शासनकर्ती जमात बनण्याची बाबासाहेबांची संकल्पना कशी पूर्ण होणार?

30 Jun

दिनांक १६.०५.२००९ रोजी लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला. त्यात आंबेडकर चळवळीतील प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, आर.एस.गवई यांचा मुलगा डॉ. राजेन्द्र गवई, सुलेखा कुंभारे, गंगाधर गाढे, टी.एम. कांबळे, प्रा.यशवंत मनोहर असे व ईतर लहानमोठ्या नेत्यांना हार पत्करावी लागली.
      म्हणून आंबेडकर जनतेने याची नोंद घेऊन आत्मपरिक्षण करणे व त्यावर उपाययोजना करणे आवश्यक नाही काय? या पराभवाला आंबेडकरी नेत्यांची फुटीर वृती जेवढी कारणीभूत आहे, तेवढीच आंबेडकरी जनता कारणीभूत नाही काय? विशेषत: समाजातील शिकलेला वर्ग याला मुख्यत: जबाबदार आहे असे वाटते.
      डॉ.बाबासाहेबांचे खाजगी सचिव नानकचंद रत्तू यांनी लिहिलेल्या ’बाबासाहेबांच्या आठवणी’ या पुस्तकात ’शेवटचे दिवस’ या प्रकरणात बाबासाहेब म्हणतात, “मला लोकांना शासनकर्ती जमात म्हणून बघायचे आहे. जे समाजातल्या इतर घटकांसोबत मिळून समानतेने राज्य करतील. मी जे काही अथक प्रयत्‍न करुन मिळविले आहे, त्याचा लाभ आपल्या काही शिकलेल्या लोकांनी उठविला आहे. पण त्यांनी आपल्या अशिक्षित बांधवाकरीता सहानुभूती ठेवून काहीही केलेले नाही. त्याद्वारे त्यांनी आपली नालायकी सिध्द केली आहे. माझे जे काही स्वप्न होते ते त्यांनी धुळीस मिळविले आहे. ते स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी जगत आहेत. त्यांच्यामधून कुणीही समाजासाठी कार्य करायला तयार नाहीत. ते स्वत:च्या नाशाच्या मार्गाने चालले आहेत. मी आता माझे लक्ष खेड्यापाड्यांमध्ये राहणार्‍या अशिक्षित बहुजन समाजाकडे देणार आहे. जे आजपर्यंत पिडीत आहेत आणि आर्थिक दृष्ट्या न बदलता तसेच आहेत.” ( Reminiscences and Remembrances of Dr.B.R.Ambedkar with Babasaheb till the end, page No.191)
      त्याचप्रमाणे दिनांक १२ व १३ फेब्रुवारी १९३८ रोजी मनमाड येथे झालेल्या जी.आय.पी. रेल्वे कामगार परिषदेसमोर भाषण करतांना बाबासाहेब म्हणाले होते की, ’कामगारांनी राजकीय उद्दीष्टांसाठी सुध्दा संघटीत झाले पाहिजे.’
            म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार कामगार संघटना व शिकलेला वर्ग यांची वाटचाल तशी होतांना दिसून येत नाही. म्हणून राजकीय अपयश आपल्या पदरी पडत आहे असे वाटते. ज्याप्रमाणे हिंदूत्ववादी सर्व संघटना त्यांच्या राजकीय पक्षाच्या मागे संपूर्ण ताकद लावतात. तशी ताकद आंबेडकरी संघटनांनी निर्माण करुन आपल्या राजकीय पक्षाच्या मागे लावतांना दिसत नाहीत. ही खरी शोकांतीका आहे. बहुजन समाजातील अस्तित्वात असलेल्या संघटना एकतर आंधळी असतात किंवा पांगळी असतात. त्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही. बुध्दी असते तर ताकद नसते, ताकद असते तर बुध्दी नसते. अशी अवस्था बहुतेक संघटनांची झाली आहे. बुध्दीला कुठे जळते ते दिसते; परंतु विझविण्यासाठी धावण्याची ताकद नसल्यामुळे पांगळी असते. तसेच धावण्याची ताकद असली तरीही कुठे जळते ते दिसत नाही. म्हणून आंधळी असते. अशा आंधळ्या-पांगळ्या संघटनांचा सुळसुळाट झाल्यामुळे पाहिजे ते यश दृष्टोपतीस येत नाही.
            आपल्या कामगार संघटनांनी ज्यामध्ये शिकलेला असा बुध्दीवादी वर्ग आहे, त्यांनी समाजाचे राजकीय प्रबोधन करुन आपला वेळ, बुध्दी व पैसा याचा आपल्या कामासोबतच राजकीय कामासाठी सुध्दा वापर करुन गैरराजकीय मुळे पक्के करायला पाहिजे होते. परंतु तसे केलेले दिसत नाही. त्याउलट त्यांनी आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्षाची बांधीलकी तोडून मनुवादी सत्ताधारी पक्षाला जवळ केलेले आनेकदा दिसून येते. आपल्या वैयक्तिक प्रगतीमध्ये त्यांनी आंबेडकरी चळवळीचा फायदा घेतलेला असतो परंतु त्याचा उपयोग मात्र मनुवादी सत्ताधारी पक्षाच्या चळवळीला होतो आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही.
      आंबेडकरी चळवळीचे विरोधक असलेले सत्ताधारी पुढारी मार्गदर्शक म्हणून आपल्या अनेक कार्यक्रमात आंमत्रित करीत असल्याने ते आपले विचार पेरुन आंबेडकरी सुशिक्षित वर्गाला प्रभावित करीत असल्याचे आपण अनेकदा पाहत असतो. बाबासाहेबांची ’शासनकर्ती जमात’ बनण्याची संकल्पना या शिकलेल्या वर्गांनी समजावून घेऊन व ते समाजाला समजाऊन सांगण्याचे कार्य हा वर्ग करीत नसल्यामुळे समाज आज भरकटत जाऊन दिशाहीन होऊन, कोणत्याही पक्षाच्या वळचणीला जाऊन उभा राहत असलेला आपण पाहतो आहे.
      समाजातील बहुसंख्य लोकं उदासीन, निष्क्रिय व अजागृत झालेले दिसत आहेत. एकतर ते मतदार म्हणून नाव नोंदनी करीत नाहीत किंवा असेल तर मतदान करीत नाहीत. कोणीही निवडून आला तर मला काय त्याचे? अशी नकारात्मक भावना जोपासीत असतात. हरणार्‍या उमेदवाराला मत देऊन मी माझे मत कशाला वाया घालऊ? त्यापेक्षा ज्यांची हवा असेल त्यालाचा मत द्यावे अशीच त्यांची धारणा बनलेली असते जरी तो उमेदवार आंबेडकरी पक्षाचा नसला तरी! अशा प्रवृती व समजुतीमुळे स्वत:ची ताकद निर्माण करण्याची उर्मी तो हरवून बसतो.
            बाबासाहेब म्हणायचे की, ’मिठ-मिरचीसाठी आपले मत विकू नका. कारण तुमच्या मतामुळे सरकार बनत असते.’ परंतु आपण पाहतो की, काही लोकं सर्रासपणे मते विकत असतात. बाबासाहेबांचे पुतळे, विहार बांधण्यासाठी सुध्दा पैशाची मागणी करायला मागेपुढे पाहत नाहीत. म्हणजे आता प्रत्य्क्ष बाबासाहेबांना सुध्दा पुतळ्यांच्या रुपात विकायला काढल्याचे चित्र कुठे कुठे दिसत आहे. धनदांडगे विरोधी उमेदवार दारु पाजतात, पैसे देतात, कपडे-लत्ते देतात अशा लालचेला काही लोकं बळी पडून आपले बहुमोल मते त्यांना देऊन निवडून आणायला मदत करीत असतात. हे एक कटू सत्य आहे. काही ठिकाणी समाजातील सरपंच, पोलिसपाटील किंवा इतर अशा सन्मनिय पदावर काम करणारे व ज्यांच्या मागे गठ्ठा मतदान असते अशा लोकांना इतर लक्षाचे लोकं ऎनकेन प्रकारे दबावात आणून स्वकिय पक्षांच्या उमेदवाराविरुध्द मते देण्यास भाग पाडीत असतात.
            आपल्याच आंबेडकरी पक्षाला मतदान करण्यास प्रवृत न करता शिवसेना-भाजपा निवडून येतील म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करा. तसेच दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस खरे जातीयवादी आहेत असे म्हणून शिवसेना-भाजपाला मतदान करा. अशा प्रकारची विसंगत भुमिका आपलेच पुढारी घेत असतील तर आपली स्वत:ची ताकद कधितरी निर्माण होईल कां? अशी रास्त शंका निर्माण होत आहे.
      बाबासाहेब म्हणाले होते ते खरेच आहे! ते म्हणाले होते की, ’माझ्या गैरहजेरीत स्वाभिमानशून्य लोक दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिऊन तुमची दिशाभूल करतील. तेव्हा अशा लोकांपासून सावध रहा.’
      म्हणून अशा नेत्यांना व लोकांना बाबासाहेबांनी दाखविलेल्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कुणीतरी प्रय‍त्‍न करायला नको कां? म्हणून आता समाजातील शिकलेला बुध्दिवादी, साहित्यीक, नोकरदार, निवृत कर्मचारी/अधिकारी, युवावर्ग, महिला, व्यावसायिक इत्यादी सर्व वर्गांनी एकजूटीने व एकमताने पुढाकार घेऊन राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी सक्रिय होणे आवश्यक झाले आहे. नव्हे ती आता काळाची गरज झाली आहे.
      तिकीटासाठी, मंत्रीपदासाठी दुसर्‍याकडे हात पसरणे व ते मिळाले नाही म्हणून आंदोलन करणे, कलर्स टी.व्ही. चॅनेलमध्ये रामदास आठवले यांना बिग बॉस मध्ये घेतले नाही म्हणून आंदोलन करणे, निवडणुक जिंकता आली नाही म्हणून कुणाच्यातरी विरोधात आंदोलन करणे अशा प्रकारच्या आंदोलनामुळे आंबेडकरी चळवळीचा स्वाभिमान दुखावला जात आहे याचे भान आंदोलनकर्त्या लोकांना कसे राहत नाही, याचे वाईट वाटते. आंदोलन कशासाठी करावे याचे तारतम्य राहिलेले दिसत नाही. इतके अध:पतन व अवमूल्यन होत असतांना गप्प बसून उघड्या डोळ्याने सर्वांना पाहावे लागत आहे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. आतातरी याचकाची, मागण्याची प्रवृती सोडून स्वत:ची ताकद निर्माण केल्याशिवाय आपण देणार्‍यांच्या पंगतीत कसे जावून  बसणार?
त्यासाठी सर्वांनी विचार विनिमय करुन ठोस अशी यंत्रणा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणे आता काळाची गरज झाली आहे. तरच बाबासाहेबांचे ’शासनकर्ती जमात’ बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्याच्या दिशेने आपणास वाटचाल करता येईल. नाहीतर प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस ’येरे माझ्या मागल्या’ असेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल व ’शासनकर्ती जमात’ कधीतरी बनू का? असा प्रश्‍न नेहमीसाठी अनुत्तरीतच राहील!
टीप:- सदर लेख ’दैनिक विश्व सम्राट, मुंबई’ या वृतपत्रात दि. ०८ जुलै २००९ रोजी प्रकाशीत झाला.
      या लेखावर अनेक लोकांच्या मोबाईलद्वारे प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातील काही प्रतिक्रिया येथे नमुद केल्या आहेत.
१. लेख सर्वांनाच आवडला. काहींनी आमच्या मनात जे होते तेच तुम्ही लिहिलेत असेही सांगितले. .
२. शासनकर्ती जमात बनण्यासाठी पुढे काय करायला पाहिजे याबाबत काहींनी चर्चा केली.
३. काहींनी विचारले की, कोणत्या पक्षाला अथवा गटाला समाजाने समर्थन करावे ते लेखात लिहिले नाही.
४. तुमचा लेख किती लोकं वाचतील? कारण समाजामध्ये वाचक वर्ग फार कमी आहेत असे काही लोकांनी सांगितले.
५. समाजातील किती बुध्दिवंत शासनकर्ती जमात बनण्यासाठी प्रतिसाद देतील याबाबत शंकाच आहे असेही काही म्हणालेत.
६. काहींनी विचारले की, त्यात ऎक्याबाबत कां लिहीले नाही? एका कार्यकर्त्यांनी मला ठनकावून विचारले की, तुम्ही अकोल्याचे ना? मग बाळासाहेबांनी (प्रकाश आंबेडकर) ऎक्य करावं म्हणावं!
७. काहींनी सांगितले की, सध्याचे राजकारण अशिक्षित व बेरोजगार लोकांकडे असल्यामुळे त्यांनी हे क्षेत्र पोटापाण्याचा व त्यांच्या कुटूंबाच्या येणार्‍या पिढ्यांसाठी धन कमाविण्याचा धंदा बनविला आहे.
८. एकाने डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल व भारतीय बौध्द महासभेमध्ये लोकांनी काम करावे असे सांगितले.
९. एकाने डॉ. बाबासाहेब गेल्यानंतर त्यांच्या सारखा एकही नेता झाला नाही. जे काही पुढारी झालेत त्यांचेमध्ये आत्मविश्वास, नैतिकता व त्यागी वृती राहिली नाही म्हणून आंबेडकरी चळवळ पुढे जाऊ शकली नाही असे सांगितले.

शासनकर्ती जमात बणण्यासाठी काय करायला पाहिजे?

28 Jun

आपल्या समाजात आता मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, प्राध्यापक, साहित्यिक, सरकारी-निमसरकारी, प्रशासकीय उच्चपदस्थ सेवेत असेलेले अथवा निवृत झालेले अनेक बुध्दिवंत व विचारवंत निर्माण झाले आहेत. हे लोक आंबेडकरी चळवळीचे लाभार्थी आहेत. ’समाजाला आणीबाणीच्या काळात दिशा देण्याचे काम करतो तो बुध्दिजिवी’ अशी व्याख्या डॉ. बाबासाहेबांनी ’ऍन निहिलेशन ऑफ कास्ट’ या पुस्तकात केली आहे. सध्या आणीबाणीची वेळ निश्चित आली आहे. आता समाजामध्ये हजारो वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स झाले असल्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेप्रमाणे समाज प्रगल्भ झालेला आहे.
      डॉ. बाबासाहेब राजकारणाचे महत्व आणि निकड समजावून सांगतांना म्हणतात, आपल्या प्रगतीसाठी जिच्यावर आपण अवलंबून राहू शकू अशी एकच गोष्ट आहे व ती म्हणजे राजकीय शक्ती हस्तगत करणे. आपल्या मुक्तीचा तो एकच मार्ग आहे. याबद्दल तर मला मुळीच संदेह नाही व या शकिशिवाय आमचा सर्वनाश होईल.(अ.भा.दलित वर्ग परिषद नागपूर १८,१९ जुलै १९४२)
      अस्पृष्य समाजाला स्वातंत्र्य, इज्जत व माणुसकी पाहिजे असेल, तर तुम्हाला राजकारण काबीज करावयास पाहिजे. सध्या आपल्याकडे कोणतेच साधन नाही. म्हणूनच आपला नाश व अवनती झाली आहे. आपणास उठण्याचीही ताकद राहिलेली नाही. आपली समाज संख्याही पण अल्प आहे व तिही विस्कटलेली आहे. ही सर्व परिस्थिती सुधारुन घेण्यासाठीच आपल्या हाती राजकीय सत्ता पाहिजे. (पुणे ०४.१०.१९४५चे भाषण, भाषण खंड १ संपादक- गांजरे पृष्ठ्य १३१)       तुकड्यासाठी दुसर्‍याच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ समाजावर येऊ नये, पोटापाण्याचा प्रश्‍न सुटावा, सन्मानाने राहावयास मिळावे यासाठीच राजकीय सत्तेची जरुरी असते आणि ती मिळविण्यासाठीच आम्ही झगडत आहोत. (भाषण खंड १ संपादक- गांजरे पृष्ठ्य १५३)
      शासनकर्ती जमातीवर अन्याय, अत्याचार होत नाहीत. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर गोळीबार हत्याकांड किंवा खैरलांजीसारखे प्रकरणे मराठा अथवा ब्राम्हणांच्या घरी होत नाहीत. कारण ते शासनकर्ती जमाती आहेत. म्हणूनच आतातरी आपले डोळे ऊघडणे आवश्यक झाले आहे.
      शासनकर्ती जमात बणण्याचे ध्येय गाठण्यासाठी आर.पी.आय पक्षाचे सर्व गट, बहन मायावतीचा बहुजन समाज पक्ष, आदिवासी-ओ.बी.सी.चे पक्ष असे समान व फुले, शाहु, आंबेडकरी विचाराचे सर्व पक्षांनी-गटांनी एकत्रीत येऊन येणारी विधानसभा लडविणे आवश्यक आहे. परंतु यासाठी या पक्षांचे, गटाचे नेता वर्ग तयार होतील असे वाटत नाही. कारण एक्याचे वारे मध्ये-मध्ये वाहायला लागले की, नंतर ते कधी विरुन जातात तेही कळत नाही. म्हणजे हे एक्य कालापव्यय करणारे व मृगजळासारखे ठरतात. म्हणून आता समाजाने एकत्र येऊन या नेत्यांवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे.      
      याबाबत जर सर्व बाबतीत व्यवहार्य असेल तर खालीलप्रमाणे उपाययोजना करुन पाहायला काही हरकत नाही. येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबर २००९ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूका जाहिर होणार आहे. त्यापुर्वीच आपण विचारविनिमय करुन काहीतरी ठोस असा निर्णय घेऊन तशी कार्यवाही होणे गरजेचे झाले आहे.
      प्रत्येक ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा अशा तीन स्तरावर (शहराच्या ठिकाणी वार्ड स्तरावर) कोणत्याही गट अथवा पक्षाचा सभासद नसलेल्या प्रतिष्टित व्यक्तिंची निवड समिती तयार करावी.
      निरनिराळ्या आणि फुले, शाहु, आंबेडकरी पक्षांचे सभासद असलेल्या व निवडणूकीला उभे राहू इच्छिणार्‍या कार्यकर्त्यांची, उमेदवारांची पंचायत समिती स्तरावरावरील निवड समितीने छानणी करुन अशी यादी जिल्हा परिषद निवड समितीकडे पाठवावी. त्यांनी सुध्दा त्या यादीची छानणी करुन ती विधानसभा निवड समितीकडे पाठवावी. त्यांनी त्या यादीची यादीची छानणी करुन दोन नांवे निवडावीत. त्यापैकी एक उमेदवार प्रमुख व दुसरे नांव डमी राहील म्हणजे प्रमुख उमेदवाराच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाल्यास त्याच्या ऎवजी डमी उमेदवाराला उभे राहता येईल. ही दोन्ही नांवे ज्या गटाचे, पक्षाचे असेल त्या गटाच्या प्रमुखाकडे पाठवावीत. त्यानंतरची तिकीट देण्याची व निवडणुकीची पुढील कार्यवाही त्या गटाने, पक्षाने करावी. अशा निवड केलेल्या उमेदवाराला आपसातील हेवेदावे विसरुन सर्वांनी मान्यता द्यावी व त्याच्या विरोधात कुणीही आपल्या गटाचा/पक्षाचा उमेदवार उभा ठेवू नये. त्यामुळे सर्वमान्य उमेदवार मिळेल व मतविभागणी टळेल. अशा उमेदवाराला बहुजन समाजातील अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, इतर मागासवर्गिय जाती व अल्पसंख्याक धार्मिक समाज सुध्दा समर्थन देऊ शकतील. समाजातील सर्व मतदारांनी मतदान करण्याकडे व कोणाचेही मत वाया जाऊ नये, याकडे जागृत लोकांनी लक्ष ठेवावे.
      आपल्या समाजातील नोकरीदार वर्ग जसे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, विद्युत मंडळाचा तांत्रिक कर्मचारी, आरोग्य विभागाचा कर्मचारी, शेती विभागाचा कर्मचारी असे अनेक विभागाचे कर्मचारी खेड्यापाड्यापर्यंत काम करीत आहेत. अशा लोकाना खेड्यापाड्यात मान असतो. म्हणून त्यांनी जमेल त्या मार्गाने सक्रियपणे पण गुप्त पध्दतीने प्रचार व प्रसार करावा. कारण खेड्यापाड्यात गठ्ठा मतदान असते. असे जर वातावरण आपण निर्माण करु शकलो तर समाजामध्ये नविन उत्साह निश्चितच संचारेल आणि समाज एकजूट व्हायला वेळ लागणार नाही.
समाजातील सर्वांनी तन, मन, धनाने शक्ती निर्माण करुन संपुर्ण ताकद या उमेदवाराच्या मागे लावावी व अशा प्रकारे ’बहुजन शासनकर्ती जमात अभियान’ राबवावे.
      सदर योजनेवर विचारवंतांनी विचारविनिमय करावा. जर सदर योजना व्यवहार्य वाटत असेल तर कार्यवाही करण्याकरिता पाऊल उचलावे. जर सदर योजना व्यवहार्य वाटत नसेल किंवा त्यात काही तृटी असतील तर त्या दूर करावेत अथवा ज्यांच्याकडे त्याऎवजी दुसरी पर्यावी योजना असेल तर तसे त्यांनी मांडावेत.
      शेवटी डॉ. बाबासाहेबांचे २० जुलै १९४२ चे अखिल भारतीय दलित वर्ग परिषद नागपूर येथील प्रेरणादायी भाषण सर्वांनी लक्षात ठेवावे. त्यांनी म्हटले होते की, तुम्हाला माझ्या संदेशाचे अंतीम शब्द हेच आहे की, शिका, संघर्ष करा आणि संघटीत रहा. स्वत:च्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि कधिही निराश होऊ नका. म्हणजे डॉ. बाबासाहेबांची शासनकर्ती जमात बणण्याची संकल्पना वास्त्वात उतरविण्यास कठीण जाणार नाही.
टिप:- ’शासनकर्ती जमात बणण्याची संकल्पना कशी पुर्ण होणार?’ हा माझा लेख वृतरत्‍न सम्राट मध्ये दिनांक ८ जुलै २००९ रोजी प्रकाशित झाल्यानंतर मी पुन्हा ’शासनकर्ती जमात बणण्यासाठी काय करायला पाहिजे? असा वरील लेख पाठविला. परंतु सदर लेख त्यांनी स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवा’ असे शिर्षक देऊन दिनांक ११.०८.२००९ रोजी छापला.

आठवले यांनी ठाकरे यांच्या सोबत जरुर युती करावी, पण स्वत:ची ताकद वाढवून!द वाढवून!

23 Jun

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा २००९ साली १५ व्या लोकसभेत शिर्डी मतदार संघात पराभव झाला. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत गेल्या २० वर्षे असलेली युती तोडून टाकली. त्यानंतर त्यानी आर.पी.आयच्या सर्व गटाच्या एकीची हाक दिली. एकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे.जोगेंद्र कवाडे, आर.पी.आय.गवई गटाचे डॉ.राजेन्द्र गवई, दलित पॅंथरचे नामदेव ढसाळ हे सामील झालेत. भारीप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर मात्र या एकीत सामील झाले नाहीत. तर डॉ.राजेन्द्र गवई हे विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी कॉंग्रेसच्या ताफ्यात निळा झेंडा सोपवून एकीमधून बाहेर पडलेत.
त्यानंतर रामदास आठवले यांनी लोकसभेच्या पाठोपाठ सहा महिन्यानी आलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकीत आर.पी.आय (एकीकृत) व डावे पक्ष असे मिळून तिसर्‍या आघाडीचा (रिडालोस) प्रयोग केला. त्यातही एकीकृत-आर.पी.आयला एकही विधानसभेची जागा निवडून आणणे शक्य झाले नाही. म्हणून सत्तेत राहण्यासाठी (सत्तेवर नव्हे) आता ते जोगेंद्र कवाडेंना सोडून शिवसेना व भाजपशी युती करु पाहत आहेत. सध्या ते तिघेही एकत्रीत मेळावे घेत आहेत. ९ जून २०११ ला मुंबईला झालेल्या मेळाव्यात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे म्हणतात, “रामदास आठवले यांनी कॉग्रेसच्या जळत्या घराला लाथ मारुन आपला हात १० वर्षासाठी आमच्या हातात दिला आहे. आम्हीही तुमची एवढी काळजी घेऊ की तुम्ही ही साथ आयुष्यभर सोडणार नाही.”..
या युतीला त्यांनी भीमशक्ती-शिवशक्ती असे नाव दिले आहे. याबाबत आठवले म्हणतात की, “कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने दलित मतांचा निवडणुकी पुरताच वापर करुन नंतर वार्‍यावर सोडले. सहा वर्षे खासदार असूनही आपल्याला केंद्रात मंत्रीपद दिले नाही. केवळ एकच तिकीट द्यायचे आणि तीन खासदार निवडून आलेले नाहीत म्हणून मंत्रीपद नाकारायचे असा प्रकार कॉंग्रेसने केला आहे.”
युती बाबत ते म्हणतात की,  “भाजप-सेनेसोबत सध्या केवळ भ्रष्टाचार, महागाई आणि दडपशाहीविरुध्द आम्ही एकत्र आलो आहोत. दलित समाजातील विचारवंताशी चर्चा करुन सामाजिक-आर्थिक कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल. त्यानंतर भाजप-सेनेच्या नेत्यांसोबत सामाजिक आर्थिक कार्यक्रम आणि सत्तेतील वाटा याबाबत बोलणी केली जाईल. ऑक्टोबरनंतरच युतीचा निर्णय घेण्यात येईल.”
दुसरीकडे ते नागपूरच्या भाषनात म्हणतात की, “लोकांच्या भावना आणि मत जाणून घेऊन संपूर्ण विचारांतीच शिवशक्तीसोबत युती केली आहे. १९८९ मध्ये सर्वपथम कॉंग्रेससोबत आम्ही युती केली तेव्हा ३६ जागा आमच्या पाठिंब्याने कॉंग्रेसने जिंकल्या होत्या. तेव्हासुध्दा रिपाईचे सर्व नेते सोबत आले नव्हते. आता शिवसेनेला सोबत घेतल्याने सत्तापरिवर्तन निचित आहे. दोनशे मतदारसंघात पाच हजार ते विस हजारापर्यंत आमची व्होट बॅंक आहे. त्यामुळे कोणी रिपाईचे नेते सोबत आले नाहीत तरी काही फरक पडत नाही.” एकीकडे ते असे जरी म्हणाले तरी दुसरीकडे सर्व दलित नेत्यांनी आमच्याबरोबर एकत्र येऊन डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावावा असेही ते म्हणाले.
या युती बाबत जनमानसात अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याबाबत काहिंनी लेख लिहिलेत तर काहिंनी वृतपत्रात आपले भाष्य प्रकाशित केले आहेत.
.केशव हंडोरे आपल्या लेखात म्हणतात की, “ही तर ठाकरे-आठवले यांची युती आहे. भीमशक्ती कोणत्याही एका नेत्याच्या मागे नाही. आठवलेची शिवसेनेसोबतची युती म्हणजे हे सत्तेसाठी आहे. यामुळे काही नेते आणि कार्यकर्ते यांचेच भले होईल. जर आठवलेंना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिर्डीमध्ये निवडून आणले असते तर त्यांनी शिवसेनेशी युती केली असती कां? सच्च्या भीमांच्या लेकरांना आरपीआयचे ऎक्य व्हावे असे वाटत असते. परंतु त्यासाठी कोणताही नेता प्रयत्‍न करीत नाही. जे आठवले ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर जावू शकतात पण ते प्रकाश आंबेडकरांना भेटायला मात्र राजगृहावर जात नाहीत.”
रिपाई डेमॉक्रॅटीकचे राष्ट्रीय अध्यक्ष टी. एम. कांबळे म्हणतात की, “शिवसेनेसोबतची युती म्हणजे आंबेडकरी विचारांशी द्रोह आहे. भारतीय राज्यघटनेला विरोध करणार्‍या शिवसेनेसोबत युती ही तर हिंदुत्ववाद्यांशी हातमिळवणीच आहे. आठवलेंचे हे स्वार्थी राजकारण आहे. १५ वर्षे ते कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्तेत राहून त्यांनी समाजाचे कोणते प्रश्‍न सोडविले? समाजाचे काय हीत केले? समाजहिताचे किती धोरणात्मक निर्णय केले? किती संस्था उभारल्या? किती लोकांना रोजगार दिला? मिळालेल्या सत्तेचा लाभ आठवलेंनी स्वत:साठी आणि अवतीभोवती मिरवंणार्‍या कार्यकत्यांनाच दिला. गेले विस वर्षे आघाडीचे राजकारण करणार्‍या आठवलेंना समाजाचे तर भले करता आले नाहीच. त्यांनी पक्ष बांधणे तर दुरच पण आपला मतदार संघही बांधता आला नाही. आठवलें दलित जनतेची दिशाभूल करुन युतीचा फसवा प्रयोग करीत आहे. त्यांनी ही युती करतांना शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व सोडले की आठवलेंनी हिंदुत्व स्विकारले याचा आठवलेंनी खुलासा करावा.”
साहित्यीक पार्थ पोळके प्रतिक्रीया व्यक्त करतांना म्हणतात की, “आठवले हे डॉ. बाबासाहेबांच्या ’शासनकर्ती जमात बना’ या वक्तव्याचा उल्लेख करुन भावनिकरीत्या आंबेडकरी जनतेला भुलवित आहेत. याचा अर्थ कोणाच्याही गळ्यात गळा घालून सत्ताधारी जमात बना, असा होतो कां? नामांतराच्या काळातील आठवले खरे आंबेडकरी सैनिक होते तर सत्तेतील आठवले निष्भ्रप झाले होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असतांना महारवतनी कमेटीमध्ये आठवले होते. परंतु पांच वर्षात एकही बैठक झाली नाही; तेव्हा आठवलेंनी आग्रह धरला नाही.”
दुसरे साहित्यीक बी.व्ही. जोंधळे लिहीतात की, “शिवसेनेने नामांतराला विरोध करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना निजामाचे हस्तक म्हटले, दलितांच्या आरक्षणास विरोध केला, मंडल आयोग नाकारला, दलितांना सुरक्षा कवच म्हणून लाभलेल्या ऑट्रासिटी कायद्यास विरोध केला, बौध्द आणि इतर दलित जातीत आपण फरक करतो अशी दलित समाजात दुही पेरणारी भूमिका शिवसेनाप्रमुखांनी घेतली, रिडल्स प्रकरणी मुंबईत दलितांवर हात उगारला ह्या भुतकाळातील शिवसेनेच्या राजकीय भूमिका बदल्यात काय व आता त्याचा पश्चाताप म्हणून शिवसेना खेद व्यक्त करणार आहे काय.”
मंगेश पवार लिहीतात की, “कॉग्रेस-राष्टवादी कॉग्रेस प्रमाणेच जर कालांतराने सेना-भाजपाने भ्रमनिरास केला तर आठवले त्यांनाही दूषणेच देणार. यामध्ये फरफट होत आहे ती त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास टाकणार्‍या सामान्य कार्यकर्त्यांची. त्यांना आंबेडकरी चळवळीचे खांब होणे मंजूर आहे की, ’आज इथे उद्या तिथे’ अशी दमछाक करणारी बेअब्रू पदरात पाडून घ्यावयाची आहे.”
हिरालाल पवार लिहीतात की, “कॉग्रेस विश्वासघातकी आहे, कॉग्रेसने बाबासाहेबांना मुंबई तसेच भंडार्‍याला पाडले, घटना समितीवर जायला अनेक अडथळे आणलेत, हिंदू कोडबिल पास होऊ दिले नाही, आदी दुष्कृत्ये समजण्यास आठवलेंना २० वर्षे लागलीत. आठवलेंची आर.पी.आय ही निळी शाल पांघरलेली दलित पॅंथरची मंडळी आहेत. त्यांना बाबासाहेबांच्या  आर.पी.आय च्या तत्वाशी अथवा अजेंड्याशी काहीही देणेघेणे नाही. सध्या आर.पी.आय, शिवसेना, भाजपा या पक्षांच्या घशाला कोरड पडलेली आहे. म्हणून ते एकमेकांना पाण्याचा घोट पाजण्यासाठी युतीची शक्कल आजमावून एकमेकांना राजकीय जीवदान कसे मिळेल या प्रयत्‍नात आहेत.”
युतीबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणतात, “भीमशक्ती-शिवशक्ती ही शरद पवार यांची खेळी आहे. रामदास आठवले स्वाभिमानाच्या कितीही गप्पा मारत असले तरी आठवले यांचा रिमोट कंट्रोल हा शरद पवार यांच्याच हाती आहे.”
बी.जी.कोळसे पाटील म्हणतात की, “शिवसेना ही शिवशक्ती नाही आणि रामदास आठवले हे एकटे भीमशक्ती नाही. त्यामुळेच ही दोन वांझोट्याची युती आहे. रिडल्सच्या वेळी डॉ. बाबासाहेबांचे लिखाण कुणी  जाळले? आंबेडकरी जनता हे कसे विसरु शकेल? रामदास आठवले हे स्वत:च्या स्वार्थासाठी तिकडे गेले असून त्यांना दलितांच्या भावनांशी काही देणे घेणे नाही.”
भाजप-शिवसेनेला धर्मांध शक्ती म्हणून हिणविणारे व त्यांच्यासोबत मायावती-कांशिराम गेले म्हणून शिव्याशाप देणारे आठवले भविष्यात भाजप-शिवसेनेच्याच तंबूत शिरतील असे स्वप्नातही वाटत नव्हते.
युतीच्या सत्तेत किती वाटा मिळेल याबद्दल आठवले सांशक असावेत. म्हणूनच ते म्हणतात की, ’युती टिकेल वर्षे शंभर; पण आमचा कुठे लावणार तुम्ही नंबर.’ यावर उध्दव ठाकरे म्हणतात, ’रामदासजी पाहू नका तुम्ही नंबराची वाट; वाढून देऊ तुम्हाला मानाचे ताट.’
अशाप्रकारच्या टिका-टिप्पण्या आठवले यांच्यावर जरी होत असल्या तरी आता राजकारणात काहीही घडू शकते. ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही. एकेकाळचे शत्रू आता मित्र होवू शकतात तर त्याउलट मित्र हे शत्रू बनू शकतात. जयप्रकाश यांच्या जनता पक्षात त्यावेळचा जनसंघ होता, व्ही. पी. सिंगानी भाजपच्या पाठींब्याने पंतप्रधानपद भुषविले आहे. भाजपच्या सरकारात रामविलास पासवान, जॉर्ज फर्नांडीस असे समाजवादी नेते होते. बिहारमध्ये नितिशकुमारने भाजपला सत्तेत घेतले आहे. ममता बॅनर्जी व चंद्राबाबू नायडू ह्यांनी भाजपला समर्थन दिले होते. शरद पवारनेही पुलोदमध्ये जनसंघाला घेतले होते तर स्थानिक पातळीवर त्यांनी शिवसेनेशी युती केली आहे. असे अनेक उदाहरणे आहेत.
त्यामुळे रामदास आठवले काही वावगे नाहीत. म्हणून त्यांनी शिवसेना-भाजपशी जरुर युती करावी. पण स्वत:ची ताकद वाढवून! जशी मा. कांशिरामजींनी उत्तरप्रदेशमध्ये ताकद वाढविली. उत्तरप्रदेशमध्ये ’बाबा के बच्चेके बगैर कोई भी सरकार बना नही सकता.’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा मायावतीला बाकींच्या पक्षांना पाठींबा देण्यास भाग पडले व भाजपला मायावती सरकारमध्ये सामिल होण्याची पाळी आली होती. विरोधक मां कांशिरामजींना ’संधिसाधू’ म्हणत होते. तेव्हा मा.कांशिरामजीं म्हणायचे की, “हो. मी संधिसाधू आहे. केवळ संधिसाधूच नाहीतर महासंधिसाधू आहे. कारण आम्हाला कधी संधीच मिळत नाही. मग आलेल्या संधीचा मी जरुर फायदा घेणार. जर संधी मिळाली नाहीतर आम्ही तशा संधी निर्माण करु.” तेव्हापासून ’संधिसाधू’ हा शब्दच राजकारणाच्या शब्दकोषातून निघून गेला आहे.
उत्तरप्रदेशमध्ये सत्ता स्थापनेसाठी निवडणूकीनंतर बहुजन समाज पार्टीनेही दोनदा भाजप सोबत युती केली होती. त्याबाबत मा.कांशिरामजी म्हणाले होते की, “भारतीय जनता पार्टी आमच्या बहुजन समाजाला शिडी बनऊन सत्तेवर गेली होती. त्याचप्रमाणे आम्ही सुध्दा भारतीय जनता पार्टीला शिडी बनऊन उत्तरप्रदेशमध्ये दोनदा सरकार बनविले. परंतु आम्ही दोन्हीवेळेस आमच्या सरकारच्या काळात बहुजन समाजाचा एजेंडा लागू केला. बहुजन समाजाच्या हिताचे रक्षण व बहुजन समाजाच्या महापुरुषाच्या सन्मानासाठी आमच्या सरकारने काम केले. काय आठवले सुध्दा असेच काम महाराष्ट्रात करु शकतील? की ’मी बाळासाहेब ठाकरे यांना विचारतो’ असे त्यांना म्हणावे लागेल.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे लोक समस्यांच्या सोडवणूकीसाठी जेव्हा लालजी टंडन कडे जायचे तेव्हा लालजी टंडन म्हणायचे की, ’मी मायावतीला विचारतो.’ जेव्हा आठवले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोबत सत्तेत होते; तेव्हापण ते असेच म्हणायचे की, ’मी शरद पवारांना विचारतो.’ अशीच गत आताही होईल काय? म्हणून आठवलेनी सत्तेत राहण्यापेक्षा सत्तेवर राहावे म्हणजे निर्णयासाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही. म्हणून आठवले यांनी पहिल्यांदा राजकीय ताकद निर्माण करावी. मगच भाजप शिवसेनेच्या खांद्याचा जरुर उपयोग करावा.
पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असतांना त्यांच्या कॉंग्रेसला नाक घासत कांशिरामकडे विधानसभेच्या युतीसाठी जावे लागले होते. तेव्हा बी.एस.पी ला ३०० जागा व कॉंग्रेसला केवळ १३० जागा घेवून समझोता करावा लागला. अशा प्रकारची ताकद पहिल्यांदा आठवले यांनी महाराष्ट्रात निर्माण करावी. मगच त्यांनी ब्राम्हणवादी पक्षांशी बेधडक युती करावी म्हणजे त्यांना राजकारणात दुय्यम स्थान मिळणार नाही, असे वाटते. नाहीतर जसे कॉंग्रेसने वापर करुन फेकून दिले. तसेच भाजप-शिवसेनाही वापर करुन फेकून देणार नाहीत, याची काय शाश्वती आहे? मोठ्या झाडाच्या सावलीत राहून आठवलेंनी आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटवून घेण्याचे पातक करु नये असे वाटते.
ब्राम्हणवादी व्यवस्था ह्या साम दाम दंड भेद निती वापरुन येनकेन प्रकारे सत्तेवर राहत असतात. सत्तेवर असणे ही त्यांची मुलभूत गरज आहे. त्या माध्यमातूनच ते ब्राम्हणवादी व्यवस्था टिकवून ठेवीत असतात. ही त्यांची चळवळ आहे. कुणीही आपआपल्या हिताचे काम करीत असतात. त्यामुळे त्यांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही. कुणीही  ब्राम्हणवादी व्यक्तीने अद्यापतरी गडकरी-ठाकरेंना; ’तुम्ही  आठवले यांच्या आर.पी.आय सोबत कां युती करता?’ असा प्रश्‍न विचारल्याचे ऎकिवात नाही. टिका फक्त आठवलेवर व तेही आंबेडकरवादी व्यक्तींकडूनच होत आहे. ही गोष्ट टिकाकारांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे स्थितिवादी चळवळीला ’डाइनॅमिक’ करुन खर्‍या अर्थाने फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीला बहुजन समाजाच्या हितासाठी सत्तेवर घेऊन जाणार आहोत की नाही, याचा विचार प्रकर्षाने होणे आवश्यक आहे असे मला वाटते.

कामगारांच्या उत्कर्षासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य

16 Jun

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक, राजकीय, घटना निर्मिती इत्यादी संबधीचे कार्य हे असामान्य आहेच, पण ह्या कार्याबरोबरच कामगारांच्या उत्कर्षासाठी केलेले कायदे व कामगार वर्गाच्या संबधीचे इतरही कार्य उल्लेखनिय व महत्वपूर्ण आहे. बाबासाहेबांच्या या अफाट कार्यासंबंधी भारतीय कामगार व कामगार संघटनांना अजुनही पुरेशी जाणीव झालेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे.
कामगारांसाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान खालील प्रमाणे आहे.
 १.       शेतकर्‍यांसाठी किमान वेतन दर असावेत अशी मागणी विधिमंडळात केली.
२.      १९३७ साली कोकणातील बहुजन कामगारांचे शोषण थांबविण्यासंबंधी खोती पध्दत नष्ट करण्यासंबंधी बिल मांडले.
३.      १९३८ साली कोकणातील ‘औद्योगिक कलह विधेयकानुसार’ कामगारांचा संप करण्याचा अधिकार हिरावुन घेतला गेला. पण बाबासाहेबांनी या बिलावर भाषण करतांना संप हा दिवाणी अपराध आहे, फौजदारी गुन्हा नव्हे असे मत दिले व पुढे कामगारांना संप करण्याचा कायदेशिर अधिकार मिळवून दिला.
४.     वरील बिलावर भाष्य करतांना मालकांनी आपले अंदाजपत्रक कामगारांसाठी जाहीर करण्याची मागणी केली.
५.     १९३८ मध्ये सावकारी नियंत्रण विधेयक तयार केले.
६.      बिडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी बिडी कामगार संघ स्थापन केला.
७.     २ जुलै १९४२ ला ते व्हॉईसरॉय मंत्रीमंडळात कामगार मंत्री झाले. ह्या कारकिर्दीत त्यांनी कामगारांसाठी बरेच कायदे निर्माण केले.
८.      २ सप्टेंबर १९४५ ला कामगार कल्याण योजना सादर केली. ही योजना लेबर चार्टर म्हणून प्रसिध्द आहे.
९.      युध्द साहित्य निर्माण करणार्‍या कारखान्यात एक ‘सयुक्त कामगार नियामक समिती’ स्थापन केली.
१०.   सेवा योजन कार्यालय ( Employment Exchange ) ची स्थापना केली.
११.   कामगारांना अगोदर भरपगारी रजा मिळत नव्हती. १४ एप्रील १९४४ ला बाबासाहेबांनी भरपगारी रजेचे विधेयक मंजूर केले.
१२.  कामगारांना कमीत कमी वेतन ठरविण्याची तरतूद असलेले बिल मांडले. ह्यातूनच `किमान वेतन कायदा १९४८’ ची निर्मिती झाली.
१३.  औद्योगिक कलह मिटविण्यासाठी समेट घडवून आणणारी यंत्रणा (लवाद यंत्रणा) उभारण्याची तरतूद केली.
१४.  सप्टेंबर १९४३ रोजी भरलेल्या त्रिपक्षीय कामगार परिषदेचे बाबासाहेब अध्यक्ष होते. त्यात त्यानी कामगारांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सांस्कृतिक गरजा व आरोग्याचे उपाय तसेच कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी उपाय यावरील ठराव संमत केले.
१५. ३१ जानेवारी १९४४ रोजी खाण कामगारांसाठी ‘कोळसा खाण कामगार फंडाची’ स्थापना करणारे विधेयक मांडले.
१६.ऑगष्ट १९४५ मध्ये औद्योगिक वसाहतीचे नियम व मालकाच्या जबाबदार्‍या यावर    विचारविनिमय करणार्‍या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. त्यात त्यांनी उद्योगासाठी  मौलिक सूचना केल्या.
१७. ८ एप्रील १९४६ ला ‘मिका माईन्स लेबर वेल्फेअर फंडाची’ स्थापना करण्यासंबंधीचे बिल  संमत केले.
१८. ‘इंडियन्स माईन्स (अमेंडमेंड) ऑर्डिनन्स १९४५’ नुसार स्त्री कामगारांच्या मुलांसाठी पाळणा घराची व्यवस्था करण्याचे व्यवस्थापनावर बंधन घातले.
१९.`भारतिय खाण कायदा १९४६’ तयार करुन स्त्री कामगारांना खाणीत जमिनीच्या आंतमध्ये   काम करण्यास व रात्रपाळीस बंदी केली.
२०.‘दि.माईन्स मॅटरनिटी बेनिफिट ऍक्ट’ नुसार खाणीतील स्त्रीयांना बाळंतपणाची (प्रसूतीपूर्व व   प्रसूतीनंतर) रजा देण्याची शिफारस केली.
२१.‘दि.फॅक्टरी अमेंडमेंट बिल’ संमत करुन कामगारांना १० दिवसाची पगारी रजा आणि बाल   कामगारांना १४ दिवसाची पगारी रजा देण्यासंबंधी कायद्यात दुरुस्ती केली.
२२.१९४६ च्या बजेट सेशन मध्ये आठवड्याचे कामाचे तास ५४ वरुन ४८ व दिवसाला १०   तासांऎवजी ८ तास करण्याचे बिल मांडले.
२३. अपघातग्रस्त कामगारांना मोबदला मिळावा म्हणून ‘कामगार भरपाई कायद्याची’ निर्मिती केली.
२४.२१ फेब्रुवारी १९४६ साली मध्यवर्ती कायदे मंडळात ‘दि इंडियन्स ट्रेड युनियन्स (अमेंडमेंड)   ऍक्ट आणून ट्रेड युनियनला मान्यता देणे व्य्वस्थापनाला सक्तिचे करण्यासंबंधीचे विधेयक   मांडले.
२५.१९ एप्रील १९४६ ला मध्यवर्ती कायदे मंडळात कमीत कमी मजुरी आणि कामगारांची संख्या   किती असावी या संबंधी बिल मांडले व त्याचेच १९ फेब्रुवारी १९४८ ला कायद्यात रुपांतर   झाले.
 २६.बाबासाहेबांनी भारतीय घटनेची निर्मिती केली. त्यातील ‘मार्गदर्शक तत्व’ आर्टिकल ३९ (ड)    नुसार पगारदार पुरुषा इतकाच पगार त्याच पदावर काम करणार्‍या स्त्रियांनाही मिळावा अशी    घटनात्मक तरतूद केली.
 २७.घटनेच्या कलम ४३ नुसार गर्भवती व बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी योग्य व    सुरक्षित व्यवस्था ठेवण्याची तरतूद केली.
 २८.कलम ४३ (अ) नुसार शासनाने कामगारांना व्यवस्थापनात सहभागी करण्यासाठी प्रयत्‍न    करावेत अशी तरतूद केली.
 २९.कलम ४३ नुसार शासनाने कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक    संधी देण्यासाठी प्रयत्‍न करण्याची तरतूद केली.
 ३०.‘स्टेट्स ऍण्ड मायनॉरिटीज’ या ग्रंथामध्ये वेठबिगार कामगारांच्या प्रश्‍नाला हात घालतांना    बाबासाहेब ‘वेठबिगार हा गुन्हा आहे’ असे मत मांडले आहे.
 ३१.कामगारांचे आथिक जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात आर्थिक    धोरण स्पष्ट केले. त्यातील आर्टीकल २ सेक्षन २ (४) मध्ये आर्थिक शोषणाच्या विरोधात    स्पष्टीकरण केले. त्यात कामगारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संपत्तीची जास्तीत जास्त    समान वाटणी करण्याबद्द‍ल राज्याने प्रयत्‍न करावेत अशी सुचना केली.
 ३२.शेतीच्या प्रगतीसाठी व शेतकर्‍यांच्या उत्कर्षासाठी लॅंड मॉर्गेज बॅंक, शेतकर्‍यांची पतपेढी,    खरेदी विक्री संघ इत्यादी स्थापण करण्याविषयी धोरण व्यक्त केले.
    कामगार मित्रांनो. बाबासाहेबांचे वरील बहुमूल्य योगदान पाहतां आज कामगारांची जी    सुस्थिती दिसत आहे, त्यात बाबासाहेबांचा निश्चितच सिंहाचा वाटा आहे. म्हणून बाबासाहेब    हे सर्व कामगारांचे आदर्श आहेत. ही बाब सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

स्पर्धा परिक्षा आणि भाषा

4 Jun

स्पर्धा परीक्षेमध्ये भाषेप्रती विद्यार्थी किती सजग आहे हे समजून घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने नविन अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी भाषेचे आकलन व आंतरवैयक्तिक संवाद, संभाषण तसेच इतर इंग्रजी भाषिक कौशल्य हा विषय अनिवार्य केला आहे.
            केंद्रीय लोकसेवा आयोगाचा यंदाचा निकाल पाहता महाराष्ट्रातील मराठी मुलांनी चांगली आघाडी घेतलेली दिसून येते. मात्र योग्यता असूनही केवळ इंग्रजी भाषेच्या भितीमुळे माघार घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी नाही.
            एक सर्वसाधारण अनुभव लक्षात घेता स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात प्रसार माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती मिळते. मग स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण करुन आपणही एक प्रशासकीय अधिकारी व्हावे अशी आशा मनामध्ये निर्माण होते. त्यातून पुढे उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचे मासिकं आणि वर्तमानपत्रात  आलेल्या मुलाखती वाचल्यावर सर्वप्रथम त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली जाते. अशा उमेदवाराचे शिक्षण जर इंग्रजी माध्यमातून  किंवा वैद्यकीय  अथवा  अभियांत्रिकी शाखेतून झाले असेल तर आपल्यामध्ये असा गैरसमज निर्माण होतो की, मी जर असाच इंग्रजी माध्यमातून किंवा इंग्रजी माध्यम असलेल्या अभ्यासक्रमातून शिक्षण घेतले असते  तर  मी सुध्दा या परीक्षेची तयारी करु शकलो असतो. त्यामुळे ’स्पर्धा परिक्षा’ हा आपला प्रांत नव्हे असा एक न्युनगंड मनात निर्माण होतो. त्यामुळे  इंग्रजीबाबत वाटणारी अकारण भिती मराठी मुलांना मागे ओढण्यास कारणीभूत ठरते.
            इंग्रजी विषयी वाटणार्‍या भितीचे आणखी काही कारणे पाहिली असता असे दिसून येईल की, मराठी माध्यम घेऊन शिकणारा एक सर्वसामान्य विद्यार्थी केवळ एक आवश्यक विषय म्हणून इंग्रजी या विषयाकडे बघत असतो. आणि त्यात कसे काय पास होता येईल इतपत त्या विषयाची तयारी केलेली असते. योग्य मार्गदर्शनाच्या अभावी असे सारे घडत असते. पुढे इंग्रजी विषयाची भिती कायमस्वरुपी मनामध्ये घर करुन बसते. स्पर्धा परीक्षेची इंग्रजी भाषा ही जरी शाल्येय किंवा महाविद्यालयीन इंग्रजी भाषेपेक्षा काही प्रमाणामध्ये वेगळी असली तरी तिच्याबद्दल भिती दूर करणे आणि हळू-हळू नाहीसी करणे आपल्याला शक्य आहे.
            स्पर्धा परिक्षा; मग त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या असो; की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या असो, त्यात इंग्रजी हा विषय अनिवार्य आहे. म्हणून या विषयाचा तिरस्कार न करता त्याचेशी मैत्री करुनच आपल्याला आपले भविष्य घडवावे लागेल अशी खुनगाठ वांधूनच आपल्याला या परीक्षेच्या प्रवाहामध्ये पोहायला उतरावे लागेल. इंग्रजी ही सरावाने अवगत होणारी भाषा आहे. ती जर येत नसेल तर आजच्या स्पर्धात्मक युगात टिकणे कठिन आहे.
      या भाषेबाबत आणखी एक चुकीची आणि भ्रामक कल्पना अशी की, ही भाषा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांनाच येते. आता एका संशोधनानुसार असे आढळले की, प्रतिभाशाली होणे ही एक नैसर्गिक कला आहे. कौशल्य आहे. ही कला, कौशल्य आपण शिकू शकतो. आत्मसात करु शकतो.
            या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात ही आपल्याला एखाद्या दैनिक इंग्रजी वृतपत्राच्या वाचनापासून करावी लागेल. सुरुवातीला अवघड वाटणार्‍या इंग्रजी शब्दासाठी डिक्शनरीचा वापर करावा. अशा प्रकारे आपला इंग्रजीचा शब्दसंग्रह देखील वाढेल. मात्र त्याला वेळेचे बंधन असले पाहिजे म्हणजे इतर विषयाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही. सुरुवातीला भाषेचे आकलन होण्यासाठी वेळ लागेल. पण काही कालावाधीत सरावाने ते आपल्याला सहज शक्य होईल. घरामध्ये आपल्या कुटूंबीयासोबत सोप्या व सहज इंग्रजीमध्ये बोलण्याचा सराव करावा. आपल्या मित्र-मैत्रणीच्या ग्रुपमध्ये एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये एखाद्या महत्वाच्या सामाजिक किंवा राजकीय विषयाला अनुसरुन किमान एक तास तरी चर्चा करावी. त्यामध्ये व्याकरणदृष्ट्या होणार्‍या चुका टाळाव्यात. काळ आणि त्याचा उपयोग, शब्दाच्या जाती आणि त्याचा उपयोग यांचा योग्य रित्या सराव करावा.
            असे म्हणतात की आपण ज्या भाषेमध्ये विचार करतो तीच भाषा चांगली बोलतो आणि लिहतो सुध्दा! तसेच त्याच भाषेमध्ये आपण आपले विचार योग्य प्रकारे व्यक्त करतो. म्हणून एखाद्या विषयाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्या दृष्टीने त्या विषयाचा विचार देखील इंग्रजीमधून करावा. तशी सवय स्वत:ला लावून घ्यावी. या पध्दतीचा उपयोग आपल्याला इंग्रजीमध्ये निबंध या घटकासाठी निश्चीतच होईल, माझा वैयक्तिक अनुभव पाहता मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी याच पध्दतीने निबंध या विषयामध्ये २०० पैकी १५० गूण घेतलेले आहेत. कोणत्या विषयाचा कसा व किती अभ्यास करावा ही प्रत्येकाची वेगवेगळी पध्दत असू शकते.
            मी बारावीला विज्ञान विषय घेतला होता. त्यानंतर मात्र मी विधीशाखेकडे वळलो. विधीशाखेचा संपूर्ण अभ्यासक्रम इंगजीमध्ये असल्यामुळे इंग्रजीची खरी ओळख मला इथेच झाली. मला सर्व विषय इंग्रजीमध्ये समजून घेणे क्रमप्राप्त झाले होते. सुरुवातीला अवघड वाटायचं. पण हळू-हळू मात्र सार्‍या संकल्पना इंग्रजीमधून लक्षात यायला लागल्या. डॉ. आंबेडकर लॉ कॉलेज, औरंगाबादच्या कॉलेजचे प्राध्यापक व माझे सहकारी मित्रांचे मला भरपूर सहकार्य लाभले.
            एखाद्यावेळेस गंमत म्हणून आपण काहीतरी करावं आणि त्या घटनेने आपल्या आयुष्याला कलाटणी मिळावी असेच काही माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये घडले. कॉलेजच्या तिसर्‍या वर्षाला असतांना एका सराव चाचणी परीक्षेमध्ये अभ्यास झालेला नव्हता आणि परीक्षा देणे अनिवार्य होते. तेव्हा गंमत म्हणून एका पेपरमध्ये तत्कालीन सामाजिक विषयावर पूर्ण उत्तरपत्रिका निबंधवजा लिहून टाकली; ज्याचा मूळ विषयाशी काहीही संबंध नव्हता. कुणीही तपासू नये हा त्या लिहण्यामागे माझा उद्देश होता. मात्र घडले उलटेच!
            परिक्षक प्राध्यापकाच्या हातात उत्तरपत्रिका  पडल्यावर त्यांना वेगळे काहीतरी लिहिलेले दिसल्यावर कुतूहल म्हणून वाचले. आणि लगेच मला ऑफिसमध्ये बोलाविले. मी मनाची तयारी करुन गेलो की, आता आपला खरपूस समाचार घेतला जाणर! मात्र वास्तविक चित्र मला वेगळेच दिसले. तेथे बसलेल्या इतर प्राध्यापक वृदांमध्ये माझ्या लेखणावर चर्चा सुरु होती. ते मला म्हणाले, “तू तुझ्या संकल्पना अत्यंत मार्मिकपणे स्पष्ट करु शकतोस. तुझ्या अंगी ती क्षमता आहे, तर तू केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबद्दल विचार कर. तू त्या परीक्षेमध्ये छान पेपर लिहू शकशील.”
            त्यावेळी माझ्या मनामध्ये रोवल्या गेलेल्या त्या बिजाचे आज मी आय.आर.एस. (भारतीय राजस्व सेवा) मध्ये सेवा देत आहे. हे एका रोपट्यात झालेले रुपांतर आहे. खर्‍या अर्थाने मला त्या प्राध्यापक वर्गानींच स्पर्धा परीक्षेची प्रेरणा दिली असेच म्हणावे लागेल. नाहीतर माझ्या सोबतचे कोणी वकील झालेत तर कोणी न्यायाधिश झालेत.
            पांच वर्षांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून विधी शाखेची पदवी घेऊन मी बाहेर पडलो. तो हाच विचार मनामध्ये घेऊन की, मला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये जायचे आहे. त्यासाठी मी तत्वज्ञान व इतिहास हे वैकल्पिक विषय निवडले. इतिहासामध्ये एम.ए. करण्यासाठी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, दिल्ली यांची चाचणी परीक्षा उत्तीर्ण केली. तेथे सुध्दा तेथील वातावरणाने इंग्रजी विषयी माझी बरीच भिती दूर झाली.
            इंग्रजी भाषेचे योग्य प्रकारे आकलन झाले तर आपण त्या भाषेतील उत्तमोत्तम साहित्य वाचू शकतो. त्या भाषेमध्ये आपण चांगल्या प्रकारे त्या विषयाच्या संकल्पना स्पष्ट करु शकतो. नव्हे साहित्य वाचनामुळेही आपल्या संकल्पना चांगल्या प्रकारे स्पष्ट होत जातात. म्हणून मराठी, हिंदी भाषेच्या पाठोपाठ इंग्रजी भाषेचे साहित्य वाचनामध्येही  गोडी निर्माण करणे आवश्यक आहे. जी भाषा सार्वत्रीक संवादासाठी अथवा परीक्षेसाठी अनिवार्य आहे, तिच्यावर प्रभुत्व मिळविणे ही काळाची गरज आहे.
            प्रशासकीय सेवेमध्ये आल्यावर इतर देशातील किंवा खात्या अंतर्गत अथवा बाहेरील अधिकारी वर्गासोबत आपल्याला इंग्रजीतून संभाषण करावे लागते. शासनाचे सर्व परिपत्रके इंग्रजीमधून प्रसिध्द होत असतात. प्रत्येक राज्यात स्थानिक भाषा बोलली जात असते. स्थानिक भाषा चटकन अवगत होत नाही. म्हणून इंग्रजी भाषेमध्ये विचारांची देवानघेवान केली जाते. त्यामुळे इंग्रजी भाषेला फार महत्व आहे. म्हणून ही भाषा अवगत होणे अत्यंत गरजेचे आहे. भाषा शिकण्याचे तंत्र आपण अवगत केले तर आपण कोणतीही भाषा शिकू शकतो, लिहू शकतो किंवा वाचू शकतो.
            मागे वळून पाहिले असता भाषेवर प्रभुत्व मिळविलेली विचारवंताची अनेक उदाहरणे दिसून येतील. आपण आपल्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण ठेवले पाहिजे. मराठीतून शिक्षण घेवून त्यांनी इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत असतांना वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी इंग्रजीमध्ये ’दी प्राब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध लिहीला. पुढे त्यांनी इंग्रजीमध्ये अनेक ग्रंथ लिहिले. परदेशातील पी.एच.डी, डी.एस.सी. बार अ‍ॅट लॉ सारख्या पदव्या ग्रहन केल्या. एवढेच नव्हे तर गोलमेज परिषद, भारतीय संविधान परिषदेमध्ये सुध्दा इंग्रजीमध्ये संवाद साधला. म्हणून इंग्रजी भाषा ही कुणाचीही मक्तेदारी राहिलेली नाही तर तीला आंतरराष्टीय भाषेचं स्थान प्राप्त झालेलं आहे. जागतिकीकरणाच्या युगामध्ये इंग्रजी  भाषा एकमेकांना जोडणारी आहे. त्याला आता पर्याय नाही हे सत्य आपण स्विकारलेच पाहिजे! म्हणून इंग्रजी भाषेविषयीची भिती मनातून हद्दपार केली पाहिजे.
            मुख्य परीक्षेचा मराठी माध्यमातून पेपर लिहून देखील अनेक विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत आहेत. त्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात करुन ते उत्तम प्रशासकीय सेवा देत आहेत. तथापी नव्या पॅटर्ननुसार यापुढे उच्चतम दर्जाचे इंग्रजीवरील प्रभुत्व मिळविणे फायद्याचेच ठरेल. ग्रामीण आणि निमशहरी भागातून येणार्‍या उमेदवाराचे शिक्षण हे मराठी माध्यमातून झाले असले आणि इंग्रजी साधारण असली तर अशा विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा आत्मसात करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल.
            शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत. आपण मुलाखत आपल्या मातृभाषेमध्ये देऊ शकतो. आपण आपले मुलाखत देतांना आपल्या भाषेच्या उत्तराचे रुपांतर इंग्रजीमध्ये करणारे तेथे ’ट्रांन्सलेटर’ बसलेले असतात. तरीही आपण आपले विचार इंग्रजीमध्ये मांडण्याचा प्रयत्‍न करावा; अशी मुलाखतकार निवड मंडळाची अपेक्षा असते. पण तसा त्यांचा आग्रह मात्र नसतो. त्यामुळे त्यावेळी आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येत नाही म्हणून आपली नामुष्की होत नाही. त्यामुळे इंग्रजी भाषेची भिती बाळगू नये.
            इंग्रजीची भिती बाळगणार्‍या सर्व मराठी मुलांना हेच सांगावेसे वाटते की, एक आव्हान म्हणून इंग्रजीचा स्विकार करा. कधिही नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचार केल्यामुळे आपल्या मांसपेशीवर तसेच परिनाम होऊन जीवनात नैराश्य येते. म्हणून नेहमी प्रसन्न, साहसी आणि आशावादी बनून रहा.
      असे म्हणतात की, पाण्यात पडल्यावर पाण्याची भिती निघून जाते. कारण तेव्हा आपल्या चोहीकडे पाणीच पाणी असते. त्या प्रमाणे एकदा तुम्ही इंग्रजी भाषा अत्मसात करण्याचा वसा घेतला तर आपल्या सभोवताली इंग्रजीचे वलय दिसू लागेल. आपला आत्मविश्वास वाढून त्याचा चांगला परिणाम इतर विषयांमधे निश्चितच दिसून येईल. फक्त कमालीची जिद्द, भयानक चिकाटी, अतूट सयंम, अपार ध्येय, खडतर प्रयत्‍न व कठोर मेहनत हवी! संत तुकाराम महाराजांचा सल्ला लक्षात ठेवावा. ते आपल्या अभंगात म्हणतात, “असाध्य ते साध्य, कराया सायास, करावे अभ्यास, तुका म्हणे.” मग काही अवघड नाही.
            तात्पर्य: आपल्या व्यक्तिमत्व विकासातही त्याची भर पडेल आणि एक दिवस या स्पर्धा परीक्षेच्या महासागरामध्ये आपण यशाचा किनारा नक्किच गाठलेला असेल. मग तो दिवस, ती वेळ, तो क्षण आपलाच असेल…! फक्त आपलाच असेल…!!
प्रज्ञाशील रा. जुमळे,
 E.mail pradnyasheel@gmail.com
टिप:- सदर लेख  दैनिक वृतरत्न सम्राट मध्ये दि. १०.०७.२०११ रोजी प्रकाशित झाला. तसेच दैनिक महानायक, मुंबई   मध्ये  प्रकाशित झाला.

’चारित्र्य’ जपणारे महापुरुष: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

19 May

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवातीची वर्षे अत्यंत हलाखिमध्ये व गरिबीत गेली. त्यांच्या पत्‍नी रमाबाई मोठ्या उदार मनाच्या व  पतीला सदोदित साथ देणार्‍या होत्या. दलित-बहुजन समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी  बाबासाहेबांनी सुरू केलेल्या अथक संघर्षामुळे बाबासाहेब स्वता:च्या प्रपंचाकडे फारसे लक्ष देऊ शकले नाहीत. पण, आपल्या पत्‍नीवर त्यांचे अपार प्रेम होते. रमाबाईंनी आपल्याला सांभाळले, याची सारखी जाणीव त्यांना राहत होती.
२५ मे १९३५ रोजी रमाबाईंचं दुख:द निधन झाले. रमाबाईंच्या मृत्यूनंतर तेरा वर्षे बाबासाहेब अविवाहित राहिले. उच्च रक्तदाब व  मधुमेह अशा दुर्धर विकाराने त्यांना ग्रासले होते. आयुष्यभरच्या संघर्षाने त्यांची प्रकृती कमालीची खालावली होती. बाबासाहेबांच्या प्रकृतीची सतत काळजी घेणारी एखादी स्त्री त्यांच्या जवळ असावी,  असे त्यांच्या कार्यकर्त्यांना सतत वाटत होते.
तसे बाबासाहेब इंग्लंडला १९२० ते १९२३ या कालखंडात शिकायला गेले होते. तेव्हा फ्रेनी फ्रेनझाइज  नांवाची एक आंग्ल विधवा युवती एक संवेदनशील मैत्रिण, एक जवळची सल्लागार म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आली होती. ती हॉऊस ऑफ कॉमन्स मध्ये सेक्रेटरी होती. तिचा बाबासाहेबांशी बराच पत्रव्यवहार झाला होता.
१९३७ मध्ये तर बाबासाहेब इंग्लंडला गेले असतांना त्यांनी, ’या इंग्लिश विधवेशी गुप्तपणे विवाह केला’ अशी तार भारतात आली होती. ही तार वाचून कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. ही गोरीबाई बाबासाहेबांना चळवळीत राहू देईल की नाही, की ती बाबासाहेबांना इंग्लंडला घेवून जाईल? अशा अनेक शंका-कुशंकानी त्यांना घेरले होते.
बाबासाहेब भारतात परत आल्यावर बोटीतून उतरतांना तिला सोबत आणले असेल, म्हणून लोक उत्सुकतेने पाहत होते. परंतु बाबासाहेब एकटेच उतरल्याचे दिसलेत. तारेची बातमी बाबासाहेबांना सांगितली, तेव्हा ते नुसतेच हसले!
रमाबाई गेल्यानंतर तिला बाबासाहेबांच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटत होती. म्हणून बाबासाहेबांना मनस्वास्थ व कौटुंबिक सुख देण्यासाठी व त्यांचा जीवघेना आजार आटोक्यात आणण्यासाठी ती हळवी झाली होती. त्यामुळे खरंच .तिला बाबासाहेबांच्या जीवनात प्रवेश करण्याची उत्कट इच्छा झाली होती. परंतु बाबासाहेब विचारी, गंभीर, संयमी आणि सदाचारी होते. ’चारित्र्य’ जपणारे महापुरुष होते. फ्रेनीमधल्या ’स्त्री’ पेक्षा तिच्यामधल्या निर्भेळ मैत्रीला जपणारे होते. फ्रेनीची तळमळ, उत्सुकता जाणूनही हा विचारी, धिरगंभीर, संयमी पुरुष विचलीत झाला नाही. परिस्थितीने बाबासाहेबांना बांधून ठेवले होते. अनेक सुखापासून त्यांना वंचित ठेवले होते. शेवटी फ्रेनीचं १९४४ मध्ये निधन झाल्यावर त्या कायमच्या बाबासाहेबांपासून  दूर निघून गेल्यात.(संदर्भ- पत्राच्या अंतरंगातून: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखिका- डॉ. माधवी खरात)
त्यानंतर बाबासाहेबांनी १५ ऎप्रील १९४८ रोजी डॉ. सविता (शारदा) कबीर सोबत दुसरा विवाह केला,  एवढेच लोकांना माहिती आहे. पण, हा विवाह कोणत्या परिस्थितीमध्ये केला याची माहिती मात्र लोकांना नाही. बाबासाहेबांचे आयुष्याच्या शेवटपर्यंत खाजगी सचिव असलेल्या नानक चंद रत्तू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या आठवणींच्या पुस्तकात या बाबतीत लिहिलेले      आहे.    .
बाबासाहेब मुंबईला डॉ. माधव मावळंकर यांच्या दवाखान्यात १९४८ मध्ये दाखल झाले होते. तेव्हा त्यांनी मधुमेहाच्या आजारावर रोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे गरजेचे आहे असे बाबासाहेबांना सांगितले होते. तेव्हा तुमची शुश्रूषा करेल अश्या स्त्री सोबत तुम्ही एकतर लग्न करा किवा तुमच्या सोबत एखादी स्त्री परिचारिका म्हणून ठेवा अशी सुचना डॉक्टरांनी  केली. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की, “ माझ्या समाजातील सार्‍याच स्त्रिया मला बाबा म्हणतात. मी कुणाशी लग्न करु?”
अशावेळी डॉ. सविता कबीर बाबासाहेबांना भेटल्या. त्यांनी परिचारिका म्हणून बाबासाहेबांसोबत दिल्लीला येण्याची आणि तेथे त्यांची शुश्रूषा करीत महिनाभर राहण्याची तयारी दर्शवली.
बाबासाहेबांनी त्यांची सुचना  मान्य न करता त्यांना लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी  लिहिले की, “एखादी स्त्री माझी शुश्रूषा करण्यासाठी माझ्या जवळ असावी, याबद्दल तुम्ही जे विचार मांडले आहेत, ते मला मुळीच स्वागतार्ह वाटलेले नाहीत. या बद्दल मला माफ करा. मी कमालीच्या नैतिक आणि धार्मिक वातावरणात लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे अवांछनिय संबंधांची जाहीर चर्चा निर्मान होईल, असा प्रस्ताव तर सोडाच, पण साधा विचारही मी करू शकत नाही. सार्वजनिक जीवनातील माझी प्रतिमा स्वच्छ चारित्र्याचा आणि निष्कलंक नीतिमत्तेचा व्यक्ती या लौकिकावर उभी राहिलेली आहे. माझे शत्रू सुध्दा मला घाबरत असतील आणि माझा आदरभाव करत असतील, तर ते याच कारणाने! त्या लौकिकाला तडा जाण्याची जराही शक्यता ज्यात असेल, असे काहीही माझ्या हातून कदापिही घडणार नाही. माझी पत्‍नी गेली, तेव्हा मी अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती. ती मोडावी लागली तर, मी विवाह करीन, पण कोणत्याही परिस्थितीत आणि विशेषत: घरात दुसरी कोणी स्त्री नाही, अशा वेळी परिचारिका किंवा साथीदार ठेवण्याची सूचना मी मुळीच मान्य करणार नाही.”
डॉ. कबीर आणि बाबासाहेब यांच्यात जवळपास चार महिने पत्रव्यवहार झाला. आपल्या पत्‍नी बद्दलच्या अपेक्षा व्यक्त करतानाच, त्यांनी स्त्रियांबद्दलचा आपला प्रचंड आदरभाव या पत्रात व्यक्त केला आहे. या बाबतीत त्यांनी दादासाहेब गायकवाड व त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन त्यांचे  मत विचारात घेतले.
डॉ. कबीर आणि बाबासाहेब यांचा विवाह झाला. डॉ. सविता कबीर या  माईसाहेब आंबेडकर म्हणून, बाबासाहेबांच्या जीवनात आल्या.  निकोप चारित्र्याला जपणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे हे विलक्षण हिमालयाच्या उत्तुंग उंचीचे व्यक्तिमत्व होते!

भारतीय स्त्रीयांची मुक्तता

6 Apr

भारतामध्ये जेवढी स्त्रियांची अवनती झाली, तेवढी कोणत्याही देशात झाली नाही. स्त्रियांना या देशात अत्यंत हिन व पुरुषांपेक्षा दुय्यम स्थान देण्यात आले. स्त्रियांच्या या अवनतीस ब्राम्हणवादी व्यवस्था कारणीभूत आहे.

स्त्रियांना परंपरागत गुलामगिरीतून काढून तिला स्वातंत्र्य देण्याचे व तिचे उध्दार करण्याचे कार्य भगवान बुध्द, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी केले आहे. त्यांनी जे  स्त्री मुक्तीसाठी कार्य केले त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. काळ जसजसा पुढे सरकेल, येणारी पिढी प्राचिन भारतातील गुलाम स्त्री व आधुनिक भारतातील स्वतंत्र्य स्त्री यांचा तुलनात्मक अभ्यास करेल, तेव्हा संपुर्ण देश फुले-आंबेडकरांच्या स्त्री मुक्तीच्या कार्यापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही.

प्राचिन भारतातील मनुस्मृतीचे कायदे व प्रथा स्त्रियांसाठी कसे जाचक होते व हे अन्यायी कायदे फुले-आंबेडकरांनी कसे बदलविले ते पुढिल आलेखावरुन दिसून येईल.

१. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-१८ व २-२६ नुसार  स्त्रियांना वेदाभ्यास व विद्या संपादन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. एवढेच नव्हे तर आपस्तंभ धर्मसुत्र ६-११ नुसार एखादा विद्यार्थी वेद वाचत असतांना स्त्री समोर आली असेल तर त्याने वेद वाचणे थांबवावे असे लिहीले आहे.

महात्मा फुलेंनी १ जानेवारी १८४८ रोजी मुलींसाठी देशात पुण्यात पहिली शाळा काढून स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. सावित्रीबाई फुले ह्या प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलम २९ नुसार  प्रत्येक स्त्रीस शिक्षणाचा मुलभूत अधिकार बहाल केला.

२. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-३ नुसार  स्त्रीचे स्वातंत्र्य नाकारुन ती स्वातंत्र्यास लायक नाही असे सांगितले.

बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम १४ नुसार  देशातील सर्व स्त्री पुरुषास कायद्याने समान ठरविले व तिला स्वातंत्र्य उपभोगण्याचे समान हक्क दिले. एवढेच नव्हे तर घटनेच्या कलम ३१ (घ) नुसार स्त्री आणि पुरुषास असे दोघानांही समान कामाबद्दल समान वेतनाचा अधिकार दिला.

३. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-३ नुसार  पतीला पत्‍नीची विक्री करण्याची मुभा देण्यात आले. याचे उदाहरण म्हणजे महाभारतातील द्रोपदीला जुगारात हरण्याचे आहे.

बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम २३(१) नुसार  स्त्री-पुरुषांचा व्यापार व विक्री करण्यास मनाई केली आहे.

४. मनुस्मृतील श्लोक क्रमांक २-६६ नुसार  स्त्री ही अमंगल ठरविण्यात आले असून तिला धार्मिक विधी अथवा मंत्र म्हणता येत नाही. मनुस्मृतील श्लोक क्रमांक १६-३६-३७ नुसार  ती जर मंत्र म्हणत असेल तर नरकात जाते.

बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम २५ नुसार  धर्म स्वातंत्र्याचा व धार्मिक विधीत सहभागी होण्याचा स्त्री-पुरुषांना समान अधिकार आहे.

५. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ५-१४८ नुसार  स्त्रीला नवर्‍यापासून घटस्फोट घेण्यास मनाई केली आहे. नवरा कसाही असला तरी तिने नवर्‍यासोबतच राहावे असे तिच्यावर बंधन टाकले. पुरुषावर मात्र असे कोणतेही बंधन टाकले नाही.

बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम ६ अनुसूची ३ (झ) नुसार  नवरा जर अन्यायी असेल तर त्याच्या जाचापासून मुक्त होण्यासाठी घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला आहे.

६. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-४१६ नुसार  पत्‍नीला कुटुंबाच्या संपत्तीत हक्क नाही. तिने जरी स्वकष्टाने संपत्ती मिळवली असली तरीही त्यात तिचा हक्क नाही.

बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम ३०० (क) नुसार  स्त्री किंवा पुरुषाला संपत्तीच्या हक्कापासून वंचित करता येत नाही. तसेच बाबासाहेबांनी मांडलेल्या हिंदु कोड बिलाच्या आधारावर जो कायदा तयार करण्यात आला, त्यानूसार स्त्रिला कुटुंबाच्या संपत्तीत समान हक्क देण्यात आला आहे.

७. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ८-२९९ नुसार  स्त्रिला जबर शिक्षा म्हणून मारण्याचा पतीला हक्क देण्यात आला. तसेच श्लोक क्रमांक ११-६७ नुसार  स्त्री हत्त्या झाली असेल तर मद्यपानाच्या अपराधाएवढा क्षुल्लक गुन्हा ठरविण्यात आला. एवढेच नव्हे तर, तुलशीदास यांनी रामचरित मानस मध्ये म्हटले आहे की, ‘ढोल गवॉर शुद्र पशु नारी, सब ताडन के आधिकारी।’

बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या अनुसुची  ७ क्रमांक ३ (१)(२) नुसार  स्त्रिला मारहान करणे व स्त्रीची हत्या करणे फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय स्त्रिला त्रास होवू नये म्हणून इंडियन माईन्स ऎक्ट १९४६ ची निर्मिती करुन स्त्री कामगारांना खाणीत जमिनीच्या आंत काम करण्यास व रात्रपाळीस बंदी घातली. तसेच माईन्स मॅटर्निटी बेनेफिट ऎक्ट तयार करुन स्त्रियांना बाळंतपणाची रजा देण्याची शिफारस केली. पुढे घटनेने हा कायदा देशातील सर्व स्त्रियांसाठी लागू केला. त्याच प्रमाणे घटनेच्या कलम ४२ नुसार गर्भवती व बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी सोयी व सुरक्षित व्यवस्था देण्यात यावी असे बंधन मालकावर टाकण्यात आले.

८. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ५-१४७ नुसार  कुटुंबातील कोणत्याही स्त्रिला व्यवहाराबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाकारला.

बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम १४ नुसार  स्त्री किंवा पुरुषाला समान अधिकार असल्यामुळे स्त्रिला व्यवहाराबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. एवढेच नव्हे तर घटनेच्या कलम ३९ (क) नुसार उपजिविकेचे पर्याप्त साधन मिळविण्याचा अधिकार दिला. तसेच घटनेच्या कलम ३२५ नुसार बाबासाहेबांनी पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही लोकशाही प्रक्रियेत भाग घेण्यासाठी मतदानाचा अधिकार दिला. या महत्वपुर्ण अधिकारांमुळे लोकशाहीतील सर्वश्रेष्ट असं शस्त्र स्त्रियांच्या हातात देवून व त्यांना सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग सुकर करुन .बाबासाहेबांनी स्त्रियांवर अनंत उपकार केले आहे.

९. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९.१६ नुसार  स्त्रीच्या बाबतीत असे म्हटले की परमेश्वराने जन्मताच तिच्यात अत्यंत विघातक दुर्गुण घातले आहेत. श्रीकृष्णाने भगवतगिता श्लोक क्रमांक ९.३२ नुसार स्त्रियांना पापयोनी म्हटले आहे.

बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या अनुसुची  ७ क्रमांक ३ (१)(२) नुसार  स्त्रियांची मानहानी करणे व कलम १४ नुसार  लिंगभेद करण्यास मनाई केली आहे. तसेच घटनेच्या कलम ३९ (क) नुसार कायद्याने न्याय देतांना स्त्री पुरुष असा लिंगभेद करता येत नाही.

१०. विधवा स्त्रिचे केशवपन करणे, बालविवाह करणे, विधवा पुनर्विवाहास बंदी करणे, स्त्रिला सती जाण्यास प्रवृत्व करणे, होळीच्या दिवशी नग्न नाचविणे ( मध्यप्रदेशात होळीच्या दिवशी शुद्र स्त्रीला नग्न नाचविण्याची प्रथा आहे.) इत्यादी स्त्रियांना हिनत्व आणणार्‍या कुप्रथा स्त्रियांवर हिंदूधर्माने लादल्या.

बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम ५१ (ड) नुसार  स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचविणार्‍या सर्व सामाजिक व धार्मिक कुप्रथा व अनिष्ट परंपरांवर बंदी आणली.

हिंदु धर्मातील ब्राम्हणी व्यवस्थेतील मनुच्या कायद्याने व इतर धर्मग्रंथाने स्त्रियांना व बहुजन समाजाला गुलाम केले. म्हणूनच महात्मा फुल्यांनी, ‘मनुस्मृती जाळली पाहिजे’ असे जळजळीत उद्‍गार काढले होते. बाबासाहेबांनी आपल्या गुरुची आज्ञा समजून प्रत्यक्षात दिनांक २५ डिसेंबर १९२७ रोजी हा काळा कायदा जाळला. ते मनुस्मृती जाळून थांबले नाहीत तर त्या ठिकाणी समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्यायावर आधारित भारतीय घटना २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राष्ट्राला अर्पन करुन  तिची अंमलबजावनी दिनांक २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाली.

आज फुले-आंबेडकर यांच्या महान कर्तृत्वामुळेच भारतीय स्त्री देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती सारख्या सर्वोच्च पदावर विराजमान होत आहेत. तेव्हा भारतीय स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे द्वार उघडून देणार्‍या या महामानवा समोर समस्त स्त्रियांनी कृतज्ञतेने नतमस्तक व्हायला पाहिजे.

टिप:- १. सदर लेख  विश्व लिडर, मुंबई या मासिकात मार्च २०११ च्या अंकात प्रकाशित झाला.                  २. सदर लेख  दैनिक वृतरत्‍न सम्राट, मुंबई या वृतपत्रात दि. १९.०६.५०११ रोजी   झाला.

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 359 other followers

%d bloggers like this: