आमची कार सिग्नलला थांबली. एक पोरसवदा मुलगी कापडाच्या झोळीत छोट्या बाळाला घेऊन प्रत्येक कारजवळ जाऊन हात पसरत पैसे मागत होती. पण कोणीही कारची काच खाली सरकवून तिला पैसे दिल्याचे मला दिसले नाही. मी हे दृष्य न्याहाळत होतो. सिग्नल सुरू होणार इतक्यात ती आमच्या कारजवळ आली. आमचीही तिला पैसे देण्याची ईच्छा दिसली नाही. कारण त्याआधी अशीच एक बाई लहान मुलाला कडेवर घेऊन आमच्या कारजवळ आली होती. ती मुलाच्या तोंडाला हात लावून व हात समोर करून केविलवाणी तोंडाने पैसे मागत होती. मला तिची कीव आली. मी विस रुपयाची नोट तिला देण्यासाठी खिशातून काढली. पण मुलाने देऊ दिले नाही. ती आशाळभूत नजरेने माझ्या हातातील नोटेकडे पाहत होती.
ह्या बाया पुणे-मुंबईच्या चौका चौकात लहान मुलांना कडेवर घेऊन भिक मांगतांना दिसतात. त्यांच्याजवळ असलेलं मुलं त्यांचीच आहेत की चोरलेली आहेत याबद्दल शंकाकुशंका निर्माण होतात. आता हेच पाहाना, ती जी मुलगी झोळीत बाळ घेऊन आली होती, त्याचं आंग जरी झाकलेलं होतं तरी त्याचा चेहरा पाहून तो बाळ गोरा आणि गुबगुबीत दिसत होता. तिच्यापेक्षा जरा वेगळाच वाटत होता. या प्रत्येक बायांकडे लहान मुलेच कसे दिसतात असाही प्रश्न निर्माण होतो. यांना भिक देऊन आपणच त्यांना प्रोत्साहन देतो, असे माझ्या मुलाचे, सुनेचे व मिसेसचे म्हणणे पडले, ते मलाही पटले होते. यांनी रस्त्यावर येऊन भिकच का मागावी? बाकीचे बरेच लोक लहानमोठे कामं करून स्वाभिमानाने जगतातच ना? शहरात कोणतेही काम मिळते. कामाला काही वान नाही. तेही खरंच होतं. यांच्यापैकी काहीजण मुलांचे खेळणे अथवा काही वस्तू विकायला कार जवळ घेऊन येत, हे जरी बरं वाटत असलं तरी बाकीच्या त्यांच्या बाया-मुलं भिकच मागत होते, हे मात्र बरं वाटत नव्हतं !
मी मागे एकदा पुण्याला मुलाकडे आलो होतो; तेव्हाची गोष्ट सांगतो. मी केळी घेऊन येत असतांना चौकात यांचीच दोन-तिन मुले केळी मागत माझ्यामागे लागले होते. मी ते डझनभर केळी त्यांना देऊन टाकले; तेव्हा कुठे त्यांनी माझा पिच्छा सोडला. मग परत जाऊन दुसरे विकत आणले. यावेळी मात्र दुस-या बाजूने त्या मुलांना दिसू नये म्हणून लपत छपत आलो.
एकदा आम्ही दिवाळीच्या दरम्यान सासुरवाडीला गेलो होतो. ह्यावेळी माहेरी आलेल्या मुलींना साड्या घेण्याची प्रथा अजुनही खेड्यात प्रचलीत आहे. म्हणून आम्ही कपडे घेण्यासाठी यवतमाळला गेलो होतो. आझाद मैदानाजवळ कापडांच्या ओळी आहेत. त्या मैदानात फटाक्यांचे दुकाने दरवर्षीप्रमाणे ह्याही वेळेस लागले होते. मी कार पार्किंग करून आझाद मैदानावर फेरफटका मारत असतांना मला अत्यंत लाजिरवाने दृष्य आढळून आले. तेथे पारधी लोक मुलंबाळ व अबालवृध्दांसहीत उघड्यावर राहतांना दिसून आले. त्यांचा पिढीजात धंदा म्हणजे तितरं, बाटरं, ससे यांची शिकार करून विकणे व त्यावर आपली गुजराण करणे हा होता. परंतु शिकारीवर सरकारने बंदी आणल्याने त्यांचा हा धंदा बसला. म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी शहरात येऊन भिक मागणे सुरू केले. ह्यांची लहान लहान मुले रस्त्यावरील लोकांना हात लावून केविलवाण्याने पैसे मागत. जे शाळेत जाण्याचं वय असतं, ते पोटाची तेवढी गरज भागवण्यासाठी लोकांसमोर हात पसरवत पाहताना झिनझिन्या आल्यासारखे वाटत होतं. मान-सन्मान सारे हरवून बसले होते, बिच्चारे! सकाळी सकाळी यांची मुले-बाया डोक्यावर टोपले घेऊन ‘वाढा ओ माय’ असे म्हणत फिरताना दिसत. लोकांनी दिलेल्या शिळेपाळे अन्नावर ते जीवन जगून उगवलेला प्रत्येक दिवस ढकलत होते. पोळ्या-भाकरी वाळवून पाण्या-पावसाच्या घाती खात होते. मुलांना शिक्षण, स्वास्थ्य, सुरक्षा असं काही नागरिक म्हणून यांच्या वाटेला आलेच नव्हते. त्यावेळी वयात आलेले एक मुलगा व मुलगी दारूच्या नशेत आपल्याच मस्तीत तेथे फटाक्याच्या दुकानाजवळील पसरलेल्या रेतीवर झोपलेल्या अवस्थेत एकमेकांशी दंगामस्ती करीत होते. जाणारे येणारे सारेजण हे दृष्य पाहून थबकत होते. हे दृष्य म्हणजे देशातील समाजव्यवस्थेला काळीमा फासल्यासारखं वाटत होतं. समाजाच्या एका घटकाला अशा पद्धतीने दैनावस्थेत जीवन जगायला भाग पाडणे, हा आपल्या समाजाचा सपशेल पराभवच नव्हे काय?
श्रीनिवास गेडाम, एका गझलेत म्हणतात ते खरंच आहे-
” हसता मला न आले, रडता मला न आले
जुळवून या जगाशी, जगता मला न आले”
आर.के.जुमळे
Leave a Reply