बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग नववा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग नववा

२. पक्षाचे धोरण आखण्यास सुकाणू समिती असावी.

पक्षाच्या बाबतीत दि. १३.१०.१९५१ च्या ‘जनता’ मध्ये बाबासाहेब लिहितात, ‘केवळ एखादी संस्था प्रस्थापित करणे म्हणजे तो पक्ष होत नाही: जिथे लोक विशिष्ट तत्वाने कार्य करायला बद्द होतात, त्यालाच पक्ष म्हणतात. विशिष्ट ध्येय असल्याशिवाय पक्ष जगूच शकत नाही आणि लोकही एकत्र येऊ शकत नाहीत. केवळ राजकीय उदात्त ध्येय  असून चालत नाही. त्या ध्येयाचा विजय झाला पाहिजे. ह्या गोष्टी केवळ एकाकी व्यक्तीमत्वाने सफल होत नाहीत. ती सुसंगत पक्षाकडूनच पार पाडली जातात.’ म्हणजेच पक्षाला यशस्वी होण्याकरीता तीन गोष्टीची गरज आहे.

१. विशिष्ट तत्व, २. विशिष्ट ध्येय आणि ३. त्या ध्येयाचा विजय किंवा त्या ध्येयानुसार वाटचाल.

विचारधारा, सिद्धांत व तत्त्वज्ञानाला  अनुसरून पक्षाचे धोरण असले पाहिजे. त्यानुसार पक्षाची  वाटचाल सुरु असावी अशी अपेक्षा सर्वांनाच असते.

तथापि अलीकडच्या काळात पक्षाच्या धोरणात काही झालेला बदल लोकांना खटकले आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’च्या जागी ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’, ‘हाथी नही, गणेश है, ब्रम्हा विष्णू महेश है’ अशा घोषणा देणे, कार्यक्रमात मंत्रोच्चार करणे, शंख वाजविणे, विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांचे खंडन करतांना कार्यकर्त्यांना अवघड जाणे- जसे आपल्या हयातीत स्वत:चे पुतळे उभारणे, दलित की नही दौलत की बेटी, उत्पन्नापेक्षा संपत्ती जास्त असलेल्या आरोपावरून सी.बी.आय.चा ससेमिरा सुरु होणे, गुजरातमध्ये नरेंद्र मोदीच्या प्रचारासाठी जाणे, आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचे तत्व मान्य करणे, काही जुन्या कार्यकर्त्यांना तडकाफडकी काढून टाकणे- जसे मध्यप्रदेशातील फुलसिंग बरैया, दाउराम रत्नाकर, हरियाणाचे अमनकुमार नागरा, पंजाबचे हरभजन लाखा, कर्नाटकचे बी. गोपाल, महाराष्ट्रातील श्रीकृष्ण उबाळे व त्यांचे साथीदार, ब्रिगेडियर सुधीर सावंत असे कितीतरी उदाहरणे आहेत.

‘बहुजन’ या शब्दा ऐवजी ‘सर्वजन’ या शब्दाचा वापर करणे उचित वाटत नाही. पक्षाच्या नावामध्येच ‘बहुजन’ या शब्दाचा उल्लेख आहे. तो काही बदलता येणार नाही. जातीव्यवस्थेला  सर्व जाती बळी पडल्या नाहीत तर बहुजन समाजातील ६५०० जातीच बळी पडल्यात. म्हणूनच मनुवाद व मानवतावाद या संबंधातील १५-८५ च्या संघर्षाचे सूत्र निर्माण झाले. त्यानुसारच  पक्षाच्या संघर्षाचा ढाचा तयार झाला आहे, हे कसे विसरता येईल?

‘बहुजन’ हा शब्द तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीतून आलेला आहे. अडीच हजार वर्षापूर्वी ‘चरथ भिक्क्वे चारिकंम, बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असा आदेश भगवान बुध्दाने आपल्या भिक्खूगणांना दिला होता. हा भिक्खुगण म्हणजे धम्माचा कार्यकर्ता होता. त्यांनी चारही बाजूने कानाकोपऱ्यात जावून बहुजनाच्या हितासाठी व सुखासाठी धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा, अशी ती शिकवण होती. याच पद्धतीने बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चारही बाजूने जावून बहुजनाच्या कल्याणासाठी कार्य करावे असा महान संदेश आणि आशय त्या शिकवणीत आहे. ‘बहुजन’ या शब्दात फार मोठी शक्ती सामावलेली आहे.  मागास समूहांना आत्मभान निर्माण करणारा असा तो शब्द आहे. हिंदू समाजातील जातीला चिकटलेला तिरस्कृतपणाचा डाग जाऊन त्या ऐवजी ’बहुजन’ असा व्यापक अर्थ मिळाला आहे. त्यामुळे या शब्दाचा अव्हेर करू नये असे वाटते.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: