आतातरी शहाणपण शिकले पाहिजे

24 Oct

दिनांक १९.१०.२०१४ रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला. त्यात आंबेडकरी पक्षाची दाणादाण उडाली. बहुजन समाज पक्षाने नेहमीसारखेच याही वेळेस खाते उघडले नाही. रिपब्लिकन पार्टी-आठवले गटाने भाजपशी युती केल्याने त्यांना फार मोठी आशा वाटत होती. पण लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुध्दा पडेल जागा मिळाल्याने त्यांची यावेळीही फसगत झाली. युतीत एक सत्य मात्र उमगलं की भलेही आंबेडकरी जनता कॉंग्रेस-भाजपला मतदान करीत असतील; पण कॉंग्रेस-भाजपचे लोक मात्र आंबेडकरी पक्षाला मतदान करीत नाहीत. याचा अनुभव आठवले यांनी चांगलाच घेतलेला दिसतो.

पूर्वी आठवले गटाने राष्ट्रवादी-कॉंग्रेस सोबत सोयरिक केली होती. पण शिर्डीच्या लोकसभा मतदारसंघात आपटी खाल्ल्याने राष्ट्रवादी-कॉंग्रेसला सोडून शिवसेनेचा पदर धरला. आठवलेने शिवसेनेकडे राज्यसभेची खासदारकी मागितली; पण त्यांनी ती दिली नाही. मग भाजपला दया येऊन आठवलेला खासदार बनविले. आता ते केंद्रात मंत्री बनण्यासाठी आतुर झाले आहे. यावेळेस नाही; पण पुढील विस्तारात पाहू असे नरेंद्र मोदीने सांगितल्याने मंत्रीपदाचं गाजर आठवलेंना सतत खुणवीत आहे. जेव्हा भाजप व शिवसेनेचा काडीमोड झाला; तेव्हा शिवसेनेला जोडलेली भीमसेना तोडून भाजपला जोडली.

जोगेंद्र कवाडे यांनी कॉंग्रेसशी युती केली पण स्वतःचे उमेदवार उभे न करता विधान परिषदेच्या आमदारकीच्या बदल्यात संपूर्ण पक्ष कॉंग्रेसला बांधून टाकला. रिपब्लिकन पार्टी गवई गटाचीही तीच गत झाली. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाचे बळीराम शिरस्कार  बाळापुर मतदार संघातून निवडून आल्याने प्रकाश आंबेडकरांची थोडीफार लाज राखली.

एकंदरीत कोणत्याही आंबेडकरी पक्षांचा राजकीय रथ पुढे गेला नाही. उलट प्रत्येक निवडणुकीत जसा मागे जातो तसाच याहीवेळेस मागेच गेला. भाजप-शिवसेना यांची युती व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी तुटली तरी या सुवर्णसंधीचा फायदा आंबेडकरी नेते व जनतेला घेता आला नाही. अशी दुरावस्था आंबेडकरी पक्षांची का होते? याचा विचार कधीतरी आंबेडकरी जनतेने करायला नको का? हटवादी नेते जर एकत्र येत नसतील तर जनतेने एकत्र का येऊ नये?

भाजप आणि शिवसेना अलग अलग निवडणुकीत उतरून सुध्दा त्यांचे आमदार मागच्या पेक्षा जास्त निवडून आणलेत. त्यामागील कारणे काहीही असोत; पण ते जागृत आहेत ऐवढे मात्र खरे! हिंदुत्ववादी चळवळ पुढे पुढे जात आहे आणि आंबेडकरी चळवळ मात्र मागे मागे पडत आहेत, असं हे चित्र आता निर्माण झालं आहे. प्रत्येक  विचारधारेचे मोजमाप हे त्यांच्या राजकीय शक्तीवरून होत असते. त्यामुळे हिंदुत्ववादी चळवळ वाढत आहे व त्यामानाने आंबेडकरवादी चळवळ मागे पडत आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

त्यांची राजकीय शक्ती निश्चितच उतरोत्तर वाढत आहे. म्हणून त्यांचा दुस्वास वाटणे, हेवा वाटणे किंवा मत्सर वाटणे साहजिक जरी असले; तरी त्यांच्या परिश्रमाचे त्यांना मिळालेले ते फळ आहे. कारण त्यांचा nनरेंद्र मोदी देशाचा प्रधानमंत्री असूनही वेळ काढून महाराष्ट्रात २७ पेक्षा जास्त सभा घेतात आणि दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांचे तर अगणित सभा होतात…! आमची बहिण मायावती सद्याच्या स्थितीत मुख्यमंत्री नसतांना सुध्दा त्यांना महाराष्ट्रात केवळ पाच-सहा सभा घेता येऊ शकल्या! भाजपची पितृ संघटना असलेली आर.एस.एसचे कार्यकर्ते समाजाच्या प्रत्येक स्तरात रात्रंदिवस प्रचार करीत असतात. ते सारे माध्यमे, साधने कामाला लावतात. म्हणून त्यांना यश मिळणे साहजिकच आहे. म्हणून त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. कारण प्रत्येकजण आपापल्या चळवळीचे काम करीत असतो. ते त्यांच्या चळवळीचे काम करतात. आपण मात्र आपली चळवळ वाढविण्यासाठी काय करतो; हाच खरा प्रश्न आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनांक २० जुलै १९४२च्या नागपूर येथील अखिल भारतीय दलित परिषदेत इशारा देतांना म्हणाले होते की, ‘हिंदू समाज व्यवस्थेने ज्या मानवीय अधिकारांची गळचेपी आणि लांडगेतोड केली, त्यांच्या पुनर्स्थापनेसाठी हा संघर्ष आहे. जर ही राजकीय लढाई हिंदू जिंकले आणि आम्ही हरलो तर ही दडपशाही आणि लांडगेतोड तशीच सुरु राहील.’ वर्णवर्चस्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आर.एस.एस.) ही संघटना संपूर्ण भारतावर विळखा घालायला निघाली आहे. त्यांनी नरेंद्र मोदीचा ओ.बी.सी. मोहरा पुढे करून देश ताब्यात घेतला व आता एकेक राज्य पादाक्रांत करीत आहे. २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र आणि हरियानाला ताब्यात घेतले. आतापर्यंत २९ राज्यांपैकी ९ राज्यावर त्यांनी आपली हुकुमत प्रस्थापित केली  आहे.  

ब्राम्हणवाद्यांचे खरे शत्रू आंबेडकरवादी व गैर हिंदू म्हणजे मुस्लीम व ख्रिचन आहेत. त्यांना काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष अगदी जवळचे आहेत. काँग्रेसला पर्याय म्हणून त्यांनीच जनसंघाचे नाव बदलवून भाजप ठेवले. बाटली बदलविली; पण लोकांना धार्मिक व आध्यात्मिक नशेत झिंगत ठेवणारी दारू तीच आहे. त्यामुळेच हिंदुत्वाचा आर.एस.एसचा अजेंडा राजकीय सत्तेच्या माध्यमातून राबविण्यासाठी त्यांनी भाजपला वाढविणे सुरु केले आहे.

ब्राम्हणांनी सत्तेत वाटा घेण्यासाठी बहिण मायावतीला २००७ साली उत्तरप्रदेशची सत्ता सोपविली होती. पण मुस्लीम वर्गांनी ब्राम्हणांच्या घुसखोरीमुळे बहिण मायावतीची साथ सोडून मुलायमसिंहच्या समाजवादी पक्षाकडे गेले. त्यामुळे २०१२ मध्ये बहिण मायावतीची राज्यातील  सत्ता गेली. नंतर २०१४च्या लोकसभेच्या निवडणूकीत नरेंद्र मोदीच्या रूपाने ब्राम्हणवाद्यांना मोहरा मिळाल्याने, त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे ८० पैकी ७१ खासदार निवडून आणण्याची किमया केली. मायावतीला मात्र एकही खासदार निवडून आणणे शक्य झाले नाही.

मागच्या काही निवडणुकांवरून एक बाब स्पष्ट होते की, या देशात मनुवाद्यांना द्विपक्षीय राज्यपद्धतीचा पायंडा पाडायचा आहे. कॉंग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष आलटून पालटून नेहमीसाठी सत्तेवर व विरोधीपक्ष राहतील, अशी व्यवस्था त्यांना करायची आहे. त्यामुळेच कॉंग्रेसने  मुद्दामच जनतेचा रोष ओढवून केंद्राची व आता महाराष्ट्राची सत्ता भाजपाला सहज हस्तांतरित केली आहे. या देशात द्विपक्षीय राज्यपद्धती निर्माण व्हायला पाहिजे; असे वक्तव्य लालकृष्ण अडवानी यांनी मागे एकदा केले होते. त्यानुसारच भाजप व कॉंग्रेसची वाटचाल सुरु आहे असे म्हणावे लागेल.

मनमाड येथील दिनांक १६.०१.१९४९च्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘खरी लोकशाही निर्माण करावयाची असल्यास आज हजारो वर्षे डोक्यावर नाचत असलेला वरचा वर्ग खाली व समाजातील खालचा वर्ग वर गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही. क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले. आसासह चाक पूर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांती होऊ शकत नाही, ते चक्र आम्हीच फिरवू.’ याचा अर्थ क्रांतीचे हे चक्र फिरविण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांवर सोपविली.

त्यासाठी त्यांनी सांगून ठेवले की, ‘आमच्यावर होणारा जुलूम दुसरा कोणी नाहीसा करणार नाही. तो आपला आपणच नाहीसा केला पाहिजे. यासाठी कायदेमंडळात आपले योग्य प्रतिनिधी पाठविले पाहिजे. ते तेथे जाऊन आपल्या हक्कांसाठी झगडतील.’ (अहमदाबाद येथील दिनांक २०.११.१९४५ चे भाषण )

मग ही जबाबदारी कोणी उचलली पाहिजे? याचे उत्तर बाबासाहेब मनमाड येथील दिनांक १६.०१.१९४९च्या भाषणात देतात. ते म्हणाले होते की, ‘एखाद्या समाजाची उन्नती त्या समाजातील बुद्धिमान, होतकरू व उत्साही तरुणांच्या हाती असते.’

म्हणजेच समाजातील बुद्धिजिवी, होतकरू व तरुण वर्गाने पुढाकार घेणे बाबासाहेबांना अभिप्रेत होते. बुद्धिजिवी वर्गाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर “जातिभेद का उच्छेद” (Annihilation of Caste) या पुस्तकात लिहितात की, “प्रत्येक देशामध्ये बुद्धिजिवी वर्ग प्रभावशाली असतो. जो सल्ला व नेतृत्व देऊ शकतो. देशातील अधिकांश जनता विचारशील व क्रियाशील नसतात. ते बुद्धीजीवी वर्गाचे अनुकरण करून त्या मार्गाने जात असतात. म्हणून त्या देशाचे समाजाचे भविष्य बुद्धिजिवी वर्गावर अवलंबून असते. बुद्धिजिवी वर्ग चांगला किंवा वाईट असू शकतात. बुद्धिजिवी वर्ग इमानदार, स्वतंत्र व निष्पक्ष असेल तर समाजाला संकटकाळी मार्ग काढून योग्य मार्गदर्शन करू शकेल. समाजाला सहाय्य करू शकेल. पथभ्रष्ट लोकांना ते चांगल्या मार्गावर आणू शकतात. समाजाला आणीबाणीच्या काळात दिशा देण्याचे काम करतो, तो बुध्दिजिवी” अशी व्याख्या बाबासाहेब करतात. सध्या आणीबाणीची वेळ निश्चित आली आहे. कारण ज्या राजकीय पक्षाचा प्रभाव असतो, त्या पक्षाच्या विचारधारेवर आधारित चळवळ वाढत असते. हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब राजकारणाचे महत्व आणि निकड समजावून सांगतांना म्हणतात, “आपल्या प्रगतीसाठी जिच्यावर आपण अवलंबून राहू शकू अशी एकच गोष्ट आहे व ती म्हणजे राजकीय शक्ती हस्तगत करणे. आपल्या मुक्तीचा तो एकच मार्ग आहे. याबद्दल तर मला मुळीच संदेह नाही व या शक्तीशिवाय आमचा सर्वनाश होईल.” (अ.भा.दलित वर्ग परिषद नागपूर १८,१९ जुलै १९४२)

      “अस्पृष्य समाजाला स्वातंत्र्य, इज्जत व माणुसकी पाहिजे असेल, तर तुम्हाला राजकारण काबीज करावयास पाहिजे. सध्या आपल्याकडे कोणतेच साधन नाही. म्हणूनच आपला नाश व अवनती झाली आहे. आपणास उठण्याचीही ताकद राहिलेली नाही. आपली समाज संख्याही पण अल्प आहे व तिही विस्कटलेली आहे. ही सर्व परिस्थिती सुधारुन घेण्यासाठीच आपल्या हाती राजकीय सत्ता पाहिजे.” (पुणे ०४.१०.१९४५चे भाषण, भाषण खंड १ संपादक- गांजरे पृष्ठ १३१)   “तुकड्यासाठी दुसर्‍याच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ समाजावर येऊ नये, पोटापाण्याचा प्रश्‍न सुटावा, सन्मानाने राहावयास मिळावे यासाठीच राजकीय सत्तेची जरुरी असते आणि ती मिळविण्यासाठीच आम्ही झगडत आहोत.” (भाषण खंड १ संपादक- गांजरे पृष्ठ १५३)

      हे खरं आहे की, शासनकर्ती जमातीवर अन्याय, अत्याचार होत नाहीत. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर गोळीबार हत्याकांड किंवा खैरलांजीसारखे प्रकरणे मराठा अथवा ब्राम्हणांच्या घरी होत नाहीत. कारण ते शासनकर्ती जमाती आहेत. म्हणूनच आतातरी आपले डोळे ऊघडणे क्रमप्राप्त  झाले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेप्रमाणे समाजामध्ये हजारो वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स निर्माण झाल्याने समाज आता निश्चितच प्रगल्भ झालेला आहे यात वाद नाही. हे सारे उच्चपदस्थ लोक आंबेडकरी चळवळीचे लाभार्थी आहेत, हे कुणीही नाकारू शकत नाहीत.

महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघांचे विश्लेषण केल्यास केवळ बौद्धांचे २५-३० टक्के मतदान असलेले ३१ मतदार संघ व १०-२०  टक्के मतदान असलेले १५८  मतदार संघ महाराष्ट्रात आहेत. म्हणून या मतदार संघात तरी आंबेडकरी मतदार निश्चितच प्रभाव पाडू शकतात एवढे मात्र नक्की! मुस्लीम मतदारांचे ध्रुवीकरण होवून एम.आय.एमचे दोन आमदार महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेत. मग बौध्द मतदारांचे ध्रुवीकरण होवून बौद्धांचे आमदार का निवडून येऊ शकत नाहीत?

बौध्द समाजाने खरेच एकजुटीने मतांची टक्केवारी वाढवून काही प्रतिनिधी निवडून आणणे सुरु केले तर परिवर्तनवादी व समविचारी पक्ष, मागासवर्गीय संघटना जे आरक्षणाच्या एका सूत्रात बांधले गेले आहेत व जे हजारो वर्षापासून ब्राम्हणवाद्यांचे बळी आहेत; असे नक्कीच या बौध्द समाजासोबत येतील यात वाद नाही. त्याशिवाय मुस्लीम, शीखांसारखे अल्पसंख्याक वर्ग सुध्दा जुळायला वेळ लागणार नाही. असे जर घडले तर या देशात एकतर द्विपक्षीय शासन पद्धतीत भाजप आणि आंबेडकरी असे दोनच पक्ष राहतील किंवा भाजप-कॉंग्रेस नंतर आंबेडकरी पक्षाचा तिसरा पर्याय उपलब्ध होईल, यात शंका नाही. बाबासाहेबांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन विसर्जित करून व्यापक असा रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याच्या मागे तोच उद्देश समोर ठेवला होता.

शेवटी बाबासाहेबांना कळकळीने नागपूर येथील दिनांक २०.०७.१९४२ भाषणात सांगावे लागले की, “तुम्हाला माझ्या संदेशाचे अंतिम शब्द हेच आहेत की “शिकवा, संघर्ष करा आणि संघटीत रहा. (Educate, Agitate and Organize) स्वत:च्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा (have a faith in yourselves) आणि कधीही निराश होऊ नका, (and never lose hope)” यातही बाबासाहेब या तीन सूत्रांमध्ये पहिल्या सूत्रात ‘शिकवा’ असे म्हणतात. म्हणजे स्वतः शिकल्याशिवाय इतरांना शिकविता येणार नाही. शिकल्यानंतर इतरांना शिकवा असा त्याचा अर्थ! दुसऱ्या सूत्रात संघर्ष करा. म्हणजे स्वत:ला व समाजाला संघर्षासाठी तयार करा. तिसऱ्या सूत्रात स्वत: संघटीत होवून समाजाला संघटीत करा.

बुद्धम शरणंम गच्छामी, धम्मम शरणंम गच्छामी व संघम शरणंम गच्छामी यातील मतितार्थ तोच आहे. बुध्द म्हणजे ज्ञान म्हणजेच शिकणे व शिकविणे आलेच! धम्म म्हणजे योग्य जीवन जगण्याचा मार्ग म्हणजेच संघर्ष आला! या मार्गावर चालणारा संघ म्हणजे भिक्खू संघ म्हणजेच संघटना! असाच अर्थ बाबासाहेबांनी त्रिशरणाचा घेऊन ‘शिकवा, संघर्ष करा व संघटीत व्हा” असा मुलमंत्र दिला.  

याचाच उपयोग प्रत्येकांनी आपल्या जीवनात करून आपली जबाबदारी उचलली पाहिजे. वकिलांनी समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला कायदेशीररित्या अटकाव निर्माण केला पाहिजे. डॉक्टरांनी समाजाचे स्वास्थ सांभाळलं पाहिजे. इंजिनिअर्सने समाजाच्या विकासाचे प्रोजेक्ट तयार केले पाहिजे. समाजाची बांधणी केली पाहिजे. शिक्षक-प्राध्यापकांनी समाजाला शिकवलं पाहिजे. व्यावसायिक व उद्योगांनी संघटना चालविण्यासाठी निधी मजबूत केला पाहिजे. कारकून व कार्यालयीन नोकरदारांनी पारदर्शकरीत्या हिशोब ठेवला पाहिजे. पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी समाजाला सुरक्षा प्रदान केली पाहिजे. उच्च पदस्थ शासकीय अधिकारी यांनी सरकारच्या योजनेचा फायदा समाजापर्यंत पोहचविला पाहिजे. पटवारी, ग्रामसेवक यांनी खेड्यापाड्यात राहाणाऱ्या शेवटच्या माणसाला जागवलं पाहिजे. साहित्यिक, वृतपत्र (वृत्तरत्न सम्राट, विश्वरत्न सम्राट, जनतेचा महानायक, लोकनायक इत्यादी) व टी.व्ही.चॅनेल (लॉर्ड बुध्दा टी.व्ही व आवाज इंडिया) यांनी समाजाला जागवून, त्यांचे प्रबोधन करून सुसंस्कारित केले पाहिजे. ही यादी आणखी लांबू शकते. सांगायचे एवढेच की जर कामाची वाटणी करून प्रत्येक वर्गाने इमानेइतबारे आपापली जबाबदारी पार पाडली तर समाजाचा विकास होऊन राजकीय दृष्ट्या प्रगल्भ होण्यास वेळ लागणार नाही.

पुढील पाच वर्षे यापद्धतीने मशागत केली तर येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत चांगले पिक यायला काही हरकत राहणार नाही असे वाटते.

मग उठा मित्रांनो…! बाबासाहेबांना पुन्हा एकदा वचन द्या…! जसं बाबासाहेब हयात असतांना त्यावेळेसच्या लोकांनी दिलं होतं तसं…! त्यासाठी त्यांच्या नागपूर येथील दिनांक २०.०७.१९४२च्या भाषणाची आठवण करा. ज्यात बाबासाहेबांनी म्हटले होते की, ‘आपल्या अधिकारांसाठी शक्ती, ऐक्य आणि खंबीरपणे उभे राहण्याची हमी, आपल्या अधिकारांसाठी संघर्षाची आणि जेव्हापर्यंत आपण आपले हक्क मिळवीत नाही तोपर्यंत परत न फिरण्याची हमी, मला हवी आहे. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडाल असे मला वचन द्या!’

म्हणूनच प्रसिद्ध दलित साहित्यिक दया पवार मोठ्या कळकळीने म्हणतात की, “प्रखर तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला. ज्या काजव्यांचा आम्ही जयजयकार केला, ते केव्हाच निस्तेज झालेत. आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा आणि क्रांतीचा जयजयकार करा !”

दिनांक- २३.१०.२०१४

मोबाईल- ९३२६४५०५०६ 

पत्ता- रामी हेरीटेज, आर.टी.ओ. जवळ अकोला

 

 

 

 

Leave a comment