर येथे सार्वजनिक महात्मा ज्योतीबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून दिलेल्या भाषणावर आधारीत आहे.

शासनकर्ती जमात बनण्याची बाबासाहेबांची संकल्पना कशी पूर्ण होणार?

30 Jun

दिनांक १६.०५.२००९ रोजी लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला. त्यात आंबेडकर चळवळीतील प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, आर.एस.गवई यांचा मुलगा डॉ. राजेन्द्र गवई, सुलेखा कुंभारे, गंगाधर गाढे, टी.एम. कांबळे, प्रा.यशवंत मनोहर असे व ईतर लहानमोठ्या नेत्यांना हार पत्करावी लागली.
      म्हणून आंबेडकर जनतेने याची नोंद घेऊन आत्मपरिक्षण करणे व त्यावर उपाययोजना करणे आवश्यक नाही काय? या पराभवाला आंबेडकरी नेत्यांची फुटीर वृती जेवढी कारणीभूत आहे, तेवढीच आंबेडकरी जनता कारणीभूत नाही काय? विशेषत: समाजातील शिकलेला वर्ग याला मुख्यत: जबाबदार आहे असे वाटते.
      डॉ.बाबासाहेबांचे खाजगी सचिव नानकचंद रत्तू यांनी लिहिलेल्या ’बाबासाहेबांच्या आठवणी’ या पुस्तकात ’शेवटचे दिवस’ या प्रकरणात बाबासाहेब म्हणतात, “मला लोकांना शासनकर्ती जमात म्हणून बघायचे आहे. जे समाजातल्या इतर घटकांसोबत मिळून समानतेने राज्य करतील. मी जे काही अथक प्रयत्‍न करुन मिळविले आहे, त्याचा लाभ आपल्या काही शिकलेल्या लोकांनी उठविला आहे. पण त्यांनी आपल्या अशिक्षित बांधवाकरीता सहानुभूती ठेवून काहीही केलेले नाही. त्याद्वारे त्यांनी आपली नालायकी सिध्द केली आहे. माझे जे काही स्वप्न होते ते त्यांनी धुळीस मिळविले आहे. ते स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी जगत आहेत. त्यांच्यामधून कुणीही समाजासाठी कार्य करायला तयार नाहीत. ते स्वत:च्या नाशाच्या मार्गाने चालले आहेत. मी आता माझे लक्ष खेड्यापाड्यांमध्ये राहणार्‍या अशिक्षित बहुजन समाजाकडे देणार आहे. जे आजपर्यंत पिडीत आहेत आणि आर्थिक दृष्ट्या न बदलता तसेच आहेत.” ( Reminiscences and Remembrances of Dr.B.R.Ambedkar with Babasaheb till the end, page No.191)
      त्याचप्रमाणे दिनांक १२ व १३ फेब्रुवारी १९३८ रोजी मनमाड येथे झालेल्या जी.आय.पी. रेल्वे कामगार परिषदेसमोर भाषण करतांना बाबासाहेब म्हणाले होते की, ’कामगारांनी राजकीय उद्दीष्टांसाठी सुध्दा संघटीत झाले पाहिजे.’
            म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार कामगार संघटना व शिकलेला वर्ग यांची वाटचाल तशी होतांना दिसून येत नाही. म्हणून राजकीय अपयश आपल्या पदरी पडत आहे असे वाटते. ज्याप्रमाणे हिंदूत्ववादी सर्व संघटना त्यांच्या राजकीय पक्षाच्या मागे संपूर्ण ताकद लावतात. तशी ताकद आंबेडकरी संघटनांनी निर्माण करुन आपल्या राजकीय पक्षाच्या मागे लावतांना दिसत नाहीत. ही खरी शोकांतीका आहे. बहुजन समाजातील अस्तित्वात असलेल्या संघटना एकतर आंधळी असतात किंवा पांगळी असतात. त्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही. बुध्दी असते तर ताकद नसते, ताकद असते तर बुध्दी नसते. अशी अवस्था बहुतेक संघटनांची झाली आहे. बुध्दीला कुठे जळते ते दिसते; परंतु विझविण्यासाठी धावण्याची ताकद नसल्यामुळे पांगळी असते. तसेच धावण्याची ताकद असली तरीही कुठे जळते ते दिसत नाही. म्हणून आंधळी असते. अशा आंधळ्या-पांगळ्या संघटनांचा सुळसुळाट झाल्यामुळे पाहिजे ते यश दृष्टोपतीस येत नाही.
            आपल्या कामगार संघटनांनी ज्यामध्ये शिकलेला असा बुध्दीवादी वर्ग आहे, त्यांनी समाजाचे राजकीय प्रबोधन करुन आपला वेळ, बुध्दी व पैसा याचा आपल्या कामासोबतच राजकीय कामासाठी सुध्दा वापर करुन गैरराजकीय मुळे पक्के करायला पाहिजे होते. परंतु तसे केलेले दिसत नाही. त्याउलट त्यांनी आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्षाची बांधीलकी तोडून मनुवादी सत्ताधारी पक्षाला जवळ केलेले आनेकदा दिसून येते. आपल्या वैयक्तिक प्रगतीमध्ये त्यांनी आंबेडकरी चळवळीचा फायदा घेतलेला असतो परंतु त्याचा उपयोग मात्र मनुवादी सत्ताधारी पक्षाच्या चळवळीला होतो आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही.
      आंबेडकरी चळवळीचे विरोधक असलेले सत्ताधारी पुढारी मार्गदर्शक म्हणून आपल्या अनेक कार्यक्रमात आंमत्रित करीत असल्याने ते आपले विचार पेरुन आंबेडकरी सुशिक्षित वर्गाला प्रभावित करीत असल्याचे आपण अनेकदा पाहत असतो. बाबासाहेबांची ’शासनकर्ती जमात’ बनण्याची संकल्पना या शिकलेल्या वर्गांनी समजावून घेऊन व ते समाजाला समजाऊन सांगण्याचे कार्य हा वर्ग करीत नसल्यामुळे समाज आज भरकटत जाऊन दिशाहीन होऊन, कोणत्याही पक्षाच्या वळचणीला जाऊन उभा राहत असलेला आपण पाहतो आहे.
      समाजातील बहुसंख्य लोकं उदासीन, निष्क्रिय व अजागृत झालेले दिसत आहेत. एकतर ते मतदार म्हणून नाव नोंदनी करीत नाहीत किंवा असेल तर मतदान करीत नाहीत. कोणीही निवडून आला तर मला काय त्याचे? अशी नकारात्मक भावना जोपासीत असतात. हरणार्‍या उमेदवाराला मत देऊन मी माझे मत कशाला वाया घालऊ? त्यापेक्षा ज्यांची हवा असेल त्यालाचा मत द्यावे अशीच त्यांची धारणा बनलेली असते जरी तो उमेदवार आंबेडकरी पक्षाचा नसला तरी! अशा प्रवृती व समजुतीमुळे स्वत:ची ताकद निर्माण करण्याची उर्मी तो हरवून बसतो.
            बाबासाहेब म्हणायचे की, ’मिठ-मिरचीसाठी आपले मत विकू नका. कारण तुमच्या मतामुळे सरकार बनत असते.’ परंतु आपण पाहतो की, काही लोकं सर्रासपणे मते विकत असतात. बाबासाहेबांचे पुतळे, विहार बांधण्यासाठी सुध्दा पैशाची मागणी करायला मागेपुढे पाहत नाहीत. म्हणजे आता प्रत्य्क्ष बाबासाहेबांना सुध्दा पुतळ्यांच्या रुपात विकायला काढल्याचे चित्र कुठे कुठे दिसत आहे. धनदांडगे विरोधी उमेदवार दारु पाजतात, पैसे देतात, कपडे-लत्ते देतात अशा लालचेला काही लोकं बळी पडून आपले बहुमोल मते त्यांना देऊन निवडून आणायला मदत करीत असतात. हे एक कटू सत्य आहे. काही ठिकाणी समाजातील सरपंच, पोलिसपाटील किंवा इतर अशा सन्मनिय पदावर काम करणारे व ज्यांच्या मागे गठ्ठा मतदान असते अशा लोकांना इतर लक्षाचे लोकं ऎनकेन प्रकारे दबावात आणून स्वकिय पक्षांच्या उमेदवाराविरुध्द मते देण्यास भाग पाडीत असतात.
            आपल्याच आंबेडकरी पक्षाला मतदान करण्यास प्रवृत न करता शिवसेना-भाजपा निवडून येतील म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करा. तसेच दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस खरे जातीयवादी आहेत असे म्हणून शिवसेना-भाजपाला मतदान करा. अशा प्रकारची विसंगत भुमिका आपलेच पुढारी घेत असतील तर आपली स्वत:ची ताकद कधितरी निर्माण होईल कां? अशी रास्त शंका निर्माण होत आहे.
      बाबासाहेब म्हणाले होते ते खरेच आहे! ते म्हणाले होते की, ’माझ्या गैरहजेरीत स्वाभिमानशून्य लोक दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिऊन तुमची दिशाभूल करतील. तेव्हा अशा लोकांपासून सावध रहा.’
      म्हणून अशा नेत्यांना व लोकांना बाबासाहेबांनी दाखविलेल्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कुणीतरी प्रय‍त्‍न करायला नको कां? म्हणून आता समाजातील शिकलेला बुध्दिवादी, साहित्यीक, नोकरदार, निवृत कर्मचारी/अधिकारी, युवावर्ग, महिला, व्यावसायिक इत्यादी सर्व वर्गांनी एकजूटीने व एकमताने पुढाकार घेऊन राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी सक्रिय होणे आवश्यक झाले आहे. नव्हे ती आता काळाची गरज झाली आहे.
      तिकीटासाठी, मंत्रीपदासाठी दुसर्‍याकडे हात पसरणे व ते मिळाले नाही म्हणून आंदोलन करणे, कलर्स टी.व्ही. चॅनेलमध्ये रामदास आठवले यांना बिग बॉस मध्ये घेतले नाही म्हणून आंदोलन करणे, निवडणुक जिंकता आली नाही म्हणून कुणाच्यातरी विरोधात आंदोलन करणे अशा प्रकारच्या आंदोलनामुळे आंबेडकरी चळवळीचा स्वाभिमान दुखावला जात आहे याचे भान आंदोलनकर्त्या लोकांना कसे राहत नाही, याचे वाईट वाटते. आंदोलन कशासाठी करावे याचे तारतम्य राहिलेले दिसत नाही. इतके अध:पतन व अवमूल्यन होत असतांना गप्प बसून उघड्या डोळ्याने सर्वांना पाहावे लागत आहे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. आतातरी याचकाची, मागण्याची प्रवृती सोडून स्वत:ची ताकद निर्माण केल्याशिवाय आपण देणार्‍यांच्या पंगतीत कसे जावून  बसणार?
त्यासाठी सर्वांनी विचार विनिमय करुन ठोस अशी यंत्रणा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणे आता काळाची गरज झाली आहे. तरच बाबासाहेबांचे ’शासनकर्ती जमात’ बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्याच्या दिशेने आपणास वाटचाल करता येईल. नाहीतर प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस ’येरे माझ्या मागल्या’ असेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल व ’शासनकर्ती जमात’ कधीतरी बनू का? असा प्रश्‍न नेहमीसाठी अनुत्तरीतच राहील!
टीप:- सदर लेख ’दैनिक विश्व सम्राट, मुंबई’ या वृतपत्रात दि. ०८ जुलै २००९ रोजी प्रकाशीत झाला.
      या लेखावर अनेक लोकांच्या मोबाईलद्वारे प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातील काही प्रतिक्रिया येथे नमुद केल्या आहेत.
१. लेख सर्वांनाच आवडला. काहींनी आमच्या मनात जे होते तेच तुम्ही लिहिलेत असेही सांगितले. .
२. शासनकर्ती जमात बनण्यासाठी पुढे काय करायला पाहिजे याबाबत काहींनी चर्चा केली.
३. काहींनी विचारले की, कोणत्या पक्षाला अथवा गटाला समाजाने समर्थन करावे ते लेखात लिहिले नाही.
४. तुमचा लेख किती लोकं वाचतील? कारण समाजामध्ये वाचक वर्ग फार कमी आहेत असे काही लोकांनी सांगितले.
५. समाजातील किती बुध्दिवंत शासनकर्ती जमात बनण्यासाठी प्रतिसाद देतील याबाबत शंकाच आहे असेही काही म्हणालेत.
६. काहींनी विचारले की, त्यात ऎक्याबाबत कां लिहीले नाही? एका कार्यकर्त्यांनी मला ठनकावून विचारले की, तुम्ही अकोल्याचे ना? मग बाळासाहेबांनी (प्रकाश आंबेडकर) ऎक्य करावं म्हणावं!
७. काहींनी सांगितले की, सध्याचे राजकारण अशिक्षित व बेरोजगार लोकांकडे असल्यामुळे त्यांनी हे क्षेत्र पोटापाण्याचा व त्यांच्या कुटूंबाच्या येणार्‍या पिढ्यांसाठी धन कमाविण्याचा धंदा बनविला आहे.
८. एकाने डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल व भारतीय बौध्द महासभेमध्ये लोकांनी काम करावे असे सांगितले.
९. एकाने डॉ. बाबासाहेब गेल्यानंतर त्यांच्या सारखा एकही नेता झाला नाही. जे काही पुढारी झालेत त्यांचेमध्ये आत्मविश्वास, नैतिकता व त्यागी वृती राहिली नाही म्हणून आंबेडकरी चळवळ पुढे जाऊ शकली नाही असे सांगितले.

शासनकर्ती जमात बणण्यासाठी काय करायला पाहिजे?

28 Jun

आपल्या समाजात आता मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, प्राध्यापक, साहित्यिक, सरकारी-निमसरकारी, प्रशासकीय उच्चपदस्थ सेवेत असेलेले अथवा निवृत झालेले अनेक बुध्दिवंत व विचारवंत निर्माण झाले आहेत. हे लोक आंबेडकरी चळवळीचे लाभार्थी आहेत. ’समाजाला आणीबाणीच्या काळात दिशा देण्याचे काम करतो तो बुध्दिजिवी’ अशी व्याख्या डॉ. बाबासाहेबांनी ’ऍन निहिलेशन ऑफ कास्ट’ या पुस्तकात केली आहे. सध्या आणीबाणीची वेळ निश्चित आली आहे. आता समाजामध्ये हजारो वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स झाले असल्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेप्रमाणे समाज प्रगल्भ झालेला आहे.
      डॉ. बाबासाहेब राजकारणाचे महत्व आणि निकड समजावून सांगतांना म्हणतात, आपल्या प्रगतीसाठी जिच्यावर आपण अवलंबून राहू शकू अशी एकच गोष्ट आहे व ती म्हणजे राजकीय शक्ती हस्तगत करणे. आपल्या मुक्तीचा तो एकच मार्ग आहे. याबद्दल तर मला मुळीच संदेह नाही व या शकिशिवाय आमचा सर्वनाश होईल.(अ.भा.दलित वर्ग परिषद नागपूर १८,१९ जुलै १९४२)
      अस्पृष्य समाजाला स्वातंत्र्य, इज्जत व माणुसकी पाहिजे असेल, तर तुम्हाला राजकारण काबीज करावयास पाहिजे. सध्या आपल्याकडे कोणतेच साधन नाही. म्हणूनच आपला नाश व अवनती झाली आहे. आपणास उठण्याचीही ताकद राहिलेली नाही. आपली समाज संख्याही पण अल्प आहे व तिही विस्कटलेली आहे. ही सर्व परिस्थिती सुधारुन घेण्यासाठीच आपल्या हाती राजकीय सत्ता पाहिजे. (पुणे ०४.१०.१९४५चे भाषण, भाषण खंड १ संपादक- गांजरे पृष्ठ्य १३१)       तुकड्यासाठी दुसर्‍याच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ समाजावर येऊ नये, पोटापाण्याचा प्रश्‍न सुटावा, सन्मानाने राहावयास मिळावे यासाठीच राजकीय सत्तेची जरुरी असते आणि ती मिळविण्यासाठीच आम्ही झगडत आहोत. (भाषण खंड १ संपादक- गांजरे पृष्ठ्य १५३)
      शासनकर्ती जमातीवर अन्याय, अत्याचार होत नाहीत. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर गोळीबार हत्याकांड किंवा खैरलांजीसारखे प्रकरणे मराठा अथवा ब्राम्हणांच्या घरी होत नाहीत. कारण ते शासनकर्ती जमाती आहेत. म्हणूनच आतातरी आपले डोळे ऊघडणे आवश्यक झाले आहे.
      शासनकर्ती जमात बणण्याचे ध्येय गाठण्यासाठी आर.पी.आय पक्षाचे सर्व गट, बहन मायावतीचा बहुजन समाज पक्ष, आदिवासी-ओ.बी.सी.चे पक्ष असे समान व फुले, शाहु, आंबेडकरी विचाराचे सर्व पक्षांनी-गटांनी एकत्रीत येऊन येणारी विधानसभा लडविणे आवश्यक आहे. परंतु यासाठी या पक्षांचे, गटाचे नेता वर्ग तयार होतील असे वाटत नाही. कारण एक्याचे वारे मध्ये-मध्ये वाहायला लागले की, नंतर ते कधी विरुन जातात तेही कळत नाही. म्हणजे हे एक्य कालापव्यय करणारे व मृगजळासारखे ठरतात. म्हणून आता समाजाने एकत्र येऊन या नेत्यांवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे.      
      याबाबत जर सर्व बाबतीत व्यवहार्य असेल तर खालीलप्रमाणे उपाययोजना करुन पाहायला काही हरकत नाही. येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबर २००९ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूका जाहिर होणार आहे. त्यापुर्वीच आपण विचारविनिमय करुन काहीतरी ठोस असा निर्णय घेऊन तशी कार्यवाही होणे गरजेचे झाले आहे.
      प्रत्येक ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा अशा तीन स्तरावर (शहराच्या ठिकाणी वार्ड स्तरावर) कोणत्याही गट अथवा पक्षाचा सभासद नसलेल्या प्रतिष्टित व्यक्तिंची निवड समिती तयार करावी.
      निरनिराळ्या आणि फुले, शाहु, आंबेडकरी पक्षांचे सभासद असलेल्या व निवडणूकीला उभे राहू इच्छिणार्‍या कार्यकर्त्यांची, उमेदवारांची पंचायत समिती स्तरावरावरील निवड समितीने छानणी करुन अशी यादी जिल्हा परिषद निवड समितीकडे पाठवावी. त्यांनी सुध्दा त्या यादीची छानणी करुन ती विधानसभा निवड समितीकडे पाठवावी. त्यांनी त्या यादीची यादीची छानणी करुन दोन नांवे निवडावीत. त्यापैकी एक उमेदवार प्रमुख व दुसरे नांव डमी राहील म्हणजे प्रमुख उमेदवाराच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाल्यास त्याच्या ऎवजी डमी उमेदवाराला उभे राहता येईल. ही दोन्ही नांवे ज्या गटाचे, पक्षाचे असेल त्या गटाच्या प्रमुखाकडे पाठवावीत. त्यानंतरची तिकीट देण्याची व निवडणुकीची पुढील कार्यवाही त्या गटाने, पक्षाने करावी. अशा निवड केलेल्या उमेदवाराला आपसातील हेवेदावे विसरुन सर्वांनी मान्यता द्यावी व त्याच्या विरोधात कुणीही आपल्या गटाचा/पक्षाचा उमेदवार उभा ठेवू नये. त्यामुळे सर्वमान्य उमेदवार मिळेल व मतविभागणी टळेल. अशा उमेदवाराला बहुजन समाजातील अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, इतर मागासवर्गिय जाती व अल्पसंख्याक धार्मिक समाज सुध्दा समर्थन देऊ शकतील. समाजातील सर्व मतदारांनी मतदान करण्याकडे व कोणाचेही मत वाया जाऊ नये, याकडे जागृत लोकांनी लक्ष ठेवावे.
      आपल्या समाजातील नोकरीदार वर्ग जसे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, विद्युत मंडळाचा तांत्रिक कर्मचारी, आरोग्य विभागाचा कर्मचारी, शेती विभागाचा कर्मचारी असे अनेक विभागाचे कर्मचारी खेड्यापाड्यापर्यंत काम करीत आहेत. अशा लोकाना खेड्यापाड्यात मान असतो. म्हणून त्यांनी जमेल त्या मार्गाने सक्रियपणे पण गुप्त पध्दतीने प्रचार व प्रसार करावा. कारण खेड्यापाड्यात गठ्ठा मतदान असते. असे जर वातावरण आपण निर्माण करु शकलो तर समाजामध्ये नविन उत्साह निश्चितच संचारेल आणि समाज एकजूट व्हायला वेळ लागणार नाही.
समाजातील सर्वांनी तन, मन, धनाने शक्ती निर्माण करुन संपुर्ण ताकद या उमेदवाराच्या मागे लावावी व अशा प्रकारे ’बहुजन शासनकर्ती जमात अभियान’ राबवावे.
      सदर योजनेवर विचारवंतांनी विचारविनिमय करावा. जर सदर योजना व्यवहार्य वाटत असेल तर कार्यवाही करण्याकरिता पाऊल उचलावे. जर सदर योजना व्यवहार्य वाटत नसेल किंवा त्यात काही तृटी असतील तर त्या दूर करावेत अथवा ज्यांच्याकडे त्याऎवजी दुसरी पर्यावी योजना असेल तर तसे त्यांनी मांडावेत.
      शेवटी डॉ. बाबासाहेबांचे २० जुलै १९४२ चे अखिल भारतीय दलित वर्ग परिषद नागपूर येथील प्रेरणादायी भाषण सर्वांनी लक्षात ठेवावे. त्यांनी म्हटले होते की, तुम्हाला माझ्या संदेशाचे अंतीम शब्द हेच आहे की, शिका, संघर्ष करा आणि संघटीत रहा. स्वत:च्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि कधिही निराश होऊ नका. म्हणजे डॉ. बाबासाहेबांची शासनकर्ती जमात बणण्याची संकल्पना वास्त्वात उतरविण्यास कठीण जाणार नाही.
टिप:- ’शासनकर्ती जमात बणण्याची संकल्पना कशी पुर्ण होणार?’ हा माझा लेख वृतरत्‍न सम्राट मध्ये दिनांक ८ जुलै २००९ रोजी प्रकाशित झाल्यानंतर मी पुन्हा ’शासनकर्ती जमात बणण्यासाठी काय करायला पाहिजे? असा वरील लेख पाठविला. परंतु सदर लेख त्यांनी स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवा’ असे शिर्षक देऊन दिनांक ११.०८.२००९ रोजी छापला.
Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 361 other followers

%d bloggers like this: