प्रज्ञा
१.सम्यक दृष्टी
सम्यक दृष्टीचा उद्देश अविद्येचा विनाश करणे हा आहे. मनुष्याला दु:खाचे अस्तित्व आणि दु:खनिरोधाचा उपाय ही उदात्त सत्ये न समजणे म्हणजेच अविद्या होय. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चार आर्यसत्य समजणे म्हणजेच सम्यक दृष्टी होय. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. कर्मकांडावर विश्वास न ठेवणे, निसर्ग नियमाविरुध्द कोणतीही गोष्ट न करणे, काल्पनिक अनुमानावर विश्वास न ठेवता वास्तवतेच्या व अनुभवाच्या सिध्दांतावर विश्वास ठेवणे इत्यादी गोष्ठी सम्यक दृष्टीमध्ये येतात. सम्यक दृष्टी आपल्या मनाला योग्य त्या दिशेने घेऊन जाते आणि आपल्या मनाला योग्य वळण लावते.
२.सम्यक संकल्प
जीवनातील अत्युच्च ध्येय प्राप्तीेसाठी सम्यक संकल्प अत्यंत महत्वाचे आहे. सम्यक संकल्पात उदात्त आणि प्रशंसनीय अशी ध्येये, महत्वाकांक्षा आणि आकांक्षा याचा समावेश होतो. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावीत. हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. मनामध्ये चांगले अथवा वाईट विचार येत असतात आणि म्हणून या विचारांना योग्य अशी दिशा देण्याच्या दृष्टीने सम्यक संकल्प अत्यंत महत्वाचे अंग आहे. जगामध्ये दु:ख आहे आणि या दु:खाला दूर करणे हा सम्यक संकल्पाचा मुख्य हेतू आहे.
शील
३. सम्यक वाचा
सम्यक वाचा म्हणजेच सम्यक वाणी. वाणी ही चांगल्या आणि वाईट गोष्टी निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते. भांडण, तंटा वादावादी हे वाईट वाणीमूळे तर प्रेम, ममता चांगल्या वाणीमूळे ऊत्पन्न होत असते. प्रबोधन, जागृती हे वाणीमूळेच शक्य आहे. म्हणून जीवन जगत असतांना वाणी हे महत्वाचे घटक आहे.
सम्यक वाचा पुढील शिकवण देते. १) माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे. २) असत्य बोलू नये. ३) माणसाने दुसर्या विषयी वाईट बोलू नये. ४) माणसाने दुसर्या्ची निंदानालस्ती करण्यापासून परावृत व्हावे. ५) माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरु नये ६) माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. ७) माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करु नये. त्यांचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे.
४) सम्यक कर्मांत
अष्टांगिक मार्गातील चवथा मार्ग सम्यक कर्मांत हा आहे. जीवनाच्या नियमांशी सुसंगत वर्तन करणे, दुसर्यां च्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करणे म्हणजे सम्यक कर्मांत होय.
५) सम्यक आजीविका
प्रत्येक व्यक्तीकला आपला चरितार्थ चालवायचा असतो. परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत. काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत. दुसर्यां ची हानी किंवा त्यांचेवर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे मार्ग ते चांगले होत. यालाच सम्यक आजीविका म्हणतात.
समाधी
६.सम्यक व्यायाम
सम्यक व्यायाम म्हणजे मनाचा व्यायाम होय. सम्यक व्यायामामुळे अविद्या नष्ट करण्याचा प्रयत्नह करता येतो. सम्यक व्यायामाचे चार हेतू आहेत. १) आपल्या मनात वाईट विचार येत असतील तर ते येऊ न देणे, २) आपल्या मनात वाईट विचार आले असतील तर ते काढून टाकणे, ३) आपल्या मनात चांगले विचार येत असतील तर ते येऊ देणे व ४) आपल्या मनात चांगले विचार आले असतील तर त्याचे संवर्धन करणे, वाढ करणे. अशा प्रकारे आपल्या मनाला योग्य व्यायाम देवून आपले चित्त शुध्द करता येते. चित्त शुध्दीकरीता सम्यक व्यायामाची अत्यंत आवश्यकता असते.
७.सम्यक स्मृती
सम्यक स्मृती म्हणजे योग्य प्रकारे स्मरण करणे, मनाची जागरुकपणा व विचारीपणा होय. जीवनामध्ये जे कार्य करावयाचे आहे ते जागरुकतेने करायचे असते, हीच स्मृती आहे. सम्यक स्मृती दुष्ट वासनावर मनाचा पहारा ठेवते.
८.सम्यक समाधी
मनाला स्थायी व कायम स्वरुपाचे वळण सम्यक समाधीद्वारे लावता येते. चित्ताला स्थिर करण्याचे कार्य सम्यक समाधी करते. सम्यक समाधी मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेचे काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते. त्यामुळेच अकुशल कर्माकडे आकर्षित होणार्याश मनाच्या प्रवृतीला दूर ठेवते. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचा़च नेहमी विचार करण्याची संवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.
आर.के.जुमळे, अकोला
One Response to “आर्यअष्टांगिक मार्ग”