बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग एकेचाळीसावा

15 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग एकेचाळीसावा

३१.  पक्षाचे विशिष्ट कालावधीत अधिवेशन घेणे

मा.कांशीरामजी व मा.श्रीकृष्ण उबाळे असतांना महाराष्ट्रात राज्य स्तरावर एवढेच नव्हे तर जिल्हा व तालुका स्तरावर पक्षाचे अधिवेशने होत होते. तसेच युवक, विद्यार्थी व महिलांचे सुध्दा स्वतंत्रपणे अधिवेशने होत होते. त्यात पक्षाच्या विस्तारावर आढावा घेण्यात येत होता. प्रत्येक युनिट आपल्या क्षेत्रातील कार्याचा अहवाल या अधिवेशनात सादर करीत होते. त्यामुळे त्यांच्या कार्याची प्रेरणा इतर युनिटच्या कार्यकर्त्यांना मिळत होती. अशा उपक्रमामुळे  लहान-सहान कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामकाजात सामावून घेतल्या जात होते. तीच प्रथा आताही सुरु करावी असे वाटते.

३२.  निवडणुका व इतर काळात मिडीयासोबत संपर्कात राहणे

मिडीयासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी काही कार्यकर्त्यांवर सोपवावी. म्हणजे निवडणुका व इतर काळात त्याचा फायदा पक्षाला मिळू शकतो. २०१२ च्या उत्तरप्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत बी.एस.पी.च्या उमेदवाराचा सहभाग मिडीयाच्या चर्चा सत्राच्या कार्यक्रमात दिसून येत नव्हता. त्यामुळे इतर पक्षाचे उमेदवार मुख्यत: बहीण मायावतीच्या पुतळ्याचा व मिळकतीपेक्षा कमाई जास्त हे दोन मुद्दे घेऊन  विरोधक प्रचार करतांना दिसत होते. त्यामुळे काम चांगले पण प्रतिमा खराब असा काहीसा गोंधळ निर्माण करण्यात ते यशस्वी झाल्यासारखे वाटत होते. २०१२ साली उत्तरप्रदेशची सत्ता जाण्यामागे हेही एक कारण असू शकते. म्हणून पक्षाने निवडणुका व इतर काळात प्रसार माध्यमाच्या संपर्कात राहावे व टी.व्ही. वर सादर होणाऱ्या कार्यक्रमाच्या चर्चासत्रात भाग घेऊन पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडावे असे वाटते.

३३.  प्रधानमंत्रीसाठी बहीण मायावतीच्या नावाचा प्रचार करणे

अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री बनण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक अटलबिहारी वाजपेयीची प्रतिमा जनमानसात रुजवित होते. त्यांच्या नावाचे मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करीत होते. आमच्या ऑफीसमध्ये हे लोक सांगायचे की, राजीव गांधी हे बोफोर्सच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेले आहेत. तेव्हा भारताला भ्रष्टाचारापासून फक्त अटलबिहारी वाजपेयीच वाचवू शकतात. तेव्हा यानंतर त्यांनाच प्रधानमंत्री बनवायला पाहिजे. ते भाजपचे नाव घेऊन  प्रचार करीत नव्हते  तर अटलबिहारी वाजपेयीच्या नावाचा  प्रचार करायचे. म्हणजेच शेवटी भाजपचाच प्रचार करीत होते.

याचप्रकारे बहुजन समाजाला सत्तेवर आणून त्यांची प्रगती करायची असेल तर बहीण मायावतीलाच प्रधानमंत्री बनवायला पाहिजे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा जबरदस्त प्रचार सुरु केला पाहिजे. त्यामुळे पक्षाचा आपोआप प्रचार होतो.

दि.२८.०५.१९३८ च्या जनता पत्रिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘मला तुमच्यापैकी प्राइम मिनिस्टर झालेला पाहायचे आहे. मला या मुठभर शेटजी-भटजीचे राज्य नको असून ८० टक्के लोकांचे राज्य हवे आहे.’ हे त्यांचे स्वप्न १९३८ सालातले आहे. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. तेव्हापासून अजूनही असा प्रधानमंत्री झाला नाही. आता बहीण मायावतीच्या स्वरूपात तसे व्यक्तिमत्व मिळाले आहे. तेव्हा बहुजनांनी सारी शक्ती एकवटून बाबासाहेबांचे स्वप्न खरे करून दाखवावे.

बहीण मायावती यांनी ब्राम्हण वर्गाची साथ जरी सोडली व मुस्लीमांना जवळ केले तरी अनुसूचित जाती/जमाती व काही प्रमाणात ओबीसींना सोबत घेवून बहीण मायावती प्रधानमंत्रीच्या खुर्चीपर्यंत पोहचू शकतात. कारण मुस्लीम वर्ग उत्तरप्रदेशात १८.२ टक्के जरी असला तरी त्यापेक्षा आसाम मध्ये ३०.०९ टक्के, पश्चिम बंगाल मध्ये २५.२ टक्के, केरळमध्ये २४.७ टक्के आहेत. आणि पूर्ण देशात त्यांची टक्केवारी ११.६७ टक्के आहे. तेव्हा बहीण मायावती यांना या लोकांपर्यंत पोहचून, त्यांना विश्वास देवून  आपली ताकद वाढवावी लागेल.

फक्त बहीण मायावती यांनी स्टेजवर भाषण करतांना कागदावर पाहून वाचून दाखविण्यापेक्षा उत्स्फूर्तपणे भाषण द्यावे, अशी बऱ्याच लोकांची अपेक्षा आहे. अशा भाषणाचा जनमानसावर खरा प्रभाव पडत असतो. नाहीतर वाचून दाखविलेले भाषण कंटाळवाणे आणि दुर्लक्षित होण्याचा संभव असतो.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: