Archive | सामाजिक RSS feed for this section

धन्य ती रमाई !

31 May

‘रमाई’ म्‍हणजे आमचे बाबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रामू!  आम्हा सर्व कुटूंबाची कुटूंबवत्‍सल माता. सर्व आंबेडकरी लेकरे आणि लेकींची माता. अगदी अशिक्षित असलेली रमाई विद्याविभूषित व प्रकांड पंडित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत संसाराचा गाडा ओढत होती. ही गोष्ट खरं तर अत्यंत कमालीची आणि नवलाईची वाटते.

विश्वभूषण, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि बहुजन समाजाचे मुक्तिदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्फूर्ती, चेतना, प्रेरणा म्हणजे रमाई !

लहानपणीच भीमरावाशी तिचा विवाह झाला. साऱ्या संसाराचा भार ती पेलीत होती. कुटुंबातील सासरे रामजीबाबा, मीरा आत्या, दीर आनंदराव, जाऊ लक्ष्मीबाई. पुतण्या मुकुंद, मुलगा यशवंत, भाऊ शंकर, बहिण गौरा आणि स्वत: रमाई एवढा मोठा परिवार सांभाळताना रमाईला किती कसरत करावी लागत असेल ! एवढेच नव्हे तर बाबासाहेबांच्या कार्यातील सहकारी कार्यकर्त्यांची सरबराई करणे आलेच ! ती सर्वांसाठी कणाकणाने झिजत होती. त्‍यासाठी ती कधीही कुरकुरली नाही की तक्रारही केली नाही. ती राबराब राबली. तिच्यावर शेणगोळा करून गोवऱ्या थापून संसाराचा खर्च चालविण्याचा दुर्धर प्रसंग आला; तरी डगमगली नाही. कष्‍टाचा धडा तर लहानपणी असतांनाच ती शिकली होती. आईवडिलांच्‍या निधनानंतर तर काका-मामांच्‍या घरी कष्‍टाचा धडा तिला मिळाला.

अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले भिमराव आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्‍टर होण्‍यासाठी अपार कष्‍ट घेऊ  लागला. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्‍यास करु लागला. त्‍याच वेळी रमाईने आपल्‍या निष्‍ठेने, त्‍यागाने आणि कष्‍टाने स्‍वतःच्‍या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. स्‍वतःची रमेश, गंगाधर, इंदू आणि राजरत्‍न ही अपत्‍ये औषधावाचून हे जग सोडून गेले. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. त्यावेळी त्या माउलीचे ह्र्दय दु:खाने किती फाटले असेल ! तिला किती शारीरिक आणि मानसिक वेदना झाल्या  असतील ! पण परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या साहेबांना मात्र रामूने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू  दिली नाही.

डॉ. बाबासाहेबांना शिक्षणासाठी संपूर्ण वेळ मिळावा म्‍हणून घरातील गरीबीची परिस्थिती त्‍यांना कधीही कळू दिली नाही. बाबासाहेब एका पत्रात लिहितात, ‘रामू, मी वणव्यातून धावण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.’ त्यामुळे बाबासाहेब आपल्या ध्येयाप्रती किती ठाम आणि निष्ठुर होते ते कळते. डॉ. बाबासाहेबांनी रमाईला लिहायला-वाचायला शिकविल्यामुळे रमाई बाबासाहेबांना पत्र लिहून पाठवित होती. डॉ. बाबासाहेबही त्‍यांना पत्रातून रमाईच्‍या त्‍यागाबद्दल लिहित असत. रमाईमुळेच ते अधिक शिकू शकले, असे कृतज्ञतापूर्वक पत्रातून लिहू लागले. त्‍याचा रमाईला अपार आनंद होई.

धारवाडला हवापालट करण्‍यासाठी यशवंताला घेऊन रमाई गेल्‍या असता, त्‍यांनी तेथील वसतिगृहाला भेट दिली. जेवण नसल्‍यामुळे मुले उपाशीच होती. रमाईने हे ओळखले आणि स्वतःचे दागिने अधिक्षकाकडे देऊन मुलांना जेवण बनविण्‍यासाठी सामान आणले व स्‍वतःच्‍या हाताने मुलांना जेवण वाढले. जेव्‍हा ही घटना डॉ. बाबासाहेबांना कळाली, तेव्‍हा त्‍यांनी रमाईचे कौतुकच केले.

डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्‍यांच्‍या स्‍वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगले लुगडे नव्हते म्हणून तिने छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या. ते बोटीतून उतरताच त्‍यांच्‍या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्‍यांना भेटत होते, हस्‍तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्‍यांच्‍या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्‍यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्‍हणाली, तुम्‍हाला भेटण्‍यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्‍हाला अगोदर भेटणे योग्‍य नाही. मी तर तूमची पत्‍नीच आहे. मी तुम्‍हाला कधीही भेटू शकते. रमाईंचे इतके मोठे मन होते. म्‍हणूनच डॉ. बाबासाहेब आपले अंगीकृत काम करु लागले.

महाडच्‍या सत्‍याग्रहाच्‍या वेळी रमाईनेही सत्‍याग्रहास येण्‍याचा हट्ट धरला. कारण डॉ. बाबासाहेबांना खूनाच्‍या धमक्‍या येत होत्‍या. रमाईचे मन आतल्‍या आत कुरतडत होते. परंतु डॉ. बाबासाहेबांनी रमाईला महाडला येण्‍यास मनाई केली. डॉ. बाबासाहेबांना काही दगाफटका होऊ नये म्‍हणून रमाई उपास-तापास, व्रतवैकल्‍या करु लागली. परंतु डॉ. बाबासाहेबांच्‍या काळजीमूळे आणि उपासातापासांमुळे रमाई खंगली, आजारी पडली. त्‍यातच २७ मे १९३५ रोजी त्या सर्वांना सोडून निघून गेल्या. बाबासाहेबांसारख्या धीरोदात्त हिमालयाची सावली निघून गेली. रामजीबाबांनी केलेली रमाईची निवड ही किती सार्थ होती, हे तिच्‍या एकूण चारित्र्यावरून दिसून येते.

एकदा रमाईने पंढरपूरला जाण्‍याचा हट्ट धरला. डॉ. बाबासाहेब रमाईला म्‍हणाले, ‘रामू, मी तुझ्यासाठी नवीन पंढरपूर निर्माण करीन.’ बाबासाहेबांनी त्यानंतर निर्माण केलेले पंढरपूर पाहण्यासाठी रमाई मात्र राहिल्या नव्हत्या.

बाबासाहेबांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ रमाईच्या प्रिय स्मृतीला समर्पित केला. त्यांनी अगदी मनमोकळेपणाने कबूल केले होते की. ‘रामू’मुळेच ते घडले आहेत. रामूने जर त्याग केला नसता आणि स्त्री हट्ट धरला असता, तर कदाचित ते फक्त भिवा किंवा भीमा म्हणून राहिले असते. ते सर्वांचे बाबासाहेब झाले नसते आणि विद्येचे डॉक्टरही झाले नसते.

भारतात ज्या महनीय स्त्रिया होवून गेल्यात त्या म्हणजे तथागत गौतम बुध्द यांच्या सहचारिणी माता यशोधरा, दुसऱ्या राष्ट्रपिता ज्योतीराव फुले  यांच्या सहचारिणी क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले व तिसऱ्या म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी रमाई माता यांचा उल्लेख केल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही.

महिलांनी त्यागमूर्ती माता रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी त्याग केला पाहिजे अशी प्रेरणा मिळेल. तरच आपल्या जीवनाचं सार्थक होईल. रमाईच्या कर्तव्याचा, सहनशक्तीचा, निष्ठेचा आदर्श घेवून आपले जीवन व्यतीत करायला पाहिजे. त्यांच्यामुळेच बाबासाहेब आपले कार्य पार पाडू शकले. त्यांच्यामुळेच आपल्या जीवनात सुख आणि समृध्दीचा प्रवाह निर्माण झाला. रमाई स्वत: झिजल्या पण सुगंध मात्र समाजाला देवून गेल्यात. रमाईमाता आणि बाबासाहेबांनी आपल्या संसाराची राखरांगोळी करून समाजाचं जीवन मात्र फुलविलं, याची आपण सतत जाण ठेवली पाहिजे.

अशा मायाळू, दयाळू, कनवाळू, ममताळू, कष्‍टाळू रमाईला विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम ! 

 आर.के.जुमळे, अकोला

 

 

 

आतातरी शहाणपण शिकले पाहिजे

24 Oct

दिनांक १९.१०.२०१४ रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला. त्यात आंबेडकरी पक्षाची दाणादाण उडाली. बहुजन समाज पक्षाने नेहमीसारखेच याही वेळेस खाते उघडले नाही. रिपब्लिकन पार्टी-आठवले गटाने भाजपशी युती केल्याने त्यांना फार मोठी आशा वाटत होती. पण लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुध्दा पडेल जागा मिळाल्याने त्यांची यावेळीही फसगत झाली. युतीत एक सत्य मात्र उमगलं की भलेही आंबेडकरी जनता कॉंग्रेस-भाजपला मतदान करीत असतील; पण कॉंग्रेस-भाजपचे लोक मात्र आंबेडकरी पक्षाला मतदान करीत नाहीत. याचा अनुभव आठवले यांनी चांगलाच घेतलेला दिसतो.

पूर्वी आठवले गटाने राष्ट्रवादी-कॉंग्रेस सोबत सोयरिक केली होती. पण शिर्डीच्या लोकसभा मतदारसंघात आपटी खाल्ल्याने राष्ट्रवादी-कॉंग्रेसला सोडून शिवसेनेचा पदर धरला. आठवलेने शिवसेनेकडे राज्यसभेची खासदारकी मागितली; पण त्यांनी ती दिली नाही. मग भाजपला दया येऊन आठवलेला खासदार बनविले. आता ते केंद्रात मंत्री बनण्यासाठी आतुर झाले आहे. यावेळेस नाही; पण पुढील विस्तारात पाहू असे नरेंद्र मोदीने सांगितल्याने मंत्रीपदाचं गाजर आठवलेंना सतत खुणवीत आहे. जेव्हा भाजप व शिवसेनेचा काडीमोड झाला; तेव्हा शिवसेनेला जोडलेली भीमसेना तोडून भाजपला जोडली.

जोगेंद्र कवाडे यांनी कॉंग्रेसशी युती केली पण स्वतःचे उमेदवार उभे न करता विधान परिषदेच्या आमदारकीच्या बदल्यात संपूर्ण पक्ष कॉंग्रेसला बांधून टाकला. रिपब्लिकन पार्टी गवई गटाचीही तीच गत झाली. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाचे बळीराम शिरस्कार  बाळापुर मतदार संघातून निवडून आल्याने प्रकाश आंबेडकरांची थोडीफार लाज राखली.

एकंदरीत कोणत्याही आंबेडकरी पक्षांचा राजकीय रथ पुढे गेला नाही. उलट प्रत्येक निवडणुकीत जसा मागे जातो तसाच याहीवेळेस मागेच गेला. भाजप-शिवसेना यांची युती व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी तुटली तरी या सुवर्णसंधीचा फायदा आंबेडकरी नेते व जनतेला घेता आला नाही. अशी दुरावस्था आंबेडकरी पक्षांची का होते? याचा विचार कधीतरी आंबेडकरी जनतेने करायला नको का? हटवादी नेते जर एकत्र येत नसतील तर जनतेने एकत्र का येऊ नये?

भाजप आणि शिवसेना अलग अलग निवडणुकीत उतरून सुध्दा त्यांचे आमदार मागच्या पेक्षा जास्त निवडून आणलेत. त्यामागील कारणे काहीही असोत; पण ते जागृत आहेत ऐवढे मात्र खरे! हिंदुत्ववादी चळवळ पुढे पुढे जात आहे आणि आंबेडकरी चळवळ मात्र मागे मागे पडत आहेत, असं हे चित्र आता निर्माण झालं आहे. प्रत्येक  विचारधारेचे मोजमाप हे त्यांच्या राजकीय शक्तीवरून होत असते. त्यामुळे हिंदुत्ववादी चळवळ वाढत आहे व त्यामानाने आंबेडकरवादी चळवळ मागे पडत आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

त्यांची राजकीय शक्ती निश्चितच उतरोत्तर वाढत आहे. म्हणून त्यांचा दुस्वास वाटणे, हेवा वाटणे किंवा मत्सर वाटणे साहजिक जरी असले; तरी त्यांच्या परिश्रमाचे त्यांना मिळालेले ते फळ आहे. कारण त्यांचा nनरेंद्र मोदी देशाचा प्रधानमंत्री असूनही वेळ काढून महाराष्ट्रात २७ पेक्षा जास्त सभा घेतात आणि दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांचे तर अगणित सभा होतात…! आमची बहिण मायावती सद्याच्या स्थितीत मुख्यमंत्री नसतांना सुध्दा त्यांना महाराष्ट्रात केवळ पाच-सहा सभा घेता येऊ शकल्या! भाजपची पितृ संघटना असलेली आर.एस.एसचे कार्यकर्ते समाजाच्या प्रत्येक स्तरात रात्रंदिवस प्रचार करीत असतात. ते सारे माध्यमे, साधने कामाला लावतात. म्हणून त्यांना यश मिळणे साहजिकच आहे. म्हणून त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. कारण प्रत्येकजण आपापल्या चळवळीचे काम करीत असतो. ते त्यांच्या चळवळीचे काम करतात. आपण मात्र आपली चळवळ वाढविण्यासाठी काय करतो; हाच खरा प्रश्न आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनांक २० जुलै १९४२च्या नागपूर येथील अखिल भारतीय दलित परिषदेत इशारा देतांना म्हणाले होते की, ‘हिंदू समाज व्यवस्थेने ज्या मानवीय अधिकारांची गळचेपी आणि लांडगेतोड केली, त्यांच्या पुनर्स्थापनेसाठी हा संघर्ष आहे. जर ही राजकीय लढाई हिंदू जिंकले आणि आम्ही हरलो तर ही दडपशाही आणि लांडगेतोड तशीच सुरु राहील.’ वर्णवर्चस्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आर.एस.एस.) ही संघटना संपूर्ण भारतावर विळखा घालायला निघाली आहे. त्यांनी नरेंद्र मोदीचा ओ.बी.सी. मोहरा पुढे करून देश ताब्यात घेतला व आता एकेक राज्य पादाक्रांत करीत आहे. २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र आणि हरियानाला ताब्यात घेतले. आतापर्यंत २९ राज्यांपैकी ९ राज्यावर त्यांनी आपली हुकुमत प्रस्थापित केली  आहे.  

ब्राम्हणवाद्यांचे खरे शत्रू आंबेडकरवादी व गैर हिंदू म्हणजे मुस्लीम व ख्रिचन आहेत. त्यांना काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष अगदी जवळचे आहेत. काँग्रेसला पर्याय म्हणून त्यांनीच जनसंघाचे नाव बदलवून भाजप ठेवले. बाटली बदलविली; पण लोकांना धार्मिक व आध्यात्मिक नशेत झिंगत ठेवणारी दारू तीच आहे. त्यामुळेच हिंदुत्वाचा आर.एस.एसचा अजेंडा राजकीय सत्तेच्या माध्यमातून राबविण्यासाठी त्यांनी भाजपला वाढविणे सुरु केले आहे.

ब्राम्हणांनी सत्तेत वाटा घेण्यासाठी बहिण मायावतीला २००७ साली उत्तरप्रदेशची सत्ता सोपविली होती. पण मुस्लीम वर्गांनी ब्राम्हणांच्या घुसखोरीमुळे बहिण मायावतीची साथ सोडून मुलायमसिंहच्या समाजवादी पक्षाकडे गेले. त्यामुळे २०१२ मध्ये बहिण मायावतीची राज्यातील  सत्ता गेली. नंतर २०१४च्या लोकसभेच्या निवडणूकीत नरेंद्र मोदीच्या रूपाने ब्राम्हणवाद्यांना मोहरा मिळाल्याने, त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे ८० पैकी ७१ खासदार निवडून आणण्याची किमया केली. मायावतीला मात्र एकही खासदार निवडून आणणे शक्य झाले नाही.

मागच्या काही निवडणुकांवरून एक बाब स्पष्ट होते की, या देशात मनुवाद्यांना द्विपक्षीय राज्यपद्धतीचा पायंडा पाडायचा आहे. कॉंग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष आलटून पालटून नेहमीसाठी सत्तेवर व विरोधीपक्ष राहतील, अशी व्यवस्था त्यांना करायची आहे. त्यामुळेच कॉंग्रेसने  मुद्दामच जनतेचा रोष ओढवून केंद्राची व आता महाराष्ट्राची सत्ता भाजपाला सहज हस्तांतरित केली आहे. या देशात द्विपक्षीय राज्यपद्धती निर्माण व्हायला पाहिजे; असे वक्तव्य लालकृष्ण अडवानी यांनी मागे एकदा केले होते. त्यानुसारच भाजप व कॉंग्रेसची वाटचाल सुरु आहे असे म्हणावे लागेल.

मनमाड येथील दिनांक १६.०१.१९४९च्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘खरी लोकशाही निर्माण करावयाची असल्यास आज हजारो वर्षे डोक्यावर नाचत असलेला वरचा वर्ग खाली व समाजातील खालचा वर्ग वर गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही. क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले. आसासह चाक पूर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांती होऊ शकत नाही, ते चक्र आम्हीच फिरवू.’ याचा अर्थ क्रांतीचे हे चक्र फिरविण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांवर सोपविली.

त्यासाठी त्यांनी सांगून ठेवले की, ‘आमच्यावर होणारा जुलूम दुसरा कोणी नाहीसा करणार नाही. तो आपला आपणच नाहीसा केला पाहिजे. यासाठी कायदेमंडळात आपले योग्य प्रतिनिधी पाठविले पाहिजे. ते तेथे जाऊन आपल्या हक्कांसाठी झगडतील.’ (अहमदाबाद येथील दिनांक २०.११.१९४५ चे भाषण )

मग ही जबाबदारी कोणी उचलली पाहिजे? याचे उत्तर बाबासाहेब मनमाड येथील दिनांक १६.०१.१९४९च्या भाषणात देतात. ते म्हणाले होते की, ‘एखाद्या समाजाची उन्नती त्या समाजातील बुद्धिमान, होतकरू व उत्साही तरुणांच्या हाती असते.’

म्हणजेच समाजातील बुद्धिजिवी, होतकरू व तरुण वर्गाने पुढाकार घेणे बाबासाहेबांना अभिप्रेत होते. बुद्धिजिवी वर्गाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर “जातिभेद का उच्छेद” (Annihilation of Caste) या पुस्तकात लिहितात की, “प्रत्येक देशामध्ये बुद्धिजिवी वर्ग प्रभावशाली असतो. जो सल्ला व नेतृत्व देऊ शकतो. देशातील अधिकांश जनता विचारशील व क्रियाशील नसतात. ते बुद्धीजीवी वर्गाचे अनुकरण करून त्या मार्गाने जात असतात. म्हणून त्या देशाचे समाजाचे भविष्य बुद्धिजिवी वर्गावर अवलंबून असते. बुद्धिजिवी वर्ग चांगला किंवा वाईट असू शकतात. बुद्धिजिवी वर्ग इमानदार, स्वतंत्र व निष्पक्ष असेल तर समाजाला संकटकाळी मार्ग काढून योग्य मार्गदर्शन करू शकेल. समाजाला सहाय्य करू शकेल. पथभ्रष्ट लोकांना ते चांगल्या मार्गावर आणू शकतात. समाजाला आणीबाणीच्या काळात दिशा देण्याचे काम करतो, तो बुध्दिजिवी” अशी व्याख्या बाबासाहेब करतात. सध्या आणीबाणीची वेळ निश्चित आली आहे. कारण ज्या राजकीय पक्षाचा प्रभाव असतो, त्या पक्षाच्या विचारधारेवर आधारित चळवळ वाढत असते. हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब राजकारणाचे महत्व आणि निकड समजावून सांगतांना म्हणतात, “आपल्या प्रगतीसाठी जिच्यावर आपण अवलंबून राहू शकू अशी एकच गोष्ट आहे व ती म्हणजे राजकीय शक्ती हस्तगत करणे. आपल्या मुक्तीचा तो एकच मार्ग आहे. याबद्दल तर मला मुळीच संदेह नाही व या शक्तीशिवाय आमचा सर्वनाश होईल.” (अ.भा.दलित वर्ग परिषद नागपूर १८,१९ जुलै १९४२)

      “अस्पृष्य समाजाला स्वातंत्र्य, इज्जत व माणुसकी पाहिजे असेल, तर तुम्हाला राजकारण काबीज करावयास पाहिजे. सध्या आपल्याकडे कोणतेच साधन नाही. म्हणूनच आपला नाश व अवनती झाली आहे. आपणास उठण्याचीही ताकद राहिलेली नाही. आपली समाज संख्याही पण अल्प आहे व तिही विस्कटलेली आहे. ही सर्व परिस्थिती सुधारुन घेण्यासाठीच आपल्या हाती राजकीय सत्ता पाहिजे.” (पुणे ०४.१०.१९४५चे भाषण, भाषण खंड १ संपादक- गांजरे पृष्ठ १३१)   “तुकड्यासाठी दुसर्‍याच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ समाजावर येऊ नये, पोटापाण्याचा प्रश्‍न सुटावा, सन्मानाने राहावयास मिळावे यासाठीच राजकीय सत्तेची जरुरी असते आणि ती मिळविण्यासाठीच आम्ही झगडत आहोत.” (भाषण खंड १ संपादक- गांजरे पृष्ठ १५३)

      हे खरं आहे की, शासनकर्ती जमातीवर अन्याय, अत्याचार होत नाहीत. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर गोळीबार हत्याकांड किंवा खैरलांजीसारखे प्रकरणे मराठा अथवा ब्राम्हणांच्या घरी होत नाहीत. कारण ते शासनकर्ती जमाती आहेत. म्हणूनच आतातरी आपले डोळे ऊघडणे क्रमप्राप्त  झाले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेप्रमाणे समाजामध्ये हजारो वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स निर्माण झाल्याने समाज आता निश्चितच प्रगल्भ झालेला आहे यात वाद नाही. हे सारे उच्चपदस्थ लोक आंबेडकरी चळवळीचे लाभार्थी आहेत, हे कुणीही नाकारू शकत नाहीत.

महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघांचे विश्लेषण केल्यास केवळ बौद्धांचे २५-३० टक्के मतदान असलेले ३१ मतदार संघ व १०-२०  टक्के मतदान असलेले १५८  मतदार संघ महाराष्ट्रात आहेत. म्हणून या मतदार संघात तरी आंबेडकरी मतदार निश्चितच प्रभाव पाडू शकतात एवढे मात्र नक्की! मुस्लीम मतदारांचे ध्रुवीकरण होवून एम.आय.एमचे दोन आमदार महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेत. मग बौध्द मतदारांचे ध्रुवीकरण होवून बौद्धांचे आमदार का निवडून येऊ शकत नाहीत?

बौध्द समाजाने खरेच एकजुटीने मतांची टक्केवारी वाढवून काही प्रतिनिधी निवडून आणणे सुरु केले तर परिवर्तनवादी व समविचारी पक्ष, मागासवर्गीय संघटना जे आरक्षणाच्या एका सूत्रात बांधले गेले आहेत व जे हजारो वर्षापासून ब्राम्हणवाद्यांचे बळी आहेत; असे नक्कीच या बौध्द समाजासोबत येतील यात वाद नाही. त्याशिवाय मुस्लीम, शीखांसारखे अल्पसंख्याक वर्ग सुध्दा जुळायला वेळ लागणार नाही. असे जर घडले तर या देशात एकतर द्विपक्षीय शासन पद्धतीत भाजप आणि आंबेडकरी असे दोनच पक्ष राहतील किंवा भाजप-कॉंग्रेस नंतर आंबेडकरी पक्षाचा तिसरा पर्याय उपलब्ध होईल, यात शंका नाही. बाबासाहेबांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन विसर्जित करून व्यापक असा रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याच्या मागे तोच उद्देश समोर ठेवला होता.

शेवटी बाबासाहेबांना कळकळीने नागपूर येथील दिनांक २०.०७.१९४२ भाषणात सांगावे लागले की, “तुम्हाला माझ्या संदेशाचे अंतिम शब्द हेच आहेत की “शिकवा, संघर्ष करा आणि संघटीत रहा. (Educate, Agitate and Organize) स्वत:च्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा (have a faith in yourselves) आणि कधीही निराश होऊ नका, (and never lose hope)” यातही बाबासाहेब या तीन सूत्रांमध्ये पहिल्या सूत्रात ‘शिकवा’ असे म्हणतात. म्हणजे स्वतः शिकल्याशिवाय इतरांना शिकविता येणार नाही. शिकल्यानंतर इतरांना शिकवा असा त्याचा अर्थ! दुसऱ्या सूत्रात संघर्ष करा. म्हणजे स्वत:ला व समाजाला संघर्षासाठी तयार करा. तिसऱ्या सूत्रात स्वत: संघटीत होवून समाजाला संघटीत करा.

बुद्धम शरणंम गच्छामी, धम्मम शरणंम गच्छामी व संघम शरणंम गच्छामी यातील मतितार्थ तोच आहे. बुध्द म्हणजे ज्ञान म्हणजेच शिकणे व शिकविणे आलेच! धम्म म्हणजे योग्य जीवन जगण्याचा मार्ग म्हणजेच संघर्ष आला! या मार्गावर चालणारा संघ म्हणजे भिक्खू संघ म्हणजेच संघटना! असाच अर्थ बाबासाहेबांनी त्रिशरणाचा घेऊन ‘शिकवा, संघर्ष करा व संघटीत व्हा” असा मुलमंत्र दिला.  

याचाच उपयोग प्रत्येकांनी आपल्या जीवनात करून आपली जबाबदारी उचलली पाहिजे. वकिलांनी समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला कायदेशीररित्या अटकाव निर्माण केला पाहिजे. डॉक्टरांनी समाजाचे स्वास्थ सांभाळलं पाहिजे. इंजिनिअर्सने समाजाच्या विकासाचे प्रोजेक्ट तयार केले पाहिजे. समाजाची बांधणी केली पाहिजे. शिक्षक-प्राध्यापकांनी समाजाला शिकवलं पाहिजे. व्यावसायिक व उद्योगांनी संघटना चालविण्यासाठी निधी मजबूत केला पाहिजे. कारकून व कार्यालयीन नोकरदारांनी पारदर्शकरीत्या हिशोब ठेवला पाहिजे. पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी समाजाला सुरक्षा प्रदान केली पाहिजे. उच्च पदस्थ शासकीय अधिकारी यांनी सरकारच्या योजनेचा फायदा समाजापर्यंत पोहचविला पाहिजे. पटवारी, ग्रामसेवक यांनी खेड्यापाड्यात राहाणाऱ्या शेवटच्या माणसाला जागवलं पाहिजे. साहित्यिक, वृतपत्र (वृत्तरत्न सम्राट, विश्वरत्न सम्राट, जनतेचा महानायक, लोकनायक इत्यादी) व टी.व्ही.चॅनेल (लॉर्ड बुध्दा टी.व्ही व आवाज इंडिया) यांनी समाजाला जागवून, त्यांचे प्रबोधन करून सुसंस्कारित केले पाहिजे. ही यादी आणखी लांबू शकते. सांगायचे एवढेच की जर कामाची वाटणी करून प्रत्येक वर्गाने इमानेइतबारे आपापली जबाबदारी पार पाडली तर समाजाचा विकास होऊन राजकीय दृष्ट्या प्रगल्भ होण्यास वेळ लागणार नाही.

पुढील पाच वर्षे यापद्धतीने मशागत केली तर येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत चांगले पिक यायला काही हरकत राहणार नाही असे वाटते.

मग उठा मित्रांनो…! बाबासाहेबांना पुन्हा एकदा वचन द्या…! जसं बाबासाहेब हयात असतांना त्यावेळेसच्या लोकांनी दिलं होतं तसं…! त्यासाठी त्यांच्या नागपूर येथील दिनांक २०.०७.१९४२च्या भाषणाची आठवण करा. ज्यात बाबासाहेबांनी म्हटले होते की, ‘आपल्या अधिकारांसाठी शक्ती, ऐक्य आणि खंबीरपणे उभे राहण्याची हमी, आपल्या अधिकारांसाठी संघर्षाची आणि जेव्हापर्यंत आपण आपले हक्क मिळवीत नाही तोपर्यंत परत न फिरण्याची हमी, मला हवी आहे. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडाल असे मला वचन द्या!’

म्हणूनच प्रसिद्ध दलित साहित्यिक दया पवार मोठ्या कळकळीने म्हणतात की, “प्रखर तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला. ज्या काजव्यांचा आम्ही जयजयकार केला, ते केव्हाच निस्तेज झालेत. आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा आणि क्रांतीचा जयजयकार करा !”

दिनांक- २३.१०.२०१४

मोबाईल- ९३२६४५०५०६ 

पत्ता- रामी हेरीटेज, आर.टी.ओ. जवळ अकोला

 

 

 

 

आंबेडकरी जनतेनी एकजूट व्हावे

28 Sep

शिवसेना व भाजप यांची २५ वर्षापासून अधिक काळ असलेली युती अखेर तुटली. हे दोन्हीही पक्ष हिदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले होते. १९९५ मध्ये त्यांनी महाराष्ट्राची सत्ता मिळवली होती. इतर वेळेस ते विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून वावरत होते. आताच्या २०१४च्या लोकसभेत प्रचंड मताने निवडून येवून केंद्रातील सत्ता हस्तगत केली. सत्तेच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रात व देशात मनुवादी चळवळ आणखी बळकट केली. याच काळात बाबरी मस्जिद पाडून देशात हिंसाचाराचे व दहशतवादाचे वातावरण निर्माण केले.

दुसरीकडे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची सुध्दा गेल्या १५ वर्षापासूनची आघाडी संपुष्टात आली. ह्या दोन्हीही घटना आंबेडकरी जनतेला अत्यंत महत्वाच्या आहेत.

आता २०१४च्या येणाऱ्या विधानसभेत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रमुख पक्षात व इतर लहान पक्ष जसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामकरी पक्ष, समाजवादी पक्ष यांच्यात जोरदार चुरस निर्माण होईल. त्यामुळे मतांची विभागणी होणे अपरिहार्य आहे. याचा फायदा  आंबेडकरी जनतेनी निश्चितच घ्यायला पाहिजे. अन्यथा वेळ निघून गेली की साप निघून गेल्यावर फरकांडी झोडपत बसण्यासारखे होईल.

आता फुटीर व तत्वहीन आंबेडकरी नेत्यांची मात्र फरफट सुरु झाली आहे. इकडे जावे की तिकडे जावे अशा संभ्रमात ते सापडले आहेत. भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनाही प्रचारात मिरवायला निळा झेंडा पाहिजे असते. त्यामुळे ते प्रत्येक गटाला आमिष दाखवीत आहे. मलिंदा कुठे खायला मिळेल याची चाचपणी केल्यावर हे आंबेडकरी गट कुठेतरी घरोबा करणार आहेत, ऐवढे मात्र नक्की!  परंतु आपण सर्व गटांनी एकत्र येऊन निवडणूका लढवाव्यात अशी कुणाचीही मानसिकता नाही. त्यामुळे कोणतेही गटनेते एकत्र येतील अशी सुतराम शक्यता नाही. नेते एकत्र येऊ शकत नाहीत. म्हणून चूप बसण्यापेक्षा जनतेनी एकत्र येऊन या गट नेत्यांना धडा शिकविण्याची हीच एक नामी संधी चालून आली आहे. अशी संधी परत येईल कि नाही काही सांगता येत नाही.

बाबासाहेब म्हणाले ह्लोते की, आपल्या प्रगतीसाठी जिच्यावर आपण अवलंबून राहू शकू अशी एकच गोष्ट आहे व ती म्हणजे राजकीय शक्ती हस्तगत करणे. आपल्या मुक्तीचा तो एकच मार्ग आहे. याबद्दल तर मला मुळीच संदेह नाही व या शक्तिशिवाय आमचा सर्वनाश होईल. (अ.भा.दलित वर्ग परिषद, नागपूर १८,१९ जुलै १९४२) म्हणून राजकीय शक्ती हस्तगत करायला पाहिजे ही गोष्ट निर्विवाद sस्पष्ट आहे.

डॉ. बाबासाहेबांनी घटना समितीत अथक संघर्ष करुन सर्वसामान्य बहुजन समाजासाठी प्रौढ मतदानाचा अधिकार मिळवीला. तेव्हा आचार्य कृपलानी बाबासाहेबांना म्हणाले होते की, ‘तुमचे लोक गरीब असतात. तेव्हा त्यांचे मत विकत घेऊन आम्ही सरकार बनवू.’ यावर डॉ. बाबासाहेब म्हणाले की, ‘आमच्या लोकांना जेव्हा मताची किंमत कळेल ना तेव्हा ते स्वत:च सरकार बनवतील. तेव्हा तुम्ही कंगाल व दरिद्री व्हाल.’ म्हणून इतक्या वर्षानंतर आतातरी लोकांना आपल्या मताची किंमत कळायला काही हरकत नाही.

यासाठी मात्र समाजातील बुद्धिजिवी वर्गाने पुढाकार घेणे क्रमप्राप्त आहे. कारण बुद्धिजिवी वर्गाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर “जातिभेद का उच्छेद” (Annihilation of Caste) या पुस्तकात लिहितात की, “प्रत्येक देशामध्ये बुद्धिजिवी वर्ग प्रभावशाली असतो. जो सल्ला व नेतृत्व देऊ शकतो. देशातील अधिकांश जनता विचारशील व क्रियाशील नसतात. ते बुद्धीजीवी वर्गाचे अनुकरण करून त्या मार्गाने जात असतात. म्हणून त्या देशाचे समाजाचे भविष्य बुद्धिजिवी वर्गावर अवलंबून असते. बुद्धिजिवी वर्ग चांगला किंवा वाईट असू शकतात. बुद्धिजिवी वर्ग इमानदार, स्वतंत्र व निष्पक्ष असेल तर समाजाला संकटकाळी मार्ग काढून योग्य मार्गदर्शन करू शकेल. समाजाला सहाय्य करू शकेल. पथभ्रष्ट लोकांना ते चांगल्या मार्गावर आणू शकतात.”

      बुद्धीवाद्यांच्या संदर्भात एक तत्वचिंतक जॉर्ज ओरवेल (George Orwell)  म्हणतात की, “History is continuously re-written by those peoples who control the present.” म्हणजे इतिहासाचे सतत पुनर्लेखन करणारे लोकच वर्तमानकाळाला नियंत्रित करीत असतात. अशी क्षमता ज्या समाजातील बुद्धीवाद्यांमध्ये असते तेच लोक इतिहासाचे पुनर्लेखन करू शकतात. म्हणून हा तत्वचिंतक पुढे म्हणतो की, Those who controls present, controls the past. Those who controls past, controls the future” म्हणजेच जो वर्तमान काळाला नियंत्रित करतो, तो गतकाळाला नियंत्रित करतो. जो गतकाळाला नियंत्रित करतो, तो भविष्यकाळाला नियंत्रित करतो.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे एक बुध्दिवंत झाले की, ज्यांनी हजारो वर्षापासून चालत आलेला अस्पृश्यतेचा प्रवाह रोखून धरला व इतिहासालाच बदलून टाकले. काय अशी किमया करण्याची हिंमत आजचा बुद्धीवंतवर्ग दाखवू शकेल? त्याकाळी बाबासाहेब एक बुद्धीवंत होते. आतातर समाजात डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, प्राध्यापक, साहित्यिक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सरकारी-निमसरकारी, प्रशासकीय उच्चपदस्थ सेवेत असेलेले अथवा निवृत झालेले असे अनेक बुध्दिवंत व विचारवंत निर्माण झालेले आहेत. हे सारे लोक आंबेडकरी चळवळीचे लाभार्थी आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेप्रमाणे समाजामध्ये हजारो वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स झाले असल्यामुळे समाज आता प्रगल्भ झालेला आहे यात वाद नाही.

’समाजाला आणीबाणीच्या काळात दिशा देण्याचे काम करतो तो बुध्दिजिवी’ अशी व्याख्या डॉ. बाबासाहेबांनी ’ऍन निहिलेशन ऑफ कास्ट’ या पुस्तकात केली आहे. सध्या आणीबाणीची वेळ निश्चित आली आहे. कारण ज्या राजकीय पक्षाचा प्रभाव असतो, त्या पक्षाच्या विचारधारेवर आधारित चळवळ वाढत असते. म्हणूनच हिंदुत्वाची चळवळ जोमाने फोफावलेली आहे व  त्यामानाने आंबेडकरी चळवळ मागे पडली आहे. उद्या संसदीय लोकशाहीच्या ऐवजी अध्यक्षीय प्रणाली देशात आली तर नवल वाटणार नाही. कारण आर.एस.एस.ने भारतीय संविधानाच्या विरोधात निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान जाहीर करून व त्याला निवडून आणून तसा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहेच! तसे झाले तर या देशाचा अध्यक्ष नेहमीच हिंदुत्ववादी आर.एस.एस.चा असेल यात शंका नाही. कारण त्यावेळी अध्यक्षासाठी पूर्ण देश एकच मतदारसंघ असल्याने ज्या चळवळीचा प्रभाव जास्त त्यांचाच अध्यक्ष बनेल यात शंका नाही.

म्हणून आता आंबेडकरी चळवळीचा राजकीय प्रभाव निर्माण करणे आवश्यक झाले आहे. १९५७च्या सार्वत्रिक निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीने महाराष्ट्रात १६ आमदार व देशात ९ खासदार निवडून आणून दबदबा निर्माण केला होता. तसेच वातावरण आता का निर्माण होऊ शकत नाही. होऊ शकते…! पण त्यासाठी बुध्दिवंत व विचारवंतांनी एकजुटीने सक्रीय होणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघांचे विश्लेषण केल्यास केवळ बौद्धांचे 25-30 टक्के मतदान असलेले 31 मतदार संघ व 10-20 टक्केमतदान असलेले 158 मतदार संघ महाराष्ट्रात आहेत. म्हणून या मतदार संघात तरी आंबेडकरी मतदार प्रभाव पाडू शकतात एवढे मात्र नक्की!

त्यासाठी आपल्याला एक प्रयोग करून पाहावा लागेल. प्रत्येकांनी एव्हाना आपापल्या गटाचे उमेदवार प्रत्येक विधानसभा मतदार क्षेत्रात उभे केलेले दिसेल. कोणी अपक्ष म्हणून उभे असतील. कोणी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना पाठींबा दिला असेल. अशा परिस्थितीत त्यात्या मतदारसंघात बुद्धिवादी व विचारवंत लोकांच्या समित्या स्थापन करून एकमताने ज्या क्षेत्रात ज्यांचा चांगला प्रभाव असेल असा योग्य उमेदवार निवडावा व त्यालाच मतदान करण्याचे लोकांना आवाहन करावे. आंबेडकरी चळवळीच्या विरोधात काम करणाऱ्या तत्वहीन उमेदवाराला मात्र कटाक्षाने निवडू नये, एवढी मात्र खबरदारी घ्यावी.

      आपल्या समाजातील नोकरीदार वर्ग जसे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, विद्युत मंडळाचा तांत्रिक कर्मचारी, आरोग्य विभागाचा कर्मचारी, शेती विभागाचा कर्मचारी असे अनेक विभागाचे शासकीय कर्मचारी खेड्यापाड्यापर्यंत काम करीत आहेत. अशा लोकाना खेड्यापाड्यात मान असतो. म्हणून त्यांनी जमेल त्या मार्गाने सक्रियपणे पण गुप्त पध्दतीने प्रचार व प्रसार करावा. कारण खेड्यापाड्यात गठ्ठा मतदान असते.

तसेच आज वृतरत्न सम्राट, विश्वरत्न सम्राट, जनतेचा महानायक, लोकनायक असे प्रिंट मिडीया आणि लॉर्ड बुध्दा टी.व्ही. व आवाज इंडिया सारखे इलेक्ट्रॉनिक मिडीया निर्माण झाले आहेत. यांचा सुध्दा प्रचार व प्रसार करण्यासाठी मोलाचा हातभार लागेल. समाजातील विद्यार्थी, युवक, महिला, कामगार, व्यावसायिक, नोकरीदार, साहित्यीक, विचारवंत, बुध्दिवंत, निवृतकर्मचारी/अधिकारी अशा सर्व घटकांचा या कार्यामध्ये सहयोग घ्यावा लागेल. त्यामुळे समाजात नविन उत्साह निश्चितच संचारेल आणि समाज एकजूट व्हायला वेळ लागणार नाही. प्रामुख्याने तरुणवर्ग निश्चितच हिरीरीने भाग घेऊन या कामात झोकून देतील असा विश्वास वाटतो. यातूनच नवीन नेतृत्व निर्माण होईल. मतदानापासून दूर राहणारा व उदासीन असणारा मतदार सुध्दा उत्साहित होतील. समाजातील सर्व वर्ग तन, मन, धनाने शक्ती निर्माण करुन संपुर्ण ताकद या उमेदवाराच्या मागे लावतील व अशा प्रकारे ’बहुजन शासनकर्ती जमात अभियान’ राबविण्यास सुरुवात होईल असे वाटते.

बाबासाहेब म्हणायचे की, ’मिठ-मिरचीसाठी आपले मत विकू नका. कारण तुमच्या मतामुळे सरकार बनत असते.’ परंतु आपण पाहतो की, काही लोक सर्रासपणे मते विकत असतात. बाबासाहेबांचे पुतळे, विहार बांधण्यासाठी सुध्दा पैशाची मागणी करायला मागेपुढे पाहत नाहीत. म्हणजे आता प्रत्यक्ष बाबासाहेबांना सुध्दा पुतळ्यांच्या रुपात विकायला काढल्याचे चित्र कुठे कुठे दिसत आहे. धनदांडगे विरोधी उमेदवार दारु पाजतात, पैसे देतात, कपडे-लत्ते देतात अशा लालचेला काही लोक बळी पडून आपले बहुमोल मते त्यांना देतात. हे एक कटू सत्य आहे. तरी या बाबतीत मात्र जागरूक राहावे लागेल. काही ठिकाणी समाजातील सरपंच, पोलिसपाटील किंवा इतर अशा सन्मानिय पदावर काम करणारे व ज्यांच्या मागे गठ्ठा मतदान असते अशा लोकांना इतर पक्षाचे लोक ऎनकेन प्रकारे दबावात आणून स्वकिय पक्षांच्या उमेदवाराविरुध्द मते देण्यास भाग पाडीत असतात. अशा लोकांच्या बाबतीत सुध्दा लक्ष ठेवावे लागेल.

शेवटी डॉ. बाबासाहेबांचे २० जुलै १९४२ चे अखिल भारतीय दलित वर्ग परिषद नागपूर येथील भाषण अत्यंत प्रेरणादायी  आहे. ते सर्वांनी लक्षात ठेवावे. त्यांनी म्हटले होते की, “तुम्हाला माझ्या संदेशाचे अंतीम शब्द हेच आहे की, शिका, संघर्ष करा आणि संघटीत रहा. स्वत:च्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि कधिही निराश होऊ नका.” म्हणजे डॉ. बाबासाहेबांची शासनकर्ती जमात बणण्याची संकल्पना वास्तवात उतरविण्यास कठीण जाणार नाही.

दया पवार हे क्रांतीसाठी प्रवृत्त करतांना लिहितात,

“प्रखर तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला,

ज्या काजवांचा तुम्ही जयजयकार केला,

ते केव्हाच निस्तेज झाले,

आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा,

अन् क्रांतीचा जयजयकार करा.”

बोनगाव-कोलकाताची सफर (सुधारीत)

31 Dec

       मी माझ्या पत्‍नीसह या वर्षीच्या जानेवारी महिन्यात बोनगाव या गावला गेलो होतो. खरं म्हणजे या गावाचे नाव बनगाव आहे. पण बंगाली भाषेत शब्दांचे उच्चार ओकारयुक्त असल्याने बंगाली लोक बनगावला बोनगाव म्हणतात. या ठीकाणी आम्ही मुलाकडे राहिलो होतो.

       तेथे माझा मोठा मुलगा कस्टममध्ये असिस्टंट कमिशनर होता. त्याची आय.आर.एस. साठी निवड झाल्यावर पहिल्यांदा त्याला या भागात नेमणूक मिळाली.

            हे गाव तालुक्याचं ठिकाण असून पश्चिम बंगालच्या २४ नोर्थ परगणा या जिल्ह्यात आहे. २४ नोर्थ परगणा नावाचं कोणतही शहर नाही, तर बारासात हे शहर या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

            बोनगाव हे तालुक्याचं ठिकाण असून  कोलकातापासून बांगलादेशच्या जेस्सोर रोडवर, १२५ किलोमिटर दूर आहे. येथे जवळच पेट्रापोल हे ठिकाण बांगलादेश व भारत या सिमेवर आहे. तेथून जवळपास रोज ४०० ट्र्कच्या मालाची आयात-निर्यात होत असते.

            यापूर्वी मी १९८६ सालात कुटुंबासह माझ्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यलयाकडून मिळणार्‍या रजाप्रवास सवलत अंतर्गत काठमांडू पर्यंत प्रवास केला होता. त्यावेळी मुलं लहान होते. तेथून आम्ही दार्जिलींगला जातांना कोलकाताला एक दिवस थांबलो होतो. या शहरात त्यावेळी अनुभवणारी गर्दी आताही तेवढीच होती. त्यावेळी आमची ट्रॅव्हलबस ट्रॅफिकमध्ये अडकली होती. त्यामुळे गर्दीची आठवण आहे.

            त्यावेळच्या कलकत्त्याचं आता कोलकाता असे नाव झाले. तथापी त्यावेळी रिक्ष्यात बसलेल्या प्रवाशांना माणसं ओढत. आता मात्र ते चित्र दिसले नाही. त्यावेळी रोडवर ट्राम धावत असत. आताही एकट-दुकट ट्राम जातांना दिसत होत्या.

            गेल्या २५ वर्षापासून या राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सतत सत्ता होती. आता मात्र सत्तेत परिवर्तन होऊन ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असलेल्या तृणमूल कॉंग्रेसची सत्ता आली आहे.

            मार्क्सवादी म्हणतात की, धर्म ही अफूची गोळी आहे. तरीही या राज्यात कमालीचे  देव-धर्माचे प्रस्थ नांदत आहे. त्यात तसूभरही बदल झाल्याचं मला आढळले नाही. कारण कुठेही पुरोगामी विचार पेरल्याचे दिसले नाही. साम्यवादी विचारसरणी येथे कुठेही रुजलेली दिसली नाही. कारण काही किलोमिटर अंतरावर ‘हरे रामा हरे कृष्णा, मिशनचे देशातील मुख्य ठिकाण मायापुरीला आहे. तसेच पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रध्दा काही कमी झाल्याचं दिसलं नाही. त्यांच्या राजवटीत लोकांची गरीबी सुध्दा हटलेली दिसून आलेली नाही. आताही तेथे कमालीची दैनावस्था थैमान घालत असल्याचे दिसते.

      येथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे येथील विवाहीत महिला गुलामीचं प्रतीक असलेल्या काळ्या मण्यांच्या गाठ्या किंवा मंगळसुत्र न घालता त्याएवजी दोन्ही हातात पांढर्‍या व लाल रंगाचे असे दोन कडे घालतात. येथील मुस्लीम महिला पण बुरखे घालतांना  दिसल्या नाहीत.

      सत्तांतरामुळे पक्ष म्हणजे बाटली बदलली, पण  दारु मात्र बदलेली दिसली नाही. त्यामुळे लोकांच्या राहणीमानात फारसा फरक पडेल; असं वाटत नाही. शेतकर्‍यांच्या मालाला उचित भाव मिळत नसल्याने कर्जात बुडालेल्या शेतकर्‍यांनी विदर्भासारखे येथेही आत्महत्त्या करीत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचल्या आहेत.

            बोनगावात सायकलरिक्षा व ऑटो क्वचित दिसतात. तेथे महाराष्टात सामान वाहून नेणारे ढकलगाडी जसे असतात, तसे माणसांना घेऊन जाणारे सायकल-ढकलगाडी सर्रास जिकडे-तिकडे मोठ्या प्रमाणात रोडवर दिसत होत्या.

            आम्ही घरी गेल्यावर सुनेने विचारले, ’तुम्हाला व्हॅन दिसल्या.? मला वाटलं व्हॅन म्हणजे मारुतीव्हॅन असावेत. पण हे वेगळेच वाहन होते. इकडे सायकलने जोडलेल्या ढकलगाडीला व्हॅन असे म्हणतात; असे तिने सांगितल्यावर आम्हाला हसू आले.

            ह्या. व्हॅनवर  पुढे दोन व मागे दोन असे चार लोक खाली पाय सोडून निवांतपणे बसून जातात. पाऊस आला तर व्हॅनवरील प्रवाशांना जर छत्री नसेल तर ओले झाल्याशिवाय गत्यंतर राहात नाही.  कारण त्यांच्या व्हॅनवर वर काही आवरण नाही आणि बसायची जागा पण ओली होऊ शकते. उन्हा-पावसाच्या सुरक्षेसाठी प्रवाशांनाच छत्र्या घेऊन बसावे लागते.

          ह्या व्हॅनचे भाडे मात्र कमी आहे. इतर प्रवाशाच्या ’शेअर सिस्टीम’मुळे भाडे केवळ पाच रुपये व त्यापेक्षा दूर असेल तर त्यापेक्षा थोडं जास्त होतं. पण किमान भाडे फक्त पाच रुपये. येथे रुपयाला टका म्हणतात. यांच्या संघटनेने दुसर्‍या वाहनांना येऊ दिले नाही, असे समजले. रेल्वे आली की, आमच्या घरासमोरुन रोडने हे व्हॅन भरभरून जायचे. हे व्हॅनवाले आणि इतर सर्वसामान्य लोक सर्रास उघडपणे कुठेही बिड्या ओढतांना दिसतात. त्यामुळे वायूचं प्रदुषन झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या धुम्रपानाचा मला फार त्रास होत होता.

      येथील लोक सायकलीचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याचे दिसते. त्यामुळे पेट्रोलवर धावणाऱ्या दुचाकी वाहनाने होणारे प्रदुर्षण टाळण्यास मदत होते, ही गोष्ट काही कमी महत्वाची नाही.

      तेथील स्थानिक लोकांना हिंदी समजत नाही, असं नाही. काही हिंदी बोलत पण होते. पण बर्‍याच लोकांना समजतही नव्हतं व बोलताही येत नव्हतं; अशीही परिस्थिती होती. पण बंगाली भाषा जरी आपल्याला समजत नसली तरी ऐकायला मात्र फार गोड वाटते. कदाचित बंगाली लोक रसगुल्ला, चमचम सारखे गोड पदार्थ मोठ्या चवीने खात असल्याने त्यांच्या भाषेत गोडवा तर निर्माण झाला नसावा ! आम्हाला शेजारच्या एका बंगाली कुटुंबांनी जेवायला बोलाविले होते. त्यांनी जेवायच्या आधी आम्हाला बंगाली मिठाई खायला दिली. जेवणात त्यांनी मांसाहारात मच्छीफ्राय. चिकनकरी त्याशिवाय दोन प्रकारच्या शाकाहारी भाज्या, मसुरची डाळ, भात व पोळ्या असा मेनू होता. तेथील लोक जेवणात तर भात खातातच त्याशिवाय सकाळच्या नास्त्यात सुध्दा भात खातात. जेवणात कधी पोळ्या खात नाही. येथे स्वयंपाकात फोडणीला सरसोच म्हणजे मोहरीचं तेल वापरतात.

      एखाद्यं सामान विकत घ्यायला गेलो की, त्याला  काय म्हणायचं ते कळत नव्हतं. मग ती वस्तू जर दिसण्यासारखी असली, की त्याला हाताचा स्पर्ष करुन सांगावे लागत होते. माझ्या सुनेला किराणा घ्यायचा असला की, दुकानातील वस्तूला हात लाऊन सांगत होती. अशी भाषेची अडचण येत होती.

      कपडा खरेदी करतांना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे सारे कपडे न दाखविता एक कपडा दाखविला व पसंद पडला नाही तर त्याची घडी करून ठेवल्यानंतरच दुसरा कपडा दाखवीत. महाराष्ट्रात मात्र बऱ्याच ठिकाणी कपडा पसंद पडेपर्यंत दाखविलेल्या कपड्याचा ढीग पडत असतो.

      येथे मच्छीचा मोठा बाजार भरतो. आम्हा खवय्यांची जणू पर्वणीच. गावाजवळ समुद्र नाही, पण गोडे पाण्याचे छोटे छोटे तलाव म्हणजे पॉंड्स आहेत. त्यात मासे पाळतात व मोठ्या झाल्यावर विकतात. रहू, कथला ह्या महाराष्ट्रातील मासे तिकडे पण मिळतात. तेथील बेटकी मासा खायला चवदार वाटला, पण महाग आहे. ३०० रुपये किलो. बांगलादेशाचा इलीस मासा ज्याला पश्चिमबंगाल मध्ये हिंल्सा म्हणतात – क्वचित येतो. त्याची किंमत जवळपास १००० रुपये किलोपर्यत तरी असते. इतका तो महाग आहे. त्याला बोनगावच्या मच्छीबाजारात घेण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे राहावे लागते, असं म्हणतात. तो बांगलादेशाचा राष्ट्रीय मासा म्हणून ओळखल्या जातो.

      एकदा बांगलादेशाचा राष्ट्रीय मासा कोणता असा प्रश्न ‘कौन बनेगा करोडपती’ या टी.व्ही. कार्यक्रमात विचारला होता. या माशाला बारीक काटे असतात. पण खायला तुपाच्या चविसारखा अत्यंत रुचकर आणि वेगळाच लागतो. आम्ही खाऊन त्याची प्रत्यक्ष चव घेतली तेव्हा खरोखरच तृप्त झालो.. येथे मोठे झिंगे म्हणजे प्रॉन्स मिळतात. त्याच्या किंमती ४०० रुपयापासून ६०० रुपये किलोपर्यंत आहेत.

      येथे भारत-बांगलादेशाची सीमारेषा आहे. दोन्ही देशाच्या सीमारेषेत ‘झिरो पॉईंट’ किवा ’नो मॅन लॅंड’ अशी रिकामी जागा आहे. म्हणजे या जागेवर कोणत्याच देशाची मालकी नाही. आहे की नाही गम्मत ! आम्ही या जागेवर जाऊन थांबलो तेव्हा मनात वेगळीच भावना दाटून आली होती.

      सिमारेषेवर कुठेकुठे काटेरी कुंपण केले आहे. पण काही गाव असे आहेत की ते भारतात आहेत की बांगलादेशात आहेत याचा निर्णय अजूनही झालेला नाही. काही घरे भारतात तर त्या घराचे आंगण बांगलादेशात आहेत, अशीही गंमत पाहायला मिळाली. येथूनच स्मगलींगचा व्यवहार होण्यास मोठा वाव आहे, असे कळले. बागलादेशात गाई-बैलाचं मास मोठ्या प्रमाणात खात असल्याने या जनावरांची तेथे फार मागणी आहे. म्हणूनच दुरदुरच्या राज्यातून आणलेली गुरे-ढोरे अशा गावातून किवा नदीतून लपून-छपून बांगलादेशात नेले जात असल्याचे ऐकले. पूर्वी अशा स्मगलींग करणार्‍यांना बॉर्डर सिक्युरीटी फोर्सच्या सैनिकांना फायरिंग करता येत होते. पण आता त्यांच्याकडील असे अधिकार काढून घेतल्याचे समजले. त्यामुळे स्मगलर्सवरील वचक कमी झाल्याने तेच या सैनिकांवर हल्ला करुन बांगलादेशात पळून जात असल्याच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या.

      तेथील सभेची एक आगळी-वेगळी पध्दत मला दिसली. कुठेतरी लोकांच्या भरगर्दीच्या चौकात एखादा स्टेज असतो. तेथे दोन-चार लोक खुर्च्या टाकून बसलेले असतात. एखादा वक्ता माईकवर बोलत असतात. त्यांच भाषण ऎकणारे तेथे कुणीच श्रोते बसलेले अथवा उभे असलेले दिसत नाहीत, तर तेथून भोवताल रोडच्या बाजूला दूर-दूर पर्यंत लॉउडस्पिकरचे भोंगे लावतात. त्या भोंग्याच्या माध्यमातून जाणारे-येणारे चालता चालता किंवा दुकानात बसलेले व्यापारी आपला धंदा करता करता किंवा गिर्‍हाईक सामान विकत घेता घेता, त्याचे भाषण ऎकत असतात. आहे की नाही गंमत! त्यामुळे कुणाचेही व्यवहार थांबत नाहीत किंवा कुणाला काही अडथळा निर्माण होत नाही.. ही पध्दत मला खरोखरच चांगली वाटली.

      आणखी एक गोष्ट मला पाहायला मिळाली; ती म्हणजे कोणत्याही मिरवणूक किंवा मोर्चासोबत एकही पोलीस दिसला नाही. आपल्या महाराष्टात तर अशा वेळेस लोकांपेक्षा पोलीसच जास्त दिसतात.

      कम्युनिस्ट पार्टीची एक मिरवणूक – मिरवणूक होती की मोर्चा होता, काय माहिती ? आमच्या घरासमोरून विळा-हातोडीचे चिन्ह असलेले लाल झेंडे घेऊन, घोषणा देत देत चालले होते. पण मला त्यांच्या मागे-पुढे एकही पोलीस दिसला नाही. निदान राजकीय पक्षाच्या मिरवणूकां-मोर्चासोबत तरी पोलीस आमच्याकडे जसे असतात, तसे पाहिजे होते ना ? पण नाही ! त्यामुळे मला गंमतही वाटत होती आणि पोलिसांना विणाकारण त्रास नाही, म्हणून चांगली गोष्ट असल्याचेही जाणवले होते !

      येथे महाराष्ट्रासारखे वाहनधारकांकडून पैसे उकळण्यासाठी टपून बसलेले ट्रॅफिक पोलीस मात्र दिसले नाहीत. तर त्याऎवजी कोणताही गणवेष न घातलेले, पण कोणत्याही पोशाखावर पिवळा रंगाचा जाकीट घातलेले व हातात जाड आकाराचा अर्धा-दांडूका घेतलेले कंत्राटदाराचे कर्मचारी असल्याचे दिसले. येथेही मला सरकारची काटकसरच दिसली.

      असं सांगतात की, कम्युनिस्ट राजवटीत प्रशासनामध्ये एक प्रकारची वेगळी संस्कृती निर्माण झाली होती ! कर्मचारी फारसे काम करीत नसत. वेळेवर कधी येत नसत. कामगार युनियनच्या जबरदस्त दहशतीमुळे कोणताही अधिकारी कारवाई करण्याची हिंमत करीत नव्हते. नाहीतर संप आणि आंदोलन याला सामोरे जावे लागे. आता सत्ता बदलली तरीही तृणमूल कॉंग्रेसच्या राजवटीत फारशी सुधारणा झालेली नाही, अशी माहिती मिळाली.

      एक दिवस अशीच हातात बंगला भाषेत लिहिलेले व ज्ञानेश्वर महाराज पालखट मांडून बसतात; तसे चित्र असलेले बॅनर घेऊन ढोल-ताशाच्या तालावर नाचत नाचत भल्या मोठ्या मिरवणूका राहून राहून आमच्या घरासमोरच्या रोडवरुन जात होत्या.

       मी माहिती घेतल्यावर कळले की, त्या दिवशी हरीचंद ठाकूरची जयंती होती. मला हरीचंद व गुरुचंद या दोन ठाकूर बंधूनी केलेल्या चळवळीबद्द्ल माहिती होती. त्यांनी बंगालमधील अस्पृष्य जातीतील चांडाल लोकांची, नमो-शुद्रायची चळवळ चालविली होती.

      बारासातच्या बहुजन समाज पार्टीच्या एका कार्यकर्त्यांनी एक आठवण सांगितली. माननीय कांशीरामजींनी बोनगाव येथे एकदा सभेसाठी आले होते, तेव्हा ज्या लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीवर निवडून आणले होते, त्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन येथील माती त्यांनी कपाळाला लावली होती. असा तो कार्यकर्ता सांगत होता.   

      जेस्सोर-खुलना या भागात या लोकांचा जास्त भरणा आहे. म्हणूनच जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटना परिषदेत अस्पृष्यांच्या घटनात्मक सुरक्षेसाठी जाणे आवश्यक वाटले, तेव्हा कॉंग्रेसने सारे दरवाजे बंद केले होते. त्यांना कुठूनही निवडून येणे अशक्य केले होते. सरदार पटेल यांनी जाहीर केले होते की, ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना घटना परिषदेचे दरवाजेच काय, खिडक्यासुध्दा आम्ही बंद केले आहे.’ म्हणून त्यावेळी बंगालमधील नमो-शुद्राय चळवळीचे नेते व बाबासाहेबांचे अनुयायी जोगेंद्रनाथ मंडळ यांनी मुसलमानाच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तेथून निवडून पाठविले होते. हा इतिहास त्यावेळी मला आठवला होता. पण या इतिहासाच्या खाणाखुणा मला येथे दिसल्या नाहीत.

      अशा विसरलेल्या इतिहासाचा संदर्भ घेत बोनगाव-कोलकाताची सफर संपवून आम्ही अकोल्याला परत आलो.

मानवाच्या कल्याणाचा मार्ग म्हणजे विपश्यना

31 Dec

      भगवान बुध्द हे  महान मनोवैज्ञानिक आणि संशोधक होते. त्यांनीच ही विपश्यना विधी अडीच हजार वर्षापूर्वी शोधून काढली. विपश्यना भगवान बुध्दाच्या शिकवणुकीचा सार आणि गाभा आहे. त्यांनी संशोधीत केलेल्या  सत्य आणि प्रज्ञेचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यासानेच  घेतलेला आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या शिकवणुकीत ध्यानावरच विशेष भर दिला आहे.

      विपश्यना ही ध्यानविधी अगदी सोपी आणि साधी असून अद्वितीय आहे. ती एक निखळ सुख आणि मन:शांती मिळवून देणारी तर्कसंगत अशी साधना आहे.

      या साधनेच्या अभ्यासाने स्वत:च्या शरीर व मनात खोलवर दडलेल्या समस्यांची उकल होऊन, त्या दूर होण्यास मदत होते. आपल्यामधील सुप्त शक्तीचा विकास होतो. त्या शक्तीचा उपयोग स्वत:च्या व इतरांच्या कल्याणासाठी करता येतो. या साधनेद्वारे केवळ शारीरिक वेदना दूर होतात, असे नाही तर जीवनात मोठा क्रांतीकारी मानसिक बदल सुध्दा घडवून येतात.

      ही कल्याणकारी विद्या भारतातून जगात पसरली. गुरु-शिष्य परंपरेच्या माध्यमातून ही विद्या ब्रम्हदेशात शुध्द स्वरूपात जतन करण्यात आली. सत्यनारायन गोयंकाजी यांनी ही विधी ब्रम्हदेशातून  आणून नाशिक जवळील इगतपुरी येथे व देशातील इतर काही ठिकाणी दहा दिवसाच्या शिबिरातून प्रशिक्षित आचार्यांच्या माध्यमातून शिकवीत आहेत.

      तसेच विपश्यना शिबीर त्रेलोक्य बौध्द महासंघ,  सद् धम्म प्रचार समिती व इतरही काही धार्मिक संस्था आयोजित करीत असतात.

      विपश्यनात दोन प्रकारचा अभ्यास आहे. पहिला अभ्यास आनापानसतीचा व दुसरा स्वत:च्या शरीरातील प्रत्येक पेशीत उमटणार्‍या  संवेदनाचे निरीक्षण करणे.

      आनापानसती विपश्यनाचा पाया आहे. ही एक प्राथमिक क्रिया आहे. म्हणून या शिबिरात सुरुवातीला ‘आनापानसती’ शिकवून मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास आणि  सराव केल्या जाते. हा अभ्यास विपश्यना साधनेची पूर्वतयारीच असते. आन म्हणजे श्वास आत घेणे, अपान म्हणजे श्वास बाहेर सोडणे व सती म्हणजे येणार्‍या व जाणार्‍या श्वासावर लक्ष ठेवणे. म्हणजेच  या अभ्यासात शरीरात नाकावाटे सहज आणि स्वाभविक येणारा तसेच बाहेर पडणारा श्वासावर लक्ष केंद्रित केल्या जाते. आपले मन जागृत ठेवले जाते.

      विपश्यनाला पाली भाषेत विपस्सना म्हटले जाते. त्यात वि आणि पस्सना असे दोन शब्द आहेत. वि म्हणजे विशेष रुपाने आणि पस्सना म्हणजे जाणणे, पाहणे किवा अनुभूती घेणे. म्हणजेच जग जसे आहे तसे पाहणे. जगाची वास्तवता समजून घेणे. वस्तू जशा आहेत तसे पाहाणे व त्यांच्या अस्तित्वाचे सत्यदर्शन म्हणजे विपश्यना.

      या विधीत आपल्या स्वत::च्या शरीरात उत्पन्न होणार्‍या सर्वसामान्य, नैसर्गिक संवेदनाचे पध्दतशीर व नि:पक्षपातीपणे निरीक्षण केल्या जाते. कारण संवेदनाच्या आधारेच आपल्याला प्रत्यक्ष सत्याची अनुभूती होते. विपश्यना करतांना शरीर आणि मनाचे संपूर्ण सत्य अनुभवाच्या पातळीवर समजून घेतल्या जाते. विपश्यनामुळे मनाच्या खोल गाभ्यात बदलांची प्रक्रिया सुरु होते.   

      कोणत्याही समस्येचे मूळ आपल्या मनात असल्याने तिच्याशी मानसिक स्तरावरच सामना केला पाहिजे. म्हणून विपश्यनेच्या माध्यमातून मनावर संस्कार करण्याचा अभ्यास विपश्यना शिबिरात शिकविले जातात. हा अभ्यास अत्यंत गांभिर्याने, नैसर्गिक वातावरणात आचार्याच्या मार्गदर्शनात भारतात आणि परदेशात वैज्ञानीक पद्धतीने शिकविल्या जाते.

      मन हे सतत भरकटत असते. चवताळलेला हत्ती  काहीही नुकसान करू शकतो, पण त्याला जर काबूत ठेवले  तर तो चांगल्या कामात  उपयोगी पडू शकतो. तसेच मनाचे आहे. मनाला काबूत ठेवण्यासाठी विपश्यना हे एक चांगले साधन आहे. आपले चित्त, मन एखाद्या गोष्टीवर अथवा कार्यावर एकाग्र करणे, त्या कार्याप्रती पूर्णपणे जागृत राहणे व ते कार्य सर्वशक्तीनिशी पार पाडणे हे आनापानसतीचा अभ्यास करणारे चांगल्या रीतीने करू शकतात.

      श्वास म्हणजे जीवन आहे. श्वास बंद पडला की जीवन संपले. म्हणून आनापानसतीचा अभ्यास करतांना या गोष्टीची सतत आठवण होत असते. त्यामुळे  आपले जीवन किती अनित्य आहे, क्षणभंगुर आहे. या गोष्टीची जाणीव होत असते.  म्हणून या ध्यानात एकाग्रता, जागरूकता व स्मृती या तीनही गोष्टीचा लाभ होतो.

      सत्याच्या  अनुभूतीचा एकमेव मार्ग म्हणजे स्वत :च्या अंतर्मनाचे आपण स्वत:च केलेले निरीक्षण होय. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेला हा मार्ग आत्मनिरीक्षणाचा, स्वत:ला शास्त्रीय पद्धतीने तपासण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आपल्या स्वत:च्या स्वभावाचे ज्ञान करून आपल्यामधील दोष, विकार नष्ट करता येते. अंतर्मनातील अंधकार दूर करता येते. निसर्गाचे अस्तित्व आणि त्याचे नियम समजून घेता येते. या अभ्यासाने दु:ख, प्रक्षुब्द व ताणतणाव निर्माण करणारे कारणे शोधून त्याला नष्ट करता येते. त्यामुळे आपले मन शुध्द, शांत व आनंदी होत जाते.

      भगवान बुध्दांनी आपल्या मनाच्या तीक्ष्ण एकाग्रतेने आपल्या मनाच्या खोलीत शिरून सत्याचा तळ गाठला. त्यांना आढळले की, आपले शरीर अत्यंत लहान लहान परमानुचे बनले आहे. ते सतत उत्पन्न होवून नष्ट होत असते. म्हणजेच जीवनाच्या अनित्यतेची जाणीव होते. अनित्यतेची जाणीव झाल्याने मनुष्य कुशल कर्मे करण्याकडे वळतो. स्वतःतील दोष कमी करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मनातील राग, द्वेष, मोह, तृष्णा, वासना, लोभ, भयं असे विकार दूर करतो. उर्वरित आयुष्य दु:खात घालविण्यापेक्षा सुख आणि आनंदात  घालवितो. असे अनेक फायदे या ध्यान साधनेने मनुष्याला प्राप्त होते.

      शरीरातील प्रत्येक कण परिवर्तनीय व बदलत असल्याने ‘मी’ ‘माझा’ असे म्हणावे असे काहीच स्थिर राहात नाही. हे सत्य साधकाच्या लक्षात येते. त्यामुळे अनात्मतेचा बोध होतो. आणखी एक सत्य साधकाला स्पष्ट होते ते असे की, ‘मी’ व ‘माझे’ची आसक्ती हीच तर दु:ख निर्मिती करते. ह्या सार्‍या गोष्टी कोणी सांगितले म्हणून नव्हे तर आपल्या स्वत:च्या अनुभवावरून संवेदनाच्या निरीक्षणामुळे समजू लागतात.

      या अभ्यासात शिकविले जाते की, शरीरात उमटणार्‍या संवेदनावर कोणतीही मग ती सुखद असो, दु:खद असो की, सुखद-दु:खद असो – प्रतिक्रिया व्यक्त न करता नि:ष्पक्ष राहून केवळ निरीक्षण केल्याने दुखा:च्या आहारी जात नाही.  कारण संवेदना सतत बदलत असतात. त्या कायम राहत नाही. उदय होणे, व्यय होणे हा तिचा नैसर्गिक  स्वभाव असल्याचे जाणवते. म्हणून सजगता व समतेत राहिल्याने आपण दुख:मुक्त होऊ शकतो, ही गोष्ट  साधकाच्या लक्षात येते.

      तसेच प्रत्येक संस्कार उत्पन्न होते, लय पावते. ते परत उत्पन्न होते, लय पावते. ही क्रिया सतत सुरु राहते. आपण प्रज्ञेचा विकास करून तटस्थपणे निरीक्षण केल्यास, संस्काराची पुनर्निर्मिती थांबते. आताच्या आणि पूर्वसंचित संस्काराचे उच्चाटन झाले की, आपण दुख:मुक्तीचा आनंद उपभोगू शकतो, हेही साधकाच्या लक्षात येते.

      संवेदनापासून तृष्णेऐवजी प्रज्ञाच विकसित होते. प्रज्ञेमुळे दुखा:ची साखळी तुटते. राग व द्वेषाच्या नवीन प्रतिक्रिया निर्माण होत नाहीत. त्यामुळे दुख: निर्माण होण्याचे कारणच उरत नाही. मनाच्या दोलायमान स्थितीत घेतलेले निर्णय ही एक प्रतिक्रियाच असते. ती सकारात्मक कृती राहत नसून ती एक नकारात्मक कृती बनते.  ज्यावेळी  मन शांत व समतोल असते. तेव्हा घेतलेले निर्णय हे कधीही दुख:दायक नसते तर ते आनंददायकच असते. जेव्हा प्रतिकिया थांबतात, तेव्हा तणाव दूर होतात. त्यावेळी आपण जीवनातील खरा आनंद उपभोगू शकतो, याची साधकाला प्रचीती येते.

      आपण सुखी व आनंदित झालो की, असेच सुख आणि आनंद दुसर्‍यालाही मिळावे म्हणून कामना करतो. सर्वांचे कल्याण होवो, सर्व दुख:मुक्त होवोत, हीच तर ‘विपश्यना ध्यान’ साधनेचा उद्देश आहे. यालाच ‘मेत्ता भावना’ म्हणजेच ‘मैत्री भावना’ म्हणतात. 

      भगवान बुद्धांनी या अभ्यासाद्वारे जाणले की, मनुष्याला होणारे दु:ख हे काही दैवी कारणाने होत नसते. तर त्याला जसे इतर कोणत्याही गोष्टी कारणाशिवाय घडत नाहीत, तसे दु:खाला सुध्दा कारणे आहेत. 

      भगवान बुद्धांनी अखिल मानवाला दु:खमुक्त होण्यासाठी चार आर्यसत्य व अष्टांगिक मार्गाची शिकवण दिली. चार आर्यसत्यामध्ये  दु:ख. दु:खाची कारणे, दु:खाचा निरोध आणि दु:ख नष्ट करण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग याचा समावेश आहे.

      अष्टांगिक मार्गामध्ये १. सम्यक दृष्टी, २. सम्यक संकल्प, ३. सम्यक वाचा, ४. सम्यक कर्म, ५. सम्यक आजीविका, ६. सम्यक व्यायाम, ७. सम्यक स्मृती व ८. सम्यक समाधी याचा समावेश होतो. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी जसे शारीरिक व्यायाम करतो, तसेच मनाला निरोगी ठेवण्यासाठी मनाचा व्यायाम म्हणजे ही विपश्यना साधना होय.

      जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, जो व्यक्ती शरीराने आणि मनाने निरोगी आहे, अशा व्यक्तीला सुदृढ आणि सक्षम म्हटल्या जाते. विपश्यना साधनेमध्ये मानवी मन हे केंद्रस्थानी आहे. शरीरावर होणार्‍या  प्रतिक्रिया ह्या मनातून निर्माण होतात. म्हणून मन हे निरोगी असेल तरच शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

      ही वैज्ञानीक साधना शिकण्यासाठी  विविध भाषा, जाती, धर्म, सम्प्रदाय, लिंग असलेले लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. त्यामुळे जातीय सलोखा निर्माण होण्यात या विधीचा मोठा हातभार लागत आहे. 

      आज दहशतवाद व अण्वस्त्राच्या भीतीने जगात अशांतता व अस्वस्थता निर्माण होत आहे. तेव्हा जगात शांतता नांदण्यासाठी विपश्यना विधीची  फार मोठी मदत होत आहे. जगात ठिकठिकाणी विपश्यना केद्रे स्थापन होत आहेत. त्यामुळे ह्या  विधीचा सार्‍या  जगात  झपाट्याने प्रसार होत आहे.

      भारतातील पहिल्या महिला आय.पी.एस. अधिकारी किरण बेदी यांनी कैद्यांसाठी विपश्यना अभ्यासाची व्यवस्था केली होती. त्यामुळे गुन्हेगारी जग सुधारण्यास या विधीचा उपयोग होत आहे.

      शासन त्यांच्या अधिकार्‍यांना ही विद्या शिकता यावी म्हणून शिबिराला पाठविण्याची व्यवस्था करीत आहेत. प्रशासकीय कामे करतांना मानसिक तणाव दूर होतो. ही विधी शिकतांना भगवान बुद्धांनी सांगितलेला शील-समाधी-प्रज्ञा तसेच पंचशीलेची शिकवण मिळत असल्याने साधक वर्ग नीतीमान बनत असतो. त्यामुळे  भ्रष्टाचाराला वाव राहत नाही. वक्तशीरपणा, प्रामाणीकपणा हे गुण साधक वर्गात वाढीस लागत आहेत.

      लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत आज शिबिरे आयोजीत होत आहेत. त्यामुळे मैत्री, करुणेचे भगवान बुध्दाचे तत्वज्ञान जनमानसात रुजत आहेत. सामाजिक सलोखा निर्माण होण्यास तसेच आजच्या अनैतिक जगात माणसाला सदाचारी, चारीत्रवान, निरोगी  बनविण्यासाठी या विधीचा फार मोठा हातभार लागत आहे.

      विपश्यनेचा व्यक्तिगत दृष्टीने नियमित अभ्यास केल्याने मनातील राग, द्वेष, मोह, तृष्णा, वासना, लोभ, भयं असे विकार नष्ट होतात. त्यामुळे दु:ख आणि विकारातून मुक्त होवून मानवाचे कल्याण होते. तसेच सामाजिक दृष्टीने विशुद्धी, पावित्र, सदाचार, नैतिकतेचा पाया मजबूत होवून समाजविकास घडून येतो.

      आज जगासमोर उपासमार, गरिबी, जातीयवाद, हिंसाचार, दहशतवाद, हुकूमशाही, युध्दजन्य परिस्थिती असे जे भयावह स्थिती दिसत आहेत,  त्याला शांत करण्यासाठी भगवान बुध्दाचे समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्याय तसेच अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा व मैत्रीचे तत्वज्ञान व त्यांची विपश्यना विधी हेच उत्तर आहे. म्हणून विपश्यना साधना ही मानवी कल्याणाचा मार्ग आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कामगारांना मार्गदर्शन

25 Nov

जी. आय. पी. रेल्वेकामगार परिषदमनमाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. १२ व १३ फेब्रुवारी १९३८ रोजी दिलेले भाषण कामगार वर्गासाठी अत्यंत मोलाचे, मार्गदर्शक आणि दिशानिर्देश देणारे आहे.

      त्यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दें असे आहेत.

१.       कामगाराच्या हितासाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे. यात काही किंतु नाही. परंतु तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही राष्ट्रीय उद्दिष्टासाठी संघटीत झाले पाहिजे.

२.      कामगार संघटनानी राजकारणात शिरलेच पाहिजे. कारण शासन सत्तेवाचून कामगारांच्या हिताचे सरक्षण करणे अशक्य आहे.

३.      संघटनेच्या शक्तीला कायद्याच्या शक्तीची जोड मिळावयास हवी. तुमची संघटना उभारण्याच्या जोडीलाच तुम्ही देशाच्या राजकारणात भाग घेतल्याशिवाय हे घडू शकत नाही.

४.     स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्वावर आधारलेली नवी पध्दती स्थापन करणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे. याचा अर्थ समाजाची पुनर्रचना आणि अशा प्रकारची पुनर्रचना समाजात घडवून आणणे हे कामगार वर्गाचे प्राथमिक स्वरूपाचे कर्तव्य आहे. परंतु कामगार वर्ग हे ध्येय कसे साध्य करून शकेल? राजकीय शक्तीचा परिणामकारक उपयोग झाल्यास याबाबतीत ते निश्चितच एक शक्तीशाली साधन ठरते. मग त्यांनी राजकीय शक्ती साध्य केली पाहिजे.

५.     कांग्रेस पासून स्वतंत्र स्वतःचा असा वेगळा राजकीय पक्ष कामगारांनी स्थापन करावा, असा सल्ला देण्यास मला मुळीच हरकत वाटत नाही.

६.      जो पक्ष वर्गहिताच्या, वर्गजाणिवेच्या पायावर आधारलेला असेल, अशा पक्षामध्ये  तुम्ही सामील व्हावे. ही कसोटी लावून पाहिल्यास तुमच्या हिताच्याविरोधी नसलेला, मला माहीत असलेला पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष हा होय. स्पष्ट कार्यक्रम असलेला तो एकच पक्ष असून कामगाराच्या हिताला सर्वोच्च स्थान देतो, त्याचे धोरण सुनिश्चित आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे, खंड १८, भाग २)

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच भाषणात म्हणतात की, ‘कम्युनिस्टांपेक्षा कामगारांचा अधिक नाश दुसर्‍या कोणीही केला नाही. कामगार संघटनेचा मात्र निश्चितच सर्वनाश केला. अशाप्रकारच्या निरर्थक चळवळीपासून यापेक्षा अधिक काय अपेक्षा करता येण्यासारखी आहे? आगीचा भडका उडवून देण्याच्या प्रयत्नात आपल्या स्वतःच्या घराचीही काळजी न घेणार्‍या आगलाव्यासारखाच  कम्युनिस्ट माणूस सिध्द झालेला आहे.”

      तरीही एका आंबेडकरवादी राजकीय चळवळीमध्ये वरच्या पदावर काम करणारा व्यक्ती एका कम्युनिस्ट प्रणीत विज कामगार संघटनामध्ये वरच्या पदावर कसे काय काम करु शकतो, हे अनाकलनीय आहे

      पुढार्‍यांच्या अशा विसंगत वागणुकीला काय म्हणावे? त्यांनी पहिल्यांदा बाबासाहेबांच्या विचाराचे अध्ययन करावे. तरच बाबासाहेबांच्या विचाराची खर्‍या अर्थाने पेरणी होऊ शकेल.

      तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ९ नोव्हेंबर १९४२ रोजी मुंबई आकाशवाणी केंद्रावर मजूरमंत्री या नात्याने भाषण केले. या भाषणात ते म्हणतात की, “देशाला अचूक नेतृत्व देण्याची गरज आहे. हे नेतृत्व कोण देऊ शकतो? हे नेतृत्व फक्त कामगारवर्गच देऊ शकतो, असे मला वाटते. नवी समाज रचनाच कामगारांचे आशास्थान असते. त्यासाठी कामगाराच योगदान करू शकतात आणि या दिशेनेच भारताचे राजकीय भवितव्य ते साकार करू शकतात.”

      तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लिहिणारे लेखक धनंजय कीर, पान क्रमांक ३७७ वर लिहितात की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मद्रास सदर्न मराठा रेल्वे कामगारांनी मानपत्र दिले, त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय सत्ता काबिज करणे ही गोष्ट कामगार संघ स्थापन करण्यापेक्षा अधिक महत्वाची आहे असे म्हटले होते.”

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कारकुनांपेक्षा म्हणजे मोक्याची जागा हस्तगत करणारे अधिकारी वर्ग अधिक पाहिजे होता. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटीश कालीन भारताचे गवर्नरजनरल लॉर्ड लिनलिथगो यांना उच्च शिक्षणाकरीता स्कॉलरशिपची मागणी करतांना म्हणाले होते की, “मला राजवाड्याच्या टोकावर बसणारी माणसे हवीत. कारण तेथून सर्वत्र टेहळणी करता येते. आपल्या लोकांचे संरक्षण करायचे असेल तर अशी पारध करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार?” परंतु अधिकारी वर्गांनी याचे भान ठेवलेले दिसत नाहीत.

      महात्मा कबीर आपल्या दोह्यात म्हणतात की,

      “बडा हुवा तो क्या हुवा, जैसे पेड खजूर !

      पंछी को भी छाया नही, फल लागे अती दूर !!

      अधिकारी वर्ग काही अपवाद सोडला तर खजुराच्या झाडासारखे उंचच उंच वाढत गेलेत. परंतु त्यांचा आंबेडकरी चळवळीला व समाजाला काहीच उपयोग झालेला दिसत नाही.

      निरनिराळ्या क्षेत्रात विखुरलेल्या आंबेडकरवादी कामगार संघटनांनी या भाषणाचा अभ्यास करून आपल्या कामगारांचे प्रबोधन करणे आवश्यक होते. परंतु हे कार्य होत नसल्याने कामगारवर्ग आंबेडकर चळवळीच्या संदर्भात दिशाहीन झालेले दिसत आहे.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दिशानिर्देशानुसार कामगार संघटनांची चळवळ चालत नसल्याचे आपण पाहतो आहे. एवढेच नव्हे तर कुठे कुठे विकृत स्वरूप आलेले दिसते. आंदोलनाच्या वेळी टाकलेल्या मंडपात किवा अधिवेशन स्थळाच्या राहत्या ठिकाणी कामगारवर्ग चळवळीचे पुस्तके वाचण्यापेक्षा जुगाराचे पत्ते कुटत बसल्याचे चित्र बहुधा पाहायला मिळत असते. तसेच अधिवेशन, आंदोलन किवा इतर कोणत्याही कार्यासाठी बाहेर ठिकाणी जायचे असल्यास खाणेपिणे व मौजमजा करण्यात वेळ व पैसा घालवीत असतात.

      कामगारवर्ग हा समाजातील दुधावरची साय (क्रिम) असणारा वर्ग आहे. कामगारवर्गाची भूमिका पार पाडण्यापूर्वी तो विद्यार्थी वर्गातून गेलेला असतो.

      विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “ हमारे लडको को दो बाते अवश्य सिखनी चाहिये! प्रथम बात ये है कि, उन्हे प्रमाणित करना होगा, कि वह शिक्षा, बुध्दी, योग्यता मे दुसरोके मुकाबले किसी तरह से पीछे नहि ! दुसरी बात वाह है कि उनका उद्देश केवल आरामदायक जीवन व्यतिक करना ही नही है, बल्की अपने समाज का नेतृत्व करना भी है । ताकि वह स्वतंत्र हो सके तथा पूर्णतः सम्मानजनक जीवन बीता सके ! शिक्षा ऐसा एक हथियार है जिसके द्वारा वह अपनी तथा अपने समाज की जिंदगी को अच्छा बना सकते है !”

      कामगारवर्ग हा बुद्धिजिवी वर्गामध्ये मोडतो. बुद्धिजिवी वर्गाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर “जातिभेद का उच्छेद” (Annihilation of Caste) या पुस्तकात लिहितात की, “प्रत्येक देशामध्ये बुद्धिजिवी वर्ग प्रभावशाली असतो. जो सल्ला व नेतृत्व देऊ शकतो. देशातील अधिकांश जनता विचारशील व क्रियाशील नसतात. ते बुद्धीजीवी वर्गाचे अनुकरण करून त्या मार्गाने जात असतात. म्हणून त्या देशाचे समाजाचे भविष्य बुद्धिजिवी वर्गावर अवलंबून असते. बुद्धिजिवी वर्ग चांगला किवा वाईट असू शकतात. बुद्धिजिवी वर्ग इमानदार, स्वतंत्र व निष्पक्ष असेल तर समाजाला संकटकाळी मार्ग काढून योग्य मार्गदर्शन करू शकेल. समाजाला सहाय्य करू शकेल. पथभ्रष्ट लोकांना ते चांगल्या मार्गावर आणू शकतात.”

      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे लिखाण कर्मचार्‍यांसाठी स्फूर्तिदायक आहे. परंतु त्यांनी त्याप्रमाणे आपली योग्यता सिध्द करण्यास अपयशी ठरल्याचे आपणास दिसत आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच तसे संतापजनक उदगार काढल्याचे त्यांचे निजी चिटणीस नानकचंद रत्तू यांनी “बाबासाहेबांच्या आठवणी” “( Reminiscences and remembrances of Dr. B.R.Ambedkar with Babasaheb till the end. Page No. 191- Nanakchand Rattu) या पुस्तकात “शेवटचे दिवसं” या प्रकरणात लिहिले आहे. ते लिहितात की, “मला माझ्या लोकांना शासनकर्ती जमात म्हणून बघायचे आहे. जे समाजातील इतर घटकांसोबत मिळून समानतेने राज्य करतील. मी जे काही अथक प्रयत्न करून मिळविले आहे, त्याचा लाभ आपल्या काही शिकलेल्या लोकांनी उठविला आहे. पण त्यांनी आपल्या बांधवांसाठी सहानुभूती ठेऊन काहीही केलेले नाही. त्याव्दारे त्यांनी आपली नालायकी सिध्द केली. माझे जे काही स्वप्न होते ते त्यांनी धुळीस मिळविले आहे. ते स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी जगत आहेत. त्यांच्यामधून कुणीही समाजासाठी  कार्य करायला तयार नाहीत. ते स्वतःच्या नाशाच्या मार्गाने चालले आहेत. मी आता माझे लक्ष खेड्यापाड्यांमध्ये राहणार्‍या अशिक्षित बहुजन समाजाकडे देणार आहे. जे आजपर्यंत पिडीत आहेत आणि आर्थिकदृष्ट्या न बदलता तसाच आहे.”

      बुद्धीवाद्यांच्या संदर्भात एक तत्वचिंतक जॉर्ज ओरवेल (George Orwell)     म्हणतात की, “History is continuously re-written by those peoples who control the present.” म्हणजे इतिहासाचे सतत पुनर्लेखन करणारे लोकच वर्तमानकाळाला नियंत्रित करीत असतात. अशी क्षमता ज्या समाजातील बुद्धीवाद्यांमध्ये असते तेच लोक इतिहासाचे पुनर्लेखन करू शकतात. म्हणून हा तत्वचिंतक पुढे म्हणतो की, Those who controls present, controls the past. Those who controls past, controls the future” म्हणजेच जो वर्तमान काळाला नियंत्रित करतो, तो गतकाळाला नियंत्रित करतो. जो गतकाळाला नियंत्रित करतो, तो भविष्यकाळाला नियंत्रित करतो.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे एक बुध्दिवंत झाले की, ज्यांनी हजारो वर्षापासून चालत आलेला अस्पृश्यतेचा प्रवाह रोखून धरला व इतिहासालाच बदलून टाकले. काय अशी किमया करण्याची हिंमत आजचा बुद्धीवंत कामगारवर्ग दाखवू शकेल?

      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन  संकल्पना : त्या म्हणजे  पहिली   शासनकर्ती जमात बनणे व दुसरी  प्रबुद्ध भारत बनविणे. म्हणजेच सम्पूर्ण भारत बौद्धमय करणे. हे साकार करण्यासाठी कामगारवर्गांनी बुद्धी, पैसा आणि वेळ देणे आवश्यक आहे.

      माननीय कांशीरामजी यांनी २७ जुलै २००१ रोजी नेहरू मेमोरियल हॉल पुणे येथे कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करतांना सांगितले होते, “कुछ पैसा इकठ्ठा करके समाज को देना या कुछ समाजकी सेवा करना ये तो काम अच्छा है| लेकिन कोई बडा काम नही है| सही काम मै जो समजता हुं वो ये है की, हजारो सालो से गीराये हुये समाज को उसके पैरो पर  खडा करना और उसको अपनी मुव्हमेंट का अहसास कराना, उसके बारे मी जानकार बनाना और समाज को अपने पैरो पर खडा करके उसे मुव्हमेंट को चलाने लायक, कामयाब बनाने लायक बनाना, मै समझता हुं की ये काम पढे-लिखे कार्माचारीओको करना चाहिये था|”  

      प्रसिद्ध दलित साहित्यिक दया पवार म्हणतात की, “प्रखर तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला. ज्या काजव्यांचा आम्ही जयजयकार केला, ते केव्हाच निस्तेज झालेत. आता तुम्हीच प्राकाशाचे पुंजके व्हा आणि क्रांतीचा जयजयकार करा !”

तेव्हा कामगारवर्गानी बाबासाहेबांच्या दिशानिर्दशाला अनुसरून कामगार चळवळ राबविली पाहिजे, अशी अपेक्षा करणे गैर होणार नाही. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण आणि बौध्दांची जबाबदारी

18 Sep

           दिनांक १४.१०.१९५६ रोजी नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली व नंतर उपस्थित लाखो अनुयानांना त्यांनी दिक्षा दिली.

      दुसर्‍या दिवशी दिनांक १५.१०.१९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत त्यांनी धम्माचे विवेचन व समाजबांधवांना मार्गदर्शन करणारे ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण दिले. या घटनेला आज ५५ वर्षे लोटून गेलीत. तेव्हा त्यांनी ज्या पोटतिडकीने दिशानिर्देश दिलेत त्यानुसार  समाजबांधव वागला कां याचा विचार करणे आवश्यक आहे.

      बाबासाहेब भाषणात म्हणाले होते की, ’आम्हाला इज्जत प्यारी आहे आहे, लाभ प्य्रारा नाही.’

      केसरीच्या बातमीदाराने संगमनेरच्या सभेत चिठ्टी पाठवून बाबासाहेबांना विचारले होते की, ’तुमचे लोकं हलाखीमध्ये जगत आहेत. त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाहीत. त्यांना अन्न नाही. शेतीवाडी नाही अशी त्याची बिकट परिस्थिती असतांना मेलेली ढोरे ओढू नका असे तुम्ही सांगत असल्यामुळे त्यांचे दरवर्षी कातड्याचे, शिंगाचे, मांसाचे ५०० रुपये उत्पन्नाचे नुकसान होते.’ तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की, ’तुम्ही, तुमचे पांच मुले, तुमच्या भावाच्या ५/७ मुलांमिळून तुमच्या कुटूंबानी हे काम करावे म्हणजे तुम्हाला ५०० रुपयाचे  उत्पन्न मिळेल. त्याशिवाय मी दरवर्षी तुम्हाला ५०० रुपये वर देण्याची व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न-वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहून घेईन. मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही कां सोडून देता? तुम्ही कां हे करीत नाही? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही? ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे…’

      दुसर्‍या एका ब्राम्हण मुलाने, पार्लमेंट, असेंब्ल्याच्या जागा कां सोडता असे विचारले होते. त्यावर बाबासाहेब म्हणाले की, ’तुम्ही महार बनून भरा.’

      म्हणून बाबासाहेब म्हणतात की, आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरीता! मनुष्य मात्राला पूर्णावस्थेस नेण्याकरितां आम्ही तयारी करीत आहोत. त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे.

      काय बाबासाहेंबाच्या या म्हणण्यानुसार समाजबांधव वागत आला आहे कां? की स्वार्थासाठी वाटेल ते, प्रसंगी स्वाभिमान, मानसन्मान व इज्जत गहान ठेवायला मागेपूढे पाहिले नाही. याचा जाब अशा लोकांनी स्वत:ला विचारायला नको कां?

      बाबासाहेब त्या भाषणात म्हणाले होते की, ’आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५ पासून येवले येथे एक ठराव करुन हाती घेतली. मी.हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञा मी मागेच  केली होती आणि काल मी ती खरी करुन दाखविली. मला इतका आनंद झाला की- हर्षवायुच झाला आहे. नरकांतून सुटलो असे मला वाटते.’

      काय आपण सुध्दा पुर्णपणे हिंदू धर्माच्या संकृतीचा, रितीरिवाजाचा त्याग केला आहे कां? असा प्रश्‍न आम्ही स्वत:ला विचारायला नको कां?

      पुढे बाबासाहेब म्हणतात की, ’मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द धर्मात यावयाचे आहे, त्यांनी जाणीवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.’

      काय बाबासाहेंबाच्या म्हणण्यानुसार, समाजबांधवांनी बौध्द धम्म आतातरी पटवून घेतला आहे कां? धम्माची शिकवन समजून घेऊन इतरांना समजून सांगितली काय? याचा जाब प्रत्येकांनी स्वत:ला विचारायला नको कां?

      भगवान बुध्दाचा उपदेश सांगतांना बाबासाहेब म्हणतात की, बौध्द संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान आहेत. सागरात गेल्यावर हे गंगेचं पाणी किंवा हे महानदीचे पाणी ओळखणे अश्यक्य असते. त्याप्रमाणे बौध्द संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात.

      काय लग्न जुळवतांना आपण पोटजातीचा विचार करतो काय? याचा जाब अशा लोकांनी विचारायला नको काय?

      बाबासाहेबांनी भाषणामध्ये धर्मास ग्लानी कां येते? या राजा मिलिंदानी विचारलेल्या प्रश्‍नाला भन्ते नागसेनाने दिलेल्या उत्तराचे विवेचन करतांना तीन कारणे सांगितली आहेत.

१. पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्वांत गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व कालानुसार अशा धर्म टिकतो.

२. दुसरे कारण हे की, धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्मास ग्लानी येते. ज्ञानी माणसांनी धर्म-ज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिध्द नसतील तरी धर्माला ग्लानी येते.

३. आणि तिसरे कारण हे की, धर्म व धर्माची तत्वे विद्वानासाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ट विभूतिचे पूजन करतात.

      बाबासाहेब म्हणतात की, आपण बौध्द धर्म स्विकारतांना ही कारणे लक्षांत ठेवली पाहिजे. बौध्द धर्माची तत्वे कालिक (काही काला पुरती) आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही.

      काय धम्म प्रचारासाठी व  गांवा-गांवात, मोहल्या- मोहल्यात बुध्द विहारे बांधण्यासाठी समाज बांधवांनी विशेषत: शिकलेल्या बुध्दिजीवी वर्गांनी पुढाकार घ्यायला नको काय? कारण हा वर्ग समजून घेउन इतरांना समजावून सांगू शकतो. हा वर्ग बाबासाहेबांच्या चळवळीचा लाभधारक आहे. तेव्हा या लोकांवर बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी येऊन पडत नाही काय?

      बाबासाहेब पुढे म्हणतात की, “मात्र तूमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्द‍ल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौध्द धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शुन्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे हो‍ऊ नये, म्हणून आपण दृढ निश्‍चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.”

      काय आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा प्रयत्‍न केला काय किंवा करतो काय? आपल्या कृतीने बुध्द धम्म निंदाजनक स्थितीस आणला असे झाले तर नाही ना? याचा अंतर्मुख होवून सर्वांनी विचार करायला नको काय?

      बाबासाहेब पुढे म्हणतात की, “ हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे, काही इच्छिले आहे, हे तरूणांनी लक्षांत घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान २० वा हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा.

      काय आपल्या उत्पनाचा विसावा हिस्सा म्हणजे पांच टक्के आपण बाबासाहेबांच्या कार्याकरीता योगदान देतो काय? कां हेही पैसे आपण आपल्याच घरात, शौकपाण्यासाठी खर्च करतो? याचा विचार आपण करायला नको काय? हा पैसा बाबासाहेबांचा आहे आणि तो मी बाबासाहेबांच्याच कामाकरीता खर्च करेन याची जाणीव किती लोकांना आहे?

      भाषणाच्या शेवटी बाबासाहेब म्हणतात की, “दरेकांनी दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौध्द माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो.”

      काय इतर जाती-धर्माच्या लोकांनी बौध्द धम्म स्विकारावा म्हणून आपण अशी काही यंत्रना निर्माण करु शकलो काय? याचा आम्ही विचार करायला नको काय?

      बाबासाहेबांचे भाषण व त्यावर आपली जबाबदारी याचा विचार करुन जर सर्वांनी एकत्र येऊन एका सुत्रबद्द पध्दतीने व निष्ठापूर्वक  रितिने  वाटचाल करण्याचा निर्धार केला तर खर्‍या अर्थाने बाबासाहेबांचे ’भारत बौध्दमय’ करण्याचे स्वप्‍न काही अंशी साकार झाल्याशिवाय राहणार नाही, हे निर्वीवाद सत्य आहे.

टिप-  सदर लेख

दिनांक २४.०९.२०११  दैनिक धम्मशासन, मुंबई,

दिनांक २५.०९.२०११ दैनिक वृतरत्‍न सम्राट, मुंबई,

दिनांक २९.०९.२०११ व ३०.०९.२०११  जनतेचा महानायक, मुंबई,

दिनांक ०६-१०-२०११ दैनिक बहुजन महाराश्ट्र पूणे  धम्मचक्र प्रवर्तन विशेषांक

व दिनांक ०६-१०-२०११  धम्मसंदेश यवतमाळ  धम्मचक्र प्रवर्तन विशेषांक मध्ये प्रकाशित झाला आहे. 

गुरु शिष्यानी वादळ निर्माण केले

6 Jul

      ११ अप्रील ला क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या गुरु शिष्यानी या महाराष्टातच नव्हे तर संपुर्ण भारतात एक प्रकारचा झंझावात, वादळ  निर्माण केले होते. संपुर्ण समाजमन त्यांनी ढवळून काढले होते.
      फुले-शाहु-आंबेडकर चळवळीचा १८४८ ते १९५६ पर्यंतचा १०८ वर्षाचा हा संघर्ष होता. ज्योतीबा फुले यांनी या समाज क्रांतीच्या इमारतीचा भक्कम असा पाया रोवला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावर कळस चढविला.
      या देशात त्यांनी न भुतो न भविष्यती असा क्रांतीकारी इतिहास घडविला. त्यांच्याच संघर्षामुळे  आम्हाला आज गोड फळे चाखायला मीळत आहे.
      एक शायर म्हणतो-
      हजारो सालोसे नरगीस अपने बेनुरीपे रोती है।
      बडे मुश्किल से होती है चमन मे दिदारे पैदा॥
      याचा अर्थ, हजारो वर्षापासून  नरगीस आपल्या विद्रुप चेहर्‍याकडे पाहून रडत होती. परंतु जेव्हा बागेत फुलं उगवयला लागले तेव्हा ती हसली. 
      त्याच प्रमाणे हजारो वर्षापासून शुद्र अतिशुद्र, स्त्रिया, बहुजन समाज आपल्या विद्रुपतेकडे म्हणजे दयनीय परिस्थितीकडे पाहून रडत होते. परंतु जेव्हा याच खाणीत क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजश्री शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारखे हिरे पैदा होऊन ते समाजाचे दु:ख दुर करण्याचा प्रयत्‍न करायला लागले. तेव्हा कुठे या समाजाला हायसे वाटले. आशेचा किरण दिसला.
      कालची मुके आज बोलू लागले. कालपर्यंत आम्ही मूके होतो आज मात्र बोलू लागलो. ही किमया या दोन्ही गुरु शिष्यानी घडवून आणली आहे. एक काळ असा होता की प्रस्थापीत व्यवस्थेने येथील शुद्राती-शुद्र बहुजन समाजाला शिक्षणापासून दूर ठेवले होते. क्रांतीबा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हातात लेखणी दिली. त्यामुळे आज हा वर्ग मोठमोठ्या हुद्यावर जाऊन पोहचला आहे.
      वामन दादा कर्डक आपल्या गाण्यात म्हणतात की, ‘शेणाचे हात लावले पेणाले‘ ज्यांचे हात नेहमी गाई-ढोराच्या शेणाने माखलेले असायचे, आता त्यांच्या हातात लेखणी आली आहे. ही लेखणी क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजश्री शाहु महाराज  व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्या हातात दिली ही गोष्ट आपण कधिही विसरता कामा नये..
      निसर्गातील साध्या पाण्याला तहान भागवण्यासाठी हात लावता येत नव्हता. ज्योतिराव फुलेंनी आपल्या आवारातील हौद त्यावेळी अस्पृष्यांसाठी खुला केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ साली महाड येथील चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी सत्याग्रह करावा लागला होता. जेथे कुत्रे, मांजरे, गाई-ढोरे पाणी पित होते परंतु माणसांना मात्र  पाण्याला शिवण्यास मनाई होती.  त्यांची सावली सुध्दा उ़च्चवर्णीय आपल्या अंगावर पडू देत नव्हते. निरनिराळ्या प्रकारे त्यांनी गुलामीत जखडून ठेवले होते.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्यांना इतिहास माहीत नाही ते इतिहास घडवू शकत नाही. एक इतिहास व्यक्तीला बदलवू शकतो तर व्यक्ती सुध्दा इतिहासाला बदलू शकतो असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. या दोन्ही गुरु-शिष्याने अस्पृष्यतेचा, विषमतेचा  हजारो वर्षापासून चालत आलेला अमानवी इतिहासाचा प्रवाह रोखून धरला. परिवर्तन करण्याची एवढी प्रचंड ताकद त्यांच्या चळवळीमध्ये होती ही बाब नाकारता येणार नाही. 
      जोसेफ मॅझनी नावांच्या एका विचारवंताने म्हटले होते की, माणूस जरी मर्त्य असला तरी त्याचे विचार मात्र जिवंत राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा खोडून काढतांना सांगितले की, असे समजणे घोडचुक होईल. कारण एखाद्या रोपट्याला जिवंत ठेवण्यासाठी खत व पाणी देण्याची आवश्यकता असते. नाहीतर ते मरुन जाईल.  त्याचप्रंमाणे विचाराला जिवंत ठेवण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार होणे तितकेच महत्वाचे आहे. नाहीतर ते विचार सुध्दा मरुन जाईल. क्रांतीबा ज्योतिराव फुलेंचे विचार सुध्दा असेच काळाच्या आड लपलेले होते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले व त्यांचे मानव कल्याणाची चळवळ शुध्द स्वरुपात पुढे नेली.
      कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी अनेक शाळा, कॉलेज, वसतीगृह काढले, ते म्हणतात-
      ‘एक वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा..
      शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसे  पेरा..
      व पांच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा…’
      म्हणून महापुरुषांचे विचार एका पिढीतून दुसर्‍या पिढीपर्यंत समर्थपणे पोहचविण्यासाठी विचार पेरणे आवश्यक आहे. नाहीतर  ते विचार खंडीत होवून जातील.
      ज्योतिबा फुले हे भारतीय इतिहासातील पहिले भारतीय आहेत की ज्यांनी ब्राम्हणवादी समाज व्यवस्थेच्या विरोधात कठोर विद्रोह केला.  त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत जो अविरत संघर्ष केला तो ब्राम्हणी समाज व्यवस्थेच्या विरोधात होता. ते ब्राम्हणांचा विरोध करीत नव्हते. तर ब्राम्हणी समाज व्यवस्थेचा विरोध करीत होते.
      तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्राम्हणांचा विरोध करीत नव्हते. तर ब्राम्हणवादाचा  विरोध करीत होते. त्यांनी १२ व १३ फ़ेब्रुवारी १९३८ ला जळगांव येथे झालेल्या कामगार परिषदेत सांगितले होते की, ‘ब्राम्हणवाद म्हणजे समता, स्वातंत्य, बंधुत्व व न्याय नाकारणारी प्रवृती होय. ही प्रवृती जशी ब्राम्हणांमध्ये असेल तशीच ती ब्राम्हणेतरांमध्ये पण असू शकते.’ म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीत ब्राम्हणांनी सुध्दा सक्रिय योगदान दिले होते, ही गोष्ट नाकारता येऊ शकत नाही.
      ज्योतिबा फुले यांच्या आगमनाच्या पुर्वीचा जो काळ होता तो पेशवाईचा काळ होता. हा पेशवाईचा काळ म्हणजे शुद्र-अतिशुद्र, बहुजन समाजासाठी अत्यंत अंधारमय काळरात्र  होती व ब्राम्हणांसाठी मात्र अत्यंत भरभराटीचा काळ होता.
      ब्राम्हण भोजणे व दक्षीणा हा त्यांच्यासाठी पर्वणीचा उद्योग असायचा. सरकारी तिजोरीतला अमाप पैसा या ब्राम्हण भोजणांवर खर्च करायचे. खादाड वृती इतकी विकोपाला गेली होती की, जो  ब्राम्हण एकाच वेळेस चार शेराचा भात, दुध, तुप, साखर खात असेल त्याला पालकीचा मान मिळत असे. तसेच सरकारी तिजोरी खाली होईपर्यंत ब्राम्हणांना लाखो रुपयाची दक्षिणा वाटत असत. श्रावण मासात रुपये, सोणे-नाणे वाटण्यासाठी एक सण असायचा. लाखो ब्राम्हण दक्षिणेसाठी पुण्यात जमायचे. नानासाहेब पेशवे यांनी १७५३ साली ८०००० ब्राम्हणांना १६ लाख रुपये वाटली अशी नोंद आहे.
      शिवाजी महाराजांची सत्ता गेल्यानंतर मनुस्मृतीच्या कायद्याचा अंमल याच काळात अत्यंत कठोरपणे करण्यात येत होता. हिंदु धर्मात ज्या सतीप्रथा, विधवा विवाहबंदी, बालविवाह, जरड विवाह, विधवांचे केशवपण, जातीभेद, अस्पृष्यत: यासारखे जे अनिष्ट चालिरिती आधिच चालु होत्या त्याला पेशवाईत आणखीनच बळ मिळाले होते.
      शुद्र-अतिशुद्र असा हा भलामोठा समाज विषारी जातीयतेच्या दु:खाने, शोषणाने, भुकेने, निरक्षरतेने त्राही त्राही झाला होता. लुळापांगळा झाला होता. त्याकाळी शैक्षणीक, सामाजिक, नैतिक अवस्था इतकी किळसवानी थराला जाऊन पोहचली होती की पेशवाई म्हणजे मानवतेवर फार मोठा कलंक ठरावा.
      शुद्र-अतिशुद्रांना शिक्षण घेण्यापासून बंदी होती. चांगली मोडी अक्षर लिहिणार्‍या सोनार, प्रभु वगैरे जातींच्या लोकांचे हात तोडून टाकण्यात आले होते. शिक्षण घेऊ पाहणार्‍या कित्येक लोकांना फासावर लटकवीले गेले होते.
      अनेक प्रकारच्या जुलमी कर वसुलीसाठी शेतकर्‍यांना ओणवे करुन उघड्या पाठीवर फटके मारीत, नाजुक भागावर चटके देत असत. त्यांच्या स्त्रियांवर गूंडाकडून बलात्‍कार घडवून आणीत. 
      स्त्रियांच्या दु:खाला तर पारावर राहिला नव्हता.
      ‘शुद्र पशु नारी ये है सब ताडण के अधिकारी’
      या स्वामी तुलशीदासाच्या म्हणण्यानुसार नारी ती मग ब्राम्हणाची कां असेना त्या शुद्रच होत्या. त्यामुळे ब्राम्हणाची आई, बहिण, मुलगी यांचा सुध्दा ब्राम्हण पुरुष मनुस्मृतीच्या कायद्यानुसार छळ करायचे.
      आपल्या मुलींचे लग्न वयाच्या नवव्या वर्षीच उरकून घ्यावे असे त्यांनी फर्मान काढले होते. त्यामुळे बालविवाह, अकाली वैधव्य, सतिची चाल, केशवपण अशा सारख्या अनिष्ट चालिरितीने स्त्रिया नाडल्या जाऊन त्यांना जनावरासारखी वागविले जात होते.
      एकापेक्षा अनेक बायका करण्याची पध्दत त्यावेळी श्रिमंत, जमीनदार, राजघराणे यांच्यात रुढ झाली होती. नाना फडणीसाला नऊ बायका, दुसर्‍या बाजीरावाला अकरा बायका, महादजी शिंदेला सात बायका. याशिवाय अनेक रखेल राहायचा. त्याची मोजदाद नाही. त्यांचे कडे एक जनानखाणा असायचा.
      एखाद्या ६०-७० वर्षाच्या वयस्कर पुरुषाच्या गळ्यात ८-९ वर्षाची कोवळी मुलगी बांधून द्यायचे… अशा नवर्‍याचे निधन झाले की त्यांना आयुष्यभर विधवेचे जीवन जगावे लागे. पुरुषांच्या वाईट नजरांना त्यांना बळी पडावे लागे. अशातच त्यांना मातृत्व आले की आत्महत्या करायच्या किवा जन्माला आलेल्या बालकांच्या हत्या करायच्या.
      सतीमध्ये केवळ लग्नाच्या बायकांना जाळत असत असे नव्हे; तर त्यांच्या रखेल, नौकरानी, दासी यांना सुध्दा जाळत. जाळण्यापुर्वी त्यांच्या अंगावर दागदागिने घालायला लावायचे, तिच्या मृत नवर्‍याच्या चित्तेवर बसवून तिला जिवंतपणी जाळत. तिने जर चित्तेवरुन उडी घेण्याचा प्रयत्‍न केला तर तीला बांबूच्या काठीने ढकलून द्यायचे. तिचा आर्त आवाज आसमंतात घुमू नये म्हणून मोठमॊठे नगारे वाजवित. जळाल्यावर त्यांच्या राखेला हात लावण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणांना! कारण त्यात सोने-नाणे असायचे. ‘मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे’ म्हणतात ते हेच असावेत! किती ही क्रुर प्रथा! अंगावर काटे येतात…
      तीला दुसरे लग्न करायला बंदी होती.      त्यांच्या डोक्याचे केस काढुन त्यांना विद्रुप करायचे.
      ‘अहो अण्णा मी तुमची लाडकी।
      मला कां करतां बोडकी॥’
      अशा त्या टाहो फोडत असल्याचे सावित्रीमाईने आपल्या काव्यात म्हटले आहे.
      पायात वहान घालण्याची त्यांना बंदी होती. एखाद्या कोपर्‍यात तीला बसून राहावे लागे. अशा प्रकारचे अनेक निर्बंध तिच्यावर असायचे.
      पेशवाईत स्त्रियांचा बाजार भरायचा. दास-दासी विकत घेण्याची व विकण्याची उघड प्रथा होती. स्त्रियांचे शील व चरीत्र नेहमीच धोक्यात असायचे. 
      न्यायाला व सत्याला कुठेही स्थान नव्हते. घाशीरामने आपली कोवळी मुलगी बाजीरावला भोगायला देउन कोतवालकी मिळवली होती हे सत्य आपण घाशीराम कोतवाल या नाटकात पाहिले असेल. प्रजेचा अतोनात छळ होत होता. भ्रष्टाचार बोकाळला होता. न्याय सुध्दा विकत मिळत होता.
      कनिष्ट जातींना कठोर शिक्षा व वरिष्ट जातींना सौम्य शिक्षा व्हायच्या. धर्माविरुध्द बोलणे म्हणजे धर्मद्रोह व राजाविरुध्द बोलणे म्हणजे राजद्रोह. उकळत्या तेलातून नाणे किंवा अंगठी काढणे, तप्त लाल झालेली कुर्‍हाड हातात धरणे, आरोपीची जिभ कापणे, शरिराचे एक एक अवयव तोडणे, फटके मारणे, जखम झाली की त्यावर मिठ लावणे, तोफेच्या तोंडेत देणे, हत्तीच्या पायाने तुडविणे, डोके उडऊन गांवात फिरवीणे अशा प्रकारच्या कठोर शिक्षा शुद्र-अतिशुद्रांना भोगावे लागत असे.
      ब्राम्हणांना सचैल स्नान करणे, तूप पिणे, दुधातील खिर खाणे असे हास्यास्पद शिक्षा करीत असे. ब्राम्हणांना दक्षिणा दिले की पापमुक्त होत असे.
      सामाजिक अत्याचारात ब्राम्हण वर्गाने कहरच केला होता. काही सोनाराने कपाळावर आडवे गंध लावला म्हणून लोखंडी शिक्के तापऊन त्यांच्या कापाळावर उमटविल्या. सुताराने एकटांगी धोतर नेसले म्हणून त्याच्या ढुंगणाचा कुल्ला कापुन टाकला. शुद्रांमध्ये मोडणार्‍या व आता ओ.बी.सी मध्ये गणल्या जाणार्‍या सोनार, सुतारासारख्या जातींचा सुध्दा त्याकाळी छळ होत होता.
      या काळात अस्पृश्यांच्या अत्याचाराला पारावर नव्हता. याच काळात रस्त्यावर उमटलेले पायाचे चिन्ह पुसून जावे म्हणून ढुंगणाला फडा बांधणे व थुंकण्यासाठी गळ्यात गाडगे अडकवीणे अस्पृश्यांना बंधनकारक केले होते. कित्येकांच्या तोंडात तेल व शेंदूर ओतून त्यांना इमारतीच्या पायात, गढी, किल्ले व बुरुजात ठार मारण्याची प्रथा होती.
      अशा या अंधार युगाचा अंत १८१८ ला झाला. त्यानंतर ब्रिटीशांची राजवट आली.
      फुले दांपत्याचे आगमन झाल्याचा काळ पेशवाई नंतरचा जरी असला तरी सामाजिक परिस्थीती पेशवाईकालीन परिस्थितीपेक्षा फारशी सुधारली होती असे म्हणता येत नाही.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुध्द आणि संत कबीर यांचे सोबत ज्योतिबा फुले यांना सुध्दा गुरु मानले होते. ते एकदा म्हणाले होते की, ‘जर ज्योतिबा फुले या धरतीवर जन्माला आले नसते तर आंबेडकर सुध्दा निर्माण झाला नसता. म्हणून ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक चळवळीला  भारताच्या सामाजिक क्रांतीच्या इतिहासात विशेष स्थान आहे.
      एका ब्राम्हण व्यक्तीच्या सांगण्यावरुन ज्योतीबांच्या वडिलांनी ज्योतीबांचे शिक्षण बंद केले होते. परंतु गफ्फार मुन्सी व लेजिट अशा मुस्लिम व ख्रिचन व्यक्तिने ज्योतीबांच्या वडिलांना समजावीले म्हणून ज्योतीबांना पुढील शिक्षण घेता आले.
      याच काळात त्यांचेवर ख्रिचन मिशणमधील शिक्षणाचा, थॉमस पेन यांच्या ‘मानवाचे हक्क’ या ग्रंथाचा, जॉर्ज वाशिग्टन व शिवाजीराजे यांच्या चरीत्राचा प्रभाव पडला. 
      ब्राम्हण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून ज्योतीबांना हाकलून दिले होते. वडिल म्हणाले की, ‘बरे झाले तुला फक्त हाकलले. पेशवाई असती तर तुला हत्तीच्या पायाने तुडविले असते.’ ज्योतीबां वडिलांना म्हणाले की, ‘बाबा तुम्ही हे सर्व सहन केले असेल परंतु मी मात्र सहन करणार नाही.’ हा प्रसंग त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. त्यानंतर त्यांनी धर्मशास्त्र, वेद, पुराण याचा अभ्यास केला व जातीभेदाच्या नांवाने देण्यात येणार्‍या कारणांचा शोध घेतला.
      सामाजीक क्रांतीच्या चळवळीचे नेतृत्व करु पाहणार्‍या सेनापतीला  दुरदृष्टी व धाडस या दोन  मौलीक गुणाची गरज असते. हे दोन्हिही गुण ज्योतिबा फुले यांच्याकडे निश्चितच होते.
      ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी याविरोधात चळवळ चालविली. मातृत्व आलेल्या स्त्रियांना आत्महत्या न करण्याबाबत प्रवृत करीत. त्यांचे बाळंतपण व मुलांचे संगोपण त्यानी स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृह व बाल संगोपण गृहात करीत असत.
      काशीबाई नांवाची एका ब्राम्हण स्त्रिला आत्महत्या न करु देता, तीचे बाळंतपण केले व तिच्या बाळाला-यशवंताला दत्तक घेतले. हेच फुले दांपत्याचे एकमेव मुल होते. कारण त्यांना स्वत:चे मुल नव्हते. या यशवंताला त्यानी वैद्यकीय शिक्षण दिले व त्याचे आंतरजातीय मुलीशी लग्न लाऊन दिले.
      ज्योतिबा फुले यांनी विधवा मुलींचे नाव्ह्यांनी डोक्याचे केस कापू नयेत म्हणून त्याचे शिष्य नारायन मेघाजी लोखंडे यांच्या मार्फत त्यांचा संप घडवून आणला होता.    आजकाल पगारवाढीसाठी संप केला जातो. पण अशा सामाजिक प्रश्‍नासाठी संपाचे शस्त्र ज्योतिबा फुलेंनी उगारले हे जगातील त्यावेळचे पहिले उदाहरण असेल.
      ज्योतीबा फुले शुद्र-अतिशुद्राच्या गुलामगिरीचे, दुखाचे  कारण अविद्या आहे असे म्हणत. म्हणून त्यांनी ‘शेतकर्‍याचा आसुड’ या ग्रंथात म्ह्टले आहे की-
      विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥
      निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।
      वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
      हा महात्मा फुले यांचा संदेश म्हणजे क्रांतीकारक तर आहेच पण एक नविन तत्वज्ञान मांडणारा आहे. पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीपासून जवळपास २००० वर्षापासून एखाद्या मुक्या जनावराप्रमाणे राहणार्‍या शुद्र अतिशुद्र समुहाचा अडकलेला हुंकार मुक्त झाला या संदेशामुळेच! 
      म्हणून त्यांनी शिक्षणावर जास्त भर दिला.  १ जानेवारी १८४८ ला मुलींसाठी भिडे वाड्यात पहिली ऎतिहासिक शाळा काढली. त्यानंतर त्यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या. पुढे १८५२ पर्यंत अशा शाळांची संख्या १८ पर्यंत नेली.
      इंग्रज लोकांची अशी धारणा होती की जर वरिष्ट जातींना उच्च शिक्षण दिले तर झिरपत खालच्या जातीपर्यंत येईल. फुलेंनी या त्यांच्या योजनेला विरोध केला. त्याऎवजी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे करावे असे त्यांनी हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात मागणी केली.
      याची अंमलबजावणी मात्र राजश्री शाहु महाराजांनी त्याच्या राज्यात केली होती. जे पालक मुलांना शाळेत टाकणार नाहीत त्यांना ते दंड करीत.
      याचीच तरतुद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानात केली. परंतु खेदाची गोष्ट अशी की, ६० वर्षानंतर त्याचा कायदा होऊन १ अप्रिल २०१० पासून त्याची अंमलबजावणी झाली आहे. त्याची जर आधिच कायदा होऊन अंमलबजावणी झाली असती तर शिक्षणाच्या बाबतीत भारतामध्ये एक वेगळेच चित्र निर्माण झाले असते.
      मुलींना शिकविण्यास शिक्षक मिळत नव्हते. म्हणून त्यांनी सावित्रीलाच शिक्षिका बनविले. सावित्री ही भारतातील पहिली शिक्षिका ठरली. त्यानंतर त्या मुख्याध्यापिका झाल्यात. तेव्हा  भारतामध्ये मुख्याध्यापिका झालेल्या त्या पहिल्या स्त्री होत्या
      त्या घरुन शाळेत जायच्या तेव्हा रस्त्यातील ब्राम्हण लोकं तिला शेण, माती,दगडं मारुन अर्वाच्च शिव्या देत असत. मुलींनी शिकणे पाप आहे. धर्माच्या विरोधात आहे. जेवणाच्या ताटात अळ्या पडतात. आज कोणाच्या स्त्रिया शिक्षणामध्ये व इतर अन्य क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. असे असून सुध्दा या स्त्रिया सावित्रीमाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात काय? की त्या फक्त  काल्पनीक सरस्वतीला जीला कोणताही इतिहास नाही. अशा सरस्वतीलाच  देवता माणतात? याचे आश्चर्य वाटते.      ज्योतीबांना व सावित्रीमाईंना वडिलाने ब्राम्हणाच्या तक्रारीवरुन घराबाहेर काढले. तरीही ते डगमगले नव्हते.
       स्त्रि-पुरुष समानतेवर ताराबाई शिंदे यांनी लिहलेल्या पुस्तकाचा त्यांनी गौरव केला. त्यांनी स्वत:च्या जीवनात त्यांच्या विचाराचे अनुकरण केले. ज्योतीबांना अपत्य नव्हते. तेव्हा सगेसोयरे व प्रत्यक्ष पत्‍नी सावित्री हिने सुध्दा दुसरे लग्न करण्याची विनंती केली. तेव्हा ते सावित्रीना म्हणाले की, वैद्यकिय दृष्ट्या तुझ्यात जर ऊणीव असेल तर दुसरे लग्न करुन सवत आणण्यास  काही हरकत नाही. पण माझ्यात जर ऊणीव असेल तर तुला दुसरे लग्न करुन या घरात सवता आणावे लागेल, याला तुझी तयारी आहे कां? असा तिला प्रश्‍न केला. अशा प्रकारे समता कृतीत आणणारे ते युगपुरुष होते.
      शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी ज्योतीबा फुले रायगडावर गेले. तेथे झाडाझुडपात व काट्यात लपलेला शिवाजीची समाधी शोधून काढली. व तो परिसर साफ केला. त्यावर फुले वाहिली. ग्रामभटाने हे पाहिले व त्यांनी ते फुले पायांनी उधळले. त्यांनी शेतकर्‍यांचा रक्षणकर्ता असे शिवाजीराजे यांचे चित्र रंगवून पोवाडा रचला.
      जमीनदार व सावकारच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी शेतकर्‍यांची चळवळ चालविली. याच वेळेस त्यांनी शेतकर्‍यांचा आसुड हा ग्रंथ लिहीला
      नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये गिरणी कामगाराची  चळवळ सुरु केली होती.   
      १८७७ साली पडलेल्या दुष्काळात त्यांनी लहान मुलांसाठी अन्नछत्र उघडले होते.
      १८७७ साली चळवळीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘दीनबंधु’ नावाचे मुखपत्र सुरु केले. त्या मुखपत्राचे संपादक सुरुवातीला कृष्णराव भालेकर व नंतरच्या काळात नारायण मेघाजी लोखंडे होते.
      ज्योतीबा फुले यांनी प्रंचड लेखन केले. त्यांनी शेतकर्‍यांचे आसुड, गुलामगिरी, ब्राम्हणाचे कसब, तृतीय रत्‍न, शिवाजींचा पोवाडा, सार्वजनिक सत्य धर्म, अखंड इत्यादी अनेक प्रकारचे ग्रंथ, नाटक व काव्यलेखन केले. आयुष्याच्या अखेरीस ते आजाराने ग्रस्त असल्यामुळे त्यांचा उजवा हात काम करीत नव्हते. म्हणून त्यांनी डाव्या हाताने सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ लिहिला.
      पत्रकारिता, ग्रंथलेखन, साहित्यलेखन, काव्यलेखन, तत्वज्ञान, कामगार चळवळ, शेतकरी आंदोलन, स्त्री मुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन, जाती निर्मुलन, अनिष्ट प्रथा निर्मुलन आरोग्य, शिक्षण ईत्यादी अनेक स्तरावर महात्मा फुलेंची चळवळ प्रहार करत पुढे जात होती.
      सतीप्रथेच्या बाबतीत ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी जागृती निर्माण केली. बायको मेल्यावर तीचा  नवरा सता कां जात नाही असा ते प्रश्‍न विचारीत.
      ब्राम्हणांनी दोन मारेकर्‍यांना ज्योतिबा फुलेंना मारण्यासाठी सुपारी देऊन पाठविले होते. परंतू ज्योतिबा फुलेंच्या विनयशील वागणूकीमुळे ते दोघेही त्यांना शरण गेले. त्यातला एक धोंडीराम कुंभार याला काशीला पाठविले. तेथे त्यांनी ग्रंथाचा व  शास्त्राचा अभ्यास करुन पंडीत झाला. दुसरा रोडे रामोशी ज्योतिबाचा अंगरक्षक झाला.  
      राजेशाहीमध्ये सत्तेच्या सर्व किल्ल्या ब्राम्हणाकडेच होत्या. नांवाला क्षत्रिय राजे असले तरी त्यांची सत्ता ब्राम्हणाच्या सल्ल्याने चालत असायचे. राम आणि कृष्णा सारख्या देवांची सत्ता सुध्दा  ब्राम्हणाच्या सल्लामसलतीने चालत होता.
      ज्योतीबा फुलेंच्या काळात जरी सत्ता ब्रिटिशांची असली तरी त्यांच्या प्रशासनात  ब्राम्हणच होते. समाजातील उच्च स्थानामुळे सत्तेला आपल्या कलाप्रमाणे राबविण्यात ते यशस्वी झालेत. ऎनकेन प्रकारे सत्तेवर ब्राम्हणाचे वर्चस्व राहिल्यामुळे  सर्वसामान्य लोकं आणि शेतकरी नाडल्या जात होते. त्यांच्या अशिक्षितपणाचा, अडाणीपणाचा फायदा घेऊन कोर्ट कचेरीच्या कामात त्यांना कसे नागविल्या जात होते ते ज्योतीबांनी ‘ब्राम्हणाचे कसब’ आणि ‘शेतकर्‍यांचा आसूड’ या ग्रंथात लिहिले आहे.
      ब्राम्हणांनी मनुस्मृती व वेद निर्मान करुन ते देवनिर्मित आहेत असे लोकांना सांगितले. त्यामाध्यमातून चातुर्वण्य व्यवस्था व जातीची उच्च-निच अशी उतरंड तयार केली. त्यामुळे बहुजन समाज एकत्र येऊ शकला नाही. पाप, पुण्य, नशीब, दैव अशा भोळसर कल्पना त्याच्यात बिंबवील्यात.  त्यामुळे  ब्राम्हणांकडून होणारे अन्याय अत्याचाराला ते निमुटपणे सहन करीत असत.
      हिंदुधर्माच्या ग्रंथावर ते टिका करीत असे. रामायणाला लोकांची मने रिझविण्यासाठी त्यावेळच्या गप्पाड्या नाटक्यांनी कल्पून रचिलेला नितीहीन इतिहास होय. गोपीकांचे वस्त्र पळविणारा, गोपपत्‍नी राधेसोबत रममान होणार्‍या कृष्णाला महाभारतातील नितिभ्रष्ट पात्र समजत असत.
      विटलो खोट्या धर्मा।
      त्यागिले निच कर्मा॥ असे त्यांनी एका काव्यात म्हटले आहे.
      त्यांनी फक्त ब्राम्हणी समाज व्यवस्था किंवा हिंदु समाज व्यवस्था किंवा जाती व्यवस्था या विरोधात विद्रोह केला असे नसुन त्यांनी ज्या धर्म शास्त्रांचा आधार घेऊन  ही व्यवस्था निर्माण केली त्या धर्म शास्त्रांच्या सत्यतेच्या विरुध्द सुध्दा आव्हान दिले.
      ज्योतीबा फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथात रामायण व ‘भागवत’ यातील गोष्टी खर्‍या व विश्वसनिय नाहीत असे लिहिले आहेत. ‘रामायणात परशुरामाचे धनुष्य सिता जर सहज उचलून खेळत असेल व तोच धनुष्य उचलतांना जर रावण पडत असेल तर रावणापेक्षा सिता ही शक्तीशाली असली पाहिजे. मग रावण सितेला कसा काय पळवून नेऊ शकतो? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.
      तसेच ब्राम्हण असलेल्या भृगु ॠषीने विष्णु-आदिनारायणाला लाथ मारतो तेव्हा  भृगु ॠषीच्या पायाला लागले असेल म्हणून विष्णु त्याचे पाय चोळतो. याचा अर्थ ब्राम्हणाने प्रत्य्क्ष देवाला जरी लाथ मारली तरी तो सहन करतो. मग आपण तर शुद्रच आहोत, मग आपल्याला ब्राम्हणाने लाथ मारल्यानंतर हु की चु करु नये, असा त्याचा भावार्थ आहे असे फुलेंनी ग्रंथात लिहिले आहे.
      ‘ब्राम्हण हे ईराणी आर्यभट असून परकीय आहेत. त्यानी आपली सत्ता टिकविण्यासाठी वेदापासून पुराणापर्यंत निर्मिती केली. आक्रमण करुन आलेल्या आर्यानी शक्ती, विश्वासघात व धार्मिक प्रचार या माध्यमातून स्थानिक जनतेवर त्यांनी विजय मिळविला. विष्णुचे नउ अवतार म्हणजे आर्यांनी प्राप्त केलेल्या विजयाच्या निरनिराळ्या अवस्था होत्या’ असे ज्योतीबा फुलेंनी ग्रंथात लिहिले आहे.
      इंग्रज आहेत तोपर्यंत शुद्राने जल्दी करुन भटाच्या दास्यत्यातून मुक्‍त व्हावे असे गुलामगिरी या ग्रंथामध्ये लिहिले आहे.
      मनुस्मृतीचे कोणीतरी एखादा शुद्र दहन करील असे भाकीत ज्योतीबा फुले यांनी व्यक्त केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुची आज्ञा मानून २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे महाड येथे दहन केले
      शुद्र-अतिशुद्रास रसातळाला नेणारा त्यांचे जीवन, भावविश्व बेचिराख करणारा असा हिंदुधर्म असल्यामुळे त्यांनी ’सार्वजनिक सत्य धर्माची’ स्थापना केली.
      २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या स्थापनेमागे त्यांचे ३ उद्देश होते-
१. शुद्र व अतीशुद्र यांची ब्राम्हण पुरोहिताकडून होणारी पिळवणूक बंद करणे.
२. त्यांना त्यांच्या मानवी हक्काची व अधिकारांची शिकवणूक देणे. आणि
३. ब्राम्हणी शास्त्रांच्या आणि धार्मिक गुलामगिरीतून त्यांना मुक्त करणे.
हाच उद्देश समोर ठेउन ज्योतीबा फुलें यांनी आपल्या कार्याची दिशा आखली होती.
      सत्यशोधक समाजाची स्थापना करुन सनातन्याचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली. तसेच सत्यशोधक समाजाचे संघटन करण्याचे कार्य हाती घेतले. या संघटनेचा पुणे, मुंबई व खेडोपाडी प्रचार व प्रसार करण्य़ात आला.. ब्राम्हणाच्या हातून लग्न व इतर कोणतेही विधी करण्याचे काम या संघटनेने थांबवून आपल्याच कार्यकर्त्याद्वारे ते सत्यशोधक पध्दतीने विधी करीत असत. संघटनेने अनेक सत्यशोधक विवाह अत्यंत कमी खर्चात व साधेपाणाने घडवून आणले.
      ८ मार्च १८६४ रोजी त्यांनी शेणवी जातीच्या विधुर-विधवांचा पुनर्विवाह घडवून आणला.
      ख्रिचन,  मुस्लिम, मांग व  ब्राम्हण यांनी भावासारखे राहावेत असे फुले म्हणत असत. ख्रिस्त महमंद मांग ब्राम्हणासी।
      धरावे पोटाशी। बंधुपरी॥ यावरुन ते मानवतेवर किती प्रेम करायचेत ते दिसते. एकाच घरात एक भाऊ मुस्लिम एक ख्रिस्ती एक बौध्द असावा अशी त्यांची सर्व धर्म समभावाची व व्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना होती.
      ज्योतीबा म्हणतात-
      ‘थोडे दिन तरी मद्य वर्ज करा।
      तोच पैसा भरा। ग्रंथासाठी॥’
१८८० मध्ये त्यांनी दारु विक्रीला विरोध केला होता. 
      प्रत्येक सरकारी खात्यात ब्राम्हणेत्तर लोकं असल्याशिवाय जनतेला खरे सुख मिळणार नाही. म्हणून ते प्रत्येक खात्यात सर्व जातीच्या लोकांचा भरणा असला पाहिजे असे ते प्रतिपादन करीत. विशेषत: शिक्षण खात्यात सर्व जातीच्या शिक्षकांची नेमणुक करावी असे ते सरकारकडे मागणी करीत असे. म्हणजेच प्रत्येक जातीला त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात त्यांची भागिदारी असावी असा त्यांनी विचार मांडला होता. हाच विचार घेवून राजश्री शाहू महाराज यांनी त्याच्या संस्थानात ब्राम्हणेतरांना ५० टक्के आरक्षण दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गियांना आरक्षण मिळण्यासाठी कठोर संघर्ष केला व भारतीय घटनेमध्ये तशी तरतुद केली.
      २ मार्च १८८८ रोजी पुणे येथे ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सत्कार प्रसंगी ज्योतीबाने शेतकर्‍याच्या पोषाखात  जाऊन म्हणाले की, ‘येथे जमलेले हिरेमोती व मौल्यवान कपडे घातलेले लोक हे हिंदुस्थानचे खरे प्रतिनिधी नाहीत. खरा हिंदुस्थान खेड्यात आहे. तो उपाशी, गरीब, बेघर व उघडा-नागडा आहे. त्याला शिक्षण देणे आवश्यक आहे. ही जाणीव आपण आपली माता महाराणी व्हिक्टोरिया यांना करुन द्यावी.’
      ज्योतीबांनी  इंग्रज नोकरशाहीलाही धारेवर धरले होते. इंग्रज अधिकारी ऎषारामी बनला आहे. हाताखालील ब्राम्हण अधिकार्‍यावर विश्वास ठेऊन इंग्रज अधिकारी शेतकर्‍यांची पिळवणूक करीत असतो. इंग्रजी राजवटीत ब्राम्हण अधिकारी अधिकच जुलमी व भ्रष्टाचारी बनली आहे.
      ग्रामीण शेतकरी–कष्टकरी जनतेचे आता दुहेरी शोषण होत आहे. एकीकडे इंग्रज व दुसरीकडे ब्राम्हण यांच्याकडून त्यांची भयंकर नागवणूक होत आहे
      म्हणून ज्योतीबा फुले म्हणतात-
      ‘सत्ता तुझी राणीबाई। हिंदुस्तानी जागृत नाही॥
      जिकडे तिकडे ब्राम्हणशाही। डोळे उघ्डुनी पाही॥ .
      मुंबईच्या सभेत त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली.
      संत कबीर म्हणतात-
      सुखीया सब संसार है। खाये और सोये॥
      दु:खीया दास कबीरहै। जागे और रोये॥
      याचा अर्थ-
      सर्व लोकं खाण्यात व झोपण्यात सुख मानतात. कबीर मात्र यामुळे दु:खी होऊन जगत आहे व रडत आहे.  
      संत कबीर पुढे म्हणतात-
      बडा हुआ तो क्या हुआ। जैसे पेड खजुर॥
      पंछी को तो छाया नही। फल लागे अती दुर॥
      याचा अर्थ- ‘खजुराच्या झाडाप्रमाणे मोठा झालास म्हणून काय झाले. पाखरांना तर तुझी सावली मिळत नाही आणि तुझी फळे दुर असल्यामुळे ते पण कोणाला खाता येत नाही.’
      म्हणून महात्मा ज्योतीबा फुले यांच्या त्यागमय जीवनाचा बोध घेऊन सामाजीक कार्यामध्ये तन, मन धनाने सहयोग दिला पाहिजे. फुले-शाहु-आंबेडकरांच्या चळवळीचा सैनिक बणण्याऎवजी प्रतिक्रांतीवाद्याचा सैनिक बनून मानवतेचा बळी तर घेत नाही ना यावर आपण लक्ष ठेवायला शिकले पाहिजे हा बोध ज्योतीबा फुलेंच्या जीवन आणि कार्यामधून घेता येईल. 
      एक शेर असा आहे-
      मिला दे खाक मे हस्ती, गर कुछ मर्तबा चाहे।
      कि दाना खाक मे मिल गुले, गुलझार होता है॥
      याचा अर्थ आहे-
      जेव्हा धान्याचा एक दाना जमिनीत पुरतो. तेव्हा त्याचे झाड बनते. त्याला कणिस लागते. त्या कणसाला हजारो दाने लागतात. परंतु हे हजारो दाने निर्माण करण्यासाठी त्या एका दान्याला जमिनीमध्ये नष्ट व्हावे लागते. असं हे ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे जीवन होते.

—————————————————————————————————-

 सदर लेख लेखकांनी (आर. के. जुमळे) दिनांक ११.०४.२०१० रोजी भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन, विद्युत वसाहत दिपनगर येथे सार्वजनिक महात्मा ज्योतीबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून दिलेल्या भाषणावर आधारीत आहे.

कामगारांच्या उत्कर्षासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य

16 Jun

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक, राजकीय, घटना निर्मिती इत्यादी संबधीचे कार्य हे असामान्य आहेच, पण ह्या कार्याबरोबरच कामगारांच्या उत्कर्षासाठी केलेले कायदे व कामगार वर्गाच्या संबधीचे इतरही कार्य उल्लेखनिय व महत्वपूर्ण आहे. बाबासाहेबांच्या या अफाट कार्यासंबंधी भारतीय कामगार व कामगार संघटनांना अजुनही पुरेशी जाणीव झालेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे.
कामगारांसाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान खालील प्रमाणे आहे.
 १.       शेतकर्‍यांसाठी किमान वेतन दर असावेत अशी मागणी विधिमंडळात केली.
२.      १९३७ साली कोकणातील बहुजन कामगारांचे शोषण थांबविण्यासंबंधी खोती पध्दत नष्ट करण्यासंबंधी बिल मांडले.
३.      १९३८ साली कोकणातील ‘औद्योगिक कलह विधेयकानुसार’ कामगारांचा संप करण्याचा अधिकार हिरावुन घेतला गेला. पण बाबासाहेबांनी या बिलावर भाषण करतांना संप हा दिवाणी अपराध आहे, फौजदारी गुन्हा नव्हे असे मत दिले व पुढे कामगारांना संप करण्याचा कायदेशिर अधिकार मिळवून दिला.
४.     वरील बिलावर भाष्य करतांना मालकांनी आपले अंदाजपत्रक कामगारांसाठी जाहीर करण्याची मागणी केली.
५.     १९३८ मध्ये सावकारी नियंत्रण विधेयक तयार केले.
६.      बिडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी बिडी कामगार संघ स्थापन केला.
७.     २ जुलै १९४२ ला ते व्हॉईसरॉय मंत्रीमंडळात कामगार मंत्री झाले. ह्या कारकिर्दीत त्यांनी कामगारांसाठी बरेच कायदे निर्माण केले.
८.      २ सप्टेंबर १९४५ ला कामगार कल्याण योजना सादर केली. ही योजना लेबर चार्टर म्हणून प्रसिध्द आहे.
९.      युध्द साहित्य निर्माण करणार्‍या कारखान्यात एक ‘सयुक्त कामगार नियामक समिती’ स्थापन केली.
१०.   सेवा योजन कार्यालय ( Employment Exchange ) ची स्थापना केली.
११.   कामगारांना अगोदर भरपगारी रजा मिळत नव्हती. १४ एप्रील १९४४ ला बाबासाहेबांनी भरपगारी रजेचे विधेयक मंजूर केले.
१२.  कामगारांना कमीत कमी वेतन ठरविण्याची तरतूद असलेले बिल मांडले. ह्यातूनच `किमान वेतन कायदा १९४८’ ची निर्मिती झाली.
१३.  औद्योगिक कलह मिटविण्यासाठी समेट घडवून आणणारी यंत्रणा (लवाद यंत्रणा) उभारण्याची तरतूद केली.
१४.  सप्टेंबर १९४३ रोजी भरलेल्या त्रिपक्षीय कामगार परिषदेचे बाबासाहेब अध्यक्ष होते. त्यात त्यानी कामगारांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सांस्कृतिक गरजा व आरोग्याचे उपाय तसेच कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी उपाय यावरील ठराव संमत केले.
१५. ३१ जानेवारी १९४४ रोजी खाण कामगारांसाठी ‘कोळसा खाण कामगार फंडाची’ स्थापना करणारे विधेयक मांडले.
१६.ऑगष्ट १९४५ मध्ये औद्योगिक वसाहतीचे नियम व मालकाच्या जबाबदार्‍या यावर    विचारविनिमय करणार्‍या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. त्यात त्यांनी उद्योगासाठी  मौलिक सूचना केल्या.
१७. ८ एप्रील १९४६ ला ‘मिका माईन्स लेबर वेल्फेअर फंडाची’ स्थापना करण्यासंबंधीचे बिल  संमत केले.
१८. ‘इंडियन्स माईन्स (अमेंडमेंड) ऑर्डिनन्स १९४५’ नुसार स्त्री कामगारांच्या मुलांसाठी पाळणा घराची व्यवस्था करण्याचे व्यवस्थापनावर बंधन घातले.
१९.`भारतिय खाण कायदा १९४६’ तयार करुन स्त्री कामगारांना खाणीत जमिनीच्या आंतमध्ये   काम करण्यास व रात्रपाळीस बंदी केली.
२०.‘दि.माईन्स मॅटरनिटी बेनिफिट ऍक्ट’ नुसार खाणीतील स्त्रीयांना बाळंतपणाची (प्रसूतीपूर्व व   प्रसूतीनंतर) रजा देण्याची शिफारस केली.
२१.‘दि.फॅक्टरी अमेंडमेंट बिल’ संमत करुन कामगारांना १० दिवसाची पगारी रजा आणि बाल   कामगारांना १४ दिवसाची पगारी रजा देण्यासंबंधी कायद्यात दुरुस्ती केली.
२२.१९४६ च्या बजेट सेशन मध्ये आठवड्याचे कामाचे तास ५४ वरुन ४८ व दिवसाला १०   तासांऎवजी ८ तास करण्याचे बिल मांडले.
२३. अपघातग्रस्त कामगारांना मोबदला मिळावा म्हणून ‘कामगार भरपाई कायद्याची’ निर्मिती केली.
२४.२१ फेब्रुवारी १९४६ साली मध्यवर्ती कायदे मंडळात ‘दि इंडियन्स ट्रेड युनियन्स (अमेंडमेंड)   ऍक्ट आणून ट्रेड युनियनला मान्यता देणे व्य्वस्थापनाला सक्तिचे करण्यासंबंधीचे विधेयक   मांडले.
२५.१९ एप्रील १९४६ ला मध्यवर्ती कायदे मंडळात कमीत कमी मजुरी आणि कामगारांची संख्या   किती असावी या संबंधी बिल मांडले व त्याचेच १९ फेब्रुवारी १९४८ ला कायद्यात रुपांतर   झाले.
 २६.बाबासाहेबांनी भारतीय घटनेची निर्मिती केली. त्यातील ‘मार्गदर्शक तत्व’ आर्टिकल ३९ (ड)    नुसार पगारदार पुरुषा इतकाच पगार त्याच पदावर काम करणार्‍या स्त्रियांनाही मिळावा अशी    घटनात्मक तरतूद केली.
 २७.घटनेच्या कलम ४३ नुसार गर्भवती व बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी योग्य व    सुरक्षित व्यवस्था ठेवण्याची तरतूद केली.
 २८.कलम ४३ (अ) नुसार शासनाने कामगारांना व्यवस्थापनात सहभागी करण्यासाठी प्रयत्‍न    करावेत अशी तरतूद केली.
 २९.कलम ४३ नुसार शासनाने कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक    संधी देण्यासाठी प्रयत्‍न करण्याची तरतूद केली.
 ३०.‘स्टेट्स ऍण्ड मायनॉरिटीज’ या ग्रंथामध्ये वेठबिगार कामगारांच्या प्रश्‍नाला हात घालतांना    बाबासाहेब ‘वेठबिगार हा गुन्हा आहे’ असे मत मांडले आहे.
 ३१.कामगारांचे आथिक जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात आर्थिक    धोरण स्पष्ट केले. त्यातील आर्टीकल २ सेक्षन २ (४) मध्ये आर्थिक शोषणाच्या विरोधात    स्पष्टीकरण केले. त्यात कामगारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संपत्तीची जास्तीत जास्त    समान वाटणी करण्याबद्द‍ल राज्याने प्रयत्‍न करावेत अशी सुचना केली.
 ३२.शेतीच्या प्रगतीसाठी व शेतकर्‍यांच्या उत्कर्षासाठी लॅंड मॉर्गेज बॅंक, शेतकर्‍यांची पतपेढी,    खरेदी विक्री संघ इत्यादी स्थापण करण्याविषयी धोरण व्यक्त केले.
    कामगार मित्रांनो. बाबासाहेबांचे वरील बहुमूल्य योगदान पाहतां आज कामगारांची जी    सुस्थिती दिसत आहे, त्यात बाबासाहेबांचा निश्चितच सिंहाचा वाटा आहे. म्हणून बाबासाहेब    हे सर्व कामगारांचे आदर्श आहेत. ही बाब सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

’चारित्र्य’ जपणारे महापुरुष: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

19 May

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवातीची वर्षे अत्यंत हलाखिमध्ये व गरिबीत गेली. त्यांच्या पत्‍नी रमाबाई मोठ्या उदार मनाच्या व  पतीला सदोदित साथ देणार्‍या होत्या. दलित-बहुजन समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी  बाबासाहेबांनी सुरू केलेल्या अथक संघर्षामुळे बाबासाहेब स्वता:च्या प्रपंचाकडे फारसे लक्ष देऊ शकले नाहीत. पण, आपल्या पत्‍नीवर त्यांचे अपार प्रेम होते. रमाबाईंनी आपल्याला सांभाळले, याची सारखी जाणीव त्यांना राहत होती.
२५ मे १९३५ रोजी रमाबाईंचं दुख:द निधन झाले. रमाबाईंच्या मृत्यूनंतर तेरा वर्षे बाबासाहेब अविवाहित राहिले. उच्च रक्तदाब व  मधुमेह अशा दुर्धर विकाराने त्यांना ग्रासले होते. आयुष्यभरच्या संघर्षाने त्यांची प्रकृती कमालीची खालावली होती. बाबासाहेबांच्या प्रकृतीची सतत काळजी घेणारी एखादी स्त्री त्यांच्या जवळ असावी,  असे त्यांच्या कार्यकर्त्यांना सतत वाटत होते.
तसे बाबासाहेब इंग्लंडला १९२० ते १९२३ या कालखंडात शिकायला गेले होते. तेव्हा फ्रेनी फ्रेनझाइज  नांवाची एक आंग्ल विधवा युवती एक संवेदनशील मैत्रिण, एक जवळची सल्लागार म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आली होती. ती हॉऊस ऑफ कॉमन्स मध्ये सेक्रेटरी होती. तिचा बाबासाहेबांशी बराच पत्रव्यवहार झाला होता.
१९३७ मध्ये तर बाबासाहेब इंग्लंडला गेले असतांना त्यांनी, ’या इंग्लिश विधवेशी गुप्तपणे विवाह केला’ अशी तार भारतात आली होती. ही तार वाचून कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. ही गोरीबाई बाबासाहेबांना चळवळीत राहू देईल की नाही, की ती बाबासाहेबांना इंग्लंडला घेवून जाईल? अशा अनेक शंका-कुशंकानी त्यांना घेरले होते.
बाबासाहेब भारतात परत आल्यावर बोटीतून उतरतांना तिला सोबत आणले असेल, म्हणून लोक उत्सुकतेने पाहत होते. परंतु बाबासाहेब एकटेच उतरल्याचे दिसलेत. तारेची बातमी बाबासाहेबांना सांगितली, तेव्हा ते नुसतेच हसले!
रमाबाई गेल्यानंतर तिला बाबासाहेबांच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटत होती. म्हणून बाबासाहेबांना मनस्वास्थ व कौटुंबिक सुख देण्यासाठी व त्यांचा जीवघेना आजार आटोक्यात आणण्यासाठी ती हळवी झाली होती. त्यामुळे खरंच .तिला बाबासाहेबांच्या जीवनात प्रवेश करण्याची उत्कट इच्छा झाली होती. परंतु बाबासाहेब विचारी, गंभीर, संयमी आणि सदाचारी होते. ’चारित्र्य’ जपणारे महापुरुष होते. फ्रेनीमधल्या ’स्त्री’ पेक्षा तिच्यामधल्या निर्भेळ मैत्रीला जपणारे होते. फ्रेनीची तळमळ, उत्सुकता जाणूनही हा विचारी, धिरगंभीर, संयमी पुरुष विचलीत झाला नाही. परिस्थितीने बाबासाहेबांना बांधून ठेवले होते. अनेक सुखापासून त्यांना वंचित ठेवले होते. शेवटी फ्रेनीचं १९४४ मध्ये निधन झाल्यावर त्या कायमच्या बाबासाहेबांपासून  दूर निघून गेल्यात.(संदर्भ- पत्राच्या अंतरंगातून: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखिका- डॉ. माधवी खरात)
त्यानंतर बाबासाहेबांनी १५ ऎप्रील १९४८ रोजी डॉ. सविता (शारदा) कबीर सोबत दुसरा विवाह केला,  एवढेच लोकांना माहिती आहे. पण, हा विवाह कोणत्या परिस्थितीमध्ये केला याची माहिती मात्र लोकांना नाही. बाबासाहेबांचे आयुष्याच्या शेवटपर्यंत खाजगी सचिव असलेल्या नानक चंद रत्तू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या आठवणींच्या पुस्तकात या बाबतीत लिहिलेले      आहे.    .
बाबासाहेब मुंबईला डॉ. माधव मावळंकर यांच्या दवाखान्यात १९४८ मध्ये दाखल झाले होते. तेव्हा त्यांनी मधुमेहाच्या आजारावर रोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे गरजेचे आहे असे बाबासाहेबांना सांगितले होते. तेव्हा तुमची शुश्रूषा करेल अश्या स्त्री सोबत तुम्ही एकतर लग्न करा किवा तुमच्या सोबत एखादी स्त्री परिचारिका म्हणून ठेवा अशी सुचना डॉक्टरांनी  केली. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की, “ माझ्या समाजातील सार्‍याच स्त्रिया मला बाबा म्हणतात. मी कुणाशी लग्न करु?”
अशावेळी डॉ. सविता कबीर बाबासाहेबांना भेटल्या. त्यांनी परिचारिका म्हणून बाबासाहेबांसोबत दिल्लीला येण्याची आणि तेथे त्यांची शुश्रूषा करीत महिनाभर राहण्याची तयारी दर्शवली.
बाबासाहेबांनी त्यांची सुचना  मान्य न करता त्यांना लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी  लिहिले की, “एखादी स्त्री माझी शुश्रूषा करण्यासाठी माझ्या जवळ असावी, याबद्दल तुम्ही जे विचार मांडले आहेत, ते मला मुळीच स्वागतार्ह वाटलेले नाहीत. या बद्दल मला माफ करा. मी कमालीच्या नैतिक आणि धार्मिक वातावरणात लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे अवांछनिय संबंधांची जाहीर चर्चा निर्मान होईल, असा प्रस्ताव तर सोडाच, पण साधा विचारही मी करू शकत नाही. सार्वजनिक जीवनातील माझी प्रतिमा स्वच्छ चारित्र्याचा आणि निष्कलंक नीतिमत्तेचा व्यक्ती या लौकिकावर उभी राहिलेली आहे. माझे शत्रू सुध्दा मला घाबरत असतील आणि माझा आदरभाव करत असतील, तर ते याच कारणाने! त्या लौकिकाला तडा जाण्याची जराही शक्यता ज्यात असेल, असे काहीही माझ्या हातून कदापिही घडणार नाही. माझी पत्‍नी गेली, तेव्हा मी अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती. ती मोडावी लागली तर, मी विवाह करीन, पण कोणत्याही परिस्थितीत आणि विशेषत: घरात दुसरी कोणी स्त्री नाही, अशा वेळी परिचारिका किंवा साथीदार ठेवण्याची सूचना मी मुळीच मान्य करणार नाही.”
डॉ. कबीर आणि बाबासाहेब यांच्यात जवळपास चार महिने पत्रव्यवहार झाला. आपल्या पत्‍नी बद्दलच्या अपेक्षा व्यक्त करतानाच, त्यांनी स्त्रियांबद्दलचा आपला प्रचंड आदरभाव या पत्रात व्यक्त केला आहे. या बाबतीत त्यांनी दादासाहेब गायकवाड व त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन त्यांचे  मत विचारात घेतले.
डॉ. कबीर आणि बाबासाहेब यांचा विवाह झाला. डॉ. सविता कबीर या  माईसाहेब आंबेडकर म्हणून, बाबासाहेबांच्या जीवनात आल्या.  निकोप चारित्र्याला जपणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे हे विलक्षण हिमालयाच्या उत्तुंग उंचीचे व्यक्तिमत्व होते!
%d bloggers like this: