शासनकर्ती जमात बनण्याची बाबासाहेबांची संकल्पना कशी पूर्ण होणार?

30 Jun

दिनांक १६.०५.२००९ रोजी लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला. त्यात आंबेडकर चळवळीतील प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, आर.एस.गवई यांचा मुलगा डॉ. राजेन्द्र गवई, सुलेखा कुंभारे, गंगाधर गाढे, टी.एम. कांबळे, प्रा.यशवंत मनोहर असे व ईतर लहानमोठ्या नेत्यांना हार पत्करावी लागली.
      म्हणून आंबेडकर जनतेने याची नोंद घेऊन आत्मपरिक्षण करणे व त्यावर उपाययोजना करणे आवश्यक नाही काय? या पराभवाला आंबेडकरी नेत्यांची फुटीर वृती जेवढी कारणीभूत आहे, तेवढीच आंबेडकरी जनता कारणीभूत नाही काय? विशेषत: समाजातील शिकलेला वर्ग याला मुख्यत: जबाबदार आहे असे वाटते.
      डॉ.बाबासाहेबांचे खाजगी सचिव नानकचंद रत्तू यांनी लिहिलेल्या ’बाबासाहेबांच्या आठवणी’ या पुस्तकात ’शेवटचे दिवस’ या प्रकरणात बाबासाहेब म्हणतात, “मला लोकांना शासनकर्ती जमात म्हणून बघायचे आहे. जे समाजातल्या इतर घटकांसोबत मिळून समानतेने राज्य करतील. मी जे काही अथक प्रयत्‍न करुन मिळविले आहे, त्याचा लाभ आपल्या काही शिकलेल्या लोकांनी उठविला आहे. पण त्यांनी आपल्या अशिक्षित बांधवाकरीता सहानुभूती ठेवून काहीही केलेले नाही. त्याद्वारे त्यांनी आपली नालायकी सिध्द केली आहे. माझे जे काही स्वप्न होते ते त्यांनी धुळीस मिळविले आहे. ते स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी जगत आहेत. त्यांच्यामधून कुणीही समाजासाठी कार्य करायला तयार नाहीत. ते स्वत:च्या नाशाच्या मार्गाने चालले आहेत. मी आता माझे लक्ष खेड्यापाड्यांमध्ये राहणार्‍या अशिक्षित बहुजन समाजाकडे देणार आहे. जे आजपर्यंत पिडीत आहेत आणि आर्थिक दृष्ट्या न बदलता तसेच आहेत.” ( Reminiscences and Remembrances of Dr.B.R.Ambedkar with Babasaheb till the end, page No.191)
      त्याचप्रमाणे दिनांक १२ व १३ फेब्रुवारी १९३८ रोजी मनमाड येथे झालेल्या जी.आय.पी. रेल्वे कामगार परिषदेसमोर भाषण करतांना बाबासाहेब म्हणाले होते की, ’कामगारांनी राजकीय उद्दीष्टांसाठी सुध्दा संघटीत झाले पाहिजे.’
            म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार कामगार संघटना व शिकलेला वर्ग यांची वाटचाल तशी होतांना दिसून येत नाही. म्हणून राजकीय अपयश आपल्या पदरी पडत आहे असे वाटते. ज्याप्रमाणे हिंदूत्ववादी सर्व संघटना त्यांच्या राजकीय पक्षाच्या मागे संपूर्ण ताकद लावतात. तशी ताकद आंबेडकरी संघटनांनी निर्माण करुन आपल्या राजकीय पक्षाच्या मागे लावतांना दिसत नाहीत. ही खरी शोकांतीका आहे. बहुजन समाजातील अस्तित्वात असलेल्या संघटना एकतर आंधळी असतात किंवा पांगळी असतात. त्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही. बुध्दी असते तर ताकद नसते, ताकद असते तर बुध्दी नसते. अशी अवस्था बहुतेक संघटनांची झाली आहे. बुध्दीला कुठे जळते ते दिसते; परंतु विझविण्यासाठी धावण्याची ताकद नसल्यामुळे पांगळी असते. तसेच धावण्याची ताकद असली तरीही कुठे जळते ते दिसत नाही. म्हणून आंधळी असते. अशा आंधळ्या-पांगळ्या संघटनांचा सुळसुळाट झाल्यामुळे पाहिजे ते यश दृष्टोपतीस येत नाही.
            आपल्या कामगार संघटनांनी ज्यामध्ये शिकलेला असा बुध्दीवादी वर्ग आहे, त्यांनी समाजाचे राजकीय प्रबोधन करुन आपला वेळ, बुध्दी व पैसा याचा आपल्या कामासोबतच राजकीय कामासाठी सुध्दा वापर करुन गैरराजकीय मुळे पक्के करायला पाहिजे होते. परंतु तसे केलेले दिसत नाही. त्याउलट त्यांनी आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्षाची बांधीलकी तोडून मनुवादी सत्ताधारी पक्षाला जवळ केलेले आनेकदा दिसून येते. आपल्या वैयक्तिक प्रगतीमध्ये त्यांनी आंबेडकरी चळवळीचा फायदा घेतलेला असतो परंतु त्याचा उपयोग मात्र मनुवादी सत्ताधारी पक्षाच्या चळवळीला होतो आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही.
      आंबेडकरी चळवळीचे विरोधक असलेले सत्ताधारी पुढारी मार्गदर्शक म्हणून आपल्या अनेक कार्यक्रमात आंमत्रित करीत असल्याने ते आपले विचार पेरुन आंबेडकरी सुशिक्षित वर्गाला प्रभावित करीत असल्याचे आपण अनेकदा पाहत असतो. बाबासाहेबांची ’शासनकर्ती जमात’ बनण्याची संकल्पना या शिकलेल्या वर्गांनी समजावून घेऊन व ते समाजाला समजाऊन सांगण्याचे कार्य हा वर्ग करीत नसल्यामुळे समाज आज भरकटत जाऊन दिशाहीन होऊन, कोणत्याही पक्षाच्या वळचणीला जाऊन उभा राहत असलेला आपण पाहतो आहे.
      समाजातील बहुसंख्य लोकं उदासीन, निष्क्रिय व अजागृत झालेले दिसत आहेत. एकतर ते मतदार म्हणून नाव नोंदनी करीत नाहीत किंवा असेल तर मतदान करीत नाहीत. कोणीही निवडून आला तर मला काय त्याचे? अशी नकारात्मक भावना जोपासीत असतात. हरणार्‍या उमेदवाराला मत देऊन मी माझे मत कशाला वाया घालऊ? त्यापेक्षा ज्यांची हवा असेल त्यालाचा मत द्यावे अशीच त्यांची धारणा बनलेली असते जरी तो उमेदवार आंबेडकरी पक्षाचा नसला तरी! अशा प्रवृती व समजुतीमुळे स्वत:ची ताकद निर्माण करण्याची उर्मी तो हरवून बसतो.
            बाबासाहेब म्हणायचे की, ’मिठ-मिरचीसाठी आपले मत विकू नका. कारण तुमच्या मतामुळे सरकार बनत असते.’ परंतु आपण पाहतो की, काही लोकं सर्रासपणे मते विकत असतात. बाबासाहेबांचे पुतळे, विहार बांधण्यासाठी सुध्दा पैशाची मागणी करायला मागेपुढे पाहत नाहीत. म्हणजे आता प्रत्य्क्ष बाबासाहेबांना सुध्दा पुतळ्यांच्या रुपात विकायला काढल्याचे चित्र कुठे कुठे दिसत आहे. धनदांडगे विरोधी उमेदवार दारु पाजतात, पैसे देतात, कपडे-लत्ते देतात अशा लालचेला काही लोकं बळी पडून आपले बहुमोल मते त्यांना देऊन निवडून आणायला मदत करीत असतात. हे एक कटू सत्य आहे. काही ठिकाणी समाजातील सरपंच, पोलिसपाटील किंवा इतर अशा सन्मनिय पदावर काम करणारे व ज्यांच्या मागे गठ्ठा मतदान असते अशा लोकांना इतर लक्षाचे लोकं ऎनकेन प्रकारे दबावात आणून स्वकिय पक्षांच्या उमेदवाराविरुध्द मते देण्यास भाग पाडीत असतात.
            आपल्याच आंबेडकरी पक्षाला मतदान करण्यास प्रवृत न करता शिवसेना-भाजपा निवडून येतील म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करा. तसेच दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस खरे जातीयवादी आहेत असे म्हणून शिवसेना-भाजपाला मतदान करा. अशा प्रकारची विसंगत भुमिका आपलेच पुढारी घेत असतील तर आपली स्वत:ची ताकद कधितरी निर्माण होईल कां? अशी रास्त शंका निर्माण होत आहे.
      बाबासाहेब म्हणाले होते ते खरेच आहे! ते म्हणाले होते की, ’माझ्या गैरहजेरीत स्वाभिमानशून्य लोक दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिऊन तुमची दिशाभूल करतील. तेव्हा अशा लोकांपासून सावध रहा.’
      म्हणून अशा नेत्यांना व लोकांना बाबासाहेबांनी दाखविलेल्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कुणीतरी प्रय‍त्‍न करायला नको कां? म्हणून आता समाजातील शिकलेला बुध्दिवादी, साहित्यीक, नोकरदार, निवृत कर्मचारी/अधिकारी, युवावर्ग, महिला, व्यावसायिक इत्यादी सर्व वर्गांनी एकजूटीने व एकमताने पुढाकार घेऊन राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी सक्रिय होणे आवश्यक झाले आहे. नव्हे ती आता काळाची गरज झाली आहे.
      तिकीटासाठी, मंत्रीपदासाठी दुसर्‍याकडे हात पसरणे व ते मिळाले नाही म्हणून आंदोलन करणे, कलर्स टी.व्ही. चॅनेलमध्ये रामदास आठवले यांना बिग बॉस मध्ये घेतले नाही म्हणून आंदोलन करणे, निवडणुक जिंकता आली नाही म्हणून कुणाच्यातरी विरोधात आंदोलन करणे अशा प्रकारच्या आंदोलनामुळे आंबेडकरी चळवळीचा स्वाभिमान दुखावला जात आहे याचे भान आंदोलनकर्त्या लोकांना कसे राहत नाही, याचे वाईट वाटते. आंदोलन कशासाठी करावे याचे तारतम्य राहिलेले दिसत नाही. इतके अध:पतन व अवमूल्यन होत असतांना गप्प बसून उघड्या डोळ्याने सर्वांना पाहावे लागत आहे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. आतातरी याचकाची, मागण्याची प्रवृती सोडून स्वत:ची ताकद निर्माण केल्याशिवाय आपण देणार्‍यांच्या पंगतीत कसे जावून  बसणार?
त्यासाठी सर्वांनी विचार विनिमय करुन ठोस अशी यंत्रणा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणे आता काळाची गरज झाली आहे. तरच बाबासाहेबांचे ’शासनकर्ती जमात’ बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्याच्या दिशेने आपणास वाटचाल करता येईल. नाहीतर प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस ’येरे माझ्या मागल्या’ असेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल व ’शासनकर्ती जमात’ कधीतरी बनू का? असा प्रश्‍न नेहमीसाठी अनुत्तरीतच राहील!
टीप:- सदर लेख ’दैनिक विश्व सम्राट, मुंबई’ या वृतपत्रात दि. ०८ जुलै २००९ रोजी प्रकाशीत झाला.
      या लेखावर अनेक लोकांच्या मोबाईलद्वारे प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातील काही प्रतिक्रिया येथे नमुद केल्या आहेत.
१. लेख सर्वांनाच आवडला. काहींनी आमच्या मनात जे होते तेच तुम्ही लिहिलेत असेही सांगितले. .
२. शासनकर्ती जमात बनण्यासाठी पुढे काय करायला पाहिजे याबाबत काहींनी चर्चा केली.
३. काहींनी विचारले की, कोणत्या पक्षाला अथवा गटाला समाजाने समर्थन करावे ते लेखात लिहिले नाही.
४. तुमचा लेख किती लोकं वाचतील? कारण समाजामध्ये वाचक वर्ग फार कमी आहेत असे काही लोकांनी सांगितले.
५. समाजातील किती बुध्दिवंत शासनकर्ती जमात बनण्यासाठी प्रतिसाद देतील याबाबत शंकाच आहे असेही काही म्हणालेत.
६. काहींनी विचारले की, त्यात ऎक्याबाबत कां लिहीले नाही? एका कार्यकर्त्यांनी मला ठनकावून विचारले की, तुम्ही अकोल्याचे ना? मग बाळासाहेबांनी (प्रकाश आंबेडकर) ऎक्य करावं म्हणावं!
७. काहींनी सांगितले की, सध्याचे राजकारण अशिक्षित व बेरोजगार लोकांकडे असल्यामुळे त्यांनी हे क्षेत्र पोटापाण्याचा व त्यांच्या कुटूंबाच्या येणार्‍या पिढ्यांसाठी धन कमाविण्याचा धंदा बनविला आहे.
८. एकाने डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल व भारतीय बौध्द महासभेमध्ये लोकांनी काम करावे असे सांगितले.
९. एकाने डॉ. बाबासाहेब गेल्यानंतर त्यांच्या सारखा एकही नेता झाला नाही. जे काही पुढारी झालेत त्यांचेमध्ये आत्मविश्वास, नैतिकता व त्यागी वृती राहिली नाही म्हणून आंबेडकरी चळवळ पुढे जाऊ शकली नाही असे सांगितले.

Leave a comment