Archive | कथा RSS feed for this section

हॅलोSS हॅलोSSS

14 Oct

माझं गांव चौधरा… अगदी लहानसं खेडं… माझं पहिली ते चवथी पर्यंतचे शिक्षण गांवापासून एक-दिड  कोस दूर असलेल्या निळोणा या गांवाला झाले.

त्यांतरचे पाचवी ते बी.कॉम. पर्यंतचे शिक्षण गांवापासून तीन…क कोस दूर असलेल्या यवतमाळ या शहरात झाले.

त्यावेळी दुकान, ऑफीस, सिनेमा इत्यादी ठिकानी टेलिफोन वर लोकं बोलत असल्याचे मी पाहत होतो.

खेड्यामध्ये टेलिफोन नसल्यामुळे लोकांना त्याचे कुतूहल वाटायचं. म्हणून मी त्याची नक्कल लोकांना करुन दाखवायचं ठरविलं.

त्यावेळी मी कॉलेजमध्ये प्रि. कॉमर्स म्हणजे आताच्या अकरावीला शिकत होतो.

माडी पोर्णिमेच्या दिवशी चन्द्राचा पांढराशुभ्र प्रकाश असतो. त्यादिवशी रात्रीचे जेवन करुन लोकं बाहेर येऊन बसत होते. एकत्र येऊन गप्पागोष्टी करणे, खेळ खेळणे, मनोरंजन करणे इत्यादी मौज-मजेचे कार्यक्रम करीत होते. लोकांना आपआपली कला प्रदर्शीत करण्याची संधी मिळत होती.  लोकांचेही त्यानिमित्ताने मनोरंजन होत होते.  मी सुध्दा माझा मित्र अर्जुन याला घेऊन टेलीफोनची नक्कल करायचं ठरवल.

मी एकीकडे माझ्या एका कानाला हात लाऊन हॅलोSS हॅलोSSS म्हणत होतो. दुसरीकडे अर्जुन त्याच्या कानाला एक हात लाऊन दुसर्‍या हाताने जोरात हालवल्याची ऍक्टींग करीत होता. मी त्याला म्हणत होतो की, ’ अरे मी तुला हॅलो हॅलो म्हणतोय, तू बोलत कां नाहीस ? तु काय करीत आहेस ? ’

‘तु सांगितल्या प्रमाणे मी हालवत आहे ना…’

‘अरे तसे नाही. फोनवर बोलतांना सुरुवातीला हॅलो हॅलो म्हणत असतात. नंतर बोलायचं  असते.’

लोकं या नकलेला पोट धरुन हासत होते.

टेलीफोन आपल्याकडे असणे म्हणजे त्यावेळी स्वप्नवत होते. परंतु आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.

त्यावेळी टेलीफोन म्हणजे श्रीमंताची मिरासदारी होती. एकदा मुंबईला १९९४ मध्ये माननिय कांशीराम यांची सभा होती. त्या सभेला माजी पंतप्रधान माननिय व्हि.पी.सिंग आले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले होते की, ‘टेलीफोन डिरेक्टरी मधील नांवे पाहिले की, कोण श्रीमंत व उच्चवर्णिय आहेत ते कळतात.’ आता टेलीफोन डिरेक्टरी मधिल नांवे पाहिले की, कोण श्रीमंत व उच्चवर्णिय आहेत ते कळत नाही !

माझ्याकडे एवढेच नव्हे तर माझे बहुतेक नातेवाईक, मित्र मंडळीकडे सुध्दा आता टेलीफोन आलेला आहे. माझे मुले त्यावेळी मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ सारख्या उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे व औरंगाबाद या ठिकानी असल्यामुळे त्यांचेशी संपर्क ठेवण्यासाठी टेलीफोन घेणे अत्यंत आवश्यक झाले होते.

पुर्वी नक्कल करीत होतो ! आता प्रत्यक्षात उतरले आहे. हे कश्यामुळे शक्य झाले आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच ! ते जर नसते तर मी कुठेतरी मोलमजुरी करीत बसलो असतो.

बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, ‘शिका… !’ ते माझ्या आई-बाबांनी ऎकले. मला शाळेत टाकून शिक्षण दिले.

चवथीपर्यंत शाळा गावांजवळच्या खेड्यात होते. पाचवीनंतर मला यवतमाळ शहरातील म्युनिसिपल हायस्कुल या शाळेत टाकले.

आम्हां दोघे बहिन-भावांना  यवतमाळ शहरापासून थोडं दूर, एका टोकाला असलेल्या उमरसरा या खेड्यागांवात बाबांनी शिक्षणासाठी ठेवले होते. सुरुवातीला बाबांच्या नातेवाईकांकडे व नंतर एक झोपडे बांधून दिले तेथे राहत होतो.

त्यावेळी मला पाचवीपासून दहावीपर्यंत पंधरा रुपये स्कॉलरशिप मिळत होती. कॉलेजमध्ये शिकत असतांना चाळीस रुपये मिळत होते. म्हणून मला शिक्षण घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या आधार झाला. त्यामुळे मला बी.कॉमपर्यंत शिक्षण घेता आले.

राखीव जागेच्या सवलतीमूळे पुढे मला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये लिपिकाची नोकरी मिळाली. त्यानंतर महावितरण कंपनीमध्ये अकॉउंटस ऑफीसर्पर्यंत पदोन्नती घेत घेत सेवानिवृत झालो.

मी शिकलो, नोकरीला लागलो. माझी आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यामुळे माझ्या लहान भावाला डॉक्टरचे शिक्षण घेण्यासाठी मदत करु शकलो. माझ्या मुलांना शिकऊ शकलो. एक मुलगा वकील झाला. दुसरा डॉक्टर झाला. मुलगी कॉंम्पूटर ईंजिनिअर झाली. एवढे आमुलाग्र परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक कार्यामूळेच घडुन आले !

मी सप्टेंबर २००७ साली सेवानिवृत झालो. त्यावेळी माझ्या कार्यालयात  झालेल्या निरोप समारंभाच्या वेळी मी सांगितले की, ‘मी नोकरीला लागलो ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच! कारण त्यांनीच शिक्षणासाठी स्कॉलरशिप व शासन-प्रशासामध्ये मागासवर्गीय जातींचा सुध्दा सहभाग असावा म्हणून राखीव जागा मिळवून दिल्या. म्हणून या देशातील मागासवर्गियांची प्रगती झाली. केवळ मागासवर्गियांची प्रगती झाली, असे नव्हे तर या देशाची सुध्दा प्रगती झाली. कारण देशात राहणाऱ्या लोकांची प्रगती झाल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. एखाद्या शरीराचा तीन चतुर्थांश भाग जर खराब असेल तर ते शरीर विकलांग असते. तसेच देशातील बहुतांश लोक जर गरिबी व अज्ञानात खितपत पडले असतील तर, तो देश सुध्दा विकलांग झालेला असतो. त्यामुळे केवळ मीच नव्हे तर सर्वांनी त्यांचे ऋणी असायला पाहिजे.’

 

 

Advertisements

दगड तरंगला नाही

19 Jan

मी त्यावेळी निळोण्याच्या प्राथमिक शाळेत शिकत होतो. शाळेच्या पाठ्यपुस्तकात ‘रामाच्या नांवाने कोण वाया गेले ?’ अशा शिर्षकाचा एक धडा होता. त्या धड्यात दगडावर ‘राम’ असे लीहून पाण्यात सोडला की तो दगड पाण्यात तरंगते असे लिहले होते.
त्यादिवशी हा धडा गुरुजी शिकवायला लागले होते. खरंच दगड पाण्यावर तरंगतो कां ? असं अकल्पीत कधी घडत असते कां ? रामाच्या नांवात एवढी जादु आहे कां ? अश्या नाना प्रकारच्या प्रश्‍नाने माझ्या मनात प्रचंड गदारोळ माजवीला होता.
म्हणून हा प्रयोग करुन पाहण्यासाठी माझं मन अधीर झालं होतं.
माझं मन गुरुजी काय सांगतात, त्यापेक्षा मनात चालू असलेल्या घालमेली सोबतच अनेक गतस्मृती माझ्या मनात पिंगा घालू लागल्या होत्या. गुरुजींनी माझं नांव कसं शाळेत टाकलं या प्रसंगापासून ते त्यानंतरच्या सर्व घडामोडी माझ्या नजरेसमोर धाऊ लागल्या होत्या.
आमच्या गांवात शाळा नव्हती. आमच्या गांवापासून एक-दिड कोसावर निळोणा या गांवला पहिली पासून ते चवथी पर्यंतची प्राथमीक शाळा होती. हे गांव वाघाडी नदीच्या पलिकडे यवतमाळला जाणार्‍या रस्त्यावर होते.
एकदा शाळा सुरु होण्यापुर्वी बबन गुरुजी आमच्या गांवात आले होते. त्यावेळेस मी खेळत होतो.
‘अरे ईकडे ये…तुझे नांव काय आहे.’ गुरुजींनी मला जवळ येऊन विचारले.
‘हे पहा माझ्या हातावर लिहिले आहे.’ कोणी मला माझे नांव विचारले की माझ्या उजव्या हातावर गोंदलेले नांव दाखवायला मी हरकून जात असे.
‘रामराव…’
‘हो.’
‘शामरावचा भाऊ कां ?’
‘हो.’
‘चल तुझ्या घरी.’ आम्ही घरी आलो. माझ्या सोबत खेळणारे मुलेही माझ्या मागेमागे आलेत.
‘याला शाळेत टाकता का ?’ गुरुजींनी माझ्या बाबाला विचारले.
‘लहान आहे. अजुन त्याचा हात पाठीमागून कानाला लागत नाही.’
‘किती वर्षाचा आहे.’
‘असेल सहाक वर्षाचा. घेता कां त्याला शाळेत.’
‘नाही. त्याला आठ वर्षाचा दाखवावा लागेल.’
‘दाखवावा ना आठ वर्षाचा… काय बिघडते ?’
‘त्यांची जन्म तारीख माहित आहे ?’
‘नाहीजी… तारीख माहित नाही पण तो श्रीकृष्णदेव जलमला त्यावेळेसचा आहे.’ आई म्हणाली. म्हणून माझे पाळण्यातले नांव ‘श्रीकृष्ण’ व दुसरे नांव ‘रामराव’ असे ठेवले होते, अशी आई सांगत होती.
‘बरं मी कोतवालाच्या बुकात पाहून घेईन.’
‘उद्यापासून येरे शाळेत… चांगले कपडे घालून ये.’ माझ्या मळकट कपड्याकडे पाहून गुरुजी म्हणाले.
गुरुजींनी गांवातील आणखी काही मुलांचे नांव टाकून घेतले.
तेव्हापासून मी निळोण्याच्या शाळेत जायला लागलो.
आमचे गुरुजी एकटेच पहिला ते चवथ्या वर्गापर्यंत शिकवीत होते.
शाळेत रमत गमत जातांना-येतांना खूप मजा वाटायची. आम्ही मुले एखाद्या उंडाळणार्‍या वासरासारखे रस्त्याने जात होतो.
आम्ही एकमेकाशी ‘अ’ व ‘ची’ ची भाषा बोलत होतो. ‘मला’ म्हणायचं असलं तर ‘अ’च्या भाषेत ‘अला…म’ व ‘ची’च्या भाषेत ‘चिला…म’ म्हणत असे. तसेच ‘तूला’ म्हणायचं असलं तर ‘अ’च्या भाषेत ‘अला…तू’ व ‘ची’च्या भाषेत ‘चिला…तू’ म्हणत असे. ही भाषा बोलतांना आम्हाला इतकी इतकी सवय झाली होती की आम्ही सहजपणे न अडखडता ही भाषा बोलत होतो.
पावसाळ्यात पायाच्या घोट्यापर्यंत तर कुठे कुठे टोंगळ्यापर्यंत गाडण राहायच. अशा वेळेस धुर्‍याच्या काठा-काठाने किवा शेतात घुसून रस्ता पाडत असे. कुठे कुठे रस्त्यावर घसरण असायची.
रस्त्याच्या दोन्हीही काठाला पळस, पांजरा, हिवरा. बाभूळ, येण, धावडा, चिल्हाटी, भराडी इत्यादी निरनिराळ्या जातीचे पण सागाच्या जातीचे जास्त झाडं असायचे. सागाचे मोठेमोठे पानाचा पाऊस आला की डोक्यावर धरायला छत्री सारखी उपयोगात होत असे. त्याच्या पानाला घासले की, रक्तासारखा घट्ट रस निघायचा.
आम्ही मुले निसर्गसौंदर्य न्याहळत, डोळ्यात साठवत जात असो. हिरवेगार परिसर पाहून आमचे डोळे सुखाऊन जात असे. जणू काही डोंगर, जमिनीने हिरवा शालू पांघरलेला आहे असच वाटायचं..
पाहा ना, हिरव्या रंगाच्या किती विविध छटा असतात नाही कां ? शेतातल्या तुरीच्या तासाचा हिरवेपणा वेगळा तर त्याच शेतातल्या पर्‍हाटीचा वेगळा ! रस्त्याच्या बाजूला ऊगवलेल्या गवताच्या प्रत्येक पात्याचा हिरवेपणा वेगळा आणि झाडांच्या पानांचासुध्दा वेगवेगळा ! नदी-नाल्या जवळचा लुसलुशीत पोपटीपणा, शेताच्या धुर्‍याजवळचा गर्द हिरवा, तर डोंगर-कड्यावरचा गच्च हिरवेपणा !
निसर्गाने सुध्दा झाडा-वेलींना एक शिस्त लाऊन दिली आहे असच म्हणावं लागेल ! उगवायचं, फुलायचं व परागीभवन होऊन पुढील पिढी तयार करायचं हे काम त्यांच नेटाने चालू असतं.
सृष्टीमध्ये प्रत्येक जीवांचं, वनस्पतीचं वंशवाढीचं, पुनर्निमीतीचं कार्य अव्याहतपणे सुरु असते. यासाठी त्यांना एकमेकांवर अवलंबून राहावे लागते.
डार्विनच्या सिध्दांताप्रमाणे- निसर्गात जो सक्षम आहे, त्यालाच जगण्याचा हक्क आहे.
म्हणून आपला वंश निर्वेधपणे पुढे चालू राहावा अशी सृष्टीतील प्रत्यके जीवांची धडपड चालू असते.
झाडा-फुलांना किडे, पक्षी, वारा यांच्याकडून परागीभवन करुन घ्यावे लागत असते. मग किडे, पक्षी यांना आकर्षून घेण्यासाठी आपल्या फुलां-पानांचा रंग, आकार व गंध याचा वापर करण्याची युक्ती ते वापरतात. ज्यांना जो रंग आवडतो तो तो रंग आपल्या फुलांत भरत असतात.
असे म्हणतात की मधमाश्यांना निळा रंग आवडतो म्हणून काही फुलांच्या जाती आपला रंग निळा करून मधमाश्यांना बक्षीस देण्यासाठी त्यात भरभरून मधाची निर्मिती करतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पळस, पांगरा, सावर हे झाडे लाल रंग धारण करीत असतात. त्याचं कारण असं सांगतात की पक्ष्यांना लाल रंग स्वछ आणि उठवून दिसत असतो.
एवढं मात्र खरं की फुलांच्या दृष्टीने त्यांचे हे रंग माणसाना आकर्षीत करण्यासाठी नाहीतच मुळी !. कारण फुलांना माहीत आहे की परागीकरणात माणसाचा कोणताच उपयोग होत नाही. परंतु माणसंच फुलांच्या या वैविध्याचा मनसोक्तपणे उपभोग घेत असतात हे त्यांना कुठे माहित असते ?.
कुहू ऽऽकुहू ऽऽ असा मंजुळ आवाज आला की त्या दिशेने आम्ही धावत जायचो. कारण ही कोकीळा गर्द झाडीत किवा पाना-फांद्याने बहरलेल्या एखाद्या मोठ्या झाडावर कोणालाही दिसणार नाही अशा अवघड जागी लपलेली आढळत असे. कदाचीत आपला काळा रंग जगाला दिसू नये म्हणूनच ती संकोचीत होती की काय !. जवळ गेलं की तिचा आवाज बंद होऊन जात असे. तिला पाहतो नं पाहतो तर ती क्षणातच भुरकून उडून जात असे.
असेच रस्त्यावरील झाडावर बसलेल्या एखादं पाखरु जसा आवाज काढायचा, शिळ घालायचा, त्याची नक्कल आम्ही करुन पाहत होतो.
रस्त्याला लागून असलेल्या एखाद्या भुईमूंगाच्या वावरात कुणी नाही असं पाहून, धुर्‍यावरच्या काट्या सरकवून चोर पावलानं आंतमध्ये घुसत असे. त्या वावरातल्या भुईमूंगाच्या भरलेल्या शेंगाच्या डहाळ्या मुळासकट उपटून रस्ताभर खात खात जात होतो. कधी मुंगाच्या, उडदाच्या पाटाच्या शेंगा, तर कधी वाळकं, काकड्या तोडून खात होतो.
हिवाळ्यात धान निघाल्यावर पेरलेल्या हरभरा व वटाण्याच्या शेंगाचे हिरवेगार शालू नेसल्यासारखे डुंगे दिसले की आम्ही हरकून जात होतो. मग हिरवा घाठ्यांनी भरलेला हरभरा व वटाण्याच्या शेंगाचे सोले खायची मजा येत होती.
कधी तुरीच्या तासात शिरुन हिरव्या टर्रऽऽ भरलेल्या शेंगा ओरबाडून खिश्यात भरुन घेत होतो. मग रस्त्याने जात जात खात होतो.
बैलगाडीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी होती. त्यात येणाचे, खैराचे, भराडीचे, धावड्याचे, सागाचे, बाभळीचे, पळसाचे, पांजर्‍याचे, चिल्हाटीचे, हिवर्‍याचे झाडे होते. येणाच्या झाडाला हमखास रेशमाचे कोष लटकलेले दिसत असत. त्याला तोडून आम्ही त्याचं मखमली सूत काढण्याचा प्रयत्‍न करीत होतो. याच कोशातून फुलपाखरं बाहेर पडत असल्याचे आम्ही पुस्तकात वाचले होते. धावड्याचा, बाभळीचा डिंक खात होतो. कडूनिंबाचा डिंक कडू लागायचा. तो पुस्तकाचे पाणे चिकटवायला वापरत होतो.
झाडावर कधी बसलेले तर कधी उडत असलेले निरनिराळ्या जातीचे पक्षी पाहण्यात आम्ही गुंग होवून जात होतो. त्यांच्या सुरेख चोचीतून बाहेर पडणारा लयदार आवाज व चमकदार रंगीबेरंगी पंखाचे पिसं पाहून आम्ही मोहीत होवून जात होतो. असं म्हणतात की पक्ष्यांना लाभलेल्या विविध रंगाच्या वरदानाचा उपयोग शत्रूपासून लपून राहण्यासाठी व जोडीदाराचे लक्ष वेधून घेण्यासाठी करीत असतात.
वर आकाशात उंच उडणार्‍या घार किंवा गिधाडासारख्या पक्षांच्या जमिनीवर पडणारी सावली आम्ही न्याहाळीत राहत होतो.
एखाद्यावेळेस केणेच्या वावरातल्या मोहाच्या झाडावर दिसलेल्या घुबडाला पाहून आम्ही घाबरुन जात होतो. कारण तो म्हणे लहान मुलांचे कपडे नदीवर नेवून धुतो व झाडावर वाळू घालतो. ते जसं जसं वाळायला लागतं तसं तसं तो मुलगा वाळायला लागतो अशी एक दंतकथा या घुबडाच्या बाबतीत खेड्यात सांगितली जात होती.
पावसाळाच्या तेवढ्यात रस्त्याच्या बाजूला माकोडे आपले घरं बांधण्यात गुंग राहत असल्याचे दिसायचे. जमिनीच्या आतून माकोडे इतकूला मातीचा कण आपल्या तोंडात धरुन आणीत व बाहेर बाजूला टाकून त्याचा कणावर कण ढिग रचत असत. त्यांच ते अविरत व सततचं काम पाहतच राहावे वाटे.
उन्हाळ्याच्या तेवढ्यात एखाद्या उलट्या भोवर्‍यासारखे गुळगूळीत मातीचे भक्के जागोजागी दिसायचे. त्यात बारिक गवताची पाती हळूच टाकली की त्यात विसावलेला इवलासा गुबगूबीत हत्ती त्या काडीला तोंडाने पकडून बाहेर आलेला दिसला की आम्हाला मजा वाटायची.
रस्त्याच्या गुळगूळीत मातीत तुरुतूरु चालणार्‍या निरनिराळ्या प्क्षांच्या पायाचे ठसे एखाद्या चित्रकाराने नक्षिकाम करावे तसे दिसायचे.
पांडू लभानाच्या वावराला लागून असलेल्या बैलगाडीच्या रस्त्याने रांगोळीचा काचे सारखा दिसणारा दगड आम्हाला नेहमी खुणावत राहायचा. आम्ही त्याला खोदून दप्तरात टाकून घरी नेत होतो. मग त्याला बारीक करुन व फडक्याने गाळून रांगोळी बणवीत होतो.
शनिवारी सकाळची शाळा असायची तेव्हा दुपारी घरी येतांना वावरातील आंब्याच्या झाडावर आम्ही चाप-डुबल्याचा खेळ खेळत होतो.
रस्त्याने जास्तीत जास्त दूर कुणाचा दगड जाऊन पडतो याची आम्ही मुले शर्यत लावत होतो.
पावसाळ्यात रस्त्यात लागणार्‍या चिलकीचे पाणी आम्ही उडवत उडवत जात होतो. आकाशाच्या दिशेने उडणारे पाण्याचे तुषार पाहतांना मंत्रमुग्ध होऊन जात असे.
त्यात पोहणार्‍या बारीक बारीक माश्यांच्या मागे आम्ही लागत असे. बेंडकाचे बारीक माशासारखे दिसणारे पिल्ले दिसायचे. काही दिवसाने त्या पिल्लाचे तोंड बेंडकासारखे व्ह्यायचे. शेपटी मात्र माशासारखे दिसत असे. त्यानंतर ते शेपटी गळून पुर्ण बेंडकाचा त्याला आकार यायचा. काय हे सृष्टीची किमया म्हणून आम्ही विस्मयचकीत होत होतो.
कधी लहान लहान व मध्यम आकाराचे खेकडे दिसत असत. कधीकधी त्या चिलकीत एखादा सळसळत पोहत जाणारा साप दृष्टीस पडायचा.
आमच्या गांवावरून येणारा असा हा रस्ता पायवाटेचा तर कुठे कुठे बैलगाडीचा, खासराचा होता. रस्त्यावर विखुरलेल्या बारीक खड्याने आमच्या पायाच्या तळव्याची आग होत असे.
नदीचा तीराचा परिसर हिरव्या रंगाने, नानाविवीध मखमल रान फुलांनी नटलेला होता. करकरीच्या वनस्पतीला लागलेलं लाल-पिवळ्या रंगाचं उठून दिसणारं फुल आमच चित्त वेधून घेत असे.
एका वावरातून पायवाटेने वाघाडी नदीत उतरणारा निसरडा रस्ता होता. एखाद्यावेळेस पावसाची सर येऊन गेली तर त्या रस्त्यावर घसरण तयार व्ह्यायची. मग तोल सावरत सावरत, जवळच्या झाडाच्या फांद्याना पकडत किंवा पायाच्या बोटाचे नखं जमिनीत रुतवत नदीत उतरावे लागे.
पावसाळ्यात नदीत उतरण्यापूर्वी वरच्या बाजूला कानोसा घेऊन पुराचे लोंढे येण्याचा आवाज येतो काय, त्याचा अंदाज घेतल्यावरच आम्ही नदीत उतरत होतो.
नदीच्या पाण्यात पाय टाकला की थंड पाण्याचा स्पर्ष सर्वांगाला उत्तेजीत करीत असे. त्या नदीच्या वाहत्या धारेचं थंड पाणी तोंडावर शिंपडून तोंड धुतलं की चालल्याने शरिरात आलेला थोडाफार थकवा निघून गेल्यासारखं वाटत असे. हळूच वाकून हाताच्या ओंजळीने पाणी पिल्यावर तहानेने कासावीस झालेला जीव शांत होवून जायचा. त्या पाण्याची चव ख्ररंच गोड लागायची.
नदीच्या वाहत्या प्रवाहात थांबून आम्ही पाणी एकमेकांच्या अंगावर उडवत असे. नदीत कुठे चापट व पाण्यातून वर आलेले खडकं दिसायचे. कुठे पाण्याच्या वर थरचे थर तर कुठे पाण्यात पाय फसणारे किंवा पायाला मऊ मऊ लागणारी रेती सुखावून जात असायचे. कधी भाकरीचा एक लहानसा तुकडा तुकडा पाण्यात टाकला की लहान लहान माश्यांचा थवाच्या थवा धावून यायचा. आमच्या पाण्यातील पायाला ते हळूच स्पर्श करीत तेव्हा पायाला गुदगूल्या होत असे. मग आम्ही त्याच्या मागे धाऊन जाण्यात रंगुन जात होतो. अस त्या पाण्यात किती खेळावं नं किती नाही, असे होऊन जात असे! कुठे कुठे संथ वाहणारा तर कुठे खळखळ आवाज करणारा प्रवाह मनाला भुरळ पाडून जात असे. नदीच्या प्रवाहाच्या खालच्या व वरच्या दिशेने दुरवर पाणीच पाणी दिसत असे.
नदीत वार्‍याच्या झोताने माना डोलावणार्‍या पण पूराच्या पाण्याने न डगमगणार्‍या लव्ह्याळ्या आम्हाला आकर्षीत करुन जात असे. खडकाला चिकटलेला चिल्हा कधी कधी आम्हाला घसरुन खाली पाडत असे.
दूरवर त्या नदीत टिटवीचं मन उसवून टाकणांर ‘टिटीव-टिव’ असं तिचा आकांत सुरु राहायचं. तिच्या मागे धावायला आम्हाला मजा वाटायची. मग ती तुरुतुरु ओरडत पळायची. जवळ गेलो की उडून जायची.
कावळे व आणखी काही पक्षी पाण्यात डुबक्या मारुन आपले अंग धुत असायचे.
पांढर्‍या शुभ्र रंगाचे बगळे मासे पकडण्यासाठी बराच वेळ एका पायावर एकटक ध्यान लाऊन उभे राहात असत.
एखाद्या वेळेस नदीच्या पाण्यात काठाजवळ पाणकोंबडी नजरेस पडे. आमची चाहूल लागली की ती झाडीत जाऊन लुप्त होऊन जात असे. मग तिचा माग काढत कितीही शोधले तरी दिसायची नाही.
नदीत आम्ही मुले चापट दगडाचे चिपोरे पाण्यात असे काही भिरकावत असे की तो चिपोरा दोन-चार ठिकाणी टुन…टून… उड्या मारत जात असे. मग कुणाचा दगड जास्त उड्या मारत दूर जाते याची शर्यत आमच्यात लागत असे.
एके दिवशी आम्ही चौधर्‍याचे सर्व मुले पाटी-दप्तर घेऊन लगबगीने शाळेच्या बाहेर पडलो. नदी पर्यंत त्या गोटाळ पांदणीने धावत, पळत सुटलो. नदी वाहत असलेल्या वरच्या बाजूला खूप आभाळ भरुन आले होते. त्यामानाने इकडे आभाळ कमी होते. परंतु ते आभाळ खाली खाली सरकत येत होते. त्यावरून वर निश्चीतच पाणी पडत असावे व पुराचे लोंढे आता लवकरच वाहत येतील असा आम्ही अनुमान लावला होता. त्या लोंढ्याचा दुरुनच गडगडऽऽ असा आवाज पण येत होता. त्यामुळे आम्हाला भिती वाटायला लागली होती. ते लोंढे धडकण्यापूर्वीच वाघाडी नदी ओलांडून जायला पाहिजे म्हणून जिवांच्या आकांताने आम्ही सर्व मुलं पाण्यात उतरलो. पलीकडच्या काठावर पोहचतो न पोहचतो तर आमच्या डोळ्यासमोरुन पूराच्या गढूळ पाण्याचे लोंढेच्या लोंढे धडधडऽऽ करत वाहत गेले. पाहतां पाहतां नदी पुराने टम्म फुगून गेली होती. दोन्ही थड्या भरभरून वाहू लागल्या. एका क्षणात वाढलेलं ते पुराचं अगडबंब पाणीच पाणी पाहून आमची बोबडीच वळली. आम्ही थोडा वेळ जरी उशीर केला असता तर आमचे काय झाले असते ? या कल्पनेने आम्ही भेदरुन गेलो होतो.
आम्ही जरी मनातून घाबरलो असलो, तरी तो पूर पाहण्यासाठी आमचे पाय मात्र थोडावेळ तेथे थबकले होते. ते अवर्णीय व विहंगम असे दृष्य आम्ही आमच्या डोळ्यात साठवत होतो. पुराचे ते तांडव. अथांग पाणी, अक्राळविक्राळ रुप छातीत धडकी भरवीत होती.. त्या पूरात मोठमोठे उन्मुळून पडलेले झाडं, खोडाचे ओंढके, पाला-पाचोळा, काड्या-फांद्या असे काहीबाही त्या पूरात वाहून जात होते. मध्येच एखाद्या भोवर्‍यात सापडले की ते गिरक्या घेऊन आंतमध्ये गुडूप व्हायचे व काही अंतरावर वर निघून परत वाहायला लागत असे. नदी पाण्याला कधी आक्रसून घेई तर कधी आणखी फुगवत असे. .
थोड्यावेळाने धाडधाड पाऊस सुरु झाला. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरु झाला. आम्ही मुलांनी मोठ्या दांड्याच्या व आकोड्याच्या त्या छत्र्या ऊघडून वेगवान वारा आणि बेधुंद पावसाच्या धारा झेलत, रस्ता तुडवत, मोठ्यामोठ्याने पाय टाकत गांवला चालत गेलो.
खरंच पाऊसाचे अनेक रुपे आहेत… नाही कां? कधी अल्लड बाळासारखा झेपावतो. तर कधी दुष्ट राक्षसारखा बरसतो. तर कधी सुकुमार तरुणीसारखा लचकत, मुरडत रिमझिमतो. तर कधी दानगटासारखा कोसळतो. असं त्यांच त्या त्या वेळी ते ते रुप आपल्याला भावतंदेखील!
कधीकधी श्रावण महिन्यात तर एक वेगळाच नजारा पाहायला मिळत असे. आम्हाला अभ्यासाला बालकविने रचलेली एक कविता होती.
‘श्रावण मासी, हर्ष मनाशी, हिरवळ दाटे चोहिकडे !
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात येऊनी उन पडे !! अशी ती कविता होती.
खरोखरच क्षणात पाऊस यायचा तर क्षणातच उन्ह पडल्याचे दिसत असे. त्या रिमझिमणार्‍या धारा कलत्या सूर्यप्रकाशात न्हाऊन जरतारी होत जातांना आपण हुरळून जात होतो. अशावेळी क्षितीजावर अचानक इंद्रधनुष्य उमलू लागत असे. सात रंगाचं उधळण केलेलं ते तोरण वाटत असायचं. असे ते विलोभनीय दृष्य मनात साठवतांना उर भरुन येत असे.
एखाद्यावेळेस नदीच्या काठावर परसाकडे बसलो की वाहत्या पाण्याची खळखळ पाहत असे किंवा त्यावेळेस नदीच्या पाण्यात लहान लहान दगडं फेकत असे. कुठे आवाज कमी येतो… कुठे जास्त येतो… त्यावरुन कुठे खोल पाणी आहे… कुठे उथळ पाणी आहे… याचा अंदाज घेण्याच्या खेळात आम्ही वेळ घालवित होतो.
एके दिवशी मी असाच खेळात रमलो असतांना एकदम गुरुजी शिकवत असलेल्या त्या धड्याची आठवण जागी झाली. दगडावर ‘राम’ असे लिहून पाण्यात फेकून पाहण्याच्या त्या उर्मीने उचल खाल्ली.
मी जवळचा एक लहानसा दगड उचलला. त्यावर लेखणीने ‘राम’ असे अक्षर लिहीले व तो दगड खोल पाण्यात फेकला. मला वाटलं आता चमत्कार होईल व दगड तरंगेल. म्हणून मी उत्कंठतेने डोळे फाडून त्याकडे पाहू लागलो. पण तो दगड पाण्यात बुडला.
मी आणखी एक दगड घेतला. त्यावर ‘राम’ असे लिहीले व दुसरीकडे पाण्यात फेकला. पण तोही दगड बुडला. असा प्रयोग मी पुन्हा पुन्हा करुन पाहिला. पण कोणताही दगड काही केल्या पाण्यावर तरंगल्याचं मला आढळले नाही. माझे रामाच्या नांवाचे दगडं फेकण्याचे सारे परिश्रम वाया गेले. पण ‘रामाच्या नांवाने कोण वाया गेले ?’ याचा मला काहीही अर्थबोध झाला नाही. तेव्हा त्या धड्यातील खोटेपणा माझ्या लक्षात आला. पुस्तकात असे खोटं खोटं लिहून लहानग्या, चिमुरड्या मुलांच्या डोक्यात अशा प्रकारच्या अंधश्रध्दा कां भरतात कुणास ठाऊक ? याचं मला आश्चर्य वाटलं.

टिप:- सदर कथा माझ्या ‘अशा होत्या त्या काटेरी वाटा !’ या आत्मकथेतील आहे.

हॅलो ऽऽ हॅलो ऽऽऽ

16 Jan

माझं गांव चौधरा… अगदी लहानसं खेडं… पन्नास-साठ घरांची वस्ती…माझं पहिली ते चवथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण गांवापासून एक-दिड कोस दूर असलेल्या निळोणा या गांवाला झाले.
त्यांतरचे पाचवी ते बी.कॉम. पर्यंतचे कॉलेजचे शिक्षण गांवापासून तीनक कोस दूर असलेल्या यवतमाळ या शहरात झाले.
त्यावेळी दुकान, ऑफीस, सिनेमा इत्यादी ठिकानी टेलिफोन वर लोकं बोलत असल्याचे मी त्या शहरात पाहत होतो.
खेड्यामध्ये टेलिफोन नसल्यामुळे लोकांना त्याचे कुतूहल वाटत असे. म्हणून मी त्याची नक्कल लोकांना करुन दाखवायचं ठरविलं.
त्यावेळी मी कॉलेजमध्ये प्रि. कॉमर्स म्हणजे अकरावीला शिकत होतो. सुट्टीच्या किंवा एखाद्या सणासुदिच्या दिवशी मी घरी येत होतो.
माडी पोर्णिमेच्या दिवशी चन्द्राचा पांढराशुभ्र प्रकाश असतो. त्यादिवशी रात्रीचे जेवन करुन लोकं बाहेर येऊन बसतात. एकत्र येऊन गप्पागोष्टी करणे, खेळ खेळणे, गमती-जमती करणे, मनोरंजन करणे इत्यादी मौज-मजेच्या कार्यक्रमात आपले मन रमवित असतात. गुणी लोकांना आपआपली कला प्रदर्शीत करण्याची संधी त्यावेळी मिळत असते. लोकांचेही त्यानिमित्ताने मनोरंजन होत असते. मी सुध्दा माझा मित्र अर्जुन याला घेऊन टेलीफोनची नक्कल करायची ठरवलं.
मी एकीकडे माझ्या एक कानाला हात लाऊन हॅलो हॅलो म्हणत होतो. दुसरीकडे अर्जुन त्याच्या कानाला एक हात लाऊन दुसर्‍या हाताने जोरात हालवल्याची ऍक्टींग करीत होता. मी त्याला म्हणत होतो की, ’ अरे मी तुला हॅलो हॅलो म्हणतोय, तू बोलत कां नाहीस ? तु काय करीत आहेस ? ’
‘तु सांगितल्या प्रमाणे मी हालवत आहे ना…’ असे तो म्हणत होता.
‘अरे तसे नाही. फोनवर बोलतांना सुरुवातीला हॅलोऽऽ हॅलोऽऽऽ म्हणत असतात. नंतर बोलायचं असते.’
लोकं या नकलेला पोट धरुन हसत होते.
टेलीफोन आपल्याकडे असणे म्हणजे त्यावेळी स्वप्नवत होते. परंतु आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.
त्यावेळी टेलीफोन म्हणजे श्रीमंताची मिरासदारी होती.
एकदा मुंबईला १९९४ मध्ये माननिय कांशीरामजी यांची सभा होती. त्या सभेला माजी पंतप्रधान माननिय व्हि.पी.सिंग आले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले होते की, ‘टेलीफोन डिरेक्टरी मधील नांवे पाहिले की, कोण श्रीमंत व उच्चवर्णिय आहेत ते कळतात.’ आता टेलीफोन डिरेक्टरी मधिल नांवे पाहिले की, कोण श्रीमंत व उच्चवर्णिय आहेत ते कळत नाही!
माझ्याकडे एवढेच नव्हे तर माझे बहुतेक नातेवाईक, मित्र मंडळीकडे सुध्दा आता टेलीफोन आलेला आहे. माझे मुले मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ सारख्या उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे व औरंगाबाद या ठिकानी शिकत होते. त्यामुळे त्यांचेशी संपर्क ठेवण्यासाठी मला टेलीफोन घेणे अत्यंत आवश्यक झाले होते.
पुर्वी नक्कल करीत होतो! आता प्रत्यक्षात उतरले आहे. हे कश्यामुळे शक्य झाले आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच! ते जर नसते तर मी कुठेतरी मोलमजुरी करीत बसलो असतो.
बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, ‘शिका’ ते माझ्या आई-बाबां-दादानी ऎकले. मला शाळेत टाकून शिक्षण घेवू दिले.
बाबासाहेबांनी स्कॉलरशिपची सवलत मिळवून दिली. कुणीतरी एका काव्यात म्हटले आहे की, ‘स्कॉलरशिप आमची आई-बाप झाली होती.’ खरच आहे. स्कॉलरशिप जर मिळाली नसती तर आम्ही शिकूच शकलो नसतो!
त्यावेळी मला पाचवीपासून दहावीपर्यंत पंधरा रुपये स्कॉलरशिप मिळत होती. कॉलेजमध्ये होस्टॆलच्या मुलांना चाळीस रुपये मिळत होती. म्हणून मला आर्थिक आधार झाला. त्यामुळे मला बी.कॉमपर्यंत शिक्षण घेता आले.
नोकरीमध्ये बाबासाहेबांनी राखीव जागेची सवलत मिळवून दिली. जर राखीव जागेची सवलत नसती तर कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी खात्यात मला नोकरी मिळाली नसती.
राखीव जागेवर पुढे मला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये लिपिकाची नोकरी मिळाली. त्यानंतर महावितरण कंपनीमध्ये अकॉउंट ऑफीसर पर्यंत आरक्षणामूळेच पदोन्नती घेत घेत सेवानिवृत झालो.
मी शिकलो, नोकरीला लागलो. माझी आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यामुळे माझ्या लहान भावाला डॉक्टरचे शिक्षण घेण्यासाठी मदत करु शकलो. तो एम.बी.बी.एस.एम.एस. पर्यंत शिकला. मी माझ्या मुलांना शिकऊ शकलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक प्रगल्भतेच्या संकल्पेनुसार एक मुलगा वकील झाला. दुसरा डॉक्टर झाला. मुलगी कॉंम्पूटर ईंजिनिअर झाली. एवढे आमुलाग्र परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांमुळेच घडुन आले.
मी सप्टेंबर २००७ साली सेवानिवृत झालो. त्यावेळी माझ्या कार्यालयात झालेल्या निरोप समारंभाच्या वेळी मला शाल व माझी पत्‍नी कुसुम हिला साडी देवून आमचा उभयंताचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मी माझ्या भाषणात सांगितले होते की, ‘मी नोकरीला लागलो ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच! बाबासाहेब आंबेडकरांमुळेच केवळ मागासवर्गियांची प्रगती झाली, असे नव्हे तर इतर सर्व समाजाची प्रगती झाली. या देशाची प्रगती झाली. त्यामुळे केवळ मीच नव्हे तर सर्वांनी त्याचे ऋणी असायला पाहिजे.’ ही बाब मी माझ्या निरोप समारंभाच्या वेळी आवर्जून सांगितली होती. माझी तर अशी अपेक्षा आहे की जो जो सेवानिवृत होईल त्यांनी आपल्या निरोप समारंभाच्या वेळी ही बाब प्रकर्षाने मांडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती जोपासावी. त्यामुळे उपस्थित असलेल्या इतर कर्मचारी/अधिकार्‍यांना बाबासाहेबांचे मौल्यवान कर्तृत्व नजरेस येईल.
एकेकाळी मी गंमत म्हणून हॅलोऽऽ हॅलोऽऽऽ म्हणत होतो. आता प्रत्यक्षात हातात टेलिफोन व मोबाईलवर हॅलोऽऽ हॅलोऽऽऽ म्हणतो, तेव्हा माझं मलाच नवल वाटून गालातल्या गालात खुदकन हसत राहतो.
टिप :- सदर कथा ‘अशा होत्या त्या काटेरी वाटा !’ या आत्मकथेवर आधारित आहे.

पुढार्‍यांनी दादाला नासवलं

16 Jan

शामरावदादा म्हणजे माझा मोठा भाऊ… आम्ही भावंडं त्याला दादा म्हणत होतो. तो गांवाचं पुढारीपण करायचा. तो आंबेडकर चळवळीत अग्रेसर होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली दलितांच्या सर्वांगीन उत्कर्षाची चळवळ खेड्यापाड्यात पोहोचली होती. त्यावेळी ठिकठिकानी, गावागावात सभा होवून समाज जागृती होत असे.
आमच्या चौधरा या गांवात समता सैनिक दल होतं. समता सैनिक दलाची व्यायाम शाळा होती. त्यात गांवातले तरुण मुलं दांडपट्टा, लाठीकाठी शिकून सराव करीत असत. ते रोज व्यायाम करुन व मल्लखांबावर कसरत करुन शरीर कमवित असत. यवतमाळचा दादाराव वस्ताद त्यांना शिकवीत असे. दादा सुध्दा ह्या मुलांना मार्गदर्शन करायचा.
बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी गांवात मिरवणूक निघायची तेव्हा हे मुलं कसरत करुन दाखवित, तेव्हा पाहणार्‍यांच्या डोळ्यांचे पारणे फिटायचे.
जेथे जेथे सभा व्हायची तेथे तेथे समता सैनिक दल खाकी पॅंट, पांढरा शर्ट व हातात काठी घेवून मार्च करीत जात असत. तेव्हा विरोधकांच्या छातीत धडकी भरत असे. ह्या दलाचा आमच्या गांवात व जिकडे तिकडे दरारा होता. आमच्याही गांवात मी लहान असतांना सभा झाली होती. त्या सभेत बौध्द पध्दतीने कुणाचं तरी लग्न लाऊन देण्यात आले होते.
दादा सुरेख आवाजात भजणं म्हणायचा. त्याची पहाडी आवाजातली कव्वाली काळजाला भिडत असे. तो भजन मंडळात पेटी वाजवित होता. म्हणून त्याला गांवातील लोक पेटकर म्हणायचे. तो भाषणं देवून लोकांचं प्रबोधन पण करायचा. त्यामुळे गांवात त्याला फार मोठा मान होता.
परंतु दादाला रिपब्लीकन पार्टीच्या पुढारी लोकांच्या दुषित संसर्गामुळे दारुचं व्यसन जडलं होतं. पंधरा वर्षे तो गांवचा सरपंच राहिला होता. त्याआधि ढिवरु सरपंच असतांना तो उपसरपंच राहीला होता.
दादा त्याकाळी तिसर्‍या वर्गापर्यंत शाळा शिकला होता. गांवातले बहुतेक त्यांच्या वयातले लोकं दोन-तिन वर्गाच्या पलिकडे गेलेले नव्हते. बाबा, मामा, आगलावे, दशरथ असे दोन-चार लोकं दोन-तिन वर्गच शिकले होते. त्यांच्या नंतरची पिढी म्हणजे दादा, रामधन, नामदेव, उध्दव, किसना, लक्ष्मण, तुळशिराम हे पण जास्त शिकलेले नव्हते. फक्त त्यांच्यापैकी रामदास हा सातवीपर्यंत शाळा शिकला होता. त्याला त्यावेळी मास्तरची नोकरी पण लागणार होती. परंतु त्याच्या आई-वडीलांनी घर सोडून दुसर्‍या गांवला जाण्यास मनाई केली होती.
खेड्यातील वातावरण असंच असतं. खेड्यातील मुलांच शिक्षण म्हणजे कोंबडीच्या पिल्लासारखं असतं. कोंबडीचं पिल्लु आईच्या मागे मागे राहते. एखाद्या वेळेस त्याने उडण्याचा प्रयत्‍न केला की त्याची आई त्याला टोचते. त्यामुळे त्याची उडण्याची उर्मी तेथेच जिरुन जाते. असाच काहिसा प्रकार खेड्यातील मुलांचा होतो. त्याला शिक्षणाची प्रेरणा दिली जात नाही. त्याने जरी घरापासून, गांवापासून दूर जायचे म्हटले की आई-बाबाची माया त्याला जाऊ देत नाही. त्यामुळे त्याची उंच भरारी घेण्याची उर्मी मरुन जाते.
आमची पिढी नंतरची… गांवामध्ये प्रल्हाददादा प्रि.आर्टस्, मी बी.कॉम, बाबाराव एम.ए. बि.लिब, तर अज्याप एम.बी.बी.एस. एम.एस. पर्यंत शिकला होता. असे उच्च शिक्षीत मुलं आता आमच्या गांवात निपजले जात होते.
‘बामणाघरी लेवनं अन् महाराघरी गाणं.’ असं पुर्वी म्हटल्या जात होतं. आता ‘महाराघरी लेवनं’ पण आलं. म्हणून‘ शेणाचे हात लावले लेखणीला.’ असे भीम गितात म्हटल्या जायचे ते खरंच आहे, नाही कां? जे हात नेहमी शेणाने भरलेले राहायचे, त्या हातात आता लेखणी आली, ही किमया डॉ. बाबासाहेबांनी घडवून आणली.
मनमिळावूपणा, प्रामाणिकपणा, लोकांची कामे करण्याची तळमळ, लोकांमध्ये मिळूनमिसळून राहणे अशा दादाच्या स्वभावामुळे लोकं त्यालाच प्रत्येक वेळी सरपंच पद बहाल करायचे. त्याच्याशीवाय दुसरं कुणी गांवचा सरपंच बणायला तयारच होत नसत. कारण लोकांना ते मानसन्मानाचे पद न वाटता, रिकामटेकड्याचे कामे वाटत असायचे. म्हणून लोक प्रत्येकवेळी त्यालाच सरपंच बनवीत असत. त्याला हे सरपंचपद अंगवळणी पडल्यामुळे तो ही त्याला तयार व्हायचा. त्यामुळे दादाचं घरादाराकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत असे. सरपंच पदाच्या अंगावर चढलेल्या झुलीमुळे तो शेती वाडीचे कामे करीत नव्हता. त्याच्या सरपंचपणाच्या मान-पानापाई घरचे लोक दु:ख आणि कष्टात जगत होते. त्यामुळे आम्ही त्याला पुन्हा सरपंच बनायला विरोध करीत होतो.
तो घरचं खाऊन लोकांचे कामे करीत असे. शहरात जाऊन … कुणाचे बॅंकाचे, कुणाचे कर्जाचे, कुणाचे तहसिलचे, कुणाचे पंचायत समितीचे, कुणाचे जिल्हा परिषदेचे, कुणाचे कोर्ट-कचेर्‍याचे, कुणाचे पोलीस स्टेशनचे असे नानातर्‍हेचे लोकांचे कामे करीत असायचा. त्याशिवाय त्याला ग्रामपंचायतीचे दैन्यंदिन कामे करावे लागे. कुणाला दाखले दे, कुणाचे भांडण-तंटे सोडव… अशा अनेक कामांत तो सतत मग्न राहायचा.
लोकांचे कामे करण्यासाठी कधी कधी त्याला संबंधीत अधिकार्‍यांचे व पक्षाच्या पदाचिकार्‍यांचे हात ओले करावे लागे, तर कधी त्यांना दारु आणि कोंबडीच्या पार्टीची व्यवस्था करावी लागे. मग समाजसेवेच्या बदल्यात त्याला काय मिळालं ? जळजळणारं विषारी दारुचं व्यसन…!
रिपब्लीकन पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी बाबासाहेबांनी जीवनभर बाळगलेली व भगवान बुध्दांनी शिकवीलेली नैतिकता न रुजविता त्यांनी लोकांना, आपल्या कार्यकर्त्यांना व्यसनाधीन केले होते असा एक कटु अनुभव मी घेतला आहे. गावोगांवी यांनी दारुचे गुत्ते निर्मान केले. काही पुढार्‍यांनी स्वत:चे दारु, स्पिरीटचे दुकान थाटले होते. आणि गमत अशी की हे दुकाने केवळ मागासलेल्या लोकांच्या मोहल्ल्यातच उघडले जात होते. शेटे-भाटे-ब्राम्हणाच्या मोहल्ल्यात असे दुकाने कां उघडले जात नव्हते याचे मला आश्चर्य वाटत होते. यवतमाळच्या एका पुढार्‍याने पाटीपूर्‍यात स्पिरीटचे दुकान उघडले होते. स्पिरीट अत्यंत ज्वलनशील प्रवाही पदार्थ आहे. ती पिल्याने जरी नशा येत असली तरी पोटातल्या आतडीचे काय होत असेल याची कल्पना करवत नाही. तेथून लोकं स्पिरीट विकत घेऊन त्यात थोडे पाणी घालून आपल्या घश्यात ओतत असल्याचे मी पाहिले आहे.
समाजाचं स्वास्थ बिघडविण्यासाठी हेच रिपब्लीकन पक्षाचे महान पुढारी कारणीभूत आहेत. म्हणून मी त्यांनाच दोष देतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी म्हणाले होते की, ‘राजकीय सत्तेशिवाय आपणास काहीही करता येणार नाही. म्हणून आपण राजकीय सत्तेसाठी झगडले पाहिजे.’
परंतु पुढार्‍यांनी राजकीय सत्तेच्या माध्यमातून समाजाचे परिवर्तन घडवून न आणता समाजात लाचारी आणि व्यसनाधिनचेच पिक उगवले.
माझ्या दादाला यांनी दारुच्या व्यसनात बुडवलं हे भिषण सत्य मी लपवू शकत नाही. असे कितीतरी गावोगांवचे शामराव यांनी नासवले आहेत. ज्यांनी एकेकाळी आपल्या गायकीच्या आणि पेटीच्या सुरांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या चळवळीचा वणवा पेटविला, अशा एका निष्ठावंत अनुयायाला, कलाकाराला-माझ्या दादाला ह्या पुढार्‍यांनी मातीत लोटण्याचे काम केले.
बाबासाहेबांनी दाखविलेल्या उच्च नैतिक मूल्यव्यवस्थेच्या अधिष्ठाणावर वाटचाल करणारे व आपल्या कार्यकर्त्यांना त्याप्रमाणे शिकवणारे पुढारी कां निपजले नाहीत ? समाजाने कुणाचा आदर्श पाळावा? अशा अनेक गहण प्रश्‍नाने मला नेहमी सतावूत सोडले होते.
कुठे गेले ते पुर्वीचा प्रत्येकाच्या जीवनाला शिस्त लावणारा, समाजात आदर्श निर्माण करणारा, बाबासाहेबांनी स्थापन केलेला समता सैनिक दल? कुठे गेले ते बाबासाहेबांची प्रेरणा पेरणारे व लोकांमध्ये स्फुलींग पेटवणारे भजन मंडळे? कुठे गेले ते पंचशील झेंड्याजवळ त्रीशरण, पंचशील, वंदनेसाठी एकोप्याने जमणारा, धम्मरस ग्रहन करणारा समुह? अंगात भिनलेल्या दारुच्या नशेत हात जोडून लोकं, ‘सुरामेरय मज्ज पमाद ठाना वेरमनी, शिक्का पदम समाधीयामी.’ असे पंचशील म्हणतांना मी पाहिले आहे. ‘मी नशा आणणार्‍या कोणत्याही नशील्या पदार्थाचे म्हणजेच दारु, तंबाखाचे सेवन करणार नाही.’ असा त्या शीलाचा अर्थ त्यांना कुठे माहीती आहे?. या शिलाचा अर्थ त्यांना कोणीतरी समजाऊन सांगतो काय? दारुचा घोट घेण्यापुर्वी, ‘घ्या, जयभीम !’ असे मोठ्या अभिमानाने म्हणणारे लोकं मी पाहिले आहे.
ज्या बाबासाहेबांनी आपल्या जीवनात इंग्लंड, अमेरिकासारख्या देशात राहून सुध्दा कधी दारुला हात लावला नाही. त्याच बाबासाहेबाचे नांव दारुने झिंगलेले लोक घेत असतात याचे भान त्यांना नसते. अशी दयनिय स्थिती समाजामध्ये कां निर्मान झाली? याला कोण जबाबदार आहेत?
खेड्यातला समाज हा अडानी व अशिक्षीत असतो. तो दिवसभर काबाडकष्ट करतो. उन्हा-तान्हात, पाण्या-पावसात हिवा-दवात मरमर राबतो. दिवसभराच्या कामाचा शिनभाग घालविण्यासाठी तो रात्री दारुमध्ये बुडून जातो. धम्म जर त्याच्या रक्तात भिनवल्या गेला असता तर तो मानसिकदृष्ट्या सशक्त बणून दारु, बिडी, चिलिम, तंबाखु सारख्या अपायकारक गोष्टीच्या आहारी गेला नसता.
तुटपूंज्या कमाईतला काही भाग त्याच्या नशेसाठी खर्च होतो. त्यामुळे त्याचे कुटूंब विस्कळीत होऊन घरी वादाला तोंड फुटते. बायको मुलांची आबाळ होते. मुलांच्या शिक्षणाकडे, आजारपणाकडे दुर्लक्ष होते. दारिद्रता त्याच्या मागे हात धुवून लागते. ते माणसाला एका दुष्टचक्रात टाकते. त्यामुळे शिक्षण नाही. शिक्षणाअभावी रोजगार नाही. रोजगाराअभावी अन्न, वस्त्र, निवारा व आरोग्य नाही. मग त्याला कसंतरी रखडत जीवन जगून मृत्यूच्या वाटेने जाण्यशिवाय दुसरा मार्ग नसतो. म्हणून अशा माणसाच्या जीवनात दारिद्र्य हे एक सर्वाधिक भिषण वास्तव बणून जातं आहे. त्यामुळे त्याचे जगणेच यातनामय होवून जाते.
हे समाजाचे चित्र समाजाचे नेतृत्व करु पाहणार्‍या शिकल्या-सवरलेल्या पुढार्‍यांना दिसत कां नाही ?
काही शिकलेल्या, नोकरीवर लागलेल्या पांढरपेशे लोकांनी तर समाजाची नाळच तोडून टाकली आहे.
एक मोलमजुरी करुन कसातरी पोट भरणारा भाऊ त्याच्या दुसर्‍या शहरात राहून नोकरी करणार्‍या भावाला म्हणतो, ‘तु काय मोठा झालास ? आमची तुला काय चिंता ?’ असं जेव्हा रक्‍ताचं नातं तुटायला लागतं, तेथे समाजाचं नातं तर दुरच राहीलं ?
म्हणून बाबासाहेब हयात असतांना गहिवरुन म्हणाले की, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. मला वाटलं होतं, की हे लोक शिकून आपल्या समाजाचा विकास करतील. पण मी पाहतो आहे की हे स्वत:चाच विकास करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे माझ्या खेड्यातील लोकांच कसं होईल. आता मी काठी टेकवत टेकवत खेड्यात जाईन व माझ्या गोरगरीब खेडूत लोकांच जीवनमान सुधरवीन.’
त्यानंतर बाबासाहेबांचे अवघ्या नऊ महिण्यानंतर महापरीनिर्वान झाले. त्यांच ते स्वप्न अधुरं राहीलं ते राहिलच…! बाबासाहेबांचा रथ पुढे तर नेला नाहीच; उलट त्याला मागे जाण्यास रोखले पण नाही. याला कोण जबाबदार आहे? हा पांढरपेशा शिकलेला व राजकारण करणारा पुढारी असा दोन्हीही वर्ग …!
कां नाही यांनी बाबासाहेबांची व भगवान बुध्दाच्या धम्माची शिकवण जनमाणसात पेरली? बाबासाहेबांच्या स्वप्नांतला आदर्श समाज कां निर्माण केला नाही? खेड्यापाड्यातील अशिक्षीत, अडाणी लोकांनी कोणाचे अनुकरण करावे? बाबासाहेबांना अपेक्षीत असलेला समता, स्वातंत्त्य, बंधुत्व व न्यायाच्या आधारावर समाजाची पुनर्बांधनी करण्याकडे कां वाटचाल केली नाही? भगवान बुध्दाच्या शिकवणीनुसार धम्मराज्याची स्थापना करण्याच्या दिशेने कां धाव घेतली नाही? नैतिकतेचे धडे देण्याची जबाबदारी कुणाची होती? बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञेला समजून घेवून समाजाला कां शिकवले नाही? कुणी करावे हे बाबासाहेबांचे अपुरे राहिलेले कार्य? खेड्यापाड्यातल्या अडाणी लोकांना काय कळतं यातलं?
‘भारत बौध्दमय करणे’ हे कार्य तर दुरच राहिले उलट वैयक्तिक स्वार्थापायी समाज रसातळाला जात आहे याची कुणालाच चिंता राहिली नव्हती असे चित्र मला दिसले.
मी कॉलेजमध्ये शिकत असतांना दारुचे दुश:परिनाम माझ्या लक्षांत येत होते. दारु पिणे वाईट आहे. दारु वारंवार पिल्यामुळे त्याचं व्यसन कधिही जडू शकते. त्याचा आरोग्यावर वाईट परिनाम होत असतो. दारुने अकाली मरण ओढवत असते. दारुमुळे अनाठायी खर्च वाढत जातो. मग तो दारिद्र्याच्या खाईमध्ये ढकलल्या जातो. ‘आमदानी अठन्नी खर्चा रुपया’ असं त्याच्या कमाईचं व खर्चाचं व्यस्त गणित निर्माण होतं. मुलांच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे घरामध्ये भांडणे लागतात. घरात ताणतणाव निर्माण होतं. त्याला समाजात मान-सन्मान राहत नाही. दारुच्या अंमलात असतांना कुणाशीही भांडण ऊकरून काढतो. अशा प्रकारचे भिषण अवस्था माझ्या डोळ्यासमोर तराळत असल्यामुळे मी एकदा दादाने कपात दिलेली दारु पिण्यास नकार दिला होता.
‘हे काय अमृत आहे ? तू पण पितो व आम्हालाही प्यायला देतो. तुला तर याची तलफच लागली आहे. घरी खाण्यापिण्यात, कपडेलत्यात, चांगलं-चुंगलं राहण्या्त काटकसर करतो पण दारु पिण्यासाठी मात्र विणाकारण खर्च करतो. काय फायदा आहे या दारुत.? उलट नुकसानच नुकसान आहे. त्याने माणसाचे काळिज खराब होते म्हणतात. आता दारु पिणे बंद कर व घराकडे लक्ष दे.’ असं मी एकादमात त्यादिवशी दादाला सुनावले होते.
पुर्वी दादा इतका दारु पित नव्हता. नंतरच्या काळात मात्र रोज दारु प्यायला लागला होता. परंतु इतर लोकांसारखा दारु पिऊन तो कुणाला त्रास देत नव्हता, की भाडत नव्हता; ही त्याच्या बाबतीत जमेची बाजू होती याचच आम्हाला समाधान वाटत होतं.
परंतु त्याचे दारुच्या व्यसनापाई व सरपंचपदाच्या प्रतिष्ठीतपणाचे भुत मानगुटीवर बसल्यामुळे घरातील कामे करण्याची वृती न राहील्यामुळे आमची घरची परिस्थिती आणखीनच डबघाईला आली. गरीबीमुळे घरात अवकळा पसरली होती.
खरच माझ्या बहुगुणी दादाला धुर्त व स्वार्थी पुढार्‍यांनी नासवल्यामुळेच आम्हाला असे गरिबीचे दिवसं भोगायला आले होते!
टिप :- सदर कथा ‘अशा होत्या त्या काटेरी वाटा !’ या माझ्या आत्मकथेतील आहे.

बाबाची सही

16 Jan

मी निळोणा या गांवाच्या शाळेतून चवथा वर्ग पास झाल्यावर पुढील शिक्षण कसं होईल याची आई-बाबा, दादांना चिंता लागली होती. कारण निळोण्याला पाचवीनंतरच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था नव्हती.
एकदा उन्हाळ्यात, यवतमाळच्या बाजारात बकुबाई-आत्यासोबत बाबाची भेट झाली. ती यवतमाळ जवळ असलेल्या उमरसरा या गांवला राहत होती. उमरसर्‍याला बकुबाई व सखुबाई अशा दोघ्या बहिणी राहत होत्या. त्या माझ्या बाबाच्या चुलत नात्यामध्ये बहिणी लागत होत्या.
तिच्याकडे बाबाने आमच्या दोघा बहिण-भावाच्या शिक्षणाची गोष्ट काढली.
‘माझ्याकडे ठेव नं मामा.’ सुभद्राबाई हीने सुचवीले.
सुभद्राबाई ही आत्याची मोठी मुलगी. ती आत्यासोबत बाजारात आली होती. ती आत्याच्या घराजवळच उमरसर्‍याला राहत होती. तिचे लग्न झाले होते. आमचा राहण्याचा प्रश्‍न आता मिटला होता.
उमरसर्‍याला राहून मी पांचवी ते आठवीपर्यंत शिक्षण घेतले.
हे गांव यवतमाळपासून शेवटचे टोक संपल्यानंतर एक मैलावर होते. दोन्ही गावांच्या मध्ये एक लहानसा नाला होता. पावसाळ्यात त्या नाल्याला पाणी असायचे. उन्हाळ्यात आटून जायचा. त्या नाल्याच्या दोन्ही कडेला उंच-खोल अशी जमीन पसरलेली होती. अंधार पडला की येथून जायला भिती वाटायची.
सुरुवातीला आम्ही दोघं बहिण-भाऊ सुभद्राबाईकडे राहत होतो. त्यानंतर आम्ही लहान आत्याकडे राहायाला गेलो. तेथून आम्ही मोठ्या आत्याच्या एका खोलीत राहिलो.
त्यानंतर आम्ही बाबाने बांधून दिलेल्या एका लहानश्या झोपडीत गेलो. ही झोपडी सोपानदादाच्या घराच्या सांदीत बांधली होती. या झोपडीत तीन-चार माणसे झोपतील एवढी जागा होती. बाबाने गांवावरुन बैलगाडीने लाकूड-फाटा आणला होता. यवतमाळहून आणलेल्या बांबुच्या तट्ट्यावर पळसाच्या पानाच्या डाहाळ्या टाकून व्यवस्थितपणे शहाळले होते. तसेच आरामशीन वरुन आणलेल्या पाट्याचा कवाड बनविला होता. त्या झोपडीत एका कोपर्‍यात मातीची चूल टाकून दिली. त्या चुलीला आडप करण्यासाठी मधात एक कुडाची भिंत टाकली. झोपडीच्या चारही बाजुच्या भिंतीला पळसाच्या काड्या लाऊन त्याला शेण-मातीने लिपून घेतले. अशा पध्दतीने बाबाने आम्हा दोघा बहिण-भावासाठी एक सुंदरसं घर बांधून दिलं होतं.
बाई माझ्यापेक्षा मोठी असल्यामुळे साहजिकच घरातील कर्ता म्हणून प्रपंचाची सारी जबाबदारी बाईवर आली होती. जे वय खेळण्या-बागडण्याचं असते त्या वयात घर सांभाळण्याचं ओझं बाईच्या अंगावर येऊन पडली होती !
मी त्यावेळेस पांचव्या वर्गात शिकत होतो. यवतमाळ शहरातील म्युनिसिपल हायस्कुल या शाळेत मला बाबांनी नुकतेच टाकले होते.
वर्ग चालू होता. शाळेचा चपराशी वर्गात आला.
‘जुमळे कोण आहे ?’ मी ऊभा झालो.
‘तूला बाबुने ऑफीसमध्ये बोलावीले.’
मी ऑफीसमध्ये गेलो. बाबुने मला एक फॉर्म दिला.
‘तूझ्या वडिलाची सही घेऊन उद्याच्या उद्या आणून दे.’
तो फॉर्म स्कॉलरशीपचा होता. मला वर्षाला पंधरा रुपये स्कॉलरशीप मिळणार होती. ज्यांना चवथ्या वर्गात चांगले मार्क्स मिळालेत, त्यांनाच ही सरकारची स्कॉलरशीप मिळणार होती. आमच्या शाळेत मी व दुसरा एक धोपे नांवाचा धोब्याचा मुलगा होता. अशा दोघांची ह्या स्कॉलरशीपसाठी निवड झाली होती.
मी पांच वाजता शाळा सुटल्यावर घरी आलो. घरी येईपर्यंत संध्याकाळ झाली होती. दप्तर खुंटिला अडकवून ठेवले.
‘बाबाची सही आणण्यासाठी मी गांवला जात आहे.’ असे बाईला सांगितले.
माझ्या मोठ्या बहिणीचे नांव जनाबाई. तीला मी ‘बाई’ असेच म्हणत होतो. खेड्यामध्ये ‘ताई’ ऎवजी ‘बाई’च म्हंणत असतात. ती माझ्यापेक्षा मोठी होती. परंतू शिक्षणामध्ये माझ्यापेक्षा एका वर्गाने मागे होती. कारण तिला माझ्यानंतर शाळेत टाकले होते. माझा लहान भाऊ अज्याप याला राखण्यासाठी तिला ठेवले होते.
‘रस्त्यातच तूला अंधार होईल. मग कसा जाशील रे अंधारात?’
‘पण बाबाची सही घेऊन उद्याच्या उद्या तो फॉर्म बाबुकडे द्यायचा आहे ना?. त्यामुळे अंधार जरी पडला तरी जातो मी… सकाळी लवकर येईन…’ असे म्हणून मी पायी-पायी जायला निघालो.
माझे खेडेगांव चौधरा त्या शहरापासुन तीन साडे-तीन कोस दूर होते. त्यावेळेस गांवला जाण्यासाठी पायी जाण्याशिवाय दुसरा उपायच नव्हता.
रस्ता पण चांगला नव्हता. लहान-मोठे दगडं, माती-मुरमाटीचा असा तो कच्चा रस्ता होता. परंतू तो लहानपणापासून नेहमीचा जाण्या-येण्याचा असल्यामुळे अंधारात सुध्दा रस्ता चुकत नव्हता. इतकी ती वाट मळलेली होती.
झाडांझुडपातून, जंगलघाटातून जाणारा…, उतार-चढावातून जाणारा…, शेतातून, शेताच्या उभ्या पिकातून जाणारा…,शेताच्या धुर्‍याधुर्‍याने जाणारा…,बैलगाडीच्या चाकोरीने जाणारा…, बरडाच्या काठा काठा ने जाणारा… तो रस्ता होता.
शेतातील काही पिके माझ्या कंबरेपर्यंत तर कुठे कुठे माझ्या उंचीएवढे वाढले होते.
घाटाच्या खाली उतरलो. गोधणी हे गांव ओलांडून पलीकडे गेलो. त्यानंतर निळोणा हे गांव लागणार होते. मग माझं चौधरा हे गांव येणार होते.
सूर्य बरडाच्या आड लपत लपत खालच्या बाजुने हळुहळू सरकत चालला होता. त्याचे लालसर किरणे तेवढे दिसत होते. त्याचे अस्तित्व नष्ट होत चालल्याची जाणीव मला अस्वस्थ करत होती. हळुहळु त्याची जागा अंधारलेला काळोख आपल्या कवेत घेत होता. पाखरं मोठ-मोठ्या झाडावर रात्रीच्या राहुटीला एकत्र जमले होते. त्यांचा बर्‍याच वेळापासून चाललेला किलबिलाट आता मंद होत चालला होता.
जस-जशी झाकट पडत चालली, तस-तसे माझ्या अंगावर अनामिक भितीचे काटे उभारले जात होते. कशी तरी हिम्मत करुन मी निघालो खरा, पण आता अंधाराच्या जाणिवेने माझे सर्वांग शहारत चालले होते. हृदयाच्या ठोक्याची गती वाढत चालली होती. छाती घाबरल्यामूळे धडधड करीत होती.
ती काळीकूट्ट अंधारी रात्र असल्याचे आता तिव्रतेने जाणवत होते. बहूतेक अमावस्या तेवढ्यातच होती कीं काय असे वाटत होते.
नाला आला की आणखीनच भिती वाटत होती. कारण काठाच्या अलीकडे व पलीकडे निमुळता व चिखल-पाण्याचा घसरता रस्ता असायचा. आजुबाजूच्या गवताने व पालवीने तो रस्ता झाकून जायचा. पाय घसरुन पडु नये म्हणून पायाच्या बोटाची नखे ओल्या मातीत रुतवून हाताने जवळच्या पालवीला पकडीत जावे लागे.
शेत ओलांडल्यावर रस्त्याच्या आजु-बाजूला गर्द झाडी असायची. मध्येच नाला यायचा. दिवसा निखळ आनंद देणारी पाण्याची खळखळ आता मात्र अंधार्‍या रात्रीत नकोशी वाटत होती. रातकिड्यांचा किर्रकिर्र आवाज शांतता भंग करीत होता. मध्येच एखाद्या पाखराच्या फडफडण्याचा आवाज दुरुन ऎकू यायचा. कधी कधी पाखरांच्या गुंजण्याचा आवाज मंजूळ वाटायचा तर कधी कधी भेसूर वाटायचा.
मला प्रश्‍न पडायचा की, या पाखरांना अंधार्‍या रात्रीची कां भिती वाटत नाही? आपल्यासारख्या माणसांनाच कां वाटते? दिवसा किंवा उजॆड असतांना आपण ज्या रस्त्याने जातो, तेव्हा त्या रस्त्याची जेवढी भिती वाटत नाही. त्यापेक्षा मात्र त्याच रस्त्याची रात्रीला आणखी भिती वाटते. असे कां?
लहान मोठ्या झाडा-झुडपाच्या सावल्या विचित्र दिसायच्या. कोणीतरी उभे आहे कां असे वाटायचे. जवळ गेल्यावर ती सावली असल्याचे लक्षात यायचे. कधी मध्येच काजवा ऊजेडाची उघडझाप करीत चमकून जात होता. थोडासा कां होईना त्या अंधारात एखाद्या बिघडलेल्या बंद चालू होणार्‍या बॅटरीप्रमाणे उजेड पाडून जात होता. तेवढाच एक बुडत्याला काडीचा आधार वाटत होता.
मला विंचु-काट्यांची, सापाची किंवा हिंस्त्र पशु-पक्षांची जेवढी भिती वाटत नव्हती, त्यापेक्षा भुता-खेतांची, चकव्या-लावडिनीची जास्त भिती वाटत होती. कारण अशा भितिदायक गोष्टी लहानपणापासून खूप ऎकल्या होत्या. त्या मनाच्या एका कोपर्‍यात घट्ट जावून बसल्या होत्या. अशा भयान रात्रीला त्या हमखास बाहेर यायच्या. मग भितीने आणखीनच कापरे भरायचे. अशा गोष्टींमध्ये काहीच तथ्यांश नसते हे त्यावेळी मला काहीच कळत नव्हते. भगवान बुध्दांचा आत्मा नाकारणारा अनात्मवादाचा सिध्दांत व भुता-खेतांसारख्या गुढ, अद्‍भूत व चमत्कारिक गोष्टीला नाकारणारा, कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही असा कार्यकारणभाव किंवा प्रतित्य समुत्पादाच्या सिध्दांताचे ज्ञान त्यावेळी मला झाले नव्हते.
एक-दिड कोस मी चालून आलो असेन. शेतातल्या पायवाटेने जीव मुठीत घेऊन चाललो होतो. गोधणी गांवच्या कोलामाचे मोहाच्या झाडाचे ते शेत म्हणून ओळखले जात होते. त्यात ज्वारीचे पीक उभे होते. त्या शेताच्या मधोमध मोहाच्या झाडाजवळून पायवाट जात होती. पायवाटेच्या दोन्हिही बाजूला ज्वारीचे धांडे माझ्या उंचीएवढे वाढले होते.
मी एवढ्या रात्री येण्याची इतकी हिंमत करायला नको होती, असे मला राहून राहून सारखे वाटत होते.
आतापर्यंत केवळ अर्धीच वाट चालून आलो असेन. आणखीन तेवढेच दूर जायचे होते. अजुन निळोणा हे गाव यायचे होते. निळोणा या गांवला माझे चवथीपर्यंतचे शिक्षण झाले होते.
त्यांतर वाघाडी नदी…! बापरे त्या नदितून कसा जाईन? खळखळ वाहणारी व मोठे पात्र असलेली ती नदी… तिच्या आलिकडील व पलिकडील काठाला मसणवटी… तिच्या थोडे दूर खालच्या बाजुला खोल असा डोह होता. डोह म्हणजे जेथे खूप पाणी साचलेले असते असे ते ठिकाण… तो डोह… तो चकवा… माझं सर्वांग शहारुन गेलं! अंगावर सरसरून काटे ऊभे झाले! छाती धडधड करायला लागली! माझे पाय लटपटा कापायला लागले! परत जावे की काय असाही विचार मनात चमकून गेला. पण बाबाची सही… काय करावे काही कळत नव्हते. ‘पुढे बसलो तर धूर जड अन् मागे बसलो तर उलार!’ अशी माझी गत झाली होती.
एवढ्यात मला दुरुनच धियाऽऽ धियाऽऽ असा अस्पष्ट आवाज ऎकू येऊ लागला. मी त्या आवाजाचा कानोसा घेण्यासाठी क्षणभर थबकलो.
त्याच वेळेस पुन्हा एकदा त्या चकव्याची आठवण झाली. तो म्हणे असाच कोणत्यातरी रुपात येत असतो. आपल्यासोबत गोड गोड बोलून नदी काठावर घेऊन जातो व डोहात ढकलून देतो.
आमच्या गांवात अशीच एक गोष्ट घडून गेल्याची कोणीतरी सांगत होते. एका नवरदेवाला रात्रीला उठवून त्याला वाघाडी नदीवर नेले होते. तेथे त्याचे कपडे काठावर उतरवून त्याला डोहात ढकलून दिले होते. खरं काय न खोटं काय कोण जाणे!
या आठवणीने मी पार हादरून गेलो होतो. तोंड सोकून आले होते. तरीही मी आवाजाचा कानोसा घेत थबकत थबकत चालू लागलो. आता तो आवाज थोडा स्पष्ट होत जवळ येऊ लागला होता. चकव्याची भिती थोडी कमी होत चालली होती. माझ्या घाबरलेल्या जीवात जीव आल्याचे जाणवत होते. परंतू पायवाटेच्या समांतर चाललेल्या बैलगाडीच्या वाटेने तो आवाज येत होता. पुढे ह्या दोन्हिही वाटा एकत्र येऊन मिळणार होत्या. म्हणून मी झपाझप पाऊले टाकत चालायला लागलो. नाहीतर ती व्यक्ती पुढे निघून जाईल व पुन्हा मला एकट्यालाच त्या अंधार्‍या रात्री मार्ग तूडवत जावे लागले असते.
जेथे दोन्हिही रस्ते एकत्र येत होते तेथे मी येऊन थांबलो. ती व्यक्ती जवळ येऊ लागली. तसा तो एकदम थांबला. एवढ्या रात्री कोणी येथे उभा असेल याची त्याला कल्पना नव्हती. मला पाहून तो पण घाबरुन गेला असावा.
‘कोण आहेरे?’ असे दरडावून मला विचारले.
‘मी रामराव.’
‘कोंड्यामामाचा कुंडा कारे? अरे बापरे, एवढ्या रात्री कसा तू?’
‘हो, कामच होतं तसं. बाबाची सही घेऊन उद्या फॉर्म शाळेत नेऊन द्यायचा आहे. म्हणून शाळा सुटल्यावर मी निघालो, पण अंधार पडला.’
‘बरं झालं, मी भेटलो, नाहीतर तू एकटा कसा गेला असतास, कुणास ठाऊक?’
तो व्यक्ती माझ्याच गांवचा निघाला. धर्मा लभान. त्याने त्याचा बैल गुरांच्या दवाखाण्यात नेला होता. दवाखाणा करता करता उशीर झाला. त्यामुळे त्यालाही निघायला रात्रच झाली होती.
‘शाळा शिकायला किती कष्ट घ्यावे लागतात! नाही कां? पहाना आमचे लोकं पोरांना शाळेत धाडत नाहीत. कोणी टाकले तर शाळेत जात नाहीत. असे आमचे बयताड लभान लोकं आहेत. तू मात्र किती आटापिटा करुन शिकत आहेस! शिक बाबा… आपल्या गांवचं नांव कमावून दाखव म्हणजे झालं!’
मी त्याच्या मागे मागे चालत होतो. त्याच्या सोबत बैल असल्यामुळे त्याला बैलगाडीच्या रस्त्यानेच चालावे लागत होते. पायवाट तरी बरी होती. त्यापेक्षा हा बैलगाडीचा रस्ता म्हणजे आणखीनच त्रासदायक होता. पाय कधी खड्ड्यात पडायचा. तर कधी ठेचाळत जायचा. निळोणा गांवापासून ते वाघाडी नदिपर्यंतचा रस्ता तर निव्वळ गोटाळीचा होता. आम्ही निळोण्याला शाळेत यायचो, तेव्हा येवढा रस्ता पार करायला आमच्या जीव नाकीनव यायचा.
तो खेडूत शेतकरी असल्यामुळे तो झपाझप लांब टांगा टाकत चालत होता. मला त्याला गाठायला त्या अंधार्‍या रात्री कधी कधी दुडक्या चालीने चालावे लागत होते. गांव जवळ आले की हागदोडी-पांदन लागायची. पाय केव्हा एखाद्या पोवट्यावर पडेल याचा काही नेम नव्हता.
शेवटी गावांत आलो. बाहेरून आवाराच्या कवाड्याची कडी वाजवली. बाबाने कवाड उघडलं. हातातला कंदिल वर घेऊन दारात कोण आहे म्हणून पाहायला जवळ आला. मला दारात पाहून दचकलाच.
‘अरे बाबु, तू कसा काय एवढ्या रात्री आलास?’
‘मी गोधणीच्या मोहाच्या वावरापर्यंत एकटाच आलो. मग मला धर्मा लभान भेटला. त्याच्याबरोबर आलो.’
‘एवढ्या रातच्यानं कशाला यायला पाहिजे होतं. आला असतास सकाळ-वकाळ.’ ‘स्कॉलरशीपच्या फॉर्मवर तूमची सही पाहिजे होती ना… तो उद्याच शाळेत नेवून द्यायचा आहे.’
‘आता ही काय भानगड आहे?’
‘मला आता दर वर्षाला पंधरा रुपये मिळणार आहेत. त्याला स्कॉलरशीप म्हणतात.’
‘हो बाबा, आपल्या आंबेडकर बाबांनी तूझ्यासारख्या हुषार मुलांना खूप शिकता यावे म्हणून मोठ्या पुण्याईचं काम केलं… ते खूप शिकलेत…मोठे झालेत…तू पण तसाच शिकून मोठा हो…’
दुसर्‍या दिवशी सकाळी बाबांनी मला रेंगीने उमरसर्‍याला आणून दिले.
त्यानंतर मी कानाला खडा लावला. कोणत्याही फॉर्मवर बाबाची सही घेण्यासाठी कधिही गांवला गेलो नाही. कारण मीच बाबाची सही चांगली घोटून घोटून शिकून घेतली होती. त्यामुळे मीच प्रत्येक वेळी त्यांची खोटी खोटी सही करीत होतो. त्यांची खोटी सही करण्याचा वारंवार गुन्हा माझ्या जीवनाचा तेव्हापासून अविभाज्य अंग बनला होता.
एकदा बाबा मला डॉक्टर बाबासाहेबांच्या राजकीय चळवळीत काम करणारे साहेबराव शिरसाट यांच्या बंगल्यावर घेऊन गेले होते. ते त्यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. अशा लोकांबद्दल बाबांना फार ओढ असायची. त्यांच्या पासून मला शिक्षणाची प्रेरणा मिळावी असा बाबाचा त्यामागे उद्देश असायचा. मी संकोची वृतीचा असल्यामुळे मला मात्र अवघडल्यासारखे होत असे. त्यांनी मला खूप शिकण्याचा उपदेश केला होता.
खरंच डॉक्टर बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार माझ्या बाबांनी अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी मजबुत पायाभरणी केली होती, ही गोष्ट मी कधिही विसरु शकत नाही. कारण याच मजबुत पायाच्या आधारावरती माझ्यानंतर येणारी पिढी निश्चितच शिक्षणाची भव्य-दिव्य ईमारत उभी केल्याशिवाय राहणार नाही हेही तेवढेच खरे होते!
टिप :- सदर कथा ‘अशा होत्या त्या काटेरी वाटा !’ या माझ्या आत्मकथेतील आहे.
%d bloggers like this: