युग स्त्री-सावित्रीबाई ज्योतिबा फुले

20 Nov

परदेशातून भारतात आलेल्या आर्यांनी परमेश्वराच्या नावाने चार वर्णाची निर्मिती करुन मूळ रहिवाशी भारतीयांना शुद्र वर्णात टाकले. ह्या शुद्रांना (आजचा बहुजन समाज ) ६००० जातीमध्ये विभागून त्यांच्यात उच्चनीचतेची विषारी भावना रुजविली. बहुजन समाजाला दैववादी व अंधश्रध्दाळू बनवीले व आपल्या भजनी लावले. काल्पनिक देवधर्माच्या, स्वर्ग-नरकाच्या व पाप-पुण्याच्या मोहजालात गुरफटवून मानसिक व शारिरीक गुलामगिरीत बहुजानांना बंदिस्त करुन ठेवले. हा प्रकार गेली पांच हजार वर्षापासून या देशात चालत आलेला आहे. अशा मनुवादी जाचक व अनिष्ठ रुढी परंपरेवर म. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले ह्यांनी प्रखर हल्ला चढविला.
सावित्रीबाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगांव या गावी झाला. सन १८४० मध्ये त्यांचा विवाह ज्योतीराव फुलेशी झाला.
ढोल गवॉंर शुद्र पशु नारी,
सब ताडन के अधिकारी !
तुलशीदास (रामचरित मानस )
ह्या प्रमाणे मनुवादी व्यवस्थेत ’नारी’ ही सुध्दा शुद्रच होती. म्हणून शुद्राप्रमाणे स्त्रियांना सुध्दा शिक्षणापासून वंचीत ठेवले होते. शिक्षण हे समाज परिवर्तानाचे साधन असल्यामुळे स्त्रियांना शिक्षण घेता यावे म्हणुन म. ज्योतिबा फुलेंनी १ जानेवारी १८४८ ला पहिली मुलींची शाळा पुण्यास काढली. या शाळेच्या सावित्रीबाई ह्या प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्यात.
१५ मे १८४८ ला अस्प्रृशांसाठी आणखी शाळा काढुन १८५२ पर्यंत अशा शाळांची संख्या १८ पर्यंत नेली.
हे कार्य चालवितांना त्यांना अतोनात श्रम, हाल-अपेष्टा भोगाव्या लागल्या. उच्च वर्णीयांकडुन अर्वाच्च शिव्या व शेणमातींचा मार सहन करावा लागला. त्यांना मारण्यासाठी उच्चवर्णीयांनी मारेकरी पाठविले होते. मुलींना व अस्प्रृशांना शिकविण्यासाठी कोणीही शिक्षक पुढे येत नव्हते. तेव्हा स्वत: सावित्रीबाई शिकून शिक्षिका बनल्या. अशा रितीने सावित्रीबाई भारतातील पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका ठरल्या.
विद्येची देवता ही सरस्वती आहे, असे पुराणातील कथा बहुजन समाजाच्या चिल्या-पिल्यांच्या संस्कारक्षम मनावर ठासून बिंबविले जाते. परंतु शिक्षणाचे महान कार्ये करणार्‍या सावित्रीबाईंना मात्र अनभिज्ञ ठेवल्या जाते. ही फार मोठी शोकांतिका आहे. सतीची चाल, देवदासी प्रथा, बालविवाह, विधवा केशवपण पध्दती, विधवा विवाहास बंदी, अस्प्रृशता इत्यादी सारख्या अनिष्ट रुढीवर व त्यांचे उदात्तीकरण करणार्‍या धर्मग्रंथावर फुले दांपत्यांनी प्रखर हल्ला चढविला.
बालपणीच लग्न झाल्यामुळे पतिनिधनानंतर मुली विधवा होत होत्या. सन १८९१ च्या खाने सुमारीनुसार महाराष्टात केवळ शुन्य ते चार वर्षे वयापर्यंतच्या विधवा झालेल्या, आईचे स्तनपान न सुटलेल्य़ा निरागस बालीकांची संख्या १३८७८ अशी होती. तर चार वर्षे वयानंतरच्या बालिका किती असतील याची कल्पना करता येणार नाही. अशा विधवा मुलींचे डोक्यावरील केस काढुन त्यांना विद्रृप केले जात होते. अशा मुक्या मुली आपल्या बापांना म्हणत असतील की, “ मी तुमची लाडकी, मला कां करता बोडकी ! ”विधवांचे संप होऊ नये म्हणून फुले दांपत्यांनी नाव्ह्यांचा संप घडवुन आणला होता.”
बाल विधवा वयात आल्यानंतर उच्चवर्णीय लोक त्यांच्या असहायतेचा फायदा घेवून त्यांचेवर अत्याचार करीत व त्यांना विधवा माता बनण्यास भाग पाडत होते. कित्येक विधवा स्त्रिया गर्भपात करुन घ्यायच्या किवा आत्महत्या करायच्या. बालकांची हत्या होऊ नये म्हणून फुले दांपत्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह १८६३ साली स्थापन केले होते. सावित्रीबाईं स्वत: विधवा मातेचे बाळंतपण करायच्या. अशाच एका काशीबाई नावाच्या ब्राम्हण विधवा मातेला आत्महत्येपासून परावृत केले. एवढेच नव्हे तर तिचे बाळंतपण करुन तिचा मुलगा यशवंत याला दत्तक घेतले. त्यास डॉक्टर बनविले व आपला एकुलता एक वारस जाहिर करुन आपली संपत्ती त्याचे नावांने करुन दिली. केवढे कृतिशील उदात्त कार्य आहे हे !
सावित्रीबाई बहुजन समाजाचे प्रबोधन करतांना आपल्या ’उद्धोग’ ह्या विषयावरील भाषणात म्हणतात की, “दैव्य, प्रारब्ध ह्यावर विश्वास ठेवणारे लोक आळशी व भिकारी असून त्यांचा वंश नेहमीच दुसर्‍यांच्या गुलामगिरीत राहतो. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे आपला हिंदूस्थान होय.”
सावित्रीबाईंनी ’काव्य फुले’ व ’बावन्नकशी सुबोध रत्‍नाकर’ नावांचे काव्यसंग्रह व इतर साहित्य निर्मिती केली. त्यांची काव्य संपदा कवी केशवसुतांच्या ३० वर्षे आधिची होती. त्यामुळे मराठी काव्यात क्रांती घडवून आणल्याबद्दल पहिला मान सावित्रीबाईंनाच जाते.
सावित्रीबाई आपल्या ’काव्य फुले’ या संग्रहात म्हणतात-
“ज्ञान नाही, विद्या नाही,
ते घेण्याची गोडी नाही,
बुध्दी असूनी चालत नाही,
तयास मानव म्हणावे का ?”
प्रारब्ध आणि दैवाचा फैलाव करणारा रामदास श्वामी यांचा श्‍लोक सावित्रीबाईं खालील प्रमाणे दुरुस्त करतात-
रामदासांचा श्‍लोक सावित्रीबाईंचा दुरुस्त श्‍लोक
जगी सर्व सुखी असा कोण आहे जगी सर्व सुखी असा एक आहे
विचारी मना तूच शोधोनी पाहे ! विचारी मना तूच शोधोनी पाहे !
मना त्वाची ते पूर्व संचित केले मना त्वाची ते ज्ञान संचित केले
तया सारखे भोगणे प्राप्त झाले !! तया सारखे सौख्य प्राप्त झाले !!
२८ नोव्हेंबर १८९० ला ज्योतिबा फुले यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांचे कार्य पुढे नेण्याची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईवर येवून पडली. म. ज्योतिबा फुलेंनी सुरु केलेली समाज परिवर्तनाची ’सत्यशोधक समाज’ ही चळवळ राबविण्यासाठी सार्वजनिक कार्यासाठी बाहेर पडणारी सावित्रीबाई भारतातील पहिल्याच स्त्री होत्या.
१८९७ साली प्लेग ग्रस्त लोकांना मदत करतांना स्वत: सावित्रीबाईंनाच त्या रोगाने पछाडले होते. त्यातच १० मार्च १८९७ रोजी सावित्रीबाईंची क्रांतीज्योत कायमची मालवली.
भारतीय स्त्रिला फक्‍त पुराणातील कथेतल्या सत्यवानाच्या सती सावित्रीची ओळख आहे. स्त्रिया वट सावित्रीची पूजा मोठया भक्‍ती भावाने करीत असतात. परंतू खर्‍या अर्थाने संपूर्ण स्त्रियांची मुक्‍ती दाती असलेली, स्त्री शिक्षणाची पाया रोवणारी प्रथम शिक्षिका, शिक्षणतज्ञ, स्त्री मुक्‍ती चळवळीची आद्य प्रणेती, सार्वजनिक कार्यासाठी बाहेर पडलेली प्रथम स्त्री, क्रांतीमाता, सामाजिक क्रांतीची जननी, क्रांतीज्योती ’सावित्रीबाई फुले’ ह्याच आहेत. त्यांची ३ जानेवारी २०१० ला १७८ वी जयंती आहे, त्या निमित्त अशा ’यूग स्त्रीला’ शतश: अभिवादन !
———————————————————–
सदर लेख दैनिक वृतरत्न सम्राट मध्ये दि. ०५.०१.२०१० रोजी प्रकाशित झाला.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: