Longreads’ Best of WordPress, Vol. 3

12 Aug Featured Image -- 406

rkjumle:

Adsence

Originally posted on WordPress.com News:

We’re back with another edition of Longreads’ Best of WordPress: below are 10 outstanding stories from across WordPress, published over the past month.

You can find Vol. 1 and 2 here — and you can follow Longreads on WordPress.com for all of our daily reading recommendations.

Publishers, writers, keep your stories coming: share links to essays and interviews (over 1,500 words) on Twitter (#longreads) and WordPress.com by tagging your posts longreads.


1. The Great Forgetting (Kristin Ohlson, Aeon)

5238595778_17c27c49d3_b

Why do we suffer from “childhood amnesia”? We lack the ability to recall memories from the first three or four years of our lives, and we have “a paucity of solid memories until around the age of seven.”

Read the story

2. The Mecca in Decline (Jordan Conn, Grantland)

Why doesn’t New York City produce elite NBA talent like it used to?

Years ago, New York’s playgrounds and high…

View original 562 more words

संविधान बदलविण्याचा कट

27 Apr

 दि.१३.०४.२०१४च्या दिव्य मराठीच्या ‘रसिक’ मध्ये अशोक अडसूळ यांचा ‘मतदारांचा नवदलित चेहरा’ हा लेख वाचण्यात आला. हा लेख म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून केवळ नरेंद्र मोदीचा प्रचार आहे. नरेंद्र मोदीच्या विरोधात जो कोणी वर्ग असेल, त्यांचा बुद्धिभ्रम करणे हाच यामागे उद्देश आहे. हिटलरचा प्रचारक गोबेल्स हा सुध्दा असाच प्रचार करायचा. एखादी खोटी गोष्ट शंभर वेळा सांगा म्हणजे ती लोकांना खरी वाटायला लागते. म्हणून या प्रकाराला  गोबेल्स  नीती म्हटल्या जाते, हे सार्‍यांनाच माहिती आहे. तशातलाच हा प्रकार दिसतो.

‘महायुतीला संधी द्यायला काही हरकत नाही असा या मतदारांचा कल दिसत आहे. तसेच रामदार आठवले यांनी शिवसेनेशी केलेला घरोबा योग्य असल्याचा निर्वाळा दलितांमधील एका वर्गाने दिला आहे.’ असे जे लेखकाने सरसकटपणे ठोकून दिले ते निव्वळ गोबेल्स नीतीचा भाग आहे. वास्तविक महाराष्ट्रातील फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कोणताही सुज्ञ मतदार महायुतीला संधी द्यायचा विचार स्वप्नातही करणार नाही.

सार्‍यांनाच माहिती आहे की नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उपज आहे. त्यांची  धर्मवादी व फुटीरतावादी विचार हे राष्टीय एकतेला बाधक आहे. नरेंद्र मोदीला मोहरा बनवून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्य घटना मोडीत काढायची आहे, हे स्पष्ट आहे. मागे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना संविधान बदलविण्याचा जोरकस प्रयत्न झाला. परंतु बहुजन समाजाच्या जागरूकतेमुळे त्यांचा हा प्रयत्न त्यावेळी फसला. आता लोकांची मानसिकता बदलविण्याची प्रक्रिया सुरु करून घटनेचे स्वरूप बदलविण्याचे कारस्थान त्यांनी रचलेले दिसते.

भाजप निवडणुकीपूर्वीच पंतप्रधान घोषित करून एक नवीन पायंडा या देशात पाडत असल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संसदीय लोकशाही बदलवून  त्या ठिकाणी अमेरिकेत असलेली अध्यक्षीय लोकशाही पध्दत प्रस्थापित करायची आहे. या देशात हिंदूची संख्या जास्त असल्याने थेट निवड पद्धतीने पंतप्रधान हा हिंदूच असेल. म्हणजे हिंदूचीच सत्ता कायम या देशात राहील, असे त्यांचे गणित आहे. निवडणुकीपूर्वीच पंतप्रधान घोषित करण्याची प्रथा एकदा का अंगवळणी पडली की लोकांची मानसिकता हळूहळू या बदलाला तयार होवून संविधान सहज बदलविणे शक्य होईल, असे त्यांना वाटते.

अध्यक्षीय लोकशाही पध्दतीत देशव्यापी एकच मतदारसंघ असल्याने प्रवीण तोगडिया किंवा बाबा रामदेव सारखे कडवे हिंदुत्ववादी महाभाग बहुसंख्यांकाच्या आधारावर या देशाचा अध्यक्ष झाला तर नवल वाटणार नाही. पण संसदीय लोकशाही प्रणालीत वेगवेगळ्या मतदारसंघात  वेगवेगळ्या जाती-धर्माचे प्राबल्य राहत असल्याने हे लोक निवडून येऊन पंतप्रधान बनणे अशक्य आहे. म्हणूनच निवडणुकीआधीच पंतप्रधान घोषित करण्याची चाल खेळण्यात येत असल्याचे दिसते.

मागे अडवानीने म्हटले होते की भारतात द्वीपक्षीय पद्धती असावी. एक पक्ष सत्तेवर आला की दुसर्‍या वेळेस दुसरा पक्ष सत्तेवर यावा, अशी ती व्यवस्था. एकदा लोक कॉंग्रेसला कंटाळली की दुसर्‍या वेळेस भाजप सत्तेवर यावी. म्हणजे दोघांनी आलटून-पालटून सत्तेच्या व विरोधी पक्षाच्या बाकावर बसत राहावे. तिसर्‍या पक्षाला बिलकुल थाराच असू नये, अशी ती व्यवस्था त्यांनी मांडली होती. म्हणून कॉंग्रेस व भाजप या दोन पक्षात जणू काही करारनामा झाल्यासारखे यावेळी कॉंग्रेसने भाजपला सत्ता सोपविण्याचा मनसुबा बनविलेला दिसत आहे.    

त्यामुळेच पंतप्रधान पदासाठी मोदींचा धुमधडाक्यात प्रचार सुरु आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांच्या निरनिराळ्या क्षेत्रात काम करणार्‍या शाखा, बुवा-बाबा, हिंदुत्ववादी संघटना, वृतपत्रे आणि दूरदर्शन प्रसारमाध्यमे असे सार्‍यांनीच जबरदस्त कंबर कसली आहे. ‘अबकी बारी मोदी सरकार’, ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा घोषणा निनादत आहेत. मोदींना संपूर्ण देशात फिरविण्यासाठी उद्योगपतींनी आपल्या थैल्या व साधने मोकळ्या केल्या आहेत. जेथे जाता येत नाही अशा २२५ ठिकाणी ३ डी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर मतदारांची मानसिकता अनुकूल होण्यासाठी सतत संभावित निकालाचे आकडे मोदीकडे झुकणारे देण्यात येत आहे. २००४च्या निवडणुकीत ‘इंडिया शायनिंग’चे असेच आकडे देण्यात आले होते. त्यावेळी मतदार त्यांच्या अशा प्रचाराला फसले नाहीत. पण आताच्या पद्धतशीर प्रयोगाला ते गळाला लागावेत म्हणून त्यांचा जोरात आटापिटा सुरु आहे.

मागे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान बनण्याआधी त्यांचा असाच प्रचार चालू होता. बोफोर्स प्रकरणाचा जोरात चर्चा सुरु केली होती. या प्रकरणाला धरून राजीव गांधीवर विनोदी किस्से सांगितले जात होते. याला उत्तर आता अटलबिहारी वाजपेयी! त्यांच्या शिवाय या देशातील भ्रष्टाचार जाणार नाही, असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितले जात होते. तेव्हाही ते भाजपचा प्रचार न करता केवळ वाजपेयीचा प्रचार करीत होते. ज्यांना भाजपचा तिटकारा होता, ते सुध्दा या प्रचाराला बळी पडलेत. फक्त पाच वर्ष अटलबिहारी यांना द्या आणि पहा काय जादू होते ते!. सत्ता आल्यावर बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला ते चुटकीसरशी दूर करू करतील. असा आशावाद लोकांत निर्माण करण्यात आला होता. असाच प्रकार आताही होत आहे.

वाजपेयी निवडून आल्यावर त्यांना एक पूर्ण टर्म मिळून सुध्दा भ्रष्टाचार कमी झाला का हा संशोधनाचा विषय आहे. उलट नात्यागोत्यातील व पक्षातील लोकांना पेट्रोल पंप वाटपासारखे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आले होते. सरकारी उद्योग विकून खाजगी भांडवलदारांच्या घशात घातले. मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कात्री लावली. उद्योगपतींच्या फायद्यासाठी कामगारविषयक कायदे कमजोर करण्यात आले. कंत्राटदारी पद्धत राबवून उद्योगपतींना स्वस्तात मजूर मिळवून दिले व त्याद्वारे कामगारांचे शोषण सुरु केले. शिक्षणक्षेत्राला बाजारूपणाचे स्वरूप आणून सर्वसामान्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले.

त्यानंतर दगडापेक्षा वीट मऊ या नात्याप्रमाणे लोकांनी कॉंग्रेस आघाडीला दोनदा सत्तेवर आणले. पण त्यांच्या काळातही बेरोजगारी, गरिबी, महागाई, भ्रष्टाचार, काळापैसा  अशासारख्या अनेक समस्या दूर न करता त्या आणखी चिघळत ठेवल्या. म्हणजे त्यांनी असे मुद्दाम केले की काय अशी शंका घ्यायला जागा निर्माण झाली आहे.

भाजपाच्या मानाने कॉंग्रेसचा प्रचार तोकडा दिसतो. टी.व्ही.सुरु केला की प्रत्येक चॅनलवर मोदींचं भाषण, मुलाखती, जाहिराती दिसतात. पण तेवढी प्रसिद्धी कॉंग्रेसची का नाही असा प्रश्न पडतो. इतर पक्ष तर प्रसारमाध्यमाच्या खिजगणतीतही दिसत नाहीत.

अकोल्याचीच गोष्ट घ्या. भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर निवडून येऊ नये म्हणून कॉंग्रेसने मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरविला. जेणेकरून मुस्लीम मते प्रकाश आंबेडकरांना पडू नयेत व पर्यायाने भाजपचे संजय धोत्रे नेहमीप्रमाणे याहीवेळेस सहज निवडून यावेत, हा त्यामागे दृष्टीकोन दिसतो, अशी लोकांची भावना झाली आहे. अशीच तडजोड भाजप आणि कॉंग्रेस यांनी तिसरया पक्षाचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून इतर मतदारसंघात केली नसेल काय?

हा अभद्र प्रकार स्वत:ला आंबेडकरवादी समजणारे रामविलास पासवान, उदित राज व रामदास आठवले यांच्या लक्षात का येत नाही, तेच कळत नाही. कारण त्यांनीही मोदी सरकार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. मोदी सरकार आले की मी मंत्री होणार असे एकाने तर जाहीरच करून टाकले. मागे खासदार असतांना सोनिया गांधीकडे मागणी करून सुध्दा त्यांना मंत्री बनविले नाही, म्हणून नाराज झाले होते. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्रिपद मिळण्यासाठी आंदोलन पण केले. तरीही काही उपयोग झाला नाही. आताही तसेच होणार नाही कशावरून? इतिहासात ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’ म्हणून या लोकांची नोंद झाली तर नवल वाटणार नाही. एवढे मात्र खरे!

जर्मनीचा हुकुमशहा हिटलर पण निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर आला होता. सारी सत्ता त्याच्या हातात एकवटल्यानंतर त्यांनी ज्यू लोकांचे शिरकाण केले, हा ताजा इतिहास आहे. मोदीने भाजप पक्ष काबीज केला. आता देश काबीज करायला लागला, असे त्यांचे विरोधक म्हणत आहेत. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हुकुमशहा निर्माण करण्यासाठी पद्धतशीरपणे पावले उचलत आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. हुकुमशहाच्या माध्यमातून त्यांना भारताला हिंदुस्थान बनवायचे आहे. त्यांनी जाहीरनाम्यात राम मंदिर उभारण्याचे जे आश्वासन दिले, त्यावरूनच त्यांचे मनसुबे लक्षात येत आहे.

शरद पवार म्हणतात, ‘हल्ली टी.व्ही.वर मोदिचाच गवगवा केला जातो. भाजप व्यक्तीकेंद्रित पक्ष झाला आहे. जेव्हा एका व्यक्तीच्या हाती संपूर्ण सत्ता जाते, तेव्हा ती व्यक्ती भ्रष्ट होते. यामधूनच हुकुमशहा जन्माला येतो. ही बाब देशाच्या सार्वभौमत्वाला मारक आहे.’ हे त्यांचे म्हणणे खरंच वाटते. म्हणून मोदीमुळे संसदीय लोकशाही धोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

बहुजन समाज पार्टीने अकोला सोडून द्यावं

4 Dec

नुकत्याच अकोला जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एँड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाने जिल्हा परिषदेत एकूण ५३ जागांपैकी २३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून परत उदयास आला आहे. मागच्या वेळेपेक्षा यावर्षी चांगली कामगिरी करून ४ जागांची अधिक भर पाडली आहे. ७ पैकी ५ पंचायत समित्यामध्ये पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. गेल्या २० वर्षांपासून पक्षाने या जिल्ह्यात दबदबा निर्माण केला आहे. मग ती लोकसभेची असो की विधानसभेची की स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक असो. अकोला महानगरपालिकेत सुध्दा या पक्षाची सत्ता आहे. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांच्या येथील कारकिर्दीला ‘अकोला पॅटर्न’ संबोधिल्या जाते.

या निकालानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाला ४ जागांची आवश्यकता आहे. निवडून आलेल्या चौघा अपक्षांचा निर्णय सत्तास्थापनेसाठी निर्णायक ठरणार आहे. सत्तास्थापनेसाठी सर्वाधिक संख्येचा पक्ष म्हणून भारिप-बहुजन महासंघ पुढाकार घेईल. परंतु अपक्षासहित भाजप-शिवसेना युती, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे सारे विरोधी पक्ष एकत्र आलेत तर भारिप-बहुजन महासंघाला रोखू शकतात. नाहीतरी या निवडणुकीत या विरोधी पक्षांनी गुप्त समझोता करून भारिप-बहुजन महासंघाला रोखण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे. आपल्याच पायावर दगड मारून घेणारे आर.पी.आय-आठवले या गटाचा भाजप-शिवसेना युतीला महायुतीतील पक्ष म्हणून पाठींबा होता. पण त्यांच्या पक्षाचा मागमूसही या निवडणुकीत दिसून आला नाही.

बहुजन समाज पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाने विजयाचे जे दावे केले होते, ते सारे फोल ठरले आहेत. आता म्हणतात की, आम्ही इतक्या जागांवर दुसर्‍या  क्रमांकावर आहोत. प्रकाश आंबेडकरांचे आमच्यामुळे इतके उमेदवार पडलेत. यातच ते खुश दिसतात. प्रत्यक्ष आकडेवारी पाहिली तर असं काही दिसून येत नाही. म्हणजे त्यांचं अस्तित्व नगण्य असल्याचे दिसते.

खरं म्हणजे बहुजन समाज पार्टीने प्रकाश आंबेडकरसाठी अकोला सोडायला काही हरकत नाही. माननीय कांशीराम जर हयात असते तर कदाचित त्यांनी असेच केले असते. कारण त्यांनी एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक प्रकाश आंबेडकरसाठी सोडली होती, हे एक उदाहरण बोलकं  आहे. आताही त्यांनी तसेच केले असते, यात शंका नाही. त्यांनी कधी आंबेडकरवादी पक्षांच्या संदर्भात द्वेषाचं व वैरत्वाचं राजकारण केल्याचं आठवत नाही. पण आताची बहुजन समाज पार्टीची वेगळीच भूमिका दिसत आहे. कधी म्हणतात कॉंग्रेसला वाढविण्यासाठी प्रकाश आंबेडकरला पुढे आणतात तर कधी म्हणतात भाजपला पुढे आणण्यासाठी प्रकाश आंबेडकरला पुढे करतात. त्यांना काय म्हणायचं तेच कळत नाही. त्यांनी अकोल्यातील कार्यकर्ते, नेते, पैसा, श्रम, वेळ, बुद्धीची ताकद राज्यात दुसरीकडे वळवावी. एकमेकांच्या विरोधात दंड ठोकून एकमेकांचे डोके फोडण्यापेक्षा निदान अकोला जिल्हा प्रकाश आंबेडकरांना सार्‍या आंबेडकरवादी पक्षांनी व गटांनी दान करून टाकावे. कारण अकोल्यात  प्रकाश आंबेडकर यांचीच ताकद आहे, हे आता पुन्हा एकदा निर्विवाद सिद्ध झाले आहे.

हिंदुत्ववादी पक्ष भाजप व शिवसेना, गांधीवादी पक्ष कॉग्रेस व राष्टवादी कॉंग्रेस, साम्यवादी पक्ष भाकप व माकप एकमेकांशी युती करून ताकद निर्माण करून निवडून येतात. एकतर सत्तेत राहतात किंवा विरोधी पक्ष म्हणून वावरत असतात. पण ‘राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे.’ असे बाबासाहेबांचे वाक्य वारंवार लोकांना सांगणारा बहुजन समाज पार्टी हा पक्ष सर्व आंबेडकरवादी पक्षांना सोबत घेऊन सत्तेची शिडी चढतांना मात्र दिसत नाही. याचे विषन्न वाटते. 

सद्यस्थितीत भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेनुसार बहुजनांना शासनकर्ती जमात बनविणे व  भारत बौद्धमय करणे हे ध्येय जर साध्य करायचे असेल तर महाराष्ट्रात तरी आंबेडकरवादी सर्व गटांना/पक्षांना  एका ठिकाणी आणणे आवश्यक आहे. जे रिपब्लिकन पक्षाचे गटं कॉंग्रेस, राष्ट्रवादी-कॉंग्रेसशी, शिवसेना, भाजपशी युती करू शकतात, ते बहुजन समाज पार्टीशी का करू शकत नाहीत; हे न समजण्यासारखं कोडं आहे. द्वेषाला व अहंकाराला बाजूला ठेवून आंबेडकरवादी गटांनी, पक्षांनी तसा एकदा प्रयोग तरी करून पाहावा. असं जर झालं तर आंबेडकरवादी जनतेत  उत्साह व आनंद निर्माण होवून या पक्षांना शिखरावर नेवून पोहचवायला वेळ लागणार नाही.

एवढ्यावरच थांबता येणार नाही तर आंबेडकरवादी पक्षांनी आपले नैसर्गिक मित्र पक्के केले पाहिजे. अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त जाती, ओबीसी, बौध्द, मुस्लीम, शीख, ख्रिचन हा वर्ग निश्चितच नैसर्गिक मित्र आहेत. त्यांच्या संघटना आणि त्यांचे पक्ष यांना जवळ करून  समान कार्यक्रमाच्या आधारावर सामंजस्य निर्माण करावे.

असेच धोरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा असल्याचा उल्लेख य.दी.फडके यांनी लिहिलेल्या ‘डॉ.आबेडकरांचे मारेकरी अरुण शौरी’ या पुस्तकात आला आहे. त्यात लिहिले की, ‘१९५२ च्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीसाठी शेड्युल्ड कास्ट फेडेरेशनतर्फे बाबासाहेबांनी जो जाहीरनामा प्रसिध्द केला, त्यामध्ये दलित, आदिवासी व अन्य मागासवर्गीय यांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी देशातील दारिद्र्य व निरक्षरता यांचे निर्मूलन होण्याची आवश्यकता स्पष्ट केली होती. या निवडणुकीत शेड्युल्ड कास्ट फेडेरेशनचा कॉंग्रेस, हिंदूसभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इत्यादिंना तीव्र विरोध असला तरी आचार्य कृपलानीचा कृषक मजदूर पक्ष, समाजवादी पक्ष, तामिळनाडूतील जस्टीस पार्टी इत्यादी पक्षांनी आघाडी स्थापन केल्यास त्यांना सामील होण्याची शेड्युल्ड कास्ट फेडेरेशनची तयारी होती. या निवडणुकीसाठी शेड्युल्ड कास्ट फेडेरेशनने मुंबई प्रांतात समाजवादी पक्ष व काही जागांसाठी शेतकरी कामगार पक्षाशी सुध्दा युती केली होती.’

आपल्याला माहितच आहे की, आंबेडकरी पक्ष अनेक गटात विभागल्याने त्यांची ताकद विखुरल्या गेली. पुणे कराराने निर्माण झालेल्या चमचा युगाने वारंवार निवडणुका लढवूनही आंबेडकरी  विचाराच्या रिपब्लिकन पार्टीला किंवा बहुजन समाज पार्टीला महाराष्ट्रात यश मिळून राहिलं नाही. या चळवळीच्या माध्यमातून कोणीही निवडून येऊ शकत नाही की आमदार/खासदार बनू शकत नाही, अशी धारणा होत असल्याने हे पक्ष, गट विश्वास गमावून बसले आहेत. म्हणून बहुजन समाज पार्टी व भारिप-बहुजन महासंघ सोडला तर इतर काही गट गांधीवादी कोंग्रेसला शरण जातात. ज्या कॉंग्रेसला बाबासाहेब जळते घर आणि त्यात जावून आपला विकास होणार नाही, असे म्हणत. त्याच घराचा आश्रय घेतात. भाजप व शिवसेनेसारख्या धर्माध शक्तीला दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजयी करा, असे म्हणणारे आठवले गट आमदार/खासदार/मंत्रीपदाचा मलिंदा चाखायला मिळत नाही, म्हणून नाक घासत भाजप व शिवसेनेच्या तंबूत शिरतात. हा गट आंबेडकरी तत्व व स्वाभिमान विसरून त्यांच्या ओंजळीने पाणी प्यायला मजबूर होतात. हे चित्र काही अभिमानस्पद नाही. त्यामुळे ह्या चळवळीला लाचारीपणाची झाक येऊन मरगळल्या सारखी अवस्था झाली आहे. ही गोष्ट नाकारत येणार नाही.

कोणत्याही चळवळीचे मोजमाप हे त्या चळवळीच्या राजकीय यशापयशाच्या  आलेखावरून ठरविली जाते. गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि साम्यवादी विचार घेऊन त्यांचे पक्ष निवडणूका  लढवून जिंकतात; तेव्हा तो विचार दृढ होत आहे, असे समजले जाते. म्हणून जेव्हा हे आंबेडकरी पक्ष एकत्र येवून निवडणुकीत यश मिळवतील; तेव्हा फुले-आंबेडकरी विचारधारा वाढत आहे, असे संकेत मिळायला लागतील. उत्तरप्रदेशात बहुजन समाज पार्टी सत्तेवर आली; तेव्हा एकवेळ तसेच  वाटायला लागले होते.

      महाराष्ट्रात  प्रत्येक गटा/पक्षाचे काहीना काही ठिकाणी पॉकेट्‌स निर्माण झालेले आहेत. जसे बहुजन समाज पार्टीचे नागपूर, गडचिरोली व अमरावती, प्रकाश आंबेडकर यांचे अकोला व नांदेड,  जोगेंद्र कवाडे यांचे नागपूर, रा.सु.गवई यांचे अमरावती, गंगाधर गाडे यांचे औरंगाबाद, तर रामदास आठवले यांचे पुणे-मुंबई या परिसरात कार्य आहे. हे सारे आंबेडकरी विचारांचे गट/पक्ष  एकत्र आलेत तर महाराष्ट्रात काही ठिकाणी आमदार, खासदार नक्कीच निवडून येऊ शकतात. १९५२, १९५७ च्या निवडणुकीत शेडयुल्ड कास्ट फेडरेशन व रिपब्लिकन पार्टीचे आमदार, खासदार निवडून आले होते.

      जो लहानपण घेतो तोच भविष्यात मोठा होतो. म्हणून बहुजन समाज पार्टीने तरी लहानपण घेऊन समविचारी-परिवर्तनवादी पक्षाकडे, गटाकडे, संघटनेकडे जावून सामायिक मोट बांधावी असे वाटते.

      सध्या मनुवादी व्यवस्थेने राष्ट्रीय स्तरावर मतदारांसमोर दोनच पर्याय उपलब्ध करून ठेवले आहेत. एक कॉग्रेस प्रणीत यूपीए व  दुसरा भाजप प्रणीत एनडीए. मतदार कॉग्रेसला विटलेत की भाजपाला सत्तेवर आणतात. भाजपला विटलेत की कॉग्रेसला सत्तेवर आणतात. म्हणजे आलटूनपालटून दोघेही वर्षोनुवर्षे सत्ता उपभोगत राहतील, अशी त्यांनी व्यवस्था करून ठेवली आहे. याशिवाय त्यांच्या समोर सशक्त असा तिसरा पर्याय दिसत नाही. हीच खेळी आता आंबेडकरवादी पक्षांनी खेळली पाहिजे. म्हणून राष्ट्रीय स्तरावर समविचारी पक्षांना, गटांना एकत्र करून सशक्त असा ‘परिवर्तनशील मोर्चा’ बनविण्यासाठी आंबेडकरवादी पक्षांनी निदान बहुजन समाज पार्टीने तरी पुढाकार घ्यावा आणि या माध्यमातून सत्तेची चाबी हस्तगत करावी असे वाटते.

गोजिरवाणा चेहरा तेजोहीन झाला…!

20 Nov

      कार ड्रायव्हिंग करीत असतांना संघूने सिद्धांतला स्टेअरिगला लागून मांडीवर बसविले होते. त्याला मधून मधून चूप करण्याचा तो प्रयत्न करीत होता. संघशीलला आम्ही लहानपणापासून ‘संघू’ म्हणत होतो. तो आमचा मधला मुलगा.

      सिद्धांतचा ’ऊऽऽ ऊऽ” असा रड अजुनही चालूच होता.

      ‘सिद, अरे ती बघ अनन्या…’ गाडीला जसं जोरात ब्रेक लावल्यावर गाडी जाग्यावर थांबते; तसा सिद्धांतचा रड एकाएकी थांबला.

      अनन्या सिद्धांतच्याच वयाची. ती संघूच्या मित्राची मुलगी. दोघेही आधी त्रिवेंद्रमला एकाच हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजीस्ट होते. तेव्हापासून दोन्ही कुटुंबाचे एकमेकाच्या घरी जाणेयेणे सुरु होते. संघू दोन महिने झाले, आता तो पुण्याला आला.

      अनन्याला बोलता येत होतं. सिद्धांत मात्र अजूनही बोलत नव्हता. मुलांपेक्षा मुली लवकर बोलतात, असे म्हणतात ते खरं आहे.

      ’अनन्या अन् तिचे पप्पा काल आपल्याकडे आले होते न…! तू तिच्यासोबत खेळला होता. तुने तिला खेळणे दाखविले. बाबाने तुम्हाला गार्डनमध्ये नेले. तुम्ही तेथे बॉल खेळलात. पाळण्यात झुलले. घसरगुंडीवर खेळले. हो ना… सिद…’

      सिद्धांत निमुटपणे रड थांबवून भिरभिर पुढे पाहत संघूचे बोलणे ऐकत होता. खरं म्हणजे अनन्या आणि तिचे पप्पा असे कोणीच समोर नव्हते. पण सिद्धांतचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी संघूने मुद्दामच त्याला असे सांगितले. पण संघू बोलायला थांबल्याबरोबर परत त्याचा हळू आवाजात रड पुन्हा सुरु झाला. त्याचा क्षणभर का होईना रड थांबला; हे मला मोलाचे वाटत होते.

      तेवढ्यात  टॅव्हल‍‌‌ ‍‌बस आली.

      ’सिध्दांत रडू नको. आमची बस आली. आम्ही आता गावला जात आहे.’ मी सिद्धांतकडे पाहत म्हणालो. मी बाजूच्याच सीटवर बसलो होतो. सिद्धांतची काहीच प्रतिक्रिया उमटलेली दिसली नाही.

      बस थांबली. मी कारच्या डिकीतून बॅगा काढून बसच्या डिकीत टाकल्या. तो पर्यंत कुसुम बसमध्ये चढली. मी तिच्या मागोमाग चढलो. संघू सिद्धांतला कडेवर घेऊन आमच्याकडे पाहत खाली उभा होता. तो आता रड थांबवून निमूटपणे आमच्या हालचालीकडे पाहत होता. त्याचा नेहमी टवटवीत, खेळकर, निरागस दिसणारा चेहरा आता मलूल झालेला दिसत होता. डोळ्याच्या खाली गोबर्‍या  गालावर अश्रूचे ओघळ थबकलेले दिसत होते.

      दरवाज्यातून मागे फिरून मी सिद्धांतला पाहिले.

      ‘सिद्धांत, बायऽऽ…’ असे म्हणत मी हात हलवला. त्यानेही माझ्याकडे पाहून रडक्या चेहर्‍यानेच हात हलवून बायऽऽ केला. त्याने माझ्या बायला प्रतिसाद दिल्याने माझी हुरहूर कमी झाली. आम्ही  बसमध्ये चढत असल्याचे पाहून त्यालाही आम्ही गावला जात असल्याची चाहूल लागली असावी.

      बस सुरु झाली. सिध्दांत व संघू आता दिसेनासे झाले. मी माझ्या सिटवर येऊन बसलो. स्लिपर गाडी होती ती. खिडकीतून बाहेर पाहिले. गाडी पुढे जात होती. अन् रस्ते, इमारती, दुकानाच्या पाट्या, जाहिराती असे सारेच भराभर मागे पडत होते.

      गाडीच्या वेगाने माझे विचारचक्र फिरू लागले. मला कमालीचं अस्वस्थ वाटत होतं. अपराधीपणाच्या भावनेने माझे मन गलबलून गेले होते. सिद्धांतचा रडवलेला चेहरा सारखा माझ्या नजरेसमोर येत होता. मीच त्याला कारणीभूत झालो होतो. त्यामूळे मला सारखी चुटपूट लागली होती.

      मी खिशातला मोबाईल हातात घेऊन संघूला रिंग केला.

      ’संघू. पोहचला का रे….?’

      ’हो… पप्पा. पोहचलो.’

      ’सिध्दांत कसा आहे रे…? अजूनही रडत आहे का ?’

      ’नाही… पप्पा. आता शांत झाला. पण बोटाला हात लावू देत नाही. हात लावले की रडतो.’

      ’बोटाला काही लावले की नाही…?’

      ’हो… हळद आणि तेल लावले.’

      ’उद्या वाटल्यास फ़्रॅक्चर आहे का ते तपासून घे.’

      ’हो… पप्पा. काही काळजी करु नका. तुम्ही जास्त फील करु नका. जे झालं ते झालं… व्यवस्थीत जा. हॅपी जर्नी….’ असे म्हणून त्याने फोन बंद केला.

      एक महिन्यापूर्वी आम्ही मुलाकडे आलो होतो.

      येण्याच्या आदल्या दिवशी संघूने सकाळी फोन करुन नुतनला बाळंतपणासाठी दवाखान्यात भरती केल्याचे सांगितले. नंतर एखाद्या तासाने बाळ झाल्याचे सांगितले.

      रात्रीची टॅव्हल बस होती. मी तिकीट काढून आणली. आम्ही भराभर घ्ररातले सारे कामे आवराआवर करायला लागलो.

      घर सोडून बाहेर जायचे म्हणजे घराला कुलूप लावूनच जावे लागत असे. पहिल्यांदा झाडाची व्यवस्था लावावी लागत असे. मग सर्व झाडांच्या कुंड्या एकत्र करणे, त्यांच्या खाली प्लेट ठेवणे, घराच्या बाहेर पडेपर्यंत त्यात पाणी टाकत राहणे इत्यादी सारी कामे करण्यात कुसुम मग्न होवून जात होती. एवढी लगबग पाहून झाडं पण समजून जात असतील की घरवाले आता बाहेर जाणार आहेत म्हणून !

      कुसुमचा जीव झाडात फारच गुंतलेला असायचा. झाडांना ती लेकरासारखे जपत होती. झाडांना सोडून जाण्यापूर्वी ती सारखी झाडाच्या आजूबाजूला रेंगाळत राहायची. त्यांना पाणी टाकत राहायची.

      त्यामुळे झाडांना सोडून जातांना आम्हाला फारच वाईट वाटत होते. कारण आम्ही कधी परत येऊ त्याचा काही नेम नव्हता. तोपर्यंत यातील किती जगतील आणि किती मरतील याची मनात धाकधूक राहायची. घरी आल्यावर त्यातील जीवट झाडं सोडले तर बाकी मेलेले दिसले की सारखी हळहळ वाटत राहायची. मग कुसुम परत झाडं विकत किवा कुठूनतरी आणायची व रिकाम्या झालेल्या  कुंडीत लावून गॅलरीतील परसबाग पुन्हा पुन्हा फुलवीत राहायची.  

      घरी आम्ही दोघेच राहत होतो. तीघेहे मुले बाहेर राहत होते. हा पुण्याला, प्रज्ञाशील लुधियानाला तर करुणा ठाण्याला.

      मुलं मोठे झाले, अर्थाजनाला लागले; अन् पाखरासारखे कधी भूर्रकन उडून गेले ते कळलंच नाही. आम्ही मग मुलांची, नातवंडाची आठवण अनावर झाली किवा मुलांनी आग्रह केला की अधूनमधून त्यांचेकडे महिना-दीड महिना राहून येत होतो.

      सुरुवातीचे काही दिवस मुलांकडे असेच भुर्रकन निघून जात. आता नातवंडे झाल्याने  त्यांचेशी खेळण्यात थोडेफार दिवसं निघून जात होते, म्हणा !  पण  जास्त दिवस झाले की कुसुमची चला ना गावला… अशी  भुणभुण सुरु व्हायची. खरं म्हणजे आपलं घर सोडून दुसरीकडे तिला जास्त दिवस करमत नसे. आपल्याच घरी करमते अशी म्हणायची. मग आम्ही मार्केट किवा आणखी कुठेतरी फिरायला जावून मन रिझवत होतो. एखाद्यावेळी मुलं पण वेळ असला की कुठेतरी फिरायला नेत.

      मुलांकडे जायचे म्हणजे त्यांच्यासाठी नव्हाळीच्या वस्तू घेऊन जाण्यात मोठी हौस वाटायची. त्यात ज्वारी-बाजरीचे पीठ, बेसन, तिखट, लोणचे, तूप, शेवया, वड्या, झिंगे अशा काहीबाही वस्तू घेऊन जात होतो.

      घराला कुलूप लावण्यापूर्वी खिडक्या-दरवाजे लावणे, गॅससिलेंडर, नळाचे कॉक, इलेक्ट्रिक स्विचेस बंद करणे, कॉम्पुटर व टी.व्ही.चे वायरी काढून ठेवणे, मोबाईल, चार्जर, ओषधी, तिकीटा, जेवणाचा डब्बा, पाण्याचे बॉटल्स, किल्ल्या व मुलांना द्यायच्या नव्हाळीच्या वस्तू घेतल्या की नाही, बॅगेत सारे सामान भरले की नाही; म्हणून एकमेकांची विचारपूस करणे, असं घरातून निघेपर्यंत सुरु राहायचे.  

      मी नेहमीप्रमाणे ऑटो आणला. ऑटोवाल्याला बाहेर बिल्डिंगच्या खाली थांबायला सांगून घरात गेलो. बॅगा बाहेर आणून दरवाज्याला कुलूप लावले. त्याचबरोबर कुसुम पुढे सरसावून कुलूपाला ओढून पाहायला लागली. ती नेहमी मी दरवाज्याला कुलूप लावले की त्याची हमखास तपासणी करीत असते. आताही तिने तसेच केले. मी ऑफीसला असतांना ऑडिटचे कामे करीत होतो. त्यावेळी मी पण असेच तपासणीचे कामे करीत होतो.

      सकाळी आम्ही पुण्याला संघूकडे पोहचलो. सिद्धांत घरीच होता. सिद्धांत आता सव्वादोन वर्षाचा झाला. त्याला मी ‘सिद्धांतभाऊ’ म्हणत होतो. मी माझ्या सार्‍या नातुंना भाऊच म्हणत असतो.

      त्याला म्हटले, ‘सिद्धांतभाऊ, ओळखतो का मला?’ असे म्हटल्यावर तो माझ्या जवळ आला. मी त्याला उचलून कडेवर घेतले. त्याचा पापा घेतला. तसा तो बापाच्या फार अंगावरचा ! कुणाच्या जवळ सहजासहजी जाणार नाही.

      आम्ही त्रिवेदमला गेलो होतो. तेव्हा तो सुरुवातीला आमच्या जवळ येतच नव्हता. त्याला आवाज दिला की, तो आमच्याकडे न पाहता गचकन मान दुसरीकडे वळवून फिरवायचा. नंतर तो आमच्यासोबत इतका रुळला की आमच्याशिवाय राहत नव्हता.

      त्याला आम्ही अपार्टमेंटमधील खालच्या मोकळ्या ठिकाणी फिरायला नेत होतो. त्याचेसोबत बॉल व इतर खेळणे खेळत होतो. त्यामुळे तो आमच्याही अंगावरचा झाला होता. त्याला इलेक्ट्रिक स्वीचेच बंद-चालू करायला फार मजा वाटत होती. बटन दाबल्यावर लाईट लागला की ‘आईट’ म्हणायचा. त्याला लाईटचा उच्चार येत नव्हता. म्हणून तो आईट म्हणायचा.

      एकदा आम्ही गावाला असतांना संघू माझ्यासोबत मोबाईलवर बोलत होता. तेव्हा त्याने मोबाईल सिद्धांतच्या कानाला लावला. मी त्याला आईट कुठे आहे रे… म्हणून  विचारले. तेव्हा तो खोलीत जावून बेडवर चढून लाईटचे बटन चालू-बंद करीत ‘आईट, आईट’ असे म्हणत असल्याचे मला संघू सांगत होता; अशी त्याची गंमत ऐकून आम्ही खूप हसत होतो.

      दुसरा त्याचा छंद म्हणजे संघू कार चालवितांना थांबला की कारचे स्टेअरिंग फिरविण्यासाठी पटकन संघूजवळ जायचा.

      आम्ही त्याला सायकल घेऊन दिली होती. ती व दुसरी एक स्टॉलर यांना उलटी करायला खुणवायचा. तो मग माझ्या मांडीवर बसून चाकं फिरवीत राहायचा. ह्या दोन्हीही गाड्या त्याला सरळ दिसल्या, की आमच्यावर त्याच्या भाषेत रागवायचा.

      आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे त्याला जेवण भरवीतांना नूतन त्याचे जवळ टॅबलेट द्यायची. टॅबलेट म्हणजे कॉम्पुटरचा छोटा अविष्कार. तो मग त्याला सुरु करून बोटाच्या स्पर्शाने व्हिडीओ, गेम, गाणे असं काहीतरी लावून पाहत राहायचा. त्याला जे पाहिजे ते बदलवीत राहायचा. जेवण होईपर्यंत त्याचा हा कार्यक्रम सुरु राहायचा. या वयात त्याला टॅबलेट सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळता येणे म्हणजे नवलच वाटत होते. विशेष म्हणजे चालू करण्यापासून ते बंद करण्यापर्यंतच्या सार्‍या क्रिया त्याला येत होत्या. मग त्याचे कौतुक केल्याशिवाय आम्हाला राहवत नसे. यावरून आजची पिढी फारच पुढे जात असल्याचे चित्र आमच्या डोळ्यासमोर दिसत होते. 

      आम्ही पोहचलो; त्या दिवशी मला अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या  बगीच्यात सिद्धांत घेऊन गेला. तेथील घसरगुंडीवर मनमुरादपणे खेळला. मग मी रोजच त्याला येथे आणून खेळवत होतो. खूप पळायचा. त्याची पळण्याची स्टाईल पण वेगळीच ! खांदे उडवत पळायचा.

      तो मला जीममध्ये घेऊन गेला. तो संघुसोबत जिममध्ये जात असल्याने त्याला माहित होते. त्याला ‘जीम’ असा शब्द उच्चारता येत नव्हते तर त्याऐवजी तो ‘जी’ म्हणायचा.

      त्याने मला बॅगमध्ये ठेवलेले, त्याचे खेळणे दाखविले. मग रोजच मला घेऊन बसायचा. त्याचे खेळणे हाताळून झाल्याशिवाय मला तेथून उठू देत नव्हता.

      संघूला रोज रात्री एक-दीड वाजेपर्यंत झोपू देत नव्हता. मोठा मस्ती करायचा. जेवण झाल्यांनंतर झोपेपर्यंत दोघेही बाप-लेक खेळत राहायचे.

      एखादी घटना घडली की तो खाणाखुणा व हावभाव करून सांगण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला आम्हाला त्याची ही अबोल भाषा कळत नव्हती. मम्मा, पप्पा शिवाय त्याला दुसरं काही बोलता येत नव्हतं. संघू व नूतनला तो काय सांगतो ते कळायच.

      एकदा त्याचा हात बाळाच्या डोक्याला लागला तेव्हा तो प्रसंग खाणाखुणा व हावभाव करून सांगत होता. अशा त्याच्या गमतीजमतीत आम्हीही समरस होऊन जात होतो.

      संघूचा दुसरा छोटा बाळ मस्त गुटगुटीत आणि मोठा शांत. टुकुरटुकुर पाहत राहायचा. त्याला भूक लागली की ‘ऑऽऽ ऑऽऽ‘ करून मधुर आवाजात रडायचा.

      आम्हाला एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला जायचे असल्याने आम्ही गावला  यायला निघालो.

      बॅगा घेऊन लिफ्टने खाली कारजवळ आलो. सोबत सिद्धांत पण होता. येतांना त्याने नूतनला बाय केला. हसत-खेळत, उड्या मारत तो कारजवळ आला.

      बॅगा संघूने डिकीत ठेवल्या. कुसुम दरवाजा उघडून मागच्या सीटवर बसली. संघू ड्रायव्हर सीटवर बसला. मी सिद्धांतला घेऊन त्याच्या बाजूच्या सीटवर बसणार होतो. माझ्याजवळ एक थैली होती. ती पाठीमागच्या सीटवर ठेवण्यासाठी मी दरवाजा उघडला व परत बंद करायला लागलो. तेव्हा सिद्धांत एकदम जोरात किंचाळला. त्याची किंकाळी ऐकून माझ्या मनात चर्र झालं. त्याचे बोट पहिल्या आणि दुसर्‍या दरवाज्याच्या मध्ये चेंदला असल्याचे माझ्या लक्षात आले.

      त्याच्या ओरडण्याने मी घाबरलो. संघू ताबडतोब कारच्या बाहेर पडून सिद्धांतला उचलून घेतले. काय झाले म्हणून मला विचारले. मी त्याचे बोट चेपल्याचे सांगितले.

      ‘पप्पा, जरा पाहून दरवाजा लावत जा… त्याचे बोट जर फ्रॅक्चर झाले असेल

तर… ?’ संघू काळजीच्या सुरात मला म्हणाला.

      त्याचे हे बोलणे ऐकून मी खजील झालो. पोराच्या यातना पाहून बापाची तडफड होणं साहजिकच आहे.

      ‘हो…रे… संघू… त्याने दरवाज्याच्या फटीत बोट टाकले असेल हे माझ्या लक्षातच आले नाही. तिथे अंधार होता. मला काही दिसलेच नाही. फार मोठी चूक झाली माझ्याकडून… चांगला हसत-खेळत असलेल्या लहानशा जिवाला माझ्यामुळे दुखापत झाली. गावला जाता जाता असे घडले. फारच वाईट वाटते.’

      ‘कुठे बोट चेपलं. दाखवा बरं.’ संघू म्हणाला.

      आम्ही कारच्या दरवाज्याच्या बाजूने आलो. पहिला दरवाजा लाऊनच होता. मागचा दरवाजा उघडा होता. दोन्ही दरवाज्याच्या मध्ये फट निर्माण झालेली होती. नेमके त्याचवेळेस सिद्धांतने त्यात बोट घातले असावे. जेव्हा मी दरवाजा लावायला गेलो; तेव्हा चेपले असावे. मी त्या फटीत बोट टाकून दरवाजा लावून पाहिला; तेव्हा बोटाच्या शेवटच्या टोकावर दाब पडून घसरून बाहेर आला. सिद्धांतच्या कोवळ्या बोटावर असाच दाब पडून चिंबला असावा.  

      बस येण्याची वेळ झाली होती. त्यामुळे आम्हाला लवकर निघणेही गरजेचे होते. इकडे सिद्धांत जीवाच्या आकांताने रडत होता. घळघळा अश्रूचा पूर डोळ्यावाटे बाहेर येऊन त्याच्या कोमल गालावर ओघळत होते.

      ऐरवी लहान मुलाचा रड हा धुक्यासारखा अल्पजीवी असतो. असे म्हणतात की मुलं मोठ्या माणसासारखे आपले दु:ख गोंजारत बसत नाहीत. पण सिद्धांत इतका वेळ रडत आहे; म्हणजे नक्कीच त्याला खूप  यातना होत असाव्यात !

      मी त्याची दयनीय अवस्था पाहून गलबलून गेलो होतो. मला कमालीचे वाईट वाटत होते. जणूकाही माझ्या काळजाचे पाणी होत आहे असे वाटत होते. चांगला हुंदळणारा-हसरा-खेळकर चेहरा एकाएकी रडका झाला…! इतका साजरा गोजिरवाणा दिसणारा चेहरा तेजोहीन झाला…! या अकल्पित प्रसंगाने मला पुरते हलवून सोडले होते.  

      मी स्वत:वरच खूप संतापलो होतो. चिमुकल्या जीवाला दुखापत करण्याला मीच कारणीभूत आहे असे म्हणून नकळत माझा हात कपाळावर जाऊन स्वतःलाच चापटे मारीत होता. मी अपराधी भावनेने अर्धामेला झालो होतो.

      सकाळी घरी पोहोचल्याबरोबर संघूला फोन केला.

      ‘संघू, आम्ही पोहचलो घरी. सिद्धांत कसा आहे ?’

      ‘चांगला आहे, पप्पा. बरं झाले. सुखरूप पोहचलात.’

      थोडं थांबून आणखी पुढे म्हणाला, ‘सिद्धांतला दुखापत होण्याची ही काही पहिली वेळ नाही. यांआधीही कधी माझ्यामुळे तर कधी नूतनमुळे अशा घटना घडल्यात. प्रत्येकवेळी मोठठा रडतो…! त्याचे बोट एकदा बाथरूमच्या दरवाज्यात चेपले होते, गरम इस्त्रीने त्याचा हात भाजला होता. टबमध्ये गरम पाण्याने त्याचे दोन्ही पाय पोळले होते. गार्डनमध्ये पळतांना एका मोठ्या छिद्रावर त्याचा पाय पडल्याने मुडपला होता. अशा ज्या काही गोष्टी घडतात ना… त्याला खरं म्हणजे आपण मोठे माणसंच जबाबदार असतो. म्हणून आपण लहान मुलांच्या बाबतीत फार लक्ष द्यायला पाहिजे, असे मला वाटते.’

      ‘बरोबर आहे. आपल्या निष्काळजीपणामुळेच मुलांना दुखापत होत असते. काळजी घेतली की काळजी करण्याचा प्रसंग येत नाही.’ असं मी म्हणत मी त्याला दुजोरा दिला.

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

13 Jul

            ‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही !

            हर हाल मे सुरत बदलनी चाहिये !!’

सद्यस्थितीत भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेनुसार बहुजनांना शासनकर्ती जमात बनविणे व  भारत बौद्धमय करणे यासाठी बहुजन समाज पार्टी शिवाय दुसरा पर्यायच नाही. ही गोष्ट कुणालाही  नाकारता येणार नाही. कारण बहुजन समाज पार्टी ही ८५ टक्के बहुजनांची आहे. ज्यात अनुसूचित जाती/जमाती, अन्य मागासवर्गीय, धार्मिक अल्पसंख्यांक (मुस्लीम, बौध्द, जैन, ख्रिश्चन इत्यादी) समाज येतात. ज्यांना १०० पैकी ८५ मते मिळू शकतील, तोच पक्ष सत्तेवर राहू शकतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की, ज्या धर्माला राजाश्रय असेल तोच धर्म वाढत असतो. टिकत असतो. म्हणून हा पक्ष सत्तेवर आल्याशिवाय भारत बौद्धमय होवू शकणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

            भारतातील ८५ टक्के बहुजन समाजाच्या हिताचे तत्वज्ञान घेऊन माननीय कांशीरामजी यांनी फुले-शाहू-आंबेडकरांचा राजकीय वारसा गतीमान केला, ते अविवाहित राहून आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या कल्याणासाठी पणाला लावले. राष्ट्रीय पातळीवर फुले-शाहू-आंबेडकर चळवळ पोहचवण्याचे महान कार्य त्यांनीच  केले. त्यांनी प्रतिज्ञा घेतली की,

            “मी लग्न करणार नाही. मी स्वतःची संपत्ती निर्माण करणार नाही. मी माझ्या घरी जाणार नाही. मी माझे उरलेले संपूर्ण जीवन फुले-आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित करीन.”

            त्यामुळे त्यावेळी आमच्या पिढीतला आमच्यासारखा तरुण व कर्मचारी वर्ग भारावून जावून त्यांच्या ‘कारव्या’त बांधिलकी आणि कर्त्यव्य भावनेने सहज सामील झाला.            

            माननीय कांशीरामजी यांचा उदय होण्यापूर्वी आंबेडकरी पक्ष अनेक गटात विभागल्याने त्यांची ताकद विखुरल्या गेली होती. पुणे कराराने निर्माण केलेल्या चमचा युगाने वारंवार निवडणुका लढवूनही आंबेडकरी विचाराच्या रिपब्लिकन पार्टीला यश मिळत नाही. या चळवळीच्या माध्यमातून आमदार/खासदार बनता येत नाही.  बाबासाहेबांची चळवळ चांगली आहे; पण या चळवळीच्या माध्यमातून कोणीही निवडून येऊ शकत नाही. अशी त्यांची धारणा झाल्याने ते विश्वास गमावून बसले होते. म्हणून खचून जावून आंबेडकरी अनुयायी गांधीवादी कोंग्रेसला शरण गेलेत. ज्या कॉंग्रेसला बाबासाहेब जळते घर आणि  त्यात जावून आपला विकास होणार नाही, असे म्हणत होते. त्याच घराचा आश्रय घेत होते. (एकेकाळी बी.एस.पी.ने उत्तरप्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाचा पाठिंबा घेतला म्हणून शिव्या देत होते, भाजप व शिवसेनेसारख्या धर्माध शक्तीला दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजयी करा, असे म्हणणारे   आर.पी.आय.वाले आमदार/खासदार/मंत्रीपदाचा मलिंदा मिळाला नाही म्हणून आता महाराष्ट्रात नाक घासत हिंदुत्ववादी भाजप व शिवसेनेच्या तंबूत शिरलेत.) हे आर.पी.आय.चे गट स्वाभिमान विसरून दुसऱ्यांच्या  ओंजळीने पाणी प्यायला मजबूर झालेत. त्यामुळे ह्या चळवळीला लाचारीपणाची झाक  येऊन मरगळल्या सारखी अवस्था झाली होती.

            हे पाहून आंबेडकरी विचारधारेवर विश्वास गमावलेल्या लोकांना पर्याय देण्याच्या उद्देशाने मा.कांशीरामजींनी स्वतःची बुद्धी, पैसा, वेळ व श्रम या तत्वावर बामसेफ, डीएसफोर व बी.एस.पी.ची निर्मिती केली.

            बी.एस.पी.च्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करतांना मा.कांशीरामजी म्हणाले होते की, ‘भारतीय घटनेने स्वीकृत केलेले राजकीय समानते सोबतच सामाजिक आणि आर्थिक समानता यावी, अशी आमची इच्छा आहे.’ फुले-आंबेडकर चळवळीला गतिशीलता प्रदान करणे हा त्यांचा  बी.एस.पी. स्थापन करण्यामागचा आणखी एक उद्देश होता.

            बाबासाहेबांची दोन महास्वप्ने अपुरी राहिली. एक शासन सत्ता हस्तगत करणे व दुसरी भारत बौद्धमय करणे. या महास्वप्नाच्या पूर्ततेसाठी मा.कांशीरामजींनी एक सशक्त मिशनरी टीम उभी केली. या मिशनमध्ये आमच्यासारख्या एका संपूर्ण पिढीने आपले तारुण्य कुर्बान करून या मिशनमध्ये झोकून दिले.

            ‘बाबा तेरा मिशन अधुरा, बी.एस.पी.करेगा पुरा’ अशी घोषणा देऊन बाबासाहेबांच्या स्वप्न पूर्ततेसाठी वाटचाल सुरु झाली. सारा भारत ढवळून निघाला. म्हणून लोकांनी न थकता घोषणा देणे सुरु केले की,

            ‘कांशीराम तेरी नेक कमाई, तूने सोती कौम जगाई !’

            देशातील  बुद्धिवादी वर्ग त्यांच्या भूमिकेमुळे खडबडून जागा झाला. त्यांनी खडतर ध्येयाच्या पूर्ततेसाठी पैसा, बुद्धी व वेळ ही साधनसामुग्री एकत्र करून फुले-आंबेडकरी मिशनला पुढे नेणारी ६ डिसेंबर १९७३ ला संकल्पित केलेल्या व ६ डिसेंबर १९७८ रोजी जन्माला घातलेल्या बामसेफ या संघटनेत झोकून दिले, या चळवळीच्या पाठीशी सारी शक्ती लावली. जातीच्या आधारावर  तोडलेल्या साडेसहा हजार जातींना जोडून बहुजन समाज निर्माण करण्यासाठी आमची पिढी झपाटून गेली होती. जातीजातीत तोडलेल्या बहुजन समाजाला जागृत करून एका सूत्रात बांधण्याची प्रक्रिया मोठ्या जोमाने सुरु झाली.  काही राज्यात त्याचा परिणाम दिसून आला. सत्तेकडे वाटचाल सुरु झाली. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, काश्मीर, हरियाणा, हिमाचलप्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब इत्यादी राज्यात पक्षाला मान्यता मिळाली. त्यामुळेच बहुजन समाज पार्टीला अगदी अल्पावधीतच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. बाबासाहेबांचा हत्ती चिन्ह ज्या आर.पी.आय.ने गमावला होता, तो परत मिळविला. नंतरच्या काळात निवडणूक आयोगाने सर्व प्राण्यांचे चिन्ह रद्द केले. पण हत्ती या प्राण्याचे चिन्ह बी.एस.पी.ने राखीव केल्याने हे चिन्ह कायम राहिले. बाबासाहेबांची एक फार मोठी आठवण सुरक्षित ठेवली. ही मा. कांशीरामजी व बी.एस.पी.ची फार मोठी उपलब्धी आहे, असेच म्हणावे लागेल. मा.कांशीरामजी आपल्या ध्येयाबाबत सुस्पष्ट होते. बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनविण्याचा एकच ध्यास त्यांनी घेतला होता.

            मा. कांशीरामजींनी संपूर्ण भारत पिंजून काढला. सभा, संमेलन, परिषदा, आंदोलने, कॅडर कॅम्प, सायकल मार्च, रॅली, परिवर्तन रॅली  इत्यादी मार्गाद्वारे बहुजन समाजात जोश आणि उत्साह भरला. त्यांची दूरदृष्टी व शास्त्रशुद्ध पायावर आधारीत नेतृत्वामुळे या चळवळीला भक्कम अशी उभारी मिळाली.

            त्यामुळे ही पार्टी अल्पावधीतच देशात तिसऱ्या क्रमांकावर जावून पोहचली. आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सुध्दा आमदार खासदार निवडून येऊ शकतात. हे मा. कांशीरामजी यांनी सिध्द करून दाखविले. ऐवढेच नव्हे तर मंत्री बणून सरकार सुध्दा चालवू शकतात. हे उत्तरप्रदेशच्या उदाहरणाने सिध्द करून दाखविले.

            उत्तरप्रदेशच्या सत्तेसाठी भाजपाचा आधार घेतला;  तेव्हा संधीसाधूपणाची प्रखर टीका होवूनही ते कधी डगमगले नाहीत. उलट ‘हो मी संधीसाधू आहे. केवळ संधीसाधू नाही तर मोठा संधीसाधू आहे. आम्हाला कधी संधीच मिळत नव्हत्या. म्हणून मिळालेल्या संधीचा मी फायदा घेणारच. जर संधी मिळाली नाही तर निर्माण करू.’ असे म्हटल्याने विरोधकाचे कायमचे तोंड बंद झालेत. पुढे ते असेही म्हणत की, ‘जो पर्यंत आमची सत्ता येत नाही तो पर्यंत अस्थिर सरकार राहील. मजबूत सरकार मजबुतीने आमचा गळा घोटतात. म्हणून आम्हाला मजबूत नव्हे तर मजबूर सरकार पाहिजे. त्यामुळे आम्हाला निवडणुकीची वारंवार संधी मिळेल.’

            कोणत्याही चळवळीचे मोजमाप हे त्या चळवळीच्या  राजकीय यशापयशाचे आलेखावरून ठरविल्या जाते. कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस हे गांधीवादी विचार, भाजप-शिवसेना हे  हिंदुत्ववादी विचार तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे साम्यवादी विचार घेऊन निवडणूका  लढवीत असतात. हे पक्ष निवडणूक जिंकतात; तेव्हा तो विचार दृढ होत आहे, असे समजले जाते.  बी.एस.पी.ला जेव्हा निवडणुकीत यश मिळत गेले तेव्हा फुले-आंबेडकरी विचारधारा वाढत आहे असे संकेत मिळायला लागले. याचा अर्थ मा. कांशीरामजी यांनी गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद, हिंदुत्ववाद याच्या पलीकडे जावून आंबेडकरांच्या बहुजनवादाला शिखरावर नेवून ठेवले.

            त्यांना आता बाबासाहेबांच्या दुसऱ्या स्वप्नाची पूर्तता करावयाची होती. त्यांना सम्राट अशोकाचा भारत निर्माण करायचा होता.

            बहीण मायावतीनी ‘संसद भवन – केंद्र की सत्ता का मंदिर’ या पुस्तिकेत लिहिल्याप्रमाणे मा. कांशीरामजींना धर्मांतराच्या सुवर्ण महोत्वसी वर्षात म्हणजे १४ ऑक्टोबर २००६ मध्ये ३ कोटी लोकांना सोबत घेऊन बौद्ध धम्म स्वीकारणार असल्याची घोषणा केली होती. तथापि त्यापूर्वी त्यांनी केंद्राची सत्ता हस्तगत करण्याची पूर्ण योजना आखली होती.

            पण त्यापूर्वीच ते २००३ साली ब्रेन स्टोकने आजारी पडलेत. ९ ऑक्टोबर २००६ रोजी त्यांचे निधन होईपर्यंत ते आजारातून उठलेच नाहीत. त्यामुळे त्यांची धर्मांतराची घोषणा फलद्रूप झाली नाही.

            त्यांच्या आजारपणात व निधनानंतर बहुजन समाज पार्टीची झालेली वाताहात पाहून मनाला वेदना झाल्याशिवाय राहत नाही. हताश, निराश व हतबल मानसिक अस्वस्थेत सापडलेला निष्ठावान अनुयायी पाहून मनात कालवाकालव होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे मनातला उद्वेग बाहेर येऊन या विषयावर लिखाण केल्याशिवाय  मला राहवले नाही.

            अनेक लोकांनी नोकरीत कार्यरत असतांना  ऐन उमेदीच्या काळात बी.एस.पी. संबंधित बामसेफ व पे  बॅक टू सोसायटी प्रोग्रॅम (पि.बी.एस.पी.) या संघटनेत निष्ठेने, प्रामाणिकपणे व समर्पितपणे काम केले आहे. त्यात मी सुध्दा होतो, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. या संघटनेला व बी.एस.पी.ला वेळ, पैसा व बुद्धी देऊन मिशनरी वृतीने काम केल्याबद्दल आम्ही धन्य झालोत. नोकरीच्या कार्यालयीन वेळा सोडल्या तर इतर वेळी किंवा सुट्ट्यांच्या दिवशी किंवा प्रसंगी गरज भासल्यास सुट्ट्या काढून आम्ही या चळवळीचे काम झपाटल्यासारखे तहान-भूक विसरून करीत होतो, हे नमूद करतांना आमचा उर अभिमानाने भरून येत आहे.

      केवळ कर्मचारीच वर्ग या चळवळीत सामील झाला असे नाही तर त्यांचे कुटुंबीय सुध्दा मा. कांशीरामजी यांच्या ‘कारव्या’त सामील झाला. बामसेफ ही संघटना अराजकीय, अधार्मिक व कर्मचाऱ्यांना सरकारी नियमांचे बंधन असल्याने सामील होऊ शकत नसल्याने त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना डी.एस.फोर या संघटनेच्या व नंतर बी.एस.पी.च्या माध्यमातून  या चळवळीत उतरविले. कुटुंबीय सुध्दा निस्वार्थ भावनेने या चळवळीत समर्पित झाले.

            या चळवळीला प्रसंगी प्रॅाव्हिडंट फंड, सोसायटीचे कर्ज काढून पैसा पुरविण्यात आम्हाला त्यावेळी मोठा उत्साह वाटत होता. मी तर माझी बदली कोकणात झाली; तेव्हा तेथे कार्यकर्त्यांचा संच तयार होईपर्यंत दरमहा मनिऑर्डरने पैसे नागपूर येथील बी.एस.पी. कार्यालयाला पाठवित होतो.

            मी दीड महिना सुट्ट्या काढून दिल्ली येथील बी.एस.पी.च्या मुख्य कार्यालयात मा. बावाजी मेश्राम यांच्या आधिपत्याखाली मार्च १९९१ च्या दरम्यान काम केले. आहे.

            म्हणून  मला बहुजन समाज पार्टी बद्दल आज काय वाटत आहे, याबाबत प्रांजळपणे मते मांडण्याचा थोडाफार तरी अधिकार पोहोचतो. म्हणूनच या लिखाणाकडे टीकेच्या दृष्टिकोनातून म्हणजे दाईच्या भावनेने  न पाहता सकारात्मक दृष्टीने म्हणजे आईच्या भावनेने पाहावे, अशी माझी माफक अपेक्षा आहे.

            महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या चळवळीचा रथ मागे जात असल्याचे पाहून माननीय कांशीरामजी उद्विग्न होत. त्यामुळे ते बौद्धांवर तुटून पडत. (ते एखाद्यावेळी उपरोधिकपणे महार असे संबोधित असत.)  परंतु त्यांचा राग हा प्रेममूलक होता. आईच्या रागासारखा !  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुध्दा एकदा म्हणाले होते, “तुमचे मलूल चेहरे पाहून मला वाटते की तुम्ही आईच्या पोटातच का नाही मेले ? कशाला पृथीला भार झालात ?” 

            मा. कांशीरामजी मुंबईच्या भाषणात एकदा म्हणाले होते की,

            ‘भाई कांशीराम, तू महाराष्ट्रमे बारबार क्यू आता है ! क्योकी जिधर-उधर हरियाली दिखेगी तब महाराष्ट्र उजडा हुवा दिखेगा, ये मुझे देखा नही जायेगा ! इस महाराष्टमे फुले पैदा हुये, शाहूजी पैदा हुये और बाबासाहेब डॉक्टर अम्बेडकर पैदा हुये. यहांसे मै सिखके गया हू ! इसीलिये मै बारबार यहांपे आता हुं !’ इतकी आत्मीयता महाराष्ट्राबाबत त्यांना होती. 

            म्हणून माननीय कांशीरामजीचे आवाहन स्वीकारून महाराष्ट्रातील बामसेफच्या व बी.एस.पी.च्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या राज्यातील निवडणुकीसाठी पैसा पाठविला. कार्यकर्ते पाठविले. उपाशीतापाशी राहून त्यांनी काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यात खडकावर पेंटींग केली. जीवावर उदार होवून भाषणे दिलीत. हरियाणा व  उत्तरप्रदेशातील जमीनदाराच्या दहशतीला न घाबरता – 

            ‘जयभीम का नारा गुजेगा, भारत के कोनेकोने मे’ असे म्हणत फिरलेत. उन्हातान्हात सायकल रॅलीत हिरीरीने भाग घेतला.

            ऐवढेच नव्हे तर बामसेफ, बी.एस.पी.चे दिल्लीचे केंद्रीय कार्यालय महाराष्ट्रातील लोकांनी चालविले, दिल्ल्तील बोटक्लबवर वेळोवेळी झालेले आंदोलन यशस्वी करण्याचे काम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी केले. बी.एस.पी.चे धोरण व रणनीती आखण्यात महाराष्ट्रातील लोकांचा महत्वाचा सहभाग होता. बी.एस.पी.ची वैचारीक प्रेरणा असलेले महापुरुष महात्मा ज्योतीराव फुले, राजश्री शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी व कर्मभूमी महाराष्ट्रच आहे. उत्तरप्रदेशात मिळालेल्या सत्तेची पायाभरणी  महाराष्ट्रातील मिशनरी कार्यकर्त्यांनी आपला स्वतःचा पैसा, बुध्दी, श्रम  आणि वेळ देवून केलेली आहे. मा. कांशीरामजींच्या कार्याचा आरंभ महाराष्ट्रापासून सुरु झाला. त्यांनी महाराष्ट्रातूनच सामाजिक आणि राजकीय प्रेरणा घेतली. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या बळावर मा. कांशीरामजींनी ही चळवळ संपूर्ण देशात पसरविली. ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे.

            परंतु त्याच महाराष्ट्रातील मिशनरी कार्यकर्त्यांना व नेत्यांना  मा. कांशीरामजी पासून तोडण्याचे प्रयत्न झाले. त्यांच्या निधनानंतर तर उरल्यासुरल्या नेत्यांना-कार्यकर्त्यांना हलक्याफुलक्या कारणाने काढून टाकण्यात आले. ही सल महाराष्ट्रातील मिशनरी लोकांच्या मनात खोलवर खदखदत आहे.

            मा. कांशीरामजीच्या आजारपणात व त्यांचे निधन झाल्यावर ही मिशन खतम होत असल्याचे शल्य कुर्बानी दिलेल्या त्यावेळेसच्या तरुण व आताच्या वृदत्वाकडे झुकलेल्या पिढीला सारखी बोचत आहे.   

            माननीय कांशीरामजीनी ही चळवळ जाण्यापूर्वी बहीण मायावती यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांच्या कार्यकाळात या पार्टीची महाराष्ट्रात तर पीछेहाट झालीच, शिवाय इतर राज्यात सुध्दा तीच गत होत आहे. अती झाल्यावर निदान मातीतरी होऊ नये, म्हणून या तळमळीने जुने कार्यकर्ते हादरून गेल्याचे जाणवत आहेत.

            ‘बुडती ही जन पहावेना डोळा, म्हणूनी कळवळा येत असे’ या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार मुक्यामुक्याने किंवा उघडपणे कळवळा लोक व्यक्त करीत आहेत. 

            बी.एस.पी.ला घडवितांना महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजातील कर्मचारी-अधिकारी, विद्यार्थी, महिला, प्राध्यापक, वकील, इंजिनिअर, डॉक्टर, अशा विविध क्षेत्रातील लोकांचे  मोठे योगदान मिळाले. पण त्यातील बहुतांशी मिशनरी वर्ग आज या चळवळीपासून अलिप्त झाला आहे. काही स्वस्थ बसलेत, तर काही इतर पक्षाच्या  वळचणीला गेलेत, तर काहींनी वेगळ्या चुली मांडल्यात.  

            सुरुवातीच्या काळात या पक्षाने उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाना, मध्यप्रदेश, काश्मीर, बिहार या राज्यात आपला दबदबा निर्माण केला होता. त्याशिवाय राजस्थान, आंध्र, छत्तीसगढ व दिल्ली  याही राज्यात आमदार निवडून आणण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे उत्तरप्रदेश शिवाय पंजाब व मध्यप्रदेश या राज्यातही सत्तेचा प्रबळ दावेदार म्हणून पक्षाची गणना होत होती.

            उत्तरप्रदेशात सुरुवातीला समाजवादी पक्ष व भाजप यांच्या सहकार्याने सत्ता मिळाली. त्यानंतर २००७ साली बहीण मायावतीच्या नेतृत्वात पक्षाला निर्विवाद सत्ता मिळाली.   लोकसभेचे २१ खासदार व राज्यसभेचे १६ खासदार बनले. त्यामुळे केंद्रीय सरकारवर वचक निर्माण झाला. याचा प्रभाव इतर राज्यात पडून तेथे सुध्दा पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येतील, असे जो-तो स्वप्ने रंगवीत होता. महाराष्ट्रात सुध्दा तसेच घडेल असे वाटत होते. कारण महाराष्ट्रातील जनता रिपब्लिकन पार्टीच्या फाटाफूटीच्या व स्वाभिमानशून्य राजकारणाला कंटाळली होती. त्यामुळेच पक्षाला होणाऱ्या मतदानाची टक्केवारी उत्तरोत्तर वाढत होती. २००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीतही  महाराष्ट्रात ४.८५ टक्के मते मिळाली होती. पण सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र २.३५ टक्क्यावर आली. म्हणजे निम्म्यावर घसरली. याचा अर्थ महाराष्ट्रातील जनतेने बी.एस.पी.ला काही प्रमाणात नाकारले असा होतो. त्यामुळे बी.एस.पी.ची झालेली वाताहत महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला चिंताजनक वाटत आहे.

            असाच प्रकार इतर राज्याच्या निवडणुकीत सुध्दा झाला. एकेकाळी ९ आमदार व ३ खासदार दिलेल्या पंजाबमध्ये आता एकही आमदार व खासदार नाही. मध्यप्रदेशात सुध्दा ११ आमदार व २ खासदार निवडून आले होते. तेथेही बी.एस.पी.चा दबदबा कमी झाला. हरियाणात १ खासदार होता. आता तेथेही काही राहिले  नाही. बिहार मध्ये ५ आमदार होते. आता २०१० साली एकही आमदार नाही. २०१२च्या उत्तरप्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत तर कडेलोट झाला. या राज्यात पण पक्षाचा पराभव होवून विरोधी बाकावर बसण्याची पाळी आली आहे.

            आजच्या घडीला अनेक राज्यात पक्षाची पीछेहाट झालेली दिसते. त्यामुळे लखनौ नंतर दिल्ली काबीज करणे हे पक्षाचे उद्दिष्ट फलद्रूप होईल की नाही, अशी साधार भीती निर्माण झाली आहे. त्या उलट बी.एस.पी.चे कार्यक्षेत्र उत्तरप्रदेशापुरते सिमीत राहून प्रादेशिक पक्ष म्हणून अस्तित्व राहील तर नाही ना अशी पुसटशी शंका आल्याशिवाय राहत नाही.

            राजकारणात पडझड तर होतच असते हे खरे आहे. हवेवर वाहत जाणारे काही पक्षाचे मतदार असतात. पण बी.एस.पी.ही ‘कॅडर बेस’ आणि समर्पित लोकांची संघटना आहे. त्यामुळे बी.एस.पी.ची पडझड ही जीवाला लागून जाते.

            प्रसिध्द साहित्यिक दया पवार, आर.पी.आय.च्या  पडझडीच्या राजकारणाला जबाबदार असणाऱ्या नेतृत्वाबाबत अगदी चखपलपणे भाष्य करून समाजाला पेटून उठायला सांगतांना म्हणतात की,

            ‘प्रखर तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला, ज्या काजव्याचा आम्ही जयजयकार केला, ते केव्हाच निस्तेज झाले. आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा… अन क्रांतीचा जयजयकार करा…!’

असे म्हणण्याची पाळी बी.एस.पी.च्या बाबतीत न येवो म्हणजे झाले!

            असं  का घडत आहे याचे चिंतन आंबेडकरी जनतेत व्हावे, असे आमच्यासारख्या एका लहानशा जुन्या मिशनरी कार्यकर्त्याला चळवळीच्या आत्यंतिक आत्मीयतेपोटी वाटणे साहजिकच आहे. या अधोगतीचे कारणे शोधून नव्या जोमाने, ताकदीने पक्षाच्या कार्याला गती  आली पाहिजे असे सर्वांनाच वाटत आहे.

            माझ्या मते महाराष्ट्राच्या व देशाच्याही दृष्टीने खालील बाबीवर विचार होणे आवश्यक आहे असे वाटते.

१. बुद्धिवादी, विचारवंत, साहित्यिक, तत्वज्ञानी लोकांचे मार्गदर्शन घेणे 

 बाबासाहेबांनी दि. २०.०१.१९४० च्या ‘जनता’ मध्ये लिहिले होते की, ‘गेल्या पिढीतील राजकारणात विद्वतेची जरुरी भासत असे. आजच्या राजकारणात बोटवाती-काडवाती करणारांची जरुरी भासत आहे. विद्वानांची त्यातून खड्यासारखी उचलबांगडी करण्यात येत आहे. आजचे राजकरण हे आंधळ्याच्या माळेच्या हाती गेले आहे. ही अत्यंत अनिष्ट गोष्ट झालेली आहे.’

            काही अपवाद सोडले तर राजकारण म्हणजे ज्यांना रोजगार नाही अशा लोकांचे राजकारण झाले असल्याचे सर्वत्र टीका होत आहे. या लोकांनी राजकारण म्हणजे पोटा-पाण्याचा, कमाईचा धंदा बनविला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विद्वान लोक या राजकारणात पडत नसल्याचे जाणवते. ते राजकारणाच्या, चळवळीच्या व आंदोलनाच्या बाहेर राहत असल्याने बौद्धिक पराभवाचे हे ही एक कारण असेल की काय असे वाटते.

            बुद्धिजिवी वर्गाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर “जातिभेद का उच्छेद” (Annihilation of Caste) या पुस्तकात लिहितात की, “प्रत्येक देशामध्ये बुद्धिजिवी वर्ग प्रभावशाली असतो. जो सल्ला व नेतृत्व देऊ शकतो. देशातील अधिकांश जनता विचारशील व क्रियाशील नसतात. ते बुद्धीजीवी वर्गाचे अनुकरण करून त्या मार्गाने जात असतात. म्हणून त्या देशाचे समाजाचे भविष्य बुद्धिजिवी वर्गावर अवलंबून असते. बुद्धिजिवी वर्ग चांगला किवा वाईट असू शकतात. बुद्धिजिवी वर्ग इमानदार, स्वतंत्र व निष्पक्ष असेल तर समाजाला संकटकाळी मार्ग काढून योग्य मार्गदर्शन करू शकेल. समाजाला सहाय्य करू शकेल. पथभ्रष्ट लोकांना ते चांगल्या मार्गावर आणू शकतात.”

            बाबासाहेब आंबेडकरांचे असेही प्रतिपादन होते की, राजकीय, आर्थिक क्रांतीपुर्वी सामाजिक व वैचारिक क्रांती आवश्यक असते. फ्रेंच राज्यक्रांतीची पूर्वतयारी स्वातंत्र्यवादी विचारवंतांनी केली. शिवाजीच्या राजकीय क्रांतीची पूर्वतयारी भक्ती चळवळीने केली, असे न्या, रानडे म्हणतात. बाबासाहेब त्यास दुजोरा देतात. भारतातील सामाजिक क्रांतीसाठी वैचारीक क्रांतीची गरज आहे असे म्हणतात. ही वैचारीक क्रांती करण्याची जबाबदारी अंतिमतः दलित बुद्धीजीवी वर्गावर येते. त्यादृष्टीने आजच्या दलित बुद्धिजीवींच्या साहित्य, संस्कृती व राजकीय भूमिकांची दखल घेणे आवश्यक आहे. (संदर्भ-आंबेडकरांचे खरे शत्रू कोण? ले.सिद्धार्थ जगदेव)

      एखाद्या पक्षाचा विस्तार कुंठीत होण्याचे एक कारण असे सांगितले जाते की, जो पक्ष त्याच्या कार्यकर्त्यांकडून, जनतेकडून, राजकीय सामिक्षाकडून होणाऱ्या चिकित्सेतून तावून-सुलाखून जात नाही. विधायक टीका-टिपणी, पूर्वग्रहरहीत समीक्षा आणि व्यापक दृष्टीकोनातून झालेली चिकित्सा ही राजकीय पक्षाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरत असते.

            मा. कांशीरामजी एखाद्या ज्वलंत विषयावर ठिकठिकाणी परिषदा घेऊन बौद्धिक चर्चा घडवून आणीत. त्यात शोधनिबंध सादर होत. त्या विषयावर जनमत व जागृती तयार करून आंदोलनाची दिशा ठरवीत. जसे मंडल आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करणे. तसेच भाजपच्या सत्तेच्या काळात भारतीय घटनेचे पुनर्मूल्यांकन करण्याच्या प्रयत्नाला हाणून पाडणे इत्यादी विषयावर त्यांनी परिषदा घेतल्या होत्या.

            ऐवढेच नव्हेतर मा.कांशीरामजी यांनी ‘बामसेफ-एक परिचय या पुस्तिकेत संघटनेच्या यशस्वीतेसाठी ज्या १० अंगाची चर्चा केली त्यात ९ वा अंग महत्वाचे आहे. त्यात ते म्हणतात की, प्रत्येक गोष्टीची वैज्ञानिक आधारावर विश्लेषण झाले पाहिजे. त्यासाठी सर्वेक्षण, परिचर्चा, परिषदा याचे आयोजन होईल. यात बुद्धिमान व समर्पित व्यक्तिंचा समावेश असेल. ते पुढे म्हणतात की, बामसेफ जर आमच्या समाजाचे ‘बुद्धी बँक’ मानले जात असेल तर या ‘परीक्षण स्कंधा’ला बँकेचे डोके असे नाव देणे उपयुक्त होईल.

            चर्चेतून विचाराची बैठक तयार होते. आणि त्या आधारे प्रश्नांचे उत्तरे शोधणे सहज शक्य होते. म्हणून वस्तुनिष्ठ चिकित्सा व कार्याची समीक्षा वेळोवेळी होणे आवश्यक आहे.

            म्हणून मा. कांशीरामजी यांनी मांडलेला ‘परीक्षण स्कंधा’चा  प्रयोग आताही करण्यात यावा असे वाटते. बी.एस.पी.च्या उत्कर्षासाठी काय केले पाहिजे या विषयावर सर्वप्रथम बुद्धिवादी, मिशनरी लोकांच्या परिषदा देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन चर्चा घडवून आणावी व त्यानुसार एक सुनिश्चित कृती धोरण आखून त्या दिशेने पक्षाने वाटचाल करावी असे वाटते. या चर्चेत जे मिशनरी वृत्तीचे लोक पक्षापासून दूर गेलेत, त्यांचाही सहभाग घ्यावा. म्हणजे पक्षाबाबत त्यांच्यात आत्मीयता निर्माण होऊन उदार अंतकरणाने ते पक्षाला परत योगदान देतील. कारण हे लोक जरी सद्यस्थितीत दूर गेले असतील; तरी मा.काशीरामजी यांच्या आणि त्यांनी स्थापन केलेल्या बी.एस.पी. बद्दल ते शरीराने नसेल पण मनाने मात्र अत्यंत संवेदनशील आहेत. त्यामुळे ते निश्चितच परत जुळून पक्षाला उभारी दिल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रक्रियेमुळे पक्षात कृतीशील विचारवंतांची फळी निर्माण होईल.

२. पक्षाचे धोरण आखण्यास सुकाणू समिती असावी.

            पक्षाच्या बाबतीत दि. १३.१०.१९५१ च्या ‘जनता’ मध्ये बाबासाहेब लिहितात, ‘केवळ एखादी संस्था प्रस्थापित करणे म्हणजे तो पक्ष होत नाही: जिथे लोक विशिष्ट तत्वाने कार्य करायला बद्द होतात, त्यालाच पक्ष म्हणतात. विशिष्ट ध्येय असल्याशिवाय पक्ष जगूच शकत नाही आणि लोकही एकत्र येऊ शकत नाहीत. केवळ राजकीय उदात्त ध्येय  असून चालत नाही. त्या ध्येयाचा विजय झाला पाहिजे. ह्या गोष्टी केवळ एकाकी व्यक्तीमत्वाने सफल होत नाहीत. ती सुसंगत पक्षाकडूनच पार पाडली जातात.’ म्हणजेच पक्षाला यशस्वी होण्याकरीता तीन गोष्टीची गरज आहे. १. विशिष्ट तत्व, २. विशिष्ट ध्येय आणि ३. त्या ध्येयाचा विजय किंवा त्या ध्येयानुसार वाटचाल.   

            विचारधारा, सिद्धांत व तत्त्वज्ञानाला  अनुसरून पक्षाचे धोरण असले पाहिजे. त्यानुसार पक्षाची  वाटचाल सुरु असावी अशी अपेक्षा सर्वांनाच असते.

            तथापि अलीकडच्या काळात पक्षाच्या धोरणात  काही झालेला बदल लोकांना खटकले आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’च्या जागी ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ ‘हाथी नही, गणेश है, ब्रम्हा विष्णू महेश है’ अशा घोषणा देणे, आपल्या हयातीत स्वत:चे पुतळे उभारणे, गुजरातमध्ये नरेंद्र मोदीच्या प्रचारासाठी जाणे, आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचे तत्व मान्य करणे, काही जुन्या कार्यकर्त्यांना तडकाफडकी काढून टाकणे, जसे मध्यप्रदेशातील फुलसिंग बरैया, दाउराम रत्नाकर, हरियाणाचे अमनकुमार नागरा, पंजाबचे हरभजन लाखा, कर्नाटकचे बी. गोपाल, महाराष्ट्रातील श्रीकृष्ण उबाळे व त्यांचे साथीदार, ब्रिगेडियर सुधीर सावंत असे कितीतरी  उदाहरणे आहेत.

            ‘बहुजन’ या शब्दा ऐवजी ‘सर्वजन’ या शब्दाचा वापर करणे उचित वाटत नाही. पक्षाच्या नावामध्येच ‘बहुजन’ या शब्दाचा उल्लेख आहे. तो काही बदलता येणार नाही. जातीव्यवस्थेला  सर्व जाती बळी पडल्या नाहीत; तर बहुजन समाजातील ६५०० जातीच बळी पडल्यात. म्हणूनच मनुवाद व मानवतावाद या संबंधातील १५-८५ च्या संघर्षाचे सूत्र निर्माण झाले. त्यानुसारच  पक्षाच्या संघर्षाचा ढाचा तयार झाला आहे, हे कसे विसरता येईल?

            ‘बहुजन’ हा शब्द तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीतून आलेला आहे. अडीच हजार वर्षापूर्वी ‘चरथ भिक्क्वे चारिकंम, बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असा आदेश भगवान बुध्दाने आपल्या भिक्खूगणांना दिला होता. हा भिक्खुगण म्हणजे धम्माचा कार्यकर्ता होता. त्यांनी चारही बाजूने कानाकोपऱ्यात जावून बहुजनाच्या हितासाठी व सुखासाठी धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा, अशी ती शिकवण होती. याच पद्धतीने बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चारही बाजूने जावून बहुजनाच्या कल्याणासाठी कार्य करावे असा महान संदेश आणि आशय त्या शिकवणीत आहे. ‘बहुजन’ या शब्दात फार मोठी शक्ती सामावलेली आहे.  मागास समूहांना आत्मभान निर्माण करणारा असा तो शब्द आहे. हिंदू समाजातील जातीला चिकटलेला तिरस्कृतपणाचा डाग जाऊन त्या ऐवजी ’बहुजन’ असा व्यापक अर्थ मिळाला आहे. त्यामुळे या शब्दाचा अव्हेर करू नये असे वाटते.

तसेच ब्राम्हण वर्गातील गरिबांना आर्थिक आधारावर आरक्षण देणे हे तत्व जर सर्वमान्य केले; तर भारतीय संविधानातील सामाजिक व शैक्षणिक आधार कमजोर होवून बाबासाहेबांनी आखून दिलेली घटनेची चौकट खिळखिळी झाल्याशिवाय राहणार नाही. हा भविष्यकाळातील धोका पक्षाने लक्षात घ्यायला पाहिजे असे वाटते.

सामाजिक व शैक्षणिक आधारावर आरक्षण का देण्यात येते या मागील कारणमीमांसा समजून घेणे आवश्यक आहे. एखादा ब्राम्हण आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास ठरत नाही. त्याउलट एखादा दलित व्यक्ती  आर्थिकदृष्टया श्रीमंत असला तरी तो सामाजिक व शैक्षणिकदृष्टया पुढारलेला समजण्यात येत नाही. भारतात अशी परिस्थिती आणण्यास ब्राम्हणवादी व्यवस्थाच  कारणीभूत आहे. ही गोष्ट कशी विसरता येईल ?

मागासांना या ब्राम्हणवादी व्यवस्थेने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय अशा अनेक आघाड्यावर मानवी हक्क नाकारले होते. अशा हजारो वर्षे वंचित, पिडीत वर्गाला नोकरी, शिक्षण, व्यवसायात संधी प्राप्त करून द्यावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास हा निकष लाऊन आरक्षण देण्याची संविधानात तरतूद केली. म्हणून केवळ आर्थिकदृष्टया दुर्बल म्हणून खुल्या प्रवर्गातील घटकांना आरक्षण देणे समर्थनीय ठरत नाही. ही बाब पक्षाच्या नेतृत्वाने लक्षात घ्यावी असे वाटते. 

म्हणून जनमानसावर प्रभाव पाडणारे आणि बहुजनांचे हित जोपासणारे धोरणे आखण्याकरीता पक्षाचे धोरण अथवा सुकाणू समिती असावी असे वाटते.

            राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात. परंतु ह्या तडजोडी ध्येय, धोरण व तत्वाच्या विरोधात असू नये असे वाटते.

            तसेच पक्ष चालवितांना काही चुका होणे शक्य आहे. ही गोष्ट बाबासाहेबांनी सुध्दा मान्य केली होती. ते म्हणाले होते की, ‘सार्वजनिक जीवनात भूलचूक होत असते. त्यामुळे आपण दु:खी होऊ नये. तर त्यातून आपल्या कमजोरीची ओळख करून त्याचे परिमार्जन करायला पाहिजे.’ म्हणून भविष्यात चुका होऊ नये म्हणून अशा समितीची मदत होईल असे वाटते.

३. जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेणे

            बाबासाहेबांच्या हयातीत आणि त्यानंतर मा.कांशीरामजींच्या  काळात सुध्दा महाराष्ट्रात विदर्भ अग्रेसर होता. विदर्भातून जरी आमदार, खासदार निवडून आलेले नसले, तरी बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये प्रतिनिधी निवडून येण्यास सुरुवात झालेली होती. कधी नव्हे पण २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही, पण एकट्या विदर्भात १० टक्के मतदान घेऊन कॉग्रेस-राष्ट्रवादीचे ११ ही उमेदवार पाडलेत. म्हणजे पाडण्याच्या दुसऱ्या पायरीवर मजल मारून जिंकण्याच्या तिसऱ्या पायरीवर पाय ठेवण्याची सिद्धता पक्षाने केली होती असेच म्हणावे लागेल. पक्षाच्या या घौडदौडीने  महाराष्ट्रातील  कॉग्रेस-राष्ट्रवादीला चागलीच धडकी भरली होती.

     परंतु त्याच विदर्भातील अग्रगण्य कार्यकर्त्यांना पूर्वी आणि नंतर पक्षातून काढून टाकल्याने किवा काहीजन निष्क्रीय झाल्याने पक्षाला त्याची किंमत अद्यापही मोजावी लागत आहे. तरी जे कार्यकर्ते पक्षात परत येऊ इच्छितात त्यांना एकदा तरी संधी देऊन पक्षात सन्मानाने प्रवेश द्यावा. जसे भाजपने काढून टाकलेल्या कल्याणसिंह व उमा भारती यांना परत सामावून घेतले, असेच लवचिक धोरण पक्षाने स्वीकारावे असे वाटते. तसेच राष्ट्रीय स्तरावर दाउराम रत्नाकर छत्तीसगड, फुलसिंग बैरया मध्यप्रदेश, श्रीकृष्ण उबाळे महाराष्ट्र, अमनकुमार नागरा हरियाणा, हरभजन लाखा पंजाब, बी.गोपाल कर्नाटक यांनी   अथक परिश्रम घेऊन बी.एस.पी. वाढविली, फुलवली त्यांना परत सन्मानाने पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करायला काही हरकत नसावी असे वाटते. तसेच त्यांच्या सारखे राज्याराज्यातील ज्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना या ना त्या कारणाने काढून टाकण्यात आले त्यांनाही दुराग्रह, वैमनस्य व हेवेदावे दूर करून पक्षात येण्यासाठी संधी देऊन पाहावी. त्यामुळे पक्षाच्या वाढीला फायदाच होईल.

            बाबासाहेबांच्या काळात अशा गोष्टी घडल्या नाहीत असे नाही. पी.एन.राजभोज यांनी १९३२ च्या कामठी येथील परिषदेत विरोध केला होता तरीही त्यांना क्षमा करून बाबासाहेबांनी त्यांच्याकडे १९४२ पासून शेड्युल्ड कास्ट फेडेरेशनचे कार्यवाह पद सोपविले होते. बाबासाहेबांना विरोध करणाऱ्या रावसाहेब ठवरे यांनाही आपल्यात सामावून घेतले होते. अशा तऱ्हेने चुका करणाऱ्या नेत्यांना ते सुधारण्याची संधी देत होते.

            मतभेद कुठे नाही. घराघरात आहे. हे तर संघटन आहे. अनेक विचाराचे, प्रवृतीचे लोक असतात. तसेच चुका ह्या होतच असतात. माणूस म्हटला की चुका होणारच. पण त्यासाठी नैसर्गिक न्यायाचे तत्त्व अवलंबीले पाहिजे असे कोणीही म्हणेल. भारतीय संविधानाने आखून दिलेल्या न्यायाच्या प्रक्रीयानुसार न्यायनिवाडा व्हायला पाहिजे. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर नसल्यास काही कालावधीसाठी निलंबित करून परत प्रवेशासाठी संधी देणे योग्य होईल. परंतु कोणतीही न्यायप्रक्रिया न अवलंबीता केवळ पूर्वग्रह व द्वेषापोटी तडकाफडकी काढून टाकणे हे न्यायोचित होऊच शकत नाही असे वाटते. 

४.  महाराष्ट्रात योग्य नेतृत्वाकडे पक्षाची कमान सोपविणे

            राज्यातील बहुसंख्य लोकांना पक्षाचा अध्यक्ष कोण आहे, ही  माहिती असली पाहिजे. त्यासाठी  तो सतत प्रकाशझोतात वावरत असला पाहिजे. त्यांचे वक्तृत्व, लढाऊपणा, बौद्धिक क्षमता व संघटन कौशल्य लोकांच्या लक्षात आली पाहिजे. त्यांनी लोकांची, कार्यकर्त्यांची मने जिंकली पाहिजेत. म्हणून जनमानसावर प्रभाव टाकू शकणाऱ्या नेतृत्वावर महाराष्ट्राच्या पक्षाची कमान सोपवली पाहिजे असे वाटते.

५. लोकांचे राजकीय प्रबोधन करणे

            मी एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात मध्यप्रदेशात जांजगीर येथे नातेवाईकाकडे गेलो होतो. तेव्हा शेजारी त्यांच्या मित्राने चहासाठी बोलाविले होते. मी त्यांना विचारले की, येथे कुणाचा जोर आहे ? तेव्हा त्यांनी सांगितले की, पहिल्या क्रमांकावर भाजप आहे, दुसऱ्या क्रमांकावर कॉग्रेस आहे; तर तिसऱ्या क्रमांकावर बी.एस.पी. आहे. मग तुम्ही मत कुणाला देणार? असे मी विचारले असतांना त्यांनी बी.एस.पी.ला देणार असे सांगितले. मी त्यांना आमच्या महाराष्ट्रात ज्याचा जोर असेल त्यांना मत द्यावे. ज्याचा नसेल त्यांना  देऊन वाया मत घालवू नये अशी विचारसरणी  आहे. त्यांनी सांगितले की, येथे तसे नाही. आज जरी बी.एस.पी. तिसऱ्या क्रमांकावर असली तरी उद्या ती दुसऱ्या व नंतर पहिल्या क्रमांकावर निश्चितच येऊ शकते. त्यामुळे आमचे मत वाया जात नाही तर आम्ही त्याची शक्ती वाढवतो. अर्थात त्याकाळी मध्यप्रदेशातील लोकांचे राजकीय प्रबोधन झाले होते. त्यामुळे ते उत्तरप्रदेश नंतर सत्तेच्या जवळजवळ चालले होते. असेच प्रबोधन महाराष्ट्रात व सगळीकडे  व्हावे असे वाटते.

            महाराष्ट्रात काही लोक मते विकत असतात. प्रचाराच्या दरम्यान आम्हाला असा अनुभव आला की, लोक आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सुध्दा विकायला लागले आहेत. ‘पुतळा किंवा बुध्दविहार बनविण्यासाठी भाजप, कॉग्रेस आम्हाला ऐवढे पैसे देत आहेत. तुम्ही किती देणार ते सांगा? म्हणजे तुम्हाला आमच्या गावातील लोक मते देतील.’ असे सांगणारे गावातील काही लोक स्वतःला पुढारी समजणारे भेटले होते.  एका ठिकाणी दारू प्यायला पैसे मागत होते. त्यांनी सांगितले होते, ‘भाजप, कॉग्रेसने आम्हाला दारू पिण्यासाठी इतके पैसे दिले आहेत. तुम्ही त्यापेक्षा जास्त द्याल तर आम्ही तुम्हालाच मते देऊ.’ गावात प्रचाराची गाडी गेली की, भोवताल लोक जमा होतात. ते म्हणतात ‘माझ्या घरात इतके मते आहेत. तुम्ही मला ऐवढे पैसे द्या आम्ही तुम्हालाच मते देऊ.’ याचा अर्थ जसे कॉग्रेस-भाजपशी युती करणारे व त्यांच्याकडून पैसे घेऊन समाजाला विकणारे नेते हे मोठे दलाल आहेत तर घरातील लोकांना विकणारे हे छोटे दलाल आहेत.

तसेच समाजातील पाटील, सरपंच, तलाठी, शिक्षक, ग्रामसेवक यांचा मतदारावर फार मोठा प्रभाव असतो. ते गावातील लोकांच्या सतत संपर्कात असतात, लोकांची  कामे करीत असतात. म्हणून लोक त्यांच्या मागे असतात. ते सांगतील तसे लोक ऐकत असतात. त्यामुळे  त्याच्याकडे गावातील लोकांचा गठ्ठा मतदान असते. परंतु सत्तेत असणारे कॉग्रेस-भाजप त्यांची कामे करीत असल्याने ते त्यांचे बांधील व लाचार असतात, असाही प्रकार काही गावात आढळला आहे. त्यामुळे अशा लोकांशी सतत संपर्कात असणे, त्यांची कामे करणे आवश्यक आहे.

अलीकडे सत्ताधारी व विरोधी पक्ष निवडणुका जवळ आल्या किवा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात लोकांना खुष करण्यासाठी निरनिराळे हातखंडे अवलंबित असतात. त्यात लोकांना टी.व्ही.,लॅपटॉप, शिलाई मशीन, सायकल अशा गृहपयोगी वस्तू देणे, स्वस्त दरात धान्य देणे, कोणत्यातरी  योजनेच्या नावाने तुटपुंजे पैसे देणे,  अख्ख कुटुंब दाटीवाटीने राहतील व ज्यात कौटुंबिक प्रायव्हसी राहणार नाही असे लहान लहान घरे बांधून देणे, कर्जावर अनुदान देणे इत्यादी प्रकारची घोषणाबाजी करीत असतात. निवडून आल्यावर एकतर या घोषणांची अंमलबजावणी करीत नाहीत किवा दुसरी निवडणूक जवळ येण्याच्या अगोदर करतात. हे राजकारण गरीब व अज्ञानी लोकांना कळत नाही. हा वर्ग यांच्या राजकारणाला बळी पडतो. मग हा वर्ग लाचार आणि मिंधा बनतो. तो या पक्षांचे गुणगान करून त्यानांच आलटून पालटून भरघोस मते देऊन निवडून आणतात. परंतु लोकांचे जीवनमान उंचावण्यास, जीवन जगण्यास आवश्यक असणारी किमान मजुरी किवा पगार मिळण्यासाठी त्यांना तसा रोजगार  त्यांच्या पात्रतेनुसार पुरविण्याची कोणतीही योजना हे सत्ताधारी वर्ग राबवीत नाहीत; जेणेकरून ह्या वस्तू किवा सुविधा तेच स्वत: विकत घेण्या इतपत त्यांची क्रयशक्ती वाढेल. म्हणजे त्यांच्या स्वाभिमानाला डीवचण्याची कोणीही हिंमत करणार नाही. म्हणून मनुवाद्याचे असले फसवे राजकारण लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी खेड्यापाड्यात व शहराच्या मोहल्या मोहल्यात लोकांचे राजकीय प्रबोधन होणे  अतीमहत्वाचे आहे.

             एकदा आम्हाला असा अनुभव आला होता की,  प्रचाराच्या दरम्यान  त्या गावातील लोक हत्तीला मतदान करतील असा विश्वास निर्माण झाला होता. परंतु मतदानानंतर असे कळले की, त्यांनी हत्तीला मतदान न करता नारळाच्या झाडाचे चिन्ह असणाऱ्या आर.पी.आय.च्या एका गटाला मतदान केले. कारण हत्ती हे कांशीराम-मायावतीचे चिन्ह असून ते  दोघेही चांभार आहेत. ते  बाबासाहेबांच्या रक्ताचे नाहीत. अशा विरोधी प्रचाराचे निरसन करायला आम्ही परत त्या गावात गेलो नव्हतो, ही आमची चूक झाली होती. 

      निवडणुकीच्या काळात प्रचाराचा धुरळा उडविण्यापेक्षा शेतकरी जसा जमिनीची मशागत करतो. पावसाळा आल्यावर पेरणी करतो. मग चांगले रोपटे उगवून चांगले पिक हातात येते. तसेच पक्षाने वर्षभर पक्षाचा प्रचार-प्रसार व लोकांचे प्रबोधन करावे, व्यक्ती विकासासाठी शिबिरे आयोजित करावेत  म्हणजे निवडणुकीच्या काळात भरघोस मते पदरात पडल्याशिवाय राहणार  नाही. 

            म्हणून मध्येमध्ये खेड्यापाड्यात सतत कॅडर कँप आयोजित करून लोकांमध्ये पक्षाची विचारधारा सारखी रुजवत ठेवायला पाहिजे. त्यातूनच प्रशिक्षित कार्यकर्ते तयार होतील. त्यामुळे जागृतीचा दिवा विझणार नाही. पक्षाला जबरदस्त कॅडर बेस संघटनेचा आधार मिळेल. त्याचा फायदा कमिटेड वोटर्स निर्माण करण्यात होईल. निवडणुकीच्या काळात देशात कोणतीही हवा जरी आली तरी हे समर्पित मतदार (कमिटेड वोटर्स) वाहवत जाणार नाहीत. म्हणजेच न विकणारा समाज निर्माण होईल. तसेच काळाच्या ओघात  नेतृत्वात जरी बदल झाला तरी संघटन व विचारधारा मात्र कोणत्याही परिस्थितीत बदलू शकणार  नाही.

६. मुस्लीम, आदिवासी, भटके  व ओबीसींना पदावर घेणे

            सद्याच्या परिस्तीतीत महाराष्ट्रात बहुजन समाजातील बौध्द वर्ग सोडला तर इतर वर्ग अपवादानेच बी.एस.पी.त दिसत आहेत. बाबासाहेब या बाबतीत म्हणाले होते की, ‘अनुसूचित जाती व मागासवर्ग (ओ.बी.सी.) यांच्यात एकता स्थापन व्हावी. पण दु:खाची बाब ही की दोन्ही वर्गाचे हित सारखे असून एकत्र येत नाही. कां तर मागासवर्ग अनुसूचित जाती सोबत राहू इच्छित नाही. त्यामुळे आमचा दर्जा घसरून अनुसूचित जातीच्या बरोबरीचे होऊ असे त्यांना वाटते.’

            आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या चळवळीच्या रेट्यामुळे मागासवर्गही परिवर्तनाकडे झुकत चाललेला आहे. भटक्या-विमुक्त जातीच्या ४२ जातींनी  लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वात बुध्द धम्माची दीक्षा घेतली आहे. हनुमंत उपरे यांच्या नेतृत्वात ओ.बी.सी. जाती २०१६ साली बुध्द धम्माची दीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. ते ‘चलो बुध्द की ओर’ असे एक अभियान राबवित आहेत. ठिकठीकाणी ते परिषदा घेऊन ओ.बी.सी.वर्गांना जागृत करीत आहे. ही साऱ्या  प्रक्रिया वैचारिक परिवर्तनाचे द्योतक आहे. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप-बहुजन महासंघाच्या अकोला पॅटर्नच्या प्रयोगात सुध्दा हा बदल दिसून आलेला आहे.

तरीही महाराष्ट्रात मुस्लीम, आदिवासी, भटके व ओबीसींचा सहभाग नसल्यासारखाच दिसत आहे. पूर्वी मा. श्रीकृष्ण उबाळे महाराष्ट्राचे संयोजक व अध्यक्ष असतांना निरनिराळ्या जातीचे नेते/कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्षात होते व काही नव्याने पण आले होते. जसे कुणबी समाजाचे प्रा. मा.म.देशमुख, बाळासाहेब गावंडे, ब्रिगेडियर सुधीर सावंत, गोविंदराव ब्राम्हणकर, नागनाथ नायकवडी, बाबुराव गुरव, भारत पाटणकर, तेली समाजाचे किशोर जंगले, पांडुरंग ढोले, आदिवासी समाजाचे दशरथ मडावी, पुष्पाताई आत्राम, आगरी समाजाचे राजाराम साळवी, धनगर समाजाचे महादेवराव जानकर, दीपक यंबडवार, माळी समाजाचे वसंत नन्नावरे, अशोक गोरे, कोष्टी समाजाचे राम हेडाऊ, पांडुरंग हिवरकर, बौध्द समाजाचे राहुल हुमने, डॉ.भाऊ लोखंडे, डॉ. जमनादास खोब्रागडे, अशोक सरस्वती, राजरतन मोटघरे, रामप्रभू सोनोने, वामन निंबाळकर, लीलाताई कांबळे, सी.के.मानकीकर मातंग समाजाचे आर.के.त्रिभुवन, नंदाताई तायवाडे,  एकनाथ आव्हाड, भटक्या समाजाचे लक्ष्मण गायकवाड, मुस्लीम समाजाच्या जैबुनिसा  शेख यांच्या शिवाय आणखी बरेच लोक होते. सर्वांचा उल्लेख करणे शक्य नाही. हे खरे आहे की, या लोकांचा समाज मात्र बी.एस.पी.मध्ये त्यावेळी आला नव्हता. पण हा त्यावेळेसचा माहोल जर टिकला असता तर उत्तरप्रदेशानंतर महाराष्ट्रात बी.एस.पी.ची सत्ता यायला वेळ लागला नसता. पण नव्याने सामिल झालेले लोक  आले कसे व नंतरच्या काळात गेले कसे ते कळलेच नाही. 

हे खरे आहे की, सर्वसामान्यरित्या बौद्धांनी सुध्दा सुरुवातीच्या काळात बी.एस.पी.ला नाकारले होते. कारण बी.एस.पी.जरी बाबासाहेबांचे विचार घेऊन जात असले तरी हा पक्ष बाबासाहेबांचा नाही. आर.पी.आय.च बाबासाहेबांचा पक्ष आहे अशी भावनिक भूमिका महाराष्ट्रातील सर्वसामान्य बौध्दांची झाली  होती. हे लोक जरी आठवले, गवई, कवाडे, प्रकाश आंबेडकर यांना शिव्या देत होते, तरी निवडणूक आली की त्यांच्या नारळाचे झाड, रेल्वे इंजिन, उगवता सूर्य कप-बशी अशा त्यांच्या उमेदवाराच्या चिन्हावर ठप्पा मारीत. पण मतपत्रिकेत त्यांच्या पुढ्यात दिसणाऱ्या पूर्वीच्या बाबासाहेबांच्या व आताच्या बी.एस.पी.च्या हत्ती या चिन्हावर मात्र ठप्पा मारीत नव्हते. हीही एक गंमत त्यावेळी पाहायला मिळत होती.  मुळात ज्या पक्षाचे (आर.पी.आय.) चे ऐक्य टिकून राहत नाही. तो पक्ष बाबासाहेबांचा कसा? असा प्रश्न विचारला तर आर.पी.आय. हितचिंतकांच्या नाकाला मोठ्या मिरच्या झोंबत ! परंतु जो पक्ष (बी.एस.पी.) बाबासाहेबांचा विचार घेऊन देशात झंझावात निर्माण करतो तोच खऱ्या अर्थाने बाबासाहेबाचा पक्ष ठरतो, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. महाराष्ट्रात बौध्द तर नाहीच पण इतर कोणतीही जात ही बी.एस.पी.चा बेस बनला नव्हता. ही गोष्ट नाकारता येणार नाही.

सध्याच्या काळात  बौध्द सोडले तर इतर समाजाचे लोक पक्षात बोटावर मोजण्याएवढेच दिसत आहेत. आर.पी.आय.चे निरनिराळे गट व बी.एस.पी. या सर्वांचे हा समाज म्हणजे भांडवल झाला आहे. त्याच तुटपुंज्या संख्येत असलेल्या बौध्दाची इकडे-तिकडे पळवापळवी होत असल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. त्यामुळे कुणालाच जनाधार उरलेला दिसत नाही.

            तेव्हा परत मुस्लीम, आदिवासी, भटके व ओबीसींचा सहभाग पक्षात वाढविण्यासाठी खास प्रयत्न करण्यात यावेत. हा सारा वर्ग समदु:खी आहे. मनुवादी विषम समाजव्यवस्थेचा बळी आहे. कोणी कमी आहे कोणी जास्त आहे, फरक एवढाच ! त्यामुळे त्यांना एका संघटनेच्या छायाछ्त्रात एकत्र व्हायला काही अडचण असेल असे वाटत नाही. परंतु त्यासाठी प्रत्येक जातीतील नेतृत्व आणि कार्यकर्ते निर्माण करावे लागेल. त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्रे चालवावे लागतील. त्यांच्यासाठी सतत मेळावे, कॅडर कँप, मिटींग, कॉर्नर मिटींग  आयोजित करावे लागतील. पक्षाचे ध्येयधोरणे त्या त्या जातीतील लोकांनी त्या त्या जातीतील लोकांना सांगितल्यावर पटते, हे नक्की !  इतर जातीच्या लोकांचे म्हणणे सहसा कोणी ऐकत नाहीत किंवा पटवून घेत नाहीत. म्हणजेच सोनारानेच कान टोचावे अशी जी म्हण आहे, ती येथे लागू पडते. म्हणून पक्षाच्या कार्यकारणीत त्यांना महत्वाच्या पदावर प्रतिनिधित्व देण्यात यावेत असे वाटते.

            मा. कांशीरामजी यांनी प्रकाशित केलेल्या ‘बामसेफ-एक परिचय’ या पुस्तिकेत उल्लेख केला आहे की, बामसेफचे तीन अनिवार्य तत्व आहेत. ते म्हणजे पहिले बहुजन आधारित म्हणजे मासबेस्ड, दुसरे व्यापक म्हणजे ब्रॉडबेस्ड, तिसरे म्हणजे कॅडरवर आधारित कॅडरबेस्ड. बी.एस.पी.चा पाया बामसेफने रचला आहे. त्यामुळे हे तीनही तत्वे बी.एस.पी.चे सुध्दा अंगभूत तत्वे आहेत हे ओघानेच आले.

७. युवक, महिला, विद्यार्थी, कामगार अशा निरनिराळ्या शाखा स्थापन करणे

            पूर्वी बामसेफ संघटनेच्या जडणघडणीत विद्यार्थी, युवक, महिला, औद्योगिक कामगार, शेतकरी-शेतमजूर अशा विविध शाखेचा अंतर्भाव होता. 

            प्रत्येक पक्षाने युवक, महिला, विद्यार्थी, कामगार, वकील, डॉक्टर्स असे विविध आघाड्या स्थापन केल्या आहेत. तसेच बी.एस.पी.ने सुध्दा करावेत असे वाटते. त्यामुळे त्या त्या क्षेत्रातील लोकांना मोठ्या प्रमाणात काम करण्यास वाव उपलब्ध होतो. त्यामुळे पक्षातील सहभाग वाढत जातो.  

            विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक पक्षाने स्वतंत्र शाखा उघडली आहे. भाजपाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कम्युनिस्टांनी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, कॉंग्रेसने नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया अशा शाखा उघडल्या आहेत. आज १८ वर्षावरील तरुण-तरुणींना मतदानाचा हक्क मिळाला आहे. हा वर्ग समाजात व समाजाच्या बाहेर विद्यार्थी जगतात वावरत असतो. हा वर्ग लवकरच परिवर्तन चळवळीकडे आकर्षित होत असतो. तो जर वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ केले तर तो आपल्या मताचे प्रचारक व वाहक ठरू शकतात. म्हणून त्यांची वेगळी आघाडी स्थापन करून त्यांना स्वतंत्रपणे काम करण्यास वाव मिळवून द्यावा असे वाटते. म्हणून त्याचे राजकीयदृष्ट्या प्रबोधन होणे आवश्यक आहे. कारण हा वर्ग विदयार्थी जीवनापासूनच राजकारणाचे धडे घेत असतो. देशात प्रत्येक महाविद्यालयात विदयार्थी प्रतिनिधीसाठी निवडणुका होत असतात. प्रत्येक राजकीय पक्षाचे पॅनल उभे असतात. येथूनच त्यांना राजकीय विचारधारेचे आकलन होते आणि पुढे त्यांच्यापैकी काहीजण सक्रियपणे त्या पक्षाच्या राजकारणात भाग घेतात. त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित होण्यास येथूनच सुरुवात होते. शिवाय बहुजन विद्यार्थ्यांचे विद्यार्थी जीवनात बऱ्याच समस्या असतात. अॅडमिशनच्या समस्या, फी आकारणी, क्रमिक पुस्तकांच्या वाढलेल्या किंमती, महागाईशी निगडीत स्कॉलरशिप न मिळणे, स्कॉलरशिप वेळेवर न मिळणे, शहरात राहण्याची समस्या, शिक्षणाचे बाजारीकरण, आठव्या वर्गापर्यंत परीक्षा पद्धती बंद झाल्याने बहुजन विदयार्थी शिक्षणात मागे पडणे, परीक्षेत लेखी परीक्षा पेक्षा मौखिक परीक्षेत कमी मार्क्स पडणे, शिकवणी वर्गाचा सुळसुळाट अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांना भेडसावेत असतात. बहुजनातील गरीब विदयार्थी सरकारी शाळेत शिकतो, जेथे कोणत्याही सुविधा नसतात. उच्चवर्णीयांचे मुले इंग्रजी माध्यमातील खाजगी शाळेत शिकतात, जेथे साऱ्याच सुविधा असतात. त्यामुळे हे मुले पुढे जातात तर गरीब विदयार्थी मागे पडतात. निराश होवून शाळा सोडून देतात. मग उच्चवर्णीयांची स्वस्तात सेवा चाकरी करायला ‘स्वस्त मजूर’ म्हणून यांचा वापर होतो.

            महागडे शिक्षण करून गरीब मुलांनी शिक्षण घेऊ नये अशी व्यवस्था मनुवादी शासक करीत आहेत, जेणेकरून हा बहुजन समाज वर्षोनुवर्षे दारिद्र्यात खितपत पडून अज्ञानतेच्या चिखलात व धर्मांधतेच्या कर्मकांडात फसून राहावे असे त्यांना वाटत असते. म्हणून या समस्या समजून त्या विरुध्द लढणारा विदयार्थी वर्ग तयार व्हायला पाहिजे नाहीतर शिक्षणाच्या संधी पासून बहुजन समाज दुरावल्या जाईल.

            शिक्षणातून बाहेर पडल्यावर युवकांना बेरोजागारीशी सामना करावा लागतो. शिक्षण घेता घेता नाकी नऊ आल्यावर आता रोजगार मिळविणे हे एक दिव्यच होवून बसते. अर्जाची फी, कागदपत्राच्या सत्य प्रती, पोस्टल ऑर्डर्स, अर्ज पाठविण्याचा खर्च, लेखी अथवा मौखिक परीक्षेला जाण्यायेण्याचा खर्च, मधल्या दलालाचा खर्च, भ्रष्टाचार अशा अनेक बाबीवर खर्च करून करून घाईस येतो.  

मनुवादी शासकांना वाटत नाही की बहुजन समाज हा आत्मनिर्भर व्हावा म्हणून !  जर हा वर्ग आत्मनिर्भर झाला तर त्याचे लक्ष शासनसत्ता हस्तगत करण्याकडे जाईल. म्हणून त्याला सतत समस्यात गुंतवून ठेवण्यात बाध्य केल्या जात असते. म्हणून विदयार्थी-युवक वर्ग ह्या समस्यांच्या मुळात जावून संघर्ष करीत नाही, तोपर्यंत दुर्दशा त्यांची साथ सोडणार नाही. म्हणून या महत्वपूर्ण विषयावर विचार व संघर्ष करण्यासाठी विदयार्थी व युवकांच्या वेगळ्या शाखा असणे आवश्यक आहे. कारण बहुजन समाज बेरोजगारीच्या विस्तवात भाजून निघत आहेत.

            राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देतांना बहुजन विद्यार्थ्यांना वेगळ्याच समस्यांशी झुंजावे लागते. याकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष गेले नाही. या परीक्षेत विदयार्थी कसातरी मौखिक परीक्षेपर्यंत जावून पोहचतो. परंतु त्याला मौखिक परीक्षेत एकतर लेखी परीक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळतात किवा एकदम कमी मार्क्स देवून त्याला आयएएस, आयपीएस बनण्यापासून वंचित केल्या जाते.  

महिलांची सुध्दा वेगळी आघाडी उघडणे आवश्यक आहे. महिला ह्या समाजाचा अर्धा हिस्सा आहे. ती जर राजकीयदृष्ट्या जागृत असेल तर घरातील कुटुंबाना ती दिशानिर्देश देऊ शकते. पूर्वी अशी आघाडी होती. त्यांची अधिवेशने पण महाराष्ट्रात होत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर २०.०७.१९४२ रोजी नागपूरला म्हणाले होते की, ‘आमच्या चळवळीला तो पर्यंत सफलता मिळू शकत नाही, जो पर्यंत महिला सुध्दा पूर्णपणे सक्रीय होवून चळवळीला गती देण्यास मदत करीत नाहीत. स्वयंसेवी संघटना खेड्यापाड्यात, शहरात स्थापन व्हावेत. नवयुवक व विद्यार्थ्यांनी आपल्या समाजाची सेवा करण्याचे भाव आपल्या मनात जागवावे. समाजाचा मोठा भार त्यांनाच उचलायचा आहे. ही गोष्ट त्यांनी कधीही विसरू नये.’

८.   निवृत्त झालेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांचा सहभाग घेणे

            जे लोक नोकरीच्या काळात पक्षाचे पडद्याबाहेरील कार्यकर्ते किंवा हितचिंतक असतात, त्यांना निवृतीनंतर पक्षाच्या कामात सहभागी करून त्यांच्या बौद्धिक क्षमता व कौशल्याचा उपयोग करून घेण्यासाठी ठोस अशी यंत्रणा निर्माण करावी  असे वाटते. सेवानिवृत्त झालेले लोक आर्थिक व बौद्धिकदृष्ट्या संपन्न असू शकतात. नोकरीत असतांना तो कामात गुंतलेला असतो. पण नोकरी गेल्यावर वेळ कसा घालवावा असा प्रश्न बहुतेकांना पडतो. म्हणून ह्या रिकाम्या वेळेचा उपयोग ते पक्षासाठी देऊन पक्षाच्या लहान-मोठ्या कामात आपले मन गुंतवू शकतात.

            असे म्हणतात की, नोकरीच्या काळात आर.एस.एस. मध्ये लपून-छपून काम करणारे कर्मचारी-अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर आर.एस.एस. व भाजपामध्ये थेट काम करीत असतात. ऐवढेच नव्हेतर आय.ए.एस., आय.पी.एस., आय.एफ.एस. सारख्या सनदी व इतर मोठमोठ्या सरकारी पदावर काम केलेल्या लोकांना भाजपाने पक्षामध्ये सामावून घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा वापर भाजपा करीत आहे. तशीच एक नीती व ठोस धोरण बी.एस.पी.ने सुध्दा आखावी म्हणजे त्याद्वारे निवृत्त झालेले कर्मचारी-अधिकारी चळवळीकडे आकर्षित होवून पक्षात काम करण्यास त्यांना संधी मिळेल. त्यामुळे गप्पा-गोष्टी व इकडे-तिकडे फिरण्यात वाया जाणारा वेळ आणि  शक्ती चळवळीसाठी उपयोगात येईल असे वाटते.  

९.  मिशनरी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणे

      खरे म्हणजे मिशनरी कार्यकर्ता हा संघटनेचा व पक्षाचा कणा असतो. त्याला कोणत्याही गोष्टीची अभिलाषा नसते. त्याला नाही पद पाहिजे ना प्रतिष्ठा ! फक्त निष्ठेने व सेवाभाव वृतीने काम करीत राहणे हेच त्याचे उद्दिष्ट्ये आणि मिशन असते. म्हणून पक्षात अशा मिशनरी वृतीने व निष्ठेने काम करणाऱ्या लहानसहान कार्यकर्त्यांचीही वेळोवेळी दखल घेऊन त्यांना सतत प्रोत्साहित करीत राहावे असे वाटते.

१०. कामगार आघाडी निर्माण करणे 

            महाराष्ट्रात १९९१ साली त्यावेळचे पक्षाचे संयोजक मा.श्रीकृष्ण उबाळे यांनी बामसेफच्या काही ठळक सक्रीय कार्यकर्त्यांची नागपूर येथे तीन दिवस बैठक घेऊन काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. त्यात माझाही सहभाग होता. या बैठकीत्त चर्चेअंती ‘बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन’ ही बी.एस.पी. संलग्नित कामगार संघटना निर्माण करण्यात आली होती. या संस्थापकीय कार्यकारणीत मला संयुक्त सचिव हे पद देण्यात आले होते. परंतु त्यानंतर काही लोकांनी या निर्णयाला विरोध करून मा. कांशीरामजी यांनाही तसे पटविण्यात आले. त्यामुळे या ना त्या कारणाने मा. कांशीरामजी यांनीच मा. श्रीकृष्ण उबाळे यांना पक्षापासून दूर करण्यात येऊन ‘बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन’ला सुध्दा झिडकारण्यात आले. तेव्हापासून हे अपत्य मा. श्रीकृष्ण उबाळे सांभाळीत आहेत.

            खरं म्हणजे प्रत्येक पक्षाला स्वतःच्या कामगार संघटना आहेत. कॉग्रेसला इंटक, भाजपला बी.एम.एस. तर भाकपला आयटक संघटना संलग्नित आहेत. एवढेच नव्हे तर शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे) सारख्या प्रादेशिक पक्षाने सुध्दा आपल्या कामगार आघाड्या तयार केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कामगार सभासद हे पक्षाच्या विचाराचे वाहक असतात. आपल्या पक्षाचे विचार तो कामगार क्षेत्रात पेरत राहतो.

तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुध्दा दि.१२ व १३ फेब्रूवारी १९३८ साली मनमाडच्या रेल्वे परिषदेत कामगार संघटनाची आवश्यकता प्रतीपादन केली होती. १९३० साली बाबासाहेब ‘बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन’चे उपाध्यक्ष व १९३४ पासून ते ‘म्युनिसिपल कामगार संघा’चे अध्यक्ष होते. तसेच त्यांचे विदर्भातील विश्वासू सहकारी एल.एन.हरदास यांनी १ जानेवारी १९३१ रोजी नागपूरला ‘मध्यप्रांत वऱ्हाडबिडी कामगार संघ’ स्थापन केला होता. बिडी कामगारांच्या हितासाठी बाबासाहेबाचे सहकारी आमदार रामचंद्र फुले व राघव घोडीचोर यांनी वऱ्हाडाच्या विधानसभेत विधेयक मांडले होते. अर्थातच यामागे बाबासाहेबांच्या उध्दाराची प्रेरणा होती.

            त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ९ नोव्हेंबर १९४२ रोजी आकाशवाणी केंद्रावरून मजूरमंत्री या नात्याने केलेल्या भाषणात म्हणाले होते की, ‘देशाला अचूक नेतृत्व देण्याची गरज आहे. हे नेतृत्व कोण देऊ शकेल? हे नेतृत्व फक्त कामगारच देऊ शकेल असे मला वाटते. नवी समाजरचना कामगाराचे आशास्थान असते. त्यासाठी कामगारच योगदान करू शकतात आणि या दिशेने भारताचे राजकीय भवितव्य ते साकार करू शकतात.’ म्हणून बहुजन समाज पार्टीने  सुध्दा परत कामगार संघटने बाबत  विचार करावा असे वाटते.

११. बामसेफ, पी.बी.एस.पी.च्या धर्तीवर कामगार-अधिकारी वर्गाची संघटना निर्माण करणे

            समाजातील अराजकीय मुळे पक्के करण्याकरीता मा. कांशीरामजींनी १९७८ साली कामगार-अधिकाऱ्यांची ‘बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन’ (बामसेफ) नावाची संघटना स्थापन केली होती. मा. कांशीरामजी म्हणायचे की, ‘जिस समाजकी गैर राजनीतिक जडे मजबूत नही होती है, उस समाजकी राजनीती कामयाब नही होती!’

            ही संघटना स्वतःच्या कल्याणासाठी न झटता केवळ समाजाचे हित जोपासणारी होती. या वर्गाला केवळ बाबासाहेबांच्या चळवळीचा लाभ घ्यावा एवढेच माहिती होते. परंतु त्यांचेवर समाजाची परतफेड करण्याची जबाबदारी आहे, ही दायित्वाची भावना पहिल्यांदा मा. कांशीरामजींनी त्यांच्यात जागविली. या माध्यमातून हा वर्ग बुद्धी, वेळ व पैसा द्यायला लागला होता. शिवाय पडद्याच्या आड राहून बी.एस.पी.या राजकीय पक्षाचे सुध्दा काम करीत होता. परंतु नंतरच्या काळात डी.के.खापर्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाहेर पडून या संघटनेला रजिस्ट्रेशन केल्याने या संघटनेच्या नावाने काम करणे अवघड झाले होते. म्हणून मा. कांशीरामजी यांनी बामसेफ बरखास्त करून कामगार-अधिकाऱ्यांनी बी.एस.पी.चे थेट काम करावे असे सांगितले. पण नोकरीविषयक बंधने असल्याने त्यांना सरळ पक्षाचे काम करणे अवघड होत होते. तेव्हा मा. कांशीरामजी यांनी पे बॅक टू सोसायटी (पी.बी.एस.पी.) ची कल्पना मांडली. ही संघटना निर्माण झाल्यानंतर आम्ही या संघटनेत काम करायला लागलो. या संघटनेद्वारे आम्ही दर महिन्याला १५० रुपये जमा करीत होतो. त्यातून कॅडर कँप सारख्या स्थानिक कार्यक्रमासाठी ५० रुपये ठेऊन १०० रुपये मा, कांशीरामजी यांना देत होतो. त्यावेळी जवळपास एक लाखाची थैली मा. कांशीरामजी यांना दरमहा देत होतो. त्यानंतर याही संघटनेच्या विरोधात ओरड झाल्याने ही संघटना सुध्दा बरखास्त करण्यात आली. आता कामगार-अधिकारी वर्गाला पक्षाचे काम करण्यासाठी व त्यांना पक्षाशी जुळून ठेवण्यासाठी कोणतेही माध्यम उरले नाही. तरी पुन्हा अशा प्रकारची संघटना तयार करावे, म्हणजे कामगार-अधिकारी वर्गाला त्याद्वारे चळवळीचे काम करण्यासाठी योगदान देता येईल.

१२.  नेतृत्वाची शृंखला निर्माण करणे

            बाबासाहेब म्हणतात, ‘राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाशिवाय जगामध्ये कोणालाच काही साधता येणार नाही. आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रश्न या सर्व प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करावयास पाहिजे. त्यांनी पुढाऱ्यांची जबाबदारी काय आहे याची जाणीव ठेवावयास पाहिजे. कारण आपल्या समाजातील पुढाऱ्यावर अत्यंत मोठी जबाबदारी आहे. इतर पुढाऱ्याचे काय? सभेत जाणे, लांबलचक भाषण करणे, टाळ्या मिळविणे आणि शेवटी हार गळ्यात घालून परत येणे, एवढेच काम इतर पुढाऱ्यांचे असते. आपल्या समाजातील पुढाऱ्यांना हे करून भागत नाही. चांगला अभ्यास करणे, समाजाच्या उन्नतीसाठी स्वत: रात्रंदिवस सतत अंगमेहनत करणे हे आपल्या पुढाऱ्याला करावे लागेल; तरच तो लोकांचे थोडे फार भले करू शकेल आणि तोच पुढारी ठरू शकेल.’ (डॉ.बाबासाहेब आबेडकरांची भाषणे खंड ६ संपादक – मा.फ.गांजरे पृ.१९१) म्हणजेच नेत्यांना विचाराची पक्की बैठक आणि वास्तवाचे चिकित्सक ज्ञान असायला पाहिजे. नाहीतर कबीर म्हणतात तशी अवस्था होऊ शकते. ते म्हणतात,

‘जो का गुरु अंधा हो, वो का चेला अंधा हो !

            अंधे को अंधा मिला, शाबूत बचा न कोय !!

            मराठीमध्ये असेही म्हणता येईल की,

            ‘आंधळ्या गुरुचा शिष्यही आंधळा…

            आंधळ्याच्या भेटी आंधळाही गेला…

            सत्यानाश झाला दोघांचाही…!’

            मा. कांशीरामजी नंतर बहीण मायावतीचे नेतृत्व उदयास आले. पण त्यानंतर कोण ? असा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दुसऱ्या व तिसऱ्या फळीचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर व राज्य स्तरावर निर्माण होण्याची प्रक्रिया सतत सुरु असली पाहिजे. म्हणजे नंतर कोण? याचे उत्तर शोधायची गरज निर्माण होणार नाही. पक्षाची सर्वोच्च नेता बहीण मायावती यांच्या नंतरचे पक्षाचे चेहरे लोकांना दिसले पाहिजेत. त्यांना संपूर्ण भारतभर दौरे काढून फिरविले पाहिजे. त्यामुळे त्यांची जनतेला ओळख होईल.त्याशिवाय त्यांच्यातील नेतृत्वगुण लोकांच्या लक्षात येवून आपला पक्ष मजबूत पायावर उभा आहे, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण होण्यास मदत होईल.

            एका राज्यातील नेते दुसऱ्या राज्यात गेल्यावर लोकांना त्यांचे कौतुक वाटते. एकदा मुंबईला मा. कांशीरामजीची सभा झाली होती; तेव्हा उत्तरप्रदेशातील पक्षाचे मंत्री स्टेजवर पाहून व त्यांचे भाषणे ऐकून लोक हरखून गेले होते. कांग्रेसचे, भाजपाचे दुसऱ्या-तिसऱ्या फळीचे नेते देशभर फिरून सतत लोकांच्या संपर्कात असतात. तीच प्रक्रिया पक्षाने अवलंबीली पाहिजे असे वाटते.

            नेतृत्वाच्या बाबतीत एक इंग्रजी कवी म्हणतो की, ‘सोन्याला जंग लागला तर लोखंडाची बिकट अवस्था होईल. मेंढपाळाच्या अंगाला  चिखल लागला तर मेंढ्या पण अस्वच्छ राहतील.’ हेच तत्व नेत्याला पण लागू होतात. नेत्यात क्षमता, योग्यता, निष्टा, त्याग, समर्पण, इमानदारी, साहस, दूरदृष्टी, निस्वार्थीपणा, चिकाटी, सचोटी, प्रामाणिकपणा, प्रांजळपणा, निस्पृहता, सहनशीलता, हिंमत, धीर, मुत्सद्देगिरी, राजकीय डावपेचात तरबेज असणारा  इत्यादी गुण असले पाहिजेत. तो केवळ बुद्धिमान असून चालत नाही तर तो शीलवान असला पाहिजे. म्हणजेच चारित्रसंपन्न असला पाहिजे. म्हणूनच तथागत  बुद्धांनी प्रज्ञेसोबत शिलाची सांगड घातली होती. याबाबत साक्रेटीस म्हणतात ते खरेच आहे. ते म्हणतात, ‘विवेकशील आणि चारित्रसंपन्न व्यक्तीच्या नेतृत्वाशिवाय समाजाला वाचविणे आणि मजबूत करणे कसे शक्य आहे?’ म्हणून समाजाला वाचविण्यासाठी व मजबूत करण्यासाठी विवेकशील व चारित्रसंपन्न व्यक्तीच्या नेतृत्वाची गरज असते. बाबासाहेबांनी असे नेतृत्व दिले होते म्हणून समाजावर त्यांचा खोलवर परिणाम झाला होता.

            नेत्याच्या बाबतीत एच.डी.आवळे (आवळेबाबू) यांनी छान वर्णन केले आहे. ते म्हणतात की, ‘समाजाला दोन प्रकारच्या नेत्याची गरज असते. पहिला समाजाची बौद्धिक गरज पूर्ण करणारा व दुसरा समाजात जावून संघटन तयार करणाऱ्या संघटकाचा. समाजाच्या ह्या दोन शक्ती आहेत. बुद्धिमान नेता हा ट्रेनच्या इंजिन सारखा तर संघटक नेता हा इंजिनला जोडलेल्या डब्ब्यासारखा असतो. इंजिनचे कार्य रस्ता दाखवून जोडलेल्या डब्ब्यात बसलेल्या प्रवाशांना घेऊन जाण्याचे असते. प्रवाशांना घेऊन योग्य त्या ठिकाणी पोहचवून उद्दिष्ट प्राप्त करण्याचे इंजिनचे कार्य असते. संघटक नेत्याशिवाय बुद्धिमान नेता हा हवेत फुगे उडविणारा तर बुद्धिमान नेत्याशिवाय संघटक नेता हा पर्वतावरील निर्जीव दगडासारखा पडून राहील.’  

            व्यक्तीपेक्षाही संघटनेला महत्व दिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना व्यक्तीपूजा मान्य नव्हती. व्यक्ती आज आहे, उद्या नाही. पण संघटना मात्र आहे, त्याच ठिकाणी राहते. ती कायम राहते. व्यक्ती गेल्यानंतर संघटनेला बाधा यायला नको. म्हणून संघटना ही मजबूत असायला पाहिजे. आकाशात उडणाऱ्या एका  पक्षाकडे कुणाचे लक्ष जाणार नाही. पण घोळक्याने उडणाऱ्या पक्षांकडे लोकांचे मात्र नक्कीच लक्ष जाते. हीच संघटनेची खरी ओळख, ताकद असते. म्हणून चांगले नेते हे संघटनेला खरी ओळख व ताकद देतात. असे चांगले नेते घडविण्याची प्रक्रिया पक्षाने निर्माण केली पाहिजे असे वाटते. 

 १३. कार्यकर्ता

समाजक्रांती यशस्वी करण्यासाठी नेता आणि कार्यकर्ता या दोन दुव्यांची अत्यंत आवश्यकता आहे. नेत्याला डोके म्हणता येईल तर कार्यकर्त्याला पाय म्हणता येईल. पक्षाचे, नेत्याचे, चळवळीचे विचार लोकांपर्यंत पोहोचविणारा घटक म्हणजे कार्यकर्ता. कार्यकर्त्याशिवाय चळवळ चालू शकत नाही. म्हणून पक्षात सतत निस्वार्थ, निष्ठावान,  चिकाटीचा, सचोटीचा, प्रामाणिक, प्रांजळ, निस्पृह, सहनशील, खंबीर, हिंमतवान, धीराचा, शारीरिक क्षमतेचा, ध्येयशील असा कार्यकर्ता घडविण्याची प्रक्रिया सुरु असली पाहिजे. पक्ष अशा कार्यकर्त्यांनी गजबजून गेला पाहिजे. कार्यकर्त्यांचे जाळे सर्वदूर पसरले पाहिजे. चळवळीचे भवितव्य कार्यकर्त्याच्या कुशल कार्यावर अवलंबून असते.

कार्यकर्त्यामध्ये सहनशीलता आणि धीर हे दोन गुण असणे आवश्यक आहे. भगवान बुध्द भिक्खूना म्हणाले होते की, ‘जग जरी आपल्यासोबत भांडले तरी आपण त्यांचेशी भांडू नये. सत्य शिकविणारा कधीही भांडत नसतो.’

समाजाने सुध्दा अशा कार्यकर्त्याची किंमत केली पाहिजे. त्यांचे मनोध्येर्य खचू द्यायला नको. तो वैफल्यग्रस्त होणार नाही याची काळजी समाजाने व पक्षाने घेतली पाहिजे. कार्यकर्त्यांच्या त्यागाचे चीज व्हायला पाहिजे; तरच तो टिकून राहील.

कार्यकर्ता हा चळवळीच्या रथाचा चालक असतो. तो महत्वाचा घटक आहे. चळवळीजवळ कितीही प्रभावी विचार असला तरी त्याला कार्यकर्त्याचा आधार मिळाल्याशिवाय तो विचार समाजापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की, रोपट्याला जिवंत ठेवण्यासाठी जसे पाणी आणि खत दिल्या जाते, तसेच विचाराचा प्रचार आणि प्रसार झाल्याशिवाय तो विचार जिवंत राहणार नाही. आणि हे कार्य कार्यकर्ताच करू शकतो. नेता जसा चळवळीचा प्राण असतो, तसाच कार्यकर्ता सुध्दा चळवळीचा प्राण असतो. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की, ‘YOU MUST BE ABLE TO CREATE DEVOTED WORKERS.’

            भगवान बुद्धांच्या धम्माचा कार्यकर्ता म्हणजे भिक्खू संघ ! भगवान बुद्धांनी त्यांना ‘चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असा आदेश दिला होता. म्हणजेच ‘बहूजनांच्या हितासाठी, बहूजनांच्या सुखासाठी भिक्खुनो चारही दिशेने फिरा!’ 

कबीर पण म्हणायचे की,

      ‘कबीरा खडा बजार मे लिये लुकाठी हाथ !

      जो घर फुके आपना चले हमारे साथ !!’

      म्हणजेच  आपले घरदार सोडून निघालेला कार्यकर्ता हा कबीराचा समाजसेवक होता !

कार्यकर्ता हा जन्माला येत नाही. त्याला घडवावा लागतो. म्हणून कार्यकर्ता हा प्रशिक्षित असावा. आपले महापुरुष जसे अभ्यासू, समर्पित, ध्येयनिष्ठ, चरित्रसंपन्न, नीतिवान होते, तसेच कार्यकर्ता व नेता सुध्दा असावा. त्यांना उत्तम वकृत्वाचे धडे दिले पाहिजे. समाजात, राजकारणात निर्माण होणाऱ्या समस्या आणि प्रश्नावर मांडणी, विश्लेषण, सोडवणूक कशी करावी याचे प्रशिक्षण त्याला दिले पाहिजे. त्यामुळे जनतेला तो आदरणीय, अनुकरणीय व आदर्श राहून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरेल. त्यांच्या बोलण्यात व कृतीत अंतर असू नये. जनता अशा नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे व संघटीतपणे उभे राहतील. कार्यकर्ता असेल तर चळवळ, पक्ष जगेल. म्हणून असा निस्पृह कार्यकर्ता पक्षाने घडवावा असे वाटते.

१४.  ब्राम्हणांचा सहभाग एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठेवण्याबाबत

बहीण मायावती उत्तरप्रदेशात ‘सोशल इंजिनियर’च्या नावाने सतत ब्राम्हणांचे मेळावे घेऊन त्यांचेशी सलगी वाढवीत आहेत. ‘ब्राम्हण  दलित भाई भाई’ अशा घोषणा देऊन, भाईचारा समित्या स्थापन करून व ब्राम्हण जोडो संमेलन घेऊन बी.एस.पी.मध्ये मोठ्या  प्रमाणात शिरकाव करून घेत आहे. ऐवढेच नव्हे तर विधानसभेच्या सर्व मतदारसंघात ब्राम्हणांना भाईचारा समित्याचे  अध्यक्ष, उपाध्यक्ष  व दलितांना सचिव बनविण्यात आले. ब्राम्हण संमेलनात बहीण मायावतीला ब्राम्हण दैवत असलेले व क्षत्रियांचे कर्दनकाळ ठरलेले परशुराम यांची कुऱ्हाड भेट देण्यात आल्याचे नमूद ‘आधुनिक भारतातील दलित’ या पुस्तकात करण्यात आले आहे. 

ब्राम्हण वर्गाला बी.एस.पी.त वळण्याचे कारण काय? याचे विश्लेषण करतांना असे सांगितले जाते की, १९५२ च्या पहिल्या संसदेत ब्राम्हण वर्गाचे ३३० खासदार होते. परंतु ही संख्या रोडावत आता ५०-६० वर येऊन ठेपली आहे. म्हणून जिंकणाऱ्या प्रत्येक पक्षात आपले जात वर्चस्व अबाधित राहण्यासाठी आपले जास्तीत जास्त खासदार असावेत असा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून हा वर्ग सर्व बास्केट मध्ये अंडे घालून ठेवतात, जेणेकरून कोणत्या ना कोणत्या बास्केटमध्ये अंडी उबवल्या जातील अशी त्यांना खात्री असते.  हे एक कारण आहे. दुसरे कारण असे की, त्यांचे नैसर्गिक नात्यागोत्याचे पक्ष असलेले भाजप व कॉंग्रेस यांचा जनाधार उत्तरप्रदेश मध्ये कमालीचा घसरला आहे. त्यामुळे त्यांचेसमोर दोन विकल्प होते. एकतर त्यांनी हजारो वर्षे वंचित करून ठेवलेल्या बहुजनांच्या पक्षाला समर्पित होवून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करणे किंवा हिंदुत्ववादी राजकारणाला वाढवून आपले अस्तित्व शाबूत ठेवणे. यात त्यांनी पहिला पर्याय स्वीकारलेला दिसतो. कारण ते स्वतंत्रपणे सत्तेत राहण्याच्या परिस्थितीत नाही याची त्यांना जाणीव झाली असावी. म्हणूनच ते आता बहुजन समाज पार्टीकडे वळले असावेत असा अनुमान आहे. यालाच बहीण मायावतीने ‘सोशल इंजिनीअर’ असे नाव दिले.

असेही सांगितले जाते की, ज्या ब्राम्हण उमेदवारांना  भाजपाने निवडणुकीच्या तिकीटा दिल्या नाहीत आणि मुलायमसिंहच्या समाजवादी पक्षात गुन्हेगार वृत्तीच्या व क्षत्रियांच्या तुलनेत दुय्यम स्थान दिल्या जाणाऱ्या भीतीने नाही भाजपात राहू शकत की समाजवादी पक्षात जाऊ शकत. म्हणून नाईलाजाने ते बहुजन समाज पार्टीकडे तिकिटासाठी आलेत. अर्थात ही त्यांची मजबुरी होती असे दिसते. त्यांनी जर २००७ ची उत्तरप्रदेशची निवडणूक जिंकून दिली, असे समजले तर मग २०१२ची निवडणुक का नाही? की याचा उलटा परिणाम म्हणजे मुस्लीम वर्गाने आपली मते मुलायमसिंहच्या समाजवादी पार्टीकडे वळवली तर नाही ना?

तसेच बी.एस.पी.त शिरून बी.एस.पी.ची चळवळ ते काबीज (हायजॅक) तर करणार नाही ना अशी साधार भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. कारण मनुवादी षडयंत्र राबवितांना असे सांगितले जाते  की, विरोधी चळवळीची  पहिल्या पायरीवर  ते दखल घेत नाहीत. तरीही जर ती चळवळ वाढत असेल तर दुसऱ्या पायरीवर त्या चळवळीला साम, दाम, दंड, भेद नीती वापरून नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतात. तरीही जर ती चळवळ वाढण्याचे थांबत नसेल तर तिसऱ्या पायरीवर त्या चळवळीचा स्वीकार केल्या जाते. त्या चळवळीला  दुषित करण्याचे काम करून बदनाम केल्या जाते. मग ती चळवळ हळूहळू खतम होत जाते. अशी अवस्था बी.एस.पी.ची तर होणार नाही ना?

            मा.कांशीरामजींनी घोषणा केली होती की, ‘१४ ऑक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या ५०व्या वर्षी मी ३ कोटी लोकांसोबत बौध्द धम्माचा स्वीकार करेन.’ पण त्यानंतर ते आजारी पडल्याने ती घोषणा फलद्रूप झाली नाही. म्हणून त्यांची ही घोषणा पक्षातील कुणीही नेत्याने फलद्रूप करू नये म्हणून तर ब्राम्हण वर्ग  तशी आखणी करीत नाही ना अशी शंका येत आहे.

            शिवाय ब्राम्हण वर्गाचे पक्षावर वाढणार्‍या वर्चस्वामुळे मुस्लीम समाज सुध्दा दुरावल्या जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एकवेळ ब्राम्हण वर्ग जवळ नाही आला तरी चालेल पण मुस्लीम वर्गाला तोडणे पक्षाला परवडणारे नाही. कारण उत्तरप्रदेशात जरी ब्राम्हण  वर्गाची  संख्या ९.२ टक्के असली तरी देशात मात्र केवळ ३.५ टक्के आहेत तर मुस्लीम वर्ग हा उत्तरप्रदेशात १८.२  टक्के तर देशात ११.६७ टक्के आहेत. म्हणजे ब्राम्हण  वर्गापेक्षा मुस्लिमांची संख्या जास्त आहे.

ब्राम्हण वर्गाची स्वत:ची संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जवळचा पक्ष म्हणजे भाजप व दुसरा पर्यायी पक्ष म्हणजे कांग्रेस आहे. मुस्लिमांना स्वतःचा असा देशव्यापी पक्ष नाही. ब्राम्हण वर्ग हा कधीही बसपा सोबत ईमानदारीने व निष्ठेने राहू शकेल असे वाटत  नाही. बी.एस.पी.ची विषमतेवर आधारीत हिंदुत्व विरोधी विचारधारा असल्याने मुस्लीम समाज पक्षाशी सहज जुडू शकतात. बहुजन समाजातील ओबीसी, आदिवासी व विमुक्त-भटके जमातीतील लोकांचा हिंदूमधील  धर्मांध वर्ग म्हणजेच प्रामुख्याने मनुवादी  वर्ग मुस्लिमाच्या विरोधात आजपर्यंत सैनिक म्हणून वापर करीत आला आहे. हा वर्ग जर मुस्लीमासोबत मित्रत्वाने वागायला लागला तर दंगली पेटणारच नाहीत. म्हणून मुस्लीम वर्ग बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या  बसपासोबत गुण्यागोविंदाने राहू शकतील यात काही शंका वाटत नाही.

      १९९५ मध्ये बी.एस.पी. उत्तरप्रदेशात सत्तेवर असतांना विश्व हिंदू परिषदेला मथुरा येथे कृष्णाचा वाढदिवस साजरा करू दिला नाही. कारण तेथे मस्जिद होती. आणि बाबरी मस्जिद नंतर ही मस्जिद पाडण्याचा त्यांचा मनसुबा होता. त्यामुळे मुस्लीम वर्ग बहीण मायावतीवर त्यावेळी खूष झाला होता. म्हणून मुस्लीम वर्ग हा बी.एस.पी. जवळ निश्चितच राहू शकतो.

बाबासाहेबांनी मनमाड येथील रेल्वे कामगारांच्या परिषदेत म्हटलेच होते की, ब्राम्हणशाही व भांडवलशाही हे कामगारांचे दोन शत्रू आहेत.  ह्या वर्गाने स्वत:च्या वर्चस्वासाठी इतरांवर अन्याय केल्याचे इतिहासात नमूद झाले आहे. या व्यवस्थेने निर्माण केलेल्या जाती संस्थेने केवळ अस्पृश्यांच्याच जीवनाचा विध्वंस केला असे नाही, तर तिच्यामुळे संपूर्ण भारत देशच उध्वस्त झाला आहे. ही गोष्ट कशी विसरता येईल?  म्हणून भारतीय इतिहासातील संघर्ष ब्राम्हण  विरुध्द ब्राम्हणेतर असाच आहे. त्याला आणखी पुरावा देण्याची गरज नाही. तरी विषाची परीक्षा पुन:पुन्हा करणे योग्य होणार नाही.            

            डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २१.१०.१९५१ रोजी पटियाला येथे दिलेल्या भाषणाची आठवण करून देऊ इच्छितो. ते कॉंग्रेसच्या बाबतीत बोलले होते की, ‘काय मांजर आणि उंदीर कधी एकत्र राहू शकतात? तसेच बनिया आणि शेतकरी एकत्रितपणे शांतीपूर्ण राहू शकतील? हाच प्रश्न ब्राम्हण आणि अस्पृश्य यांनाही लागू होतो. ब्राम्हण पाहतील की अस्पृश्यांना खालच्यातील खालच्या स्तरावर कसे ठेवता येईल. त्यांना कोणताही अधिकार मिळू नये असा प्रयत्न ते करतील. माणुसकीचे अधिकार देणार नाहीत. मग शोषक आणि शोषित, अत्याचारी आणि अत्याचारग्रस्त कोणत्यातरी राजनैतिक पक्षात एकत्र नांदू शकतील काय? म्हणून सर्व शोषित, पिडीत, दलित वर्गासाठी एक अलग आणि स्वतंत्र पक्ष असणे आवश्यक आहे. नाहीतर या वर्गाचा सत्यानाश होईल.’

तसेच गं.बा.सरदार यांच्या ‘गांधी आणि आंबेडकर’ या पुस्तकात उल्लेख आला आहे की, ‘कॉंग्रेस ही शोषक आणि शोषितांची आघाडी आहे आणि हे निश्चित आहे की, कॉंग्रेसमधील शोषक वर्ग कॉंग्रेसला बहुजनांच्या हितार्थ कार्य करू देणार नाही. राजकीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी शोषक आणि शोषितांच्या ऐक्याची गरज असेलही; परंतु समाजाच्या पुनर्रचनेसाठी शोषक आणि शोषितांनी एकाच पक्षात काम करणे म्हणजे बहुजनांची फसवणूक होय.’ असे बाबासाहेबांनी म्हटले आहे.

तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या इशारावर लक्ष देऊन आपण धोरण ठरविणे योग्य होणार नाही काय?.

            मा. कांशीरामजी पण क्वालालंपूरच्या भाषणात म्हणाले होते की, ‘जातीविहीन समाज निर्माण करण्यासाठी शासक बनणे आवश्यक आहे. तेव्हाच नवीन समाजाची निर्मिती करणे शक्य होईल.’ काय बहुजन समाज पार्टीच्या या उद्दिष्टासाठी ब्राम्हण समाज सहकार्य करतील असे वाटते? काय एकट्या उत्तरप्रदेशात ब्राम्हण वर्गाच्या सहकार्याने सत्ता आली म्हणजे सामाजिक परिवर्तनाचे हे उद्दिष्ट्य सफल होईल काय? त्यासाठी राज्याराज्यांत आणि दिल्लीची केंद्रीय सत्ता काबीज करणे आवश्यक नाही काय?

            येथे आणखी एक गोष्ट नमूद करणे अवाजवी  ठरणार नाही. बाबासाहेबांच्या मजबूत संघटनेकडे पाहून वल्लभभाई पटेल म्हणाले होते की, ‘संघटना असावी तर डॉ. बाबासाहेबांसारखी.’ त्यावर बाबासाहेब म्हणाले होते की, ‘तुम्ही या संघटनेमध्ये बिघाड होऊ देऊ नका. हंडाभर दुध नुसत्या मिठाच्या खड्याने नासते.’ (जनता दि.२३.०७.१९३८) तेव्हा ब्राम्हणांच्या शिरकाव्यामुळे (परिवर्तनवादी ब्राम्हण  सोडून) पक्ष नासणार तर नाही ना याची काळजी घ्यायला नको कां ?

            तसेच राजश्री शाहू महाराजांनी दि. २० व २१ मार्च १९२०च्या माणगाव परिषदेत जे सांगितले होते तेही लक्षात घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले होते की, ‘आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेत पोहचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळविण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही आपलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवितात. पशुपक्षी देखील आपल्याच जातीचा पुढारी करितात. पक्षात कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही. चतुष्पादी कधीही पक्षाचा पुढारी नसतो. गाय, बैल, मेंढरे यात मात्र धनगर त्यांचा पुढारी असतो. त्यामुळे शेवटी त्यांना कत्तलखान्याकडे जावे लागते.’ यदाकदाचित भविष्यात पक्षाचा पुढारी जर एखादा ब्राम्हण झाला तर आपली गत राजश्री शाहू महाराज सांगतात तशी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भीती वाटते.

      हजारो वर्षापासून ज्या मनुवाद्याचे मन परिवर्तन झाले नाही, त्यांच्यात बहीण मायावतीच्या ‘सोशल इंजिनिअर’च्या सूत्राने एकाएकी कसा बदल झाला याचे आश्चर्य वाटते.  ज्या ब्राम्हणवादाविरुद्ध बहीण मायावती संघर्ष करीत होत्या, त्याच वर्गाला आपल्या पक्षात सामावून घेतात याला काय म्हणावे?

      बी.एस.पी.तर्फे निवडून गेलेले ब्राम्हण खासदार संसदेत कोणते कार्य करितात, त्या बाबत ‘दैनिक महानायक’चे संपादक सुनील खोब्रागडे यांनी ‘फेसबुक’वर जो लेख टाकला तो माझ्या वाचण्यात आला. त्यातील उतारा उदबोधक वाटला म्हणून  माहिती करीता येथे देत आहे.

      “बसपाच्या कपील मुनी कारवारिया या खासदाराने निवडून आल्यापासून  एकूण 17 चर्चांमध्ये सहभाग घेतला. यापैकी दोन चर्चा गंगा नदीचे वाढते प्रदुर्षण  रोखण्यासाठी उपाय करणे व तीन चर्चा गंगा नदीवर भक्तजनांना आंघोळ करण्यासाठी घाट बांधण्यासंदर्भात होत्या. इलाहाबाद येथे चालू असलेल्या कुंभ मेळ्यासाठी सरकारी निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी आवाज उठविला. त्यांनी आतापर्यंत एकूण 226 पश्न लोकसभेत विचारले यापैकी एकही पश्न दलितांशी संबंधित नव्हता. देशाच्या इतर प्रांतात घडलेल्या दलितांवरील अत्याचाराबाबत वा अन्य पश्नांबाबत बसपाने लोकसभेत कधी ठोस चर्चा घडवून आणली नाही. यावरुन बहुजन समाज पार्टी खरोखरच दलित – शोषितांचे हित जपणारी आहे की, अन्य कुणाचे हित जपणारी आहे हे लक्षात यावे?”

      ते पुढे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या खासदाराच्या कामगिरीबाबत लिहितात की,

“याउलट चित्र शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या नावाने निवडून आलेल्या व नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे नाव धारण केलेल्या खासदारांनी केलेल्या कामगिरीचे आहे. या  पक्षाचे दुसऱ्या लोकसभेत (1957-1962) एकूण 9 सदस्य होते. या सदस्यांनी  अनुसूचित जाती, आदिवासी, इतर मागासवर्ग यांच्या हिताच्या पश्नासाठी संसदेला अनेकवेळा धारेवर धरले होते. 14 फेब्रुवारी 1958 रोजी खा. दत्ता कट्टी यांनी अनुसूचित जातीतून बौद्ध धर्मात धर्मांतर केलेल्या लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती लागू कराव्यात यासाठी ठराव आणला. याच मुद्यावर 13 ऑक्टोबर 1958 ला औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. खा. दादासाहेब गायकवाड यांनी 19 मार्च 1959 रोजी अनुसूचित जाती, आदिवासी, इतर मागासवर्ग यांच्या पश्नांवर लोकसभेला हलवून सोडले. `या वर्गांच्या हिताची सरकारला खरोखरच चिंता असेल तर सरकारने पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांना व्यापार धंद्यासाठी ज्या सवलती दिल्या आहेत तशाच सवलती अ.जा./ जमाती/ ओबीसी यांनाही द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली. रेल्वे स्टेशनात पाणी वाटपाचे काम मेहतर-भंगी समाजाला देण्यात यावे. स्टेशनवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे परवाने अ.जा./ जमाती/ ओबीसी यांना देण्यात यावे. सरकारच्या सर्व खात्यात आरक्षण धोरणाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी केली.’ त्यांच्या   पाठपुराव्यामुळे शेवटी सरकारने मार्च 1962 मध्ये आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याची शासननिर्णय काढला. मार्च 1959 मध्ये खा. एन. शिवराज यांनी समाजवादाच्या गप्पा करणाऱ्या  प्रधानमंत्री नेहरुंना `पथम ब्राम्हणवाद नष्ट करा नंतर समाजवादाच्या गप्पा मारा.’ असे खडसावले. गुजरातमधून निवडून आलेल्या के. यु. परमार यांनी 24 एपिल 1959ला अनुसूचित जाती अहवालावर बोलताना अनुसूचित जातीच्या हिताची चिंता न करणाऱ्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असे सुनावले. राज्यसभेचे खासदार असलेल्या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी ग्रामपंचायत बिलावर बोलताना `ग्रामपंचायतीला अधिक अधिकार देणे म्हणजे मनूचा कायदा लागू करणे होय’ या शब्दात सरकारची निर्भर्त्सना केली. मार्च 1960 मध्ये खा. प्रकाशवीर शास्त्री यांनी धर्मांतरविरोधी विधेयक लोकसभेत मांडले होते. या विधेयकाला विरोध करताना खा. दादासाहेब गायकवाड यांनी भर सभागृहात मनुस्मृतीचे पाने टराटरा फाडून खा. शास्त्रीच्या अंगावर भिरकावली. दलितांचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेल्या खासदारांनी कशाप्रकारे कार्य करावे याचा वस्तुपाठच या खासदारांनी घालून दिल्याचे दिसून येईल.”

तसेच आणखी ते पुढे लिहितात की,                                    

      “डॉ. आंबेडकरांच्या मतानुसार `ज्या समाजात जाती आधारित विषमता अस्तित्वात असते त्या समाजात पक्षपातीपणा आणि विरोधीवर्गाला दडपून टाकण्याची प्रवृत्ती जोर धरीत असते. राजकीय शक्तीचा वापर सर्वांच्या विकासासाठी करण्याऐवजी आपल्या वर्गाच्या भरभराटीसाठी आणि विरोधीवर्गाला मातीत मिळविण्यासाठी  केला जाण्याची अधिक शक्यता असते त्यामुळे अशा समाजात राजकीय सत्ता मिळविण्यासोबतच सामाजिक समता पस्थापित करण्यासाठीही संघर्ष उभा केला पाहिजे. ‘बहुजन समाज पक्षांच्या खासदारांची  लोकसभेतील कामगिरी पाहिल्यास याची प्रचीती येते. सर्वजन समाजाचे  हित जपण्याचा दावा करणाऱ्या व ब्राह्मणांच्या सहाय्याने देशाची सत्ता हातात घेऊ पाहणाऱ्या बहुजन समाज पक्षाने डॉ. आंबेडकरांचा हा इशारा ध्यानात घेऊन कार्य केल्यास देशातील परिवर्तनवादी जनता निश्चितच या पक्षाच्या मागे उभी राहिल. मायावतीच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्ष मात्र या मार्गाने जाताना दिसत नाही.”

            तेव्हा ब्राम्हणांचा पक्षातील सहभाग घेतांना काही पथ्य पाळणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा सहभाग एका  विशिष्ट मर्यादेपर्यंतच ठेवला होता. ही मर्यादा ओलांडल्या जाणार नाही, अशीच काळजी पक्ष नेतृत्वाने घ्यावी असे वाटते. कारण बी.एस.पी. हा पक्ष दलितांचा, उपेक्षितांचा, बहुजन समाजाचा व आंबेडकरी विचारावर आधारीत असावा,  असेच जर सर्वांना वाटत असेल तर त्यात गैर असे काही नाही.

            ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’च्या ऐवजी ‘सर्वजण हिताय सर्वजण सुखाय’ या  नवीन संकल्पनेचा पक्षाने स्वीकार केल्याने ब्राम्हण वर्गाला पक्षात शिरकाव करण्यास मोठा वाव निर्माण झाला आहे. मा. कांशीरामजी यांनी बामसेफ निर्मितीच्या वेळेस मागास व अल्पसंख्याक समाजातील शिकलेल्या कर्मचाऱ्यांना संघटीत करण्याचा उद्देश असा ठेवला होता की, हे लोक फुले-आंबेडकरी चळवळीचे लाभार्थी होते, म्हणून त्यांनी ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाची गुलामी नष्ट करणे असा उदात्त हेतू होता. त्यावेळी ‘सर्वजण हिताय’ची संकल्पना कोणाच्याही डोक्यात अवतरली नव्हती. मग आताच या संकल्पनेच्या आहारी जावून ब्राह्मणांना निमंत्रण का द्यावे ते अनाकलनीय आहे. खरेच पक्षात आलेल्या ब्राम्हणांनी बी.एस.पी.ची विचारधारा स्वीकारली की सत्तेच्या लालसेपायी आले, हे तपासण्याची कोणती कसोटी आहे?

 ‘आ बैल मुझे मार’ असे भविष्यात तर घडणार नाही ना अशी भीती वाटल्यास नवल नाही! कारण भारतातील सर्व समाजात ब्राम्हण वर्ग हा अत्यंत लवचिक वर्ग मानल्या जातो. ‘जिधर दम उधर हम’. मग ‘दम’ वाल्यांनाच खतम करण्याची त्यांची रणनीती ते आखत असल्याचे इतिहासात नमूद झाल्याचे दिसते.

बुध्द धम्मात एकेकाळी ७५ टक्के ब्राम्हण भिक्कू संघात असतांनाही सम्राट अशोकाचा नातू बृहदथ यांचा ब्राम्हण सेनापती पुष्यमित्र श्रुंगाने खून करून सत्ता बळकावली व या वर्गाने बुध्द धर्म भारतातून खलास करण्याचे पातक केले. हे एक त्याचे फार मोठे उदाहरण आहे.

ब्राम्हणी समाज व्यवस्थेमुळेच बहुजन समाज कित्येक शतके केवळ उपेक्षितच राहिला नाही तर तो आर्थिदृष्ट्या शोषितही राहिला. अन या व्यवस्थेत पशूपेक्षाही नीच अवस्थेत जगला आणि त्याच अवस्थेत ठेवण्यासाठी त्यांच्यावर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि मानसिक गुलामगिरी लादली. ही गोष्ट कशी विसरता येईल?

हा समाज, त्यांची संघटना, त्यांची चळवळ अगदी डोळ्यात तेल घालून क्षणोक्षणी जाग्रृत असते. मग त्यांच्या कल्याणाची कळकळ आपल्या पक्षाने का म्हणून बाळगावी? तरी  सर्वजण हितायची संकल्पना पक्षाने सोडून द्यावी असे वाटते.

१५.  जिल्हा स्तरावर अद्ययावत पक्षाचे कार्यालय असावेत.

            निदान जिल्हा स्तरावर अद्ययावत पक्षाचे कार्यालय उघडण्यात यावेत. या कार्यालयात फर्निचर, संगणक व टी.व्ही.ची सोय असावी. शिवाय कार्यकर्त्यांची मिटींग घेता येईल एवढीतरी जागा असावी. एखाद्या बाहेरच्या कार्यकर्त्याला राहायचे काम पडले तर त्याला राहता यावे अशी सोय असावी. पक्षाची अशी सुविधा पाहून कार्यकर्ते हरकून जातील.

१६. कायमस्वरुपी निधी उभारण्याबाबत

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील १९.०७.१९४२ रोजीच्या भाषणात म्हणाले होते की, ‘कॉग्रेसची संघटना मोठी असून त्याचा प्रभाव चारही बाजूने पसरली आहे. त्याचे कारण कॉंग्रेसकडे महत्वपूर्ण दोन बाबी आहेत. एक प्रेस (मिडीया). तो नेहमी कॉग्रेसच्या मागे उभा राहतो. कॉग्रेसचा प्रचार करतो. दुसरे धन. त्यांच्या यशात धनाचे रहस्य दडलेले आहे. म्हणून आम्हाला धन जमा केले पाहिजे. त्याशिवाय इतर संघटनासोबत बरोबरी करू शकणार नाही.’

            पूर्वी बामसेफ ही संघटना निधी जमा करून पक्षाला पुरवीत असत. आता बामसेफ बरखास्त करण्यात आल्यामुळे ही यंत्रणा ठप्प झालेली आहे.

            तसेच मा. कांशीरामजी असतांना निवडणुकीच्या काळात ‘नोट दो, व्होट दो.’ असे एक अभियान राबविले जात होते. त्यामुळे घरोघरी जावून प्रचार होत होता. लोकांशी थेट संपर्क  होत होता. त्याशिवाय निवडणूक निधी पण काही प्रमाणात तयार होत होता. म्हणून निधी गोळा करण्यासाठी अशा प्रकारचे काही विशिष्ट व कायम स्वरूपाची यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.

            भाजप व कॉंग्रेस सारख्या भांडवलदार व मनुवादी पक्षाकडे उद्धोगपती, कारखानदार व श्रीमंत वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात निधी निर्माण होत असतो. ह्या निधीचा उपयोग करून निवडणुका जिंकतात व सत्तेवर आल्यानंतर निवडणुकीत ओतलेला पैसा दाम दुपट्टीने काढून घेतात. निवडणूक आणि सत्ता हे त्यांच्यासाठी उद्योग झाला आहे. जसे एखाद्या धंद्यात पैसे गुंतवा व नंतर पैसे काढा. तसेच निवणुकीत पैसे गुंतवा व सत्ता मिळाल्यावर पैसे काढा. राजकारण हे त्यांच्यासाठी जरी धंदा असला तरी आपल्यासाठी मिशन आहे. म्हणून आपण आपल्याच ताकदीवर निधी उभारला पाहिजे. आपणही जर मनुवादी भांडवलदार वर्गाकडून निधी घेतला तर त्यांच्या इशारावर आपल्याला नाचावे लागेल. म्हणून याबाबत पक्षाने सतर्क राहायला पाहिजे.

      मनुवादी मानसिकतेचे उद्धोगपती व भांडवलदार वर्गाचे राजकारणात हस्तक्षेप करण्यापासून थांबावयाचे असेल तर निवडणुकीसाठी त्यांच्या पैशाची मदत घेणे थांबविले पाहिजे. कारण त्यांच्या पैशाने निवडून आलेले प्रतिनिधी त्यांचे लाचार बनतात. मग ते त्यांचेकडून कामे करून घेवून निवडणुकीत लावलेला पैसा दाम दुपट्टीने वसूल करतात. या बाबत १६ मे १९३८ रोजी चिपळूण येथील भाषणात डॉ.बाबासाहेब आबेडकर म्हणाले होते की, ‘कॉंग्रेस ही आतापर्यंत शेटजी भटजीच्या पैशावर पोसली जात असल्यामुळे ती त्यांची बटिक होऊन राहिली आहे. जो ज्यांचे अन्न खातो तो त्यांचा मिंधा होतो.’ (डॉ. बाबासाहेब आबेडकर-लेखन व भाषणे खंड १८ ) निधी उभारण्याबाबत बाबासाहेबांचे हे मार्गदर्शन आपण लक्षात घेतले पाहिजे.

      तसेच उभारलेला निवडणूक निधी खर्च करण्यासाठी व्यवस्थापन समिती नेमावी. यात बी.एस.पी. व बामसेफचे प्रामाणिक कार्यकर्ते असावे. त्यांच्या मार्फतच निवडणुकीचा खर्च करावा. म्हणजे भ्रष्टाचार रोखला जाऊन खऱ्या अर्थाने निवडणुकीसाठीच खर्च केला जाईल याची खात्री निर्माण होईल. 

१७. कायम स्वरुपी प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे

            स्वत: शिकून इतरांना शिकविणे, संघटीत होणे व संघर्ष करणे हे चळवळ यशस्वी करण्याचे सूत्र बाबासाहेबांनी सांगितले आहे. म्हणून चळवळीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे ही महत्वाची बाब आहे.

            रिपब्लिकन पक्षात तरुणांची भरती होत राहावी म्हणून राजकारणात प्रत्यक्ष भाग घेऊ इच्छिणाऱ्यासाठी मुंबई येथे एक प्रशिक्षण विद्यालय (ट्रेनिंग स्कूल) सुरु करावे असे बाबासाहेबांनी ठरविले होते. (डॉ.बाबासाहेब आंबेडकर ले.धनंजय किर)

            आपल्याकडे प्रचाराचे साधने अत्यंत तुटपुंजे आहेत. तेव्हा वैयक्तिकरित्या तोंडाने जो काही प्रचार करता येईल त्यावर भर देण्यात यावा. प्रचार करणारा कार्यकर्ता हा प्रशिक्षित कॅडर असावा. त्याला मिटींग, सभा व लोकांपुढे बोलतांना पक्षाची विचारधारा मांडता आली पाहिजे. म्हणून त्याला काही विशिष्ट कालावधीसाठी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात यावे. या प्रशिक्षणात बहुजनांना लाचार व गुलाम बनण्याचे कारणे, महापुरुषांचा संघर्ष, समता, स्वातंत्र्य व बंधुत्वावर आधारीत भगवान बुध्दाचा धम्म, इत्यादी अभ्यासक्रम असावा. पक्षाचा पदाधिकारी नेमतांना त्याने हे प्रशिक्षण घेतल्याचे बंधनकारक करावे. नेतृत्व निर्माण करणारी अशा प्रकारची यंत्रणा राबविण्यात यावी. अशा प्रकारचे परिपूर्ण नेते पक्षात जेव्हा निर्माण होतील तेव्हा त्या पक्षाला कधी ग्रहण लागेल असे वाटत नाही.

१८. वेळोवेळी  चिंतन बैठका, परिषदा घेणे

            पक्षाचे कार्य व विस्ताराबाबत सतत विश्लेषण करण्याकरीता वेळोवेळी चिंतन बैठका, परिषदा घेणे आवश्यक आहे असे वाटते. तसेच पक्षाच्या  कार्यातील अडथळे लक्षात घेवून योग्य त्या दिशेने मार्गक्रमण करण्यास मदत होऊ शकते.  

१९. सहकारी, शैक्षणिक संस्थेत भाग घेणे

            जेथे जेथे लोकाचा संबंध येतो त्या त्या ठिकाणी बी.एस.पी.ने आपली माणसे पेरले पाहिजेत. सद्या देशात सहकारी संस्थेचे फार मोठे जाळे खेड्यापाड्यात व शहरात सर्वदूर पसरले आहे. जंगल सोसायटी, मजूर सोसायटी, दुध संकलन सोसायटी, दुध संघ, खरेदी-विक्री संघ, पत पुरवठा सोसायटी असे अनेक प्रकारच्या सोसायट्या खेड्यापाड्यात व शहरात कार्यरत असतात.  महिलांचे बचत गट पण ठिकठिकाणी कार्यरत झालेले आहेत. ह्या संस्था त्यांच्या सभासदांना सोयी-सुविधा पुरवीत असतात. यात आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतात. या सोसायट्यात  कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसचे पाळेमुळे खोलपर्यंत रुतलेले आहेत. त्याद्वारे निवडणुकीवर प्रभाव टाकीत असतात. तसेच यावर काही लोकांचे गुजराण होत असते. म्हणून बी.एस.पी.ने या माध्यमाचा फायदा मतदार बांधण्यासाठी आणि कार्यकर्त्याच्या गुजराणसाठी करून घ्यावा.

तसेच भारतातील दलित, शोषित समाजाला आपले शोषण संपविण्यासाठी स्वत:ची अर्थव्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. श्रीमंत लोक नोटांनी व्होट विकत घेतात. याला प्रामुख्याने गरीब लोक बळी पडतात. म्हणून आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होण्यासाठी सहकारीतेचा आधार घेणे हा एक मार्ग आहे. भारतातील बहुजन समाज हा फार मोठा उपभोक्ता वर्ग आहे. त्यामुळे फार मोठी उलाढाल करण्यास हा वर्ग सक्षम आहे.

            तसेच शैक्षणिक संस्थेतील शाळा, कॉलेज, वसतिगृह यात सुध्दा मुलं व पालक वर्गाचा संबंध येत असतो. तेव्हा या क्षेत्रात सुध्दा बी.एस.पी.ने आपला शिरकाव  करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून शिक्षणसंस्थाचे जाळे सर्वदूर पसरविले पाहिजे. त्याचप्रमाणे ग्रामीण क्षेत्रातून शहरी भागात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांमुलींसाठी वसतिगृहे काढून त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली पाहिजे. कारण शहरात खोली करून राहणे व बाहेरचे जेवण घेणे फारच खर्चिक असते. हा खर्च गामीण विद्यार्थ्यांना झेपत नाही. ही सोय जर पक्षाने किवा पक्षाशी संबंधीत नेत्याने किवा कार्यकर्त्यांनी माफक खर्चात मोठ्या प्रमाणात केली तर ग्रामीण क्षेत्रातील मुलांमुलींचा महाविद्यालय व उच्च शिक्षणासाठी फार मोठा ओढा वाढेल. आणि त्यामुळे बहुजन समाजात उच्च शिक्षणाचा प्रचार व प्रसार होवून रोजगार मिळविण्यास मदत होईल.

आम्ही शाळा शिकत असतांना वसतिगृहात राहत होतो. निवडणूक आली की संचालक आम्हाला कांग्रेसचा प्रचार करण्यासाठी आपापल्या गावाला पाठवून देत होते. वसतिगृहाचे चालक विद्यार्थ्यांचा असाही उपयोग करून घेत असत.

            पूर्वी बामसेफ संघटनेच्या जडणघडणेत सहकाराचा अंतर्भाव होता. आताही या मुद्याकडे लक्ष द्यावे असे वाटते.

२०. इतर सामाजिक संघटनाशी संबंध प्रस्थापित करणे

            बहुजन समाज पार्टी ही केवळ राजकीय संघटना नसून ती सामाजिक संघटना सुध्दा आहे. म्हणून पक्षाचा सामाजिक आयाम सुध्दा दिसला पाहिजे.

            महाराष्ट्रात अनेक संघटना फुले-आंबेडकरी तसेच ओबीसी, आदिवासी, भटके व मुस्लीम समाजात सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक स्तरावर काम करीत आहेत. त्यांच्याशी पक्षाने समन्वय ठेवावा असे वाटते. जसे भाजप-शिवसेना यांनी हिदुत्ववादी संघटनांशी अंतर्बाह्य संबंध ठेऊन धार्मिक आधारावर यंत्रणा निर्माण केलेली आहे. याच माध्यमातून त्यांना निवडणुकीत फायदा मिळत असतो. अशीच यंत्रणा पक्षाने निर्माण करून राबवावी व बहुजन समाजातील सर्व घटकांशी सलोख्याचे नाते निर्माण करावे: म्हणजे बहुजन समाज पार्टीचा मानवतावादी चेहरा समोर येईल  असे वाटते.

२१. समाजाच्या इतर वर्तमानपत्रासोबत संबंध प्रस्थापित करणे

            महाराष्ट्रात आता आंबेडकरी चळवळीचे काही दैनिके सुरु झाली आहेत. त्यात वृत्तरत्न सम्राट, विश्वरत्न सम्राट, लोकनायक, महानायक हे दैनिके प्रमुख आहेत. पक्षाच्या कार्यक्रमाच्या जाहिराती देऊन त्यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करावे; म्हणजे ते पक्षाच्या बातम्या देऊन चळवळीच्या प्रचाराला व प्रसाराला ते मदत करू शकतील..

२२. समविचारी आंबेडकरी पक्षांशी युती करणे

            बहुजन समाजात कायम स्वरूपात दुफळी आणि उच्चनीचतेचे वैर राहावे म्हणून मनुवादी व्यवस्था सदोदित प्रयत्न करीत आले आहेत. बहुजन समाज मनुवादी धर्माला चिकटून असल्याने त्यांनी पुरस्कार केलेल्या पक्षाचे अस्तित्व टिकून आहे. जोपर्यंत बहुजन समाज जातीजातीत विखुरलेले आहेत तोपर्यंत मनुवादी विचारधारा निश्चितच प्रबळ राहील. म्हणून धर्माच्या नावाखाली या सर्व शोषितांचे धर्म, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात मुक्तपणे शोषण करणे सहज शक्य झाले आहे. परंतु ज्यावेळी फुले- शाहू-आंबेडकरी विचारांनी बहुजन समाज पूर्णपणे जागृत होतील; त्यावेळी भारतात लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांगीण सम्यक क्रांती होण्यास कुणीही अडवू शकणार नाही.

म्हणूनच हिंदुत्ववादी पक्ष भाजप व शिवसेना, गांधीवादी पक्ष कॉग्रेस व राष्टवादी कॉंग्रेस, साम्यवादी पक्ष भाकप व माकप  एकमेकांशी युती करून ताकद निर्माण करतात. निवडून येतात. एकतर सत्तेत राहतात किवा विरोधी पक्ष म्हणून वावरत असतात. तसेच बी.एस.पी.ने आपले नैसर्गिक मित्र पक्के केले पाहिजे. अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त जाती, ओबीसी, बौध्द, मुस्लीम, शीख, ख्रिचन हा वर्ग बी.एस.पी.चा निश्चितच नैसर्गिक मित्र आहेत. हे काय सांगायला पाहिजे असे नाही. मग त्यांच्या संघटना आणि त्यांचे पक्ष यांना का जवळ करू नये? आंबेडकरी पक्ष, त्यांचे निरनिराळ्या गट आणि विविध पुरोगामी पक्षाने एकत्र येऊन  समान कार्यक्रमाच्या आधारावर सामंजस्य निर्माण करावे. बहुजन समाजाच्या हिताचे कार्यक्रम राबवावेत, एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात म्हणजे पक्षाला त्याचा निश्चितच फायदा होईल.

असेच धोरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा असल्याचा  उल्लेख य.दी.फडके यांनी लिहिलेल्या ‘डॉ.आबेडकरांचे मारेकरी अरुण शौरी’ या पुस्तकात आला आहे. त्यात लिहिले आहे की, ‘१९५२ च्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीसाठी शेड्युल्ड कास्ट फेडेरेशनतर्फे बाबासाहेबांनी जो जाहीरनामा प्रसिध्द केला त्यामध्ये दलित, आदिवासी व अन्य मागासवर्गीय यांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी देशातील दारिद्र्य व निरक्षरता यांचे निर्मूलन होण्याची आवश्यकता स्पष्ट केली होती. या निवडणुकीत शेड्युल्ड कास्ट फेडेरेशनचा कॉंग्रेस, हिंदूसभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इत्यादिंना तीव्र विरोध असला तरी आचार्य कृपलानीचा कृषक मजदूर पक्ष, समाजवादी पक्ष, तामिळनाडूतील जस्टीस पार्टी इत्यादी पक्षांनी आघाडी स्थापन केल्यास त्यांना सामील होण्याची शेड्युल्ड कास्ट फेडेरेशनची तयारी होती. या निवडणुकीसाठी शेड्युल्ड कास्ट फेडेरेशनने मुंबई प्रांतात समाजवादी पक्ष व काही जागांसाठी शेतकरी कामगार पक्षाशी सुध्दा युती केली होती.’

            महाराष्ट्रात आर.पी.आयचे अनेक गट कार्यरत आहेत. त्यांचेही काही ठिकाणी पॉकेट्‌स आहेत. जसे प्रकाश आंबेडकर याच्या भारिप-बहुजन महासंघाचे कार्य अकोला, नांदेड  जिल्ह्याच्या  परिसरात चांगले आहे. त्यांचे दोन आमदार असून जिल्हा परिषद, महानगरपालिका व काही पंचायत समित्या त्यांच्या ताब्यात आहेत. जोगेंद्र कवाडे यांचे नागपूर, रा.सु.गवई यांचे अमरावती, गंगाधर गाडे यांचे औरंगाबाद, तर रामदास आठवले यांचे पुणे-मुंबई या परिसरात थोडेफार कार्य आहे, हे सत्य नाकारता येत नाही. हे सारे आंबेडकरी विचारांचे गट एकत्र आलेत तर महाराष्ट्रात काही ठिकाणी आमदार, खासदार निवडून येऊ शकतात. १९५२, १९५७ च्या निवडणुकीत शेडयुल्ड कास्ट फेडरेशन व रिपब्लिकन पार्टीचे आमदार, खासदार निवडून आले होते.

            तसेच पश्चिम महाराष्ट्रात धनगर समाजाचे महादेवराव जानकर जे पूर्वी मा. कांशीरामजी असतांना बी.एस.पी. मध्ये काम करायचे, त्यांनी नंतर वेगळा पक्ष काढून एक आमदार निवडून आणला आहे. तसेच कोकणात कुणबी समाजाची सुध्दा राजकीय संघटना आहे. शेतकरी कामकरी पक्ष सुध्दा पनवेल-रायगड च्या परिसरात काम करतात. त्यांचेही आमदार निवडून येत असतात. तेव्हा अशा बहुजन समाजातील संघटनांसोबत बी.एस.पी.ने जवळचे संबंध निर्माण करावेत असे वाटते.

            जो लहानपण घेतो तोच भविष्यात मोठा होतो. म्हणून बी.एस.पी.ने लहानपण घेऊन समविचारी, परिवर्तनवादी पक्षाकडे, गटाकडे, संघटनेकडे जावून सामायिक मोट बांधावी असे वाटते.

            सध्या मनुवादी व्यवस्थेने राष्ट्रीय स्तरावर मतदारांसमोर दोनच पर्याय उपलब्ध करून ठेवले आहेत. एक कॉग्रेस प्रणीत यूपीए व  दुसरा भाजप प्रणीत एनडीए. मतदार कॉग्रेसला विटलेत की भाजपाला सत्तेवर आणतात. भाजपला विटलेत की कॉग्रेसला सत्तेवर आणतात. म्हणजे आलटूनपालटून दोघेही वर्षोनुवर्षे सत्ता उपभोगत असतात. याशिवाय त्यांच्या समोर सशक्त असा तिसरा पर्याय दिसत नाही. हीच खेळी आता बी.एस.पी.ने खेळली पाहिजे असे वाटते. म्हणून राष्ट्रीय स्तरावर समविचारी पक्षांना, गटांना एकत्र करून ‘परिवर्तनशील मोर्चा’ बनविण्यासाठी बी.एस.पी.ने पुढाकार घ्यावा. म्हणजे जनतेला सशक्त असा तिसरा पर्याय मिळू शकतो.

२३. बहुजन समाजात कार्यरत असलेल्या बामसेफ/एम्बस सारख्या संघटनांशी समन्वय ठेवणे

            मुळात मा. कांशीरामजींनी स्थापन केलेल्या बामसेफ मधून फुटून बी.डी.बोरकर आणि वामन मेश्राम यांचे अलगअलग बामसेफ संघटना निर्माण झाल्यात. तसेच पुर्वी मा. कांशीरामजी असतांना पी.बी.एस.पी. या संघटनेत काम केलेले विजय मानकर यांनी सुध्दा एम्बस नावाची वेगळी संघटना स्थापन केली. या संघटनेत मुख्यत: कर्मचारी-अधीकारी वर्ग ओढल्या गेला आहे. त्यांनी आर्थिक व बौद्धिक साधनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली आहे. यांच्या संघटनेचे नियमित अधिवेशने, कॅडर कॅम्पस, मिटींगा होत असतात. वामन मेश्राम आपल्या कार्यक्रमाच्या पोस्टरवर मा. कांशीरामजी यांचा फोटो छापतात.

            या  संघटनांच्या विचारधारा पक्षाच्या विचाराधाराशी समान  आहेत. तेव्हा या संघटनांशी सौहार्दपूर्ण नाते निर्माण करून त्याचा पक्षाला उपयोग करून घ्यावा असे वाटते. त्यामुळे त्यांचेशी जुळलेला बहुजन समाजातील कर्मचारी-अधिकारी वर्ग जवळ येतील.

            तसेच आदिवासी व ओबीसींच्या संघटना कार्यरत आहेत. ओबीसी सेवा संघ व मराठा सेवा संघ ह्या संघटना त्यांच्या समाजातील कर्मचारी-अधिकारी वर्गात काम करीत असतात. त्यांचेशी पण बी.एस.पी. ने समन्वय साधला पाहिजे असे वाटते. त्यामुळे पक्षाला व्यापक स्वरूप मिळेल.

२४. बंद पडलेले वर्तमानपत्र परत सुरु करणे.

            ‘ज्या चळवळीला वर्तमानपत्र नसते त्या चळवळीची अवस्था पंख नसलेल्या पक्षासारखी असते.’ असे बाबासाहेब म्हणायचे. पूर्वी पक्षाने प्रकाशित केलेले मराठीत ‘बहुजन नायक’ व हिंदीत ‘बहुजन संघटक’ असे दोन प्रमुख साप्ताहिक वाचण्यात येत होते. या पेपरद्वारे चळवळीची हालचाल कळत होती. पक्षाच्या राजकारणाची दिशा कळत होती. मान्यवरांचे मार्गदर्शन मिळत होते. त्यातील  लेख वाचून प्रबोधन होत असे. आमच्यासारखे कार्यकर्ते हे पेपर नोकरीच्या ठिकाणी घरोघरी जावून वाटत होतो. त्यामुळे या निमित्ताने लोकांशी संपर्क राहत होता. नंतरच्या काळात दोन्हीही पेपर बंद करण्यात आल्याने विरोधकांनी पक्ष अथवा नेतृत्वावर केलेल्या चिखलफेकीची सत्य बाजू कळण्यास मार्ग उरला नाही. त्यामुळे पक्ष वाढीला मोठी खीळ बसली आहे.  इतर मनुवादी व भांडवलवादी पेपर आपल्या विरोधातील प्रचारासाठी त्यांच्या माध्यमाचा सर्रास वापर करीत असतात, ही गोष्ट काही लपून राहिलेली  नाही.

            लोकं आपल्या वर्तमानपत्राअभावी त्यांचे वर्तमानपत्र रोज वाचीत असतात. त्यात प्रदर्शित झालेले मते वाचून ते आपले मते बनवित असतात. ते मते आपले स्वतःचे पण असू शकत नाहीत. त्यामुळे जनमत आपल्या बाजूने वळविण्याऐवजी कित्येकवेळा आपल्या विरोधात गेल्याचे चित्र दिसून येते.

            असे कित्येकदा अनुभवास आले की, भाजपचे अटलबिहारी वाजपेयी किवा एल.के.अडवाणी कुठेतरी एखाद्या लहानशा कार्यक्रमात बोलले तरी त्याची बातमी पेपरमध्ये ठळकपणे येत असे  पण मा. कांशीरामजी यांची मोठमोठ्या सभा व्हायच्या पण त्याची कुठेही बातमी झळकत नव्हती.

            मी दिल्लीला असतांना प्रत्यक्ष पाहिले की, १५ मार्च १९९१ रोजी देशभरात फिरलेल्या ‘परिवर्तन रॅली’च्या समारोपाच्या सभेला देशभरातून ५ लाखाच्या वर लोक आले होते, पण दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये या सभेचा वृतांत न देता राजघाट वरील म.गांधीच्या समाधीला नुकसान केलेल्या प्रकरणाचा बी.एस.पी.च्या कार्यकर्त्यावर दोषारोप करून प्रत्येक वर्तमानपत्रानी गाजावाजा करून या सभेच्या भव्यतेला दाबण्याचा प्रयत्न केला. ऐवढेच नव्हेतर नंतरही दोन-तीन दिवस सतत मा. कांशीरामजी व बहीण मायावती  यांना अटक करावी असे संपादकीय लेख प्रकाशित झाले होते. परंतु जेव्हा या प्रकरणाचा छडा मा.कांशीरामजी यांनी लावला तेव्हा लक्षात आले की, हे प्रकरण कॉग्रेसच्या लोकांनी घडवून आणले. या बाबतीत त्यांनी राजीव गांधी यांना फोन करून खडसावले, या प्रसंगाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. कारण त्यावेळी मी बी.एस.पी.च्या दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात काम करीत होतो. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन ही बाब त्यांनी पत्रकाराच्या नजरेस आणली. तेव्हापासून हे प्रकरण भांडवलदाराची मालकी असणाऱ्या व ब्राम्हणवादी मानसिकता असणाऱ्या संपादकांनी निमुटपणे बंद केले.      

            बहीण मायावतीची संपत्ती उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे  व सी.बी.आय.ने त्यावर केलेली चौकशीचे प्रकरणे प्रसार माध्यमे सतत राहून राहून प्रचारात आणत असते. त्याची दुसरी बाजू सर्वसामान्य लोकांना कळत नाही. त्यामुळे बहीण मायावतीची प्रतिमा खराब करण्यास काही प्रमाणात ते यशस्वी होतात.  एखाद्या व्यक्तीविषयी संशय फार लवकर पसरविला जातो, परंतु तो पुसून टाकायला मात्र दीर्घकाळ लागतो. आपली जर प्रसार माध्यमे असती तर या प्रकरणाची दुसरी बाजू जनतेला कळली असती. तरी बी.एस.पी. ने पुन्हा पेपर सुरु करावेत असे वाटते. एवढेच नव्हेतर महाराष्ट्रात जसे शिवसेनेने   ‘सामना’, कॉंग्रेसने ‘लोकमत’, भाजपने ‘तरुण भारत’ नावाचे  दैनिक वर्तमानपत्र सुरु केले,  तसेच पक्षाने सुध्दा दैनिक वर्तमानपत्र सुरु करावे  असे वाटते.

            पूर्वी बामसेफ संघटनेच्या जडणघडणेत बातमीपत्र व प्रकाशनाचा अंतर्भाव होता. म्हणून आताही या मुद्याकडे परत विशेष लक्ष देण्यात यावे असे वाटते. 

२५. इलेक्ट्रॉनिक मीडियाची निर्मिती करणे.

            इतर प्रिंट मीडिया व इलेक्ट्रोनिक मीडिया आपल्या विरोधातील प्रचारासाठी त्यांच्या माध्यमाचा वापर करीत असतात. म्हणून पक्षाने आता स्वतःचे इलेक्ट्रोनिक मीडिया (टी.व्ही.चॅनेल) निर्माण करावेत असे वाटते. जयललिता व नरेंद्र मोदी या नेत्यांचे स्वत:चे टी.व्ही.चॅनेल्स आहेत असे ऐकिवात आहेत. त्याचप्रमाणे पक्षाने सुध्दा पक्षाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पूर्ण भारतभर नेटवर्क तयार करावे असे वाटते.

२६.  जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करणे

            मा.कांशीरामजी म्हणायचे की, ‘Power will be the product of struggle,’ सत्ता ही संघर्षाची उपज आहे.’

            गुरु गोविंदसिंग म्हणाले होते की,

            ‘कोई किसीको राज न दे है,

            जो ले है वो निज बल से ले है !’

म्हणूनच लढा दिल्याशिवाय लक्ष्य साध्य करता येत नाही. हे लक्षात घेतले पाहिजे.

            एक शायर म्हणतो,

            ‘नारो पे बंदीशे है तो चीखे बुलंद कर, तेरे खामोशी का फायदा उठा रहे है लोग !’

            यावरून संघर्ष, आंदोलन, लढा  आवश्यक आहे,  हे आपल्या लक्षात येते.

            हाच मुद्दा एका जिल्ह्याच्या कलेक्टरने आम्हाला सांगितला होता. एकदा तो कलेक्टर त्यांचे जवळचे मित्र असलेले आमच्यापैकी एकाकडे जेवायला आले होते. त्यावेळी आम्ही पी.बी.एस.पी. (पे बॅक टू सोसायटी प्रोग्राम) चे कार्यकर्ते त्यांचेशी चर्चा करण्यासाठी बसलो होतो.

      मी आणि पंजाब खंडारे त्या वसाहततील सुशिक्षित आणि तरुण मुलांना दर रविवारी एक-दीड तास बहुजन समाज पार्टीची विचारधारा समजावून सांगत होतो. आम्ही संपर्क साधण्यापूर्वी त्या वसाहतील हे सारेच लोकं रिपब्लिकन पार्टी आठवले गटात काम करीत होते. परंतु या आमच्या प्रबोधनामुळे तेथील तो पूर्ण गट बहुजन समाज पार्टीमध्ये सामील झाला. त्यात बौद्धांशिवाय काही ओ.बी.सी. पण होते. मोठी वसाहत होती. पण त्यांची घरे सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधल्याने त्या वसाहततीत वीज पुरवठा करण्यात येत  नव्हता. तेव्हा हा विषय आम्ही कलेक्टरसमोर मांडला. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, निवेदन तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन या म्हणजे मी त्यावर कार्यवाही करतो.

            त्यांनी सांगितले होते की, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटले तरच लोक त्या पक्षाकडे झुकतात. तत्वज्ञान हे विद्वान लोकांसाठी असते तर सर्वसामान्य लोकांना त्यांचे जीवन-मरणाचे प्रश्न महत्वाचे वाटतात. लोकांच्या प्रश्नासाठी शिवसेना सतत संघर्ष करून प्रशासनावर दबाव निर्माण करतात; म्हणून लोक त्यांच्या सोबत राहतात. निवडणुकीत त्यांना मते देतात, असेच धोरण बी.एस.पी.ने सुध्दा अवलंबवावे असे वाटते.

            महाराष्ट्रात शेतकरी जाती म्हणजे मराठा-कुणबी ३१ टक्के, माळी ३ टक्के, धनगर ५ टक्के आणि तेली २ टक्के असे ४१ टक्के जाती आहेत. तर शेतमजूर जाती म्हणजे अनुसूचित जाती १६.५ टक्के, अनुसूचित जमाती ९.२७ टक्के असे जवळपास २६ टक्के जाती आहेत. या दोन्हीही वर्गात सुध्दा आलटूनपालटून काही शेतकरी-शेतमजूर असू शकतात.

            शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे प्रामुख्याने शेतमालाला उचित भाव न मिळणे हा आहे, तर शेतमजुरांचे प्रश्न म्हणजे उचित मजुरी न मिळणे हा होय. शेतकऱ्यांना वाटते मजुरांचे दर वाढल्याने शेती परवडत नाही. पण प्रत्यक्षात खत, बी-बियाणे, औषधी यांचे भरमसाठ वाढलेले दर व कर्जाचे डोंगर उभा झाल्याने व त्याचबरोबर  व्यापाराकडून आणि बाजारात शेतमालाला उचित भाव मिळत नसल्याने शेती परवडत नाही. म्हणून  शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला तर शेतमजुरांना सुध्दा न्याय मिळू शकतो. म्हणून या दोघांचेही प्रश्न घेऊन पक्षाने आंदोलन उभे केले तर पक्षाला ताठ उभे राहण्यास या वर्गाचा आधार मिळू  शकतो.

            भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीप्रधान व मागासलेली असल्याने व शेतीवर ७० टक्के पेक्षा जास्त जनता अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचा लढा उभारणे महत्वाचे आहे.

      डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित-बहुजनांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित येऊन संघर्षसिद्ध होण्यासाठी १९३६ साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकरी-मजूर-कामगार या बहुजन वर्गाच्या उन्नतीला अग्रक्रम दिला होता. त्यांनी महाराष्ट्रातील कोकणात खोतांकडून होणारे  कुळांचे शोषण थांबविण्यासाठी खोती निर्मुलांची चळवळ चालविली. ठिकठीकाणी शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी परिषदा घेतल्या होत्या. त्यांनी १७ सप्टेंबर १९३७ रोजी मुंबई विधिमंडळात खोती निर्मुलन विधेयक मांडले होते. त्यांनी १० जानेवारी १९३८ रोजी मुंबई विधिमंडळावर शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा नेला होता. अशा तऱ्हेने बहुजन समाजातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रखर लढा उभारला होता. हे कुळ म्हणजे प्रामुख्याने कुणबी-मराठा  जातीचा वर्ग होता. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षातर्फे शेतमजुरांचे किमान वेतन निश्चित करण्यासाठी चळवळ उभारली होती. त्या आंदोलनामुळेच शेतमजुरांना १९४८ च्या किमान वेतन कायद्यातील तरतुदींचा लाभ झाला आहे. त्याशिवाय कामाचे तास सुध्दा निश्चित झाले आहे.

तसेच मुंबई राज्य सरकारच्या विरोधात ७ नोव्हेंबर १९३८ रोजी कामगारांनी केलेल्या संपाचे त्यांनी केवळ समर्थन केले नाही तर त्या संपाचे त्यांनी नेतृत्व सुध्दा केले होते. साम्यवादी संघटनाच्या सहकार्याने हा संप यशस्वी केला होता. ट्रेड डीस्प्युट बिलाच्या विरोधात बाबासाहेबांनी १६ ऑक्टोबर १९३८ रोजी मुंबईतील कामगार मैदानावर स्वतंत्र मजूर पक्ष व इतर कामगार संघटनाच्या वतीने ५० हजार कामगारांची प्रचंड सभा भरविली होती. त्यामुळे स्वतंत्र मजूर पक्षात शेतकरी-कामगारांच्या लढ्यामुळे  दलितांशिवाय बहुजन समाजातील इतर जाती सुध्दा आकर्षित झाल्या होत्या. ही बाब १९३७ सालच्या पहिल्या प्रांतिक निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाला जे यश मिळाले त्यावरून सिध्द झाले होते.

            ग्रामीण क्षेत्रातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर शेतकरी-शेतमजुरांचा प्रभाव असतो. त्यातूनच पुढे आमदार व खासदारांचा मार्ग जात असतो. म्हणून हे सत्तेचे केंद्रे काबीज करण्याकरीता शेतकरी-शेतमजुरांचे जीवन-मरणाचे प्रश्न हाताळणे आवश्यक आहे.

            २३ ऑक्टोबर १९६४ रोजी आर.पी.आय. ने दादासाहेब गायकवाड यांच्या नेतुत्वात ‘कसेल त्याची जमीन पण नसेल त्याचे काय?’ हा मुद्दा घेऊन भूमिहीन शेतकरी-शेतमजुरांचा क्रांतीकारी देशव्यापी मोर्चा दिल्लीच्या संसद भवनावर नेला होता. ६ डिसेंबर १९६४ पासून ‘जेलभरो सत्याग्रहाचे आंदोलन’ सुरु झाले. हे आंदोलन दोन महिन्या पर्यंत चालले. त्यावेळी चार लाखाच्या वर सत्याग्रही कारागृहात गेले होते.

या आंदोलनात दलितांसोबतच अन्य मागासवर्गीयांनी सुद्धा भाग घेतला होता. जनतेच्या मुलभूत प्रश्नावर लढे उभारले तर लोक जाती-पातीचा विचार न करता समान हितसंबंधासाठी व वर्गीय भूमिकेवर राजकीय क्षेत्रात सहभागी होऊ शकतात. हे एक त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टीला जात-वर्ण-वर्गदृष्ट्या सर्वसमावेशक असे स्वरूप प्राप्त झाले होते. दलित, आदिवासी, मागासवर्गीय यांना एकत्र गुंफणारा असा हा लढा होता. याचा परिणाम म्हणून लोकसभेचा एक खासदार व अन्य राज्यात आमदार निवडून आले होते. त्यावेळी आर.पी.आय.ला १२.७१ टक्के मते मिळून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. त्यामुळे भांडवलदार व जमीनदारांचे हितसंबंध धोक्यात आले होते. या आंदोलनाला मिळालेला अभुतपुर्व यश पाहून कॉग्रेसला मोठा धक्का बसला. कॉग्रेसने आर.पी.आय.ला फोडण्याचे कारस्थान रचले. परिणामतः नंतरच्या काळात आर.पी.आय.चा राष्ट्रीय दर्जा जावून हत्ती चिन्ह मोकळे करण्यात आले.

            म्हणून बी.एस.पी.ला सर्वंव्यापी स्वरूप येण्याकरीता आणि जनाधार मिळविण्यासाठी बहुजन समाजातील सर्व जातींना घेऊन भूमिहीन, बेरोजगार, शेतकरी-शेतमजुरांचे लढे उभारणे आवश्यक आहे.

            सद्यस्थितीत आदिवासी, दलित, विमुक्त-भटके, शेतकरी यांचे अलग अलग आंदोलन तसेच स्त्री मुक्ती, ओबीसी, मराठा यांचे सुध्दा अलग अलग आंदोलन चाललेले असते, या सर्वांची सांधेजोड करून एक सामायिक असा लढा उभारला तर पक्षाला व्यापक स्वरूप मिळू शकते.

            भारतीय संविधानाने अनुसूचित जाती/जमाती व अन्य मागासवर्गीय वर्गाला सरकारी नोकरीत राखीव जागा दिल्या आहेत. तथापि त्या प्रमाणात जागा भरल्या जात नाहीत, म्हणून वर्षोनुवर्षे अनुशेष निर्माण होत असतो. हा अनुशेष कित्येक वर्षापासून कित्येक लाखाचा साचलेला आहे. त्यामुळे उचित रोजगाराअभावी ह्या वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. समाजात येणाऱ्या नोकऱ्या व त्या माध्यमातून येणारा पैसा व आर्थिक सुबत्ता मनुवाद्यानी रोखून धरला आहे. या प्रश्नाकडे मागासवर्गीय कामगार संघटना सोडल्या तर इतर कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष गेलेले नाही. म्हणून बी.एस.पी.ने हा मुद्दा अग्रस्थानी घ्यायला पाहिजे असे वाटते. त्यामुळे बेरोजगार लोकांचा पक्षाला पाठिंबा मिळाल्याशिवाय राहणार नाही.   

            १९८९ साली बी.एस.पी., जनता पार्टी व काही प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन परिवर्तनशील मोर्चा बनविण्यात आला होता. त्यात पाच सूत्री सामाजिक परिवर्तनाचा कार्यक्रम ठरविण्यात आला होता. १. सन्मानासाठी संघर्ष, २. मुक्तीसाठी संघर्ष, ३. समानतेसाठी संघर्ष ४. जाती अंत आणि तोडलेल्या जातीत भाईचारा निर्माण करून जोडण्यासाठी संघर्ष व ५. अस्पृश्य, अन्याय, अत्याचार आणि दहशतवादा विरुध्द संघर्ष. तसेच पाच सूत्री आंदोलन म्हणजे १. भारतीय किसान मजदूर आंदोलन २. सफाई मजदूर आंदोलन ३. दस्तकार आंदोलन ४. शरणार्थी आंदोलन व ५. भागीदारी आंदोलन अशा आंदोलनाच्या दिशा ठरविण्यात आल्या होत्या.

            आंदोलनाच्या संदर्भात बी.एस.पी.ने मार्ग ठरविले होते. ते असे – १. सायकल मार्च २. लहानमोठ्या मिटिंगा आयोजित करणे ३. लहानमोठे रॅली आयोजित करणे ४. वेगवेगळ्या विषयावर साहित्य निर्मिती करणे व ५. कार्यकर्त्यांसाठी कॅडर कँप आयोजित करणे. जनतेच्या प्रश्नावर लढा देतांना या बाबी लक्षात घेणे आवश्यक वाटते.

            हे खरे आहे की, मनुवादी सरकार बहुजनांसमोर समस्या निर्माण करीत असतात व त्याच्या निराकरणासाठी बहुजन समाजाला आपली शक्ती खर्च करावी लागते. तरीही मुल रडल्याशिवाय आई पण दुध पाजत नाही. म्हणून लढल्याशिवाय कोणतेही सरकार समस्या सोडवित नाहीत हा अनुभव आहे. ‘मागितल्याने फक्त भीक मिळते पण लढल्याने हक्क मिळतात.’ असे बाबासाहेब म्हणायचे. येथे गरज+ इच्छा +शक्ती हे तत्व लागू पडते. ज्या गोष्टीची गरज आहे, ती मिळविण्यासाठी इच्छा निर्माण झाली की शक्ती एकवटल्या जाते. त्यातूनच संघटन तयार होते. संघटनेद्वारे प्रश्न सुटतात.

            त्यांनी महागाई, बेरोजगार, शिक्षणातील बाजारूपणा, व्यसनाधीनता, भ्रष्टाचार, दलित व महिलांवरील अन्याय-अत्याचार, गरिबी असे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. तेव्हा अशा प्रशाना घेऊन लढे उभारले तर जनता सोबत राहतील व त्याचा फायदा निवडणुकीत मिळू शकतो.

      राजकारणाचा मार्ग हा अनेक संकटानी भरलेला काटेरी मार्ग असला तरी त्या मार्गाने चालल्याशिवाय बहुजन समाजाचे मुलभूत प्रश्न सुटणार नाहीत, हेही तेवढेच खरे आहे.

२७.  पक्षाकडून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे

            सांस्कृतिक आधारावर असलेल्या असमानतेचे आम्ही बळी आहोत. म्हणून आम्ही अशी संस्कृती निर्माण केली पाहिजे जी समानतेवर आधारीत असेल आणि त्यावर वंचित, उपेक्षित व दलितांचे नियंत्रण असेल. म्हणून पक्षाने सांस्कृतिक कार्यक्रम राबविणे अगत्याचे आहे.परिवर्तनाच्या  ताकदीला सांस्कृतिक स्तरावर मजबूत करण्यासाठी सांस्कृतिक परिवर्तन होणे आवश्यक आहे.

            मनुवादी व्यवस्था कालबाह्य रूढी-परंपरा, अंधश्रध्दा, कर्मकांड, दैववाद या ना त्या माध्यमातून लोकांच्या मनात रुजवत असतात. नंतर धार्मिक भावना चेतवून व उन्माद माजवून त्याचा फायदा निवडणुकीत घेतात. म्हणून लोकांमधील अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी पक्षाने ठोस भूमिका वठविली पाहिजे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय घटनेत लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविला पाहिजे असे नमूद केले आहे. म्हणून या तत्वाचा प्रचार आणि प्रसार करणे हे पक्षाचे कर्त्यव्य ठरते.

            तिरुपती, शेगाव, शिर्डी अशा अनेक ठिकाणच्या देवस्थानात बहुजनांनी दिलेल्या देणगीचे करोडो रुपयाची धनसंपत्ती अडकून पडलेले आहेत. त्याचा उपयोग देशाच्या व बहुजनांच्या विकासासाठी करता येऊ शकतो. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी देवालयाचे राष्ट्रीयीकरण करून ती संपती देशाच्या विकासासाठी लावावी असे खाजगी विधेयक संसदेत मांडले होते. परंतु ते मान्य झाले नाही. म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लोकांचे मत परिवर्तन व प्रबोधन करणे आवश्यक आहे.

            समाजाचे भौतिक आणि मानसिक शोषण थांबले पाहिजे.  त्यासाठी परिवर्तनाची अत्यंत गरज आहे. म्हणून असे सांस्कृतिक कार्यक्रम पक्षाने वेळोवेळी आयोजित केले पाहिजे असे वाटते. 

            डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कवी वामनराव कर्डक यांना म्हणाले होते की, ‘तुमचे एक गाणे माझे दहा भाषणांची  बरोबरी करते.’ म्हणजेच मनोरंजनातून केलेल्या प्रबोधनाचा पगडा जनमानसावर जबरदस्त होत असतो. कोणताही लढा, चळवळ प्रबोधनाशिवाय यशस्वी होत नाही. 

            मी दिल्लीच्या बी.एस.पी. ऑफिसमध्ये काम करतांना ‘मानवलीला’ची सी.डी. पाहिली होती. त्यात मागासवर्गीयांवर होत असलेला अन्याय-अत्याचार, आपल्या महापुरुषांचा संघर्ष व त्याचसोबत स्थानिक नेत्यांचे भाषणे इत्यादी चित्रित करण्यात  आले होते. 

            उत्तरप्रदेशात रामलीलाचा कार्यक्रम रात्रभर चालत असतो. त्या माध्यमातून लोकांच्या मनावर धार्मिक भावनेचा पगडा  बसविला जातो. त्याचा फायदा मग भाजपला निवडणुकीत मिळत असतो. त्याच धर्तीवर मानवलीलाचा कार्यक्रम सुध्दा रात्रभर केल्या जात होता. त्यात बहुजन समाजावर मनुवादी व्यवस्थेत कसा अन्याय-अत्याचार होत होता, हे दाखविल्यामुळे त्याचा फायदा बी.एस.पी.ला मिळत होता.

            तसेच बी.एस.पी. उत्तरप्रदेशात सत्तेत आल्यावर सरकारी स्तरावर आंबेडकर, पेरियार, शाहूजी, फुले, बिरसा मुंडा, गुरु घासिदास यांचे मेळावे आयोजित केले. होते. मला आठवते. जेव्हा अडवाणी यांनी पेरियार रामस्वामी यांचा मेळावा लखनौत न घेता दिल्लीत घ्यावा, असे मा. कांशीरामजी यांना सुचविले. तेव्हा मा. कांशीरामजी त्यांना म्हणाले होते की, जेव्हा आमची सत्ता दिल्लीत येईल, तेव्हा आम्ही दिल्लीला सुध्दा मेळावे घेऊ. या मेळाव्याचा जबरदस्त पगडा जनमानसावर उमटत असतो. म्हणून महाराष्ट्रात सुध्दा जलसा, भजन, जागृतीजत्था व पथनाट्याद्वारे जबरदस्त प्रबोधन केल्या जाऊ शकते.

            पूर्वी बामसेफ संघटनेच्या जडणघडणेत जागृतीजत्थाचा अंतर्भाव होता. तसेच ‘बुद्धिस्ट रिसर्च सेंटर’ची पण स्थापना केली होती. 

            तरी बी.एस.पी.ने सांस्कृतिक कार्यक्रमावर भर द्यावा असे वाटते. कारण ह्या कार्यक्रमाद्वारे बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून दिली की तो बंड करून उठल्याशिवाय राहत नाही. याची प्रचीती येते.

२८ पक्षाचे विशिष्ट कालावधीत अधिवेशन घेणे

            मा.कांशीरामजी व मा.श्रीकृष्ण उबाळे असतांना महाराष्ट्रात राज्य स्तरावर एवढेच नव्हे तर जिल्हा व तालुका स्तरावर पक्षाचे अधिवेशने होत होते. तसेच युवक, विद्यार्थी व महिलांचे सुध्दा स्वतंत्रपणे अधिवेशने होत होते. त्यात पक्षाच्या विस्तारावर आढावा घेण्यात येत होता. प्रत्येक युनिट आपल्या क्षेत्रातील कार्याचा अहवाल या अधिवेशनात सादर करीत होते. त्यामुळे त्यांच्या कार्याची प्रेरणा इतर युनिटच्या कार्यकर्त्यांना मिळत होती.  अशा उपक्रमामुळे  लहान-सहान कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामकाजात सामावून घेतल्या जात होते. तीच प्रथा आताही सुरु करावी असे वाटते. 

२९.  निवडणुका व इतर काळात मिडीयासोबत संपर्कात राहणे

            मिडीयासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी काही कार्यकर्त्यांवर सोपवावी. म्हणजे निवडणुका व इतर काळात त्याचा फायदा पक्षाला मिळू शकतो. २०१२ च्या उत्तरप्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत बी.एस.पी.च्या उमेदवाराचा सहभाग मिडीयाच्या चर्चा सत्राच्या कार्यक्रमात दिसून येत नव्हता. त्यामुळे इतर पक्षाचे उमेदवार मुख्यत: बहीण मायावतीच्या पुतळ्याचा व मिळकतीपेक्षा कमाई जास्त हे दोन मुद्दे घेऊन  विरोधक प्रचार करतांना दिसत होते. त्यामुळे काम चांगले पण प्रतिमा खराब असा काहीसा गोंधळ निर्माण करण्यात ते यशस्वी झाल्यासारखे वाटत होते. उत्तरप्रदेशची सत्ता जाण्यामागे हेही एक कारण असू शकते. म्हणून पक्षाने निवडणुका व इतर काळात प्रसार माध्यमाच्या संपर्कात राहावे व टी.व्ही. वर सादर होणाऱ्या कार्यक्रमाच्या चर्चासत्रात भाग घेऊन पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडावे असे वाटते.

३०.  पंतप्रधानसाठी बहीण मायावतीच्या नावाचा प्रचार करणे

            अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान बनण्यापूर्वी आर.एस.एस.चे लोक अटलबिहारी वाजपेयीची प्रतिमा जनमानसात रुजवित होते. त्यांच्या नावाचे मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करीत होते. आमच्या ऑफीसमध्ये हे लोक सांगायचे की राजीव गांधी हे बोफोर्सच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेले आहेत. तेव्हा भारताला भ्रष्टाचारापासून फक्त अटलबिहारी वाजपेयीच वाचवू शकतात. तेव्हा यानंतर त्यांनाच पंतप्रधान बनवायला पाहिजे. ते लोक भाजपचे नाव घेऊन  प्रचार करीत नव्हते  तर अटलबिहारी वाजपेयीच्या नावाचा  प्रचार करायचे. म्हणजेच शेवटी भाजपचाच प्रचार करीत होते.

याचप्रकारे बहुजन समाजाला सत्तेवर आणून त्यांची प्रगती करायची असेल तर आता बहीण मायावतीलाच पंतप्रधान बनवायला पाहिजे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा प्रचार सुरु करावा. त्यामुळे आपोआप पक्षाचा प्रचार होतो.

            दि.२८.०५.१९३८ च्या जनता पत्रिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘मला तुमच्यापैकी प्राइम मिनिस्टर झालेला पाहायचे आहे. मला या मुठभर शेटजी-भटजीचे राज्य नको असून ८० टक्के लोकांचे राज्य हवे आहे.’ हे त्यांचे स्वप्न १९३८ सालातले आहे जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. तेव्हापासून अजूनही असा पंतप्रधान झाला नाही. तसं बहीण मायावतीच्या स्वरूपात तसे व्यक्तिमत्व मिळाले आहे. तेव्हा बहुजनांनी सारी शक्ती एकवटून बाबासाहेबांचे स्वप्न खरे करून दाखवावे.

      बहीण मायावती यांनी ब्राम्हण वर्गाची साथ जरी सोडली व  मुस्लीमांना जवळ केले तरी अनुसूचित जाती/जमाती व काही प्रमाणात ओबीसींना सोबत घेवून बहीण मायावती पंतप्रधानच्या खुर्चीपर्यंत पोहचू शकते. कारण मुस्लीम वर्ग उत्तरप्रदेशात १८.२ टक्के जरी असली तरी त्यापेक्षा आसाम मध्ये ३०.०९ टक्के, पश्चिम बंगाल मध्ये २५.२ टक्के, केरळमध्ये २४.७ टक्के आहेत. पूर्ण देशात त्यांची टक्केवारी ११.६७ टक्के आहे. तेव्हा बहीण मायावतीला या लोकांपर्यंत पोहचून आपली ताकद वाढवावी लागेल.

३१.  रॅली आयोजित करणे

            मा. कांशीरामजी सायकल मार्च, परिवर्तन, सभा, संमेलन, परिषदा, आंदोलने, कॅडर कॅम्प, सायकल मार्च, रॅली, परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचत. त्या माध्यमातून ते सतत जनमानसात वावरत. असं म्हणतात की, देशातील कोणत्याही पक्षाचा नेता मा. कांशीरामजी इतका देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून प्रवास केला नसेल. तरी लोकांमध्ये जोश आणि उत्साह निर्माण होण्याकरीता ‘हुक्मरान बनो’ रॅली काढण्यात यावी व त्याचे नेतृत्व बहीण मायावतीने करायला हरकत नाही.

३२. माहिती पुस्तिकेचे वाटप करणे

            पक्षाचे उद्दिष्टे, ध्येय, धोरणे दर्शविणारी माहिती पुस्तिका प्रत्येक गावात-मोहल्ल्यात, घराघरात वाटण्यात याव्यात. तसेच पक्ष सत्तेवर असतांना कोणते कोणते कामे केलेत, त्याचीही माहिती पुस्तिकेत देण्यात यावेत. त्यामुळे पक्षाबद्दल माहिती मिळून जनमानसात विश्वासाहर्ता निर्माण होते. पक्षाच्या कार्याबाबत कुणी शंका किवा प्रश्नचिन्ह उपस्थित केले की, पुस्तिका वाचून त्याचे  त्याचवेळी निरसन करणे शक्य होईल. भाजपासारखे ‘गाव चलो, घर चलो.’ असे एक घरोघरी जाण्याचे अभियान पक्षाने राबवावे असे वाटते.  

३३. स्वार्थी नेत्यांच्या हस्तक्षेपावर प्रतिबंध घालणे.

            काही स्वार्थी नेते पैशाची देवघेव करीत असतात. त्यांच्या अशा कृत्यामुळे जनमानसात पक्षाची प्रतिमा बिघडल्या जाते. तरी अशा लोकांच्या कारवाया लक्षात आल्यावर पक्षाने त्यावर वेळीच आवर घालावे असे वाटते. 

३४. तिकीट वाटपात पारदर्शकता असण्याबाबत 

            निवडणुकीच्या काळात तिकीट वाटप करतांना खालच्या स्तरापासून ते वरपर्यंतच्या कार्यकर्त्याचे मनोगत जाणून घेऊनच तिकीट देण्यात यावे; म्हणजे प्रामणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. पक्षाच्या बाहेरील उमेदवार निवडणुकीपर्यंत पक्षात राहतात. निवडणूक संपली की निघून जातात असे निदर्शनास आले आहे. त्यांना पक्षाशी अजिबात निष्टा नसते. तर त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करायचा असतो. किवा त्यांना त्यांच्या पक्षाने तिकीट नाकारले असते. म्हणून अपक्ष राहण्यापेक्षा कोणत्यातरी पक्षाच्या आधाराने निवडणुकीत उभे राहावे म्हणून ते बी.एस.पी. कडे वळतात असे लक्षात आले आहे. अशा उपऱ्या लोकांना अजिबात तिकीटा देऊ नये असे वाटते. तसेच गुन्हेगारी प्रवृतीच्या व्यक्तीना तिकीटा देणे उचित होणार नाही.

      तसेच तिकीट वाटपात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. पक्षाचा फंड सोडून कोणत्याही नियमबाह्य प्रकारची वैयक्तिकरित्या पैशाची देवाणघेवाण होऊ नये. त्यामुळे कार्यकर्त्यात विश्वासाचे  वातावरण राहण्यास मदत होते.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाचे खरे प्रतिनिधी निवडून येण्यासाठी स्वतंत्र मतदार संघाचा आग्रह धरला होता. कारण या पद्धतीने निवडून आलेले खरे समाजाचे प्रतिनिधी दिसले असते असा त्यांचा उद्देश होता.. म्हणून पक्षाने समाजाच्या खऱ्या व्यक्तींनाच व पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांनाच निवडणुकीत उभे करावे म्हणजे पक्षाच्या कामकाजात नैतिकता टिकून राहील.

 ३५. महाराष्ट्रातील राज्याबाहेरील व्यक्तींचे प्रभारी पद काढण्याबाबत

            उत्तरप्रदेशातील दोन लोकांकडे महाराष्ट्राची कमान सोपवून काही उपयोग झाला असे वाटत नाही. त्याउलट महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना मनमोकळेपणाने व स्वतंत्रपणे काम करणे कठीण झाले आहे. पहिलेच महाराष्ट्रातील जागृत व कर्मठ लोक हे स्वाभिमानी वृतीचे आहेत. त्यांना कुणाचे दडपण सहन होत नाही. म्हणून प्रभारीपद काढून स्वतंत्रपणे काम करू देण्याचा प्रयोग करून पहावा. त्यानंतर आढावा घेऊन प्रभारीपदाबाबत फेर निर्णय घ्यावा. मा. कांशीरामजी यांनी मात्र कधीही असे निरीक्षक नेमले नव्हते; तर ते स्वतःच कामाचा आढावा घेऊन नियोजन करीत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील कार्यकर्ते दडपणाशिवाय मुक्तपणे कामे करीत होते.

३६. काही विशिष्ट मतदार क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे

            ज्या मतदार संघात पक्षाचा जोर वाढला असेल अथवा दबदबा निर्माण झाला असेल, त्या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे म्हणजे तेथील जागा निवडून आणण्यास सोपे जाईल.

३७.  द्वेषाचे राजकारण बंद करणे

            भगवान बुध्द यांची एक शिकवण आहे. ‘द्वेषाने द्वेष वाढते. प्रेमाने द्वेषाचे शमन होते.’

            बामसेफमध्ये काम करतांना आम्हाला सांगितले जायचे की, घरात व शेजारी चांगले वातावरण ठेवा. तसेच शत्रू किंवा विरोधक निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्या. त्यामुळे मिशनच काम करतांना घरचे, शेजारचे व इतर लोक अडथळे निर्माण करणार नाहीत. हेच तत्व पक्षात सुध्दा पाळायला काही हरकत नसावी. ‘तो आपला, तो त्यांचा’ असा दुजाभाव कधिही करू नये असे वाटते. तो कुणाचा जरी असला, तरी तो आपला सुध्दा कसा होईल याचाच प्रयत्न सातत्याने करीत राहायला पाहिजे. त्यातच पक्षाच्या यशाचं गमक आहे.     

            ज्यावेळी पक्ष उत्तरप्रदेशात सत्तेवर होता, त्यावेळी सरकारी स्तरावर काही प्रस्थापित वर्तमानपत्रात पान भरून जाहिराती छापून येत होत्या. परंतु महाराष्ट्रातील बहुजन समाजातील वर्तमानपत्रात मात्र जाहिराती दिल्या जात नव्हत्या. ऐवढेच नव्हे तर बहीण मायावती यांच्या वाढदिवसाच्या किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाच्या जाहिराती सुध्दा या वर्तमानपत्रात दिल्या जात नव्हत्या. काय तर म्हणत की, तो पेपर आपला नाही. तो रामदास आठवले किंवा कॉंग्रेसचा किंवा प्रकाश आंबेडकरांचा आहे. त्यामुळे त्या पेपरचा संबंध दुरावल्या जात होता. आपल्या पक्षाचा एकही पेपर नाही व जे बहुजन समाजातील पेपर आहेत, त्यांच्याशीही आपले  चांगले संबंध नाहीत, मग अशा परिस्थितील पक्षाचा प्रचार होईल तरी कसा?  समाजात पक्षाच्या बाजूने अनुकूल मतप्रवाह निर्माण तरी कसा होईल?  तरी द्वेषाचे राजकारण टाळून प्रेमाचे व मित्रत्वाचे राजकारण करावे असे वाटते.

            डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दि.१४.०१.१९५० ‘जनता’ मध्ये लिहिले होते की, ‘पूर्वीचे शत्रूत्व. वैर आता विसरले पाहिजे. आपला शत्रू कोण मित्र कोण हे ओळखले पाहिजे: आणि आपली शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्वीसारखा एकलकोंडेपणा आता उपयोगी पडण्यासारखा नाही.’

            समविचारी लोक एकमेकाचे मित्र होऊ शकतात. पण आपण परस्परांमध्ये द्वेष निर्माण केल्याने शत्रूचे फावते. ते आपल्यात फुट निर्माण करतात. त्याला आपण बळी पडतो. म्हणून आपल्याला व्यक्तीगत स्वार्थ, अहंकार, मनाचा क्षुद्रपणा, बेईमानी,  लबाडवृती, अप्रामाणिकपणा, लालच, द्वेष, मत्सर ह्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. ह्या रोगाने चळवळ खंगून जाते. तरी ही लागण बी.एस.पी.मध्ये होऊ देऊ नये, याची नेतृत्वाने सतत काळजी घ्यावी असे वाटते. 

३८. गरजू कार्यकर्त्यांना मानधन देण्याबाबत

            कार्यकर्त्यांनाही स्वत:चे पोट व प्रपंच असतात. सारेच कार्यकर्ते श्रीमंत असतील असे नाही. तेव्हा त्यांना गुजराण करण्यासाठी ज्यांना आवश्यक आहे, अशांना मानधन देण्याची व्यवस्था पक्षाने करावी. त्यामुळे ते सारे लक्ष पक्षाच्या कामाकडे केंद्रित करू शकतील.

३९.  राज्यातील एखाद्या बसपा नेत्याला उत्तरप्रदेशच्या कोट्यातून राज्यसभेचा खासदार बनविणे

            महाराष्ट्रात नजीकच्या काळात तरी एखादा लोकसभेचा  खासदार निवडून येईल असे वाटत नाही. म्हणून महाराष्ट्रातील मा. सुरेश माने किंवा सिद्धार्थ पाटील यांच्यासारख्या एखाद्या तरी प्रभावी नेत्याला उत्तरप्रदेशच्या कोट्यातून राज्यसभेचा खासदार बनविणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या नेत्याचे वजन वाढून महाराष्ट्रात त्या पदाचा फायदा मिळू शकतो. तसेच  महाराष्ट्रातील लोकांचे प्रश्न राज्यसभेत मांडल्याने त्याचे अनुकूल पडसाद संपूर्ण राज्यात उमटेल. जसे समाजवादी पक्षाने २००२  ते २००८ च्या दरम्यान अबू आझमी यांना उत्तरप्रदेशच्या कोट्यातून राज्यसभेचा खासदार बनविला होता. त्यानंतर ते महाराष्ट्र विधानसभेत समाजवादी पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलेत. कॉंग्रेसने सुध्दा तारिक अन्वर, राजीव शुक्ला सारखे बिगर महाराष्ट्रीयन लोकांना राज्यसभेवर पाठविले आहे. तरी हा प्रयोग बी.एस.पी.ने सुध्दा करायला काही हरकत नाही.

४०.  स्वयंसेवक दल निर्माण करणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली दलितांच्या सर्वांगीन उत्कर्षाची चळवळ खेड्यापाड्यात पोहोचली होती. त्यावेळी अस्पृश्यांनी लाचारी सोडून स्वाभिमानाने व ताठ मानेने जगणे सुरु केले होते. त्यावेळी जातीयवादी लोक चिडून हल्ला करीत. म्हणून संरक्षण देण्याचे काम खेड्यापाड्यात, गावोगावी स्थापन करण्यात आलेले समता सैनिक दल करीत असत.

त्या समता सैनिक दलात  तरुण पोरांचा भरणा असायचा. त्यांचा विशिष्ट पेहराव असायचा. एखाद्या कार्यक्रमस्थळी पोलीस दलासारखे कवायत करीत शिस्तीत चालत जायचे. त्यामुळे संपुर्ण वातावरण भारावून जात होते. समाजामध्ये विलक्षण असे बळ निर्माण झाले होते. गावोगावी व्यायामशाळा काढून त्यात मल्लखांब, दंडबैठका, दांडपट्टा, कवायत, लाठीकाठी, तलवारबाजी, जंबियाबाजी, कुस्त्या इत्यादी व्यायामाचे व कसरतीचे प्रकार शिकवीत. त्यामुळे तरुण वर्गाचे आरोग्य धडधाकट राहून व्यसनापासून अलिप्त राहत.

पूर्वी मा. कांशीरामजींच्या सभा होत त्यावेळी वेळेवर असे बहुजन व्हॉलींटिअर फोर्स (बीव्हीएफ) नावाचे स्वयंसेवक दल तयार करून मा. कांशीरामजींना  व सभेला सुरक्षा पोहचवित असत. म्हणून आता याच पद्धतीचा स्वयंसेवक दल कायमस्वरुपी बी.एस.पी.ने गावोगावी निर्माण करावा; म्हणजे बहुजन समाजातील अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व धार्मिक अल्पसंख्यांक यांना वाटत असलेल्या असुरक्षिततेच्या भावनेला दूर करता येईल असे वाटते. 

बामसेफची निर्मिती करतांना मा. कांशीरामजी यांनी जी ‘बामसेफ-एक परिचय’ नावाची पुस्तिका काढली, त्यात दिलेल्या १० अंगापैकी ‘बामसेफ स्वयंसेवक दल’ या अंगाबाबत उल्लेख केला आहे. म्हणून आता बहुजन स्वयंसेवक दल बनविण्यास काही हरकत नसावी असे वाटते.

४१. जिल्हास्तरापर्यंत कार्यालये स्थापन करणे

            किमान जिल्हास्तरापर्यंत तरी कार्यालये स्थापन करणे आवश्यक आहे. जिथे शक्य आहे तेथे तालुका स्तरापर्यंत कार्यालये स्थापन केल्यास लोकांशी थेट संपर्क बनविणे शक्य होते. देशात बामसेफच्या कार्यालयाचे जाळे पसरविण्याचे उद्दिष्ट्य ‘बामसेफ-एक परिचय’ या पुस्तिकेत दिले आहे. त्याच पद्धतीने देशात बी.एस.पी.च्या कार्यालयाचे जाळे पसरविण्यात यावे. त्यामुळे लोकांच्या समस्यांची त्वरीत दखल घेणे शक्य होते.

४२. पक्षाच्या लहानसहान घडामोडीला व्यापक प्रसिद्धी देणे

      इतर पक्ष त्यांच्या  कोणत्याही लहानसहान व कोणत्याही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला वर्तमानपत्रात व इलेक्ट्रॉनिक मिडीयाला बातम्या देऊन पक्षाला सतत प्रकाशझोतात ठेवीत असतात. तसेच ते वार्ताहर परिषद घेऊन पक्षाचे धोरणे विषद करीत राहतात किवा  एखाद्या विषयावर मतप्रदर्शन करीत राहतात. त्यांचे प्रवक्ता  सतत मिडीया व वर्तमानपत्राला मुलाखती देत असतात. मिडीयाच्या चर्चासत्रात भाग घेत असतात. त्यामुळे त्यांनी केलेले कार्य खरे असो की नसो पण लोकांच्या मन:पटलावर पक्षाचं नाव सतत आदळत ठेवतात. कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेत राहतात. त्यामुळे त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत निश्चितच मिळतो. बी.एस.पी.ने सुध्दा हेच तंत्र अवलंबणे आवश्यक आहे. कोणत्याही वर्तमानपत्राचे वार्ताहर वार्ता मिळविण्यासाठी कार्यक्रमस्थळी येत नाहीत; तर बातम्या तयार करून त्यांच्याकडे नेवून द्याव्या लागतात. त्यानंतरच त्या दिलेल्या बातम्या त्यांच्या वर्तमानपत्रात छापून येतात असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे प्रसिद्धीचे कार्य जाणकार कार्यकर्त्याला देवून पक्षाला सतत प्रकाशात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत राहायला पाहिजे असे वाटते.

४३. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘स्टेट्स अँड मॉयनारिटीज’ या ग्रंथात मांडलेल्या राज्य समाजवादाचे धोरण जाहीर करण्याबाबत

      या ग्रंथात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील गोष्टींना महत्व दिलेले आहे.

१.       मुख्य उद्योगधंदे राज्याच्या मालकीचे असतील व राज्याद्वारे ते चालविले जातील.

२.      असे उद्योग की जे मुख्य नसतील पण आधारभूत उद्योग असतील असे उद्योग राज्याच्या मालकीचे असतील आणि ते राज्याद्वारे किवा राज्याने स्थापन केलेल्या मंडळाद्वारे चालतील.

३.      विमा योजनेच्या बाबतीत राज्याला मक्तेदारी असेल आणि राज्य प्रत्येकाला कायद्यानुसार विमा योजना लागू करतील.

४.     शेती व्यवसाय राज्याच्या मालकीचा असेल.

५.     उद्योगधंदे विमा आणि शेतजमीन ज्या खाजगी व्यक्तीकडे असतील ते त्याचा मोबदला देवून सरकार ताब्यात घेऊ शकेल.

६.      राज्याने ताब्यात घेतलेल्या (संपादीत) केलेया शेतजमिनीचे योग्य आकारात विभाजन केले जाईल. सर्व शेतकरी सामूहिकरीत्या शेती करतील आणि राज्याने ठरवून दिल्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्यांना सर्व काही मिळेल.

      म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या राज्य समाजवादाचे धोरण मान्य करून त्या दिशेने पक्ष वाटचाल करेल असे जाहीर करावे; म्हणजे आंबेडकरी जनतेचा पक्षावरील विश्वास दृढ होईल.

४४.  मजबूत संघटन

एकंदरीत बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे (धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र) पक्षाच्या बळकटीला तीन गोष्टी लागतात.

नेता – नेता असा असावा की जो प्रतिस्पर्ध्याच्या मनगटाला मनगट घासून खुल्या मैदानातील लढाईत विजयश्री खेचून आणेल.

शिस्तबद्ध संघटना – नेत्याचा संदेश जनतेपर्यंत पोहचविणारी, नेत्याचा शब्द खरा करण्यासाठी जीवाचं रान करणारी शिस्तबद्ध संघटना असावी.

कार्यक्रम – सुस्पष्ट असा कार्यक्रम की ज्यापुढे प्रतिस्पर्धी नामोहरण होईल. जनतेच्या मनाला जाऊन भिडेल. मेंदूपर्यंत पोहचेल. ह्या तिन्हीही गोष्टी बहुजन समाज पार्टीकडे नाहीत असे कोणी म्हणेल काय?

      बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत सांगितले आहे की,

१.       पक्ष स्थापणेसाठी व त्याच्या संघटीत वाढीसाठी झटणे, आणि पक्षाचे तत्त्वज्ञान व ध्येयधोरण यांचा प्रचार करणे,

२.      पक्षाची तत्वे, विचारसरणी यांचा प्रचार, वृतपत्रे, सभा-संमेलने, व्याख्याने, वांङमयलेखन इत्यादी मार्गाने करणे,

३.      पक्ष सभासदांच्या वतीने संयुक्त राजकीय चळवळी व राजकीय कृती करण्यासाठी निवडणुका लढविणे.

      आणखी  संघटनेबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘आपणाजवळ मजबूत संघटना नसेल तर देशाच्या राजकारणात आपणाला कोणतेही स्थान असू शकत नाही. ‘अछूत’ लोक जर एकसंघ अशा एका जातीत संघटीत झाले तर आपण राजकारणात काही स्थान प्राप्त करू शकतो. आपले मजबूत व एकसंघ संघटन करण्यासाठी आपण दहा वर्षे थांबू नये. ही संघटना आतापासून बांधली पाहिजे; ही संघटना आजच आपण बांधली पाहिजे. होय, उद्याही नव्हे, परवाही नव्हे तर आजच !’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : खंड ७ मा.फ.गांजरे)

      खरे म्हणजे ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हे बाबासाहेबांनी सांगितलेले तीन सूत्र म्हणजे संघटना बांधणीसाठी आवश्यक असणारे सूत्र आहेत. शिकल्याशिवाय संघटीत होता येत नाही व संघटीत झाल्याशिवाय संघर्ष करता येत नाही. ज्यांना संघटीत होता येते त्यांचा संघर्ष यशस्वी होतो हे मात्र निश्चित !

      ‘रिपब्लिकन पक्ष बांधणीची एक दिशा’ या पुस्तकात डॉ.यशवंत मनोहर लिहितात की, ‘रिपब्लिकन पक्षाच्या विनाशाला तीन गोष्टी कारणीभूत आहेत. स्वार्थ, अहंकार आणि बेईमानी. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा, त्यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या महान ध्येयापेक्षा, ज्या मंडळींना स्वत:चे प्रासंगिक नेतृत्व स्वत:चा अहंकार आणि स्वत:चे गट महत्वाचे वाटतात ती माणसे एकत्र कशी येतील? वरपांगी ऐक्याच्या सूत्राचा देखावा करणारी पण आतून विघटनाची सूत्रे जपणारी माणसे एकत्र कशी येतील? खरे तर असे आहे की जी माणसे खरोखरच मोठी असतात ती अहंकारी नसतातच.’ ही गोष्ट बहुजन समाज पक्षाच्या नेतृत्वाने सतत लक्षात ठेवणे अगत्याचे आहे असे वाटते.

      याच पद्धतीचे लिखाण ‘दैनिक महानायक’चे संपादक सुनील खोब्रागडे यांनी ‘फेसबुक’वर केल्याचे माझ्या वाचण्यात आले आहे. ते लिहितात की,

      “आपल्या चळवळी क्षीण होण्याची कारणे कोणती आहेत? कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे, चार भिंतीच्या आड घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांवर लादणे, खूष मस्करी करणारे जे लोक असतील, हुजरेगिरी करणारे असतील,गुलामी पत्करणारे असतील त्यांना नेत्याने अवास्तव महत्व देऊन महत्वाच्या पदावर त्याची वर्णी लावणे. व्यापक परिणाम करणारे निर्णय परस्पर घेऊन ते कार्यकर्त्यांवर लादणे ही ती कारणे. आहेत. याचाच अर्थ चळवळीच्या अपयशाची पमुख कारणे नेत्यांमध्ये असलेले विकार, माणसांमध्ये असलेले विकार आहेत. आपल्याला अपयशी न होता यशस्वी चळवळ उभारायची असेल तर या चळवळीचे वाहक असणारे कार्यकर्ते, या चळवळीला यशस्वी करण्याची धडपड करणारे, जबाबदारी घेणारे लोक विकाररहीत असले पाहिजेत. त्यांच्या स्वभावामध्ये सदगुण जास्त आणि दोष कमीतकमी असले पाहिजेत. आपल्या नेत्यांमध्ये, चळवळीतील कार्यकर्त्यामध्ये  नेमक्या याच गोष्टीचा अभाव आहे. खूष मस्करी करणाऱ्या , हुजरेगिरी करणाऱ्या ,गुलामी पत्करणाऱ्याना योग्यतेपेक्षा अवास्तव महत्व दिल्यामुळे नेता आणि त्याचे हुजरे,गुलाम,स्तुतिपाठक यांच्यामध्ये स्वामी-दास संबंधाची निर्मिती झाली आहे. आपली योग्यता नसतानाही स्वामीने आपल्याला दास्यात घेतले ही स्वामीची आपल्यावर कृपा आहे असे पदाधिकाऱ्याना वाटते. यामुळे मंत्री असला तरी तो नेत्याच्या बाजूला खुर्चीवर न बसता खाली जमिनीवर बसतो. मंत्री असला तरी तो नेत्याच्या चपला उचलतो. योग्यता नसतानाही स्वामीने सोपविलेली पदाची जबाबदारी स्वीकारायची पण काम मात्र करायचे नाही केवळ स्वामीचा उदो-उदो करायचा आणि दुसरीकडे सेवकांनी मात्र केवळ सांगितलेले तेवढेच काम करायचे.जबाबदारी घ्यायची नाही, आपली बुद्धी वापरायची नाही अशी विचित्र व्यवस्था तयार होते. समता -स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या मार्गात या प्रकारची संगठन व्यवस्था अत्यंत घातक आहे.”

            मी या लिखाणात उल्लेख केलेल्या  मुद्यांची अंमलबजावणी होत नाही असे नाही. होत आहे. जरूर होत आहे. काही महत्वाच्या विषयावर पुस्तिका काढण्यात येत आहेत ही समाधानाची बाब आहे. नुकतेच सरकारी कर्मचाऱ्यांना बढतीमध्ये राखीव जागा असाव्यात, या संदर्भात बी.एस.पी.ने संसदेत केलेल्या प्रयत्नाबाबत एक पुस्तिका माझ्या वाचण्यात आली आहे. पण ह्या पुस्तिका महाराष्ट्रात तरी घरोघरी पोहचल्याचे मला आढळले नाही. कारण मला ही पुस्तिका कर्नाटकच्या एका बी.एस.पी. कार्यकर्त्याकडून मिळाली.

            कोणी म्हणतील की, कोणतीही गोष्ट कागदावर उतरविणे फार सोपे आहे; पण प्रत्यक्षात व्यवहारात उतरविणे वाटते तेवढे सोपे नाही. हे जरी खरे असले तरी निदान त्या दिशेने वाटचाल करायला काय हरकत आहे? हे जर शक्य झाले तर  बाबासाहेबांच्या संकल्पनेचा पक्ष म्हणजे, ‘पक्षाचा सरसेनापतीसारखा नेता असावा, पक्षाचे चिन्ह हत्ती असेल, निशाण निळा असेल, अनुसूचित जाती/जमाती, इतर मागासवर्गीय यांचा सक्रीय सहभाग असावा, पक्षाचे स्वरूप व्यापक व राष्ट्रीय असावा, पक्षाचे ध्येयधोरण व तत्वाचा सातत्याने प्रचार व प्रसार व्हावा, पक्ष दलित, शोषितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सतत झटणारा, संघर्ष करणारा असावा.’ असा पक्ष म्हणजे बहुजन समाज पार्टीच असेल, यात तिळमात्र शंका उरणार नाही.

वरील सारे मुद्दे सर्वांनाच पटावेत अशी माझी अपेक्षा नाही. व्यक्ती तितक्या प्रवृती या म्हणीप्रमाणे कदाचित इतरांचे आणखी काही अनुकूल, प्रतिकूल  विचार असू शकतील. तरी या विषयाच्या अनुषंगाने सखोलपणे विचारमंथन व्हावे असे मला वाटते. जेणेकरून पक्षाला चांगले दिवसं येवून  बहुजन समाज हा देशातील सार्‍या राज्यात व केंद्रात सत्ताधारी वर्ग बनेल व त्या माध्यमातून भारत बौद्धमय बनण्यासाठी वाटचाल करेल. म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन्हीही संकल्पना उशिरा का होईना पण यापुढे साकार व्हायला वेळ लागणार नाही असे वाटते.

            एका शायराने म्हटले आहे की,

            ‘माना कि इस जहॉं को गुलजार (उद्यान) न कर सके हम,

            कुछ खार (काटे) तो कम कर गये गुजरे जहॉंसे हम !’

            इतका जरी परिणाम या लिखाणाचा झाला तरी मला समाधान लाभेल, एवढं मात्र नक्की ! 

            शेवटी मला अगदी अंतकरणापासून सांगावेसे वाटते की,

            ‘मेरे तडप का एहसास तुझको हो जाये !

            मेरे ही तरह से तेरे दिल की चैन खो जाये !!

            संघटीत होकर दूर करके रहेंगे अपनी गुलामी !

            यही होंगी फुले-शाहू-आंबेडकर को असली सलामी !!

            जयभीम-जयभारत

भीमजयंतीची अविस्मरणीय मिरवणूक

1 May

      १४ अप्रीलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. दरवर्षी येणारी ही बाबासाहेबांची जयंती मोठ्या धुमधाडाक्याने सर्वत्र साजरी केल्या जात असते. त्या निमित्त बहुतेक ठिकाणी मिरवणूका काढण्यात येत असतात. या जयंतीच्या कार्यक्रमांचा व मिरवणुकांचा उद्देश बाबासाहेबांचा जयघोष करणे, त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा प्रभाव जनमानसात उमटविणे व रुजविणे, त्यांची चळवळ योग्य दिशेने व गतीने पुढे नेण्यासाठी लोकांना प्रेरित करणे, चळवळीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी संकल्प करणे, समाजामध्ये एकोपा, संघटितपणा निर्माण करणे व आपल्या उध्दारदात्याविषयी कृतज्ञता प्रदर्षीत करणे, इत्यादी असते.

      आता बाबासाहेब जरी आपल्यामध्ये राहिले नसलेत तरी त्यांचे लिखान आणि काही लोकांनी लिहून ठेवलेल्या आठवणी मात्र आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असतांना त्यावेळेसच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांचा ५० वा वाढदिवस मोठ्या प्रंमाणात साजरा करण्याचा विचार मांडला होता. तेव्हा  “माझा जयजयकार करण्यापेक्षा माझे कार्य करा. ते जास्त महत्वाचे आहे.” असे त्यानी सांगितले होते. तसेच नागपूर येथे १५ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्म बांधवांना मार्गदर्शन करतांना  बाबासाहेब म्हणाले होते की, “मात्र तूमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्द‍ल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे.” म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करतांना प्रत्येक कृतीमध्ये बाबासाहेबांचे कार्य, त्यांचा आदर्श व विचारांचे प्रतिबिंब उमटेल याचे भान प्रत्येक कार्यकर्त्यांने ठेवणे आवश्यक आहे. म्हणून  बाबासाहेबांचे हे बोल आपण लक्षात ठेवून तसे आचरण केले पाहिजे, नव्हे तसे वागणे हे आपले कर्तव्यच आहे ! 

      जयंतीमध्ये दारु पिणे, मनोरंजनाकरीता सिनेमा, सिनेमाच्या गाण्यांचा ऑर्केष्ट्रा, क्रिकेटसारखा बेकारांना व्यर्थ गुंतवून ठेवणारा कंटाळवाणा खेळ; यासारखे अनुचित व  अवांच्छित कार्यक्रम आयोजित करणे योग्य नाही. त्यामुळे मुलांवर वाईट संस्कार पडतात. शिवाय लोकांकडून जमविलेल्या निधीचा गैरवापर होत असतो. त्यापेक्षा मनोरंजनातून प्रबोधन कसे होईल याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. तरच सुसंस्कारीत समाजमन निर्माण होऊ शकेल.

      सुरुवातीच्या काळात खेड्या-पाड्यांमध्ये सुध्दा समता सैनिक दल असायचे. ते पांढरा शर्ट, निळा पॅंट घालून हातात बांबुची किंवा वेताची काठी घेऊन दोन-दोनच्या रांगेमध्ये घोषणा देत मार्च करत पोलीस दलासारखे शिस्तीत चालत असायचे. त्यामुळे संपूर्ण वातावरण भारावून जायचे. समाजामध्ये विलक्षण असे बळ निर्माण व्हायचे. लोकांमधील ऊत्साह उदंड वाहत राहायचा. विरोधकांच्या मनात धडकी भरायची. समाजाचा एकोपा, उत्साह, शिस्त, बाबासाहेब व त्याच्या चळवळीप्रती निष्ठा इत्यादी गोष्टीचे त्यात प्रदर्शन व्हायचे. हल्लीच्या काळात मात्र बहुतेक ठिकाणी समता सैनिक दल राहिलेले नाही्त. त्यामुळे मिरवणुकीवर कोणाचे नियंत्रण राहत नाही. म्हणून मिरवणुकींना अनियंत्रीत असे स्वरुप येत आहेत. तरी ह्या गोष्टी रोखणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

      काहींना असे वाटते, की बाबासाहेबांची जयंती धुमधडाक्यांनी साजरी केली की, संपली चळवळ ! चळवळीचे आणखी काही अंग आहेत, आयाम आहेत यांचेशी त्यांचे काही देणे घेणे नसते… बस आपल्या वाट्याला आलेली वर्गणी किंवा घासाघीस करुन पैसे दिले व कार्यक्रमाला हजेरी लावली की, झाली आपली वर्षभराची निचंती ! असा बहुतेकांचा समज (गैरसमज) झालेला असतो. चळवळ ही गतिशील व सातत्याने सुरु असणारी प्रक्रिया असते. त्यात पैसा, वेळ व बुध्दी ह्या तिन्ही गोष्टीचे समर्पण सातत्याने दिले गेले पाहिजे याची जाणिव ठेवणे आवश्यक आहे..

      मिरवणुकीमध्ये दोन दोन च्या रांगेमध्ये चालणे, (जर खुप मोठा जमाव असेल तर तिन-तिन च्या रांगेमध्ये चालण्यास काही हरकत नाही.) पांढरे शुभ्र वस्त्रे परिघान करणे, रात्रीच्या वेळेला शक्य असल्यास बशांमध्ये (प्लेट) वाहणार्‍या वार्‍यात टिकतील असे जाडसर जळत्या मेणबत्या काही लोकांच्या हातात देणे, काही लोकांच्या हातात पंचशीलाचे झेंडे देणे, स्वयंसेवकाद्वारे किंवा समता सैनिक दलाद्वारे मिरवणुकीचे नियंत्रण करणे, शक्य झाल्यास खुल्या वाहनावर बाबासाहेबांची भव्य प्रतिमा ठेवणे, शक्य झाल्यास सजिव अथवा निर्जिव दृश्यांची व्यवस्था करणे, मशाली, लेझीम पथक, आखाडा, कवायत इत्यादीची व्यवस्था करणे, घोषणा कोणत्या द्यायच्या हे आधिच ठरवून तशा प्रकारचे लिहिलेले कागदं काही ठरावीक लोकांकडे देणे, सुमधूर आवाजामध्ये ‘बुध्दंम शरणंम गच्छामी, धम्मम शरणंम गच्छामी व संघम शरणंम गच्छामी’ची कॅसेट तयार करुन ती खुल्या वाहनावर लावणे, चौका-चौकात फटाक्याची आतिषबाजी करणे इत्यादी पध्दतीची मिरवणूक काढली तर ती आकर्षित बनू शकते. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये ढोल-ताशा किंवा बॅंडबाजा लाऊन नाचण्याची कोणालाही परवानगी देऊ नये. दारु पिलेल्या व्यक्तींना मग तो कोणीही  असो अशांना स्वंसेवकाद्वारे बाहेर काढून पोलिसांच्या हवाली करावे.

      या पध्दतीने आदर्श अशी मिरवणूक काढता येणे शक्य आहे कां असा काही लोकांचा प्रश्‍न असू शकतो. एक उदाहरण म्हणून आम्ही अशा प्रकारचा प्रयोग करुन पाहिलेला आहे.

      एकलहरा येथील नाशिक औष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीत आंबेडकर व शिवजयंती सयुक्तपणे, सार्वजनिकरित्या प्रशासकीय अधिकार्‍यांच्या सहकार्याने साजरी करण्याचे ठरविले होते. सर्व कामगार-अधिकार्‍यांच्या पगारातून वर्गणीचे पैसे प्रशासनामार्फत कापून घेतल्यामुळे फार मोठा निधी जमा झाला होता. त्यामुळे चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे शक्य झाले.

      सर्वांना विश्वासात घेऊन एका वेगळ्या पध्दतीने मिरवणूक काढण्याची आम्ही सर्वांनी योजना आखली होती. आम्ही बाया-माणसांना पांढरे कपडे परिधान करुन मिरवणुकीमध्ये सामिल व्हावे, असे सांगितले होते. कारण कोणत्याही मंगल प्रसंगी बौध्द धम्मात पांढरे वस्त्रे घालतात. मिरवणूक अत्यंत शिस्तबद्द व एका आगळ्या-वेगळ्या पध्दतीने यशस्वी व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही जबरदस्त तयारी केली होती. माझ्या पत्‍नीने यांत सक्रियपणे पुढाकार घेतला होता. तिने जयंतीच्या काही दिवसा आधीपासूनच खुप मेहनत घेऊन महिला व त्यांच्या मुलांना मोठ्या प्रमाणात तयार केले होते. विशेष म्हणजे जे विरोध करीत होते त्यांच्याच घरच्या महिलांनी माझ्या पत्‍नीला या कामात साथ दिली होती.  त्यांना सुचना दिल्या होत्या की पांढरे कपडे घालून मिरवणुकीमध्ये सामील व्हावे. मिरवणुकीमध्ये कोणिही नाचू नये. त्याऎवजी घोषणा द्यायचे. घोषणा कोणत्या द्यायच्या ते सुध्दा लिहून दिले होते. मिरवणूक कधी, कोणत्या मार्गाने जाईल, कोणत्या पध्दतीने व कशाप्रकारे निघेल याचे लेखी परिपत्रक काढले होते. जवळपास सर्वच बाया, माणसं व मुलांकडे बशामध्ये पेटलेल्या जाडसर मेणबत्त्या देण्यात आले होते व काहींच्या हातात पंचशीलाचे लहान-लहान झेंडे दिले होते. पेटलेल्या मेणबत्त्यामुळे काही अनिष्ट प्रसंग उद्‍भवू नयेत, याचीही काळजी घेण्यात येत होती. त्यांचेवर लक्ष ठेवण्यासाठी, दोन दोन ची रांग तुटू नये, प्रत्येकांनी शिस्त पाळावी, घोषणा व्यवस्थित द्यावेत म्हणून स्वयंसेवक तयार करण्यात आले होते व ते मिरवणुकीवर नियंत्रण ठेवून होते. कोणीही नाचनार नाही याची ते काळजी घेत होते. दोन दोन ची रांग असल्यामुळे मिरवणूक भव्य दिसत होती. दोन खुल्या जिपवर बाबासाहेब व शिवाजी महाराजांचे मोठ्या आकाराचे प्रतिमा ठेवल्या होत्या. ‘बुध्दंम शरणंम गच्छामी, धम्मम शरणंम गच्छामी व संघम शरणंम गच्छामी’ची कॅसेट तयार करुन ती हळु आवाजात जिपवर लावण्यात आली होती. मिरवणुकीच्या समोर एक जळती मशाल घेउन एक युवक चालत होता. त्यानंतर लेझीमची कवायत करणारे विद्यार्थी होते. चौका-चौकामध्ये फटाक्याची आतिशबाजी व्हायची. सर्वजण भारावून गेले होते. उत्साहीत झाले होते. लोकं ही मिरवणूक पाहण्यासाठी वसाहतीतील बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन पाहत होते. यापूर्वी अशाप्रकारची मिरवणूक कधीही निघाली नसल्याचे लोकांच्या तोंडून उद्‍गार निघत होते.  जेव्हा मिरवणूक विसर्जित झाली तेव्हा विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता यानी सांगितले की, ‘मी अशा प्रकारची भव्य व शिस्तबद्द मिरवणूक पहिल्यांदाच पाहतो आहे.’ त्यांनी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहून माझ्या पत्‍नीचे अभिनंदन केले.

      त्या वसाहतीमधील कर्मचारी व अधिकारी वर्ग मात्र खरोखरच चांगले, समजदार व जागृत होते, याचा विशेष असा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय अशा प्रकारची नाविण्यपुर्ण व आदर्श अशी मिरवणूक काढणे शक्यच नव्हते. म्हणून  तसा प्रयत्न यावर्षी येणार्‍या जयंतीमध्ये जागोजागी आयोजकांनी जरुर करुन पाहायला काही हरकत नाही. यापेक्षा आणखी चांगले आयोजन करता आले तर वाचकांनी तशा सुचना, प्रतिक्रिया द्यावेत.

      जयंतीदिनी प्रत्येकांनी चळवळीतील आपल्या सहभागाचे सिंहावलोकन करणे आवश्यक आहे. येणार्‍या वर्षात चळवळीला हातभार लावण्याचा संकल्प करावा. तरच खर्‍या अर्थाने आपण जयंती साजरी करीत आहोत असे समजता येईल.                                                                                  

………………………………………………………………………………………………………

 १. सदर लेख  दैनिक वृतरत्न सम्राट मध्ये दि. ०२.०४.२०१० रोजी प्रकाशित झाला.

 २. सदर लेख  दैनिक बहुजनरत्‍न लोकनायक मध्ये दि. २७.०३.२०१२ रोजी प्रकाशित झाला.

 

बोनगाव-कोलकाताची सफर (सुधारीत)

31 Dec

       मी माझ्या पत्‍नीसह या वर्षीच्या जानेवारी महिन्यात बोनगाव या गावला गेलो होतो. खरं म्हणजे या गावाचे नाव बनगाव आहे. पण बंगाली भाषेत शब्दांचे उच्चार ओकारयुक्त असल्याने बंगाली लोक बनगावला बोनगाव म्हणतात. या ठीकाणी आम्ही मुलाकडे राहिलो होतो.

       तेथे माझा मोठा मुलगा कस्टममध्ये असिस्टंट कमिशनर होता. त्याची आय.आर.एस. साठी निवड झाल्यावर पहिल्यांदा त्याला या भागात नेमणूक मिळाली.

            हे गाव तालुक्याचं ठिकाण असून पश्चिम बंगालच्या २४ नोर्थ परगणा या जिल्ह्यात आहे. २४ नोर्थ परगणा नावाचं कोणतही शहर नाही, तर बारासात हे शहर या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

            बोनगाव हे तालुक्याचं ठिकाण असून  कोलकातापासून बांगलादेशच्या जेस्सोर रोडवर, १२५ किलोमिटर दूर आहे. येथे जवळच पेट्रापोल हे ठिकाण बांगलादेश व भारत या सिमेवर आहे. तेथून जवळपास रोज ४०० ट्र्कच्या मालाची आयात-निर्यात होत असते.

            यापूर्वी मी १९८६ सालात कुटुंबासह माझ्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यलयाकडून मिळणार्‍या रजाप्रवास सवलत अंतर्गत काठमांडू पर्यंत प्रवास केला होता. त्यावेळी मुलं लहान होते. तेथून आम्ही दार्जिलींगला जातांना कोलकाताला एक दिवस थांबलो होतो. या शहरात त्यावेळी अनुभवणारी गर्दी आताही तेवढीच होती. त्यावेळी आमची ट्रॅव्हलबस ट्रॅफिकमध्ये अडकली होती. त्यामुळे गर्दीची आठवण आहे.

            त्यावेळच्या कलकत्त्याचं आता कोलकाता असे नाव झाले. तथापी त्यावेळी रिक्ष्यात बसलेल्या प्रवाशांना माणसं ओढत. आता मात्र ते चित्र दिसले नाही. त्यावेळी रोडवर ट्राम धावत असत. आताही एकट-दुकट ट्राम जातांना दिसत होत्या.

            गेल्या २५ वर्षापासून या राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सतत सत्ता होती. आता मात्र सत्तेत परिवर्तन होऊन ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असलेल्या तृणमूल कॉंग्रेसची सत्ता आली आहे.

            मार्क्सवादी म्हणतात की, धर्म ही अफूची गोळी आहे. तरीही या राज्यात कमालीचे  देव-धर्माचे प्रस्थ नांदत आहे. त्यात तसूभरही बदल झाल्याचं मला आढळले नाही. कारण कुठेही पुरोगामी विचार पेरल्याचे दिसले नाही. साम्यवादी विचारसरणी येथे कुठेही रुजलेली दिसली नाही. कारण काही किलोमिटर अंतरावर ‘हरे रामा हरे कृष्णा, मिशनचे देशातील मुख्य ठिकाण मायापुरीला आहे. तसेच पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रध्दा काही कमी झाल्याचं दिसलं नाही. त्यांच्या राजवटीत लोकांची गरीबी सुध्दा हटलेली दिसून आलेली नाही. आताही तेथे कमालीची दैनावस्था थैमान घालत असल्याचे दिसते.

      येथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे येथील विवाहीत महिला गुलामीचं प्रतीक असलेल्या काळ्या मण्यांच्या गाठ्या किंवा मंगळसुत्र न घालता त्याएवजी दोन्ही हातात पांढर्‍या व लाल रंगाचे असे दोन कडे घालतात. येथील मुस्लीम महिला पण बुरखे घालतांना  दिसल्या नाहीत.

      सत्तांतरामुळे पक्ष म्हणजे बाटली बदलली, पण  दारु मात्र बदलेली दिसली नाही. त्यामुळे लोकांच्या राहणीमानात फारसा फरक पडेल; असं वाटत नाही. शेतकर्‍यांच्या मालाला उचित भाव मिळत नसल्याने कर्जात बुडालेल्या शेतकर्‍यांनी विदर्भासारखे येथेही आत्महत्त्या करीत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचल्या आहेत.

            बोनगावात सायकलरिक्षा व ऑटो क्वचित दिसतात. तेथे महाराष्टात सामान वाहून नेणारे ढकलगाडी जसे असतात, तसे माणसांना घेऊन जाणारे सायकल-ढकलगाडी सर्रास जिकडे-तिकडे मोठ्या प्रमाणात रोडवर दिसत होत्या.

            आम्ही घरी गेल्यावर सुनेने विचारले, ’तुम्हाला व्हॅन दिसल्या.? मला वाटलं व्हॅन म्हणजे मारुतीव्हॅन असावेत. पण हे वेगळेच वाहन होते. इकडे सायकलने जोडलेल्या ढकलगाडीला व्हॅन असे म्हणतात; असे तिने सांगितल्यावर आम्हाला हसू आले.

            ह्या. व्हॅनवर  पुढे दोन व मागे दोन असे चार लोक खाली पाय सोडून निवांतपणे बसून जातात. पाऊस आला तर व्हॅनवरील प्रवाशांना जर छत्री नसेल तर ओले झाल्याशिवाय गत्यंतर राहात नाही.  कारण त्यांच्या व्हॅनवर वर काही आवरण नाही आणि बसायची जागा पण ओली होऊ शकते. उन्हा-पावसाच्या सुरक्षेसाठी प्रवाशांनाच छत्र्या घेऊन बसावे लागते.

          ह्या व्हॅनचे भाडे मात्र कमी आहे. इतर प्रवाशाच्या ’शेअर सिस्टीम’मुळे भाडे केवळ पाच रुपये व त्यापेक्षा दूर असेल तर त्यापेक्षा थोडं जास्त होतं. पण किमान भाडे फक्त पाच रुपये. येथे रुपयाला टका म्हणतात. यांच्या संघटनेने दुसर्‍या वाहनांना येऊ दिले नाही, असे समजले. रेल्वे आली की, आमच्या घरासमोरुन रोडने हे व्हॅन भरभरून जायचे. हे व्हॅनवाले आणि इतर सर्वसामान्य लोक सर्रास उघडपणे कुठेही बिड्या ओढतांना दिसतात. त्यामुळे वायूचं प्रदुषन झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या धुम्रपानाचा मला फार त्रास होत होता.

      येथील लोक सायकलीचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याचे दिसते. त्यामुळे पेट्रोलवर धावणाऱ्या दुचाकी वाहनाने होणारे प्रदुर्षण टाळण्यास मदत होते, ही गोष्ट काही कमी महत्वाची नाही.

      तेथील स्थानिक लोकांना हिंदी समजत नाही, असं नाही. काही हिंदी बोलत पण होते. पण बर्‍याच लोकांना समजतही नव्हतं व बोलताही येत नव्हतं; अशीही परिस्थिती होती. पण बंगाली भाषा जरी आपल्याला समजत नसली तरी ऐकायला मात्र फार गोड वाटते. कदाचित बंगाली लोक रसगुल्ला, चमचम सारखे गोड पदार्थ मोठ्या चवीने खात असल्याने त्यांच्या भाषेत गोडवा तर निर्माण झाला नसावा ! आम्हाला शेजारच्या एका बंगाली कुटुंबांनी जेवायला बोलाविले होते. त्यांनी जेवायच्या आधी आम्हाला बंगाली मिठाई खायला दिली. जेवणात त्यांनी मांसाहारात मच्छीफ्राय. चिकनकरी त्याशिवाय दोन प्रकारच्या शाकाहारी भाज्या, मसुरची डाळ, भात व पोळ्या असा मेनू होता. तेथील लोक जेवणात तर भात खातातच त्याशिवाय सकाळच्या नास्त्यात सुध्दा भात खातात. जेवणात कधी पोळ्या खात नाही. येथे स्वयंपाकात फोडणीला सरसोच म्हणजे मोहरीचं तेल वापरतात.

      एखाद्यं सामान विकत घ्यायला गेलो की, त्याला  काय म्हणायचं ते कळत नव्हतं. मग ती वस्तू जर दिसण्यासारखी असली, की त्याला हाताचा स्पर्ष करुन सांगावे लागत होते. माझ्या सुनेला किराणा घ्यायचा असला की, दुकानातील वस्तूला हात लाऊन सांगत होती. अशी भाषेची अडचण येत होती.

      कपडा खरेदी करतांना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे सारे कपडे न दाखविता एक कपडा दाखविला व पसंद पडला नाही तर त्याची घडी करून ठेवल्यानंतरच दुसरा कपडा दाखवीत. महाराष्ट्रात मात्र बऱ्याच ठिकाणी कपडा पसंद पडेपर्यंत दाखविलेल्या कपड्याचा ढीग पडत असतो.

      येथे मच्छीचा मोठा बाजार भरतो. आम्हा खवय्यांची जणू पर्वणीच. गावाजवळ समुद्र नाही, पण गोडे पाण्याचे छोटे छोटे तलाव म्हणजे पॉंड्स आहेत. त्यात मासे पाळतात व मोठ्या झाल्यावर विकतात. रहू, कथला ह्या महाराष्ट्रातील मासे तिकडे पण मिळतात. तेथील बेटकी मासा खायला चवदार वाटला, पण महाग आहे. ३०० रुपये किलो. बांगलादेशाचा इलीस मासा ज्याला पश्चिमबंगाल मध्ये हिंल्सा म्हणतात – क्वचित येतो. त्याची किंमत जवळपास १००० रुपये किलोपर्यत तरी असते. इतका तो महाग आहे. त्याला बोनगावच्या मच्छीबाजारात घेण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे राहावे लागते, असं म्हणतात. तो बांगलादेशाचा राष्ट्रीय मासा म्हणून ओळखल्या जातो.

      एकदा बांगलादेशाचा राष्ट्रीय मासा कोणता असा प्रश्न ‘कौन बनेगा करोडपती’ या टी.व्ही. कार्यक्रमात विचारला होता. या माशाला बारीक काटे असतात. पण खायला तुपाच्या चविसारखा अत्यंत रुचकर आणि वेगळाच लागतो. आम्ही खाऊन त्याची प्रत्यक्ष चव घेतली तेव्हा खरोखरच तृप्त झालो.. येथे मोठे झिंगे म्हणजे प्रॉन्स मिळतात. त्याच्या किंमती ४०० रुपयापासून ६०० रुपये किलोपर्यंत आहेत.

      येथे भारत-बांगलादेशाची सीमारेषा आहे. दोन्ही देशाच्या सीमारेषेत ‘झिरो पॉईंट’ किवा ’नो मॅन लॅंड’ अशी रिकामी जागा आहे. म्हणजे या जागेवर कोणत्याच देशाची मालकी नाही. आहे की नाही गम्मत ! आम्ही या जागेवर जाऊन थांबलो तेव्हा मनात वेगळीच भावना दाटून आली होती.

      सिमारेषेवर कुठेकुठे काटेरी कुंपण केले आहे. पण काही गाव असे आहेत की ते भारतात आहेत की बांगलादेशात आहेत याचा निर्णय अजूनही झालेला नाही. काही घरे भारतात तर त्या घराचे आंगण बांगलादेशात आहेत, अशीही गंमत पाहायला मिळाली. येथूनच स्मगलींगचा व्यवहार होण्यास मोठा वाव आहे, असे कळले. बागलादेशात गाई-बैलाचं मास मोठ्या प्रमाणात खात असल्याने या जनावरांची तेथे फार मागणी आहे. म्हणूनच दुरदुरच्या राज्यातून आणलेली गुरे-ढोरे अशा गावातून किवा नदीतून लपून-छपून बांगलादेशात नेले जात असल्याचे ऐकले. पूर्वी अशा स्मगलींग करणार्‍यांना बॉर्डर सिक्युरीटी फोर्सच्या सैनिकांना फायरिंग करता येत होते. पण आता त्यांच्याकडील असे अधिकार काढून घेतल्याचे समजले. त्यामुळे स्मगलर्सवरील वचक कमी झाल्याने तेच या सैनिकांवर हल्ला करुन बांगलादेशात पळून जात असल्याच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या.

      तेथील सभेची एक आगळी-वेगळी पध्दत मला दिसली. कुठेतरी लोकांच्या भरगर्दीच्या चौकात एखादा स्टेज असतो. तेथे दोन-चार लोक खुर्च्या टाकून बसलेले असतात. एखादा वक्ता माईकवर बोलत असतात. त्यांच भाषण ऎकणारे तेथे कुणीच श्रोते बसलेले अथवा उभे असलेले दिसत नाहीत, तर तेथून भोवताल रोडच्या बाजूला दूर-दूर पर्यंत लॉउडस्पिकरचे भोंगे लावतात. त्या भोंग्याच्या माध्यमातून जाणारे-येणारे चालता चालता किंवा दुकानात बसलेले व्यापारी आपला धंदा करता करता किंवा गिर्‍हाईक सामान विकत घेता घेता, त्याचे भाषण ऎकत असतात. आहे की नाही गंमत! त्यामुळे कुणाचेही व्यवहार थांबत नाहीत किंवा कुणाला काही अडथळा निर्माण होत नाही.. ही पध्दत मला खरोखरच चांगली वाटली.

      आणखी एक गोष्ट मला पाहायला मिळाली; ती म्हणजे कोणत्याही मिरवणूक किंवा मोर्चासोबत एकही पोलीस दिसला नाही. आपल्या महाराष्टात तर अशा वेळेस लोकांपेक्षा पोलीसच जास्त दिसतात.

      कम्युनिस्ट पार्टीची एक मिरवणूक – मिरवणूक होती की मोर्चा होता, काय माहिती ? आमच्या घरासमोरून विळा-हातोडीचे चिन्ह असलेले लाल झेंडे घेऊन, घोषणा देत देत चालले होते. पण मला त्यांच्या मागे-पुढे एकही पोलीस दिसला नाही. निदान राजकीय पक्षाच्या मिरवणूकां-मोर्चासोबत तरी पोलीस आमच्याकडे जसे असतात, तसे पाहिजे होते ना ? पण नाही ! त्यामुळे मला गंमतही वाटत होती आणि पोलिसांना विणाकारण त्रास नाही, म्हणून चांगली गोष्ट असल्याचेही जाणवले होते !

      येथे महाराष्ट्रासारखे वाहनधारकांकडून पैसे उकळण्यासाठी टपून बसलेले ट्रॅफिक पोलीस मात्र दिसले नाहीत. तर त्याऎवजी कोणताही गणवेष न घातलेले, पण कोणत्याही पोशाखावर पिवळा रंगाचा जाकीट घातलेले व हातात जाड आकाराचा अर्धा-दांडूका घेतलेले कंत्राटदाराचे कर्मचारी असल्याचे दिसले. येथेही मला सरकारची काटकसरच दिसली.

      असं सांगतात की, कम्युनिस्ट राजवटीत प्रशासनामध्ये एक प्रकारची वेगळी संस्कृती निर्माण झाली होती ! कर्मचारी फारसे काम करीत नसत. वेळेवर कधी येत नसत. कामगार युनियनच्या जबरदस्त दहशतीमुळे कोणताही अधिकारी कारवाई करण्याची हिंमत करीत नव्हते. नाहीतर संप आणि आंदोलन याला सामोरे जावे लागे. आता सत्ता बदलली तरीही तृणमूल कॉंग्रेसच्या राजवटीत फारशी सुधारणा झालेली नाही, अशी माहिती मिळाली.

      एक दिवस अशीच हातात बंगला भाषेत लिहिलेले व ज्ञानेश्वर महाराज पालखट मांडून बसतात; तसे चित्र असलेले बॅनर घेऊन ढोल-ताशाच्या तालावर नाचत नाचत भल्या मोठ्या मिरवणूका राहून राहून आमच्या घरासमोरच्या रोडवरुन जात होत्या.

       मी माहिती घेतल्यावर कळले की, त्या दिवशी हरीचंद ठाकूरची जयंती होती. मला हरीचंद व गुरुचंद या दोन ठाकूर बंधूनी केलेल्या चळवळीबद्द्ल माहिती होती. त्यांनी बंगालमधील अस्पृष्य जातीतील चांडाल लोकांची, नमो-शुद्रायची चळवळ चालविली होती.

      बारासातच्या बहुजन समाज पार्टीच्या एका कार्यकर्त्यांनी एक आठवण सांगितली. माननीय कांशीरामजींनी बोनगाव येथे एकदा सभेसाठी आले होते, तेव्हा ज्या लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीवर निवडून आणले होते, त्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन येथील माती त्यांनी कपाळाला लावली होती. असा तो कार्यकर्ता सांगत होता.   

      जेस्सोर-खुलना या भागात या लोकांचा जास्त भरणा आहे. म्हणूनच जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटना परिषदेत अस्पृष्यांच्या घटनात्मक सुरक्षेसाठी जाणे आवश्यक वाटले, तेव्हा कॉंग्रेसने सारे दरवाजे बंद केले होते. त्यांना कुठूनही निवडून येणे अशक्य केले होते. सरदार पटेल यांनी जाहीर केले होते की, ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना घटना परिषदेचे दरवाजेच काय, खिडक्यासुध्दा आम्ही बंद केले आहे.’ म्हणून त्यावेळी बंगालमधील नमो-शुद्राय चळवळीचे नेते व बाबासाहेबांचे अनुयायी जोगेंद्रनाथ मंडळ यांनी मुसलमानाच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तेथून निवडून पाठविले होते. हा इतिहास त्यावेळी मला आठवला होता. पण या इतिहासाच्या खाणाखुणा मला येथे दिसल्या नाहीत.

      अशा विसरलेल्या इतिहासाचा संदर्भ घेत बोनगाव-कोलकाताची सफर संपवून आम्ही अकोल्याला परत आलो.

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 359 other followers

%d bloggers like this: