बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग सहावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

टीप- मला जाणीव आहे की, काही आततायी, शीघ्रकोपी किंवा कर्मठ बीएसपीवाले माझ्या लेखात आलेले प्रतिकूल प्रतिक्रिया वाचून खवळून उठतील. ते आपली लेखणी चालवून माझ्यावर तुटून पडण्याची शक्यता आहे. ते मी उपस्थित केलेल्या मुद्द्याचे/प्रश्नाचे ओढूनताणून उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांना मी सांगू इच्छितो की, त्यांनी पहिल्यांदा माझे सर्व लेख वाचावेत आणि नंतरच त्यांना काय म्हणायचे ते मांडावे. म्हणजे हे लेख लिहण्यामागचा माझा उद्देश त्यांच्या लक्षात येईल. त्यांनी मा.कांशीरामजींचे अनुयायी जरूर बनावे ना की भक्त आणि तेही    अंधभक्त तर मुळीच नाही ! या निमित्ताने जर विचारमंथन – मला अपेक्षित आहे ते होत असेल तर फारच चांगलं ! नाहीतर त्यापेक्षा त्यांना मला एकच सांगायचे आहे की, त्यांनी  बीएसपीची हालत इतकी पतली का झाली याचे उत्तरे शोधून त्यावर उपाय करावे. म्हणजे बीएसपीला वाढवीण्यास नक्कीच मदत होईल याची मला खात्री आहे. माझ्या लेखावर अशा लोकांच्या प्रतिक्रिया वाचून असं कुणी म्हणू नये की, ‘आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पहावे वाकून.’ असे कुठपर्यंत चालू द्यायचे? अजूनही वेळ गेली नाही. फक्त वास्तव परिस्थितीचा अन्वयार्थ शोधून बीएसपीमध्ये  मूलगामी परिवर्तन करणे आवश्यक झाले आहे, हे तरी त्यांनी लक्षात घ्यावे. नाहीतर आपल्या चुका हेच जर आपले धोरण  बनविले तर बीएसपीला कुणीही वाचवू शकणार नाही. एवढे मात्र  खरे !

————————————————————————
भाग सहावा

माननीय कांशीरामजींनी  जाण्यापूर्वी ही चळवळ बहीण मायावती यांच्याकडे सुपूर्द केली. बहीण मायावती यांच्या कार्यकाळात या पार्टीची महाराष्ट्रात तर पीछेहाट झालीच, शिवाय इतर राज्यात सुध्दा तीच गत होत आहे. अती झाल्यावर निदान मातीतरी होऊ नये, म्हणून या तळमळीने जुने कार्यकर्ते हादरून गेल्याचे जाणवत आहेत.

‘बुडती ही जन पहावेना डोळा, म्हणूनी कळवळा येत असे’

या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार मुक्यामुक्याने किंवा उघडपणे कळवळा लोक व्यक्त करीत आहेत.

बी.एस.पी.ला घडवितांना महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजातील कर्मचारी-अधिकारी, विद्यार्थी, महिला, प्राध्यापक, वकील, इंजिनिअर, डॉक्टर, अशा विविध क्षेत्रातील लोकांचे  मोठे योगदान मिळाले. पण त्यातील बहुतांशी मिशनरी वर्ग आज या चळवळीपासून अलिप्त झाला आहे. काही स्वस्थ बसलेत, तर काही इतर पक्षाच्या  वळचणीला गेलेत, तर काहींनी वेगवेगळ्या चुली मांडल्यात.

सुरुवातीच्या काळात या पक्षाने उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाना, मध्यप्रदेश, काश्मीर, बिहार या राज्यात आपला दबदबा निर्माण केला होता. त्याशिवाय राजस्थान, आंध्र, छत्तीसगढ व दिल्ली  याही राज्यात आमदार निवडून आणण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे उत्तरप्रदेश शिवाय पंजाब व मध्यप्रदेश या राज्यातही सत्तेचा प्रबळ दावेदार म्हणून पक्षाची गणना होत होती.

उत्तरप्रदेशात सुरुवातीला समाजवादी पक्ष व भाजप यांच्या सहकार्याने सत्ता मिळाली. त्यानंतर २००७ साली बहीण मायावतीच्या नेतृत्वात पक्षाला निर्विवाद सत्ता मिळाली. लोकसभेचे २१ खासदार व राज्यसभेचे १६ खासदार बनले. त्यामुळे केंद्रीय सरकारवर वचक निर्माण झाला. याचा प्रभाव इतर राज्यात पडून तेथे सुध्दा पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येतील, असे जो-तो स्वप्ने रंगवीत होता. महाराष्ट्रात सुध्दा तसेच घडेल असे वाटत होते. कारण महाराष्ट्रातील जनता रिपब्लिकन पार्टीच्या फाटाफूटीच्या व स्वाभिमानशून्य राजकारणाला कंटाळली होती. त्यामुळेच पक्षाला होणाऱ्या मतदानाची टक्केवारी उत्तरोत्तर वाढत होती. २००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीतही  महाराष्ट्रात ४.८५ टक्के मते मिळाली होती. पण सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र २.३५ टक्क्यावर आली. म्हणजे निम्म्यावर घसरली. याचा अर्थ महाराष्ट्रातील जनतेने बी.एस.पी.ला काही प्रमाणात नाकारले असा होतो. त्यामुळे बी.एस.पी.ची झालेली वाताहत महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला चिंताजनक वाटत आहे.

असाच प्रकार इतर राज्याच्या निवडणुकीत सुध्दा झाला. एकेकाळी ९ आमदार व ३ खासदार दिलेल्या पंजाबमध्ये आता एकही आमदार व खासदार नाही. मध्यप्रदेशात सुध्दा ११ आमदार व २ खासदार निवडून आले होते. तेथेही बी.एस.पी.चा दबदबा कमी झाला. हरियाणात १ खासदार होता. आता तेथेही काही राहिले  नाही. बिहार मध्ये ५ आमदार होते. आता २०१० साली एकही आमदार नाही. २०१२च्या उत्तरप्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत तर कडेलोट झाला. या राज्यात पण पक्षाचा पराभव होवून विरोधी बाकावर बसण्याची पाळी आली आहे.

मी २०११ मध्ये आग्रा येथे सपत्नीक फिरायला गेलो होतो. तेव्हा आम्ही बसलेल्या रिक्षेवाल्याला विचारले की, ‘क्यो भाई, बहन मायावतीका राज कैसे चल रहा है| तो म्हणाला, ‘वो तो सिर्फ बम्मन और पुतले के पीछे पड गयी, हम गरीबोके तरफ वो कहां ख्याल देगी?’ तेव्हाच बहिण मायावतीची सत्ता जाते की काय अशी शंकेची पाल त्यावेळी आमच्या मनात चुकचुकली होती. आणि शेवटी झाले तसेच…! आपल्याकडे बाबासाहेबांनी कमाविले आणि अनुयायांनी गमावले असे म्हणतात. तसेच मा.कांशीरामजी यांनी कमावले आणि बी.एस.पी.च्या आताच्या नेत्यांनी गमावले असे म्हणण्याची पाळी न येवो म्हणजे झाले !

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: