खरं म्हणजे अकोल्याच्या घरी मी आणि कुसुम असे दोघेच राहत होतो. पण ह्यावेळी प्रजाशीलचा मुलगा व आमचा नातू प्रतिक याचा दुसरा वाढदिवस दि. ११ मे २०१५ ला अकोल्यालाच साजरा करायचा असं ठरल्याने त्यानिमित्त सारेच कुटुंबीय म्हणजे मोठा मुलगा प्रज्ञाशील, सून किरण, नातू प्रतिक व दुसरा मुलगा संघशील, सून नूतन, नातू सिद्धांत व इशाण, मुलगी करुणा, जावई प्रशांत व नातू आरव आपापल्या दूरदूरच्या गावावरून आमच्या घरी उतरले. त्यामुळे आणखी एकदा घर कसं भरून गेल्यासारखे वाटत होते. मी लहानपणी खेड्यात राहत होतो; तेव्हा संध्याकाळच्या वेळी चिमण्या आमच्या अंगणात उतरून चिवचिवाट सुरु करीत, मग अंगण कसं भरभरल्यासारखे वाटत होते. तसंच काहीसं माहोल आताही वाटत होतं.
मी नोकरी निमित्त अनेक ठिकाणी फिरलो. त्या काळात बदललेल्या नवीन नवीन घरात राहत होतो. त्यावेळी मुलं जेव्हा लहान होते – शिकत होते, त्यावेळी आमचं घर कसं भरल्यासारखे वाटत होते. मग त्यांचे शिक्षण झाले, लग्न झालेत, नोकरी-व्यवसायानिमित्त दूरदूरच्या ठिकाणी पाखरांना पंख फुटल्यासारखे निघून गेलेत. मीही नोकरीतून निवृत्त झाल्यावर मूळ खेडेगाव चौधरा शेजारील शहर यवतमाळ सोडून आमचे कुणीही नातेवाईक अकोला येथे राहत नसतांना अकोला येथेच सदनिका घेऊन स्थायिक झालो. कारण मुलांच्या जाण्यायेण्याच्या सोयीसाठी अकोला शहर हे रेल्वे मार्गावर येते, यवतमाळ शहर येत नाही म्हणून !
सारा गोतावळा एकत्र झाला; तेव्हा ते आनंदाचे क्षण टिपतांना हरकून जात होतो. एक-एका नातुंचे कोडकौतुक करतांना आमचे मन भरून येत होते. प्रतिक सर्वात लहान व त्याचाच वाढदिवस होता. प्रतिक मला ‘आपी’ म्हणायचा. सिद्धांत ‘आलोला’ म्हणायचा. ही त्याची केरळची भाषा ! तो पुण्याच्या आधी त्रिवेंद्रमला होता
ना ! आरव मला ‘बाबा’ म्हणायचा. अशी तिघांचीही मला संबोधनाची वेगवेगळी भाषा होती.
प्रतिक ‘आपी कि (Key) देणा’ टॅक्सीत बसे, बाहेर जाते.’ असा म्हणायचा. तो कारला टॅक्सी म्हणायचा. तो बाहेर कारमध्ये जावून घरी आला, तरी कारची चाबी तो आपल्या जवळच झोपेपर्यंत ठेवत होता. तो लुधियानाला ट्रेनने जात असतांना व घरी पोचल्यावर सुध्दा ‘आपी कि देणा’ असच म्हणत असल्याचे प्रज्ञाशील सांगत होता. प्रतिकपेक्षा इशान मोठा ! तो पण खूप
गोड ! आधी आमच्याकडे येत नव्हता. मग रुळल्यावर आमच्याजवळ यायला लागला. त्याच्या पेक्षा मोठा सिध्दांत व त्याच्यापेक्षा मोठा आरव. हे दोघेही मोठे खेळकर व सक्रीय…! त्यातल्यात्यात आरव तर फारच उड्या मारण्यात पटाईत…! घरातल्या सोफ्यावर दणा-दण उड्या मारायचा. खेळण्यासाठी सर्व नातुंमध्ये चढाओढ लागत असे. एखाद्यावेळी खेळणीसाठी एकमेकांशी बालसुलभ भांडणे होत. मग भांडण सोडविण्यासाठी आमची मोठी धावाधाव व्हायची.
घरात आम्ही सारे जण बसलो असतांना कुणी विचारलं तर ‘आपी त्रास देते’ असा प्रतिक अगदी सहजपणे म्हणायचा. कुणी नाही विचारलं तरीही असाच म्हणायचा. आम्हाला त्याची मोठी गंमत वाटायची.
आताचे मुले फारच हुशार…! ते कॉम्प्युटर, टॅबलेट व स्मार्ट मोबाईल फोन हाताळताना दिसतात. त्यातील व्हिडीओ, गेम पाहतात. खरंच त्यांच्या हुशारकीचं जितके कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
प्रतिकला सोडायला आम्ही रेल्वेस्थानकावर गेलो. त्याला कडेवर घेऊन विचारले, ‘प्रतिक, कुठे चालला.’ ‘लुधियाना जाते’ असे स्पष्टपणे म्हणत होता. आता कुठे आहेस ? ‘अकोला’ असेही म्हणत होता. इतक्या कमी वयात म्हणजे दोन वर्षाचा असतांना तो एवढे सहजतेने बोलतो, याचे आम्हाला नवल वाटत होते.
प्रतीकच्या वाढदिवसानिमित्त जमलेले मुलं, सुना व नातू आपापल्या गावाला निघून गेल्यावर आम्ही पूर्वीसारखे दोघेच राहिलो. बरेच दिवस आम्हाला करमत नव्हते, हे काही सांगायला नकोच…!
आर.के.जुमळे
Leave a Reply