Archive | स्पर्धा परीक्षा RSS feed for this section

स्पर्धा परिक्षा आणि भाषा

4 Jun

स्पर्धा परीक्षेमध्ये भाषेप्रती विद्यार्थी किती सजग आहे हे समजून घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने नविन अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी भाषेचे आकलन व आंतरवैयक्तिक संवाद, संभाषण तसेच इतर इंग्रजी भाषिक कौशल्य हा विषय अनिवार्य केला आहे.
            केंद्रीय लोकसेवा आयोगाचा यंदाचा निकाल पाहता महाराष्ट्रातील मराठी मुलांनी चांगली आघाडी घेतलेली दिसून येते. मात्र योग्यता असूनही केवळ इंग्रजी भाषेच्या भितीमुळे माघार घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी नाही.
            एक सर्वसाधारण अनुभव लक्षात घेता स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात प्रसार माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती मिळते. मग स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण करुन आपणही एक प्रशासकीय अधिकारी व्हावे अशी आशा मनामध्ये निर्माण होते. त्यातून पुढे उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचे मासिकं आणि वर्तमानपत्रात  आलेल्या मुलाखती वाचल्यावर सर्वप्रथम त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली जाते. अशा उमेदवाराचे शिक्षण जर इंग्रजी माध्यमातून  किंवा वैद्यकीय  अथवा  अभियांत्रिकी शाखेतून झाले असेल तर आपल्यामध्ये असा गैरसमज निर्माण होतो की, मी जर असाच इंग्रजी माध्यमातून किंवा इंग्रजी माध्यम असलेल्या अभ्यासक्रमातून शिक्षण घेतले असते  तर  मी सुध्दा या परीक्षेची तयारी करु शकलो असतो. त्यामुळे ’स्पर्धा परिक्षा’ हा आपला प्रांत नव्हे असा एक न्युनगंड मनात निर्माण होतो. त्यामुळे  इंग्रजीबाबत वाटणारी अकारण भिती मराठी मुलांना मागे ओढण्यास कारणीभूत ठरते.
            इंग्रजी विषयी वाटणार्‍या भितीचे आणखी काही कारणे पाहिली असता असे दिसून येईल की, मराठी माध्यम घेऊन शिकणारा एक सर्वसामान्य विद्यार्थी केवळ एक आवश्यक विषय म्हणून इंग्रजी या विषयाकडे बघत असतो. आणि त्यात कसे काय पास होता येईल इतपत त्या विषयाची तयारी केलेली असते. योग्य मार्गदर्शनाच्या अभावी असे सारे घडत असते. पुढे इंग्रजी विषयाची भिती कायमस्वरुपी मनामध्ये घर करुन बसते. स्पर्धा परीक्षेची इंग्रजी भाषा ही जरी शाल्येय किंवा महाविद्यालयीन इंग्रजी भाषेपेक्षा काही प्रमाणामध्ये वेगळी असली तरी तिच्याबद्दल भिती दूर करणे आणि हळू-हळू नाहीसी करणे आपल्याला शक्य आहे.
            स्पर्धा परिक्षा; मग त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या असो; की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या असो, त्यात इंग्रजी हा विषय अनिवार्य आहे. म्हणून या विषयाचा तिरस्कार न करता त्याचेशी मैत्री करुनच आपल्याला आपले भविष्य घडवावे लागेल अशी खुनगाठ वांधूनच आपल्याला या परीक्षेच्या प्रवाहामध्ये पोहायला उतरावे लागेल. इंग्रजी ही सरावाने अवगत होणारी भाषा आहे. ती जर येत नसेल तर आजच्या स्पर्धात्मक युगात टिकणे कठिन आहे.
      या भाषेबाबत आणखी एक चुकीची आणि भ्रामक कल्पना अशी की, ही भाषा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांनाच येते. आता एका संशोधनानुसार असे आढळले की, प्रतिभाशाली होणे ही एक नैसर्गिक कला आहे. कौशल्य आहे. ही कला, कौशल्य आपण शिकू शकतो. आत्मसात करु शकतो.
            या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात ही आपल्याला एखाद्या दैनिक इंग्रजी वृतपत्राच्या वाचनापासून करावी लागेल. सुरुवातीला अवघड वाटणार्‍या इंग्रजी शब्दासाठी डिक्शनरीचा वापर करावा. अशा प्रकारे आपला इंग्रजीचा शब्दसंग्रह देखील वाढेल. मात्र त्याला वेळेचे बंधन असले पाहिजे म्हणजे इतर विषयाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही. सुरुवातीला भाषेचे आकलन होण्यासाठी वेळ लागेल. पण काही कालावाधीत सरावाने ते आपल्याला सहज शक्य होईल. घरामध्ये आपल्या कुटूंबीयासोबत सोप्या व सहज इंग्रजीमध्ये बोलण्याचा सराव करावा. आपल्या मित्र-मैत्रणीच्या ग्रुपमध्ये एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये एखाद्या महत्वाच्या सामाजिक किंवा राजकीय विषयाला अनुसरुन किमान एक तास तरी चर्चा करावी. त्यामध्ये व्याकरणदृष्ट्या होणार्‍या चुका टाळाव्यात. काळ आणि त्याचा उपयोग, शब्दाच्या जाती आणि त्याचा उपयोग यांचा योग्य रित्या सराव करावा.
            असे म्हणतात की आपण ज्या भाषेमध्ये विचार करतो तीच भाषा चांगली बोलतो आणि लिहतो सुध्दा! तसेच त्याच भाषेमध्ये आपण आपले विचार योग्य प्रकारे व्यक्त करतो. म्हणून एखाद्या विषयाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्या दृष्टीने त्या विषयाचा विचार देखील इंग्रजीमधून करावा. तशी सवय स्वत:ला लावून घ्यावी. या पध्दतीचा उपयोग आपल्याला इंग्रजीमध्ये निबंध या घटकासाठी निश्चीतच होईल, माझा वैयक्तिक अनुभव पाहता मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी याच पध्दतीने निबंध या विषयामध्ये २०० पैकी १५० गूण घेतलेले आहेत. कोणत्या विषयाचा कसा व किती अभ्यास करावा ही प्रत्येकाची वेगवेगळी पध्दत असू शकते.
            मी बारावीला विज्ञान विषय घेतला होता. त्यानंतर मात्र मी विधीशाखेकडे वळलो. विधीशाखेचा संपूर्ण अभ्यासक्रम इंगजीमध्ये असल्यामुळे इंग्रजीची खरी ओळख मला इथेच झाली. मला सर्व विषय इंग्रजीमध्ये समजून घेणे क्रमप्राप्त झाले होते. सुरुवातीला अवघड वाटायचं. पण हळू-हळू मात्र सार्‍या संकल्पना इंग्रजीमधून लक्षात यायला लागल्या. डॉ. आंबेडकर लॉ कॉलेज, औरंगाबादच्या कॉलेजचे प्राध्यापक व माझे सहकारी मित्रांचे मला भरपूर सहकार्य लाभले.
            एखाद्यावेळेस गंमत म्हणून आपण काहीतरी करावं आणि त्या घटनेने आपल्या आयुष्याला कलाटणी मिळावी असेच काही माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये घडले. कॉलेजच्या तिसर्‍या वर्षाला असतांना एका सराव चाचणी परीक्षेमध्ये अभ्यास झालेला नव्हता आणि परीक्षा देणे अनिवार्य होते. तेव्हा गंमत म्हणून एका पेपरमध्ये तत्कालीन सामाजिक विषयावर पूर्ण उत्तरपत्रिका निबंधवजा लिहून टाकली; ज्याचा मूळ विषयाशी काहीही संबंध नव्हता. कुणीही तपासू नये हा त्या लिहण्यामागे माझा उद्देश होता. मात्र घडले उलटेच!
            परिक्षक प्राध्यापकाच्या हातात उत्तरपत्रिका  पडल्यावर त्यांना वेगळे काहीतरी लिहिलेले दिसल्यावर कुतूहल म्हणून वाचले. आणि लगेच मला ऑफिसमध्ये बोलाविले. मी मनाची तयारी करुन गेलो की, आता आपला खरपूस समाचार घेतला जाणर! मात्र वास्तविक चित्र मला वेगळेच दिसले. तेथे बसलेल्या इतर प्राध्यापक वृदांमध्ये माझ्या लेखणावर चर्चा सुरु होती. ते मला म्हणाले, “तू तुझ्या संकल्पना अत्यंत मार्मिकपणे स्पष्ट करु शकतोस. तुझ्या अंगी ती क्षमता आहे, तर तू केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबद्दल विचार कर. तू त्या परीक्षेमध्ये छान पेपर लिहू शकशील.”
            त्यावेळी माझ्या मनामध्ये रोवल्या गेलेल्या त्या बिजाचे आज मी आय.आर.एस. (भारतीय राजस्व सेवा) मध्ये सेवा देत आहे. हे एका रोपट्यात झालेले रुपांतर आहे. खर्‍या अर्थाने मला त्या प्राध्यापक वर्गानींच स्पर्धा परीक्षेची प्रेरणा दिली असेच म्हणावे लागेल. नाहीतर माझ्या सोबतचे कोणी वकील झालेत तर कोणी न्यायाधिश झालेत.
            पांच वर्षांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून विधी शाखेची पदवी घेऊन मी बाहेर पडलो. तो हाच विचार मनामध्ये घेऊन की, मला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये जायचे आहे. त्यासाठी मी तत्वज्ञान व इतिहास हे वैकल्पिक विषय निवडले. इतिहासामध्ये एम.ए. करण्यासाठी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, दिल्ली यांची चाचणी परीक्षा उत्तीर्ण केली. तेथे सुध्दा तेथील वातावरणाने इंग्रजी विषयी माझी बरीच भिती दूर झाली.
            इंग्रजी भाषेचे योग्य प्रकारे आकलन झाले तर आपण त्या भाषेतील उत्तमोत्तम साहित्य वाचू शकतो. त्या भाषेमध्ये आपण चांगल्या प्रकारे त्या विषयाच्या संकल्पना स्पष्ट करु शकतो. नव्हे साहित्य वाचनामुळेही आपल्या संकल्पना चांगल्या प्रकारे स्पष्ट होत जातात. म्हणून मराठी, हिंदी भाषेच्या पाठोपाठ इंग्रजी भाषेचे साहित्य वाचनामध्येही  गोडी निर्माण करणे आवश्यक आहे. जी भाषा सार्वत्रीक संवादासाठी अथवा परीक्षेसाठी अनिवार्य आहे, तिच्यावर प्रभुत्व मिळविणे ही काळाची गरज आहे.
            प्रशासकीय सेवेमध्ये आल्यावर इतर देशातील किंवा खात्या अंतर्गत अथवा बाहेरील अधिकारी वर्गासोबत आपल्याला इंग्रजीतून संभाषण करावे लागते. शासनाचे सर्व परिपत्रके इंग्रजीमधून प्रसिध्द होत असतात. प्रत्येक राज्यात स्थानिक भाषा बोलली जात असते. स्थानिक भाषा चटकन अवगत होत नाही. म्हणून इंग्रजी भाषेमध्ये विचारांची देवानघेवान केली जाते. त्यामुळे इंग्रजी भाषेला फार महत्व आहे. म्हणून ही भाषा अवगत होणे अत्यंत गरजेचे आहे. भाषा शिकण्याचे तंत्र आपण अवगत केले तर आपण कोणतीही भाषा शिकू शकतो, लिहू शकतो किंवा वाचू शकतो.
            मागे वळून पाहिले असता भाषेवर प्रभुत्व मिळविलेली विचारवंताची अनेक उदाहरणे दिसून येतील. आपण आपल्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण ठेवले पाहिजे. मराठीतून शिक्षण घेवून त्यांनी इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत असतांना वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी इंग्रजीमध्ये ’दी प्राब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध लिहीला. पुढे त्यांनी इंग्रजीमध्ये अनेक ग्रंथ लिहिले. परदेशातील पी.एच.डी, डी.एस.सी. बार अ‍ॅट लॉ सारख्या पदव्या ग्रहन केल्या. एवढेच नव्हे तर गोलमेज परिषद, भारतीय संविधान परिषदेमध्ये सुध्दा इंग्रजीमध्ये संवाद साधला. म्हणून इंग्रजी भाषा ही कुणाचीही मक्तेदारी राहिलेली नाही तर तीला आंतरराष्टीय भाषेचं स्थान प्राप्त झालेलं आहे. जागतिकीकरणाच्या युगामध्ये इंग्रजी  भाषा एकमेकांना जोडणारी आहे. त्याला आता पर्याय नाही हे सत्य आपण स्विकारलेच पाहिजे! म्हणून इंग्रजी भाषेविषयीची भिती मनातून हद्दपार केली पाहिजे.
            मुख्य परीक्षेचा मराठी माध्यमातून पेपर लिहून देखील अनेक विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत आहेत. त्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात करुन ते उत्तम प्रशासकीय सेवा देत आहेत. तथापी नव्या पॅटर्ननुसार यापुढे उच्चतम दर्जाचे इंग्रजीवरील प्रभुत्व मिळविणे फायद्याचेच ठरेल. ग्रामीण आणि निमशहरी भागातून येणार्‍या उमेदवाराचे शिक्षण हे मराठी माध्यमातून झाले असले आणि इंग्रजी साधारण असली तर अशा विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा आत्मसात करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल.
            शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत. आपण मुलाखत आपल्या मातृभाषेमध्ये देऊ शकतो. आपण आपले मुलाखत देतांना आपल्या भाषेच्या उत्तराचे रुपांतर इंग्रजीमध्ये करणारे तेथे ’ट्रांन्सलेटर’ बसलेले असतात. तरीही आपण आपले विचार इंग्रजीमध्ये मांडण्याचा प्रयत्‍न करावा; अशी मुलाखतकार निवड मंडळाची अपेक्षा असते. पण तसा त्यांचा आग्रह मात्र नसतो. त्यामुळे त्यावेळी आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येत नाही म्हणून आपली नामुष्की होत नाही. त्यामुळे इंग्रजी भाषेची भिती बाळगू नये.
            इंग्रजीची भिती बाळगणार्‍या सर्व मराठी मुलांना हेच सांगावेसे वाटते की, एक आव्हान म्हणून इंग्रजीचा स्विकार करा. कधिही नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचार केल्यामुळे आपल्या मांसपेशीवर तसेच परिनाम होऊन जीवनात नैराश्य येते. म्हणून नेहमी प्रसन्न, साहसी आणि आशावादी बनून रहा.
      असे म्हणतात की, पाण्यात पडल्यावर पाण्याची भिती निघून जाते. कारण तेव्हा आपल्या चोहीकडे पाणीच पाणी असते. त्या प्रमाणे एकदा तुम्ही इंग्रजी भाषा अत्मसात करण्याचा वसा घेतला तर आपल्या सभोवताली इंग्रजीचे वलय दिसू लागेल. आपला आत्मविश्वास वाढून त्याचा चांगला परिणाम इतर विषयांमधे निश्चितच दिसून येईल. फक्त कमालीची जिद्द, भयानक चिकाटी, अतूट सयंम, अपार ध्येय, खडतर प्रयत्‍न व कठोर मेहनत हवी! संत तुकाराम महाराजांचा सल्ला लक्षात ठेवावा. ते आपल्या अभंगात म्हणतात, “असाध्य ते साध्य, कराया सायास, करावे अभ्यास, तुका म्हणे.” मग काही अवघड नाही.
            तात्पर्य: आपल्या व्यक्तिमत्व विकासातही त्याची भर पडेल आणि एक दिवस या स्पर्धा परीक्षेच्या महासागरामध्ये आपण यशाचा किनारा नक्किच गाठलेला असेल. मग तो दिवस, ती वेळ, तो क्षण आपलाच असेल…! फक्त आपलाच असेल…!!
प्रज्ञाशील रा. जुमळे,
 E.mail pradnyasheel@gmail.com
टिप:- सदर लेख  दैनिक वृतरत्न सम्राट मध्ये दि. १०.०७.२०११ रोजी प्रकाशित झाला. तसेच दैनिक महानायक, मुंबई   मध्ये  प्रकाशित झाला.
%d bloggers like this: