सामाजिक उतराई

22 Aug

‘सामाजिक उतराई’च्या निमित्ताने…

मी ‘अशा तुडविल्या काटेरी वाटा’ हे पुस्तक प्रकाशित केल्यावर अनेकांनी फोन करून विचारपूस केली. पुस्तक वाचतांना जणूकाही,  ‘माझंच जीवन मी वाचत असल्याचा भास होत आहे’ असे त्यांनी सांगितले. 

काही  वाचकांनी सुचविले,  की आपण या पुस्तकात नोकरीनंतरचेही जीवन चित्रीत करायला पाहिजे होते किंवा दुसरे पुस्तक प्रकाशित करावे.  खरं म्हणजे त्यापुढील जीवन रेखाटणारं पुस्तक लिहायची माझी मुळीच  इच्छा नव्हती. 

पहिलं पुस्तक लिहण्यामागे एक  प्रयोजन  होतं. मी खेड्यात राहून गरिबीत शिक्षण घेतलं. नोकरी लागली.  जीवन कमालीचं   पालटलं.   मी जर तसंच दैन्य आणि दारीद्रयामध्ये जीवन जगत राहिलो असतो, तर मी कदाचित  लिहू शकलो नसतो. कारण ते रोजचेच जीवन  असते. ‘रोज मरे त्याला कोण रडे…!’ याप्रमाणे जीवनप्रवास सुरु असता. त्याकाळात ज्या परिस्थितीत मी जगत होतो, हे त्या समुहाचं सार्वत्रिक जीवन होतं. सर्वचजण असे जगतात, मग माझ्या जगण्यात असं काय आगळंवेगळं होतं, ते मी लोकांना सांगू…? परंतु त्यावेळचं जगणं आणि नोकरी नंतरचं जगणं यामध्ये आमुलाग्र बदल झाल्याने मी ते कागदावर उतरवलं.  

त्यानंतर हळूहळू काटेरी वाटेच्या आवर्तनातून मी बाहेर पडलो. माझं जीवनमान सुधारलं. म्हणूनच त्यापुढील पुस्तक लिहावंसं वाटलं नाही. पण नोकरीच्या जीवनात जिथे जिथे माझ्या बदल्या झाल्यात तेथे तेथे मी माझं जीवन सामाजिक कार्यात झोकून दिलं होतं. सुरुवातीच्या काळात कामगार संघटनेत कार्यरत होतो. नंतर ख-या अर्थाने दिग्रस जि. यवतमाळ या लहानशा शहरापासून माझं सामाजिक कार्य सुरू झालं. नंतर नोकरीच्या अंतापर्यंत मा. कांशीरामजी यांच्या बामसेफ व पे बॅक टू द सोसायटी प्रोग्रॅम या संघटनेत इतरांप्रमाणे मीही तन, मन, धन  प्रामाणिकपणे अर्पण करून समर्पित झालो. ऐन तारुण्य आणि उमेदीच्या जीवनातील काही वर्षे या कार्यात समाधानकारकपणे घालविले याचा मला आनंद वाटतो. 

“अगर मरने के बाद भी जिना चाहो…

तो एक काम जरूर करना, 

पढने लायक कुछ लिख जाना,

या लिखने लायक, कुछ कर जाना…” 

… डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

बाबासाहेबांचे हे विचार मला खूप भावले होते. म्हणून मी माझ्या गत जीवनाकडे डोकाऊन पाहिले; तेव्हा मलाही वाटले की, फार नाही पण काहीतरी समाजासाठी जगलो आहे. म्हणून मी नोकरीवर लागल्यापासून ते आतापर्यंत कोणकोणत्या समाजकार्यात माझा हातभार लागला हे शब्दबद्ध करण्याचा मोह झाला. म्हणूनच मी ‘सामाजिक उतराई’ या मथळ्याखाली लिखाण करण्यास प्रवृत्त झालो.  आयुष्याच्या संध्याकाळी या कार्याच्या वाटचालीचा धावता आढावा घेण्यासाठी या काळातील दस्तऐवज धुंडाळत ते मी लिहून काढलं. 

आता लिहलं तर खरंच, पण ते कुणीतरी वाचलं पाहिजे ना ! म्हणून स्वस्तुतीचा आरोप अंगावर झेलत याबाबतीतची लेखमाला ‘सामाजिक उतराई’ या शीर्षकाखाली फेसबुक व माझ्याकडे असलेल्या २० व्हाट्सअॅपच्या गृपवर ७९ भागात टाकलेत.

माझ्या नोकरीनंतरचं चित्रपट असा आहे…

माझं बालपण यवतमाळपासून ८ किलोमिटर दूर असलेल्या चौधरा या खेडेगावात गेलं. चवथीपर्यंतचे शिक्षण गावाजवळील निळोणा या गावाला झाले. आता हे गाव धरणात गेल्याने अस्तित्वात नाही. त्यानंतर पाचवी पासूनचे पुढील शिक्षण यवतमाळ या शहराच्या ठिकाणी झाले. शिक्षण घेत असतांना मी उमरसरा, वंजारीनगर, तलावफैल, वसंतराव नाईक वसतिगृह आणि अमोलकचंद महाविद्यालय वसतिगृह इत्यादी निरनिराळ्या ठिकाणी राहत आलो. 

त्यावेळी आमच्या खेड्यात वीज पोहचली नसल्याने घरात विजेचे दिवे, पंखे अशा आतासारख्या काहीही सुविधा नव्हत्या. रॉकेलच्या मिणमिणत्या दिव्‍याच्या उजेडात अभ्यास करावे लागे. झोपायला गादी किंवा  पलंग नव्हते तर खालीच पोते किंवा आई-बाबाचे धोतर-लुगडे टाकून घरात अथवा शेणा-मातीने सारवलेल्या आंगणात उघडयावर झोपावे लागे. 

अशा रितीने मी अत्यंत हलाखीच्या आणि कठीण परिस्थितीमध्ये बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतलं. खरं म्हणजे माझं शिक्षण स्कॉलरशिपच्या भरोशावर झालं. त्यावेळी आम्ही म्हणायचो की, आमचे आई-बाबा हे जन्मदाते असले तरीही स्कॉलरशीप मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे खरे जीवनदाते बाबा होत. स्कॉलरशिपमध्ये कॉलेज आणि होस्टेलचा तेवढा खर्च फक्त  भागत  होता. मात्र बाकी चिल्लर कामासाठी जसे वह्या, पुस्तके, साबण तेल इत्यादी दैनंदीन उपयोगासाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी मी इतरही कामे जसे- कापसाच्या जिनात रात्रपाळीमध्ये काम करणे, गावात शेती-वाडीचे काम करणे, जंगलातून लाकडे आणून त्याचे बाजा बनवून शहरात विकायला नेणे, मोहाच्या टोया विकणे, विहिरीचे बांधकामावर काम करणे, घरावरचे कौले फिरविणे, गोळ्या-बिस्किटे-पाव, बर्फाचे गोळे, कुल्फ्या गावात विकणे, शहराच्या बाजारात आई-बाबासोबत भाजीपाला विकणे, टोपले डोक्यावर घेऊन खेडोपाडी पिकलेले आंबे फिरत विकणे,  गावात फिरून वरळी मटक्याचे आकडे घेऊन संध्याकाळी शहराच्या ठिकाणी अड्‍डयावर आणून देणे इत्यादी अनेक लहान-मोठे आणि जिकरीचे कामे करुन शिक्षणाला हातभार लावला.

१. नोकरीची सुरुवात 

माझे शालेय शिक्षण यवतमाळ येथील म्युनिसिपल हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण अमोलकचंद महाविद्यालयामध्ये झालं. बी.कॉम फायनलला असतांनाच महाराष्ट राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ लिपिकाच्या पदासाठी माझी लेखी परीक्षा झाली. त्या आधारे मला फेब्रूवारी १९७१ या महिन्यात नोकरीचा आदेश आला.

त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे नोकरीची पहिली नेमणूक मिळाली. त्यावेळी नोकरीवर हजर होण्यासाठी माझ्याकडे पैसे सुध्दा नव्हते. शेती असलेल्या माझे गावातील नातेवाईक तुळशीराम भगत यांनी सोन्याची आंगठी सावकाराकडे गहाण ठेवून मला ४० रुपये दिलेत. त्यावेळी हेच पैसे जायला व पगार होईपर्यंतचा खर्च भागेल इतकी त्याची किंमत होती.  

दि. २३.०२.१९७१ रोजी ब्रम्हपुरी  येथे मी नोकरीवर रुजू झालो. खऱ्या अर्थाने येथूनच माझं शैक्षणिक जीवन संपून आता नोकरीविषयक जीवन सुरु झालं. पुर्वी मी काटेरी वाटा तुडवीत जात होतो, आता मी मखमली वाटेने जाणार ही कल्पनाच मला उत्तेजित करून गेली होती. यानंतर मी कमावता झाल्याने वैभवशाली जीवन जगणार अशी उमेद निर्माण झाली होती. 

मला मिळणारा पगार हा २४० रूपयापासून सुरू झाला. इतका कमी पगार त्यावेळी असेल यावर कदाचित आता कुणाचा विश्वास बसणार नाही. पण त्यावेळी हा पगार कमी होता असं वाटत नव्हतं. भाड्याने खोली घेतल्यावर मी आईला घेऊन आलो. त्यावेळी खोलीचे भाडे वीस रुपये होते. दोन विजेचे बल्ब सोडले तर बाकी कुठलीही सुविधा नव्हती. शौचालयाला बाहेरच्या तलावाजवळ जावे लागत होते. बाथरूम पण तात्पुरती विटा रचून बांधलेली होती. दुसरीकडे यापेक्षा बौद्ध मोहल्ल्यात आणखी चांगली खोली मिळालीच नसती. इतर समाजाकडे चांगली घरे होती. पण ते आमच्या जातीच्या लोकांना देत नव्हते.

माझा पहिला पगार झाला. त्यावेळेसचा हा हृद्यस्पर्शी प्रसंग आहे हा ! मी पगार आईच्या हातात देतांना तिला म्हणालो, ‘आई, माझा पगार…! हे घे… ठेव तुझ्याकडे.’ माझ्या हातातून पैसे घेतांना तिच्या डोळ्यात अश्रू तराळलेले मी पाहिले. ते पाहून मीही भावूक झालो. तिला धरून खाली बसलो. मी तिच्या डोळ्यातले आसू पुसले. ‘आई, नको रडू… आत्ता आपले दिवसं पालटले.’ तिला गरीबीतले दिवसं आठवले. पोरगा शिकला, नोकरीला लागला अन् पगार घेऊन आला ! कसा सोन्यासारखा दिवस उगवला ! हे सारे तिला स्वप्नवत वाटले. आमच्या घराण्यात पहिल्यांदा असं घडलं; म्हणून तिचे डोळे पाणावले ! तिच्या व्याकुळलेल्या आयुष्याला नवीन झळाळी प्राप्त झाली. मी आईला घेऊन कापड्याच्या दुकानात गेलो. तिला लुगडं, चोळी व माझ्यासाठी कपडे घेतले. तेव्हापासून माझा पैजामा-शर्ट जाऊन पॅन्ट-मनिला आला. त्यावेळीर् माझ्या जीवनातलं परिवर्तन मला पहिल्यांदा जाणवलं.

ब्रम्हपुरीबद्दल सांगायचे म्हणजे या भागात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे इकडे भाताची शेती मोठ्या प्रमाणात असते. तांदुळाचा सुकाळ असतो. आमच्या घराजवळच गुजरी भरत होती. त्या बाजारात शेतकरी बैलगाडीने गोण्यात तांदूळ भरून विकायला आणीत. तांदूळ विकणाऱ्यांची रांगच रांग दिसायची. म्हणून येथे भात खाणारे जास्त लोक होते. भातासोबत बहुतेक  वांग्याची भाजी असायची… कारण वांगे त्यावेळी पाच पैशाला तीन किलो म्हणजे इतके स्वस्त मिळत होते. आमच्या वऱ्हाडातील जेवणात प्रामुख्याने ज्वारीची भाकर होती. तांदूळ आणि गहू महाग मिळत असल्याने सणासुदीच्या दिवसालाचभात आणि पोळ्या खायला मिळत होते.  आणखी या बाजारात मासे पण भरपूर विकायला येत होते. कारण जवळूनच वैनगंगा नदी वाहत होती. झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात प्रामुख्याने भाताची शेती केल्या जात होती. आमच्या वऱ्हाडात या भात शेतीला धानाची शेती म्हणत. ही भात शेती म्हणजे चारही बाजूने बांध घातलेली असायची. नांगरणी केल्यावर व पावासाळ्यात पाणी साचल्यावर चिखलणी करून भाताची लावणी केली जात होती. भात निघाल्यावर शेतात पडलेले धानाचे दाणे टिपायला चिमण्याच्या आकाराचे, वेगळ्याच जातीचे, काळपट रंगाचे पक्षांचा थवा धानाच्या शेतात उतरत. मी त्यांचे नाव विसरलो. पण हे पक्षी विजेच्या तारांवर एका ओळीने बसलेले पाहून खूप छान दृश्य दिसत होते. ते खाली शेतात उतरल्यावर त्यांना पकडून व भाजून बाजारात विकायला आणत. आमच्या इकडे या पक्ष्यांसारखे बाटरं पक्षी मिळत. खायला पण तसेच लागत होते. टरबूजे, खरबुजे पण मोठ्या प्रमाणात विकायला येत असे. जागोजागी तलाव असल्याने शिंगाडेचे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असे. येथे वऱ्हाडासारखे काळे दगड आणि रेती दिसले नाहीत तर ते जांभळ्या रंगाचे होते. कच्चे रोड असल्याने गागरा-माती खूप उडत होती. म्हणूनच माझा लहान भाऊ अजय हा ब्रम्हपुरीला गंमतीने ‘गागारापुरी’ म्हणत होता.

अजयने यवतमाळ येथे अकरावी (त्यावेळची हायर मॅट्रिक) परीक्षा पास केल्यावर त्याला ब्रम्हपुरी येथे नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात विज्ञान शाखेत टाकले. त्याला वैद्यकीय शिक्षणाकडे पाठवायचे, असे त्याचवेळी आम्ही ठरविले होते. माझा मोठा भाऊ शामराव याची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्याने सुद्धा माझ्या शिक्षणाला हातभार लावला होता. म्हणून त्याला मदत करणे हे माझं कर्त्यव्यच होतं. गावात सहा एकर कोरडवाहू शेती होती. आणखी चार एकर शेती त्याने बरबडा येथे घेतली होती. ही शेती घेण्यासाठी त्याने शेतीपयोगी साधने विकले होते. म्हणून त्याला ही शेती भाड्या-भुसाऱ्याने वाहावी लागत होती. शेतीत काहीही आमदानी येत नव्हती. म्हणून शेती दुरुस्त व्हावी याकरिता त्यालाही नोकरीच्या सुरुवातीला पैसे पाठवून मदत करीत होतो. माझ्यासोबत अजय शिवाय मोठ्या भावाचा मुलगा शुद्धोधन हा सुध्दा शिकायला होता. मला मिळाणाऱ्या पगारात हा सगळा खर्च भागविणे जड जात होते.  

माझ्या नोकरीच्या खात्यात त्यावेळी ‘महाराष्ट्र राज्य मंडळ  कर्मचारी संघ’ नावाची कर्मचार्‍यांची संघटना होती. ही संघटना कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न होती. कामगार संघटनेमध्ये काम करणे म्हणजे समाजाचेच कार्य करीत असल्याची भावना वाटत होती. जणुकाही आपण समाजाचे ऋन फेडीत आहोत असे समाधान त्यावेळी मिळायचे. माझ्यापेक्षा सिनियर असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी समजणारे कर्मचारी सुध्दा याच युनियनचे सभासद बनून काम करायचे. खरं म्हणजे त्यावेळी मागासवर्गीय संघटना नव्हती. मला युनियनमध्ये कोषाध्यक्ष हे पद नोकरीला लागल्या लागल्या दिले गेले होते. त्यानंतर याच संघटनेमध्ये निरनिराळ्या बदलीच्या ठिकाणी शाखाअध्यक्ष अशा महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मला मिळत गेली.  आमच्या संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष कॉ. ए.बी.बर्धन होते, जे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नावाजलेले नेते होते. नंतरच्या काळात ते कम्युनिस्ट पक्षाचे महासचीव झालेत. त्यांचे सोबत मिटिंगमध्ये मांडीला मांडी लावून बसायची संधी मिळाली होती, याचा मला अभिमान वाटतो.

आणखी एक गोष्ट सांगतो. माझ्या खोलीशेजारी  रामटेके नावाचे  पोष्टातील बाबू (लिपिक) राहत होते. माझ्यासारखेच ते पण अविवाहित ! त्याच्याकडे त्याची आई व दोन लहान भाऊ राहत. त्याचा लहान भाऊ, गणेशला चांगले मार्क्स पडल्याने त्याला एमबीबीएसला प्रवेश मिळणार होता. पण प्रवेश घेण्यासाठी तेवढे पैसे त्याच्याकडे नव्हते. म्हणून ते विवंचनेत पडले होते. त्यावेळी मी युनियनचा कोषाध्यक्ष असल्याने युनियनचे पैसे पोष्टातल्या माझ्या खात्यात जमा करून ठेवत होतो. ही गोष्ट रामटेकेला माहिती होती. म्हणून त्याने मला पैसे मागितले. मी द्यायला तयार झालो, पण कुणाला न सांगण्याच्या अटीवर. त्यांनी भरोसा देण्यासाठी हातातली घड्याळ व सायकल गहाण ठेवण्यास तयारी दाखवली. पण मी ते न घेता त्याला तीनशे रुपये दिले. ते पैसे नंतर त्यांनी इमानदारीने परत केले, ही गोष्ट निराळी ! पण त्याच्या भावाच्या वैद्यकीय शिक्षणात माझाही हातभार लागला यात मला मोठा आंनद वाटला होता.   

ह्यावेळी ब्रम्हपूरीला असतांना विधान सभेच्या निवडणूकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अनेक गटाचे उमेदवार उभे राहणार  होते. त्यांच्यात एकी निर्माण व्हावी व गटबाजीला विरोध करावे  म्हणून  ‘रिपब्लिकन जनतेस हाक’ असे शीर्षक असलेले  पत्रक तेथील स्थानिक कार्यकर्ते भिवाजी कोसे, आत्माराम रामटेके, मनोहरराव चहांदे, बालाजी मेश्राम, देवराव गजभिये, वसंत फुले, केवळरामजी क-हाडे, लक्ष्मण रामटेके यांच्या  इच्छेनूसार मी लिहून दिले होते. हे पत्रक अजूनही माझ्या संग्रहात आहे.

तेथील सामाजिक कार्यक्रमाला वर्गणी देणे, आंबेडकर जयंती सारख्या कार्यक्रमाला हजेरी लावणे व मिरवणुकीत सामील होणे, बस… इतपत माझा सामाजिक कार्यात सहभाग होता. 

आमचे घरमालक आत्माराम  रामटेके यांच्याकडे बौद्ध भिख्कू भदंत धम्मसुंदरजी येत असत. त्यांचेशी माझा चांगला परिचय झाला होता. त्यांना मी भोजनदानासोबतच आर्थिक दान पण देत होतो. बौद्ध धम्माच्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करून धम्माबाबतचे ज्ञान ग्रहण करीत होतो. त्यांच्या बाबतीत एक आठवण सांगतो. त्यावेळच्या शिरस्त्याप्रमाणे माझं लग्न रात्रीला लागलं होतं. ते माझ्या लग्नाला आवर्जून आले होते. ब्रम्हपुरीपासून (चंद्रपूर जिल्हा) कळंबपर्यंत  (यवतमाळ जिल्हा) ते एसटी बसने आले होते. तेथून तेवढ्या अंधाऱ्या रात्री, कच्च्या रस्त्याने रोडपासून सहा किलोमीटर दूर असलेल्या सुकळी ह्या दुर्गम भागातील खेड्यापर्यंत लॅाऊडस्पिकरच्या आवाजाची चाहूल घेत आणि पायी चालत माझ्या लग्न समारंभाला आले होते.  इतका त्रास त्यांनी घेतला होता. मला तर कमालच वाटली होती. खरं म्हणजे इतके धाडस करायला दिव्यच लागते.

ब्रम्हपूरीला आमच्या सबडिव्हिजन कार्यालयाचे प्रमुख तुराबअली साहेब मुस्लिम होते. ते सहाय्यक अभियंता होते. आमच्या कार्यालयातर्फे दरवर्षी   गणपती उत्सव साजरा करण्याची प्रथा होती. या उत्सवाच्या कार्यकारणीत मला सचीव पदावर नियुक्त करण्यात आले होते. आमच्या विद्यूत मंडळाच्या ग्राहकांकडून वर्गणी जमा करण्यासाठी आम्ही आमच्या अखत्यारीत असलेल्या वडसा, कुरखेडा, आरमोरी, नागभीड सारख्या सेंटर ऑफिसला फिरायचो. वर्गणी भरपूर जमा व्हायची. या उत्सवात कव्वालीचा व प्रसिध्द गायकांचे कार्यक्रम आयोजीत करण्यात येत होते. कार्यक्रमात नावाजलेल्या कव्वालीशिवाय प्रसिध्द मराठी गायक कृष्णा शिंदे यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्याकाळात त्यांनी गायलेले भीम-बुध्द गीते बरीच गाजली होती. त्यावेळी मी उत्सव मंडळाचा सचिव म्हणून त्यांना लिखीत पत्र दिले होते. त्यात लिहिले होते की, “सदर उत्सव मंडळामध्ये बौध्द धर्मीय कर्मचार्‍यांचा सुध्दा सहभाग असल्यामूळे हिंदू धर्मीय व इतर  गीतांसोबतच आपण भीम-बुध्द गिते पण म्हणावेत.”  परंतू त्यांनी शेवटपर्यंत एकही भीम-बुध्द गीत म्हटले नाही. कार्यक्रम संपल्यावर या बाबतीत मी त्यांना विचारले. “मी सचिव या नात्याने तुम्हाला पत्र देवून सुध्दा तुम्ही एकही भीम-बुध्द गित म्हटले नाही.” तेव्हा त्यांनी सांगितले की, “त्यामूळे वाद निर्माण होतात म्हणून मी म्हटले नाही.”  त्यावेळेस मीच  चुकलो होतो असे वाटले. कारण ते आपले स्थळ नव्हते तर ते हिंदू धर्मियांचे होते. गणपती उत्सवाच्या माध्यमातून हिंदूत्ववादी चळवळ राबवितात व त्यात बिगर हिंदूधर्मिय लोकांचा सहभाग करून घेतात हे त्यावेळी प्रथमत: माझ्या लक्षात आले. त्यानंतर मात्र मी अशा कार्यक्रमात कधिच भाग घेतला नाही.

२. दिग्रस येथे बदली आणि बढती

ब्रम्हपुरी हे ठिकाण माझ्या गावापासून दूर येत होतं म्हणून मी बदलीसाठी अर्ज दिला होता. त्यानुसार नोव्हेंबर १९७३ मध्ये दिग्रस (यवतमाळ जिल्हा) येथे बदली झाली. मी खात्याची पहिली परीक्षा पास केल्याने मला ऑक्टोबर १९७४ मध्ये उच्च लिपिक या पदावर बढती होऊन येथेच पदस्थापना मिळाली होती. 

मी दिग्रस येथे असतानाच २४ मे १९७५ रोजी माझे लग्न कुसुम भगत हिच्याशी झाले. ती पण माझ्या प्रमाणेच खेड्यातच राहणारी होती. सुकळी (ता.कळंब जि.यवतमाळ) हे तिचे गाव.

त्याच दरम्यान अजय  याला एमबीबीएसला नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्याचं शिक्षण माझ्यावर पूर्णपणे अवलंबून होतं.  ब्रम्हपुरीनंतर तो एक वर्ष यवतमाळला अमोलकचंद कॉलेजमध्ये शिकला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांबाबत कसा जातीभेद होतो याचे उदाहरण म्हणजे त्याला प्रॅक्टिकल परीक्षेत पडलेले मार्क्स दर्शविते. त्याला थिअरीमध्ये चांगले मार्क्स पडलेत. प्रॅक्टिकलमध्ये मात्र त्यामानाने कमी मार्क्स  देण्यात आले होते. याचा अर्थ जात पाहून प्रॅक्टिकलमध्ये मुद्दाम कमी मार्क्स दिले असावेत हे उघड झाले होते. तरीही त्याला एकूण मार्काच्या आधारावर एमबीबीएसला प्रवेश मिळाला होता.

दिग्रसला आल्यावर सुध्दा मी कामगार संघटनेत महत्वाच्या पदावर काम करीत होतो. त्यावेळी दि. २५.२.१९७५ रोजी संघटनेच्या आमसभेत  माझी शाखेचा अध्यक्ष म्हणून निवड झाली होती तर सचिव म्हणून ए.डी. नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली होती.  कम्युनिस्ट प्रणित या कामगार संघटनेत आमच्यासारखे खालच्या जातीतील  पण नोकरीत मोक्याच्या पदावर काम करणारे कर्मचारी हे स्थानिक  पातळीवरील कार्यकारिणीत महत्वाचे पदे देत असल्याचे,  हे या संघटनेचे वैशिष्ट्य माझ्या पाहण्यात आले होते. आंबेडकरी चळवळीचे लाभार्थी असलेल्या कामगारांवर नोकरीच्या सुरवातीपासून  अशा प्रकारे साम्यवादी  विचारसरणी बिंबवण्याचे काम ही संघटना करीत होती, हे त्यावेळी आमच्या लक्षात येत नव्हते. हे लक्षात यायला बराच काळ जावा लागला. नंतरच्या काळात  काहीजण बाहेर पडलेत तर काहीजण घट्टपणे याच संघटेला चिकटून राहिलेत. याचा उलगडा मी पुढे केला आहे.

३. पुसद  येथे बदली

डिसेंबर १९७५  मध्ये विद्युत मंडळाने प्रशासकीय कारणास्तव माझी बदली उपविभागीय कार्यालय पुसद  (यवतमाळ जिल्हा) येथे केली. वास्तविक अवघ्या दोन वर्षात बदली करण्याचे काहीच कारण नव्हते. कारण सहसा तीन वर्षे तरी बदली होत नसल्याचे धोरण होते. कदाचित जातीवाद भोवला असेल असे अनुमान काढता येते. पुसद येथेही दि. २९.०४.१९७६ रोजी झालेल्या संघटनेच्या मिटींगमध्ये मला शाखा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते.

४. आर्वी येथे बदली

ह्यावेळी राजकारणाच्या उलथापालथीमध्ये इंदिरा गांधी ह्या प्रधानमंत्री असतांना देशात  आणीबाणी लागू झाली होती. या आणीबाणीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने समर्थन दिले होते. आमची युनियन या पक्षाशी संलग्न असल्याने आमचाही या आणीबाणीला पाठींबा होता. त्यावेळी शिस्तीचे एक पर्व सुरु झाले असे म्हणत. परंतु या आणीबाणीत आम्हीही भरडल्या गेलो होतो. कारण पुसद येथे येऊन मला नुकतेच सहा महिनेही झाले नव्हते, तरीही मे १९७६  मध्ये ‘सामुहिक बदल्या’ अंतर्गत आर्वी (वर्धा जिल्हा) येथे माझी सुद्धा बदली झाली होती. सहा महिन्यात कशी काय बदली झाली हे सूद्धा न उमगणारे कोडेच होते. पत्नीचे बाळंतपण अगदी जवळ आले होते. तरीही ‘नोकरी होय’, जावे तर लागतच होते. असे म्हणतात की, “पावसाने झोडपले आणि राजाने मारले त्याची दाद कुणाला मागावी?” अशी नोकरदार वर्गाची गत होती, मी ३१.५.१९७६ ला आर्वीच्या कार्यालयात कामावर रुजू झालो आणि दुस-या दिवशी  १ जून १९७६ रोजी आर्वी येथेच प्रज्ञाशीलचा जन्म झाला. 

यवतमाळ  येथे बदली

आर्वी येथून लगेच सप्टेंबर १९७६ मध्ये म्हणजे तीन महिन्यांनी स्वतःच्या विनंतीनुसार यवतमाळ  येथे दुसऱ्या कर्मचाऱ्यासोबत आपसी बदली घेतली. गावाजवळ आलो म्हणून मोठा आनंद झाला होता. यवतमाळ येथे पण कामगार संघटनेच्या कामात हिरीरीने भाग घेऊन मी सक्रियपणे काम करीत होतो. ही संघटना इतर संघटनेपेक्षा लढाऊ असल्याने सतत आंदोलन, मिटिंग, शिबीर, अधिविशेन असे काही ना काही उपक्रम सुरु राहत असत. पगार, बोनस व इतर सुविधा मिळवून घेण्यासाठी आंदोलने जास्त होत. त्यावेळी संपावर जाण्याची सारखी पाळी येत होती. संपकाळात पगार कापत असल्याने कामगार वर्ग आर्थिक अडचणीत येत जरी असला तरी  पगार वाढल्याने दीर्घकाळ फायदा पण होत होता. त्यावेळी कामगार संघटनेची पतपेढी पण स्थापन झाली होती. पतपेढीच्या  कार्यकारीणीत सदस्य म्हणून घेतल्याने मला त्यात पण काम करण्याची संधी मिळाली होती. 

ह्यावेळेस तुळशीराम दादाच्या मरणाची बातमी ऐकून धक्काच बसला. तुळशीराम भगत हा माझ्या मोठ्या आईचा म्हणजे माझ्या आईच्या मोठ्या बहिणीचा मुलगा होता. तो पण गावातच राहत होता. आमच्या गरीब अवस्थेत तो मदत करायचा. मला नोकरी लागली; तेव्हाही सोन्याची अंगठी गहाण ठेऊन मला चाळीस रुपये दिले होते. ही त्याची आठवण माझ्या मनावर चांगलीच कोरली होती. तो सुरवातीच्या काळात खूप चांगला होता. इतकं की लोक त्याला ‘साधू’ म्हणत. गावातल्या भजन मंडळात तो टाळ वाजवून इतरांसोबत साथ देत होता. कुठलंही व्यसन त्याला नव्हतं. पण गावगाड्यातील दारुड्यांच्या संपर्कामुळे त्याला दारूचे व्यसन लागले आणि शेवटी दारुतच दि. २२.०६.१९७७ रोजी  मरण पावला. त्याच्या बाबतीत असं घडावं याचं मला खुपच दु;ख झालं. 

यवतमाळला असतानाच १२ जानेवारी १९७८ रोजी संघशील याचा जन्म झाला.  आमचं हे दुसरं अपत्य होतं.

६. श्रीवर्धन येथे बढतीवर बदली  

मला सहाय्यक लेखापाल या पदावर बढती मिळून एप्रिल १९७८ मध्ये श्रीवर्धन जिल्हा कुलाबा (सध्या रायगड जिल्हा) येथे नेमणूक झाली.  

प्रशासनाच्या वरच्या स्तरावर ब्राम्हणवादी मंडळी विराजमान असल्याने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना मुद्दामच त्रास देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या कोकणासारख्या दूरवरच्या ठिकाणी पाठवित होते. तरीही मी मुलांबाळांना सोबत घेऊन श्रीवर्धन येथे कामावर रुजू झालो. कार्यालयातील कर्मचारी इतक्या लांबून तुम्ही कसे काय आलात म्हणून आश्चर्य व्यक्त करीत होते. कारण त्यांना माहित होतं की, कोकणाच्या बाहेरून कोणीही येथे  यायला पाहत नव्हते. सुरुवातीच्या नोकरीला सूद्धा येथे कोणी येत नव्हते. नेमणूकांचे  आलेले आदेश सहसा रद्द होत असत. क्वचितच एखादा हजर व्हायचा.

मला यवतमाळच्या कार्यालयाने सोडल्यावर मी एकटाच श्रीवर्धनला कामावर हजर होण्यासाठी गेलो. तेथे काही दिवस लॉजवर राहून खोली बघितली.

येथे जातीव्यवस्थेत चांगलं  घर मिळवणं कठीण झालं होतं.  कारण एकतर बौद्ध वस्तीत  आर्थिक दुरवस्थामूळे घरं  उपलब्ध होत नव्हते आणि दुसरा समाज खरी जात सांगितल्याने घर देत नव्हते.   इतर ठिकाणापेक्षा कोकणात भयानक जातीभेद  असल्याचे मी ऐकले होते, ते खरंच होतं.   त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता.   तसे घर शोधतांना इतरही ठिकाणी अशा  अडचणी येतच  होत्या. पण येथे मात्र घर मिळविणे मोठे जिकरीचं  काम झालं  होतं. श्रीवर्धनच्या पोष्टात पोस्टमास्तर म्हणून उमरखेड जि. यवतमाळ येथील नोकरीला असलेले मुनेश्वर यांनी मला जात लपवून घर घ्या असे सुचविले. त्यामुळे मला येथे पहिल्यांदाच  जात लपवूनच  घर मिळवावे लागले होते. माझ्या घरात कोणत्याही देवादिकांचे प्रतिमा दिसत नसल्याने घरी येणाऱ्यांना अचंबा वाटत होता.

खरं सांगायचं म्हणजे मी कुटुंबाला आणि घरघूती सामान घेऊन येतांना प्रवासात आणि त्याआधी घर शोधतांना  जो अतोनात त्रास झाला होता, त्यामुळे मी पार खचून गेलो होतो. यवतमाळवरून सरळ श्रीवर्धनला जायची सोय नव्हती. श्रीवर्धनला जायचं म्हणजे मुंबईहून जावे लागत होते. सायकल, टेबल, लाकडाची बाज असं काही सामान माझा मोठा भाऊ शामराव जो यवतमाळ जवळील चौधरा या गावाला राहत होता, त्याला देऊन उरलेलं सामान, आई, दोन मुलं व पत्नीला घेऊन एसटी बसने सकाळी निघून जळगावपर्यंत दुपारी आलो. हा प्रवास जवळपास साडे तीनशे किलोमीटरचा होता. तेथून आणखी चारशे किलोमीटर पुढे मुंबईला पुढे जायचं होतं. हा प्रवास जवळपास बारा तासाचा होता. तेथूनही श्रीवर्धन त्यावेळी दहा-बारा तास दूर असावं. इतका दूरचा प्रवास आणि तेही गाड्या बदलवत कुटुंबांला व सामान घेऊन जाणे मोठे कठीण वाटत होतं. ती एकच बस रात्रीला जळगाववरून मुंबईला जाणारी होती. तोपर्यंत वाट पाहणे, एसटीत सामान चढविणे-उतरविणे, उन्हाळ्याचे गरमीचे दिवसं, मुलांची तगमग, यामुळे त्रासून गेलो होतो. असं वाटत होतं, की श्रीवर्धनला पुढे जाऊच नये. नोकरी सोडून येथूनच यवतमाळला परत जावे की काय असा विचार मनात आला. आमच्याच वाटेला असं जीवन का भोगायला येतं? मी अक्षरशः रडकुंडीला आलो होतो. पण नोकरी सोडून करणार काय? खाणार काय? राहणार कुठे? असेही प्रश्न डोळ्यासमोर उभे झाले होते. त्यामुळे श्रीवर्धनला जाणे भागच होतं. रात्रीला बस आली. भयानक गर्दी. पाय ठेवायला जागा नव्हती. संघशील दुधपीता म्हणजे पाचक महिन्याचा होता. प्रज्ञाशील दोन वर्षाचा होता. सामान बसच्या टपावर चढवून त्या गर्दीत आम्ही बसलो. गाडीत भयानक गरमी होत होती. संघशीलची मान आखडली होती. त्यामुळे तो खुपच रडत होता. गाडीतील एका बाईने त्याची मान खोबऱ्याच्या तेलाने चुरून दिल्याने, त्याला बरे वाटल्याने तो झोपला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मुंबईच्या बॉम्बे सेंट्रलला आम्ही पोहचलो. तेथून श्रीवर्धनला जाणारी रात्रीची बस होती. गाडीचं रिझर्वेशन नाही. त्यामुळे गाडीच्या शेवटच्या बाकावर कशीतरी जागा मिळाली. शेवटच्या बाकावर बसलं की काय त्रास होतो हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच आमचे होत होते. सकाळी आम्ही श्रीवर्धनला पोहोचलो. इतके हाल या प्रवासात झाले होते.

कार्यालयाचे कामकाज सुरु झाल्यावरची ही गोष्ट आहे. ती चांगली गंमतीशीर व आठवणीत आहे, म्हणून  सांगतो. मला एकदा ऑफिसच्या कामाकरिता मुंबईतील कल्याण येथे जावे लागले होते. तेथून येतांना रात्रीला आठ्क वाजता बस इंदापूर येथे आली होती. बसचे कंडक्टर आणि ड्रायव्हर जेवायला खाली उतरले होते. मला पण जेवायचे होते. मी त्यांना तसे सांगितले पण होते. त्यांच्या जेवणाचे ताट लवकर आले व माझे ताट उशिरा आल्याने मला त्यांच्यापेक्षा जेवायला थोडा उशीर झाला. ते जेवून बाहेर पडल्याचे मी पाहिले. मला वाटले ते पानपट्टीवर पान खायला थांबतील. मी पैसे देऊन बाहेर पडणार तर गाडीची घंटी आणि लगोलग गाडी सुरु झाल्याचा आवाज आला. मी धावतच गेलो. पण गाडी निघून गेली होती. मी तेथील व्यवस्थापकाला ही परिस्थिती सांगितली. माझे सामान असल्याने ती गाडी पकडणे आवश्यक होते. म्हणून त्यांनी दुसऱ्या गाडीने माणगावपर्यंत जायला सांगितले. कारण माझी सुटलेली गाडी माणगाववरून वळून ती श्रीवर्धनला जाणार होती. मी दुसऱ्या गाडीने लगेच गेलो. पण ती गाडी सापडली नाही. माणगावला उतरून मी गाड्यांचा टाईम टेबल बघितला. त्यात आणखी एक शेवटची येणारी गाडी होती. त्या गाडीची वाट पाहत बसलो. ती गाडी जेव्हा आली; तेव्हा हात दाखवूनही ती गाडी थांबली नाही. कदाचित आधीच खूप गर्दी असल्याने कंडक्टरने थांबवली नसावी. मग श्रीवर्धनला जाणारी गाडीच नव्हती. ‘जेवणामुळे तुला ही शिक्षा झाली’ असं मनात म्हणून स्वत:लाच दोष देत होतो. मी एकटाच बस स्टॅापवर बसलेलो पाहून पोलिसांनी हटकले. त्याला हकीकत सांगितली. तो म्हणाला येथे लॉज नाही. पण एक माजी सैनिकांचे होस्टेल आहे. तेथे झोपण्याची व्यवस्था होते का ते जाऊन पहा. मी तेथे गेलो. कुत्र्यांचा आवाज ऐकून चौकीदार आला. त्याने माझी विचारपूस केली. आधी तो नाही म्हणाला. पण तोही श्रीवर्धनचा निघाल्याने व माझी अवस्था पाहून मला झोपायला कॉट दिली. सकाळच्या बसने मी श्रीवर्धनला आलो. माझे सामान काही मिळाले नाही. पण मला चांगलीच अद्दल घडली होती. ‘आतातरी जेवणाच्या फंदात पडत जावू नको’ असे म्हणून कानाला खडा लावला होता. अशी ती त्यावेळी झालेली गंमत पाहून आताही आठवले की हसू येते.

संघशीलला तेथील दमट वातावरण सहन झालं नाही. त्यामुळे त्याला थोडीही सर्दी झाली की त्याला दमा होत होता. शेजारी एक पोलीस इन्स्पेक्टरचे कुटुंब राहत होतं. संघशील त्यावेळी धट्टाकट्टा व गुबगुबीत दिसत होता. त्या बाईला संघशील खुपच आवडत होता. आमची परिस्थिती त्यावेळी बेताचीच होती. तिने त्याला थंडीसाठी स्वेटर दिलं होतं. तसे माझी दोन्हीही मुले पाहायला सुंदर होते. आमच्या शेजारी सुतार समाजाचं कुटुंब राहत होतं. त्यांचं आडनाव पण सुतारच होतं. तिला प्रज्ञाशीलच्या वयाऐवढी मुलगी होती. तिच्याकडे प्रज्ञाशील जायचा; तेव्हा ती बाई तिच्या मुलीसोबत याला पण मच्छी खाऊ घालत होती. असेही काही प्रेमळ लोक भेटतात.

संघशीलला खूप जपावे लागत होते. एकदा त्याला इतका दमा झाला होता की, त्याची छाती सारखी उसळत होती. डॉ. जोशीच्या दवाखान्यात त्याला भरती केले होते. त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. या तीन दिवसाच्या काळात त्याच्या मांडीला दहा इंजेक्शन टोचले होते. इंजेक्शन टोचायला जागा शिल्लक दिसत नव्हती. तरी तो डॉक्टर त्याला इंजेक्शन टोचतच होता. मला मुलाची तळमळ पाहावल्या जात नव्हती. आणखी दुसरा एक देशपांडे नावाचा डॉक्टर होता. तो इंजेक्शन देत नव्हता, तर औषध तयार करून देत होता. पण त्या औषधीने लगेच आराम पडत नव्हता. म्हणून डॉ. जोशीच्या दवाखान्यात जावे लागत होते. ते दोघेही ब्राह्मण होते. पण दोघांचा वैद्यकीयदृष्ट्या तत्व अलग अलग होते. एक इंजेक्शन टोचायचा तर दुसऱ्याचा इंजेक्शनला विरोध होता. सरकारी दवाखाना होता. पण त्यांच्या वेळा ठरलेल्या होत्या व गोरगरीब लोकांची खूप गर्दी पण राहत होती. श्रीवर्धनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे जंत फार पडत असत. म्हणून दवाखान्यात कुणीही गेले की, पहिल्यांदा त्याला जंताचे औषध पाजायला देत. दुसऱ्या दिवशी संडासमधून खरेच मोठमोठे आकाराचे जंत पडत होते. तेथे नळाच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे विहिरीचे पाणी प्यावे लागत होते. त्या पाण्यातच जंताचे जंतू राहत असावेत. 

एकदा माझा लहान भाऊ, अजय उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रीवर्धनला आला होता. तो नागपूरला  मेडिकल कॉलेजच्या होस्टेलवर राहत असल्याने त्याला पंख्याची सवय होती. पण आमच्याकडे पंखा नव्हता. म्हणून तो रात्रीला सुध्दा दरवाजा उघडा ठेऊन दरवाज्याजवळ झोपायचा. अशी त्याची गंमत यायची. सासा-सुनेचं पटत नसल्याने आई माझ्याकडे रहायला नाराज होती. म्हणून तो आईला गावाला घेऊन गेला. मला नोकरी लागल्यापासून आई माझ्याकडे राहत आली. आता ती माझ्यापासून दुरावणार म्हणून खूप वाईट वाटत होतं. बाबा त्यावेळी एकटाच यवतमाळला राहत होता. तो चकल्या काढून विकायचा धंदा करीत होता. आई पण तेथेच राहून अमोलकचंद कॉलेजच्या खान सरांकडे धुणी-भांड्याचे काम करीत होती. मी नोकरी करूनही आईवर अशी पाळी का यावी, असे काहीजण मला बोलले होते. ते मला खूप जिव्हारी लागले होते. खरंच होतं ते ! ह्या काळा धब्ब्याचा ओरखडा माझ्या जीवनात कायमचा कोरून गेला होता.   

कोकणात देवा-धर्माचे फार प्रस्थ असल्याचे दिसून आले. येथे गणपती या देवाला हिंदू लोक खुपच मानतात. मुंबईला कामाधंद्यासाठी राहणारे लोक गणपतीला हमखास कोकणातील आपल्या मूळगावाला येत असतात. अशा लोकांना ‘चाकरमानी’ म्हणतात. त्यामुळे या मोसमात एसटी बसेसला खूप गर्दी असायची. आता खाजगी बसेसची सुळसुळाट झाली असून कोकण रेल्वे पण धावत आहेत. तरीही गर्दी आहे तेवढीच आहे. कोकणातील दऱ्या-खोऱ्या, डोंगर व झाडी पाहून कधीकाळी रेल्वे येईल असं वाटत नव्हतं. पण जनता दलाच्या राजवटीत मधु दंडवते मंत्री झालेत आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने रेल्वेचे काम सुरु झालं. कोकणात घरोघरी गणपती मांडतात. जे गणपती बसवत नव्हते, त्यांच्या दरवाज्यावर गणपतीची मुर्ती आणून ठेवत, असे ऐकले  होते. पण आम्ही आमच्या घरी गणपती बसवला नसतांना तसा काही अनुभव  आला नाही.  श्रीकृष्ण जन्माष्ठमीला रस्त्यावर दहीहांडी फोडण्याची प्रथा आहे.  त्यांचे हे पथक ‘गोविंदा गोविंदा’  असे म्हणून नाचत नाचत घरासमोरून जातात; तेव्हा त्यांच्या अंगावर चरवीभर पाणी ओतावे लागत होते. माझा मोठा मुलगा प्रज्ञाशील त्यावेळी तिनक वर्षाचा होता. तोपण गोविंदा गोविंदा म्हणत नाचायचा. त्याला मस्त मजा येत होती.

माझ्या कार्यालयात मी जेथे बसत होतो;  त्याच्या पाठीमागे गणपतीचा फोटो टांगलेला होता. माझा स्टाफ ऑफिसमध्ये आल्या-आल्या गणपतीला हात जोडण्यासाठी माझ्या पाठीमागे जात; तेव्हा मला फार अवघडल्यासारखे होत होते. शेवटी त्यांना मी सांगितले की, हा फोटो दुसरीकडे कुठेतरी लावा. तेव्हा कुठे त्यांनी तो फोटो तेथून हलवला. खरं म्हणजे देवा-देवतांची फोटो कार्यालयात लावणे चुकीचे होते. पण तसे सांगणे म्हणजे त्यांच्या धार्मिक  भावना दुखावल्यासारखे होत होते. मला जरी पटत नसलं तरी मी तसा आक्षेप घेऊ शकलो नाही. कारण इतक्या दुरवरच्या ठिकाणी येऊन  कोणीही मला समर्थन दिले नसते. मी एकटा पडलो असतो.  या गोष्टीची जाणीव झाल्याने  मी तशी काही हिंमत करू शकलो नाही. 

या सबडिविजन कार्यालयात मला एक बदल जाणवला. येथे आमच्या विदर्भातील कार्यालयासारखे कर्मचाऱ्यावर असलेला कामाचा बोजा तेवढा जाणवला नाही. येथे कृषी ग्राहकांची संख्या इतर ग्राहकांच्या मानाने कमी होती. विदर्भात मात्र कृषी ग्राहकांची संख्या जास्त असायची. विद्युत बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी बरीच मेहनत घ्यावी लागत होती. येथे त्यामानाने थकबाकी कमी राहत होती. थकबाकी असलीच तरी जास्तीत जास्त एक वर्षाच्या आतील राहत होती. कोर्ट कारवाईच्या केसेस पण नसल्यासारखेच होत्या. कामकाज अगदी सुटसुटीत राहत असल्याने येथे लेखा तपासणीचे आक्षेप पण फारच कमी राहत होते. दर महिन्याचे महसुलाचे अहवाल आमचे सबडिविजन कार्यालय डिविजनमधील इतर कार्यालयापेक्षा लवकर पाठवून पहिलं बक्षीस मिळवीत असे. त्यामुळे माझ्या कामाची वाहवा डिविजन आणि सर्कल कार्यालयात होत होती.

ह्या ठिकाणी विदर्भातील काही लोक राहत असत. त्यात एक टेलर होता व दुसरा मुनेश्वर नावाचे कुटुंब होते. मुनेश्वर हे पोस्टमास्तर होते. विदर्भासारख्या दूरवरच्या ठिकाणाहून येथे येणे म्हणजे  परदेशात आल्यासारखे वाटत असे. म्हणून त्यांना नवीन आलेल्या लोकांबद्दल फार आस्था आणि आपुलकी वाटत होती.  

येथे आल्यावर आमच्या विदर्भातील विद्युत मंडळ  कर्मचारी संघाची सहाय्यक संघटना असलेली  नोकर संघ अस्तित्वात असल्याचे दिसली नाही. नोकर संघाला मानणारे काही कार्यकर्ते नावापुरतेच होते. पण संघटनेची शाखा कार्यकारिणी मात्र बनलेली नव्हती. मी येथे येण्यापुर्वीच विदर्भातून कर्मचारी संघटनेचा कार्यकर्ता येथे आल्याचा निरोप येवून पोहचला होता. ह्या ठिकाणी भारतीय मजदूर संघाला संलग्न असलेली ‘कामगार संघ’ आणि काँग्रेसची ‘इंटुक संघटना’च्या शाखा कार्यरत होत्या. कामगार संघ ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत ब्राम्हणवादी विचारसरणी असलेली संघटना होती. कोल्हापूर येथील नोकर संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते श्याम कोरोचे यांना निमंत्रित करून लाल बावट्याची नोकर संघाची  शाखा स्थापन केली. अर्थात त्यावेळी शाखेचे अध्यक्षपद मलाच देण्यात आले होते. कॉ. दत्ताजी देशमुख हे लाल बावट्याचे नेते होते. विदर्भात जशी विद्युत मंडळ  कर्मचारी संघ नावाची संघटना कार्यरत होती. तशीच इकडील विभागात महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळ नोकर संघ नावाची संघटना काम करीत होती. या संघटनेचे मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे होते. या दोन्हीही संघटना एकमेकांच्या सहाय्यक संघटना होत्या. विदर्भातील कर्मचारी संघाचे मुख्य कार्यालय नागपूर येथे होते. पुढे ह्या दोन्हीही संघटनांचे विलीनीकरण होऊन एम.एस.ई.बी. वर्कर्स फेडरेशन असे नाव ठेवण्यात आले होते. 

एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे मी येथे येण्यापूर्वी विभागीय लेखापाल या पदासाठी अर्ज केल्याने माझी वैयक्तिक मुलाखत मुख्य कार्यालय मुंबई येथे झाली होती. हे पद सहाय्यक लेखापालच्या वरचे पद होते. या पदाची पात्रता म्हणजे पदवी पर्यंतचे शिक्षण व अनुभव उच्च लिपिक अथवा सहाय्यक लेखापाल अशी होती. माझी मुलाखत चांगली झाली होती. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आणि सहाय्यक लेखापाल असल्याने या पदाकरिता आवश्यक असणारी किमान पात्रता मी पूर्ण करीत होतो. ती जागा अनुसूचित जातीकरिता राखीव पण होती. म्हणून माझी नेमणूक निश्चितीच होईल असे मलाच काय सर्वांनाच वाटत होते. दरम्यान माझी या पदासाठी नेमणूक झाल्याची बातमी येऊन धडकली होती. मी याबाबत नागपूरचे आमच्या आधीच्या युनियनचे जनरल सेक्रेटरी मोहन शर्मा यांना विचारून बातमी खरी असल्याचे खात्री करून घेतली होती. त्यामुळे माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. मी मोहन शर्मा यांना माझी पोस्टिंग विदर्भात व्हावी म्हणून प्रयत्न करायला सांगितले होते. त्यांनी माझ्या पोस्टिंगच्या बाबत श्याम कोरोचे यांना सांगितल्याने मी त्यांनी सांगितलेल्या दिवशी मुंबईला गेलो. पण तेथे कळले की, ती नेमणुकीची यादी बदलवून माझ्याऐवजी शरद पवारच्या वशिल्याने बारामतीच्या दुसऱ्या व्यक्तीला घेण्यात आले होते. तो व्यक्ती माझ्या पदापेक्षा खालील पदावर म्हणजे उच्च लिपिक होता, तरीही त्याची नेमणूक झाली. म्हणजेच मी राजकीय वाशिलाचा बळी ठरलो. तसं जर झालं नसतं तर मी विद्युत मंडळात फार मोठ्या पदावर जाऊन पोहचलो असतो.

तसं श्रीवर्धन हे ठिकाण आम्हाला खूप आवडलं होतं. कारण हे गाव समुद्र किनाऱ्यावर वसलेलं होतं. फिरायला जायचं म्हणजे  समुद्र किनाऱ्यावर जावे लागत होते. मुलं अगदी लहान होते. त्यावेळी प्रज्ञाशील आणि संघशील असे दोघेच होते. करुणाचा जन्म नंतरचा. पहिल्यांदा आम्ही समुद्राचं ते अक्राळविक्राळ रूप पाहिलं; तेव्हा आम्हाला भयभीत झाल्यासारखे वाटलं. जिकडे तिकडे दूरवर पसरलेलं अथांग पाणी पाहून खरं म्हणजे सुरुवातीला समुद्राची अनामिक भीती वाटली होती. पण नंतर मात्र आम्हाला काहीच वाटलं नाही. समुद्राची भीती निघून गेली होती. मुलं मस्त समुद्र किना-यावर मनसोक्तपणे खेळत, बागडत.  समुद्राच्या रेतीवर मस्तपणे फिरताना निरनिराळ्या आकाराचे आणि रंगाचे खेकडे पाहून मन रमून जात होते. कवड्या  ज्या घेऊन मी बालपणी खेळत होतो, म्हणून  आकर्षण होतं, ते येथे प्रत्यक्ष शोधतांना खूप मजा येत होती.  सुगंधित  केवड्याचे झुडपं आकर्षित करीत असत. केवड्याची फुले बाजारात विकायला येत असत. येथील बाया डोक्याला हमखास ही आणि इतर फुले लावीत. जर फुल नाही मिळाले तर पाने तरी लावीत; इतकं त्यांचं फुले आणि पानावर अतूट प्रेम असल्याचं मी पाहिलं. कोकणातील  सृष्टीसौन्दर्य तर विचारूच नका !  अत्यंत विलोभनीय…! नारळा-पोफळीच्या आणि हापूस आंब्याच्या बागा तसेच समुद्र किनारे अत्यंत आकर्षक वाटत होतं. आमच्या कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या दिवेआगर, हरिहरेश्वर, बोर्ली व दिघी या  सेंटर कार्यालयाला कार्यालयीन कामाच्या निमित्ताने दौऱ्यावर जात होतो;  तेव्हा समुद्राच्या किनाऱ्याला भिडून जाणारे रस्ते पाहून मी अचंबित  होत होतो. आमच्या मुंबई येथील लेखा विभागातील वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी वर्ग हरिहरेश्वर या समुद्र काठावर वसलेल्या  देवस्थानच्या दर्शनासाठी नेहमी येत; तेव्हा आमचे उपविभागीय अधिकारी मलाच जिपगाडी देऊन त्यांच्यासोबत पाठवित असत. मी त्यांच्या सोबत जायचा पण देवळाच्या गाभाऱ्यात कधीही गेलो नव्हतो. येथे आणखी एक वैशिष्ट्य दिसलं, ते म्हणजे खडकांना पडलेले छिद्रे. समुद्राच्या लाटा जोरात येऊन या खडकांना धडकत; तेव्हा कोरलेले छिद्रे नक्षीकाम केल्यासारखे दिसत होते. एकदा मी लहान भाऊ अजयला घेऊन येथे पाहण्यासाठी गेलो होतो. आम्ही दोघेही समुद्र काठावरील खालच्या दगडावर उतरलो होतो. अजय ज्या खडकावर उभा होता, तेथे एक लाट जोरात येत असल्याचे मी पाहिले. त्याला लगेच मी ओढून वर खेचले. नंतर ती लाट त्या खडकाला धडक मारून परतल्यावर आमच्या अंगावर काटेच उभे झाले. अजय जर त्याच खडकावर उभा असता तर तो त्या लाटेने समुद्राच्या पाण्यात वाहून गेला असता. इतका अनर्थ त्यावेळी घडला असता. 

येथे आम्ही पहिल्यांदाच बाजारात विकायला  येणारे लहानमोठे  निरनिराळे प्रकारचे मासे बघितले. त्यात रावस, पॉपलेट, सुरमाई, हलवा, बांगडा, शिंगाडा, बाम, तारली, शेंगाट, घोळ, बुगडे, खेकडे, शिंपले, झिंगे, कोलंबी असे कितीतरी… सर्वांची नावे माहिती नाही. काही वाळलेले मासे, मीठ लावलेले मासे पण राहत. शिंपल्याचा चुना बनवीत. रविवारच्या दिवशी कोळी लोक एखाद्यावेळी माणसाएवढा मोठा मासा बैलगाडीत टाकून बाजारात आणीत. त्याचे हिस्से पाडीत. दोन रुपयाचा एक हिस्सा विकत. मटनासारखे मासाचे तुकडे व त्यातील काटे म्हणजे हाडासारखे दिसत. बोंबील मासे कसे वाळवतात, त्याची प्रात्यक्षिक आम्ही येथे बघितले. समुद्रातून बोटीने आणलेले ओले बोंबील खडकावर वाळू घालत. मग तेथे मांजरी, कुत्रे, कावळे फिरत. भयानक दुर्गंधी सुटत होती. त्यामुळे किळसवाणे वाटत होते. अशा प्रकारे वाळविलेले बोंबील पाहिल्यावर ते खाण्याची आमची इच्छा होत नव्हती. तेथील कोळी लोक वाळविलेले मासे ज्याला ‘सुकट’ म्हणत, ते घरी आलेल्या पाहुण्यांना भेट म्हणून देत. मुलगी जेव्हा सासरी जायची; तेव्हा हे मासे तिला भेट म्हणून देत. त्यांनी दिलेले बोंबील वेगळ्या पध्दतीने वाळवीत. नारळाच्या दोरीवर सुकवीत. त्यामुळे ते खराब होत नसत. समुद्रातून आणलेल्या माशांचा ढीग रचून त्याचा हर्रास होत होता. मग ते मासे ट्रकमध्ये बर्फात टाकून मुंबईला पाठवित. माझा क्लर्क ज्याच्याकडे विद्युत बिलाचे काम होते, त्याला पसंतीचा मासा घरी खाण्यासाठी तेथील व्यापारी असाच त्याच्याकडून पैसे न घेता देत असे.

येथे भाजीपाला खाणे महाग पण मासे खाणे स्वस्त ! झिंगे ज्याला कोलबी म्हणत हे आठ आण्याला पिशवीभर मिळायचे. ते सोलून त्याची चटणी खुमासदार होत होती. वाळवलेल्या कोलबीला सोडे म्हणत. हापूस आंबे पण अगदी स्वस्त दरात मिळत.  येथे मासे  व हापूस आंब्याच्या रसाचा आस्वाद घेण्याची हौस मात्र  मस्तपणे भागवून घेतली.

आमचे विभागीय कार्यालय गोरेगाव येथे होते. त्यांनी मला श्रीवर्धन कार्यालयाशिवाय आणखी म्हसाळा येथील उपविभागीय कार्यालयाचे काम सुध्दा पाहण्यासाठी पाठवीत  होते. तेथे मी पंधरा दिवस तर श्रीवर्धन येथे पंधरा दिवस असे काम पाहत होतो. प्रवास भत्ता मिळत असल्याने मीही खुश राहत होतो.

बरेचदा मला विभागीय कार्यालयाला पण जावे लागत असे. अकौऊंटच्या बाबतीत तेथील लोकांना काही अडचणी आल्यास आमचे विभागीय लेखापाल नातू साहेब मला हमखास बोलावीत असत.  मी तिथे  गेलो की तेथील कार्यकारी अभियंता, नेने साहेब मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावल्याशिवाय राहत नसत. ते विदर्भातील असल्याने त्यांना माझ्याबाबतीत जवळकी वाटत होती.

श्रीवर्धनला एक टुरिंग टॅाकीज उन्हाळ्यात येत होती. ही टॅाकीज टेम्पररी स्वरूपात गावाच्या बाहेर एका भाताच्या शेतात उभारीत. आम्ही तसे या टॅाकीजमध्ये सिनेमा पाहायला कधीच गेलो नाही.  पण एकदा गाडगे महाराजांचा ‘देवकीनंदन गोपाला’ हा सिनेमा लागला होता. म्हणून हा सिनेमा पाहायला आम्ही सर्वजण आवर्जून गेलो होतो. या सिनेमातील कहाणी व स्थळ हे विदर्भातील परिसरातील असल्याने माझे मित्र मला त्याबाबतीत विचारीत असल्याने मला अभिमान वाटत होता.

त्यातील एक प्रसंग मला खूप भावला होता. तो असा होता-

महाराज – तुमी धार्मिक लोकं पुजापाठ करता की नाई ?
भक्त मंडळी – हो…
महाराज – मंग लगन झालं की, घराच्या वास्तूशांतीले सत्यनारायण करता की नाई?
भक्त मंडळी – हो…
महाराज – सत्यानारायणाची कथा वाचता की नाई ?
भक्त मंडळी – हो…
महाराज – काय हाये त्या पोथीत ?
भक्त मंडळी -…….. (शांत)
महाराज – अरे सांगाना…..
बरं जाऊ द्या, मीच सांगतो…
साधूवाण्याची बायको लिलावती अन् तिची लेक कलावती याईचे नवरे म्हणजे सासरे जावाई दोघई व्यापार कराले जातात. त्याईची वाट पायता पायता ते लवकर वापस याव म्हणून दोघीजणी सत्यनारायण करतात. ते वापस आल्याचं समजताच कलावती प्रसाद घ्याचा इसरते व धावत धावत नवऱ्याच्या जहाजाकडे जाते. पण देवाले प्रसाद घेतला नाई म्हणून राग येते व तो जहाजच बुडवून टाकते, तेच्याइतला माल व माणसाई सकट…
मंग आकाशवाणी प्रमाणं ते प्रसाद घेते, तं नवऱ्यासकट जहाज वर येते…
अशीच हाये ना कथा ?
भक्त मंडळी – व्हयं महाराज…
महाराज – आता मले सांगा की सत्यानारायणाची पुजा म्हणून तुमी लिलावती अन् कलावतीची कथा वाचता,  त्याले पोथी म्हणता… तं मंग कलावती अन् लिलावतीनं सत्यानारायण केल्ला तवा कोणती पोथी वाचली असन ?
भक्त मंडळी -……(शांत)
महाराज – आता काहुन दातखई बसली ?
बरं ते जाऊ द्या…
संतवचन हाये, “दया क्षमा शांती, तेथे देवाची वस्ती.”
आता या संतवचनापरमाणं सत्यनारायण देव हाये का ?
लय मयन्यानं त्या तरणीचा नवरा वापस आल्यावर ते नवतरणी लय खुस झाली. त्या खुसीत भक्तीभावानं पुजा केल्यावर परसाद घ्याले विसरली तं तीची पुजा विसरुन प्रसादासाठी तिचा नवरा जहाजासकट बुडवणाऱ्या सत्यनारायणाजवळ दया, क्षमा, शांती दिसते काय?
मंग ज्याच्याजवळ देवाचे गुणच दिसत नाई तो देव कसा असन?
बापहो हे सारं थोतांड हाये.
परसाद खाल्यानं जर जहाज वर येत असतीन तं समुंदराच्या काठावर मोठ्ठा सत्यनारायण करा अन् लढाईत डुबलेले जहाजं वर काढुन दाखवा ना…
पण एकाई भटजीले हे जमलं नाई अजुन…
तुमच्या कष्टाच्या पैशानं लेकराईले काजू बदामा नाई खाऊ घालत, अन् सत्यनारायणाच्या नावानं दान करता. अरे हा तं लुटाचा धंदा हाये… तुकोबा म्हणतात, “कथा करोनिया द्रव्य देती घेती, तया अधोगती नरकाती.”
कथा वाचुन जर दक्षिणेच्या नावानं धनधान्याची देवघेव केली तर नरकात जासान…
लक्षात घ्यारे मायबापहो तुकोबाचं सांगणं…

बोला, गोपाला… गोपाला… देवकीनंदन… गोपाला…   

कधीकधी  येथून बदलून जाऊ नये असेही वाटत होतं. पण  गावाला जाणे-येणे  बिलकुल परवडत नव्हतं. त्याशिवाय खूप त्रास होत होता. एकदा गावाला जायचे होते. पावसाचे दिवसं होते. श्रीवर्धनहून एसटी.बसने मुंबईला गेलो. तेथून सी.टी. बसने दादर रेल्वे स्टेशनवर गेलो. हातात सामान इतके की ते सांभाळणे जड झाले होते. परत दोन्ही मुलं अगदी लहान असल्याने त्यांनाही सांभाळावे लागत होते. म्हणून सामान हलके करण्याकरिता शेवटी छत्री तेथेच रेल्वेस्टेशनवर टाकून दिली. तेथे पायऱ्यांनी वर चढायचे होते. हातातल्या सामानासहित मुलांना घेऊन चढणे कठीण झाले होते. पावसाने पाय घसरीत होते. बरे झाले, एक-दोन प्रवाशांनी मुलांना घेतल्याने मी ह्या पायऱ्यां चढू शकलो. अशा त्रासापायी शेवटी बदलीसाठी विंनती अर्ज केला. तरीही श्रीवर्धनला आम्ही दोन वर्षे तेथे काढली होती, हे काही कमी नव्हतं.

७. दारव्हा  येथे  बदली

श्रीवर्धनवरून मार्च १९८०  मध्ये दारव्हा  (यवतमाळ जिल्हा) येथे  माझ्या अर्जानुसार बदली झाली. पण सहा महिने होऊनही  कार्यालय मला सोडत नव्हते. कारण माझ्या ठिकाणी कोणाचीही नेमणूक झाली नव्हती. दुसरीकडे एका ब्राम्हण व्यक्तीला मात्र स्थानिक व्यवस्था करून सोडले होते. मला मात्र मुद्दाम जातीयतेमुळे सोडत नव्हते, असे माझ्या लक्षात आले. म्हणून मी महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती/जमातीच्या मागासवर्गीय सेलकडे तशी तक्रार केली होती. कुसुमचं बाळंतपण जवळ आल्याने तिला सासुरवाडी सुकळी येथे नेऊन देणे आवश्यक झालं होतं. म्हणून मी दिर्घ सुट्ट्या काढून तिला व मुलांना घेऊन गावाला आलो. घर सोडून घरघुती सामान चहाच्या दोन डब्ब्यात पॅक करून ह्या पेट्या व दुसरी एक लोखंडी पेटी असे तीन लगेज एसटी. पार्सलने यवतमाळला पाठविले. आर्थिक परिस्थिती डबघाईची असल्याने सामान काही जास्त विकत घेता आलं नाही. आवश्यक भांडेकुंडे तेवढे होते.

आम्ही दुसऱ्या एसटी.बसने पुण्याला निघालो. वाटेत भर उन्हात शेतावर काम करणारे छोटंसं चिटकुरं कमरेला लपेटून व बाकी उघडे शरीर असलेले शेतकरी, शेतमजूर काम करतांना पाहून मला खूप कीव येत होती. हे लोक रखरखत्या उन्हात कसे काम करतात याचे आश्चर्य वाटत होते. कोकणातील रस्ते म्हणजे निमुळते, वळणा-वळणाने जाणारे, जंगलातून घाटाने जाणारे असे होते. रस्त्यात आम्हाला डोंगर माथ्यावर भोर घाट लागला होता. हा घाट चढणीचा होता. अत्यंत निमुळता… वळणावर बस आली की, ड्रायव्हर गाडी मागे-पुढे करून काढत होता. त्याच्या या प्रयत्नात गाडी खाली खाईत पडते की काय अशी भीती वाटत होती. जीव मुठीत घेऊन आम्ही गाडीत बसलो होतो. घाटाच्या बाहेर गाडी आल्यावर आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. घाट गेल्यावर एक छोटंस देऊळ रोडच्या बाजूला होतं. तेथे भगवे कपडे घालून साधू बसला होता. बसमधून लोक खाली उतरले. पिण्याच्या पाण्याची सोय होती. काही लोकांनी नारळ विकत घेऊन देवाला वाहिले. आम्हाला सुखरूप घाटातून आणल्याने देवाचे आभार मानले. पण कुणीही त्या वाहन चालकाचे आभार मानल्याचे दिसले नाही. खरं म्हणजे त्यानेच आपले कौशल्य पणाला लावून बस घाटातून सुखरूप बाहेर आणली होती. तोच खरा म्हणजे हकदार होता. त्या निर्जीव दगडाच्या देवाशी काहीही संबंध नव्हता. पण लोकांची तऱ्हाच वेगळी !

पुण्याहून दुसरी एसटी बदलवून यवतमाळला आलो. बस स्टँडच्या बाकड्यावर आम्ही येऊन बसलो. तेव्हा लोकांचे आपसातील बोलणे मला अनोखे वाटले. एक मुलगी तिच्या आईला, ‘अवं माय’ अशी म्हणाली. मी तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिलो. ‘येणं वं माय, जाणं वं माय’ ही माझीच भाषा. पण कोकणात राहून आल्याने ती दुरावल्यासारखी झाली होती. कोकणातील ऑफिसमध्ये वीज ग्राहक तक्रारी घेऊन आलेत की, आम्ही काय गणपती बसवलाय काय? आवरा बिल आला. म्हणजे ह्यावेळी आम्ही गावाला आलो नव्हतो. गणपती बसवला नाही. वीज वापरली नाही, तरीही इतके वीजबिल कसे आले, असे त्यांना म्हणायचे असते. मला त्यांची भाषा कळली नाही की माझ्या हाताखालील लिपिकांकडे पाठवित होतो. सांगायचं म्हणजे कोकणात राहून आल्याने मलाच माझी विदर्भाची भाषा वेगळी वाटायला लागली होती. विदर्भाची भाषा म्हणजे रांगडी वाटायची. त्यामानाने कोकणातील भाषा ही गोड वाटत होती. तेथील लोक एखाद्यावेळी भांडले तरी ते भांडण वाटत नव्हते. विदर्भात साधी बोलाचाली झाली तरी ती भांडखोर वाटत होती. असा तो फरक होता.

एसटी पार्सलने पाठविलेले सामान माझा मित्र निरंजन पाटील याने सोडवून माझे नातेवाईक पांडुरंग लोखंडे यांच्याकडे नेऊन दिले. महाराष्ट्र शासनाने माझ्या तक्रारीची दखल घेतल्याचे पत्र मला मिळाले होते. त्याचाच परिणाम म्हणून की काय मला कार्यालयाकडून सोडत असल्याचा निरोप आला. म्हणून मी परत श्रीवर्धनला गेलो. तेव्हा कुठे त्यांनी मला सोडले.

८. दिग्रस येथे बदली

सुकळीला दि. ९ एप्रिल १९८० रोजी करुणाचा जन्म झाला. एक महिन्यानी कुटुंबांना घेऊन यवतमाळला राहण्यासाठी आलो. माझे बाबा त्यावेळी यवतमाळच्या हरनामसिंग कोठा मोहल्ल्यात राहत होते. ते चकल्या काढून विकण्याचा धंदा करीत होते. त्यांची भाड्याने घेतलेली एकच लहानशी कुडा-माती व टिनाची खोली होती. आम्ही पण बाबासोबत त्या लहानश्या खोलीत  राहू लागलो. घरात कोणत्याही प्रकारच्या सोयी नव्हत्या. इलेक्ट्रिक लाईन पण नव्हती. उन्हाळ्याचे दिवसं होते. त्या टिनाच्या खोलीत भयानक उकाडा होत होता. संडास, बाथरूम असं काहीही नव्हतं. आंघोळीसाठी गव्हर्नमेंट हायस्कूलच्या कुंपणाची तारं सरकवून आतमध्ये तट्ट्याचं तात्पुरतं बाथरूम बांधलं होतं. याच शाळेच्या आवारातील विहिरीतून पाणी आणावे लागे. अशाही बिकट परिस्थितीत दिवसं काढावे लागले. तेथून मी दारव्हा येथील कार्यालयाला एसटी.बसने जवळपास ४५ किलोमीटर रोज जात होतो.  

मी काही वर्षापूर्वी दिग्रस (यवतमाळ जिल्हा) येथे लिपिक व च्च लिपिक या पदावर काम केले होते. माझ्या चांगल्या कामाबाबत तेथील सहाय्यक अभियंता आर.एस.देशमुख यांना कळल्यावर त्यांनी यवतमाळ येथील  वरिष्ठ कार्यालयाला सांगून माझी बदली दिग्रसला करून घेतली. म्हणजे मी दारव्ह्याहून लगेच दोन महिन्याने प्रशासकीय कारणास्तव दिग्रस येथे बदलून आलो. मी येथे खोली घेऊन कुटुंबाला घेऊन गेलो. दिग्रसला मी जवळपास सहा वर्षे राहिलो. मुलांना इंग्लीश कॉन्वेंटमध्ये टाकले.

येथे आल्यावर मला वर्कर्स फेडरेशन  युनियनचा  शाखा अध्यक्ष व  सचिव म्हणून दत्ता शिंदोडे यांना निवडण्यात आले होते.  आम्ही दोघेही मागासवर्गीय समाजाचे होते. शिंदोडे हा चांगला तळमळीचा  कार्यकर्ता होता. त्याला भाषण देणे पण जमत होतं.  मला मात्र तेवढं जमत नव्हतं. शिंदोडेबद्दल आणखी सांगायचं म्हणजे आम्ही यवतमाळ येथील अमोलकचंद कोलेजच्या होस्टेलमध्ये राहत असतांना माझी ओळख होती. तो विद्यार्थी जीवनापासून सक्रीय होता.

तेथे एक घटना घडली होती.  अभियंता असलेले अधिका-यांची सब-ऑर्डीनेट इंजिनिअर असोसिएशन  (एसईए) नावाची युनियन होती. त्यांनी त्यांच्या मागण्यासाठी दीर्घकालीन संप सुरु केला होता. त्यावेळी संपकाळात दिग्रस सब-डिविजनच्या प्रमुखाचे काम माझ्याकडे आले होते. माझ्या अधिकारात कार्यालयाची जीप आल्याने मी संपूर्ण सब डिविजन फिरून काम पाहत होतो. मी त्यांच्या संपाच्या  जवळपास दीड महिन्याच्या काळात शेतकऱ्यांना नियमाव्यतिरिक्त काहीही जास्तीचे पैसे न घेता लगेच विद्युत पुरवठा दिल्याने लोक आमच्यावर खुश झाले होते. कारण अभियंता  व त्यांच्या हाताखालील काम करणारा स्टाफ लाच घेतल्याशिवाय लोकांची कामे करीत नव्हते. त्यांचा संप संपल्यावर हे अभियंते आमच्यावर चिडून होते. म्हणून त्यांनी आमच्या युनियनमध्ये फुट पाडण्याचा धडाका सुरु केला होता.  आमच्या  संघटनेची सदस्य संख्या इतर युनियनपेक्षा जास्त होती. बाकी युनियन ह्या प्रशासनाच्या ताटाखालचे मांजर असल्यासारखे वागत असत. त्यांच्या विरोधात  आम्ही साखळी उपोषणासारखे जबरदस्त आंदोलन सुरु केले होते. त्याशियाय मी त्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरणे काढून वर्तमानपत्रात बातम्या येण्याची व्यवस्था केली होती. त्याचा धसका वरिष्ठ प्रशासनाने घेतला होता. यवतमाळ सर्कलच्या अधीक्षक अभियंत्यांला चौकशी करावी लागली. पण ब्राम्हण लॉबीने ह्या चौकशीत सहाय्यक अभियंता व त्यांच्या  अभियंता  स्टाफवर कोणताही आरोप सिद्ध होऊ नये अशी खास व्यवस्था केली होती. कारण सहाय्यक अभियंता, आर.एस.देशमुख हे ब्राम्हण समाजाचे होते आणि आमच्याही युनियनचे वरिष्ठ नेते सुध्दा तेच होते. मी शाखा अध्यक्ष व  सचिव शिंदोडे असे आम्ही दोघेही अनुसूचित जातीचे होतो. आमच्या मागे आमच्यावर देखरेख ठेवण्यासाठी त्यांनी युनियनमधील ब्राम्हण हेर सोडले होते. त्यावरून आमच्या लक्षात आले होते की, “खालच्या स्तरावर खालच्या जातीचे व वरच्या स्तरावर उच्चवर्णीय समाजाचे नेते” अशी आमच्या युनियनची रचना केली होती. कारण तळागाळातील कर्मचारी वर्ग हा बहुतांश  मागासवर्गीय असायचा. त्यांना बांधून ठेवायला त्यांच्याच जातीचे लोक पाहिजे असतात. म्हणून त्यांनी अशी रचना केली होती. हे ब्राम्हणवादी रहस्य आम्हाला  हळूहळू कळायला लागलं होतं. आम्ही तसे बोलून पण दाखवत होतो. तरीही आम्ही या युनियनमध्ये का राहत होतो? कारण ही युनियन साम्यवादी प्रणित असल्याने लढाऊ बाण्याची म्हणून ओळखल्या जात  होती. हाच लढाऊपणा संघर्षात जगणा-या आंबेडकरी कर्मचा-यांना जवळकीची वाटत होती आणि  त्याशिवाय आमच्यापुढे दुसरा पर्याय पण दिसत नव्हता. कारण बाकीच्या युनियन ह्या प्रशासनाच्या मनाने वागणाऱ्या होत्या आणि मागासवर्गीयांची वेगळी अशी संघटना तोपर्यंत तरी अस्तित्वात आली नव्हती.

देशमुख साहेब हे जरी युनियनच्या बाबतीत विरोधक असले तरी ते वैयक्तिकदृष्ट्या स्वभावाने चांगले होते. त्यांनी कधी दुजाभाव केल्याचे मला आठवत नाही. एकदा गुरनुले नावाचा एक तांत्रिक कामगार इलेक्ट्रिक खांबावरून खाली पडला होता. तेव्हा त्याच्या कमरेला जबरदस्त मार लागला होता. आम्ही त्याला ट्रकमध्ये टाकून नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन गेलो होतो. त्यावेळी माझा लहान भाऊ अजय तेथे शिकत होता. औरंगाबाद येथील मेडिकल कॉलेजमध्ये विद्युत मंडळाच्या अपघात झालेल्या कामगारांसाठी काही बेड आरक्षित असल्याने तेथे उपचार करण्यासाठी नागपूर येथील दवाखान्याची शिफारस पाहिजे होती. त्यावेळी नागपूर येथे दिग्रसहून यायला व वैद्यकीय प्रक्रियेत उशीर झाल्याने मेडिकल कॉलेज बंद होऊन तेथील प्रमुख डॉक्टर ज्यांची सही त्या पेपरवर पाहिजे होती, ते निघून गेले होते. त्यावेळी माझ्या भावाने ते कँटीनमध्ये जेवत असतांना सुद्धा त्यावर सही घेऊन आला होता. त्यावेळी देशमुख साहेब म्हणाले होते की, ‘जुमळे साहेबांचा भाऊ असल्याने काम झाले, नाहीतर एक दिवस आपल्याला नागपूर येथे थांबावे लागले असते.’ अजय त्यावेळी एमएसला असतांना देशमुख साहेबांचे मोठे भाऊ परीक्षक म्हणून आले होते. त्यावेळीं त्यांनी भावाला मदत केली होती. असे आमचे संबंध जवळचे निर्माण झाले होते. त्यादरम्यान त्यांची बदली बढतीवर दुसरीकडे झाली होती; तेव्हा आम्ही युनियनतर्फे त्यांना मांसाहारी जेवण ठेऊन निरोप समारंभ आयोजित केला होता. त्यांच्याबाबतीत माझ्या लक्षात राहीलेली एक गोष्ट सांगतो. एकदा आम्ही कार्यालयीन कामासाठी जिपने सदोबा सावळी येथे गेलो होतो. परत येतांना  काही खेडूत लोक आडवे येऊन झाडावरून पडलेल्या मुलाला दवाखान्यात घेऊन चला म्हणून विनवणी करीत होते. त्यावेळी  देशमुख साहेब स्वतः जिप चालवित होते. ते म्हणाले, ‘तुम्ही बाजूला व्हा. गाडी साईडला घेतो.’  ते बिचारे बाजुला झालेत आणि तिच संधी साधून साहेबांनी गाडी न थांबवता जोरात दामटली. हे पाहून मी  साहेबांवर जवळपास ओरडलोच आणि म्हणालो, ‘काय साहेब, त्या पोराची नाजुक परिस्थिती पाहून आपण त्याला  दवाखान्यात पोहोचवले पाहिजे, ना…’  मी असं म्हटल्यावर,  त्यांनी लगेच गाडी रिव्हर्समध्ये घेऊन त्या लोकांना  बसविले. आम्ही त्यांना आर्णी येथील  सरकारी दवाखान्यात आणून सोडले.  रस्त्यात साहेब मला म्हणाले, ‘जुमळे साहेब,  तुम्ही  म्हटले म्हणून मी हिंमत केली. नाहीतर मी अशा अवस्थेत कुणाला घेत नाही.  कधी कधी चांगुलपणा आपल्या अंगावर येण्याची शक्यता असते. समजा तो मुलगा दुर्दैवाने  रस्त्यातच  मेला असता तर आपल्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरा झाला असता. म्हणून मी या भानगडीत सहसा पडत नाही.  मी म्हणालो,  ‘बरोबर आहे साहेब,   पण एखाद्या वेळी माणुसकी पण दाखवायवा पाहिजे असे मला वाटले, म्हणून मी  तुम्हाला बोललो.’ अशाही काही गोष्टी नकळत घडून जातात.

या दरम्यान एका महत्वाच्या व तातडीच्या कामाकरिता युनियनचे जनरल सेक्रेटरी मोहन शर्मा यांना भेटायला नागपूर येथे जाणे आवश्यक झाले होते. तेव्हा मी युनियनचा अध्यक्ष असल्याने  व शिंदोडे हे सचिव असल्याने आम्ही दोघेही दिग्रसच्या एसटी बस स्थानकावर आलो. रात्री १२ वाजताची बस होती. ती सकाळी नागपूरला पोहचणार होती. थंडीचे दिवसं होते. कुडकुडत आम्ही बसची वाट पाहत थांबलो होतो. त्यावेळी माझ्या मनात नेहमी खटकणारा प्रश्न यावेळीही उफाळून बाहेर आला होता. मी शिंदोडेला म्हणालो की, कशाला आपण इतका त्रास या कामगारांसाठी घेत आहोत? आधीच हे कामगार चांगल्या परिस्थितीत जगत आहेत आणि आणखी त्यात भर म्हणून व त्यांना अधिक चांगले जगता यावे म्हणून आपण धडपड करीत आहोत. आता ही गोष्ट मला पटून राहिली नाही. आपण ज्या गोरगरीब समाजातून आलो, तो समाज विपन्नावस्थेत जगत आहेत. ना त्यांना पुरेशी मजुरी मिळते ना त्यांना महागाई वाढली म्हणून त्या प्रमाणात मजुरी वाढवून मिळते. शेतकरी, बिच्चाऱ्यांचे तेच हाल आहेत. महागाई वाढली म्हणून काय त्यांच्या शेतमालाचे भाव थोडेच वाढवून मिळते?  म्हणून या संघटीत कामगारांच्या युनियनमध्ये आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा आपण ज्या समाजातून आलो, त्या असंघटीत लोकांमध्ये जाऊन काम करावे असे वाटते. अशी आम्ही आपसात चर्चा करीत असतांना बस आली. याच चर्चेतून मला नंतरच्या काळात समाजात जावून काम करायला दिशा मिळाली होती. त्याची माहिती मी पुढे दिली आहे. 

आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे राळेगाव मतदार संघाचे त्यावेळचे आमदार सुधाकर धुर्वे दिग्रसला राहत होते. त्यांना मी भेटून माझी सासुरवाडी सुकळी या गावाचे विद्युतीकरण करण्यासाठी बोललो. त्यात अडचण अशी होती की, विद्युत मंडळाला जे किमान महसूल मिळायला पाहिजे होता, तो मिळत नव्हता. म्हणून या गावाचे विद्युतीकरण करण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. मला माहित होतं की, शासनाच्या धोरणानुसार विद्युत मंडळ काही स्कीममध्ये ही अट शिथिल करू शकते. तसे मी आमदार साहेबांना  सांगितले.  त्यांनी तसा प्रयत्न केल्याने या गावाचे विद्युतीकरण होण्याचा मार्ग मोकळा झाला. या गावाच्या विद्यूतीकरणात माझाही सहभाग होता हे मला विशेष नमूद करायला आनंद वाटतो. 

हे खरं आहे की मी दिग्रस आणि त्यापुर्वीही कामगार संघटनेत सक्रियपणे काम करीत आलो. पण समाजकार्यात फारसा भाग घेतला नव्हता. पण येथे आल्यावर मात्र समाजाशी नाळ जुळली व समाजात पहिल्यांदाच मी दिग्रस येथेच सार्वजनिकरीत्या काम करायला लागलो. 

“आपण नोकरीच्या निमित्ताने ज्या ठिकाणी जाऊ तेच आपलं गाव व आपलं कार्यक्षेत्र” असे समजून त्या ठिकाणी असेपर्यंत सामाजिक कार्य करावे, अशी संकल्पना तेथील बौद्ध समाजातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पटवून देण्यात मी यशस्वी झालो.  त्या अनुशंगाने  मिटिंग घेऊन  ‘बौध्द कर्मचारी समाज सुधारक मंडळ’ या नावाची  संस्था १९८२ साली स्थापन केली. या संस्थेचे यवतमाळला जाऊन मी पब्लिक ट्रस्ट अंतर्गत रितसर फेब्रुवारी १९८२ मध्ये पंजीकरण केले. जवळपास ९७ कर्मचारी या संस्थेचे सभासद झाले होते. प्रत्येकाकडून दरमहिना १० रुपये वर्गणी जमा करीत होतो. वर्गणी जमा करण्याचे काम मी भीमराव कांबळे या होतकरू मुलाला महिना ३० रुपये मोबदला देऊन सोपविले होते. शिवाय त्याला फिरायला माझी सायकल दिली होती. या समाजकार्यात विशेषतः मला बापुराव कांबळे, एकनाथ तुपसुंदरे, महादेव भगत, विजय सरदार, देवराव कुलदीपके, तुकाराम उबाळे गुरुजी, टी.एस.दिपके, डी.के.घाटगे, आर.एम.बागडे, जी.एस.भारशंकर, वाय.पी.अडागळे या  व इतर अनेक कार्यकर्त्यांचे बहुमोल सहकार्य मिळाले होते. या संस्थेच्या माध्यमातून वधुवर परिचय मेळावा, विवाह मेळावा, व्याख्यानमाला, वाचनालय इत्यादी उपक्रम राबविले होते.  

त्यावेळी दिग्रसची व्याख्यानमाला  खूप गाजली होती. यात अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते श्याम मानव नागपूर, सुधाकर जोशी नागपूर, केशव खिल्लारे यवतमाळ, प्रा.लीलाताई भेले पांढरकवडा, प्राचार्य सुभाष खंडारे कळंब, आकाशवाणीचे वृत्तनिवेदक  नेताजी राजगडकर नागपूर, महिलामुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या मंगला खिवंसरा औरंगाबाद, बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी नागपूर,  यामिनी चौधरी नागपूर, (श्याम मानव यांची पत्नी) इत्यादी व्याख्यात्यांची व्याख्याने झाली होती. 

नेताजी राजगडकर हे नागपूर आकाशवाणीवर वृत्तनिवेदक असल्याने त्यांचा आवाज सर्वांना परिचित झाला होता. त्यामुळे लोकांना त्यांचे पण आकर्षण वाटत होते. नेताजी राजगडकर बद्दल आणखी सांगायचं म्हणजे ते माझा लहान भाऊ अजय याचा मित्र होता. अजय त्यावेळी नागपूर येथे शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला शिकत होता. तो कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आला होता.  आंबेडकरी  विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून त्याचा नेताजी राजगडकर यांचेशी चांगली दाट ओळख झाली होती. म्हणूनच नेताजी राजगडकर मला म्हणाला होता की, “दादा, खरं म्हणजे मला व्याख्यानासाठी येणे शक्य नव्हते, पण तुमच्यामुळे मला येणे भाग पडले.” हे ऐकून मी सद्गदित झालो होतो.

नेताजी राजगडकर आदिवासी असल्याने त्यांना भेटायला दिग्रसमधील काही आदिवासी कार्यकर्ते आले होते. त्यावेळी नेताजी त्यांना म्हणालेत की, नागपूरच्या इंदोरा भागात दोन मोहल्ले आहेत. एक बौद्ध मोहल्ला व दुसरा भंगी मोहल्ला. बौद्ध मोहल्ल्यात उच्च पदस्थ लोक असल्याचे आपणास दिसेल तर दुसरीकडे भंगी मोहल्ल्यात अजूनही झाडू मारण्याचे कामे करतात.  शिक्षणामुळे किती प्रगती होते हे या उदाहरणावरून नेताजीने त्या आदिवासी कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. 

आणखी एक आठवणीतली गोष्ट विशेष सांगायचं म्हणजे त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ राबविणारे श्याम मानव हे खूप प्रसिद्धीला आले होते. पहिल्या वर्षी मी नागपूरला जावून त्यांना प्रत्यक्ष भेटून तीन दिवसांची व्याख्याने आयोजित केली होती. पण ते त्यावर्षी काही महत्वाच्या कारणास्तव येऊ शकणार नाही असे कळविल्याने मी परत नागपूरला जावून त्यांची पत्नी यामिनी चौधरी यांना भेटून त्यांची व नास्तिक तथा रेशनॅलिस्ट चळवळीत काम करणारे सुधाकर जोशी आणि यवतमाळचे त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम करणारे व नंतरच्या काळात यवतमाळ जिल्ह्याचे बहुजन समाज पार्टीचे संयोजक म्हणून काम केलेले केशव खिल्लारे यांच्या तीन दिवसाचे व्याख्याने आयोजित केले. दुसऱ्या वर्षी परत श्याम मानव यांचे तीन दिवशीय व्याख्याने निश्चित केले. त्यांच्या व्याख्यानात पहिल्या दिवशी नशीब-फल ज्योतिष्य एक थोतांड, दुस-या दिवशी भुत-भानामती-देवी अंगात येणं एक मायाजाल आणि तिस-या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन असे विषय होते. 

ह्यावेळेसची गंमत सांगायची म्हणजे  आम्ही त्यांच्या कार्यक्रमाची  सर्व तयारी केली होती. एसटी स्थानकाच्या बाहेर लाउडस्पीकर लावलेला रिक्षा तयार ठेवला होता. पण श्याम मानव नियोजित वेळेच्या आधी येण्यास उशीर होत होता. त्यावेळी आतासारखे मोबाईल नसल्याने संपर्क पण करता येत नव्हते. आम्ही एसटी स्थानकावर त्यांची वाट पाहत होतो आणि जेव्हा ते एका एसटी बसमध्ये बसलेले दिसले; तेव्हा ताबडतोब रिक्षा गावात फिरवायला सांगितला. रिक्षावाला गंमत सांगत होता की, ‘श्याम मानव आले’ असे ऐकल्याबरोबर लोक कपडे घेऊन घरातून बाहेर पडत आणि रस्त्यानेच कपडे घालत घालत येत होते. ही तीन दिवसाची व्याख्यानमाला जबरदस्त गाजली होती. कार्यक्रमाचा मैदान तुडुंब भरला होता. श्याम मानव यांनी बुवाबाजी करणारे बुवा जसे चमत्कारीक घटना दाखवून लोकांना आकर्षित करतात, तसेच प्रयोग करून दाखवले होते.  त्याशिवाय त्यांनी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे पण दिली होती. काही लोकांच्या मजेशीर प्रश्नांना मजेशीरपणे उत्तरे दिली होती, हे विशेष !  या गावात एक डॉक्टर भूत उतरवीत असल्याचे सांगत होता. त्याला श्याम मानवला घेऊन आम्ही भेटलो होतो. सुरवातीला तो तशी बतावणी करीत होता; पण नंतर त्याने माघार घेतली.

समाजात विवाह मेळाव्याची प्रथा रुजविणे अत्यंत आवश्यक आहे, असे आम्हाला वाटत होते. विवाह मेळाव्यामुळे समाजातील गोरगरिबांना आर्थिक झळ न बसता एकमेकांचे संसार उभे राहून एक वेगळं नातं तयार होते. यात वेळ, पैसा, मानसिक व शारीरिक त्रास वाचतो. काही लोकांच्या घरी मांडव टाकायला जागा नसते. पण विवाह मेळाव्यातील सर्व जोडप्यांचे लग्न एकाच ठिकाणी, एकाच मंडपात होतात. मेळाव्यातील लग्न कार्याला खर्च येत नसल्यामुळे आर्थिक ताण कमी होतो. कर्जबाजारी होण्यापासून मुक्ती मिळते. समाज एकसंघ होतो. असे अनेक फायदे या मेळाव्याचे सांगता येतील. म्हणून आम्ही हा उपक्रम सुध्दा हातात घेतला होता. दरवर्षी उन्हाळ्यात हा मेळावा आयोजित करीत होतो. मेळाव्याची तारीख जाहीर करण्यापूर्वी आम्ही दिग्रस आणि आजूबाजूच्या खेड्यात माहिती देऊन मेळाव्याची गरज त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत होतो. पण  मेळाव्यात लग्न करायला लोक फारसे उत्सुक दिसत नव्हते. कारण त्यावेळी लोकांमध्ये काही गैरसमज पसरले होते. लग्न हे आपल्या घरच्या अंगणातच व्हायला पाहीजे. गरीब जरी असला तरी खर्च करून मोठेपणाचे प्रदर्शन करण्याची बहुदा सर्वांनाच हौस असते. लग्नकार्य हे जीवनात एकदाच करावे लागते. म्हणून खर्चाला लगाम लावू नये. लग्नसोहळा हा आपला आपणच स्वतंत्रपणे केला पाहिजे, त्यात इतरांच्या पाहुण्यांची सरमिसळ असू नये. अशा प्रकारची समाजाची मानसिकता होती. त्यामुळे पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. असं जरी असलं तरी काही जणांनी मात्र धाडस केले होते, हेही येथे नमूद करायला पाहिजे. माझ्या आठवणीत असलेले आमचे कार्यकर्ते एकनाथ तुपसुंदरे यांचा पुतण्या गौतम तुपसुंदरे आणि दत्ता कांबळे ज्यांना त्यावेळी देवा म्हणत आणि कीर्तनकार म्हणून ओळखल्या जात होते आणि त्यांना कबीराचे दोहे तोंडपाठ होते, त्यांचा मुलगा भीमराव यांना धरून पाच जोडप्यांनी मात्र धाडसाने पहिल्याच वर्षी प्रतिसाद दिला होता. ह्या मेळाव्यात- १. गौतम तुपसुंदरे व जया, २. लक्ष्मण कांबळे आणि शिला,  ३. भीमराव बराटे आणि उषा, ४. पुसदचे भालेराव आणि तारा आणि ५. भीमराव कांबळे आणि सविता असे ते पाच जोडपे होते. हा विवाह मेळावा दि. ५ मे १९८५ रोजी दिनबाई हायस्कूलच्या प्रांगणात पार पडला होता. दत्ता कांबळे नंतरच्या काळात बौध्द भिक्खू झाल्याचे व त्यांचे नाव भिक्खू उपाली असल्याचे कळले होते.  

विवाह मेळाव्याला एकदा पुसद जवळील मुळावा येथील भन्ते धम्मसेवक आले होते. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, लग्नविधी भन्तेजींच्या हातून करू नये. नाहीतर भन्तेजींची हिंदुच्या भटजी सारखी अवस्था होईल. म्हणून लग्नविधी बौध्द उपासकाकडून करून घ्यावी. याचा पुरावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात देता येईल. या ग्रंथातील पंचम खंड- संघ, भाग दुसरा- भिक्खू आणि त्याच्याविषयी भगवान बुध्दाची कल्पना, तीन- भिक्खू आणि ब्राम्हण यात अनुक्रमांक तीनमध्ये लिहिले आहे की, “ब्राम्हण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यू यांचे आनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य होय.” अनुक्रमांक पाचमध्ये लिहिले आहे की, “या संस्कारासाठी पुरोहिताची आवश्यकता आहे. उलटपक्षी भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यावर विश्वास ठेवीत नाही. ह्यामुळे संस्काराचे कारणच उरत नाही. म्हणून भिक्खू हा पुरोहीत होत नाही.” याचा अर्थ भिक्खूंनी ब्राम्हण पुरोहीतासारखे जन्म, विवाह, आणि  मृत्यू यासारखे संस्कार करू नये असा होतो. 

तसेच लग्नविधी करतांना वधूने वराच्या पाया पडणे, वराने जाहीररीत्या सर्वांच्या समोर वधूला काळ्यामण्याची गाठी म्हणजे मंगलसूत्र बांधणे अशा प्रथा पाळल्या जातात. यामुळे वधुला अर्थात स्त्रीला कमी लेखण्यासारखे होते. तिला पुरुषांपेक्षा दुय्यम स्थान दिल्या जाते. स्त्री-पुरुष समानतेचे तत्व येथे पायदळी तुडविल्या जाते. म्हणून समाजातील या अनिष्ट रूढी, परंपरा बंद व्हायला पाहिजेत असे आम्हाला वाटत होते. म्हणून आम्ही या प्रथांना पायबंद घातला होता. पाया पडण्याऐवजी वधू-वरांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन जयभीम म्हणून अभिवादन करावे. मंगलसूत्र लग्न प्रसंगी जाहीररीत्या सर्वांच्यासमोर वराने वधूच्या गळ्यात घालून प्रदर्शन करू नका असं आम्ही सांगत होतो. यामुळे मुलींची अवहेलना होते. त्यापेक्षा लग्नकार्य आटोपल्यावर  मंगलसूत्र घालायचं असल्यास घालू शकता; पण लग्नकार्यात विधीचा एक भाग म्हणून सर्वांच्या समोर त्याचं जाहीररीत्या प्रदर्शन करू नका, असं आमचं म्हणणं होतं. 

विवाह मेळाव्याच्या आधी आम्ही वधुवर परिचय मेळावा आयोजित करीत होतो. ह्या मेळाव्याचे पत्रके आणि पोस्टर छापून प्रचार करीत होतो. ऐवढेच नव्हे तर गावात व आजूबाजूच्या खेड्यात कोणी लग्नाच्या वयात आलेले मुले असतील तर त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगत होतो. तसेच पुसद, मानोरा, दारव्हा, दिग्रस, यवतमाळ इत्यादी लहानमोठ्या शहरात मी आणि एकनाथ तुपसुंदरे असे दोघेही एकत्र दौरा करून तेथील सामाजिक कार्यकर्त्यांना भेटून या कार्यक्रमाची माहिती देत होतो. प्रत्यक्ष संपर्क साधून वधुवर परिचय मेळाव्याची गरज का आहे आणि हा उपक्रम आम्ही का हातात घेतला,  हे जरा विस्ताराने त्यांना सांगणे आवश्यक होते. कारण त्याकाळात ह्या  उपक्रमाने अजूनही मुळ धरले नव्हते. तसे या मेळाव्याबाबतही समाजात कमालीचा गैरसमज होता. हा काय मुलांचा बाजार आहे काय? असे काही लोक प्रश्न विचारीत. एक गोष्ट सांगायची म्हणजे,  आम्ही त्याच निमित्ताने यवतमाळला गेलो होतो, तेव्हा मा. कांशीरामजी यांच्या चळवळीत डीएसफोर या तरुणांच्या संघटनेत काम करणारे आनंद गायकवाड, अमोल गणवीर यांना भेटलो. त्यांना घेऊन आम्ही यवतमाळमधील पाटीपुरा, अंबिकानगर, जामनकरनगर अशा काही मोहल्ल्यात फिरलो. त्यावेळी विशेष अशी एक बाब आमच्या नजरेत भरली ती म्हणजे येणारे पाहुण्यांची जेवणाची व्यवस्था कशी करावी याचे प्रात्यक्षित तेथे पाहिले. ते बामसेफच्या कार्यकर्त्यांकडे आळीपाळीने जेवणाची व्यवस्था करीत. आमची जेवणाची व्यवस्था जामनकरनगरमध्ये राहणारे विठठल वाणी यांच्याकडे केली होती. ते बामसेफचे कार्यकर्ते होते. अशा प्रकारची प्रथा तेथे पडली होती. सुरुवातीच्या काळात खुद्द मा.कांशीरामजी यवतमाळला येत; तेव्हा ते एसटी स्थानकाजवळील सायकल भाड्याने घेऊन फिरत; तेव्हा त्यांची व सोबत आलेल्या लोकांची अशीच जेवणाची व्यवस्था करीत असल्याचे सांगत होते. काहीजण मोठ्या अभिमानाने सांगत की, मा. कांशीरामजी आमच्या घरी जेवले होते.

त्याकाळात यवतमाळ जिल्ह्यात केवळ दोन ठिकाणी म्हणजे एक पांढरकवडा आणि दुसरे दिग्रस येथे वधुवर परिचय मेळावा आयोजित होत होता. पांढरकवडा येथे सामाजिक कार्यकर्ते जनपथगुरुजी हे असा मेळावा आयोजित करीत होते. त्यांनी आमच्या दिग्रस येथील  मेळाव्याबद्दल ऐकून आम्हाला त्यांच्या वधुवर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमाला निमंत्रित केले होते. त्यावेळी मी व एकनाथ तुपसुंदरे असे दोघेही या मेळाव्याला हजर झालो होतो. मला तेथे माझे मनोगत मांडायला संधी मिळाल्याने मी माझे विचार मांडले होते. मी त्यावेळी खालील मुद्दे प्रामुख्याने मांडले होते. 

१. पुर्वी मुलं विवाहयोग्य झालेत की नातेवाईक आणि ओळखीचे लोक शोध घेत असत. पण आता नोकरी-व्यवसायासाठी गाव आणि नातेवाईकांना सोडून दूर-दूरच्या ठिकाणी जात असल्याने ही व्यवस्था मोडकळीस आली आहे. म्हणून वधुवर परिचय मेळाव्याची गरज निर्माण झाली आहे. 

२. कोणते मुलं-मुली  लग्न करू इच्छितात हे मेळाव्यात भाग घेतल्याने कळते. एरवी कळत नाही. 

३. मुलं-मुली शोधतांना पालकांचा जो पैसा आणि वेळ खर्च होतो तो मेळाव्याने टळतो.

४. मेळाव्यात अनेक मुलं-मुली एकाच वेळेस एकाच ठिकाणी पाहता येतात. 

५. मुली पाहण्याच्या ज्या परंपरागत प्रथा आहेत. त्या मेळाव्याने टाळल्या जातात. रूढी-परंपरांना दूर सारून परिवर्तन घडवून आणता येते. 

६. मेळाव्याने समाजातील आंतरीक पोटजाती मिटवीणे शक्य होते. त्यामुळे बौद्ध समाज एकसंघ होण्यास मदत होते. 

७. समाजात जर कुठे हुंडापद्धत अस्तित्वात असेल तर त्याविरोधात मेळाव्यात प्रबोधन होत असल्याने हुंडापध्दत नष्ट होण्यास मदत होते. 

८. केवळ लग्न जुळणे एवढाच मर्यादित उद्देश न राहता या निमित्ताने तरूण-तरूणी एकत्र येतात. त्यामुळे त्यांना समाजात वावरण्याची संधी मिळते. सर्वांसमोर येऊन परिचय देत असल्याने ‘स्टेज डेअरींग’ निर्माण होऊन आत्मविश्वास वाढतो. 

९. मेळावा म्हणजे तरूणांच्या उत्साही मनाचे विचारपीठ  असल्याने त्यांच्यात बाबासाहेबांचे विचारधन पेलण्याचे सामर्थ्य निर्माण होऊ शकते. 

१०. मेळावा हा नविन मुल्य व परिवर्तन निर्माण करण्याचे माध्यम बनू शकते. 

ह्या मेळाव्याला आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून नामाकिंताना  बोलावून त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पाडीत होतो.

या मेळाव्याला पांढरकवडा येथील प्रा. हरीश्चंद्र भेले जे माझ्या  यवतमाळच्या अमोलकचंद कॉलेजच्या  होस्टेलमध्ये आमचे मार्गदर्शक होते, यवतमाळ येथील बौध्द धम्माचे गाढे अभ्यासक आणि यवतमाळ जिल्हा परिषदेत लेखाधिकारी असलेले पी.यु. लोखंडे, तसेच माझे होस्टेलमधील मित्र व त्यावेळचे यवतमाळचे जिल्हा नियोजन अधिकारी असलेले बी.आर.कांबळे, कळंब जि.यवतमाळ येथील कॅालेजचे प्राचार्य सुभाष खंडारे  अशा व्यक्तींना निमंत्रित केले होते.  

काही स्थानिक लोकांना आमच्या या सामाजिक कार्याबद्दल असूया वाटत होती. ते  आमच्यावर  टीका करीत होते. ते म्हणत की, ‘तुम्ही बाहेरून येता व येथे कार्य करता, आम्ही काय मेलोत का?’ असे कडवटवणे बोलत. यावर  मी त्यांना सांगत होतो की, ‘तुम्ही केवळ बाबासाहेबांची जयंती साजरी करता. बाकी कोणतेही कार्यक्रम म्हणजे व्याख्यानमाला, वधुवर परिचय मेळावा, विवाह मेळावा, लायब्ररी चालविणे इत्यादी कार्ये करीत  नाहीत. आम्ही जयंतीचा कार्यक्रम सोडून ही कार्ये करीत आहोत, जे तुम्ही करीत नाहीत. आम्हीही तुमच्यापैकीच आहोत. त्याशिवाय तुम्ही घेत असलेल्या जयंतीच्या कार्यक्रमात आम्हीही पण मदत करू. नोकरी निमित्त आम्ही गावोगावी फिरतो. जिथे जाऊ, ते आमचे गाव असते. म्हणून त्या गावात समाजकार्य करणे हे आमचे कर्त्यव्य ठरते.’ असं सांगितल्यावर त्यांचा विरोध हळूहळू कमी होत गेला. दिग्रस येथे घंटीबाबाची यात्रा दरवर्षी  भरत असते. मी नागपूरला जाऊन फुले, शाहू, आंबेडकर साहित्याची पुस्तके विकत आणून यात्रेमध्ये ते विकत होतो. उद्देश हा की लोकांनी ह्या पुस्तकांचे वाचन करावे. उरलेली पुस्तके आम्ही लायब्ररीत लोकांना वाचायला ठेवली होती.

आम्ही आयोजित करीत असलेल्या कार्यक्रमाच्या बातम्या लगेच वृतपत्रात सविस्तरपणे झळकत असल्याने तेथील वार्ताहर पण अचंबित होत होते. सुरुवातीला मी तेथील वृत्तपत्रांच्या वार्ताहरांना बातम्या स्वतः लिहून त्यांच्या घरी नेवून देत होतो. ते कधीही स्वतः कार्यक्रमस्थळी येऊन बातम्या घेत नव्हते. अशी प्रथा इतरांच्या बाबतीत होती की नाही, माहित नाही पण त्यावेळी निदान आमच्या बाबतीत तरी होती. त्यांच्याकडे दिलेल्या बातम्या कधी येत, कधी येत नव्हते. नागपूरच्या दैनिक लोकमतच्या संपादक मंडळात काम करीत असलेले जयंत नरांजे हे माझा लहान भाऊ जो नागपूरला त्यावेळी मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता, त्याचा जवळचा मित्र होता. त्यामुळे ह्या बातम्या सरळ त्याच्याकडेच सविस्तर लिहून पाठवित असल्याने तोच आमच्या बातम्या प्रसिध्द करीत होता. 

त्याशिवाय नेताजी राजगडकर पण ह्या बातम्या नागपूरच्या आकाशवाणीवरून प्रसारित करीत होता. हा पण माझ्या भावाचा जवळचा मित्र होता याचा यापूर्वी उल्लेख केला आहे.

एकदा दिग्रसला ओबीसींना आरक्षण देण्यासाठी मंडल आयोग लागू करण्याच्या संदर्भात मिटिंग झाली होती. बहुजन समाज पार्टीने लोकजागृतीची ही मोहीम सुरु केली होती. त्यावेळी यवतमाळहून दशरथ मडावी, केशव खिल्लारे आणि शेटे गुरुजी आले होते. शेटे गुरुजी हे मला यवतमाळ येथे म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शिकत असतांना चित्रकला विषयाचे शिक्षक होते. ते ओबीसी समाजाचे होते. ही मिटिंग आयोजित करण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता.

बामसेफ/बहुजन समाज पार्टीतर्फे देशात निरनिराळ्या ठिकाणी आरक्षण: एक सहभागाचा मुद्दा या विषयांतर्गत पाच मोठमोठे परिसंवाद आणि ५०० चर्चा सत्रे आयोजित करण्यात आले होते. त्याचा एक भाग म्हणून यवतमाळला सुद्धा दि.१९ ऑक्टोबर १९८५ रोजी चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. मी सुद्धा दिग्रसचे काही लोकांसोबत या कार्यक्रमाला गेलो होतो.

याच दरम्यान प्रकाश आंबेडकर यांचा दौरा ठिकठीकाणी सुरु होता. यवतमाळचे चंदन तेलंग व डी.जी.अंडे हे त्यांचे कार्यकर्ते होते. त्यांनी दिग्रस येथे दौरा आयोजित केला होता. आम्हीच त्यांच्या सभेचे आयोजन केले होते. त्यांच्या सभेचा खर्च आणि जेवणाची व्यवस्था आम्हीच केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून लोकांना जबरदस्त आकर्षण आणि जिव्हाळा असल्याने या सभेला खूप गर्दी जमा झाली होती. तेवढ्यात विधानसभेची निवडणूक आली होती. राठोड नावाचा एक व्यक्ती आमचे कार्यकर्ते एकनाथ तुपसुंदरे यांचे वडील गोमाजी तुपसुंदरे यांचेकडे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाची तिकीट मिळविण्यासाठी आले होते. त्यावेळी एकनाथ तुपसुंदरे यांचे काका रामभाऊ तुपसुंदरे (रेंजर) हे आम्हाला घेऊन अकोला येथे प्रकाश आंबेडकरकडे त्यांची शिफारस करण्यासाठी घेऊन गेले होते. आमच्या शिफारशीमुळे त्यांना तिकीट मिळाली होती, हे आवर्जून येथे नमूद करावेसे वाटते. रामभाऊ तुपसुंदरे हे राजकीय चळवळीत कार्य करीत होते. तसे ते व गोमाजी तुपसुंदरे हे आमचे मार्गदर्शक पण होते. 

त्यापूर्वी  डिसेंबर  १९८० मध्ये  प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार करण्यासाठी सभा झाली होती. या कार्यक्रमाच्या आयोजनात माझ्याच शेजारी राहणारे  भालेराव यांचा प्रामुख्याने  सहभाग होता. या कार्यक्रमाच्या खर्चाचा भार कर्मचारी वर्गांनी उचलला होता. मी पण त्यांच्यासोबत होतो. तसेच अरुण तुपसुंदरे, एकनाथ (भय्या)  तुपसुंदरे हे पण सोबत होते. आम्ही सारेजण नोकरीवर असल्याने आम्ही समोर न येता तरूणांना  समोर करून हा कार्यक्रम घेतला होता. यात गौतम तुपसुंदरे, भीमराव कीर्तने व  गोवर्धन पुनवटकर हे युवक सक्रीय होते. त्यांच्याच सक्रियतेमुळे हा कार्यक्रम पार पडला होता. 

तसेच त्रैलोक्य बौध्द महासंघाचा दौरा त्यावेळी सुरु होता. दिग्रस येथे त्यांच्या सभेची तयारी करण्यासाठी पुण्यावरून त्यावेळचे प्रसिद्ध आंबेडकरी गीतांचे गीतकार राजानंद गडपायले यांचे भाऊ  माझ्याकडे आले होते. त्यांची सभा आम्हीच आयोजित करून त्यांचा सारा खर्च आम्हीच केला होता. या सभेला पण अलोट गर्दी जमा झाली होती.  गीतकार राजानंद गडपायले यांच्या बाबतीत आणखी माहिती द्यायची म्हणजे ते मुळचे यवतमाळ येथील पाटीपुरा येथे राहणारे होते. पण नंतरच्या काळात ते पुणे येथे राहायला गेलेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.१५ जून १९५० रोजी राजानंद गडपायले यांचा कार्यक्रम पाहिला. त्यांच्या सादरीकरणावर खुश होवून बाबासाहेबांनी स्वहस्ताक्षरात प्रशत्रीपत्र दिले होते. ही माहिती मी यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक आनंद गायकवाड यांनी संपादित केलेल्या ‘मुक्काम पोस्ट : पाटीपुरा’ या पुस्तकात वाचली.  ‘थांबारे, दलितांनो… ऎसा निष्ठुर करुनिया बेत, नका रे उचलू भीमाचे प्रेत…’ हे गाणे त्यांनीच लिहलेलं आहे. माझा मोठा भाऊ शामरावदादा हे गाणे जेव्हा भजन मंडळात म्हणायचा; तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी तराळत होते, इतके हे गाणे हृदयाला भिडणारे होते.

माझ्या शेजारी अजय गजभिये राहत होते. ते कृषी खात्यात अधिकारी होते. ते मला मा. कांशीरामजी चालवीत असलेल्या बामसेफ आणि त्यांनी स्थापन केलेल्या बहुजन समाज पार्टी बद्दल माहिती देत होते. या चळवळीत काम करण्याचे ते मला सांगत होते. पण मी या सामाजिक कार्यात गुंतून गेल्याने मी त्याकडे दुर्लक्ष करीत होतो. पण कांशीरामजी यांच्या चळवळीचे जे काही कार्यक्रम आयोजित होत, त्यात आमचा प्रामुख्याने सहभाग असायचा. 

एकदा यवतमाळहून चांदेकर नावाचा कार्यकर्ता माझ्याकडे आला होता. तो  बामसेफचा कार्यकर्ता होता. तो बहुतेक  जीवन विमा खात्यात नोकरीवर होता. आम्ही रात्रीला बौध्द मोहल्ल्यात त्यांची कॅार्नर मिटिंग आयोजित केली होती. ह्या मिटींगला बरेच लोक जमा झाले होते. त्यात आर.एस.गवई यांच्या रिपब्लिकन पार्टीच्या गटाचे कार्यकर्ते पण हजर होते. ह्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले. आम्हाला पण फारशी राजकीय माहिती नव्हती. राजकीय मंच असल्याने आम्ही उघडपणे त्यात भाग पण घेऊ शकत नव्हतो. अशी त्यावेळी अवघड परिस्थिती निर्माण झाल्याने कशीतरी बामसेफच्या त्या कार्यकर्त्याची त्यातून आम्ही सुटका करून घेतली होती.        

तसेच मी आणखी एक प्रयत्न करून पाहिला. ‘बौध्द कर्मचारी समाज सुधारक मंडळा’च्या मार्फत सभागृह आणि बालोद्यानसाठी जागेची मागणी करून तसा प्रस्ताव पाठविला होता. खरं म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला बुध्दविहार बांधायचे होते. नगर रचनाकार यवतमाळ यांनी उपविभागीय अधिकारी दारव्हा यांना लिहिलेल्या पत्रात सरकारी दराच्या किंमतीने पैसे भरून जागा देऊ केली होती. यासाठी पैश्याची जमवाजमव करण्याची आमची तयारी होती. त्यावेळी बी.आर.कांबळे हे यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून कार्यपदस्थ होते. ते आणि  मी असे दोघेही  यवतमाळच्या अमोलकचंद कॉलेजमध्ये शिकत असतांना होस्टेलमध्ये राहत होतो. म्हणून ते माझे चांगले परिचित आणि जवळचे मित्र होते. त्यांच्या माध्यमातून मी हे काम करीत होतो. पण ते पूर्णत्वास जाऊ शकले नाही.

मुलांच्या बाबतीत दिग्रस येथील आठवणी सांगायच्या म्हणजे आमच्याशेजारी हिंदू कुटुंब होतं. त्यांनी गणपतीच्या सणाच्या वेळेस गणपती बसविला होता. त्यांच्या दोन मुलांसोबत प्रज्ञाशील खेळायचा. ते पाहून प्रज्ञाशीलनेही गणपती बसविण्यासाठी हट्ट धरला होता. आता त्याच्या बालमनाला कसं समजावून सांगायचं की, गणपती हे हिंदू देवता आहे आणि त्याबाबत बाबासाहेबांनी, ‘मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.’ अशा बावीस प्रतिज्ञापैकी तिसरी प्रतिज्ञा दिली होती. हे त्याला समजावून सांगणे अवघडच होतं. आणखी शेजारी एक हिंदू कुटुंब होतं. या सर्व मुलांनी मिळून घराबाहेर गणपती बसविला होता. त्यात प्रज्ञाशील पण सामील होत होता. आणखी एक गोष्ट- करुणा त्यावेळी पाचक वर्षाची असेल तिचं पोट सारखं दुखायचं. एकदा फारच दुखत होतं. आमच्या शेजारी खान नावाचे डॉक्टर होते. त्यांनी घरीच सलाईन लावली होती. म्हणून तिला पुढील उपचारासाठी अजयकडे नागपूरला घेऊन जायचं ठरविलं होतं. नागपूरला जाणारी रात्रीची बस होती. समाजातील जमलेल्या बायांनी त्रिशरण, पंचशील म्हणून प्रार्थना केली होती. त्यावेळी अजय मेडिकल कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहत होता. जेवणाची वेळ झाली की अजयचे मित्र तिला होस्टेलच्या कँटीनमध्ये जेवायला घेऊन जात. इतकी ती तेथील मुलांना आवडत होती. ती दिसायला चुणचुणीत दिसत होती. अजयने सिनियर मुलांकडून एक्स रे सारख्या चाचण्या घेऊन कुठला तरी आजाराची शक्यता वर्तवली होती. कदाचित ऑपरेशन करावे लागेल असेही त्यांचे मत पडले होते. म्हणून अजयने थेट कॉलेजच्या डीनची अपॅायमेंट घेतली. त्यांनी तपासून मला म्हणाले की, काळजी करण्यासारखं काही नाही. फक्त तिच्या आवडी-निवडीकडे लक्ष द्या. त्यांनी औषधी लिहून दिल्यात. परत तिचं पोट कधी उमळलं नाही. मी होस्टेलमध्ये बघितलं की आपली मुले खूप मेहनत घेऊन रात्रंदिवस अभ्यास करीत होते. तरीही आपल्या मुलांना तेथील जातीयवादी प्राध्यापक नापास करीत. उच्चवर्णीय मुले नुसते गाड्या घेऊन फिरवीत, तरीही ते पास होत. इतका जातीयवाद हे उच्चवर्णीय प्राध्यापक करीत असत. अशा प्रकरणात एका प्राध्यापकाला पकडले होते. ‘तुम्ही कशाला येथे शिकायला आले? तुमची शिकायची लायकी नाही,’ असे म्हणत असल्याची बातमी त्यावेळी पेपरमध्ये बातमी आली होती. आपल्या एका मुलाने हे प्राध्यापक लोक आपल्या मुलांना वर्गात कसे नाउमेद करीत असतात, त्याचे रेकॉर्डिंग केले होते. ही कॅसेट विधानसभेत एका आमदाराने वाजवून दाखविली. हे प्रकरण त्यावेळी खुपच गाजले होते.

९. वणी येथे बदली

त्यादरम्यान माझी बदली वणी जिल्हा यवतमाळ येथे मे १९८६ मध्ये प्रशासकीय कारणास्तव झाली होती. वणी हे यवतमाळ जिल्ह्यातील शेवटचं टोक ! त्यावेळी आमच्या कार्यालयाच्या परिभाषेत एक म्हण होती- ‘ज्याचे नाही कोणी,  त्याने जावे वणी.’  माझे मित्र असे म्हणून मला चिडवीत असत. हो… ते खरंच होतं… कारण आमचं कोणी नाही, आम्ही त्यांच्या जातीचे नाहीत, म्हणून तर ते आम्हाला दूरच्या ठिकाणी बदलीवर पाठवित असत.

माझ्या नंतर बौद्ध कर्मचारी समाज सुधारक मंडळ या संस्थेचे काम विजय सरदार आणि एकनाथ तुपसूंदरे पाहत होते. त्यांनी सुध्दा जागा मागणीच्या बाबतीत त्यापुढील पत्रव्यवहार करून हे काम रेटण्याचा प्रयत्न केला होता. नगर रचनाकार यवतमाळ यांनी जी जागा देऊ केली होती, तेथे पूर्वीच अतिक्रमण झाले असल्याने ही जागा मिळविणे अवघड झाल्याचे असे मला कळले होते. यामुळे हे काम माझ्याकडून अधुरे राहून गेले, याची सल मला नेहमी टोचत होती. माझी जर बदली झाली नसती तर मी निश्चितच त्यावर काहीतरी मार्ग काढून जागा मिळविण्यासाठी जोरकसपणे प्रयत्न करून पाहिला असता, असं मला राहून राहून वाटत होतं.

त्यादरम्यान विधानसभेच्या निवडणुका आल्या होत्या. कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नागपूर आकाशवाणीच्या नोकरीचा राजीनामा देऊन नेताजी राजगडकर राळेगाव मतदार संघातून निवडणूक लढवीत होते. त्यावेळी युनियनच्या कार्यकर्त्यांना त्यांचा प्रचार करण्याचा आदेश दिला होता.  मी त्यावेळी कम्युनिस्ट प्रणीत कामगार संघटनेत सक्रियपणे आणि महत्वाच्या पदावर काम करीत असल्याने मी व युनियनचे यवतमाळ सर्कलचे सचिव पी.पी. घाडगे असे दोघेही त्यांच्या गावाला व माझ्या सासुरवाडीला प्रचारासाठी गेलो होतो. कारण ही दोन्हीही गावे कळंब तहसीलमध्ये येत असल्याने राळेगाव मतदार संघात होते.

त्यावेळी प्रत्येक पक्ष आपल्या अखत्यारीत कामगार संघटनेच्या मुरलेल्या सभासदांना पक्षाची फी भरून  रितसर सभासद बनवून घेत असत. इंटक संघटना काँग्रेस पक्षाचे, बिएमएस संघटना भाजपचे व तसेच आयटक संघटना पण कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य बनवून घेत होते.  म्हणून  माझ्याही मागे संघटनेचे नेते कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होण्यासाठी भरीस पडले होते. 

पण कोणत्याही एका पक्षाची बांधिलकी ठेवावी, या मताचा मी नव्हतो. मुळात मी आंबेडकरी विचारधारेशी जुळला असल्याने त्यांच्या या आग्रहाचा  स्विकार करणे शक्यच नव्हते. 

त्यानंतर  वणीला बदली होण्यापूर्वी मी दिग्रसला होतो; तेव्हा सामाजिक कार्य करीत असतांना माझा दलित पँथरच्या कार्यकर्त्यांशी संबंध येत होता. दिग्रसला एकदा दलित पँथरचे कार्यकर्ते पुंडलीक इंगोले यांनी  मोर्चा आयोजित केला होता. त्यात सुध्दा माझा सक्रीय सहभाग होता. माझं हे कार्य वणीच्या दलित पँथरच्या कार्यकर्त्यांना दिग्रसच्या कार्यकर्त्यांनी कळविले असल्याने त्यांनी माझ्याशी संपर्क केला होता. त्याशिवाय  मी वणीला आलो; तेव्हा रेल्वे स्टेशन परिसरात जयंतीच्या कार्यक्रमात मला प्रमुख वक्ता म्हणून बोलाविले होते. माझा हा समाजकार्यातील सहभाग पाहून एकदा मला पँथरच्या नेत्यांनी मिटींगला बोलाविले होते. त्यावेळी रिडल्स प्रकरण गाजत होतं. हिंदू लोकांनी दंगलीचं वातावरण तयार केले होतं. त्यामुळे बौध्द समाज भयभीत झाला होता. मिटिंगमधील  प्रक्षोभक चर्चा ऐकून मी व्यथित झालो होतो.  मी त्या ठिकाणी सांगितले होते की, बुद्धांची शिकवण ही शांती आणि अहिंसेची आहे. माझ्या अशा भूमिकेमुळे  मिटींगचा मूड थोडाफार बदलला होता. माझ्या विरोधी भूमिकेमुळे मला मिटींगला बोलावणे त्यानंतर टाळत होते.

मुळावा येथील भन्ते डॉ.प्रा.खेमधम्मो चारचाकी गाडी घेऊन धम्म प्रचारासाठी फिरत असतांना ते माझ्याकडे आले होते. एकदा आम्ही मुळावा पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी येथे बुद्धविहाराचे बांधकाम सुरु होते. तेथे मुलांची शाळा पण दहावीपर्यंत चालवीत होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला त्यांच्या ह्या उपक्रमाची माहिती दिली होती. वणीला आल्यावर त्यांच्या सोबत गावात फिरून त्यांना दान पण जमा करून दिले होते. घरोघरी फिरतांना कुणाकडे देवांचे फोटो अथवा देव्हारा दिसला की,  ते त्यांचे प्रबोधन करीत असत. ते सांगायचे की, ‘आमचे पूर्वज हजारो वर्षापासून देवं पुजत आले. पण कोणत्याही देवांनी आमचा उध्दार केला नाही. म्हणून तुम्ही देवं पूजनं सोडून द्या व हा देव-धर्म व यात्रा-जत्रावर होणारा खर्च मुलांच्या शिक्षणावर करा,  असे बाबासाहेब म्हणत असल्याचे सांगत.’  बाबासाहेबांच्या या उपदेशामुळेच आपली सारखी प्रगती होत आहे. या पद्धतीने ते समजावीत असल्याने ते देवांचे फोटो काढायला तयार होत होते. 

पण एक गोष्ट मला आवर्जून सांगावसे वाटते की, मी ब्रम्हपुरीला असतांना माझ्या खोली शेजारी अर्जुनजी गणवीर राहत होते. ते बिडी कारखान्यात चहा विकण्याचे काम करीत होते. ते अडीअडचणीला उसने पैसे देऊन मला मदत करायचे. त्यामुळे त्यांच्याशी घरोब्याचे संबंध निर्माण झाले होते. त्यांचा मुलगा महेंद्र याच्या लग्नाची पत्रिका आली होती. म्हणून मी माझी पत्नी कुसुम हिच्यासोबत ब्रम्हपूरीला गेलो होतो. तेथे गेल्यावर कळले की, त्याला जेलमध्ये बंद केले होते. कारण त्यावेळी दंगलीत एका ब्राम्हणाच्या मुलाला त्याच्या मित्राने जबरदस्तीने ओढून आणल्याने दंगलीतील इतरांना सोडून त्यालाच मारहाण झाली होती आणि त्यात हा गोवला गेला होता. पण या प्रसंगानंतर ती दंगल मात्र पूर्णपणे शमली होती. म्हणजे याचा अर्थ दंगलीत बहुजन समाज मेला तर चालते पण ब्राम्हणांना मात्र झळ पोहचायला नको. ही बाब प्रकर्षाने अधोरेखित झाली होती.

आता अजयचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले होते. तो एमबीबीएस आणि एमएस (जनरल सर्जरी) इतका शिकला होता. त्याला देवलापार जि. नागपूर येथे मेडिकल ऑफिसरची नोकरी मिळाली होती. त्याचे लग्न दि. २८.०१.१९८८ रोजी नागपूरचे पी.सी.पाटील, कार्यकारी अभियंता यांची मुलगी मीनाक्षी पाटील हिच्यासोबत झाले. ती पण त्यावेळी बिएएमएस इतकी शिकली होती. आता तिने एमए आणि पिएचडी केल्याने तिला चंद्रपूर येथे प्राध्यापीकेची नोकरी मिळाली. अजय पण चंद्रपूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये रेसिडेंट डॉक्टर म्हणून नोकरी करीत होता. त्याचे लग्न नागपूरला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वणी येथे माझ्या राहत्या घरी रिसेप्शनचा कार्यक्रम घेण्यात आला होता.

वणी येथे असतांनाच दि. ६.११.१९८६ ते २७.११.१९८६ या बावीस दिवसाच्या कालावधीत पहिल्यांदाच विद्युत मंडळाकडून मिळणाऱ्या भारत भ्रमण सवलती अंतर्गत काठमांडू पर्यंत प्रवास केला. कुटुंबांतीत सर्वांना घेऊन फिरायला गेलो होतो. मुलं त्यावेळी अगदी लहान होते. हा प्रवास यवतमाळच्या आमच्या कार्यालयातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता. त्यावेळी दोन ट्रॅव्हल बसेस निघाल्या होत्या. या प्रवासात भेडाघाट जिथे नर्मदा नदी आणि पांढरेशुभ्र संगमवरी दगडं, पाण्याचे तुषार उडविणारा धबधबा होता, मैहर येथे उंच टेकडीवर मंदिर, खजुराहो येथे सुंदर शिल्प असणारे अनेक मंदिरे, शिल्पात दैनदिन जीवन कोरलेलं, पण प्रामुख्याने कामक्रीडेचे विविध प्रकारचे शिल्पे आकर्षून घेत होते. पण हे पाहतांना  कोणताही कामुक भाव अथवा उत्तेजना मनात येत नव्हता. अलाहाबाद- अलाहाबादला आता प्रयागराज म्हणतात. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जन्मस्थान- आनंद भवन,  त्रिवेणी संगम, हिंदुच्या पौराणिक कथांनुसार गंगा, यमुना आणि सरस्वती अशा तीन नद्यांचा त्रिवेणी संगम, बोटीने जावे लागते. या बोटीवर पंडे-पुजारी बसलेले असतात. हिंदू लोक मोठ्या भक्तिभावाने त्यांच्याकडून नारळ, फुलं व दुध विकत घेऊन त्या संगमावर वाहत असतात. कुणाची इच्छा नसली तरी हे पंडे लोक ही सामुग्री विकत घेण्यासाठी जबरदस्ती करीत होते. एका व्यक्तीचा फक्त त्यांच्या नारळाला हात लागला म्हणून त्याच्याकडून त्यावेळी पाच रुपये अरेरावी करून वसूल केले होते. गंमत अशी की, हे पंडे अर्पण केलेले फुलं, नारळ नदीत वाहू न देता, लगेच ताटाने पकडीत व त्याच वस्तू परत दुसऱ्याला विकत. म्हणजे एका नारळाचे व फुलांचे आपल्या डोळ्यादेखत हजारो रुपये करीत होते. त्यांची ही चलाखी धडधडीत डोळ्याने दिसत असतांना हिंदू लोक अशा अंधश्रद्येला कसे बळी पडत, तेच कळत नव्हतं. गंगामाय पण अशी भक्तांची होत असलेली फसवणूक कशी खपवून घेत होती काय माहित? बनारस- बनारसला वाराणशी, काशी असेही म्हणतात. येथे आमचा मुक्काम तीन दिवस होता. या ठिकाणी आम्ही बनारशी शालू विकत घेतल्या होत्या. पहिल्या दिवशी आम्ही बाजारात फिरून भाव पाहिला. त्यावेळी लक्षात आले होते की, येथे भाव करायला पाहिजे. कारण दुकानदार सरकारी दुकान, सोसायटीचे दुकान असे काहीबाही सांगून भाव होत नाही असे खोटेच सांगत. पण ते खरे नव्हते. त्यांनी सांगितलेली किंमत अर्ध्यावर येऊ शकते, हे आम्हाला दिसून आले होते. मग आम्ही दुसऱ्या दिवशी शालू घेतल्या. म्हणून स्वस्तात पडल्या. तसेच आम्ही गंगा नदी पाहायला गेलो होतो. अर्धवट जळालेले प्रेत गंगेच्या प्रवाहात वाहत जात असतांना दिसत होते. शहरातून वाहत आलेले घाणेरडे पाणी गंगेच्या नदीत मिसळत. अशा घाणेरड्या पाण्यात लोकांना डुबकी मारतांना आश्चर्य वाटत होते. येथे आंघोळ केल्याने पापमुक्त होवून मोक्ष प्राप्त होते, असा हिंदू लोकांचा समज. एवढेच नव्हे तर हे घाणेरडे पाणी तीर्थ म्हणून पीत व सोबत घरी आणण्यासाठी बॉटलमध्ये भरून घेत. सारनाथ- बनारसपासून दहा किलोमीटर. बुद्धगयेला भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यावर ते येथे आलेत. त्यांनी तेथील पाच भिख्कूंना धम्मोपदेश दिला. भगवान बुद्धांनी या धम्माचा प्रचार पंचेचाळीस वर्षे महापरिनिर्वाण पर्यंतच्या अंशीव्या वयापर्यंत केला. त्यांनतर या धम्माला राजा बिम्बिसार, राजा प्रसेनजीत, राजा मिलिंद, हर्षवर्धन, कनिष्क, सम्राट अशोक इत्यादी अनेक राजांचा राजाश्रय मिळाल्याने देशातच नव्हेतर जगात प्रसार झाला. भारतात हा धम्म साडेबाराशे वर्षेपर्यंत टिकला होता. पण वैदिक धर्माच्या प्रतीक्रांतीनंतर हा धम्म लयाला गेला. पण भारताबाहेरील अनेक देशात हा धम्म अजूनही प्रचारात आहे. हा धम्म विज्ञानाशी सुसंगत असल्याने अनुयायी सारखे वाढत आहेत. सारनाथ येथील वातावरण अगदी प्रसन्न असते. येथील हरीण पार्क, मुलगंधकुटीविहार, भग्नावस्थेतील अशोक स्तंभ पाहतांना मन भारावून जाते. बुद्धगया- गयेला भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्याने हे स्थळ पवित्र मानल्या जाते. सम्राट अशोकांनी बांधलेला महाबोधीविहार, पिंपळाचे वृक्ष म्हणजेच बोधिवृक्ष हे खास आकर्षण. हे बौद्धांचे पवित्र स्थळ असतांनाही हिंदूच्या ताब्यात आहे. ही एक खटकणारी बाब आहे. हिंदुनी त्यांच्या देव-देवता घुसवल्या आहेत. तेथील गाईड पण अंधश्रद्धा पसरवणारी चुकीची माहिती देत असतात. येथे प्रत्येक बौद्ध राष्ट्रांनी विहार बांधले आहेत. राजगृह- राजगिरी पण म्हणतात. येथे जपानने बांधलेले विश्वशांती स्तूप आहे. अत्यंत सुंदर आणि शांत ठिकाणी हा स्तूप पहाडावर बांधण्यात आले आहे. ते पहाण्यासाठी रोपवेने जावे लागते. नालंदा- नालंदा हे त्याकाळी प्रसिद्ध बौध्द विद्यापीठ होते. देश विदेशातील हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत. आता हे भग्नावस्थेत पडलेलं दिसते. पावापूरी- येथे भगवान महावीर यांचे निर्वाण झाले होते. येथूनच काही अंतराने नेपाळची सीमा लागते. काठमांडू- नेपाळची राजधानी. पशुपतीनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. बुद्धविहार बघितलं. परत भारताच्या सीमेत आलो. सिलीगुडीवरून दार्जिलिंगला गेलो. तेथून कोलकाता, जगन्नाथपुरी- जगन्नाथ मंदिर, समुद्राचा परिसर. भुवनेश्वर, कोणार्क, सूर्यमंदीर, महानदीवरील हिराकुंड धरण इत्यादी प्रमुख स्थळे पाहून वणीला परतलो. विशेष सांगायचं म्हणजे ह्या प्रवासात आम्ही जसे हिंदूचे देवळे बघितलेत तसेच बुद्धगया, सारनाथ, राजगृह, नालंदा इत्यादी बौध्द स्थळे सुद्धा बघितलेत. पण हे पाहतांना असे आढळून आले की, हिंदुच्या देवळांपेक्षा बौद्धांचे स्थळे हे अगदी स्वच्छ, सुंदर आणि आल्हाददायक वाटले होते. देवळात पाय ठेवला की, पंडे-पुजारी दरवाज्यातच दान टाका म्हणून मागे लागत. इतकी भिकारी व भक्तांना लुटणारी वृती दुसरीकडे कुठे दिसली नाही.

माझ्या मुलांना मी सुरुवातीपासूनच म्हणजे दिग्रसला होतो; तेव्हापासून इंग्लीश शाळेत टाकले होते. माझा साळा धम्मदीप हा साडभाऊ कांबळे यांच्याकडे विदिशा येथे शिकत होता. त्याला पण वणीच्या शाळेत माझ्या मुलांबरोबर टाकले होते. त्याला नृत्याची आवड होती. त्याने शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात नागा डान्स व भांगडा डान्स खूप उत्कृष्टपणे केला होता, तर माझा मोठा मुलगा प्रज्ञाशील याने नाटकात मास्तराची भूमिका केली होती. दोघांचीही कलेबाबतची विशेष आवड वाखाणण्याजोगी होती, म्हणून हा उल्लेख केला.   

वणीला बौद्ध साहित्य संस्कृती मंडळ ही संस्था कार्यरत होती. या संस्थेचा मी उपाध्यक्ष झालो  होतो. 

मी पूर्वीपासूनच ए.बी.बर्धन यांच्या कामगार संघटनेत काम करीत आल्याने येथेही शाखा अध्यक्ष म्हणून जोमाने काम करीत होतो. आम्ही वणीला  दि. २७ फेब्रुवारी ते १ मार्च १९८७ या कालावधीत माझ्या नेतृत्वात   जिल्हास्तरीय  कामगार प्रशिक्षण शिबीर आणि मेळावा  आयोजित केला होता. ह्यावेळी जंगम जातीचे  पी.एस. डब्बावार हे सचिव  म्हणून होते. हे पण अनुसूचित जातीत मोडत होते. या मेळाव्याला संघटनेच्या इतर वरिष्ठ नेत्यांबरोबर कम्युनिस्ट पक्षाचे नेते  कॅा. सुदाम देशमुख  आले होते.  ही बाब आमच्यासाठी  विशेष महत्वाची  होती.   हा मेळावा मोठ्या प्रमाणात  यशस्वीरित्या पार पडला होता. 

माझा एम.एस.ई.बी.वर्कर्स फेडरेशन या युनियनमधील हा  शेवटचा सहभाग ठरला होता. कारण मी या  संघटनेच्या सदस्यत्वाचा आणि   शाखाप्रमुख पदाचा  दि. १.६.१९८८ रोजी राजीनामा देऊन या संघटनेतून कायमचा बाहेर पडलो होतो.

राजीनामा देण्यापूर्वीच  मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जे.एस.पाटील यांच्याशी संपर्क झाला होता. त्यावेळी ते विद्युत मंडळात अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांनी सांगितले की,  मागासवर्गीय संघटना सोडून बाकीच्या संघटना मागासवर्गीयांचे प्रश्न कधीही हातात घेत नाहीत. ते कधीही आरक्षणाचा साचलेला अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. कारण ते त्यांचे मुळातच प्रश्न  नसतात तर ते प्रश्न आपल्या समाजाचे आहेत, ते आपणच सोडविले पाहिजेत. खरंच होतं ! मलाही तसा खूप अनुभव आला  होता. 

माझ्यावरही वैयक्तिकरित्या होणारा सततचा अन्याय युनियनच्या नजरेस आणून सुध्दा युनियनचे वरिष्ठ पदाधिकारी केवळ माझी दिशाभूल करीत होते. सुरुवातीला माझी निम्मस्तर लिपिक म्हणून नेमणूक झाल्यावर दिग्रस येथे लेखाविभागाची पहिली लोअर अकौंटन्स परीक्षा बिना पुस्तकाने व अवगत ज्ञानाच्या आधारावर पास केली होती. त्यामुळे मला लगेच बढती मिळून उचस्तर लिपिक झालो. त्यानंतर आरक्षणाच्या आधारावर  दुसरी  बढती सहाय्यक लेखापालच्या जागेवर मिळून कोकणातील श्रीवर्धन उपविभाग येथे पाठविण्यात आले  होते. त्यांनतर मात्र मला हायर अकौंटन्स परीक्षा पास केल्याशिवाय त्यापुढील विभागीय लेखापालची बढती मिळणार नव्हती. नंतरच्या बढत्या मात्र ह्या सेवाज्येष्ठतेनुसार होणार होत्या. म्हणून मी ह्या परीक्षेला जेव्हा बसत होतो;  तेव्हा माझ्या लक्षात आले की,  या परीक्षेला जे विद्यूत मंडळाने खात्याच्या कामकाजासंबंधीत पुस्तके छापले होते,  ते माझ्याकडे उपलब्ध नव्हते. मी जेव्हा परीक्षा द्यायला जात होतो;  तेव्हा इतर परीक्षार्थी परवानगी असलेले हे  पुस्तके परीक्षेच्या ठिकाणी  घेऊन येत. माझ्याकडे मात्र एकही पुस्तक राहत  नव्हते. हे पुस्तके केवळ वरच्या पातळीवरील कार्यालयात उपलब्ध होत असे. आमच्या सारख्या खालच्या कार्यालयात मिळणे अवघड होते.  त्याशिवाय उपविभागात कामाच्या ओझ्यामुळे  पुरेसा  वेळ  आणि त्याबाबतचे  मार्गदर्शन पण मिळत नव्हते. म्हणून मी ठरविले होते की,  जोपर्यंत मी  विभागीय किंवा त्यावरील कार्यालयात बदलून जात नाही, तोपर्यंत परीक्षेला बसणे व्यर्थ आहे. म्हणून मी अर्ज करीत होतो की, मला झोन कार्यालय अंतर्गत डिव्हीजन,  सर्कल अथवा झोनल कार्यालयात  कुठेही बदली देण्यात यावी. जर झोन अंतर्गत बदली देता येत नसेल तर मला महाराष्ट्रात कुठेही झोनच्या बाहेर सुद्धा  बदली दिली तरी चालेल असा अर्ज दिला होता. विद्युत खात्यात मी पहिला व्यक्ती असेल की जो महाराष्ट्रात कुठेही आणि   झोनच्या बाहेर सुद्धा  बदली मागत होतो. पण मी अनुभवलं की, मला सतत एका उपविभागातून दुसऱ्या उपविभागात बदली देत होते. ही बाब मी युनियनच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आणून दिले होते. ते सांगत की,  तुमचा प्रश्न प्रशासनासमोर मांडला आहे आणि लवकरच सोडवणूक होईल. पण तेच लोक आडकाठी आणीत असल्याचे माझ्या लक्षात आले होते. कारण प्रशासनात व युनियनच्या वरिष्ठ पातळीवर हेच उच्चवर्णीय लोक बसलेले होते. त्यांना माहित होते की,  एकदा का मला उपविभाग सोडून वरच्या कार्यालयात  बदली दिली आणि मी परीक्षा उतीर्ण केली की,  पुढील बढत्याचा मार्ग मोकळा होईल. मग मी बढत्या घेत घेत कुठल्या कुठे जावून पोहेचेल. हे त्यांना नको होते. म्हणून मी त्यांची संघटना सोडून मागासवर्गीय संघटनेत सामील होण्याचे पूर्णतः मन बनविले होते. 

१०. यवतमाळ येथे बदली

त्यानंतर माझी योगायोगाने वणीवरून यवतमाळला स्थापत्य विभागात जून १९८८  साली बदली झाली. तेही माझ्यासाठी नव्हे तर युनियनच्या त्यांच्या एका कार्यकर्त्याची सोय म्हणून झाली होती. तो यवतमाळच्या कार्यालयात होता. मंडळाच्या नियमानुसार जास्त काळ एकाच ठिकाणी राहिल्याने त्याची बदली प्रशासकीय कारणास्तव अमरावती जिल्ह्यातील दूरच्या ठिकाणी झाली होती. त्याची बदली रद्द करून करून जवळच्या ठिकाणी आणण्यासाठी युनियन प्रयत्न करीत होती. त्यावेळी वणी हेच यवतमाळच्या जवळचे असलेले उपविभाग होते, जेथे मी काम करीत होतो आणि बदलीसाठी अनायसे अर्ज दिलेला  होता. म्हणून त्यांना नाईलाजाने मला  यवतमाळ येथे स्थापत्य विभागीय कार्यालयात त्याच्या ठिकाणी बदली द्यावी लागली व माझ्या वणी येथील ठिकाणी त्यांना बदली दिली. यवतमाळला आल्यावर मी लगेच पुस्तके जमवून परीक्षा दिली आणि विशेष म्हणजे सर्वांपेक्षा जास्त गुण मिळवून मी उत्तीर्ण झालो होतो. त्यामुळे मला आता पुढील बढत्या मिळण्यासाठी कुठलीही आडकाठी राहिली नव्हती. 

मी  पूर्वीच्या वर्कर्स फेडेरेशनचा राजीनामा देऊन मी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेत सामील होतांना मी एकटाच बाहेर  पडलो हे जरी खरं असलं, तरी पुढे मात्र ही संघटना यवतमाळ जिल्ह्यात सतत वाढत गेली, याचा मला खूप अभिमान वाटतो. मी ही संघटना स्थापन करण्यापूर्वी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना व्यक्तिशः भेटून हा मुद्दा समजावून सांगत होतो. त्यावेळी परिस्थिती अशी होती की, यवतमाळ सर्कलमध्ये अभियंता वर्ग नसल्यासारखेच होते. अभियंता हे अधिकार पदावर असत. गडचिरोली, चंद्रपूर सारख्या मागासवर्गीय इलाख्यात मुद्दाम मागासवर्गीय अभियंत्याची मोठ्या प्रमाणात भरती होत होती, पण यवतमाळसारख्या पुढारलेल्या जिल्ह्यात मात्र त्यांना नेमणुका अथवा बदल्या देत नव्हते. असे असले तरीही यवतमाळ येथे लेखा, सामान्य आस्थापना आणि तांत्रिक विभागात वर्ग ३ व ४ स्तरावर  काम करणारे अनेक कर्मचारी होते. हे कर्मचारी माझ्यासारखेच वर्कर्स फेडरेशनचे सदस्य होते.

मागासवर्गीय संघटना स्थापन करण्यापूर्वी कर्मचारी वर्गांची मानसिक तयारी करण्यासाठी मी ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी सम्यक विचार मंच’ नावाची  संघटना स्थापन करून त्या नावाने पत्रक काढून मागासवर्गीय संघटनेची आवश्यकता का आहे ही भुमिका पटवून देण्यासाठी  कामगारांना भेटत राहीलो. त्यात आरक्षणाबाबत साचलेला अनुशेष (बॅकलॅाग), पदोन्नती देतांना रोस्टर पद्धती अंमलात न आणणे, मागासवर्गीय कर्मचारी वर्गांवर बदल्या करतांना अन्याय करणे, गोपनीय अहवाल खराब करणे असे अनेक प्रकरणात  जातीयवादी दृष्टिकोनातून अन्याय-अत्याचार होत असतात. म्हणून अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आणि स्वताच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी मागासवर्गीय संघटन आवश्यक असल्याचे सांगत होतो. 

 दि. १ जानेवारी १९८९ रोजी नगर वाचनालय यवतमाळ येथे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची मिटिंग आयोजित केली. या मिटींगला कामगारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मिटींगच्या अध्यक्षस्थानी आस्थापना अधिकारी आर.के.हिवाळे होते. केंद्रीय संघटनेचे उपाध्यक्ष  एल.के.मडावी, प्रशासकीय अधिकारी हे प्रमुख मार्गदर्शक होते. त्यावेळी संघटनेची अस्थायी कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. या कार्यकारिणीत मला अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. उपाध्यक्ष जी.ए.अवसरमोर, सचिव एम.एस.मेश्राम, सहसचिव एन.एस. वाकोडे, कोषाध्यक्ष जे.डब्ल्यू. गणविर, संघटक आर.एम.पेंदोर व सातजण सदस्य म्हणून निवडल्या गेलेत. यातील काही कामात आलेत. काही बैठे बैल व घाबरणारे निघालेत. काहीजण जातीची ओळख प्रकट होईल म्हणून लपून राहून घाबरणारे होते.  

त्यानंतर अवसरमोल यांना सोबत घेऊन पूर्ण जिल्हाभर या संघटनेचा विस्तार करण्याची मोहीम  हातात घेतली. त्यावेळी बहुतेक मागासवर्गीय कर्मचारी हे वर्कर्स फेडेरेशनचे सदस्य असल्याने त्यांचे काही हितसंबंध या संघटनेशी  गुंतलेले होते.  शिवाय ते या संघटनेच्या  दहशतीत वावरत असल्याने सहजासहजी आमच्या या नवीन संघटनेत यायला  तयार होत नव्हते. त्यामुळे त्यांच्यातील भीती कमी करून त्यांची  हिंमत वाढविण्यासाठी व मागासवर्गीय संघटनेचे कार्य त्यांना समजावून सांगण्यासाठी मी यवतमाळ शहरातील कार्यालयात काम करणाऱ्या कामगाराच्या घरोघरी मिटिंग आयोजित करीत होतो. 

दि. १७.०१.१९८९ रोजी मुंबई येथील मागासवर्गीय  संघटनेचे वरिष्ठ नेते मा. डी.के.दाभाडे कार्यालयीन कामाकरिता आले होते आणि  जे नंतरच्या काळात केंद्रीय अध्यक्ष पण झाले होते, त्यांची मिटिंग पाटीपुरा यवतमाळ येथे मुख्य लिपिक करवाडे यांचे घरी घेतली होती. तसेच केंद्रीय सरचिटणीस जे.एस.पाटील यांची सुध्दा मिटिंग घेतली होती. त्याशिवाय मी यवतमाळ सर्कल मध्ये येणाऱ्या प्रत्येक सेंटर कार्यालयापासून ते विभागीय, उपविभागीय  कार्यालयापर्यंत भेटी देऊन संघटनेची गरज त्यांना समजावून सांगत होतो. वणी, कळंब, राळेगाव, पांढरकवडा, दिग्रस, आर्णी, लोनबेहळ, दारव्हा, पुसद, उमरखेड अशा दूरवरच्या ठिकाणी जावून संपर्क करीत होतो. मिटिंगा घेत होतो. 

दि.१९.१.१९८९ रोजी संघटनेचे सरचिटणीस जे.एस.पाटील यांच्या उपस्थितीत मिटिंग झाली होती. या मिटिंगमध्ये मागासवर्गीय संघटना कशी वाटचाल करीत आहे ते सविस्तरपणे सांगितले.

२९ व ३० जानेवारी १९८९ ला नांदेड येथे झालेल्या संघटनेच्या पाचव्या द्विवार्षिक   राज्यस्तरीय अधिवेशनाला १६ कर्मचाऱ्यांना घेऊन गेलो होतो. या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे हायकोर्टाचे निष्णात वकील, अॅडव्होकेट राहुल हुमणे व सिद्धार्थ लॅा  कोलेज मुंबईचे प्राचार्य सदांशिव हे आले होते. दुसऱ्या दिवशी दि. ३०.१.१९८९ रोजीच्या प्रतिनिधी सत्रात मी यवतमाळ सर्कलचा अहवाल सादर केला होता. 

दि. २२.०२.१९८९ रोजी दिग्रस येथे स्थानिक व पुसद येथील कर्मचाऱ्यांची मिटिंग घेतली होती. या मिटींगला तेली समाजाचे एच. एन. रोहणे प्रामुख्याने आले होते. नंतर ते संघटनेचे सदस्य झाले होते. तसेच बंजारी समाजाचे अभियंता  सुभाष राठोड यांनी सक्रियपणे भाग घेऊन  ते पण संघटनेचे सदस्य झाले होते. त्यामुळे ही संघटना इतर जातीत सुद्धा पोहचत असल्याचे निर्देशित होत होते. दि. २४.४.१९८९ रोजी पांढरकवडा येथे मिटिंग घेण्यात आली. त्यात मी संघटनेची भूमिका मांडली. यावेळी २६ कामगार या मिटींगला हजर झाले होते.

 दि. २५.८.१९८९ रोजी संघटनेच्या मिटींगमध्ये स्थायी स्वरुपात  कार्यकारिणी बनविण्यात आली. त्यात मला सर्कल सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले. अध्यक्ष म्हणून पी.एम.भगत उपकार्यकारी अभियंता (मेजर स्टोअर्स, लोहारा) हे होते. उपाध्यक्ष डी.के.उके, सहसचिव जी.ए.अवसरमोर, कोषाध्यक्ष जे.पी.अवचार व बाकीचे चार सदस्य होते. 

दि.८.४.१९८९ रोजी वर्धा येथे संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची मिटिंग झाली होती. त्यात मी यवतमाळ सर्कलच्या कामाचा अहवाल सादर केला होता. या मिटिंगमध्ये अध्यक्ष म्हणून लक्ष्मणराव तायडे, कार्याध्यक्ष म्हणून डी.के. दाभाडे, उपाध्यक्ष म्हणून जयप्रकाश इंगोले व एल.के.मडावी व सरचिटणीस म्हणून जे.एस.पाटील यांची निवड झाली होती. कार्यकारिणीच्या सदस्यात मला घेण्यात आले होते.

दि.३.१०.१९८९ रोजी विद्युत मंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालय प्रकाशगड येथे संघटनेच्या मागण्यांसाठी एक दिवशीय धरणा आंदोलन झाले होते. त्यात मी काही कामगारांना घेऊन गेलो होतो. यवतमाळचा प्रतिनिधी म्हणून मी भाषण दिले होते.

दि.१३.०१.१९९० रोजी अमरावती येथे मागासवर्गीय कर्मचा-यांचा मेळावा झाला होता. हा मेळावा वैरागडे साहेब आणि एल.के.मडावी यांच्या पुढाकाराने आयोजित झाला होता. त्यापूर्वी घडलेली घटना सांगतो. खरं म्हणजे त्यावेळी माझ्या जिवावर पण बेतले होते. मी ऑफिसमध्ये काम करीत असताना अमरावतीवरून एल.के.मडावी आस्थापना अधिकारी व वैरागडे साहेब हे दोघेही माझ्याकडे आलेत. त्याचा प्रचार करण्यासाठी ते फिरत होते. मग आम्ही पांढरकवडा येथे जायला निघालो. पांढरकवड्याच्या अलीकडे आमच्या गाडीला अपघात झाला. गाडी पुलाच्या खाली उलटी झाली होती. वैरागडे साहेब गाडीची खिडकी तुटून बाहेर फेकल्या गेले होते. त्यांच्या छातीला मुका मार लागला होता. मडावी साहेबांचा पँट फाटून मांडीला खरचटले होते. मला मात्र काहीच झाले नव्हते. पण जाणारे-येणारे लोक म्हणत होते की या ॲक्सिडेंटमध्ये किती लोक मेलेत? इतका तो भयानक ॲक्सिडेंट होता. मी घरी न सांगता परस्पर ऑफिसमधून निघून गेलो होतो. त्यामुळे  घरच्या लोकांना काहीच माहिती नव्हते. घरी आल्यावर त्यांना हा प्रकार कळला  होता. हा प्रसंग माझ्या चांगल्या आठवणीत राहीला.

या मेळाव्याला आम्ही यवतमाळचे कार्यकर्ते गेलो होतो. या मेळाव्यात मी माझे विचार मांडले होते. या मेळाव्याला तेली समाजाचे कार्यकर्ते विजय बाभुळकर, अमरावती विद्यापीठाचे वाघमारे साहेब, बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी व संघटनेचे अध्यक्ष डी. के. दाभाडे हे हजर राहून मेळाव्याला मार्गदर्शन केले होते.

दि. २७.०१.१९९१ व २८.०१.१९९१ रोजी दोन वर्षाच्या अंतराने  नाशिकला सहावे अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाला माझ्याशिवाय एम.पी.गेडाम, जी.ए.अवसरमोल, पी.डी.भजगवरे व आत्माराम राठोड असे पाच जण गेलो होते.

या अधिवेशनात एक बाब लक्षात आली ती ही की, मागासवर्गीय संघटनेत अभियंता वर्ग मोठ्या प्रमाणात तर आहेतच, त्याशिवाय वरिष्ठ अधिकारपदी सेवारत असलेले ९ कार्यकारी अभियंते पण सामील झालेले होते. संघटनेत यादव नावाचे एक ओबीसी अभियंता होते तर अन्वर बेग नावाचे मुस्लीम समाजाचे वरिष्ठ लिपिक होते, हे अधोरेखित करण्यासारखे होते.

दि. २७.१.१९९१ रोजी मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषणे झालीत. ओबीसी समाजाचे कार्यकर्ते प्रा.श्रावण देवरे आणि बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी यांनी विचार मांडले होते.  

दि. २८.१.१९९१ रोजी प्रतिनिधी सत्र होते. यात प्रत्येक शाखा प्रतिनिधींनी आपापल्या शाखेच्या कामाचा अहवाल सादर केला. मी पण यवतमाळ सर्कलच्या कामाचा अहवाल या सत्रात सादर केला होता. यावेळी जे.एस.पाटील यांनी माहिती दिली की, १९६० साली स्थापन झालेल्या विद्युत मंडळाने सरळ सेवेमध्ये १९६५ मध्ये राखीव जागेचे धोरण स्वीकारले. १९७४ मध्ये पदोन्नतीमध्ये राखीव जागा लागू केल्या. रोस्टर पद्धती सुरु केली नव्हती तर ती १९८४ पासून सुरु केली. त्यामुळे ३१.१२.१९८९ पर्यंत ६५९१ जागेचा अनुशेष साचला होता. हा अनुशेष विद्युत मंडळाकडून भरून घेणे आवश्यक आहे. प्रसंगी त्याकरिता आंदोलन उभे करावे लागेल.

नाशिक अधिवेशनाच्या बाबतीत एक गोष्ट आठवणीत आहे. अधिवेशनातील एक सत्र संपल्यावर आम्ही पुस्तकांच्या स्टॅालकडे वळलो. तेथे ओबिसी कार्यकर्ते विजय बाभुळकर होते. हे पण विद्युत मंडळात नोकरीला होते.  त्यांनी एक विषय छेडला. विजय बाभुळकर हे नागेश चौधरी यांचे सोबत फुले, शाहू, आंबेडकर  चळवळीचे  काम करीत होते. नागेश चौधरी हे बहुजन संघर्ष नावाचा पाक्षीक नागपूरहून काढत होते. ते उत्कृष्ट वक्ते होते. त्यांना या अधिवेशनाला आयोजन समितीने निमंत्रित केले होते. त्यांच्याशी माझी आधीपासूनच ओळख होती. मी त्यांच्या  पेपरमध्ये लिखाण काम करीत होतो. दिग्रसला असताना त्यांचे व्याख्यान पण घेतले होते.  जनता पार्टीचे व्ही.पी.सिंग हे प्रधानमंत्री असतांना त्यांनी  १९९० मध्ये ओबिसींना आरक्षण देणारा  मंडल आयोग लागू केला होता. त्यामुळे ओबिसी वर्ग व्ही.पी.सिंग यांच्याकडे वळला होता. ह्यावेळी भारतीय जनता पक्षाने त्यांचा पाठिंबा काढून घेतल्याने त्यांचे सरकार कोसळले होते. त्यावेळी  बिएसपीकडे तिन खासदार होते. पण बिएसपीने विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मते दिली नाहीत. हा तो विषय होता. मी त्यांना म्हणालो की व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाचे अकरा शिफारशी लागू न करता  केवळ नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण तेवढी एकच  शिफारस लागू केली. तरीही मायावतीने म्हटले होते की, आमच्या तिन मताने जर व्ही.पी.सिंग सरकार वाचत असेल तर आम्ही सरकारच्या बाजूने मतदान करायला तयार आहोत. पण सरकार आमच्या मताने पडणार नसून त्यांच्याच मताने पडणार असल्याचे स्पष्ट झाले होते. अशी ती चर्चा चालू असतांनाच नागेश चौधरी तेथे आले होते. ही चर्चा चांगलीच रंगली होती. विजय बाभुळकर आणि नागेश चौधरी हे दोघेही व्ही.पी.सिंगची तरफदारी करीत होते तर तेथे जमलेला बहुतांश कामगार मा. कांशीरामजी यांच्या बाजूचे असल्याचे दिसून आले  होते. त्यामुळे या दोघांचीही कोंडी झाल्यासारखी अवस्था झाली होती. या घटनेमुळे एक बाब स्पष्ट झाली की मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेत मोठ्या प्रमाणात बामसेफचे लोक काम करीत असल्याचे दिसून आले. 

त्यानंतरचे अधिवेशन पुण्याला झाले होते. याही अधिवेशनाला आम्ही गेलो होतो. पुण्याला  यवतमाळहून गाडी  करून गेलो होतो.  

दि.१८.१०.१९९१ रोजी सुधाकर डोहणे मारेगाव यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय सरचिटणीस जे.एस.पाटील यांच्या उपस्थितीत संघटनेची महत्वाची मिटिंग यवतमाळ येथे घेतली होती.   

२०.१०.१९९१ रोजी  पतपेढीची निवडणूक आली होती. ही पतपेढी वर्कर्स फेडेरेशनच्या ताब्यात होती. मी पूर्वी या संघटनेत होतो; तेव्हा पतपेढीच्या कार्यकारिणीत होतो. म्हणून मी या निवडणुकीत भाग घेऊन पतपेढीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने कामगारांशी संपर्क करून संघटनेच्या विस्तारासाठी पूर्ण जिल्हाभर फिरलो. मी जरी निवडून आलो नसलो तरी एवढे खरे की या निवडणुकीत चांगली मते मिळविली होते व संघटनेचा प्रचार पण झाला होता.

संघटनेने दि. १४.१२.१९९० रोजी नागपूरच्या विधानसभेवर मोर्चा नेला होता. त्यात आम्ही यवतमाळ सर्कलतर्फे सक्रियपणे भाग घेतला होता. त्यावेळी सुध्दा मी माझे मनोगत मांडले होते. महाराष्ट्र शासनाने १६,६००० राखीव जागांचा अनुशेष साचविला असून तो भरला जावा ही प्रमुख मागणी घेऊन व त्यासोबत इतरही मागण्या जोडून हा मोर्चा काढण्यात आला होता.

२०.१०.१९९१ रोजी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारणीने दिलेल्या आदेशानुसार मागासवर्गीयांच्या आरक्षणातील अनुशेष भरणे अशा मागण्यांच्या संदर्भात आंदोलनाचा एक भाग म्हणून यवतमाळ सर्कलच्या प्रशासकीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आयोजित केले होते. 

त्यानंतर दि, २१.११.१९९१ रोजी विद्युत मंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालय प्रकाशगड येथे एक दिवशीय धरणा आंदोलन झाले होते. त्यात माझ्याशिवाय डी.एस.वानखडे, एस.पी.वानखडे, गिरजाबाई मार्कंड, नितनवरे, एस.के.डोहणे मारेगाव, एच.पी.शंभरकर वणी असे सातजणांनी सहभाग घेतला होता. मी यवतमाळ सर्कलचा प्रतिनिधी म्हणून भाषण दिले होते. यावेळी संघटनेचे केंद्रीय  महासचिव जे.एस.पाटील यांनी माहिती दिली की, १९८२ ते १९८९ या कालावधीत महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी चार वेळा दीर्घकालीन संप केलेत. या संपकाळात अंशकालीन भरती करण्यात आली होती. त्यात १ लाख ६ हजार जागांपैकी ९६ हजार जागा एकजात ब्राम्हण समाजाचे भरण्यात आले. अंशकालीन भरती असल्याने मागासवर्गीयांना लागू असणारे राखीव जागा येथे लागू होत नाही, म्हणून त्यांनी ही अराखीव वर्गातील भरती केली होती. नंतरच्या काळात हे सर्व कर्मचारी कायम करण्यात आले होते. म्हणजे यांचे संप हे ब्राम्हणांच्या नोकर भरतीसाठी होत असल्याचे स्पष्ट झाले होते. याची ओरड जेव्हा मागासवर्गीय संघटनांनी केली व त्याचे पडसाद विधानसभेत उमटले; तेव्हा तत्कालीन गृहमंत्री श्रीकांत जिचकार यांनी जाहीर केले की, यापुढे संप जरी झाले तरी अंशकालीन भरती करण्यात येणार नाही. तेव्हापासून दीर्घकालीन संप होण्याचे प्रकार बंद झालेत. या धरणा कार्यक्रमात मुंबईचे आमदार एकनाथ गायकवाड व मुर्तीजापुरचे आमदार मखराम पवार आले होते. या दोघांनीही भाषणे करून आंदोलनाला पाठींबा व्यक्त केला होता.

यवतमाळ येथे वेळोवेळी  संघटनेच्या केंद्रीय नेत्यांना बोलाऊन कार्यक्रम आयोजित करीत होतो.  दि. ०६.१२.१९९१ रोजी यवतमाळला सर्कल कार्यालयाच्या गेटवर संघटनेचा सुचना फलक उभारून  त्याचे उद्घाटन केंद्रीय सरचिटणीस जे.एस.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच याचवेळी  महात्मा फुले पुण्यतिथी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वान दिनानिमित्तचा  कार्यक्रम सुद्धा  आयोजित केला होता. विशेष सांगायचे म्हणजे या आंदोलनात १९ कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. तसेच पुसद येथे दि. २३.०८.१९९२ ला विभागीय मेळावा आयोजित केला होता. ह्यावेळी एम.डी.बडेराव, जे.पी.सावंग, उमरखेडचे  व्ही.जी.गायकवाड, दिग्रसचे टी.आर.खाडे, डी.के.घाटगे असे अनेक कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. या मेळाव्याला केंद्रीय कार्यकारिणीचे जे.एस. पाटील, पी.पी.निल कार्यकारी अभियंता, डी.बी. भदे, आस्थापना अधिकारी  इत्यादी  नेते उपस्थित राहून  मार्गदर्शन केले होते. या मेळाव्याला कामगार व अधिकारी यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे ह्यावेळी पुसद येथील काही मागासवर्गीय  अभियंता  सुध्दा संघटनेत सामील झाले होते. याच मेळाव्यात पुसद विभागीय कार्यकारिणी गठीत केली होती. यात अध्यक्ष एम.डी.बडेराव, उपाध्यक्ष एम.डी.भोरे, सचिव एस.आर.मनवर, सहसचिव जे.पी.सावंग, कोषाध्यक्ष एम.टी.धोंगडे, संघटक एम.जी.कांबळे (ज्युनिअर इंजिनियर), एम.यू.हनवते, सहसंघटक टी.आर.तांबटकर व नऊ सदस्य होते. 

याशिवाय आम्ही आता मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन प्रशासनाकडे जात होतो. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करीत होतो. त्यामुळे आपलेही प्रश्न सोडविण्याचा मार्ग आता खुला झाल्याने लोकात विश्वास निर्माण होत गेला. म्हणून सदस्य संख्या पण वाढत चालली होती. सामुहिक बदल्यांच्या प्रकरणात नेहमीच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असे. कारण त्यांचा कोणी वाली राहत नसे. त्यांना दूर-दूरच्या आणि दुर्गम ठिकाणी पाठविण्यात येत असे. परंतु मी बदल्यांचे आदेश निघण्याच्या आधीच या मुद्यावर प्रशासनाला इशारा दिला होता की, जर बदल्याच्या संदर्भात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यामुळे असे प्रकार कमी झाले होते.

पुसदला एक धार्मिक प्रकरण उपस्थित झाले होते. विद्युत मंडळ आकस्मिक कर्मचारी व अधिकारी वर्गांसाठी सबस्टेशनच्या परिसरात निवासी गाळे बांधतात. त्यावेळी त्या परिसरात हिंदूचे देवळे पण त्या ठेकेदाराकडून बांधून घेत असतात.  पुसदला जेव्हा हनुमानाचे देऊळ बांधले जात होते; तेव्हा आमच्या युनियनचे सदस्य असलेले व्ही.जी.गायकवाड यांनी आक्षेप घेऊन आंदोलन छेडले होते. हा प्रश्न मी पण युनियनचा सर्कल सेक्रेटरी म्हणून धसास लावला होता. 

 त्याशिवाय वडार समाजाचे एस.एन.मस्के या लिपिकाला कापड वाटण्याच्या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्याने त्याला निलंबित केले होते. त्याचे प्रकरण प्रशासनासमोर मांडले असतांना त्यांनी मला आमच्या युनियनच्या दोन सदस्यांचे जामीन मागून परत त्याला कामावर घेतले. 

त्यावेळी माझ्या असे लक्षात आले होते की, वर्कर्स फेडरेशन या युनियनमध्ये कार्यरत असणाऱ्या टी.एस. भागवत नावाच्या एका मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर आरोपपत्र ठेवण्यात आले होते. त्यात त्याचा प्रतिनिधी त्याच्या युनियनचा ब्राम्हण कर्मचारी होता. (कामगार प्रतिनिधी हा एक प्रकारचा कामगारांच्या बाजूने लढणारा वकील असतो) 

प्रकरण असे होते की त्याने आंबेडकर जयंतीनिमित्त फेस्टिवल अॅडव्हान्स घेतांना अर्जात धर्म ‘बौद्ध’ असे दाखविले होते. परंतु त्याच्या सर्व्हिस बुकमध्ये ‘हिंदू महार’ असे लिहिले होते. त्याने खोटेपणा करून विद्युत मंडळाला फसविले असा त्याच्यावर आरोप ठेवला होता. मी त्याला सांगितले की, ‘तुम्हाला हे लोक न्याय मिळवून देणार नाहीत. आमच्या मागासवर्गीय युनियनमध्ये आल्यावर मी तुम्हाला निर्दोष सोडवू शकतो.’ पण त्याने ऐकले नाही. शेवटी त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊन त्याची एक वार्षिक वेतनातील वाढ रोखण्यात आली. खरं म्हणजे आंबेडकर जयंती कोणत्याही धर्मातील व्यक्ती साजरी करू शकतो. शिवाय धर्म ही वैयक्तिक बाब आहे. त्यात कोणीही प्रश्न निर्माण करू शकत नाही. पण संविधानातील या तरतुदीतील दाखले त्याच्या प्रतिनिधीने दिलेच नाहीत. परिणामत: त्याला दोषी ठरविण्यात आले. तात्पर्य मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर कसे क्षुल्लक कारणास्तव अन्याय करतात, त्याचे हे एक जिवंत उदाहरण होते. 

यवतमाळ येथे आल्यावर माझी ओळख बहुजन समाज पार्टी आणि बामसेफ (बॅकवर्ड अँड मायनॅारिटी कम्यूनिटीज एम्प्लॅाईज फेडरेशन) यांच्या कार्यकर्त्यांशी झाला. तसा मी दिग्रसला असताना या चळवळीकडे माझा ओढा निर्माण झाला होता. मला माझ्या कॉलेज आणि होस्टेलमधील मित्र पोष्ट खात्यात काम करीत असलेले निरंजन पाटील यांनी बामसेफबद्दल आधीच माहिती दिली होती. तसेच माझ्या घराशेजारी राहत असलेले कृषी खात्यात अधिकारी असलेले अजय गजभिये हे पण मला बामसेफ व मा. कांशीरामजी यांच्या कार्यांबाबत  सांगत होते. त्यांच्याबाबतीत सांगायचे म्हणजे मी जेव्हा कोकणात गेलो होतो; तेव्हा तेथील लोक सांगत होते की,  गजभिये साहेब आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील  अभियंता  भगत साहेब, जे नंतर यवतमाळ येथे बदलीवर आले होते, ह्या दोघांनी कोकणात व गोव्यात बामसेफचे खूप कामे केलीत. पण भगत साहेबांवर त्यांच्या खात्याने शिस्तभंगाची कारवाई केल्याने त्यांनी बामसेफचे काम थांबवले होते,  असे कळले होते. 

मी दिग्रसला असतांना या चळवळीत  फारसा रस घेतला नाही. कारण मी त्यावेळी  ‘बौद्ध कर्मचारी समाज सुधारक मंडळ’ या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असल्याने व त्यातच मी पूर्णपणे झोकून दिल्यामुळे सारखा व्यस्त राहत होतो. पण यवतमाळला आल्यावर बीएसपीचे जिल्हा संयोजक केशव खिल्लारे, बामसेफचे जिल्हा संयोजक शेख मेहबूब आलम तसेच मधुकर गुजर (गुरुजी),  एच.एन.मोरे साहेब, दशरथ मडावी, बाळू गावंडे, आनंद गायकवाड, विमल स्थूल, अमोल गणवीर, सुदाम वनकर, देवानंद सावरकर,  गौतम कुंभारे, भानुदास केळझरकर, वणीच्या कार्यकर्त्या पुष्पाताई आत्राम, दारव्ह्याचे अशोक नाईक  – सर्वांची नावे लिहणे शक्य नाही – अशा विविध  जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांशी माझी ओळख झाली. बहुजन समाजाचा खराखुरा नमुना येथे मला पाहायला मिळाला.

मी सुध्दा या बहुजन  चळवळीत काम करायचे मनोमन  ठरविले होतेच.  वणीला असतांना मी दि. २३.०५.१९८८ रोजी बिएसपीचे संयोजक मा.श्रीकृष्ण उबाळे साहेब यांना पत्र लिहून कळविले  होते की,  शिवसेना खेड्यापाड्यापर्यंत आपले पाय रोवून जातीय तेढ निर्माण करण्याचे कार्य करीत आहे. कारण  माझी सासुरवाडी- सुकळी येथे १४ एप्रिलच्या आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत शिवसेनेच्या मुलांनी दगडफेक केली होती. मिरवणूकीच्या मार्गावर काटे टाकले होते. पुर्वी या गावात  सौहार्दाचे वातावरण असल्याने जातियता जाणवत नव्हती.  पण शिवसेना गावात आल्याने  बौद्धांवर त्यांनी बहिष्कार टाकला होता. रस्ते अडविणे, जातीय द्वेषाने वागणे अशा प्रकारे भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले होते. शिवसेनेत बहुतांश मुले हे कुणबी जातीचे होते. म्हणून त्यांनी  बिएसपीचे कुणबी समाजाचे यवतमाळचे  कार्यकर्ते बाळू गावंडे यांना पाठवले होते. त्यांनी या गावात सभा घेऊन शिवसेनेसारखी जातीवादी संघटना बहुजन समाजात  कशी जातीय विष कालवते,  ते पटवून दिले होते. 

म्हणून दिग्रस, वणी पासूनच माझा या चळवळीशी जवळीकी निर्माण झाल्याने मी या चळवळीत संपूर्ण ताकदीनिशी सामील झालो होतो. 

माझा एक स्वभाव बनला होता की,  जे कार्य मी हातात घेत होतो, त्या कार्यात मी पूर्णपणे झोकून देत होतो.  म्हणून याही कामात मी स्वतःला झोकून दिले होते.

मला मा. कांशीरामजी यांचे मते पटली होती. त्यांनी सांगितले होते की, जे बाबासाहेबांच्या चळवळीचे लाभार्थी आहेत;  त्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून समाजाची  परतफेड करावी. म्हणून कामगार/अधिकारी वर्गात ही जाणीव निर्माण  झाल्याने आम्ही भारावून गेलो होतो. शासनकर्ती जमात बनण्याचे उद्दिष्ट त्यांनी आमच्यापुढे ठेवले होते. कारण शासनकर्ती जमातीवर अन्याय-अत्याचार होत नाहीत, हे त्याचे सूत्र होते. आम्हालाही समाज कार्यात सहभाग असावा असे नेहमीच  वाटत होते. पण तशी यंत्रणा आमच्या समोर दिसत  नव्हती. मा.कांशीरामजी यांनी तशी यंत्रणा निर्माण केल्याने,  आम्हा नोकरदार वर्गांना समाज कार्य करण्याची संधी मिळाली होती. मा.कांशीरामजी यांनी आमच्यात उर्जा निर्माण केल्याने आम्ही खडबडून जागे झालोत. त्यांच्या आदेशानुसार  आम्ही तन, मन, धन व बुद्धी  या चळवळीत ओतून समर्पित झालोत. कॅडर कॅम्प, कॅार्नर मिटिंग, सभा, सायकल मार्च, भिंतीवर पेंटींग, लोक संपर्क  इत्यादी अनेक माध्यमातून आम्ही घरादाराची तमा न बाळगता कामे करीत होतो. ऑफिस सुटल्यावर व सुट्टीच्या दिवशी हिच कामे आम्ही  झपाटल्यासारखे सतत करीत होतो. 

मा.कांशीरामजी बद्दल सांगायचे म्हणजे त्यांनी भारतातील ८५ टक्के बहुजन समाजाच्या हिताचे तत्वज्ञान घेऊन फुले-शाहू-आंबेडकरांचा राजकीय वारसा गतीमान केला.  ते अविवाहित राहून आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या कल्याणासाठी पणाला लावले. राष्ट्रीय पातळीवर फुले-शाहू-आंबेडकर चळवळ पोहचवण्याचे महान कार्य त्यांनीच  केले. त्यांनी प्रतिज्ञा घेतली की, “मी लग्न करणार नाही. मी स्वतःची संपत्ती निर्माण करणार नाही. मी माझ्या घरी जाणार नाही. मी माझे उरलेले संपूर्ण जीवन फुले-आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित करीन.”  हे त्यांनी जाहीर केलेलं त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट खुपच भावलं होतं !

माननीय कांशीरामजी यांचा उदय होण्यापूर्वी आंबेडकरी राजकीय पक्ष अनेक गटात विभागल्याने त्यांची ताकद विखुरल्या गेली होती. पुणे कराराने निर्माण केलेल्या चमचा युगाने वारंवार निवडणुका लढवूनही आंबेडकरी विचाराच्या रिपब्लिकन पार्टीला यश मिळत नव्हतं. या चळवळीच्या माध्यमातून आमदार/खासदार बनता येत नव्हतं.  बाबासाहेबांची चळवळ चांगली आहे;  पण या चळवळीच्या माध्यमातून कोणीही निवडून येऊ शकत नाही. अशी त्यांची धारणा झाल्याने ते विश्वास गमावून बसले होते. म्हणून खचून जावून आंबेडकरी अनुयायी गांधीवादी काँग्रेसला शरण गेलेत. ज्या काँग्रेसला बाबासाहेब जळते घर आणि  त्यात जावून आपला विकास होणार नाही, असे म्हणत होते. त्याच घराचा आश्रय घेत होते. असे हे निरनिराळे रिपब्लिकन पार्टीचे गट स्वाभिमान विसरून दुसऱ्यांच्या  ओंजळीने पाणी प्यायला मजबूर झालेत. त्यामुळे ह्या चळवळीला लाचारीपणाची झाक  येऊन मरगळल्या सारखी अवस्था झाली होती. 

हे पाहून आंबेडकरी विचारधारेवरील विश्वास गमावलेल्या लोकांना पर्याय देण्याच्या उद्देशाने मा.कांशीरामजींनी बामसेफ, डीएसफोर व बहुजन समाज पार्टीची निर्मिती केली.

बी.एस.पी.च्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करतांना मा.कांशीरामजी म्हणाले होते की, ‘भारतीय घटनेने स्वीकृत केलेले राजकीय समानते सोबतच सामाजिक आणि आर्थिक समानता यावी अशी आमची इच्छा आहे.’ फुले,शाहू,आंबेडकर चळवळीला गतिशीलता प्रदान करणे हा त्यांचा  बी.एस.पी. स्थापन करण्यामागचा आणखी एक उद्देश होता.

‘बाबा तेरा मिशन अधुरा, बीएसपी करेगी पुरा’ अशी घोषणा देऊन बाबासाहेबांच्या स्वप्न पूर्ततेसाठी वाटचाल सुरु झाली. सारा भारत ढवळून निघाला. म्हणून लोकांनी न थकता घोषणा देणे सुरु केले की, ‘कांशीराम तेरी नेक कमाई, तूने सोती कौम जगाई !’ 

मा. कांशीरामजी यांच्या ‘शासनकर्ती जमात’ बनण्याच्या भूमिकेमुळे देशातील बुध्दीवादी वर्ग खडबडून जागा झाला. त्यांनी खडतर ध्येयाच्या पूर्ततेसाठी पैसा, बुध्दी, श्रम  व वेळ ही साधनसामुग्री एकत्र करून फुले-आंबेडकरी मिशनला पुढे नेणारी ६ डिसेंबर १९७३ ला संकल्पित केलेल्या व ६ डिसेंबर १९७८ रोजी जन्माला घातलेल्या बामसेफ या संघटनेत झोकून दिले. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात काम करतांना आरपीआयच्या राजकारणावरून त्यांच्या लक्षात आले की, समाजातील अराजकीय मुळे (unpolitical roots) हे पक्के नसल्याने राजकीय आंदोलन यशस्वी होवून राहिले नाही. म्हणून नोकरीमध्ये मोठ्या प्रमाणात अडकलेली ही अराजकीय मुळे त्यांनी पक्के करण्याचे ठरविले. या चळवळीच्या पाठीशी सारी शक्ती एकवटली. जातीच्या आधारावर तोडलेल्या साडेसहा हजार जातींना जोडून बहुजन समाज निर्माण करणे वाटते तेवढं सोपं काम नव्हतं. पण मा. कांशीरामजी यांच्या प्रेरणेने हेही अशक्यप्राय वाटणाऱ्या कामाच्या पूर्ततेसाठी आमची पिढी झपाटून गेली होती.

ते म्हणाले होते की,  “इस देशमे जातिके आधारपर, ऊँचनीचता के आधारपर लोगोंको तोडा गया है. साडे छह हजार जाति उपजातियोंमे ये समाज बिखरा है. और हर जाति अपने आपमें एक “अल्पजन समाज” है. मै इन जातियोंको तोडकर, इन अल्पजन समाजों को जोडकर बहूजन समाज बनाना चाहत हूँ. मेरी चाहत है कि हम सब लोग अल्पजन से बहूजन बनें और बहूजन बनकर इस देशके हुकुमरान बनें…”

जातीजातीत तोडलेल्या बहुजन समाजाला जागृत करून एका सूत्रात बांधण्याची प्रक्रिया मोठ्या जोमाने सुरु झाली.  काही राज्यात त्याचा परिणाम दिसून आला. सत्तेकडे वाटचाल सुरु झाली. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, काश्मीर, हरियाणा, हिमाचलप्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब इत्यादी राज्यात पक्षाला मान्यता मिळाली. त्यामुळेच बहुजन समाज पार्टीला अगदी अल्पावधीतच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. बाबासाहेबांचा हत्ती चिन्ह ज्या आर.पी.आय.ने गमावला होता, तो परत मिळविला. नंतरच्या काळात निवडणूक आयोगाने सर्व प्राण्यांचे चिन्ह रद्द केले होते. पण हत्ती या प्राण्याचे चिन्ह बी.एस.पी.ने राखून ठेवल्याने निवडणुकीच्या रिंगणात हे चिन्ह कायम राहिले. बाबासाहेबांची एक फार मोठी आठवण सुरक्षित राहिली. ही मा.कांशीरामजी यांच्या चळवळीची फार मोठी उपलब्धी आहे, असेच म्हणावे लागेल. मा.कांशीरामजी आपल्या ध्येयाबाबत सुस्पष्ट होते. बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनविण्याचा एकच ध्यास त्यांनी घेतला होता. कारण शासनसूत्रे हातात आल्यावर त्या समाजाचा विकास होतो आणि त्या समाजावर कोणीही अन्याय-अत्याचार करायला हिंमत करीत नाही, असं एक सूत्र त्यांनी मांडलं होतं.  

मा. कांशीरामजींनी संपूर्ण भारत पिंजून काढला. सभा, संमेलन, परिषदा, आंदोलने, कॅडर कॅम्प, सायकल मार्च, रॅली, परिवर्तन रॅली  इत्यादी मार्गाद्वारे बहुजन समाजात जोश आणि उत्साह भरला. त्यांची दूरदृष्टी व शास्त्रशुद्ध पायावर आधारीत नेतृत्वामुळे या चळवळीला भक्कम अशी उभारी मिळाली.

त्यामुळे ही पार्टी अल्पावधीतच देशात तिसऱ्या क्रमांकावर जावून पोहचली. आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सुध्दा आमदार, खासदार निवडून येऊ शकतात. हे मा. कांशीरामजी यांनी सिध्द करून दाखविले. ऐवढेच नव्हे तर मंत्री बनवून सरकार सुध्दा चालवू शकतात. हे उत्तरप्रदेशच्या उदाहरणाने सिध्द करून दाखविले.

बाबासाहेबांची दोन महास्वप्ने अपुरी राहिली. एक शासन सत्ता हस्तगत करणे व दुसरी भारत बौद्धमय करणे. या महास्वप्नाच्या पूर्ततेसाठी मा.कांशीरामजींनी एक सशक्त मिशनरी टीम उभी केली. या मिशनमध्ये आमच्यासारख्या एका संपूर्ण पिढीने आपले तारुण्य कुर्बान करून या मिशनमध्ये झोकून दिले.

मी बघितलं की, मा. कांशीरामजी यांच्या बहुजन चळवळीत ख-या अर्थाने  सर्व धर्माचे व बहुजनातील सर्व जातीचे कार्यकर्ते सामील झाले होते. चळवळीच्या विस्तारासाठी आम्ही एक पद्धत ठरविली होती.

१. आम्ही  अनुसूचित जाती, जमाती व ओबिसी समाजाचा  प्रत्येकी एकजण राहील असा  तिघांचा एक गट बनवून  यवतमाळच्या आजुबाजूच्या खेड्यात जात होतो.

२. सुरुवातीला त्या गावातील शिकलेल्या तरूण वर्गाची मिटींग घेत होतो.

३. दुस-या वेळी त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळीची मिटींग घेत होतो. 

४. तिस-या मिटींगमध्ये प्रश्न, शंका-कुशंका यावर चर्चा करीत होतो. 

४. चवथ्या मिटींगमध्ये सक्रीय कार्यकर्त्यांची कार्यकारिणी तयार करून शाखेची स्थापना करीत होतो.

५. नंतर या गावाला कॅडर कँप, पत्रके, वैचारिक पुस्तके, भिंतीवर पेंटींग करणे,  बहुजन नायक  पेपरचे वर्गणीदार वाढविणे, आंदोलन व फंडीग उभारणी  इत्यादी कार्यक्रम देत होतो.

अशा प्रकारे कामाची पद्धत ठरविली होती. माझ्या गटात  मी अनुसूचित जाती, दशरथ मडावी हे अनुसूचित जमाती  व विलास काळे हे ओबिसी समाजाचे  होते.  

१४ ऑक्टोबर १९८९ रोजी मा. कांशीरामजी यांची सभा नागपूरला झाली होती. या सभेला आम्ही यवतमाळ शहरातील  जवळपास शंभराचे वर लोकांना गाड्या भाड्याने करून घेऊन गेलो होतो. 

या सभेत मा. कांशीरामजी यांनी अनेक उदाहरणे देऊन  ख-या अर्थाने आम्ही आंबेडकरी चळवळ राबवीत असल्याचे ठासून  सांगितले. पण दैनिक लोकमतने या वक्तव्याचा विपर्यास करून ग्रामीण आवृतीत ‘मीच खरा आबेडकर’ अशा शिर्षकाची बातमी दिली. त्यामुळे कांशीरामजी स्वःताला काय आंबेडकर समजतो?  अशा प्रकारच्या तिखट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. लोकमतने चलाखी अशी केली होती की,  शहर आवृतीमध्ये हे वृत्त बरोबर दिले होते. कारण नागपूरच्या जनतेला मा. कांशीरामजी काय बोललेत ते माहिती होते आणि त्यांचे भाषण पटल्याचे मान्य करीत होते. माझे काही नातेवाईक नागपूरला राहत होते. त्यापैकी काहीजण मा.कांशीरामजी यांचे विरोधक होते. पण भाषण ऐकून ते समर्थक बनले होते.

त्यादरम्यान यवतमाळ जवळील गावात चळवळीच्या प्रचारासाठी  सायकल मार्च काढला होता. मी इतर बामसेफ कार्यकर्त्यांसोबत ऑफिस सुटल्यावर  संध्याकाळी बाईक घेऊन ज्या गावाला सभा असेल  त्या गावाला जाऊन सायकल मार्चचे नियोजन करीत होतो. एकदा आम्ही मेहराबाद येथे गेलो होतो. आनंद गायकवाड आणि इतर काही कार्यकर्त्यांचे येथे  भाषणे झाले होते. बाळू गावंडे यांना चळवळीनिमीत्त सतत फिरावे लागत होते. म्हणून मी माझी मोपेड त्याला नेहमी देत होतो.

दि.१०.०४.१९८९ रोजी माझी बहिण जनाबाई बागडे हिचे गाव  बरबडा येथे सप्तफुलाबाई नागभीडकर या आदिवासी कार्यकर्तीच्या अध्यक्षतेखाली  सभा घेतली होती. या सभेचे संचलन माझ्या बहिणीने केले होते. या सभेत यवतमाळचे कार्यकर्ते  बाळू गावंडे, दशरथ मडावी, शेख मेहबूब आलम, वणीच्या आदिवासी कार्यकर्ती पुष्पाताई आत्राम व दारव्ह्याचे अशोक नाईक यांच्याशिवाय माझी पत्नी कुसुमचे सुध्दा भाषण झाले होते. या गावात  पक्षाचे १३ सभासद बनविण्यात आले होते.  त्यात काही ओबिसी व आदिवासींचा समावेश होता. बाळू गावंडे  आणि दशरथ मडावी यांचे भाषण म्हणजे  अगदी मनाला भिडणारे राहत  असे. त्यांच्या  भाषणाचा जनमानसावर जबरदस्त  प्रभाव पडत होता.   

मी त्यापूर्वी  प्रा. अशोक नाईक यांच्यासोबत कळंब, पार्डी व माझी सासुरवाडी सुकळी येथे चळवळ समजावून सांगण्यासाठी  दौरा  केला होता. 

यवतमाळ येथे डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त  महिलांचा जिल्हा स्तरीय मेळावा नगर भवन येथे दि. १५.०४.१९८९ रोजी आयोजित झाला होता. या मेळाव्याच्या आयोजनात माझा महत्वाचा वाटा होता. या मेळाव्याला पुष्पाताई आत्राम, (संयोजिका, विदर्भ प्रदेश, बसपा) बाळू गावंडे, (संयोजक, डिएस फोर, यवतमाळ) व प्रा. अशोक नाईक (संयोजक, बसपा,  जागृती जत्था) यांनी मार्गदर्शन केले होते. या मेळाव्यात सुध्दा कुसुमचे भाषण झाले होते.

दि.१३ व १४ मे रोजी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचा मान आमच्या यवतमाळ जिल्ह्याला मिळाला होता. आम्ही हे अधिवेशन  नगर भवन यवतमाळ येथे आयोजीत केले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे संयोजक मा. श्रीकृष्ण उबाळे, विदर्भ प्रदेशाचे संयोजक मा. सिद्धार्थ पाटील, वरिष्ठ नेते प्रा. मा.म. देशमुख हे व इतर अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. या अधिवेशनाच्या प्रचारासाठी सायकल मार्च, पैदल मार्च असे विविध  कार्यक्रम आयोजित केले होते. या आयोजनात व वर्गणी जमा  करण्यात माझा सहभाग तर होताच शिवाय अधिवेशनात दोन दिवस भाग घेण्यासाठी महाराष्ट्रातून आलेल्या प्रतिनिधींच्या जेवणाची व्यवस्था मी व विमल स्थूल असे दोघांनी सांभाळले होते. सदर अधिवेशनात सामील झालेल्या लोकांची यवतमाळ शहरातील प्रमुख रोडने मिरवणूक काढली होती. या  अतीभव्य मिरवणूकीचा जनमानसावर  चांगलाच प्रभाव पडला होता.

नागपूर येथे ३०.०६.१९८९ रोजी  राज्यस्तरीय महिला आघाडीचा मेळावा झाला होता.  प्रतिनिधी सत्राचे उदघाटन महाराष्ट्राचे संयोजक  मा. श्रीकृष्ण उबाळे यांच्या हस्ते झाले होते. या सत्रात संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली होती. यात  यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधी  म्हणून कुसुम हिने  भाग घेऊन तिने यवतमाळ जिल्ह्याचा अहवाल सादर केला होता. राज्यस्तरीय महिला अधिवेशनात भाग घेण्याची संधी मिळणे,  ही घटना आमच्यासाठी खरोखरच अभिमानाची बाब वाटत होती.

दुस-या दिवशी दि. ०१.०७.१९८९ रोजी ‘समाज परिवर्तनामध्ये बिएसपी महिला आघाडीची जबाबदारी ‘ या विषयावर खुले अधिवेशन झाले. या सभेला अॅड. कु. मायावती, महासचिव बिएसपी दिल्ली, यांनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले होते. यावेळी  सुत्रसंचालन  करतांना स्नेहलता सुर्यवंशी जे म्हणाल्या होत्या, ते मला खूप भावलं होतं. त्या म्हणाल्या होत्या  की, ‘चेतवित धुलकन कैफात चाललो मी, हरेक झोपडीत सुर्यकन ठेवित चाललो मी.’ 

दि.१६.९.१९९० रोजी बीएसपीचे राज्यस्तरीय अधिवेशन अकोला येथे झाले होते. ह्या अधिवेशनाच्या खुल्या अधिवेशनाला उत्तरप्रदेशाचे खासदार रामकृष्ण यादव यांनी संबोधित केले होते. ह्यावेळी ते म्हणाले होते की, ‘संपूर्ण शोषण के खिलाप बगावत का नाम बहुजन समाज पार्टी है !’ या अधिवेशनाचा मुख्य कार्यक्रम संपल्यावर भव्यदिव्य अशी मिरवणूक निघाली होती. या दृश्याचा साक्षीदार मी सुद्धा होतो.

माझा साळा धम्मदीप भगत हा वणीपासूनच माझ्याकडे शिकायला होता. तो चळवळीतील विद्यार्थी आघाडीत काम करीत होता. त्याला पेंटींग कलेची आवड होती.  त्याने नागपूरला जावून पेंटींग स्कॅाडचे प्रमुख  राजरतन मोटघरे यांच्याकडून भिंतीवरील  पेंटींग्जचे कामे शिकून घेतले होते.  तो रात्री-बेरात्री व जोखीम घेऊन चळवळीतील त्याचे विद्यार्थी मित्र विलास काळे, चिंतामण वंजारी व  विवेक गुजर यांना सोबतीला घेऊन भिंतीवरील  पेंटींग करण्याचे कामे  करीत  होता. हत्तीचे चिन्ह अगदी कमी वेळात व हुबेहूब काढत होता. त्याचंही या चळवळीत मोलाचं योगदान होतं.

महाराष्ट्राचे संयोजक श्रीकृष्ण उबाळे साहेब मला ओबीसी समाजाचे समजत असत. कारण एकदा मला ‘तुमच्या समाजात’ असं जेव्हा म्हणालेत; तेव्हा मी बौद्ध असल्याचे त्यांना सांगितले. माझ्या आडनावावरून मला ते तेली जातीचे समजत, असे ते म्हणाले होते. जुमळे हे आडनाव बौद्धांमध्ये नसल्यासारखेच आहे. इतर समाज म्हणजे तेली, शिंपी या जातीत हे आडनावे दिसून येतात.

१२ डिसेंबर १९९१ ला  बीएसपीतर्फे नागपूर विधानसभेवर मोर्चा नेला होता. त्यात यवतमाळवरून आम्हाला दिलेल्या लक्ष्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात लोकांना घेऊन जाण्यात माझाही मोठा सहभाग होता.  

मा. कांशीरामजी यांची सभा कुठेही असली तरी त्या सभेला मी हमखास गेल्याशिवाय राहत नव्हतो. त्या काळात कोणते ना  कोणते तरी कार्यक्रम सतत राहत होते. 

एकदा मा. कांशीरामजी यांची सभा मुंबईला झाली होती. या सभेला व्ही.पी.सिंग आले होते. मी यवतमाळच्या कार्यकर्त्यांसोबत या सभेला गेलो होतो. शर्टाच्या खिशाला बिएसपीचा बिल्ला लावला की  रेल्वेची तिकीट न काढता फुकटच जाता-येत होते. ‘जयभीम बोलो और किधर भी चलो’ असे त्यावेळी लोक म्हणत असत. पण हा प्रवास जनरल बोगीने करावे लागत असे. या डब्यात भयानक गर्दी राहत होती. पाय ठेवायला जागा मिळत नव्हती. 

एकदा तर मी संडासमध्ये उभे राहून प्रवास केला होता. किती भयानक होतं ते !

दुस-यांदा गेलो होतो;  तेव्हा रात्रीच्या वेळी  बसण्याच्या बाकड्याच्या खाली झोपलो होतो. माझ्या सोबत बरेच बाया-माणसं असेच झोपले होते. खुपच गर्दी होती त्या डब्यात  ! 

धामणगाववरून रात्रीच्या गाडीने निघून सकाळी मुंबईला पोहचत होतो. परत येतांना जागा मिळाली तर रात्रीच्या गाडीने निघत होतो. पण  बहुदा आम्ही  सभेच्या दुस-या दिवशी सकाळी  निघून संध्याकाळी धामणगावला येत होतो. तेथून एसटीने यवतमाळला येत होतो.

एकदा मी माझ्या  कार्यालयाकडून  ‘लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन’ ची सुविधा घेऊन  कुटुंबासोबत सभेला गेलो होतो. त्यावेळी मला फर्स्ट क्लासने प्रवास करायला मुभा असल्याने फर्स्ट क्लासच्या वातानुकूलित  (एअर कंडीशन) डब्यात बसून प्रवास केला होता. त्यावेळी मी यवतमाळच्या कार्यकर्त्यांसोबत जनरल डब्यात येऊन बसलो होतो. दिवसाची वेळ होती. मग काय… आमचा कवी संमेलननाचा बहारदार कार्यक्रम रंगला होता. विशेष म्हणजे या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान मलाच दिलं होतं. यात दशरथ मडावी, किशोर जंगले, धम्मदिप भगत, विलास काळे, एकनाथ तुपसुंदरे, बाळू गावंडे  अशा अनेक कवी महाशयांनी भाग घेतला होता. प्रत्येकजण  एकावर एक अशा विद्रोही, आंबेडकरी विचारधारेच्या  कवीता सादर करीत होते. मी पण प्रल्हाद चेंदवनकर यांच्या ऑडीट (माझा ऑफीसमधील जॅाब ऑडीटचा होता. म्हणून ह्या ओळी माझ्या आवडीच्या होत्या.)  या काव्यातील चार ओळी सादर केल्या होत्या.  

“फुले, आंबेडकरांनी तुमचे अकौऊंटस् ऑडीट केलेत,

ग्रंथा ग्रंथाच्या पानावरचे सगळेच फ्रॅाड डिटेक्ट केलेत,

गतजन्मीचे कुजके स्टॅम्पस् कधीच आऊटडेटेट झालेत…”

अर्थात ह्या कवितेवर उत्स्फूर्त दाद मिळाली होती, हे सांगायलाच नको !  कवितांशिवाय कुणी गाणे म्हणत होते तर कोणी चुटकूले सादर करीत होते.  अशी ही रंगतदार मैफील चांगलीच आठवणीत राहीली. 

एकदा मी दारव्हा, दिग्रस, पुसद या कार्यकर्त्यांसोबत मुर्तिजापूरला रात्रीला येऊन पोहोचलो होतो. रेल्वे स्टेशनवर रात्रभर झोपून सकाळी आम्ही मुर्तिजापूर ते यवतमाळला जाणारी ‘शकुंतला ‘ झुकझूक गाडीने यवतमाळला गेलो होतो.

दि. १३,  १४ व १५  सप्टेंबर १९९१ च्या दरम्यान तिन दिवस  महाराष्ट्रातील बीएसपी/बामसेफ चळवळीतील प्रमुख ३३ कार्यकर्त्यांची मीटिंग नागपूर येथे महाराष्ट्राचे बीएसपी संयोजक श्रीकृष्ण उबाळे ह्यांनी बोलाविली होती. उबाळे साहेबांनी मिटींगचे पत्र जसे इतरांना दिले होते, तसेच  मला पण  व्यक्तीशः दिले होते हे विशेष ! ही मिटींग बिएसपीच्या जडणघडणीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण होती. त्यामुळेच चळवळीतील नेमक्या कार्यकर्त्यांना पाचारण केले होते. 

ही मिटींग बाबाजी मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली बंद खोलीत घेण्यात आली होती.  

माझ्याशिवाय यवतमाळहून जी.सी. कुंभारे व बी.ए. ढेंगळे या मीटिंगला गेलो होतो. यात ट्रेड युनियन, रिसर्च अँड डेव्हलेपमेंट, प्रेस अँड  पब्लीकेशन, को-ऑपरेटिव्ह मुव्हमेंट, सेटअप ऑफ पॅालिटीकल पार्टी,  स्टुडन्ट, युथ, वुमन विंग, अॅगिटेशनल प्रोग्रॅम इत्यादी निरनिराळ्या  विषयांवर  चर्चा होवून प्रत्यकांचे मते नोंदविण्यात आले होते आणि त्यानुसार  निर्णय घेण्यात आले होते. मला अभिमान वाटतो की अशा महत्वपूर्ण मिटींगमध्ये मला भाग घेण्याची संधी मिळाली होती.  या मिटिंगमध्ये जेव्हा कामगार संघटना स्थापन करण्याबाबतचा विषय आला; तेव्हा मी प्रामुख्याने भाग घेऊन कामगार संघटनेची आवश्यकता का आहे हे सविस्तरपणे मांडले होते. मी सांगितले होते की, प्रत्येक प्रमुख  पक्षाला कामगार संघटना संलग्नीत झालेली असते. कम्युनिस्ट पक्षाला आयटक, सिटू आणि समाजवाद्याला हिंद मजदूर सभा, काँग्रेसला इंटक व भाजपाला भारतीय मजदूर संघ अशा कामगार संघटना जोडलेल्या आहेत.  कामगार वर्गांकडे पैसा, बुद्धी, प्रशासकीय सत्ता व अनुभव  असतो. याचा फायदा पक्षाला होत असतो.

त्याशिवाय  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी. आय. पी. रेल्वेकामगार परिषद मनमाड येथे दि. १२ व १३ फेब्रुवारी १९३८ रोजी दिलेले भाषण कामगार वर्गासाठी अत्यंत मोलाचे, मार्गदर्शक आणि दिशानिर्देश देणारे असल्याचे मत मी मांडले होते. त्यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे म्हणजे-
१.       कामगाराच्या हितासाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे. यात काही किंतु नाही. परंतु तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही राष्ट्रीय उद्दिष्टासाठी संघटीत झाले पाहिजे.
२.      कामगार संघटनानी राजकारणात शिरलेच पाहिजे. कारण शासन सत्तेवाचून कामगारांच्या हिताचे संरक्षण करणे अशक्य आहे.
३.      संघटनेच्या शक्तीला कायद्याच्या शक्तीची जोड मिळावयास हवी. तुमची संघटना उभारण्याच्या जोडीलाच तुम्ही देशाच्या राजकारणात भाग घेतल्याशिवाय हे घडू शकत नाही.
४.     स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्वावर आधारलेली नवी पध्दती स्थापन करणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे. याचा अर्थ समाजाची पुनर्रचना आणि अशा प्रकारची पुनर्रचना समाजात घडवून आणणे हे कामगार वर्गाचे प्राथमिक स्वरूपाचे कर्तव्य आहे. परंतु कामगार वर्ग हे ध्येय कसे साध्य करून शकेल? राजकीय शक्तीचा परिणामकारक उपयोग झाल्यास याबाबतीत ते निश्चितच एक शक्तीशाली साधन ठरते. मग त्यांनी राजकीय शक्ती साध्य केली पाहिजे.
५.     काँग्रेसपासून स्वतंत्र स्वतःचा असा वेगळा राजकीय पक्ष कामगारांनी स्थापन करावा, असा सल्ला देण्यास मला मुळीच हरकत वाटत नाही.
६.      जो पक्ष वर्गहिताच्या, वर्गजाणिवेच्या पायावर आधारलेला असेल, अशा पक्षामध्ये  तुम्ही सामील व्हावे. ही कसोटी लावून पाहिल्यास तुमच्या हिताच्याविरोधी नसलेला, मला माहीत असलेला पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष हा होय. स्पष्ट कार्यक्रम असलेला तो एकच पक्ष असून कामगाराच्या हिताला सर्वोच्च स्थान देतो, त्याचे धोरण सुनिश्चित आहे.
याच भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कम्युनिस्टांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ९ नोव्हेंबर १९४२ रोजी मुंबई आकाशवाणी केंद्रावर मजूरमंत्री या नात्याने केलेलं  भाषण महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. बाबासाहेब  म्हणतात की, “देशाला अचूक नेतृत्व देण्याची गरज आहे. हे नेतृत्व कोण देऊ शकतो? हे नेतृत्व फक्त कामगारवर्गच देऊ शकतो, असे मला वाटते. नवी समाज रचनाच कामगारांचे आशास्थान असते. त्यासाठी कामगारच योगदान करू शकतात आणि या दिशेनेच भारताचे राजकीय भवितव्य ते साकार करू शकतात.”

म्हणून बाबासाहेबांचे मार्गदर्शन लक्षात घेता कामगार संघटनेची गरज असल्याचे मी सांगितले होते. 

याच मिटींगमध्ये  महाराष्ट्राच्या  बिएसपी व निरनिराळ्या आघाडीची कार्यकारिणी निवडण्यात आली होती. यात अध्यक्ष म्हणून श्रीकृष्ण उबाळे, उपाध्यक्ष म्हणून  फिरोज अली, दशरथ मडावी, प्रा. मा.म.देशमुख व अॅड. राहूल हुमने, सचिव म्हणून राजरतन मोटघरे, डॉ. एस.आर. अभंग इत्यादी पदाधिकारी निवडण्यात आले होते.   तसेच निरनिराळ्या आघाड्या आणि त्याचे प्रमुख यांची पण निवड करण्यात आले होते.  त्यात ‘बहुजन स्टुडन्टस् युनियन ऑफ इंडिया’चे प्रा. पी.एस.चंगोले, ‘बहुजन युथ फेडरेशन ऑफ इंडिया’चे सिद्धार्थ पाटील हे प्रमुख होते. 

‘रिसर्च अँड डेव्हलेपमेंट (बामसेफ) विंग’ अंतर्गत ‘डॉ. आंबेडकर रिसर्च इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ‘ स्थापन करण्यात आले होते. या विंगचे प्रमुख म्हणून डॉ. डी.एस.पिंपळकर होते. यात आजिवन  सदस्य म्हणून मला घेण्यात आले होते. याची पहिली मिटींग २५ सप्टेंबर १९९१ रोजी झाली होती. 

तसेच ‘बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन’ नावाची कामगार संघटना नव्याने स्थापन करून मला सहसचिव म्हणून राज्य कार्यकारिणीत  घेण्यात  आले होते. अध्यक्ष म्हणून  बी.आर.बनसोडे सोलापूर, उपाध्यक्ष म्हणून  पी.एस.खोब्रागडे नागपूर व डब्ल्यू. डी.थोरात मुंबई, महासचिव म्हणून बी.डी.हजारे नागपूर,  सचिव म्हणून  एस.बी.निशानराव अमरावती, सहसचिव म्हणून  आर.के.जुमळे, यवतमाळ  व कोषाध्यक्ष म्हणून एस.बी.डोईफोडे, वर्धा अशी ती राज्यस्तरीय कार्यकारिणी होती.  

या मिटींगबाबतीत आठवणीत राहणारी गोष्ट म्हणजे एका कार्यकर्त्यांने एक छत्तीसगढी गाणं म्हटलं होतं. गाणं मोठं आहे, पण त्याच्या दोन ओळी अशा होत्या-

‘कैसे खाबेरे कैसे जिबेरे नागरवाला !

मोरो देशमॅा, मोरो गावमॅा,

मोरो घरमा,  रिक्षावाला… टांगेवाला… 

‘कैसे खाबेरे कैसे जिबेरे नागरवाला !’

म्हणजे कसा जगतो रे, कसा खातो रे, रिक्षावाला-टांगेवाला… अशा अर्थाचं ते गाणं होतं.  त्यांच्या जगण्याची विदारक परिस्थिती या गाण्यात चितारली होती.

दाऊराम रत्नाकर हा युवक मध्यप्रदेश विधानसभेत बिएसपीचा आमदार म्हणून निवडून आला होता. तो लोकजागृती करतांना हे गाणं डफ वाजवून म्हणत होता. त्याचा सत्कार नागपूरला घेण्यात आला होता. त्याबाबतीत एक गंमत सांगितली होती. नागपूरला मध्यप्रदेशातून आलेले छत्तीसगढी बाया-माणसं रोडच्या कामावर ठेकेदाराकडे काम करीत. जेथे त्यांच्या झोपड्या होत्या, तेथेच हा कार्यक्रम आयोजीत केला होता. कार्यक्रम सुरु झाला, पण कोणीही कार्यक्रमाच्या ठिकाणी आले नव्हते.  पण दाऊराम रत्नाकर यांनी  डफ वाजवत हे गाणं म्हणनं सुरू केलं अन् ते ऐकताच सारेजण कार्यक्रमस्थळी हजर झाले होते. एवढं हे गाणं त्यावेळी प्रसिद्ध झालं  होतं. 

यवतमाळला दि. २२. ९.१९९१ रोजी मिटींग आयोजीत करून नागपूरच्या या मिटींगचा  वृतांत सादर केला होता. या मिटींगला यवतमाळशिवाय पुसद, मारेगाव, दिग्रस, पांढरकवडा, राळेगाव, बाभूळगाव, घाटांजी, वणी, कापेश्वर, पाचखेड अशा अनेक ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते.

बामसेफ शिवाय आणखी ‘बहुजन एम्पलॅाइज फेडरेशन’ या  संघटनेची जबाबदारी सहसचिव या नात्याने  माझ्या शिरावर येऊन पडली होती. त्यामुळे ह्या संघटनेचा प्रचार आणि विस्तार करण्यासाठी मी कामाला लागलो. मी या कामगार संघटनेच्या शाखा यवतमाळ, दारव्हा, दिग्रस येथे स्थापन करून शाखा कार्यकारणी निवडल्या होत्या. २५.१२.९१ रोजी राज्य उपाध्यक्ष पी.एस.खोब्रागडे व कोषाध्यक्ष एस.बी.डोईफोडे यांच्या उपस्थितीत जिल्हा मिटींग आयोजीत केली होती. बिईएफ (बहुजन एम्पलॅाइज फेडरेशन) चंद्रपूर शाखेची जबाबदारी माझ्याकडे दिल्याने मी चंद्रपूरचे सदस्य डी.जे.वानखडे यांना भेटून सदस्य नोंदणीबाबत व मुंबईच्या अधिवेशनाबाबत चर्चा केली. त्यानंतर वेळोवेळी त्यांच्याकडून अहवाल घेत होतो. 

दि. ५.१.१९९२  रोजी झालेल्या मिटींगमध्ये यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली.  या  कार्यकारिणीत प्रामुख्याने वाय.एस.आहाटे जिल्हाअध्यक्ष, एस.जी.नगराळे कार्याध्यक्ष, पी.आर.जासुदकर उपाध्यक्ष दिग्रस, सचिव वसंत कनाके, सहसचिव लक्ष्मण नन्नावरे वणी, श्रावण केराम पांढरकवडा, डी.डब्ल्यू. राऊत पुसद, एस.एस.रेकलवार कळंब व कोषाध्यक्ष बी.ए.ढेंगळे दारव्हा यांचा समावेश होता. 

याशिवाय मी बिव्हीएफ संघटनेच्या कामाची माहिती व उपयुक्ततेच्या बाबतीत पत्रके काढून जिल्हाभर वाटली. अशा प्रकारे जिल्हा आणि तालूका स्तरावर सतत मिटींगा आयोजीत करून व पत्रके वाटून संघटनेचा विस्तार करीत होतो. 

फेब्रुवारी  १९९२ मध्ये मुंबई येथे  होऊ घातलेल्या बहुजन एम्प्लॉइज फेडरेशनच्या  पहिल्या अधिवेशनाची जबाबदारी ज्या सात लोकांवर सोपविली होती, त्यात माझाही अंतर्भाव होता.  या अधिवेशनासाठी  यवतमाळ जिल्ह्यातून इतर जिल्ह्यापेक्षा सर्वात जास्त  निधी आम्ही  जमा करून दिली  होती. त्याशिवाय यानिमित्ताने काढण्यात आलेल्या  विशेषांकासाठी जाहिराती पण दिल्या होते.  या अधिवेशनात  भाग घेण्यासाठी काही कार्यकर्त्यांसोबत गेलो होतो. विशेषांकात  माझा लेख छापण्यात आला होता. या लेखात मी  कामगार संघटनेचे उद्देश व   आवश्यकता याबाबतीत माहिती दिली होती.  अशा प्रकारे संघटनेच्या कार्याचा विस्तार वाढत गेला. 

३०.८.१९९२ रोजी दारव्हा जि. यवतमाळ येथे पारधी समाजाचे प्राध्यापक सुभाष घोसले सर यांच्या अध्यक्षतेखाली  शिक्षक वर्गांची मिटींग घेऊन संघटनेचे ध्येयधोरणे समजावून सांगितले. याचवेळी अन्नाभाऊ साठे यांची जयंती पण साजरी करण्यात आली. आहाटे व नगराळे साहेबांनी अन्नाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.  या मिटींगमध्ये एम.जे.चांदेकर अध्यक्ष, पी.बी.मनवर कार्याध्यक्ष, के.पी.चव्हाण उपाध्यक्ष, डी.बी.गडलिंग सचिव आणि एम.एस.खडसे कोषाध्यक्ष असे विविध जातीतील शिक्षकांची कार्यकारिणी निवडण्यात आली होती.   

यवतमाळ येथील आदिवासी विकास कार्यालयात काम करणाऱ्या ३५ रोजंदारी कामगारांना काढून टाकण्यात आले होते. त्यावेळी मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केला होता आणि धरणे कार्यक्रम आयोजित करून आयुक्तांशी चर्चा करून त्यांना कामावर घेण्यासाठी भाग पाडले होते. 

बाभूळगाव येथील एका शाळेतील शाळा संचालकाकडून जी.झेड.कांबळे, या शिक्षकावर होत असलेल्या जातीय छळवणूकी विरोधात पत्रव्यवहार केला होता. हे कार्य करीत असतांना विशेषतः बामसेफ व बहुजन एम्पलॅाइज फेडरेशनच्या  कार्यकर्त्या  विमल स्थूल यांची खूप मदत झाली होती. 

प्रा. पी.एस.चंगोले सर हे ‘बहुजन स्टुडन्टस् ऑफ इंडिया ‘ या विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र संयोजक होते. त्यांनी मला दि.८.११.१९९१ रोजी पत्र लिहून यवतमाळ जिल्हा व यवतमाळ शहर संयोजकांची निवड करून त्यांची नावे पाठविण्याचे काम माझ्यावर सोपविले होते. मी १२.११.१९९१ ला मिटींग घेऊन जिल्हा संयोजक म्हणून बौद्ध समाजाचे  नाना मेश्राम व शहर संयोजक म्हणून कुणबी समाजाचे  नरेश राऊत यांची निवड करून कळविले होते.  

बहुजन नायकचा जिल्हा पत्रकार म्हणून आनंद गायकवाड यांचे नाव निश्चित करून कळवले.

बामसेफ, बहुजन एम्पलाइज फेडरेशनशिवाय  माझ्या विद्युत मंडळ खात्या अंतर्गत कार्यरत असलेल्या  ‘मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटने’चा  यवतमाळ सर्कलचा सेक्रेटरी असल्याने या पण कामाकडे मला व्यस्त राहावे लागत असे.  

या दरम्यान जिल्हापरिषद/पंचायतीच्या निवडणुका आल्या होत्या. त्यात बीएसपीचे उमेदवार उभे करण्यात आले होते. मी कार्यकर्त्यांसोबत प्रचारासाठी सुट्ट्या काढून फिरलो होतो. आमचा अॅटो गावात शिरला की, काही पोरं-सोरं आमच्या भोवती जमा होत. ते सांगत की माझ्या घरात इतके- इतके लोकं आहेत.  तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या.  आम्ही तुम्हालाच मते देऊ. मनात यायचं, या मुलांना कसं कळलं असेल की,  मते हे निवडणूकीच्या बाजारात  विकण्यासाठीच असतात म्हणून !  हा व्यवहार  या मुलांना  कोणी शिकवला ? हे मुलं म्हणजे उद्याचे  नागरीक !   भावी मतदार !  यांची मानसिकता कशी बनेल याची  चिंता का कुणाला वाटत नाही ?

माझा थोडा दुरचा नातेवाईक एका गावाचा सरपंच होता. आम्ही  त्या गावात गेलो.  गावात सरपंच-पाटील यांना मान असतो. त्यांच्यामागे गावातले गठ्ठा मतदान असते. तो मला म्हणाला, “तुला खरं ते सांगतो. आमच्या गावात पाण्याची नेहमीच टंचाई असते. विहीर कोरडी पडलेली असते. काँग्रेसचा पुढारी पंचायत समितीचा सदस्य आहे. तो माझ्या सांगण्यावरून रोज पाण्याचा टँकर पाठवून विहिरीत पाणी ओततो. आम्ही जर काँग्रेसला मते दिली नाहीत तर ते आमचे पाणी तोडून टाकतील. मग आम्ही काय करावं? बिएसपी तर हे काम करू शकत नाही,  ना ?” म्हणून गावातले लोक प्रत्येकवेळी  यांनाच कसे निवडून देतात,  याचे खरे इंगीत मला उमगलं. कारण  येनकेन प्रकारे सत्तेवर आले की, हे  या पध्दतीने सत्ता टिकवून ठेवतात. याला म्हणतात राजकारण  ! हे राजकारण बिएसपीच्या अंगवळणी कधी पडणार ?

तसेच निवडणुकीच्या प्रचारासाठी आम्ही यवतमाळ जवळील स्टोन क्रशरच्या वसाहतीत गेलो. सोबत दशरथ मडावी होते. वसाहतीतील लोकांनी आम्हाला सांगितले की, “इतर पक्ष आम्हाला रोजच  दारू पिण्यासाठी तीन – तीन रुपये देऊन जातात. तुम्हीही जर त्यापेक्षा जास्त पैसे दिलेत तर  तुम्हाला मते द्यायचा विचार करू.”  दारूच्या पेल्यात बुडविणारे राजकारण लोकशाहीला कसे अभिप्रेत आहे, हेच मला कळेना  !

यवतमाळला लागून असलेल्या  उमरसरा या गावाला तर वेगळाच अनुभव आला. तेथील महिला मंडळातील महिलांनी आम्हाला सांगितले की, “आम्हाला गावात  बाबासाहेबांचा पुतळा बसवायचा आहे. भाजप/काँग्रेसने आम्हाला २००० रुपये देऊ केले आहे. तुम्ही त्यापेक्षा जास्त देत असाल तर आमच्या गावाचे लोक तुम्हाला मते देतील.”  बाबासाहेब म्हणाले होते की, “भाजी-भाकरीसाठी आपले मत विकू नका.”  येथे तर  या लोकांनी चक्कपणे बाबासाहेबांनाच  विकायला काढले

होते !

ज्या गावात आम्ही सभा घेऊन चळवळ समजावून सांगितली होती, त्या गावातील लोकांनी हत्तीला मतदान केलं नसल्याचे कळल्यावर त्यांना विचारले की, तुम्ही मते का दिली नाहीत ? त्यावर ते म्हणाले, “नारळाचे झाड, हे  चिन्ह असलेल्या आरपीआयच्या लोकांनी सांगितले की, कांशीराम-मायावती आपल्या जातीचे नाहीत. बाबासाहेबांच्या रक्ताचे नाहीत. म्हणून त्यांना मते देऊ नका.” हे ऐकून आमच्या लक्षात आले की,  आपणच त्यांचं प्रबोधन करायला कमी पडलो.  ही चुक त्यांची नाही,  आपली आहे. 

तसेच विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही कर्मचाऱ्यांनी मिटिंग घेऊन आंबेडकरी पक्षांच्या गटांना एकत्र करून निवडणूक लढविण्याचा प्रयोग यवतमाळ जिल्ह्यापुरता तरी  करून पहावा असे ठरविले  होते. यात माझा पण महत्वाचा सहभाग होता. आम्ही त्या गटांच्या प्रतिनिधींना आमचा उद्देश सांगितला. पण याबाबतीत मात्र विचित्र अनुभव आला. रिपब्लिकन पार्टीच्या एका गटाने आम्हाला चक्कपणे ठणकाऊन सांगितले की, “तुम्ही नोकरीवाले, महिना संपला की पगार घेता. आम्ही वर्षभर झटून लोकांची कामे करतो, प्रसंगी त्यासाठी आंदोलने करतो. आम्हाला काय मिळते ? काहीच  नाही !  लोकांकडून खड्कुही मिळत नाही ! पण निवडणूक आली की आम्हाला काँग्रेस-भाजपकडून मलिंदा मिळतो. त्यावरच आम्ही आमचे पोटं भरतो आणि  पक्ष चालवितो.” हे ऐकून आम्ही सारे गर्भगळीत झालो. त्यामुळे पुढील प्रवास तेथेच थांबला, हे सांगायलाच

नको ! असेही विचित्र अनुभव आम्हाला या राजकारणातून  मिळाले होते. 

सामाजिक परिवर्तनाची चळवळ चालवून बहुजन समाजाला योग्य दिशा दाखविणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले याची स्मृती  आणि डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने बहुजन समाज पार्टीने संघर्ष वर्ष घोषीत केले होते. त्यानिमीत्त पार्टीतर्फे देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या संघर्ष वर्षात दि. ६ डिसेंबर १९९० पासून कन्याकुमारी येथून सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक मुक्ती आंदोलन अंतर्गत या रॅलीची सुरवात झाली होती. या रॅलीचे नेतृत्व मा. कांशीरामजी करीत होते.

या रॅली अंतर्गत पाचसूत्री कार्यक्रम राबविण्याचे जाहीर केले होते. 

सामाजिक परिवर्तन-

१. आत्मसन्मानासाठी संघर्ष 

२. स्वातंत्र्यासाठी संघर्ष 

३. समतेसाठी संघर्ष 

४. अस्पृश्यता, अन्याय, अत्याचार याविरुद्ध संघर्ष 

५. आतंकवादाविरूद्ध संघर्ष 

आर्थिक परिवर्तन- 

१. भारतीय किसान मजदूर आंदोलन 

२. भारतीय शरणार्थी आंदोलन 

३. भारतीय दस्तकारी आंदोलन (बलुतेदारांसाठी)

४. भारतीय सफाई मजदूर आंदोलन 

५. भारतीय भागीदारी आंदोलन 

ही रॅली यवतमाळला  दि. ८ जानेवारी १९९१ रोजी आली होती. त्यानिमीत्त आझाद मैदानावर मा. कांशीरामजी यांची जाहीर सभा झाली होती. या कार्यक्रमाच्या आयोजनात बामसेफ कार्यकर्त्यांसोबत माझाही मोठा सहभाग होता. बामसेफ व बिएसपीसाठी लागणा-या कोणत्याही नियमीत अथवा आकस्मिक खर्चाचा भार भागवण्यासाठी फंड जमा करण्याचं काम प्रामुख्याने मला व माझ्या टिमकडे सोपवण्यात आली होती. आम्हाला गमतीने ‘बेगर स्कॅाड’वाले म्हणत. 

जाहीर सभेच्या निमित्ताने मा.कांशीरामजी पहिल्यांदाच यवतमाळला आले होते. मा.कांशीरामजींच्या यवतमाळ शहरात होणाऱ्या आगमनाप्रीत्यर्थ त्यांचे कार्य आणि कर्तृत्व दर्शविणारा लेख त्यांच्या फोटोसहीत माझी पत्नी  कुसुम हिच्या  नावाने मातृभूमी या दैनिक वृत्तपत्रात छापून आला होता. हा पेपर सभेसाठी आलेल्या बहुतेक लोकांजवळ दिसत होता. त्यामुळे हा लेख सर्वांनाचा आवडलेला दिसत होता.

त्यापुर्वी बामसेफ बांधणीच्या सुरूवातीच्या काळात मा.कांशीरामजी काही वेळा यवतमाळला येऊन गेल्याचे जुने कार्यकर्ते सांगत होते. ते एसटीस्टँडवरून सायकल भाड्याने घेऊन नोकरीदार वर्गाकडे विचारत विचारत जात असत.

या परिवर्तन रॅलीची सांगता १५ मार्च १९९१ रोजी दिल्लीला होणार  होती.

त्यावेळी महाराष्ट्र युनिट कडून बामसेफच्या कार्यकर्त्यांना  दिल्लीच्या बिएसपी कार्यालयात काम करण्यासाठी पाठविले जात असत.   मला आणि यवतमाळ  जिल्हा संयोजक शेख मेहबूब आलम साहेब  असे दोघांना एक महिन्यासाठी पाठविण्यात आले होते.

यापुर्वीही  मी दिल्लीला जाऊन आलो होतो. पण वेगवेगळ्याच प्रकरणात गेलो होतो. दुर्दैवाने माझ्या आयुष्यात त्यावेळी  एक वावटळ घोंघावत   आलं होतं.  त्याचा उल्लेख या लिखाणात करावा की नाही याचा विचार करीत होतो. पण शेवटी राहवलं नाही  म्हणून सांगतो. आमच्या पति-पत्नीच्या घरघूती भांडणाचे पर्यवसान या अप्रिय  घटनेत झाला होता. संशयी वृतिचा हा परिणाम होता. माझी पत्नी कुसुम हिला कमरेचा आजार जडला होता. खाजगी दवाखान्यात   उपचार करतांना तिला ट्रॅक्शन लावले होते. पण महिनाभर ट्रॅक्शन लावायचा म्हणजे खाजगी दवाखाना महागात पडला असता  म्हणून माझा लहान भावाच्या डॅाक्टर असलेल्या  मित्राच्या ओळखीने सरकारी दवाखान्यात तिला भरती केले होते. 

नेमके त्याचवेळेस माझी साळी व तिचे पती तिच्या वैद्यकिय उपचारासाठी आमचेकडे आले होते. त्यावेळी  आमच्या स्वयंपाकाची अडचण पाहून  तिच्या पतीने तिला थांबण्यास सांगितले होते. पण माझी पत्नी आमच्याकडे आधीपासूनच  संशयाने पाहत होती. मी दवाखान्यात जेवण, चहा व इतर उपयोगी वस्तू नेवून देत होतो. तेव्हा माझी पत्नी माझ्याशी धड बोलत नव्हती. उलट दोनदा तिने जेवण सुध्दा घेतले नव्हते. जेवणाचा डब्बा तसाच परत न्यावा लागला होता. म्हणून तिच्या सोबत कोणीतरी जवळचे असावे; यासाठी मी  मामीजींना गावावरून आणून दवाखान्यात तिच्या जवळ ठेवले.
त्या दिवशी ती रागातिरेकाने इतकी लालबूंद झाली होती की जणू काही क्रुद्ध झालेला नाग फुसफुसत माझ्यावर विष फेकत आहे, असे वाटत होते.
तिचे ते कडवट बोलणे सहन करीत, कसे तरी तिला शांत केले. मात्र ह्या प्रकरणानंतर मी पार कोलमडून गेलो होतो. एखादा वृक्ष उन्मळून पडावा तशी माझी गत झाली होती. त्यामुळे  हयापूढे जीवन जगण्यात काही अर्थ नाही, असे  राहून राहून वाटत होते. म्हणून त्या रात्री जीवनयात्रा संपवावी, असे मनोमन ठरविले होते. माझ्या जीवनात रुक्ष आणि रखरखीत असे भयानक वाळवंट उरल्याचे दिसत होते. दु:खाचे दाहक चटके व उरात न मावणारी असह्य मनोव्यथा सहन करीत तीळातीळाने जगण्यापेक्षा मेलेला बरा !

म्हणून घरी येतांना रस्त्याच्या बाजूने असलेल्या सार्वजनिक विहिरीमध्ये ऊडी टाकून जीव द्यावा असा मी पक्का विचार केला होता. त्यापुर्वी त्याच विहिरीमध्ये काही लोकांनी जीव दिल्याचे मी पाहिले होते.

परंतु  मी आत्महत्या का केली हे कुणाला तरी सांगायला पाहिजे, नाहीतर ते रहस्यच राहील, म्हणून घरी येऊन हे प्रकरण साळीला सांगावे आणि मगच जीव द्यावा असे वाटले. हाच  विचार माझ्या मनात घोळत असतांना माझे पाय घराकडे वळलेत.

त्यावेळी खूप रात्र झाली होती. घरी सर्वजण झोपले होते. मी बाहेरच्या खोलीत झोपलो होतो. झोप लागत नव्हती. विचाराचा काहूर मनात सुरू होता. शेवटी मी आतमधल्या खोलीत झोपलेल्या साळीजवळ जाऊन सांगण्यासाठी स्पर्श करणार, त्याच क्षणी  ती दचकून उठली व घाबरून अंगणात गेली. मला पाहून तिने वेगळाच अर्थ घेतला. आता या प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली होती. आता एका प्रकरणाने दुसर्‍या  नव्या प्रकरणाला जन्म दिला होता. त्यामुळे कधी नव्हे इतका मी खचून गेलो होतो. मी माझ्या जागेवर येऊन झोपलो. आता यापुढे आपले जीवन संपविण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नव्हता, अशी माझी मनोभावना सांगत होती.  त्यानंतर तिने माझ्याशी बोलणे सोडून दिले. तिला मी तिच्या सासुरवाडीला पोहचून दिले. वाटेत ती काहीच बोलत नव्हती. त्यामुळे घडलेला प्रकार तिला सांगू शकलो नाही. पण तिची क्षमायाचना करीत जेव्हा मी आत्महत्या करीन असं म्हणालो; तेव्हा कुठे ‘असे करु नका’ अशी मला शपथ घातली. नाहीतर मी सुद्धा तसेच करीन अशी भीती घातली. तरीही घर सोडून मी कुठेतरी निघून जावे, असा मी मनात  विचार केला.  मी  घरी आलो. सामानाची जुळवाजूळव करून जे काही पैसे घरी दिसलेत ते घेतले. चिठ्ठी लिहून मुलीच्या कंपासपेटीत  ठेवली. जेव्हा ती उघडेल, तोपर्यंत मी दूरवर जाऊन पोहचलो असेल,  या उद्देशाने मी तिच्या कंपासपेटीचा उपयोग केला. मी घर सोडलं तेव्हा एकदा पाठीमागे वळून घराकडे पाहिले; तेव्हा अश्रूच्या धारा वाहायला लागल्या होत्या. अनेक भावना व विचार मनामध्ये दाटून आल्या होत्या. वणव्यात सापडलेल्या पाखरासारखा तडफडत होतो. नागपुरला आलो. तेथे घरी व साळीला पत्र लिहले. पत्र लिहितांना डोळ्यातून अश्रूच्या धारा सतत वाहत होत्या.  त्यात लिहले की, ‘मी जरी घर सोडून जात असलो तरी मरणार नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत मी ओळख विसरुन जगणार आहे. त्यामुळे  माझा तपास करण्याचा व्यर्थ प्रयत्‍न करु नये.’ तसेच माझ्या कार्यालयाला सुट्टीचा अर्ज लिहून ही  पत्रे तेथील पोष्टाच्या डब्ब्यात टाकले. मी माननीय कांशीरामजींच्या  चळवळीत  काम करीत असल्याने दिल्ली येथील ऑफीसमध्ये कारकूनाचे काम करावे व माझ्या नोकरीतील  कामाच्या अनुभवाचा तेथे उपयोग करावा, असा विचार माझ्या मनात येऊन गेला. म्हणून मी दिल्लीलाच जायचे ठरविले. मी जनरल डब्ब्याची तिकीट काढून रिझर्व्ह डब्यातील दरवाजाजजवळील रिकाम्या जागेत उभा असतांना दोन बंदूकधारी रेल्वे पोलीस येतांना दिसले. त्यापैकी एक माझ्याजवळ येऊन विचारपूस करु लागला.  

‘ कहाँ जा रहे हो?’ 
‘ दिल्ली..’ 
‘तिकीट निकाली है?’ 
‘हॉ.’ 
‘ किससे मिलने जा रहे हो?’ 
‘ मान्यवर कांशीरामजीसे.’
मा.कांशीरामजींचं नाव ऐकल्याबरोबर तो थोडा थबकला आणि मला म्हणाला, ‘ठिक है. बैठे रहो.’ 
त्या पोलीसाचे मला आश्चर्य वाटले. कदाचित तो पण कांशीराम साहेबांचा चाहता असावा असं मी समजून गेलो.

त्यानंतर लगेच दुसरा पोलीस माझ्याजवळ आला. त्यांनी मला विस रुपये मागितले. मी पहिल्या पोलीसाकडे केविलवाण्या नजरेने पाहिले. त्यांनी माझ्याकडे पाहून त्या पोलीसाला हाताने इशारा करुन सोडून द्यायला सांगितले. त्यामुळे माझी पोलीस चौकशीतून सुटका झाली.
दिल्लीला आल्यावर कळले की, महाराष्ट्राचे संयोजक, श्रीकृष्ण उबाळे साहेब  नॉर्थ एव्हेन्यूच्या ऑफीसला आलेले आहेत. त्यामुळे मला हायसे वाटले ! कारण ते माझ्या अगदी जवळच्या परिचयाचे असल्याने ते  माझी निश्चितच शिफारस करतील अशी मला खात्री वाटत होती.
त्यांना मी दिल्लीला  राहून ऑफीसमध्ये नेहमीसाठी काम करण्याची इच्छा  व्यक्‍त केली. त्याचे कारण विचारले असतांना, मी वस्तुस्थिती त्यांना  समजाऊन सांगितली. तेव्हा त्यांना सुध्दा धक्का बसल्याचे जाणवले होते.
त्यांनी व ऑफीसमधील इतर कार्यकर्त्यांनी सल्ला दिला की, ‘तुम्ही परत जाऊन तूमच्या नोकरीतील  भानगडी मिटवून या. नोकरीतील पैशाने कुटुंबाचे पालनपोषण करण्याची तजवीज केल्यानंतरच दिल्लीला या. तुम्हाला येथे ऑफीसमध्ये निश्चितच काम करता येईल. तुमच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था होईल. त्याची काळजी करु नका. तुम्ही वाटल्यास दोन-तीन दिवस येथे थांबा. तुमच्या मनावरील ताण कमी झाल्यावर तुम्ही जायला काही हरकत नाही.’
त्यांचे सर्वांचे बोलणे मला पटले. मी परत येण्यासाठी रेल्वे स्टेशनला आलो. तेथे प्लॅटफॉर्मवर  एक गरीब बाई बसली होती. तिने मला तंबाखू व चुना मागीतल्यावर तिला त्या दोन्हीही पुडया देऊन टाकल्या व तुझ्याकडेच ठेव असे सांगितले. तिने तंबाखूला चुना लाऊन घोटला आणि तोंडात टाकला. नंतर तिने एका बोटाने चुना काढून तिच्या पायाच्या पोटरीला असलेल्या खांडकावर लावला. तिच्या बाजूला एक लहान मुलगी अंगावर फाटकी चादर ओढून झोपली होती. तिच्या डोक्यावरील पांघरुन काढून तिच्या डोक्याला असलेल्या खांडकाला तिने चुना लावला. ती असे करतांना मी तिच्याकडे पाहत होतो. मी तिला त्या मुलीबद्द्ल विचारले असतांना तिला ताप आला, असे ती सांगत होती. डोक्याच्या खांडकामुळे तिला ताप चढला असावा. मी तिला दहा रुपयाची नोट देऊन दवाखान्यात घेऊन जायला सांगितले. तीने पैसे घेतले, पण काहीच बोलली नाही. तिची अशी दिनवाणी अवस्था पाहून मला गहिवरुन आले होते. कदाचित माझीही अवस्था अशीच झाली असती या कल्पनेने थरारून गेलो. लवकरच गाडी आली. सामान्य श्रेणीचा डब्बा पाहून मी त्यात चढलो.
त्या डब्ब्यात सी.आर.पी. पोलीस व सैनिक बसले होते. रात्र झाल्यावर ते झोपायची तयारी करीत असतांना दंडुकाचा धाक दाखऊन डब्ब्यात बसलेल्या इतर प्रवाशांना त्या डब्ब्यातून दुसर्‍या डब्ब्यात जायला सांगत होते. कोणी जाग्यावरुन उठायला नकार दिला तर त्यांना धक्काबूक्की करीत होते.  मला सुध्दा ते उठायला सांगत होते. त्यापूर्वी  माझा तंबाखू खाण्याच्या निमित्ताने एका सैनिकाशी परिचय होऊन तो माझा मित्र झाला होता. म्हणून मी वाचलो. त्यांनी मला दोन बेंचच्या मध्ये असलेल्या जागेवर बसण्यास सांगितले. अशा रितीने माझ्या जीवनाची ससेहोलपट त्यांनेच थांबविली होती. दुसर्‍या दिवशी दुपारी मी घरी आलो. मुलीच्या कंपासपेटीतील चिठ्ठीमुळे प्रकरण सर्वांच्या लक्षात आले होते.  तेव्हा बरेच लोक  घरी आलेले दिसलेत. माझा लहान भाऊ व भावसून आले होते. माझी बहीण, भाऊजी, पत्नीचे  बाबा व मावशी पण आले होते. मामीजी तर आधीच घरी होत्या.
मी घरात पाय टाकल्याबरोबर  मला पाहून घरातले वातावरण स्मशान शांतता पसरल्यासारखे झाले होते. कोणाच्याही चेहर्‍यावर दु:ख अथवा आनंदाच्या छटा न दिसता एकमेकांकडे पाहत होते. पत्नी पण दवाखान्यातून घरी आली होती.
माझे बाबा ढसाढसा रडायला लागला. त्याच्या रडण्यामूळे मुलेही फुसफुसून रडायला लागले. मलाही रडू कोसळले. सगळे वातावरण शोकाने भारावून गेले होते.
मी ऑफीसला गेलो. तेथेही मी  निघून गेल्याची चर्चा होतीच.
कुणालाही न सांगता अचानक निघून गेल्याने काय परिणाम होतात, हे  त्यावेळी मला कळले होते.
नोकरी सोडल्याने मुला-बाळांच्या पालण-पोषणाचा व शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण होईल. मुलांचे भविष्य खराब होण्यास मीच जबाबदार राहीन. असे सर्वांचे मत पडले. मलाही या गोष्टीची तीव्रतेने  जाणीव झाली.
त्याशिवाय आमच्या खात्याच्या कर्मचारी संघटनेची जबाबदारी  माझ्यावरच  होती.  बामसेफ/बिएसपीच्या   चळवळीसाठी लागणारा निधी जमा करण्याचे काम मुख्यत: माझ्याकडेच होते.
तसेच पत्नीला महिला आघाडीमध्ये काम करायला मी मुद्दामच  प्रोत्साहित करीत होतो. तिला कार्यक्रमाला घेऊन जात होतो. भाषण लिहून देऊन कार्यक्रमात बोलायला  सांगत होतो. तिच्या नांवाने मी निरनिराळ्या विषयावर लेख लिहून प्रकाशीत करीत होतो. यामागे माझा उद्देश असा होता की,  सामाजिक कार्यात भाग घेतल्याने सामाजिक दडपण येते.  वैचारिक कक्षा रुंदावतात. म्हणून वागण्यावर बंधने येवून  सुधारणा होऊ शकते. त्या दृष्टीने  मी तिला सामाजिक व राजकीय कार्यामध्ये भाग घेण्यास प्रेरीत करीत होतो. ह्या सर्व अडचणी माझ्या लक्षात आल्याने  माझी नोकरी सोडून दिल्लीला जाण्याची  नियोजीत योजना नियतीने निष्फळ ठरवली. असेच म्हणावे लागेल. ही गोष्ट मी कथेच्या स्वरूपात ही घटना घडली त्याच वेळेस ‘आमची ती एक कथा ‘ या शिर्षकाखाली लिहून काढली होती. 

शेख साहेबांच्या बाबतीत सांगायचे म्हणजे ते मुस्लिम असुन सुद्धा  समोरच्या व्यक्तीला फुले-शाहू-आंबेडकर चळवळ पटवून देण्यात त्यांच्यात जबरदस्त क्षमता आणि  हातोटी  दिसली.  त्यामुळे एक मुस्लिम व्यक्ती ही परिवर्तनाची चळवळ आम्हाला  सांगतो हे पाहून लोक भारावून जात. मी जेव्हा एखाद्या नविन नोकरीदार व्यक्तीकडे पहिल्यांदाच  वर्गणी मागण्यासाठी जात होतो, तेव्हा मी शेख साहेबांना हमखास  घेऊन जात होतो. त्यावेळी मला पण हे त्याचं कौशल्य जाणवत होतं.  

मला  रॅलीच्या खर्चासाठी निरनिराळ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या अग्रिम रकमेचा हिशेब पूर्ण करायचा असल्याने दीड महिना दिल्लीला  थांबावे लागले होते. 

मी कॉमर्समध्ये ग्रॅज्यूएशन (बि.कॉम) केले असल्याने व माझ्या कार्यालयात लेखा विभागात काम करीत असल्याने मी कार्यालयात कॅश बुक लिहीणे, पत्रे टाईप करणे, फायलींग करणे, रॅलीत मिळालेल्या नोटांचे मोजमाप करून  कॅशबुकमध्ये नोंदी घेणे इत्यादी कामे करीत होतो. आम्ही हे काम बाबाजी मेश्राम यांच्या हाताखाली  करीत होतो. त्यावेळी नागपूरकडील दिलीप मेंढे, सुभाष पाटील, ढोणे  हे सुद्धा या  कार्यालयात काम करीत होते. दिलीप मेंढे हे ‘बहुजन संघटक’ या पत्रिकेचे काम सांभाळीत होते. ढोणे हे फोटोग्राफर होते. सुभाष पाटील हे बाहेरच्या कामाशिवाय  मा.कांशीरामजी यांचे सोबत राहून बरेचदा  साहेबांचे बॅाडीगार्ड म्हणून पण काम करीत  होते.  मी कार्यालयातील कामाशिवाय पक्षाचे मुखपत्र असलेले हिंदी भाषेतील ‘बहुजन संघटक’ या साप्ताहिक पेपरच्या वितरण कार्यात दिलीप मेंढे यांना   मदत करीत होतो. 

त्यावेळी हे कार्यालय नॉर्थ  एव्हेन्यूला बहिण मायावती  यांच्या क्वॅार्टरला लागून होते. आमची राहण्याची, जेवणाची  व्यवस्था पंजाबचे खासदार हरभजन लाखा साहेब यांच्या  क्वॅार्टरमध्ये करण्यात आली होती.  त्यावेळी बिएसपीचे लोकसभेत कुमारी मायावती, हरभजन लाखा व रामकृष्ण यादव असे  ३ खासदार होते.   

१५ मार्चच्या कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने लोक दोन दिवसाआधीच यायला सुरूवात झाली होती.  लालकिल्ला  जवळील मैदानावर लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. मी  हरभजन लाखा यांच्या सोबत जीपमधून  व्यवस्था पाहण्यासाठी जात असतांना रोडजवळील एका इमारतीच्या स्क्रीनवर संसद बरखास्त झाल्याची  बातमी  झळकली होती. मी लगेच  हरभजन लाखा साहेबांना म्हणालो, ‘साहाब, वो देखो… अब आप सांसद नहीं रहे, भुतपूर्व बन गये …!’ त्या स्क्रीनकडे पाहून माझ्याकडे विस्मयपणे पाहत हसले आणि म्हणाले, ‘हॅाव, यार…!!! 

दिल्लीला असताना मा.कांशीरामजींच्या बाबतीत  अविस्मरणीय आठवणी अजूनही  माझ्या ह्रदयात कोरून ठेवलेल्या आहेत. संसद बरखास्त झाल्यावर मा.कांशीरामजी यांनी सदर सभेचे रूपांतर निवडणूक प्रचारात करण्यासाठी मला प्रेस नोटचा ड्राफ्ट तयार करून दिला. मी तो टाईप करून साहेबांकडे नेऊन दिला. सदर प्रेस नोट वृतपत्रांना देण्यासाठी त्यांनी त्यांचे खाजगी सचिव  आंबेत राजन यांच्याकडे दिलेत.

आदल्या दिवशी मा.कांशीरामजी यांची रॅली  दिल्लीत दाखल झाली. रॅलीतील जवळपास  सारेच लोक  झोपले होते.  पण मा.कांशीरामजी तेवढ्या उशीरा  रात्रीला लोकांची व्यवस्था पाहत फिरत होते. मी त्यावेळी हरभजन लाखा साहेब यांच्या क्वार्टरमध्ये झोपत होतो. त्यादिवशी छापून आलेला बहुजन संघटकचा अंक मला वाचतांना बरीच रात्र झाली होती.  “क्या पढ रहे हो ! सोये नही, अभितक…?” असा आवाज आल्यावर मी वळून पाहिले तर प्रत्यक्ष मा.कांशीरामजी  दिसलेत. मला आश्चर्य वाटले की मा.कांशीरामजी एवढ्या रात्रीला फिरून देखरेख करीत होते !

 “नही साहाब, बहुजन संघटक पढ रहा हूँ!”

“ठिक है, पढो….” असे म्हणून ते तेथून निघून गेलेत. 

दुसऱ्या दिवशी सभेच्या ठिकाणी बोटक्लबवर लोक मिरवणूकीने येत होते. भारतातील निरनिराळ्या राज्यातून जवळपास पाच लाखाचे वर लोक या सभेला आले असावे असा अनुमान व्यक्त केला होता. सभेच्या स्टेजजवळील जागेवर महत्वाच्या लोकांना  बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना पासेस देण्यात येत होते. सुरक्षाव्यवस्था कडक केली होती. हे पासेस पाहूनच बहुजन व्हॉलिंटर फोर्स प्रवेश देत होते. महाराष्ट्रातील कार्यकर्ते माझ्या ओळखीचे असल्याने  त्यांना पासेस देण्याचे काम माझ्याकडे दिले होते.  

मा.कांशीरामजींची ही सभा अतीभव्य स्वरूपात झाली होती. मा.कांशीरामजी सभेत म्हणाले होते की, “जिस बाप के बच्चे नालायक होते हैं, उस बाप की कदर नही होती ! जिस बाप के बच्चे लायक होते हैं, उस बाप की कदर होती हैं !” अर्थात हे वाक्य  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत त्यांनी म्हटले होते. बाबासाहेबांचे  लेकरं  नालायक असल्याने त्यांची कदर होत नाही, या अर्थाने ते बोलले होते. सभा आटोपल्यावर रात्रीला ऑफिसमध्ये या वाक्याबद्दल मा. कांशीरामजी आमच्याकडून प्रतिक्रिया विचारत असतांना आम्ही मोकळेपणे त्यांच्या या वाक्याला दाद दिली होती. मी त्यांचे हे वाक्य कधीच विसरलो नाही, इतकं ते मला भावलं  होतं. कारण याची प्रचीती मी माझ्या वैयक्तिक जीवनात तर उतरविली होतीच; शिवाय मी अनेकांना बोलतांना हे उदाहरण देत होतो. आई-वडिलांची कदर व्हावी म्हणून मुलांनी लायक बनणे आवश्यक आहे. मुलं जर डॉक्टर, आयएएस, आयपीएस सारख्या मोठ्या हुद्द्यावर पोहचले तर त्यांचे त्याच हुद्द्यावर असलेले मोठमोठे मित्र वडिलकीच्या नात्याने तुमच्या समोर झुकतात किंवा पदस्पर्श करतात. इतकी आई-वडिलांची इज्जत वाढत असते. कारण हा अनुभव मी घेतला आहे.  माझा मुलगा प्रज्ञाशील याचे  मित्र कोणी कलेक्टर आहेत, पोलीस अधीक्षक आहेत, तर दुसरा मुलगा  संघशील याचे मित्र एमबीबीएस, एम.डी, एम.एस असे डॉक्टर आहेत. ते जेव्हा एखाद्या निमित्ताने घरी येतात, तेव्हा आमची ओळख करून दिल्यानंतर ते पदस्पर्श करतात. इतकी इज्जत जेव्हा मिळते; तेव्हा आई-बापाला खूप  मोठा आनंद मिळतो. प्रज्ञाशील जेव्हा यू.पी.एस.सी.स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला, तेव्हा ‘आय.बी.एन.-लोकमत’ टी.व्ही. चॅनलवर व निरनिराळ्या वर्तमानपत्रात ती बातमी झळकली होती. ही बातमी ‘लोकमत’ वर्तमानपत्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या आवृतीमध्ये सविस्तरपणे प्रकाशीत झाली होती. आमच्या गावातील मुले दु्ध विकायला सकाळीच यवतमाळला येत होते. त्यांना ‘लोकमत’ मध्ये ‘चौधरा’ या गावाचा उल्लेख असल्याचे सांगितल्यावर त्यांच्या आनंदाला इतके उधाण आले, की प्रत्येकांनी तो पेपर विकत घेतला आणि सांगायला लागलेत की, ‘आमच्या गावाचा मुलगा कलेक्टर झाला.’ त्यामुळे लोकांचा उर अभिमानाने व गर्वाने भरुन आला होता ! सांगायचं तात्पर्य म्हणजे केवळ आई-वडिलांचाच मान होतो, असे नव्हे तर त्याच्या गावाचाही मान वाढतो.  

सभेच्या दुसऱ्या दिवशी राजघाटावर म.गांधीच्या स्मारकाची तोडफोड केल्याची बातमी प्रसारमाध्यमात झळकली.  या प्रकरणात पंजाबचे काही तरूण मुले पकडले गेलीत.  ही बातमी रोजच पेपरात येत होती.  एवढेच नव्हे तर कांशीराम आणि मायावती यांना अटक करा असे संपादकीय लेख लिहिले जात होते. मा.कांशीरामजी त्यावेळी दोन दिवस सतत राज्यातून आलेल्या नेत्यांचे मिटींग घेण्यात व्यस्त होते. नंतर त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला. तेव्हा त्यांना कळले की हे प्रकरण मुद्दामच काँग्रेसच्या एका नेत्यांनी बिएसपीला बदनाम करण्यासाठी व सभेचे वृत्त दडपून टाकण्यासाठी  घडवून आणले होते. त्यावेळी  मा.कांशीरामजी यांनी राजीव गांधींना फोन करून खडसावले होते. मी त्यावेळी त्यांच्या कॅबीनमध्ये बाजूलाच उभा होतो.

दुसऱ्या दिवशी ऑफिसच्या लॅानवर  प्रेस कॅान्फरन्स घेतली. वार्ताहर लोकांसाठी गोडधोड पदार्थ आणले होते. हे पदार्थ पाहून  विनोदाने मा.कांशीरामजी म्हणाले की, हे पदार्थ खायची मला पण इच्छा होत आहे. यावर सगळेजण हसले. कारण साहेबांना  डायाबिटीज आहे हे सर्वांनाच माहित होतं. तेव्हा साहेब म्हणाले की, ‘एकवेळ परिस्थिती अशी होती की पैशाअभावी हे पदार्थ मला खाता येत नव्हते. आता दिसतात तर खाता येत नाही.’ 

मा.कांशीरामजी यांनी त्या वार्ताहर परिषदेत जी मांडणी केली, ते पाहून मी अवाक् झालो. साहेबांना एवढं सुचतेच कसं याचे मला अचंबा वाटत होतं. ते  म्हणाले की, “आपले वर्तमानपत्र आमच्या बाबतीत  खूप  चुकीच्या बातम्या देत असतात. आपल्या पेपरात लिहून येते की अमुक व्यक्तीने बिएसपी सोडली. मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारल्यावर ती व्यक्ती कोण होती, ते त्यांनाही माहिती नसते. म्हणजे  आमच्या बाबतीत एकतर चुकीच्या बातम्या देऊन ब्लॅकमेल केल्या जात आहेत किंवा बातम्या न देता ब्लॅकआउट केल्या जात आहेत,  याचेच उदाहरण म्हणजे राजघाट प्रकरण आहे. मला  आणि  मायावतीला अटक करा असे  तुमचे  संपादक लिहीत आहेत.  परंतु असे लिहीण्यापुर्वी मला या बाबतीत एकाही शब्दाने विचारले नाही. बरे, मी तुम्हाला विचारतो की, जेव्हा गांधींजी जीवंत होते; तेव्हा  पुणेकराराच्या प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीला जीवदान दिले. आता तर गांधी मेले आहेत. मग मेलेल्यांना आम्ही काय मारणार?”  याचाच परिणाम म्हणून त्यानंतर राजघाट प्रकरणाच्या बातम्या तेव्हापासून येणे  पुर्णतः बंद झाल्यात.

सभा आटोपल्यावर सर्व कार्यकर्ते जवळपास  गावोगावी परत गेले होते. पण उबाळे साहेबांना मा. कांशीरामजींनी थाबवून ठेवले होते. उबाळे साहेबांबद्दल विशेष सांगायचं म्हणजे  ते एका राज्याचे पक्ष प्रमुख असतांना सुद्धा आमच्या सारख्या सर्वसामान्यांसोबत खाली जमिनीवर झोपत होते. ही गोष्ट  मला वाखाणण्याजोगी  वाटत होती. 

उबाळे साहेबांना मा.कांशीरामजी यांनी  जेव्हा आतमध्ये केबिनमध्ये बोलाविले, त्यावेळी तेथेच मी बाहेर थांबलो  होतो. उबाळे साहेब बाहेर आल्यावर मला म्हणालेत की, साहेबांनी आपल्यावर आणखी एक काम सोपविले आहे. मा.कांशीरामजी त्यांना म्हणालेत की,  महुच्या कार्यक्रमाची संपुर्ण तयारी महाराष्ट्राच्या लोकांनी करायची आहे.  मी उबाळे साहेबांना म्हणालो की, साहेब  महाराष्ट्रातून आताच साहेबांची रॅली गेली. त्यात आपली ताकद खर्च झाली. आता महुची जबाबदारी आपण कशी काय पेलणार? उबाळे साहेब मला जे म्हणालेत,  ते मी माझ्या मनात कोरून ठेवले आहे. ते मला म्हणालेत की, “जुमळे साहेब, कांशीरामजींनी आपल्यावर सोपविलेले हे काम आपल्यासाठी  चॅलेंज आहे.  ते आपण स्विकारलंच पाहिजे. नाही म्हणायचं नाही.” 

आणखी सांगायचं म्हणजे मा. कांशीरामजी, मायावती किंवा महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेरील नेत्यांसोबत वावरण्याचे अनेक प्रसंग आले होते. पण मी पुढे-पुढे करण्याचे किंवा त्यांच्यासोबत फोटो काढण्याचे टाळत होतो. कारण ते मुळातच माझ्या स्वभावातच नव्हते. फक्त एकदाच मी आणि शेखसाहेब असे दोघांनी  मायावती यांच्यासोबत ऑफिसमधील फोटोग्राफर   ढोणे यांच्या  आग्रहावरून  ऑफिसच्या लॉनवर फोटो काढला होता. हा एवढा एकच फोटो माझ्या संग्रही आहे. पण आता वाटत आहे की, इतर लोक जसे फोटो काढीत होते, तसेच आठवणीसाठी म्हणून मी सुध्दा त्यावेळी फोटो काढायला पाहिजे होते. ही गोष्ट त्यावेळी माझ्या लक्षातच आली नव्हती.  

दिल्लीहून यवतमाळला आल्यावर परत माझे काम सुरु झाले. येतांना मी महाराष्ट्रासाठी दिलेले निवडणुकीच्या निधीच्या कुपन्सचे गठ्ठे घेऊन आलो. ते मी नागपूरच्या कार्यालयाला सुपूर्द केले. त्याआधी आम्ही २७.२.१९९० रोजी झालेल्या विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी फंड  जमा केला होता. तरीही लगेच दुस-या वर्षी म्हणजे मे १९९१ मध्ये आलेल्या ह्या लोकसभा निवडणूकीसाठी ४१४८०.७५  रुपये जमा केले होते. लोक म्हणायचे, इतके पैसे तुम्ही कसे काय जमा करता?  मी म्हणायचो, ‘समाज हा डोंगरासारखा एका जागेवर स्थिरावला असतो. तो आपल्याकडे येणार नाही.  आपल्यालाच त्यांच्याकडे जावे लागेल, ही एक गोष्ट… दुसरी गोष्ट म्हणजे दगडं मारून पाहायचे.  लागला तर फायदाच… हुकला तर नुकसान काय…? समाजातील पगारदार वर्गांना सामाजिक दायित्वाची जाणीव करून द्या, आंबेडकरी चळवळीचा लाभार्थी म्हणून आपल्यावरच जबाबदारी आहे असे त्यांच्या मनात भरवा, तो निश्चितच सहयोग देईल हा माझा अनुभव आहे.’

महिला आघाडीत माझी पत्नी  कुसुम पण सक्रियपणे काम करीत होती. त्यांनी ‘वोट दो नोट दो’ या अभियानांतर्गत घरोघरी फिरून  मोठी रक्कम जमा केली होती. ही रक्कम त्यांनी बामसेफला सुपूर्द केली  होती. या निधीचा वापर निवडणूकीच्या खर्चासाठी करायचा होता. या अभियानाने  महिलांचा पण निधी जमा करण्यात व प्रचारात मोठा वाटा होता.

लोकसभेच्या निवडणूकीच्या काळात  दि. ३०.५.१९९१  रोजी आझाद मैदान येथे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार दशरथ मडावी यांच्या प्रचारासाठी खुद्द मा. कांशीरामजी आले होते. त्यांची विशाल सभा आझाद मैदानावर झाली होती. 

त्यापूर्वीची एक गंमत सांगतो. त्यावेळी आझाद मैदानावर  सर्व पक्षीय उमेदवारांचे भाषणे झाली होती. त्या निवडणूकीत विदर्भवीर  जांबूवंतराव धोटे पण उभे होते. धोटेंचं भाषण म्हणजे जबरदस्तच… प्रश्नच नाही…  भावना हेलावणारं…  पण दशरथ मडावी यांच्या भाषणाच्या समोर त्यांचं भाषण फिकं पडलं होतं. त्याच आझाद मैदानावर पारधी समाज उघड्यावर राहून कसा भिक मागतो,  हे जळजळीत  उदाहरण देऊन मडावी यांनी  समाज व्यवस्थेची चिरफाड केली होती;  तेव्हा संपूर्ण प्रेक्षक वर्ग  स्तब्ध झाला होता. कानात प्राण ओतून मडावीचे भाषण ऐकत असल्याचा भास होत होता. मडावी आणखी म्हणालेत की, आमचे आदिवासींचे देवं झाडावर वास्तव्य करतात. ते कुणालाही त्रास देत नाहीत.  कुणी ते झाड तोडलं की दुस-या झाडावर राहूटी हलवतात. पण तुमचे देवं  एकमेकांशी भांडून देशात सांप्रदायिक तणाव निर्माण करतात. एकमेकांना मारायला ऊठतात. जीव घेतात. अशी मांडणी ऐकून सारे अवाक् झाले होते. 

या निवडणूकीच्या काळात प्रचारासाठी एक अॅम्बॅसॅडर कार भाड्याने घेऊन त्याद्वारे जिल्हा अध्यक्ष केशव खिल्लारे, उमेदवार दशरथ मडावी, जिल्हा सचिव बाळू गावंडे व दिग्रसचे कार्यकर्ते एकनाथ तुपसुंदरे यांची मुलगी उज्वला तुपसुंदरे हे मतदार संघात ठिकठिकाणी सभा घेत होते. उज्वला पण प्रभावीपणे  भाषण करायची. प्रचारासाठी फिरत असतांना खिल्लारे साहेब मला चिठ्ठ्या पाठवून पैसे पाठविण्यासाठी व्यवस्था करायला सांगत होते. त्याप्रमाणे पैसे जमा करून पाठवीत होतो. 

पण निवडणूक संपल्यावर मात्र  आम्हाला एका संकटाला सामोरे जावे लागले होते. तो किस्सा असा  होता-  निवडणूक संपल्यावर गाडीचे भाडे तर चुकते केले. पण लाऊडस्पीकरचे पैसे देण्यासाठी पैसेच उरले नव्हते. निवडणूक संपल्याने कोणी वर्गणी देईल अशी बिलकूल  शक्यता वाटत नव्हती.  ज्यांनी आश्वासन दिले होते, त्यांनी पण हात वर केले होते.  लाऊडस्पीकरवाल्याने तर सारखा तगादा लावला होता. त्याला आम्ही पुढील दिवसं देऊन कसे तरी आजचे मरण उद्यावर ढकलत होतो. शेवटी त्याच्या भीतीने मी, दशरथ मडावी व केशव खिल्लारे आम्हा तिघांवर मनवर साहेबांच्या घराच्या टेरेसवर लपून बसण्याची पाळी आली होती.  शेवटी त्याला निर्वाणीचा पगाराचा दिवस सांगून कशीबशी  सुटका करून घेतली. अशी आमची त्यावेळी  बिकट अवस्था झाली होती. हा प्रसंग आठवला की अंतर्मुख होतो.

या दरम्यान मा. केशव खिल्लारे यांचे ह्रूदयविकाराने आकस्मिक  निधन झाले. आमचे मार्गदर्शक व एक उमदा नेता हरवला. त्यांच्या निधनाने यवतमाळच्या चळवळीत पोकळी निर्माण झाली होती.  त्यांच्या जागी  बाळू गावंडे हे तरुण वयात यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष  झाले. ते कुणबी समाजाचे होते. त्यांच्याशिवाय कुणबी समाजाचे आणखी काही कार्यकर्ते या चळवळीत कार्यरत  होते.

मी  मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, बामसेफ व बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन या संघटनात काम करीत असतांना इतरही सामाजिक संघटनेत काम करीत होतो. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटेलेक्च्युअल फोरमच्या कार्यकारिणीत मला सदस्य म्हणून घेतले होते. त्यांच्या होणाऱ्या कार्यक्रमात मी भाग घेत होतो. 

याच वेळेस मी योगानंद टेंभूर्णे व ऍड. गोविंद  बनसोड यांचेसोबत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच’च्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात  सुध्दा सक्रियपणे काम करीत होतो. १४ एप्रिल १९८९ च्या आंबेडकर जयंतीला एसटी स्टँड जवळील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन कार्यक्रमाचे संचलन मीच केले होते.  

दि. २०.०५.१९८९ रोजी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी मला विठ्ठलवाडी जे गाव पुनर्वसित होते व आमच्या चौधरा गावातील लोक येथे राहत होते, त्यांनी बोलाविले होते. या पुतळ्याचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रल्हाद बोक्से यांचे हस्ते झाले होते. मी त्या ठिकाणी विचार मांडतांना बोललो होतो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा वापर आपण कसा करणार आहोत यावर तुमच्या परिश्रमाचं, त्यागाचं व कार्याचं मोल ठरणार आहे. या पुतळ्याचा वापर आपण गावातील शोभेची वस्तू म्हणून करणार आहात  की जयंती किंवा महापरिनिर्वानदीनी त्यांची पुजा करण्यासाठी करणार आहात की त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करणार आहात की कुण्या समाज कंटकांनी पुतळ्याला विद्रुप केले म्हणून दंगल पेटविणार आहात यावर बाबासाहेबांच्या पुतळ्याचं मुल्यमापन होणार  आहे. 

१४ जुलै १९९१ रोजी विद्यार्थी कार्यकर्ते मनोज सोनोने,  बुध्ददास मिरगे,   प्रविण स्थूल आणि   त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या युवा साहित्य संमेलनातील  कथाकथन सत्रात  कथा सादर करण्यासाठी कार्यक्रम  पत्रिकेत माझं नाव जाहीर केलं होतं. त्यात मी  भाग घेऊन ‘भातासाठी चोरी’ ही  सत्यकथा सादर केली होती. या कथेतील प्रसंग  मी वणीला असतांना घडली होती. एका धडधाकट तरूणाने भटक्या समाजाच्या पालातून स्वतःची  भुक भागवण्यासाठी शिजवलेल्या भाताचा गंज चोरला होता. तो  घाबरून काटेरी झुडपात लपून बसला असतांना त्याला पोलीसांनी पकडून चोरी घडलेल्या  ठिकाणी आणले होते.  मी सकाळी ऑफिसात जातांना त्याला पोलीस मारझोड करीत असलेले दृष्य  प्रत्यक्ष  डोळ्याने पाहिले. हे पाहून माझं तरल मन हेलावून गेलं होतं. याच प्रसंगावर मी ही कथा गुंफली होती. 

यवतमाळ येथेच मी ‘फुले-शाहू-आंबेडकर वाचनालय’ नावाची  घरघुती लायब्ररी  स्थापन केली होती. यात जवळपास ५०० च्या वर वैचारिक पुस्तके होती. ही लायब्ररी माझा मोठा मुलगा प्रज्ञाशील आणि   साळा धम्मदीप भगत पाहत असत. चळवळीत कार्य करणाऱ्या लोकांना पुस्तकांची गरज पडत होती. त्यांना ही पुस्तके वाचायला देत होतो.

आणखी विशेष सांगायचं म्हणजे बाबासाहेबांच्या काळात बालाजी टेंभूर्णे हे एक झुंजार व्यक्तिमत्व पाटीपुरा यवतमाळ येथे होवून गेले होते. ते बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रीय होते. पाटीपुरा म्हणजे त्याकाळी यवतमाळ जिल्ह्यातील चळवळीचं मुख्य केंद्रस्थान होतं. त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी त्यांची मुले- योगानंद व रवींद्र यांना त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मरणिका छापायची  होती. त्यात त्यांची आई सत्यभामाबाई यांची मुलाखत घेण्यासाठी मी आणि कुसुम दोघांनाही बोलाविले  होते. मी त्यांची त्यांच्या कुटुंबाची  मुलाखत घेऊन ती कुसुमच्या नावाने स्मरणिकेत छापली. ही कलाकृती त्यांच्या कुटुंबातील सर्वांनाच खुपच आवडली होती.

आणखी एक गोष्ट आवर्जून सांगायची म्हणजे एकदा माझ्या बाबाचे पोट खूप दुखू लागले होते. मी त्याला माझ्या लहान भाऊ डॉ. अजय याचा मित्र डॉ. सतीश खडसे याच्या दवाखान्यात नेले होते. त्यांनी त्यांच्या एका डॉक्टर मित्राच्या दवाखान्यात पाठविले. तिथे त्यांनी तपासून लगेच ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. मी माझ्या लहान भावाला सांगितले. तो ताबडतोब नागपूरहून आला. त्याने बाबाची तब्बेत पाहिली आणि डॉक्टरशी बोलून ऑपरेशनची गरज नसल्याचे सांगितले. औषधीच्या उपचाराने तो बरा झाला. म्हणजे पहा, माझा भाऊ डॉक्टर नसता तर विनाकारण माझ्या बाबाचे पोट फाडल्या गेले असते, ना…  वैद्यकीय जगतात असेही प्रकार घडू शकतात, नाही का? म्हणून घरात एक तरी डॉक्टर असावा, असे म्हणतात ते खरंच आहे!

 ११. पुसद  येथे बदली

यवतमाळहून  जून १९९२ मध्ये प्रशासकीय कारणास्तव पुसद  जिल्हा यवतमाळ येथे बदली झाली. पुसदला माझा कॉलेजच्या होस्टेलमधील जुना मित्र निरंजन पाटील यांचा सहवास लाभला. तो पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करीत होता. माझ्याही आधीपासून तो बामसेफचे काम करीत होता. तो नागपूरहून निघणाऱ्या बहुजन नायक या साप्ताहिक पेपरचे घरोघरी जाऊन वाटप करीत होता. त्याचे हे काम मला फार आवडले होते. पेपर वाटप करण्याच्या निमित्ताने लोकांशी संपर्क होत होता. त्याच्याच प्रेरणेने मी पण पेपर वाटून माझ्या पुढील कार्याची वहिवाट सुरु केली होती. दिग्रसला होतो तेव्हा ‘बौध्द कर्मचारी समाज सुधारक मंडळ’ या सामाजिक संघटनेत काम करीत असतांना माझ्यासोबत एकनाथ तुपसुंदरे पण सक्रियपणे काम करीत होते, ते यावेळी पुसदला मृदसंधारण कार्यालयात नोकरी करीत होते. त्यांचाही येथे सहवास लाभला होता.

ह्यावेळी मी मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचा पुसद येथे यवतमाळ जिल्हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी आले होते. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय कर्मचारी हजर झाले होते. मी संघटनेच्या मिटिंगमध्ये कथेच्या स्वरूपात एक उदाहरण देत होतो. ते येथेही पण सांगितले होते. ती कथा अशी होती की, ‘एकदा शेतकरी गायीढोरं घेऊन जंगलात जातो. त्याला हरवलेल्या वाघाचं पिल्लू सापडतं. तो त्याला घेऊन येतो. त्याला पण तो गायीढोरांसोबत पाळतो. त्याला गायीढोरांसोबत जंगलात घेऊन जातो. पण वाघ त्याच्यातील असलेले अंगभूत गुण विसरतो. आता वाघ वयात येतो. एकेदिवशी तो जंगलातील दुसऱ्या एका वाघाची डरकाळी ऐकतो आणि त्याच्यातील वाघ जागा होतो.’ तसंच आमच्या समाजातील कामगारांचे झाले आहे. इतरांसोबत राहून आमच्यावर त्यांचेच संस्कार पडत गेलेत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी व्यवस्थेविरुद्ध पेटवलेले स्फुलिंग, विद्रोह आम्ही विसरून गेलो. आता या मेळाव्याने ती जाणीव आम्हाला करून दिली आहे. म्हणून आपण आपल्याच समाजासोबत राहिले पाहिजे. त्यातच आपले हित आहे. अशी मी मांडणी करीत होतो.

पुसदला जास्त दिवस थांबलो नाही. कारण लगेच सप्टेंबर १९९२ मध्ये चौदा वर्षांनी का होईना विभागीय लेखापाल या वरच्या पदावर बढती मिळून कोकणासारख्या दुरवरच्या ठिकाणी म्हणजे  पोफळी जल विद्यूत केंद्र जिल्हा रत्नागिरी  येथे नेमणूक दिली. ज्याच्यामागे बहिष्कृत  जात चिकटली असते ना, त्यांची अशीच गत होते. मी पदोन्नती झालेल्या  लोकांची यादी पाहीली,  त्यात आमच्यासारख्यांना दुरवरच्या ठिकाणी पाठवल्याचे दिसून आले.  इतर उच्चभ्रू जातींना  मात्र जवळपासच्या ठिकाणी पाठवले होते.

१२. पोफळी येथे बढतीवर बदली

पोफळीला  कामावर हजर होण्यासाठी मी पहिल्यांदा आलो; तेव्हा पुसदहून एसटीबसने पुण्याला आलो. तेथून रातराणी एसटीने  सातारा, क-हाड, पाटण, कोयना या मार्गाने पोफळीला आलो. घाटातून येणारा हा रस्ता म्हणजे  वळणा-वळणाने, चढ-उतार, कुठे निमुळता, द-या-खो-याचा पाहून भीती वाटत होती. खिडकीतून बाहेर बघितलं की प्रचंड खाई दिसत होती. गाडी खाईत जाते की काय या कल्पनेने छातीत धडधडायला लागत होती.  पण ड्रायव्हर मात्र प्रत्येक वळणावर  एसटीला बिनधास्त हाकत होता. अशा घाटाच्या  वळणाची त्याला नेहमीची  सवय असावी. 

विदर्भाकडील  पावसाळा संपण्याच्या मार्गावर  होता, पण  कोकणात मात्र अजूनही पावसाळा सुरूच होता. कुठे  डोंगरावरून उतरलेल्या पाण्याचे पांढरे तुशार फेकणारे धबधबे दिसत होते. कुठे वरून वाहत आलेल्या पाण्याचे  नुसते  ओघळ  दिसत होते. कुठे काळ्याकुट्ट कातळातुन वाहणारे झरे दिसत होते.

हिरवी शाल पांघरलेल्या उंच-उंच डोंगररांगा , हिरवीगार विविध  झाडे,  दुतर्फा फुललेली रानफुले, वेलींनी आच्छादलेला कातळ, डौलणारं गवत,  लालचुटुक माती, खेड्यातील कौलारू घरे, जांभ्याच्या (खरपाचे दगडं) दगडं एकावर एक रचून घराभोवती केलेला आवार,  हिरवीगार वा-याच्या झोताने डोलणारी भाताची शेती पाहून  मन तृप्त झाल्यासारखे वाटत होते.  पोफळी हे गाव घाटाच्या पायथ्याशी वसलेलं. मी बसमधून खाली उतरलो. माझे कान बुजून गेले होते. काही ऐकू येत नव्हते. चढावातून खाली उतारात आलंय की असं होत असते.

मुलांच्या शाळा सुरु असल्याने मी पुसदहून पोफळीला एकटाच आलो होतो. त्यावेळी मी सुरुवातीला गेस्ट हाउसमध्ये राहत होतो. नंतर क्वार्टर मिळाल्यावर क्वार्टरला राहायला गेलो. संघशील व करुणाची परीक्षा आटोपल्यावर व त्यांचा निकाल लागल्यावर त्यांना घेऊन पोफळीला घेऊन आलो. प्रज्ञाशीलचं बारावी पूर्ण व्हायचं असल्याने त्याला एक वर्ष पुसदला थांबावे लागले होते. त्यावेळी पुसदला माझा भाचा विद्याशील हा इंजिनिअर कॉलेजमध्ये शिकत होता. त्याच्याच रुममध्ये हा सुध्दा राहत होता. तो मार्च १९९४ साली बारावीची परीक्षा पास झाल्यावर त्याच्या इच्छेनुसार त्याला औरंगाबादला आंबेडकर लॅा कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन दिली. कॉलेजची अॅडमिशन झाली होती. पण होस्टेलला पहिल्या वर्षी अॅडमिशन देत नव्हते. म्हणून खोली पाहण्यासाठी भर पावसात आम्ही दोघेही शहरात कॉलेजच्या आजूबाजूला फिरलो होतो. शेवटी एक खोली मिळाली. त्याला लोखंडी कॅाट घेऊन दिली. सायकल आणि बेड घरून घेऊन आलो होतो. त्याची व्यवस्था झाल्यावर आम्ही पुसदला परत आलो. पुसदला  मेटॅडोर (मिनी ट्रक) भाड्याने घेतला. त्यात सामान भरून संध्याकाळी आम्ही पोफळीला जाण्यासाठी निघालो. रस्त्यात काय गंमत झाली होती, ते सांगतो. रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी दुपारी पोफळीला पोहचलो. रस्त्यात गाव आलं की एखाद्यावेळी मांजर आडवी जातांना दिसली की, ड्रायव्हर मध्येच गाडी थांबवून उदबत्ती पेटवून लावत होता. तो फारच अंधश्रद्धाळू दिसला. हिंदू धर्माने त्याच्यावर केलेल्या संस्कारांचा हा परिपाक होता. पोलीस आडवा आला का की, त्याला चिरमिरी देऊन सुटका करून घेत होता. मी त्याला म्हणालो, ‘पैसे कशाला देता?’ तो म्हणाला, ‘पैसे घेतल्याशिवाय हे लोक सोडत नाहीत.’ ट्रकमध्ये भरलेले सामान खरेच ट्रान्स्फरचे घरघुती सामान आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी मलाही माझी ट्रान्स्फर ऑर्डर मागितली होती. सकाळी कोयनेजवळ एका गावाला मांजर आडवी गेली. त्याला व्यवस्थित न दिसल्याने ड्रायव्हरने मला विचारले, ‘ही मांजरच होती का?’ हीच संधी साधून त्याची गंमत करावीशी वाटली. मी म्हणालो, ‘नाही. तो ससा होता. इकडे जंगल आणि झाडीझुडपे असल्याने ससे खूप जास्त आहेत.’ खरं म्हणजे ती मांजरच होती. मी खोटेच त्याला ससा असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याची एक उदबत्ती वाचली. त्याच्या अंधश्रद्धेची कीव वाटली मला ! गाडी पुढे निघून गेल्यावर खरे काय ते सांगितले.

सामान उतरवून घेतल्यावर प्रज्ञाशील त्याच मेटॅडोरने पुसदला परत गेला होता. आम्हाला सोडून तो एकटाच जात होता, म्हणून आम्ही सारेजण गहिवरून आलो होतो.

संघशील मॅट्रिकच्या दहाव्या वर्गाची परीक्षा पास झाला होता. त्याला शिरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत अकरावीला टाकले. करुणाला नववीला चिपळूणच्या मुलींच्या बांदल हायस्कूलला टाकले. चिपळूण हे गाव पोफळीवरून २५ किलोमीटर दूर होतं तर शिरगाव हे गाव आठ किलोमीटर दूर होतं. त्यांना शाळेत जाणे-येण्यासाठी विद्युत मंडळाने स्कूल बसची सोय केली होती. एक किराणा सामान सोडले तर बाकीच्या वस्तू विकत घेण्यासाठी आम्हाला चिपळूणला जावे लागत होते. म्हणून मी जाण्या-येण्यासाठी बजाज स्कूटर विकत घेतली होती.

मी कोकणात पहिल्यांदाच आलो, असं नव्हे तर यापुर्वीही १९७८ साली   बढती झाली होती, तेव्हा मला  यवतमाळवरून श्रीवर्धनला फेकले होते. मी तेव्हाही  कुटुंबासह श्रीवर्धनला  दोन वर्षे राहीलो होतो. श्रीवर्धन हे गाव अगदी समुद्राच्या काठावर होतं. पण पोफळी हे गाव समुद्रापासून लांब म्हणजे जवळपास साठक कि.मी. दूर होतं. पण सामुद्रीक वातावरण जसं- दमटपणा, जोराचा व सतत पडणारा पाऊस येथे पण होता. मे महिन्यापासूनच पावसाची सुरवात होत होती तर ती सप्टेंबर अखेरपर्यंत… घराबाहेर निघताना पाऊस नसला तरीही हातात छत्री घेऊनच बाहेर पडावे लागत असे. कधी पाऊस सुरू होईल आणि कधी थांबेल याचा नेम नसे. त्यामुळे छत्री कुठे तरी विसरून राहील्याचे प्रकार नेहमी घडायचे. त्यावेळी नागपूरचे डॉ. भगत साहेब  नुकतेच दुर्गापूर विद्युत निर्मिती केंद्र चंद्रपूर येथून बदली होऊन पोफळीच्या दवाखान्यात आले होते. ते नेहमीच्या सवयीनुसार छत्री जवळ ठेवत नसल्याने ओले होत. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो, ‘साहेब,  पाऊस असो की नसो हातात छत्री घेऊनच घराबाहेर पडत चला. म्हणजे तुम्ही असे ओले होणार नाही.’ अशी ती पावसाची गंमत होती.

पोफळी हे छोटसं खेडे गाव होतं. पण जल विद्युत केंद्राची निर्मिती झाल्याने येथे कामगारांना राहण्यासाठी टुमदार वसाहत तयार झाली. कोयना नदीवर बांधलेल्या धरणाचे पाणी बोगद्याद्वारे येथे आणून डोंगराच्या गाभा-यात विद्युत केंद्राची उभारणी करण्यात आली होती. विद्युत निर्मितीसाठी वापरलेलं हे पाणी कालव्याद्वारे  चिपळूण येथील समुद्राच्या खाडीला सोडून देण्यात येत होते. या विद्युत निर्मिती अंतर्गत कोयना, अलोरे व पोफळी अशा तिन ठिकाणी विद्युत निर्मिती होत होती. आणखी चवथ्या टप्प्याचं काम सुरू झालं होतं. माझा  चंद्रपूरला राहणारा लहान भाऊ डॉ. अजय माझ्याकडे आला होता; तेव्हा आम्ही सर्वजण परवानगी काढून चारशे फुट खोल उतरून  बोगद्यातील चालू असलेलं  ते अवाढव्य काम बघून चक्राऊन गेलो होतो.

तसा हा भुकंप प्रवण प्रदेश होता. सारखे भुकंप जाणवत असे. घाटाच्या वरचा भाग म्हणजे कोयना व घाटाच्या पायथ्याचा भाग म्हणजे पोफळी… साधारणपणे  पावसाचा  मोसम संपण्याच्या बेतात असतांना म्हणजे सप्टेंबर नंतर हे धक्के जाणवत असत.

११ डिसेंबर १९६७ रोजी पहाटे पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरण परिसरात ६.७ रिश्टर क्षमतेचा तीव्र भूकंप झाला होता. खूप नुकसान झाले होते. त्यानंतर  कोयनेच्या परिसरात एक लाख चाळीस हजार भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद  झाल्याची सांगतात. पण हे लहान लहान धक्के असल्याने फारसे नुकसान होत नव्हते. थोडेफार भिंतीला तडे जात होते, ऐवढेच… जमीनीतून गडगड आवाज यायला लागला व कॅाट हलल्याचे जाणवले की मी घाबरून घराच्या बाहेर पडत होतो. पण आमची मुले मात्र मजा घेत होते. एखाद्या दिवशी भुकंप झाला नाही की करमत नव्हते. इतकी सवय त्या भुकंपाची झाली होती. एकदा दुपारची वेळ होती. त्यावेळी  मी ऑफिसमध्ये होतो. भुकंपाचे धक्के बसायला लागलेत.  माझी खुर्ची व समोरील झाडे झोके घेतांना दिसत होते. मुलं शाळेत गेली होती. पत्नी एकटीच घरी होती. तसाच मी घरी पळालो. कॅालनीतील महिला बाहेर आलेल्या दिसल्या.  माझी मिसेस सांगत होती की, घरातले भांडे पडत होते. बाहेर येण्यासाठी दरवाज्याची कडी काढायला गेली तर हलत असल्याने निघत नव्हती. शेवटी मोठ्या मुश्किलीने निघाली; तेव्हा कुठे बाहेर पडली. असाच अनुभव घराबाहेर आलेल्या महिला सांगत होत्या.

दुसरा अनुभव म्हणजे सापांचा सुळसुळाट… डोंगर, झाडंझुडपं, भाताची शेती व नदी-नाले यामुळे साप कधी  दिसेल ते सांगता येत नव्हते.  आमच्या क्वार्टरमध्ये पण एकदा दरवाज्यातून  साप घरात येतांना  दिसल्याचे मिसेस सांगत होती. पण साप चावून कोणी दगावल्याचे कधी ऐकले नाही.  माझ्या क्वार्टरच्या समोरच्या रस्त्याने संध्याकाळी एक कातकरी नवरा-बायको जोडपे दारू पिऊन झिंगत जात असल्याचे दृश्य पाहून आमची मान लाजेने खाली जायची. हे कातकरी भटक्या जमातीत मोडतात. अत्यंत गरिबी आणि हलाखीच्या अवस्थेत ते जीवन जगत असतात. ते जंगलातून कच्चे आंबे, करवंद, कोकम, शिकेकाई असा रानमेवा विकायला आणीत. माझी मिसेस त्यांच्याकडून कोकम विकत घेऊन त्याचे शरबत बनवीत असे. कोकमचे शरबत कोकणात खूप प्रसिद्ध आहे.

मी यवतमाळला होतो, तेव्हा बहुजन एम्प्लॉइज फेडेरेशन या बीएसपी प्रणीत कामगार संघटनेत केंद्रीय सहसचिव पदावर काम करीत होतो. केंद्रीय संघटनेचे सरचिटणीस बी.डी.हजारे साहेब यांचे मला पत्रे येत होते. संघटनांच्या मीटिंगा सहसा नागपूरला होत. त्यामुळे मी इतक्या लांबून जाऊ शकत नव्हतो. त्यांनी मला बिईएफचे अधिवेशन नागपूरला होत असल्याचे कळविले होते. तसेच संघटनेचे मुखपत्र ‘बिईएफ समाचार’ काढण्याचे निश्चित केल्याचे सांगितले होते. अशाप्रकारे ते मला संघटनेच्या घडामोडी कळवीत होते.

कोकणात आल्यानंतर पोफळी येथून या संघटनेचे  काम करणे अवघड झाले होते. केंद्रीय संघटनेचे अध्यक्ष बनसोडे साहेब हे मला महाड, कोल्हापूर व मुंबई येथे कार्यक्रमानिमित्य भेटले असतांना त्यांना मी ह्या अडचणी सांगितल्या होत्या. मी बी.डी.हजारे साहेब यांना दि. ८.९.१९९६ रोजी सविस्तर पत्र लिहून कळविले होते.  म्हणून मी केंद्रीय सहसचिव पदाचा राजीनामा दिला. 

तेवढ्यातच संघटनेचे अध्यक्ष बी.आर. बनसोडे साहेब यांचे दु:खद निधन झाल्याचे कळले. त्यांच्या ठिकाणी एच.एन.मोरे साहेब यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. मोरे साहेब मी यवतमाळला असतांना होम गार्ड खात्यात अधिकारी होते आणि बामसेफमध्ये सक्रीय होते. म्हणून माझी त्यांचेशी जवळची ओळख होती. 

त्यांनतर मी बामसेफ चळवळीकडे लक्ष केंद्रित केले. पोफळी येथे कामावर रुजू झाल्यावर मी पाहिलं की, येथे मा.कांशीरामजी यांना मानणारे काही कर्मचारी-अधिकारी होते. पण संघटन मात्र अस्तित्वात नव्हते. मी पूर्वीच्या ठिकाणी दरमहिना १०० रुपये चळवळीला  देत होतो. येथे मात्र तशी यंत्रणा नसल्याने मी सुरुवातीला मनिऑर्डने पैसे थेट नागपूरच्या कार्यालयाला पाठवित होतो. नंतरच्या काळात सुद्धा दरमहा १०० रूपये राज्यनिधी म्हणून देत राहीलो.  मी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव केली.  पी.आर. इंगळे, ए.बी शिंदे, डॉ. मिलिंद भगत, आर.पी. पाटील, जी.एन.संदे,  एस.एस.सरवदे, अशोक जाधव, गौतम भोसले, विलास जाधव, मनोहर मोहिते, व्ही.बी.मोहिते, ए.एच.गायकवाड, एस.बी. वालेकर, पी.एस.कांबळे, बाबूराव थोरवडे,  डी.एस. सावंत, एम.सी. गायकवाड, एस.एस.कांबळे  युवा कार्यकर्ता संदिप मोहिते, चर्मकार समाजाचे ए.पी.शिंदे, एस.आर. कारंडे, पी.एस.अडसुळे, मराठा कार्यकर्ते  आर.डी.लगारे, एन.बी.थोरात, भटक्या जमातीतील पी.बी.माने, प्रताप पवार, जी.व्ही. राठोड, आदिवासी समाजाचे आर.जी.मिटके, बी.डी.भलावी, बी.बी.बागूल,  मुस्लिम समाजाचे एम.ए.जे. खान साहेब, जी.वाय. मुल्ला,  ओबिसी समाजाचे नाझरे साहेब, ख्रिचन समाजाचे एन.के.चादणे इत्यादी कार्यकर्त्यांकडून  दरमहिना नियमितपणे निधी जमा करू लागलो. विशेष सांगायचे म्हणजे यात सारे जाती-धर्माचे कार्यकर्ते आणि देणगीदार होते.  रत्नागिरी येथील बीएसपीचे अध्यक्ष राजेंद्र आयरे यांच्याशी संपर्क करून जिल्ह्यात काम वाढविण्याच्या दृष्टीने  आम्ही त्यांना चळवळीसाठी  आर्थिक व इतर मदत द्यायला लागलो. आम्ही त्यांना सुरवातीलाच  सांगून ठेवलं  होतं की, तुम्हाला जो काही खर्च येईल तो संपुर्ण निधी आमचं पोफळीचं युनिट द्यायला तयार आहे,  फक्त तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यात निदान आमचा चिपळूण तालूका तरी चळवळीच्या दृष्टीने उभं करून दाखवा.

मी यवतमाळला असतांना प्रा.मा.म.देशमुख यांचेशी माझी ओळख झाली  होती. मराठा समाजाचे कार्यकर्ते आर.डी.लगारे, एन.बी.थोरात, पी.टी.पाटील, बी.आर.पाटील या इंजिनिअर मंडळींनी व माझ्या ऑफिसातील साबळे यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून प्रा.देशमुख यांचे तिन दिवसांसाठी कॅडर कँपचे आयोजन जानेवारी १९९४ मध्ये  केले होते. त्यांनी लिहिलेले बहुजन समाजाच्या प्रबोधनाचे पुस्तके वसाहतीत मोठ्या प्रमाणात विकलेत. यामुळे मराठा समाजात जागृतीचे लोण पसरले होते. त्याचा फायदा चळवळीला आर्थिक योगदान मिळण्यास झाला होता.    

मी पोफळी वसाहतीत मिटींग आणि कॅडर कँपचे आयोजन करीत होतो. मिटींगमध्ये खालील विषयावर  आम्ही  चर्चा करून  निर्णय घेत होतो.

१. वैयक्तिक पातळीवर सर्वांनी  प्रबोधन करणे

२. चळवळीचे पत्रके छापून वाटणे

३. बहुजन नायक व बहुजन संघटक पेपर वाढविणे. प्रत्येकांना पेपर वाढविण्यासाठी लक्ष्य देऊन पुढील मिटींगमध्ये त्याचा आढावा घेत होतो. त्यामुळे केवळ वसाहतीतच नव्हे तर आजूबाजूच्या खेड्यापाड्यापर्यंत, सर्व जाती-जमातीपर्यंत पेपर पोहचत होता.

४. प्रा. मा.म.देशमुख यांच्या बहुजन प्रबोधनाच्या पुस्तकांचा प्रचार आणि प्रसार करणे

५.  कॅडर कँपचे आयोजन करणे

६. दर महिना मिटींग घेणे

७. दर महिना निधी जमा करणे

 एक गोष्ट सांगायची म्हणजे मी पोफळीला आलो,  तेवढ्यातच पुण्याला मा. कांशीरामजी यांची सभा झाली होती. त्यावेळी यवतमाळकडील कार्यकर्त्यांची भेट झाली होती. दिग्रसचे एकनाथ तुपसुंदरे हे तेथील कार्यकर्त्यांना घेऊन आले होते. त्यात कुणबी-मराठा  समाजाचे बापुरावजी  काळे हे गृहस्थ होते. मी दिग्रसला नोकरीला होतो;  तेव्हा ते शिक्षकी पेशा करून एक साप्ताहिक ‘विदर्भ भुमी’ नावाचे  पेपर काढीत होते. त्यावेळी  त्यांच्याबाबतीत एवढीच मला माहिती होती.  नंतरच्या काळात ते दिग्रस तालूका बिएसपी अध्यक्ष झाल्याचे कळले होते.   ते बिएसपीत कसे आले, हे त्यांनी मला सांगताना म्हणाले की,  “तुपसुंदरे साहेब मला प्रा. मा.म.देशमुख यांचे व इतर फुले-शाहू-आंबेडकर यांची पुस्तके वाचायला देत. मला ही पुस्तके वाचायचा कंटाळा यायचा. म्हणून मी झोपतांना उशीखाली ठेवून देत होतो. दुस-या, तिस-या दिवशी तुपसुंदरे पुस्तकं वाचलेत का म्हणून विचारायचे. मी हो म्हटल्यावर दुसरे पुस्तके द्यायचे. असा तो क्रम सुरू होता. मी त्यांचेशी खोटे बोलत होतो. याची मला लाज वाटली.  तेव्हा खरंच या पुस्तकात काय असते, म्हणून एकदा वाचायला घेतले. तेव्हा  सामाजिक व्यवस्था कशी आहे आणि या व्यवस्थेत  बहुजन समाजा कसा पिचल्या जात आहे, हे माझ्या लक्षात आले.  तेव्हा मी इतरही पुस्तके भराभर वाचून काढलीत. परिणामतः मी मा. कांशीरामजी यांच्या चळवळीकडे ओढल्या गेलो.”  त्यांची बायको पण सोबत होती. तिला तुपसुंदरे यांनी माझ्याशी ओळख करून दिली. ती मला म्हणाली, “साहेब, तुमचे राजकारण  मला काही कळत  नाही.  पण माझ्या नवऱ्याने तुमच्या राजकारणात  आल्यापासून  दारू पिणे सोडले,  हा माझा मोठा फायदा झाला.”  मला आठवलं, हाच तो व्यक्ती होता, जो बामसेफच्या यवतमाळ येथील  मिटींगमध्ये एकदा  आला होता. त्यावेळी कुणबी समाजाचे बिएसपीचे जिल्हा सचिव  व धडाडीचे  युवा कार्यकर्ते बाळू गावंडे यांना मध्यप्रदेशात चळवळीच्या कामानिमित्त पाठवायचे होते. त्यावेळी बामसेफच्या कार्यकर्त्यांनी भराभर खिशातून पैसे काढून बाळू गावंडे यांना दिले होते.  हे पाहून तो अवाक झाल्याचे मी प्रत्यक्ष पाहीले होते. 

पोफळी येथे महाराष्ट्रातील कानोकोप-यातील विद्युत मंडळात  नोकरी  करण्यासाठी आलेले लोक होते. पण त्यातल्या-त्यात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा इकडील लोकांचा जास्त करून अधीक भरणा होता. यात अधिकारी, इंजिनिअर्स, तंत्रज्ञ  १ ते ४ वर्ग पर्यंतच्या विविध पातळ्यावर   काम करणारा कामगार वर्ग होता. ह्या कामगारांना राहण्यासाठी विद्युत मंडळाने निवासी घरे बांधून दिली होती.  

अधिकारी वर्गांत प्रामुख्याने  उच्चवर्णिय ब्राम्हणांचा तर कर्मचारी वर्गांत मागासवर्गीयांचा जास्त भरणा होता. ब्राह्मण समाज तसा मुळातच सामाजिक व राजकीय दृष्ट्या अत्यंत  जागरूक…  या ठिकाणी सुद्धा  ते जागृत होते यात काही नवल नाही !  

माझे अकौऊंटस् ऑफिसर हे ब्राह्मण होते. माझ्या आणि त्यांच्या कॅबीनच्या मधोमध एक खिडकी होती. तिथे टेलीफोन ठेवला होता, ज्याचा वापर त्यांना किंवा मला करता येत होता आणि कागदपत्रे एकमेकांना देता येऊ शकत होते. त्यांनी एकदा एका इंजिनिअरला चुकीची माहिती दिल्याचे मी ऐकले.  त्यावेळी मी म्हणालो की, साहेब तुम्ही चुकीची माहिती दिली. तेव्हा ते म्हणाले, ‘हो. मी त्याला मुद्दामच चुकीची माहिती दिली. आता त्याच्या डोक्यात घुसलेला हा किडा त्याचा मेंदू कुरतडत राहील अन् सारखा अस्वस्थ होईल.’ हे ऐकून मला धक्काच बसला. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की, हे लोक असेच चुकीचे सांगून बहुजन समाजाचे डोके खराब करीत असतील, नाही का? 

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या संघटनेच्या माध्यमातून निरनिराळे सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम ते सतत राबवित असत. ही संघटना येथे मजबूत आणि  क्रियाशील होती. पण एक खरं की या ब्राम्हणवादी चळवळीत आणि  आमच्या फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत कधी टकराव निर्माण झाला नाही. ते त्यांच्या हिताची चळवळ राबवीत होते, तर आम्ही आमच्या हिताची चळवळ राबवीत होतो.

येथील  इंजिनिअर/अधिकारी जे आरएसएसचे काम करीत ते निसंकोचपणे सर्वसामान्य कर्मचा-यात मिसळून काम करीत असल्याचे मी पाहिले. राजकारणाचं त्यांना वावडं नव्हतं. आरएसएस ही सांस्कृतिक संघटना म्हणता म्हणता  कधी राजकारणाकडे घेऊन जात होती ते कळतच नव्हतं.  एकदा त्यांनी  पदवीधर मतदार संघात मतनोंदणीची मोहीम उघडली होती.  त्यात माझा पण अर्ज भरून घेतला. पण तो अर्ज निवडणूक कार्यालयाकडे पाठविला नसावा. कारण माझं नाव यादीमध्ये आलं नव्हतं. मी गाफील राहीलो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून फसलो.  

ब्राह्मणांच्या राजकीय जागरूकतेबाबत एक किस्सा सांगतो-
त्यावेळी बहुतेक विधानसभेची निवडणूक आली होती. माझ्या क्वार्टर शेजारी ब्राम्हण कुटुंब राहत होतं. त्या व्यक्तीची पुणे येथे राहत असलेली आई रात्रीला मरण पावल्याची दु:खद बातमी आली होती. पण ते कुटुंब रात्रीला न जाता सकाळी  मतदानाला जाऊन पहिला नंबर लावला. मतदान करूनच ते पुण्याला गेलेत.  वास्तविक पाहता  पुण्याला जाणा-या रातराण्या एसटी बसेस सुरू  होत्या. पण ते त्यावेळी गेले नाहीत. कारण  त्यांना त्यापेक्षा  मतदान करणे जास्त  महत्वाचं वाटलं. याला म्हणतात  राजकीय जाण…! त्यांना माहीत आहे की, आपण अल्पसंख्याक आहोत. म्हणून  एकही मत वाया न जाऊ देता मतात भर टाकतात.  याउलट आमचा बहुजन समाज नावाचा  बहुसंख्याक आहे ! पण माझ्या एका मताने काही बिघडत नाही,  असा विचार करून आपले मत कुजवून टाकतात. म्हणजेच मतांच्या दृष्टीने अल्पसंख्याक बनतात. ब्राह्मणांसारखी राजकीय जागृती जेव्हा बहुजन समाजात येईल ना, त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अल्पजण समाज हा कधीही सत्तेवर आल्याचे दिसणार नाही !
माझे काही मित्र हे आरएसएसचे कार्यकर्ते किंवा हितचींतक होते. त्यांच्या सोबतीला राहून माझ्या असे लक्षात आले की, ते मतदार संघातील हिंदूत्वाला अनुकूल असणारा एकच उमेदवार निवडतात, मग तो भाजपा-शिवसेनेचा असो की काँग्रेसचा असो. त्याच उमेदवाराच्या मागे संपूर्ण शक्ती लाऊन एकगठ्ठा मतदान करतात. याउलट आपले बहुजन समाज कोणत्याही एका बहुजनवादी उमेदवाराच्या मागे शक्ती पणाला लावीत नाहीत.  त्यामुळे एकाला एक लढत न होता, एकाला (हिंदुत्ववादी) अनेक (बहुजनवादी) अशी लढत होऊन आपल्या मतांचे विभाजन करून हिंदूत्ववाद्यांचे पारडे जड करतात. हाही धडा आपण शिकलो पाहिजे असे मला वाटते.

मी यवतमाळला होतो तेव्हा पण मी पाहिलं की माझ्या ऑफिसातील हे लोक भाजप पक्षाचा विस्तार, प्रचार आणि प्रसार होईल अशा पध्दतीने  काम करीत होते. तेव्हाही निवडणूक आली होती. हे लोक त्यावेळी ऑफिसमध्ये म्हणायचे, ‘आई, बाई, अक्का अन कमळावर मारा शिक्का.’ त्यावेळी बोफोर्स भ्रष्टाचाराचे प्रकरण खूप गाजत होते. राजीव गांधीच्या बाबतीत एक किस्सा नेहमी सांगत. राजीव गांधी कटिंग करायला सलूनमध्ये जात, तेव्हा न्हावी त्यांना बोफोर्सची आठवण करून देत. तेव्हा राजीव गांधी नाव्ह्याला म्हणायचा की, ‘तुम्ही नेमकं यावेळेस हा विषय का काढता?’ न्हावी म्हणायचा की, ‘त्यामुळे तुमचे केसं ताठ होतात. मग मला तुमचे केसं कापणे सोपं जातं.’  हा किस्सा सांगून असे म्हणत की, ‘आता यावर फक्त आणि फक्त एकच उपाय आहे, ते म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. तेच देशाला वाचवू शकतात.’ अशा प्रकारे ते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा उजागर करून अप्रत्यक्षपणे भाजपचा प्रचार करीत होते.  

पोफळीला गणपती उत्सवाचं जबरदस्त नाद असल्याचं मला विशेष जाणवलं.   हा एक शासकीय कार्यक्रम असल्यासारखे साजरा केल्या जात होते. तसे महाराष्ट्रातील इतर विभागापेक्षा कोकण विभागात  गणपती उत्सव मोठ्या  प्रमाणात घरघुती आणि सार्वजनिकरीत्या साजरी करण्याची प्रथा आहे.

या संदर्भात मला आलेला  अनुभव नमुद करतो. मी आतापर्यंत जेथे कुठे नोकरी केली तेथे मला  कार्यालयाच्या माध्यमातून गणपती उत्सव साजरा केल्याचे उदाहरण एक ब्रम्हपूरी सोडले तर कुठे  दिसून आले नाही. पण येथे मात्र  हा उत्सव अगदी उघडपणे साजरा केल्या जात होते. उत्सवाच्या आधी पगाराच्या दिवशी प्रशासकीय कार्यालयात  वर्गणी जमा करण्यासाठी  कार्यालयीन वेळातच कर्मचाऱ्यांना कामाला लावीत. त्यावेळी आधीच्या वर्षी ज्यांनी वर्गणी दिली नसेल त्यांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर जाहीररीत्या लावल्या जात होती. वर्गणी न देणारे बहुतेक गणपतीला न मानणारे लोकच असायचे. त्यांना अपमानित करण्याच्या दृष्टीने असा प्रकार केल्या जात होता. त्यात कट्टर आंबेडकरी कार्यकर्ते व इंजिनीअर असलेले पी.आर.इंगळे, यांचं पण नाव झळकलं होतं. त्यावेळी अनायसे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय महासचिव जे.एस.पाटील यांची मिटिंग झाली होती. त्यात मी हा मुद्दा उपस्थीत केल्याने संघटनेने निषेध व्यक्त केला व हा मुद्दा प्रशासनासमोर मांडला. त्यानंतर उत्सव समितीने वर्गणी न दिलेल्यांची नावे जाहीर करण्याची  प्रथा बंद केली. 

तसेच मी वर्गणी देण्याचे नाकारल्यावर मला कामगार कल्याण अधिकाऱ्यांनी बोलावून प्रश्न केला की, ‘तुम्ही धर्माला मानत नाही का?’ मी त्यांना उत्तर दिले की, ‘तुम्ही म्हणता,  तो धर्म कोणत्याही खालच्या वर्गांने स्वच्छेने स्वीकारलेला असेल असे मला वाटत नाही. तो त्यांच्यावर जबरदस्तीने लादून त्यांना मानसिकदृष्ट्या गुलाम बनविले आहे. त्यामुळे असा धर्म मानण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.’  तेव्हा तो अधिकारी चूप बसला.  

येथे शेगावच्या गजानन महाराजाची दिंडी येत होती. या दिंडीसोबत हत्ती, घोडे, पालख्या व भजणमंडळी मोठ्या प्रमाणात येत असत. त्यांच्या सरबराईसाठी अख्खा कर्मचारी वर्ग राबत होता. त्यांच्या राहण्या-जेवण्यासाठी व हत्ती, घोड्यांच्या चाऱ्यासाठी व्यवस्था करीत. ते ज्या रस्त्याने जात, त्या रोडवर पाणी टाकून रांगोळी काढल्या जात होती. 

त्याशिवाय  पोफळी, अलोरे, कोयना येथे विद्युत निर्मितीच्या आतील परिसरात नित्यनेमाने दरवर्षी  सत्यनारायणाची पुजा होत होती. अशीच पूजा  प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीत सुद्धा कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत होत  होती.  खरं म्हणजे शासकीय कार्यालयात अशा प्रकारे कोणत्याही धर्माचा उत्सव साजरा करणे, पूजा विधी करणे अपेक्षित नाही. तसे शासनाचे निर्देश पण आहेत. पण वरिष्ठ पातळीवर त्यांचेच अधिकारी असल्याने कोणीही भांडण विकत घेत नव्हते. म्हणून असा प्रकार चालत असतो. वसाहतीत तर देवांचे मंदिर सर्रास बांधल्या जातात. वसाहत निर्मिती करतांनाच कंत्राटदाराकडून हे काम करून घेतल्या जात असते. त्याची देखभाल पण शासकीय खर्चाने केले जात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष पोलीस स्टेशनच्या आवारातच असे मंदिरे असल्याचे मी पाहिले आहे.

तसेच येथे सनातन संस्था पण कार्यरत होती.  ही भारतातील एक जहाल हिंदू संस्था समजली जाते. धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राची निर्मिती करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट  आहे. यांचा ‘सनातन प्रभात’ नावाचं नियतकालिक पोफळीला मोठ्या प्रमाणात वाचल्या जात होते. बरेचसे मागासवर्गीय यांच्या जाळ्यात अडकले होते. त्यांच्या महिला या संस्थेच्या प्रचारासाठी कामाला लावत. एकदा पाच-सहा महिला माझ्या घरी आल्या होत्या. त्यांनी सांगितलेले  संस्थेचे महात्म्य ऐकून घेतल्यावर मी त्यांना प्रश्न विचारला की, ‘तुमच्यामध्ये कोणी ब्राह्मण महिला आहेत का?’ त्या एकमेकींकडे पाहात प्रश्नाचे उत्तर द्यायला टाळत होत्या. कदाचित असे अनपेक्षित प्रश्न कोणी विचारतील याची त्यांना शिकवण दिली असावी. मी म्हटलं, मला माहित आहे की ब्राह्मण महिला असे काम  करीत नाहीत, म्हणून तुमच्यात कोणीही ब्राह्मण महिला असुच शकत नाही.  त्या घरी बसून मुलांना शिकवीत असतील अन् तुम्ही मुलांना शिकवायचे सोडून सनातन संस्थेच्या प्रचारासाठी घरोघरी फिरत आहात. त्यांची मुले इंजिनिअर बनतात आणि तुमची मुले आयटीआय शिकून हेल्पर बनतात.  हे तुमच्या लक्षात येते का? सनातनच्या मागे लागल्याने तुमची मुले काही इंजिनिअर बनणार नाहीत.  हे ऐकून त्या एकदम वरमल्यासारख्या झाल्यात. 

आम्ही चळवळ लोकांपर्यंत  पोहचविण्यासाठी पोफळी आणि चिपळूणला कॅडर कँप आयोजित करणे सुरू केले. पोफळी गावाच्या शेजारी सय्यदवाडी म्हणून मुस्लीम धर्मीय लोकांचं एक खेडेगाव होतं. तेथे इसाक इब्राहिम सय्यद यांच्या पुढाकाराने कॅडर कँपचे आयोजन केले होते. तसेच शिरगाव या खेडे गावात सुद्धा  आम्ही कॅडर कँप आयोजित केला होता. या कॅडर कँपला  पी.आर.इंगळे यांनी मार्गदर्शन केले होते.  दि.११.५.१९९३ ला पोफळी येथील प्रशिक्षण वर्गाला (कॅडर कँप) मार्गदर्शन करण्यासाठी  मुंबईहून सेंट्रल बँक ऑफ इंडियात नोकरीला असणारे एस.बी.मेश्राम आले होते. 

त्यावेळी कोकण विभाग हा ॲड. राहूल हुमणे यांच्याकडे होता. ते हायकोर्टाचे वकील होते.  दि. १२.९.१९९३ रोजी ठाणे येथे कोकण विभागीय प्रादेशिक मिटींग  त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या मिटींगला  आम्ही हजर राहून चिपळूणचा बामसेफचा  प्रतिनिधी या नात्याने मी माझे विचार मांडले होते. त्याच दरम्यान आणखी २६.९.१९९३ रोजी चिपळूणला कॅडर कँपचे आयोजन केले होते. दि. २३.८.१९९४ रोजी देवरूख येथे कॅडर कँप घेण्यासाठी पोफळीवरून ए.पी.शिंदे यांना पाठवीले होते. ७.३.१९९५ रोजी चिपळूण येथील निरनिराळ्या खात्यातील कर्मचारी वर्गांची मिटींग घेतली होती. प्रा.मा.म.देशमुख यांचे प्रबोधनावरील पुस्तके काही ओबिसी, मराठा व्यक्तींना व ग्रंथालयाला भेट दिले होते.

१२ जानेवारी १९९४ रोजी मा.कांशीरामजी यांची रत्नागिरी येथे  कुणबी-भंडारी समाज परिषद होणार होती. ही परिषद यशस्वी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीकृष्ण उबाळे, उपाध्यक्ष ॲड. राहुल हुमणे व रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र आयरे यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा केला होता. १५ मार्च १९९४ रोजी मा. कांशीरामजी यांची मुंबईला सभा झाली होती. त्या सभेला आम्ही गेलो होतो. दि.१३.८.१९९४ रोजी बामसेफतर्फे चिपळूण येथे अॅड. राहूल हुमणे यांचे कॅडर कँप आणि पुणे विद्यापीठाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याच्या संदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रमाची आखणी करण्याच्या करण्याच्या दृष्टीने मिटींग  आयोजीत केली होती. दि. २८.१.१९९४ रोजी चिपळूण येथे तालुका स्तरीय मिटींग घेण्यात आली होती. ह्यावेळी मा.श्रीकृष्ण उबाळे यांनी मौलिक मार्गदर्शन केले होते. याच वेळेस चिपळूण तालुक्याचे अध्यक्ष म्हणून शांताराम कदम व माझी चिपळूण तालुक्याचे बामसेफ संयोजक म्हणून नेमणूक केली होती. दि.१३.२.१९९४ रोजी माझ्या अध्यक्षतेखाली चिपळूणला बामसेफची मिटींग झाली. त्यात बाकीचे पदाधिकारी म्हणजे उपाध्यक्ष म्हणून प्रा.एन.बी.सकपाळ चिपळूण, सचिव म्हणून भाऊ गायकवाड चिपळूण, सहसचिव म्हणून पी.आर.इंगळे पोफळी व खजिनदार म्हणून एस.बी.कांबळे यांना घेण्यात आले होते.  या मिटींगमध्ये सक्रीय निधी जमा करणे, बहुजन नायक,  बहुजन संघटक पेपर वाढविणे,  कॅडर कँप व प्रशिक्षक ट्रेनिंग कँप आयोजीत करण्याबाबत निर्णय घेण्यात आले होते. दि.१९.१०.१९९४ रोजी रत्नागिरी येथील मिटींगला मी पी.आर.इंगळे साहेबांसोबत गेलो होतो. मिटींगला अॅड. राहूल हुमणे यांनी मार्गदर्शन केले होते. 

रत्नागिरी जिल्हा पातळीवर सायकल मार्च आयोजीत करण्याच्या दृष्टीने दि. २०.११.१९९४ रोजी चिपळूण येथे जिल्हा अध्यक्ष मा. राजेंद्र आयरे यांनी विचारविनिमय करण्यासाठी मिटींग आयोजीत केली होती. दि. २.४.१९९५ रोजी  रात्री ११वाजता रत्नागिरी येथे राज्य उपाध्यक्ष अॅड. राहूल हुमणे यांनी अत्यंत तातडीची मिटींग आयोजीत केली होती. ही मिटींग रात्रभर चालली होती. या मिटींगला मी, पी.आर.इंगळे आणि ए.पी. शिंदे असे तिघेजण पोफळीहून गेलो होतो. 

या दरम्यान उबाळे साहेबांचा  गोवा येथे  दौरा झाला होता. या दौ-यात त्यांनी कॅडर कँपला मार्गदर्शन केले होते. उबाळे साहेब हे चांगले प्रशिक्षक व वक्ते पण होते.  तेव्हा आम्ही  पोफळी युनिटकडून या दौऱ्याला गाडी व ए.बी..शिंदे व युवा कार्यकर्ता संदिप मोहिते या दोन कार्यकर्त्यांना सोबत देऊन त्यांच्या दौ-याचा खर्च आमच्या युनिटने केला होता. गोव्यावरून परत आल्यावर पोफळी येथे त्यांच्या सत्काराचा  कार्यक्रम घेऊन त्यांना आर्थिक निधी अर्पण केला होता. 

दि.२७.१२.१९९३ रोजी महाड येथील मा.कांशीरामजी यांच्या सभेला जवळपास २७ लोकांनी वर्गणी जमा करून हा निधी अॅड. राहूल हुमणे आणि  जिल्हा अध्यक्ष राजेंद्र आयरे यांच्याकडे सुपूर्द केला होता. या कार्यक्रमाला पोफळीवरून दोन गाड्या भरून लोकांना घेऊन गेलो होतो. 

आम्ही आर्थिक निधी दरमहीना आणि  वेळोवेळी येणा-या कार्यक्रमासाठी मग ते बहुजन नायकच्या फुले विशेषांकासाठी असो की, महाड, मुंबई, रत्नागिरी, चिपळूणचा कार्यक्रम, निवडणूक, शाहु महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचे पत्रक छापण्यासाठी, चार चाकी गाडी विकत घेण्यासाठी असो अशा अनेक चळवळीच्या कामासाठी जमा करून आयरे साहेब, अॅड. हुमणे साहेब यांच्याकडे सुपूर्द करीत होतो.  याशिवाय आमच्या युनिटकडून नागपूरच्या कार्यालयाला दरमहा राज्य निधी पाठवित होतो.

दि. १.४.१९९४ रोजी  कोल्हापूर येथे  शाहू छत्रपती स्मृतीदिनानिमीत्य मा कांशीरामजी यांच्या ६ मेच्या सभेच्या तयारीसाठी  राज्य अध्यक्ष मा. श्रीकृष्ण उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली मिटींग घेण्यात आली होती. या मिटींगला मी व ए.पी.शिंदे गेलो होतो.  या मिटींगमध्ये  प्रज्ञावंत गौतम यांनी प्रास्ताविक करून नागनाथ नायकवडी, वसंतराव नन्नावरे, मारूख खान, यशवंत कांबळे, तानाजी हिरवे, डॉ.प्रल्हाद वडगावकर, डॉ. बाबूराव गुरव, डॉ. भारत पाटणकर, डॉ.एस.के.पाटणकर, डॉ.अभ्यंग, मराठा महासंघाचे शिवाजीराव घोलपे,  असे महत्वाचे सर्व जाती-धर्माच्या नेत्यांनी विचार मांडले होते. मा. श्रीकृष्ण उबाळे यांनी फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीची विचारधारा, कार्यप्रणाली व कार्यक्रम विस्ताराने मांडले होते. यावेळी कार्यक्रम आयोजनाच्या निरनिराळ्या समित्या नागनाथअण्णा नायकवडी, साखर कारखानदार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आले होते. 

ह्यावेळची गंमत सांगायची म्हणजे आम्ही मिटींग संपल्यावर सर्किट हाऊसला थांबलो होतो, तेथे उबाळे साहेब यांनी माझी ओळख नागनाथअण्णा नायकवडी यांना करून देतांना, हे जुमळे साहेब ऊर्जामंत्री आहेत असे गंमतीने म्हणाले होते. तेव्हा ते माझ्याकडे आश्चर्याने पाहतच राहिले. तेव्हा उबाळे साहेब म्हणाले की ऊर्जामंत्री म्हणजे ते विद्युत खात्यात अधिकारी आहेत. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या बाबतीत एक उल्लेखनीय गोष्ट सांगायची म्हणजे त्यांनी ‘बहुजन नायक’ या साप्ताहिकाचे ५०० प्रतीसाठी एकाच वेळेस वार्षिक वर्गणी भरून त्यांच्या साखर कारखान्यात काम करीत असलेल्या कामगारांना वाचनासाठी उपलब्ध करून दिले होते. 

नागनाथ नायकवडी यांच्या पुढाकाराने मा.कांशीरामजी यांची जाहीर  सभा दि. ६ मे १९९४ रोजी अतीभव्य प्रमाणात यशस्वी  झाली होती. या  सभेसाठी त्यांनी ५०० ट्रक भरून लोक आणले होते. इतके ते मोठे प्रस्थ होते. या  सभेला आम्ही पोफळीवरून दोन गाड्या भरून  गेलो होतो.

मा. कांशीरामजी यांच्या प्रत्येक सभेला मग ती कोल्हापूरची असो की मुंबई, कऱ्हाड येथील असो, आमच्या पोफळी येथील कार्यकर्त्यांसह हजेरी लावली आणि प्रत्येकवेळी आर्थिक सहयोग दिला. ३० सप्टेंबर १९९४ रोजी मंत्रालयावर मा.कांशीरामजी यांच्या नेतृत्वात पुणे विद्यापीठाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यासाठी मोर्चा काढला होता. यात आमच्या पोफळी येथील टिमने संपुर्ण सहकार्य दिलं होतं. 

त्यापूर्वी चिपळूण येथे दि.१३.८.१९९४ रोजी या संदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रमाची आखणी करण्याच्या दृष्टीने व्यापक स्वरूपात कार्यकर्त्यांची मिटींग घेण्यात आली होती. या मिटींगला राज्य उपाध्यक्ष राहूल हुमणे यांनी संबोधीत केले होते. याच मिटींगमध्ये गुहागर तालुका अध्यक्षपदी भंडारी समाजातील नामवंत कार्यकर्ते एस.के.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. या मिटींगला माझ्यासहीत आमच्या पोफळी युनिटचे अनेक  कार्यकर्ते हजर होते. 

जुलै १९९७ मध्ये उबाळे साहेबांच्या जागेवर अध्यक्ष म्हणून मा. सिध्दार्थ पाटील यांची निवड झाली होती. त्यानिमीत्त आम्ही पोफळीच्या कार्यकर्त्यांनी दि. २.८.१९९७ रोजी त्यांना अभिनंदनपर पत्र पाठविले होते. त्यांनी लगेच आमच्या पत्राला प्रत्यूत्तर देऊन सहकार्याची अपेक्षा प्रदर्शित केली होती.  मी यवतमाळला असतांना त्यांचेशी अगदी जवळचा संबंध आला होता. 

मी नागपूरवरून काढण्यात येणारे चळवळीचे मुखपत्र असलेले ‘बहुजन नायक’ या साप्तहिकाची  वर्गणी  भरून मागवून घेत होतो. मग हे जवळपास ५० च्या वर पेपर व्यक्तिशः प्रत्येक शनिवारी अथवा रविवारी सुट्टीच्या दिवशी वसाहतीत वाटत होतो. काही दिवसाने नियमित वाचक झालेल्या लोकांचे वार्षिक वर्गणी घेऊन त्यांचा पेपर पोस्टाने थेट त्यांच्या पत्यावर पाठविण्याची व्यवस्था करीत होतो. मी मग त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या वाचकांचा पेपर लाऊन देत होतो. अशा प्रकारे वाचकांची संख्या वाढवीत होतो. तसेच दिल्लीवरून निघणारे हिंदी भाषेतील ‘बहुजन संघटक’ हा  पेपर पण वाटत होतो. विशेष सांगायचे म्हणजे हे पेपर बहुजन समाजातील  सारेच जाती-धर्माच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे देत होतो. खरं म्हणजे या पेपरच्या माध्यमातून मला लोकाशी संपर्क ठेवायला एक चांगलं साधन मिळालं होतं. त्याचाच मी पुरेपूर उपयोग करून घेत होतो. 

याठिकाणी  शिवसेनेचे प्राबल्य होते, ही गोष्ट मान्य करावी लागेल. कारण तेथे पुर्वापार राहत असलेले खेडूत शेतकरी-कामकरी वर्ग हा हिंदूत्वाच्या भावनेने त्यांच्याशी जुळलेला होता. त्यांच्या चिपळूण मतदार संघातून शिवसेनेचा भास्कर जाधव हा आमदार निवडून आला होता. म्हणून त्यांचा दबदबा होता. मला माझे एक-दोन हितचींतक असलेले स्थानिकांनी शिवसेनेपासून दुर रहा. एकटेदुकटे फिरू नका असा सल्ला दिला होता. पण मला त्यांच्यापासून कोणताही त्रास झाला नाही. उलट मी त्यांच्याच  पुढा़-यांकडे बहुजन नायक हा पेपर टाकत होतो. कारण ते बहुजन समाजाचे घटक होते.  वैयक्तिक संपर्कामुळे व सामाजिक कार्यामुळे त्यांच्याशी माझी जवळीकी निर्माण झाली होती. त्यामुळेच आमच्या सहकाऱ्यांच्या एक-दोन पोलीस अटकेच्या प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये जामीन घेण्यासाठी त्यांनी बरीच मदत केली होती. एका इंजिनीअरच्या पत्नीने आत्महत्या केली होती. त्यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली होती. तसेच एका वैद्यकीय अधिकाऱ्याला घरघुती भाडंणात जमानत घेण्यासाठी त्यांनी मदत केली होती. एका कर्मचाऱ्यांच्या पत्नीच्या जळीत प्रकरणात डॉ. शिवाजी मानकर यांच्या दुकानदार भावाने दुकानातील गल्ल्यातून अर्ध्या रात्रीला उसणे पैसे देऊन आर्थिक मदत केली होती. ते माझ्यावर असणाऱ्या विश्वासामुळेच, असे त्यांनी बोलून दाखविले होते.  डॉ. शिवाजी मानकर पण शिवसेनेचेच होते.

एवढेच नव्हे तर मी राहत होतो, तो वार्ड महिलांसाठी राखीव होता. म्हणून त्यांनी माझ्या घरी येवून कुसुमला म्हणजे माझ्या पत्नीला  शिवसेनेकडून उमेदवारी देऊन तिला पोफळीची सरपंच बनविण्याची संपूर्ण जबाबदारी घ्यायला तयार झाले होते. अर्थातच त्यांचा हा प्रस्ताव आम्ही मान्य केला नाही. कारण माझी बदली कधीही होऊ शकते. हे एक कारण तर होतेच, पण त्यांनी बदली झालीच तर आम्ही रद्द करू असे आश्वासन दिले होते. पण दुसरं खरं तात्त्विक कारण असं की, त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या हिंदुत्ववादी चळवळीला शरण जाण्यासारखे होईल आणि ही बाब आम्हाला पचनी पडत नव्हती. म्हणून आम्ही तयार झालो नाही.   

१७ जानेवारी १९९४ रोजी मा.कांशीरामजी यांची सभा मुंबईला  झाली होती. त्यापूर्वी मराठवाडा नामांतर आंदोलन पेटलं होतं. त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. शरद पवार मुख्यमंत्री होते. १६ वर्षे त्यांनी हे प्रकरण चिघळत ठेवलं. त्यात अनेकांचे जीव गेलेत. घरादारांची राखरांगोळी झाली. पण नामांतर करायचे सुचले नाही. मात्र या सभेच्या दोन दिवस आधी घोषणा करून नामविस्तार करण्यात आले. 

मा. कांशीरामजी जेव्हा केव्हा महाराष्ट्रात येत तेव्हा नामांतराचा  मुद्दा ते आवर्जून मांडीत असत. ते म्हणत की,  उत्तरप्रदेशमध्ये कुणाचीही मागणी नसतांना प्रधानमंत्री राजीव गांधी हे  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ११ कोटी रुपये खर्चून केंद्रीय विद्यापीठाची निर्मिती करण्याचे जाहीर केले. तसेच तेथील विज्ञान संस्थेला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याचे पण जाहीर केले. कारण उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टी सत्तेची चाबी हस्तगत करीत असल्याचे चिन्हे त्यांना दिसत होती. पण महाराष्ट्रात मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी १९७८ पासून आंदोलन सुरू आहे. बाबासाहेबांनी मराठवाड्यात शिक्षणाच्या क्षेत्रात विशेषतः मिलींद कॅालेज स्थापून अतुलनीय  काम केले.  तरीही सरकार या आंदोलनाकडे लक्ष देत नाही.  कांशीरामजी मुंबईला आल्याने शरद पवार यांच्या खुर्चीला धोका निर्माण होईल या भीतीने त्यांनी ही नामांतराची  घोषणा केली की काय अशी चर्चा त्यावेळी होत होती. म्हणून जोपर्यंत यांच्या खुर्चीला हलविण्याची ताकद येत नाही, तोपर्यंत मागासवर्गीयांच्या अन्याय-अत्याचाराचा अंत होणार नाही, ही गोष्ट सतत लोकांच्या मनावर मा.कांशीरामजी  बिंबवीत होते. म्हणून ते म्हणायचे  की, “मागणारे नाही, देणारे बना… शासनसुत्रे आपल्या हातात घ्या…”  विशेष म्हणजे या सभेला पुर्वप्रधानमंत्री  व्ही.पी.सिंग पण उपस्थित होते. त्यावेळी  मा. कांशीरामजी म्हणाले होते की आज व्ही.पी.सिंग आले. उद्या पि.व्ही. नरसिंहराव  जे तत्कालीन प्रधानमंत्री आहेत ते पण  येतील,  असे गंमतीने  म्हणाले होते. 

क-हाडच्या सभेला आम्ही काही कार्यकर्ते गेलो होतो. सुरेश माने आणि आम्ही  सोबतच बसून मा. कांशीरामजी यांचे भाषण ऐकत होतो. या सभेला मुलायमसिंग यादव पण येणार  असल्याचे जाहीर झाले होते. परंतु ते आले नव्हते. ही सभा बेरोजगारांच्या समस्येवर अनिल गोटे यांनी  आयोजीत केली होती. त्यावेळी मा. कांशीरामजी  म्हणाले होते की, गोव्यावरून समुद्र मार्गे कच्चे खनिज जहाजाने जपानला जात असते. त्यावर तेथे प्रक्रिया होऊन लोखंड आमच्या देशात पाठवील्या जाते. केंद्रात आमचे  सरकार जर आले तर हा कच्चा माल बाहेर न पाठवता आपल्याच देशात त्यावर प्रक्रिया करू. अशा पद्धतीने  देशातील बेरोजगारी तर संपेलच, उलट इतके मनुष्य बळ कुठून आणायचे असाही  प्रश्न निर्माण होईल. 

सुरेश माने यांच्याकडे राहून हुमणे यांच्या नंतर कोकणचा भाग सोपविला होता. त्यामुळे आमच्या पोफळीला त्यांचे जाणे-येणे नेहमी होत असे. चळवळीचे समर्थक आणि त्याअनुषंगाने कार्यकर्ते वाढविण्याच्या दृष्टीने मी त्यांच्यासोबत चिपळूण येथील प्राध्यापक वर्गांकडे व्यक्तीशः फिरलो; तेव्हा त्यांच्यातील एक  गुण मला विशेष  आवडला,  तो म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपला मुद्दा पटवून देण्याचा… 

४ जानेवारी १९९८ रोजी  मा. कांशीरामजी यांची मुंबई येथे सभा झाली होती. त्यावेळी सुरेश माने यांच्या सुचनेनुसार नोटाचा हार मा.कांशीरामजी यांना अर्पण केला होता.  

माझा मुलगा प्रज्ञाशील त्यावेळी डॉ. आंबेडकर लॅा कॅालेज औरंगाबाद येथे शिकत होता. तो बहुजन  विद्यार्थी आघाडीचा कार्यकर्ता  होता. या कॅालेजचे ३८ मुले या सभेला आले होते. यातील काही मुलांनी सभेच्या जागृती जथ्यात भाग घेतला होता. सुरेश माने यांच्या  बौद्धिक कॅडर कँपच्या माध्यमातून ही मुले प्रभावित झाले होते.  यातील काही मुले शिक्षण पुर्ण झाल्यावर वकीलीच्या व्यवसायासोबत बिएसपीच्या चळवळीत कामाला आले होते.  

पोफळीला आल्या-आल्याच मला एस.आर.कारंडे, ड्रायव्हर याच्यावर असलेल्या  विभागीय चौकशीच्या  प्रकरणात कर्मचारी प्रतिनीधि म्हणून काम पाहण्याचे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले. मी त्यावेळी गेस्ट हाउसला एकटाच राहत होतो.

मी त्याच्यावरील असलेल्या आरोपाच्या कागदपत्राचे सखोलपणे अभ्यास करून मी ती केस लढविली आणि त्या कर्मचाऱ्याला निर्दोष सोडवून घेण्यात मला यश मिळाले. ही घटना विशेष नमूद करण्यासारखी आहे. कारण नोकरीच्या जीवनात मी पहिल्यांदा कर्मचाऱ्याच्या बाजूने वकिली करून युक्तिवाद केला होता.

ह्या ठिकाणी मागासवर्गीय संघटना मजबूत होती. संघटनेचे कार्यकर्ते पण क्रियाशील आणि  तळमळीने काम करणारे  होते. व्ही.बी.मोहिते, बि.आर.थोरवडे, ए.पी.शिंदे, पी.आर.इंगळे, पि.एस.अडसुळे, जी.एन.संदे असे अनेक कार्यकर्ते होते. विशेष म्हणजे या संघटनेत चपराशी, ड्रायव्हर पासून माझ्यासारखे विभागीय  लेखापाल व सबइंजिनिअर पासून ते कार्यकारी अभियंतापर्यंतचे कामगार-अधिकारी सामील होते. मी या  कार्यकारिणीत सल्लागार या पदावर काम करीत होतो. 

२६, २७ फेब्रुवारी १९९३ ला पुणे येथे झालेल्या ७ व्या द्वैवार्षिक अधिवेशनाला कार्यकर्त्यांसोबत मी गेलो होतो.  पहिल्या दिवशी  या अधिवेशनाचे उदघाटन रामदास आठवले यांनी केले होते. प्रमुख वक्ते एच.डी.बाबा पाटील होते. दुस-या सत्रात माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील, दलित व्हाईसचे व्ही.टी.राजशेखर, प्रा. डी.एन. संदानशिव यांनी मंडल आयोग व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या परिचर्चात भाग घेतला होता. 

१५, १६ जानेवारी  १९९५ ला अकोला येथे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे ८वे द्वैवार्षिक अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाला आम्ही पोफळीतील कर्मचारी गाडी करून गेलो होतो. मी यवतमाळला होतो, तेव्हा अकोल्यातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो. त्यामुळे येथील आयोजक माझ्या ओळखीचे होते.

राजापूर जि. सिंधुदुर्ग येथे दि. २३ सप्टेंबर १९९५ला तेथील कार्यकर्ते शाखा अध्यक्ष मिलींद कांबळे, सचिव  प्रेमानंद कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या विभागीय मेळाव्यात मला प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रित केले होते. या मेळाव्यात मी  ‘मागासवर्गीयांचे आरक्षण आणि खाजगीकरण’ या विषयावर मते मांडली  होती.  

दि. ८ व ९ फेब्रुवारी १९९७ रोजी रत्नागिरी येथे आयोजित मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशाच्या आयोजनात माझा सक्रीय सहभाग होता. आम्ही पोफळी येथील कार्यकर्ते सहकुटुंब रत्नागिरीला गेलो होतो. माझी मुलगी करूणा हिने स्त्रियांच्या चर्चासत्रात भाग घेऊन महत्वपूर्ण विचार मांडले होते. ती म्हणाली होती की, सावित्रीबाई फुले नसत्या तर मी आज आपणासमोर भाषण करतांना दिसली नसती.

२६ सप्टेंबर १९९५ रोजी चिपळूण येथे स्थापन झालेल्या ‘म.राज्य अनुसूचित जाती/जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक कर्मचारी कल्याण समन्वय समिती’चा उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली होती. अध्यक्ष दि.मा.सोनवळकर, कार्याध्यक्ष शांताराम कदम व सचिव दिपक खांडेकर होते. त्यादरम्यान सुप्रीम कोर्टाने मंडल आयोगाच्या संदर्भात दिलेल्या निर्णयाने अनुसूचित जाती/जमाती  यांच्यावर कसा अन्याय केला,  याबाबतीत प्रा.डी.एन.सदांनशीव, सदस्य लॅा कमीशन दिल्ली यांनी इंग्रजीमध्ये पत्रक काढले होते. हे पत्रक त्यांनी दि. २६ व २७ फेब्रुवारी १९९३ रोजी पुणे येथील मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनात वाटले होते.  त्याचे मी मराठीत  भाषांतर करून ही पत्रके  वाटलीत. हाच मुद्दा घेऊन आम्ही जी समिती स्थापन केली होती, त्या नावाने ही पत्रके मोठ्या प्रमाणात  छापून वाटलीत. 

या पत्रकातील थोडक्यात आशय असा होता-

“दि.१६.११.१९९२ रोजी मंडल आयोगाच्या संदर्भात निवाडा देतांना सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिले होते की, येत्या पाच वर्षात अनुसूचित जाती/जमाती, भटक्या विमूक्त जाती इत्यादी मागासवर्गीयांच्या नोकरीमधील बढतीतील आरक्षण बंद करावे. तसेच जसे ओबिसींना क्रिमी लेअरची अट टाकून विशिष्ट उत्पन्नाच्यावर आरक्षण नाकारले; त्याचप्रमाणे हाच नियम ह्या वर्गांना सुद्धा लागू होईल असे निकालपत्रात म्हटले होते.  वास्तविक मंडल आयोगाचा अहवाल इतर मागासवर्गीयांच्या (ओबिसी) आरक्षणाशी संबंधित असून त्याचा व अनुसूचित जाती/जमाती  आरक्षणाचा अर्थाअर्थी कोणताही संबंध नव्हता. तरीही  त्यांची बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देता सुप्रीम कोर्टाचा एकतर्फी निर्णय हा पुर्णपणे नैसर्गिक न्यायाचे व मुलभुत तत्वाचे उल्लंघन करणारा आहे.” ही पत्रके सगळीकडे वाटून व ठिकठिकाणी मिटींगा आयोजित करून कामगारांत जागृती निर्माण करीत होतो. 

डॅा. बाबासाहेब आंबेडकर नागरी पतपेढी संस्था’ या नावाने चिपळूण येथे पतपुरवठा करणारी संस्था स्थापन करण्यात आली होती. या संस्थेचे कामकाज चिपळूणचे  शिक्षक असलेले  रामानंद पुजारी पाहत होते. यात पोफळीचा प्रतिनिधी म्हणून मला  कार्यकारिणीत  घेतले होते. 

 आणखी एक सांगायचं म्हणजे ओबीसी समाजाचे कार्यकर्ते प्रा. श्रावण देवरे यांनी  ‘फुले आंबेडकर तत्वज्ञान संस्था’ या माध्यमातून प्रबोधनाचे स्वतंत्र ज्ञानपीठ तयार केले असून ते सातत्याने  ज्ञानपीठाच्या या परीक्षा आयोजित करीत होते. अजूनही त्यांचा हा उपक्रम सुरूच आहे. या ज्ञानपिठाला डॉ.श्रीराम लागू व निळू फुले यांचे मार्गदर्शन होते.  या परिक्षेच्या अंतर्गत क्रांतीज्योती परीक्षा, जयज्योती परीक्षा, राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार, छत्रपती गौरव पदवी, सत्यशोधक पदवी आणि संविधान सुवर्ण पुरस्कार इत्यादी परीक्षा घेत असत.  ह्या परीक्षेसाठी त्यांनी छत्रपती शिवाजी, राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र व विचार-साहित्यावर आधारित व भारतीय संविधान हे पुस्तके अगदी कमी आणि परवडेल अशा किंमतीत उपलब्ध करून देत असतात. ही परीक्षा त्यावेळी आम्ही पोफळी येथे आयोजित करीत होतो. या परीक्षेसाठी सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे लिहावी लागतात म्हणून या निमित्ताने तरी लोक हे पुस्तके वाचीत होते. तसे हे पुस्तके परीक्षेच्या ठिकाणी घेऊन जायला परवानगी राहत असे. पण पुस्तके पाहुन उत्तरे लिहता येते हे जरी खरं असलं तरीही आधी संबंधित पुस्तक वाचणं क्रमप्राप्त असते. त्याशिवाय वेळेवर  प्रश्नांची उत्तरे लिहणे अवघड होते.  

मला एका परीक्षेत ६० टक्केपेक्षा जास्त गुण मिळाल्याने ‘शिलज’ ही वरच्या स्तरावरील  पदवी मिळाली होती. त्याशिवाय मला भिमाई पुरस्कार मिळाला होता.  त्यानिमित्ताने सत्यशोधक परीक्षा समितीने ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या परिक्षार्थीकडून मुक्त चिंतनपर लेख मागवून ते लेख  ‘चिंतन वेध गौरव ग्रंथ’ या पुस्तकात प्रकाशित केले  होते. वाचलेल्या पुस्तकाचे मनन व चितन व्हावे हा त्यामागे दृष्टिकोन होता. यात माझा ‘बहुजन मुक्तीचे द्वार : धर्म व राजकीय परिवर्तन’ या विषयावर  लेख छापून आला होता. या लेखात मी प्रामुख्याने असा विचार मांडला होता की, “ज्या मानवी शरिराचा ८५ टक्के भाग रोगग्रस्त झाला असेल, त्या शरिराला निकामी व विकलांग समजण्यात येते. त्याचप्रमाणे भारतातील ८५ टक्के बहुजन समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, मानसिक व इतर सर्व अंगाने मागासलेला असल्यामुळे भारत देश अनेक वर्षांपासून विकलांग अवस्थेत जगत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मनुवादी व्यवस्था आहे. “

 या पुस्तकाचे संपादक रमेश दाणे व सहसंपादक रमेश कांबळे होते. प्रस्तावना प्रा. श्रावण देवरे यांनी लिहीली होती. 

चळवळीत महिलांचा सहभाग असावा म्हणून पोफळी येथे समता महिला मंडळ स्थापन करण्यात आले होते. या संस्थेचे कामकाज माझी पत्नी कुसुम ही सचिव म्हणून पाहत होती. या माध्यमातून आंबेडकर जयंती सोडून इतर नैमेत्तिक कार्यक्रम जसे सावित्रीमाई फुले, माता रमाई जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वान दिन इत्यादी कार्यक्रम घेत असत. यात  माझा पूर्ण सहयोग असायचा. दि.३.१.१९९६ रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती समता महिला मंडळाने साजरी केली होती. या कार्यक्रमात ‘समाजातील स्रियांचे स्थान’ या विषयावर भाषण दिले होते. ह्यावेळी सावित्रीबाईचा गौरव करणारे व त्यांच्या कार्याचा संपूर्ण आढावा घेणारे पत्रक काढून घरोघरी व दुकानात वाटण्यात आले होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १०५ वी जयंती उत्सवाचा अध्यक्ष मी होतो. ह्यावेळी दि.१३.४.१९९६ रोजी समता महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी रांगोळी, संगीत खुर्ची व मेणबत्ती स्पर्धा, आनंद मेळा इत्यादी विविध कार्यक्रम  आयोजित करण्यात आले होते. दि. १४.४.१९९६ रोजी पंचशील ध्वजारोहन, उपमुख्य अभियंता व वैद्यकीय अधिकारी यांच्या केबिनमध्ये डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे अनावरण व मुक्त गायनाचा कार्यक्रम होता. सायंकाळी प्रा.डॉ.  एम.एम.आचार्य विभाग प्रमुख राजाराम महाविद्यालय कोल्हापूर व प्रा.बी.बी.कदम, सिनेट, शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर यांचे भाषणे झाली होती. प्रमुख पाहुणे म्हणून ए.के.भगत, उपमुख्य अभियंता हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन मी केले होते. तसे दरवर्षीच्या कार्यक्रमात सहसा मीच संचालन करीत असे. तसेच दरवर्षीच्या जयंतीच्या कार्यकारिणीत  कार्यक्रम आयोजन समिती, वर्गणी समिती अशा निरनिराळ्या समित्या असायच्या; त्यात माझा अंतर्भाव असायचा. १४.४.१९९८ रोजीच्या जयंतीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी  निबंध स्पर्धा आयोजीत केली होती. या स्पर्धेत माझी मुलगी करूणा हिला पहिले पारितोषिक मिळाले होते. ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली होती, त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तके भेट म्हणून दिले होते. 

१४ एप्रिलच्या जयंतीपुर्वी ११ एप्रिल  १९९७ रोजी ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कामगार कल्याण केंद्राचे प्रमुख रघुनाथ कासेकर यांनी कार्यक्रम घेतला होता. यात प्रमुख वक्ता म्हणून मी भाषण दिले होते.

आंबेडकर जयंतीतील विशेष आठवणीत ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आनंद मेळ्याची. यावेळी काहीजण वेगवेगळ्या खाण्याचे स्टॅाल लावीत होते. आम्ही ‘वैदर्भीय भजे’ या खाद्यपदार्थाचा स्टॅाल लावत होतो. तिकडल्या परिसरातील भजे मोठे आणि गोल आकाराचे असत. विदर्भातील भजे लहान आकाराचे व  खुसखुशीत राहत असत. खान नावाचा एक व्यक्ती स्वादिष्ट आणि चमचमीत  मटण बिर्याणी बणवित होता. तो खायला इतका अप्रतिम वाटायचा की, त्याच्या या पदार्थावर लोकांची गर्दी लोटत असे व हा पदार्थ लवकरच संपून जात असे. 

तसेच पोफळी  या गावाला आम्हाला एक वेगळीच  प्रथा पाहायला मिळाली होती.  ती म्हणजे १५ आँगस्ट आणि २६ जानेवारीला राष्ट्रीय सण साजरा करण्यासोबतच  जिलेबी खाऊन  पण हा सण साजरा केल्या जात होते.  आदल्या दिवशी जिलेबीची ऑर्डर देऊन ठेवावे लागत असे. नाहीतर  ती  वेळेवर मिळत नसे.  त्यादिवशी चौकात आणि बाजार ओळीत असे स्टॅाल लागत होते. कढईतून काढलेली गरम गरम जिलेबी बहुतेक जण  कमितकमी एका किलोच्यावर तरी घरी  घेऊन  जात असत. मी पण ऑफिसातून झेंडा वंदन करुन आलो की, जिलेबी घेऊन येत होतो. मग  घरातील सर्वजण मिळून त्यावर ताव मारीत होतो. हा  त्यावेळेसचा घरात बसून सर्वमिळून जिलेबी खाण्याचा असा  काहीसा माहोल खुपच अनोखा आणि  वेगळाच वाटत होता. ही प्रथा कोल्हापूर-साताराकडील लोकांनी येथे आणल्याचे समजले. यादिवशी  कोल्हापूरकर ९० हजार किलो जिलेबी  फस्त करतात, असे बोलल्या जात होते.

आणखी अशीच एक प्रथा जी कुठेही पाहायला मिळाली नाही ती येथे पाहीली. ती म्हणजे ‘गटारी अमावस्या’… या दिवशी दिव्यांची आरास करतात, म्हणून ‘दिव्यांची अमावस्या’ असेही म्हणतात. पण प्रामुख्याने गटारी अमावस्या म्हणूनच प्रसिद्ध आहे. या दिवशी  दारू पिऊन बेधुंद होणं आणि गटारीत लोळत पडणं, हा त्याचा अर्थ… पण तसे कोणी दारू पिऊन गटारीत लोळत पडल्याचे मी बघितले नाही. पण या दिवशीची तशी म्हण पडली आहे.  पुढील संपूर्ण श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना… या महिन्यात मांस खावू नये असा नियम… मग येतात हिंदूचे सण-वार म्हणजे गणपती उत्सव, नवरात्र व दसरा. या काळात  उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा यादिवशी प्रयत्न केला जातो. जे नियम पाळत नाही तेही हा दिवस मात्र जोरात साजरा करतात. कारण एक गाणं आहे ना, “पिने वालोको पिने का बहाना चाहीये !” तसाच काहीसा प्रकार आहे हा !  त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच असते. कुणाला मटणाच्या जेवणाचे आमंत्रण दिले असेल तर हा दिवस आपल्या सोयीनुसार  मागेपुढे होऊ शकतो. मी आणि माझे ऑफिसातील अकौऊंटस् ऑफिसर जे ब्राह्मण होते, असे आम्हा दोघांना  कुणी नाही कुणीतरी अशा जेवणाला बोलावीत असत.  

आणखी एक कार्यक्रम… तो म्हणजे  कोजागिरी पौर्णिमा… हा दिवस तर सनासारखा साजरा करीत असत. प्रत्येक बिल्डींगमध्ये असा कार्यक्रम चालत असे. बिल्डींगच्या टेरेसवर रात्रीचे बारा वाजेपर्यंत दुधात काजू-बदामसारखे सुकामेवा टाकून दुध आटवून फरसान सोबत  खाण्याचा कार्यक्रम सामुहिकपणे चालत असे. आमच्या बिल्डींगमधील आठही क्वॅाटर्स मिळून हा कार्यक्रम होत असे. मुलं तर वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करीत. माझा मुलगा संघशील त्यांच्या मित्रांसोबत जवळच्याच टेकडीच्या घाटावर सर्व सामानसुमान घेऊन जात. तेथे मौजमजा करीत हा कोजागिरीचा  कार्यक्रम साजरा  करीत असत. 

माझा मुलगा संघशील व मुलगी करूणा हे दोघेही पोफळीजवळील शिरगाव येथील शाळेत अकरावी-बारावीला शिकत होते. ही शाळा भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेतर्फे चालविण्यात येत होते. ही शाळा ग्रामीण भागात जरी असली तरी शैक्षणिक स्तर अत्यंत उच्च प्रतीचे होते. येथील शिक्षक वर्ग आपुलकीने शिकवीत असत. शहरांसारखे शिकवणी वर्गाचे फॅड या ठिकाणी नव्हते. दोघांचेही  भविष्य घडविण्यात या शाळेचा महत्वाचा वाटा होता,  हे विसरता येणार नाही. याच शाळेत बारावीला दोघांनाही चांगले मार्कस् पडल्याने संघशीलला मुंबईच्या जे.जे.मेडिकल कॉलेजला व करूणाला पुण्याच्या डी.वाय.पाटील वुमन्स इंजिनिअर कॅालेजच्या कॅाम्पूटर शाखेत प्रवेश मिळाला होता. पोफळीचे जे  विद्यार्थी बारावीच्या परिक्षेला बसणार होते, त्यांच्यासाठी मी सर्व पालकांच्या मदतीने सराव परीक्षा आयोजीत करीत होतो. त्यांच्या उत्तरपत्रीका तपासण्यासाठी या शाळेच्या शिक्षकांकडे पाठवीत होतो. यासाठी आम्ही पालकांनी पैसे जमा करून शिक्षकांना देण्याचे ठरविले होते.  पण त्यांनी पैसे घेतले नाहीत.  मग आम्ही त्यांच्यासहित सामुहिक जेवणाचा कार्यक्रम आयोजीत करून शिक्षकांना  वस्तूंच्या स्वरूपात प्रेझेंट दिले होते. 

संघशीलची मेडिकलची अॅडमिशन करण्यापूर्वी कोर्ट केस चालू असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. म्हणून त्याची अॅडमिशन माणगाव जवळील लोणेरे येथे त्यावेळी नुकतेच स्थापन झालेल्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी’ या विद्यापिठात केमिकल इंजिनीअरला करण्यात आली होती. नंतर कोर्टाचा निकाल लागल्यावर जे.जे. मेडिकल कॉलेजला अर्ज सादर  केला. तेव्हा त्याला येथे पण प्रवेश मिळू शकतो, हे निश्चित झाल्याने लोणेरे येथे जाऊन त्याचे अॅडमिशन रद्द करावे लागले व विद्यापीठाला दिलेले मुळ प्रमाणपत्रे परत आणून मेडिकल कॉलेजला दिलेत. त्याच्या अॅडमिशनच्या प्रक्रियेच्या वेळेस दिग्रसला माझ्या ऑफिसचे सहाय्यक अभियंता आर.एस. देशमुख साहेब पण त्याच्या मुलाच्या अॅडमिशनसाठी आले होते. हा एक योगायोग होता. कॉलेजच्या पहिल्या दिवशी सकाळी विद्यार्थी आणि पालक यांची मिटिंग घेऊन काही सूचना केल्या होत्या. नंतर आम्हा पालकांना बाहेर जायला सांगून सिनियर मुलांनी या मुलांचा ताबा घेतला. त्यांची ओळखपरेड घेतल्यावर कॉलेजमधील डिपार्टमेंट पाहण्यासाठी त्यांना खूप वेळपर्यंत फिरविण्यात आले. मेडिकल कॉलेजमध्ये सिनियर मुले ज्युनिअर मुलांवर रॅगिंग करीत असतात असे ऐकले होते. ही मुले लवकर बाहेर न आल्याने काळजी वाटत होती. कारण भुकेची वेळ टळून गेली होती. आम्ही जेवण्यासाठी मुलांची वाट पाहत होतो. माझा लहान भाऊ अजय नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होता; तेव्हा त्याला रॅगिंगला सामोरे जावे लागले होते. पोफळीचे डॉ. मिलिंद भगत पण रॅगिंगच्या प्रकाराबद्दल सांगत असत. म्हणून आम्हाला धाकधूक वाटत होती. या रॅगिंगमुळे कमजोर मुलं कॉलेज सोडून घरी येत किंवा आत्महत्या केल्याच्या काही घटना पण पेपरमध्ये वाचण्यात आल्या होत्या. काही जणांचे मत पडले की रॅगिंग असायला पाहिजे. कारण त्यामुळे मुलांमध्ये कणखरपणा निर्माण होतो. हे एकवेळ ठीक आहे. रॅगिंग हे विद्यार्थ्यांमध्ये कणखरपणा निर्माण करण्यापर्यंत मर्यादित असावे हे एक वेळ पटू शकतं. पण त्यात अश्लील आणि अश्लाध्य प्रकार करवून घेणे, ही विकृतीच झाली ना…  रात्रभर एका पायावर उभे ठेवणे, लिखाणकाम करून घेणे, खाली झोपवून पाण्यात पोहण्यासारखे कृती करवून घेणे, एखाद्या मुलीला हात लावून ये म्हणणे अशा सारखे अनेक प्रकार रॅगिंगमध्ये घुसले होते, असे डॉ. भगत सांगत होते. संघशील आणि त्याचे सोबतचे मित्र रॅगिंगच्या धाकाने जवळच्या रेल्वे स्टेशनवर अर्ध्या रात्रीपर्यंत फिरून होस्टेलवर येत. सकाळी वर्गामध्ये झोपेच्या डुलक्या येत असे, असे संघशील सांगत होता. जी मुले होस्टेलवर राहत असत त्यांच्यावरच जास्त रॅगिंग होत होती. शहरात राहणाऱ्या मुलांना फक्त कॉलेजमध्ये दिवसा जी काही रॅगिंग होत होती, तेवढीच… ती फारशी त्रासदायक नसायची. अजयसोबत नागपूरला शिकायला असलेले व त्याचा जवळचा मित्र असलेला डॉ.व्ही.व्ही.वासे हे या कॉलेजला फॉरेन्सिक डिपार्टमेंटला प्रमुख होते. त्यांना लक्ष ठेवायला सांगितले होते. त्यांच्या बाबतीत आणखी सांगायचं म्हणजे त्यांच्या बहिणीला आमच्या चौधरा गावातील सुखदेव गजघाटे याला दिली होती. त्यानिमित्त ते अजयसोबत गावाला येत होते. तसेच सुरेश आडे नावाचा मुलगा येथे शिकायला होता. तो सिनियर होता. त्याला पण लक्ष ठेवायला सांगितले होते. संघशील व देशमुख साहेबांचा मुलगा आनंद यांना बाहेर माझ्या मित्राच्या विद्युत मंडळाच्या वसाहतीत क्वार्टरवर ठेवता येईल का असाही प्रयत्न करून पाहिला होता. होस्टेलमध्ये राहणारा सुरेश आडेकडे झोपायला पाठवित होतो. तरीही काही प्रमाणात रॅगिंग ही होतच होती. हीच मुले सिनियर झाली की ज्युनिअर मुलांवर रॅगिंग करीत होते. आहे की नाही गंमत ! सासू सुने सारखे यांचं नातं असते, म्हणे ! म्हणून हा प्रकार सुरु राहत होता. रॅगिंगबाबत खूप ओरड झाल्याने आता यावर बरेच निर्बंध आले आहेत.

सुरेश आडेचा मी जो उल्लेख केला, त्याबद्दल माहिती सांगायची म्हणजे तो आमच्या यवतमाळकडील पुसद जवळ राहणारा होता. तो बंजारी समाजाचा होता. तो संघशीलला सिनीयर होता. त्याची ओळख म्हणजे माझ्या ऑफिसमधील नलवडे नावाच्या महिला कर्मचा-याचा मुलगा  त्याच्यासोबत या कॉलेजला शिकायला होता. त्याच्याचमुळे सुरेश आडेशी ओळख झाली होती. त्याची घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्याला पैशाची गरज होती. माझ्याकडे नव्हते पण त्याला घेऊन मी डॉ. भगत यांच्याकडे गेलो. त्यांनी त्याला माझ्या सांगण्यावरून मदत केली. शेतीतला कापूस निघाल्यावर त्याने हे पैसे  परत केले होते, ही गोष्ट वेगळी!  पण डॉ.भगत यांच्या मदतीची जाण ठेवण्याच्या दृष्टीने मी हा उल्लेख मुद्दामच  केला आहे. समाजातील काही लोकांच्या परोपकाराच्या भावनेतून समाजाचा विकास कसा घडत जातो हे एक त्याचे उदाहरण आहे.  डॉ. भगत यांच्या बाबतीत आणखी सांगायचं म्हणजे आम्ही दोघांनी असं ठरविलं होतं की, ऐरव्ही आम्ही कुठेही भेटलो तरी जयभीम म्हणतोच. पण आता यापुढे आम्ही जरी आपापल्या केबिनमध्ये असलो आणि तेथे इतर कोणीही जरी बसून असले तरी त्याची पर्वा न करता, बिनधास्तपणे एकमेकांना ‘जयभीम’ म्हणायचं. ही पद्धत आम्ही दोघांनी बदल्या होतपर्यंत  पाळली होती.  

पोफळीचे डॉ. शिवाजी दाजीराम मानकर हे शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते होते, याचा उल्लेख मी आधीच केला आहे. ते चिपळूण येथे वैद्यकीय व्यवसाय करीत. सामाजिक कार्यामुळे माझा त्यांच्याशी चांगला संबंध आला होता. त्यांचा विशेष उल्लेख यासाठी करावा लागेल की त्यांनी संघशीलला एमबीबीएसच्या प्रवेशाच्या अर्जावर किमान एक लाख रुपयाची पत (solvency) असणा-या व्यक्तीची  जमानतदार म्हणून  सही पाहिजे होती. म्हणून त्यांनी तहसीलदाराकडून तसे प्रमाणपत्र घेऊन ते अर्जासोबत जोडण्यासाठी दिले  होते. 

पोफळीला आणखी एक पायंडा पडल्याचे आढळून आले होते. येथे कामगारांना राहण्यासाठी विद्युत मंडळानी घरे  उपलब्ध करून दिले  होते. म्हणून येथिल कामगार वर्ग आपल्या मुलांना आयटीआयचे तांत्रिक शिक्षण देऊन याच ठिकाणी नोकरी लावून देण्यासाठी प्रयत्नशील राहत. आयटीआयच्या पलीकडे मुलांना शिकविण्याचा त्यांचा कल दिसत नसे. मुलांना नोकरी लागली की मुलगा त्याच क्वार्टरमध्ये राहत असत. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर बापाला घर सोडण्याची गरज पडत नसे. त्यामुळे ते पिढ्यानुपिढ्या त्या एकाच क्वार्टरमध्ये स्वतःचे घर असल्यासारखे कायम स्वरूपात राहत असल्याचे मी पाहिले होते. मुलांच्या शिक्षणाबाबत अशी दूरवस्था पाहून मी त्यांना समजावून सांगत होतो की मुलांना जास्तीत जास्त शिकवायला पाहीजे. ज्या डबक्यात आपण जीवन घालवले त्याच डबक्यात मुलांना पण जगायला भाग  पाडू नका. मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांना  डॅाक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक बनवा. माझी मुले  उच्च शिक्षण घेतांना पाहून फार नाही पण काही जणांनी ही पायवाट चोखाळल्याची मला दिसून आले. भास्कर या कामगाराने आपली तिन्हीही मुलांपैकी मुलीला डॅाक्टर व दोन मुलांना इंजिनिअर बनविले होते, ही गोष्ट विशेष वाटत होती. 

आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट आहे. शंकर मोहिते नावाचा मुलगा संघशिलच्या वर्गात शिकत होता. शंकर हा वडार जातीचा अन् अत्यंत गरीब परिस्थितीत राहत होता. त्याचे आई-बाबा झोपडीत राहून रोजमजुरी करीत होते. संघशीलचा तो जवळचा मित्र होता. संघशील त्याला अभ्यासात मदत करीत होता. त्याने त्याला घड्याळ पण भेट दिली होती. बारावीचा निकाल लागला; तेव्हा संघशीलला चांगले मार्क्स पडल्याने त्याला मुंबईच्या जे.जे.मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. शंकरला बऱ्यापैकी मार्क्स पडले होते. तो भटक्या जमातीत मोडत असल्याने त्याला पण त्याचवेळेस मेडिकलला प्रवेश मिळू शकला असता. मी त्याला तसे सांगितले सुध्दा आणि मदत करायला पण तयार होतो. पण त्याने त्यावेळी मनावर घेतले नव्हते. 

दुसऱ्या वर्षी परत त्याला सांगितले. संघशीलचे शिक्षण पाहून तो तयार झाला. मी सुरुवातीला त्याच्या अॅडमिशनसाठी  काही खर्च केला. परंतु नंतरचा खर्च मला झेपावणार नव्हता. म्हणून त्याच्याच जातीचा एम.जी.जाधव हे त्यावेळी सुरक्षा अधिकारी होते. त्यांना मी ही गोष्ट सांगितली. तेव्हा त्यांना पण आनंद झाला आणि ते त्याला शेवटपर्यंत शिकवायला तयार झाले. ते अविवाहित आणि एकटेच राहत होते. शंकरच्या आईवडिलाला बोलावून त्यांना समजावून सांगितले. ते पण तयार झाले. माझा मुलगा कुणाच्यातरी मदतीने डॉक्टर होत आहे याचा कुणालाही आनंदच होईल, ना ! जाधव साहेबांनी त्याला कपडे, बकेट, पुस्तके व इतर काही त्याला लागणारे उपयोगी सामान घेऊन दिले. तो होस्टेलमध्ये राहायला  गेला. पण काही दिवसाने तो तेथून गायब झाल्याची बातमी संघशीलने दिली. ही बातमी ऐकून आम्ही गर्भगळीत झालो. आमच्यामुळे तो शिकायला गेला आणि त्यांचं काही बरंवाईट झालं तर आमच्यावर दोष येईल. म्हणून आम्ही पण फार घाबरलो होतो. आम्ही मग त्याच्या घरी शिरगावला गेलो. त्याच्या बापाला ही गोष्ट सांगितली. तो म्हणाला, ‘काही काळजी करू नका. तो पुण्याला त्याच्या मामाकडे गेला असेल.’ आम्ही त्यांना  जाण्यासाठी पैसे दिलेत. तो खरंच पुण्याला सापडला. शंकरला घेऊन आले. परत त्याला आम्ही सर्वांनी समजाविले. मी त्याला ‘कोल्हाट्याचं पोर’ हे किशोर शांताबाई काळे ह्यांनी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन कसा डॉक्टर झाला ते सांगितले. माझ्याकडे संग्रही असलेले ते पुस्तक त्याला वाचायला दिले.

जाधव साहेबांनी पैसे देऊन त्याला परत मुंबईला पाठविले. पण तो काही दिवस राहून पुन्हा परत आला. त्याला आम्ही खोदून खोदून त्याची काय अडचण आहे ते विचारण्याचा प्रयत्न केला. पण तो काहीच सांगायला तयार नव्हता. “तुला रॅगिंग होते काय की तुला इंग्लीश भाषेची अडचण येते, की आणखी काय ते सांग.”  पण तो तोंड उघडायला बिलकुल तयार नव्हता. त्यामुळे आम्ही त्याच्यापुढे हात टेकले. एका गरीब मुलाला डॉक्टर होण्यास आमचा हातभार लागेल असे आम्हाला मनोमन वाटत होतं. पण नियतीला ते मान्य नसल्याचं दिसत होतं. जाधव साहेबांचे पण आमच्यामुळे जवळपास तेरा हजार रुपये खर्च झाले होते. ही खंत आम्ही त्यांना बोलून दाखविली. पण त्यांनी त्याचा दोष आम्हाला दिला नाही. तुम्ही प्रयत्न करून पाहिला पण फसला. त्याला तुम्ही काय करणार असे म्हणून आम्हाला दिलासा दिला. ही गोष्ट आमच्या नेहमी आठवणीत राहणारी अशीच आहे !

आणखी एक गोष्ट आमच्या मनाला खोलवर चटका लावून गेली. ही गोष्ट आहे वंदना हिची…

दिग्रस जि.यवतमाळ येथे एका टिनाच्या झोपडीत रमा आणि गोविंदराव राहत होते. त्यांची ही एकुलती एक मुलगी… तिचे आई-बाबा रोजमजुरी करून गुजराण करीत. तिच्या बाबाला दारूचे व्यसन जडले होते. वंदना दोन महिन्याची असतांना तिच्या बाबाने दारूच्या व्यसनात तिला खाली आपटले होते. त्यामुळे तिचा एका बाजूचा हात आणि  पाय लुळा पडला होता. एकदा तिच्या आई-बाबाचे जोरात भांडण झाले. त्या रागाच्या भरात ती जिव द्यायला जवळच्या विहिरीवर गेली. हे पाहून आईचा भाऊ म्हणजे वंदणाचा एकुलता एक मामा तिला वाचवण्यासाठी धावत आला. तिने विहिरीत उडी घेतलेली पाहून त्याने पण उडी घेतली. दोघेही पाण्यात बुडून मरण पावलेत. ही बातमी वा-यासारखी गावात पसरली. वंदणाचा बाप घाबरून पळून गेला. तेव्हापासून तो बेपत्ता झाला. मामाच्या बायकोने दुसरा घरठाव केला. वंदनाचा सांभाळ तिच्या म्हातारे आजी-आजोबांनी केला. आम्ही त्यावेळी दिग्रसला  नोकरीला होतो. माझे बाबा त्या मोहल्ल्यात जात,  तेव्हा तिच्या आजोबांशी मैत्री  झाल्याने वंदनाला घेऊन ते  आमच्या घरी  येत-जात असत,  तेव्हा आम्हाला तिची  ही गोष्ट  समजली. त्यावेळी ती ५-६ वर्षाची असावी. तितक्यातच आमची बदली वणीला व नंतर  यवतमाळला झाली. आम्ही तेथून  गेल्यावर  काही दिवसांनी तिचे आजोबा वारलेत. आजी पण पाठोपाठ वारली. आता ती अनाथ झाली होती. शेजारी तिचा दुरच्या  नात्याच्या एका  मामाने आमचा यवतमाळ येथील पत्ता काढत तिला आमच्याकडे आणून सोडले. मला पण आमचा प्रपंच व तिन मुलांचे शिक्षणापायी तिला सांभाळणे अवघड झाले असते. म्हणून मी तिला २०० रुपये डोनेशन भरून दि.१.८.१९८८ रोजी  बाबाजी दाते यांच्या श्री विशुद्ध विद्यालय यवतमाळ संचालीत ‘माया पाखरं’ या अनाथ मुलांच्या संस्थेत दाखल केलं. संस्थेने तिला पहिल्या वर्गात शाळेत दाखल केले होते. अधुन-मधून तिच्यासाठी आम्ही खावू घेऊन तिला भेटून येत होतो. त्यावेळी तिच्यासोबत राहत असलेले लहान-लहान मुले आमच्या अवतीभवती जमत. त्यांना खाऊ वाटत होतो. प्रत्येकांच्या वेगवेगळ्या कहाण्या ऐकून मोठी किव येत होती. नियतीने या लहान मुलांच्या पदरी असे भोग का वाढून दिलेत याचे अतोनात  दु:ख होत असे. संस्थाचालकांच्या परवानगीने आम्ही तिला घरी पण घेऊन येत होतो. तिला कपडे घेऊन देत होतो. आता ती आमच्या कुटुंबाची एक घटक झाली होती. म्हणून तिच्याप्रती आम्हाला जिव्हाळा निर्माण झाला होता. नंतर आमची बदली पुसद व नंतर खूप दुर म्हणजे कोकणात झाली. आता तिला वारंवार भेटणे अवघड झाले. फक्त जेव्हाकेव्हा गावाला येत होतो, तेव्हाच तिला भेटणे शक्य होत असे.  एकदा यवतमाळला आलो होतो; तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत तिला कोकणातील आमच्या पोफळी येथील घरी आणले होते. तिची ही शेवटची भेट होती. ती आता लग्नाच्या वयाची झाल्याने संस्थाचालकांनी तिच्यासाठी मुलगा पाहिला होता. पण तो दारूडा आहे, मला तो पसंत नाही, असे तिने पत्र पाठवून आम्हाला कळविले होते. म्हणून मी माझे मित्र दिग्रसचे एकनाथ तुपसुंदरे यांना यात लक्ष घालायला सांगितले होते. त्यांनी संस्थाचालकांना भेटून हे लग्न मोडले होते. आमच्या सांगण्यावरून ते यवतमाळला आले की तिची विचारपूस करीत होते.  पण नंतर  ती तेथून निघून गेली असल्याचे त्यांनी कळविले. मुलं मोठी झालेत की संस्था त्यांना काढून टाकीत असत.  ती कुठे गेली ते काहीही कळले नाही. त्यामुळे तिच्याशी संपर्क कायमचा तुटून गेला. ती कुठे असेल, काय करीत असेल या चिंतेत आम्ही होतो. घरातला जीव हरवल्यासारखे आम्हाला वाटत होते.        

माझी मुलं आता शहराच्या ठिकाणी शिकायला गेले होते. प्रज्ञाशील औरंगाबाद येथे आंबेडकर लॅा कॉलेजला, संघशील मुंबईला जे.जे. मेडिकल कॉलेजला आणि करुणा पुण्याला डी.वाय. पाटील वूमन इंजिनिअर  कॉलेजमध्ये कॅाम्पुटर  इंजिनिअरला शिकत होती. म्हणून जाण्या-येण्याला सोयीचे व्हावे म्हणून मध्यस्थान म्हणून नाशिक येथे बदलीसाठी अर्ज केला. त्यामुळे पोफळीवरून ऑगष्ट १९९८ मध्ये नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे  येथे बदली झाली.

१३. नाशिक (एकलहरे) येथे बदली

एकलहरे येथे औष्णिक विद्युत केंद्र असून या केंद्राला नाशिक औष्णिक विद्युत केंद्र म्हटल्या जात होते. आता कंपनी झाल्याने महाजनको म्हणजे महाराष्ट्र स्टेट पॅावर जनरेशन कंपनी म्हटल्या जात आहे. येथे ६३० मेगावॅटची ४ संचाद्वारे विद्युत निर्मिती होत होती.  हे केंद्र नागपूर हायवेवर नाशिकरोड पासून सात किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकापासून एकलहरे  येथे जाण्या-येण्यासाठी सिटी बसेसची व्यवस्था केलेली  आहे. या केंद्राजवळून गोदावरी नदी वाहत जाते. केंद्राला व वसाहतीला याच नदीचा पाणीपुरवठा होतो. येथे केंद्राच्या परिसरातच कर्मचारी व अधिकारी वर्गांसाठी निवासी गाळे बांधण्यात आले आहे. मी जुन्या डीचा बंगला पद्धीतीचा गाळा (क्वार्टर) घेतला. हे क्वार्टर मार्केटला लागून होतं. नवीन डीचे क्वार्टर फ्लॅट पद्धतीचे तीन मजली होते. ते मार्केटपासून दूर होते. आम्हाला ते आवडले पण नव्हते. आम्ही नंतर या क्वार्टरच्या भोवताल मेहंदीचे कम्पाऊंड तयार केले. कारण क्वार्टरच्या पुढे भरपूर जागा होती. मग आम्ही या जागेत मस्तपैकी बाग फुलवली. निंबू, पेरू, केळ, सीताफळ असेही काही फळझाडे लावलीत. स्कूटर पण कम्पाऊंडच्या आतमध्ये ठेवता येत होती.  

हा परिसर थंड हवामानाचा असून द्राक्षे आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवील्या जाते. माझ्या क्वार्टरच्या समोरच्या रोडला लागून आठवडी बाजार भरत होता. तसेच रोज संध्याकाळी पण भाजीपाला विकायला येत होता. त्यामुळे रोज ताजा भाजीपाला मिळत होता.

मी विपश्यना शिबिराबाबत बरेचदा ऐकले होते. यवतमाळला असतांना मला इगतपुरीच्या शिबिरात प्रवेश पण मिळाला होता. पण काही कारणांमुळे मी त्यावेळी जाऊ शकलो नाही. आता अनायसे नाशिकला आलो म्हणून हे शिबिर करायचे ठरविले होते. इगतपुरी हे  नाशिकहून जवळपास ५० किलोमीटर दुर आहे.  दि. १४.६.२००० रोजी मी, माझी मुलगी करूणा आणि तिची पोफळी येथील मैत्रीण मेघा असे आम्ही तिघांनी मिळून हे १० दिवसाचे शिबीर केले. त्यावेळी योगायोग असा की  या केंद्राचे संचालक सत्यनारायणजी गोयंका यांनी  प्रत्यक्ष एक दिवस शिबिरात येऊन आम्हाला प्रवचन दिले होते.  हे शिबिर झाल्यावर मला जाणवलं की गोयंकाजी आणि मा. कांशीरामजी या दोघांकडे जरी धर्माने बौद्ध असल्याचे प्रमाणपत्र नसले तरी ते आपल्या आचरणाने ख-या अर्थाने बौद्ध असल्याचे सिद्ध केले होते. 

एक व्यक्ती  शिबिराच्या माध्यमातून भगवान बुद्धांची शिकवण सांगत होते तर दुसरे ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’साठी देशाच्या चारही बाजुला भ्रमण करीत  होते.

या शिबिरात  बौद्ध समाजाशिवाय इतरही समाजाचे लोक येत असल्याचे मला दिसून आले.  यवतमाळ येथील माझ्या ओळखीचे प्रा. काशिनाथ लाहोरे,  माळी समाजाचे हे पण त्यावेळी आले होते. या शिबिरात काही मुस्लिम, मारवाडी  पण दिसले होते.

विपश्यनेबाबत काही लोक विरोध करतात व काही लोक समर्थन पण करतात. बाबासाहेबांनी समाजात पेरलेल्या विद्रोहाची ज्वाला थंड करण्यासाठी ही विपश्यना विधी कार्य करते असे विरोधकांचे म्हणणे आहे. विपश्यना केल्याने बाबासाहेबांच्या चळवळीपासून दूर जातो अशीही टीका केली जाते. अशा प्रकारचे समज-गैरसमज जरी पसरले असले तरी विपश्यना ही भ.बुद्धांचीच ध्यान-साधनेची विधी असल्याचे मज्जिम व दिघ्घनिकायच्या महासतीपत्ठान सूत्तात उल्लेख आला आहे. कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना व धम्मानुपश्यना या चार सावधानतेमुळे साधनेतील पाच दुर्बलता म्हणजे जीवहिंसा, चोरी, काममिथ्याचार, असत्य भाषण, आळस वाढविणाऱ्या मद्याचे सेवन दूर होतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध  आणि त्यांचा धम्म या ग्रंथात धम्म म्हणजे काय? या प्रकरणात हा उपदेश नमूद केला आहे.

खरं म्हणजे  विपश्यना शिबिर म्हणजे एक कार्यशाळा आहे. तेथे धम्म प्रशिक्षण असते.  त्रिशरण व पंचशील ग्रहण करून ही कार्यशाळा सुरू होते. बुद्ध धम्म हा संपूर्णतः विज्ञानावर आधारित आहे. विज्ञान हे असे व्यवस्थित ज्ञान किंवा शिक्षण आहे की जे विचार, अवलोकन आणि प्रत्यक्ष प्रयोगातून सिद्ध होते. विज्ञानाच्या व्याख्येनुसार दु:खातून मुक्त होण्यासाठी भगवान बुद्धांचा धम्म परियत्ती (Theory विचार) आणि पटिपत्ती ( Practical अवलोकन ) आणि पटिवेदन

(प्रत्यक्ष प्रयोग, अनुभव, Practice) अशा पद्धतीने धम्म अनुसरणातूनच म्हणजेच अनुभवातुन सिद्ध होतो. कारण धम्माचे कार्य फक्त उपदेश करुन बाजुला होणे नाही तर व्यवहारी जीवनात त्याचे प्रत्यक्ष अनुसरुण करुन वैयक्तिक प्रगतीतुन सामाजीक प्रगती साधने आहे, दुःखातून मुक्त करणे आहे. त्यामुळे ज्यावेळी धम्म अनुसरण करण्यासाठी मानसीक अडथळे निर्माण होत असतात, त्यावेळी सर्वप्रथम ते अडथळे दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जो पर्यंत तुमच्या चित्तामध्ये मनामध्ये कुशल कर्मे करण्याची चेतना निर्माण होत नाही तोपर्यंत तुमच्या कडून धम्माचे किंवा बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन होऊच शकणार नाही. हेच वैज्ञानीक दृष्टिकोण सांगतो. विपश्यना शिबिरात ध्यान-साधनेशिवाय  दहा पारमिता, पंचशील, अष्टांगमार्ग आणि मैत्रीभाव याचेही प्रशिक्षण दिले जाते.

भगवान बुध्द हे महान मनोवैज्ञानिक आणि संशोधक होते. ते जगातील पहिले आणि सर्वश्रेष्ठ तत्ववेत्ते होते. त्यांनीच ही विपश्यना  विधी शोधून काढली. या साधनेच्या अभ्यासाने स्वत:च्या शरीर व मनात खोलवर दडलेल्या समस्यांची उकल होऊन, त्या दूर होण्यास मदत होते. आपल्यामधील सुप्त शक्तींचा विकास होतो. त्या शक्तीचा उपयोग स्वत:च्या व इतरांच्या कल्याणासाठी करता येतो. या साधनेद्वारे केवळ शारीरिक समस्या दूर होतात, असे नाही तर जीवनात मोठा क्रांतीकारी मानसिक बदल सुध्दा घडून येतो.

विपश्यना  ही कल्याणकारी विद्या भारतातून जगात पसरली. गुरु-शिष्य परंपरेच्या माध्यमातून ही विद्या ब्रम्हदेशात मागील २५०० वर्षांपासून शुद्ध स्वरूपात जतन करण्यात आली.

असे सांगितल्या जाते कि, सत्यनारायन गोयंका गुरुजी यांनी ही विधी ब्रम्हदेशात उ बा खिन या बौद्ध भिक्खू कडून शिकून घेतली. ते भारतात येऊन नाशिक जवळील इगतपुरी येथे व देशातील आणि  जगातील इतर अनेक ठिकाणी दहा दिवसाच्या शिबिरातून प्रशिक्षित आचार्यांच्या माध्यमातून शिकवीत असत. विपश्यना शिबिरात आनापानसती (श्वासाचे निरीक्षण) व दुसरा विपश्यना  (स्वत:च्या शरीरातील प्रत्येक पेशीत उमटणार्‍या  संवेदनाचे निरीक्षण) आणि तिसरी मंगल मैत्री  (विश्वातल्या सर्व प्राण्यांप्रति मंगल भाव करणे) शिकवले जाते. आनापानसतीच्या शिकवणीत  मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास आणि  सराव केल्या जाते. आन म्हणजे अश्वास, अपान म्हणजे प्रश्वास व सती म्हणजे सजगता. म्हणजेच येणार्‍या व जाणार्‍या श्वासावर लक्ष ठेवणे. म्हणजेच या अभ्यासात शरीरात नाकावाटे सहज आणि स्वाभविक येणारा तसेच बाहेर पडणारा श्वासावर लक्ष केंद्रित केल्या जाते. आपले मन जागृत ठेवले जाते. मनाच्या एकाग्रतेसाठी  ही विधी विद्यार्थ्यांना  खूप उपयुक्त आहे.  माझा मुलगा प्रज्ञाशील हा युपीएससीची तयारी करीत  असतांना त्याने पण  हे शिबिर नागपूर, सोनिपत (हरियाणा) आणि इगतपुरीला केले.

मन हे सतत भरकटत असते. चवताळलेला हत्ती काहीही नुकसान करू शकतो, पण त्याला जर काबूत ठेवले तर तो चांगल्या कामात  उपयोगी पडू शकतो. तसेच मनाचे आहे. मनाला काबूत ठेवण्यासाठी विपश्यना  हे एक चांगले साधन आहे. आपले चित्त, मन एखाद्या गोष्टीवर अथवा कार्यावर एकाग्र करणे, त्या कार्याप्रती पूर्णपणे जागृत राहणे व ते कार्य सर्वशक्तीनिशी पार पाडणे हे आनापानसतीचा, विपश्यनाचा आणि मंगल मैत्रीचा अभ्यास करणारे चांगल्या रीतीने जाणू शकतात. या अभ्यासात शिकविले जाते की, शरीरात उमटणार्‍या संवेदनावर कोणतीही मग ती सुखद असो, दु:खद असो की, सुखद-दु:खद असो – प्रतिक्रिया व्यक्त न करता नि:ष्पक्ष राहून केवळ निरीक्षण केल्याने दुखा:च्या आहारी जात नाही. कारण संवेदना सतत बदलत असतात. त्या कायम राहत नाही. उदय होणे, व्यय होणे हा तिचा नैसर्गिक स्वभाव असल्याचे जाणवते. म्हणून सजगता व समतेत राहिल्याने आपण दु:खमुक्त होऊ शकतो, ही गोष्ट  साधकाच्या लक्षात येते. आपण सुखी व आनंदित झालो की, असेच सुख आणि आनंद दुसर्‍यालाही मिळावे म्हणून कामना करतो. सर्वांचे कल्याण होवो, सर्व दुख:मुक्त होवोत, हीच तर विपश्यना ध्यान साधनेचा उद्देश आहे. यालाच मेत्ता भावना म्हणजेच ‘मैत्री भावना’ म्हणतात. 

लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत आज  निरनिराळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ही शिबिरे आयोजीत होत आहेत. त्यामुळे मैत्री, करुणेचे भगवान बुध्दाचे तत्वज्ञान जनमानसात रुजत आहेत. सामाजिक सलोखा निर्माण होण्यास तसेच आजच्या अनैतिक जगात माणसाला सदाचारी, चारीत्रवान, निरोगी  बनविण्यासाठी या विधीचा फार मोठा हातभार लागत आहे.

मी पण १९८६ पासून आंबेडकरी चळवळीत जीव ओतून काम करतोय. पण विपश्यनेचं शिबीर केल्याने चळवळीपासून दूर गेलो असे तर कधी घडले नाही. एवढेच काय चळवळीपासून दूर राहावे असा पुसटसा विचारही कधी माझ्या मनाला शिवला नाही. स्वताच्या श्वासाचे आणि शरीराच्या घडामोडीचे निरीक्षण केल्याने समाजाचे कोणते नुकसान होणार आहे? संवेदना व श्वास बघितल्याने आंबेडकरवादी व्यक्ती चळवळीपासून दूर जातो असे म्हणणे अनाकलनीय वाटते. म्हणून जे लोक विपश्यनेवर टिका करतात त्यांनी प्रत्यक्ष हे शिबिर करून पहावे, तेव्हाच या शिबिरांचे स्वरूप त्यांना कळेल असे मला वाटते. उगीच ओरड करण्यात काहीही अर्थ नाही.

मी यापुर्वी यवतमाळला असतांना ट्रेनिंगसाठी नाशिकला आलो होतो. येथे पुर्ण महाराष्ट्रासाठी ट्रेनिंग सेंटर आहे.  आठ दिवस येथे होतो. त्यावेळी कधी वाटलं नव्हतं की, कधीकाळी येथे माझी पण बदली होईल, म्हणून… जीवनात ध्यानीमनी नसतांना असं काहीतरी घडतंय, हेच खरं  !

येथे असतांना कधी कधी माझे ओळखीचे लोक जे ट्रेनिंगला येत होते, त्यांच्याशी अचानक भेट झाली की मोठा आनंद व्हायचा. एकदा नागपूरचे बामसेफचा कार्यकर्ता रमेश देशभ्रतार ट्रेनिंगसाठी आले होते. ते विद्युत मंडळात ऊर्जानगर चंद्रपूर येथे माझ्यासारखेच विभागीय लेखापाल होते. त्यांना कळले की मी येथे आहे. तेव्हा ते भेटायला माझ्या क्वार्टरवर आले होते. ते कवी होते. त्यांनी प्रकाशित केलेला ‘वणव्याची धग’ हा काव्यसंग्रह  भेट म्हणून  दिला होता. ती तारीख होती, २५.०५.२००१ ची… या पुस्तकाला सुप्रसिद्ध दलित साहित्यिक प्रा. केशव मेश्राम यांनी प्रस्तावना लिहिली होती. विशेष म्हणजे या संग्रहातील एक कविता मला खूप भावली होती. ती  कविता होती, ‘पावसाचे गाणे…’

विजा कडाडल्या की माय

दारासमोर विळा ठेवायची

आम्हा तिघांनाही कवेत घेऊन

बापाला शिव्याशाप द्यायची

त्यावेळी घरची चूल पेटविण्याकरिता

बाप घराबाहेर गेलेला असायचा

एकदा झड सुरु झाली की

घरी खायची सोय नसायची

चूल शांत शांत

पिपे मडके रिकामे असायचे

पोटात मात्र

भुकेचा डोंब उसळत असायचा

घर गळणे सुरु झाले की

ताट, वाट्या, जर्मनी गंज

सर्वच कामी यायचे

पाणी फेकतांना जीव गळ्यापर्यंत यायचा

पूर्ण रात्र रडत रडत

कोंट्यात बसून काढत असू

आता मी फ्लॅटमध्ये राहतो

फ्लॅट काही गळत नाही

मात्र पावसाने दिलेल्या वेदनेचा

विसर काही पडत नाही…

आहे ना, खासच कविता ! कसा हा कवी भाऊक होवून आपलं जीवन या कवितेत रेखाटतो ! मीच काय जे जे गरीब अवस्थेत शिक्षण घेऊन नोकरीला लागलेत आणि आज ऐशोआरामात जगत आहेत, त्या सर्वांना या कवितेतील भाव लागू पडतात. माझ्या बालपणाची आठवण या कवितेत दिसली, ती मला फार आवडली. म्हणून तिचा उल्लेख केल्याशिवाय राहवलं नाही.

पुस्तकात एकूण ५३ कविता होत्या. इतक्या कविता रचणे म्हणजे माझ्या दृष्टीने फारच झालं. मला तर कविता करणे फारसं जमलंच नाही. मी लहान होतो; तेव्हा माझ्या चौधरा  खेडेगावात भजन मंडळं होती. त्याकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दलितांच्या सर्वांगीन उत्कर्षाची चळवळ खेड्यापाड्यात पोहोचली होती. भजनाच्या माध्यमातून गावागावात समाज जागृती होत होती. त्यांच्या भजनातील बुद्ध-भीम गीताने मन कसं भारावून जात असे ! माझा मोठा दादा शामराव हा भजनं-कव्वाली म्हणत होता. त्याच्या कलेबद्दल विचारूच नका ! त्याचा  आवाज म्हणजे  पहाडी व काळजाला पाझर फोडणारा होता. त्यांचे भजन मंडळ आजूबाजूच्या खेड्यापाड्यात जबरदस्त गाजले होते. त्यांच्या भजनात आंबेडकरी चळवळीतील जागृती गितांचा, भीम व बुध्द गितांचा भरपूर समावेश असायचा. त्यांच्या भजनाने मनाला खरोखरच चटका लागून जायचा. खेड्यातील लोकांना तेच एक मनोरंजनाचे व जागृतीचे साधन होते, म्हणा ! बुध्द-भिमांचे विचार, त्यांचे कार्य व कर्तृत्व, त्यांचा आदर्श त्या गितांतून प्रकट होत असे. त्यांच्या खणखणीत आवाजातील सूर व संगीताचा साज सर्वत्र निनादत राहायचा.

‘पटाचाराची ऐका कहाणी, काळजाची होईल पाणी पाणी’ यासारखे कारुण्याने ओतप्रोत भरलेल्या गाण्याने लोकांच्या डोळ्याला अक्षरश: पाणी येत असे. असे गाणे ऐकून वाटायचं की, आपणही अशी गाणे लिहून काढावीत. प्रयत्न करून पहिला. पण नाही जमलं. दादा गाण्याशिवाय पेटी-हारमोनीयम अन् फिड्डल सुद्धा उत्कृष्टपणे वाजवीत होता. तो कलाकारच होता. अशी म्हण होती की, ‘बामणाच्या घरी लेवणं, कुणब्याच्या घरी दाणं तर महार-मांगाच्या घरी गाणं !’ स्वत:च्या कलाकृतीतून जीवनातील आनंद फुलविण्याचं उपजत कौशल्य या महार-मांग समाजाजवळ होतं. मांगा-महाराच्या जातीला संगीत कलेचा मोहक सुगंध होता. या जातीत जन्माला आलेल्या माणसाच्या नसानसात संगीतकला भिणलेली होती. त्यामुळे ह्या जाती म्हणजे लोककला व कलावंताची खाण होती, असेही म्हणता येईल. खेळ, साहित्य, संगीत, गायन, नृत्य, नाट्य, चित्र, मूर्तीकाम, भाषण-व्याख्यान अशा कितीतरी कला आहेत. त्यापैकी एक ना एक कुणाला तरी अवगत असतेच. जगात दु:ख आहे, पण ती सुसह्य होण्यासाठी कला देखील आहे. त्याशिवाय जगणारा माणूस विरळाच असेल, नाही का? आमच्या घरात असे कलाकार निपजले होते. बाबाला तमाशाचा नाद होता. त्याने लोककलेचा वसा घेतला होता. तो  गळ्यात ढोलक अडकवून दोन्ही हाताच्या बोटाने उत्कृष्टपणे ढोलक वाजवायचा. हाताच्या करंगळीला व अंगठ्याच्या जवळच्या तर्जनीला बारीक काडी बांधून एखाद्या सिनेमाच्या तमाशात जशी ढोलकी टन्… टन्… आवाज करते ना, तसाच आवाज बाबाच्या ढोलकीतून निनादत होता. मग त्याच्या ढोलकीचा सुरेल व मोहक आवाज माझ्या कानात बर्‍याच वेळपर्यंत घुमत राहायचा. घरातला बाबा आणि तमाशात गळ्यात ढोलकं अडकवलेला बाबा, असे दोन वेगवेगळे रूपं पाहून मी अचंबित होत होतो. खरं म्हणजे बाबाने तमाशात काम करु नये, ढोलक वाजवू नये, असेच  माझ्या आई व घरच्यांना वाटत असे. मामा व मोठीआई त्यामुळेच बाबाचा तिरस्कार करीत होते. माझ्या मनात मात्र तमाशातील ती रंजक कला ठसून गेली होती. ढोलक वाजविणे ही सुध्दा कलाच आहे. मग तो तमाशातला असो की सिनेमातला ! कलेच्या दृष्टीकोनातून त्याकडे समाजाने पाहायला पाहिजे होतं. पण आंबेडकरी चळवळीतील बदललेल्या वैचारिक वातावरणात समाजाचा दृष्टीकोन बदलला होता. ‘नेहमीच राया तुमची घाई, नका लावू गठुडं बांधायला, येऊ कशी कशी मी नांदायला हो’ हे गाणे लागले की त्यातील ढोलकीचा आवाज ऐकून मला बाबाची आठवण येत होती. देवदासदादा सुमधुर बासरी वाजवून आजूबाजूचा परिसर बेधुंद करून टाकायचा. दुरून बासरीचा आवाज आला की, ‘होय न होय ही देवदासचीच बासरी होय’ अशी प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत. त्याला पेटी-फिड्डल वाजवण्याचा पण शौक होता. मला व माझा लहान भाऊ अजय आम्ही दोघेही शिक्षणात रमलो होतो. त्यामुळे आम्ही संगीतकलेपासून कोसो दूर राहिलो. मला बासरी शिकायची फार इच्छा होती; पण साधलं नाही ! असं जरी असलं तरी आम्हाला विद्येची कला तेवढी अवगत होती, हे कुणालाही नाकारता येणार नाही.

यवतमाळला असतांना एकदा दलित कवी संमेलन झालं होतं. ते पाहून मलाही कविता रचण्याची उर्मी आली होती. त्यादरम्यान मी दोन कविता मोठ्या मुश्किलीने रचल्या होत्या. पण या कविता जुळवताना कुठलाही शास्त्रीय आधार घेतला नव्हता. जसं जमलं तशा लिहिल्या. ज्याला मुक्त कविता म्हणतात, तशातलाच हा प्रकार होता.  त्या दोन कविता अशा होत्या.

पहिली कविता 

परिवर्तन तुझ्या पुढ्यात आहे…

चातुर्वर्ण्याच्या आगीत तु जळत होतास,

जातियतेच्या दलदलीत तु फसला होतास,

दैव-अंधश्रद्धेच्या चिखलात तु रुतला होतास,

पण फुले-शाहू-आंबेडकरांनी पेटवली मशाल !

त्या दिव्य प्रकाशाने न्हाऊन निघालास,

शिकला-सवरला नोकरी धंद्याला लागलास,

चळवळीचा तु पुर्ण फायदा घेतलास,

फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचा वारस तु !

त्यांच्या संपत्तीचा वाटा घेतलास,

त्यांच्या त्यागाने  उत्तरोत्तर सुधारलास,

परंतु चळवळीला मात्र विसरलास,

तरीही काही जणांनी हा संगर पेटतच ठेवला.

घे त्यात उडी सर्वस्वी झोकुनी,

बहुजन समाजाला संघटीत करूनी,

वेळ-पैसा-बुद्धिची आहुती देऊनी,

मित्रा सामाजिक परिवर्तन-आर्थिक मुक्ती दुर नाही, 

त्याची गरज तुलाच आहे,

इच्छेची त्याला जोडही आहे, 

शक्तीची मात्र उणीव आहे.

भरूनी काढ ही उणीव, 

परिवर्तन तुझ्या पुढ्यात आहे, 

परिवर्तन तुझ्या पुढ्यात आहे…

त्यावेळी यवतमाळला असतांना चळवळीची नशा जबरदस्त अंगात भिनली होती. म्हणून अशा प्रकारची ही कविता प्रसवली होती.

दुसरी कविता जरा प्रेमी जीवांच्या भावनेला हाक देणारी होती. ती अशी–

बंदिस्त तलाव 

पावसाच्या सरीने,

दाहकता शांत होते.

उध्वस्त नदीच्या पात्राला,

संथ गती मिळते.

उष्ण वा-याला स्पर्शता,

थंड लहरी प्रसवते.

बंदिस्त तलावाचे,

दुरूनी दर्शन होते.

व्याकुळलेल्या जिवाला,

जीवन असह्य होते.

परी शितल झुळकीने,

मन सुखावूनी जाते.


कवितेचा विषय निघाल्याने मी जरा एकलहरेच्या बाहेर पडलो होतो. आता परत मी एकलहऱ्यात येतो. मी या वसाहतीला लागून असलेल्या झोपडपट्टीत पाहिलं की, तेथे एक टीनाची १० बाय १० ची खोली होती. त्यात बाबासाहेब व भगवान बुद्धांच्या सिमेंटच्या मुर्त्या ठेवलेल्या होत्या. आणखी त्यात काही दाटीवाटीने पोस्टर्स व इतर काहीबाही सामान ठेवलेले होते. खोलीच्या बाजूला नाली होती. शेजारी एक किराणा दुकान होतं. तो बौध्द समाजाचा होता. दुकानदाराला विचारले असताना त्यांनी सांगितले की, ‘हे बुद्धविहार आहे. जयंतीच्या दिवशी मिरवणुका काढतात; तेव्हा ही खोली उघडतात. एरवी ती बंद असते.’ मी त्यांना सुचविले की, ‘या विहाराची व बाजूच्या जागेची साफसफाई करून तेथे बौध्द भिक्खूंच्या प्रवचनाचा कार्यक्रम घेऊ या.’ तो म्हणाला की, ‘काही नाही साहेब, येथील लोक पॉवर हॅाऊसला दिवसभर काम करतात व तेथून आल्यावर दारू पितात. त्यामुळे हे लोक काही ऐकणार नाही तुमचं.’ मी त्यांना म्हणालो, ‘बुद्धांचा धम्म त्यांनाच सांगणे आवश्यक आहे. कारण आपण पुस्तके वाचून ज्ञान मिळवू शकतो. ते पुस्तके वाचीत नाहीत, त्यामुळे धम्माचे ज्ञान त्यांना मिळत नाही. म्हणून प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला तर हे लोक ऐकतील.’ तो तयार झाल्यावर आम्ही वर्गणी करून तेथील जागेची साफसफाई केली व कार्यक्रमाचे आयोजन केले. लाउडस्पीकर लावला. नाशिकवरून शिक्षण घेत असलेले दोन तरुण भिक्खू भन्ते धम्मदीप व सुगत माझ्याकडे येत असल्याने ओळख झाली होती. आम्ही त्यांना दान देऊन त्यांचा मानसन्मान करीत होतो. त्यांनी बौध्द धम्माचे प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बुद्धविहार बांधण्याची योजना आखली होती. या कामाकरीता नाशिकचे तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर गजभिये साहेब मदत करीत होते. त्यांनी नोकरीदार अधिकारी वर्गाची मिटिंग बोलाविली  होती. या मिटींगमध्ये वटफळी जि. यवतमाळ येथील भन्ते सुमेधबोधी यांचे दान पारमितावर प्रवचन झाले होते. गजभिये साहेबांनी मिटिंग आयोजित करण्याचा उद्देश सांगून त्यांनी स्वतःच्या दानाची रक्कम जाहीर केली. त्यानंतर उपस्थित लोकांनी स्वतःच्या दानाची रक्कम जाहीर केली. मी सुध्दा या मीटिंगमध्ये भाग घेऊन माझे विचार मांडले. माझ्या भाषणात प्रामुख्याने,

‘बडा हुवा तो क्या हुवा जैसे पेड खजूर,

पंछी को छाया नाही फल लागे अतिदूर !’ 

हे संत कबीर यांचा दोह्याचा संदर्भ घेऊन आपण सामाजिक उतराई होण्यासाठी सढळ हाताने आर्थिक योगदान दिले पाहिजे असे सांगितले. 

मी त्यावेळी पाच हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. एवढेच नव्हेतर भन्ते धम्मदीप व सुगत यांना एकलहरे  वसाहतीत बोलावून काही लोकांकडे जावून दान मिळवून देण्यास मदत केली होती. म्हणून मी या भिख्खूंनाच या कार्यक्रमाला बोलाविले. त्यांना सांगितले की, ‘येथील लोक दिवसभर काबाडकष्ट करून रात्रीला दारुच्या आहारी जातात. धम्माचे कोणतेही ज्ञान त्यांना नाही. हिंदूचे देवं पूजतात. उपास-तापास करतात. गणपती, दुर्गादेवी बसवितात. त्यांना शिरवतांना मिरवणुकीत सामील होतात. तेव्हा तुम्ही प्रवचनात या गोष्टीवर भर देऊन त्यांच्या डोक्यात प्रकाश टाका.’ पहिल्यांदाच भिख्खूंचे प्रवचन होत असल्याने या कार्यक्रमाला झोपडपट्टीतील जवळपास झाडून  सर्वच बायामाणसं प्रामुख्याने हजर झाले होते. कार्यक्रम झाल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या की, ‘असं आम्हाला यापूर्वी कुणीच सांगितलं नाही.’ व्यवसायाने कंत्राटदार असणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, ‘मी पुण्यकर्म करावे म्हणून हिंदूचे देवळे फुकटात बांधून देत असतो. यापुढे मी देवळं न बांधता बुद्धविहार बांधण्यासाठी मदत करीन.’ 

मी एकलहरे येथे येण्यापूर्वीपासूनच बामसेफमध्ये काम करीत असलेले पंजाबराव खंडारे यांना सोबत घेऊन दर रविवारी एका डॉक्टरच्या खोलीमध्ये कॅडर कँप घेत होतो. या प्रशिक्षण वर्गाला झोपडपट्टीतील सर्व जातीतील तरुण मुलं मोठ्या प्रमाणात येत असत. एक-दिड तासाचा हा वर्ग राहत होता.  फुले, शाहू, आंबेडकर आणि त्या अनुषंगाने मा. कांशीरामजी यांची बहुजन समाजाची चळवळ याचे एकेक भाग करून त्यांना समजाऊन सांगत होतो. रविवारी त्या डॉक्टरचा दवाखाना बंद असल्याने आम्हाला त्यांनी त्यांची खोली उपलब्ध करून दिली होती. याचा परिणाम असा झाला की तेथे आठवले गटाच्या पक्षाचे काम करणारे हे लोक बीएसपीचं काम करायला लागले होते. 

ती जी झोपडपट्टी होती, तेथे विजेची सोय नव्हती. कारण ती जागा अतिक्रमित होती. आमच्या वसाहतीत कार्यकारी अभियंता असलेले व्ही.एस.पाटील साहेब हे किशोर गजभिये साहेब यांचे वर्गमित्र होते. किशोर गजभिये साहेबांबाबत आम्ही ऐकून होतो की,  ते सामाजीक दायित्व जोपासणारे सनदी अधिकारी आहेत. त्यापुर्वीही त्यांनी नाशिक येथे समाजातील कर्मचारी व अधिकारी वर्गांची मिटींग घेऊन बौद्ध भिक्खू प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न केल्याचे  मी आधीच  लिहिले आहे. एकदा व्ही.एस.पाटील साहेबांनी गजभिये साहेबांना जेवण करायला आमंत्रित केले होते. त्यांचे जेवण आटोपल्यावर त्यांना आम्ही झोपडपट्टीतील समस्या सांगितली. त्यांनी आम्हाला  सांगतले की, ‘मी हे काम असंही करू शकतो. पण त्याला किंमत राहत नाही.  म्हणून त्यांनी मंत्र दिला की, तुम्ही पक्षातर्फे निवेदन द्या. आंदोलन करा. या पद्धतीने शिवसेना आणि इतर पक्ष आंदोलने करीत असल्याने त्यांचा प्रशासनावर दबाव निर्माण होतो. त्यामुळे त्यांची कामे प्रशासनाला करणे भाग पडते. यामुळे लोकही त्यांच्यासोबत राहतात व निवडणुका आल्यावर त्यांनाच मते देतात. सर्वसाधारण लोकांना त्यांची कामे झालेले पसंत पडतात, तुमचं तत्त्वज्ञान नाही. तत्त्वज्ञानामुळे त्यांचे पोट भरत नाहीत की त्यांचे कामे होत नाहीत. त्यापेक्षा त्यांना रोजच्या जीवनात भेडसाविणारे कामे झाली पाहिजेत. हे त्यांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे असते. म्हणून त्यांच्याच मागे ते जात असतात.’ हीच कार्यप्रणाली बहुजन समाज पक्षाने सुध्दा अवलंबीने आवश्यक आहे असे त्यांचे मत पडले होते. त्यांच्या सांगण्यावरून गौतमभाई गांगुर्डे, जिल्हा अध्यक्ष युवक आघाडी यांच्या नेतृत्वात नोटीस देऊन २.८.२००२ रोजी एक दिवसीय धरणा आंदोलन  केल्यावर  विद्युत मंडळाकडून कार्यवाहीला सुरुवात झाली होती.

या ठिकाणी आल्यावर  मला जाणवलं की,  या विद्युत केंद्रामध्ये मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना  मजबूत आणि मोठी  होती. मला सल्लागार या पदावर कार्यकारिणीत घेतले होते. येथे असतांना औरंगाबाद येथे ९ व १० फेब्रुवारी २००१ रोजी ११ वे द्वैवार्षिक अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाला मी पण गेलो होतो. या अधिवेशनाला उपराकार लक्ष्मण माने आले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले होते की ब्राह्मणांना जन्मजात (By birth) अधिकार मिळाले होते. आम्हाला संविधानाने अधिकार दिलेत. संघटनेचे अध्यक्ष जे.एस. पाटील म्हणाले होते की,  देशात बहुजन समाजाचे ६९/७० लाख कर्मचारी आहेत. ते जर जागृत असते तर खाजगीकरणाची

कु-हाड कोसळली नसती.

माननीय कांशीरामजी यांनी २६ जुलै ते १ ऑगस्ट  २००२ पर्यंत सात  दिवस कोल्हापूर येथे कार्यक्रम आयोजित केला होता. २६ जुलै १९०२ रोजी  राजर्षी शाहू महाराज यांनी ब्राम्हणेतरांना ५० टक्के आरक्षण देण्याचा आदेश काढला होता. त्या गोष्टीला १०० वर्षे होत असल्याने त्यानिमीत्त हा कार्यक्रम कोल्हापूरला व त्यानंतर संपुर्ण देशात घेण्याचे जाहीर केले होते.  त्यावेळी आम्ही वसाहतीतील व बाजूच्या झोपडपट्टीतील काही कार्यकर्त्यांना या सभेला घेऊन गेलो होतो. 

यावेळी मा.कांशीरामजी यांनी  उत्तरप्रदेशात बिएसपीने काँग्रेसशी युती का केली? याची कारणमिमांसा करतांना सांगितले की, बिएसपीच्या वाढत्या प्रभावाने काँग्रेसचे मतदान घटून ८ टक्क्यांपर्यंत आले होते. त्यामुळे प्रधानमंत्री पी.व्ही.नरसिंहराव यांनी बिएसपीशी युती करायची इच्छा व्यक्त केली होती.  परंतु मा.कांशीरामजी यांची इच्छा नव्हती.  पण महाराष्ट्रात काँग्रेसने १९७१ साली रिपब्लिकन पार्टीसोबत युती करून ५२१ जागांपैकी  बाबासाहेबांना केवळ एक जागा देऊन बाबासाहेबांची मानहानी केली होती. त्याचा वचपा घेण्यासाठी हिच योग्य वेळ आली आहे असे समजून युती केली.  पण ही युती  बाबासाहेब  व बापूची असेल असे त्यांना सांगितले. काँग्रेसच्या मतदानाच्या टक्केवारीनुसार काँग्रेसच्या वाट्याला ४२५ जागांपैकी केवळ ३६ जागा येतात. पण नाही, हो म्हणत नरसिंहराववर दया करून आम्ही त्यांना १२५ पर्यंत जागा वाढवून दिल्यात आणि ३०० जागा आम्ही घेतल्यात. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला कळावे म्हणून त्यांनी मुद्दामहून सांगितली. 

दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की, १९६६ नंतर महाराष्ट्रात अशी एक लहर तयार करण्यात आली की, ‘होऊ शकत नाही. फुले-शाहू-आंबेडकर चळवळ चांगली आहे; पण त्यांचे नाव घेऊन आम्ही आमदार, खासदार, मंत्री बनू शकत नाही’. म्हणून बाबासाहेबांची चळवळ सोडून आर.डी.भंडारे, दादासाहेब रूपवते, एन.एम.कांबळे काँग्रेसमध्ये गेले. कोणी खासदार, आमदार, मंत्री, राज्यपाल बनलेत. परंतु कांशीरामजी महाराष्ट्रातील तीन बाबा, त्यापैकी  दोन फेटेवाले व एक टायवाले यांना  घेऊन उत्तरप्रदेशमध्ये गेलेत. तेथे यांच्या नावाने आमदार, खासदार, मंत्री बनलेत. तिनदा यु.पी.ची सत्ता ताब्यात घेतली. म्हणून या चळवळीद्वारे ‘होऊ शकते’ हे सिद्ध केले. म्हणून ‘होऊ शकतेची लहर महाराष्ट्रात निर्माण करा’ असे मा. कांशीरामजी म्हणालेत. 

तिसरा मुद्दा आणखी त्यांनी सांगीतला की, ते पुण्याला नोकरी करीत असतांना मोरे नावाचे अधिकारी नेत्यांवर आरोप करायचे की, हे नेते चळवळीचे काम व्यवस्थित करीत नाहीत.  मी असे आरोप करणा-यांना  म्हणायचो की, नेते वाईट आहेत तर तुम्ही का करीत नाहीत? तेव्हा ते म्हणायचे की आम्ही कसे करणार?  आम्ही नोकरी करतो. म्हणजेच बाबासाहेबांनी ज्या लोकांना शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यात ते म्हणतात की, बाबासाहेबांचे काम कसे करणार?  दिल्लीला प्लॅनिंग कमिशनमध्ये  दोन डायरेक्टर शेड्युल्ड कास्ट समाजाचे आहेत. मी त्यांना विचारले की, तुम्ही देशाचे प्लॅनिंग करता. मग बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी तुम्ही काय प्लॅनिंग केले? तेव्हा ते म्हणालेत की, जसे आदेश येतात तसे आम्ही प्लॅनिंग करतो. म्हणून मा.कांशीरामजी यांनी नोकरी सोडून बामसेफच्या माध्यमातून अराजकीय मुळे पक्के करण्याचे काम केले.  

त्यावेळी बामसेफ या संघटनेच्या माध्यमातून बीएसपी सोबत जुळलेल्या नोकर वर्गाना काम करता येणे कठीण झाले होते. कारण मा. कांशीराम यांच्या नेतृत्वातील बामसेफमधून काही कार्यकर्ते बाहेर पडून  त्यांनी पंजीकृत बामसेफची स्थापना केली होती. त्यामुळे बामसेफच्या नावाने आम्हाला चळवळीचे काम करता येऊ शकत नव्हते. ही अडचण लक्षात आल्याने ‘पे बॅक टू द सोसायटी प्रोग्रॅम’ ही संघटना स्थापन करण्यात आली होती. या संघटनेचे एकलहरे  येथील सारेच कामकाज मीच पाहत होतो. त्या अंतर्गत  मी एकलहरे  येथील २७ व रेल्वे ट्रॅक्शन कॅालनी, नाशिक रोड येथील ८ असे जवळपास ३५ कामगार-अधिका-यांकडून  प्रत्येकी दरमहा १५० रुपये जमा करीत होतो. रेल्वे ट्रॅक्शन येथील पैसे बालकिशन सिंग (मूळ उत्तरप्रदेशातील पण येथे नोकरी करीत होते) जमा करीत होते. 

यात काही  लोक १५० तर काहीजण १०० किंवा काहीजण  ५०  रुपये देत होते. यातील प्रत्येकी  १०० रुपये  मा. कांशीरामजी यांना दरमहा एक लाख रुपये  थैली देण्यासाठी तर उरलेले १०० रुपयाच्या आतील पैसे स्थानिक कामासाठी वापरीत होतो. हे पैसे  पी.डी.पगारे, नाशिक यांच्याकडे सुपूर्द करीत  होतो.  ते झोनल कन्व्हेनर म्हणून नाशिक जिल्ह्याचे काम पाहत होते. या संघटनेत नागपूरचे बी.बी.मेश्राम, जळगावचे  पी.आर.आंबेडकर, चंद्रपूरचे नरेंद्र गेडाम, नागपूरचे विजय मानकर आणि  नाशिकचे बी.पी.निकम, एस.एस.गांगुर्डे, ए.एस.सहारे, एन.एम.तेजाळे, जी.एस.खिल्लारे  इत्यादी व्यक्ती निरनिराळ्या पदावर काम करीत होते. 

दि.१५.४.२००० रोजी ठाणे येथे पे बॅक टू द सोसायटी प्रोग्रॅम अंतर्गत आयोजीत  राज्य स्तरीय मिटींगमध्ये  ‘फंडीग ऑफ मिशनरी मुव्हमेंट अँड डायनॅमीक ऑफ आंबेडकराइट मुव्हमेंट’ या विषयावर चर्चासत्र आयोजीत केले होते.  एकलहरेच्या कार्यकर्त्यांसोबत मी पण या मिटींगला गेलो होतो.

या मिटींगमध्ये मा.कांशीरामजी यांनी बामसेफ, डीएसफोर व बहुजन समाज पार्टीचा इतिहास मांडून ही चळवळ कशी वाढत गेली याचा आढावा घेऊन  कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन  करतांना म्हणाले  होते की, “समझानेवालेको समझना होगा और समझकर समझाना होगा !” किती अर्थपूर्ण बोलले होते ते ! कारण शिकलेले लोक चळवळ समजून घेऊन इतरांनाही समजावून सांगू शकतात. तसेच ते आणखी म्हणाले होते की, मनुवादी पक्ष ज्यांना आमचे पुढारी म्हणून समोर आणतात ते प्रत्यक्षात चमचे असतात. म्हणून चमच्यात गुंतून न राहता त्यांना जे हात वापरतात, त्या  हाताला जोरदार धक्का मारा म्हणजे तो चमचा गळून पडेल. या पध्दतीने आम्हाला काम करावे लागेल.

त्यांनी या मिटींगमध्ये आंदोलनाचे टप्पे विस्ताराने मांडले.  केवळ मतांचा हक्क एवढेच पुरेसे नसून मतांची शक्ती निर्माण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आंदोलनाचा पहिला टप्पा १३ मार्च ते १४ एप्रिल २००० दक्षिण भारतासाठी, दुसरा टप्पा १५ एप्रिल ते १४ ऑगस्ट २००० देशातील मोठमोठ्या शहरात (मुंबईसह) सेमिनार, चर्चासत्र.  २० एप्रिलला लखनौला धरणे, प्रत्येक गावात, वार्डात जणजागरण व तिसरा टप्पा १५ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर २००० उत्तर भारतासाठी आणि उद्दिष्ट (target) दिल्ली राहील. या पध्दतीने त्यांनी सामाजिक आणि आर्थिक असमानतेचा अंत करण्याच्या दिशेने  आंदोलन आखल्याचे सांगितले होते. दिमाख, हुन्नर व पैसा वापरून हे ध्येय गाठण्यासाठी मजबूत  तयारी करावी असे त्यांनी आवाहन केले होते. या भाषणाचा पिबीएसपीच्या (पे बॅक टू द सोसायटी प्रोग्रॅम) म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर खोलवर परिणाम झाल्याचे जाणवत होते. या कार्यक्रमात डब्ल्यू.डी.थोरात, पी.आर.आंबेडकर, विजय मानकर, नरेंद्र गेडाम, बळवंत मेश्राम  इत्यादी पिबीएसपीचे अग्रगण्य नेत्यांनी  विचार मांडले होते.  

दि. १९.०२.२००२ रोजी पलुस्कर सांस्कृतिक भवन नाशिक येथे पिबीएसपीच्या माध्यमातून चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.  विषय होता. “मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया.” विषय अत्यंत महत्त्वाचा होता. कारण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वानानंतर चळवळ कुठपर्यंत येऊन पोहचली याचा शोध घेणे गरजेचे होते. ती पुढे वाढली, की तिथेच आहे,  की मागे गेली याचे विचारमंथन अशा चर्चासत्रातून करता येते. मी पण या चर्चेत भाग घेऊन माझे मत मांडले होते. 

प्रस्तावनेत पी.डी.पगारे यांनी उल्लेख केला होताच  की,  “१८ मार्च १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रा येथील रामलिला ग्राउंडवर एका विराट सभेत मोठ्या दु:खाने भावविवष होऊन हे उदगार काढले होते. ते म्हणाले होते की, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. मला वाटत होते की, हे लोक शिकून आपल्या समाजाची सेवा करतील. पण या लोकांनी समाजाची सेवा न करता आपलेच पोट भरण्याच्या मागे लागले आहेत.” 

याचा संदर्भ देऊन  मी म्हणालो  की, आजही आजचा शिकलेला वर्ग काही अपवाद सोडला तर नोकरी-धंद्यात व आपल्या परिवाराच्या ऐशो-आरामात गुंतलेला दिसत आहे. समाजाशी त्यांनी नातं तोडून टाकलेलं आहे. खरं म्हणजे हा वर्ग बाबासाहेबांच्या चळवळीचा लाभार्थी आहे. त्यामुळे त्यांनी चळवळीला  बुद्धी, पैसा, वेळ व श्रम देऊन आपल्याला जो फायदा मिळाला, त्याची परतफेड करणे हे त्याचे कर्तव्य ठरते. पण तसं झालं नाही. म्हणून चळवळ रेंगाळत चालली आहे. मनुवाद्यांच्या चळवळीच्या तुलनेत आपली चळवळ  फारच मागे पडली आहे. 

बाबासाहेब हे  शेवटच्या काळात एकटेच रडताना दिसत. प्रयत्न करूनही त्यांना झोप येत नव्हती. ते खूप काळजीत आणि त्रासलेले दिसत होते. बाबासाहेबांची अशी अवस्था पाहून  त्यांचे स्टेनोरायटर नानकचंद रत्तू यांनी विचारल्यावर बाबासाहेबांनी सांगितले की, ” नानकचंद, तुम्ही पाहत आहात की, या दिल्लीत दहा हजार कर्मचारी व अधिकारी केवळ अनुसूचित जातीचे आहेत. जे आधी शुन्य होते. मी माझे संपुर्ण  जीवन आपल्या लोकांना शिक्षण घेण्यासाठी व्यतित केलं आहे. कारण मला वाटत होतं की, मी जर  एकटा इतकं काम करू शकतो तर आपले हजारो लोक शिकले तर आपल्या समाजात  किती मोठे परिवर्तन होईल?”  

ज्या महापुरूषाने आपले संपुर्ण जीवन, स्वतःचे कुटुंब, मुलं सुळीवर चढवून आपल्या समाजाच्या  उद्धारासाठी क्षण न क्षण वेचला, पिढ्यानुपिढ्या  दबलेल्या समाजाला वर आणण्याच्या कार्यात झोकून दिलं, ज्यांनी आपल्या समाजाचा उद्धार करणे हेच आपले जिवीत कार्य असल्याचे मानलं, त्या महापुरूषाने समाजातील शिकला-सवरलेला वर्गच समाजाला गुलामगिरीतून मुक्ती देऊ शकतो अशी अपेक्षा बाळगणे साहजिकच होतं.   पण ते जिवंत असतांना आणि त्यांच्या पश्चात सुद्धा या शिकलेल्या लोकांनी धोका द्यावा ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी  बाब आहे. शिकलेला वर्ग हा कामगार आणि व्यावसायिक वर्गात परिवर्तीत झाला आहे. हा वर्ग  बुद्धिजिवी वर्गामध्ये मोडतो. बुद्धिजिवी वर्गाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘जातीचे निर्मुलन’ (Annihilation of Caste) या पुस्तकात लिहितात की, “प्रत्येक देशामध्ये बुद्धिजिवी वर्ग प्रभावशाली असतो. जो सल्ला व नेतृत्व देऊ शकतो. देशातील अधिकांश जनता विचारशील व क्रियाशील नसतात. ते बुद्धीजीवी वर्गाचे अनुकरण करून त्या मार्गाने जात असतात. म्हणून त्या देशाचे समाजाचे भविष्य बुद्धिजिवी वर्गावर अवलंबून असते. बुद्धिजिवी वर्ग चांगला किंवा वाईट असू शकतात. बुद्धिजिवी वर्ग इमानदार, स्वतंत्र व निष्पक्ष असेल तर समाजाला संकटकाळी मार्ग काढून योग्य मार्गदर्शन करू शकेल. समाजाला सहाय्य करू शकेल. पथभ्रष्ट लोकांना ते चांगल्या मार्गावर आणू शकतात.”

परंतु या वर्गांनी आपली योग्यता सिध्द केली नसल्याचे संतापजनक  उदगार काढल्याचा उल्लेख नानकचंद रत्तू यांनी “बाबासाहेबांच्या आठवणी” या पुस्तकात केला आहे. 

ते लिहितात की, “मला माझ्या लोकांना शासनकर्ती जमात म्हणून बघायचे आहे. जे समाजातील इतर घटकांसोबत मिळून समानतेने राज्य करतील. मी जे काही अथक प्रयत्न करून मिळविले आहे, त्याचा लाभ आपल्या काही शिकलेल्या लोकांनी उठविला आहे. पण त्यांनी आपल्या बांधवांसाठी सहानुभूती ठेऊन काहीही केलेले नाही. त्याव्दारे त्यांनी आपली नालायकी सिध्द केली. माझे जे काही स्वप्न होते ते त्यांनी धुळीस मिळविले आहे. ते स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी जगत आहेत. त्यांच्यामधून कुणीही समाजासाठी  कार्य करायला तयार नाहीत. ते स्वतःच्या नाशाच्या मार्गाने चालले आहेत. मी आता माझे लक्ष खेड्यापाड्यांमध्ये राहणार्‍या अशिक्षित बहुजन समाजाकडे देणार आहे. जे आजपर्यंत पिडीत आहेत आणि आर्थिकदृष्ट्या न बदलता तसाच आहे.”

शासनकर्ती जमात बनणे व  प्रबुद्ध भारत बनविणे या बाबासाहेबांच्या दोन संकल्पना  साकार करण्यासाठी बुद्धीजीवी,  नोकरदार व व्यवसायिक लोकांनी  बुद्धी, पैसा आणि वेळ आणि श्रम  देणे आवश्यक आहे, तरच बाबासाहेबांचे ‘मुझे पढेलिखे लोगों ने धोका दिया’ हे त्यावेळी काढलेले उद्गार आज खोडून काढता येईल असा आशावाद व्यक्त करायला हरकत नाही असे काही महत्वपूर्ण  विचार मी मांडले.  शेवटी  मार्टिन लूथर कींग यांच्या वाक्याचा संदर्भ दिला. तो असा- 

” जर तुम्ही उडू शकत नसाल तर पळा… जर पळू शकत नसाल तर चला… जर चालू शकत नसाल तर रांगत चला… पण समोर जात रहा…”

८.१०.२००० रोजी मा.कांशीरामजी यांची मालेगाव येथे सभा झाली होती. या सभेला एकलहरे  येथून आम्ही १० लोक गाडी घेऊन गेलो होतो. २७.०३.२००१ रोजी वसाहत व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी, युवक व सुशिक्षित बेरोजगारांची मिटिंग आयोजित करून त्यांच्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली होती. २७.०१.२००१ रोजी वर्ग १ व वर्ग २ मध्ये येणारे अधिकारी व इंजिनीअर्सची मिटिंग घेऊन या मिटींगला पे बॅक टू सोसायटीचे वरिष्ठ कार्यकर्ते व आताचे एम्बसचे नेते विजय मानकर यांनी मार्गदर्शन करून त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली होती. मिटींग संपल्यावर लगेच  सर्व अधिकारी व इंजिनीअर्स यांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती. 

दि. १८.१.२००१ रोजी मुंबई येथे संघटनेचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.   या अधिवेशनात  डिसेंबर २००० अखेर पर्यंत जमा झालेल्या फंडापैकी १ लाख रूपयाची थैली मा. कांशीरामजी यांना अर्पण करण्यात आली  होती. मी या कार्यक्रमाला एकलहरे  येथील कार्यकर्त्यांसोबत गेलो होतो.  त्यापूर्वी असाच मा.कांशीरामजी यांना १ लाख रुपयाची थैली अर्पण करण्याचा कार्यक्रम नागपूरला पण झाला होता. त्यांना दरमहा १ लाख रुपये या संघटनेच्या माध्यमातून देण्यात येत होते.

दि. २७.०७.२००१ रोजी पुणे येथील नेहरू मेमोरियल भवनमध्ये मा. कांशीरामजी यांना एक लाखाची थैली अर्पण केली होती. त्या कार्यक्रमाला एकलहरे येथून गाडी करून लोकांना घेऊन गेलो होतो. 

यावेळी मा. कांशीरामजी मार्गदर्शन करतांना म्हणाले होते की, “कुछ पैसा इकठ्ठा करके समाजको देना या  कुछ समाजकी सेवा करना ये तो काम अच्छा है! लेकीन कोई बडा काम नही है! सही काम मै जो समझता हु वो ये है कि हजारो सालोसे गीराये हुये समाजको उसके पैरो पर खडा करना और उसको अपनी मुव्हमेंट का अहसास कराना, उसके बारे मे जाणकार बनाना और समाजको अपने पैरोपर खडा करके उसे मुव्हमेंट को चलाने लायक, कामयाब बनाने लायक बनाना,  मै समझता हु कि ये काम पढे-लिखे कर्मचारीयोंको करना चाहिये था ! याच कार्यक्रमात बामसेफ संघटना कशी फुटली याबाबत माहिती देतांना ते म्हणालेत की,  बामसेफमध्ये फुट पाडण्यासाठी राजीव गांधी यांनी ५ कोटी रुपये बाजूला ठेवले होते. पण फक्त २६ लाखातच त्यांचे काम आटोपले. मी यवतमाळला होतो; तेव्हा तेथील जुने कार्यकर्ते पण सांगत होते की, हे फुटीर लोक कांशीराम साहेबांची साथ सोडण्यासाठी पैसे घेऊन येत होते. 

पे बॅक टू सोसायटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून बुद्ध जयंती ते कबीर जयंती पर्यंतच्या दि.७.५.२००१ ते २०.५.२००१ कालावधीत नाशिक जिल्हाभर  धम्मप्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वेळी मी पण या विषयावर प्रवचन दिले होते. 

मी एकलहरे येथे   ‘पे बॅक टू द सोसायटी प्रोग्रॅम’च्या माध्यमातून कॅडर कँप घेण्याचा सपाटा सुरू केला होता. कारण कॅडर कँपच्या माध्यमातून फुले-शाहू-आंबेडकर चळवळ लोकांना समजावून सांगता येत होतं. असा प्रशिक्षित झालेला व्यक्ती  मग ही चळवळ आपल्या कुटुंबाना, नातेवाईक, मित्रमंडळी व समाजाला समजावून सांगण्यासाठी सक्षम होत होता. दि. २७.८.२००० रोजी येथे ‘बहुजन जागृती मंच’ या नावाने   प्रशिक्षण वर्ग (कॅडर कँप)  आयोजित केला होता. या प्रशिक्षण वर्गाला मुंबईचे राहाटे साहेबांनी मार्गदर्शन केले होते. ह्यावेळी ४५ कामगार/अधिकारी व विद्यार्थी वर्ग  या प्रशिक्षण वर्गाला हजर होते.  त्यानंतर परत आणखी दि. ३.९.२००० रोजी  कॅडर कँप आयोजित केला  होता. दि. १४.०१.२००१ रोजी  कॅडर कँप घेतला होता. या कॅम्पला १७ कर्मचारी व ३ विद्यार्थी असे एकूण  २० जण हजर होते. दि.१४.१०.२००१ रोजी कॅडर कँपला शिकविण्यासाठी चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राचे इंजिनिअर,  कोष्टी समाजाचे व बामसेफचे कार्यकर्ते जी.व्ही.खंबाळकर यांना बोलाविले होते. ते मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेत पण  काम करीत होते. त्यानंतर दि. ३.३.२००२ रोजी मी एकलहरे  येथे  प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. या वर्गाला धुळ्याचे डॉ. महिरे यांनी मार्गदर्शन केले होते. विशेष म्हणजे या कँपला प्रतिष्ठित व्यक्ती असलेले नाशिकचे बाळासाहेब कर्डक व  कविता कर्डक हे दाम्पत्य आले होते. चळवळीबद्दल दिलेल्या माहितीमुळे दोघेही प्रभावीत होऊन दोघांनीही बीएसपीमध्ये सामील होवून काम करायला लागले होते. या दोघांनाही मा.कांशीरामजी यांच्या चळवळीत आणायला मी कारणीभूत ठरलो होतो, याचा मला आभिमान वाटतो. अर्थात त्यांनी त्याआधी या चळवळीचा अभ्यास केला असेलच. फक्त त्यांनी कॅडर कँप बघितला नव्हता. ते येथे पाहायला मिळाला असे ते सांगत होते. बाळासाहेब कर्डक हे शहर अध्यक्ष झाले होते. या कॅडर कॅम्पला वसाहतीतील २७ कर्मचारी व १५ विद्यार्थी हजर होते. ज्या ज्या वेळी कॅडर कँप घेतले, त्या त्या वेळी प्रशिक्षणार्थीसाठी  पुरीभाजी, चहा, बिस्केटची व्यवस्था करण्यात येत  होती. १७.३.२००२ रोजी ‘पे बॅक टू द सोसायटी प्रोग्रॅम’ द्वारे पी.डी.पगारे झोनल कन्व्हेनर यांनी आयोजित केलेल्या जिल्हा मेळाव्यात एकलहरे  युनिट तर्फे माझा सहभाग होता. यादरम्यान ओझर येथे पगारे साहेबांनी दोन दिवसीय प्रशिक्षण  शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला प्रशिक्षक म्हणून  नागपूरचे  पी.एस.खोब्रागडे लाभले होते. त्यांची ओळख म्हणजे मी यवतमाळला बामसेफ आणि बहुजन एम्पलाइज फेडरेशनमध्ये काम करीत  होतो, तेव्हापासूनची होती. ते बहुजन एम्पलॅाइज फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष होते व मी महाराष्ट्र राज्य  सहसचिव होतो. नाशिक येथे केदारे (नाशिककर) आणि त्यांच्या सहका-यांनी विद्यार्थ्यांसाठी कॅडर कँप आयोजीत केला होता. संध्याकाळच्या सत्रासाठी प्रशिक्षण देण्यासाठी मला बोलाविले होते. त्यावेळी मी माझ्या ऑफिसातील कोष्टी समाजाचे  टी.डी.गौरकार यांना सोबत घेऊन गेलो होतो. यावेळी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रामाचे उदात्तीकरण का करते याचे कारणमिमांसा करतांना  रामायणाचा उल्लेख केला होता. रामायणातील श्लोक क्रमांक ६-१२८-३८ व ७-३३-१२ नुसार राम हे ब्राह्मण पुजक होते. म्हणून त्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी  संपुर्ण देशाला वेठीस धरलं. हे त्याचे कारण आहे. राम मंदिर बांधण्यासाठी घाम गाळून  खपतील ते बहुजन म्हणजे शुद्र समाज …! एकदा का राम मंदिर तयार झाले की त्याचा फायदा घेतील ते ब्राम्हण, भटजी आणि व्यापारी, शेटजी…! तेव्हा बहुजन समाजाने ब्राम्हणवाद्यांची ही चाल समजून घ्यायला पाहिजे असे मत मी मांडले होते.  ८ जून २००२ रोजी नाशिक येथे प्रा. पी.एस.चंगोले, बिएसपी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांचा एक दिवसीय प्रशिक्षण शिबीराच्या कार्यक्रमाच्या आयोजनात माझाही सक्रीय सहभाग होता. मी यवतमाळला  होतो, तेव्हापासून चंगोले सरांशी माझी दाट ओळख झाली  होती. ते नागपूरला जाण्यापूर्वी एकलहरे  येथे घरी येऊन भेटून गेले होते. यावेळी त्यांनी मला ते संपादीत करीत असलेल्या ‘रविदास सत्यशोधक’ या मासिकाची १००० रुपये वर्गणी देऊन आजिवन सभासद बनवून घेतले होते. दि. ८.८.२००२ रोजी प्रा.डॉ.सुरेश माने, महाराष्ट्र राज्य महासचिव तथा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत बहुजन समाज मेळावा नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. यातसुद्धा माझा सहभाग होता. माने सर यांच्याशी मी कोकणात असतांना जवळचा संबंध निर्माण झाला होता. त्यावेळी त्यांच्याकडे कोकण विभाग दिले असल्याने आमच्या पोफळी येथे वास्तव्य करून कोकणचा दौरा करीत होते. या दरम्यान मध्यप्रदेशातून फुलसिंग बैरेया आणि दाऊराम रत्नाकर यांच्या नेतृत्वात मुंबईच्या सभेला जाण्यासाठी नाशिकला रॅली आली होती. त्या रॅलीची सभा व मुक्कामाची व्यवस्था नाशिकला करण्यात आली होती. या रॅलीचे आगमनापासून ते सभेच्या ठिकाणी जात पर्यंतचे नियोजन मी व यशवंत सपकाळे (जिल्हा अध्यक्ष) मिळून केले होते. या सभेला सुरेश माने सरांनी मार्गदर्शन केले होते.

एकलहरे  येथे सुध्दा पोफळी प्रमाणे बहुजन नायक/बहुजन संघटक या पेपरचे वाटप करून वर्गणीदार वाढवीले होते. खरं म्हणजे लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी पेपर वाटप करणे हे चांगले माध्यम होते. ही शिकवण माझा यवतमाळ येथील अमोलकचंद कॅालेज आणि होस्टेलचा मित्र निरंजण पाटील यांच्याकडून घेतली होती. ते पोस्टात नोकरी करीत होते. मी  पुसदला असतांना ते पेपर घेऊन येत असत. 

दि. २३, २४ व २५ फेब्रुवारी २००० या तिन दिवसांच्या कालावधीत  मी माझ्या खर्चाने म्हणजे वर्गणी जमा न करता संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपूरचे अशोक सरस्वती याचे ‘सत्यशोधक कीर्तना’चा कार्यक्रम ठेवला होता. त्यापैकी पहिला  कार्यक्रम एकलहरे, दुसरा नाशिक रोड व तिसरा फुलेनगर पंचवटी येथे घेण्यात आले होते.  त्यांच्याशी माझी यवतमाळपासून चांगली ओळख होती. कारण ते बीएसपी कार्यकारिणीत पदाधिकारी म्हणून काम करीत होते. कीर्तन म्हटले की सर्व जाती धर्माचा आवडता कार्यक्रम असतो. लोकांची चिक्कार गर्दी झाली होती. पण हे कीर्तन म्हणजे फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीवर आधारित होतं, हे कीर्तन ऐकल्यावर लोकांना कळले. पण हे कीर्तन सर्वांनाच आवडलं होतं. 

या किर्तनात ते म्हणाले होते की,

‘आंधळ्या गुरूचा शिष्यही आंधळा, 

आंधळ्याच्या भेटी आंधळाची गेला,

सत्यानाश झाला दोघांचाही, 

जात्यामध्ये दाणे भरडल्या जाती, 

पाहुनिया रडती संतजण… ‘

हा संत कबिरांचा दोहा आपल्या मराठी  भाषेत तबला, पेटी, टाळ, खंजेरी व भजणमंडळीच्या मधूर तालासुरात अशोक सरस्वती गावून सांगत; तेव्हा उपस्थित विराट जनसमुदाय मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. बहुजन समाज आंधळ्या गुरूच्या जाळ्यात फसल्यामूळे तो गेल्या अनेक वर्षांपासून दुःख आणि दारिद्र्यात कसा पिचत पडला आहे, ही बाब त्यांनी संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत कबीर, संत तुकाराम, संत नामदेव इत्यादी परिवर्तनशील संतांचे वचने गावून व अनेक उदाहरणे देऊन अत्यंत सोप्या व मराठमोळ्या भाषेत लक्षात आणून देत होते. फुले-शाहू-पेरियार-आंबेडकर या विचारधारेची उकलन करून हा विचार स्विकारल्याशिवाय बहुजनांचा उद्धार होणे अशक्य आहे, असा मोलाचा संदेश ते आपल्या किर्तनात देत होते.

दि.७.१०.२००० रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमीत्य माझ्या घरीच कार्यक्रम आयोजीत केला होता. या निमित्ताने कॅालनीतील काही ठळक लोकांना   बोलाऊन एक छोटेखानी मिटींग घेतली होती. ह्यावेळी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

ह्यावेळी माझा मुलगा संघशील एमबीबीएस पास झाला होता. हीही  एक आनंदाची बातमी होतीच. त्याला इंटरनरशिप संपल्यावर बाँडनुसार एक वर्ष नोकरी बंधनकारक असल्याने जळगाव जिल्ह्यातील भडगाव पंचायत समितीच्या अंतर्गत गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरी मिळाली होती. पहिल्या पगारातील १००० रूपये कोकणातील त्याच्या शिरगावच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेला दि. २.८.२००२ रोजी  दान रूपाने देऊन अंशतः उपकाराची परतफेड केली होती, ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे.

मी एकलहरे  येथे पुलगाव जि.वर्धा येथील लता डोंगरे हिचा ‘रमाई’ हा एकपात्री नाटकाचा कार्यक्रम दि. २७.११.२००० रोजी  आयोजित केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रकांड पंडित महापुरुषाशी निरक्षर माता रमाई हिने कसा संसार केला, यातील प्रसंग तिने या नाटकात सादर केले होते. हे नाटक पाहण्यासाठी नाशिकमधील लोक पण आवर्जून आले होते. ह्या नाटकातील प्रसंगाने सर्वांचे मन हेलावून गेले होते. सर्वांच्या डोळ्याला अक्षरशः पाणी येत होते. 

२८.११.२००० रोजी बहुजन सांस्कृतिक मंडळाद्वारे ज्योतिबा फुले स्मरण दिनानिमीत्य कार्यक्रम घेतला होता. यावेळी बहुजन महासंघाचे उपाध्यक्ष माळी समाजातील कोंडाजी मामा आव्हाड,  के.एम.राठोड विभागीय समाज कल्याण अधिकारी व विक्रम गायकवाड आदिवासी विकास कार्यालय नाशिक हे आले होते. 

पोफळीला जसे माझी पत्नी कुसुम हिच्या पुढाकाराने  समता महिला मंडळाच्या वतीने महिलांचे कार्यक्रम होत, तसेच कार्यक्रम एकलहरे येथे सुद्धा होत होते. दि. ३ जानेवारी २००० रोजी  सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली होती.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्टेट बँक ऑफ इंदोरचे मॅनेजर   यशवंत सकपाळे होते. ते कोळी समाजाचे होते. नंतरच्या काळात ते बहुजन समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष झाले होते. त्यावेळी प्रमुख वक्त्या प्रा. सुधा डुमरे ह्या सावित्रीबाईंचे कार्य सांगताना म्हणाल्या होत्या की, पतीच्या कार्यात सावित्रीने झोकून दिले होते. मुलींसाठी त्यांनी शाळा काढल्या होत्या. विधवा स्त्रियांचे पुनर्वसन करून रोजगार मिळवून दिला होता. त्या होत्या म्हणून स्रियांची प्रगती झाली. म्हणून स्रियांनी त्यांचा आदर्श घ्यावा. प्रमुख पाहुणे एम.जी.जाधव सहाय्यक संचालक सुरक्षा विभाग हे होते. ह्यावेळी माझी पत्नी कुसुम हीचे पण भाषण झाले होते.  मी या कार्यक्रमात प्रास्ताविक मांडले होते.  दुस-या वर्षी दि. ३.१.२००१ रोजी पण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली होती.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  नाशिकचे तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर गजभिये यांची पत्नी मिनाताई गजभिये यांनी भूषविले होते.  त्या मार्गदर्शन करतांना म्हणाल्या होत्या की, सावित्रीबाई फुले यांनी संपूर्ण समाजाला घडविले. आपण निदान आपल्या मुलांवर चांगले संस्कार टाकून येणारी पिढी घडवू या. या कार्यक्रमात  बंजारी समाजाच्या महिला आघाडीच्या प्रमुख सुरेखाताई राठोड व माळी समाजातील कार्यकर्त्यां सुषमाताई माळी यांनी भाषण दिले होते. 

२७.३.२००१ रोजी ‘न्यू जनरेशन स्टडी सर्कल’ या नावाने एकलहरे  व आजूबाजूच्या परिसरातील बहुजन समाजातील विद्यार्थी, युवक, सुशिक्षीत बेरोजगार यांची मिटींग आयोजित केली होती. त्यांच्या समस्यांच्या सोडवणकीसाठी चर्चा केली होती.  या मिटींगला नाशिक व ओझर येथील युवक कार्यकर्ते आले होते. या मिटींगला २५ पेक्षा जास्त युवकांनी भाग घेतला होता.  यात बौद्ध, माळी, ख्रिचन, मातंग, मराठा, वाल्मिकी समाजातील युवक होते. यात विशेषतः विनोद बारमाटे, घनश्याम साळवे, जितेंद्र तभाने यांनी मेहनत घेतली होती. 

दि. २१.१०.२००१ रोजी एकलहरे येथे बाळासाहेब निकम यांच्या अध्यक्षतेखाली ‘यदि पढेलिखे लोगों ने धोका नहीं दिया होता, तो क्या होता?’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. मी सर्वप्रथम  प्रास्ताविक करून विषयाची मांडणी करतांना सांगितले की, प्रत्येकांनी या विषयावर चिंतन करून मी काय संकल्प करणार ते सांगावे. या चर्चासत्रात बालकिशन सिंग, विनोद बारहाटे, शब्बीर पापामिया शेख, एस.बी.नेटावणे, अजय मोटघरे, गोसावी समाजाचे विजयकूमार बाबा, घनश्याम साळवे, सी.एम.पाईकराव, पंजाब खंडारे, संजय दिवे इत्यादी लोकांनी भाग घेतला होता. बहुतेकांनी सांगितले की, ‘मी आंबेडकरी चळवळीत भाग घेऊन दरमहीना १५० रूपये योगदान देईन.’ या चर्चासत्रात अनुसूचित जाती ९, भटके विमुक्त १, धार्मिक अल्पसंख्य १ असे ११ जणांनी भाग घेतला होता.            

एकलहरे  येथील आठवणीत राहणारी गोष्ट म्हणजे तेथील आंबेडकर जयंतीची मिरवणूक ! १४ एप्रिल २००२ ला आंबेडकर जयंती व शिवजयंती सयुक्तपणे, सार्वजनिकरित्या प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने साजरी करण्याचे ठरविले होते. त्यावेळी मी जरी या समितीत कोषाध्यक्ष म्हणून नेमला गेलो होतो, तरी आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम ठरविण्याचे सारे सूत्र माझ्याकडे देण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्यांपासून तर मिरवणुकीपर्यंतचे सारे नियोजन मीच केले होते. भाषणाच्या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीच केले होते. सर्व कामगार-अधिकार्‍यांच्या पगारातून वर्गणीचे पैसे प्रशासनामार्फत कापून घेतल्यामुळे फार मोठा निधी जमा झाला होता. त्यामुळे भव्य प्रमाणात कार्यक्रम आयोजित करणे शक्य झाले. 

त्यापुर्वीही या वसाहतीत आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका निघत होत्या. पण त्याचं स्वरूप फार मर्यादित असायचं. पूर्वीच्या मिरवणुकीत दारू पिऊन नाचण्याची प्रथा होती. ही प्रथा मोडून काढण्याचा विचार मी मांडला आणि तो पुर्वीचे लोक सोडून इतर सर्वांना आवडला.  सर्वांना विश्वासात घेऊन दरवर्षी दारु पिऊन मिरवणूका काढणार्‍यांचा एकाधिकार, अरेरावी व दहशत मोडून काढण्यासाठी एका वेगळ्या पध्दतीने मिरवणूक काढण्याची आम्ही सर्वांनी योजना आखली होती. मात्र आमच्या या नाविण्यपुर्ण उपक्रमाला त्या प्रस्थापितांनी मोठ्या प्रमाणात विरोध करुन पाहिला. ठिकठिकाणी आम्हाला त्यांनी व त्याच्या कंपुने अडविण्याचा प्रयत्न करून पाहिला. कारण त्यांची यापुढे दुकानदारी बंद होणार होती. त्यामुळे ते चिडलेले दिसत होते. बरे त्यांचेमध्ये फार मोठी प्रगल्भता होती असेही नाही. कारण जेव्हा आम्ही बाया-माणसांना शक्य तोवर पांढरे कपडे परिधान करुन मिरवणूकीमध्ये सामिल व्हावे असे सांगत होतो, तेव्हा तो म्हणत होता की, ‘ही काय बाबासाहेबांची प्रेतयात्रा आहे?’ कोणत्याही मंगल प्रसंगी बौध्द धम्मात पांढरे वस्त्रे घालतात याची त्याला थोडीसुध्दा जाण नव्हती आणि निघाला होता पुढारीपण करायला…! किती  लाजिरवाणी गोष्ट होती ती ! तो आणि त्याचा कंपु धमक्या द्यायचा की, तुम्ही जर मुलांना नाचू दिले नाही तर मिरवणूकीमध्ये गडबड होऊ शकते. मी त्यांना औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजमधील गाढवावर बसून मौज-मजा करणार्‍या एका विद्यार्थ्याला बाबासाहेबांनी पाहिल्यानंतर त्याला बाबासाहेबांनी काठीने कसे मारले व स्वत:च कसे ढसाढसा रडलेत, ही गोष्ट सांगून तुम्ही असे अडथळे आणू नका, अशी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसमोर मी हात जोडून त्यांची विणवनी केली. तेव्हा ते थोडेफार नरमले.  

मिरवणूक अत्यंत शिस्तबद्द व एका आगळ्या-वेगळ्या पध्दतीने यशस्वी व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही जबरदस्त तयारी केली होती. माझी पत्नी कुसुम हिने यात सक्रियपणे पुढाकार घेतला होता. तिने जयंतीच्या काही दिवसा आधीपासूनच खूप मेहनत घेऊन महिला व त्यांच्या मुलांना मोठ्या प्रमाणात तयार केले होते. विशेष म्हणजे जे विरोध करीत होते त्यांच्याच घरच्या महिलांनी माझ्या पत्‍नीला या कामात साथ दिली होती. त्यांना सुचना दिल्या होत्या की, पांढरे कपडे घालून मिरवणूकीमध्ये सामील व्हावे. मिरवणूकीमध्ये कोणिही नाचू नये. त्याऎवजी घोषणा द्यावेत. घोषणा कोणत्या द्यायच्या ते सुध्दा लिहून दिले होते. मिरवणूक कधी, कोणत्या मार्गाने जाईल, कोणत्या पध्दतीने व कशाप्रकारे निघेल याचे लेखी परिपत्रक काढले होते. जवळपास सर्वच बाया, माणसं व मुलांकडे बशामध्ये (प्लेट) पेटलेल्या जाडसर मेणबत्त्या देण्यात आले होते व काहींच्या हातात पंचशीलाचे लहान-लहान झेंडे दिले होते. पेटलेल्या मेणबत्त्यामुळे काही अनिष्ट प्रसंग उद्‍भवू नयेत, याचीही काळजी घेण्यात आली होती. त्यांचेवर लक्ष ठेवण्यासाठी, दोन-दोनची रांग तुटू नये, प्रत्येकांनी शिस्त पाळावी, घोषणा व्यवस्थित द्यावेत म्हणून स्वयंसेवक तयार करण्यात आले होते व ते मिरवणूकीवर नियंत्रण ठेवून होते. कोणीही नाचनार नाहीत याची ते काळजी घेत होते. दोन-दोनची रांग असल्यामुळे मिरवणूक भव्य दिसत होती. वेगवेगळ्या दोन खुल्या जिपवर बाबासाहेब व शिवाजी महाराजांचे मोठ्या आकाराचे प्रतिमा ठेवल्या होत्या. ‘बुध्दं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी व संघ शरणं गच्छामी’ची संघशीलने कॅसेट तयार करुन दिली होती. ती हळू आवाजात पूर्ण मिरवणुकीत वाजविण्यात आली होती. मिरवणूकीच्या समोर एक जळती मशाल (भिमज्योत), त्यानंतर बँड पथक, लेझीमची कवायत, चौका-चौकामध्ये फटाक्याची आतिशबाजी असा तो माहोल होता. सर्वजण या माहोलाने भारावून गेले होते. उल्हासित झाले होते. लोक ही मिरवणूक वसाहतीतील बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन पाहत होते. यापुर्वी अशाप्रकारची मिरवणूक कधिही निघाली नसल्याचे लोकांच्या तोंडून उद्‍गार निघत होते. जेव्हा मिरवणूक विसर्जित झाली; तेव्हा विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता रावसाहेब चिठोरे साहेब यांनी सांगितले की, ‘मी अशा प्रकारची भव्य व शिस्तबद्द मिरवणूक पहिल्यांदाच पाहतो आहे.’ त्यांनी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहून माझ्या पत्‍नीचे अभिनंदन केले.

यादरम्यान ओबीसी कर्मचारी वर्गाचे नेते प्रा. श्रावण देवरे यांच्याशी चांगली  ओळख झाली होती.  तसे त्यांच्याशी सत्यशोधक ज्ञानपीठाच्या परीक्षा पोफळीला आयोजित करीत होतो; तेव्हापासून संपर्क होता. पण प्रत्यक्ष भेट नाशिकलाच झाली. आमच्याकडे त्यांचे जाणे-येणे सुरू होते. चळवळीच्या बाबतीत चर्चा व्हायच्या. मी त्यांना म्हणालो होतो की,  तुम्ही एकलहरे कॅालनीत तिन सक्रीय आणि समर्पित  ओबिसी कार्यकर्ते मिळवून द्या. त्यांना सोबत घेऊन आम्ही ही चळवळ ओबिसींमध्ये घेऊन जातो.  पण असे ओबिसी कार्यकर्ते मिळणे कठीण होते, याची जाणीव आम्हालाच काय त्यांना पण होती. १४ एप्रिल २००२ ला आंबेडकर जयंतीला प्रमुख वक्ते म्हणून मी त्यांना पाचारण केले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले होते की, शिवाजी महाराजांच्या संदर्भात ज्या तिन गोष्टी प्रामुख्याने  सांगितल्या जातात, त्या म्हणजे  एक- शिवाजी महाराजांचे गुरू रामदास होते, दोन- ते गोब्राम्हण प्रतीपालक होते व तिन- ते मुस्लिमद्वेष्टे होते. ह्या तिन्हीही गोष्टी आज इतिहासाने खोटे ठरविले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीच केले होते.

त्यांनी मा. कांशीरामजी यांनी आयोजित केलेल्या परिसंवादात संविधान समिक्षेच्या संदर्भात निबंध सादर केला होता. तोच निबंध त्यांनी ‘संविधान समीक्षा: समस्या व उपाय’ या नावाने पुस्तक स्वरूपात छापला होता. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नाशिक येथे झाला होता. त्या कार्यक्रमाच्या आयोजनात मी पण  सहभागी होतो. कार्यक्रम पत्रिकेत त्यांनी माझे पण नाव टाकले होते.

मला एकलहरे येथे जास्त कालावधी होत असल्याने बदली कुठेही होऊ शकते. म्हणून मीच भुसावळ येथे बदलीसाठी अर्ज केला. त्यावरून जानेवारी २००३ मध्ये दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ येथे बदलीचा आदेश आला होता.  

याच दरम्यान  नाशिक येथे  महिला आघाडीच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या तयारीसाठी नागपूरहून महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. सिद्धार्थ पाटील व  मुंबईहून मा. सुरेश माने आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा आशाताई पाटील ह्या आल्या होत्या.  त्यांच्यासोबत चार-पाच दिवस सुट्ट्या काढून मी व माझी मिसेस कुसुम असे दोघेही फिरत होतो. 

त्यावेळी योगायोग असा आला होता की, भुसावळला राहणारे,  जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष रविंद्र गवई  पण या अधिवेशनाच्या तयारीसाठी आले होते.  त्यावेळी सभेच्या मैदानात झेंडे बांधण्याची कामे करीत  असतांना माझी ओळख किरणदादा मोहीते यांनी त्यांच्याशी करून दिली. मोहिते सर हे जिल्हा सचिव होते. ते त्यांना  म्हणाले की, आम्ही आमचा एक चांगला कार्यकर्ता- जुमळे साहेबांना तुमच्याकडे पाठवित आहे.  कारण त्यांची भुसावळ येथे बदली झाली आहे, असे सांगून  माझ्या कार्याबाबत त्यांनी माहिती दिली.  हे ऐकून त्यांना बरे वाटले.  ते म्हणाले की, भुसावळच्या दिपनगर येथील विद्युत केंद्रात आपल्या समाजाचे भरपूर अधिकारी व कर्मचारी आहेत. पण तेथे बामसेफचे काम करणारे कोणी नसल्याने चळवळीपासून दूर आहेत. आता जुमळे साहेब येत असल्याने तेथे चळवळीचे काम सुरू होण्यास खूप मदत होईल. मी त्यांना म्हणालो की, ते तर खरंच आहे, पण आतापर्यंत मी मोहिते सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत होतो. आता तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मला आवडेल. 

एकलहरे  आणि नाशिक येथे चळवळीच्या माध्यमातून खूप मोठा गोतावळा जमा झाला होता. म्हणून नाशिक सोडण्याच्या आधी आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बोलावून अल्पोपहाराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रामुख्याने यशवंत सकपाळे, नाशिक जिल्हा अध्यक्ष,   बाळासाहेब कर्डक, नाशिक शहर अध्यक्ष, किरणदादा मोहिते, जिल्हा सचिव, प्रा. जयंतकुमार आहेर महासचिव, बामसेफ कार्यकर्ते पी.आर.इंगळे, पंजाबराव खंडारे  इत्यादी अनेक स्थानिक व एकलहरे वसाहतीतील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या निमित्ताने काही लोकांनी आमच्याविषयी स्तुतिसुमने उधळीत मत प्रदर्शन केले होते. मी पण आभार व्यक्त करतांना माझे मनोगत मांडले होते. या कार्यक्रमाने आम्ही पुरते भारावून गेलो होतो. नाशिक सोडतांना आमच्या भावना उचंबळून आल्या होत्या. 

१४. भुसावळ येथे बदली

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राबाबत माहिती सांगायची म्हणजे हे पॉवर स्टेशन जळगाव जिल्ह्यात भुसावळ-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर भुसावळपासून आठ किलोमीटर दूर दीपनगर येथे आहे. हे पॉवर स्टेशन १९६८ पासून कार्यान्वित झालेलं आहे. मी होतो त्यावेळी ४८२.५ मेगावॉट इतक्या क्षमतेचे तीन युनिट कार्यान्वित होते. त्यानंतर आणखी ५०० मेगावॉटचे दोन युनिट व युनिट ६०० मेगावॉटचा एक असे तीन उनिटची भर पडली आहे.

याठिकाणी मी जे क्वार्टर घेतले ते रिकामे पडून होते. हे क्वार्टर तीन मजली फ्लॅट पद्धतीचे होते. मी खालचे क्वार्टर घेतले. येथेही कंपाऊंड करून आम्ही रिकाम्या जागेत फुलबाग फुलवली होती. त्यामुळे घटकाभर आम्हाला या बागेत करमत होतं. या क्वार्टरच्या बाजूला झोपडपट्टी होती. तेथे पॉवर हाउसमध्ये कंत्राटदाराकडे काम करणारे मजूर राहत होते. याठिकाणच्या महिला वसाहतीत मोलकरीणीचे काम करीत. हे सारेच बौद्ध समाजाचे होते. मध्ये संरक्षक भिंत होती. त्या भिंतीला या लोकांनी भोक पाडून जाणे-येणे करीत. विद्युत केंद्राने हे भोक बुजवल्याने त्यांना वसाहतीला वळसा देऊन यावे लागत होते. म्हणून ते चिडले होते. म्हणून त्यांचे उनाड मुले आमच्या क्वार्टरवर दगडफेक करीत. म्हणून मी घेतलेले क्वार्टर कोणी घ्यायला पाहत नव्हते. आम्ही राहायला आलो तेव्हा झोपडपट्टीतून एकदा दगडं आले होते. मग आम्ही त्या झोपडपट्टीत गेलो. त्यांना सांगितले की, आम्ही पण तुमच्यासारखेच बौद्ध आहोत. त्यांना बरे वाटले. मग आम्ही नेहमी तेथे जाऊन त्यांच्यात मिसळत होतो. धम्माच्या व चळवळीच्या गोष्टी सांगत होतो. ते जयंतीसारख्या कार्यक्रमाला येत. त्यांच्या मुलांना आम्ही जेवायला बोलाविले होते. त्यांची मुले आमच्या बागेतील कामे करून देत असत. अर्थात त्यांना आम्ही या कामासाठी पैसे देत होतो. तेव्हापासून दगडं येणे बंद झाले. वरच्या क्वार्टरमध्ये राहणारे लोक यामुळे खुश झाले होते. 

मी निरनिराळ्या ठिकाणी सामाजिक कार्य करीत असतांना मला असे आढळून आले होते की, लोकांना सामाजिक कार्याप्रती कमालीची उदासिनता, जागृतीचा अभाव, सामाजिक बांधिलकी नसणे अशा नकारात्मक भावनेने घेरलेले होते. एकवेळ वर्ग ३ व ४ स्तरातील कर्मचारी कार्यक्रमात भाग घेत. पण वर्ग १ व २ मधील अधिकारी वर्ग काही अपवाद सोडला तर सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळायला मागेपुढे पहात. कदाचित शिक्षण आणि कार्यालयीन अधिकारांमुळे त्यांच्यात अहंकार व वरिष्ठपणाची भावना निर्माण होत असावी. काहींच्या बाबतीत आणखी एक कारण असू शकते ते म्हणजे आपली जात ही इतरांच्या नजरेत येईल, म्हणून घाबरत असावे. काहीजण पैसे द्यावे लागते म्हणूनही दुर राहण्याचा प्रयत्न करीत असावे. ‘खिशाला खार नको अन् डोक्याला ताप नको’ अशी वृती ! खरं  म्हणजे अधिकारी वर्गांमध्ये ‘पेयींग कॅपेसिटी’ भरपूर असते. पण देण्याची दानत नसते. काहीजण खरोखरच समाज बांधिलकीप्रती अज्ञानी असतात. त्यांना सांगितल्यावर समजून घेतात. काहीजणांना  कार्यक्रमाबद्दल  सांगितले की ऐकून घेत, पण कार्यक्रमाला  येत नसत. काहीजण रोखठोक बोलून दाखवत की, ‘काय साहेब, घरची कामं करण्यासाठी रविवारचा एक दिवस तर मिळतो. तेही तुम्ही करू देत नाही. मग घरची कामे कधी करावीत ?’ असे प्रतिप्रश्न करून घरगुती अडचणी समोर करीत.  

मी  विभागीय लेखापाल म्हणून काम करीत असतांना ऑडीटच्या संदर्भात  माझ्याशी अधिकारी वर्गांशी संबंध येत होता. म्हणून मी पहिल्यांदा ठरविले, ते म्हणजे  अधिकारी वर्गांना सामाजिक दायीत्वाची जाणीव निर्माण करून द्यावी. या लोकांचा सहभाग पाहून इतर स्तरावरील कर्मचारी वर्ग आपसुकच प्रतिसाद देतील.  म्हणून मी या लोकांची मिटिंग घेऊन त्यांना सांगितले की, आपण उच्च शिक्षित असल्याने जेव्हा कोणत्यातरी निमित्ताने समाजात जाऊ; तेव्हा समाजातील लोकांची सहज अपेक्षा असते की, आपण बुध्द धम्माबाबत त्यांना मार्गदर्शन करावे. पंचशील, चार आर्यसत्य, अष्टांगींक मार्ग, दहा पारमिता, प्रतीत्य समुत्पादाचा सिद्धांत इत्यादी धम्माच्या मौलिक सिद्धांताबाबत आपल्याला कोणी विचारले आणि आपण सांगू शकलो नाही तर मान खाली घालावे लागेल. ‘अशीच घटना माझ्याबाबतीत घडली होती’, असे एक इंजिनिअर महाशय सांगत होते. ते म्हणाले, ‘एका लग्नाला मी गेलो होतो. लग्न आटोपल्यावर एकाने मला असेच साळसूदपणे विचारले की, साहेब तुम्ही शिकलेले, मोठे साहेब, मला पंचशीलात जे शील ग्रहण करतात ते म्हणून त्याचा अर्थ सांगू शकाल काय? मी नाही सांगू शकलो. काय होतं, लोक सामुदायिकरीत्या त्रिशरण-पंचशील म्हणतात. त्यांच्या बरोबरीने मलाही म्हणता येते, पण एकट्याला म्हणायचं म्हणजे अवघडच… आधी अदिन्नदाना वेरमणी  आहे की पाणातिपाता वेरमणी आहे की, कामेसू मिच्छाचारा की, मुसावादा, सुरा मेरय ते मला नाही जमत. त्याचा अर्थ तर सांगणं दूरच राहिलं. त्यामुळे मी नाही सांगू शकलो, खरंच माझी त्यावेळी अवघडल्यासारखी परिस्थिती झाली होती.’ म्हणून मी म्हणालो, ‘अशी नामुष्कीची परिस्थिती आपल्यावर ओढवू नये म्हणून आपण  ‘बुद्धिस्ट स्टडी सर्कल’ स्थापन करू या आणि धम्माचा अभ्यास करू या. म्हणजे अशी बिकट परिस्थिती कुणावरही ओढवणार नाही.’ मग आम्ही दर बुधवारी के.एन.रामटेके साहेबांच्या घरी – ते एकटेच राहत असल्याने संध्याकाळी  ऑफिसमधून आल्यावर निदान दोन तास तरी धम्माचा अभ्यास करीत होतो. एवढेच नव्हे तर त्यावेळी त्यांच्यात सामाजिक दायीत्वाची जाणीव निर्माण करून मी चळवळीबद्दल अवगत करीत होतो. एकदा जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष रविंद्र गवई यांना मिटिंगला बोलावून त्यांनी चळवळ राबविताना आर्थिक अडचणी कसे येतात ते सांगितले. तेव्हापासून आम्ही दरमहिना प्रत्येकी १०० रुपये जमा करून जवळपास १५०० रुपये जिल्हा कार्यकारिणीकडे सुपूर्द करीत होतो. तसेच कार्यालयाच्या बांधकामासाठी काही जणांनी एक-एक हजार रुपये दिले होते. त्याशिवाय त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पण काही लोकांना घेऊन जात होतो. उद्देश हा होता की या कर्मचारी/अधिकाऱ्यांना आपल्या चळवळीची जाणीव व्हावी आणि त्यांचे विचार प्रगल्भ व्हावेत. समाजकार्यात काम करतांना मला एक अनुभव आला, तो असा की, सारेच नोकरीदार वर्ग समाजकार्याबाबत अलिप्त असतात असे नव्हे. ते अज्ञानी आणि जागृत नसल्याने ते समाजकार्यात भाग घेत नाहीत. म्हणून त्यांना सामाजिक दायीत्वाची जाणीव करून दिली तर तेही समाजकार्याशी जुळू शकतात. या उपक्रमात के.एन.रामटेके, सेंट्रल बँकेचे मॅनेजर एस.एस.रामटेके, व्ही.डी.भगत, बी.झेड.शिवनकर, पी.एस.तायडे, व्ही.एल.जाधव, सीव्हील कॅान्ट्रॅक्टर मधुकर इंगळे, पी.बी.ढेंबरे साहेब इत्यादी अनेक कामगार/अधिकारी सामील झाले होते.

या माध्यमातून आम्ही निरनिराळे  सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजीत करीत होतो. त्याच दरम्यान आम्ही दिपनगर आणि वरणगाव येथे बुद्ध जयंतीचा कार्यक्रम घेतला होता. यात मी भगवान बुद्धांच्या पंचशील, अष्टांगिक मार्ग, दहा पारमिता, चार आर्यसत्य, प्रतित्यसमुत्पाद इत्यादी प्रमुख शिकवणीचे थोडक्यात विश्लेषण केले होते. ४ ऑक्टोबर २००३ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमीत्य आयोजित कार्यक्रमात मी भाषण दिलं होतं. या भाषणात मी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का निवडला, त्याची कारणे थोडक्यात विषद केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्युत निर्मितीचे एक अधिकारी होते, ते ब्राम्हण होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, बुद्धांच्या शिकवणीत गीतेचे सार आहे. अर्थात त्यांचे म्हणणे हे चुकीचे होते. पण अध्यक्षीय भाषणानंतर त्याचे खंडन करता येत नव्हते. पण वैयक्तिक चर्चेत मात्र या त्यांच्या वक्त्यव्याचा खरपूस समाचार घेतला. ‘चातुर्वण्यं मया सृष्ठ्म गुणकर्मविभागशः’ हे जे श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं, ते भगवान बुद्धांच्या शिकवणीत यायला पाहिजे होतं. पण भगवान बुद्धांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा विरोध केला. हे कसं काय? बौध्द काळात भारत हा अधिक प्रबुध्द आणि तर्कसंगत युग होतं. गीतेतील कर्मकांड, अंधश्रद्धा, अध्यात्म या विज्ञानविरोधी तत्वांना काहीही स्थान नव्हते. गीतेत जो निर्वाणाचा सिद्धांत आला तो कोणत्याही उपनिषदात आला नाही. हा सिद्धांत भगवान बुद्धांच्या धम्मातून घेण्यात आला आहे, ज्याचे विवेचन महापारीनिब्बान सुत्तात केले आहे. इतिहासकार असे मानतात की, मुळातच गीतेची रचना ही बौद्ध काळानंतर झाली आहे. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, गीता ही  बौद्ध दर्शनाचा पराभव करण्यासाठी रचलेली प्रतिक्रियावादी पुस्तक आहे.

विद्युत निर्मिती केंद्राच्या वसाहतीत राहतांना एक गोष्ट आम्हाला सारखी खटकत होती, ती म्हणजे वसाहतीत बांधलेले हिंदूंचे देवळे… इतर धर्मीयांच्या कोणत्याही वास्तूचे अस्तित्व  वसाहतीत दिसत नव्हते.  म्हणून आम्हीही विद्युत मंडळाकडे बुद्धविहार बांधण्याची परवानगी मागावी अशी चर्चा मिटींगमध्ये केली होती. पण अशी परवानगी विद्युत मंडळ देणार नाही हे स्पष्ट होतं. उलट धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आरोप करून आमच्यावर कारवाई करू शकतील असे वाटल्याने आम्ही हा मुद्दा सोडून दिला. तथापि वसाहतीतच्या बाहेर जवळच्या गावात बुद्धविहार बांधण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली होती.

बाबासाहेब म्हणायचे की, “कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते.” याल अनुसरून मा. कांशीरामजींनी चळवळीचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टीने निरनिराळे साहित्य प्रकाशित केले होते. त्यात बामसेफ बुलेटीन, द ऑप्रेसड् इंडियन (इंग्रजी), अनटचेबल इंडिया (इंग्रजी), बहुजन भारत, श्रमीक साहित्य,शोषित साहित्य, दलित आर्थिक उत्थान, इकॅानॅामीक उपसर्ज (इंग्रजी), बहुजन संघटक, दै.बहुजन टाईम्स (मराठी), बहुजन संदेश, बहुजन नायक (मराठी आणि बंगाली), बहुजन एकता इत्यादी नियतकालिकांचा समावेश होता.  यापैकी  नागपूरहून निघणाऱ्या ‘बहुजन नायक’ या  साप्ताहिकाला २३ वर्षे पुर्ण झाली होते. म्हणून वाचक वर्ग वाढविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रम घेऊन प्रचार आणि प्रसार करण्यात येत होता. भुसावळला सुध्दा १०.८.२००३ ला असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त बहुजन नायकचे वित्तीय प्रबंधक मा. किशोर नंदेश्वर, अॅड. संदेश भालेकर, अशोक खडतकर व अभयसिंह भुजाडे पाटील इत्यादी वरिष्ठ कार्यकर्ते नागपूर व जळगावहून आले होते. या कार्यक्रमासाठी दीपनगरहून काही लोकांना घेऊन गेलो होतो. या कार्यक्रमात  मा. कांशीरामजी यांनी यशस्वीपणे हाताळलेले दिल्लीचे राजघाट प्रकरण, नागपूरच्या सभेत मा.कांशीरामजी यांच्या भाषणाचे चुकीचे वृत्त, मायावती उत्तरप्रदेशाच्या मुख्यमंत्री असल्याने १४ एप्रिल २००३ चे टिव्हीवरील जिवंत प्रक्षेपण म्हणजे सत्तेचा चमत्कार, भाजपाचे अडवाणी सारखे नेते दोन-चार लोकात जरी बोलले तरी प्रसारमाध्यमे देत असलेली प्रसिद्धी आणि मा.कांशीरामजी लाखोंच्या सभेत जरी बोलले तरी त्याला न मिळणारी प्रसिद्धी इत्यादी विषयांचा मी माझ्या भाषणात परामर्श घेतला होता.  वर्तमानपत्र हे माध्यम  अत्यंत प्रभावी असते.  त्याद्वारे जनमत तयार करता येते किंवा बिघडविता येते, असे विचार मांडून ‘घर तेथे बहुजन नायक ‘ अशी मोहीम सुरू करण्याचे आवाहन मी  केले होते.

यादरम्यान मा.कांशीरामजी हैदराबादला पक्षाच्या मिटींगकरीता जात असतांना रेल्वेच्या प्रवासात त्यांना ब्रेन हॅमरेजचा झटका आल्याने त्यांना हैदराबादच्या दवाखान्यात भरती करून दिल्लीला आणल्याची बातमी येऊन धडकली. ही बातमी १५ सप्टेंबर २००३ ची होती. हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. या आजारामुळे त्यांचे देशभरात फिरणे बंदच झाले. त्यानंतर चळवळीचे सारे सुत्र बहिण मायावती यांच्याकडे गेले. 

मी जसे पोफळी आणि एकलहरे नाशिक येथे बहुजन नायक/बहुजन संघटकचे वाटप करून वर्गणीदार वाढविण्याचा उपक्रम हातात घेतला होता. तसाच प्रघात येथेही सुरु ठेवला होता. परंतु या दरम्यान बहुजन नायकचे प्रकाशन एकाएकी बंद झाल्याने खूप गैरसोय निर्माण झाली होती. लोकांशी संपर्क करण्याचे माध्यमच निघून गेलं होतं. मी  काही लोकांकडून वार्षिक वर्गणी १५० रूपये जमा करून नागपूरच्या कार्यालयाला पाठवीले होते. पण पेपर बंद झाल्याने  मी तोंडघशी पडलो होतो. खरं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्याप्रमाणे वर्तमानपत्र हे चळवळीला आवश्यक असते. त्याशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. नाहीतर पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे तिची अवस्था होते. बहिण मायावतीच्या आदेशानुसार हा पेपर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे समजले. पण हा निर्णय अत्यंत चुकीचा होता हे आम्हाला जाणवत होते. तसेच नोकरीदार वर्गांना काम करण्यासाठी बामसेफला पर्याय म्हणून निर्माण केलेली ‘पे बॅक टू द सोसायटी प्रोग्रॅम’ ही संघटनाच मायावतींनी खतम करून टाकली. आता ना बामसेफ राहिली ना पे बॅक टू द सोसायटी प्रोग्रॅम राहिली. त्यामुळे नोकरीदार वर्गांची फार कुचंबणा झाली. कालांतराने आमच्यासारखा नोकरीदार वर्ग बीएसपीच्या चळवळीपासून तुटत गेला. मा.कांशीरामजी यांनी बामसेफच्या माध्यमातून अराजकीय मुळा पक्क्या करण्याची जी मोहीम सुरु केली होती, त्यात खंड पडत गेला.

आंबेडकर जयंती अथवा इतर कोणत्याही कार्यक्रमात माझा जसा पोफळी आणि नाशिक येथे सहभाग असायचा तसाच सहभाग येथेही पण असायचा. जयंतीसारख्या कार्यक्रमासाठी वर्गणी जमा करण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत मलाही फिरावे लागत असे. एका वर्षीच्या आंबेडकर जयंतीच्या उत्सवात झालेल्या रक्तदान शिबिरात मी रक्तदान सुद्धा  केले होते. यावेळी माझा मुलगा डॉ. संघशील याने रक्तदान शिबिराला मार्गदर्शन केले होते. 

येथे पण आंबेडकर जयंतीच्या  मिरवणुकीत  दारू पिऊन नाचण्याचा प्रघात होता. नाशिक-एकलहरेला आम्ही तो जसा  मोडून काढला होता, तसाच प्रयत्न येथे सुद्धा केला होता. 

दिपनगरला मी आणखी एक उपक्रम सुरू केला होता. कॅालनीमधील कामगारांचे जे मुलं शिकत होते किंवा शिक्षण झाल्यावर बेरोजगार होते, त्यांची मिटींग घेऊन बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल त्यांना अवगत करत होतो. त्यांच्या माध्यमातून चळवळीचे काही कार्यक्रम राबवित होतो. यात  विशेषतः मिलींद जमदाडे, राहूल खंडारे हे सक्रीय होते. माझ्या माध्यमातून  ‘बहुजन युवा मंच’ स्थापन  केली होती. दि.३.१.२००४ रोजी दिपनगर वसाहतीत सावित्रीबाई फुले यांची जयंती पहिल्यांदाच वसाहतीत साजरी केली होती.  या कार्यक्रमात मी भाषण देतांना म्हटले  होते की, दिपनगरमध्ये युवक वर्ग समोर आला आहे. त्यांना प्रोत्साहन द्या.  त्यांना नाउमेद करू नका. पैशाअभावी कामे रखडतात. म्हणून समाजाने तन, मन, धनाने त्यांच्या कार्याला सहकार्य करणे अगत्याचे आहे. आपल्या प्राप्तीचा २०वा हिस्सा आपल्या घरी खर्च करू नका तर तो बाबासाहेबांच्या कार्यासाठी खर्च करा. म्हणजे युवक वर्गाला पैशाची चणचण भासणार नाही. युवक वर्ग चळवळीसाठी मेहनत घेतील. पण कोणी हातभार लावला नाही तर  ते पैसा आणतील कुठून? सारे सोंग करता येतील; पण पैशाचे सोंग करता येत नाही. म्हणून युवकांच्या प्रबोधन कार्याला गती देण्याच्या दृष्टीने विचार करावा. तरच ख-या अर्थाने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केल्याचे समाधान मिळेल असे विचार मांडले होते. 

एकदा अधिकारी वर्गांसाठी मानव संसाधन विकास (Human Development Resources) अंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी व त्याद्वारे विद्युत मंडळाच्या कामकाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी निरनिराळ्या विषयाचे अभ्यासक बाहेरून बोलाविण्यात आले होते. त्यांनी दिलेले व्याख्यान खरोखरच उपयुक्त असेच होते. एक व्याख्याता त्यांच्या व्याख्यानात जपानचा वारंवार उल्लेख करून जपानने जगात कशी अतुलनीय प्रगती केली याचे उदाहरण देत होता. हिरोशिमा आणि नागासाकी या जपानच्या मोठ्या शहरावर अमेरिकेने बॉम्ब टाकून बेचिराख करून टाकले होते. तरीही त्या राखेतून फिनिक्स पक्षी उठून उभा व्हावा आणि त्याने उंच भरारी घ्यावी, तशाच प्रकारे जपानने किमया घडवून आणली. त्यांनी घडवून आणलेला नेत्रदीपक विकास जगासाठी एक उत्तम उदाहरण असेच आहे, असे तो प्राध्यापक सांगत होता. शेवटी व्याख्यान संपल्यावर प्रश्नोत्तराचा तास होता. त्यात मी म्हटले की सर, तुम्ही दिलेली माहिती खूप चांगली आहे. वादच नाही. पण मला एक प्रश्न पडला की बेचिराख झालेल्या जपानने इतकी प्रगती कशी काय केली? त्याचे कारण काय, ते तुम्ही सांगितले नाही. जपान हे बौद्ध राष्ट्र आहे, हे त्याचे प्रमुख कारण आहे. म्हणूनच त्यांनी इतकी प्रगती घडवून आणली. आपल्या देशासारखा जातीयवाद तेथे अस्तित्वात नाही. प्रगती करायला तेथे सर्वांनाच समान संधी उपलब्ध करून दिल्या जाते. तशी संधी या देशात उपलब्ध करून दिल्या जात नाही. म्हणून भारत मागे पडला आहे. हे जर तुम्ही सांगितले असते तर मुद्दा आणखी स्पष्ट झाला असता. बामसेफच्या चळवळीच्या माध्यमातून मला ही दृष्टी मिळाल्याने मी त्यांना हा प्रश्न विचारू शकलो. ही बाब इतर कोणत्याही अधिकाऱ्यांच्या लक्षात आली नाही. आलीही असेल तरी कुणी बोलायची हिंमत केली नाही, असेही असू शकते.   

दि.२९.२.२००४ रोजी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित शिबीरमध्ये ‘शिक्षीत मागासवर्गीय नोकरदारकडून समाजाप्रती कर्तव्य’ या विषयावर माझे भाषण ठेवले होते.

एकदा इग्लंड या देशातून बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक व सायकोथेरेपिस्ट अँड डायरेक्टर इन बुध्दीस्ट फिलॅासॅाफी, अमिदा ट्रस्ट लंडनचे  चेअरमन, लेखक- दी फिलींग बुद्धा, न्यू बुध्दीजम, झेन सॅायकॅालॅाजिस्ट  डेव्हिड ब्रेझिअर व कॅरोलीन बेझियर यांचा भारतातील बौद्ध धम्मस्थळ पाहणे व बौद्ध लोकांशी वार्तालाप करण्याच्या उद्देशाने दौरा आखला होता. माझा मुलगा प्रज्ञाशील दिल्लीला युपीएससीची तयारी करीत होता. तो व त्याच्या मित्राचा आंतरराष्ट्रीय बुध्दीस्ट गृप होता. इंटरनेटच्या माध्यमातून ते संपर्क करून चर्चा करीत असत. याच संपर्कातून त्यांनी भारतात दौरा आखला होता. याच दौ-यात भुसावळ आणि  अजिंठा लेणीचा अंतर्भाव   होता. त्यांच्यासोबत दिल्लीवरून येतांना प्रज्ञाशीलचे मित्र मंगेश दहिवले, प्रियदर्शी तेलंग आणि संतोष राऊत हे पण आले होते. हे तिघेही सामाजिक आणि धार्मिक चळवळीत सक्रीय होते. या सर्वांचा मुक्काम माझ्याकडेच तिन दिवस होता. आम्ही बुद्धिस्ट स्टडी सर्कलच्या माध्यमातून वसाहतीत  त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम दि. १०.३.२००४ रोजी  घेतला होता. या प्रवचनाला विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता व इतर अभियंता/अधिकारी पण जातीने हजर झाले होते. विशेष म्हणजे इतर धर्मीय लोक सुद्धा हे प्रवचन ऐकायला आले होते. कारण इंग्लंडचे गोरे वंशीय बौद्ध धम्माचे अभ्यासक  कसे आहेत, कसे बोलतात याचे  एक प्रकारचं  कुतूहल आणि आकर्षण होतं. मंगेश दहिवले हे  त्यांच्या इंग्रजी भाषणाचे मराठीत रुपांतर करून सांगत होते. मंगेश दहिवले हे दिल्लीच्या सचिवालयमध्ये उच्च पदावर नोकरीला होते. प्रियदर्शी तेलंग हे वामन मेश्राम यांच्या बामसेफचे कार्यकर्ते होते तर संतोष राऊत हे त्रैलोक्य बौद्ध महासंघाचे धम्माचारी होते. तिघेही उच्च विद्याविभुशीत होते.  त्यांना अजिंठा लेणी पाहण्यासाठी गाडी करून दिली होती. त्यांच्यासोबत कुसुम व आणखी काही महिला गेल्या होत्या. त्यांचं तत्त्वज्ञान जरा अध्यात्म आणि अंधश्रद्धेकडे झुकणारं वाटलं. कारण ते प्रार्थनेत मंत्र म्हणत होते.

२७.६.२००६ रोजी त्रैलोक्य बौद्ध महासंघाचे धम्मचारी ज्ञानपर पुणे यांचे प्रवचन आयोजीत केले होते.

मी जसे पोफळी आणि नाशिक येथे विद्युत केंद्रातील वसाहतीत प्रा. श्रावण देवरे यांचे  सत्यशोधक ज्ञानपीठाच्या परीक्षा आयोजित करीत होतो; तशाच परीक्षा येथेही सुरु करून  तरुण मुलांना त्यात सहभागी करून घेत होतो. परीक्षेत उत्तरे लिहीता यावीत म्हणून त्या निमित्ताने हे मुलं  पुस्तके वाचीत होते. ह्यावेळी दि.१ फेब्रुवारी २००४ रोजीच्या परिक्षेत  सत्यशोधक क्रांतीज्योती परिक्षा, सत्यशोधक जयज्योती परिक्षा व संविधान सुवर्ण पुरस्कार परिक्षा आयोजित करण्यात आले होते. या परिक्षेबाबत अधिक माहीती अशी आहे की, मी पोफळीला होतो, तेव्हापासून म्हणजे  जवळपास २० वर्षापासून फुले आंबेडकर तत्त्वज्ञान विद्यापीठातर्फे पुरोगामी अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा आयोजित केल्या जात होत्या. प्रा. श्रावण देवरे यांचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम अजूनही सुरूच असल्याचे समजले.  विविध सामाजिक विषयांवर पाठ्यपुस्तके छापून त्यावर १००  गुणांची राज्यस्तरीय परीक्षा आयोजित केली जाते. राज्यभरात जवळपास १०० परीक्षा केंद्रे कार्यरत असल्याचे समजले.  वर्षभरातून एक अथवा दोन परीक्षा आयोजित केल्या जातात. या अंतर्गत  छत्रपती शिवाजी, राजे संभाजी, जिजाऊ, शाहु महाराज, अहिल्यामाई होळकर, रमाबाई आंबेडकर, यांच्या जीवन चरित्रावर व फुले-आंबेडकरांनी लिहीलेल्या ग्रंथांवर परिक्षा घेतल्या जातात. परीक्षार्थींना छापील पाठ्यपुस्तके निम्म्यापेक्षाही कमी किंमतीत दिले जाते.

या परीक्षेत राज्यात पहिला, दुस-या व तिस-या क्रमांकाने  उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थीस आकर्षक रोख बक्षीस  देण्यात येत असते. परीक्षेत सहभागी होणा-या प्रत्येक परिक्षार्थीस आकर्षक प्रमाणपत्र दिले जाते. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर लहानपणीच समतावादी संस्कार होतात. असे संस्कार झालेली मुले धार्मिक उन्मादाच्या उत्सवात वा जातीय दंगलींच्या कार्यक्रमात कधीच सामील होत नाहीत. जे पालक आपली मुले दंगलखोर होणार नाहीत, याची काळजी घेतात व आपली मुले एक जबाबदार भारतीय नागरीक बनविण्यासाठी प्रयत्न करतात, ते आपल्या पाल्यांना फुले आंबेडकर विद्यापीठाच्या परीक्षा प्रकल्पात अवश्य पाठविले पाहिजे असे मला आवर्जून सांगायचे आहे. त्यांच्या या उपक्रमासोबत निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू हे सामाजिक जाणीवेची जान असणारे सिनेअभिनेते पण जुळले होते.  

दिपनगर, भुसावळला असतांनाच माझी आई अत्यवस्थ असल्याची बातमी आली. त्यावेळी आई माझा लहान भाऊ डॉ. अजयकडे चंद्रपूरला राहत होती. वृद्धावस्थामुळे ती आजारी राहत होती. आम्ही दोघेही रात्रीला रेल्वेने निघालो व चंद्रपूरला सकाळी पोहचलो. त्यावेळी आम्ही दोघेच राहत होतो. प्रज्ञाशील दिल्लीला, संघशील नागपूरला तर करूणा पुण्याला होती. संघशील त्याच रात्रीला नागपूरहून  चंद्रपूरला आला होता. खरं म्हणजे संघशीलनेच आम्ही येईपर्यंत  तिला जीवंत ठेवले होते, असेच म्हणावे लागेल. तिच्याजवळ रात्रभर बसून  छातीवर दाब देऊन तिला कृत्रिमरीत्या श्वासोश्वास घेण्यास मदत करीत होता. तो मेडिकलला शिकत असल्याने त्याला याबाबतीतचं तंत्र  माहीती होतं. आम्ही पोहचलो; तेव्हा तिचे डोळे बंद होते. तिला घरघर लागली होती. मी आईला म्हणालो, ‘आई, आम्ही आलो.’ माझा आवाज आल्याबरोबर तिने आमच्या दोघांकडेही डोळे  भरून पाहिले. बोलायचा प्रयत्न करीत होती. ‘अsss…’ असा अस्पष्ट आवाज तिच्या तोंडातून बाहेर पडत होता. मग तिने लगेचच जीव सोडला, तो कायमचाच !  मी पहिल्यांदाच इतक्या जवळून कुणाचं मरण पाहीलं असेल तर ते माझ्या आईचंच ! तो दिवस होता, १६ ऑक्टोबर २००३ रोजीचा… योगायोग असा की, याच दिवशी सत्तेचाळीस वर्षापूर्वी म्हणजे दि. १६.१०.१९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरनंतर चंद्रपूरला आपल्या अनुयायांना बुद्ध धम्माची दिक्षा दिली होती. माझ्या आईच्या तीन वर्षाआधी म्हणजे दि. ०१.१२.२००० रोजी माझ्या बाबाचे निधन लहान भावाकडेच झाले होते. आई-बाबाच्या निधनामुळे माझ्या आधीच्या एका पिढीचा अस्त झाला होता, असेच म्हणावे लागेल.

 १५. पारस येथे बढतीवर बदली

जुलै २००४  मध्ये लेखाधिकारी या पदावर बढती मिळून पारस जिल्हा अकोला येथे सिव्हील कन्ट्रक्शन सर्कल मध्ये माझी नेमणूक झाली होती. पण पारसला जवळपास सहा महिने क्वार्टर उपलब्ध झाले नसल्याने भुसावळ ते पारस असा दोन तास जाणे व दोन तास येणे असा प्रवास मला रोज करावा लागत होता. ट्रेन पण जास्त उपलब्ध नव्हत्या. सकाळी सहा ते सातच्या दरम्यान दोन ट्रेन होत्या. एक पॅसेंजर व दुसरी शालीमार एक्स्प्रेस. ह्या दोन्हीही गाड्या चुकवता येत नव्हत्या. नाहीतर ऑफिसला हजर होता येत नव्हतं. सकाळी चार-साडेचारला उठून तयारी करणे, दीपनगरवरून स्कूटरने सात-आठ किलोमीटर भुसावळच्या रेल्वे स्टेशनला जाणे, यात एखादा तास सहज जात होता. पारसच्या रेल्वेस्टेशन कॉलनीतील आमचं ऑफिस तिनक किलोमीटर दूर होतं. तेथेही पायपीट होत होती. संध्याकाळी एकदम पाच वाजता परतीची पॅसेंजर होती. ही गाडी पकडतांना मोठी धावपळ होत होती. कारण आमचं ऑफिस बंद होण्याची वेळच संध्याकाळी पाचची होती. ती गाडी सुटली की, शालीमार एक्स्प्रेस साडेसहाची होती. ती हॉवडा-कोलकाता येथून येत असल्याने वेळेवर येईलच याचा काही भरवसा नव्हता. या गाडीला भयानक गर्दी राहत होती. जनरल डब्ब्यात प्रवास करावे लागत असल्याने, त्या गर्दीत पाय ठेवायला जागा राहत होती. जनरल डब्बा कधी मागे कधी पुढे असे लागत असल्याने तो शोधायला एका टोकावरून दुसऱ्या टोकाला धावतच जावे लागत होते. नाहीतर गाडी सुटून जात होती. मग एकतर मुक्काम करावे लागत होते किंवा त्यावेळेस वाहन उपलब्ध असले तर अकोला येथे जावून दुसरी ट्रेन पकडावी लागत होते. असा हा त्रास सहा महिने सोसावा लागला.

पारसला असणारे हे पॉवर स्टेशन फार जुने म्हणजे १९६१ पासूनचे होते. येथे नव्यानेच विद्युत मंडळाने एका नवीन संचाचे काम सुरु केले होते. हा १२०० कोटीचा प्रकल्प होता. हा संच धरून चार युनिट होणार होते व विद्युत निर्मितीची क्षमता ५०० मेगावॉट पर्यंत जाणार होती. आमचं सिव्हील कन्ट्रक्शन ऑफिस खास याच प्रकल्प उभारणीच्या कामासाठी नाशिक येथून हलविण्यात आले होते. मी लेखा विभागाचा प्रमुख असल्याने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी येऊन पडली होती. त्यामुळे कामाचा ताण पण खूप वाढला होता. मला सारखे मुंबईला जावे लागत होते. पारस हे गाव जरी रेल्वे मार्गावर असले तरी मुंबईला जाणारी फक्त ‘शालीमार एक्प्रेस’ ही एकच ट्रेन होती. वेळेवर ट्रेनचे रिझर्वेशन करणे एखाद्यावेळी शक्य होत नव्हते. त्यामुळे माझी फार तारांबळ होत होती.

मी ह्या ठिकाणी पाहिलं की, वसाहतीच्या प्रवेश द्वाराजवळ १९८५ साली बुद्धविहार बांधण्यात आले होते, पण समोरील सभागृहाच्या  खांबाशिवाय इतर बाकीचे कामे अपुर्णावस्थेत होते. हे काम पुर्ण करायला कोणीही पुढाकार घेत नसल्याने तेव्हापासून पडून होते. कुणी पुढाकार घ्यायचा प्रयत्न केला की, त्याला नाउमेद करीत असल्याचे ऐकले होते. मी जेव्हा हा विषय मिटिंगच्या माध्यमातून लोकांसमोर मांडत होतो; तेव्हा पण लोकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे मला जाणवत होते. त्यावेळी मी चिडून म्हणत होतो की, ‘आपण पगारदार व कमावता वर्ग असतांना एकोणवीस वर्षापासून हे काम अपूर्णावस्थेत पडून आहे; तेव्हा आपल्याला या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे.’ तेव्हा एच.एम. खंडारे, एन.एन. खंडेराव, एस.जी. गवई, अविनाश दोडके साहेब अशा काही सामाजिक जाणीवेची जान असणाऱ्यांना सोबत घेऊन हे काम नेटाने पुर्ण करण्याचे ठरविले. 

तेथे ‘सुकेशनी महिला संघ’ ही  महिलांची संस्था अस्तित्वात होती; पण निष्क्रिय होती. म्हणून मी माझ्या पत्नीला- कुसुमला पुढाकार घेऊन नवीन कार्यकारिणी तयार करून या संस्थेच्या माध्यमातून वर्गणी जमा करण्याचे काम हातात घेतले. त्यासाठी आम्ही एक योजना आखली. ती म्हणजे “संकल्प निधी योजना”. त्यानुसार दान देणाऱ्यांनी एक रक्कम जाहीर करावी व ती रक्कम एकमुक्त किंवा विभागून दरमहिना द्यावी. आम्ही ५००० रुपये संकल्प निधी जाहीर केला होता. ही रक्कम दरमहिना १००० रुपये प्रमाणे सुकेसनी महिला संघाला दान देत होतो. त्याचप्रमाणे ह्या महिला इतरही दानकर्त्याकडून जावून पैसे जमा करीत होत्या. त्यानुसार एकूण दान दोन लाख एकोणचाळीस हजाराच्या जवळपास निधी जमा करून ही रक्कम बांधकामासाठी ‘पंचशील समता प्रसारक मंडळ’ जे विहाराचे काम पाहत होते, त्यांच्याकडे सुपूर्त केली. त्यादरम्यान माझी अकोला येथे बदली झाली. आमच्यानंतर पारस येथील कार्यकर्त्यांनी हे बांधकाम पुर्णत्वास नेले. हे एक महत्वाचे धम्माचे कार्य आमच्या हातून घडले, याचा आम्हाला खूप आनंद वाटत होता.

येथे सुद्धा आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात वर्गणीपासून तर भाषण देण्यापर्यंत माझा सहभाग राहत होता. एकदा आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मुलं किती मस्त नाचलेत हे फुशारकीने सांगताना एक कार्यकर्ता म्हणाला होता की, यावेळेस मुलांना दारू पाजतांना काही कसर ठेवली नव्हती. मी त्याला म्हणालो, ‘मग त्यात तुमचा मुलगा पण असेल.’ हे ऐकून त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

अकोला जवळील भरतपूर येथून बौध्द भिख्खु आणि श्रामणेर यांचा पैदलमार्च आमच्या पारसवरून पुढे जाणार होता. त्यांचा हा मार्च दुपारी बाराच्या दरम्यान पारसला येणार होता. म्हणून आम्ही त्यांच्या भोजनदानाची व्यवस्था माझ्या क्वार्टरला स्वयंपाक करून समोरच्या रिकाम्या क्वार्टरमध्ये पंक्तीची व्यवस्था केली होती. अशा प्रकारचे काही सावर्जनिक कार्य सोडले तर बाकीचे कार्य फारसे करता आले नाही.

दि.१३.२.२००५ रोजी कल्याण मुंबई येथे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे द्वैवार्षिक अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाला पारसच्या कर्मचा-यांसोबत मी पण स्पेशल गाडी करून गेलो होतो. हे नेहमीप्रमाणे दोन दिवसीय अधिवेशन राहत असे. अधिवेशनात मला नेहमी खटकणारी बाब दिसत होती, ती म्हणजे जे कर्मचारी अधिवेशनाच्या निमित्ताने येत असत, त्यातील काही कर्मचारी नुसते मौजमजा करण्यासाठी येत असल्याचे दिसून येते होते. अधिवेशनाचे कामकाज सुरू असतांना हे लोक एकतर आजुबाजुची प्रेक्षणीय स्थळे पाहून येत, नाहीतर पत्ते कुटत बसत. हे चित्र बाकीच्याही कर्मचारी संघटनेत दिसत होते. मी मागासवर्गीय कर्मचारी संघटनेत येण्यापुर्वी वर्कर्स फेडरेशनमध्ये काम करीत होतो, तेथेही हा प्रकार मी पाहीला होता. त्यामुळे मला या गोष्टीची मोठी चीड येत होती.

संघटनेच्या अधिवेशनाचा मुळ उद्देश म्हणजे मागील काळात संघटनेने काय काम केले आणि येणा-या काळात काय काम करायचे आहे; त्याचा उहापोह करून त्याचा अहवाल  प्रत्येक शाखेच्या पदाधिका-यांपासून ते केंद्रीय पदाधिका-यांनी सादर करायचा असतो. संघटनेच्या वाटचालीसाठी पदाधिकारी काही मोलाचे मार्गदर्शन करीत असतात.  ते आत्मसात करायचे असतात. त्याशिवाय अधिवेशनाला बाहेरील काही नामांकित मंडळी बोलावीत असतात, त्यांचे विचार पण ऐकून घ्यायचे असतात. एकंदरीत अधिवेशनातील वृतांत इतर कर्मचारी वर्गांपर्यंत पोहोचवली पाहिजे अशी अपेक्षा असते. 

मला जेव्हा-केव्हा संघटनेच्या कार्यक्रमात विचार मांडण्याची संधी मिळायची, त्यावेळी मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जी. आय. पी. रेल्वेकामगार परिषद मनमाड येथील दि. १२ व १३ फेब्रुवारी १९३८ रोजी दिलेल्या भाषणांचा आवर्जून संदर्भ देत होतो. कारण हे भाषण कामगार वर्गासाठी अत्यंत मोलाचे, मार्गदर्शक आणि दिशानिर्देश देणारे होते. त्यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे म्हणजे-

१. .  कामगारांच्या हितासाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे. यात काही किंतु नाही. परंतु तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही राष्ट्रीय उद्दिष्टासाठी संघटीत झाले पाहिजे.

२.   कामगार संघटनानी राजकारणात शिरलेच पाहिजे. कारण शासन सत्तेवाचून कामगारांच्या हिताचे सरक्षण करणे अशक्य आहे.

३.  संघटनेच्या शक्तीला कायद्याच्या शक्तीची जोड मिळावयास हवी. तुमची संघटना उभारण्याच्या जोडीलाच तुम्ही देशाच्या राजकारणात भाग घेतल्याशिवाय हे घडू शकत नाही.

४.  स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्वावर आधारलेली नवी पध्दती स्थापन करणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे. याचा अर्थ समाजाची पुनर्रचना आणि अशा प्रकारची पुनर्रचना समाजात घडवून आणणे हे कामगार वर्गाचे प्राथमिक स्वरूपाचे कर्तव्य आहे. परंतु कामगार वर्ग हे ध्येय कसे साध्य करू शकेल? राजकीय शक्तीचा परिणामकारक उपयोग झाल्यास याबाबतीत ते निश्चितच एक शक्तीशाली साधन ठरते. मग त्यांनी राजकीय शक्ती साध्य केली पाहिजे.

५.  काँग्रेस पासून स्वतंत्र स्वतःचा असा वेगळा राजकीय पक्ष कामगारांनी स्थापन करावा, असा सल्ला देण्यास मला मुळीच हरकत वाटत नाही.


६.   जो पक्ष वर्गहिताच्या, वर्गजाणिवेच्या पायावर आधारलेला असेल, अशा पक्षामध्ये  तुम्ही सामील व्हावे. ही कसोटी लावून पाहिल्यास तुमच्या हिताच्याविरोधी नसलेला, मला माहीत असलेला पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष हा होय. स्पष्ट कार्यक्रम असलेला तो एकच पक्ष असून कामगाराच्या हिताला सर्वोच्च स्थान देतो, त्याचे धोरण सुनिश्चित आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे, खंड १८, भाग २)  निरनिराळ्या क्षेत्रात विखुरलेल्या आंबेडकरवादी कामगार संघटनांनी या भाषणाचा अभ्यास करून आपल्या कामगारांचे प्रबोधन करणे आवश्यक होते. परंतु हे कार्य होत नसल्याने कामगारवर्ग आंबेडकर चळवळीच्या संदर्भात दिशाहीन झालेले दिसत असल्याचे मी प्रकर्षाने मांडत होतो.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दिशानिर्देशानुसार कामगार संघटनांची चळवळ चालविणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे.  आंदोलनाच्या वेळी मंडपात किंवा अधिवेशन  ठिकाणी कामगारवर्गांनी  जुगाराचे पत्ते कुटत बसण्यापेक्षा किंवा खाणेपिणे व मौजमजा करण्यात वेळ व पैसा घालवीण्यापेक्षा चळवळीचे पुस्तके वाचावीत असे मुद्दे मी भाषणात मांडत होतो.

जसे नाशिकला पुलगावच्या लता डोंगरे यांचा ‘रमाई’ हा एकपात्री नाटकाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तसाच पारसच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीत  पण हा कार्यक्रम आंबेडकर जयंतीला आयोजित केला होता. 

विशेष सांगायचं म्हणजे आम्ही माझी  सासुरवाडी  सुकळी जिल्हा यवतमाळ येथे सुद्धा त्यांच्या नाटकाचा कार्यक्रम घेतला होता. हा कार्यक्रम घेण्याचे प्रयोजन म्हणजे  आमच्या सासऱ्यांच्या वडिलांच्या आधीच्या पिढीत तुकाराम महाराज नावाचे संत होऊन गेलेत. पुर्वीच्या काळी म्हणजे बौद्ध धम्म घेण्यापूर्वी बहुतेक गावाला पुर्वाश्रमीच्या महार समाजात साधू राहत असत. जे हातात तंबोरा घेऊन किर्तन करीत. लोकांना धार्मिक कथा, संत तुकाराम महाराज, चोखामेळा, नामदेव, कबीर इत्यादी संतांच्या अभंगांचे विवेचन करून लोकांना ज्ञान देण्याचे व मनोरंजन करण्याचे काम ते करीत असत. माझ्याही चौधरा गावात असे साधू होऊन गेलेत.  ‘गुरूबिन गॅन (ज्ञान) नही’ असे ते म्हणत असल्याचे मला आठवते. बौद्ध धम्म स्विकारल्यानंतर गावोगांवचे हे साधू बाबासाहेबांच्या चळवळीत सामील झालेत. काही बौद्ध भिक्खू झाल्याचे पण दाखले आहेत. त्याशिवाय गावागावात भजन मंडळी निघालीत, जे बुद्ध-भीम गिते गावून चळवळीचा प्रचार आणि प्रसार करीत होते.  

तर ह्या सुकळी गावात भगत घराण्यातील  तुकाराम महाराजांचे निधन झाल्यावर  विठ्ठल-रुखमाईच्या देवळाच्या बाजुला त्यांची समाधी बांधण्यात आली. हे देऊळ गावातील  हिंदू लोकांना त्यातील मुर्त्या व काही पैसे देऊन समंजसपणे त्यांच्याकडून सोडवून घेण्यात आले. ह्या देवळाचा ताबा आल्यावर तेथे वर्गणी करून बुद्धविहार बांधण्यात आले. आम्ही पण वर्गणी दिली. तुकाराम महाराजांच्या  पुण्यतिथीनिमीत्त माझ्या सास-यांच्या कुटुंबाकडून दरवर्षी  गाव जेवण देऊन हा दिवस साजरा करण्याची प्रथा पडली. त्यानिमीत्त कधीकधी गाणे-कव्वालीचा कार्यक्रम पण आयोजीत केल्या जात असते. यानिमित्ताने आजूबाजूच्या खेड्यातील व बाहेरगावचे नातेवाईक हजेरी लावत असतात. नंतरच्या काळात गावातील ज्या मुली लग्न होऊन नोकरी करणा-यांच्या घरात गेल्यात, त्या मुलींची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने एक पुण्याईची भावना ठेवून  स्वत:च्या खर्चाने निदान एकदातरी गाव-जेवण देऊन आपला सहभाग नोंदवीत असतात.  आम्ही सुध्दा गाव जेवण दिलं होतं. पण आम्ही  जेवणाशिवाय लोकांचे प्रबोधन होण्याच्या दृष्टीने लता डोंगरे यांच्या एक पात्री रमाई नाटकाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यामुळे लोक खूप प्रभावीत झाले होते. माझी मुलगी करुणा हिने पण आमच्यानंतर या उपक्रमांतर्गत जेवण दिले होते.

१५. अकोला येथे बदली

पारसवरून त्याच पदावर एप्रिल २००५ मध्ये अकोला येथे तपासणी विभागात प्रशासकीय कारणास्तव बदली झाली. तपासणी विभागात लेखाधिकारी म्हणून मी, विभागीय लेखापाल व उच्चस्तर लिपीक असे तिघांची टिम होती.  लेखा विभागाच्या तपासणीसाठी मला अकोला, वाशीम व बुलढाणा या तीन जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयापर्यंत जावे लागत होते. या कामासाठी  मला सततचे दौरे करावे लागत होते. सकाळी बाहेर पडले की रात्रीलाच घरी यावे लागत होते. इतर सुट्टीच्या दिवशी तपासणीचे अहवाल तयार करून मुख्य कार्यालय मुंबई येथे पाठवावे लागत होते.  त्यामुळे येथे समाजकार्य फारसं करता आले नाही.

येथे सांगण्यासारखी एक गोष्ट घडली होती. ती म्हणजे- आम्ही  अकोला येथील गोरक्षण रोडवरील विद्युत मंडळाच्या वसाहतीतील क्वार्टरमध्ये राहायला आलो. हे क्वार्टर कोणी घ्यायला पाहत नव्हते.  म्हणून हे क्वार्टर बरेच दिवसापासून रिकामे पडलेले होते. कारण तेथे एका मॅट्रीकला

शिकणा-या आई-बापाला एकुलता एक असलेल्या  मुलाने आत्महत्या केली होती. मलाही हे क्वार्टर घेऊ नका असे काहीजण सांगत होते. पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून क्वार्टर घेतलं. घेतल्यानंतरही तेथे पूजाविधी करा असे म्हणत होते. पण या गोष्टीवर आमचा मुळातच विश्वास नव्हता. दोन वर्षे राहीलो. पण आम्हाला काहीही विपरीत असं जाणवलं नाही. मी तर इन्स्पेक्शनच्या निमित्ताने बाहेर बाहेर फिरत होतो. कुसुम दिवसभर एकटीच घरी राहत होती. कधीकधी घरी यायला मला बरीच रात्र व्हायची. मला ऑफिसच्या कामानिमित्ताने मुंबईला जावे लागत होते. अशावेळी ती घरात एकटी राहूनही कधीच घाबरली नव्हती. अकोला येथे पारसहून बदलून आल्यावर एक फायदा झाला. येथे माझी मुलगी करुणा हिचे लग्न जुळले. पारस हे आतमध्ये असल्याने तेथे अवघडच गेले असते. आमचे इवाही (व्याही) म्हणजे सी.एन.गाडगे, यवतमाळचे राहणारे, विद्युत मंडळात मुख्य अभियंता या पदावर सेवानिवृत्त झालेत. जावई प्रशांत गाडगे, हे केमिकल इंजिनीअर असून  मुंबईला एका कंपनीत नोकरी करतात. हे लग्न ३ डिसेंबर २००६ ला याच क्वार्टरमध्ये झालं. विशेष सांगायचं म्हणजे मी जी पत्रिका छापली होती, त्यात बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या धम्मदीक्षेच्या वेळी दिलेल्या २२ प्रतिज्ञा एका पानावर छापल्या होत्या. तसेच दुसऱ्या पानावर मा. कांशीरामजी यांचे ‘माझ्या संकल्पनेतील भारत सम्राट अशोकाचा भारत असेल’ असे वाक्य छापले होते. माझ्या तिन्हीही मुलांच्या पत्रिका याच पद्धतीने छापल्या होत्या. लग्न आटोपल्यावर पाहुण्यांसाठी खास मांसाहारी जेवण ठेवण्याची प्रथा आता सर्वीकडे सुरु झाली आहे. आम्ही पण तसे जेवण ठेवले होते. विशेष सांगायचे म्हणजे अनायसे अकोल्याला कार्यक्रमानिमित आलेले प्रा. श्रावण देवरे सर यांना पण जेवणाला पाचारण केले होते. लग्नाच्या आधी मी मारुती आल्टो कार विकत घेतली होती. त्यामुळे ह्या गाडीचा खूप उपयोग झाला.

संघशील याने मुंबईच्या जे.जे.मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पास केल्यावर त्याने रेडिऑलॅाजीत नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये डीएमआरडी ही पदव्युत्तर परीक्षा पास केली. त्यानंतर तो हैदराबाद येथे डीएनबी करीत असतांना त्याचे लग्न उरकवण्यात आले. त्याचे लग्न २५ नोव्हेंबर २००७ ला मुंबई येथील कस्टममध्ये सहायक आयुक्त असलेले आर.डी. मोरे यांची मुलगी डॉ. नूतन हिचेशी झालं. नूतन हिने पॅथॅालॅाजीमध्ये एम.डी. केलेले आहे.

मी अकोला येथेच संघशीलच्या लग्नाच्या आधी रामी हेरीटेज अपार्टमेंटमध्ये फ्लॅट बुक केला होता. तो आता बांधून तयार झाला होता. मुंबईहून लग्न आटोपून आल्यावर आम्ही गृहप्रवेशचा कार्यक्रम घेतला. तेव्हा यावेळी यवतमाळचे धम्माचे कार्य करणारे पी.यु.लोखंडे यांनी पूजा विधी घेतली. भिक्खू महाथेरो आनंद भंतेजी यांनी परित्राण पाठ घेतला. यावेळी गावावरून लग्नाला आलेले आमचे नातेवाईक हजर होते. प्रज्ञाशील यूपीएससीची तयारी करीत असल्याने संघशीलपेक्षा मोठा असून सुद्धा त्याचे लग्न थांबविले होते. प्रज्ञाशील यूपीएससीची परीक्षा २००८ साली पास झाला. त्यानंतर त्याला आयआरएसच्या कस्टम विभागात असिस्टंट कमिशनर म्हणून नोकरी लागली. त्यापूर्वी त्याची नेमणूक आयबी (Intelligence Bureau, Ministry off Home Affairs) असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून झाली होती. पण या नोकरीवर न जाता आयआरएसच्या कस्टम विभागात असिस्टंट कमिशनर म्हणून नोकरी करणे त्याने पसंत केले.

त्यांनतर त्याचे लग्न अकोला येथेच राहणारी कुसुम किसनराव पातोडे यांची मुलगी किरण हिचेशी झाले. त्याचे लग्न कोर्ट मॅरेज पद्धतीने दि. ३०.०५.२०१० रोजी रजिष्ट्रारच्या कार्यालयात एकमेकांना हारार्पण करून करण्यात आला. त्यावेळी प्रज्ञाशील सोबतच आयपीएस पास झालेला संदीप पारसकर हजर होता. रात्रीला स्वागत समारंभ ठेवण्यात आला होता. त्यावेळी प्रज्ञाशीलचे मित्र मंडळी हजर होतेच, त्याशिवाय उल्लेख करण्यासारखे म्हणजे अकोल्याला आयपीएस अधिकारी असलेले प्रवीण पडवळ व सुधीर हिरेमठ हे सुद्धा या समारंभाला हजर झाले होते. या अधिकाऱ्यांना पाहून साऱ्यांनांच कौतुक वाटले होते. प्रज्ञाशीलच्या मित्रमंडळीत आयएएस, आयपीएस. एमपीएससी पास झालेले अधिकारी, वकील मंडळी व त्याच्यासोबत दिल्ली येथे यूपीएससीची तयारी करणारे अनेक मित्र होते.

माझा मोठा भाऊ शामराव हा यवतमाळ येथील बरबडा या खेडेगावात राहत होता. या गावात त्याने चार एकर शेती घेतली होती. आमचे चौधरा या गावातली शेती विकून टाकली होती. म्हणून तो आमचे मुळ गाव सोडून घर विकून जवळच असलेल्या बरबडा या गावात राहायला आला होता. तो त्या काळात तिसरा वर्ग शिकला होता. हरहुन्नरी होता. चौधरा येथे असतांना १५ वर्षे सरपंच राहिला होता. त्याआधीही तो उपसरपंच होता. त्याने बाबासाहेबांच्या चळवळीत झोकून दिले होते. त्यावेळी गावागावात समाज जागृती होत होती. दादा गावातील कार्यक्रमात भाषणं द्यायचा. एवढंच नव्हे, तर त्याचं भजन मंडळ होतं. त्यात तो बुद्ध-भीम गीते व कव्वाली पहाडी आवाजात म्हणायचा. तो पेटी-हारमोनीयम अन् फिड्डल उत्कृष्टपणे वाजवायचा याचा उल्लेख यापूर्वी केला आहे. तो  रिपब्लिकन पार्टी या राजकीय पक्षात काम करायचा. मात्र बाबासाहेबांनी जीवनभर बाळगलेली व भगवान बुध्दांनी शिकवीलेली नैतिकता न रुजविता रिपब्लिकन पार्टीच्या पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांना व्यसनाधीन बनविले होते, असा कटू अनुभव मी घेतला होता. दादाला पुढार्‍यांच्या दुषित संसर्गामुळे दारुचं व्यसन जडलं होतं. चांगल्या व्यक्तीच्या संगतीने माणूस कळसास पोहचतो, पण वाईट संगतीने जीवनाचा पाय चिखलात रुततो, असंच काहीसं दादाच्या जीवनाचं झालं. खरं म्हणजे माझ्या बहुगूणी दादाला शहरातल्या धुर्त व स्वार्थी पुढार्‍यांनी नासवल्यामुळेच आम्हाला गरिबीचे दिवसं भोगायला आले होते ! शेवटी दादा दारूतच दि. २९.१२.२००५  रोजी वारला. त्याने माझ्यासाठी काय नाही केलं? माझ्या शिक्षणाला त्याने हातभार लावला होता, ही गोष्ट मी विसरू शकत नाही. मी आणि माझी बहिण जनाबाई असे दोघेही माझ्या पाचव्या वर्गानंतर यवतमाळजवळील उमरसरा येथे बाबाने झोपडी बांधून देऊन शिकायला ठेवले होते. त्यावेळी दादाच आम्हाला दाळदाणा व पैसे-अधले पुरवित होता. तो एकदा मला अभ्यासाला घेवून बसला होता. त्यावेळी मला आठवते, तो म्हणाला होता की, ‘माझ्यावर भिक मागायची पाळी आली, तरी तुला शिकवीन. पण रामराव, तुझे शिक्षण बुडू देणार नाही.’ खरंच आहे…! आई, बाबा, दादा यांची ममता व दूरदृष्टी, बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण यामुळे माझ्या डोक्यावरची शेणाची पाटी उकिरड्यावर फेकल्या गेली आणि माझ्या हाती लिहिण्याची पाटी आली. हे त्यांचे उपकार मी कसे विसरू?

तसेच आणखी एक दादा माझ्या जीवनात आला होता, तो म्हणजे देवदासदादा… तो पण मला अभ्यासाला घेऊन बसायचा. एक-दोन वर्ग तो शिकलेला असेल. पुढे तो शिकू शकला नाही, म्हणूनच तो मला खूप शिकावं अशी इच्छा बाळगून होता. तो माझ्यावर खूप जीव लावत होता. तो बाहेर कुठेही गेला की, मला सोबत घेऊन जायचा. मी बहुतेक सात-आठ वर्षाचा असतांनाच त्याच्यावर काळाने झडप मारली होती. माझ्यापासून दूर दूर निघून गेला होता. नंतरच्या काळात माझ्या पंखांनी मारलेली भरारी त्याने पाहिलीच नाही. तो काळ धर्मांतरनंतरचा म्हणजे १९५६ च्या पुढला असावा. कारण त्यावेळी यवतमाळला पाटीपुरा येथे बाबासाहेबांची जयंती व्हायची; तेव्हा तो मला घेऊन जायचा, हे माझ्या चांगल्याच लक्षात आहे. त्याचं निधन म्हणजे एक मोठी शोकांतिकाच होती. तो जळून मेला होता. यवतमाळच्या सरकारी दवाखान्याच्या बाहेर त्याचं निर्जीव शरीर निर्विकारपणे मी पाहत होतो. तिथे पाहिलेला पांढरा कोट घातलेला व तपासण्याचं यंत्र गळ्यात अडकवलेला डॉक्टर आमच्याही घरात निपजू शकेल का? असा प्रश्‍न मला समजायला लागल्यापासून सारखा सतावीत होता. म्हणून मी माझा लहान भाऊ – अजयला डॉक्टरच्या रुपात पाहत होतो. देवदासदादा उत्कृष्ट बासरी वाजवायचा. इतर गावांप्रमाणे आमच्याही गावात समता सैनिक दल स्थापन झाले होते. जातीयवादी लोकांपासून समाजाला संरक्षण देण्याचे काम हा दल करीत असे. देवदासदादा या दलाचा कॅप्टन होता. ह्या दलाच्या आखाड्यात गावातले तरुण मुलं व्यायाम करीत, दांडपट्टा शिकत व मल्लखांबावर कसरत करीत. माझे बाबा, शामरावदादा व देवदासदादा असे तिघेही मिळून एकोप्याने शेतातलं काम करीत. त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती त्यावेळी बऱ्यापैकी होती. तो गेल्यावर मात्र आम्ही डबघाईला आलो. देवदासदादा म्हणजे आमच्या घरातलीच नव्हे तर गावातली ताकद होती. समता सैनिक दलामुळे गावात दरारा निर्माण झाला होता. परंतु नंतरच्या काळात तो टिकला नाही.

मी सप्टेंबर २००७ ला अकोला येथेच सेवानिवृत्त झालो.  माझ्या कार्यालयात झालेल्या निरोप समारंभाच्या वेळी मला शाल व माझी पत्‍नी-कुसुम हिला साडी देऊन आम्हा उभयंताचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मी माझ्या भाषणात सांगितले होते, की ‘मी शिक्षण घेऊन नोकरीला लागलो, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच ! बाबासाहेबांनीच स्कॉलरशिप मिळवून दिली. त्या भरोशावर माझं शिक्षण झालं. बाबासाहेबांनीच नोकरीत राखीव जागा मिळवून दिली. म्हणून मला विद्युत मंडळात नोकरी मिळाली. नाहीतर कोणी मला दारातही उभे केले नसते. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच केवळ मागासवर्गीयाची प्रगती झाली, असे नव्हे तर इतर सर्व समाजाची प्रगती झाली. म्हणजेच या देशाची सुध्दा प्रगती झाली. कारण एखाद्या शरीराचा काही भाग हा विकलांग अवस्थेत असेल तर ते शरीर सुदृढ म्हणता येत नाही. तसेच देशामध्ये जर बहुतांश लोक हे दु:ख, दारिद्र व अज्ञानात जगत असतील तर तो देश प्रगती करू शकत नाही. त्यामुळे केवळ मीच नव्हे तर सर्वांनी त्यांचे ऋणी असायला पाहिजे. माझी तर अशी अपेक्षा आहे, की जो जो सेवानिवृत्त होईल त्यांनी त्यांनी आपल्या निरोप समारंभाच्या वेळी ही बाब प्रकर्षाने मांडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती आणि उपकाराची जाणीव ठेवावी. त्यामुळे उपस्थित असलेल्या इतर सर्व जाती-धर्माच्या कर्मचारी/अधिकार्‍यांना बाबासाहेबांचे मौल्यवान कर्तृत्व नजरेस येईल.’ ही बाब मी माझ्या निरोप समारंभाच्या वेळी आवर्जून सांगितली होतो.

आम्हा विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांना पेंशन मिळत नसल्याने असे गरुजू कर्मचारी नोकरीच्या शोधात असत. तशी संधी मला व इतर लेखाधिकारी व विभागीय लेखापालांना चालून आली होती. त्यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात खाजगीकरणाचा सपाटा सुरु झाला होता. विद्युत मंडळाच्या चार कंपन्या करण्यात आल्या होत्या. विद्युत निर्मिती, पारेषण, वितरण अशा त्या महत्वाच्या तीन कंपन्या व यावर देखरेख करणारी चवथी एक शिखर कंपनी… अशा त्या चार कंपन्यात मंडळाची विभागणी झाली. तसेच अंतर्गत कामाच्या खाजगीकरणाला सुरुवात झाली. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या जागेवर भरती न करता तेच काम कंत्राट पद्धतीने करण्यात येऊ लागले. आमच्याही तपासणी विभागाचे काम बाहेरच्या कंत्राटदाराकडून करण्यात येईल अशी चर्चा होती. मीटर वाचनाचे काम जे मंडळाचे कर्मचारी पुर्वी करीत होते, ते आता कंत्राटदाराकडे दिले होते. यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली. नोकरीची कमी उपलब्धता निर्माण झाल्याने राखीव जागा कमी झाल्यात, हा एक सामाजिक परिणाम झाला. कंत्राटदार तेच काम कमी मोबदला देऊन करून घेत होते. अकोला झोनमधील मीटर वाचनाचे काम ज्या कंत्राटी कंपनीला दिले होते, तो मारवाडी समाजाचा शहा नावाचा होता. त्या कंत्राटी कामात आमचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता ठाकरे साहेब हे भागीदार होते. या कंपनीकडे अकोला, वाशीम, यवतमाळ व बुलढाणा असे चार जिल्ह्याचे कंत्राट दिले होते. कंपनीचे कार्यालयीन कामकाज विद्युत मंडळाच्या कामासारखे चालावे म्हणून अनुभवी असे सेवानिवृत्त झालेले लेखाधिकारी त्यांना पाहिजे होते. म्हणून त्यांनी निरोप पाठवून मला बोलाऊन घेतले. त्यांनी मला आठ हजार रुपये महिना देऊ केला. मीही रिकामे राहण्यापेक्षा ही नोकरी पत्करली. पण मला वाईट अनुभव आला. एकतर बऱ्याच रात्रीपर्यंत ऑफिसमध्ये कामासाठी थांबावे लागत होते. शिवाय कंपनीच्या मालकाची वागणूक मलाच काय माझ्यासारख्या बाकीच्यांनाही अपमानास्पद वाटली होती. याची तक्रार मी ठाकरे साहेबांकडे केली. त्यांना सांगितले की, तुम्हाला माहीतच आहे की, आमची विद्युत मंडळातील लेखाधिकारी पदाला किती प्रतिष्ठा असते. त्याचा मान राखून आम्हाला वागणूक द्यायला पाहिजे होती. म्हणून मी तरी ही नोकरी सोडत आहे. बाकीच्यांना ज्यांना ज्यांना नोकरीची गरज होती त्यांनी सोडली नाही. पण मी मात्र सोडली. खाजगी क्षेत्रात मालकाची मनमानी चालत असल्याने ते काम करणाऱ्या नोकरांना कस्पटासमान वागणूक देतात याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला.    

शेवटी शेवटी मला या लिखाणाचा समारोप करतांना आवर्जून  सांगायचे आहे की, मी १९९१ साली जल विद्युत केंद्र पोफळी येथे पदोन्नति मिळून  विभागीय लेखापाल या पदावर रूजू झालो, तेव्हापासून मी पोफळी, नाशिक, भुसावळ व पारस या निरनिराळ्या विद्युत केंद्रात काम केले. म्हणजे १९९१ ते २००४ असे १३ वर्षे सलगपणे विद्युत केंद्राच्या वसाहतीत राहत होतो. विद्युत केंद्र म्हणजे कामगारांची वसाहत असलेले मोठे गावच असते. सारे जाती-धर्माचे, निरनिराळ्या परिसरातील नोकरीनिमित्त आलेले  लोक येथे एकत्रितपणे राहत  असतात.  त्यामुळे शहरापेक्षा येथे समाजकार्य करणे तेवढे जिकरीचे नसते. शहरात संपर्क करणे त्रासदायक असते, तशा वसाहतीत समस्या नसतात. विद्युत निर्मिती केंद्रात काम करीत असताना प्रत्येक वर्षीच्या आंबेडकर जयंतीच्या कार्यकारिणीत व कार्यक्रमात माझा सक्रिय सहभाग असायचा. भाषणाच्या वेळी मला मानसन्मानाने बोलाऊन स्टेजवर स्थान देत व  माझे विचार मांडायला  संधी देत. ही बाब माझ्यासाठी भुषणावह वाटत होती. धम्मचक्र प्रवर्तन दिन, सावित्रीमाई फुले, ज्योतिबा फुले, डॉ. आंबेडकर महापरिनिर्वान दिन, आंबेडकर जयंती असे कोणतेही कार्यक्रम मागासवर्गीय संघटनेकडून अथवा कोणत्याही माध्यमातून आयोजित झालेले असो त्यात मला भाषण देण्यासाठी संधी मिळत असे. बहुतेक कार्यक्रमात प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मीच करीत होतो. तसेच  त्या त्या वेळी आम्ही महापुरुषांनी केलेल्या कार्याची माहिती सांगणारी पत्रिका कार्यक्रम पत्रिकेसोबत जोडत होतो. त्यानिमित्त महापुरुषाचे कार्य आणि कर्तृत्व लोकांपर्यत पोहचत होते. उदाहरण द्यायचे म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळेस ‘बाबासाहेबांनी कामगारांसाठी केलेले कार्य’ दुसऱ्या वर्षी दुसरा विषय जसे विद्यार्थ्यांसाठी, तिसऱ्या वर्षी महिलांसाठी असे विषय आम्ही हाताळत होतो. सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतांना त्यांच्या कार्याची माहिती असलेली पत्रक वाटले होते. या सर्व पत्रकाचे लेखण मीच करीत होतो. 

एकलहरे  नाशिक येथे आंबेडकर आणि शिवजयंती संयुक्तपणे साजरी केली; तेव्हा बाबासाहेबांचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व दर्शविणारी  पत्रकाचे लिखाण  मीच केले होते.  

माझ्याशिवाय कुसुम सुध्दा पुढाकार घेऊन सावित्रीबाई फुले, धम्मचक्र प्रवर्तन दिन इत्यादी कार्यक्रम महिला मंडळाच्या माध्यमातून घेत होती. असे कार्यक्रम पोफळी, नाशिक व भुसावळ येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमात ती प्रास्ताविक अथवा सूत्रसंचालन करीत होती. अर्थात यामागे माझं सतत पाठबळ राहत होतं. मी नोकरीत असल्याने आक्षेपार्ह लिखाण माझ्या नावाने प्रकाशित करता येत नव्हतं. अशावेळेस काही काही लेख तिच्या नावाने मी प्रकाशित करीत होतो. आमची मुले पण उच्च शिक्षणासाठी घराच्या बाहेर जाण्यापुर्वी लहान असतांना कार्यक्रमात पाणी वाटप करण्यासारखे त्यांना झेपेल असे काम करून आपला खारीचा वाटा उचलीत असत, याचे आम्हाला कौतुक वाटत असे. याशिवाय आम्ही दोघेही एखाद्या उत्सवाच्या निमित्ताने कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करून अल्पोपहाराची व्यवस्था करीत होतो. 

आम्ही आणखी एक उपक्रम राबवीत होतो. एकलहरे येथे असतांना नाशिकला ज्या ज्या वेळी धार्मिक कार्यक्रम होत होते; त्या त्या वेळी डॉ. बाबासाहेबांनी नागपूर येथील धम्मदिक्षेच्या वेळी दिलेल्या २२ प्रतिज्ञांची पत्रके छापून व त्याच्या झेरॅाक्स प्रती काढून लोकांना  वाटत होतो. नाशिकला त्रिरश्मी लेणी ज्याला पांडव लेणी म्हटल्या जात होते, तेथे जे कार्यक्रम होत तेथे लेणीवर जाणा-या येणा-यांना मी व माझी मुले व पत्नीला सोबत घेऊन दोन-तीन टीम बनवून ह्या २२ प्रतिज्ञांची पत्रके वाटत होतो. काही लोक २२ प्रतिज्ञेबाबत अनभिज्ञ असल्याचे आढळून आले होते. काहींनी तर खरंच बाबासाहेबांनी अशा प्रतिज्ञा दिल्या होत्या का अशी शंका व्यक्त केल्या होत्या. 

या लेणींबद्दल माहिती अशी की-

एका  मोठ्या टेकडीवर या प्राचीन  लेण्या आहेत. या  लेण्यांवरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. टेकडीच्या खाली पायथ्याजवळ बुद्ध विहार व दादासाहेब फाळके स्मारक अलीकडच्या काळात बांधले आहे. त्रिरश्मी बौद्ध लेण्यांवर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो. याठिकाणी  पाली भाषेतील शिलालेख आहे. सातवाहन राजांनी या लेणी खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.

या शिलालेखावरुन ही लेणी २००० वर्षांपुर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. एकूण २४ लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, विहीर आहे.  येथील बुद्धमुर्त्या विदृप केलेल्या आहेत. हिंदु देव-देवतांच्या मुर्त्या ठेवल्या आहेत. मूर्त्यांची शिल्पकता वाखाणण्यासारखी आहे.

माझी दिपनगर भुसावळ येथे बदली झाली होती; तेथेही आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत ही २२ प्रतिज्ञांची पत्रके वाटत होतो. एवढेच नव्हे तर बहुजन नायक आणि बहुजन संघटक या पेपरचे जुने अंक चळवळीच्या  मिटींग आणि कार्यक्रमात वाटत होतो. 

हो. एक सांगतो की,  मी कधीच कुणाचं  लग्न लावलं नव्हतं. कारण मी धार्मिक क्षेत्रात फारसं काम केलेलं  नव्हतं. पण माझ्यावर  एकदा यवतमाळला असतांना  लग्न लावायची पाळी आली होती. माझ्या नातेवाईकांचंच लग्न होतं. त्यावेळी  चिंतामण वंजारी मला म्हणाला होता की, “काका, लग्न लावायला कोणीच नाही.  तुम्हालाच लावावे लागेल.” मी हो, नाही म्हणता म्हणता तयार झालो. घरून लग्न विधीचे पुस्तक आणले व लग्न लावलं. पण मी ज्या गाथा म्हटल्यात, त्याच्या  मराठीत भाषांतर  करून सांगितल्या. कारण ह्या गाथा पाली भाषेत आहेत. त्याचा अर्थ कुणालाच कळत नाही. अशा अनोख्या पद्धतीने मी हे लग्न लावले होते. ते लग्न दोन वधु-वरांचं होतं. एक वधू- वनमाला गुलाब वंजारी व वर-हिंमत मोहन मुन… दुसरी  वधू- माया बुधाजी वंजारी व वर- रविंद्र श्रावण वाळके…

आणखी  एक सांगायचं म्हणजे नोकरीच्या जीवनात माझ्या १६ वेळा बदल्या झाल्यात. इतक्या बदल्या कुणाच्या क्वचितच झाल्या असतील.  इतक्या बदल्या होण्याचं प्रमुख कारण म्हणजे मी करीत असलेले समाजकार्य आणि  त्यातही राजकारणाशी निगडीत… मी किंवा माझ्यासारखे जे कोणी मा. कांशीरामजी यांच्या चळवळीत काम करीत ते सहसा कारवाईला भीत नव्हते, इतका निडरपणा या चळवळीत कार्य करतांना येत असल्याचा अनुभव मला आला होता.  अगदी निर्भय वृतीने आम्ही समाजासाठी कार्य करीत होतो.                           

निवृत्तीनंतर अकोला येथे फ्लॅट घेऊन स्थायिक झालो. माझं गाव जरी यवतमाळ जिल्ह्यातील असले तरी आम्ही अकोला येथेच स्थायिक होण्याचा विचार केला. कारण माझे तिन्हीही मुले- प्रज्ञाशील त्यावेळी यूपीएससीची तयारी करीत असल्याने तो कुठल्यातरी शहरात राहणार होता. दुसरा मुलगा संघशील हा केरळमध्ये डॉक्टर (रेडिऑलॅाजिस्ट) होता. मुलगी कॉम्पुटर इंजिनीअर शिकून त्यावेळी तिचे लग्न झाले होते व ती ठाण्याला राहत होती. अकोला हे शहर रेल्वे मार्गावर येत असल्याने आम्ही मुळगावाचा जिल्हा, यवतमाळला स्थायिक न होता अकोला येथेच स्थायिक झालोत. 

मी नोकरीत असतांना मला वाटायचं की, निवृत्त झाल्यावर निदान कॅडर कँपच्या माध्यमातून बीएसपीचे कार्य वाढविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्याचे कार्य हातात घ्यावे. कारण चळवळीत काम करतांना मी तशा प्रकारे लागणारे सर्व साहित्य, सामुग्री जमा केली होती. यवतमाळच्या एका कार्यकर्त्यांशी तसे माझे बोलणे पण झाले होते. काही जणांनी निवृत्तीनंतर सरळ बहुजन समाज पार्टीत प्रवेश करून पदे स्वीकारली होती. जसे शेख मेहबूब आलम यांनी यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्षपद भुषविले होते. एकनाथ तुपसुंदरे हे दिग्रस तालुक्याचे अध्यक्ष झाले होते. गुजर गुरुजी पण महत्वाच्या पदावर होते. मला पण असेच महत्वाचे पद यवतमाळला असतो तर निश्चितच मिळाले असते. एवढेच नव्हेतर अकोला येथे सुद्धा असे पद मिळायला काही अडचण आली नसती. कारण मला पण बामसेफ आणि पे बॅक टू सोसायटी या बीएसपी संलग्नित चळवळीत काम केल्याने राजकीय जाण आली होतीच. अकोला येथील पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी अगदी जवळचा संबंध आला होता. बीएसपीच्या बैठका अथवा कोणतेही कार्यक्रम असले की, मला माहिती देऊन येण्याचे निमंत्रण देत होते. त्यावेळचे जिल्हा अध्यक्ष डॉ. एस.एस.तायडे हे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना घेऊन माझ्याकडे भेटायला येत होते. ते मला बीएसपीत काम करण्यासाठी अपेक्षा व्यक्त करीत होते. त्याशिवाय भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्या पुष्पा इंगळे ज्या नंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या होत्या, त्यांनी पण पक्षामध्ये येऊन कामगार आघाडीचे काम करण्यास सांगितले होते. तसेच रिपब्लिकन पार्टी  आठवले गटाचे कार्यकर्त्या सरलाताई मेश्राम, येलकर साहेब यांनी सुध्दा पक्षात पद द्यायला तयार झाले होते. पण माझा विशेष ओढा बहुजन समाज पार्टीकडेच होता. 

परंतु आमच्या वेळेस जो माहोल होता, तो नंतरच्या काळात मात्र ओसरला होता. पुर्वी सारखे मिशनरी कार्यकर्ते राहिले नसून आता त्यांची जागा वरिष्ठ स्तरापासून ते खालच्या स्तरापर्यंत कमर्शियल कार्यकर्त्यांनी घेतल्याचे मला जाणवत होते. एक मात्र खरं की, मा. श्रीकृष्ण उबाळे हे महाराष्ट्राच्या पार्टीचे अध्यक्ष असतांना जो माहोल तयार झाला होता, तो जर टिकला असता तर महाराष्ट्र पण कुठल्या कुठे जावून पोहचला असता.

मा.कांशीरामजी यांचे निधन होण्याच्या मागील तीन वर्षापासून आजारी होते. दि. ९.१०.२००६ रोजी ते कायमचे पडद्याआड गेलेत. त्यामुळे सतत प्रेरणा देणारा आमचा मार्गदर्शकच हरवला होता.  ही घटना अत्यंत धक्कादायक होती. अतीव दु:ख देणारी होती. त्यांच्यासारखी तळमळ आता कुणामध्येही राहिलेली दिसत नाही. त्यांच्या झुंजार कार्याची पोकळी मायावती भरून काढू शकल्या नाहीत. त्यामुळे बहुजन समाज पार्टी ही नंतरच्या काळात घसरायला लागली. राष्ट्रीय पक्ष असलेल्या बसपाची अशी स्थिती का झाली? याला कोण जबाबदार आहे? याबाबत आंबेडकरी जनता अतिशय संवेदनशील बनली. खरेच आहे की, आंबेडकरी बाण्याचा २०१४ च्या लोकसभेतला आवाज बसपाला एकही जागा न मिळाल्याने दबल्या गेल्याची खंत आंबेडकरी जनतेला वाटणे साहजिकच होते. पक्षाला आर्थिक आणि बौध्दिक रसद पुरविणारी बामसेफसारखी नोकरीदार वर्गाची संघटना पण आता अस्तित्वात राहिली नव्हती. आमच्या वेळेसच्या कार्यकर्त्यांना पण पक्षाच्या वरिष्ठांनी काहीना काही कारणाने काढून टाकण्याचा सपाटा सुरु केला होता. म्हणून मला आता या कार्यात गुंतून घ्यावेसे वाटत नव्हते. मी याबाबत जवळपास चाळीस पानाचा प्रदीर्घ लेख पण लिहिला होता. मा. कांशीरामजी सोबत तन, मन, धन वाहून मिशनरी वृतीने बसपा आणि बामसेफ मध्ये काम करणाऱ्या पण नंतरच्या काळात या ना त्या कारणाने चळवळीपासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांचे मनोगत संकलित करून मी या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी व्यक्त केलेल्या अधोगतीच्या कारणांची मीमांसा या लेखात केली होती. पक्ष मजबूत व्हावा अशीच सर्वांची इच्छा होती. मी पण हा जो लेख लिहिला, त्यात निव्वळ बसपा किंवा नेत्यावर टीका करण्याचा उद्देश नव्हता, तर बसपाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी स्वनिरीक्षण करून बसपाला उभारी द्यावी, असा माझा उद्देश होता. त्याच दिशेने मी तो लेख लिहिला होता. म्हणूनच मी लेखाच्या सुरुवातीला लिहिले होते की,

‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही !

हर हाल मे सुरत बदलनी चाहिये !!’

ह्या लेखाचे लहान लहान भाग करून तो क्रमश: फेसबुक व व्हाटसअॅप गृपवर टाकला होता. हा लेख मी माझ्या ऑनलाईन ब्लॉग rkjumle.wordpress.com मध्ये सुद्धा टाकला आहे. बीएसपी ही देशव्यापी आंबेडकरवादी संघटना आहे, हे निर्विवाद सत्य आहे. बीएसपी या राजकीय पक्षाशिवाय बहुजनांसाठी या देशात राष्ट्रीय स्तरावर दुसरा पर्याय नाही, हे सुर्य प्रकाशाइतके  सत्य आहे. संघटनेत दोष नसतो. तो राबविणाऱ्यात दोष असतो. लोक येतात जातात, पण संघटना जाग्यावर राहते. जसं बाबासाहेबांनी लिहिलेली देशाची सर्वोत्कृष्ट संविधान असून सुद्धा ते राबविणारे राज्यकर्ते  वाईट निघाल्याने भारताची अधोगती झाली आहे. गरिबी, भूकमरी, कुपोषण, बेकारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षणाची आबाळ, आरोग्याची हेळसांड अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. संविधानाची समीक्षा करू पाहणाऱ्या भाजपाचे अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या राज्यकर्त्यात दोष होता, संविधानात नाही. कारण स्वातंत्र्यानंतर या ब्राम्हणवादी राज्यकर्त्यांनी बहुजनांच्या कल्याणाकरिता संविधान कधीही राबविताना दिसले नाहीत. तसेच बसपा या संघटनेच्या बाबतीत झाले आहे असे मला वाटते.  

निवृत्तीनंतर मी परत लेखनकार्याकडे वळलो. पुर्वी कार्यक्रमाच्या आयोजनातील माझ्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय लेखनकाम पण  करीत होतोच. त्यावेळीही माझे काही लेख नियतकालिकेत  प्रकाशित होत होते.

मी कॅालेजमध्ये शिकत असे पर्यंत काहीही लिहू शकलो नाही. पण मला कथा, कादंब-या वाचण्याचा भारी नाद होता. मी कॉलेजच्या लायब्ररीतून पुस्तके आणीत होतो. त्यात मला ना.सी.फडके, वि.स.खांडेकर, ह.ना.आपटे याची पुस्तके जास्त आवडत असे.  तसेच यवतमाळच्या नगरवाचनालयमध्ये मी व माझा मित्र निरंजन पाटील असे दोघेही रोज न चुकता जात होतो. तेथे वृतपत्रे व मासिके वाचीत होतो. एखाद्या दिवशी नाही गेलो तर चुकल्यासारखे वाटत होते. तसेच कुणाचंही व्याख्यान कोणत्याही विषयावर जरी असले तरी ते ऐकण्यासाठी आम्ही हमखास जात होतो. नगरवाचनालय मध्ये नवरात्र व्याख्यानमाला आयोजित होत होती. आम्ही दोघेही या व्याख्यानमाला ऐकण्यासाठी रोज जात होतो, इतकी आम्हाला त्याची जबरदस्त आवड आणि भूक होती. नोकरी लागल्यावर सुद्धा काही दिवस ही सवय मोडली नाही. ब्रम्हपुरी, दिग्रस, श्रीवर्धन ह्या ठिकाणी मी नियमितपणे वाचनालयात जात होतो. पण नंतर हळूहळू ही सवय मोडत गेली.

मी बि.कॅाम फायनलची परिक्षा होण्यापुर्वीच ब्रम्हपुरीला नोकरीवर रुजू झालो होतो. रिपब्लिकन पार्टीचे नेते राजाभाऊ खोब्रागडे आणि मारोतराव खोब्रागडे यांनी स्थापन केलेले महाविद्यालय ब्रम्हपुरीला होते. ते दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करीत होते. त्यात विदर्भातील व विदर्भाच्या बाहेरील विद्यार्थी भाग घेत होते. हा कार्यक्रम म्हणजे एकप्रकारची वैचारिक मेजवानीच होती. या कार्यक्रमाला मी न चुकता जात होतो. त्यावेळी या महाविद्यालयाचे प्राचार्य हे यवतमाळचे करंदीकर सर होते. माझ्या ओळखीचे नव्हते. कारण ते दाते कॉलेजला प्राध्यापक होते. मी अमोलकचंद कॉलेजात शिकलो होतो. त्यावेळी मी बि.कॅाम फायनलच्या परिक्षेची तयारी करीत होतो. त्यासंदर्भात मी त्यांना भेटलो होतो. त्यांचा कॉमर्स हाच विषय असल्याने ते मला मार्गदर्शन करीत होते. कॉलेजमधील वर्गात बसायला पण त्यांनी मला परवानगी दिली होती.

वाचनासोबतच लिहण्याची इच्छा मला स्वस्थ बसू देत नव्हती.  ‘आंतरजातीय विवाह आणि प्रितीविवाह’ हा विषय त्यावेळी माझ्या मनाला चाटून गेला होता. त्याची जुळवाजुळव करून कथा कागदावर रेखाटण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण या कथेचे गुंफण आणि शेवट जमला नाही. यवतमाळवरून ब्रम्हपूरीला जातांना नागपूरहून रेल्वेने जावे लागत होते. या प्रवासाचे वर्णन करणारा लेख लिहीला होता. पण त्यावेळी अडचण अशी होती की लिहून करायचंय काय?  कुठे छापताही येत नाही. कुणाला वाचताही येत नाही. मग लिहून काय उपयोग? यामुळे लिखाणाकडे दुर्लक्ष होत गेलं. त्यावेळी अनायासे माझ्या युनियनचे अधिवेशन होते. त्यानिमीत्त विशेषांक काढायचे होते. म्हणून मी ‘आसरा’ या शीर्षकाखाली लेख लिहीला.  यात घर भाड्याने घेण्याची समस्या मांडली होती. कारण नोकरी म्हटलं की कामगाराला आपलं राहतं घर सोडून नोकरीच्या ठिकाणी जावे लागते. तेथे सहजपणे भाड्याने घर मिळेलच याची शाश्वती नसते. त्यावेळी मला १३४ रुपये पगार मिळत होता. यातील २५ रूपयापासून ते ७५ रूपयापर्यंत भाड्यावर खर्च करावे लागे. म्हणून विद्युत मंडळाने वित्तीय संस्थांकडून अर्थ सहाय्य घेऊन कामगारांना घरे बांधून द्यावीत व कामगारांकडून भाडे वसूल करून ती घरे राहायला द्यावीत अशी ती योजना, मी या लेखात मांडली होती. हा लेख संघटनेच्या अधिवेशन विशेषांकमध्ये प्रकाशित झाला होता. माझ्या जीवनात पहिल्यांदाच माझा लेख छापल्याचे पाहून मी खूप आनंदीत झालो होतो. नंतरच्या नोकरीच्या  काळात माझे अनेक कामगार विषयक आणि वैचारिक लेख व कथा कामगार संघटनेच्या मुखपत्रात, बहुजन नायक, बहुजन संघटक व इतरही वृतपत्रात प्रसिद्ध होवू लागले. 

सामाजिक आणि राजकीय विषयावर निघणाऱ्या नागेश चौधरी यांचा बहुजन संघर्ष नागपूर, बहुजन नायक नागपूर, विकास यात्रा यवतमाळ इत्यादी वृतपत्र/साप्ताहिक/मासिकात प्रकाशित होत होते. तसेच बहुजन साहित्य चिपळूण,  बहुजनरत्न लोकनायक ठाणे, धम्मशासन ठाणे, वृत्ररत्न सम्राट मुंबई, महानायक नागपूर, धम्मसंदेश  यवतमाळ या दैनिक वृतपत्रात तर शालवन पत्रिका नागपूर, सम्मासमबुद्ध, गुहागर जि. रत्नागिरी, विश्वलीडर, मुंबई, भिमरत्न, पुणे, चैत्यनगरी पानगाव जि. लातूर, साहित्य सम्राट पानगाव, जात-वर्ग-स्त्री-दास्य अंत, जरुड जि. अमरावती इत्यादी मासिकात पण लेखणकार्य सुरु केले. 

माझं विविध विषयावर लिखाण पाहून ‘विश्व लिडर’ मुंबईचे संपादिका सुरेखा रामटेके  व ‘सम्मासमबुद्ध’  गुहागर जि. रत्नागिरीचे संपादक संजय गमरे  यांनी मला वर्धापन दिनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाठविले होते. 

तसेच संत गाडगेबाबा बहुजन विकास आश्रम जरुड जि.अमरावतीचे प्रमुख मा. अशोक सरस्वती यांनी धम्मचक्र परिवर्तन विशेषांक समितीत माझे नाव अंतर्भूत केले होते.  

माझ्या या कार्याची नोंद घेऊन डॉ. भीमराव अम्बेडकर विचार मंच सोनीपत हरियाणा यांनी दि.२२.४.२०१२ रोजी आयोजीत केलेल्या ‘राष्ट्रीय गौरव सम्मान सम्मेलन २०१२’ साठीच्या पुरस्कारासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरजभान बडगुजर यांनी माझी निवड केल्याचे मला दि. ४.४.२०१२ रोजी पत्र आले होते. तसेच समता जन-कल्याण सेवा केंद्र मुंबई व भारतीय बहुजन साहित्य अॅकाडमीचे अध्यक्ष मदन मनवर यांनी राष्ट्रीय जनसेवा लोकगौरव सन्मान २०१४ तथा महाराष्ट्र जनसेवा लोकगौरव सन्मान २०१४ या पुरस्कारासाठी दि. १०.२.२०१४ च्या पत्रान्वये कळविले होते. 

त्यापूर्वी सुद्धा ‘भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली’चे राष्ट्रीय  अध्यक्ष डॉ. सोहनलाल सुमनाक्षर यांनी दि.१५.६.१९९७ च्या पत्राद्वारे  ‘डॉ.अम्बेडकर फैलोशीप सन्मान १९९७’ साठी माझी निवड केली होती. हा सन्मान दिल्ली येथे आयोजित १३ व्या राष्ट्रीय साहित्यकार संमेलनमध्ये प्रदान करणार होते. तथापि मी या कोणत्याही कार्यक्रमाला जाण्याचे टाळले. कारण मला मुळातच पुरस्कार घेण्याची व  प्रसिद्धीची हाव नव्हती.

खरं म्हणजे अकोल्याच्या घरी मी आणि कुसुम असे दोघेच राहत होतो. पण ह्यावेळी प्रजाशीलचा मुलगा, आमचा नातू प्रतिक याचा दुसरा वाढदिवस दि. ११ मे २०१५ ला अकोल्यालाच साजरा करायचा ठरल्याने त्यानिमित्त आमचे सारेच मुलं, सुना, नातू आपापल्या दूरदूरच्या गावावरून आमच्या घरी उतरले. त्यामुळे आणखी एकदा घर कसं भरून गेल्यासारखे वाटत होते. मी लहानपणी खेड्यात राहत होतो; तेव्हा संध्याकाळच्या वेळी चिमण्या आमच्या अंगणात उतरून चिवचिवाट सुरु करीत, मग अंगण कसं भरभरल्यासारखे वाटत होते. तसंच काहीसं माहोल आताही वाटलं होतं. मी नोकरी निमित्त अनेक ठिकाणी फिरलो. त्या काळात बदललेल्या नवीन नवीन घरात राहत होतो. त्यावेळी मुलं जेव्हा लहान होते – शिकत होते, त्यावेळी आमचं घर कसं भरल्यासारखे राहत होतं. मग त्यांचे शिक्षण झाले,  लग्न झालेत, नोकरी दूरदूरच्या ठिकाणी पाखरांना पंख फुटल्यासारखे निघून गेलेत. मीही नोकरीतून निवृत्त झाल्यावर मूळ खेडेगाव चौधरा शेजारील शहर यवतमाळ सोडून आमचे कुणीही नातेवाईक अकोला येथे राहत नसतांना अकोला येथेच सदनिका घेऊन स्थायिक झालो. कारण मुलांच्या जाण्यायेण्याच्या सोयीसाठी अकोला शहर हे रेल्वे मार्गावर येते, यवतमाळ शहर येत नाही म्हणून ! सारा गोतावळा एकत्र झाला; तेव्हा ते आनंदाचे क्षण टिपतांना हरखून जात होतो. एकेका नातूंचे कोडकौतुक करतांना आमचे मन भरून येत होते. प्रतिक हा सर्वात लहान व त्याचाच वाढदिवस होता. प्रतिक मला ‘आपी’ म्हणायचा. सिद्धांत ‘आलोला’ म्हणायचा. ही त्याची केरळची भाषा ! तो पुण्याच्या आधी त्रिवेंद्रमला होता ना ! आरव मला ‘बाबा’ म्हणायचा. अशी तिघांचीही मला संबोधनाची वेगवेगळी भाषा होती.  
प्रतिक ‘आपी कि (Key) देणा’ टॅक्सीत बसे, बाहेर जाते.’ असा म्हणायचा. तो कारला टॅक्सी म्हणायचा. तो बाहेर कारमध्ये जावून घरी आला, तरी कारची चाबी तो आपल्या जवळच झोपेपर्यंत ठेवत होता. तो लुधियानाला ट्रेनने जात असतांना व घरी पोचल्यावर सुध्दा ‘आपी कि देणा’ असच म्हणत असल्याचे प्रज्ञाशील सांगत होता. प्रतिकपेक्षा इशान मोठा ! तो पण खूप गोड आणि लाजाळू ! आधी आमच्याकडे येत नव्हता. मग रुळल्यावर आमच्याजवळ यायला लागला. त्याच्यापेक्षा मोठा सिध्दांत व त्याच्यापेक्षा मोठा आरव. हे दोघेही मोठे खेळकर व सक्रीय…!  त्यातल्यात्यात आरव तर फारच उड्या मारण्यात पटाईत…!  घरातल्या सोफ्यावर दणा-दण उड्या मारायचा.  खेळण्यासाठी सर्व नातुंमध्ये चढाओढ लागत असे. एखाद्यावेळी खेळणीसाठी एकमेकांशी बालसुलभ भांडणे होत. मग भांडण सोडविण्यासाठी आमची मोठी धावाधाव व्हायची. घरात आम्ही सारे जण बसलो असतांना कुणी विचारलं तर ‘आपी त्रास देते’ असा प्रतिक अगदी सहजपणे बोलून जायचा. कुणी नाही विचारलं तरीही असाच म्हणायचा. आम्हाला त्याची मोठी गंमत वाटायची. आताचे मुले फारच हुशार…! कॉम्प्युटर, टॅबलेट व स्मार्ट मोबाई फोन सहजपणे हाताळताना त्यांचे मोठे कौतुक वाटते.
प्रतिकला सोडायला आम्ही रेल्वेस्थानकावर गेलो. त्याला कडेवर घेऊन विचारले, ‘प्रतिक, कुठे चालला.’ ‘लुधियाना जाते’ असे स्पष्टपणे म्हणत होता. आता कुठे आहेस ? ‘अकोला’ असेही म्हणत होता. इतक्या कमी वयात म्हणजे दोन वर्षाचा असतांना तो एवढे सहजतेने बोलतो, याचे आम्हाला नवल वाटत होते. प्रतीकच्या वाढदिवसानिमित्त जमलेले मुलं, सुना व नातू आपापल्या गावाला निघून गेल्यावर आम्ही पूर्वीसारखे दोघेच राहिलो. बरेच दिवस आम्हाला करमत नव्हते.
प्रतीकची गोष्ट झाली. आता सिद्धांतची गोष्ट सांगतो. त्यावेळी आम्ही संघशीलकडे पुण्याला असतांना ही गोष्ट घडली होती. कार ड्रायव्हिंग करीत असतांना संघू म्हणजे संघशीलने सिद्धांतला स्टेअरिंगला लागून मांडीवर बसविले होते. त्याला मधून मधून चूप करण्याचा तो प्रयत्न करीत होता. सिद्धांतचा ’ऊऽऽ ऊऽ” असा रड अजुनही चालूच होता.

‘सिद, अरे ती बघ अनन्या…’ गाडीला जसं जोरात ब्रेक लावल्यावर गाडी जाग्यावर थांबते; तसा सिद्धांतचा रड एकाएकी थांबला.

अनन्या सिद्धांतच्याच वयाची. ती संघूच्या मित्राची मुलगी. दोघेही आधी त्रिवेंद्रमला एकाच हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजीस्ट होते. तेव्हापासून दोन्ही कुटुंबाचे एकमेकाच्या घरी जाणे-येणे सुरु होते. संघू दोन महिने झाले, आता तो पुण्याला आला होता. अनन्याला बोलता येत होतं. सिद्धांत मात्र अजूनही बोलत नव्हता. मुलांपेक्षा मुली लवकर बोलतात, असे म्हणतात ते खरं आहे.

‘अनन्या अन् तिचे पप्पा काल आपल्याकडे आले होते नं…! तू तिच्यासोबत खेळला होता. तुने तिला खेळणे दाखविले. बाबाने तुम्हाला गार्डनमध्ये नेले. तुम्ही तेथे बॉल खेळलात. पाळण्यात झुलले. घसरगुंडीवर खेळले. हो ना… सिद…’ सिद्धांत निमुटपणे रड थांबवून भिरभिर पुढे पाहत संघूचे बोलणे ऐकत होता. खरं म्हणजे अनन्या आणि तिचे पप्पा असे कोणीच समोर नव्हते. पण सिद्धांतचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी संघूने मुद्दामच त्याला असे सांगितले. पण संघू बोलायला थांबल्याबरोबर परत त्याचा हळू आवाजात रड पुन्हा सुरु झाला. त्याचा क्षणभर का होईना रड थांबला; हे मला मोलाचे वाटत होते.

तेवढ्यात  टॅव्हल‍‌‌ ‍‌बस आली. ‘सिध्दांत रडू नको. आमची बस आली. आम्ही आता गावला जात आहे.’ मी सिद्धांतकडे पाहत म्हणालो. मी बाजूच्याच सीटवर बसलो होतो. सिद्धांतची काहीच प्रतिक्रिया उमटलेली दिसली नाही.

मी कारच्या डिकीतून बॅगा काढून बसच्या डिकीत टाकल्या. तो पर्यंत कुसुम बसमध्ये चढली. मी तिच्या मागोमाग चढलो. संघू सिद्धांतला कडेवर घेऊन आमच्याकडे पाहत खाली उभा होता. तो आता रड थांबवून निमूटपणे आमच्या हालचालीकडे पाहत होता. त्याचा नेहमी टवटवीत, खेळकर, निरागस दिसणारा चेहरा आता मलूल झालेला दिसत होता. डोळ्याच्या खाली गोबर्‍या  गालावर अश्रूचे ओघळ थबकलेले दिसत होते. दरवाज्यातून मागे फिरून मी सिद्धांतला पाहिले. ‘सिद्धांत, बायऽऽ…’ असे म्हणत मी हात हलवला. त्यानेही माझ्याकडे पाहून रडक्या चेहर्‍यानेच हात हलवून बायऽऽ केला. त्याने माझ्या बायला प्रतिसाद दिल्याने माझी हुरहूर कमी झाली. आम्ही  बसमध्ये चढत असल्याचे पाहून त्यालाही आम्ही गावला जात असल्याची चाहूल लागली असावी. बस सुरु झाली. सिध्दांत व संघू आता दिसेनासे झाले. मी माझ्या सिटवर येऊन बसलो. स्लिपर गाडी होती ती. खिडकीतून बाहेर पाहिले. गाडी पुढे जात होती. अन् रस्ते, इमारती, दुकानाच्या पाट्या, जाहिराती असे सारेच भराभर मागे पडत होते. गाडीच्या वेगाने माझे विचारचक्र फिरू लागले. मला कमालीचं अस्वस्थ वाटत होतं. अपराधीपणाच्या भावनेने माझे मन गलबलून गेलं होतं. सिद्धांतचा रडवलेला चेहरा सारखा माझ्या नजरेसमोर येत होता. मीच त्याला कारणीभूत झालो होतो. त्यामूळे मला सारखी चुटपूट लागली होती.

      मी खिशातला मोबाईल हातात घेऊन संघूला रिंग केला.

      ’संघू. पोहचला का रे….?’

      ’हो… पप्पा. पोहचलो.’

      ’सिध्दांत कसा आहे रे…? अजूनही रडत आहे का ?’

      ’नाही… पप्पा. आता शांत झाला. पण बोटाला हात लावू देत नाही. हात लावला की रडतो.’

      ’बोटाला काही लावले की नाही…?’

      ’हो… हळद आणि तेल लावले.’

      ’उद्या वाटल्यास फ़्रॅक्चर आहे का ते तपासून घे.’

      ’हो… पप्पा. काही काळजी करु नका. तुम्ही जास्त फील करु नका. जे झालं ते झालं… व्यवस्थीत जा. हॅपी जर्नी….’ असे म्हणून त्याने फोन बंद केला.

एक महिन्यापूर्वी आम्ही संघूकडे आलो होतो. येण्याच्या आदल्या दिवशी संघूने सकाळी फोन करुन नुतनला बाळंतपणासाठी दवाखान्यात भरती केल्याचे सांगितले होते. नंतर एखाद्या तासाने बाळ झाल्याचे सांगितले. रात्रीची टॅव्हल बस होती. मी तिकीट काढून आणली. आम्ही भराभर घरातली सारी कामे आवराआवर करायला लागलो. घर सोडून बाहेर जायचे म्हणजे घराला कुलूप लावूनच जावे लागत असे. पहिल्यांदा झाडाची व्यवस्था लावावी लागत असे. मग सर्व झाडांच्या कुंड्या एकत्र करणे, त्यांच्या खाली प्लेट ठेवणे, घराच्या बाहेर पडेपर्यंत त्यात पाणी टाकत राहणे इत्यादी सारी कामे करण्यात कुसुम मग्न होवून जात होती. एवढी लगबग पाहून झाडं पण समजून जात असतील की घरवाले आता बाहेर जाणार आहेत म्हणून !

कुसुमचा जीव झाडात फारच गुंतलेला असायचा. झाडांना ती लेकरासारखे जपत होती. झाडांना सोडून जाण्यापूर्वी ती सारखी झाडाच्या आजूबाजूला रेंगाळत राहायची. त्यांना पाणी टाकत राहायची. त्यामुळे झाडांना सोडून जातांना आम्हाला फारच वाईट वाटत होते. कारण आम्ही कधी परत येऊ त्याचा काही नेम नव्हता. तोपर्यंत यातील किती जगतील आणि किती मरतील याची मनात धाकधूक राहायची. घरी आल्यावर त्यातील जीवट झाडं सोडले तर बाकी मेलेले दिसले की सारखी हळहळ वाटत राहायची. मग कुसुम परत झाडं विकत किंवा  कुठूनतरी आणायची व रिकाम्या झालेल्या  कुंडीत लावून गॅलरीतील परसबाग पुन्हा पुन्हा फुलवीत राहायची.  

आम्हाला मुलांची, नातवंडाची आठवण अनावर झाली, मुलांनी आग्रह केला की अधूनमधून त्यांचेकडे महिना-दीड महिना राहून परत अकोल्याला येत होतो.

सुरुवातीचे काही दिवस मुलांकडे असेच भुर्रकन निघून जात. आता नातवंडे झाल्याने  त्यांचेशी खेळण्यात थोडेफार दिवसं निघून जात होते, म्हणा !  पण  जास्त दिवस झाले की कुसुमची चला ना गावला… अशी  भुणभुण सुरु व्हायची. खरं म्हणजे आपलं घर सोडून दुसरीकडे तिला जास्त दिवस करमत नसे. मग आम्ही मार्केट किवा आणखी कुठेतरी फिरायला जावून मन रिझवत होतो. एखाद्यावेळी मुलं पण वेळ असला की कुठेतरी फिरायला नेत.

मुलांकडे जायचे म्हणजे त्यांच्यासाठी नव्हाळीच्या वस्तू घेऊन जाण्यात मोठी हौस वाटायची. त्यात ज्वारी-बाजरीचे पीठ, बेसन, तिखट, लोणचे, तूप, शेवया, वड्या, वाळलेले झिंगे अशा काहीबाही वस्तू घेऊन जात होतो. वाळलेले झिंगे जेव्हाकेव्हा आम्ही सासुरवाडी-सुकळीला जात होतो, तेव्हा कळंबच्या बाजारातून आणत होतो.

घराला कुलूप लावण्यापूर्वी खिडक्या-दरवाजे लावणे, गॅससिलेंडर, नळाचे कॉक, इलेक्ट्रिक स्विचेस बंद करणे, कॉम्पुटर व टी.व्ही.चे वायरी काढून ठेवणे, मोबाईल, चार्जर, ओषधी, तिकीटा, जेवणाचा डब्बा, पाण्याचे बॉटल्स, किल्ल्या व मुलांना द्यायच्या नव्हाळीच्या वस्तू घेतल्या की नाही, बॅगेत सारे सामान भरले की नाही; म्हणून एकमेकांची विचारपूस करणे, असं घरातून निघेपर्यंत सुरु राहायचे.  

मी नेहमीप्रमाणे ऑटो आणला. ऑटोवाल्याला बाहेर बिल्डिंगच्या खाली थांबायला सांगून घरात गेलो. बॅगा बाहेर आणून दरवाज्याला कुलूप लावले. त्याचबरोबर कुसुम पुढे सरसावून कुलूपाला ओढून पाहायला लागली. ती नेहमी मी दरवाज्याला कुलूप लावले की त्याची हमखास तपासणी करीत असते. आताही तिने तसेच केले होते. मी ऑफीसला ऑडिट सेक्शनला असतांना त्यावेळी असेच तपासणीचे कामे करीत होतो.

      सकाळी आम्ही पुण्याला संघूकडे पोहचलो. सिद्धांत घरीच होता. सिद्धांत आता सव्वादोन वर्षाचा झाला. त्याला मी ‘सिद्धांतभाऊ’ म्हणत होतो. मी माझ्या सार्‍या नातुंना भाऊच म्हणत होतो.

      त्याला म्हटले, ‘सिद्धांतभाऊ, ओळखतो का मला?’ असे म्हटल्यावर तो माझ्या जवळ आला. मी त्याला उचलून कडेवर घेतले. त्याचा पापा घेतला. तसा तो बापाच्या फार अंगावरचा ! कुणाच्या जवळ सहजासहजी जाणार नाही. आम्ही त्रिवेदमला गेलो होतो. तेव्हा तो सुरुवातीला आमच्या जवळ येतच नव्हता. त्याला आवाज दिला की, तो आमच्याकडे न पाहता गचकन मान दुसरीकडे वळवून फिरवायचा. नंतर तो आमच्यासोबत इतका रुळला की आमच्याशिवाय राहत नव्हता. त्याला आम्ही अपार्टमेंटमधील खालच्या मोकळ्या ठिकाणी फिरायला नेत होतो. त्याचेसोबत बॉल व इतर खेळणे खेळत होतो. त्यामुळे तो आमच्याही अंगावरचा झाला होता. त्याला इलेक्ट्रिक स्वीचेच बंद-चालू करायला फार मजा वाटत होती. बटन दाबल्यावर लाईट लागला की ‘आईट’ म्हणायचा. त्याला लाईटचा उच्चार येत नव्हता. म्हणून तो आईट म्हणायचा. एकदा आम्ही गावाला असतांना संघू माझ्यासोबत मोबाईलवर बोलत होता. तेव्हा त्याने मोबाईल सिद्धांतच्या कानाला लावला. मी त्याला आईट कुठे आहे रे… म्हणून  विचारले. तेव्हा तो खोलीत जावून बेडवर चढून लाईटचे बटन चालू-बंद करीत ‘आईट, आईट’ असे म्हणत असल्याचे मला संघू सांगत होता; अशी त्याची गंमत ऐकून आम्ही खूप हसत होतो.

      दुसरा त्याचा छंद म्हणजे संघू कार चालवितांना थांबला की कारचे स्टेअरिंग फिरविण्यासाठी पटकन संघूजवळ जायचा. आम्ही त्याला सायकल घेऊन दिली होती. ती व दुसरी एक स्टॉलर यांना उलटी करायला खुणवायचा. तो मग माझ्या मांडीवर बसून चाकं फिरवीत राहायचा. ह्या दोन्हीही गाड्या त्याला सरळ दिसल्या, की आमच्यावर त्याच्या भाषेत रागवायचा.

      आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे त्याला जेवण भरवीतांना नूतन त्याचे जवळ टॅबलेट द्यायची. टॅबलेट म्हणजे कॉम्पुटरचा छोटा अविष्कार. तो मग त्याला सुरु करून बोटाच्या स्पर्शाने व्हिडीओ, गेम, गाणे असं काहीतरी लावून पाहत राहायचा. त्याला जे पाहिजे ते बदलवीत राहायचा. जेवण होईपर्यंत त्याचा हा कार्यक्रम सुरु राहायचा. या वयात त्याला टॅबलेट सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळता येणे म्हणजे नवलच वाटत होते. विशेष म्हणजे चालू करण्यापासून ते बंद करण्यापर्यंतच्या सार्‍या क्रिया त्याला करता येत होत्या. मग त्याचे कौतुक केल्याशिवाय आम्हाला राहवत नसे. यावरून आजची पिढी फारच पुढे जात असल्याचे चित्र आमच्या डोळ्यासमोर दिसत होते. 

      आम्ही पोहचलो; त्या दिवशी मला अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या  बगीच्यात सिद्धांत घेऊन गेला. तेथील घसरगुंडीवर मनमुरादपणे खेळला. मग मी रोजच त्याला येथे आणून खेळवत होतो. खूप पळायचा. त्याची पळण्याची स्टाईल पण वेगळीच ! खांदे उडवत पळायचा. तो मला जीममध्ये घेऊन गेला. तो संघुसोबत जिममध्ये जात असल्याने त्याला माहित होते. त्याला ‘जीम’ असा शब्द उच्चारता येत नव्हते तर त्याऐवजी तो ‘जी’ म्हणायचा. त्याने मला बॅगमध्ये ठेवलेले, त्याचे खेळणे दाखविले. मग रोजच मला घेऊन बसायचा. त्याचे खेळणे हाताळून झाल्याशिवाय मला तेथून उठू देत नव्हता. संघूला रोज रात्री एक-दीड वाजेपर्यंत झोपू देत नव्हता. मोठा मस्ती करायचा. जेवण झाल्यांनंतर झोपेपर्यंत दोघेही बाप-लेक खेळत राहायचे.

      एखादी घटना घडली की तो खाणाखुणा व हावभाव करून सांगण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला आम्हाला त्याची ही अबोल भाषा कळत नव्हती. मम्मा, पप्पा शिवाय त्याला दुसरं काही बोलता येत नव्हतं. संघू व नूतनला तो काय सांगतो ते कळायच.

      एकदा त्याचा हात छोट्याशा बाळाच्या डोक्याला लागला तेव्हा तो प्रसंग खाणाखुणा व हावभाव करून सांगत होता. अशा त्याच्या गमतीजमती पाहून आम्हीही समरस होऊन जात होतो.

      संघूचा दुसरा छोटा बाळ मस्त गुटगुटीत आणि मोठा शांत. टुकुरटुकुर पाहत राहायचा. त्याला भूक लागली की ‘ऑऽऽ ऑऽऽ‘ करून मधुर आवाजात रडायचा. मुलीसारखा सुंदर दिसायचा. खरं म्हणजे आम्हा सर्वांना मुलाऎवजी मुलगी व्हायला पाहिजे होती, असं वाटत होतं.

      आम्हाला एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला जायचे असल्याने आम्ही गावला  यायला निघालो. बॅगा घेऊन लिफ्टने खाली कारजवळ आलो. सोबत सिद्धांत पण होता. येतांना त्याने नूतनला बाय केला. हसत-खेळत, उड्या मारत तो कारजवळ आला. बॅगा संघूने डिकीत ठेवल्या. कुसुम दरवाजा उघडून मागच्या सीटवर बसली. संघू ड्रायव्हर सीटवर बसला. मी सिद्धांतला घेऊन त्याच्या बाजूच्या सीटवर बसणार होतो. माझ्याजवळ एक थैली होती. ती पाठीमागच्या सीटवर ठेवण्यासाठी मी दरवाजा उघडला व परत बंद करायला लागलो. तेव्हा सिद्धांत एकदम जोरात किंचाळला. त्याची किंकाळी ऐकून माझ्या मनात चर्र झालं. त्याचे बोट पहिल्या आणि दुसर्‍या दरवाज्याच्या मध्ये चेंदला असल्याचे माझ्या लक्षात आले. त्याच्या ओरडण्याने मी घाबरलो. संघू ताबडतोब कारच्या बाहेर पडून सिद्धांतला उचलून घेतले. काय झाले म्हणून मला विचारले. मी त्याचे बोट चेपल्याचे सांगितले.

      ‘पप्पा, जरा पाहून दरवाजा लावत जा… त्याचे बोट जर फ्रॅक्चर झाले असेल

तर… ?’ संघू काळजीच्या सुरात मला म्हणाला. त्याचे हे बोलणे ऐकून मी खजील झालो. पोराच्या यातना पाहून बापाची तडफड होणं साहजिकच आहे.

      ‘हो…रे… संघू… त्याने दरवाज्याच्या फटीत बोट टाकले असेल हे माझ्या लक्षातच आले नाही. तिथे अंधार होता. मला काही दिसलेच नाही. फार मोठी चूक झाली माझ्याकडून… चांगला हसत-खेळत असलेल्या लहानशा जिवाला माझ्यामुळे दुखापत झाली. गावला जाता जाता असे घडले. फारच वाईट वाटते.’

     ‘‘कुठे बोट चेपलं. दाखवा बरं.’ संघू म्हणाला.

      आम्ही कारच्या दरवाज्याच्या बाजूने आलो. पहिला दरवाजा लाऊनच होता. मागचा दरवाजा उघडा होता. दोन्ही दरवाज्याच्या मध्ये फट निर्माण झालेली होती. नेमके त्याचवेळेस सिद्धांतने त्यात बोट घातले असावे. जेव्हा मी दरवाजा लावायला गेलो; तेव्हा चेपले असावे. मी त्या फटीत बोट टाकून दरवाजा लावून पाहिला; तेव्हा बोटाच्या शेवटच्या टोकावर दाब पडून घसरून बाहेर आला. सिद्धांतच्या कोवळ्या बोटावर असाच दाब पडून चिंबला असावा.  

      बस येण्याची वेळ झाली होती. त्यामुळे आम्हाला लवकर निघणेही गरजेचे होते. इकडे सिद्धांत जीवाच्या आकांताने रडत होता. घळघळा अश्रूचा पूर डोळ्यावाटे बाहेर येऊन त्याच्या कोमल गालावर ओघळत होते.  ऐरवी लहान मुलाचा रड हा धुक्यासारखा अल्पजीवी असतो. असे म्हणतात की मुलं मोठ्या माणसासारखे आपले दु:ख गोंजारत बसत नाहीत. पण सिद्धांत इतका वेळ रडत आहे; म्हणजे नक्कीच त्याला खूप  यातना होत असाव्यात !

      मी त्याची दयनीय अवस्था पाहून गलबलून गेलो होतो. मला कमालीचे वाईट वाटत होते. जणूकाही माझ्या काळजाचे पाणी होत आहे असे वाटत होते. चांगला हुंदळणारा-हसरा-खेळकर चेहरा एकाएकी रडका झाला…! इतका साजरा गोजिरवाणा दिसणारा चेहरा तेजोहीन झाला…! या अकल्पित प्रसंगाने मला पुरते हलवून सोडले होते.  मी स्वत:वरच खूप संतापलो होतो. चिमुकल्या जीवाला दुखापत करण्याला मीच कारणीभूत आहे असे म्हणून नकळत माझा हात कपाळावर जाऊन स्वतःलाच चापटे मारीत होतो. मी अपराधी भावनेने अर्धामेला झालो होतो.

      सकाळी घरी पोहोचल्याबरोबर संघूला फोन केला.

      ‘संघू, आम्ही पोहचलो घरी. सिद्धांत कसा आहे ?’

      ‘चांगला आहे, पप्पा. बरं झाले. सुखरूप पोहचलात.’

      थोडं थांबून आणखी पुढे म्हणाला, ‘सिद्धांतला दुखापत होण्याची ही काही पहिली वेळ नाही. यांआधीही कधी माझ्यामुळे तर कधी नुतनमुळे अशा घटना घडल्यात. प्रत्येकवेळी मोठठा रडतो…! त्याचे बोट एकदा बाथरूमच्या दरवाज्यात चेपले होते. गरम इस्त्रीने त्याचा हात भाजला होता. टबमध्ये गरम पाण्याने त्याचे दोन्ही पाय पोळले होते. गार्डनमध्ये पळतांना एका मोठ्या छिद्रावर त्याचा पाय पडल्याने मुडपला होता. अशा ज्या काही गोष्टी घडतात ना… त्याला खरं म्हणजे आपण मोठे माणसंच जबाबदार असतो. म्हणून आपण लहान मुलांच्या बाबतीत फार लक्ष द्यायला पाहिजे, असे मला वाटते.’

      ‘बरोबर आहे. आपल्या निष्काळजीपणामुळेच मुलांना दुखापत होत असते. काळजी घेतली की काळजी करण्याचा प्रसंग येत नाही.’ असं मी म्हणत त्याला दुजोरा दिला. अशा लहानमोठ्या घटना जीवनात घडतच असतात. पण ही घटना खूप खोलवर माझ्या मनात रुतून बसली होती.

माझ्या जीवनात अचानकपणे घडलेली आणखी एक घटना म्हणजे मला जडलेला कँसरचा गंभीर आजार…  मराठीतला कर्करोग… राशी भविष्यातील बारा राशीपैकी ज्याचे चिन्ह असते, ‘विंचू’… हे चिन्ह पाहूनच कुणीही घाबरून जातो. मला खरंच  कधी वाटलं नव्हतं की, कधीकाळी  मलाही हा असा आजार जडेल म्हणून… जेव्हा मला  हे कळले तेव्हा मी पुरता हादरून गेलो होतो.  मी कॅालेजमध्ये शिकत होतो, तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कँसरच्या आजाराने मरण पावल्याचे पहिल्यांदा ऐकले होते. हा आजार गंभीर असतो हे त्यावेळी  कळले होते. तंबाखाच्या सेवनामुळे तो जडतो असेही ऐकले होते.  मला शाळेपासूनच तंबाखूसोबत चुणा घोटून ओठात ठेवण्याची लत लागली होती. त्यामुळे ही भीती मला सतत सतावत होती. प्रयत्न करूनही तंबाखू काही  साथ  सोडत नव्हती. त्याकाळात  ही सवय जवळपास ब-याच जणांना  म्हणजे सार्वत्रिक अशी होती. मी नोकरीला लागलो; तेथेही तंबाखाचे अनेक भोक्ते होते. केवळ खेड्यापाड्यातील अशिक्षीत लोकच खातात असे नव्हे तर शहरातील शिकलेले लोक पण खात होते, हे एक त्याचे वैशिष्ठ्य होते. एकमेकांना तंबाखू घोटून देण्याची मजा काही औरच यायची. म्हणूनही कदाचित हा पदार्थ गोचिडासारखा चिकटून राहत असावा. आमच्या काळातील ही गोष्ट आहे, बरं !  आताची नविन पिढी मात्र या व्यसनापासून चार हात दूर आहे. ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे.  पोफळीला मात्र मुलांनी फारच दबाव आणल्याने  आता या सवयीला धरून ठेवणे अवघड झाले होते. अखेर मन पक्क करून  १९९८ साली ही सवय कायमची सोडून दिली. इतके वर्षे लोटल्यानतर सुद्धा कँसर होऊ शकते का? याचे उत्तर  कुणीही ठामपणे  देऊ शकले नाही. कारण कँसर होण्याचे अनेक कारणे आता वैद्यकीय अभ्यासात दिसून आले आहे. टाटा हॅास्पिटलच्या चौकशी विभागात या संदर्भात उपयुक्त माहीती देणारे लहान लहान पुस्तीका ठेवले होते.  ते वाचून  बरीच माहिती मिळाली. कॅन्सरच्या रुग्णांचा घरात वावर किंवा त्यांच्या सान्निध्यात राहून रोगाची लागण होईल का? रुग्णाबरोबर शारीरिक संबंधातून कॅन्सर होऊ शकतो का? हवेतून कॅन्सर पसरतो का? असे अनेक गैरसमज या आजाराच्या बाबतीत जनमानसात  पसरले होते. ही पुस्तीका व गुगलवर सर्च करून जी माहिती मिळाली, त्यावरून कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही व तो एकाचा दुसऱ्याला लागत नाही. तेव्हा घरात अथवा बाहेर  रुग्णांबरोबर कुठलेही व्यवहार करताना भीती बाळगण्याची गरज नाही. असे असतांना सुद्धा काहीजण  जर कँसरग्रस्त रुग्णांना अस्पृश्यतेची वागणूक देत असतील तर त्याच्या मनाला किती डागण्या पडत असतील  ! आधिच ते भयभीत झाले असतात, त्यातच जर अशी दुजाभावाची वागणूक मिळाली तर  ते आणखीनच किती व्यथित होतील ! म्हणून ते सहृदयतेच्या वागणुकीची अपेक्षा करीत असतील तर त्यात काही वावगं नाही. 

 पण एक खरं की,  हा आजार आता बरा होऊ शकतो, तुम्ही एकटेच या रोगाने ग्रासले नाहीत तर जगात अनेकांना हा आजार होत असतो. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. हा दिलासा कँसरग्रस्त रुग्णांना जगण्यासाठी उर्जा देऊन जाते.

सामान्यतः हा पेशीचा आजार आहे. जुन्या पेशी मरतात व त्याची जागा  नविन पेशी घेतात. या शारिरीक प्रक्रियेत काही संतुलन बिघडले की हा आजार जडतो, ही त्यामागील  कारणे समजून आलीत.  दुसरं असं की, मी नोकरीतून निवृत्त झालो; तेव्हापासून मधुमेहाचा आजार सुरू झाला होता. त्याच्याशीही झगडणे सुरूच होते. आता त्यात कँसरची भर पडली होती. माझ्या  घरच्या लोकांनी हिंमत आणि धिर  दिल्याने या दुर्धर व जीवघेण्या  आजाराशी दोन हात करायला मी मानसिकदृष्या तयार झालो. नाहीतर मी पुर्णत: खचून गेलो होतो.

हा आजार उघडकीस येण्याचे कारण म्हणजे  मला एक-दिड महिन्यापासून खोकला झाला  होता. म्हणून  संघशील याने तो स्वतः रेडिओलॅाजिस्ट असल्याने  त्याच्या पुण्याच्या हॅास्पिटलमध्ये  सिटी स्कॅन केले. त्यात माझ्या डाव्या बाजुच्या  लंगला (फुस्फुस) ट्युमर म्हणजे गाठ असल्याचे दिसून आले. त्याने रुबी हॅाल येथे संपुर्ण शरिराची पिईटी-सिटी स्कॅन केले. बायोप्सी केली. बायोप्सी करण्यासाठी  गाठीचा थोडासा अंश काढून  माझी सुन, नुतन ही जहांगीर हॅास्पिटलला होती,  तेथे पॅथॅालॅाजीत तपासणी केली. तेव्हा ही गाठ कँसरचीच असल्याचे निदान झाले.  मग सुरु झाला कँसरशी निकराईची  लढाई…  मुलांना ही बातमी लगेच  कळली.  कुसुम सोबतच होती.  पुण्यातील दवाखान्यात मला दाखवण्यात आले. त्यानंतर  मुंबईच्या कँसरच्या उपचारासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या टाटा कँसर हॅास्पिटलला सेकंड ओपीनियन घेण्यात आले. तेथील डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार दि. ६.११.२०१५ रोजी माझी फाईल तयार करण्यात आली. माझ्या  पुढील उपचाराची  प्रत्येक घडामोडी या फाईलमध्ये  जमा होऊ लागली. म्हणजेच  माझ्या जीवनातील इतिहासाची नोंदच या फाईलमध्ये होत होती, असेच म्हणावे लागेल. आता ख-या अर्थाने  येथूनच  दवाखान्याचे हेलपाटे सुरू झाले.

माझी  मुलगी करुणा हिचे  घर ठाण्याला असल्याने तिच्याकडे राहून हा दवाखाना करणे सोयीचे झाले. नाहीतर मोठी गैरसोय निर्माण  झाली असती. दवाखान्यात उपचारासाठी येणा-या रुग्णांची  भयानक गर्दी असायची. त्या गर्दीचा मीही एक भाग बनलो. संपूर्ण  देशातील रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. एका रुग्णाच्या मागे त्यांचे एक-दोन तरी नातेवाईक, मित्र  सोबत आलेले असतात. माझ्या सोबत कधी कुसुम येत होती तर कधी करुणा येत होती. आरवला घरी पाहण्यासाठी कोणीतरी घरी राहावे लागत असे. एखाद्यावेळी गरज असली तर पुण्याहून संघशील पण येत होता. प्रज्ञाशील त्यावेळी  खूप लांब दुर म्हणजे लुधियानाला  होता. तरीही  पण तो सुट्ट्या काढून येत होता.  प्रत्येक डिपार्टमेंटच्या  कॅाऊटरला रांग लावावी लागायची. नंबर लवकर लागत नव्हता. त्यामुळे त्रासून जात होतो.  येथे उपचार घेणारे दोन प्रकारचे रुग्ण असायचे. एक खाजगी व दुसरा सामान्य.  खाजगी रुग्णांना जास्त दर असायचे  तर त्यामानाने सामान्य रुग्णांना कमी दर आकारले जात असे.  डॅाक्टरची तपासणी,  रक्त तपासणी, औषधालय, स्पेशल रुम ह्या सोयी  खाजगी रुग्णांना अग्रक्रमाने दिल्या जायच्या. लोकांची गर्दी ही दोन्हीही ठिकाणी असायची. पण  सामान्य रुग्णांच्या मानाने खाजगी ठिकाणी  गर्दी कमी असायची.

आता नाना प्रकारच्या तपासण्या सुरू झाल्या होत्या. काय म्हणतात ते पिएफटी, टु डी इको, चेस्टची तपासणी,  ऐकू येते की नाही  त्याची तपासणी,  घशाची तपासणी,  ब्रेनचे एमआरआय, एक्स रे, सोनोग्रॅफी, छातीची तपासणी,  रक्ताच्या तपासण्या,  पिईटी स्कॅन, स्पिच थेरॅपिस्ट, पिजीओथेरेपी, किती पळतो त्याचीही तपासणी, घशात दुर्बीण टाकून तपासणी, अनेस्थेशिया डिपार्टमेंटची तपासणी,  लंगचा आकार व क्षमता वाढविण्यासाठी पिजीओथेरेपी विभागाने काही व्यायाम शिकविले होते ते करणे, स्पिरोमीटरचा वापर करून जास्तीत जास्त श्वासोच्छ्वास आत-बाहेर घेण्याचा सराव करणे या सर्व तपासण्या ऑपरेशनकडे घेऊन जाणा-या होत्या, हे मला कधीचच कळून चुकलं होतं. आता  ऑपरेशनची तारीख २६.११.२०१५ ही निश्चित झाली. त्यासाठी दि. २४.११.२०१५ रोजी भरती झालो. माझे तिनही मुले- प्रज्ञाशील,  डॅा. संघशील,  करूणा,  पत्नी- कुसुम  व लहान भाऊ- डॅा. अजय असे सारेजण माझ्याजवळ दवाखान्यात  राहत  होते. माझी काळजी घेत होते. येणार-जाणारे भेटून जात होते.  स्पेशल रुम होती ती. त्याचे भाडेच रोजचे ६५०० रुपये होते. त्यावरून कल्पना करता येईल की, या आजारासाठी किती खर्च झाला

असेल ! ऑपरेशन आणि दवाईचा खर्च पण मोठाच होता. प्रज्ञाशील मित्रांकडून कर्ज घेऊन हा खर्च भागवित होता. संघशील पण मदत करीत होता.  दवाखान्यातील  जेवणात तिखट-मिठ खूप कमी टाकत. त्यामुळे माझ्या जिभेची चवच बदलून गेली होती. जेवावसं वाटत नव्हतं. फारच चवहीन वाटायचं. 

कुसुम किंवा मुलगी मला सोडून सर्वांसाठी डब्बा घेऊन येत होते. मला घरचा  डब्बा खाता येत नव्हता. थोडीसी भाजी मासल्यापुरती देत. घरची भाजी ह्या दवाखान्यातल्या भाजीपेक्षा  चवदार वाटत होती. ऑपरेशनची मला खुपच भीती वाटत होती. कुटुंबातील सारेजण  धिर देत होते. माझ्या कुटुंबात डॅाक्टर्स असल्याने त्यांचाही प्रामुख्याने आधार  वाटत होता. त्या दिवशी सकाळी दोन  नाव्ही  आलेत.  माझ्या शरीरावरील  केसं काढतांना जसे फाशी देण्यापूर्वी  कैद्यांची तयारी करतात,  तसेच मलाही वाटायला लागले.  मला आता तीव्रतेने  जाणीव झाली की,  माझी या ऑपरेशनमधून  सुटका नाही. सकाळी वार्डबॅायने व्हिलचेअरवर बसवून मला घेऊन गेला. मी निघतांना ‘घाबरू नका’ म्हणून मला घरचे लोक समजावीत होते. माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं करण्याचा प्रयत्न करीत होते. ऑपरेशन  थियटरच्या दरवाज्याजवळ  रुग्णांच्या रांगेत मला आणून सोडले. आता येथे कुणाही रुग्णांचे नातेवाईक हजर नव्हते. प्रत्येकाला एकट्यालाच आणून  सोडले होते. ती अवस्था भयान अशी वाटत होती. वाळवंटात सापडल्यासारखी  गत झाली होती. दुष्मनावर पण अशी परिस्थिती ओढवू नये असे मनात वाटत होते. दु:ख हे आपलं आपल्यालाच भोगावे लागते, असं म्हणतात  तेच खरं आहे. मला कुसुमच्या कानाचे ऑपरेशन झाले होते, तो प्रसंग आठवला. संघशील त्यावेळी जे.जे.मेडिकल कॅालेजला शिकत होता. आम्ही नाशिकला होतो. तिला पण ऑपरेशनला माझ्यासारखेच स्ट्रेचरवर झोपवून  घेऊन गेले होते. खरंच तिच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल. ती नाही घाबरली त्या ऑपरेशनला, तर  मीच कशाला घाबरू? असे माझ्या मनाला समजावित होतो. मला व्हिलचेअरवरून उतरवून स्ट्रेचरवर झोपविण्यात आले. माझ्या रांगेतला एक लहान मुलगा खुपच रडत होता. त्याचा केविलवाणा आकांत  पाहून माझं  मन तिळतिळ  खचत होतं. एकेकांना आतमध्ये घेऊन जात होते. पिंज-यातील कोंबडे जसे आपल्या मानेवर फिरणाऱ्या सुरीची वाट पाहत असतात, तसंच काहीसं वाटत होतं. थोड्या वेळाने माझेही स्ट्रेचर आतमध्ये नेले. ऑपरेशनच्या टेबलवर झोपवले. जीवनात मी हा प्रकार पहिल्यांदाच पाहत होतो. मला भुल देण्यात आली. नंतर डॅाक्टरांनी  काय केले ते माहित नाही. पण मला उठवले;  तेव्हा झोपेतून जाग आल्यासारखे  वाटले. डॅाक्टर म्हणालेत, ‘झाले ऑपरेशन.’ मला कमाल वाटली. त्यांनी माझ्या  गळ्याला चिर मारून ऑपरेशन केल्याचे नंतर मला कळले. कँसरच्या गाठी आणखी कुठे पसरल्या तर नाही ना व ती गाठ काढायची की गाठीचा लंग समुळ काढायचा हे पण या ऑपरेशनमुळे ठरवणे निश्चित झाले.  या ऑपरेशनमध्ये काही दिवसापूरती  माझी वाचा बंद झाली होती. पाच दिवस भरती होतो. हे सर्व सोपस्कार  झाल्यावर किमोथेरपीची ट्रिटमेंट तिनदा देण्यात आली. यामुळे  माझी पुतनी गुडिया हिच्या  लग्नाला आम्ही  चंद्रपूरला जाऊ शकलो नाही. फक्त प्रज्ञाशीलचं कुटुंब तेवढं या लग्नाला गेले होते. आम्ही लग्नाला न आल्यामुळे बहुतेक नातेवाइकांना माझ्या आजारपणाची बातमी कर्णोपकर्णी पोहचली होती.

परत दुस-या ऑपरेशनसाठी तपासण्या सुरू झाल्यात. खरं म्हणजे या तपासण्याचा मी धसकाच घेतला होता. हे ऑपरेशन दि.१६ फेब्रुवारी २०१६ रोजी करायचे ठरले. त्यासाठी पाच दिवसापासून भरती झालो होतो. या ऑपरेशनमध्ये डाव्या बाजूचा लंग पुर्णपणे काढण्यात आला. आता एकच तेवढा उजव्या बाजुचा लंग शिल्लक राहीला होता. ऑपरेशन झाल्यावर मला आयसीयुमध्ये नेत असतांना बाहेर मुलं, लहान भाऊ व कुसुम थांबले होते. या आयसीयूत खूप रुग्ण होते. तो हॅाल पुर्ण खचाखच भरून गेला  होता. नवीन रुग्ण  आणत. जुने दुस-या हॅालमध्ये  हलवत. कुणी त्यातले मरत. माझ्या बाजूचा एक रुग्ण मेल्याचे मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले. त्यावेळी छातीत धस्स् झाले होते. एक लहान मुलगा खूप रडत होता. त्यामुळे त्याच्या आई-बाबाला त्याच्याजवळ राहण्याची परवानगी दिली होती. बाकी रुग्णाजवळ कुण्या नातेवाईकांना येऊ देत नसत. तसे अधून मधून भेटायला येऊ देत. डोळ्याला न झेपणारा प्रखर उजेड, प्रत्येक रुग्णांना जोडलेल्या मशीनचा कानावर आदळणारा  विचीत्र आवाज, निरनिराळ्या वयोगटातील दु:खात बुडालेले  पेशन्ट पाहून  दम कोंडल्यासारखे झाले होते. मी पुरता घाबरलो होतो. मला माझ्या रूममध्ये शिफ्ट करा, या गदारोळात मी नाही राहू शकत,  म्हणून तेथील डॅाक्टरांच्या मागे लागलो. पण ते ऐकत नव्हते. माझ्याही घरात सध्या येथे हजर असलेले दोन डॅाक्टर आहेत. माझा लहान भाऊ व मुलगा…  माझी काळजी घेतील ना ते !  अशी त्यांना सारखी विनवणी करीत होतो. मला लघवी पण दाटून आली होती. पण बेडवरील भांड्यात  करणे  अवघडल्यासारखे वाटत होते. शेवटी त्यांना काय दया आली काय माहिती? माझ्या भावाला बोलाऊन घेतले.  त्याच्याकडून लेखी लिहून घेतल्यावर मला माझ्या रूममध्ये  शिफ्ट केले. लघवी बंद झाल्याने नळी टाकली होती. सलाईनसाठी लागणारा आयव्ही माझ्या हाताला भरती झालो तेव्हापासूनच लावला होता. ऑपरेशनमुळे आवाज घोघरा झाला होता. स्पष्टपणे बोलता येत नव्हते. दम वाढला होता. म्हणून  मधून मधून दमासाठी नेब्युलाइज़र तोंडाला लावे लागत होते, इन्फेक्शन होऊ नये म्हणून तोंडाला मास्क बांधून घ्यावे लागत होते. पाणी पिता येत नव्हते. ज्युस जसे पितात तशी नळी गिलासात टाकून पाणी प्यावे लागत होते. ठसका लागू नये म्हणून ही काळजी घ्यावी लागत होती. आता एकाच लंगवर काम सुरू झाले होते. म्हणून खूप काळजी घ्यावी लागत होती. ठसे जमा होऊ नये म्हणून मला जबरदस्तीने खोकलायला सांगत होते. माझ्या पाठीला ठोकायला सांगत होते. स्पिरोमीटरचा वापर  दर तासाने करायला सांगत होते. खोलीबाहेर फिरून यायला सांगत होते. असे कितीतरी परिणाम अनुभवाला आले होते.  

मी ऑपरेशनसाठी १४ फेब्रुवारी २०१६ ला भरती झालो होतो आणि  डिसचार्ज ३ मार्चला मिळाला. जवळपास अठरा  दिवस बरा होईपर्यंत भरती राहलो होतो. माझी केस आता आँकॅालॅाजी सर्जनकडून आँकॅालॅाजी मेडिसीनकडे आली होती. पंधरा दिवसांनी  मला रेडियेशन देण्यासाठी संबंधित डॅाक्टरकडे पाठविले.  पण माझी  तब्येत त्यावेळी  जास्तच  बिघडलेली दिसल्याने  त्यांनी रेडियेशन दिले नाही. त्यावेळी माझ्या अंगात कमालीचा  ताप भरला होता. अशक्तपणा वाढला होता. त्यामुळे  व्यवस्थित उभे राहता येत नव्हते की  चालता येत नव्हते. अशाही परिस्थितीत कुसुमने मला करुणाच्या घरी कशी घेऊन आली असेल, त्याची कमालच वाटली. खोकला आणि तापाने बेजार झालो होतो, इतके की ठाण्यातील खाजगी दवाखान्यात जाण्यासाठी अंगात त्राण उरला नव्हता. म्हणून डॉक्टरांना जास्तीचे पैसे देऊन घरीच बोलावले होते.   आणखी एक आठवणीत राहण्यासारखी गोष्ट म्हणजे ऑपरेशनच्या वेळेस विकत आणलेल्या काही महागाच्या औषधी व ऑपरेशनचे साहित्य  वापरात न आल्यामुळे हॅास्पिटलला परत करून रिफंड घ्यायचे होते. करुणाने या कामासाठी जायची तयारी केल्याने टाटाचे स्मार्ट कार्ड  देण्याच्या ऐवजी तिला आजाराच्या भरात व्हेकल लायसेन्स दिले. कारण दोन्ही  कार्ड सारखेच दिसत असल्याने ही चुक लक्षात आली नाही.  दवाखान्यात गेल्यावर हा घोळ  लक्षात आला. त्यांनी टाटाच्या कार्ड शिवाय औषधी परत घ्यायला नकार दिला. म्हणून तिला काम न होताच घरी येवून परत दुस-या दिवशी त्याच कामासाठी  जावे लागले.  माझ्या चुकीमुळे तिला घर  ते ठाणे रेल्वेस्टेशन अॅटोरिक्शाने, तेथून  दादर रेल्वेस्टेशन आणि पुढे  परेल येथील टाटा हॅास्पिटलपर्यंत टॅक्सीने असा जाण्या-येण्याचा त्रास  झाला होता. त्याबद्दल वाईट वाटत होते.  ही गोष्ट आठवली की, माझं मलाच हसू येते. आणखी एक गोष्ट नमुद कराविशी वाटते ती म्हणजे  या काळात टाटाने माझे कितीतरी वेळा रक्त काढले असेल, त्याची गणतीच नाही.  लघवीची नळी उशिरा काढल्याने  ती जागा आता खुपच दुखायला लागली  होती. म्हणून त्या व कँसरच्या पुढील उपचारासाठी प्रज्ञाशीलने लुधियानाला यायला सांगितले. मी व कुसुम दोघेही मुंबईहून विमानाने चंदिगडला गेलो. प्रज्ञाशील आम्हाला घ्यायला गाडी घेऊन आला होता. त्याच्यासोबत लुधियानाला गेलो. तेथील मेडिकल कॅालेजच्या हॅास्पिटलमध्ये उपचार घेतला. प्रज्ञाशीलने घरीच  सलाईन  देण्याची व्यवस्था केली होती. ही ट्रिटमेंट पंधरा दिवसाचे वर घेतली होती.  मुंबईला आल्यावर परत हॅास्पिटलच्या वा-या सुरू झाल्यात. यादरम्यान प्रज्ञाशीलने  माझ्या आजाराचे कारण दाखवून मुंबई येथे बदली करून घेतली. माझ्या ऑपरेशनची जागा खुपच  दुखायला लागली  होती. दवाखान्यात  जाऊन गोळ्या आणल्या. त्यावेळी मी प्रज्ञाशीलकडे राहत होतो. त्यादरम्यान मोदी सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यामूळे सगळीकडे हाहाकार माजला होता. जवळ असलेल्या ह्या नोटा चलनातून रद्द झाल्याने त्या बँकेत नेवून जमा करावे लागत होते. तेथेही मरणाची गर्दी राहत होती. बँकेतून व  एटीएममधून पैसे काढायला मर्यादा आल्या होत्या. एटीएममधून फक्त २५०० रुपये काढता येत होते. त्यातही दोन हजाराची एक नोट बाहेर यायची. ही नोट कुणाकडे चिल्लर राहत नसल्याने कुणीही घेत नव्हते. मग अशी नोट ज्या ठिकाणी नसेल अशा एटीएमची शोधाशोध सुरु करावी लागत होती. पैसे काढणा-यांची खूप मोठी रीघ लागत होती. मोठे हाल झाले होते. दिवसा प्रज्ञाशीलला वेळ मिळत नव्हता. म्हणून तो व सुन किरण हे दोघेही लहानग्या प्रतिकला झोपवून पैसे काढायला तेवढ्या रात्री जात. प्रतिकची गंमत सांगतो.  प्रज्ञाशील मला दुकानातून औषधी-गोळ्या आणून देत होता, हे प्रतिकला माहिती होते. तो जेव्हा-केव्हा  त्याच्या आई-बाबासोबत बाहेर जायचा;  तेव्हा मी त्याला म्हणायचो, ‘प्रतिक माझ्यासाठी काय आणशील?’ तेव्हा तो, ‘तुम्ही गोळ्या खाता ना… मग तुमच्यासाठी गोळ्या आणतो’ असे निरागसतेने म्हणायचा. तेव्हा आम्हाला हसू यायचं. नंतरच्या काळात कँसरचा आजार  आटोक्यात येत गेला.  पण टाटाची वारी मात्र  थांबली नव्हती. कारण आधी  दर तिन महिन्यांनी व आता  सहा महिन्यांनी  फॅालोअप सुरू झाले. यात रक्त तपासणी व सिटी स्कॅनचा रिपोर्ट पाहून डॅाक्टर महागड्या गोळ्या देऊ लागलेत. असा हा प्रवास जिवनभर  सुरू राहील असं वाटते. पण एक खरं की, आयुष्यातील उरलेले दिवसं सरकत जातांना गाण्यातील ओळीप्रमाणे ‘माझ्या जगण्याला पंख फुटले’ असं म्हणायला काही हरकत नाही.

मी या रोगाची तमा न बाळगता पुर्ववत  दैनंदिन कामात गुंतून गेलो. विशेष म्हणजे परत कार ड्रायव्हिंग करायला लागलो. पुणे, मुंबईला पण दोन-तिनदा कार घेऊन गेलो होतो. कारण कारने जाणे फारच सोईचे होते. जाग्यावर जाता येते. कुठेही फिरता येते.  कितीही सामान असलं तरी प्रॅाब्लेम येत नाही. फक्त मध्ये एक रात्रभर हॅाटेलमध्ये  थांबून आराम करणे गरजेचे असते. कारण २५०-३०० किलोमीटरच्यावर न धांबता ड्रायव्हिंग  करणे फारच जड जाते. त्याशिवाय रात्रीच्या प्रवासात समोरून येणा-या गाड्यांच्या प्रखर प्रकाशाने डोळे दिपून जातात. म्हणून आम्ही मध्ये एक मुक्काम करीत असतो. 

एकदा मी व कुसुम असे दोघेही दि. १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगावला भेटून जायचं म्हणून अकोल्यावरून कारने आदल्या दिवशी निघालो. परंतु जवळ आल्यावर  आम्हाला कोरेगावच्या स्तंभापर्यंतच्या रोडने  पोलिसांनी जाऊ दिले नाही. तर आम्हाला सिकरापूर-चाकन मार्गाने गाडी वळविण्यास सांगितले. त्यांना मी सागीतले  की, आम्हाला शौर्य स्तंभापर्यंत जायचे आहे, पण त्यांनी क्षणभर सुद्धा थांबण्यास मनाई केली. तेथे गेलेल्या लोकांवर  हल्ला होत असल्याचे लोकांकडून नंतर आम्हाला  कळले. म्हणून पोलिस तेथे जाऊ देत नव्हते. यामुळे  सरळच्या रोडने पुण्याला न जाता  सिकरापूर-चाकन मार्गाने जावे लागले.  या मार्गाने सुद्धा गाड्या अडवून दगडफेक करण्यात आले होते व गाड्यांचे काचं फोडून आतील सामान बाहेर फेकून लुटालूट करण्यात  आल्याचे  लोकांनी सांगितले होते.  त्यामुळे आम्हाला मध्येच  थांबावे लागले. नंतर पोलिस आल्यावर हे समाजकंटक पळाल्याचे कळले. पण या रोडने ट्रॅफिक जॅम झाली  होती. या रोडने यायला सहा तासाच्यावर वेळ लागला होता. आमच्यासारखेच  दुरदुरून  कार, ट्रॅक्स, ट्रॅव्हल बसेस घेऊन आलेल्यां लोकांना  न पाहता परत जावे लागले होते. असे प्रकार करणारे निश्चितच जातीयवादी समाजकंटक होते. या ठिकाणी १४४ कलम लाऊन लोकांना जमण्यास मनाई करण्यात आली होती. तसे आम्ही  आदल्या वर्षी पुण्याला असतांना  संघशील आम्हाला  भिमा कोरेगावला त्याच्या कारने  घेऊन गेला होता. त्यावेळी आमच्या सोबत नुतन, सिद्धांत व ईशान पण आले होते.

असाच एक दाहक अनुभव मला एकदा आला होता. आम्ही, मी व कुसुम असे दोघेही बरेचदा ६ डिसेंबरला चैत्यभूमीला जावून आलो. त्या दिवशी चैत्यभूमी व शिवाजी पार्क या परिसरात होणाऱ्या गर्दीची मला कल्पना आहे. त्या परिसरात फिरून तेथील माहोल पाहतांना भारावून गेल्यासारखे वाटते. तेथील पुस्तकांचे स्टॅाल, सीडी-कॅसेटवर वाजणारे भीम-बुद्ध गीते, जयभीमचे स्टीकर, लॉकेट, मुर्त्या, फोटो, कॅलेंडर असे सटरफटर वस्तू विकणारे छोटेछोटे दुकाने, भजनी मंडळे, लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोंढे, बाबासाहेबांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी लागलेली लांबच लांब रांग हे सारं काही पाहून मन उचंबळून येते. एवढेच नव्हेतर तेथे जाऊन एक प्रकारची वेगळीच उर्जा आपल्या जीवनात खेळत असल्याची जाणीव होते. दैनंदिन जीवन बाजूला सारून हा माहोल वेगळ्याच दुनियात घेऊन जात असल्याचे क्षणोक्षणी जाणवते. असाच माहोल दसऱ्याला नागपूरच्या दीक्षाभूमीला पण दिसून येते. ऐरवी जीवनात खूप प्रवास केला. पण हा प्रवास मला काही वेगळाच अनुभव देऊन गेला. म्हणून मी तो मांडत आहे.

आम्ही नोव्हेंबर २००२ च्या शेवटी चेन्नई, कन्याकुमारी, कोडाईकॅनाल अशा प्रेक्षणीय स्थळी फिरायला गेलो होतो. परत येतांना चंद्रपूरवरून नाशिकला यायचं ठरविलं होतं. ६ डिसेंबरला मुंबई येथे चैत्याभूमिला जाणाऱ्यांची गर्दी वाढत असते. अशाच गर्दीमध्ये आम्ही त्यादिवशी सापडलो होतो.

मुंबईला फुकट जायची सोय असल्याने समाजातील गोरगरीब वर्ग दूरदूरच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात यावेळी जात असल्याचे दिसून येते. त्यात हवसे, गवसे, नवसे असणारच ! ‘जयभीम बोलो अन् फुकटमे चलो’ अशी एक म्हण त्यामुळेच पडत चालली आहे, असे म्हणतात. आता यात इतरही समाजाच्या लोकांची केवळ मुंबई पाहायला जाणाऱ्यात भर पडली आहे. आंबेडकर अनुयायी जसे चैत्यभूमीला जातात, तसेच इतरही जातीधर्माचे लोक त्यांच्या समाजाच्या अधिवेशनाला किंवा आंदोलनाच्या मोर्च्याला हातात झेंडे घेऊन व बिल्ले लाऊन फुकटपणे जात असल्याचे सर्रासपणे दिसत आहे. चंद्रपूरच्या रेल्वेस्थानकावर बाबासाहेबांच्या चित्राचे बिल्ले विकणारे लोकांना सांगत की, ‘तीन रुपयात मुंबईला जा व ऐश्वर्याराय, शाहरुखखान व अमिताभ बच्चन यांना पाहून या.’ हे बिल्ले लावणाऱ्यांची अलोट गर्दी पाहून रेल्वेचे टी.सी.पण कधीच विचारणा करीत नाहीत, हे जाणाऱ्यांना माहित असते. म्हणून लोक हे बिल्ले त्यांच्याकडून विकत घेत असल्याचे दिसले.

गाडी फ्लॅटफॅार्मवर आल्यावर रिझर्वेशन असूनही त्या गर्दीत सहजपणे चढता आले नाही. गर्दी थोडी कमी झाल्यावर आम्ही कसेतरी चढलो. त्या धामधुमीमध्ये माझा चष्मा पडला होता. गाडीत बसल्यावर माझ्या हाताची घड्याळ पण गायब झाल्याचे कळले. आम्हाला सोडायला आलेला माझा भाऊ, अजय सांगत होता की, एकदा त्याची स्लीपर व जोडा सुद्धा ट्रेनमधून गायब झाला होता.  

गाडी सुरु झाली. अंधार पडत चालला. गाडीत इतकी गर्दी वाढली की, उभे असलेल्या लोकांना पाय ठेवायला जागा राहिली नव्हती. माझे रिझर्वेशन असल्याचे लोकांना सांगितल्यावर आम्हाला आमच्या सीटवर बसायला जागा मिळाली. बाजूचे लोक सांगत होते की गाडी थांबली की, खिडक्या बंद करीत जा, दरवाजा उघडू नका. कारण बाहेरचे लोक दगडं मारतात. मला खरं वाटत नव्हतं. पण खरोखरच गाडी फ्लॅटफॅार्मवर येवून थांबली की, बाहेरच्या लोकांची आरडाओरडा ऐकू यायची. कुठे कुठे रेती, गिट्टी, मातीसारखे सारखे वस्तू फेकून मारीत. गाडी फक्त दोन मिनिटे थांबत असल्याने गाडीत चढायची लोकांची खूप घाई होत होती. त्यातच गाडीत बसलेले लोक, गर्दी आणखी वाढेल म्हणून दरवाजे उघडायला पाहत नव्हते. त्यामुळे बाहेरचे लोक चिडायचे. आरडाओरडा करून हातात जे मिळेल ते खिडकीतून फेकून मारीत होते. असे म्हणतात की, रेल्वेमध्ये माणसांची स्वार्थी मानसिकता नेमकी उघडी पडते. बाहेरील व्यक्ती आतमध्ये घुसण्यासाठी मोठा आटापिटा करीत असतो. धक्केबुक्के खाऊन कसातरी आतमध्ये घुसतो. एकदा का आतमध्ये गेला की, आता आतमध्ये कुणी येऊ नये असे त्याला वाटायला लागते.

माझ्या बाजूला एक मुलगी बसली होती. दहावी शिकून तिने शाळा सोडली असल्याचे तिने सांगितले. मी तिला विचारले, ‘कुठे चालली?’ ती- मुंबईला. मी- मुंबईला कुठे? ती चूप होती. म्हणून मीच म्हटले, मुंबई म्हणजे चैत्यभूमीला ना? तिने मान हलवली. मी- तिथे कशाला चालली? तिला काही आले नाही. मीच तिला म्हणालो, ‘बाबासाहेबांना अभिवादन करायला ना… तिने मान हलवली. ‘ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला हिंदुच्या अन्याय-अत्याचारातून मुक्त केले, त्यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले, त्या ठिकाणी तू चालली ना…’ तिने परत मान हलवून सहमती दर्शवली. मी- तू तिथे गेल्यावर काय घेऊन येणार आहेस? ती काहीच बोलली नाही. मी- तू तेथून पुस्तके घेऊन ये. ते तू वाच व इतरांना वाचून सांग. तू शिकलेली आहेस. इतके काम तर तू करू शकशील ना? तिने मान हलवून हो म्हटले. माझे हे संभाषण बाजूचे लोक ऐकत होते.

असेच आम्ही एकदा नाशिकहून दीक्षाभूमी नागपूरला दसऱ्याला गेलो असतांना काही उन्मत मुले फालतूच आरडाओरडा करून इतरांना त्रास देत होते. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, आपण बौद्ध धम्म स्वीकारला आहे. बौद्धधम्म हा शांतताप्रिय धम्म आहे. करुणा आणि बंधुत्वाची त्यात शिकवण आहे. म्हणून आपण कुणाला त्रास होईल असे वागू नये. हे ऐकून सारेजण शांत झाल्याचे दिसले. मग मी त्यांना चळवळीतील काही महत्वाचे मुद्दे सांगत गेलो. प्रामुख्याने शासनकर्ती जमात बनणे व भारत बौद्धमय करणे या दोन मुद्यांबाबत त्यांना अवगत केले. बाबासाहेबांचे हे दोन अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर सोडून ते गेलेत. याची जाणीव त्यांना करून दिली. माझ्या बाजूला एक वयस्कर बाई बसली होती. तिला मी विचारले, ‘तुम्ही दरवर्षी दीक्षाभूमीला जाता का?’ ती व इतर साऱ्याच बाया-माणसांनी होय म्हणून मोठ्या अभिमानाने सांगितले. मी- मग तुम्ही तेथून पुस्तके विकत आणता की नाही ? ‘हो. तर. दरवर्षी पुस्तके विकत आणते आणि घरी आल्यावर माझ्या नातुंना वाचायला सांगते.’ अशी एक बाई म्हणाली. आता गाडीतले वातावरण अगदी खेळीमेळीचे झाले होते. त्याचवेळेस असाच एक रिझर्वेशनवाला आला आणि त्याने वरच्या बर्थवर बसलेल्यांना उठवले. शांतताप्रिय उपदेशाचा डोज पाजल्याने ते बिचारे मुकाट्याने उठलेत. मी त्याला  रिझर्वेशनची तिकीट मागितली. कारण त्या बर्थचे रिझर्वेशन मी केलेले होते. म्हणून मला संशय आला. तेव्हा त्याची तिकीट पाहून त्याला सांगितले की तुमचे रिझर्वेशन या कोचमध्ये नसून दुसऱ्या कोचमध्ये आहे. तेव्हा तो वरमला. मोठ्या मुश्किलीने तो गर्दीतून वाट काढून तो इथपर्यंत आला होता. पण त्याला त्याच गर्दीतून दुसऱ्या कोचमध्ये जाणे फार अवघड असल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते. तो गेल्यावर उठलेल्या लोकांना पुन्हा बसायला सांगितले. त्यामुळे लोक हरखून गेले होते.

त्यावेळी नागपूरला जातांना-येतांना काही वाटले नाही. परंतु आता मात्र या गाडीत एक प्रकारची अनामिक भीती वाटायला लागली होती. गाडी बडनेरा या स्टेशनवर आली. त्यावेळी रात्रीचे बारा वाजले होते. खिडक्या दरवाजे बंद होते. आतमध्ये माणसांची तुफान गर्दी… त्यामुळे दम कोंडल्यासारखे वाटत होते. गाडी बऱ्याच वेळपर्यंत थांबली होती. काय कारण होतं, ते काही कळत नव्हतं. आतमधील लोक दरवाजे उघडीत नव्हते. बाहेरचे लोक खिडक्यांना ठोकत असल्याचा आवाज येत होता. बहुतेकांनी काचेच्या तावदानाशिवाय पत्र्याचे शटर सुद्धा बंद केले होते. एका खिडकीची नुसती काचेची शटर लावली होती. पत्र्याचे शटर बंद करण्याचा प्रयत्न सुरु होता. पण लागत नव्हती. बाहेरून त्या खिडकीची काच फोडण्याचा प्रयत्न सुरु होता. हा प्रकार पाहून मी खुपच घाबरलो. गाडीतील सर्वांचे लक्ष या खिडकीकडे लागले होते. प्रत्येकजण या खिडकीपासून दूर जाण्याच्या प्रयत्नात होते. काही लोक माकडासारखे वर लटकत होते. माझ्या मनातली भीती आणखी वाढत होती. शेवटी काच फुटली. त्याचबरोबर दगड,माती, गिट्टी-खड्यांचा वर्षाव सुरु झाला. त्या माऱ्यापासून सारेजण स्वत:ला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. तरीही काही लोकांना मार लागतच होता. गाडी कधी सुरु होते याचीच सारेजण आतुरतेने वाट पाहत होते. गाडी सुरु झाल्यावर या प्रसंगातून सुटका होईल असे वाटत होते. परंतु गाडी मक्खपणे तिथेच खिळून बसली होती. आतातर कहरच झाला. बाहेरचा एक व्यक्ती आगपेटीची काडी पेटवून खिडकीच्या आतमध्ये फेकत होता. अशा चार-पाच जळत्या काड्या त्याने फेकल्या होत्या. त्यामुळे आग लागून आतील लोक जळून खाक होतील की काय या कल्पनेने माझे आंग शहारून गेले. याचवर्षीच्या सुरुवातीला घडलेला गुजरातचा गोधरा कांड आठवला. येथे ५९ लोक रेल्वेच्या डब्ब्यात जळून खाक झाले होते. या आठवणीने माझं संपूर्ण शरीर थरथर कापायला लागले. छाती धडधड करीत होती. श्वाशोश्वास कमालीचा वाढला होता. घसा सारखा कोरडा पडत होता. राहून राहून पाणी पीत होतो. तरी घसा कोरडाच राहत होता. अत्यंत भीतीदायक असा तो प्रसंग होता ! रेल्वेत अशा प्रकारचा प्रसंग मी पहिल्यांदाच पाहत होतो. लोकांना ओरडून ओरडून सांगत होतो की, दरवाजा उघडून द्या. नाहीतर आगीने आपण सारेजण मरून जाऊ. पण कोणीच ऐकत नव्हते. दरवाज्याजवळ जाऊन दरवाजा उघडून द्यायची कुणाची हिंमत होत नव्हती. काहीजण म्हणत की, दरवाजा उघडला की, बाहेरचे लोक आपल्याला मारतील. त्यापेक्षा दरवाजा उघडूच नका. काही लोक म्हणत की, असाच प्रसंग पुढील स्टेशनवर होण्याची शक्यता आहे. यातून कशी सुटका करून घ्यावी ते काही कळत नव्हतं. दरवाजा उघडणे हाच त्यावर एकमेव मार्ग होता. म्हणून मी शेवटी हिंमत करून दरवाज्याजवळ जायचा विचार केला. माकडासारखा वर लटकत लटकत दरवाज्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागलो. फुटलेल्या खिडकीतून जातांना बाहेरील कुणी माझा पाय ओढतील की काय अशी भीती वाटत होती. कसातरी दरवाज्याच्या जवळपास पोहचलो. तेथील उभे असलेल्या लोकांना सांगत होतो की, कृपाकरून दरवाजा उघडून द्या. बाहेरचे लोक दगडं फेकत आहेत. माचीसच्या जळत्या काड्या फेकत आहेत. तेव्हा ते लोक म्हणाले की, दरवाजा उघडला की, संपूर्ण भीड आतमध्ये येईल. ते लोक चिडलेले आहेत. दरवाजा उघडला का नाही म्हणून आल्याबरोबर ते आपल्याला मारायला लागतील. मी त्यांना म्हणालो की, मारू द्या. किती लोकांना मारतील? जळून खाक होण्यापेक्षा मार खाल्लेला बरा. ते म्हणत, थोडं थांबा. गाडी सुरु होऊ द्या. म्हणजे आपल्यावरील बला तरुण जाईल. मी म्हणालो, गाडी सुरु होईल तेव्हा होईल. त्याआधीच आग लागली तर काय करणार? असा माझा युक्तिवाद सुरु असतांना एका धडधाकड मुलगा समोर आला. त्याला माझे म्हणणे पटलेलं दिसले. त्याने सर्वांचा राग ओढवून दरवाजा उघडला. त्याचक्षणी बाहेरचा लोंढा आतमध्ये घुसला. आतातर डब्बा खचाखच भरून गेला. मी कसाबसा कसरत करीत माझ्या जागेवर येऊन बसलो. मी मिसेसला म्हणालो, आपण येथेच उतरून जाऊ. पुढे जाऊ नाही. मला खुपच भीती वाटत आहे. मला धडकीच भरली आहे. सामान नेता आले तर पाहू नाहीतर येथेच ठेऊन देऊ, जीव वाचला तर भरपूर झाले. सामानाचं काय? सामान कमविता येईल. पण जीव कमाविता येणार नाही. तरीही सामान नेता आले तर पाहू. मी मग सामान आवरायला लागलो. आमची हालचाल पाहून आमच्या शेजारच्या जोडप्यांनी सुद्धा आमच्या सोबत बडनेरा येथे उतरायची तयारी केली. मी पुढच्या लोकांना सांगत होतो की, आम्हाला येथेच उतरायचे होते. परंतु दरवाजा न उघडल्यामुळे आम्हाला बाहेर पडता आले नाही. तरी कृपा करून आम्हाला येथे उतरू देण्यास मदत करा. माझी विनवणी ऐकून माझं सामान  त्यांनी पकडून समोरच्या लोकांकडे देत आम्हाला खाली उतरविण्यास मदत केली. आम्ही खाली उतरलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. आम्ही खाली उतरत नाही तर दरवाज्याजवळ धक्काबुक्की सुरु झाली होती.

आम्ही गाडी सुरु होईपर्यंत आपसात बराच वेळ तेथे बोलत राहिलो. कारण एवढ्या रात्री कुठेच जाता येत नव्हते. ती रात्र तेथेच रेल्वे स्टेशनवर काढावी लागणार होती. माझी मिसेस सांगत होती की, बाहेरचा एक मुलगा हातात वीट घेऊन माझ्या समोरच्या मुलीला सारखा म्हणत होता की, ‘तेरी मा की xxx. खोलती की नहीं? मारू क्या? असं हात उगारून तो तिला म्हणत होता. आमच्या सोबत उतरलेले जोडपे हिंदी भाषिक होते. ते सुद्धा खूप घाबरले होते. त्यांना मुंबईला जायचे होते. ते म्हणाले की, ये बुद्ध लोग गंधे होते है क्या? मी म्हणालो, ये गंधी हरकते करनेवाले लोग बुध्द नही है ! ये दुसरे जातीके लोग है ! वो सिर्फ बॉम्बे देखने जा रहे है ! कोणीतरी म्हणाले की, ज्यांनी तिकीट काढली त्यांना पैसे वापस मिळत आहे. म्हणून तिकीटचे पैसे  परत घेण्यासाठी स्टेशनमास्तरकडे गेलो. तेथे कळले की, आमच्यासारखे आणखी बरेच लोक तिथे उतरले होते किंवा ही धामधूम पाहून बडनेरा येथून कोणी गाडीत बसले नव्हते. ते सारेजण या लोकांच्या नावाने बोटं मोडून संताप व्यक्त करीत होते. मला मात्र त्यांचे असे बोलणे जिव्हारी झोंबत होते. मी त्यांना म्हणत होतो की, ‘असा गोंधळ करणारे लोक हे आंबेडकरी अथवा बौध्द असूच शकत नाहीत. त्यांच्या नावाने मुंबई पाहता यावी म्हणून इतर लोक जात आहेत आणि तेच लोक बौद्धांना बदनाम करण्याकरिता असा धिंगाणा घालत आहेत. हे मी चंद्रपूरला गाडीत बसलो तेव्हाच कळले होते. मला सांगा, आपल्याच आई-बहिणींना घाणेरडे शिव्या कोणी देऊ शकतील काय?’

मी तेथे हजर असलेल्या टी.सींना म्हणालो की, तुम्ही पोलीस बंदोबस्त का ठेवीत नाहीत. तुमचे रेल्वेचे पोलीस पण येथे दिसत नाहीत. तो म्हणाला, पोलीस काय करणार? हेच लोक पोलिसांना मारतील…  मी म्हणालो, गुंड प्रवृतीचे दोन-चार लोक असतात. तेच संपूर्ण लोकांना वेठीस धरतात. अशा लोकांना पोलिसांनी आवरले पाहिजे ना… गाडीतील लोकांना दरवाजा उघडायला भाग पाडायला पाहिजे, म्हणजे असा प्रकार होणार नाही. परंतु कुणीही माझ्या म्हणण्याकडे फारसे गंभीरतेने पाहत असल्याचे दिसले नाही.

म्हणून आता आंबेडकरी संघटनांनीच लोकांची जीवित हानी व सामाजिक बदनामी टाळण्यासाठी पुढे आले पाहिजे असे मला वाटले. निदान संवेदनशील ठिकाण जे आहेत तेथे तरी स्वयंसेवकांची व्यवस्था करायला पाहिजे. रेल्वे पोलिसांना सोबत घेऊन लोकांना सुखरूपपणे प्रवास करण्यासाठी आपल्या स्वयंसेवकांनी मदत करावी म्हणजे गोधरा सारखी आणखी एक दु:खद आणि हादरा देणारी घटना भविष्यात घडणार नाही.

चैत्यभूमी अथवा दीक्षाभूमी येथे जेव्हा केव्हा मी रेल्वेने गेलो; तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, गोरगरीब जनताच मोठ्याप्रमाणात या पवित्र ठिकाणी जात असतात. सुखवस्तू घरातील लोक क्वचितच रेल्वेने जातांना दिसतात. गेलेच तर चार चाकी गाड्यांनी जातात. म्हणून समाजातील जीव मुठीत घेऊन रेल्वेने प्रवास करणाऱ्या गोरगरीब जनतेला असे वाऱ्यावर व त्यांच्या परिस्थितीवर न सोडता त्यांना सुरक्षित व निर्भयपणे प्रवास करता यावा म्हणून प्रयत्न व्हायला पाहिजेत. रेल्वे प्रशासनाने आणखी जादा गाड्या सोडून गर्दी कमी होईल असे प्रयत्न करायला पाहिजेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाय करण्यासाठी रेल्वे प्रशासनावर दबाव निर्माण करायला पाहिजे असे मला मनोमन वाटले होते.  

याच दरम्यान मी “अशा तुडविल्या काटेरी वाटा” हे स्वकथन लिहायला घेतले. मी खेड्यात राहून लहानपणापासून  ते नोकरी लागेपर्यंत हलाखीच्या परिस्थितीत कसं शिक्षण घेतले, ते यात  रेखाटलं आहे. हे लिखाण मी rkjumle.wordprss.com या ब्लॉगवर टाकले होते. भारतातीलच नव्हे तर इतर देशातील मराठी भाषिक वाचकांनी सुद्धा त्यावर भरपूर प्रतिसाद दिला होता. 

सांगायला आनंद होतो की, हे पुस्तक १५ आगस्ट २०१८ रोजी डॉ. बबन जोगदंड संचालित स्वयंदीप प्रकाशन पुणे यांनी छापुन प्रकाशित केले. ते या पुस्तकावर अभिप्राय देतांना म्हणतात की, लेखकाने आत्मकथनाच्या माध्यमातून आपला जीवनप्रवास अत्यंत वास्तववादीपणे मांडला आहे. प्रत्येक कथा वाचतांना त्यांनी अनुभवलेलं दु;ख, वेदना आणि तत्कालीन परिस्थिती नजरेसमोर येते. ग्रामीण भागातील जीवन, तेथील भीषण जातीयता, दारिद्र याची दाहकता त्यांनी उलगडून दाखविलेली आहे. त्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत प्रगल्भ झाले आहे. यात मांडलेले अनेक प्रसंग हृदयस्पर्शी आहेत. त्यामुळे हे आत्मकथन वाचण्यात एक वेगळा आनंद आणि उत्सुकता दिसून येते. यातील मांडणी साधी, सरळ, सोपी आणि प्रेरणादायी अशी आहे. त्यामुळे एक सिद्धहस्त लेखक म्हणून आर.के.जुमळे हे या आत्मकथनाच्या माध्यमातून मराठी साहित्य प्रकारात विसावतील अशी खात्री डॉ. बबन जोगदंड यांनी व्यक्त केली आहे. 

या पुस्तकाला नांदेडचे लेखक डॉ. प्रा. राम वाघमारे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यांनी लिहलंय की, दिवसांनी एक अप्रतिम आत्मकथन वाचल्याचा आनंद झाला. दलित साहित्यामध्ये ‘आत्मकथन’ हा प्रकार जीवनाची दाहक वास्तवता सांगून समाजाला प्रेरित करण्याचे चांगले काम करते. बाबासाहेबांच्या पुण्याईने कित्येक काळापासून निद्रिस्त असलेला दलित समाज आज जागा झाला, नव्हे तर त्यांनी येथील विषमतेने, अन्यायाने बरबटलेल्या जातीवादी संस्कृतीला पायदळी तोडण्याचा चंग बांधला आणि याविरुध्द बंड पुकारले. प्रत्येक दलित आत्मकथा ही वेदनांचा हुंकार आहे. आत्मकथने माणसाला विचार करायला भाग पाडणारी आहेत. याच धाटणीतील आर.के.जुमळे यांची आत्मकथा आहे.  ‘बाटोडं माझं गाव ते पंछी बिछड गये’ हा त्यांचा पस्तीस कथांचा जीवनप्रवास वाचून नक्कीच त्यांच्या गावात गेल्याचा, तेथील माणसांना भेटल्याचा अन् जातीवाद पाहिल्याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. 

प्रस्तुत आत्मकथनात खूप छान प्रतिमा वापरल्या असून म्हणी व वाक्प्रचार यांचा अत्यंत खुबीने वापर केल्याने लेखण अधिक जिवंत झाल्याचे प्रत्ययास येते. त्यांचं हे पहिलंच पुस्तक असून पहिलं वाटत नाही. कारण त्यापूर्वी त्यांनी अनेक प्रकारचे प्रासंगिक लेखन केले असल्याने त्यांचे लेखन अधिक प्रभावी होऊ शकले असावे.”

‘अशा तुडविल्या काटेरी वाटा’ या पुस्तकावर अकोला येथील एस.व्ही.वासे यांनी समीक्षा लिहून तो दैनिक सम्राट मुंबई यांनी. दि. १७.११.२०१८ रोजी छापला. तसेच नागपूरचे मधुकर लांडगे यांनी सुध्दा समीक्षा लिहून तो दैनिक महानायक नागपूर या वृत्तपत्रात छापला. 

या पुस्तकात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असं लिखाण आहे. शिक्षण घेतल्याने कशी प्रगती होते हे माझ्याच उदाहरणावरून स्पष्ट होते. जेव्हा मी शिकत होतो, तेव्हा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवसं काढलीत. पण नोकरी मिळाल्यावर माझे जीवनमान पालटले. एवढेच नव्हे तर माझ्या घरात उच्चतम शैक्षणिक वातावरण निर्माण झाले. माझा लहान भाऊ अजय हा एमबीबीएस, एमएस शिकून डॉक्टर झाला. माझा मोठा मुलगा प्रज्ञाशील कायद्याची पदवी घेतल्यावर युपीएससी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भारतीय राजस्व सेवा (आय.आर.एस.) कस्टम विभागात लागला. आता बढती होवून जॉईन्ट कमिशनर झाला. मधला मुलगा एमबीबीएस, डीएमआरडी, डीएनबी शिकून रेडिओलॉजिस्ट डॉक्टर झाला. मुलगी करूणा कॉम्पुटर इंजिनीअर झाली. म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, “ज्या समाजामध्ये १० वकील, २०  डॉक्टर्स व ३०  ईंजिनिअर्स असतील तो समाज  मी प्रगल्भ समजतो.” बाबासाहेबांच्या या संकल्पनेनुसार   माझ्या घरात हा उत्तम नमुना पाहायला मिळतो, याचा मला खूप अभिमान वाटतो. 

अर्थात मला स्कॉलरशिप मिळाली नसती तर मी शिकू शकलो नसतो अन् आरक्षण नसते तर मला कुणीही नोकरी दिली नसती. स्कॉलरशिप आणि आरक्षण ह्या दोन्हीही महत्वाच्या  गोष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिल्यात, हे मला निक्षून सांगावेसे वाटते. त्यामुळे बाबासाहेबांचे फार मोठे उपकार माझ्यावरच नव्हे तर संपूर्ण मागासवर्गीय समाजावर आहेत. हे कुणीही विसरू नये हा उद्देश या लिखाणामागे ठेवला आहे. 

विशेष म्हणजे माझ्या लिखाणातील “बाबाची सही” ही कथा लोकसत्ताच्या दि. ८.१०.२०११ रोजीच्या चतुरंग पुरवणीत प्रकाशित झाली होती. तसेच माझ्या ब्लॉगवरून ‘वाचावे नेटके – एक समृद्ध आत्मकथा’ लोकसत्ताच्या दि. ६.८.२०१२ रोजीच्या अंकात समीक्षा प्रकाशित झाली होती.

योगायोगाने ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. ११,१२ आणि १३ जानेवारी २०१९ या काळात यवतमाळला भरविण्यात आले होते. या संमेलनात माझ्या पुस्तकाचे प्रकाशन दि. १३ जानेवारी रोजी. डॉ. प्रा. रमाकांत कोलते यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध चित्रकार बळी खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रा. शांतरक्षित गावंडे यांनी उत्कृष्ठपणे केले.  मला विशेष आनंद याचा वाटतो की, ज्यांच्या हस्ते प्रकाशन झाले ते डॉ.प्रा.रमाकांत कोलते सर मला मराठी हा विषय कॉलेजमध्ये शिकवीत होते. या कार्यक्रमासाठी आमचे नातेवाईक, मित्रमंडळी प्रामुख्याने हजर होते. त्याशिवाय पुस्तक विक्रीसाठी मी ७४ व्या क्रमांकाचा गाळा घेतला होता. यवतमाळच्या परिसरातील लिखाण असल्याने माझ्या स्टॅालला बऱ्याच लोकांनी भेटी देऊन पुस्तके विकत घेतलीत. 

तसेच भगवान बुद्धांची संपूर्ण शिकवण असलेले ‘भगवान बुद्धांचा दु;खमुक्तीचा मार्ग’ हे  लिखाण पुर्ण करून  rkjumle.blogspot.com या ब्लॉगवर टाकले आहे.

तसेच या लिखाणाची स्क्रिप्ट मी विचक्षण डिजिटल बुक पब्लिकेशन शिरपूर जिल्हा धुळे या प्रकाशकाकडे ई-बुक छापण्यासाठी दिले असून ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे. 

या लिखाणाचा जो आशय पुस्तकात टाकला आहे तो असा आहे-

“आज जग हे युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. शीतयुध्दात कोणीही सुरक्षित राहू शकत नाही.  त्यात सर्वांचेच नुकसान आहे.

म्हणून बुद्धांचे तत्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे. त्याचा जेवढा प्रचार होईल, तेवढे जग युद्धापासुन दुर व शांततेच्या नजीक जाईल.

बौद्ध धम्माबद्दल विद्ववतेचा महामेरू  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अत्यंत महत्वपूर्ण आहे.  ते म्हणतात-

१. “मला बुद्ध धम्म आवडतो, कारण त्यामध्ये इतर कुठल्याही धर्मात नाहीत अशी तीन तत्त्वे एकत्रितपणे शिकविण्यात आली आहेत. इतर सर्व धर्म हे ईश्वर आणि आत्मा आणि मृत्यूनंतरचे जीवन यामध्येच गुंतलेले आहेत. बुद्ध धम्म प्रज्ञेची (अंधश्रद्धा आणि दैववाद याच्याऐवजी समजदारपणा किंवा ज्ञान) शिकवण देतो. तो करुणा (प्रेम) शिकवितो, तो समता शिकवितो. पृथ्वीवरील चांगल्या आणि सुखी जीवनासाठी मानवाला हेच आवश्यक असते. बुद्ध धम्माची ही तीन तत्त्वे मला प्रभावित करतात. ही तीन तत्त्वे सर्व जगाला प्रभावित करतील. ईश्वर आणि आत्मा हे समाजाचे संरक्षण करु शकत नाहीत.”
२. “माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होत. जगाचं कल्याण फक्त बुद्ध धम्मच करु शकेल.”

तथागत बुद्ध हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातही सर्वांत श्रेष्ठ व्यक्‍ती आहेत. इंग्लंडच्या जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठाने मागील १० हजार वर्षांमधील अशा ‘टॉप १००’ जगातील विश्‍वमानवांची यादी तयार केली, ज्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केलीत, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जागतिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली मानव म्हणून बुद्धांचे नाव अग्रस्थानी आहे. इतिहासातील सर्वाधिक महान व्यक्‍तिमत्त्व म्हणजे तथागत बुद्ध होय. 

भगवान बुध्द धम्मपदाच्या एकशेत्र्यांशीव्या गाथेत म्हणतात, 

           सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा !

           सचीत्त परियोदपनं, एतं बुध्दांन सासनं !

याचा अर्थ, कोणतेही पाप न करणे, शुभ कर्म करणे, वाईट चित्ताला परिशुध्द ठेवणे, हीच बुध्दाची शिकवण आहे.

म्हणून भगवान बुद्धांची ही शिकवण सर्वदूर पसरावी हा या लिखाणाचा मुळ उद्देश आहे. 

rkjumle.blogspot.com या ब्लॉगवर जसे मी सामाजिक, राजकीय, धार्मिक विषयाव