सिंगापूर व मलेशियाचा प्रवास

25 May

 

परत आम्हाला विदेश पर्यटनाची संधी मिळाली. ह्यापुर्वी मी आणि माझी पत्नी कुसुम असे दोघेही थायलंडला मार्च २०१२ व मॉरिशसला मे २०१४ मध्ये विदेशी पर्यटनासाठी गेलो होतो. ह्यावेळेस आम्ही सिंगापूर आणि मलेशियाच्या प्रवासाला जायचे ठरविले. पूर्वी केसरी टूरनेच आम्ही प्रवासाला गेलो होतो. ह्यावेळी  सुद्धा केसरी टूरकडूनच जानेवारी २०१८ मध्ये जायचे निश्चित केले. त्यासाठी  अकोला येथील त्यांच्या शाखेमध्ये प्रवासाचे बुकिंग करण्यासाठी गेलो असतांना कळले की आमचे पासपोर्टची मुदत मे २०१८ पर्यंतच आहे. ती प्रवासाच्या तारखेपासून सहा महिनेपर्यंत असायला पाहिजे. म्हणून नागपूरच्या पासपोर्ट कार्यालयाची तारीख घेण्यासाठी त्यांच्या माध्यामातूनच ऑनलाईन अर्ज केला. त्यानुसार  त्या कार्यालयाला जावून पासपोर्टची मुदत दहा वर्षाने वाढवून घेतली.

जानेवारीच्या कालावधीत मलेशिया आणि सिंगापूरचं हवामान चांगलं असल्याचं कळलं. म्हणून आम्ही २०.०१.२०१८ ते २७.०१.२०१८ या सात रात्र आणि आठ दिवस हा कालावधी निवडला. या प्रवासाचे विमान मुंबईहून निघणार होते. म्हणून आम्ही पुणेमार्गे मारुती कार चालवीत मुंबईला आलो. येतांना ३१.१२.२०१७ला औरंगाबादला थांबलो. सकाळी १ जानेवारीला शौर्य दिनी  भीमा-कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन करून पुण्याला यायचं ठरविले होते.

परंतु आम्ही कोरेगावच्या जवळ आल्यावर आम्हाला स्तंभापर्यंतच्या रोडने  पोलिसांनी जाऊ दिले नाही. तर आम्हाला सिकरापूर-चाकन मार्गाने गाडी वळविण्यास सांगितले. त्यांना मी सांगीतले   की आम्हाला स्तंभाकडे जायचे आहे, पण त्यांनी क्षणभर सुद्धा  थांबण्यास मनाई केली. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला सिकरापूर-चाकन मार्गाने पुण्याला यावे लागले.  नंतर रस्त्यावरील लोकांना विचारले असताना जमावावर हल्ला सुरु असल्याचे कळले. आम्हाला ज्या मार्गाने जायला सांगितले त्या मार्गाने सुद्धा गाड्या अडवून दगडफेक करण्यात आले व गाड्यांचे काचं फोडून आतील सामान बाहेर फेकण्यात येऊन लुटालूट करण्यात आल्याचे

येणा-या गाड्यातील  लोकांनी सांगितले.  त्यामुळे आम्हाला सस्त्यातच मध्ये  काही वेळ थांबावे लागले होते. नंतर पोलिस आल्यावर हे समाजकंटक पळाल्याचे कळले. रस्त्यावर ठिकठिकाणी फुटलेले काचं दिसत होते.  या रोडने पण रहदारी तुंबली होती. या रोडने पुण्याला संघशीलकडे यायला सहा तासाच्या वर वेळ लागला. त्यामुळे आम्ही रात्री ११.३० वाजता त्याच्याकडे  पोहोचलो.  आमच्यासारखेच अनेक लोकांना कार, ट्रॅक्स, ट्रॅव्हल बसेस घेऊन दुरदूरून आलेल्यांना न पाहता परत जावे लागले. असे हिंसक प्रकार करणारे निश्चितच जातीयवादी समाजकंटक होते. संघशीलकडे तीन चार दिवस राहून आम्ही मुंबईला प्रज्ञाशीलकडे आलो.

१९ जानेवारीला रात्री ११.२५ ची क्वालालंपूरला जाणारी फ्लाईट होती. आम्ही ८.०० वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय ऐअरपोर्टला आलो. तेथे केसरीचा झेंडा घेऊन  त्यांचे  प्रतिनिधी व टूरमधील प्रवासी जमले होते. त्यांनी आम्हाला स्नॅक्स, टोप्या, पासपोर्ट (जे बुकिंग करतांना व्हिसा काढण्यासाठी घेतले होते)  व विमानाचे तिकिटे दिलीत. आतमध्ये चेकइन कॉऊंटरला जाऊन लगेज बॅगा दिल्यात. त्यानंतर इमिग्रेशन करून गेटजवळ जावून विमानाची वाट पाहत थांबलो.

आमच्या सोबत येणारे  टूर मॅनेजर मंदार पाटील आणि त्यांचे सहाय्यक योगेश चौधरी होते.

१२.३०ला विमानात बसलो. विमानात एसी असल्याने थोडी थंडी लागत होती. आम्ही अंगात स्वेटर घालून घेतले होते. शिवाय विमानात शाल पण प्रत्येकाला दिली होती. विमानात तेवढ्या रात्री आम्हाला जेवण दिले. आम्ही खिडकीजवळ बसलो होतो. या खिडकीतून बाहेरचं दृश्य दिसत होतं. पण रात्रीला ही खिडकी एअरहोस्टेसने  बंद करायला सांगितल्याने पाहू शकलो नाही. सकाळी खीडकी उघडली तेव्हा बाहेरील दृश्य अत्यंत विलोभनीय असं दिसत होतं. दिवस निघाला होता, सूर्याचे किरणे दिसत होते. ह्या सोनेरी किरणाने सारा आसमंत पूर्णपणे न्हाऊन निघालेले दिसत होते. पण सूर्याचं दर्शन मात्र होत नव्हतं. ढगांमुळे सूर्य लपला असावा. ढग म्हणजे नुसते पांढ-याशुभ्र कापसाचे पुंजके दिसत होते. पण काही वेळाने हे ढग लुप्त होऊन समुद्र व त्या काठावरील वसलेले शहरे, नागमोडी नदी, घरे, रस्ते, पाणवठे आणि एका ओळीत लावलेले पामचे झाडे दिसायला लागले. असं हे खाली जमीनीवर दिसणारं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवीत होतो.

हे विमान क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट येथे मलेशियन वेळेनुसार सकाळी  ८.३०  ला म्हणजे भारतीय वेळ सकाळचे  ६.०० वाजता आलं. म्हणजेच मलेशियन घड्याळ २.३० तासाने पुढे होतं. आम्ही त्यानुसार घड्याळीच्या वेळा लाऊन घेतल्या. इमिग्रेषण झाल्यावर आम्ही विमानतळाच्या बाहेर पडलो. आमच्या ग्रुपमध्ये ऐकून ६६ लोक होते. दोन ट्रॅव्हल एसी बसेसची व्यवस्था होती. आमची व्यवस्था बस क्रमांक एक मध्ये केली होती. आमच्या बसमध्ये रवि नावाचा तामिळ वंशाचा गाईड होता. त्याला हिंदी येत नव्हती. इंग्लिश उच्चार पण स्पष्टपणे उमटत नसे. जसं वाटर पार्क म्हणतांना ‘वाटप्पा’ म्हणायचा. मलेशियात तामिळ वंशाचे भारतीय आणि श्रीलंकन  लोक जवळपास ९० टक्के  असल्याचे कळले. हा देश मुस्लीम धर्मीय आहे.

मलेशियात पाम झाडांची लागवड  प्रमुख पिक म्हणून करतात. ओळी-ओळीने हे झाडं लावतात. याचा उपयोग सौंदर्यप्रसाधान, औषधी इत्यादी निर्मितीत करतात. परंतु येथील प्रमुख उत्पन्न  म्हणजे पेट्रोलियमचा आहे असे समजले.

आम्ही त्यादिवशी क्वालालंपूरला जयपूर महाल या हॉटेलमध्ये सकाळी १०.३० वाजता नास्ता करून पुत्रजया येथे आलो. रस्त्यात Merdeka Square  जेथे राष्ट्रीय परेड दिनाचा उत्सव होत असतो ते  पाहिलं. मलेशिया जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा ३१ ऑगस्ट १९५७ला येथेच ब्रिटिशांचं युनियन जॅक उतरवून मलेशियन झेंडा फडकविण्यात आला होता. येथे सरकारी कार्यालये आहेत. याच्या पुढे National Mosque हे मलेशियातील प्रमुख मस्जिद आहे. या मस्जिदमध्ये १५००० भाविक जमू शकतात इतकं ते मोठं आहे. या मस्जिदला एकूण ९  घुमट व एक मिनार आहे.   येथे प्रधानमंत्र्यांचं कार्यालय असून मानव निर्मित लेक आहे. अर्थात हा परिसर आम्ही दुरूनच पाहिला.  

येथील रस्ते  अगदी स्वच्छ आणि सुंदर होते . रस्त्याच्या दोन्ही बाजूला चढावावर व उतारावर झाडं लक्ष वेधून घेत होते. टेकड्यांना पण कल्पकतेने सजवलेले होते. त्यानंतर  जेथे  क्वाला आणि लम्पुर अशा दोन नद्यांच्या संगम आहे ते पण बघितलं.   

त्यादिवशी आणि दुसऱ्या दिवशी आम्ही क्वालालंपूरला इस्टीन हॉटेल येथे दोन दिवस थांबलो. या हॉटेलमध्ये मोफत वायफाय नेटवर्क देण्यात आला होता. त्यावरूनच आम्ही मुलांकडे फोन करीत होतो. कारण आम्ही तेथे सीम कार्ड वेळेअभावी विकत घ्यायचे राहून गेले होते. आमच्या ग्रुपमधील काही लोकांनी घेतले होते.

संध्याकाळी पेट्रोनाज  ट्वीन टावर्स पाहायला गेलो. दोन टावरच्या मध्ये सुरिया मॅाल आहे. जगातील सर्वात उंच व आकाशाला भिडणारं असे हे टावर ४५२ मीटर उंच व ८८ मजली आहे. आम्ही सर्वात वरच्या मजल्यावर गेलो होतो. तेथून रात्रीला झगमगाटातलं शहर दिसत होतं.  असं हे विहंगम असे दृश्य डोळ्याला सुखावणारं होतं.

२१ तारखेला सकाळी मलेशियन टुरिझम सेंटरमध्ये नावाजलेले चॉकलेट मिळतात म्हणून ते पाहायला जावून विकत घेतले.  त्याचवेळेस  भारतातून आणलेले यु.एस.डॉलर २१.०१.२०१८ रोजी बदलून मलेशियातील रिंगीट (आर.एम.) चलन घेतले. त्यावेळी एका डॉलरला ३.८२ असा विनिमय दर होता.

याच दिवशी आम्ही Sunway Lagoon पाहायला गेलो. येथे Water Park,  Amusement Park, Scream Park, Extreme Park and Wild Life Park  इत्यादी  सहा प्रकारचे पार्क आहेत. एकूण ९० प्रकारचे आकर्षण आहेत. हे पाहायला येथे पूर्ण दिवस जातो. फोटो काढायला खुप सुंदर ठिकाण आहे. हा ८८ एकरचा पार्क आहे. जमिनीपासून  १५० फुट खोल आहे. येथे आम्ही मनसोक्तपणे फिरलो. मिनीट्रेनने फिरून पूर्ण परिसर पाहिला. प्राण्याचे खेळ पाहिले. पाण्यात जाऊन ओलं व्हायचं नाही म्हणून आम्ही पाण्यात जायला टाळत होतो, पण शेवटी काही सहप्रवाशांसोबत हे ठिकाण सोडण्यापूर्वी आम्ही ३ डीचा काळा चष्मा घालून अंधारलेल्या हॉलमध्ये बसलेल्या खुर्चीमध्ये  बसलो; तेव्हा ती खुर्ची मागेपुढे होत डायनासोर आमच्या अगदी जवळ येऊन घाबरवीत होतं.  त्याचवेळेस  अंगावर पाणी सांडवून आम्हाला ओलं करून टाकलंच.

२२.०१.२०१८ रोजी सकाळी आम्ही हॉटेल सोडलं व बटू केव्ह पाहायला आलो. याला कार्तिक टेम्पल म्हणतात. वर सरळ १४० फुट उभा चुन्याचा डोंगर आहे. ते चढायला २७२ पायऱ्या आहेत. येथे तामिळ वंशाचे हिंदू लोक अनवाणी पायाने दुध, फळे नारळ व इतर काहीबाही वस्तू घेऊन जातात. काही लोक कावड घेऊन जातात. जीभेला त्रिशूल टोचतात. वर  मुरुगा देवाची व खाली पायथ्याशी हनुमानाची  मोठी मूर्ती आहे. आम्ही मात्र वर गेलो नाही. खालीच सहप्रवासी येतपर्यंत थांबलो. येथे मात्र भारत देश वास करीत असल्याचे स्पष्टपणे जाणवले.  रस्त्याच्या आजूबाजूला प्लास्टिकच्या पिशव्या, साचलेली घाण व पाणी  पाहायला मिळाले. मलेशियात कुठेही कबुतरं दिसले नाहीत, पण ते मात्र येथे घोळक्याने लोकांनी टाकलेले दाणे टीपतांना  पाहायला मिळाले.

त्यानंतर याच दिवशी मलेशियातील जेन्टींग हायलँडला जाण्यासाठी निघालो. सुरुवातीला सहा लेन असलेल्या रोडने गेलो. पूर्ण रोडवर स्ट्रीट लाईट लावलेले दिसले. येथे जातांना जगातील सर्वात मोठं असलेलं घनदाट जंगल लागते. येथे हॉटेल आणि रिझॉर्ट आहेत. १७४०  मीटर खुप उंचावर आहे.  तेथे आम्ही आशियातील सर्वात लांब व वेगवान  केबल कारने गेलो. फर्स्ट वर्ल्ड हॉटेल येथे थांबलो होतो.  येथे जगातील सर्वात मोठं कसिनो आहे. येथे चीनमधील लोक खेळायाला येतात. त्यामुळे येथे हॉटेलच्या सुविधा दिल्या आहेत. या ठिकाणी जवळपास ७३५१  रूम्स असल्याचे कळले. आम्ही कसिनो पाहायला  गेलो होतो. हा एक प्रकारचा जुगार आहे. कसिनोबद्दल सिनेमात पाहीलं होतं आणि त्याबद्दल  बरंच काही वाचलं ऐकलं होतं; पण प्रत्यक्ष पाहण्याचा योग येथेच आला. याचठिकाणी रात्रीला खूप छान लेझर सारखा अत्भुत असा शो पाहिला. डोळे दिपवून टाकणारं खुप झगमगाट होता. येथे शॉपिंगला भरपूर वेळ होता.   

सकाळी २३.०१.२०१८ ला आम्ही सिंगापूरला वोल्वो बसने जायला निघालो. येथून सिंगापूर ३५० किलोमीटर लांब आहे. आम्ही सिंगापूरला हॉलिडे इन या हॉटेलमध्ये २३.०१.२०१८ ते २६.०१.२०१८ पर्यंत अशा चार रात्री थांबलो होतो.

सिंगापूर आणि मलेशियाच्या सीमेवर इमिग्रेशन केल्यावर आम्ही सिंगापूर या छोट्याशा देशात प्रवेश केला.

सिंगापूर हे अतिशय शिस्तबद्ध आणि सुयोग्य शहर आहे.सिंगापूरला Fine देश म्हटल्या जाते. फाईन याचा एक अर्थ असा की सुंदर आणि दुसरा अर्थ    दंड ! हा देश खरोखरच अतिशय सुंदर,  स्वच्छ, शानदार रस्ते, गगनचुंबी इमारती, मोठमोठे शॉपिंग  मॅाल्स, शांत व हिरवळीने व्यापलेलं वातावरण पाहून आपलं मन भरून येतं. पण येथे गुन्हा झाला की दंड होतो. येथे बसमध्ये सुद्धा काही खाता येत नाही की पाणी सुद्धा  पिता येत नाही. नाहीतर  ३०० सिंगापूर डॉलर दंड होईल, अशी पाटी बसमध्ये लावलेली असते. येथे चुईंग गम पण खाता येत नाही. बसमध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरा लावलेला असतो.

येथे सहसा फसवणूक होत नाही. टॅक्सीवाले, दुकानदार किंवा कोणीही फसवणूक करीत नाहीत. एखाद्या ठिकाणी आपली वस्तू विसरून राहिली असेल तर परतल्यावर ती वस्तू त्या ठिकाणी तशीच असते. आम्ही खरेदीसाठी माॅलमध्ये गेलो पण आतमध्ये जातांना आपल्या इकडच्या सारखे आपली अथवा सोबत नेलेल्या बॅगची तपासणी झाली  नाही.  कारण चोरी करताना कुणी पकडलं गेल्यास त्वरित त्याच्यावर कडक कारवाई होते.

येथील  कायदा आणि सुरक्षा कडक असते. आपल्याकडे स्त्रीयांबाबत घडणाऱ्या दुर्दैवी घटना येथे नसल्यासारखेच असतात.

येथील लोक खूप चांगले आहेत. त्यांचं वागणं सौहार्दपूर्ण आहे. थोडासा भाषेचा प्रश्न कधी कधी उभा राहतो. पण आपल्याला इंग्लिश नीट येत नसेल तर थोडंसं कठीण जातं.  सिंगापूरमध्ये तामिळ लोकांची संख्या खूप आहे. मराठी लोक आणि भारतीयांचं प्रमाण लक्षणीय असलं तरी हिंदी किंवा मराठी तितकं बोललं जात नाही.

सिंगापूरमधली वयोवृद्ध माणसं सुद्धा  खूपच फिट आणि अ‍ॅक्टिव्ह आहेत.

सिंगापूरच्या अवती-भवती इंडोनेशिया, थायलंड, फिलिपाइन्स, हाँगकाँग, श्रीलंका वगैरे देश असल्याने सिंगापूरचा मध्यवर्ती ठिकाण आणि उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विचार केला जातो. सिंगापूर हे नियोजनबद्ध पद्धतीने वसलेलं शहर असून त्याचा विस्तार फार झपाटय़ाने होत आहे.

 

सिंगापूर म्हणजे सिंहाचं शहर ! पण आता सिंह राहिलेले नाहीत ! मुंबईपेक्षाही हे लहान शहर  !  हे शहर जगातील प्रमुख पर्यटन,  व्यापारिक आणि बंदराचे ठिकाण आहे. हा देश ब्रिटिशांपासून ३१ ऑगष्ट १९६३ला स्वतंत्र होवून १६ सप्टेंबर १९६३ ला मलेशियात विलीन झालं होतं. मात्र त्यानंतर ९ ऑगष्ट १९६५ साली मलेशियापासून अलग होऊन स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदय झाला.  

 आम्ही अमेरिकन डॉलर (यु.एस.डॉलर)  मुस्तफा फॉरेन  एक्स्चेंजमध्ये बदलून सिंगापूर डॉलर घेतले. त्यादिवशी एका यु.एस.डॉलरला १.३०२ सिंगापूर डॉलर असा विनिमय दर होता. म्हणजे १५० यु.एस.डॉलरला १९५.३० सिंगापूर डॉलर दिले होते.

सिंगापूरला आल्यावर त्यादिवशी  रिव्हर क्रुज येथे बोटीने फिरलो. त्यातून आजूबाजूचे सुंदर दृश्य पाहिले. सिंगापूर फ्लायर आशियातील सर्वात मोठं जायंट व्हील (Asia’s largest Giant Observation Wheel)  ह्यातील एका डब्ब्यात जवळपास आठ लोक बसतात. अगदी हळूवारपणे हा डब्बा १६५ मीटर उंचावर सरकत जाऊन खाली उतरतो. त्यामुळे यात बसायला भीती वाटत नाही. अगदी उंचावरून  सिंगापूरचे बाहेरील दृश्य  पाहता येते.

२४  तारखेला आम्ही युनिवर्सल स्टुडीओ पहायला गेलो. हे एक थीम पार्क असून सेन्टोसा इजलांडच्या परिसरात आहे. येथे फिल्म आणि टीवी सिरीअल कसे बनविल्या जातात ते बघितलं. धाडसी सिनेमा कसे बनवितात; त्याचे प्रातीक्षिके जसे हैदराबाद येथे रामोजी फिल्म सिटीमध्ये दाखवितात, तसे येथे पहायला मिळाले. आम्ही Dry  Zone मध्ये बसलो होतो. कारण याठिकाणी जोकर लोक अंगावर पाणी फेकून ओले करतात. पण  Dry  Zone मध्ये पाणी फेकत नाहीत.  या युनिवर्सल स्टुडीओमध्ये  अत्यंत धाडसी अनुभव देणारे रोलर कोस्टर, वाटर राईड पाहायला मिळतात.

जगातील पहिलं ट्रान्सफॉर्मर राईड ! ३ डीचं खास परिणाम असलेलं ! काळा चष्मा घालून बोटीत बसून आम्ही सिंगल राईडर पाहिलं. आमची बोट समोर आणि मागे जायची तेव्हा ट्रान्सफॉर्मर रोबोट्स  आम्हाला येऊन भिडत. काय जबरदस्त आणि भयानक अनुभव होता तो !

येथे जगातील सर्वात उंच रोलर कोस्टर आहे. डायनोसॉर असलेल्या या जुरासिक पार्कमध्ये बोटीने नदीतून प्रवास करावे लागते. येथे पण सगळे राईड्स पाहायला पूर्ण दिवस जातो. यावेळी येथे बाहेर निघतांना जबरदस्त पाऊस पडला होता.

२५ तारखेला सकाळी चाईनीज टेम्पल पाहायला गेलो. तेथे ओम अध्यात्मिक मंत्र असणारे प्रार्थना घेण्यात आली. येथे हसणाऱ्या बुद्धांशिवाय इतर चार मुर्त्या होत्या ज्यांची नावे बुध्दाला धरून होते. जसे सरस्वती बुध्दा, गणपती बुध्दा, मैत्री बुध्दा. पण ह्या हिंदू धर्मातील संकल्पनांनी बौध्द धर्मात कशी भेसळ केली, काय माहित? मी त्यांना सांगितले की भारतात देव, आत्मा आणि अशा मूर्त्यांच्या संकल्पना नाहीत.

त्यानंतर सामुद्रिक मत्सालय पाहायला गेलो. हे  SEA Aquarium या नावाने प्रसिद्ध आहे.  पाण्याखालील बोगद्यात असणारं मत्सालय काचेतील खिडकीतून दोन्ही बाजूने आणि तसेच वरच्या बाजूने सुद्धा पाहण्यात मन हरवून जातं. येथे फोटोग्राफी करायला खूप हुरूप येतं. येथे २५००च्या वर शार्क, कासव, डॉल्फिन, जेलीफिश, बटरफ्लायफिश, खेकडे, रीफफिश, निबलफिश, सीस्टार्स अशाप्रकारचे अनेक सामुद्रिक प्राणी असून जगातील  निरनिराळ्या देशातील २५० पेक्षा जास्त पेशीज असलेले असे हे प्राणी आहेत. ६९ एकराच्या ८३ मीटर लांब परिसरात पसरलेलं आहे.

त्यानंतर आम्ही Singapore Skyline Luge Sentosa Island  पाहायला गेलो. येथील लुगा राईड गुरुत्वाकर्षणवर चालणारी छोटीशी गाडी असते.

हि राईड वरून खाली लहान मुलांच्या खेळण्यातील बायसिकलसारखी घसरत जाते. सहा वर्षावरील व्यक्तीला एकट्यानेच ही राईड करावी लागते. आपल्याला फक्त स्टेअरिंग आणि ब्रेक सांभाळावे लागते. खालून वर परत येतांना स्कायवेने यावे लागते. स्कायराईडवरून  पूर्ण सेंटोसा इज्लांड, सिंगापूर शहर आणि साऊथचायना समुद्राचे विहंगम असे दृश्य दिसते. ही राईड करतांना मस्त मजा वाटते. अत्यंत साहसी अशी ही राईड होती. पण ज्यांना हृदयाचा आजार असेल,  उलटी होत असेल अथवा गरोदरपणात ही राईड करू नका अशा सुचना दिलेल्या आहेत.

येथे निरनिराळ्या देशातील प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे बघितले.

रात्रीला लेझर शो बघितला. याला विंग्स ऑफ टाईम म्हणतात. हा एक विलक्षण अनुभव होता. यात लेझरद्वारे आग आणि म्युझिकल कारंजे मजेशीर होते.

२६ तारखेला  सकाळी बराच फावला  वेळ असल्याने आम्ही या दिवशी  little इंडिया शॉप्समध्ये खरेदीला गेलो.  

नंतर आम्ही आशियातील सर्वात मोठं जूरोंग बर्ड पार्क ( Asia’s Largest Bird Paradise Jurong Bird Park) पाहायला गेलो. येथे पक्ष्यांचा अप्रतिम असा खेळ दाखविण्यात आला.

येथे  अनेक प्रकारचे जवळपास ६०० जातीचे व ८०००  पेक्षा अधिक विविध  पक्षी या बगीच्यात होते. रंगीबेरंगी पोपट लक्ष वेधून घेत होते.

नंतर आम्ही Singapore गार्डन बाय द बे Garden by the bay  पाहायला गेलो. हे  २५० एकरात वसलेलं हे एक  भव्य असं नैसर्गिक बगीचा आहे.  

Flower Dome and Cloud Forest  शिवाय पांढरेशुभ्र संगमवरी दगडाचे पहाड खुपच सुंदर दिसतात. निरनिराळ्या देशातून आणलेले त्या त्या वातावरणातील फुलांचे झाडं येथे आहेत. येथे थंडावा होता. तसेच येथे मानव निर्मित धबधब्याच्या उडणाऱ्या पाण्यात सारेजण मस्त मजा घेत होते. रात्रीला सुपर ट्रीवर लेझर शो पाहिला. अत्यंत नयनरम्य असा तो देखावा होता.  

२७ जानेवारीला सिंगापूरच्या छांगी विमानतळावर संध्याकाळी ५.२५ ला सुटणाऱ्या व क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी विमान होतं. आम्ही या दिवशी कुठेही फिरलो नाही. दुपारी जेवण करून आम्ही सरळ अडीच तासापूर्वी विमानतळावर आलो.  क्वालालंपूरवरून रात्री ८.०० वाजता मुंबईला जाणारे फ्लाईट होतं. हे विमान मुंबईला शिवाजी टर्मिनलला रात्री ११.३० ला पोहचलं. क्वालालंपूर ते मुंबई हे अंतर ३६२१ किलोमीटर होतं.

मुंबईला विमानतळाच्या बाहेर आल्यावर प्रीपेड टॅक्सी करायला क्वाउंटरवर गेलो. एका ठिकाणी गर्दी असल्याने दुसऱ्या क्वाउंटरवर गेल्यावर मला पवईपर्यंतचे भाडे ८०० रुपये सांगितले. एवढे भाडे नसल्याचे मला माहित होते. म्हणून अधिकृत क्वाउंटरवर गेलो. तेथे केवळ ३०० रुपये भाडे होते. सिंगापूरमध्ये अशी फसवणूक कधीच होत नाही.  भारतात तर सर्रास फसवणूक होत असते, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे नवीन माणूस नेमका फसतो. टॅक्सीत बसल्यावर बाहेर पडल्यावर रस्त्याच्या बाजूला घाणीचे साम्राज्य दिसून आलं. तेव्हा आपण सिंगापूरमध्ये नसून मुंबईत आलो आहोत याची प्रकर्षाने जाणीव झाली. किती फरक आहे सिंगापूर आणि मुंबईत ! सिंगापूरमध्ये मला कुठेही पोलीस दिसले नाहीत. रोडवर सुध्दा ट्राफिक पोलीस दिसले नाहीत. कारण हे काम सीसीटीव्ही करीत असल्याचे समजले. तसेच आणखी एक नवल वाटलं ते म्हणजे कुठेही मेडिकलचे दुकाने दिसले नाहीत. आजारी माणसाला डॉक्टरशिवाय औषधी मिळत नाहीत. त्यामुळे अशा दुकांनाचा सुळसुळाट तेथे आढळत नाहीत.  

जाता जाता काही टिप्स-

१. टीम मॅनेजर किंवा गाईड ज्या काही सूचना देतात त्या कसोशीने पाळाव्यात.

२. गृपशिवाय बाहेरील कोणत्याही व्यक्तीशी संबंध ठेवू नये. कारण फसवणूक होऊ शकते.

३. हाॅटेलमध्ये सेल्फ सर्व्हिस असते. तथापि जेवताना ताटात ऊष्टे अन्न सोडू नये. आपल्याला जेवढे खाता येईल तेवढेच घ्यावे.

४. पासपोर्ट सांभाळून ठेवावे. हरवले किंवा चोरीला गेले तर भयानक त्रासाला सामोरे जावे लागते. याबाबतीत ग्रुप लीडर काय सुचना देतात त्याकडे लक्ष द्यावे. मी याबाबतीत लोकसत्ता पेपरमध्ये आलेला लेख वाचला होता. जर पासपोर्ट चोरीला अथवा हरवला असेल तर तुम्हाला टूर सोडून भारतात परत यावे लागते. पैसेही वाया गेले, टूरही नाही आणि होणारा मानसीक त्रास म्हणजे पोलीस स्टेशन, इंडिअन एम्बसी, नवीन डॉकूमेंट मिळेपर्यंत रोज चकरा मारणे, तिथला हॉटेल, जेवण टॅक्शीचा खर्च, ग्रुप सोडून जातांना होणारे दुःख आणि मानसिक त्रास, विमानाचे भाडे इत्यादी अतोनात त्रासाला सामोरे जावे लागते. या लेखात सुचना केली होती की पूर्वीचे खेड्यातील लोक बांडी शिवत होते. शर्टाच्या आतमध्ये बनियनला खिसा असतो. त्यात पासपोर्ट नेहमीसाठी आपल्यासोबत ठेवता येते. म्हणून  मी पण अशी बांडी शिवून घेतली होती. त्यामुळे पासपोर्ट हरवण्याचा अथवा चोरीला जाण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही.

लेखक – आर.के.जुमळे, अकोला

 


 

 

One Response to “सिंगापूर व मलेशियाचा प्रवास”

  1. Bapu Tangal at 8:07 PM #

    Khup chan pravas varnan.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: