आठवले यांनी ठाकरे यांच्या सोबत जरुर युती करावी, पण स्वत:ची ताकद वाढवून!द वाढवून!

23 Jun

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा २००९ साली १५ व्या लोकसभेत शिर्डी मतदार संघात पराभव झाला. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत गेल्या २० वर्षे असलेली युती तोडून टाकली. त्यानंतर त्यानी आर.पी.आयच्या सर्व गटाच्या एकीची हाक दिली. एकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे.जोगेंद्र कवाडे, आर.पी.आय.गवई गटाचे डॉ.राजेन्द्र गवई, दलित पॅंथरचे नामदेव ढसाळ हे सामील झालेत. भारीप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर मात्र या एकीत सामील झाले नाहीत. तर डॉ.राजेन्द्र गवई हे विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी कॉंग्रेसच्या ताफ्यात निळा झेंडा सोपवून एकीमधून बाहेर पडलेत.
त्यानंतर रामदास आठवले यांनी लोकसभेच्या पाठोपाठ सहा महिन्यानी आलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकीत आर.पी.आय (एकीकृत) व डावे पक्ष असे मिळून तिसर्‍या आघाडीचा (रिडालोस) प्रयोग केला. त्यातही एकीकृत-आर.पी.आयला एकही विधानसभेची जागा निवडून आणणे शक्य झाले नाही. म्हणून सत्तेत राहण्यासाठी (सत्तेवर नव्हे) आता ते जोगेंद्र कवाडेंना सोडून शिवसेना व भाजपशी युती करु पाहत आहेत. सध्या ते तिघेही एकत्रीत मेळावे घेत आहेत. ९ जून २०११ ला मुंबईला झालेल्या मेळाव्यात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे म्हणतात, “रामदास आठवले यांनी कॉग्रेसच्या जळत्या घराला लाथ मारुन आपला हात १० वर्षासाठी आमच्या हातात दिला आहे. आम्हीही तुमची एवढी काळजी घेऊ की तुम्ही ही साथ आयुष्यभर सोडणार नाही.”..
या युतीला त्यांनी भीमशक्ती-शिवशक्ती असे नाव दिले आहे. याबाबत आठवले म्हणतात की, “कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने दलित मतांचा निवडणुकी पुरताच वापर करुन नंतर वार्‍यावर सोडले. सहा वर्षे खासदार असूनही आपल्याला केंद्रात मंत्रीपद दिले नाही. केवळ एकच तिकीट द्यायचे आणि तीन खासदार निवडून आलेले नाहीत म्हणून मंत्रीपद नाकारायचे असा प्रकार कॉंग्रेसने केला आहे.”
युती बाबत ते म्हणतात की,  “भाजप-सेनेसोबत सध्या केवळ भ्रष्टाचार, महागाई आणि दडपशाहीविरुध्द आम्ही एकत्र आलो आहोत. दलित समाजातील विचारवंताशी चर्चा करुन सामाजिक-आर्थिक कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल. त्यानंतर भाजप-सेनेच्या नेत्यांसोबत सामाजिक आर्थिक कार्यक्रम आणि सत्तेतील वाटा याबाबत बोलणी केली जाईल. ऑक्टोबरनंतरच युतीचा निर्णय घेण्यात येईल.”
दुसरीकडे ते नागपूरच्या भाषनात म्हणतात की, “लोकांच्या भावना आणि मत जाणून घेऊन संपूर्ण विचारांतीच शिवशक्तीसोबत युती केली आहे. १९८९ मध्ये सर्वपथम कॉंग्रेससोबत आम्ही युती केली तेव्हा ३६ जागा आमच्या पाठिंब्याने कॉंग्रेसने जिंकल्या होत्या. तेव्हासुध्दा रिपाईचे सर्व नेते सोबत आले नव्हते. आता शिवसेनेला सोबत घेतल्याने सत्तापरिवर्तन निचित आहे. दोनशे मतदारसंघात पाच हजार ते विस हजारापर्यंत आमची व्होट बॅंक आहे. त्यामुळे कोणी रिपाईचे नेते सोबत आले नाहीत तरी काही फरक पडत नाही.” एकीकडे ते असे जरी म्हणाले तरी दुसरीकडे सर्व दलित नेत्यांनी आमच्याबरोबर एकत्र येऊन डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावावा असेही ते म्हणाले.
या युती बाबत जनमानसात अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याबाबत काहिंनी लेख लिहिलेत तर काहिंनी वृतपत्रात आपले भाष्य प्रकाशित केले आहेत.
.केशव हंडोरे आपल्या लेखात म्हणतात की, “ही तर ठाकरे-आठवले यांची युती आहे. भीमशक्ती कोणत्याही एका नेत्याच्या मागे नाही. आठवलेची शिवसेनेसोबतची युती म्हणजे हे सत्तेसाठी आहे. यामुळे काही नेते आणि कार्यकर्ते यांचेच भले होईल. जर आठवलेंना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिर्डीमध्ये निवडून आणले असते तर त्यांनी शिवसेनेशी युती केली असती कां? सच्च्या भीमांच्या लेकरांना आरपीआयचे ऎक्य व्हावे असे वाटत असते. परंतु त्यासाठी कोणताही नेता प्रयत्‍न करीत नाही. जे आठवले ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर जावू शकतात पण ते प्रकाश आंबेडकरांना भेटायला मात्र राजगृहावर जात नाहीत.”
रिपाई डेमॉक्रॅटीकचे राष्ट्रीय अध्यक्ष टी. एम. कांबळे म्हणतात की, “शिवसेनेसोबतची युती म्हणजे आंबेडकरी विचारांशी द्रोह आहे. भारतीय राज्यघटनेला विरोध करणार्‍या शिवसेनेसोबत युती ही तर हिंदुत्ववाद्यांशी हातमिळवणीच आहे. आठवलेंचे हे स्वार्थी राजकारण आहे. १५ वर्षे ते कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्तेत राहून त्यांनी समाजाचे कोणते प्रश्‍न सोडविले? समाजाचे काय हीत केले? समाजहिताचे किती धोरणात्मक निर्णय केले? किती संस्था उभारल्या? किती लोकांना रोजगार दिला? मिळालेल्या सत्तेचा लाभ आठवलेंनी स्वत:साठी आणि अवतीभोवती मिरवंणार्‍या कार्यकत्यांनाच दिला. गेले विस वर्षे आघाडीचे राजकारण करणार्‍या आठवलेंना समाजाचे तर भले करता आले नाहीच. त्यांनी पक्ष बांधणे तर दुरच पण आपला मतदार संघही बांधता आला नाही. आठवलें दलित जनतेची दिशाभूल करुन युतीचा फसवा प्रयोग करीत आहे. त्यांनी ही युती करतांना शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व सोडले की आठवलेंनी हिंदुत्व स्विकारले याचा आठवलेंनी खुलासा करावा.”
साहित्यीक पार्थ पोळके प्रतिक्रीया व्यक्त करतांना म्हणतात की, “आठवले हे डॉ. बाबासाहेबांच्या ’शासनकर्ती जमात बना’ या वक्तव्याचा उल्लेख करुन भावनिकरीत्या आंबेडकरी जनतेला भुलवित आहेत. याचा अर्थ कोणाच्याही गळ्यात गळा घालून सत्ताधारी जमात बना, असा होतो कां? नामांतराच्या काळातील आठवले खरे आंबेडकरी सैनिक होते तर सत्तेतील आठवले निष्भ्रप झाले होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असतांना महारवतनी कमेटीमध्ये आठवले होते. परंतु पांच वर्षात एकही बैठक झाली नाही; तेव्हा आठवलेंनी आग्रह धरला नाही.”
दुसरे साहित्यीक बी.व्ही. जोंधळे लिहीतात की, “शिवसेनेने नामांतराला विरोध करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना निजामाचे हस्तक म्हटले, दलितांच्या आरक्षणास विरोध केला, मंडल आयोग नाकारला, दलितांना सुरक्षा कवच म्हणून लाभलेल्या ऑट्रासिटी कायद्यास विरोध केला, बौध्द आणि इतर दलित जातीत आपण फरक करतो अशी दलित समाजात दुही पेरणारी भूमिका शिवसेनाप्रमुखांनी घेतली, रिडल्स प्रकरणी मुंबईत दलितांवर हात उगारला ह्या भुतकाळातील शिवसेनेच्या राजकीय भूमिका बदल्यात काय व आता त्याचा पश्चाताप म्हणून शिवसेना खेद व्यक्त करणार आहे काय.”
मंगेश पवार लिहीतात की, “कॉग्रेस-राष्टवादी कॉग्रेस प्रमाणेच जर कालांतराने सेना-भाजपाने भ्रमनिरास केला तर आठवले त्यांनाही दूषणेच देणार. यामध्ये फरफट होत आहे ती त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास टाकणार्‍या सामान्य कार्यकर्त्यांची. त्यांना आंबेडकरी चळवळीचे खांब होणे मंजूर आहे की, ’आज इथे उद्या तिथे’ अशी दमछाक करणारी बेअब्रू पदरात पाडून घ्यावयाची आहे.”
हिरालाल पवार लिहीतात की, “कॉग्रेस विश्वासघातकी आहे, कॉग्रेसने बाबासाहेबांना मुंबई तसेच भंडार्‍याला पाडले, घटना समितीवर जायला अनेक अडथळे आणलेत, हिंदू कोडबिल पास होऊ दिले नाही, आदी दुष्कृत्ये समजण्यास आठवलेंना २० वर्षे लागलीत. आठवलेंची आर.पी.आय ही निळी शाल पांघरलेली दलित पॅंथरची मंडळी आहेत. त्यांना बाबासाहेबांच्या  आर.पी.आय च्या तत्वाशी अथवा अजेंड्याशी काहीही देणेघेणे नाही. सध्या आर.पी.आय, शिवसेना, भाजपा या पक्षांच्या घशाला कोरड पडलेली आहे. म्हणून ते एकमेकांना पाण्याचा घोट पाजण्यासाठी युतीची शक्कल आजमावून एकमेकांना राजकीय जीवदान कसे मिळेल या प्रयत्‍नात आहेत.”
युतीबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणतात, “भीमशक्ती-शिवशक्ती ही शरद पवार यांची खेळी आहे. रामदास आठवले स्वाभिमानाच्या कितीही गप्पा मारत असले तरी आठवले यांचा रिमोट कंट्रोल हा शरद पवार यांच्याच हाती आहे.”
बी.जी.कोळसे पाटील म्हणतात की, “शिवसेना ही शिवशक्ती नाही आणि रामदास आठवले हे एकटे भीमशक्ती नाही. त्यामुळेच ही दोन वांझोट्याची युती आहे. रिडल्सच्या वेळी डॉ. बाबासाहेबांचे लिखाण कुणी  जाळले? आंबेडकरी जनता हे कसे विसरु शकेल? रामदास आठवले हे स्वत:च्या स्वार्थासाठी तिकडे गेले असून त्यांना दलितांच्या भावनांशी काही देणे घेणे नाही.”
भाजप-शिवसेनेला धर्मांध शक्ती म्हणून हिणविणारे व त्यांच्यासोबत मायावती-कांशिराम गेले म्हणून शिव्याशाप देणारे आठवले भविष्यात भाजप-शिवसेनेच्याच तंबूत शिरतील असे स्वप्नातही वाटत नव्हते.
युतीच्या सत्तेत किती वाटा मिळेल याबद्दल आठवले सांशक असावेत. म्हणूनच ते म्हणतात की, ’युती टिकेल वर्षे शंभर; पण आमचा कुठे लावणार तुम्ही नंबर.’ यावर उध्दव ठाकरे म्हणतात, ’रामदासजी पाहू नका तुम्ही नंबराची वाट; वाढून देऊ तुम्हाला मानाचे ताट.’
अशाप्रकारच्या टिका-टिप्पण्या आठवले यांच्यावर जरी होत असल्या तरी आता राजकारणात काहीही घडू शकते. ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही. एकेकाळचे शत्रू आता मित्र होवू शकतात तर त्याउलट मित्र हे शत्रू बनू शकतात. जयप्रकाश यांच्या जनता पक्षात त्यावेळचा जनसंघ होता, व्ही. पी. सिंगानी भाजपच्या पाठींब्याने पंतप्रधानपद भुषविले आहे. भाजपच्या सरकारात रामविलास पासवान, जॉर्ज फर्नांडीस असे समाजवादी नेते होते. बिहारमध्ये नितिशकुमारने भाजपला सत्तेत घेतले आहे. ममता बॅनर्जी व चंद्राबाबू नायडू ह्यांनी भाजपला समर्थन दिले होते. शरद पवारनेही पुलोदमध्ये जनसंघाला घेतले होते तर स्थानिक पातळीवर त्यांनी शिवसेनेशी युती केली आहे. असे अनेक उदाहरणे आहेत.
त्यामुळे रामदास आठवले काही वावगे नाहीत. म्हणून त्यांनी शिवसेना-भाजपशी जरुर युती करावी. पण स्वत:ची ताकद वाढवून! जशी मा. कांशिरामजींनी उत्तरप्रदेशमध्ये ताकद वाढविली. उत्तरप्रदेशमध्ये ’बाबा के बच्चेके बगैर कोई भी सरकार बना नही सकता.’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा मायावतीला बाकींच्या पक्षांना पाठींबा देण्यास भाग पडले व भाजपला मायावती सरकारमध्ये सामिल होण्याची पाळी आली होती. विरोधक मां कांशिरामजींना ’संधिसाधू’ म्हणत होते. तेव्हा मा.कांशिरामजीं म्हणायचे की, “हो. मी संधिसाधू आहे. केवळ संधिसाधूच नाहीतर महासंधिसाधू आहे. कारण आम्हाला कधी संधीच मिळत नाही. मग आलेल्या संधीचा मी जरुर फायदा घेणार. जर संधी मिळाली नाहीतर आम्ही तशा संधी निर्माण करु.” तेव्हापासून ’संधिसाधू’ हा शब्दच राजकारणाच्या शब्दकोषातून निघून गेला आहे.
उत्तरप्रदेशमध्ये सत्ता स्थापनेसाठी निवडणूकीनंतर बहुजन समाज पार्टीनेही दोनदा भाजप सोबत युती केली होती. त्याबाबत मा.कांशिरामजी म्हणाले होते की, “भारतीय जनता पार्टी आमच्या बहुजन समाजाला शिडी बनऊन सत्तेवर गेली होती. त्याचप्रमाणे आम्ही सुध्दा भारतीय जनता पार्टीला शिडी बनऊन उत्तरप्रदेशमध्ये दोनदा सरकार बनविले. परंतु आम्ही दोन्हीवेळेस आमच्या सरकारच्या काळात बहुजन समाजाचा एजेंडा लागू केला. बहुजन समाजाच्या हिताचे रक्षण व बहुजन समाजाच्या महापुरुषाच्या सन्मानासाठी आमच्या सरकारने काम केले. काय आठवले सुध्दा असेच काम महाराष्ट्रात करु शकतील? की ’मी बाळासाहेब ठाकरे यांना विचारतो’ असे त्यांना म्हणावे लागेल.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे लोक समस्यांच्या सोडवणूकीसाठी जेव्हा लालजी टंडन कडे जायचे तेव्हा लालजी टंडन म्हणायचे की, ’मी मायावतीला विचारतो.’ जेव्हा आठवले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोबत सत्तेत होते; तेव्हापण ते असेच म्हणायचे की, ’मी शरद पवारांना विचारतो.’ अशीच गत आताही होईल काय? म्हणून आठवलेनी सत्तेत राहण्यापेक्षा सत्तेवर राहावे म्हणजे निर्णयासाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही. म्हणून आठवले यांनी पहिल्यांदा राजकीय ताकद निर्माण करावी. मगच भाजप शिवसेनेच्या खांद्याचा जरुर उपयोग करावा.
पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असतांना त्यांच्या कॉंग्रेसला नाक घासत कांशिरामकडे विधानसभेच्या युतीसाठी जावे लागले होते. तेव्हा बी.एस.पी ला ३०० जागा व कॉंग्रेसला केवळ १३० जागा घेवून समझोता करावा लागला. अशा प्रकारची ताकद पहिल्यांदा आठवले यांनी महाराष्ट्रात निर्माण करावी. मगच त्यांनी ब्राम्हणवादी पक्षांशी बेधडक युती करावी म्हणजे त्यांना राजकारणात दुय्यम स्थान मिळणार नाही, असे वाटते. नाहीतर जसे कॉंग्रेसने वापर करुन फेकून दिले. तसेच भाजप-शिवसेनाही वापर करुन फेकून देणार नाहीत, याची काय शाश्वती आहे? मोठ्या झाडाच्या सावलीत राहून आठवलेंनी आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटवून घेण्याचे पातक करु नये असे वाटते.
ब्राम्हणवादी व्यवस्था ह्या साम दाम दंड भेद निती वापरुन येनकेन प्रकारे सत्तेवर राहत असतात. सत्तेवर असणे ही त्यांची मुलभूत गरज आहे. त्या माध्यमातूनच ते ब्राम्हणवादी व्यवस्था टिकवून ठेवीत असतात. ही त्यांची चळवळ आहे. कुणीही आपआपल्या हिताचे काम करीत असतात. त्यामुळे त्यांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही. कुणीही  ब्राम्हणवादी व्यक्तीने अद्यापतरी गडकरी-ठाकरेंना; ’तुम्ही  आठवले यांच्या आर.पी.आय सोबत कां युती करता?’ असा प्रश्‍न विचारल्याचे ऎकिवात नाही. टिका फक्त आठवलेवर व तेही आंबेडकरवादी व्यक्तींकडूनच होत आहे. ही गोष्ट टिकाकारांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे स्थितिवादी चळवळीला ’डाइनॅमिक’ करुन खर्‍या अर्थाने फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीला बहुजन समाजाच्या हितासाठी सत्तेवर घेऊन जाणार आहोत की नाही, याचा विचार प्रकर्षाने होणे आवश्यक आहे असे मला वाटते.

One Response to “आठवले यांनी ठाकरे यांच्या सोबत जरुर युती करावी, पण स्वत:ची ताकद वाढवून!द वाढवून!”

  1. sumit November 21, 2011 at 2:18 PM #

    sumit
    mi jara confuse aahe tumchya lekha mule.shevti ase mhanu shakto ki kanshiram mayavatine keleli bjp sobatachi yuti barobar aani athvalechi chuk evedhech tumhala sangayache aahe.
    pan mukhyamantri zale tyamule kanshiramala bjp sobat yuti karnyacha naitik adhikar hota kay?
    aani to athvalela suddha aahe kay?
    doghehi shevti sattechi lalsa karnarech ahet.ek success zala dusra nahi zala evedhech.

Leave a comment