निवडणूकीत आपले पराभव कां होतात ?

19 Jan

महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूकीत आंबेडकरी पक्षांचा पराभव होत आहे. म्हणून या विषयावर निरपेक्षपणे वैचारिक मंथन करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने मी माझा प्रत्यक्ष अनुभव व अवलोकनावर आधारीत या विषयाच्या संदर्भात विचार मांडत आहे.
काही गोष्टी लोकांच्या सारखे लक्षात आणून देणे गरजेचे असते. म्हणून राजकारणाचे महत्व आणि निकड या बाबतीत डॉ.बाबासाहेबांनी सांगितलेले मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे.
१. “आपल्या प्रगतीसाठी जिच्यावर आपण अवलंबून राहू शकू अशी एकच गोष्ट आहे व ती म्हणजे राजकीय शक्ती हस्तगत करणे. आपल्या मुक्तीचा तो एकच मार्ग आहे. याबद्दल तर मला मुळीच संदेह नाही व या शक्तिशिवाय आमचा सर्वनाश होईल.” (अ.भा.दलित वर्ग परिषद, नागपूर १८,१९ जुलै १९४२)
२. “अस्पृष्य समाजाला स्वातंत्र्य, ईज्जत व माणुसकी पाहिजे असेल तर तुम्हाला राजकारण काबीज करावयास पाहिजे. सध्या आपल्याजवळ कोणतेच साधान नाही. म्हणूनच आपला नाश व अवनती झाली आहे. आपणास ऊठण्याचीही ताकद राहिलेली नाही. आपली समाज संख्याही पण अल्प आहे; आणि तिही विस्कटलेली आहे. ही सर्व परिस्थिती सुधारुन घेण्यासाठीच आपल्या हाती राजकीय सता पाहिजे.” (पुणे ०४.१०.१९४५ चे भाषण खंड १ संपादक गांजरे पृ.१३१)
३. तुकड्यासाठी दुसर्‍याचे तोंडाकडे पाहण्याची वेळ समाजावर येउ नये. पोटापाण्याचा प्रश्‍न सुटावा, सन्मानाने राहावयास मिळावे, यासाठीच राजकीय सत्तेची जरुरी असते. आणि ती मिळविण्यासाठीच आम्ही झगडत आहोत. (भाषण खंड १ पृ.१५३)
तसेच डॉ.बाबासाहेबांचे खाजगी सचिव नानकचंद रत्तू यांनी लिहिलेल्या ‘बाबासाहेबांच्या आठवणी’ या पुस्तकात सुध्दा ‘मला माझ्या लोकांना शासनकर्ती जमात म्हणून बघायचे आहे, जे समाजातल्या इतर घटकांसोबत मिळून समानतेने राज्य करतील.’ असे लिहिले आहे.
त्याच प्रमाणे दि. १२ व १३ फेब्रुवारी १९३८ च्या मनमाडच्या जी.आय.पी.रेल्वे कामगार परिषदेसमोर भाषण करतांना डॉ.बाबासाहेबांनी सांगितले की, ‘कामगारांनी राजकीय उद्दिष्टांसाठीसुध्दा संघटीत झाले पाहिजे.’
यावरुन शासनसत्ता हस्तगत केली पाहिजे हे एक उद्दिष्ट समाजासमोर डॉ.बाबासाहेबांने ठेवले होते, यात वाद नाही.
डॉ.बाबासाहेबांनी आणखी म्हटले आहे की, “जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा मुठभर सुशिक्षितांनी घेतला. पण त्यांचे विश्‍वासघातकी वागणे आणि अस्पृष्य शोषितांबद्दलची त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागेल. ते माझ्या कल्पनाशक्तिच्या पलीकडे गेले आहे. ते फक्त स्वत:साठी आणि त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठीच जगतात. त्यांच्यापैकी एकही जण सामाजिक कार्य करायला तयार नसतो. ते आत्मघाताच्या वाटेने निघाले आहेत.
माझ्या गैरहजेरीचा फायदा घेऊन आपल्या समाजातील काही स्वाभिमानशून्य माणसे दुसर्‍यांच्या ओंजळीने पाणी पिऊन तुमची दिशाभूल करतील! परंतु माझा विश्‍वास आहे की ज्याला स्वत:च्या समाजाचा स्वाभिमान आहे तो आपली स्वावलंबन वृती सोडून स्वाभिमानशून्य लोकांच्या आहारी पडणार नाही.”
वरील चित्र आजही तंतोतंत लागू पडते याबद्दल कोणीही सहमत होईल यात दुमत नाही. आणि हेच एक ठळक कारण निवडणूकीत होणार्‍या पराभवामागे आहे असे वाटते.
डॉ.बाबासाहेब गेल्यानंतर एकतर शिकलेल्या लोकांनी आपली जबाबदारी समजून घेऊन डॉ.बाबासाहेबांच्या चळवळीचा रथ समर्थपणे पुढे नेला नाही, दुसरीकडे समाजाची मानसिकता बिघडविण्याचे काम आर.पी.आय च्या पुढार्‍यांनी केले हे मी जबाबदारीने येथे नमूद करीत आहे. कारण माझ्या घरातच आर.पी.आय चा एक छोटा नमूना होता. माझा मोठा भाऊ गांवचा पंधरा वर्षे सरपंच होता. तो एक आर.पी.आय. गटाचा कार्यकर्ता होता. त्यामूळे आर.पी.आयचे राजकारण मी अगदी जवळून पाहिले आहे. कॉग्रेसशी लागेबांधे, पैसा, दारु-पार्ट्या ह्या गोष्टी मी चांगले़च न्याहाळले आहेत. गांवोगांवच्या कार्यकर्त्यांना नासवण्याचे काम आर.पी.आयच्या पुढार्‍यांनी केले आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्तिचे होणार नाही.
रिपब्लीकन पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी बाबासाहेबांनी जीवनभर बाळगलेली व भगवान बुध्दांनी शिकवीलेली नैतिकता न रुजविता त्यांनी लोकांना, आपल्या कार्यकर्त्यांना व्यसनाधीन केले आहेत असा एक कटु अनुभव मी घेतला आहे. गावोगांवी यांनी दारुचे गुत्ते निर्मान केले आहेत.. काही पुढार्‍यांनी स्वत:चे दारु, स्पिरीटचे दुकान थाटले आहेत. समाजाचं स्वास्थ बिघडविण्यासाठी हेच रिपब्लीकन पक्षाचे महान पुढारी कारणीभूत आहेत. म्हणून मी त्यांनाच दोष देतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी म्हणाले होते की, ‘राजकीय सत्तेशिवाय आपणास काहीही करता येणार नाही. म्हणून आपण राजकीय सत्तेसाठी झगडले पाहिजे.’ परंतु पुढार्‍यांनी राजकीय सत्तेच्या माध्यमातून समाजाचे परिवर्तन घडवून न आणता समाजात लाचारी आणि व्यसनाधिनतेचेच पिक उगवले हे वास्तव आहे. .
बाबासाहेबांनी दाखविलेल्या उच्च नैतिक मूल्यव्यवस्थेच्या अधिष्ठाणावर वाटचाल करणारे व आपल्या कार्यकर्त्यांना त्याप्रमाणे शिकविणारे पुढारी कां निपजले नाहीत? समाजाने कुणाचा आदर्श पाळावा? कुठे गेले ते पुर्वीचा प्रत्येकाच्या जीवनाला शिस्त लावणारा, समाजात आदर्श निर्माण करणारा, बाबासाहेबांनी स्थापन केलेला समता सैनिक दल? कुठे गेले ते बाबासाहेबांची प्रेरणा पेरणारे व लोकांमध्ये स्फुलींग पेटवणारे भजन मंडळे? कुठे गेले ते पंचशील झेंड्याजवळ त्रीशरण, पंचशील, वंदनेसाठी एकोप्याने जमणारा, धम्मरस ग्रहन करणारा समुह?
आपण पाहतो आहे की अंगात भिनलेल्या दारुच्या नशेत हात जोडून लोकं, ‘सुरामेरय मज्ज पमाद ठाना वेरमनी, शिक्का पदम समाधीयामी.’ असे पंचशील म्हणतात. ‘मी नशा आणणार्‍या कोणत्याही नशील्या पदार्थाचे म्हणजेच दारु, तंबाखाचे सेवन करणार नाही.’ असा त्या शीलाचा अर्थ त्यांना माहीती नाही. दारुचा घोट घेण्यापुर्वी, ‘घ्या, जयभीम…!’ असे मोठ्या अभिमानाने म्हणणारे लोकं मी पाहिले आहे. ज्या बाबासाहेबांनी आपल्या जीवनात इंग्लंड, अमेरिकासारख्या देशात राहून सुध्दा कधी दारुला हात लावला नाही. त्याच बाबासाहेबाचे नांव दारुने झिंगलेले लोक घेत असतात याचे भान त्यांना नसते. अशी दयनिय स्थिती समाजामध्ये कां निर्मान झाली ? याला कोण जबाबदार आहेत?
येथूनच मताच्या दानाऎवजी मत विकायला काढायचा धंदा सुरु झाला असे म्हणता येईल.
मी मा.कांशिरामजींच्या बामसेफमध्ये काम करतांना निवडणूकीच्या काळात बी.एस.पी.च्या उमेदवाराच्या प्रचारासाठी खेड्यापाड्यात फिरलो आहे. तेव्हा मला जे मती कुंठीत करणारे अनुभव आलेत, त्याचे काही नमुने मी येथे मांडत आहे.
एका खदानीत स्टोन क्रशरच्या कामावर काबाडकष्ट व ढोर मेहनत करणारे जवळपास तिनशे मतदार असणारे कामगार बौध्द व गोंड/कोलाम समाजाचे मजूर होते. त्यांनी आम्हाला सांगितले की, ‘आताच काही पक्षाचे लोक येऊन गेलेत. त्यांनी आम्हाला तिन-तिन रुपये दारु पिण्यासाठी दिले आहेत. तेव्हा तुम्हीही आम्हाला पैसे द्या. म्हणजे तुम्हाला मते देतो.’
एका गांवला आम्हाला महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटावे लागले. कारण गांवातल्या मतदानाच्या बाबतीत त्यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. त्यांनी आम्हाला सांगितले की, ‘अमूक पक्षाच्या लोकांनी आम्हाला बुध्द मुर्ती व बाबासाहेबांचा पुतळा बसविण्यासाठी विस हजार रुपये देऊ केले आहेत. तुम्ही त्यापेक्षा जास्त देत असाल तर आमच्या गांवचे लोक तुम्हाला मते देतील.’ येथे तर ‘मिठ-मिरचीसाठी आपले मत विकू नका’ असे सांगणार्‍या डॉ. बाबासाहेबांनाच लोकांनी विकायला काढले होते, ही किती लाजिरवाणी गोष्ट होती!
एका गांवचा सरपंच बौध्द समाजाचा व माझा नातेवाईक होता. जवळपास हजार-बाराशे गठठा मतदान असणारं अख्ख गांव त्याच्या ताब्यात हो्तं. त्याला आम्ही भेटलो. त्यांनी सांगितले की, ‘आमच्या गांवला पाण्याची टंचाई असते. तेव्हा गांवात टॅंकरने पाणी आणण्याचे काम कॉंग्रेसचा एक पुढारी करतो. त्याला जर आम्ही मते दिले नाहीत तर उद्यापासून तो आमचे पाणी तोडून टाकेल. इतरही काही गांवाचे लहान-मोठे कामे असतात. त्यामुळे त्याच्याशिवाय आम्हाला दुसर्‍याला मते देता येत नाही. ही आमची मजबुरी आहे.’
आम्ही गांवात पाय ठेवला की आमच्या गाडीच्या भोवताल काही पोरं-माणसं जमायचे. ते आम्हाला म्हणायचे की, ‘माझ्या घरात इतके लोक आहेत. आम्हाला एवढे पैसे द्या. आम्ही तुम्हालाच मतं देऊ.’ कॉंग्रेसच्या आश्रयाला गेलेले पुढारी जसे समाजाचे मोठे दलाल असतात तसे हे गांवातले लहान दलाल होते.
आणखी एक किळस आणणारं उदाहरण सांगतो. १९९२ सालची यवतमाळची गोष्ट आहे. त्यावेळी पंचायत समिती/जिल्हा परिषदेच्या निवडणूका आल्या होत्या. म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील काही प्रामाणीक कर्मचारी वर्गानी एकत्र बसून आर.पी.आय व बी.एस.पी.च्या कार्यकर्त्यांनी एकत्रीतपणे स्वबळावर निवडणूक लढवावी व त्यासाठी सर्व कर्मचारी व अधिकार्‍यांनी फंड तयार करुन खर्च करायचा व गावोगावी प्रचार करायचा. निदान आपल्या जिल्ह्यात तरी असा एक प्रयोग करुन पाहू या असे ठरविले.
त्यानूसार जिल्ह्यातील आंबेडकरी पक्षांच्या प्रमुख पुढार्‍यांची मिटिंग घेऊन आम्ही त्यांच्यापुढे हा विचार मांडला. तेव्हा एका पुढार्‍याने आम्हाला सांगितले की, ‘ मी खरं काय ते तुम्हाला सांगतो. तुम्ही कर्मचारी वर्ग महिनाभर काम करता व एक तारखेला पगार घेता. आम्हाला काय मिळते? मग मिवडणूका म्हणजे आमचा पगार असतो. निवडणूका झाल्यानंतर ते दुसरी निवडणूक येईपर्यंत पांच वर्षे आम्ही मोर्चे काढतो, धरणे धरतो याचा आम्हाला पगार मिळतो काय? मग मिवडणूका आल्यावरच आमची कमाई होत असते. तेव्हा स्वबळावर निवडणूका लढविण्याचा विचार करुन आमच्या तोंडात आलेला घास हिरावून घेऊ नका.’ इतकं निर्ढावलेलं आणि बेशरमपणाचं उत्तर विदर्भातील एका नांवाजलेल्या पुढार्‍याने त्या भर मिटींगमध्ये दिलं होतं. बाकीच्या गटाच्या पुढार्‍यांनी त्याचे समर्थन केले होते. तेव्हा आम्ही सारेच कर्मचारी अवाक झालो होतो. या नेत्यांची आंबेडकरी निष्टा पाहून आम्ही हादरुन गेलो होतो. खरंतर या नेत्यांना आत्मसन्मानाची गरज नव्हती तर अर्थांजनाची आवश्यकता होती, हे सत्य आम्हाला त्याचवेळी उमगलं होतं. हीच लाचारी वर पासून तर खाल पर्यंत समाजात पोहचलेली आहे. .
डॉ. बाबासाहेबांनी घटना समितीत अथक संघर्ष करुन सर्वसामान्य बहुजन समाजासाठी प्रौढ मतदानाचा अधिकार मिळवीला. तेव्हा आचार्य कृपलानी बाबासाहेबांना म्हणाले होते की, ‘तुमचे लोक गरीब असतात. तेव्हा त्यांचे मत विकत घेऊन आम्ही सरकार बनवू.’ यावर डॉ. बाबासाहेब म्हणाले की, ‘आमच्या लोकांना जेव्हा मताची किंमत कळेल ना तेव्हा ते स्वत:च सरकार बनवतील,. तेव्हा तुम्ही कंगाल व दरिद्री व्हाल.’
प्रस्थापित पक्षांनी साम, दाम, दंड, भेद निती वापरुन आचार्य कृपलानीचे म्हणणे खरे करुन दाखविले पण आमचा समाज बाबासाहेबांचे म्हणणे कधी खरे करुन दाखवणार?
कॉंग्रेसच्या जळत्या घरात जावून काही पुढार्‍यांनी आपले हात पोळून घेतले तर काही पुढारी कायमच त्याच जळत्या घरातील आगीच्या उबेमध्ये विसावले आहेत. हे चित्र आमच्या पुढार्‍यांचे आहे.
पूर्वी मा. कांशिरामजी हयात असतांना कर्मचारी असलेले बामसेफचे कार्यकर्ते बी.एस.पी.सारख्या राजकिय पक्षाचे काम लपून-छपून करीत असत. मी सुध्दा सुट्ट्या घेऊन निवडणूकीच्या वेळी प्रचारासारखे राजकीय काम केले आहेत. त्यापुर्वी आयटक प्रणीत कामगार संघटनेमध्ये मी काम करीत होतो, तेव्हा सुध्दा विधानसभेला उभ्या असलेल्या एका क्म्युनिस्ट उमेदवारासाठी सुट्ट्या काढून प्रचार केला होता. आर.एस.एसचे कर्मचारी/अधिकारी ऑफिसमध्ये म्हणायचे की, ‘आता भारताला फक्त अटल बिहारी बाजपेईच वाचवू शकतात.’ म्हणजेच हे लोकं देशाचे सुत्र हातात घेण्यासाठी पंतप्रधान म्हणून अटल बिहारी बाजपेई यांची प्रतीमा तयार करण्याचे काम अत्यंत गुप्तपणे व शिस्तबध्दपणे करीत होते. अशा प्रकारचे कॅडरचे काम कर्मचारी/अधिकारी वर्ग महाराष्टातील आंबेडकरी पक्षांच्या बाबतील करतांना दिसतात काय?
बाबासाहेब नेहरुंना म्हणाले होते की, ‘राजकारण तुमच्यासाठी गेम असेल, परंतु माझ्यासाठी मिशन आहे.’ म्हणून जोपर्यंत मिशनरी वृतीने चळवळीचं काम होत नाही तो पर्यंत तरी शासनकर्ती जमात बणण्याची बाबासाहेबांची संकल्पना पुर्णत्वास जाईल असे वाटत नाही.
मला वाटते या बाबतीत खालील गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे.
१. प्रत्येक नेत्याला आंबेडकरी चळवळीचे मुळातच पुर्णपणे आकलन होणे आवश्यक आहे.
२. त्यासाठी शिस्तबध्द, निष्ठावंत व प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा संच उभारणे आवश्यक आहे.
३. प्रत्येक कार्यकर्ता व नेता यांना प्रशिक्षण देण्यासाठी कायमची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
४. आंबेडकरी विचारांच्या विरोधातील विचारधारेचे पुर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
५. आंबेडकरी विचारांच्या विरोधातील चळवळीचे व त्यांच्या नेत्यांचे षडयंत्र समजण्याची तिव्रदृष्टी असणे आवश्यक आहे.
६. आंबेडकरी पक्ष व चळवळ चालविण्यासाठी स्वबळावर कायमचा निधी उभारणे आवश्यक आहे.
७. आंबेडकरी चळवळीचा मजबूत पाया रोवण्यासाठी समाजामध्ये नैतिकता निर्माण करणे आवश्यक आहे. हे कार्य धम्म चळवळीतील संघटना, स्वयंसेवक दल करु शकतात.
८. चळवळीच्या अंतिम उद्देशाची स्पष्ट कल्पना समाजाला देणे आवश्यक आहे.
९. चळवळीची व्याप्ती, व्यापकता व गती वाढविण्यासाठी बहुजन समाजातील सर्वच जातींना सम्मिलीत करणे आवश्यक आहे.
१०. समाजातील विद्यार्थी, युवक, महिला, कामगार, व्यावसायिक, नोकरीदार, साहित्यीक, विचारवंत, बुध्दिवंत, निवृत अशा सर्व घटकांचा चळवळीच्या कार्यामध्ये सहयोग घेणे आवश्यक आहे.
११. चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रसार माध्यमे उभे करणे आवश्यक आहे.
१२. लोक प्रबोधन, जागृती व सहभाग वाढविण्यासाठी सतत शिबिरे, मेळावे, बौध्दिके, संमेलने, परिषदा, अधिवेशन आयोजीत करणे, माहितीपुस्तीका प्रकाशित करणे आवश्यक आहे.
१३. भावनेवर आधारीत आंदोलने न करता वैचारिकता व लोकांच्या मुलभूत प्रश्‍नावर आंदोलने उभारणे आवश्यक आहे. जसे १९६४-६५ चा आर.पी.आयचा भूमिहीनांच्या प्रश्‍नावर केलेले आंदोलन ज्यात सर्व कष्टकरी जातीचा सहभाग मिळाला होता.
१४. शिक्षण संस्था, सहकारी संस्था, कामगार संस्था, औद्योगीक संस्थाचे जाळे उभारणे आवश्यक आहे.
१५. चळवळीत पुर्णवेळ काम करणार्‍या कार्यकर्ता व नेत्याच्या उपजिवीकेची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
१६. सर्व आंबेडकरी पक्षांनी आपसात युती व ताळमेळ करुन एकत्रीतपणे निवडणूका लढविल्या पाहिजेत.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: